Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हवा शुद्ध करणाऱ्या रोपांमुळे नाशिक हेल्दी सिटी!

0
0

Ramesh.padwal@timesgroup.com

नाशिक : अमेरिकेतील 'नासा' या संस्थेने हवेतील कार्बनिक यौगिके (व्हीओसी) शोषून घेणारी म्हणजेच हवा शुद्ध करणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास करून ५० इनडोर वनस्पतींची यादी जाहीर केली आहे. त्यातील ३० वनस्पती नाशिकच्या जैवविविधतेत आढळल्या आहेत. नाशिकच्या या जैवविविधतेमुळेच हे शहर हेल्दी सिटी ठरले आहे. मात्र, या वनस्पतींबाबत जनजागृती होण्याची निकड असून, हवा शुद्ध करणाऱ्या उपकरणांपेक्षा या वनस्पती लावण्यावर भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.

नाशिक ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध असण्याचं मोठं कारण आहे येथील जैवविविधता व भौगोलिक परिस्थिती. प्राचीन काळापासून अनेक आयुर्वेदिक वनस्पती व दुर्मिळ फुलांसाठी नाशिक प्रसिद्ध आहे. मोगल काळात तर नाशिकचे गुलशनाबाद असेच नामकरण केले गेले होते. अनेक आजारांवर तोडगा म्हणून नाशिक येथे राहण्याचा सल्लाही दिला जातो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आजारी असताना त्यांनीही आजारापासून मुक्ततेसाठी नाशिकमध्ये काही काळ वास्तव्य केले होते. नाशिकच्या वातावरणाचा हा परिणाम आरोग्य क्षेत्राच्या भरभराटीवरूनही आज पाहायला मिळतो आहे. जगभरातून दुर्धर आजारांवर उपचारांसाठी लोक आज नाशिकमध्ये येताना दिसतात.

हवा शुद्ध करणाऱ्या वनस्पतींमध्ये 'नासा'च्या यादीतील ३० वनस्पती आज नाशिकमध्ये उपलब्ध असल्याचे आयुर्वेदाचार्य डॉ. विक्रांत जाधव सांगतात. घरातील हवा शुद्ध करण्यासाठी सध्या विविध उपकरणांची रेलचेल मार्केटमध्ये पहायला मिळते. मात्र, हा खर्चिक पर्याय निवडण्यापेक्षा आपल्या नाशिकच्या जैवविविधतेत असलेल्या हवा शुद्ध करणाऱ्या इनडोर वनस्पती घरात लावल्यास घरातील वातावरण शुद्ध व आल्हाददायक करता येऊ शकते. विशेष म्हणजे अनेक नाशिककरांनी या वनस्पती घरात लावलेल्या आहेत. मात्र, त्यांचा नेमका उपयोग काय हे माहिती नसल्याने त्याचा योग्य परिणाम साधता येत नाही. त्यामुळे या वनस्पती कोणत्या हे समजून घेणे गरजेचे आहे.

या आहेत त्या वनस्पती

लेडी पाम, बांबू पाम, रबर प्लांट, ड्रेसेना 'जैनेट क्रेग', इंग्लिश आयव्हीवाय, बोस्टन फर्न, किम्बर्ले क्वीन, गेबेरा डेसी, ड्रेसेना 'वॉर्नकेकेट', डंब कॅन, डब्ल्यूएक्स बेगोनिया(दुर्मिळ), हार्ट-लीफ फिलेन्ड्रॉन, स्नेक प्लांट, फिलॉन्डेंद्र (हातीच्या कानासारखे), किंग ऑफ हार्ट, प्रे प्लांट, ख्रिस्तमस-इस्टर कॅक्टस, लली टर्फ, डेन्ड्रोबीम ऑर्किड, स्पिडर प्लांट, चिनी हरित, क्रॉटन, पॉइन्सेटिया, कोरफड, सायक्लेमेन, यूरेन प्लांट, ट्युलिप, मध्यम ऑर्किड या वनस्पती नाशिकमध्ये सापडतात व चांगल्या उगवतात. तर, नाशिकमध्ये सापडत नाहीत. मात्र, त्या या वातावरणाच चांगल्या उगवतात अशांमध्ये दिवार्फ डेट पाम, पार्लर पाम, अँथुरियम, एरिका पाम यांचा समावेश होतो.

चांद्र मोहिमेतून शोधाला चालना

१९८० मध्ये 'नासा'ने लँडस्केप डिझायनर्सच्या मदतीने हवा शुद्ध करणाऱ्या इनडोर वनस्पतींच्या गुणधर्मांचा अभ्यास केला होता. ही गरज त्यांना १९६९ मध्ये चांद्र मोहिमेनंतर जाणवली होती. मोहिमेतील अंतराळवीरांना अशुद्ध हवेमुळे बराच काळ आजारपणाला सामोरे जावे लागले होते. यानात हवा शुद्ध ठेवणाऱ्या इनडोअर वनस्पती ठेवल्या जाऊ शकतात का व कोणत्या, या गरजेतून या अभ्यासाला सुरुवात झाली होती. यातून काही वनस्पती वातावरणातील कार्बनिक यौगिकांचे (व्हीओसी Volatile organic compounds) शोषून घेतात हे पुढे आले व 'नासा'ने अशा ५० वनस्पतींची यादी प्रसिद्ध केली.

सुदैवाने नाशिकमध्ये हवा स्वच्छ करण्यास मदत करू शकणाऱ्या वनस्पती आहेत. घरातील हवा स्वच्छ करण्यासाठी आपण आता फीचर्सचा वापर करू लागलो आहोत. मात्र, हवा स्वच्छ करणाऱ्या वनस्पती सहज व अधिक जागा न व्यापता लावल्या जाऊ शकतात. यातून आरोग्य व मनाचा वेलनेस जपला जाऊ शकतो आणि खर्चाशिवाय उत्तम आरोग्य मिळू शकते.

-डॉ. विक्रांत जाधव, आयुर्वेदाचार्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात दोन शेतकरी आत्महत्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात पुन्हा शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले असून दोन दिवसांत दोघांनी मृत्यूला कवटाळले आहे. सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा आणि नाशिक तालुक्यातील शिंदे येथे या घटना घडल्या असून जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३१ झाली आहे.

सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथील रहिवाशी किसन भागुजी हुळहुळे (वय ६९) यांनी रविवारी (दि. १९) दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास शेत तळ्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबतचा प्राथमिक अहवाल सिन्नर तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला आहे. हुळहुळे कुटुंबावर बँकेचे तसेच हातउसने एकूण १५ लाखांपर्यंतचे कर्ज असल्याचे समजते. कर्जाच्या विवंचनेतून ही आत्महत्या झाली का याची माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

आत्महत्येची दुसरी घटना नाशिक तालुक्यातील शिंदे गावात घडली आहे. येथील योगेश गौतम जाधव (वय ३५) या तरुणाने सोमवारी (दि. २०) रात्री आठच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश यांचे वडील गौतम पुंजा जाधव यांच्या नावे शेतजमीन आहे. आत्महत्येबाबतचा प्राथमिक अहवाल तलाठी पी. एस. अग्रवाल यांनी पाठविला आहे. आत्महत्येच्या कारणांचा शोध घेऊन सविस्तर अहवाल पाठवा असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. गतवर्षी मे अखेरपर्यंत जिल्ह्यात ३९ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली होती. यंदा आतापर्यंत ३१ आत्महत्या नोंदविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

तालुकानिहाय आत्महत्या

तालुका शेतकरी आत्महत्यांची संख्या

मालेगाव ८

दिंडोरी ६

निफाड ३

बागलाण ३

सिन्नर ३

नाशिक २

नांदगाव २

चांदवड १

कळवण १

त्र्यंबकेश्वर १

येवला १

एकूण ३१

..

(देवळा, इगतपुरी, पेठ, सुरगाणा येथे एकाही शेतकरी आत्महत्येची नोंद नाही)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतमोजणी फोटो जोड

तीव्र झळांनी नाशिककर हैराण

0
0

तीन दिवस उष्णतेची लाट

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कडक उष्णतेने होरपळलेल्या नागरिकांना पर्जन्यवृष्टीचे वेध लागले असतानाच पुन्हा मध्य-उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. नाशिकचे तापमानही सलग दुसऱ्या दिवशी चाळिशी पार राहिले. मंगळवारी ४०.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सकाळपासूनच वाढलेल्या उन्हाच्या तीव्र झळांनी घामाघूम झालेले नाशिककर पुरते हैराण झाल्याचे दिसून आले. आणखी तीन दिवस नाशिकसह पुणे व अमदनगमध्ये उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

गेल्या आठवड्यात हवामान विभागाने वर्तविलेल्या मान्सूनच्या अंदाजामुळे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या उकाड्यापासून सुखावा देणाऱ्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, शहरातील तापमानाने यंदा पुन्हा चाळिशी ओलांडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात तापमान ३६ ते ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान रेंगाळत होते. सोमवारी (२० मे) शहराच्या तापमानाने पुन्हा चाळिशी ओलांडली. सोमवारी ४०.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले, तर मंगळवारी (२१ मे) कमाल ४०.१ अंश आणि किमान २३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारपासून शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत असून, येत्या शनिवारपर्यंत उष्णतेची लाट असेल, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.

यंदा ४ एप्रिल रोजी शहरातील कमाल तापमान ४०.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. त्यानंतर शहरातील तापमानात चढ-उतार होत राहिले. गेल्या आठ दिवसांपासून कमाल तापमानासोबतच किमान तापमानातही वाढ होत आहे. त्यामुळे उकाडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. शनिवारपर्यंत नाशिकचे तामपान ४१ अंश सेल्सिअसवर स्थिरावेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच राज्यभरात सर्वत्र उष्णतेची लाट आली असून कोकण-गोव्यामध्ये २५ मेपर्यंत तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे राज्यातील तापमानावर परिणाम होणार असून, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात उष्णतेचा कडाका वाढेल, असे हवामान विभागाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उष्माघाताचा वाढता धोका

0
0

मालेगावमध्ये सर्वाधिक रुग्ण

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंगाची लाहीलाही करणारे तापमान पुन्हा एकदा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मालेगावसह धुळे, जळगाव आदी ठिकाणी हा पारा ४३ अंशांपुढे सरकला आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचे रुग्ण समोर येत आहेत. मार्च महिन्यापासून आतापर्यंत एकूण २३ रुग्णांवर उपचार झाले असून, त्यात जळगाव आणि मालेगावमधील तब्बल १८ रुग्णांचा समावेश आहे.

थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात वर्षागणिक तापमानाचा पारा चढता राहतो आहे. चाळीस अंश सेल्सिअस तापमानाच्या पुढे उन्हात फिरणाऱ्या वा काम करणाऱ्या व्यक्तींना सनस्ट्रोकची शक्यता नाकारता येत नाही. सनस्ट्रोक झाल्यास आणि वेळेत उपचार मिळाला नाही तर अशा व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर सिव्हिल हॉस्पिटलने अशा रुग्णांसाठी विशेष वार्ड सुरू केला आहे. या वार्डात सहा बेड्स असून, तीन महिला आणि तीन पुरुषांना एकाच वेळी येथे उपचार मिळू शकतो. नाशिकमध्ये आतापर्यंत उष्माघाताची लक्षणे दिसणाऱ्या तिघा जणांवर उपचार करण्यात आले आहे. जळगावमध्ये सर्वाधिक १०, मालेगावमध्ये आठ, नाशिकमध्ये तीन, तर धुळे जिल्ह्यात दोन रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. मार्च महिन्यात उष्माघाताचे एकूण दोन, एप्रिल महिन्यात ११ तर मे महिन्यात १० रुग्ण समोर आले. उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

...

यामुळे होतो उष्माघात

उन्हामध्ये शारीरिक श्रमाचे, मजुरीची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये अथवा उष्णतेशी संबंधित ठिकाणी काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे आदी कारणांमुळे उष्माघात होऊ शकतो. पाच वर्षांपेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना उष्माघाताचा त्रास लगेचच होतो, हे लक्षात घेणे महत्त्वाचे असते. मद्य, सोडा, कॉफी, अतिथंड पाणी पिणे, गरज नसताना उन्हात बाहेर फिरणे, तंग व गडद कपडे वापरणे टाळणे हे सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरते.

--

उष्माघाताची लक्षणे

शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे, थकवा येणे, ताप येणे (१०२ पेक्षा जास्त), त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी, अस्वस्थ, बेशुद्ध अवस्था, उलटी होणे इत्यादी. उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी लिंबू-मीठ-साखरपाणी, नारळपाणी, कोकम सरबत, फळांचा रस आदी द्रवपदार्थ भरपूर प्रमाणात घ्यावेत. फ्रीजचे पाणी न पिता माठातले पाणी वाळा, गुलाबाच्या पाकळ्या घालून नैसर्गिक थंड केलेले जल प्यावे. काकडी, टरबूज, खरबूज डाळिंब अशी हंगामी फळे खावीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्लेखोरास चार वर्षे कारवास

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोकरीवरून काढल्याच्या संशयावरून सुरक्षा पर्यवेक्षकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीस जिल्हा व प्रधान न्यायाधीश आर. एम. जोशी यांनी चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सुनील भाऊसाहेब आंधळे असे या आरोपीचे नाव आहे.

सुनील आंधळे हा इंडिया बुल्स कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून नोकरीस होता. त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. आपल्याला नोकरीवरून काढण्यात रामजी प्रसाद यांचा हात असल्याचा सुनीलला संशय होता. याच संशयातून सुनीलने आपले सहकारी रवींद्र पिंपळे आणि एका अल्पवयीन युवकासह कंपनीच्या दातली गेटवर रामजीप्रसाद यांच्यावर २७ जून २०१४ रोजी प्राणघातक हल्ला केला. या घटनेत आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून तसेच गळा दाबून रामजीप्रसादला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात रामजीप्रसाद गंभीर जखमी झाले. या प्रकरणी तिघांविरोधात सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. शिरीष कडवे यांनी युक्तीवाद केला. समोर आलेल्या साक्षीपुराव्यांनुसार न्यायालयाने सुनीलला चार वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. तर पुराव्यांअभावी दोघांची निर्दोष सुटका करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैवविविधता

बालभिक्षेकऱ्यांची ‘शाळा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बालभिक्षेकऱ्यांचा मुद्दा जळजळीत असला, तरी प्रशासनाची भूमिका जखम पायाला अन् मलम शेंडीला या प्रकारात मोडणारी आहे.

प्रशासनाची कारवाई धरपकडीपुरती मर्यादित असल्याने गतवर्षी पकडण्यात आलेले बाल व इतर भिक्षेकरी पुन्हा रस्त्यावर परतले आहेत. भिक्षेकऱ्यांच्या वाढत्या संख्येचे मूळ अर्थकारणात असून, गतवर्षी मुंबई हायकोर्टानेही यासंदर्भात दिलेल्या निकालाद्वारे हेच अधोरेखित केले होते. शहरात आजमितीस अडीचशेहून अधिक भिक्षेकरी फिरतात. गतवर्षी एवढ्याच भिक्षेकऱ्यांना एका संयुक्त मोहिमेंतर्गत पकडण्यात आले होते. याबाबत दाखल झालेल्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाने मानवी हक्कांची पायमल्ली होता कामा नये, असे स्पष्ट करीत सर्व भिक्षेकऱ्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. त्यावेळी भिक्षेकऱ्यांनी त्यांची बाजूसुद्धा मांडली होती. भिक्षेकऱ्यांच्या एकूण प्रकरणाबाबत बोलताना सूत्रांनी स्पष्ट केले, की शहरात बालभिक्षेकऱ्यांची संख्या लक्षणीय असून, भविष्यात ही मुले वाममार्गाला जाण्याची शक्यता अधिक असते. २०१५ पासून वेळोवेळी भिक्षेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना पकडण्यात आले. पण, या मुलांचे अथवा इतर भिक्षेकऱ्यांचे पुनर्वसनच योग्य पद्धतीने झाले नाही. बालगृहांमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. बालगृहांमध्ये ५० टक्केसुद्धा कर्मचारी उपलब्ध नाहीत, तसेच १० ते १२ वर्षांपर्यंत मनमोकळे राहणाऱ्या मुलांना बंदिस्त वातावरणाची सवय व्हावी, त्यातून त्यांच्या शिक्षणाला गती मिळावी यासाठी ठोस उपाययोजना होत नाहीत. या वेगवेगळ्या कारणांमुळे मुलांचे मन बालगृहात रमत नाही. त्यातच त्यांचे पालकसुद्धा मुलांना बालगृहात ठेवण्यास तयार नसतात. मुलांना पकडणे सोपे आहे. मात्र, त्यांचे पुनर्वसन करणे मोठे काम असून, त्यातच आजवर महिला व बालकल्याण विभाग पिछाडीवर राहिला असल्याची खंत या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केली. सध्या पोलिस, महिला व बालकल्याण विभाग, चाइल्ड लाइनसह इतर सामाजिक संघटनांनी भिक्षेकऱ्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत एक-दोन बैठकाही पार पडल्या. पण, मुंबई हायकोर्टाने घालून दिलेल्या निर्देशानुसार महिला व बालकल्याण विभागाने काय तयारी केली, या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यातच आहे.

--

दुष्काळाचा परिणाम

राज्यात यंदा पडलेल्या भीषण दुष्काळामुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. शहरात येणाऱ्या नागरिकांना आसरा मिळाला नाही, तर ते सतत वर्दळ असलेल्या आणि वर्दळीतून दोन पैसे मिळतील अशा चौकात, सिग्नलवर आसरा घेतात. या मुलांना आणि त्यांच्या पालकांना भिक्षेकरी म्हणून पकडले, तर मुलगा शाळेत असल्याच्या दाखल्यापासून आधार कार्डपर्यंत सर्व हजर होते. त्यामुळे या कुटुंबांना सोडूनच द्यावे लागते.

--

घर सोडून रस्त्यावर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाका परिसरात रस्त्यावर राहणाऱ्या जवळपास २० कुटुंबांना घरकुल योजनेंतर्गत महापालिकेकडून घरे देण्यात आली होती. या कुटुंबांतील पुरुष गजरा विणण्याचे, तर महिला ते गजरे विकण्याचे काम करतात. लहान मुले काही तरी स्टंट करतात वा भीक मागतात. महापालिकेने फुकट दिलेली घरे सोडून ही कुटुंबे काही वर्षांतच पुन्हा रस्त्यावरच रमली असून, या कुटुंबांबाबत प्रशासन काय उपाययोजना राबविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

--

मुलांचे पुनर्वसन होणे हाच कळीचा मुद्दा असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. मुले पकडली, की ती बालगृहांना पाठविली जातात. काही दिवसांनी त्यांचे पालक येऊन मुलांना घेऊन जातात. हा फक्त दमण्याचा व दमविण्याचा प्रकार होतो.

-चंदूलाल शहा, मानद सचिव, बालनिरीक्षणगृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून रंगला कलगीतुरा

0
0

शिंदे ग्रामपंचायतीने प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शिंदे (ता. जि. नाशिक) गावातील पाणीटंचाईच्या मुद्द्याला प्रश्नाला राजकीय वळण लागले असून ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणीटंचाई दूर करण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी फेटाळला आहे. उलट गेल्या १५ वर्षांपासून शिंदे गावातील पाणीटंचाईप्रश्नी ग्रामपंचायतीकडून पंचायत समिती प्रशासनाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

शिंदे गावातील पाणीप्रश्नावर ठोस उपाययोजना आखून टंचाई दूर करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या मुद्द्यावर स्थानिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासह नाशिक पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर प्रत्येक वॉर्डमध्ये दररोज दोन टँकर पाणी पुरविण्याचे आदेश गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांनी ग्रामसेवक विजय जाधव यांना दिले होते. मात्र, ग्रामपंचायतीने या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावातील संतोष झाडे, नामदेव बोराडे आणि भावराव तुंगार या तीन शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहित करून तेथील पाणी गावकऱ्यांना पुरविले जात असल्याचा दावा सरपंच माधुरी तुंगार यांनी केला आहे. याशिवाय सरपंचांच्या मालकीच्या जागेत बोअरवेल करुन त्याचेही पाणी नागरिकांना दिले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्येक वॉर्डात दररोज एक तास पाणी पुरवले जात असल्याचा सरपंचाचा दावाही खोटा आहे. पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. भारत निर्माण योजना चुकीच्या पद्धतीने राबविली गेल्याने गावाचा पाणीप्रश्न सुटला नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

शिंदे गावात काही प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाल्यावर प्रशासनाकडे टँकरचा प्रस्ताव दिला होता. तो मंजूर झाला नाही. मात्र, तीन विहिरींचे अधिग्रहण करून सध्या ग्रामपंचायतीतर्फे प्रत्येक वार्डातील नागरिकांना दररोज तासभर पाणी पुरवठा सुरु आहे. त्यामुळे टँकरची गरज मिटली आहे.

- माधुरी तुंगार, सरपंच, शिंदे

शिंदे गावात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. नागरिकांना पाण्यासाठी चार ते पाच दिवस वाट बघावी लागते. स्थानिक नागरिक स्वखर्चाने टँकर मागवित आहेत. गावातील पाणीप्रश्न दडवून ग्रामपंचायतीने महसूल प्रशासनाची दिशाभूल करणारा अहवाल सादर केला. गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशालाही ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखविली. गेल्या १५ वर्षांपासून गावकरी पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. या प्रश्नी ग्रामपंचायत प्रशासनाचा दूरदृष्टीचा अभाव कारणीभूत आहे.

- बाजीराव जाधव, स्थानिक नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उधळपट्टीवर दंड

0
0

पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई

...

- दंडाची रक्कम ५०० रुपयांवर

- अन्य विभागातही मोहीम राबविणार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेला पाणीवापराबाबत विचारणा केल्यानंतर पालिका प्रशासन पाण्याच्या अपव्ययाबाबत खडबडून जागे झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने विचारणा केल्यानंतर पालिका प्रशासनाने आता पाणीकपातीऐवजी पाणीबचतीवर जोर दिला आहे. शहरात पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. उद्यानात पाण्याचा जास्त वापर, रस्त्यावर पाणी सांडणे, वाहने धुणाऱ्यांवर कारवाई तीव्र केली आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर पाचशे रुपयांपर्यंत दंडात्मक आकारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सिडको, सातपूर सोबतच शहरातील अन्य भागातही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्यात एकीकडे दुष्काळाची भीषण दाहकता असताना महापालिका हद्दीत मात्र मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय केला जात असल्याचे समोर आले आहे. विशेषत: सिडको, सातपूर या भागात पाण्याची उधळपट्टी होत असल्याचे माध्यमांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिले होते. शहरात होत असलेल्या पाण्याच्या अपव्ययाची जिल्हाधिकारी कार्यालयानेही गंभीर दखल घेतली आहे. महापालिकेला पाण्याच्या वापराबाबत विचारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्तांनीही सदरची बाब गंभीरपणे घेतली आहे. प्रशासनाने पाण्याच्या अपव्यय करणाऱ्यांवर यापूर्वीच सिडको आणि सातपूर विभागात कारवाई सुरू केली आहे. आता या कारवाईच्या व्याप्ती वाढवण्यात आली असून, या दोन विभागांसह नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, नाशिकरोड आणि पंचवटीतही राबविण्यात येणार आहे. पाण्याच्या अपव्यव करणाऱ्यांवरील दंडात्मक कारवाईची रक्कम आता ३०० वरून ५०० रुपयांपर्यंत करण्यात आली असून, रस्त्यांवर पाणी सांडणे, वाहने धुणाऱ्यांसह, सोसायट्यांच्या पाण्याचा सांडवा वाहतांना दिसल्यास त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - शब्द आणि अर्थ

0
0

शब्द आणि अर्थ

A फॉर

Ability - पात्रता

Absent - अनुपस्थित, गैरहजर

Accept - स्वीकार

Acadamic - शैक्षणिक

Address - पत्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे

0
0

'नाशिक शहराने आम्हाला खूप काही दिलं. आज आमच्यापैकी अनेकांची स्वत:ची घरे झाली आहेत. मोठ्या मल्टिनॅशनल कंपन्यांच्या मालकापासून ते इडली विकणाऱ्या बांधवापर्यंत आमचा समाज संपूर्ण शहरात विखूरला आहे. त्यामुळे आम्ही सर्व बांधव नाशिकच्या ऋणातच राहणे पसंत करतो', ही भावना आहे तमिळ बांधवांची. तमिळ बांधवांनी लोकांनी एकत्र यावे यासाठी तमिळ संगम नावाची संस्था स्थापन केली आहे. तिच्या माध्यामातून विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. नाशिकमध्ये तमिळ लोक कधी आले असे निटसे सांगता येणार नाही. मात्र, काही जणांचे वडील, आजोबा हे आर्टिलरी सेंटरमध्ये नोकरीला होते. तेथून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी नाशिक शहरातच राहणे पसंत केले. त्याचप्रमाणे करन्सी नोट प्रेस, गांधीनगर प्रेस, एचएएल अशा केंद्र सरकारच्या विभागांमध्ये विविध पदांवर तमिळी बांधव कार्यरत होते. आजही ओझर भागात २० ते २५ परिवार राहत आहेत. यातील काही जण निवृत्त झाले आहेत. काही अजूनही नोकरी करीत आहेत. अनेकांची नाशिक शहरात तिसरी पिढी राहते आहे. तामिळनाडूमध्ये अनेक जाती धर्माचे नागरिक राहतात. नाशिकमध्ये सर्व तमिळ बांधव कुटुंब म्हणून राहतात. त्यासाठीच कोण कुठल्या धर्माचा आहे हे पाहिले जात नाही. हिंदू, ख्रिश्चन, अथवा मुस्लिम प्रत्येक जण एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होत असतात. साधारणत: ३० ते ४० वर्षांपूर्वी तमिळ नागरिक किंवा कुटुंब नाशिक शहरात आले असावेत, असा अंदाज आहे. नाशिकच्या औद्यागिक वसाहतीमध्ये देखील तमिळ बांधवांची संख्या मोठी आहे. महिन्द्रा अँड महिन्द्रा कंपनीत तामिळनाडूमधील अनेक तमिळी बांधव अधिकारी पदावर कार्यरत आहेत. तामिळनाडूमध्ये ३२ जिल्हे आहेत. मात्र, दक्षिण तामिळनाडूमधून नाशिकमध्ये आलेल्यांची संख्या अधिक आहे. गेल्या काही वर्षांपासून नाशिकच्या खवय्यांना आमच्या इडली विक्री करणाऱ्या बांधवांनी वेड लावले आहे. त्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. पूर्वी हे बांधव गांधीनगरमध्ये राहत होते. आता सिडको, राणेनगर भागात वास्तव्याला आहेत. नाशिक शहराला एक संस्कृती आहे. त्यामुळे इतर शहरात वास्तव्यास न जाता नाशिक शहरातच तमिळ बांधव राहणे जास्त पसंत करीत आहेत.

…..

एक हजारावर परिवार

करन्सी नोट प्रेस सुरू झाले तेव्हा नाशिक शहरात अवघे एक किंवा दोन तमिळ कुटुंब राहत होती. आता त्याची संख्या एक हजारावर गेली आहे. वीस वर्षांपूर्वी आमचे इडली विकणारे बांधव आले त्यांचीही संख्या आता दोनशेच्यावर गेली आहे. दिवसेंदिवस संख्या वाढते आहे. तामिळनाडूमधून येणाऱ्या बांधवांचे आम्ही रजिस्ट्रेशन सुरू केले आहे. आतापर्यंत तीनशेच्यावर कुटुंबांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. येत्या काही दिवसात प्रत्येक कुटुंबाची माहिती आमच्या संस्थेकडे उपलब्ध होईल, असा विश्वास तमिळ संगमचे पदाधिकारी व्यक्त करतात.

…..

वर्षाला चार उपक्रम

तमिळ संगमच्या वतीने संपूर्ण तमिळ समाज एकत्र यावा, विचारांची देवाणघेवाण व्हावी, अडीअडचणीला एकमेकांना मदत व्हावी, याकरिता वर्षातून चार ते पाच वेळा आम्ही एकत्र येतो. आमचे व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत, फेसबुक पेज आहे. त्याचप्रमाणे झालेले कार्यक्रम आम्ही इन्स्टाग्राम, युट्यूबवर टाकत असतो. सर्वात महत्त्वाचा सण असतो तो पोंगल. 'शेतकऱ्याच्या शेतात चांगले धान्य पिकू दे, धन धान्य समृद्धी येऊ दे' यासाठी मकरसंक्रांतीच्या दिवशी आम्ही पोंगल सण साजरा करतो. प्रत्येक जण स्वत:च्या घरी पूजा करतो. त्याचप्रमाणे कार्तिक स्वामी मंदिर, अय्यापा स्वामी मंदिर येथे पूजा करतो. यंदा संख्या वाढल्याने एका हॉलमध्ये आम्ही सामुदायिक पूजन केले. दरवर्षी असे पूजन करण्याचा मानस आहे. तमिळ वर्षाची सुरुवात १४ एप्रिलपासून होते. त्यावेळी देखील सर्व बांधव एकत्र येत असतात. त्यानंतर वार्षिक समारंभ आणि गांधी जयंतीच्या दिवशी एकत्र येतात.

…..

सामाजिक कार्यात योगदान

तमिळ समाज इतर समाजाच्या तुलनेत छोटा आहे. त्यामुळे समाजोपयोगी कामात ते खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतात. दरवर्षी २ ऑक्टोबर, गांधी जयंतीच्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. त्याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये काही दिवसापूर्वी 'गजा' नावाचे चक्रीवादळ आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना आर्थिक आणि धान्य रुपाने मदत करण्यात आली. तेथील मच्छिमारांना मासेमारीचे जाळे घेऊन देण्यात आले. त्याचप्रमाणे केरळमध्ये पूर आला, त्या पूरबाधित व्यक्ती, कुटुंबांना मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यात आली. त्याचप्रमाणे तमिळी बांधव रमेश अय्यर यांनी तीन लाख झाडे नाशिक शहरात लावण्याचा संकल्प केला आहे. त्याला सर्वजण मदत करीत आहेत. तामिळनाडूमधून शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा भाविकांना नेहमीच मदत केली जाते. त्यांना गाड्या भाड्याने घेऊन देणे, एखाद्या परिवाराचा अपघात झाल्यास वैद्यकीय सुविधा व अन्य मदत उपलब्ध करून देणे, अशी बहुविध कामे समाजाच्या वतीने केली जात आहेत.

…..

जुलैत वार्षिक स्नेहसंमेलन

जुलै महिन्यात तमिळ संगम या संस्थेचा वर्धापन दिन असतो. यावेळी कालिदास कलामंदिरात समारंभ होतो. गायन, वादन, नृत्य, नाट्य इत्यादी कलांचे सादरीकरण यावेळी केले जाते. तमिळी पाल्य त्यात हिरीरीने सहभाही होतात. स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी मोठे योगदान दिले असे वीर पांडीय कटबम्मन यांच्या जीवनावर आधारित नाटक यंदा सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, भरतनाट्यम, कथ्थक इत्यादी प्रकारच्या नृत्यांचे देखील सादरीकरण करण्यात आले होते.

…..

सचोटीने काम

तमिळी समाज राजकारणात सहभागी होत नाही. आपला व्यवसाय आणि आपली नोकरी यातच तो धन्यता मानतो. जे काही काम करतो ते सचोटीने करतो, व्यवसाय जरी केला तरी त्यात पारदर्शकता असली पाहिजे याकडे आमचा कटाक्ष असल्याचे समाजबांधव सांगतात. त्याचप्रमाणे मुलांची शैक्षणिक प्रगती कशी होईल, याकडे आमचा अधिक कल असल्याचे ते सांगतात. पुढची पिढी शिकली तर सुखाचे दिवस येणार आहेत. म्हणून शिक्षणाला महत्त्व देतो, असे ते म्हणतात.

…..

गणेशोत्सोवाची भुरळ

नाशिक हे सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ शहर आहे. पुणे, मुंबईनंतर नाशिकमध्ये अनेक जण वास्तव्याला प्राधान्य देतात. येथील हवामान चांगले आहे. येथील रस्तेही स्वच्छ आहेत. इतर शहरांसारख्या उघड्या गटारी, रस्त्यावर कचरा कुठे दिसत नाही. नाशिककर शांतताप्रिय आहेत. नाशिककरांनी पारंपरिक सांस्कृतिकपण टिकवून ठेवले आहे. येथील गणेशोत्सव सगळ्यांना आवडतो. आमच्या सोसायटीमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आमचा जास्त पुढाकार असतो. आम्हालाही खूप मजा येते, असे तमिळी बांधव सांगतात.

…..

कन्याकुमारीसाठी स्वतंत्र रेल्वे

तामिळनाडूमधील कन्याकुमारी भागातून अनेक बांधव नाशकात आले आहेत. नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरून भारतातल्या सर्व राज्यांमध्ये जाण्याची व्यवस्था आहे. फक्त तामिळनाडूमध्ये जाण्यासाठी रेल्वे नाही. तामिळनाडूमधील कोणत्याही शहरात जायचे झाल्यास त्याला मुंबईहून कन्याकुमारी ट्रेनचा पर्याय असतो. गेल्या अनेक वर्षांपासून आमची मागणी आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे ते सांगतात.

…..

शहरात तीन लाख झाडे लावणार आहोत. साऊथ इंडियन विनोदी अभिनेता विवेक याला नाशिकमध्ये बोलावणार आहोत. शहराच्या विविध भागात ही झाडे लावण्याचा संकल्प आहे. जागा निश्चित झाली आहे. जुलै महिन्यात वृक्षारोपणाला सुरुवात होईल.

- कन्नन मुरुगन पिल्लई, उपाध्यक्ष, तमिळ संगम

…..

माझा जन्म मुंबईचा शिक्षण तेथेच झाले. सन १९८१ साली मी नाशिकला आलो, तेव्हापासून मी नाशिककर आहे. मला नाशिककर असल्याचा अभिमान आहे. माझ्या नातेवाईकांसारखेच प्रेम मला नाशिकने दिले. माझे चेन्नई, नाशिक, उदयपूर या ठिकाणी कारखाने आहेत. पण मला सर्वात जास्त नाशिक प्रिय आहे.

- राममूर्ती राजू, अध्यक्ष, तमिळ संगम

…..

आमच्या अनेक पिढ्या नाशिकमध्ये वास्तव्यास आहेत. आमची मुलेदेखील नाशिकमध्येच शिकत आहेत. नाशिकने आम्हाला खूप काही दिले. आम्ही बाहेरून आलो आहोत, असे कुणी म्हटले नाही किंवा दुजाभावही केलेला नाही.

- नारायणन सदाशिवन, सल्लागार, तमिळ संगम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकतींचा २९ ला फैसला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता २७ मे रोजी संपताच महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी शहरातील मिळकतींबाबत निर्णय घेण्यासाठी येत्या २९ मे रोजी महासभा बोलावली आहे. या महासभेत शहरातील मिळकतींना कोणते दर लावायचे याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.

प्रशासनाने व्यावसायिक वापराच्या मिळकतींना रेडिरेकनरच्या अडीच टक्के दर लावण्याचे आदेश काढले आहेत. परंतु, हे दर परवडणारे नसल्याने सत्ताधाऱ्यांकडून मिळकतधारकांना दिलासा दिला जाणार असून, या मिळकतींना ०.५ टक्के दराने कर आकारणी करण्याचा ठराव केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रतन लथ यांच्या उच्च न्यायालयातील जनहित याचिकेचा आधार घेत महापालिकेने शहरातील मिळकती 'सील' करण्याची कारवाई सुरू केली आहे. करारनामा नसलेल्या आणि अनधिकृत वापर सुरू असलेल्या व्यायामशाळा, अभ्यासिका, वाचनालये, योगा हॉल, संगीतवर्ग, समाजमंदिरे, ज्येष्ठ नागरिक संघ यांना थेट टाळे लावण्याची कारवाई सुरू केली आहे. महापालिकेच्या ९०३ मिळकतींपैकी ४०० मिळकतींचे करारनामेच नसल्याने या मिळकतींचा बेकायदा वापर सुरू असल्याचे समोर आले होते. त्यामुळे महापालिकेच्या या कारवाईने नागरिकांत संताप निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असतानाच सुरू झालेल्या कारवाईने विद्यार्थी त्रस्त झाले होते, तर नागरिकांसाठी दैनंदिन वापर असलेले वाचनालय, ज्येष्ठ नागरिक संघ, योगा हॉल, समाजमंदिरांना टाळे लागल्याने भाजपची कोंडी झाली होती.

भाजपच्या दबावानंतर प्रशासनाने कारवाईबाबत नरमाईचे धोरण स्वीकारत व्यावसायिक वापराच्या मिळकतींनी रेडिरेकनकरच्या अडीच टक्के दर लावण्याचे आदेश दिले, तर सार्वजनिक वापर असलेल्या मिळकतींचे सर्वेक्षण करून त्या खुल्या करण्याचे धोरण स्वीकारले होते. महापालिकेने जवळपास ३७४ मिळकतींना 'सील' लावण्याची कारवाई केली होती. सत्ताधारी भाजपने मिळकत धोरणाचा घोळ कायम ठेवल्याने ही कारवाई ओढावल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी हा रोष कमी करण्यासाठी मिळकतींसदर्भात आयुक्तांना अधिकार देण्यासंदर्भातील प्रलंबित असलेल्या ठरावाला आचारसंहितेतच अंतिम रूप देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, विरोधकांनी माघार घेतल्याने हा ठराव बारगळला होता. आचारसंहिता असल्याने सत्ताधाऱ्यांवर निर्णय घेण्यासाठीचे बंधन आले होते. परंतु, आता आचारसंहिता २७ मे रोजी संपत आहे. त्यामुळे आचारसंहिता संपताच नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी मिळकतींवर निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी येत्या २९ मे रोजी महासभा बोलावण्यात आली असून, त्यात दर आकारणीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

--

दिलासा मिळण्याची चिन्हे

प्रशासनाने व्यावसायिक वापर असलेल्या मिळकतींना रेडिरेकनरच्या २.५ टक्के दर आकारणी करण्याचा आदेश काढला आहे. तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी हा आदेश काढला होता. परंतु, हा दर या संस्थांना परवडणारा नसल्याचा दावा करण्यात आला होता. या दराने दर आकारणी झाली, तर भाडे संस्थाना परवडणारे नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून आता त्यावर तोडगा काढला जाणार असून, रेडिरेकनरच्या ०.५ टक्के दराने दर आकारणी करण्याचा ठराव केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या मिळकतधारकांना काहीअंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभागृह नेत्यांचा पुन्हा पत्रप्रपंच

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महाराष्ट्र पोलिस अकादमीसमोरील आरक्षित भूखंडाबाबत घेतलेल्या भूमिकेचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनी स्वागत केले आहे. आयु्क्तांच्या भूमिकेचे स्वागत करतानाच भूखंड व्यावसायिकासोबत तडजोड होऊ नये, याची दक्षता घेण्याचा सल्लाही दिला आहे. सोबतच महापालिकेच्या कारभारासंदर्भात आयुक्तांना थेट १५ प्रश्नांची प्रश्नावलीदेखील सादर केली आहे.

महापालिका मिळकती, रुग्णालये, मोबाइल टॉवर आदींबाबत तब्बल १५ प्रश्नांवरून येत्या महासभेत प्रशासनाला घेरण्याची रणनीती सत्ताधारी भाजपने आखल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या अनागोंदी कारभाराबाबत सभागृह नेते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केल्यानंतर मंगळवारी पुन्हा त्यांनी आयुक्तांना पत्र लिहून प्रश्नांची सरबत्ती केली आहे. महापालिकेचे व्यावसायिक गाळे, समाजमंदिर, वाचनालये आदी मिळकती, रुग्णालयांमधील अनागोंदी, हॉटेल्सवरील कर आकारणी, मोबाइल टॉवर्सची शुल्क वसुली, महापालिका क्षेत्रातील अनधिकृत लॉन्स, स्मशानभूमी, कब्रस्तानच्या जागांविषयी प्रशासनाची अनास्था, हॉकर्स झोन्सच्या अंमलबजावणीत प्रशासनाला आलेले अपयश, धार्मिक स्थो अनधिकृत ठरवून केली जात असलेली कारवाई, समाजमंदिरांमधील अनागोंदी, न्यायालयात महापालिकेच्या विरोधात निकाल जाण्याचे वाढते प्रमाण, शाळांची दुरवस्था, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था आदी प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे. या प्रश्नांवर येत्या २९ मे रोजी होणाऱ्या महापालिकेच्या विशेष महासभेत प्रशासनाला घेरण्याचीही तयारी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा प्रशासनाकडून चार छावण्यांना मंजुरी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात नव्याने चार चारा छावण्यांना प्रशासनाने मंजुरी दिली असून जिल्ह्यातील छावण्यांची संख्या सहावर पोहचली आहे. आठवडाभरात या सर्व छावण्या कार्यान्वित होतील असा विश्वास प्रशासनाने वर्तविला आहे. नांदगावसह मालेगाव आणि येवल्यात या छावण्या सुरू होणार आहेत.

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता भीषण रूप धारण करीत असून पाणी आणि चाराटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा छावण्यांना तातडीने मान्यता देण्यास सुरुवात झाली आहे. सिन्नर तालुक्यातील गुळवंच व आडवाडीत छावणी सुरू झाली आहे. आता पुन्हा नव्याने चार छावण्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. यामध्ये येवल्यातील अंगुलगाव येथील सद्गुरू जनार्दन स्वामी बहुउद्देशीय संस्था व येवला कृषी उत्पन्न बाजार समितीची अंदरसुलच्या छावणीचा समावेश आहे. याशिवाय नांदगावच्या छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाची शिवाजीनगर तसेच सिन्नर तालुक्यातील पांढुर्लीच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या छावणीलाही मंजुरी देण्यात आली आहे.

नांदगाव तालुक्यात चांदोरा येथील अण्णासाहेब जाधव बहुउद्देशीय संस्था आणि जळगाव बुद्रुक येथील एकता कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक मंडळाने देखील छावणीचा प्रस्ताव दिला असून तो देखील लवकरच मान्य होईल, असे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे.

अनामत रक्कम पाच लाख

छावणी सुरू करणाऱ्या संस्थेच्या अथवा व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये किमान पाच लाख रुपये असावेत, असा निर्णय सरकारने घेतला आहे. जिल्हा प्रशासनाची १० लाखांची अट शिथिल झाल्याने संस्था आणि व्यक्तींना दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गावांमध्ये कोणत्या तोंडाने जाऊ?

0
0

टंचाईच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद सदस्यांची उद्विग्नता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणी टंचाईमुळे ग्रामीण भागातील रहिवाशांची होरपळ होते आहे. प्रत्यक्ष पाहणी करण्याऐवजी अधिकारी दालनात बसून कागदी घोडे नाचविण्यात मश्गुल असल्याबाबत जिल्हा परिषद सदस्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद जिल्हाधिकाऱ्यांकडून निधी आणू शकत नसेल तर कोणते तोंड घेऊन लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांसमोर जायचे, असा उद्विग्न सवाल करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीमधील सभागृहात मंगळवारी (दि. २१) दुष्काळावर केंद्रित त्रैमासिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यात टंचाईचा मुद्दा सर्वाधिक गाजला. याप्रसंगी अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार, शिक्षण सभापती यतिंद्र पगार, समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा तीव्र प्रमाणात बसत असून ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर टँकरची मागणी होते आहे; परंतु पेठ, सुरगाणा सारख्या तालुक्यांत मागणीप्रमाणे टँकर आणि फेऱ्या मंजूर होत नसल्याने काही लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.

अभियंत्यांना लाज वाटायला हवी

जिल्ह्यात भीषण दुष्काळ असून पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या, असा सवाल बहुतांश सदस्यांनी उपस्थित केला. वेळेत प्रस्ताव सादर न केल्याने तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली नाही. आचारसंहितेच्या कारण पुढे करून अधिकारी कामचुकारपणा करीत आहेत. आर्थिक लाभ मिळत नसल्याने त्यांच्याकडूनच ही कामे रखडविली जात असल्याचा आरोप डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी केला. फेब्रुवारी अखेरपर्यंत पाणीपुरवठा विभागाने प्रस्तावच सादर न केल्याने यंदा एकाही योजनेसाठी पैसे मिळाले नाहीत. लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसेल तर याविषयी कार्यकारी अभियंत्यांना लाज वाटायला हवी, अशा शब्दांत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

योजना मंजुरीत घोटाळा

पाणीपुरवठा योजनांच्या मंजुरीमध्ये घोटाळा असण्याचा दावा करीत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर यांच्या चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली. हा विषय जिल्हा परिषदेपर्यंत मर्यादित राहिला नसून त्रयस्थ समितीद्वारे या योजनांची चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांचेही या विषयाकडे लक्ष वेधणार असल्याचे डॉ. कुंभार्डे यांनी सांगितले.

तालुकानिहाय बैठका घ्या

पाणीपुरवठा योजनांमधील अनियमितता तपासण्यासाठी समिती स्थापन करून चौकशी लावा, अशी मागणी अध्यक्षा शीतल सांगळे यांच्याकडे करण्यात आली. ग्रामसेवकांना दुष्काळाचे गांभीर्य नाही. ते नॉट रिचेबल असतात. त्यांना वेळीच तंबी देऊन वठणीवर आणा, अशी मागणी सुरेखा दराडे यांनी केली. तर गाव, पाड्यांवर अधिकाऱ्यांनी भेट दिल्याशिवाय दुष्काळाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात कसे येणार, असा सवाल रुपांजली माळेकर यांनी उपस्थित केला. प्रत्येक खाते प्रमुखावर एका तालुक्याची जबाबदारी सोपवा. तसेच तालुकानिहाय ग्रामसेवकांची बैठक घेऊन सदस्यांच्या मागण्या तडीस न्या, अशा सूचना सांगळे यांनी केल्या.

टँकरसाठी पैशांची मागणी

पाणी शिल्लक नाही, असे सांगत आरोग्य केंद्रामधील डॉक्टर प्रसूतीसाठी महिलांना थेट चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवित असल्याची गंभीर बाब कविता धाकराव यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तालुक्यातील वडाळीभोई येथे १० दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा केला जातो. यादरम्यान पाणी पुरविण्याची मागणी केली तर ग्रामपंचायत प्रत्येक टँकरसाठी एक हजार रुपये घेत असल्याकडेही बैठकीत लक्ष वेधण्यात आले. नांदगावातील सदस्य अश्विनी आहेर यांनी टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत असून यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांना सभेसाठी वेळ नसेल तर त्यांनाही दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होते. मुख्य अधिकारी उपस्थित राहणार नसतील तर त्या दिवशी सभा रद्द करायला हवी अशी भावना नूतन आहेर यांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैनिक शौर्यगाथेवर भारताला गर्व

0
0

कमांडर विनायक आगाशे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारताचे सैनिक प्राणपणाने लढतात, शहीद होतात, वीरमरण पत्करतात. त्यांना पाकिस्तानसारखा कोणताही देश थांबवू शकत नाही. पाकशी लढताना आपली सर्व ताकद एकवटून त्यांना कसे उत्तर द्यायचे हा एकमेव उद्देश सैनिकासमोर असतो. सैनिकाच्या शौर्यगाथेवर भारताला अजूनही गर्व आहे, असे प्रतिपादन कमांडर विनायक आगाशे यांनी केले.

यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट येथे वसंत व्याख्यानमाला नाशिक संस्थेच्यावतीने 'सैनिकाच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग' या विषयावरील मंगळवारी त्यांनी एकविसावे पुष्प त्यांनी गुंफले. हे पुष्प अण्णासाहेब वैशंपायन यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले होते. आगाशे म्हणाले, की काश्मिरचा आज जो भाग आपण नकाशावर पहात आहोत तो केवळ एका माणसामुळे, त्याचे नाव मेजर सोमनाथ शर्मा. मेजर शर्मा नसते तर आज काश्मिरचा आपण पहात आहोत ते भागही आपल्या ताब्यात नसता. १९४७-४८ मधील काश्मिर युद्धाची ही कहाणी. केवळ ७० जवानांना घेऊन पाकच्या भव्य सैनिक संख्येसमोर ते उभे ठाकले. आणि प्राणपणाने लढून त्यांनी पाकचे वाईट मनसुबे उधळून लावले. यात सर्व सैनिकांना व मेजर शर्मा यांना वीरमरण आले. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्राप्त झाले. हीच कहाणी लेप्टनंट कर्नल बी. टी. चाँद आणि व्ही. सीयाराम यांचीही आहे.

यावेळी मंचावर पुष्कर वैशंपायन यांची उपस्थिती होती. अण्णासाहेब वैशंपायन यांच्या स्मृतींना अविनाश वाळुंजे यांनी उजाळा दिला. प्रमुख वक्त्यांचा परिचय ओमप्रकाश कुलकर्णी यांनी करून दिला. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले.

आजचे व्याख्यान

वक्ता : संदीप जगताप

विषय : शिवशाही ते लोकशाही

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाढवं पाजताहेत माणसांना पाणी!

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

संत एकनाथ महाराजांनी काशीक्षेत्राहून आणलेले गंगेचे पाणी मरणासन्न गाढवाला पाजल्याचा दृष्टांत नेहमी दिला जातो. एरव्ही मूर्ख प्राणी समजले जाणारे हे गाढवच आज तंत्रज्ञानाच्या युगातही माणसांना पाणी पाजण्यासाठी कामी येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम कुईलीडाबर पाड्यावरील हे चित्र आहे. या पाड्यावर वाहन जाणे शक्य नसल्याने तेथील ग्रामस्थांना पाणी पुरविण्यासाठी प्रशासनाने गाढवांची मदत घेतली आहे. प्रशासनाकडून गाढवांच्या पाठीवरून पाणी वाहून नेण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.

उत्तर महाराष्ट्र यंदा भीषण दुष्काळाचा सामना करीत आहे. नंदुरबार जिल्ह्यात आजवर दुष्काळाची तीव्रता खूपच कमी होती. २०१५ सालापासून आतापर्यंत दरवर्षी अवघ्या एका टँकरची नोंद झालेली आहे. परंतु, यंदा नंदुरबारमध्येही पाणीटंचाई जाणवत आहे. दुर्गम डोंगररांगांत वसलेल्या बहुतेक पाड्यांवर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कुईलीडाबर हा त्यापैकीच एक पाडा. या पाड्यावर तीन विहिरी आहेत. परंतु, यंदा प्रथमच त्या आटल्याने येथील ४० ते ४५ कुटुंबांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी प्रशासनापुढे हा प्रश्न मांडल्यावर तहसीलदार पंकज लोखंडे यांनी या पाड्याला भेट दिली आणि टंचाईची तीव्रता बघून तत्काळ गाढवांच्या पाठीवरुन पाणीपुरवठा सुरू केला. या कामासाठी सध्या १७ गाढवांचा वापर केला जात आहे. या पाड्यावर पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पोहचलेले पंकज लोखंडे हे पहिलेच महसूल विभागाचे अधिकारी आहेत.

ग्रामपंचायत देणार खर्च

पाणी पोहचविण्यासाठी वापर केला जाणाऱ्या गाढवांचा खर्च रापापूर ग्रामपंचायत देणार आहे. त्यासाठीच्या खर्चाचा रीतसर प्रस्ताव नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवून त्याला कायदेशीर मंजुरीही घेतली जाणार आहे. गाढवांबरोबर जाणाऱ्या मजुरांनाही रोजगार हमीतून मोबदला दिला जाणार आहे.

कुईलीडाबर या अतिदुर्गम भागात वसलेल्या पाड्यावर प्रथमच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाड्यावर मुख्य गावापासून टँकरसाठी रस्ता नाही. त्यामुळे येथील ४० कुटुंबांना पिण्याचे पाणी वाहून नेण्यासाठी १७ गाढवांचा वापर केला जात आहे.

- पंकज लोखंडे, तहसीलदार, तळोदा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधनदराची वाढीकडे झेप!

0
0

पेट्रोल पाच पैशाने, डिझेल नऊ पैशाने महागले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीनंतर इंधनाचे दर वाढतील असे भाकित बाजारात वर्तविले जात असताना त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. नाशिकमध्ये मंगळवारी (दि. २१) पेट्रोल ७७ रुपये २५ पैसे तर डिझेलचे दर ६८ रुपये ८४ पैसे इतके होते. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढत असल्याने ही दरवाढ होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

इंधनदरात शनिवारपासून (दि. १८) वाढ होत आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ केली आहे. इंधनदर वाढत असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी असून त्यांना वाढीव रक्कम मोजावी लागणार आहे. यामुळे महिन्याच्या खर्चाचे नियोजन कोलमडत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. पाच दिवसांत इंधनाच्या किमती वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्यांना झळ बसू लागली आहे. इंधनावरील भार वाढू लागल्याने मालवाहतुकीचा खर्च वाढतो आणि त्याचा महागाई वाढीला हातभार लागत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तेलाच्या किमती कमी केल्या होत्या; मात्र काही दिवसात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोल ३ रुपये तर डिझेल २ रुपये वाढ होऊ शकते.

- विशाल गांधी, पेट्रोल पंपचालक

अशी इंधनदरवाढ

दिनांक पेट्रोल डिझेल (रुपयांमध्ये)

२१ मे ७७.२५ ६८.८४

२० मे ७७.२० ६८.७५

१९ मे ७७.११ ६८.५९

१८ मे ७७.११ ६८.५९

१७ मे ७७.१८ ६८.५९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घरकुल’साठी दिग्गजांची हजेरी

0
0

धुळ्यात सुनावणीदरम्यान ४३ संशयित उपस्थित; पाच जण गैरहजर

म. टा. वृत्तसेवा, धुळे

बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्याची सुनावणी मंगळवारी (दि. २१) धुळे सत्र न्यायालयात पार पडली. या वेळी सुरुवातीस न्यायाधीश सृष्टी नीळकंठ यांनी संशयितांची हजेरी घेतली. या घोटाळ्याच्या निकालावर भवितव्य अवलंबून असल्याने यातील संशयित माजी मंत्री सुरेश जैन, राष्ट्रवादीचे जळगावचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यासह ४३ दिग्गजांनी आवर्जून सुनावणीस हजेरी लावल्याची चर्चाही परिसरात होती. संशयितांच्या हजेरीनंतर खटल्याचे कामकाज झाले आणि त्यानंतर पुढील सुनावणीसाठी ७ जून ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे न्यायाधीश सृष्टी नीळकंठ यांनी सांगितल्याची माहिती विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

जळगाव घरकुल घोटाळा खटल्याचे कामकात मंगळवारी (दि. २१) दुपारी १२ वाजता धुळे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू झाले. सुरुवातीस खटल्यातील ४८ पैकी ४३ संशयित आरोपींची हजेरी घेण्यात आली. तर पाच संशयित गैरहजर होते. संशयितांनी सुनावणीस गैरहजर राहणे ही गंभीर बाब असून, संबंधिताविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात यावे, अशी मागणी विशेष सरकारी वकील चव्हाण यांनी न्यायाधीशांकडे केली. यावर आरोपींच्या वकीलाकडून सांगण्यात आले की, जे संशयित गैरहजर आहेत त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी ते बाहेरगावी असून, त्यांचा वैद्यकीय दाखला सायंकाळपर्यंत न्यायालयात सादर केला जाईल. न्यायालयाच्या बाहेर आल्यानंतर संशयित आरोपींचे वकील अॅड. जितेंद्र निळे यांनी, न्यायालयाची तयारी पूर्ण नसल्याने अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. मात्र, पुढील महिन्यात या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे, असे सांगितले. सुनावणीस पुष्पा पाटील, इकबाल पिरजादे, अजय जाधव, राम जाधव आणि पटवे हे पाच संशयित न्यायालयाच्या कामकाजावेळी गैरहजर होते.


घरकुल घोटाळा प्रकरणात एकूण ४२ कोटी ५० लाखांचा गुन्हा संशयित आरोपींवर दाखल असून, त्यातून ३५ कोटींचे काम खान्देश बिल्डर्सने केले होते. तर उर्वरित ७ कोटी ५० लाख रुपये जळगाव नगरपालिकेला परत करणार असल्याचे पत्रदेखील खान्देश बिल्डर्सने दिले होते. असे असतानाही आर्थिक गैरव्यवहार, अनियमिततेचा ठपका ठेवत घरकुल घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
-ॲड. जितेंद्र निळे, आरोपींचे वकील

कामकाज अंतिम टप्प्यात
घरकुल घोटाळा प्रकरणी खटल्याचे न्यायालयीन कामकाज आता अंतिम टप्प्यात आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी प्रभावशाली कामकाज करीत हा खटला राज्यभर गाजवत दिग्गज आरोपींना घाम फोडला होता. ॲड. सूर्यवंशी यांचे नुकतेच गेल्या दोन महिन्यांपूर्वी निधन झाल्यानंतर या खटल्याचे कामकाज त्यांचे सहकारी ॲड. प्रवीण चव्हाण हे त्याच ताकदीने सरकार पक्षाच्या वतीने हाताळत आहेत. तर आरोपींच्या वतीने ॲड. राजा ठाकरे, ॲड. जितेंद्र निळे, ॲड. अविनाश भिडे, ॲड. अकील इस्माईल, ॲड. सी. डी. सोनार, ॲड. आर. एस. सोनार, ॲड. एस. आर. वाणी आदी काम पाहत आहेत.

पॉईंटर्स...
दुपारी ठीक १२ वाजता कामकाजाला सुरुवात
निकालावरून ठरणार दिग्गजांचे भवितव्य
दोन माजी मंत्र्यांसह आमदार, बडे नेते संशयित
घरकुल घोटाळा एकूण ४२ कोटी ५० लाखांचा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images