Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ममता बॅनर्जींचा नाशकात निषेध

$
0
0

पंचवटी : पश्चिम बंगालमधील काही युवकांनी 'जय श्रीराम'चा नारा दिला होता. हा नारा देणाऱ्या आठ ते दहा युवकांवर गुन्हे दाखल करीत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली. ही कारवाई आकसबुद्धीने केली असल्याचे सांगत, या निषेधार्थ रामकुंड येथे सोमवारी (दि. ३) हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नाशिक शहरातून जवळपास ११ हजार पोस्टकार्डवर जय श्रीराम लिहून पत्र पाठवणार आहेत. या निषेधप्रसंगी संघटनेचे मृणाल घोडके, अमोल वडनेरे, अक्षय एडके, यतीश काळे, योगेश चांडोले, जयेश क्षेमकल्यानी आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुर्दम्य आशावादापुढे अपंगत्त्व दुबळे!

$
0
0

अपंगत्त्वावर मात करीत सागरला व्हायचंय आयएसएस

....

saurabh.bendale@timesgroup.com

Tweet : SaurabhbMT

..

नाशिक : जन्मतःच एका पायाला असलेले अपंगत्व अन् पोट भरेल इतकेच शेतीचे कौटुंबिक उत्पन्न. मात्र अपंगत्त्वावर मात करीत हवे ते काम करण्याचा दुर्दम्य आशावाद. संघर्षात्मक जीवनातून सावरत आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्वत:च्या पायावर सिद्ध होण्याची जिद्द त्याला खुणावतेय अन् त्या दिशेने त्याचे पाऊल पडतेय. ही कथा आहे सागर गोडसे या तरुणाची.

नाशिकमध्ये आयोजित 'दिव्यांगांना कृत्रिम अवयव व साधने वाटप' या उपक्रमात सिन्नरहून सागर कचरू गोडसे हा २४ वर्षाचा युवक आला. जन्मत:च एका पायाने अपंग असल्याने कृत्रिम अवयव आणि साधनांसाठी तो शहरात आला. साधने घेण्यासाठी लागणाऱ्या पैशांच्या निम्मे पैसे म्हणजे माझे उत्पन्न असल्याचे त्याने सांगितले. सागर हा समशेरपूर (ता. अकोले, जि. नगर) येथील एका वस्तीवर राहतो. नुकतीच एसवाय बीएची परीक्षा त्याने दिली असून, तो सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय. गावाकडे उच्च शिक्षणाची सोय नसल्याने सिन्नर येथे भाड्याच्या खोलीत राहत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे.

उच्च शिक्षणाची कवाडे खुली करण्यासाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे शक्य होत नसल्याने मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणाचा मार्ग त्याने स्वीकराला. व्यक्ति हा शरीराने अपंग असला, तरी त्याने मनाने अपंग असू नये, असे सागर सांगतो. दिवसभर लायब्ररीत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा. मित्रांनी खरेदी केलेल्या पुस्तकांतून नोट्स काढायच्या आणि पैसे मिळविण्यासाठी कामही करायचे, ही त्याची दिनचर्या. पायासाठी लागणारे साहित्य एक ते दीड वर्षात निकामी होते आणि त्यानंतर पुन्हा नव्याने खरेदी करावे लागते. त्यामुळे जीवनातील संघर्ष काही केल्या पाठ सोडत नसल्याचे तो सांगतो.

...

रात्रपाळीचे काम

कुटुंबाची प्रतिकूल परिस्थिती आणि जगण्यासाठी लागणारा पैसा, हा भेद मिटविण्यासाठी सागर रात्रपाळीचे काम करतो. सिन्नरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये रात्रभर वॉर्डबॉयचे काम करून महिन्याकाठी त्याला पाच हजार रुपये मिळतात. त्यातून घरभाडे, लायब्ररीची फी, जेवण खर्च वगळता उरलेले पैसे घरी पाठवतो. आणखी थोडे आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून फोटो अल्बम डिझाइनचेही काम करतो.

..

आईचा मला खूप मोठा आधार आहे. जगातल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची ताकद मी तिच्याकडून शिकलोय. माझ्यातील जिद्द आणि संघर्षाला भेडण्याचा स्वभाव मला नक्कीच आयएएस अधिकारी बनवेल.

- सागर गोडसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वागदर्डी फोटोओळ

$
0
0

फोटो : सतिश काळे

शोधू कुठे किनारा

खपाटीला गेलेलं पोट जशी भुकेल्या माणसाची व्यथा सांगते, तसे तळाला गेलेली धरणं देखील पाण्यासाठी आसुसणाऱ्यांची कहाणी सांगत दिसते आहे. मनमाडला पाणी पुरवठा करणारे वागदर्डी धरणातील पाण्याचा मृतसाठाही संपुष्ठात येऊ लागल्याने धरणात कधीकाळी जलविहार करणारी ही नौकाही 'शोधू कुठे किनारा'. अशी भावना तर व्यक्त करत नसेल ना?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांत्रिक कामांमुळे पाणीटंचाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या कृत्रिम पाणीटंचाईचे खापर प्रशासनाने तांत्रिक कामांवर फोडले आहे. पाणीपुरवठा विभागाकडून नाशिकरोड आणि पंचवटीत करण्यात आलेल्या कामांमुळे काही काळ पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात केली नसल्याचे सांगत गंगापूर आणि मुकणेतून नियमित पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा विभागाने केला आहे. चेहेडी पंपिग स्टेशनऐवजी आता मुकणे धरणातून पाणी उचलले जात असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. गंगापूर आणि दारणा धरणातून महापालिकेसाठी आरक्षित पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढा शिल्लक असतानाही गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नाशिकरोड, पंचवटी, नाशिक पूर्व या तीन भागांत विशेषत: पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक भागात पाणी पोहोचत नाही. त्यामुळे इंदिरानगर, पाथर्डी फाटा, उपनगर या भागात टँकरची मागणी वाढली आहे. नगरसेवकांकडून अघोषित पाणीकपात केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. परंतु, पाणीपुरवठा विभागाने कपातीचा आरोप फेटाळला असून, शहराला दररोज नियमित ३४० ते ३५० एमएलडी पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा केला आहे. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र आणि पंचवटीतील पाइपलाइनच्या दुरुस्तीमुळे या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. परंतु, कपात केली गेली नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. विस्कळीत पाणीपुरवठा पूर्ववत झाला असून, कोणत्याही परिस्थितीत कपात केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. चेहेडी पंपिग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी मुकणे येथून पाणीपुरवठा केला जात असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ बेजबाबदारांना कारणे दाखवा नोटीस

$
0
0

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जोरदार पावसाची शक्यता गृहीत धरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व यंत्रणांना जबाबदारीचे वाटप केले असून सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्षात कर्तव्यावर हजर न होणाऱ्या सहा बेशिस्त कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आपत्ती व्यवस्थापनच्या जबाबदारीत कुचराई खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही या माध्यमातून देण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा पूर प्रवण क्षेत्र असल्याने यापूर्वी प्रशासनाला अनेकदा पूर परिस्थिती हाताळावी लागली आहे. या महिन्याच्या पंधरवड्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता गृहीत धरून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणही तयारीला लागले आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व विभाग व तालुका स्तरावरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, आरोग्य विभागासह विविध यंत्रणांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले असून प्रत्येक विभागाने मान्सून काळात आपली जबाबदारी चोखपणे बजावावी असे निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांना आलटून-पालटून नेमणूका दिल्या जातात. या कक्षात येणारे फोन कॉल हाताळणे, त्याची नोंद घेणे आणि संबंधितांना प्रशासनाकडून मदत हवी असल्यास ती मिळवून देणे यासारखी जबाबदारी तेथून पार पाडणे अपेक्षित असते. परंतु, नेमणूकीच्या सूचना प्राप्त होऊनही संबंधित दिवशी तेथे हजर न झालेल्या सहा कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठचे दोन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन, दुग्धविकास विभागाच्या एका कर्मचाऱ्यासह आणखी एका कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कामातील बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशाराच या माध्यमातून प्रशासनाने दिला आहे.

अफवा रोखण्याचे निर्देश

पावसाळ्यात एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याबाबत अफवा पसरून धोका अधिक वाढण्याची शक्यता असते. भारत संचार निगमच्या प्रबंधकांनी अशा अफवा निर्माण होऊ नयेत, यासाठी नागरिकांना ग्रुप एसएमएस सुविधेद्वारे आवाहन करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय बाधित व्यक्तींच्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाईन सुरू करावी, महत्त्वाचे फोन क्रमांक सुरू राहतील याची खात्री करावी, खंडित दूरध्वनी सेवा दुरुस्तीसाठी फिरते पथक तैनात करावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीव’ लघुपटाने मारली बाजी

$
0
0

'जीव' लघुपटाने मारली बाजी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महर्षी चित्रपट संस्थेच्यावतीने लघुपट महोत्सवातील यशस्वी चित्रपटांसाठी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी प्रथम क्रमांकाने सचिन माने यांच्या 'जीव' या लघुचित्रपटाला सन्मानित करण्यात आले. द्वितीय क्रमांक 'श… शाळेचा' या प्रकाश पवार यांच्या चित्रपटाने पटकावला तर तृतीय क्रमांक 'कीर्ती' व 'देणगी' या चित्रपटांना विभागून देण्यात आला.

नाशिक येथील दादासाहेब फाळके स्मारकातील सिनेमागृहात हा महोत्सव नुकताच झाला होता. महोत्सवात निवडक ३२ लघुपटांचे फाळके स्मारक येथील सिनेमागृहात स्क्रिनिंग करण्यात आले होते. नाशिकच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले, व्यावसायिक जितेंद्र ठक्कर, शिल्पी अवस्थी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अशोक करे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या महोत्सवातील यशस्वी चित्रपटांना सोमवारच्या सोहळ्यात गौरविण्यात आले. यावेळी मंचावर ज्येष्ठ संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे, अभिनेत्री अलका कुबल, अभिनेता शंतनु मोघे, दीपा सुरवसे, अश्विनी माहेश्वरी, निशिकांत पगारे, प्रा. सोमनाथ मुठाळ, परिक्षक तुषार गुप्ते, सुधाकर बडगुजर यांची प्रमुख उपस्थिती होती.

'लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया' हे गाणे स्क्रिनवर दाखवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दादासाहेब फाळके यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन झाले. निशिकांत पगारे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र मालुंजकर व अलका चंद्रात्रे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिलखुलास व्यक्तिमत्त्वांनी बहरणार कलांचे सृजन

$
0
0

७ व ८ जून रोजी आयोजन

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स'च्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त होत असलेल्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांत सलग दोन दिवस होणारा कलासंगम हा कलांचा महोत्सव म्हणजे आगळेवेगळेपणच. प्रस्थापित कलाकारांच्या कलांचे सादरीकरण आणि उभरत्या कलाकारांना व्यासपीठ यातून जन्माला आलेल्या कलासंगम संकल्पनेने पहाता पहाता नाशिककरांच्या मनात घर केले. गेल्या दोन वर्षापासून या संकल्पनेला नाशिककर कलाकार व नाशिककरांनी उचलून धरले. यंदाही ७ व ८ जून रोजी हा दोन दिवसांचा कलासंगम महोत्सव होणार आहे.

यंदा लोककलावंत गणेश चंदनशिवे यांच्या पहाडी आवाजात घुमणाऱ्या लोकगीतांनी महोत्सवाची सुरुवात होणार आहे. लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्या अभ्यासपूर्ण मुलाखतीतून चंदनशिवे यांचा प्रवास उलगडणार आहे. तसेच, लोककलाकार नंदेश उमप यांच्या जांभूळ आख्यानाची पायवाट रसिक प्रेक्षकांना यानिमित्ताने चोखाळायला मिळणार असून, सुप्रसिद्ध चित्रकार-मूर्तीकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या रंगरेषांचा अनुभव ऐकायला मिळणार आहे.

नाशिककर कलाकारांनी कलासंगम महोत्सवाला अगदी चार चाँद लावले. पहिल्या वर्षी मविप्रच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये घेण्यात आलेला हा सोहळा ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांच्या उद्घाटनाने रंगला. त्यानंतर दुसऱ्या वर्षी ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते आणि प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी कुसुमाग्रज स्मारक येथे झालेल्या महोत्सवाचे उद्घाटन केले. चित्र, शिल्प, नाट्य, गायन, वादन, फोटोग्राफी अशा विविध कलांनी हा महोत्सव बहरला. यंदा तिसऱ्या वर्षीदेखील अत्यंत जोमात हा महोत्सव होत असून, कुसुमाग्रज स्मारकात दोन दिवस कलांची मांदियाळी राहणार आहे.

नाशिकमधील लोककला, डिजिटल आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, वादन, शिल्प, नृत्य, चित्र, छायाचित्रण सादर करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि नाशिककरांना नवनवीन सांस्कृतिक प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी, हा कलासंगम महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवात लोककलांचा उत्सव होणार असून, गोंधळ-जागरण, भारूड, बोहाडा या कला बहराला येणार आहेत. फोटोग्राफी, चित्रकला, वारली या विषयांतील विविध प्रदर्शने होणार आहेत. मान्यवर कलाकारांचे डेमोन्स्ट्रेशनही यावेळी होईल. तबलावादन, गायन व नृत्य, तसेच काही डेमो होणार आहेत. त्यांच्यातील कलाविष्कार पाहण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. नाशिककरांनी या 'आर्ट फेस्ट'ला नक्की हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलतरण स्पर्धेत नाशिक अव्वल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड नाशिकरोड येथील महापालिकेच्या जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नाशिक जिल्हा जनरल चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला, तर नागपूर जिल्ह्याला द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले. वॉटर पोलो स्पर्धेत मुले आणि मुलींच्या गटात अमरावती जिल्ह्याने विजेतेपद पटकावले, तर मुलांच्या आणि मुलींच्या गटाचे उपविजेतेपद नाशिक जिल्ह्याला मिळाले. स्पर्धेत राज्यभरातून सुमारे पाचशे जलतरणपटू सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा राजस्थानमध्ये होणार आहेत. नाशिक जिल्हा हौशी जलतरण संघटना आणि महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे नाशिकरोड येथील महापालिकेच्या जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात ४६ वी ज्युनिअर आणि ३६ वी सबज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण क्रीडा स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेच्या आयोजनासाठी राज्य संघटनेचे सचिव राजू पालकर यांच्यासह जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, पालिकेच्या जलतरण विभागाचे हरी सोनकांबळे, नाशिकरोड जलतरण तलावाच्या व्यवस्थापिका माया जगताप आदींनी सहकार्य केले. खासदार हेमंत गोडसे, नाशिक जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष सुधाकर जाधव, उपाध्यक्ष अनिल ढेरिंगे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा समारोप झाला. स्पर्धेतील विजेते यश सोनक (ठाणे) : ५ सुवर्ण, अस्मित माकवे (कोल्हापूर) : ४ सुवर्ण, मोहित नाईक (नागपुर) : ४ सुवर्ण, वैष्णवी आहेर (नाशिक) : ४ सुवर्ण आणि २ सिल्व्हर, सिद्धान्त बोडोले (नागपूर) : ४ सुवर्ण आणि ३ सिल्व्हर, वैखरी जाधव (मुंबई) : ४ सुवर्ण, अमरसिंग राजपूत (नगर) : ३ सुवर्ण आणि २ सिल्व्हर आणि अनुषा दळवी (मुंबई) : ६ सुवर्ण.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तो खान नेमका कोणाचा?

$
0
0

तो खान नेमका कोणाचा?

- लोकसभेतील बल्क मॅसेजचा तपास 'गुपचूप'

- संशयिताला अटक आणि जामीन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्यादिवशी बल्क मॅसेज पाठवून खळबळ उडवून देणाऱ्या संशयितास सायबर पोलिसांनी पालघरमधून अटक केली. त्याला जामीनही मिळाला. पण, या प्रकाराची वाच्यता शहर पोलिसांनी होऊ दिली नाही. त्यामुळे ते मॅसेजेस संशयित आरोपीने कोणाच्या सांगण्यावरून धाडले होते, हे गुलदस्त्यात असून, आगामी काळात हा मोठा राजकीय मुद्दा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

सलीम खान (वय ३१) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. लोकसभा मतदार संघातील प्रचारतोफा थंडावल्यानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करण्याबाबतचे मॅसेजेस नाशिक तसेच दिंडोरी लोकसभा मतदार संघात व्हायरल करण्यात आले होते. विशेष म्हणजे यात शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावे होती. या मॅसेजेसमुळे राजकीय पटलावर खळबळ उडाली. ज्या पदाधिकाऱ्यांची नावे मॅसेजेसमध्ये होती, अशांनी सायबर पोलिस ठाणे किंवा आपल्या हद्दीतील पोलिस ठाणे गाठले होते.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, आमदार सीमा हिरे, सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे आदींचा समावेश होता. सेना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करताना सायबर पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील पालघरमधून संशयित आरोपी खानला काही दिवसांपूर्वी अटक केली. पोलिस कोठडीनंतर त्यास जामीन देखील मिळाला. या संवेदनशील राजकीय प्रकरणाबाबत पोलिसांनी गुप्तता पाळल्याने अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. संशयित आरोपी खानने हे मॅसेजेस नेमकी कोणाच्या सांगण्यावरून केले, त्याचा राजकीय फायदा कोणाला होणार होता, या प्रकरणाचा मास्टर माईंड अद्याप मोकाट कसा, असे महत्त्वाचे प्रश्न यामुळे अनुत्तीर्ण असून, आगामी काळात हा मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांग बांधवांना मिळणार आधार

$
0
0

कृत्रिम अवयव व साधनांसाठी नोंदणी

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या वेदना कमी व्हाव्यात, त्यांना चांगल्या दर्जाच्या व नव्या तंत्रज्ञानाच्या साधनांची आणि कृत्रिम अवयवांची साथ मिळावी, या हेतूने नाव नोंदणी व तपासणी शिबिर घेण्यात आले. जिल्ह्याभरातून तीनशेपेक्षा अधिक दिव्यांग बांधवांनी तपासणी केली. यातून २१० दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव आणि साधनांची साथ मिळणार आहे.

गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात सोमवारी 'दिव्यांगांच्या आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साधने वाटपासाठी नोंदणी व तपासणी' शिबिर आयोजित करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार, महात्मा गांधी सेवा संघ, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नाशिक आणि विश्वास ग्रुप या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. शिबिरात निफाड, सिन्नर, मालेगाव, सटाणा, नांदगाव, कोपरगाव, वाडीवर्ऱ्हेसह नाशिकच्या विविध भागातून दिव्यांग बांधव तपासणीसाठी आले होते. लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांनी या शिबिराचा लाभ घेतला.

शिबिरात प्रतिष्ठानच्या नाशिक केंद्राचे कार्यध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले, की दिव्यांग बांधवांचे पुनर्वसन हा समाजासाठी मूलभूत जाणिवेचा भाग असून, यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. त्यांच्यात आत्मविश्वास व बळ निर्माण करण्याबरोबरच त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.

...

शिबिरात तपासणी

शिबिरात दिव्यांग बांधवांची तपासणी केल्यानंतर १५ जयपूर फूट, २३ कॅपिलर, ५ ट्रायपॉस्टिक, ५ कमोड चेअर, ५ एल्बो क्रचेस, ३० व्हिलचेअर, ३ अंधचष्मा, १० क्रचेस, ५ वॉकर आणि ६० श्रवणयंत्रांची गरज असल्याची नोंद करण्यात आली. शिबिरात दिव्यांग बांधवांच्या कृत्रिम अवयवांसाठी माप घेण्यात आले असून, येत्या काही दिवसांत साधने व कृत्रिम अवयवांचे वाटप केले जाणार आहे. या शिबिरात जितेंद्र दाभाडे, वसीम खान आणि कलीम शेख यांनी तपासणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भागिदाराकडूनच व्यावसायिकाची हत्या

$
0
0

‌म. टा. वृत्तसेवा, धुळे

अहमदाबाद येथील बांधकाम व्यावसायिक गोपाल काबरा यांच्या हत्येचा उलगडा पाच दिवसांतच झाला असून, यात भागीदरांनीच सुपारी देत पूर्वनियोजित कट आखत हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सोमवारी (दि. ३) दोन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली असून, उर्वरित दोन संशयितांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिली आहे.

सोनगीर-दोंडाईचा रस्त्यावर हॉटेल धनश्रीजवळ ३० मे रोजी बांधकाम व्यावसायिक काबरा यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथके गुजरात व मध्य प्रदेशात रवाना झाली होती. या प्रकरणात तपास सुरू असताना संशयित आरोपी राजू उर्फ विहांग त्रिवेदी (रा. अटलदस, बदोडा) हा पोलिसांच्या हाती लागला. चौकशीअंती त्याने गुन्ह्यांची कबुली दिली असून, गोपाल काबरा आणि त्रिवेदी यांनी गुजरातमधील राजपिपला तसेच बावला येथे जमीन व्यवहार केला होता. या व्यवहारापोटी संशयिताकडे दहा कोटींचे हिरे व्यवहार शिल्लक होते. तो व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्रिवेदीने मृत काबरा यांना ३० मे रोजी रात्री अडीच वाजता हिरे देण्याचे कबूल केले व बोलावून घेतले. पूर्वनियोजित कटानुसार आरोपी त्रिवेदी व साथीदार क्रिष्णा सोमाणी (रा. बदोडा) हा ललीत, विजय पटेल व अन्य एक अज्ञातासह सोनगीर फाट्यावर हजर होता. या सर्वांनी मिळून सोनगीर-दोंडाईचा मार्गावर हॉटेल धनश्रीजवळ काबरा यांची हत्या केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरपंचांविरोधात उपसरपंचांचे उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येवला तालुक्यातील नगरसूल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांनी थेट सरपंचांविरोधात उपोषण सुरू केले आहे.

ग्रामपंचायतीत चौदाव्या वित्त अयोगाचा निधी, पंतप्रधान घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, शबरीमाता घरकुल योजना व स्वच्छ भारत योजना व शौचालय वाटप आदींसह अनेक कामांध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार उपसरपंच नवनाथ बागल यांनी केली आहे.

शहरातील गोल्फ क्लब परिसरात त्यांनी उपोषण सुरू केले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनाही देण्यात आल्या असल्याचे बागल यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासंबंधीचे निवेदन बागल यांनी दिले आहे. त्यात म्हटले आहे, की नगरसूल ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच प्रसाद प्रमोद पाटील व ग्रामसेवक यांनी संगनमताने चौदाव्या वित्त आयोगाचा निधी, भूमिगत गटार, सभामंडप बांधकाम, सीसीटीव्ही यंत्रणा आदी कामांमध्ये गैरव्यवहार केला आहे. नोकरभरतीतदेखील नियम डावलण्यात आले त्यातून, ग्रामपंचायतीचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बागल यांनी निवेदनात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारी शहरात शटडाउन?

$
0
0

वीज व पाणीपुरवठा राहणार बंद

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनी आणि महापालिकेकडून शहरात एक दिवस शटडाउन केले जाणार आहे. महापालिकेडून पाणीपुरवठा यंत्रणेत निर्माण झालेल्या त्रुटी दूर करण्यासाठी एक दिवस वीजपुरवठा खंडित ठेवण्याचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीला दिला आहे. कंपनीलाही वीज वाहिन्यांच्या कामासाठी एक दिवसाचा ब्रेक हवा आहे. त्यामळे येत्या शनिवारी शहरात शटडाउन होण्याची दाट शक्यता असून, या दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.

शहराला सुमारे दोन हजार किलोमीटर पाइपलाइन व ११४ जलकुंभांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्याची मोठी यंत्रणा असल्याने या यंत्रणेत कायम बिघाड होतात. त्यांची दरवर्षी दुरुस्ती करावी लागते. त्याअंतर्गत व्हॉल्व दुरुस्त करणे, पंपिंग स्टेशनवरील दुरुस्ती आदी कामे हाती घेतली जातात. त्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागतो. दुसरीकडे वीज वितरण कंपनीलाही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दुरुस्तीचे कामे करायची आहेत. त्यामुळे महापालिका आणि वीज वितरण कंपनीच्या वतीने संपूर्ण शहरात एक दिवसाचे शटडाउन केले जाणार आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित राहणार असून, पाणीपुरवठाही बंद राहणार आहे. हा दिवस अद्याप निश्चित नसला तरी, शनिवारी शटडाउन होईल असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रावळगाव एमआयडीसीत स्थानिकांना रोजगारसंधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील औद्यागिक क्षेत्राचा विकास करून औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा, पायाभूत सोयी-सुविधा, प्रशिक्षण केंद्रे, निवासी झोन तसेच स्थानिकांना प्राधान्य देणे याबाबत करावयाच्या उपाययोजनांसाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

मुंबईतील मंत्रालयात तालुक्यातील औद्यागिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आढावा बैठक झाली. यानंतर दादा भुसे यांनी ही माहिती दिली. तालुक्यातील अजंग-रावळगांव एमआयडीसीचे इंटिग्रेटेड टेक्सटाइल हब योजनेत समावेश करीत उद्योजकांसाठी कामगार वसाहत, दवाखाना, शाळा, फळे व भाज्या प्रक्रिया प्रशिक्षण केंद्रे, निवासी झोन, पाणीपुरवठा व इतर बाबींसाठी जागा राखून ठेवावी. समांतर भूखंड प्रक्रिया सुरू करून स्थानिकांना तसेच महिला उद्योजक, अपंग, बचत गट, शेतकरी यांना प्राधान्य द्यावे, गिरणा डॅमवरून चाळीसगांव फाटा येथे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद करावी, उद्योजकांना अतिरिक्त सवलत द्याव्यात आदी प्रस्ताव यावेळी भुसे यांनी आढावा बैठकीत सादर केले. या उद्योगांसाठी आवश्यक वीज व पाणी याबाबत माहिती स्थानिकांना उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीस एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लघु उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. आधुनिक तंत्रज्ञान व आर्टिफिशिअल इंटलिजन्स सारख्या तंत्रज्ञानामुळे मनुष्यबळ कमी लागते. त्यामुळे यावर उपाय म्हणून लघु उद्योगांना चालना देणे आवश्यक आहे. अजंग-रावळगांव एमआयडीसीच्या विकासासाठी नियोजन केले जाणार आहे.

- सुभाष देसाई, उद्योगमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'चेंबर'साठी २८.४२ टक्के मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदासाठी तीन दिवसाच्या मतदान प्रक्रियेत मंगळ‌वारी नाशिक व मुंबईसह ४६९ मतदारांनी मतदान केले. नाशिकमध्ये ३८४, तर मुंबईत अवघ्या ८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून दोन दिवसात २८.४२ टक्के मतदान झाले असून बुधवार (दि. ५) मतदानाचा अखेरचा दिवस आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या २०१९-२० साठी होणाऱ्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी नाशिकचे संतोष मंडलेचा व मुंबई येथील अमित कामत हे दोन उमेदवार आहे. सारडा संकुल येथील चेंबरच्या कार्यालयात मतदान पार पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ओझोनला हानिकारक वायूंचे उत्पादन सुरूच

$
0
0

नासाच्या तपासात निष्पन्न; चीनमधून अवैध उत्सर्जन होत असल्याचा संशय

Bhavesh.Brahmankar@timesgroup.com

@BhaveshBMT

नाशिक : सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या ओझोन वायूला हानिकारक ठरणाऱ्या सीएफसी ११ वायूचे उत्पादन सुरूच असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. विशेष म्हणजे, हे उत्सर्जन थांबविण्याचा आंतरराष्ट्रीय करार झाल्यानंतरही सुरू असल्याने त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. हे उत्सर्जन पूर्व आशिया आणि खासकरून चीनमधून होत असल्याचा संशय शास्त्रज्ञांनी व्यक्त केला असून याप्रकरणी शास्त्रज्ञांची मोठी फळी तपास करीत आहे. त्यामुळे या तपासाकडे आणि त्याच्या निष्कर्षाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून आहे.

विविध प्रकारच्या वायूंच्या उत्सर्जनामुळे ओझोन वायूच्या आवरणावर परिणाम होत असून काही ठिकाणी या थराला छिद्र पडत असल्याचे शास्त्रज्ञांनी १९७४ मध्ये सांगितले. मात्र, ती बाब गांभिर्याने घेतली गेली नाही. अखेर १६ सप्टेंबर १९८७ रोजी मॉण्ट्रीयल शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ओझोनला वाचविण्याचा निर्णय घेण्यात आला. क्लोरोफ्लुरोकार्बन (सीएफसी), हायड्रोफ्लुरोकार्बन (एचएफसी), हॅलॉन्स, मिथेन, मिथाईल ब्रोमाईड यासारख्या वायूंचे उत्सर्जन टप्प्याटप्प्याने थांबविण्याचा रोडमॅपही निश्चित करण्यात आला. पहिल्या टप्प्यात म्हणजेच २०१०पर्यंत क्लोरोफ्लुरोकार्बन वायूचे उत्सर्जन पूर्णपणे थांबवायचे निश्चित झाले. त्यासाठी विकसित देशांकडून निधी जमा करण्यात आला आणि विकसनशील व अविकसित देशांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्याबरोबरच उत्सर्जन थांबविण्याचे प्रयत्न झाले. जगामध्ये प्रथमच अशा प्रकारचा यशस्वी पर्यावरणीय करार झाला. त्यामुळेच २०५० सालापर्यंत ओझोनचे छिद्र भरुन निघेल आणि ओझोनचा थर पूर्ववत होईल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. २०१० मध्ये उत्सर्जन बंद झाल्यामुळे सीएफसीचे वातावरणातील प्रमाण घटताना दिसत होते. मात्र, आता हे प्रमाण काहीसे वाढताना दिसत असल्याचे अमेरिकेच्या नासा या संस्थेला दिसून आले आहे. सीएफसी ११ या वायूचे उत्सर्जन सुरू असल्याचे हवाई येथील प्रयोगशाळेत दिसून येत आहे. २०१२ पासून सीएफसी ११ चे वातावरणातील प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे निदर्शनास येत असून पूर्व आशियाई भागातून हे उत्सर्जन होत असल्याचा निष्कर्ष 'नासा'ने काढला आहे. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमाच्या ओझोन विभागाने याची गंभीर दखल घेतली असून शास्त्रज्ञांची टीम त्याच्या तपासासाठी कार्यरत झाली आहे. दक्षिण कोरियाच्या क्युंगपूक राष्ट्रीय विद्यापीठाने गोसान येथे तर, जपानच्या राष्ट्रीय पर्यावरण अभ्यास संस्थेने हातेरुमा बेटावर विशेष केंद्र स्थापन केले आहे. या दोन्ही केंद्रांबरोबरच विविध उपग्रहांच्या माध्यमातून सीएफसी ११च्या उत्सर्जनाचा उगमस्त्रोत शोधला जाणार आहे. हा तपास कधीपर्यंत पूर्ण होईल आणि अहवाल कधी येईल, हे अद्याप अनिश्चित आहे. कारण, हा शोध अतिशय गुंतागुंतीचा आहे. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या आधारे त्यात नक्की यश येईल, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.

चीनने केले मान्य

सीएफसी ११ चे अवैधरित्या उत्सर्जन होत असल्याची बाब काहीशी खरी असल्याचे चीनने म्हटले आहे. त्यासाठीच पुढील वर्षी चीनमध्ये विशेष सेमिनार होणार आहे. त्यासाठी विविध तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात येत आहे. हे उत्सर्जन कुठे आणि कसे होते आहे हे शोधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे चीनने सांगितले आहे.

कारवाई काय?

जागतिक पातळीवर पहिल्यांदाच पर्यावरण करार (मॉण्ट्रीयल प्रोटोकॉल) यशस्वी झाला. चीनमधून उत्सर्जन होत असल्याचे निष्पन्न झाले तर हे उघड होईल की जागतिक निधी मिळूनही चीनने कराराचे पालन केले नाही. याबाबत संयुक्त राष्ट्राने स्थापन केलेली आणि १४ राष्ट्रांचा समावेश असलेली समिती निर्णय घेईल.

सीएफसी ११ वायूचे अवैधरित्या उत्सर्जन होत आहे. त्यामुळेच शास्त्रज्ञांची मोठी फौज त्याचा शोध घेण्यासाठी कार्यरत झाली आहे. वातावरणातील या वायूचे प्रमाण आणि उत्सर्जनाचा स्त्रोत शोधणे हे एक आव्हान आहे. पण, ते अशक्य मुळीच नाही.

- डॉ. राजेंद्र शेंडे, माजी प्रमुख, युनेप ओझोन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस ५ जून

$
0
0

वाढदिवस ५ जून

--

प्रकाश सोनवणे.........मनसे शिक्षक सेना

नानासाहेब दाते........सेवक संचालक, मविप्र

बाळासाहेब वाकचौरे....उपजिल्हाधिकारी

मोहन वाघ....कृषी सहसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कलासंगम’मध्ये रंगणार बोहाडा-जागरण गोंधळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन वर्षांपासून नाशिककरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा दोन दिवसीय कलासंगम महोत्सव यंदा पारंपरिक बोहाडा व जागरण गोंधळ या लोककलेने रंगणार आहे. नाशिककरांना ही पारंपरिक मेजवानी देण्यासाठी आदिवासी भागातून बोहाडा व जागरण गोंधळ घालणारे कलाकार येणार असून, कलासंगम महोत्सव गाजविणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज स्मारक येथे शुक्रवार ७ व शनिवार ८ जून रोजी कलासंगम महोत्सव होणार आहे. ७ जून रोजी सकाळी १० वाजता सुप्रसिद्ध लोककलावंत गणेश चंदनशिवे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

दुपारी १२ वाजता लोककलेचे ख्यातनाम अभ्यासक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश खांडगे आणि प्रा. गणेश चंदनशिवे यांच्या गप्पांमधून लोककलेचा प्रवास उलगडणार आहे. त्यानंतर नामवंत चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याशी गप्पांमधून चित्र-मूर्तीचा प्रवास आणि ख्यातनाम लोककलावंत नंदेश उमप यांच्या गप्पांमधून जांभुळ आख्यानचा प्रवास उलगडणार आहे.

७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता बोहाडा रंगणार आहे. बोहाडा हा पारंपरिक उत्सव असून, मुखवट्यांचे नृत्यनाट्य प्रकार त्यात असतो. सुमारे २०० वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा जगंदबा यात्रा उत्सव 'बोहाडा' म्हणून ओळखला जातो. मुखवट्यांचे नृत्यनाट्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणजे 'बोहाडा' हा आदिवासी समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. रात्री या उत्सवाला सुरुवात होते. निसर्गाशी संबंधित अनेक देव-देवतांचे मुखवटे व वेश परिधान करून आदिवासींचे पारंपरिक वाद्य असलेले संबळ व पिपाण्यांच्या तालावरती मिरवणूक काढली जाते. काठीला कापड बांधून तयार केलेल्या मशाली पेटवून त्या उजेडात सकाळ होईपर्यंत ही सोंगे नाचवली जातात.

महोत्सवात दुसऱ्या दिवशी ८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता जागरण गोंधळचा कार्यक्रम रंगणार आहे. मान्यवर कलाकार यावेळी खंडोबाची गाणी सादर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चेंबर’साठी २८.४२ टक्के मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदासाठी तीन दिवसाच्या मतदान प्रक्रियेत मंगळ‌वारी नाशिक व मुंबईसह ४६९ मतदारांनी मतदान केले. नाशिकमध्ये ३८४, तर मुंबईत अवघ्या ८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून दोन दिवसात २८.४२ टक्के मतदान झाले असून बुधवार (दि. ५) मतदानाचा अखेरचा दिवस आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या २०१९-२०२० या वर्षाकरिता होणाऱ्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी नाशिकचे संतोष मंडलेचा व मुंबई येथील अमित कामत हे दोन उमेदवार रिंगणात आहे. राज्यभरातील २६०० सदस्यांचे मतदान नाशिक व मुंबई कार्यालयात होत असून मंगळवारी १८ टक्के मतदान झाले. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सारडा संकूल येथील चेंबरच्या कार्यालयात मतदानप्रक्रिया पार पडली. मतदानाचा अखेरचा दिवस बुधवारी असून मोठ्या संख्येने मतदान होण्याची शक्यता आहे. तीन दिवसीय मतदान पार पडल्यानंतर शुक्रवारी (दि. ७) मुंबई येथील चेंबरच्या कार्यालयात मतमोजणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवा ‘डीसीपीआर’ १५ ला

$
0
0

जुन्या नियमावलीचा लाभ घेण्यासाठी विकासकांची घाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांसाठी राज्य शासनाने एकच विकास नियंत्रण नियमावली (डीसीपीआर) अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या विकास नियंत्रण नियमावलीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या १५ जूनपर्यत एकीकृत विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड)साठी अधिसूचना जारी केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीचे फायदे पदरात पाडून घेण्यासाठी नगररचना विभागात बांधकामांचे प्रस्ताव मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने एकीकृत विकास नियंत्रण नियमावली जाहीर केली. त्यात नाशिकला वगळल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. परंतु, पुन्हा शुद्धिपत्रक काढून त्यात नाशिकचाही समावेश करण्यात आला. आठ मार्चपासून एका महिन्याच्या आता हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. हरकती व सूचनांची मुदत संपुष्टात आली असून, आता राज्य शासनाकडून हरकतींवर सुनावणी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत एकीकृत नियमावली संपूर्ण राज्यासाठी लागू होण्याची शक्‍यता आहे. नवीन विकास नियंत्रण नियावली लागू झाल्यास सध्या अस्तित्वात असलेली विकास नियंत्रण नियमावली आपोआप रद्दबातल ठरणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीत नऊ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर आकारानुसार जादा एफएसआय देण्यात आला आहे. त्यामुळे नवीन विकास नियंत्रण नियमावली लागू होण्यापूर्वी नगररचना विभागात प्रकरणे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images