Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

झाडावर कार आदळून चालक ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार झाडावर धडकून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. अभिजित शिंदे असे कारचालकाचे नाव असून, बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात घडला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

अभिजित संजय शिंदे (वय ३०, रा. सहदेवनगर, गंगापूर रोड) मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास होरायझन स्कूलच्या रस्त्याने सहदेवनगरकडे जात होता. त्या वेळी रस्त्याच्या मध्यभागी असलेले झाड त्याच्या लक्षात आले नाही. त्यामुळे कार थेट झाडावर धडकली. अपघातात अभिजितला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. पहाटे चारच्या सुमारास त्याचा भाऊ अक्षय शिंदे याला अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर ही बाब उघडकीस आली. अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारमध्ये अडकलेल्या अभिजितला बाहेर काढून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गेल्याच महिन्यात अभिजितचे लग्न ठरले होते. नोव्हेंबरमध्ये त्याचे लग्न होणार होते, असे समजते. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. परदेशात राहणारा अभिजित कुटुंबीयांना भेटण्यासाठी शहरात आला असल्याचेही सांगितले जात आहे. त्याच्या मृत्यूने नातेवाइकांना मोठा धक्का बसला आहे. गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी सायंकाळपर्यंत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पवार तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिबट्याकडून कुत्र्याची शिकार

$
0
0

नाशिकरोड : शिंदे गावातील संजय तुंगार यांच्या घरापुढून बुधवारी (दि. २९) पहाटे चार वाजेच्यादरम्यान बिबट्याने पाळीव कुत्रा उचलून नेल्याची घटना घडली. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या भागातील चांदगिरी, जाखोरी, पळसे, विंचुर दळवी या गावांच्या शिवारात बिबट्याचे दर्शन वारंवार घडते आहे. काही दिवसांपूर्वीच चांदगिरी येथे शिवाजी कटाळे यांच्या वस्तीजवळ पिलांना घेऊन जाणाऱ्या मादी बिबट्याने झडप घातल्याने ऋषिकेश पवार, (रा. रौळस पिंप्री, ता. निफाड) हा मुलगा जखमी झाला होता. त्यानंतर जाखोरी येथे दोघा दुचाकीस्वारांना बिबट्याने जखमी केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपसेट प्राइजअभावी जमिनीचा लिलाव रद्द

$
0
0

जिल्हा बँकेचे थकबाकी वसुलीचे प्रयत्न असफल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेमार्फत थकीत कर्जवसुलीसाठी गुरुवारी जमीन लिलावाची प्रक्रिया रद्द करण्यात आली. प्रक्रिया बाजार मूल्यांकन प्रमाणे बोली न आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. गिरणारे येथील या जमिनीच्या लिलावात दोघांनी सहभाग घेतला. परंतु, दोन सभासदांनी अपेक्षित बोली न लावल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरिता थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. मार्च २०१९ पासून धडक वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विविध कार्यकारी संस्थांच्या प्रभावशाली थकबाकीदारांवर सहकार कायदा नियम १०७ अन्वये बँकेचे नाव लावून जमीन जप्त करून जमिनीच्या लिलावाच्या प्रक्रिया करणेबाबत आदेश देण्यात आलेले आहे. त्यानुसार वडगाव गिरणारे आदिवासी संस्थेचे सभासद श्री खंडेराव भागुजी कातड (पाटील ) व इतर ४ (रा. वाडगाव गिरणारे ता. नाशिक) यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी झाली असून, कर्ज वसुली प्रतिसाद न देत असल्यामुळे त्यांची जमीन जप्त करून बँकेचे नाव लावून अपसेट प्राइज मंजुरीसाठी उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेले होते. त्यानी मंजुरी दिल्यांनतर सभासदास सात दिवसांची कर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत नोटीस देण्यात आली होती. मात्र, सभासदाने थकबाकी कर्जाची रक्कम न भरल्यामुळे सदर सभासदाची नाईकवाडी शिवारातील शेत जमिनीचा फेरलिलावाची जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार सदर सभासदाच्या जमिनीचा फेरलिलाव ३० मे रोजी दुपारी १२ वाजता वाडगाव-गिरणारे आदिवासी संस्थेच्या कार्यालायात ठेवण्यात आलेला होता. यात कैलास सुधाकर थेटे व संदीप तुकाराम थेटे या दोन सभासदांनी भाग घेतला. परंतु, उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी मंजूर केलेल्या अपसेट प्राइजपेक्षा (राखीव बोली) कमी बोली त्यांनी लावल्याने सदरचा लिलाव रद्द करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ युवतीचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिक

अशोकनगर भागातील नीलकंठेश्वर नगरमध्ये गॅलरीत सुकत टाकलेली ओढणी काढण्याचा प्रयत्न तरुणीच्या जिवावर बेतला आहे. थोरात पार्क इमारतीत मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास डिंपल शुक्ला ही तरुणी ओढणी घेण्यासाठी गॅलरीत उतरली. ओढणी हातात घेतल्यावर गॅलेरीतून वर चढत असताना तिचा पाय घसरल्याने ती खाली कोसळली. तिच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली होती. डिंपलला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने अतिदक्षता विभागात डिंपलवर उपचार सुरू होते. याबाबत सातपूर पोलिस स्टेशनला दवाखाना नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी डिंपलचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंक्चरवर फुली!

$
0
0

महामार्गावरील ४३ पंक्चर बंद होणार; अपघातांना आळा बसणार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या झालेल्या बैठकीत घोटी ते मालेगावपर्यंतच्या रस्त्यावरील ४३ पंक्चर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे या रस्त्यावर वाहनांची तपासणी ही टोलनाक्यावरच करण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या. तसेच, ब्लॅक स्पॉट असलेली दुरुस्ती जूनपर्यंत करावी व वारंवार त्याची तपासणी करण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांच्या मधोमध असलेल्या झाडांचा विषय गांभीर्याने सोडविण्याचा निर्णयही घेण्यात आला.

गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी विविध सूचना केल्या. यावेळी परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस, आरोग्य व विविध विभागातील समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत रस्त्यावर असलेल्या पंक्चरमुळे वाहनांचे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंबंधी चर्चा झाली. महामार्गावर असे पंक्चर असणे धोकादायक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे हे पंक्चर अगोदर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे ब्लॅक स्पॉट बंद करण्याचे काम याअगोदर सुरू असले तरी उर्वरित काम जूनअखेर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला वारंवार संबंधित विभागाने संयुक्त भेटी देण्याचेही निर्देश देण्यात आले.

...

वाहनांची तपासणी आता टोलनाक्यावर

रस्त्यात वाहनांची तपासणी करण्यापेक्षा ती टोलनाक्यावरच पोलिसांनी करावी, गाड्या येथे थांबत असतात त्यावेळेस ओव्हरलोड, कागदपत्रे, मद्यसेवन यासारख्या तपासणी कराव्यात. येथे सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे तपासणी सुरक्षितस्थळी करता येईल. त्याचप्रमाणे इतर तपासणी करायची असेल तर तेथे सीसीटीव्ही कॅमेरे असावे असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. स्पीड चेक मात्र इतरत्र करण्याची सूटही दिली.

...

रस्त्यावरील झाडांचीही चर्चा

नाशिक येथे बुधवारी झाडाला आदळून झालेल्या अपघातांची गांभीर्याने दखल या बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे यांनी घेतली. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी महपालिकेला पत्र पाठवले जाणार आहे. ही झाडे कशी लवकर हटवावी याबाबतही गांभीर्याने विचार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी परिवहन विभागाने सादर केलेल्या अपघातांचे सादरीकरण केले. त्यातील निष्कर्षही विचार करायला लावणारे आहेत.

...

अपघात कमी कसे करता येतील, त्यावर काय उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे, याविषयावर समितीची बैठक झाली. अनेक निष्कर्ष धक्कादायक होते. अपघात कमी करण्यासाठी यापुढे कडक उपाययोजनेबरोबरच प्रबोधनही केले जाणार आहे.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

...

...असे आहेत निष्कर्ष

- दहावी नापास झालेल्यांची अपघातांची संख्या कमी, सुशिक्षितांचे अपघात जास्त

- अपघातात सर्व वयोगटातील प्रमाण सारखेच

- पुरुषांचे अपघात जास्त, महिलांचे प्रमाण खूपच कमी

- नव्या वाहनांचे अपघाताचे प्रमाण जास्त

- वाहनसंख्या वाढल्यामुळे अपघात

- ट्रॅफिकच्या रस्त्यापेक्षा मोकळ्या रस्त्यावर अपघात जास्त

- दारु दुकान सुरू झाल्यामुळे अपघात वाढले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेवीस लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरफोडी, वाहनचोरी, मोबाइलचोरी अशा गुन्ह्यांच्या तपासादरम्यान संशयित आरोपींकडून जप्त करण्यात आलेला फिर्यादींचा मुद्देमाल गुरुवारी एका छोटेखानी समारंभात पोलिसांमार्फत परत करण्यात आला.

पोलिस आयुक्तालयात सकाळी ११ वाजेच्या सुमारास पार पडलेल्या कार्यक्रमात आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते हा मुद्देमाल फिर्यादींना देण्यात आला. २२ लाख ९१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना मिळाला. मागील दोन वर्षांत पोलिस विभागाकडून सुमारे तीन कोटी रुपयांचा ऐवज पोलिसांकडून फिर्यादींना देण्यात आलेला आहे.

शहरात सातत्याने होणाऱ्या घरफोडी, चोरी, वाहनचोरी चोरी अशा विविध गुन्ह्यांमध्ये पोलिस ठाणे आणि क्राइम ब्रँचकडून तपास करण्यात येतो. तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात येतो. त्यानुसार या मालाची फिर्यादींच्या तक्रारीवरून शहानिशा केली जाते. कोर्टाच्या आदेशानुसार हा मुद्देमाल फिर्यादींना परत केला जातो. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या उपस्थितीत आयुक्तालयात फिर्यादींना हा मुद्देमाल परत करण्यात आला. यात पोलिस विभागाकडून सुमारे २२ लाख ९१ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला.

आठ फिर्यादींना दिलासा

गेल्या तीन ते चार वर्षांत विविध पोलिस ठाण्यांत दाखल झालेल्या आठ फिर्यादींचे चोरी झालेले सहा लाख ६१ हजार रुपये किमतीचे सोने, १५ लाख २५ हजार रुपये किमतीच्या २३ मोटारसायकल, ६८ हजार रुपये किमतीचे सहा मोबाइल फोन आणि २० हजारांची रोकड असा मुद्देमाल परत करण्यात आला. मागील दोन वर्षांत गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण चांगले राहिले. अगदी ६५ टक्क्यांपर्यंत गुन्हे उघडकीस आल्याने फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत मिळण्याचे प्रमाण वाढले होते. मागील दोन वर्षांत शहर पोलिसांनी तब्बल तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल परत केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णाच्या मृत्यूनंतर बोगस डॉक्टरवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

अयोध्यानगर भागातील विनोद कारभारी वाघ यांचा बुधवारी उपचारादरम्यान राहत्या घरी मृत्यू झाला होता. वाघ यांचा मृत्यू त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. रोशन वर्मा यांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. याप्रकरणी पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत संबंधित डॉक्टर बोगस आढळून आल्याने वर्मावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघ यांना बुधवारी दुपारी घरी छातीत दुखू लागल्याने त्यांनी घरानजीक असलेल्या डॉ. शर्मा यास उपचारासाठी बोलावून घेतले. शर्मा यांनी उपचार केल्यानंतर वाघ यांना अधिकच त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषीत केले. तर छावणी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र वाघ यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या चुकीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत तक्रार केली होती.

अखेर याप्रकरणी पोलिसांनी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सायका जबीन यांना पत्र पाठवून चौकशी करण्याचे सांगितले. त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव त्रिभुवन यांनी गुरुवारी डॉ. वर्मा यांच्या अयोध्यानगर भागातील क्लिनिकमध्ये जावून पाहणी केली. वर्मा यांचे पदवी प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले. त्यामुळे डॉक्टरचा दवाखाना सील करण्यात आला असून, आरोग्य अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चा बातमी

$
0
0

सर्वाधिक प्रतिक्रिया मिळालेली बातमी:

पवार-राहुल भेटीत विलीनीकरणावर चर्चा?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीनंतर पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘हॅपी नारी’कडून महिलांमध्ये जनजागृती

$
0
0

(तिचं विश्व लोगो)\B

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

मासिक पाळी व त्या अनुषंगाने होणारे शारीरिक व मानसिक बदल आणि घ्यायची काळजी, दक्षता याविषयी समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त 'हॅप्पी नारी' या सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशून बनवणाऱ्या कंपनीने सातपूर, अंबड एमआयडीसी येथील महिलांसाठी 'मासिक पाळी समज-गैरसमज आणि स्वच्छता' या विषयावर कार्यक्रम आयोजित केला होता. फॅमिली फिजीशियन्स असोसिएशनच्या माजी अध्यक्षा डॉ. स्मिता कांबळे ,डॉ तेजू सोलोमन, डॉ. शीतल सुरजूसे, डॉ. श्रुती पालखेडकर, डॉ. रिटा सोनवणे, डॉ. सुनिता जैन, आहारतज्ञ किम सोमैया यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच, त्यांच्या प्रश्नांचे योग्य निराकरण केले. हॅप्पी नारी फाऊंडेशनचे संचालक अनिलकुमार देवरे व सायली देवरे यांनी सर्व महिला डॉक्टरांचे स्वागत व सत्कार केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहा जोशी यांनी केले. सम्राट पटेल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजमध्ये आता ‘महा-ई-सेवा’ केंद्र

$
0
0

प्राचार्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे विविध शासकीय दाखले आता महाविद्यालयातच महा-ई-सेवा केंद्रात मिळणार आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी गुरुवारी घेतलेल्या प्राचार्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

बारावी निकाल लागल्यानंतर आता दहावीचे निकाल लागणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेशासाठी गर्दी होणार आहे. त्यामुळे येथे दाखले आवश्यक आहे. प्रवेशासाठी उत्पन्न दाखला, नॉनक्रिमेलिअर, जातीचा, अधिवास दाखला लागतो. हे सर्व दाखले आता या केंद्रात मिळणार आहेत. दाखल्यांसाठी जिल्ह्यात साडेचार महा-ई-सेवा केंद्रे असून, २३८० केंद्र नियमित सुरू आहेत. त्याचप्रमाणे बहुतांश गावात सीएससी केंद्रही सुरू केले आहे. सेतू कार्यालयातही हे दाखले मिळतात. पण, एकाच वेळी गर्दी होत असल्यामुळे दाखल्यांचा विषय नेहमीच कळीचा होता. त्यात अनेक विद्यार्थ्यांची लुबाडणूक होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय हा विद्यार्थ्यांना दिलासा देणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग क्र. १० ची अधिसूचना जारी

$
0
0

नामनिर्देशनपत्रासाठी ऑनलाइन प्रक्रिया

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १० ड या रिक्त जागेसाठी २३ जून रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीची अधिकृत अधिसूचना गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार ३० मे ते ६ जूनदरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनवाटप व स्वीकृतीची प्रक्रिया ऑनलाइन राबविली जाणार असून, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नाही. या पोटनिवडणुकीचा पहिला टप्पा म्हणून निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना आयुक्त गमे यांच्याकडून गुरुवारी (ता. ३०) शासन राजपत्र व वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार नामनिर्देशनपत्र ऑनलाइन भरण्यासाठी ३० मे ते ६ जून अशी आठवडाभराची मुदत आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. नामनिर्देशनपत्रांची छाननी शुक्रवारी, सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत केली जाईल. छाननी पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी माघारीसाठी १० जून रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ अशी वेळ असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ११ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. त्यानंतर अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. पोटनिवडणुकीसाठी रविवारी प्रत्यक्ष मतदान घेण्यात येईल. त्यानंतर २४ रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वासननगरातील टॉवर महापालिकेने हटवले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा इंदिरानगर

मोबाइल कंपन्यांकडून उभारण्यात येणाऱ्या टॉवर्समुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने वासननगर येथील एका खासगी इमारतीवरील मोबाइल कंपनीचे टॉवर परिसरातील नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेने काढून टाकले. सुमारे वर्षभर पाठपुरावा केल्यानंतर हे टॉवर काढण्यात आले.

वासननगर येथे एका खासगी इमारतीवर काही वर्षांपासून मोबाइलचे टॉवर उभारण्यात आले होते. हे टॉवर उभारणीपासूनच नागरिकांनी विरोध केला होता. मात्र विरोध होऊनही या ठिकाणी टॉवर उभारले गेल्याने नागरिकांनी मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. मात्र मुंढे यांची बदली झाल्याने हा विषय पुन्हा मागे पडला होता. मात्र स्थानिक नागरिकांनी याचा पाठपुरावा सुरू केल्यानंतर हे टॉवर याठिकाणाहून काढून टाकण्यात आले. सिडको विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'जेसीआय'अध्यक्ष शिरिष डुंडू नाशिक दौऱ्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

व्यक्तिविकास हे उद्दिष्ट असलेल्या जागतिक स्तरावरील 'जेसीआय'चे राष्ट्रीय अध्यक्ष शिरिष डुंडू यांनी नाशिकला नुकतीच भेट दिली. या निमित्ताने झालेल्या 'जेसीआय' नाशिक परिवाराच्या सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून झोनचे उपाध्यक्ष भरत बजाज, माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पारख, पराग झालावत, राष्ट्रीय उपाध्यक्ष मयूर करवा, संचालक अंकुश सोमानी, झोनचे माजी उपाध्यक्ष प्रमोद वाघ, राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज जैन आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम झोनचे उपाध्यक्ष भरत निमसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

शिरिष डुंडू यांनी 'जेसीआय'च्या राष्ट्रीय उपक्रमांची माहिती देताना 'जेसीआय इंडिया'चे जागतिक स्तरावरील महत्त्व प्रतिपादन केले. तसेच, 'जेसीआय'च्या माध्यमातून व्यक्तिविकास करताना त्याचा उपयोग समाजासाठी कसा केला जाऊ शकतो, याबाबत मार्गदर्शन केले. झोनचे अध्यक्ष भरत बजाज यांनी 'जेसीआय' नाशिकच्या सर्व अध्यक्षांनी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रफुल्ल पारख यांनी 'जेसीआय' नाशिक परिवाराच्या एकतेचे कौतुक करrत याचा समाजातील युवा पिढीवर कसा चांगला प्रभाव पडेल, यावर मत व्यक्त केले. राष्ट्रीय अध्यक्षांचे पगडी आणि हार घालून पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन जेसीआय गोदावरी, जेसीआय अंबड, जेसीआय नाशिक, जेसीआय जागृती, जेसीआय अकोले अगस्ती, जेसीआय ग्रेपसिटी, जेसीआय ग्रेपसिटी क्विन्स, जेसीआय मेटाफॉर्ज, जेसीआय नाशिकरोड, जेसीआय पंचवटी होली सिटी या विभागांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातवा वेतन आयोग लांबणीवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रशासकीय हालचालींना आता शासन आदेशाची आडकाठी निर्माण झाली आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यासाठी जोपर्यंत सरकारच्या नगरविकास विभागाकडून सूचना येत नाहीत, तोपर्यंत आयोग लागू करता येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सातवा वेतन आयोग लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. सरकारकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर महासभेवर प्रस्ताव सादर केला जाईल. त्यानंतरच वेतन आयोग लागू करण्याची भूमिका आता प्रशासनाने घेतल्याने सातवा वेतन आयोग अडचणीत सापडला आहे.

केंद्र व राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयोग लागू करण्यासाठी संघटनांकडून दबाव वाढला आहे. केंद्र आणि राज्यानंतर मुंबई महापालिकेनेही सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू केली आहे. नाशिक महापालिकेत नगरसेवकांसह शिवसेनाप्रणीत संघटनेने वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली आहे. त्यापूर्वी प्रशासनाने यंदाच्या बजेटमध्ये ८० कोटींची तरतूद केली आहे. महापालिकेने सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीची गुरुवारी बैठक झाली असून, त्यावर चर्चा झाली. या वेळी वेतन आयोग लागू केल्यास महापालिकेवर किती कोटींचा आर्थिक बोजा पडेल, याची आकडेमोड करण्यात आली. महापालिकेत पूर्वीच्या आकृतिबंधात ७०९० पदे मंजूर असून, निवृत्ती व स्वेच्छानिवृत्तीनंतर सध्या ५००२ पदे कार्यरत आहेत. त्यांना वेतन आयोग लागू केला तर तिजोरीवर ११० कोटींचा भार पडणार आहे. वेतन आयोग लागू करण्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असली तरी त्याला नगरविकास विभागाची मंजुरी आवश्यक आहे. हा आदेश येईपर्यंत आयोग लागू करता येत नसल्याची भूमिका समितीने घेतली आहे. त्यामुळे तूर्तास तरी महापालिकेत सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्राला ठेंगा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणकुीत सलग दुसऱ्यांदा भाजपच्या पाठीशी उभे राहून तब्बल आठ खासदार निवडून देणाऱ्या उत्तर महाराष्ट्राला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात ठेंगा दाखविला आहे. गेल्या मंत्रिमंडळात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रीपद भूषविलेल्या डॉ. सुभाष भामरे यांना डावलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वासाठी मोठा हातभार लावणाऱ्या उत्तर महाराष्ट्राला एकही मंत्रीपद न मिळाल्याने नागरिकांमध्ये अन्यायाची भावना आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्र हा आता भाजप-सेना युतीचा गड झाला आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदूरबार हे तीन जिल्हे भाजपमय झाले आहेत. पाठोपाठ नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यातही आता कमळाचा विस्तार जोमाने झाला आहे. या भागातून काँग्रेस, राष्ट्रवादी हद्दपार होत परिसर कमळ फुलले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातून आठही जागांवर भाजप-सेना युतीने विजय मिळवला होता. त्यात भाजप सहा तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या होत्या. गेल्या मंत्रिमंडळात धुळ्याचे खासदार डॉ. भामरे यांच्या रुपाने उत्तर महाराष्ट्राला स्थान मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीतही भाजप-सेना युतीने हा गड कायम राखला. त्यामुळे दुसऱ्या मोदी पर्वात उत्तर महाराष्ट्राला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा होती. उत्तर महाराष्ट्रातील आठ खासदारांपैकी डॉ. भामरे, रक्षा खडसे, डॉ. हिना गावीत दुसऱ्यांदा निवडून आले होते. त्यामुळे या तीघांपैकी एकाची तरी मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी अपेक्षा अपेक्षा होती.

विशेषता: उत्तर महाराष्ट्रातून गेल्या वेळेस मंत्री असलेल्या डॉ. भामरे यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, गुरुवारी झालेल्या शपथविधी समारंभात उत्तर महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त झाली. डॉ. भामरेंनाही स्थान मिळाले नसल्याने भाजपच्या समर्थकांसह नागरिकांमध्येही अन्यायाची भावना आहे. यापूर्वी भाजपच्या सत्ताकाळात जळगावचे एम. के. अण्णा पाटील व नगरचे दिलीप गांधी यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर डॉ. भामरेंच्या रुपाने तिसऱ्यांदा उत्तर महाराष्ट्राला केंद्रात संधी मिळाले होती. परंतु, भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणाऱ्या उत्तर महाराष्ट्राला यंदा मात्र भाजपकडून ठेंगा दाखविण्यात आला आहे.

आता विस्तावरच लक्ष

पंतप्रधान मोदींनी शपथ घेतल्यानंतर तब्बल ५८ जणांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे मोदी मंडळाचा दुसऱ्या टप्प्यात विस्तार होईल, अशी अपेक्षा आता उत्तर महाराष्ट्रातील जनतेला लागून आहे. दुसऱ्या टप्प्यात तरी, डॉ. भामरे, गावित, खडसेंपैकी एकाला संधी मिळेल, अशी चर्चा आता भाजपमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील विस्तारककडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थोडक्यात बातम्या

उपायुक्त बहिरम यांना नोटीस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त रोहिदास बहिरम यांना निवृत्तीच्या एक दिवस अगोदर प्रशासनाने नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या दोन वेग‌वेगळ्या चौकशी प्रकरणात बहिरम दोषी आढळल्याने प्रशासनाने नोटीस बजावून त्यांचा खुलासा मागवला आहे. त्यामुळे बहिरम यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

महापालिकेत लिपिक ते थेट उपायुक्त पदावर पोहचलेल्या बहिरम यांच्यावर सदस्यांकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. घरकुल वाटप, होर्डिंगबाबत त्यांची चौकशी करण्यात आली होती. तसेच ग्रीनफिल्ड प्रकरणातही त्यांची चौकशी करण्यात आली होती. परंतु, त्यावर कारवाई न झाल्याने सभागृहनेते दिनकर पाटील आणि नगरसेवक मुकेश शहाणे यांनी त्यांच्या निवृत्तीबाबत आक्षेप घेतला होता. अखेर या दोन्ही चौकशी प्रकरणात ते दोषी आढळल्याचे सांगत प्रशासनाने त्यांना नोटीस बजावली आहे. या दोन्ही प्रकरणात त्यांचा खुलासा मागवण्यात आला आहे. महासभेच्या मंजुरीनंतर त्यांच्यावर दोषारोप ठेवले जाणार आहेत. त्यामुळे बहिरम यांचे निवृत्तिवेतन अडचणीत सापडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपने पंचवटीत उभारल्या गुढ्या

$
0
0

पंचवटी : नरेंद्र मोदी हे गुरुवारी (दि. ३०) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना हा दिवस पंचवटी कारंजा येथे गुढ्या उभारून आणि ३०३ लाडूंचे वाटप करून साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते विजय साने, पंचवटी मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, नगरसेवक सुरेश खेताडे, शांता हिरे, उत्तम उगले, अमित घुगे, दिगंबर धुमाळ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पोलिस दलाने पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, तसेच पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात विनंती, तसेच कालावधी संपुष्टात आलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

शहर पोलिस दलातील सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या राजेंद्र कुटे यांची नाशिक ग्रामीण पोलिस दलात बदली करण्यात आली आहे. वाहतूक विभागातील महेश देवीकर, तसेच बाजीराव महाजन यांची पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली आहे. भरतसिंग पराडके यांना एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. अँटी करप्शन ब्यूरो येथे कार्यरत असलेले हेमंत सोमवंशी, प्रभाकर घाडगे, तसेच गुन्हे अन्वेषण विभागातील अशोक साखरे, साजन पवार, तर 'मसुप्र'तील सुभाष पवार हे हजर होणार आहेत. महाराष्ट्र पोलिस अकादमीतील विजय जाधव, रूपचंद वाघमारे आणि सुनील पाटील यांची एसीबी, शहर पोलिस दलातील के. पी वळवी, तसेच वाशिम येथील सुधीर पाटील यांची महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे, तर दत्तात्रय पवार यांची शहर पोलिस दलात बदली करण्यात आली आहे. दरम्यन, गोंदिया येथून संदीप कोळी, 'एसीबी'तील शंकर कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागातील बाळासाहेब थोरात आणि राज्य गुप्तवार्ता विभागातील खगेंद्र टेंभेकर हे नाशिक ग्रामीण पोलिस दलात हजर होतील. महाराष्ट्र पोलिस अकादमीतील विजय जाधव आणि पराग जाधव या दोघा पोलिस निरीक्षकांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

--

सहायक पोलिस निरीक्षक

--

नाव - सध्या कार्यरत - बदलीचे ठिकाण

--

बबन जगताप-नवी मुंबई- नाशिक परिक्षेत्र

वाल्मीक शार्दूल- शहर- नाशिक परिक्षेत्र

मनीषा घोडके-शहर- नागरी हक्क संरक्षण

विठ्ठल पोटे- शहर-औरंगाबाद परिक्षेत्र

नागेश मोहिते-शहर- नाशिक परिक्षेत्र

योगेश देवरे-शहर-कोकण परिक्षेत्र

मोहिनी लोखंडे-शहर- राज्य गुप्तवार्ता विभाग

किशोर परदेशी-नाशिक ग्रामीण-नाशिक शहर

प्रवीण कोल्हे-रायगड-नाशिक शहर

ज्ञानेश्वर वारे-धुळे-नाशिक शहर

स्वप्ना शहापूरकर-औरंगाबाद ग्रामीण-नाशिक परिक्षेत्र

संदीप हजारे-गडचिरोली- नाशिक परिक्षेत्र

--

उपनिरीक्षकांचा समावेश

शहर पोलिस दलातील शैलेंद्र म्हात्रे, रमेश पवार, हरश्वर घुगे, अश्विनी मोरे आणि नाशिक ग्रामीण पोलिस दलातील युवराज गिरे यांची विनंतीनुसार इतरत्र बदली करण्यात आली. कालावधी पूर्ण झालेल्यांपैकी ठाणे येथील धर्मराज बांगर यांची नाशिक शहर आणि संगीता गावित, साधना इंगळे यांची नाशिक परिक्षेत्रासाठी बदली करण्यात आली आहे. पुणे येथून मीना तडवी आणि गिरीश कुलकर्णी हे नाशिक परिक्षेत्रासाठी हजर होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीपी’वर आता चर्चेची मात्रा

$
0
0

अधिकारी करताहेत प्रत्येक शेतकऱ्याशी चर्चा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरातील प्रस्तावित नगररचना परियोजनेला (टीपी स्कीम) होणारा तीव्र विरोध पाहता आता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांबाबत नरमाईची भूमिका स्वीकारली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आता शेतकऱ्यांसोबत या योजनेबाबत वन टू वन चर्चा सुरू केली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक लाभाचे गणित प्रत्येकाला वैयक्तिकरीत्या पटवून दिले जात असून, त्याला शेतकरी किती प्रतिसाद देतात यावर टीपी स्कीमचे भवितव्य अवलंबून आहे.

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरातील ७५४ एकर क्षेत्रांत स्मार्ट नगररचना परियोजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी जागामालक शेतकरी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक मोबदल्यावरून गेल्या आठ महिन्यांपासून वाद सुरू आहेत. शेतकऱ्यांची कशीबशी मनधरणी करून जागेचे सर्वेक्षण स्मार्ट कंपनीमार्फत पूर्ण करण्यात आले. त्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दोन प्रस्ताव तयार करून ते शेतकऱ्यांसमोर ठेवले.

मंगळवारी या टीपी स्कीमच्या प्रस्तावाचे शेतकऱ्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. ६०:४० प्रस्ताव प्राधिकरणाने परवडत नसल्याचे कारण देत शेतकऱ्यांसमोर ५५-४५ आणि ५०-५० चे दोन प्रस्ताव ठेवले. या दोन्ही प्रस्तावांचे अवलोकन केल्यानंतर शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे यावर अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी केली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी त्यावर कुठलेच भाष्य न करता सभागृहातून काढता पाय घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मुदत मिळत नसेल तर थेट नकार समजावा अशी भूमिका घेत कंपनीच्या अधिकाऱ्यांना आव्हान दिले. त्यामुळे टीपी स्कीम संकटात सापडल्याचे बघताच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेतली. शेतकरी एकत्रितरीत्या होकार देण्याची शक्यता कमीच असल्याने आता प्रत्येक शेतकऱ्यासोबत वन टू वन चर्चा सुरू केली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बोलावून किंवा भेटून त्यांना या परियोजनेच्या आर्थिक लाभाचे गणित मांडत आहेत. त्यामुळे या चर्चेला शेतकरी कसा प्रतिसाद देतात त्यावरच टीपी स्कीमचे भवितव्य अवलंबून आहे.

...

भाजप नेत्यांचा खोडा

टीपी स्कीमच्या समर्थनावरून शेतकऱ्यांमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे. काही शेतकरी या टीपी स्कीमसाठी राजी झाल्याची चर्चा असून, दुसरा एक गट मात्र विरोधावर ठाम आहे. या गटाला भाजपच्या एक आमदार आणि पदाधिकाऱ्याचे समर्थन असल्याची चर्चा असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना मार्गी लागू नये, यासाठी प्रयत्न करीत असल्याचे अधिकारी खासगीत सांगत आहेत. या आमदाराला ही योजना या ठिकाणाहून स्थलांतरीत करून दुसरीकडे करायची असल्याने शेतकऱ्यांना फूस दिली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे योजनेतील या राजकीय हस्तक्षेपामुळे कंपनीचे अधिकारी मात्र त्रस्त झाले आहेत. या पदाधिकाऱ्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images