Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्यानंतर तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना नागपूर येथे घडली. या घटनेचे पडसाद नाशिकमध्येही उमटत असून, राष्ट्रवादी महिला काँग्रेसने घंटानाद आंदोलन करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. याबाबत कडक धोरण राबविता येत नसेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. विनयभंग, बलात्कारासारख्या गंभीर घटना देशभरात घडत असून, यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारांवर ठोस कारवाई होत नसल्याने असे गुन्हे करणाऱ्यांचे फावते याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. अशा गुन्ह्यांची प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवावीत, अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीसारखी कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. बेटी बचाव बेटी पढावची जाहिरात करणाऱ्यांनी आधी बेटी सुरक्षित करावी, असे आवाहन निवेदनातून करण्यात आले आहे. दिवसेंदिवस राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळत असून, गृहमंत्र्यांचे गृहखात्यावर नियंत्रण राहिलेले नाही. राज्यात महिला सुरक्षेची जबाबदारी घेता येत नसेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी केली आहे. या आंदोलनात सुषमा पगारे, सायरा शेख, सुरेखा निमसे, मिनाक्षी गायकवाड, सुजाता गाढवे, राखी शेळके, योगिता शिंदे, सलमा शेख, सरोज आदींनी घंटा व थाळी

वाजवून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झिप झॅप झूम - बालकथा

0
0

विद्याधन हेच सर्वश्रेष्ठ धन

अरुण पाटील, नाशिक

अजू आणि गजू हे दोन सख्खे भाऊ एकाच शाळेत शिकत होते. थोरला अजू गजुपेक्षा दोन इयत्ता पुढे होता. अजू अतिशय हुशार व समजदार होता. तो चिकाटीने अभ्यास करत असे. शिवाय अभ्यास केल्यानंतर आईवडिलांना कामात मदतदेखील करत असे. याउलट गजू मात्र खूपच आळशी होता त्याला अभ्यासाचा आणि शाळेचा कंटाळा होता.

आई आणि अजूदादा अभ्यासाची किरकिर लावतील म्हणून तो शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत खेळायला निघून जात असे. अजू शाळेतून सरांनी वापरून उरलेले खडूचे तुकडे घरी आणून दाराच्या फळीवर गणिताची उदाहरणे सोडविण्याचा, पाढे लेखनाचा व इंग्रजी स्पेलिंग लेखनाचा सराव करीत असे. मोठेपणी आपण शिक्षक व्हावं आणि मुलांना आवडीने शिकवावं असं ध्येय त्या छोट्या शिक्षकाने उराशी बाळगलेलं होतं. त्या दिशेने तो मेहनत करत होता. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्याने इच्छा असूनदेखील तो गुंडाळफळा विकत घेण्यासाठी तो आईजवळ हट्ट करत नसे. परीक्षा जवळ आली तरी वाचायला गाईड्स मिळत नव्हते पण याचा विचार न करता तो आपल्या मित्रांकडून अभ्यासासाठी लागणारे साहित्य घेऊन जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करत असे. रात्रीदेखील बऱ्याचदा उशिरापर्यंत जागून तो अभ्यास करत असे. गजूने मात्र आपल्या मोठ्या दादाचा अभ्यासाचा हेवा कधीच केला नाही. जेव्हा जेव्हा अजू त्याला स्वतःजवळ शिकण्यासास बोलावत असे तेव्हा तो मला हे सर्व येतं असं सांगून निघून जात असे.

वर्षाअखेरीस शाळेचा निकाल लागला आणि गजुने सर्वच विषयात लावलेले दिवे प्रगती पत्रकात चांगलेच चमकले. आईच्या धाकाने त्याने आठ दिवस त्याचा निकाल लपवून ठेवला. त्याचं हे असे वागणे न सांगता घरातील सर्वांच्या लक्षात आले. अजू मात्र चांगल्या गुणांनी पास झाला. असेच एकामागून एक दिवस निघून गेले. अजू चांगला शिकून शाळामास्तर झाला. गजू मात्र मोलमजुरी करू लागला. त्याची अवस्था फार दयनीय झाली. दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठी त्याला चांगलाच संघर्ष करावा लागत होता. त्याच्यावर आता पश्चातापाची वेळ आली होती. त्याचे डोळे उघडले. त्याला लहानपणीचे आईचे शब्द आठवले, 'गजूबेटा तू जर आजपासून अभ्यास केला नाही तर आयुष्याच्या परीक्षेत तू नापास होशील. घर, शेती, धनदौलत याचे वाटे आपण करू शकतो पण शिक्षणात कोणाचा वाटा नसतो. तू चांगला शिकून नोकरीला लागला तर तुझे भविष्य उज्ज्वल होईल. म्हणून विद्याधन हेच सर्वश्रेष्ठ धन असते.' गजूच्या डोळ्यात पाणी आलं, आता गजूला पश्चाताप करून काहीच उपयोग नव्हता कारण वेळ निघून गेलेली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीजींच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज

0
0

युवा महोत्सवात तुषार गांधी यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महात्मा गांधी यांना आपण भारतीय लोक राष्ट्रपिता मानतो पण त्यांचे विचारांचा वारसा जपण्याचा तो पुढे नेण्याचा प्रयत्न होतांना दिसत नाही असे खेदाने म्हणवे लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि गांधीजींचे पणतू तुषार गांधी बुधवारी केले.

नवी दिल्ली येथील श्रुती या सामाजिक संस्थेने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवात युवकांशी सवांद साधतांना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, प्रा. माधव पळशीकर, प्रा. विजयकुमार पाईकराव आदी मान्यवर उपस्थित होते. गांधी म्हणाले, की महात्मा गांधी यांचे उद्दिष्टे केवळ राजकीय नव्हती तर सामाजिक परिवर्तन हे देशाच्या एकात्मतेसाठी आवश्यक आहे. ही बाब गांधीजी कायम अधोरेखित करत आले. त्यांची राष्ट्राची संकल्पना केवळ भौगोलिक सीमांपुरती मर्यादित नव्हती. प्रत्येक नागरिकाच्या मनात एकमेकांना बद्दल आपुलकीची आणि आदराची भावना वाढविणे हेही त्यांच्या राजकारणातले महत्त्वाचे उद्दिष्टे होते. गांधीजींचा प्रयत्न जातीव्यवस्थेच्या मुळावरच घाव घालण्याचा होता. स्वतंत्र चळवळीत तुरुंगात जाणाऱ्या तथाकथित हलक्या जातीतील सत्याग्रहींना ब्रिटिश पोलिस संडास सफाईसारखी कामे देत असत, अशी कामे तथाकथित उच्च जातीतील सत्याग्रहींनी स्वत:हून स्वीकारावीत, याबाबात गांधीजी आग्रही असत. त्यांच्या या कृतीमुळे जातीच्या आधारावर होणारी असमानता नष्ट करण्याचाच प्रयत्न होत होता.

समाज एकत्रिकरणाची ताकद राज्यघटनेत

निराशेमध्येच उन्नतीची बिजे असतात. सध्याच्या परिस्थितीत निराश न होता दीर्घकालीन योजना सर्वच पातळीवर राबवाव्या लागतील. भारतीय समाज जन्मतःच विखुरलेला असून त्याला एकत्र करण्याची ताकद राज्यघटनेत आहे. अंत:करणातील विषमता कमी केली तरच भारत एकसंध राहण्यास मदत होईल, असे तुषार गांधी म्हणाले. राष्ट्रीय युवा महोत्सवात अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक माध्यमे, पोस्टर पेंटिंग, दृक्श्राव्य चित्रीकरण आदी विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुलं’ची फिलोसॉफी आवडती

0
0

प्राजक्त देशमुख यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पु.ल देशपांडे यांच्या विनोदी कोट्यापेक्षा त्यांची फिलोसॉफी आवडली. त्यांचे व्यंगचित्र हे माझे आवडते पुस्तक आहे. आयुष्यात काही लोक भेटायला हवी होती किंवा त्यांचा सहवास लाभायला हवा होता आणि माझी कलाकृती बघायला हवे होते असे मला नेहमी वाटते त्यापैकी पु. ल. हे एक होते, असे प्रतिपादन संगीत देवबाभळी या नाटकाचे लेखक प्राजक्त देशमुख यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महाराष्ट्रचं लाडकं व्यक्तिमत्त्व, विनोदी साहित्यिक, संगितकार, दिग्दर्शक आनंदयात्री पु. ल. देशपांडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. मी सावनाचा आजीव सभासद असून सावाना ही माझी मातृसंस्था आहे. मला लेखनाची प्रेरणा येथील पुस्तकांच्या वाचनाने झाली. माझ्या यशात सावानाचा सिंहाचा वाटा आहे, असेल्याचे देशमुख यांनी सांगितले. प्रारंभी देशमुख यांच्या हस्ते पु. ल. च्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी देशमुख यांचा सत्कार सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या हस्ते करण्यात आला. सहाय्यक सचिव अॅड. अभिजित बगदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सावानाचे कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके, बालभवन प्रमुख संजय करंजकर, डॉ. शोभा नेर्लीकर, डॉ. विनायक नेर्लीकर, डॉ. अर्चित नेर्लीकर व प्रतिभा चौधरी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डफलीच्या निनादात उरूसला प्रारंभ

0
0

पोलिसांकडून पहिली चादर चढविली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डफलीचा निनाद करत मोठ्या जल्लोषात 'शहेंशाह नाशिक' म्हणून प्रसिद्ध असलेले हुसेनी बाबा यांच्या वार्षिक यात्रोत्सवाला (उरुस) बुधवारपासून प्रारंभ झाला. पोलिसांच्या वतीने उरुसनिमित्ताने पहिली चादर चढविण्यात आली असून बडी दर्गा परिसर रोषणाईने झळाळून निघाला आहे.

उरुसच्या प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी सर्वप्रथम बाबांच्या मजारशरीफवर भद्रकाली पोलिसांकडून मिरवणुकीद्वारे सायंकाळी साडेचार वाजता आणलेली चादर चढविली गेली. विश्वस्त मंडळाकडून गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा कायम पाळली जात आहे. पोलिसांच्या वतीने डफली वादनाच्या निनादात मानाची पहिली चादर चढविण्यात आली. त्यानंतर पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक उपयुक्त अशोक नखाते आणि पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते रात्री आठ वाजता चादर चढविण्यात आली. हुसनी मस्तान मिलाद पार्टी यांनी डफली वादन केले.

यंदा ३९० वा उरुस साजरा होत असून यानिमित्ताने रात्री १० वाजता संदलचा कार्यक्रम झाला. यावेळी कबरीला चंदनाची पावडर लावून मानाची चादर चढवण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांना ट्रस्टच्या वतीने मलिदा आणि नानकटाईच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. उरुसच्या कालावधीत रोज सायंकाळी सहा वाजता कुराण पठण करण्यात येणार असून साडेसहा वाजता दुवा पठण केले जाईल.

२३ जूनपर्यंत कार्यक्रम

सर्व धार्मिक कार्यक्रम दर्गाहचे सज्जादा नशिन अलिमोद्दिन रुकनोदिदन पिरजादे, अन्सार खलील पिरजादे आणि मुनीब फहीम पिरजादा यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून रोज सायंकाळी दुवा पठण करण्यात येणार आहे. उरुस २३ जूनपर्यंत सुरू राहणार असून यावेळी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होतील.

चोख पोलिस बंदोबस्त

उरुसनिमित्ताने परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दर्गाकडे जाणारे रस्ते मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. परिसरात बॅरकेडिंग करण्यात आली असून पोलिस अधिकारी, महिला पोलिस, सध्या वेशतले पोलिस असा मोठा बंदोबस्त आहे.

विविध प्रकारचे स्टॉल

उरुसनिमित्ताने बडी दर्गाच्या परिसरात विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली आहेत. फालुदा, हलवा पराठा, बिर्यानी, आइसक्रिम, शिक कबाब, कौला, पान या खाद्यपदार्थांची दुकाने उभारण्यात आली असून गुलाबपुष्प आणि कपडे विक्रीसाठी देखील दुकाने थाटण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नद्या प्रदूषणमुक्त ठेवणे ही नैतिक जबाबदारी

0
0

अण्णासाहेब मोरे यांचे प्रतिपादन

...

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नद्या स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. नद्या कशामुळे प्रदूषित होतात, याची कारणे शोधायला हवी. नद्यांमध्ये सांडपाणी, मलमूत्र सोडण्यात येत असल्यामुळे पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे निसर्गात आमूलाग्र बदल होत आहेत. नद्या प्रदूषित होणार नाही, याची काळजी घेणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व पुरोहित संघ यांच्यातर्फे गंगादशहरा निमिताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रामकुंड येथे झालेल्या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, नगरसेवक सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, वत्सला खैरे आदींच्या उपस्थितीत गंगापूजन व आरती केली. गोदावरीला महावस्त्र, पुष्पहार, नैवद्य अर्पण करण्यात आले. भारतमातेच्या समृद्धीसाठी, चांगल्या पर्जन्यसाठी, शेती चांगली पिकावी, समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.

अण्णासाहेब मोरे पुढे म्हणाले, की जलसंपत्ती, वनसंपत्ती वाढविण्याचा प्रयत्न करावा. पाण्याचा वापर काटकसरीने करावा. वृक्ष लावून त्यांचे संगोपन करणे आपली जबाबदारी आहे. गंगापूर रोड, उदयनगर येथील केंद्र येथून गंगाजल कलशाची मिरवणूक काढण्यात आली. श्री स्वामी समर्थ केंद्रातून भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेकीच्या मूळपरतणीदिनी पित्यावर काळाचा घाला

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील अपघातात मृत्यू पावलेले पिंपळगाव खांब येथील शिवाजी बोराडे यांच्या शीतल या मुलीचा महिनाभरापूर्वीच विवाह झाला होता. तिचे सासर सुळेवाडी (ता. सिन्नर) येथील आहे. कन्यच्या विवाहानंतर बोराडे तीर्थयात्रेला गेले होते. शीतलचा बुधवारी घरी मूळपरतणीचा कार्यक्रम होता. तिला घेण्यासाठी सासरकडील मंडळी पिंपळ्गाव खांब येथे आले होते. सर्वजण आनंदात असतांनाच घरातील कर्त्या पुरुषाचा अपघाती मृत्यू झाल्याची वार्ता मिळाली. बोराडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. बोराडे यांच्या पश्चात पत्नी बेबी, दोन मुली, मुलगी शीतल आणि मुलगे किरण आणि विशाल असा परिवार आहे.

अपघातातील मृतांमध्ये सय्यद पिंप्री येथील सविता भगवंत ढिकले (वय ५५) यांचाही समावेश आहे. त्यांच्या पश्चात मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. सविता यांच्या पतीचे यापूर्वीच निधन झालेले आहे. सविता यांचे माहेर निफाड तालुक्यातील चिंचखेड येथील आहे. त्यांच्या माहेरची मंडळीही या तीर्थयात्रेत होते. परंतु, या अपघातात बहीण सविता यांचाही अंत झाला. अपघाताची माहिती समजताच सय्यद पिंप्री येथील ढिकले कुटुंबाला शोक अनावर झाला.

कुटुंबाचा आधारवड गेला

शिंदे गावातून सहा लोक तीर्थयात्रेत सहभागी गेलेले होते. त्यापैकी दशरथ जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी कौशाबाई जाधव (वय ५५) या जखमी आाहेत. त्यांना बुधवारी सायंकाळी खासगी रुग्णवाहिकेतून नाशिकरोड आणण्यात आले. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दशरथ जाधव हे महावितरण कंपनीचे निवृत्त कर्मचारी होते. सात भाऊ आणि १२ बहिणी अशा मोठ्या एकत्र कुटुंबाचे ते आधारवड होते. शिंदे सोसायटीचे त्यांनी दोन वेळा चेअरमनपद भूषविले होते. शंभर टक्के वसुलीबद्दल जिल्हा बँकेतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले होते. महावितरणमध्ये सेवेत असतांना जाधव यांनी आदिवासी दुर्गम भागात वीज वाहिन्यांचे जाळे उभारण्यात मोठे योगदान दिले होते. वयाच्या सातव्या वर्षी एका घटनेत झाडावरून खाली पडल्याने त्यांचे दोन्ही हात आणि पाय मोडलेले होते. अशाही परिस्थितीत त्यांनी एकत्र कुटुंबपद्धती जिवापाड जपली. त्यांच्या अकाली जाण्याने सुमारे ५० जणांचा समावेश असलेल्या जाधव परिवारावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रेप काउंटी रिसोर्टचा वसुंधरा पुरस्काराने गौरव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्यावरण क्षेत्रातील भरीव कामासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील ग्रेप काउंटी रिसोर्टला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे यावर्षीच्या वसुंधरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकत्याच जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रेप काउंटी रिसोर्टचे किरण चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

ग्रेप काउंटी रिसोर्टच्या परिसरात ३३ हजार झाडांची लागवड व देखभाल करण्यात येते. सौर ऊर्जेचा वापर, सांडपाण्याचा पुनर्वापर, उरलेल्या अन्नाचे व्यवस्थापन, जमिनीची धूप कमी करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग आदी बाबींचा विचार करुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. किरण चव्हाण म्हणाले,'रोज आम्हाला ३० हजार लिटर पाणी लागते. परंतु वापरल्यानंतर हे पाणी प्रक्रिया करून पुन्हा वापरात आणले जाते. अशा प्रकारे १ कोटी लिटर्स पाण्याची बचत होते. तसेच उरलेले अन्न व अन्य काचऱ्यापासून खताची निर्मिती येथे होते व येथील झाडांना प्रक्रिया केलेले पाणी व उरलेल्या अन्नातून निर्मित खत देऊनच वाढविले जाते.' रिसोर्ट भोवतीच्या १५० एकरवर बायोडायव्हर्सिटी पार्क उभारण्यात आला आहे. परिसरात रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारा १४ कोटी लिटर क्षमतेचा तलाव बांधण्यात आला आहे. तर सौर पॅनल्समुळे सुमारे ३० टक्के विजेची बचत होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ओबीसींचे तीन तुकडे ओबीसींसाठी घातक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'केंद्र शासनाकडून ओबीसी आरक्षणाबाबत न्या. रोहिणी आयोग नेमून ओबीसी आरक्षणाचे तीन विभागात विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात ओबीसींची जनगणना झाली नसताना कोणत्या आकडेवारीच्या आधारे आरक्षणाचा लाभ मिळत नाही हे ठरविले आहे,' असा सवाल उपस्थित करत ओबीसींचे तीन तुकडे हे ओबीसींसाठी अत्यंत घातक असल्यामुळे याविरोधात सर्वांनी एकत्र येत लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले. मुंबई येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची आढावा बैठक मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

भुजबळ म्हणाले,'ओबीसी आरक्षणात २ हजार ६२३ जाती आहेत. त्यातील ९८३ जातींना लाभ मिळत नसल्याचा निष्कर्ष आयोगाने काढला आहे. त्यामुळे ज्यांना लाभ मिळत नाही त्यांना १० टक्के, अंशतः लाभ मिळणाऱ्यांना १० टक्के व सर्वाधिक लाभ मिळणाऱ्यांना ७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जात असून, ओबीसीतील केवळ १० जातींना २५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळत असल्याचे निष्कर्ष काढला जात आहे.' देशात ओबीसींची जनगणना झाली नसताना कोणत्या आकडेवारीच्या आधारे आरक्षणाचा लाभ मिळत नाही हे ठरविले आहे, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. जो प्रकार ओबीसी आरक्षणाबाबत होत आहे ते इतर आरक्षणाबाबत होईल असे चित्र आहे. एकंदरीत देशातील आरक्षण डावलण्याचा प्रयत्न सुरू असून, याविरुद्ध आवाज उठवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मेळाव्यास मध्यप्रदेश प्रमुख सिद्धार्थ कुशवाह, प्रा. हरी नरके, माजी खासदार समीर भुजबळ, आ. पंकज भुजबळ, आ. रामराव वडकुते, माजी आमदार तुकाराम बिडकर, तुकाराम अभंग आदी उपस्थित होते. बापू भुजबळ यांची परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी राज्यातील सर्व पदाधिकारी व समता सैनिकांची मते जाणून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारांच्या पावसाने डाळिंब बागेचे नुकसान

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील नैताळेजवळील विष्णूनगर येथे सोमवारी (दि. ११) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस तासभर झाला. या पावसाने विष्णूनगर येथील डाळिंब व द्राक्ष बागांना गारांनी झोडपले. यामध्ये माणिक घायाळ या शेतकऱ्याच्या बागेतील डाळिंब फळांना तडे गेले असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

माणिक घायाळ यांची दीड एकर डाळिंब बाग आहे. त्यांचे कुटुंब या बागेच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती. परिसरात तीव्र पाणीटंचाई होती. मात्र, दुष्काळाचा सामना करत अक्षरशः टँकरने पाणी विकत घेऊन मोठ्या कष्टाने आपली डाळिंब बाग वाचवली. परंतु, सोमवारी विष्णूनगरमध्ये सुमारे तासभर जोरदार गारांसह वादळी पाऊस पडला. गारांच्या तडाख्याने घायाळ यांच्या डाळिंबाच्या फळाला तडे गेले तर काही फळ फुटून गेली. त्यांची सुमारे ९० टक्के बाग खराब होऊन दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. यामुळे घायाळ कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. विंचूर सजाचे कामगार तलाठी सागर शिर्के यांनी पंचनामा करीत वरिष्ठांकडे अहवाल सादर केला. सरकारने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यप्रदेशातील अपघातात नाशिकच्या चौघांचा मृत्यू

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकहून उत्तर भारतात तीर्थाटनासाठी चाललेल्या भाविकांच्या बसला मध्यप्रदेशात भोपाळ-सागर महामार्गावर अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास कुँआखेडा गावाजवळ एका वळणावर स्टिअरिंग लॉक झाल्याने ही बस उलटली. अपघातात १८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील सिव्हिल लाइन्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनंदाबाई उर्फ सविता भगवंता ढिकले (५५, रा. सैय्यद पिंप्री), दशरथ काशीनाथ जाधव (६४, रा. शिंदेगाव), शिवाजी पांडुरंग बोराडे (४०, रा. पिंपळगाव खांब) आणि मंदाबाई अशोक केदारे (५५, रा. शेवगे डांग, ता. इगतपुरी) अशी मृतांची नावे आहेत. मंदाबाई यांना उपचारासाठी नाशिक येथे सिव्हील हॉस्पिटलला आणतेवेळी त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह रात्री उशिरापर्यंत नाशिकमध्ये दाखल होणार असून, गुरुवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे. अपघातात अशोक लक्ष्मण केदारे (६२), प्रदीप रामकृष्ण जोशी (४०), सुमन बळवंत शिंदे (५८), रामदास रघुनाथ जाधव (६१), बाजीराव गणपत बेलदार (४९), वैशाली रमेश जाजू (४२), भीमाबाई रामदास जाधव (५१), भागूबाई बाळू घायवत या जखमींवर विदिशा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तर बाळू मोगल बनसोडे (४७), कौसाबाई दशरथ जाधव (६०), पुष्पाबाई भगवानदास (४०), नवनाथ विनायक कुकडे (२४), बाळू महादू पोरजे, चंद्रकला प्रकाश (४५) यांच्यावर भोपाळमध्ये उपचार करण्यात आले. किरकोळ जखमी असलेल्या व प्रकृतीमध्ये सुधारणा होत असलेल्या रुग्णांना नाशिकला पाठविण्यात आले. अपघातानंतर स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले. बस पलटी झाल्याने बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. स्थानिक पोलिसांनी तत्काळ अन्य यंत्रणांची मदत मिळवून जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, यात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. सर्वज्ञ यात्रा कंपनीच्या उत्तर भारत तीर्थयात्रेमध्ये हे सर्व भाविक सहभागी झाले होते.

आग्रह नडला

मंदाबाई अशोक केदारे यांना जखमी अवस्थेत मध्यप्रदेशातील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, त्यांनी नाशिकला जाण्याचा आग्रह धरला. त्यामुळे त्यांना नाशिकला आणण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करीत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता, आरोग्याबाबत मालेगाव स्थायीत नाराजी

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव महापालिकेच्या दवाखान्यात औषधे पुरविण्यासाठी होत असलेला विलंब, जंतूनाशक औषधे पुरवण्याकामी मागवण्यात आलेली निविदा, नव्याने खरेदी करावयाच्या ५३ घंटागाड्या, स्वच्छता आदी विषयांवर मालेगाव महापालिकेत स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या सभागृहात सभापती जयराज बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सायंकाळी स्थायी समितीची बैठक झाली. पालिकेच्या दवाखान्यातील औषध साठ्याचा विषय चांगलाच गाजला. दवाखान्यांना औषध पुरवठा करणाऱ्या मक्तेदाराची मुदत संपूनदेखील अद्याप निविदा प्रसिद्ध करण्यात न आल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर डॉ. त्रिभूवन यांनी स्पष्टीकरण देत येत्या बुधवारपर्यंत औषध पुरवण्याची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती दिली. जंतू नाशक औषध पुरविण्यासाठी २२ जून पर्यंत निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावरून मात्र समिती सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ५३ नव्या घंटागाड्या घेण्यासाठी प्रशासकीय मंजुरी झालेली असताना देखील अद्याप घंटागाड्या का पुरविण्यात आल्या नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य शिबिरात६५ जणांची तपासणी

0
0

आरोग्य शिबिरात

६५ जणांची तपासणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिला समाज सेवा समिती, भारतीय रेल विद्युत इंजिनीअरिंग संस्थान (इरिन), नाशिकरोडतर्फे श्री गुरुजी रुग्णालय, नाशिक यांच्या मदतीने इरिनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. रुग्णांचे वजन, उंची, रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण, रक्तदाब, मधुमेह व डोळ्याची तपासणी करण्यात आली. रुग्णांना त्यांच्या रोगनिदानाच्या आवश्यकतेप्रमाणे मोफत औषधेही देण्यात आली. शिबिराचा ६५ कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. महिला समाज सेवा समितीच्या निधी माथूर, दीप्ती धार्मिक, दीपा गुप्ता, वर्षा सौनकिया आदींनी शिबिरासाठी परिश्रम घेतले. डॉ विक्रांत मुंगी व अन्य डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा या वेळी मानचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला. इरिनचे निदेशक संजय दीप यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडीच्या गुन्ह्यातून उलगडली ‘मर्डर मिस्ट्री’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलिसांसाठी नेहमीच आव्हानात्मक असतो. त्यात खुनाची घटना सराईत गुन्हेगारांनी आणि थंड डोक्याने केलेली असेल तर तपासाचा प्रत्येक टप्पा हा धक्कादायक पद्धतीने समोर येतो. एका शिक्षकाच्या 'मिस्ट्रियस मर्डर'चा अशाच पद्धतीने उलगडा करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

सौरभ राजेंद्र ढगे (रा. निफाड), नीलेश उत्तम वायाळ (रा. चुंचाळे शिवार, नाशिक), सुरज केशव कांबळे (सध्या रा. निफाड, मूळ रा. एडशीगांव, जि.अकोला) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याशिवाय एक विधीसंघर्षीत बालकाचादेखील या गुन्ह्यात समावेश आहे. संजय पंडित शेवाळे (रा. गाळणे कौळाणे, ता. मालेगाव) असे खून झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. एम. ए. बीएड शिक्षण घेतलेले शेवाळे १९९६ ते १९९८ या कालावधीत हरसूल आणि सुरगाणा तालुक्यातील एका संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करीत होते. पुढे दारूचे व्यसन लागल्यानंतर शेवाळे यांची नोकरी गेली. कौटुंबिक कलहामुळे शेवाळे वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले. याच दरम्यान विविध सरकारी कार्यालय व कोर्टात अर्ज लिहून देण्याचे काम शेवाळेंनी सुरू केले. त्यातूनच त्याची ओळख सौरभ ढगे या सराईत गुन्हेगाराशी झाली. घरफोडी करण्यात मास्टर असलेल्या सौरभला जामिनदार राहिलेल्या शेवाळेंना त्यामुळे या गँगमध्ये थारा मिळाला. सौरभ आणि त्याच्या लहान भावाने चोरी करून आणलेला मुद्देमाल शेवाळे सांभाळीत असे. त्यामुळे तो सौरभच्या घरातील सदस्य बनला. पण मद्य प्राशन केल्यानंतर शेवाळे सर्व विसरून सौरभसह त्याच्या आईला शिवीगाळ करायचा. यातून वाद सुरू झाले. त्यामुळे वरील संशयित आरोपींनी शेवाळेचा गेम करण्याचा निर्णय घेतला.

हत्या अन मृतदेहाची विल्हेवाट

निफाड शहरातील उगाव रस्त्यावरील बरड वस्तीवरील एका घरात १८ मे रोजी संशयित आरोपींनी शेवाळेला दारू पाजली. यानंतर त्याची हत्या करण्यात आली. याच घरात शेवाळेचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, धुरामुळे संशयितांनी आपला प्लॅन बदलला. यानंतर आरोपींनी हा मृतदेह दुचाकीवरून शहरातील पंपिंग स्टेशन या निर्जन भागात नेला. तेथे टायर आणि पेट्रोलच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यानंतर आरोपींनी हाडे व राखसुद्धा नदीत नेऊन टाकली. एक-दोन जोरदार पावसानंतर या खुनाची वाच्यताच झाली नसती, असे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अन‌् झाला उलगडा

सौरभ ढगे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत १६ चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सौरभच्या लहान भावावर दोन, नीलेश वायाळवर चार, तर सागर जाधववर तीन गुन्हे दाखल आहेत. आडगाव येथील गुन्ह्याचा तपास करताना संशयित शहरात येणार असल्याची माहिती क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकास मिळाली होती. पोलिसांनी शिताफीने अटक करीत संशयितांकडे चौकशी सुरू केल्यानंतर या घटनेचा एक एक पदर उलगडत गेला. ही कारवाई क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, सचिन खैरनार, महेश कुलकर्णी, पुष्पा निमसे, बलराम पालकर, पोपट कारवाळ, बाळासाहेब दोंदे, रवींद्र बागुल, संजय मुळक, वसंत पांडव, प्रवीण चव्हाण आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉन्स चालकांचे धाबे दणाणले

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात नियमबाह्य लॉन्सवर महापालिका कारवाईची तयारी करीत असताना पंचवटीतील तीन लॉन्स मालकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतल्याने कारवाईची नामुष्की टळली आहे. नाशिकमध्ये बहुतांश लॉन्स आणि मंगल कार्यालये अनधिकृत असल्याचे महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. आजमितीस अनेक आस्थापना नियमबाह्य असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

सर्वाधिक लॉन्स हे पंचवटी विभागात आहेत. या विभागातील तीन लॉन्स मालकांनी वाढीव काम केल्याच्या तक्रारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून महापालिकेने या तीनही लॉन्सच्या मालकांना नोटिसा दिल्या. महापालिकेचे पथक त्या ठिकाणी पहाणी करण्यासाठी गेले असता लॉन्सच्या मालकांनी वाढीव बांधकाम काढून घेतल्याचे आढळून आले. त्यामुळे येथे होणारी संभाव्य कारवाई थांबली आहे. पंचवटीतील आठवण लॉन्स, विठ्ठल रुख्मिणी लॉन्स व मिराद्वार लॉन्स यांनी अतिक्रमणे काढून घेतली आहेत. शहर आणि परिसरात जवळपास दोनशे लॉन्स आणि मंगल कार्यालयांद्वारे वर्षाकाठी दोनशे कोटींची आर्थिक उलाढाल होत असते. या व्यवसायातून वर्षाला ६० ते ७० हजार रोजगार उपलब्ध होतात. सोबतच शेतकऱ्यांना लॉन्सच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायही उपलब्ध होत असल्याने शहर आणि आजूबाजूच्या परिसरात लॉन्स आणि मंगल कार्यालये फोफावली आहेत. परंतु, या अनधिकृत लॉन्स आणि मंगल कार्यालयांमुळे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी होत असल्याचेही चित्र आहे. त्यामुळे लॉन्स आणि मंगल कार्यालयांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून, त्यात अनेक बंधने घालण्यात आली आहेत.

टेरेस हॉटेल रडारवर

नाशिक महापालिकेच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी टेरेसवर हॉटेल तयार करण्यात आले आहे. या हॉटेल्समुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होत असून, ही अतिक्रमणे काढावीत अशी मागणी त्याच्याकडून होते आहे. या हॉटेल्स मालकांना महापालिकेने कारवाईच्या नोटिसा दिल्या असून, बंदोबस्त मिळताच त्यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आचार्य अत्रेंनी निर्भिडपणे विचार मांडले

0
0

दत्ता पाटील यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आचार्य अत्रे यांची कारकीर्द पत्रकारितेच्या माध्यमातून समजली. त्यांचे वर्णन 'प्रचंड' या एका शब्दातच करता येईल. त्यांचे विचार त्यांनी निर्भिडपणे मांडले. समाजाची व समाजकारणाची लय त्यांना सापडली होती. त्यांच्यासारखा पत्रकार व लेखक आजच्या काळात हवा होता, असे प्रतिपादन 'सावाना'च्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे माजी अध्यक्ष तथा नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयातर्फे प्र. के. अत्रे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी पाटील यांच्या हस्ते अत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. पाटील यांचा सत्कार 'सावाना'चे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या हस्ते करण्यात आला. अभ्यासिका प्रमुख प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले तर बालभवन प्रमुख संजय करंजकर यांनी आभार मानले. या प्रसंगी कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके, अर्थसचिव शंकरराव बर्वे, श्रीकांत बेणी, अंतर्गत हिशेब तपासनीस सी. जे. गुजराथी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वाधिक वाचलेली बातमी

0
0

नाना पाटेकर यांना क्लीन चिट

कथित लैंगिक शोषण प्रकरणी अभिनेते नाना पाटेकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांमुळे रखडलीगोठ्यांवरची कारवाई

0
0

म. टा.प्रतिनिधी, नाशिक

शहरातील गोठे बाहेर हलवावेत, असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिल्यानंतर नाशिक शहरातही कारवाईला सुरू झाली खरी; मात्र काही महिन्यांपासून ही कारवाई थंडावली आहे. अनधिकृत गोठे हटविण्यासाठी बंदोबस्त मिळत नसल्याने गोठ्यांवर कारवाई होत नसल्याचा दावा महापालिकेची यंत्रणा करीत आहे.

शहरातील गोठे हटविण्यासाठी ३१ डिसेंबर २०१८ ची मुदत देण्यात आली होती. मात्र, या कालावधीपर्यंत कारवाई न झाल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले होते. सोबत ही कारवाई तडीस नेण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार काही ठिकाणी कारवाई करण्यात आली. शहरात मखमलाबाद, वडाळा गाव, वडाळा रोड, कामटवाडे, चेहेडी, नाशिकरोड भागात सर्वाधिक गोठे आहेत. शहरात गोठे स्थापन करताना महापालिकेसह राज्य शासनाचाही परवाना बंधनकारक आहे. सन २०१७ मध्ये केवळ ८१५ गोठ्यांनाच परवानगी देण्यात आली असताना ९६६ गोठे आढळले आहेत. त्यामुळे तब्बल १५१ अनधिकृत गोठे शहरात आढळून आले आहेत. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाने डिसेंबर अखेरपर्यंत गोठे हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच, तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा व तुकाराम मुंढे यांनी गोठ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

दुर्गंधीचा त्रास

मनपा हद्दीतील जनावरांच्या गोठ्यांतील मलमूत्रामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. त्यातून नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडू लागला आहे, अशा तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. वडाळारोडवरील अनधिकृत गोठ्यांतील मलमूत्र रस्त्यावर वाहत असल्याने परिसरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरी वस्तीत असलेले जनावरांचे गोठे त्वरित हलविण्यात यावे तसेच अधिकृत असलेल्या गोठेधारकांना तेथील मलमूत्रांची विल्हेवाट लावण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्प उभारण्याची सक्ती केली जावी, अशा सूचना पालिकेला करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पालिकेने यापूर्वीच गोठेधारकांना नोटिसा बजावलेल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील प्रवेशद्वारांवर २४ तास नाकाबंदी

0
0

पोलिसांकडून बारा ठिकाणी तपासणी

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांबरोबर सराईत गुन्हेगारांचेही मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते आहे. त्यात मुख्यत्वे घरफोडी, चेन स्नॅचिंग, चोऱ्या करणाऱ्या सराईत आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर १२ ठिकाणी २४ तास तपासणी सुरू करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.

सध्या शहरात काही गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. चोरी, घरफोडी, वाहनचोरी असे गुन्हे होण्याच्या प्रमाणात वाढ होते आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना नांगरे पाटील यांनी ही माहिती दिली. मिशन ऑल आउटसह कोम्बिंग ऑपरेशन सातत्याने राबवले जात आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हेगारांचा सक्रिय सहभाग कमी झाला आहे. यासाठी गुन्हेगारांचे अदान-प्रदान ही मोहीमसुद्धा उपयोगी पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, स्थानिक पातळीवर उपाययोजना राबवूनसुद्धा गुन्हे घडत असून, त्यात शहराबाहेरील गुन्हेगारांचा सहभाग असल्याचा निष्कर्ष शहर पोलिसांनी काढला आहे. यास पर्याय म्हणून शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर २४ तास नाकाबंदी लावण्यात येत असल्याकडे नांगरे पाटील यांनी लक्ष वेधले. याशिवाय रात्रीच्या सुमारास ठराविक ठिकाणी वाहन तपासणी करण्यात येते. त्यात सर्वच प्रकारांच्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येते.

..

ऐंशी लाखांचा सुनियोजित वापर

पोलिस कर्मचाऱ्यांना काही ठराविक वर्षांनंतर सरकार लिव्ह ट्रव्हल्स अलाउन्स देते. मात्र, यासाठी आवश्यक त्या रजा मिळण्याची शक्यता कमी असते. रजाच मिळाल्या नाही, तर हे पैसे पुन्हा जातात. नाशिकमध्ये यंदा ८० लाख रुपये मिळाले होते. या पैशांचा कर्मचाऱ्यांसाठी योग्य तो वापर व्हावा म्हणून यंदा प्रथमच एका खासगी ट्रॅव्हल कंपनीशी करार करण्यात आला. या कंपनीमार्फत कर्मचाऱ्यांना तीन दिवस राज्यात फिरविण्यात येणार आहे. हा लाभ मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैष्णवीच्या वेणुवादनाने रसिक मोहित

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पुरिया कल्याणचे एक एक स्वर खुलवत युवा बासरीवादक वैष्णवी जोशीने नाशिकरोडच्या संगीत रसिकांना मोहित केले. बासरीवादनातून विविध राग सहजतेने सादर करत तिने आपले गुरू व प्रसिद्ध बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसियांची छाप आपल्या वादनातून दाखवून दिली.

येथील पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे वैष्णवी जोशीचा जेलरोडच्या कोठारी कन्या शाळेत बासरीवादनाचा कार्यक्रम झाला. पं. शंकरराव वैरागकर, संस्थेचे अध्यक्ष ओंकार वैरागकर, बासरी वादक अनिल कुटे, नंदकुमार देशपांडे, संदीप आपटे, अनिल लोणकर, प्रा. सुनील देवधर, प्रशांत जोशी, श्रीकांत कुलकर्णी, अंबादास कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

वैष्णवी बासरी वादन करताना पुरिया कल्याणमधील आलापीतून जणू एक एक स्वर पावसाची साद घालत अंधारावर मात करीत लख्खमय प्रकाश नादध्वनीतून बहरत होता. आलाप, झाला, तराणा यातून तिची तयारी उत्तम झाल्याचे दिसत होते. वैष्णवी ही नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सारडा कन्या मंदिरची माजी विद्यार्थिनी असून तिने आपल्या संगीत प्रवासात अनेक मैफिली खुलवल्या आहेत.

पं. शंकर वैरागकर यांनी प्रास्तविक तर ओंकार वैरागकर यांनी स्वागत केले. शुभांगी देवधर यांनी सूत्रसंचलन केले. सुधा वैरागकर, सरिता वैरागकर, सौरभ गोसावी, हितेश्वर पाटील, सौरभ गोसावी, मदन लिंभारे, प्रज्योत आढाव, बागडे आदींनी संयोजन केले.

पहाडी धूनने सांगता

पुरिया कल्याणात विलंबित झपतालातून तसेच द्रुत तीन तालात वैष्णवीने रसिकांवर मोहिनी घातली. त्यानंतर तिने राग हंसध्वनी सादर केला आणि एक छोटीशी पहाडी धून दर्जेदार पद्धतीने सादर करीत मैफिलीची सांगता केली. वैष्णवीला तबल्यावर संगीत कुलकर्णी याने साथसंगत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images