Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नगरसेवकांना अच्छे दिन

0
0

- प्रत्येक प्रभागासाठी बजेटमध्ये पाच कोटींची तरतूद

- विधानसभेपूर्वी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेतील नगरसेवकांचा गेल्या दोन वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सत्ताधारी भाजपने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांना प्रभागनिहाय तब्बल पाच कोटी रुपये देण्याची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे. त्यात रस्त्यांसाठी तीन कोटी, पाणीपुरवठ्यासाठी एक, तर उद्यानांच्या कामांसाठी एक कोटीची तरतूद केली आहे. त्यासाठी १५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आता बजेट प्रशासनाकडे अंमलबजावणीसाठी दिले जाणार असल्याने नगरसेवकांना अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाच कोटी रुपये विधानसभेसाठीचे गाजर मात्र ठरू नये, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.

महापालिकेत पूर्ण बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपला दोन वर्षांपासून विकासकामांचा सूर सापडत नसल्याचे चित्र आहे. भाजपच्या ६६ नगरसेवकांपैकी निम्मे नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे कामकाज संमजून घेण्यातच त्यांचे पहिले वर्ष वाया गेले. या जुन्या- नव्या नगरसेवकांचा वनवास संपवण्यासाठी तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या काळात भाजपने २५७ कोटींची रस्ते विकास योजना आणली. सोबतच खेडे विकास निधीसाठीही भरपूर तरतूद करण्यात आली; परंतु ही योजना अंतिम टप्प्यात असतानाच, कृष्णा यांची बदली झाली. त्यामुळे नव्याने आलेले तुकाराम मुंढे यांनी गरज, व्यवहार्यता व निधीची उपलब्धता ही त्रिसूत्री त्यांनी लावून या योजनेला कात्री लावली. नगरसेवकांना हक्काने मिळणाऱ्या ५० लाखांच्या निधीलाही कात्री लावली. त्यामुळे महापालिकेत मुंढे विरुद्ध नगरसेवक या संघर्षात दुसरे वर्षदेखील वाया गेले. नगरसेवकांना प्रभागात ठोस कामे दाखविता येत नसल्याने नगरसेवकांचा राग प्रमुख पदाधिकाऱ्यांवर, तर नागरिकांचा रोष नगरसेवकांवर होता. त्यामुळे महापालिकेत भाजपमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मुंढे यांची बदली होताच या सर्व बाबींचा विचार करून नियोजन करण्यात आले. नगरसेवकांचा आर्थिक वनवास दूर करण्यासाठी त्यांना आता प्रत्येक प्रभागात पाच कोटी दिले जाणार आहेत. त्यासाठी लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहितेच्या कात्रीत सापडलेले २०१९-२० या आर्थिक वर्षाचे बजेट भाजपने बाहेर काढले आहे. या बजेटमध्ये यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात येऊन ते आयुक्तांना सादर केले जाणार आहे. त्यामुळे नगरसेवकांना अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.

१५५ कोटींची तरतूद

शहरात ३१ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात नगरसेवकाना रस्ते कामांसाठी तीन कोटी रुपये दिले जाणार आहेत. या रस्त्यांच्या कामांसाठी ३१ प्रभाग मिळून तब्बल ९३ कोटींचा खर्च येणार आहे. रस्त्यांसोबतच नगरसेवकांच्या पाणीपुरवठा आणि बांधकामसाठीही निधीची मागणी आहे. त्यामुळे या कामांसाठी प्रत्येक प्रभागात एक कोटी, तर उद्यानाच्या कामांसाठी एक कोटी दिले जाणार आहेत. त्यामुळे शहरातील ३१ प्रभागांसाठी १५५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

निवडणूक गाजर नको

दरम्यान, भाजपची सत्ता आल्यापासून प्रत्येक बजेटमध्ये नगरसेवकांना भरघोस निधीची तरतूद केली जाते. मात्र, प्रत्यक्षात प्रशासनाकडून आर्थिक शिस्तीचे कारण देत आडकाठी आणली जाते. कृष्णा आणि मुंढेंच्या काळातही असेच प्रकार घडले होते. त्यामुळे यंदाच्या बजेटमधील तरतुदीवर नगरसेवकांचा अद्याप विश्वास नाही. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने नगरसेवकांची नाराजी ओढवून घेऊ नये म्हणून केवळ खूश करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे निवडणुकीचे गाजर ठरू नये, अशी अपेक्षा नगरेसवकांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनाकडे अंदाजपत्रक सादर

महापालिकेत सत्ता असूनही प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे आतापर्यंत ठोस कामे करता न आल्याने नगरसेवकांची नाराजी असलेल्या भाजपने यंदा नगरसेवकांना प्रभागनिहाय भरघोस निधी देण्याचा निर्णय घेतला असून, अंदाजपत्रकात तशी तरतूददेखील करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आता प्रशासनाकडे अंतिम अंदाजपत्रक सादर करताना एका प्रभागासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा विकास निधी देण्याची तरतूद असल्याने यंदाचे वर्ष नगरसेवकांसाठी अच्छे दिन आणणारे ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लूटमार करणारा अटकेत

0
0

ग्राहक सेवा केंद्रात झाली होती घटना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात महिलेस चाकूचा धाक दाखवून रोकड लुटणाऱ्या संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताच्या ताब्यातून दुचाकीसह मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. ही घटना सातपूर औद्योगिक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली होती. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली.

संग्राम पारसमल पारख (२८ रा. राधाकृष्ण नगर, श्रमिकनगर) असे त्याचे नाव आहे.

गेल्या शुक्रवारी (दि.१७) रोजी ही घटना घडली होती. अशोकनगर येथील स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात सविता सागर मुर्तडक या नियमीत काम करीत असताना एक अनोळखी ग्राहक केंद्रात आला होता. कार्यालयात शिरताच त्याने दरवाजा बंद करून मुर्तडक यांना चाकूचा धाक दाखवून दैनंदिन व्यवहाराची गल्यातील ४० हजाराचे बंडल बळजबरीने काढले. यावेळी मुर्तडक यांनी विरोध केला असता संशयिताने त्यांच्यावर चाकूचा वार करून पोबारा केला होता. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी (दि.२९) संशयित श्रमिकनगर येथील एस. डी. राठोड देशी दारू दुकान परिसरात येणार असल्याची माहिती युनिट एकच्या पथकास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली. संशयीताने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून एमएच १५ एडब्ल्यू ११३४ ही गुह्यात वापरलेली दुचाकी आणि महागडा मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपासासाठी संशयिताचा ताबा सातपूर पोलिसांकडे देण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन खैरणार, महेश कुलकर्णी, पुष्पा निमसे, हवालदार रवींद्र बागूल, वसंत पांडव, प्रवीण कोकाटे, येवाजी महाले, विजय गवांदे, पोलिस नाईक आसिफ तांबोळी, शांताराम महाले, दिलीप मोंढे, विशाल काठे, शिपाई गणेश वडजे, विशाल देवरे, राहुल पालखेडे, निलेश भोईर, प्रवीण चव्हाण, प्रतिभा पोखरकर, दीपक जठार आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुखदेव शाळेवरील टॉवर काढण्यासाठी ‘आप’चे निदर्शने

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इंदिरानगर येथील सुखदेव शाळेच्या इमारतीवर संस्‍थाचालकांनी मोबाइल टॉवर उभारून विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार सुरू केला आहे. वासननगर येथील टॉवर काढण्याबाबत एक वर्षापूर्वी केलेल्या तक्रारीनंतर हे टॉवर काढण्यात आले असले तरी सुखदेव शाळेवरीलही टॉवर तातडीने काढण्यात यावे, अशी मागणी करीत आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली.

इंदिरानगर येथील सुखदेव शाळेच्या इमारतीवर संस्थाचालकांनी स्वतःची मनमानी करून मोबाइलचे टॉवर उभारले आहे. टॉवरमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊन विविध आजारही होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरीवस्तीत टॉवर उभारण्यास विरोध होत असतो. मात्र सुखदेव शाळेवर अनेक वर्षांपासून हे टॉवर उभारून संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ मांडला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात औद्योगिक वसाहती वाढू लागल्या अन्

0
0

शहरात औद्योगिक वसाहती वाढू लागल्या अन् नोकरीच्या शोधात असलेले उडिया (कलिंग) समाजबांधवांनी ओडिशातून थेट नाशिक गाठले. कंपन्यांमध्ये रोजगार मिळविण्यासह व्यावसायिक क्षेत्रात समाजबांधवांनी कार्य करण्यास सुरुवात केली. इंडिया सिक्युरिटी प्रेस, नोट प्रेससह आर्टिलरी सेंटरमध्ये समाजबांधव काम करू लागले. सन १९७९ साली मोठ्या प्रमाणावर उडिया बांधव शहरात दाखल झाले. सातपूर आणि अंबड येथील कंपन्यांमध्ये काम करीत असताना त्याच परिसरात स्थायिक होऊ लागले. हळूहळू व्यावसायिक क्षेत्रातही या बांधवांनी प्रगती केली. नाशिकच्या विकासाचा आलेख उंचावत गेला आणि बांधवांच्या प्रगतीला बळकटी मिळत गेली. नाशिकमध्ये समाजाची आजमितीस ७०० पेक्षा अधिक कुटुंब आहेत. उडिया समाजात धर्मसंस्कृती आणि अध्यात्माला विशेष महत्त्व आहे. समाजबांधवांचे सर्व उपक्रम हे मंदिराशी निगडित आहेत. शहरात विविध धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राचा वाढता विकास समाजबांधवांना शहरात स्थायिक होण्यासाठी खुणावत आहे. अजूनही अनेक बांधव शहरात स्थायिक होण्याच्या प्रयत्नात आहेत. स्थायिक होऊन काही दशके उलटली असल्याने आता आम्ही नाशिकसाठीच समर्पित आहोत, अशा भावना समाजबांधव व्यक्त करतात.

...

श्री श्री जगन्नाथ धाम

शहरातील समाजबांधवांना एकसंध करण्यासाठी तसेच ओडिशातील जगन्नाथ पुरी येथे असलेल्या बांधवांच्या महाप्रभूंचे देवस्थान बांधण्यासाठी कलिंग सांस्कृतिक समाज, नाशिक या संस्थेची २००६ मध्ये स्थापना करण्यात आली. पाथर्डी गावाच्या परिसरातील सराफनगर भागात 'श्री श्री जगन्नाथ धाम' साकारण्यात आले. सन २००९ मध्ये भूमिपूजन करून लोकवर्गणीतून २०११ मध्ये मंदिर उभारणीस प्रारंभ करण्यात आला. सन २०१७ मध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जगन्नाथ प्रभू यांचे बंधू बलभद्रा, बहिण सुभद्रा आणि जगन्नाथ प्रभू यांच्या मूर्ती आहेत. त्याबाजूला सूर्यचक्र मूर्ती आहे. मंदिरात महालक्ष्मी, गणपती, हनुमान आणि नवग्रह यांची मूर्ती आहे. सकाळी ६.१० वाजता मंदिर भाविकांसाठी खुले होते. त्यावेळी मंगल आरती करण्यात येते. सकाळपासून रात्रीपर्यंत पूजाविधी आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल मंदिरात सुरू असते. बालभोग आरती, भागवत पारायण, धूपारती, भजन, कीर्तन, गीतापाठ, प्रवचन, गीतागोविंद पाठ, सायंआरती केली जाते. दुपारी १.१५ ते ४ या वेळ‌ेत मंदिर बंद असते. सायंकाळी ९.१५ वाजता आरतीनंतर मंदिर बंद होते. उडिया बांधवांसह शहरात इतर समाजबांधव मंदिरातील प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतात.

...

जगन्नाथ प्रभू यात्रोत्सव

उडिया समाजात धार्मिक परंपरांना विशेष महत्त्व असून, श्री जगन्नाथ प्रभू मंदिरात होत असलेले धार्मिक कार्यक्रम हेच समाजबांधवांचे सणोत्सव आहेत. मंदिराच्या चालीरितीप्रमाणेच सर्व समाजबांधव कार्यरत आहेत. शहरातील जगन्नाथ प्रभू मंदिराची आषाढी कृष्ण द्वितीय तिथीला भव्य शोभायात्रा काढण्यात येते. या उत्सवाला रथयात्रोत्सव असे म्हणतात. जगन्नाथ पुरीप्रमाणेच शहरातही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सराफ नगरातील मंदिरापासून इंदिरानगर येथील मोदकेश्वर गणेश मंदिरापर्यंत ही रथयात्रा काढण्यात येते. रथयात्रेच्या दिवसापासून पुढे दहा दिवस जगन्नाथ प्रभूंच्या दर्शनाचा लाभ सर्व समाजातील आणि धर्मातील भाविकांना घेता येतो. या व्यतिरिक्त मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन भाविकांना दर्शन घेता येत नाही. त्यामुळे यात्रोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी होत असते. मोदकेश्वर मंदिरात जगन्नाथ प्रभू दहा दिवस विश्रांती घेतात. या परंपरेला 'मावसीमा वाडी' असे म्हणतात. यात्रोत्सवाच्या सांगतेवेळी 'बहुडा' यात्रा काढण्यात येते. जगन्नाथ पुरी येथे होत असलेल्या यात्रोत्सवाप्रमाणेच हा उत्सव असतो. उडिया समाजबांधवांत या उत्सवाला विशेष स्थान आहे.

...

सणोत्सवाची परंपरा

उडिया बांधव मंदिरात श्नान पौर्णिमा, कुमार पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, गणेशपूजन, लक्ष्मीपूजन, सरस्वतीपूजन, हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात. धर्मसंस्कृतीतील प्रत्येक सणोत्सव परंपरेनुसार साजरा करण्याला बांधवांकडून पसंती देण्यात येते. धुळीपौर्णिमा (होळी) या सणाच्या दिवशी जगन्नाथ प्रभू यांचा झोपाळा झुलविण्यात येतो. जगन्नाथ प्रभू हे प्रभू श्रीकृष्णाचे रूप असल्याची आख्यायिका आहे. त्यानुसार होळीच्या दिवशी झोपाळा झुलविताना जगन्नाथ प्रभू यांना रंग लावण्यात येतो. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात समाजबांधव मोठ्या उत्साहात रंगोत्सव खेळतात.

...

दिव्यांगांचे मोफत शिक्षण

कलिंगा सांस्कृतिक समाज, नाशिक समितीतर्फे शहरातील दिव्यांग आणि अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्यात आली आहे. सध्या शहरातील चार विद्यार्थ्यांना समाजाकडून मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासोबत रक्तदान आणि नेत्रतपासणी शिबिरे आयोजित केली जातात. ओडिशामध्ये आलेल्या 'फनी' वादळाच्या आपत्तीग्रस्तांसाठी समाजबांधवांनी १ लाख २० हजार रुपयांचा मदत निधी संकलित केला. ही रक्कम ओडिसाला देण्यात आली आहे. नाशिककर या नात्याने नाशिकसाठी सामाजिक बांधिलकी जपणे कर्तव्य असल्याचे समाजबांधव सांगतात.

...

नाशिक म्हणजे 'रॉयल सिटी'

नाशिकचे वातावरण अतिशय स्वच्छ, आल्हाददायक असून, येथील नागरिक मनमिळावू आहेत. येथील प्रशासन आणि विकासाचा आलेख कौतुकास्पद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही नाशिकमध्ये वास्तव्यास आहोत. नाशिकने आम्हाला लगेचच सामावून घेतले आहे. नाशिकसोबत जिव्हाळा निर्माण झाला असून, आता नाशिकसाठीच आम्ही समर्पित झालो आहोत, अशा भावना उडिया समाजबांधव व्यक्त करतात.

...

औद्योगिक विकासाला हातभार

नाशिकच्या औद्योगिक प्रगतीत उडिया समाजबांधवांचा मोठा हातभार आहे. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये बहुतांश कंपन्यांमध्ये उडिया समाजबांधव कामगार ते अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. लघु उद्योगांमध्येही समाजबांधव कार्य करीत आहेत. कंपन्यांसह कच्चा मालाच्या पुरवठा व्यवसायातही बांधव सक्रिय आहेत. शहरातील औद्योगिक प्रगती झपाट्याने होत असून, ओडिशातून नोकरीनिमित्ताने आजही उडिया समाजबांधव शहरात येत आहेत. सध्या फक्त एकटे आलेले असे चारशे ते पाचशे समाजबांधव असून, लवकरच त्यांची कुटुंब शहरात स्थायिक होणार आहेत. त्यामुळे शहराच्या औद्योगिक विकासात उडिया बांधवांचा मोठा हातभार असल्याचे दिसून येते.

...

सर्व परिसरात स्थायिक

नाशिक शहरातील सर्व परिसरात उडिया समाजबांधव विखुरले आहेत. सध्या शहरातील विविध भागात पंडा, सुबुधी, राथा, लंका, नायर, पट्टनाईक, पात्रा, साहू, शाथी, सतपथी आदी कुटुंबे राहत आहेत. नाशिक शहरासह देवळाली, भगूर या भागातही बांधव संख्येने स्थायिक झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठाणांसाठी सर्वेक्षक नियुक्ती

0
0

- महासभेवर प्रस्ताव सादर

- २६ गावठाणांचा प्रश्न मार्गी लागणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदाकाठावरील गावठाणासह शहर, परिसरात असलेल्या २६ गावठाणांचा क्लस्टरद्वारे पुनर्विकास करण्याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. गोदाकाठावरील गावठाणासहित शहरातील जवळपास २६ गावठाणांचा क्लस्टरद्वारे पुनर्विकास करण्यासाठी आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्यासाठी सर्वेक्षक नियुक्तीचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिल्यास सव्वादोन कोटी रुपये खर्चून सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे. सत्ताधारी भाजपला या प्रस्तावाची घाई असली तरी या प्रस्तावाची लांबलचक प्रक्रिया पाहता विधानसभा निवडणुकीनंतरच क्लस्टर डेव्हलपमेंट दृष्टिपथास येण्याची शक्यता आहे.

गोदाकाठावरील पंचवटी व जुने नाशिक या दोन गावठाणांचा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजत आहे. हा निवडणुकीचा मुद्दा बनत असला तरी एफएसआयच्या वादाने ही प्रक्रिया किचकट बनली आहे. या भागात नवीन इमारत विकसित करायची असेल तर पूररेषा आणि एफएसआयचा मोठा अडसर आहे. डॉ. शोभा बच्छाव आमदार असताना ४ एफएसआय देण्याचा विषय समोर आला होता. मात्र, पंधरा वर्षांपासून हा मुद्दा सुटला नाही.

भाजपच्या आमदार देवयानी फरांदे २०१४ मध्ये निवडून आल्यानंतर त्यांनीही गावठाणात ४ एफएसआय देण्याचे प्रयत्न सरकारदरबारी सुरू केले होते. सोबतच जयंतराव जाधव आमदार असतानाही त्यांनीही विधान परिषदेत वारंवार हा प्रश्न विचारून सरकारला जेरीस आणले होते. मात्र, विकास नियंत्रण नियमावली २०१६ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपची सत्ता असूनही गावठाणात ४ एफएसआय वा क्लस्टरसारख्या योजनांना कात्री लावली गेली. त्यानंतर फरांदे यांनी पाठपुरावा केल्यानंतर गेल्या वर्षी क्लस्टर योजना मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. त्यानंतर तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवून तातडीने ही योजना लागू करण्यासाठी आघात मूल्यमापन अहवाल पाठवण्याचे दिल्यानंतर नऊ महिन्यांनी त्याला मुहूर्त मिळाला आहे. यासाठी महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला असून, एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट तत्त्वावर निविदा काढली जाणार आहे. त्यासाठी दोन कोटी २५ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यामुळे या दोन गावठाणांसह २६ गावठाणांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच पोलिस प्रशासनाने कालावधी पूर्ण केलेल्या पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश २९ मे रोजी काढले आहेत.

शहर पोलिस दलातील सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या राजेंद्र कुटे यांची नाशिक ग्रामीण पोलिस दलात बदली करण्यात आली आहे. वाहतूक विभागातील महेश देवीकर, तसेच बाजीराव महाजन यांची पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली. भरतसिंग पराडके यांना एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक शहर पोलिस दलात अँटी करप्शन ब्यूरो येथे कार्यरत असलेल्या हेमंत सोमवंशी, प्रभाकर घाडगे, गुन्हे अन्वेषण विभागातील अशोक साखरे, साजन पवार, तर 'मसुप्र'तील सुभाष पवार हे हजर होणार आहेत. ग्रामीण पोलिस दलात गोंदिया येथून संदीप कोळी, 'एसीबी'तील शंकर कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागातील बाळासाहेब थोरात आणि राज्य गुप्तवार्ता विभागातील खगेंद्र टेंभेकर हे हजर होतील. महाराष्ट्र पोलिस अकादमीतील विजय जाधव आणि पराग जाधव या दोघा पोलिस निरीक्षकांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंबाखूविषयी जागृतीत नाशिक अव्वल; सातत्याचे आव्हान

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवनास प्रतिबंद घालणाऱ्या 'कोटपा' कायद्याची मागील वर्षभरात शहर पोलिसांनी यशस्वीपणे अंमलबजावणी केली. जवळपास दोन हजार नागरिकांवर या कायद्यानुसार कारवाई झाली. महाराष्ट्रात नाशिक शहर पोलिसांची कामगिरी अव्वल ठरली असून, यात सातत्य ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षात जवळपास १६ हजार २४५ व्यक्तींवर कोटपा कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक अव्वल असून, त्या खालोखाल सोलापूर शहर पोलिसांचा क्रमांक लागला. सोलापूर शहर पोलिसांनी ७९३, सातारा ७०६, पालघर ४९५, अमरावती शहर पोलिसांनी ५८२ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली. बीड ग्रामीण पोलिसांनी ३२९, वाशीम पोलिसांनी ४५०, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी १३५, रायगड पोलिसांनी २४८, नवी मुंबई पोलिसांनी १०४ आणि मुंबई पोलिसांनी ४०० जणांवर कायद्यानुसार कारवाई केली. याबाबत अहमदनगर पोलिस खूपच पिछाडीवर आहेत.

दरवर्षी ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. सिगारेट्स-तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे युवक, तरूण, महिला हकनाक बळी पडतात. याबाबत जनजागृती करण्याबरोबर कारवाई करण्यासाठी मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य पोलिस आणि संबंध हेल्थ फाऊंडेशन संस्थेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. गत वर्षी तत्कालिन पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी पुढाकार घेऊन तंबाखूमुक्त नाशिक ही संकल्पना राबविली. यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. जानेवारी महिन्यापर्यंत एक हजार ५९५ आणि मार्च तसेच एप्रिल महिन्यात कमी अधिक स्वरूपात हा आकडा साडेचारशेच्या घरात पोहचला. आता या कारवाईत सातत्य ठेवण्याचे आवाहन शहर पोलिसांसमोर आहे.

कोटपा-२००३ कायदा

सिगारेट्स आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने, जाहिरात, व्यापार विनिमय, पुरवठा व वितरण प्रतिबंधक कायदा म्हणजेच कोटपा-२००३ कायदा होय. हा केंद्र सरकारचा कायदा आहे. २००३ पासून या कायद्याने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे. या कायद्यात पाच महत्त्वाची कलमे असून, प्रत्येक कलमानुसार कारवाई झाल्यास तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर मोठा अंकुश निर्माण होऊ शकतो.

राज्याचा विचार करता नाशिक शहर पोलिसांची कामगिरी अव्वल ठरली आहे. तत्कालिन पोलिस आयुक्तांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतली. नागरिकांशी थेट संवाद साधल्याचा परिणाम या आकडेवारीतून दिसून येतो आहे. - श्रीकांत जाधव, सन्मवयक, संबंध हेल्थ फाउंडेश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-दिल्ली विमानसेवा १५ जूनपासून!

0
0

नाशिक :

विमानसेवेच्या प्रतिक्षेत असलेल्या नाशिककरांसाठी खुषखबर आहे. येत्या १५ जूनपासून नाशिक ते दिल्ली ही विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. जेट एअरवेज कंपनीचे स्लॉट अलायन्स एअर कंपनीला देण्यात आले आहेत. त्यानुसार सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस बोईंग विमानाद्वारे ही सेवा सुरू होणार आहे.

नाशिककरांना थेट राजधानी दिल्लीशी जोडणारी विमानसेवा गेल्या वर्षी १५ जूनला सुरू झाली. जेट एअरवेज कंपनीने उडान योजनेअंतर्गत आठवड्यातून ती दिवस ही सेवा सुरू केली. या सेवेला प्रचंड प्रतिसाद लाभला. प्रवासी आणि कार्गो या दोन्हीची वाहतूक या सेवेद्वारे होत होती. मात्र, जेट एअरवेज कंपनी आर्थिक गर्तेत अडकली. त्यामुळे एप्रिल महिन्यात जेट एअरवजेची सर्व उड्डाणे जमिनीवर आली. त्याचा फटका नाशिकच्या सेवेलाही बसला. मोठा प्रतिसाद असल्यानंतरही सेवा बंद झाल्याने नाशिककरांची मोठीच निराशा झाली. जेट एअरवेजचे महत्त्वाच्या शहरांना जोडणारे स्लॉट अन्य कंपन्यांना देण्यात आले. याच धर्तीवर नाशिक-दिल्लीचा स्लॉटही अन्य कंपनीकडे देण्यात यावा, अशी अशी आग्रही मागणीही केली गेली.

विमानतळाची मालकी हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कंपनीकडे आहे. त्यामुळेच एचएएलकडूनही दिल्ली सेवेबाबत आग्रह धरला जात होता. त्यासाठी एअर इंडिया, अलायन्स एअर, विस्तारा, एअर एशिया, गो एअर, इंडिगो, स्पाईसजेट या कंपन्यांना पत्रही पाठविण्यात आले. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरद्वारे नाशिकहून हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन शहरांसाठी सेवा दिली जात आहे. त्यामुळे दिल्ली सेवेला मिळणाऱ्या प्रतिसादाची दखल अलायन्स एअरने घेतली. त्यानुसार कंपनीने हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र पाठवून जेट एअरवेजच्या स्लॉटची मागणी केली. अखेर ही विनंती मान्य झाली असून येत्या १५ जूनपासून नाशिक-दिल्ली ही सेवा सुरू करण्याचे कंपनीने निश्चित केले आहे.

मूहूर्तही तोच

जेट एअरवेजने १५ जून २०१८ रोजी नाशिक-दिल्ली सेवेचा शुभारंभ केला होता. मात्र, ही सेवा एप्रिलमध्ये बंद पडली. आता पुन्हा याच मार्गाची सेवा १५ जून रोजीच सुरू होत आहे. त्यादिवशी शनिवार आहे. शुभारंभाची सेवा झाल्यानंतर जूनच्या चौथ्या आठवड्यापासून नियमित सेवा दिली जाणार आहे.

वेळ आणि वार तोच

सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस सेवा असेल. नवी दिल्लीहून दुपारी १२.०५ला विमान निघेल आणि ते नाशिकला दुपारी २.१०ला पोहचेल. त्यानंतर नाशिकहून दुपारी २.४५ वाजता विमान निघेल आणि ते सायंकाळी ४.३५ वाजता पोहचेल.

ऑगस्टपासून दररोज

आठवड्यातील तीन दिवस असलेली सेवेला भरघोस प्रतिसाद लाभल्यास आठवडाभर सेवा देण्याची तयारी अलायन्स एअरने दर्शविली आहे. प्रवासी सेवेबरोबरच कार्गो सेवाही देण्याचे कंपनीने निश्चित केले आहे. जेट एअरवेजकडून नाशिकहून थेट लंडनला भाजीपाला पाठविला जात होता. याचपद्धतीने नाशिकहून दिल्ली मार्गे जगभरात कार्गो सेवा देण्याचा कंपनीचा विचार आहे.

प्रवासी संख्या अशी

महिना....नाशिक-दिल्ली.....दिल्ली-नाशिक

फेब्रुवारी...१७३९.....१७२१

जानेवारी....१६८५.....१७७७

डिसेंबर.....१६८५....१८४९

नोव्हेंबर......१५२५....१७४२

ऑक्टोबर....१८०९....१७४९

सप्टेंबर....१४६९...१५९१

ऑगस्ट....१७३१......१८०५

जुलै.... १५०८....१४८७

(सेवा जेट एअरवेज. जुलै २०१८ ते फेब्रुवारी २०१९)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मासिक पाळीविषयी अज्ञान, गैरसमज अधिक

0
0

जनजागृती करण्याचे जि. प. अध्यक्षांचे आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मासिक पाळी या पूनर्निर्मितीचा महत्त्वपूर्ण टप्पा तर आहेच पण स्त्रीत्व आणि मातृत्व या दोहोंचा समन्वय साधणाऱ्या या नैसर्गिक वास्तवाचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असून याविषयी व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे. आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान्याचा युगातही मासिक पाळीविषयीचे समाजात अज्ञान आणि गैरसमज असणे ही दुर्दैवाची बाब असून याबात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात शुक्रवारी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्तरीय प्रशिक्षण शुभारंभ कार्यक्रम झाला. याप्रसंगी सांगळे बोलत होत्या. जिल्हास्तरीय प्रशिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यातील आरोग्य, शिक्षण व महिला व बालविकास विभागामधील प्रत्येकी एक याप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील तीन प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. मंचावर पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी इशाधिन शेळकंदे उपस्थित होते.

जिल्हास्तरीय प्रशिक्षणानंतर तालुकास्तरावरून शिक्षिका तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रशिक्षण घेणार आहे. प्रवीण प्रशिक्षक तालुकास्तरावरील प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील आणि ते प्रशिक्षक प्रत्यक्ष शाळांमध्ये मुलींना प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणात प्रामुख्याने किशोरवयीन वयात मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल, मासिक पाळीतील समस्या, मासिक पाळीबाबतच्या अंधश्रद्धा व गैरसमजुती, मासिक पाळीत वापरायची साधणे, मासिक पाळीत घ्यावयाचा आहार आदींबाबत भाग्यश्री बैरागी, माधवी गांगुर्डे, वीणा कुलकर्णी, ज्योती देशमुख, भारती कळंबे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. माधवी गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर पाणी व स्वच्छता कक्षातील पाणी गुणवत्ता सल्लागार भाग्यश्री बैरागी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका प्रभारीमय!

0
0

डोईफोडे, नलावडे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तांचा प्रभारी भार

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एक अतिरिक्त आयुक्त, अतिक्रमण उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या सेवानिवृत्तीमुळे विस्कटणारी प्रशासकीय घडी पुन्हा बसविण्यासाठी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्रवारी प्रशासनात मोठे फेरबदल केले. अनेक अधिकाऱ्यांकडे प्रभारीपदाचा भार दिल्याने पालिकाच आता प्रभारीमय झाली आहे.

महापालिकेच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, अतिक्रमण उपायुक्त रोहिदास बहिरम, प्रशासन सहआयुक्त अशोक वाघ यांच्यासह ३४ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. कर्मचाऱ्यांपाठोपाठ अधिकाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणावर निवृत्ती झाल्याने प्रशासकीय दरी भरून आयुक्तांनी शुक्रवारी प्रशासकीय फेरबदल केले. रिक्तपदांचा पदभार विद्यमान अधिकाऱ्यांकडे प्रभारी स्वरुपात देण्यात आले आहेत. हरिभाऊ फडोळ सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्याकडील अतिरिक्त आयुक्त (सेवा) या पदाचा कार्यभार महेश डोईफोड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मालमत्ता कर निर्धारण व संकलन, एलबीटी, जीएसटी, स्लम, घरकुल, जाहिरात व परवाने या मूळ विभागांसह आता डोईफोडे यांना अतिरिक्त आयुक्त (सेवा) या विभागाकडील उद्यान व वृक्षप्राधिकरण, समाज कल्याण, राष्ट्रीय फेरीवाला धोरण, घनकचरा व्यवस्थापन, सावर्जनिक आरोग्य विभाग, शिक्षण, अतिक्रमण, पशुसंवर्धन, मिळकत, निवडणूक, जनगणना, कामगार कल्याण, क्रीडा, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, विधी व लोकशाही दिन या विभागांचा कार्यभार सांभाळावा लागणार आहे. नलावडे यांना सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी या मूळ विभागाबरोबरच अतिरिक्त आयुक्त (शहर) य विभागाकडील सार्वजनिक बांधकाम, नगरसचिव, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन, राजशिष्टाचार, जनसंपर्क, विद्युत व अभियांत्रिकी, सुरक्षा, सावर्जनिक वाहतूक व नियोजन, माहिती व तंत्रज्ञान, गोदावरी संवर्धन, पर्यावरण या विभागांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागणार आहे. त्यामुळे या दोन अधिकाऱ्यांकडील कामांचा भार अधिकच वाढला आहे.

..

विभागीय अधिकारी बनले उपायुक्त

नाशिक पूर्व विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांना विभागीय अधिकारीपदासोबतच सहायक आयुक्त आणि उपायुक्त (अतिक्रमण) अशा दोन पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. नवीन नाशिक विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांची सहायक आयुक्त (प्रशासन) पदावर नियमित पदस्थापना करण्यात आली असून, मुख्यलेखा परीक्षक महेश बच्छाव यांच्याकडील उपायुक्त प्रशासनपदाचा अतिरिक्त कार्यभारही कुमावत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. फडोळ यांच्याकडील उपायुक्त समाजकल्याण, महिला बालकल्याण, अपंग कल्याण, निवडणूक, जनगणना आदी विभागांचा कार्यभार उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाचे उपायुक्त शिवाजी आमले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

...

स्थानिक अधिकाऱ्यांची पोकळी

महापालिकेची स्थापना होण्यापूर्वीपासून कार्यरत असलेले अतिरिक्त आयुक्त फडोळ, उपायुक्त बहिरम यांच्यासारख्या अनुभवी अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमुळे प्रशासनपातळीवर मोठी दरी निर्माण होण्यासह स्थानिक अधिकाऱ्यांची पोकळी निर्माण झाली आहे. या पदावर आता परसेवेतील अधिकारी येण्याची शक्यता आहे. फडोळ आणि बहिरम हे स्थानिक अधिकारी असल्याने कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेत होते. आता त्यांच्या नियुक्तीमुळे गाऱ्हाणे मांडायचे कुणाकडे अशी अवस्था कर्मचाऱ्यांची झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७८ जणांचे गृहस्वप्न साकार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास (म्हाडा)द्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १७८ सदनिकांची सोडत शुक्रवारी जाहीर करण्यात आली. परशुराम साईडेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. राजू गवळी हे या सोडतीचे पहिले मानकरी ठरले. कामटवाडे शिवारातील अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या इमारत 'अ' आणि 'ब'साठीची ही सोडत होती.

कामटवाडे शिवारातील सर्व्हे क्रमांक ३६/ब/१ मध्ये म्हाडाच्या 'अ' इमारतीतील २४ व 'ब' इमारतीतील १५४ सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली. २४ सदनिकांसाठी ९८, तर १५४ सदनिकांसाठी २९४ अर्ज दाखल करण्यात आले होते. या सोडतीमध्ये लाभार्थी ठरलेल्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र शासनातर्फे दीड लाख रुपये अनुदान, तर राज्य शासनातर्फे अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे. २४ सदनिकांसाठी काढलेल्या सोडतीनुसार प्रतीक्षा यादीत ६४, तर १५४ सदनिकांसाठी ९६ अर्जदार प्रतीक्षायादीत आहेत. ही सोडत म्हाडा नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. सर्व अर्जदार यावेळी उपस्थित होते. कोणताही गोंधळ न होता ही सोडत जाहीर झाली असून, नोव्हेंबर २०१९ पर्यंत लाभार्थींना घराचा ताबा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव @ ४४

0
0

मे महिना ठरला तापदायक

...

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

रणरणत्या उन्हाची सवय मालेगावकरांना झालेली असली तरी मे महिना मात्र अधिकच तापदायक ठरला. संपूर्ण महिनाभर तापमान चाळिशीपार राहिल्याने नागरिक घामाघूम झाले होते. शुक्रवारीदेखील कमाल ४४.२, तर किमान २६.६ इतके तापमान नोंदवले गेले. या महिन्यात तापमानाने दुसऱ्यांदा उच्चांक गाठल्याने मे महिना मालेगावकरांसाठी 'हॉट' ठरला असून, आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

शहरात गेले महिनाभर उकाड्याने नागरिक चांगलेच हैराण झाले. गेल्या आठवडाभरापासून तर उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांच्या जीवाची काहिली अधिकच वाढली होती. वाढत्या उन्हामुळे जनजीवनदेखील प्रभावित झाले. शहरात वाढलेल्या तापमानामुळे दुपारनंतर रस्ते ओस पडत असून, नागरिक संध्याकाळीच घराबाहेर पडणे पसंत करीत आहेत. त्यात मे महिना अधिकच तापदायक ठरला आहे. गेले महिनाभर तापमान चाळिशीपार राहिले होते. याआधी २३ मे रोजी पारा ४४.६ अंशांवर गेला होता, तर शुक्रवारी दुसऱ्यांदा तपामाने उच्चांक गाठल्याची नोंद झाली.

उन्हाने उच्चांक गाठल्याने जलसाठे पूर्णतः आटून गेले असून, ग्रामीण भागात नागरिकांना भीषण पाणीटंचाईला समोर जावे लागते आहे. आता जून महिना सुरू झाल्याने नागरिकांना पावसाची प्रतीक्षा आहे.

...

गेल्या सहा दिवसांतील तापमान

दिवस किमान कमाल

२६ मे २६.२ ४३.६

२७ मे २६.८ ४२.२

२८ मे २६.२ ४२.४

२९ मे २६.६ ४३.६

३० मे २७.२ ४३.२

३१ मे २६.६ ४४.२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडांना रेडियम

0
0

नाशिक : रस्त्यात असलेल्या झाडांना रेडियमपट्टी लावण्याचे काम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतले आहे. रस्त्यातील झाडांना भरधाव वाहने धडकून वाहनचालकांसह प्रवाशांचा जीव जातो. अशीच एक घटना नुकतीच गंगापूररोड परिसरात घडली. रस्त्यातील झाड दुरून वाहनचालकाच्या लक्षात येणे गरजेचे ठरते. मात्र तसे होत नाही. या पार्श्वभूमीवर आरटीओने हे काम हाती घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वाधिक वाचलेली बातमी

0
0

सर्वाधिक वाचलेली बातमी :

अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री; राजनाथ यांच्याकडे संरक्षण खातं

नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून प्रथमच लोकसभेत निवडून आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व मोदींचे विश्वासू सहकारी अमित शहा यांच्याकडं गृहखात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा पारा ३९ अंशांवर

0
0

नाशिक : गेले दोन दिवस ३७ ते ३८ अंश सेल्सिअस या दरम्यान असलेले कमाल तापमान शुक्रवारी ३९.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत असून, त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी भेडसावू लागल्या आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून नाशिककर उन्हाच्या झळांचा सामना करीत आहेत. गुरुवारी कमाल तापमान ३७.९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.६ अंश सेल्सिअस ऐवढे नोंदविले गेले होते. शुक्रवारी त्यामध्ये वाढ झाली. कमाल तापमान ३९.१ अंश सेल्सिअस ऐवढे नोंदविले गेले. कमाल तापमानही २१.९ अंश सेल्सिअस ऐवढे नोंदविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...तर तुरुंगात कराल वृक्षारोपण

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विविध कारणांनी झाडे तोडणाऱ्यांनी झाडे लावण्याकडे दुर्लक्ष केले, तर संबंधितांना तुरुंगात वृक्षारोपण करावे लागेल, असा इशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिला.

रस्ते व अन्य विकासकामांसाठी झाडे तोडली, तर संबंधितांनी पर्यायी झाडे लावण्याची जबाबदारीही पार पाडायला हवी. याकामी कुचराई होऊ लागल्याने कायदे आणि शिक्षा अधिक कठोर करण्यासाठी समिती स्थापन करा, असे आदेशही मुनगंटीवार यांनी वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेनिमित्त मुनगंटीवार नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. ते म्हणाले, की काही वेळा विकासकामांमध्ये अडथळा ठरणारी झाडे तोडणे अपरिहार्यता असते. त्यामुळे ती तोडावी लागतात. परंतु, संबंधितांवर तेवढीच झाडे लावण्याची जबाबदारीदेखील असते. ती पार पाडली जात नसेल, तर त्यांना जेलमध्ये वृक्षारोपण करावे लागेल. त्यासाठी कायदे आणि शिक्षा अधिक कठोर करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश या कार्यशाळेत देण्यात आले. ते म्हणाले, की वन खात्याने १३२ कलमी कार्यक्रम हाती घेतला असून, राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचे शिवधनुष्य उचलले आहे. टेक्नोलॉजीचा वापर करून लागवड केलेल्या वृक्षांचे मॉनिटरिंग केले जात आहे. राज्यात ६१ लाख ८१ हजार ७६५ लोकांनी ग्रीन आर्मीमध्ये सहभाग घेतला आहे, असेही मुनगंटीवर यांनी नमूद केले.

--

वनयुक्त शिवार करण्याचा प्रयत्न

वन विभागाने जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, जलयुक्तसोबत वनयुक्त शिवार करण्याचा प्रयत्न असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. ४९३ गावे मॉडेल गावे म्हणून विकसित करण्यात येत आहेत. वृक्षारोपण नव्हे, तर वृक्ष लावण्याच्या मानसिकतेचे बीजारोपण करणे हे आमचे लक्ष्य असून, मंदिरात गेल्यावर हात आपोआप जोडले जातात एवढी स्वाभाविकता वृक्षारोपणाच्या बाबतीत यायला हवी, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. दुर्मिळ होणारा माळढोक, चिऊताई यांचे आर्टिफिशियल ब्रिडिंग करण्याच्या दिशेने पावले उचला, अशा सूचनाही यावेळी यंत्रणेला देण्यात आल्या.

--

जंगलांत सोलर पाणवठ्यांची निर्मिती

जंगलांतील पाणवठ्यांमधील पाणी कमी झाले, की बिबटे वा तत्सम प्राणी पाण्याच्या शोधात बाहेर येतात. हे टाळण्यासाठी जंगलात सोलरवर आधारित पाणवठ्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. समुद्र किनारपट्टीवर जंगलात ५० टक्के वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. गिधाडे ही स्वच्छतेची दूत असून, त्यांच्या संवर्धनासाठी योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेघर आजींना मिळाली मायेची माणसं!

0
0

फिडिंग इंडिया संस्थेत मिळाला आधार

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सरकारी सेवेत असणारा तरुण मुलगा कर्करोगाच्या दुर्धर आजाराने गमावल्यानंतर ज्या सुनेवर उरल्यासुरल्या आयुष्याची भिस्त ठेवावी, तिनेच राहत्या घराला टाळे ठोकून मयत पतीच्या वृद्ध आईला भाकरीसाठी दारोदार भीक मागायला लावले. त्या वृद्ध आजी हिराबाई शाम वाघ (वय ७५) यांच्या करुण कहाणीचे वृत्त 'मटा'तून प्रसिद्ध झाल्याबरोबर नाशिकच्या फिडिंग इंडिया या वृद्धाश्रमाच्या संचालकांना या आजीची दया आली आणि त्यांनी तात्काळ या आजींना आपल्या वृद्धाश्रमात मायेची ऊब दिली.

हिराबाई वाघ (रा. गोसावीवाडी) या आजीबाईंच्या मुलाचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या सुनेकडे आली. परंतु, सुनेने पतीच्या दशक्रियेच्या दिवशीच राहत्या घराला टाळे लावले आणि स्वतःही परागंदा झाली. तेव्हापासून या आजीबाई सून आणि नातवंडांच्या प्रतीक्षेत रेल्वेस्टेशन परिसरात भीक मागून पोटाची खळगी भरीत होत्या. दोन दिवसापूर्वी वृत्तपत्र विक्रेते गौतम सोनवणे आणि पेशाने शिक्षक असलेले संतोष श्रीवंत यांची या आजींशी भेट झाल्यावर हा सर्व प्रकार उजेडात आला.

या वृद्धेच्या करुण कहाणीचे वृत्त गुरुवारी (दि. ३०) 'मटा'तून प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दखल घेत नाशिकमधील चांदशी येथे असलेल्या फिडिंग इंडिया या वृद्धाश्रमाच्या प्रतिनिधींनी गुरुवारी सायंकाळी नाशिकरोड रेल्वेस्टेशन गाठून वृत्तपत्र विक्रेते गौतम सोनवणे, आम आदमी पार्टीचे जितेंद्र भावे यांच्या सहकार्याने या आजीबाईंचा शोध घेऊन त्यांची करुण कहाणी जाणून घेतली. शेवटी पोलिसी सोपस्कार आणि वैद्यकीय तपासणी पूर्ण केल्यानंतर 'फिडिंग इंडिया' या वृद्धाश्रमाच्या प्रतिनिधींकडे या वृद्ध आजींना सोपविण्यात आले. फिडिंग इंडियाच्या प्रतिनिधींनी हिराबाईंना रात्री त्याच्या चांदशी येथील वृद्धाश्रमात दाखल केल्याने अखेरी त्यांना पुन्हा एकदा हक्काचे छप्पर मिळाले.

..

गुरुवारच्या 'मटा'तून हिराबाई शाम वाघ या आजींची करुण कहाणी समजली. त्यानंतर आम्ही नाशिकरोड रेल्वेस्टेशन येथून या आजींना पोलिस ठाण्यातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणीही केली. त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य यासारख्या मूलभूत गरजांची पूर्तता आमच्या वृद्धाश्रमात नि:शुल्क केली जाईल.

- प्रसाद कुलकर्णी, फिडिंग इंडिया संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेल्समन महिलेचा मोबाइल पळविला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सेल्समन महिलेचा मोबाइल ग्राहक म्हणून आलेल्या महिलेने हातोहात चोरून नेला. पंडित कॉलनी येथे ही घटना घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इच्छा वासनिक (रा. वासननगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. वासनिक या हेअर अ‍ॅण्ड ब्यूटी क्लिनिकमध्ये शॅम्पू वितरणाचे काम पाहतात. बुधवारी दुपारी त्या पंडित कॉलनीतील राहुल फाटे यांच्या इनोव्हेशन हेअर आणि ब्यूटी क्लिनिक या ठिकाणी शॅम्पू विक्रीसाठी गेल्या असता ही घटना घडली. काउंटरवर बॅग ठेवून त्या शॅम्पू दाखवत असताना एका ग्राहक महिलेने खरेदीचा बहाणा करून त्यांचा मोबाइल चोरून नेला. हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.

--

सॅकमधून टॅबची चोरी

औषधांच्या दुकानात ऑर्डर घेत असताना अज्ञात भामट्यांनी सेल्समनच्या खांद्यावरील सॅक खोलून अ‍ॅपल कंपनीचा टॅब चोरून नेल्याची घटना गोळे कॉलनीत घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश ब्राह्मणकर (रा. वडाळा-पाथर्डीरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते औषधांच्या कंपनीचे काम पाहतात. बुधवारी गोळे कॉलनीतील युनिक फार्मा या दुकानात ते औषधांची ऑर्डर घेत असताना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी गर्दीची संधी साधत ब्राह्मणकर यांनी खांद्यास अडकवलेल्या सॅकची चेन खोलून बॅगेतील २० हजारांचा अ‍ॅपल कंपनीचा टॅब हातोहात लांबविला. हवालदार निकम तपास करीत आहेत.

--

प्रवासात रोकड लंपास

माडसांगवी टोल नाका ते लाखलगाव प्रवासादरम्यान एका महिलेच्या पर्समधून सहप्रवासी असलेल्या दोन महिलांनी १७ हजारांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरिना सलिम शेख (रा. चांदोरी, निफाड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. गुरुवारी माडसांगवी टोल नाका ते लाखलगाव यादरम्यान शेख एसटी बसमधून प्रवास करीत असताना ही घटना घडली. शेजारी बसलेल्या दोन अनोळखी महिलांपैकी कोणीतरी त्यांच्या पर्सची चेन उघडून १७ हजार रुपये चोरून नेले. हवालदार पगार तपास करीत आहेत.

--

तरुणाची आत्महत्या

पखालरोड भागातील एका सोसायटीच्या सुरक्षारक्षक रूममध्ये राहणाऱ्या तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विठ्ठल नारायण साळवे (वय ३२, रा. साहिल हाइट्स, पखालरोड) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्री त्याने अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील छताच्या पंख्यास साडीने गळफास लावून घेतला होता. हवालदार सोनार तपास करीत आहेत.

--

युवतीची आत्महत्या

संसरी गावातील १६ वर्षीय युवतीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पल्लवी प्रकाश राठोड (रा. कोळीवाडा, संसरी) असे या युवतीचे नाव आहे. गुरुवारी रात्री आपल्या राहत्या घरी पल्लवीने अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिला तात्काळ कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. सहायक पोलिस उपनिरीक्षक हांडोरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हार्डकोर्ट बाइक पोलोतबुलडाण्याला विजेतेपद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय हार्डकोर्ट बाइक पोलो स्पर्धेत बुलडाणा संघाने विजेतेपद पटकावले. या दोन दिवसीय सामान्यांमध्ये राज्यभरातून दहा संघ सहभागी झाले होते. नागपूर संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यात द्वितीय, तर नाशिक व अहमदनगर या दोन संघांनी तृतीय क्रमांक पटकावला.

नाशिकमध्ये २२ व २३ मे रोजी हिरावाडीतील (कै.) दत्ताजी मोगरे क्रीडांगणात प्रथमच राज्यस्तरीय हार्डकोर्ट बाइक पोलो स्पर्धा झाली. या वेळी महाराष्ट्र जम्प रोप संघटनेचे अध्यक्ष रमेश मारवाडी, जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, शिवछत्रपती पुरस्कारविजेते अशोक दुधारे उपस्थित होते. स्पर्धेत नागपूर, अकोला, परभणी, भंडारा, बुलडाणा, ठाणे, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर हे संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. स्वप्निल वाळके यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश वाघ यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शून्य अधिक शून्य एक होत नाही!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कथित विलीनीकरण, तसेच मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शून्य अधिक शून्य एक होत नाही, अशी टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष शक्तिहीन झाले आहेत, तर मनसे हा दुर्मिळ प्रजातीचा पक्ष असून, अस्तित्व दाखविण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. येथील सरकारी विश्रामगृहावर आयोजित वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेनिमित्त मुनगंटीवार नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याकडे मुनगंटीवार यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले, तर त्यांच्यामधील स्पर्धा अधिक वाढेल. सद्यस्थितीत दोन पक्ष दोन उमेदवार देऊ शकतात. परंतु, विलीनीकरण झाले, तर दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची, असा पेच निर्माण होईल. शून्य आणि शून्याची बेरीज केल्यास एक होत नाही. त्यामुळे हे पक्ष एकत्र येऊनही फायदा नाही. हे दोन्ही पक्ष शक्तिहीन झाल्याची टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्र येण्याकडेही मुनगंटीवार यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी मनसे हा दुर्मिळ प्रजातीचा पक्ष आहे. निवडून येता येत नाही म्हणून अस्तित्व दाखविण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. मनसेने लोकसभा निवडणुकीमध्ये उच्च स्तरावरील प्रचार निम्न स्तरावर आणल्याची टीकाही त्यांनी केली.

--

देशाला बनविणार कप्तान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन मंत्रिमंडळाची रचना केली आहे. प्रत्येक क्षेत्रात भारताची प्रगती व्हावी यासह लोकोपयोगी निर्णय घेऊन न्यू भारत बनण्याच्या दिशेने देशाने वाटचाल सुरू केली आहे. देशाला जगाचा कप्तान बनविण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न असल्याचे मुनगंटीवार यावेळी म्हणाले. अमित शहा यांच्यावर केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, नक्षलमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी केंद्रीय गृह विभागाची मदत घेण्यात येईल. शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करू, असे मुनगंटीवार म्हणाले.

--

अधिवेशनापूर्वी बरेच काहीचे संकेत

शिवसेनेचे अरविंद सावंत यांना अवजड उद्योग हे महत्त्वाचे खाते दिले आहे. शरीरात प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो, तसेच देशाच्या विकासासाठी प्रत्येक खाते महत्त्वाचे आहे. अवजड उद्योग खाते देऊन शिवसेनेची बोळवण केली, असे म्हणणे चुकीचे असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, तसेच राधाकृष्ण विखे-पाटील यांचा त्यापूर्वी भाजपत प्रवेश होईल, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. भारतीय जनता पक्षात विचारत नाहीत, तर आदेश दिला जातो. आदेश दिला गेल्यास प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारेन, असेही मुनगंटीवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images