Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पाण्याच्या टँकरखाली सापडून चिमुरडा ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरासह बागलाण तालुक्यात शेतीसिंचनासह पिण्याच्या पाण्याची टंचाईने शेतकरी हैराण झाला असतांनाच टँकरने शेतीसाठी पाणी आणताना टँकरवरून खाली पडून चिमुरड्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी वीरगाव येथे घडली. अकरा वर्षाचा बालक पाण्याच्या टँकरखाली सापडून ठार झाल्याने वीरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

वीरगाव येथील शेतकरी नंदकुमार हिरामण गांगुर्डे यांची दसाना रोडवर सहा एकर शेती आहे. सद्यस्थितीत शेतामध्ये गांगुर्डे यांनी डाळिंब व भाजीपाला लावलेला आहे. उन्हाळ्यात शेतीला पाणी पुरविण्यासाठी त्यांनी टँकरने आणले. गुरुवारी सकाळी वीरगावपासून सहा किलोमीटर अंतरावरील वटार येथून ते शेतीसाठी पाण्याचे टँकर भरून आणत होते. शाळेला सुट्ट्या असल्याने इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेला अक्षय हा देखील त्यांच्या सोबत आला होता.

टँकर भरून परतत असताना टँकरवरून अक्षय खाली पडल्याने तो टँक्टरच्या चाकाखाली सापडला. या अपघातात अक्षय जागीच ठार झाला. या अपघाताचे वृत्त परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरल्याने वीरगांवसह परिसरात शोककळा पसरली. दुपारी ११ वाजेच्या सुमारास अक्षयचा अंत्यविधी करण्यात आला. अक्षयच्या पश्‍चात आई, वडील, आजोबा, तसेच दोन लहान भाऊ आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आढावा बैठकीत तक्रारींचा पाढा

$
0
0

खासदार भामरे व मंत्री भुसेंची अधिकाऱ्यांना तंबी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील अग्रसेन भवन येथे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुभाष भामरे व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी दुष्काळ आढावा बैठक आयोजित आली होती. यावेळी उपस्थित ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी गावांमध्ये सुरू असलेले टँकर कागदावर असून प्रत्यक्षात फेऱ्या होत नाहीत. ग्रामसेवक, तलाठी गावात हजर नसतात अशा तक्रारींचा पाढा वाचला. तसेच टँकर फेऱ्या वाढून मिळाव्यात, चारा छावणी सुरू करावी, रोजगार हमीची कामे सुरू करावीत, अवैध वाळू उपसा रोखावा, दुष्काळी अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी खासदार व राज्यमंत्री दोघांनी अधिकाऱ्यांना दुष्काळी स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन काम करावे अशा सूचना केल्या.

बैठकीस भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव, तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, लकी गिल, सभापती प्रतिभा सूर्यवंशी, बाजार समिती सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, नितीन पोफळे प्रांत विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत उपस्थित होते. बैठकीत प्रारंभी गटविकास अधिकारी पिंगळे यांनी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या, सुरू असलेले टँकर, अधिग्रहण केलेल्या विहिरी यांची माहिती दिली. यानंतर गावनिहाय टंचाईचा आढावा घेण्यात आला. यावेळी बाजार समिती उपसभापती सुनील देवरे यांनी झोडगे गावात चारा छावणी सुरू झाल्याची माहिती दिली. तसेच टंचाई शाखा सुरू करावी व चारा छावणी जाचक अटी शिथिल कराव्यात. टँकर २४ तासात मंजूर व्हावा, आदी मागण्या केल्या. तर लकी गिल यांनी बँक अधिकाऱ्यांच्या संबंधी प्रचंड तक्रारी असल्याचे म्हटले. यावेळी जिल्हा बँक अधिकारी बैठकीत अनुपस्थित असल्याने खासदार भामरे व भुसेंनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा बँक अनुदान देणार नसेल तर शेतकऱ्यांची खाती राष्ट्रीयीकृत बँकेत हस्तांतरित करा अशी सूचना भामरे यांनी केली.

पाण्यासाठी टाहो

बैठकीत कळवाडी गटातील ग्रामस्थांनी गिरणा धरण उशाशी असून देखील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचा तक्रारी मांडल्या. कळवाडी गटात गिरणा धरणातून ५० एमसीएफटी पाणी मिळल्यास पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल ते पाणी मिळावे अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने लकी गिल यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शोभायात्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापराक्रमी क्रांतिसूर्य महाराणा प्रतापसिंह यांची ४७९ जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कालिदास कलामंदिर येथून गुरुवारी दुपारी विविध संस्थांच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी पारंपरिक वेशभूषा केलेले समाजबांधव या शोभायात्रेत सहभागी झाले.

जयंती महोत्सवानिमित्त शहराच्या विविध भागांमध्ये महाराणा प्रताप यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. तसेच शोभायात्रेत महाराणा प्रताप बहुउद्देशीय मंडळ, महाराणा प्रताप उन्नती मंडळ, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, हिंदू एकता आंदोलन पक्ष, महाराणा प्रताप सेवा संस्था, चेतक ग्रुप, क्षत्रिय संस्था, महाराणा प्रताप मित्र मंडळ, क्षत्रिय राजपूत सामाजिक संस्था, राजपूत बेलदार समाज, कातारी-शिकलकर समाज या शोभायात्रेत सहभागी झाले. यात एका वाहनावर महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा विराजमान करण्यात आला. तसेच विलास पाटील यांनी महाराणा प्रताप यांची वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधिराती काही ऐतिहासिक देखावे वाहनावर लावण्यात आले. बी. डी. भालेकर शाळेच्या मैदानावरून निघालेली शोभायात्रा शालिमार, मेनरोड, रविवार कारंजा मार्गे पंचवटी कारंजावर पोहचली. तेथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.

सिडकोत अभिवादन

सिडकोतील महाराणा प्रताप चौकात झालेल्या कार्यक्रमात महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी नाना महाले, खासदार डॉ.भारती पवार, सहायक पोलिस आयुक्त वसावे, जयंती उत्सव समिती अध्यक्षा देवयानी पाटील, प्रभाग सभापती हर्षा बडगुजर, नगरसेवक सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, राजेंद्र महाले, कल्पना पांडे, बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, विजय कुलकर्णी, रामसिंग बावरी, जयप्रकाश गिरासे, जगतसिंह जाधव आदी उपस्थित होते. समाजातील विशेष प्राविण्यप्राप्त महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर यांचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला.

आरोग्य तपासणी

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात आली. यात मोरवाडी येथील महाराणा प्रताप उन्नती मंडळ, त्रिमूर्ती चौक येथील दिव्या अॅडलॅब, त्रिमूर्ती चौकातील देवी मंदिर, मुंबई नाका येथील महाराणा प्रताप बहुउद्देशीय मंडळ, कातारी-शिककलकर समाज आणि महाराणा प्रताप युवा फाउंडेशन, द्वारका येथील हिंदू एकता आंदोलन पक्ष, पिंपळ चौक येथील महाराणा प्रताप सेवा संघ आणि फुलेनगर परिसरातील महाराणा प्रताप नगर येथील कातीर समाज संघातर्फे आरोग्य शिबिर आणि रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुलीवर भर, उत्पन्नवाढ भराभर

$
0
0

महापालिकेच्या तिजोरीला दिलासा, बिकट स्थितीत नगररचनाची चांगली वसुली

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना विभागामागे गेल्या दोन वर्षापासून लागलेले शुक्लकाष्ठ अखेर काहीसे कमी झाले असून, आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच विभागाची ४७ कोटींची वसुली झाली आहे. विशेष म्हणजे भ्रष्टाचार, गैरव्यवहार अशा विविध आरोपांनी घेरल्या गेलेल्या विभागातील अधिकाऱ्यांनी वसुलीत दमदार कामगिरी करीत एकूण उद्दिष्टापैकी पहिल्या दोन महिन्यातच २५ टक्के वसुलीचे उद्दिष्ट गाठले आहे. विकासशुल्कातून पालिकेला तब्बल १३ कोटी, तर टीडीआर शुल्कातून साडेपाच कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी हा निधी वापरता येणार आहे.

महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाचा स्रोत असलेला नगररचना विभाग हा गेल्या वर्षभरापासून वादात सापडला आहे. वादग्रस्त २१ कोटींचे भूसंपादन प्रकरण, टीडीआर हस्तांतरण, अधिकाऱ्यांच्या बदल्या या कारणांमुळे हा विभाग चांगलाच वादग्रस्त ठरला होता. जीएसटी अनुदानानंतर दुसऱ्या क्रमांकाचे उत्पन्न महापालिकेला या विभागातून मिळते. परंतु, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बांधकाम क्षेत्राला लागलेल्या मंदीचा फटका या विभागाच्या उत्पन्नालाही बसला आहे. त्यामुळे महापालिकेच्या विकासकामांवर त्याचा थेट परिणाम होत आहे. सन २०१८-१९ मध्ये नगररचना विभागाला २५० कोटींचे उद्दिष्टे मिळाले होते. प्रत्यक्षात वसुली मात्र अवघी ५० कोटींच्या आसपास झाली होती. त्यामुळे पालिकेचे बजेटही कोलमडले होते. शहर विकास नियंत्रण नियमावली आणि ऑटो डीसीआर प्रणालीतील त्रुटीमुळे बांधकाम परवानग्या रखडल्याचा परिणाम हा विभागाला आर्थिकदृष्ट्या भोगावा लागला. एकीकडे बांधकाम परवानग्यांमध्ये अनेक अडथळे उभे राहिले असताना, या विभागातील अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहेत. एकवीस कोटींच्या वादग्रस्त भूसंपादन प्रकरणामुळे विभागाची चांगलीच बदनामी झाली होती. परंतु, अशा बिकट परिस्थितीतही विभागाने चांगले काम केले होते.

...

... असा मिळाला महसूल

नगररचना विभागाला सन २०१९-२० या आर्थिक वर्षात २०२ कोटींचे उद्दिष्टे देण्यात आले आहे. परंतु, नगररचना विभागाने एप्रिल आणि मे या दोन महिन्यातच ४७ कोटींची वसुली करीत २५ टक्के वसुलीचे उद्दिष्टे पूर्ण केले आहे. त्यात १३ कोटी ३८ लाख रुपये विकासशुल्कातून आले, तर हार्डशिप प्रीमियममधून ५५ लाख रुपये मिळाले आहेत. अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक अधिमूल्यातून एक कोटी ३४ लाख, टीडीआर विकास शुल्कातून पाच कोटी मिळाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडाने घेतला मोकळा श्वास

$
0
0

गोदाघाटाची स्वच्छता

...

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

धरणातून गोदावरीत पाणी सोडणे बंद झाल्यानंतर रामकुंडातील पाण्याचा प्रवाह थांबला होता. रामकुंडासह इतर कुंडातील पाणी खराब झाले होते. पाण्यात कचरा, निर्माल्य, गाळ साचला होता. अशा पाण्यात स्नान करण्याचे भाविक टाळीत होते. हे कुंड स्वच्छ करण्याचे काम गुरुवारी (दि. ६) घनकचरा व्यवस्थापन विभाग व बांधकाम विभाग यांच्या वतीने करण्यात आले. सर्वच कुंडातील पाणी काढून त्यातील कचरा, घाण, चिखल बाहेर काढून कुंडांच्या पायऱ्या स्वच्छ करण्यात आल्या.

होळकर पुलाखालून येणारे पाणी अगोदर लक्ष्मणकुंडात येत असते. त्यानंतर रामकुंडात येते. लक्ष्मण कुंडात प्रचंड घाण साचली होती. या कुंडांच्या पाण्यावर कचरा तरंगत होता. पाण्यावर पिवळसर काळपट तवंग पसरलेल्या दिसत होता. हेच पाणी पुढे रामकुंडात जात असल्यामुळे अशा पाण्यात स्नान करणे शक्य होत नसल्याने येथे स्नान करण्याचे भाविक टाळीत होते. येथील कुंडमधील पाणी स्थिर असल्यामुळे पाणी अस्वच्छ झाले होते, काही भागात दुर्गंधी सुटली होती. कुंडांच्या पायऱ्यांवर शेवाळ जमा झाल्याने त्यावरून पाय घसरून पडण्याची शक्यता वाढली होती.

या कुंडांची आणि गोदाघाटाची स्वच्छता करण्यासाठी महापालिकेच्या दोन विभागांनी हे काम हाती घेतले. या मोहिमेत बांधकाम विभागाचे सुनील थळकर व त्यांचे १५ कर्मचारी घनकचरा विभागाचे संजय दराडे, दीपक चव्हाण, किरण मारू, राकेश साबळे व १८ सफाई कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

..

सर्वच कुंडांची साफसफाई

लक्ष्मणकुंड ते दुतोंड्या मारुतीपर्यंत गोदावरी पात्रातील गाळ, कचरा, कपड, मातीची भांडी, प्लास्टिक काढून कुंड स्वच्छ करण्यात आले. लक्ष्मणकुंड, रामकुंड, सीताकुंड, दुतोंड्या मारुतीजवळील पात्र येथून तीन ट्रॅक्टर वाळू मिश्रित गाळ व कचरा काढण्यात आला. कुंडातील गाळ व कचरा काढून कुंडांच्या शेवाळलेल्या पायऱ्या पाण्याच्या प्रेशरने स्वच्छ करण्यात आल्या. कुंड स्वच्छ केल्यानंतर त्यांच्यात पाणी सोडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकीत पेमेंटसाठीतहासीलवर मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्यातील केजीएस साखर कारखाना व देवळा तालुक्यातील वसाका साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे राहिलेले पेमेंट दहा दिवसांत दिले नाही तर तहसीलसमोर गळफास आंदोलन घेऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला.

शेतकरी संघटनेच्या ऊस उत्पादकांना घेऊन निफाड बाजार समितीच्या आवारातून मोर्चा काढण्यात आला. निफाड तहसील येथे मोर्चा आल्यानंतर तहसीलदार दीपक पाटील यांनी या प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकारीवर्गाला दूरध्वनीवरून संपर्क करून मोर्चेकऱ्यांच्या मागण्या सांगितल्या. यावेळी पुणे साखर आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी नाशिक विशेष लेखा परीक्षक संस्थाचे लक्ष्मण महाले यांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली. यावर लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, तालुकाध्यक्ष संजय पाटोळे यांनी केले. साहेबराव मोरे, निवृत्ती गारे, भाऊसाहेब तासकर, रासाका कामगार संघटनेचे अध्यक्ष बळवंतराव जाधव, सरचिटणीस उत्तमराव रायते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये पुरोहितांमध्ये‘स्थानिक- बाहेरचे’ वाद

$
0
0

तिघांना मारहाण झाल्याची तक्रार

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबली विधी करण्यावरून स्थानिक आणि बाहेरचे पुरोहित यांच्यामध्ये पुन्हा वाद निर्माण झाला आहे. एका आखाड्याच्या जागेत शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास होत असलेल्या नारायण नागबली पूजेस स्थानिक पुरोहितांनी बाहेरगावच्या पुरोहितांना विरोध केल्याने हा वाद थेट पोलिस ठाण्यात गेला आहे. यामध्ये बाहेरच्या १९ पुरोहितांनी आपल्यापैकी तिघांना मारहाण झाल्याची तक्रार दहा स्थानिक पुरोहितांविरुद्ध दिली आहे. रात्री उशिरापर्यंत त्र्यंबक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम सुरू होते. त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावाहून आलेल्या पुरोहितांपैकी काहींनी बहुउदेशीय पुरोहित संघ स्थापन केला असून, त्यांनी आनंद आखाड्याची जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. या जागेत शुक्रवारपासून नारायण नागबली पूजा सुरू केली होती. त्याला स्थानिक पुरोहितांनी आक्षेप घेतला असता, बाचाबाची झाली. यामध्ये तीन बाहेरच्या तरुणांनी आपणास मारहाण केल्याचे म्हटले आहे.

त्र्यंबकेश्वर येथे पूर्वापार स्थानिक पुरोहित नारायण नागबली पूजाविधी अहल्या गोदावरी संगमावर करीत असतात. काही वर्षांपासून येथे राहावयास आलेल्या बाहेरच्या पुरोहितांनी नारायण नागबली विधी करण्यास सुरुवात केली असता त्याला स्थानिक पुरोहितांनी हरकत घेतली व तेव्हापासून हे वाद सुरू झाले आहेत. त्र्यंबकेश्वर येथील पुरोहितांनी आपल्याकडे पेशवेकालीन सनद असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे येथे बाहेरच्या पुरोहितांना हा विधी करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. याबाबत बाहेरच्या पुरोहितांनी बहुउद्देशीय ब्राह्मण संघ स्थापन केला आहे. घटनेने दिलेल्या हक्काप्रमाणे आम्ही हा विधी करणार, असे या संघाचे म्हणणे आहे. याबाबत स्थानिक पुरोहितांच्या म्हणण्याप्रमाणे हा विधी म्हणजे स्मशान विधी असल्याने तो ठरलेल्या जागेतच करावयाचा असतो. बाहेरगावचे पुरोहित जमेल तेथे जागा घेऊन कुठेही हा विधी करीत असल्याने यामध्ये भाविकांची दिशाभूल होते. यामध्ये काही परप्रांतीय पुरोहितही येथे विधी करण्यासाठी इच्छुक असल्याने भाविकांची फसवणूक झाल्यास त्याला जबाबदार कोणाला धरणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. एकूणच हा वाद आता विकोपाला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन हजार क्विंटल तूरडाळीसाठी साकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऐन दुष्काळी परिस्थितीत तूरडाळीच्या दराने शंभरी गाठली असून, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने सरकारकडे तीन हजार क्विंटल डाळीची मागणी केली आहे. जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्यक्रम अशा वर्गातील सुमारे सहा लाख शिधापत्रिकाधारकांना ही डाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मराठवाडा, विदर्भात दुष्काळ आणि अवेळी पडलेल्या पावसामुळे धान्य आणि कडधान्यांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने धान्य आणि कडधान्यांचे दर वाढत आहेत. तूरडाळ प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून वरण गायब होऊ लागले आहे. गेल्या दोन महिन्यांत टप्प्याटप्प्याने तूरडाळीच्या दरात प्रतिकिलो ३६ रुपयांनी वाढ झाली आहे. राज्य सरकारने सर्वसामान्यांकरिता रेशन दुकानांतून ५५ रुपये किलो दराने तूरडाळ उपलब्ध करवून देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीदेखील सुरू केली आहे. परंतु, अनेक ग्राहकांना गेल्या दोन महिन्यांपासून रेशन दुकानांवरही तूरडाळ उपलब्ध झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाने तीन हजार क्विंटल डाळीची मागणी नोंदविली आहे. सध्या पुरवठा विभागाकडे १५ दिवसांचा डाळीचा साठा उपलब्ध आहे. नोंदविलेल्या मागणीप्रमाणे डाळ प्राप्त झाल्यास जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्यक्रम वर्गातील सुमारे सहा लाख शिधापत्रिकाधारकांना त्याचा फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंगल कार्यालये, लॉन्सना अंतिम नोटिसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना विभागाने नव्याने केलेल्या सर्वेक्षणात शहरात ११० मंगल कार्यालये व लॉन्स अनधिकृत असल्याचे आढळून आले असून, त्यांना महापालिकेच्या नगरविकास विभागाने अंतिम नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ६९ मंगल कार्यालये आणि ४१ लॉन्सचा समावेश आहे.

या अनधिकृत लॉन्स आणि मंगल कार्यालयांच्या फायली थेट अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित मंगल कार्यालये आणि लॉन्सवर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता आहे. शहरातील अनधिकृत मंगल कार्यालये, लॉन्सविरोधात वर्षभरापूर्वी स्थगित करण्यात आलेली महापालिकेची कारवाई आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुन्हा एकदा सुरू केली आहे. महापालिका क्षेत्रात लॉन्स व मंगल कार्यालयांची परवानगी घेण्यासाठी विशेष नियमावली नवीन विकास नियंत्रण नियमावलीत समाविष्ट करण्यात आली आहे; परंतु नियम धाब्यावर बसवित शहर व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर लॉन्स आणि मंगल कार्यालये उभी राहिली आहेत. अनेक लॉन्स व मंगल कार्यालयांमध्ये अनधिकृतपणे बांधकाम केलेले असून, त्याबाबतच्या तक्रारी नगररचना विभागाकडे आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने गेल्या वर्षी शहरातील सर्व लॉन्स व मंगल कार्यालयांचे विभागनिहाय सर्वेक्षण केले होते. यामध्ये १६७ अनधिकृत लॉन्स आणि मंगल कार्यालये आढळून आली होती. नगररचना विभागाने अनधिकृत मंगल कार्यालये व लॉन्सचालकांना नोटिसाही बजावल्या होत्या. त्यानुसार बहुतांश मंगल कार्यालये, लॉन्सचालकांनी आपापली अनधिकृत बांधकामे स्वत:हून हटविली. त्यानंतर उद्भवलेल्या गंगापूररोडवरील ग्रीन फिल्ड प्रकरणानंतर अनधिकृत मंगल कार्यालयांविरोधातील महापालिकेची मोहीम थंडावली होती. परंतु, आयुक्त गमे यांनी पुन्हा ही अनधिकृत मंगल कार्यालये आणि लॉन्सविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. त्यांनी फेरसर्वेक्षण केले होते. नगररचना विभागाने नव्याने केलेल्या फेरसर्वेक्षणात १६१ मंगल कार्यालये आणि लॉन्स आढळले आहेत. त्यात ७४ मंगलकार्यालये आणि ८७ लॉन्सचा समावेश होता. त्यापैकी पाच मंगल कार्यालये आणि ४६ लॉन्सधारकांनी महापालिकेकडून परवानगी घेतल्याचे समोर आले. त्यामुळे ६९ मंगल कार्यालये आणि ४१ लान्सधारकांनी अद्यापही परवानगी घेतलेली नसल्याने त्यांच्यावर आता अंतिम कारवाई सुरू केली आहे. या सर्वांना अंतिम नोटिसा बजावण्याचे काम नगररचना विभागाने सुरू केले आहे.

--

मुदतीत खुलाशासाठी धावपळ

नगररचना विभागाने ही ११० अनधिकृत मंगल कार्यालये आणि लॉन्सला अंतिम नोटीस बजावली असून, या नोटिसांना समाधानकारक उत्तर आले नाही किंवा संबंधित मालकाने दंडात्मक शुल्क भरून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला नाही, तर त्यांच्यावर कारवाई अटळ आहे. त्यासाठी नगररचना विभागाने या सर्व ११० अनधिकृत लॉन्स आणि मंगल कार्यालयांच्या फायली अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे पाठविल्या आहेत. नोटीस देताना तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे मुदतीत खुलासा करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणरक्षणासाठी नोकरीला रामराम...

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

नाशिक : देशात असलेली दुष्काळाची परिस्थिती, पाण्यावाचून नागरिकांचे होणारे हाल, ओसाड पडणारी जमीन हे दृश्य सहन होत नसल्याने एका कलाशिक्षकाने चक्क नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्णवेळ पर्यावरणरक्षणासाठी देऊन विविध प्रकारचे कार्य करण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे, त्यांचे नाव आहे केशव कासार.

केशव कासार हे भगूर येथील रहिवासी असून, ते ठाणे येथील ठाणे स्कूल ऑफ आर्टमध्ये कार्यरत होते. मे महिन्याच्या शेवटी त्यांनी या कॉलेजच्या व्यवस्थापनाकडे राजीनामा दिला असून, आपल्या कार्याची सुरुवात भगूरजवळील शिवडे येथून करीत आहेत. केशव कासार हे हाडाचे कलाशिक्षक देवळाली कॅम्प येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जे. डी. फाइन आर्ट व जे. डी आर्ट सिरॅमिकचे शिक्षण पूर्ण करून वसईच्या रॉबी डिसिल्वा कॉलेज ऑफ आर्टमध्ये शिकविण्यास सुरुवात केली. त्यानंतर चित्रकला महाविद्यालय, नाशिक, ललित कला महाविद्यालय, भारती कॉलेज ऑफ फाइन आर्ट, भारती विद्यापीठ, ठाणे स्कूल ऑफ आर्ट या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केले. हे करीत असताना पर्यावरणसंवर्धक अभिनेते सयाजी शिंदे यांच्याशी अनेक वर्षांपासून मैत्री असल्याने ते आपसूक देवराई या प्रकल्पाकडे ओढले गेले. कॉलेजमध्ये शिकवितानाच त्यांनी या कामानिमित्त अख्खा महाराष्ट्र पालथा घातला.

--

यामुळे आला विचार

शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने कासार यांना पर्यावरणाची मुळातच आवड आहे. पूर्वीपासूनच त्यांचे पर्यावरणरक्षणाचे सुरू आहे. या कामाने गेल्या चार वर्षांत आणखी जोर धरला. अहमदनगर, पुणे, नागपूर येथे देवराई साकारताना भीषण परिस्थिती समोर येत गेली. सरकारी पातळीवरून व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून काम होत असताना केवळ पर्यावरणसंवर्धन होत नाही, अशी ओरड करण्यापेक्षा या कामाची सुरुवात आपल्या स्वत:पासून का करू नये, असा विचार त्यांच्या मनात आला अन् त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

--

हे काम करणार

कासार यांनी एक टीम तयार केली असून, कोणत्या जमिनीवर कोणत्या वृक्षांची लागवड करायची याचे नियोजन त्यांच्याकडून केले जात आहे. सुरुवातील शिवडे येथे वड, पिंपळ, औदुंबर, बेल, कडुनिंब, पळस, पांगरा या झाडांची लागवड ते करणार आहेत. त्याचप्रमाणे चिंच, आंबा, जांभूळ, बेल, कवठ, करवंद आदी झाडेही लावणार आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते विविध ठिकाणी झाडे लावणार आहेत. येत्या काही दिवसांत जेथे मोकळी जमीन मिळेल, तेथे वृक्षारोपणाचा त्यांचा मानस आहे.

--

देवराईनिमित्त महाराष्ट्रभर फिरताना दुष्काळ किती भयानक आहे याची जाणीव झाली. त्याला सामोरे जाण्यासाठी स्वत:पासूनच सुरुवात करावी म्हणून हा निर्णय घेतला आहे. आपण स्वत: बदललो, तरच जग बदलेल, अशी माझी धारणा आहे.

-केशव कासार, निसर्गसंवर्धक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील पहिले ‘भेळभत्ता’ क्लस्टर सुरू

$
0
0

वर्धापनदिन विशेष

Gautam.Sancheti@timesgroup.com

Twitter - SanchetigMT

नाशिक : महाराष्ट्रातील पहिल्या भेळभत्त्याचे क्लस्टर चांदवड येथे सुरू झाले आहे. १३१ पेक्षा अधिक भेळभत्ता व्यापाऱ्यांना एकत्र करून रेणुका भेळभत्ता क्लस्टर कंपनीची स्थापना करण्यात आली असून, वर्षभराच्या प्रयत्नांनंतर हे क्लस्टर कार्यान्वित झाले आहे. येथील भत्ता आता राज्याच्या सर्व भागांत जाणार आहे. त्यामुळे नाशिकचे नाव आणखी उंचावणार आहे, तसेच ग्रामीण भागात या क्लस्टरमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

भेळभत्त्याचे ब्रँडिंग व्हावे व राज्यभर त्याची विक्री करता यावी, यासाठी सरकारी मदतीने हे क्लस्टर बनवण्यात आले आहे. या अगोदरच नाशिकच्या चिवड्याने अनेकांना भुरळ घातली आहे. त्यात आता चांदवडच्या क्लस्टरमुळे भर पडणार आहे. राज्य सरकारने या क्लस्टरसाठी पाच कोटींची मदत दिली असून, त्यात कंपनीचा २० टक्के निधी आहे. उद्योगांना सामूहिक सोयी-सुविधा त्यांच्या गरजेनुसार एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अनेक उद्योगांच्या क्लस्टरसाठी मदत करते. त्यातूनच ही मदत करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी भेळभत्ता प्रसिद्ध आहे; पण उर्वरित महाराष्ट्रात भत्ता हा प्रकार फारसा माहीत नाही. त्यामुळे त्याचे आधुनिक पद्धतीने पॅकेजिंग करून त्यात नवीन तंत्रज्ञान या क्लस्टरच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना मिळणार आहे. जिल्ह्यात याअगोदर केंद्र सरकारच्या मदतीने नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर व मालेगाव येथे टेक्स्टाइल्स क्लस्टर कार्यान्वित आहे. आता त्यात या क्लस्टरची वाढ झाली आहे. सूक्ष्म व लघु उद्योगाला बळ मिळावे या हेतूने राज्य सरकारने क्लस्टर योजना तयार केली आहे. किमान दहा सभासद यासाठी असावे ही अट आहे. या क्लस्टरच्या सभासदांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी याअगोदरच त्यांना हल्दीरामच्या प्लँटला भेट देऊन माहिती देण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात म्हैसूर येथे सीएफटीआरआयमध्ये प्रशिक्षण दिले गेले. त्यानंतर हे क्लस्टर सुरू झाले आहे.

चांदवड येथे भेळभत्ता क्लस्टर सुरू झाले आहे. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान, आधुनिक पॅकेजिंग मशिनरी, स्टीकर यांसारख्या सामूहिक गोष्टी येथे केल्या जाणार आहेत. छोट्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे क्लस्टर महत्त्वाचे ठरणार आहे.

पी. पी. देशमुख, उद्योग सहसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोळक्याकडून दोन भावांना मारहाण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने चौघांच्या टोळक्याने दोन भावांना बेदम मारहाण केल्याची घटना भारतनगर भागात घडली. या घटनेत एक जण जखमी झाला असून, मुंबई नाका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अल्ताफ हुसेन सय्यद, तोहिद खलील शेख, इरफान व इम्रान अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी परिसरातील तौसिफ रियाजउद्दीन शेख (वय २३, रा. आयएसआय हॉस्पिटलजवळ, त्र्यंबकरोड) या तरुणाने पोलिसांकडे फिर्याद दिली. तौसिफ शेख व त्याचा भाऊ बुधवारी सायंकाळी भारतनगर येथील म्हाडा बिल्डिंगसमोरून पायी जात असताना ही घटना घडली. दोघे भाऊ रस्त्याने पायी जात असताना एकाला दुचाकीचा धक्का लागल्याने त्यांनी संशयिताना जाब विचारला. या वेळी संशयितांनी दोघांवर हल्ला चढवत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या वेळी एकाने तौसिफच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने तो जखमी झाला. संशयित आरोपींनी या वेळी त्याच्या गळ्यातील चांदीची साखळी तोडून गहाळ केली. हवालदार ठाकूर तपास करीत आहेत.

बजरंगवाडीत दुचाकी पेटविली

नाशिक-पुणे रोडवरील सिद्धार्थ हॉटेलमागील बजरंगवाडीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी समाजकंटकांनी पेटवून दिली. या घटनेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन मदन भोसले (रा. बजरंगवाडी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. भोसले यांची शाइन (एमएच १५/ ईएन ८२३५) ही दुचाकी गुरुवारी (ता. ६) रात्री त्यांच्या घरासमोर गल्लीत पार्क केलेली असताना अज्ञात समाजकंटकांनी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली. ही बाब वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले. सहाय्यक निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

गच्चीवरून मोबाइलची चोरी

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबीयांचा मोबाइल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सिडकोतील उत्तमनगर भागात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल राजू ठोंबरे (रा. ब्रह्मगिरी महादेव मंदिराशेजारी, शिवपुरी चौक) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. रात्रीच्या उकाड्यामुळे ठोंबरे कुटुंबीय २६ एप्रिल रोजी रात्री घराच्या गच्चीवर झोपलेले असताना ही घटना घडली. ठोंबरे यांनी डोक्याजवळ ठेवलेला सुमारे १५ हजारांचा मोबाइल चोरट्यांनी लंपास केला. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

चार संशयितांना अटक

चोरीच्या उद्देशाने वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी सातपूर, पंचवटी व अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लीलाधर पुरुषोत्तम पाटील (रा. गाळण बु., ता. पाचोरा, जि. जळगाव), हेमंत कृष्णा आहेर (रा. स्वामी समर्थनगर, मखमलाबाद रोड), ज्ञानेश्वर शिवाजी भेंडेकर (रा. लक्ष्मणनगर, पेठ रोड) व बाळू सुकदेव काळे (रा. सुकदेवनगर, पाथर्डी गाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. सातपूर पोलिसांचे गस्तीपथक गुरुवारी रात्री अशोकनगर भागात गस्त घालत असताना श्रीराम ट्रेडर्स भागात लीलाधर पाटील हा संशयित आढळला. तो परिसरातील दुकान फोडण्याच्या तयारीत होता. दुसरी घटना मधुबन कॉलनीत घडली. हेमंत आहेर हा संशयित ड्रीम कॅस्टल इमारतीनजीकच्या किकबारच्या शटरजवळ संशयास्पद हालचाली करताना पोलिसांना आढळून आला. तिसरी घटना दिंडोरी रोड भागात घडली. ज्ञानेश्वर भेंडेकर हा संशयित मयूर अलंकार या दुकानाजवळ आढळला. पोलिस तपासात तो चोरी करण्याच्या प्रयत्नात होता. दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार खान व गायकवाड तपास करीत आहेत. दरम्यान, बाळू काळे हा सुकदेवनगर भागात संशयास्पद मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने चोरीच्या उद्देशाने दबा धरून बसल्याची कबुली दिली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक चव्हाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणुकीसाठी ५ उमेदवारी अर्ज

$
0
0

मालेगाव मनपाच्या प्रभाग ६ क मध्ये निवडणूक

म .टा. वृत्तसेवा, मालेगाव

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यावर लगेचच शहरात पोटनिवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या प्रभाग ६ क मधील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत गुरुवारी संपली. मुदत अखेर ५ महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सर्व अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

राज्यातील नऊ पालिकांमधील रिक्त जागांवर ही पोटनिवडणूक होत असून मालेगावातील प्रभाग ६ क चा यात समावेश आहे. गेल्या निवडणुकीत या प्रभागात जनता दल सेक्युलरच्या अन्सारी साजेदाबानो मोहम्मद याकुब या निवडून आल्या होत्या. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त होती. ही जागा सर्वसाधारण महिला राखीव आहे. ३० मे ते ६ जून दरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत एकूण ५ अर्ज दाखल झालेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १० जून आहे. त्यामुळे १० जूननंतरच या प्रभागातील पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. एकापेक्षा अधिक उमेदवार कायम राहिल्यास २३ जून रोजी मतदान होईल तर २४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

यांनी केले अर्ज दाखल

- पहमीदा किरदौस मो.फारूक - काँग्रेस

- खान शकीला बेगम अमानूल्ला - जनता दल ( सेक्युलर)

- खान समिना कौसर अमानुल्ला- अपक्ष

- अन्सारी जैबूनीसा अ.बाकी - अपक्ष

- अन्सारी असमतबानो मो.आमीन - अपक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतोष मंडलेचांची ‘हॅटट्रिक’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राच्या व्यापार-उद्योग-कृषी व सेवा क्षेत्राची राज्याची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत संतोष मंडलेचा बहुमताने विजयी झाले आहेत, तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे मंडलेचा सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष झाले असून, ९२ वर्षांच्या इतिहासात निवडणुकीत अध्यक्षपदी निवड होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रातील उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी, तसेच मदत करण्यासाठी अग्रणी उद्योजक शेठ वालचंद हिराचंद यांनी पुढाकार घेऊन 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स'ची स्थापना केली. राज्याच्या औद्योगिक पायाभरणीमध्ये चेंबरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शेठ वालचंद हिराचंद, लालचंद हिराचंद, आबासाहेब गटवारे, एकनाथ ठाकूर, दांडेकर, डहाणूकर, बजाज, कासलीवाल, दोशी, ढमढेरे, माधवराव आपटे, भरत गुलाबचंद यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी चेंबरचे अध्यक्षपद भूषविले आहे. चेंबरच्या ९२ वर्षांच्या इतिहासात अध्यक्षनिवडीसाठी प्रथमच निवडणूक झाली. विद्यमान अध्यक्ष मंडलेचा व विद्यमान वरिष्ठ उपाध्यक्ष अमित कामत यांच्यामध्ये झालेल्या लढतीत ९४ टक्के टक्के मते मिळवून मंडलेचा यांनी एकतर्फी विजय संपादन केला. तीस वर्षांनंतर प्रथमच सलग तिसऱ्या वर्षी अध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्राला प्रथमच संधी मिळाली आहे.

--

हे उपक्रम राबविण्याचा संकल्प

येत्या वर्षात महाराष्ट्राच्या व्यापार-उद्योग विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल महाराष्ट्राच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन व परिषदेचे आयोजन, चेंबरच्या ९२ वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचे पुस्तकरुपाने प्रकाशन, चेंबरच्या आजअखेरच्या वाटचालीतील सर्वच अध्यक्षांच्या कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन, महाराष्ट्राच्या व्यापार-उद्योग-कृषी व सेवा या क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी करणाऱ्यांचा 'एमएसीसीआयए' अ‍ॅवॉर्डसद्वारे गौरव, राज्याचे मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चेंबरच्या सदस्यांचा थेट संवाद घडवून आणणारे 'महाराष्ट्र स्नेहसंमेलन' हे प्रमुख उपक्रम राबविण्याचा संकल्प केल्याची माहिती मंडलेचा व गांधी यांनी दिली.

--

गेल्या दोन वर्षांत चेंबरच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या व्यापार-उद्योग-कृषी व सेवा या सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी आणि विविध समस्या सोडविण्यासाठी प्रभावीपणे कार्य केले. सभासदांना आयात-निर्यातीसाठी प्रोत्साहन देतानाच विविध देशांशी सामंजस्य करारासाठी देशांतर्गत, तसेच टर्की, ग्रीसचा दौरा केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ग्रीस दौऱ्यात सहभाग नोंदवून, ग्रामीण भागापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत चेंबरचा गौरव वाढविण्यात यश मिळविले.

-संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलासंगमद्वारे लोकसाहित्याची उपासना

$
0
0

लोककलावंत डॉ. प्रकाश खांडगे यांचे प्रतिपादन

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स'ने नेहमीच लोकसाहित्याच्या लेखनाला प्रोत्साहन दिले आहे. गावगाड्यातील लोकसंस्कृतीचे उपासक 'मटा'च्या कलासंगम महोत्सवात सहभागी होत आहेत. त्यांना व्यासपीठ दिल्याने एकप्रकारे लोकसाहित्याची उपासनाच करण्यात आली असून, मूल्यांचा नंदादीप चेतवण्याचे काम कलासंगम करतेय, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लोकसाहित्य अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठातील लोककवी वामनदादा कर्डक अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रकाश खांडगे यांनी केले.

महाराष्ट्र टाइम्स व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय कलासंगम महोत्सवाचे उद्घाटन डॉ. गणेश चंदनशिवे आणि डॉ. प्रकाश खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, की अभिजात हा शब्द 'मटा'साठीच जन्माला आला आहे. अभिजात ज्या कला असतील, त्यांच्यासाठी नेहमीच पुढाकार घेऊन प्रसिद्धी देण्याचे काम करतानाचा सामाजिकतेचे भानही 'मटा'ने जपले आहे.

यावेळी व्यासपीठावर 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक अशोक पानवलकर, लोककलावंत व मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, नामवंत चित्रकार-मूर्तीकार चंद्रमोहन कुलकर्णी, ख्यातनाम लोककलावंत नंदेश उमप, चित्रकर्ती शर्वरी लथ, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. गणेश चंदनशिवे यांनी लोकगीतांतील एक गणपतीचा गण सादर करीत कलासंगम महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी प्रास्ताविक करताना 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक अशोक पानवलकर म्हणाले, की हा काळ तंत्रज्ञानाचा आहे. परंतु केवळ भविष्याकडेच बघायचे का, आपले मूळ लक्षात राहिले पाहिजे आणि मूळ लोककला आहे. त्यामुळेच कलासंगमसाठी लोककला हा विषय घेतला आहे. लोककलेची नाळ मराठी माणसाशी कायम जुळलेली राहिली पाहिजे यासाठी लोककला विषय पुढे आला असल्याचेही ते म्हणाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराजाचे पूजन करण्यात आले. नृत्यांगना शिल्पा देशमुख व त्यांच्या शिष्यांनी गणेशवंदना सादर केली. अपर्णा क्षेमकल्याणी यांनी सूत्रसंचालन केले.

कुसुमाग्रज स्मारकात संपूर्ण दोन दिवस हा महोत्सव होत असून, आज (दि.८) दिवसभरात स्थानिक कलावंतांचे सादरीकरण, गिटार वादन, व्हॉयोलिन वादन, तबल्याची जुगलबंदी, भरतनाट्यम, कथक मूर्ती, पॉटरी डेमोस्ट्रेशन, जागरण गोंधळ, वारली, गोंदण, कशिदा, फोटोग्राफी, पेन्टिंग प्रदर्शन या कला बहरणार आहेत.

...

औचित्यपूर्ण कलासंगम महोत्सव

आपल्या मनोगतात डॉ. प्रकाश खांडगे म्हणाले. की 'मटा'चा हा कलासंगम महोत्सव लोककलेला वाहिलेला आहे, हे अत्यंत औचित्यपूर्ण आहे. कारण आपले सर्व आयुष्य लोककलेच्या अभ्यासासाठी वाहून घेतलेल्या डॉ. सरोजिनी बाबर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. याच वर्षात होणारा हा महोत्सव म्हणजे डॉ. बाबर यांना वाहिलेली सुमनांजली आहे, असेही डॉ. खांडगे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वच्छ पाण्यापासून वंचित

$
0
0

इंदिरानगरवासीयांची कैफियत; विविध आजारांचा सामना

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इंदिरानगर परिसरात गेल्या १५ दिवसांपासून दूषित आणि दुर्गंधीयुक्‍त पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे स्थानिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. पाण्याचा पुरवठा या भागात वाढला असला तरी प्रशासनाने स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

शहरात काही दिवसांपासून मुकणे धरणातून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. परंतु, पाथर्डी ते इंदिरानगर परिसरात काही दिवसांपासून अशुद्ध व दुर्गंधीयुक्‍त पाणी मिळत आहे. सध्या पाणीपुरवठा वाढल्याने या भागातील पाण्यांच्या वेळाही बदल करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. अवेळी येत असलेले पाणी अत्यंत दुर्गंधीयुक्‍त व खराब आहे. पाण्याची चव बदलल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. दोन ते तीन वेळा पाणी फिल्टर करूनही काही उपयोग होत नाही. दुर्गंधीयुक्‍त पाणी का येते, या प्रश्नाचे नागरिकांना उत्तर मिळू शकलेले नाही. दूषित पाणी प्यावे लागत असल्याने नागरिकांना विविध आणि विशेषतः पोटाचे आजार वाढल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रशासनाने दूषित पाणी पुरवठा प्रश्नी योग्य निर्णय घ्यावा आणि यावर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अस्वच्छ पाण्याला प्रचंड दुर्गंधीही येत आहे. पाणी तोंडातही घेता येत नाही. बादलीत पाणी भरले तर तळाशी गाळाचा थर जमा होतोय. अशा पाण्यामुळे इंदिरानगरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात.

- सीमा देशपांडे, गृहिणी

रोज गढूळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे सध्या लोकांना पोटदुखी, कावीळच्या तक्रारी वाढल्या आहेत. चव व रंग बदललेले पाणी पिण्यायोग्य नाही. अस्वच्छ पाणी गाळूनही काहीही उपयोग होत नाही.

- डॉ. विनया तीसगावकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाव नकाशे, मिळकत पत्रिकांचेही डिजीटायजेशन

$
0
0

नाशिककमध्ये पायलट प्रोजेक्ट

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : गावकी आणि भावकीच्या वादात गावाच्या मूळ भूरचनेलाच छेद जाऊ नये यासाठी गाव नकाशांच्या जतनाचे काम नाशिकमध्ये हाती घेण्यात आले आहे. सात बारा उताऱ्यांप्रमाणेच गाव नकाशे आणि मिळकत पत्रिकांच्या (प्रॉपर्टी कार्ड) डिजिटायजेशेनचा पायलट प्रोजेक्ट सुरू आहे. मिळकत पत्रिका याच महिन्यात ऑनलाइन पद्धतीने मिळणे शक्य होणार असून, गाव नकाशे डिजिटायजेशनच्या या प्रकल्पाची राज्यभर अंमलबजावणी केली जाणार आहे.

काळानुरूप जीर्ण होणारा दस्ताऐवज जतन करणे ही अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. जमिन-जुमले आणि तत्सम मालमत्तांशी संबंधित कागदी स्वरूपातील दस्ताऐवज व्यवस्थित सांभाळण्याचे काम भूमी अभिलेख विभाग वर्षानुवर्षे करीत आहे. मिळकत पत्रिका किंवा गाव नकाशाची नागरिकांकडून मागणी झाली तर ते उपलब्ध करून देणे ही या विभागाची जबाबदारी आहे. नागरिकांकडून जमिनी आणि मालमत्तांच्या संबंधात कायदेशीर प्रश्न निर्माण झालाच तर पुराव्यांदाखल हा दस्ताऐवजच या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मान सोडवून घेण्यासाठी उपयुक्त ठरतो. इतकेच नव्हे तर त्यामध्ये काही फेरफार झाला तर अनेकांचे आयुष्यही पणाला लागू शकते. गाव नकाशे आणि मिळकत दस्ताऐवजांचे हे महत्त्व लक्षात घेऊनच सातबारा उताऱ्यांप्रमाणेच त्यांच्याही डिजिटायजेशनच्या प्रक्रियेला नाशिकमध्ये सुरुवात झाली आहे.

अशी आहे प्रक्रीया

नकाशाची फोड करून तो नेमका कसा गेला आहे, याचे अवलोकन म्हणजे टिपणबुक होय. नकाशा नेमका कसा गेला आहे याची ही लिखापढी असते. नकाशावरील मजकूराची नोंद घेऊन तो जतन करण्यासाठी मेटा डेटा ही संलग्न प्रक्रीया एजन्सीमार्फत राबविण्यात येत आहे. डिजीटायजेशनसाठी ऑपरेटरच्या मदतीने ही सर्व माहिती ऑपरेट होत असून दोन टप्प्यांत या माहितीची १०० टक्के खातरजमा केली जाते. त्यानंतर भूमी अभिलेखचे वरिष्ठ आणि तज्ज्ञ अधिकारी रॅन्डम पध्दतीने गुणवत्ता नियंत्रणाची पडताळणी करीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आणि भूमी अभिलेख अशा तीन ठिकाणी एकाचवेळी ही सर्व प्रक्रीया राबविली जात आहे. नकाशांच्या स्कॅनिंगचे ९७.०५ टक्के तर मेटाडेटा एंट्रीचे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. २० टक्के गाव नकाशांचे डिजिटायजेशन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

काम अंतिम टप्प्यात

डिजिटल स्वाक्षऱ्या झाल्या की महिनाभरात भूमी अभिलेखच्या वेबसाईटवर ही प्रॉपर्टी कार्ड नागरिकांना उपलब्ध होऊ शकणार आहेत. याव्यतीरिक्त १ लाख ६ हजार ५४५ प्रापर्टी कार्ड सध्या दुरूस्तीच्या प्रक्रीयेत असून ६० हजार प्रापर्टी कार्डांच्या डिजिटायजेशनची पुर्णच प्रक्रीया बाकी आहे. फेब्रुवारीमध्ये हाती घेण्यात आलेले हे काम आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

नाशिकमध्ये सिटी सर्व्हे झालेल्या गावांची संख्या २८२

एकूण प्रॉपर्टी कार्डांची संख्या २ लाख ८९ हजार २५६

१ लाख २७ हजार ३३८ प्रॉपर्टी कार्डमधील दुरूस्त्या पूर्ण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बढेजावला फाटा; विद्यार्थ्यांसाठी उचचला वाटा

$
0
0

मालेगावातील सानप कुटुंबीयांचा आदर्श प्रयत्न

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

समाजातील खोट्या प्रतिष्ठा जपण्यासाठी हल्ली विवाह सोहळ्यांमध्ये लाखो रुपये उधळले जातात. विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्चाला फाटा देत येथील सानप कुटुंबाने साखरपुड्यात आपल्या मुलाचा विवाह लावून आहेराची रक्कम अंध विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी देऊ केली आहे. त्यांच्या या अनोख्या प्रयत्नाचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत असून, विवाह सोहळ्यातील बडेजाव टाळून सानप कुटुंबाने आदर्श घालून दिला आहे.

शहरातील मर्चंट बँकेतील अधिकारी शंकर दत्तात्रय सानप यांच्या ज्येष्ठ चिरंजीव सिद्धांत याचा विवाह नगरसूल (ता. येवला) येथील विलासराव पाटील यांची कन्या आरती हिच्याशी निश्चित झाला. विवाह सोहळ्यातील सर्व अनावश्यक खर्चाला फाटा देत सानप व पाटील दोन्ही कुटुंबांनी साखरपुड्यात विवाहसोहळा करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सानप कुटुंबाने वधूपित्याकडून हुंड्याची देखील मागणी केली नाही. अत्यंत साधेपणाने होणाऱ्या या विवाह सोहळ्यात नातेवाइक व मित्र परिवाराकडून आहेरात भेटवस्तू न स्वीकारता आवडेल ती रोख रक्कम द्यावी व ही रक्कम येथील त्रिवेणी देवी तुळशीराम पाटोदिया अंध विद्यालयाच्या इमारत बांधकामास देण्याची संकल्पना शंकर सानप यांनी मांडली. या संकल्पनेस दोन्ही कुटुंबांनी होकार दिला.

वऱ्हाडींनीही केली मदत

नुकताच सिद्धांत व आरती यांचा आदर्श विवाह सोहळा शहरात पार पडला. अत्यंत साधेपणाने झालेल्या या विवाह सोहळ्यास आलेल्या पाहुणे मंडळीने देखील सानप व पाटील कुटुंबांचे कौतुक करीत आनंदाने अंध विद्यालयासाठी आपली आर्थिक मदत सानप यांच्याकडे सुपूर्त केली. या विवाह सोहळ्यात आहेरात आलेली रोख रक्कम अंध विद्यालयाचे प्राचार्य पोद्दार सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक मित्रासह दोघांवर अखेर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील दाभाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत बँक मित्र असलेल्या कर्मचारी व अन्य दोघांनी खातेदाराच्या खात्यातून परस्पर पैसे काढून गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. अखेर चार दिवसांनंतर याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दाभाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत १० हजाराहून अधिक खातेदार आहेत. या बँकेत गणेश सोनवणे हा बँक मित्र म्हणून काम करीत असून त्याने खातेदारांचा विश्वास संपादन करीत त्यांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढल्याचे काही खातेदारांना लक्षात आल्याने या प्रकाराला वाचा फुटली. यामुळे खातेदारांमध्ये घबराट पसरल्याने मंगळवारी खातेदारांनी बँकेत गर्दी केली होती. अखेर याप्रकरणी चौकशीसाठी नाशिक येथून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक आले होते. पथकाने केलेल्या चौकशीनंतर बँकेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब टावरे यांच्या फिर्यादीवरून गणेश सोनवणे, अंशकालीन कर्मचारी दीपक शिंदे व कॅशियर प्रदीप शिरसाठ या तिघांवर ७२ लाख ५० हजार रुपयांचा अपहार करून बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँक मित्र गणेश सोनवणे पोलिसांच्या ताब्यात असून अन्य दोघांना अटक होण्याची शक्यता आहे.

अन्यथा आंदोलन करू

तालुक्यातील दाभाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार व फसवणूकप्रकरणी लवकरात लवकर खातेदारांना त्यांचे पैसे देण्यात यावे अशी मागणी मराठा महासंघ व खातेदारांनी केली आहे. शुक्रवारी शिष्टमंडळाने प्रांत विजयानंद शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी अमोल निकम, निरांकर निकम, शरद देवरे, वसंत मोरे, दीपक निकम आदींसह खातेदार व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खातेदारांनी बँक मित्र इतका गैरव्यवहार करीत असतांना बँक प्रशासनाला दैनंदिन व्यवहारात ही बाबा का लक्षात येऊ नये? असा सवाल उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन्यप्राण्यांचे थांबणार अपघात!

$
0
0

'रोड किल्स'चे होणार सर्वेक्षण

saurabh.bendale@timesgroup.com

tweet : SaurabhbMT

नाशिक : शहरालगतच्या ग्रामीण भागात आणि महामार्गाच्या परिसरात पावसाळ्यात बऱ्याचदा रस्ते अपघातात वन्यप्राण्यांचा मृत्यू होतो. दिवसेंदिवस वाढत जाणारे हे प्रमाण रोखण्यासाठी प्राणीमित्रांनी पुढाकार घेत 'रोड किल्स' रोखण्यासाठीची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जूनच्या शेवटच्या आठ‌वड्यात यंत्रणा उभारणीसाठी सर्वेक्षणास प्रारंभ होणार असून यामुळे वन्यप्राण्यांचे अपघातांचे थांबण्यास मदत होणार आहे.

पावसाळ्यास सुरुवात झाल्यानंतर सरपटणारे प्राणी व इतर वन्यजीव कोरड्या भागात जाण्यासाठी रस्त्याकडे येतात. दरम्यान, रस्त्यावरील वाहतुकीमुळे अनेकदा वन्यजीवांचा अपघात होतो. काही वन्यप्राणी जमखी होतात, तर काही मृत्यूमुखी पडतात. यामुळे वन्यप्राण्यांच्या संवर्धनावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. वन विभागाने अपघात मृत्यूमुखी पडणाऱ्या वन्यप्राण्यांसाठी उपाययोजना करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरुन आहे. या संदर्भात 'इको एको फाउंडेशन'च्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला असून 'रोड किल्स' संदर्भात सर्वेक्षण केले जाणार आहे. जूनच्या अखेरीस या सर्वेक्षणास सुरुवात होणार असून संकलित होणारी माहिती वन विभागाला देण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे वन विभागातर्फे भविष्यात रस्ते अपघात रोखण्यासाठी यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे इको एको फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत महामार्गालगत वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित यंत्रणा कार्यान्वित करणार असून पावसाळ्यात रस्ते अपघातामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या वन्यप्राण्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल, अशा आशावाद प्राणिमित्रांनी व्यक्त केला आहे.

रात्री होणार पाहणी

पावसाळ्यास सुरुवात झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर परिसरात रात्री रस्ते अपघातात जखमी व मृत्यूमुखी होणाऱ्या वन्यप्राण्यांची पाहणी केली जाणार आहे. इको एको फाउंडेशनचे स्वयंसेवक या सर्वेक्षणात रात्री घटनास्थळी जाऊन पाहणी करतील. वन्यप्राण्यांची अन्नसाखळी, पावसाळ्यात होणारे अपघात, त्याची कारणे, ठिकाणे याचा अभ्यास केला जाईल. रोजी रात्री ही पाहणी केली जाणार असून त्याचा अहवाल वन विभागाकडे सुपूर्द केला जाईल.

रोड किल्सच्या संदर्भात घटनास्थळी जाऊन सर्वेक्षण करणार आहोत. वन्यप्राण्यांचे अपघात होण्याची कारणे लक्षात घेऊन संशोधनात्मक पध्दतीने त्याचा आराखडा बनविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी मोठी यंत्रणा कार्यान्वित करणार असून अहवालातून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे रोड किल्स रोखण्यासाठी वन विभागाला सोबत घेऊन प्रभावी यंत्रणा उभारणार आहोत.

- वैभ‌व भोगले, इको एको फाउंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images