Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बुक लग्नतारखा आगाऊ कळवा

$
0
0

-लॉन्स, मंगल कार्यालयांना पोलिसांचे निर्देश

-वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पाऊल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरातील लॉन्स आणि मंगल कार्यालयांमुळे निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, तसेच वाहतुकीची कोंडी याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळेच विवाहाची तारीख पोलिस स्टेशनला आगाऊ कळवावी, असे सक्तीचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे विवाहाच्या दिवशी त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवतानाच वाहतुकीचेही योग्य नियोजन केले जाईल, असा पोलिसांचा कयास आहे. तसेच, विविध निर्देशांचे पालन न झाल्यास व्यवस्थापक व संचालकांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांलगत तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये मंगल कार्यालये आणि लॉन्स आहेत. त्यातच सध्या लग्नसमारंभ धूमधडाक्यात सुरू आहेत. मात्र, याठिकाणी सोहळे सुरू असताना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. खासकरुन मौल्यवान ऐवजाची चोरी, महिलांचा विनयभंग यांसारखे गुन्हे घडत आहेत. शिवाय, वाहतुकीची कोंडी वाढतच आहे. पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने आणि त्यामुळे वाहतुकीवर पडणारा ताण, मिरवणुकीवेळी वाहनांना उपलब्ध न होणारा रस्ता ही बाब शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे. या सर्वांची गंभीर दखल शहर पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळेच लॉन्स, मंगल कार्यालये, हॉलच्या संचालक तसेच व्यवस्थापकांना त्या-त्या पोलिस स्टेशनच्या ठिकाणी बैठकीसाठी बोलावून विविध निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व निर्देशांचे पालन झाले नाही तर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

हे आहेत निर्देश!

- लॉन्स, कार्यालय किंवा हॉलमध्ये सीसीटीव्ही सक्तीने लावावेत

- डीजेला पूर्णपणे बंदी

- लाऊडस्पीकर लावायचा असेल तर त्याची रितसर परवानगी घ्यावी लागेल

- वाहतुकीच्या नियोजनासाठी ट्रॅफिक वॉर्डन नेमावेत

- वाहनांचे पार्किंग कार्यालय किंवा लॉन्सच्या जागेतच असावे

- औरंगाबाद रोडवरील मिरवणुकींना बंदी

-अन्य ठिकाणी मिरवणुकीसाठी १/३ जागा वापरता येणार

लॉन्स व मंगल कार्यालयांनी पोलिसांच्या सूचनांचे सक्तीने पालन करावे. वाहतूक कोंडी आणि नागरिकांची सुरक्षा यासाठी ते महत्त्वाचे आहे.

- सूरज बिजली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आडगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ने जिंकली मने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेडच्या वर्धापन दिनानिमित्त लोकमान्य परिवारातर्फे 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बालगीत, भक्तिगीत, अभंग, लावणी अशी एकाहून एक सरस गीते सादर करून गायकांनी नाशिककरांची मने जिंकली.

गेल्या सहा वर्षांपासून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी नाशिककरांच्या सेवेत आहे. संस्थेच्या सहाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने खास नाशिककरांसाठी 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा गीतनाट्याचा कार्यक्रम आयोजत करण्यात आला. परशुराम सायखेडकर नाट्यगृह, शालिमार येथे हा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, पु. ल. देशपांडे आणि वि. वा. शिरवाडकर यांना समर्पित होता.

उद्योजक धनंजय बेळे आणि प्रेरणा बेळे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. नांदीने या बहारदार अशा मैफिलीची सुरुवात झाली. त्यानंतर कौशल्याचा राम, आकाशी झेप घे रे पाखरा, नाचरे मोरा, कुठे शोधीशी रामेश्वर, थकले रे नंदलाला, इंद्रायणी काठी, एका तळ्य़ात होती, विकत घेतला श्याम, प्रथम तुज पाहता, का रे दुरावा, सखी मंद झाल्या तारका, म्यानातून उसळे, सर्वात्मका सर्वेश्वरा अशा गीतांचा नजराणा गायकांनी सादर केला.

कार्यक्रमाचे आयोजन लोकमान्यची सांस्कृतिक चळवळ असलेल्या रसिक रंजन, बेळगावकडून करण्यात आले. संकल्पना आणि निवेदन अनिल चौधरी यांचे, संगीत दिग्दर्शन श्रीधर कुलकर्णी यांचे, तर भूमिका चैतन्य गोडबोले, श्रीवत्स हुद्दार, अनुष्का आपटे, अपेक्षा कडले, काजल धामणेकर आणि तन्वी इनामदार यांनी केल्या. नारायण गणाचारी, संतोष गुरव, ॠषिकेश परांडे यांची साथसंगत, तर सुधीर शेंडे, अंकिता कदम आणि अभिजित देशपांडे नाट्य समन्वयक होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पादचारी ठरताहेत लुटारूंचे सावज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्त्यात अडवून लुटण्याच्या प्रकारात सातत्याने वाढ होत असून, गेल्या दोन दिवसांत दोघांना चोरट्यांनी लुटले आहे. यावरून आता पादचारी चोरट्यांसाठी सोपे सावज झाल्याचे चित्र आहे.

शनिवारी (दि. १८) रात्री ८ वाजता चार जणांनी चाकूचा धाक दाखवून महामार्ग बसस्थानक परिसरात १४ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची तक्रार मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. सुनील महेश्वर दास (रा. साहेबा हॉटेल) यांनी ती दाखल केली आहे. मुंबईनाका येथील महामार्ग बसस्टॅँड परिसरात ते उभे असताना चार व्यक्तींनी येऊन चाकूचा धाक दाखवत फिर्यादी सुनील दास यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दास यांनी आरोपींना प्रतिकार केला, मात्र तो निष्फळ ठरला. या चौघांनी दास यांच्या खिशातील १४ हजार २९९ रुपये झटापटीत काढून घेतले. शिवाय, मोबाइलही हिसकावून घेतला. यावेळी परिसरातील नागरिकांनी दास यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून मारुन टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तिंविरोधात ३९४, ३४, ३२३,५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपनिरीक्षक वराळ करीत आहेत. शुक्रवारीही नासर्डी ब्रीज कार मॉल भागात एका पादचाऱ्यास तिघांनी लुटले होते.

१४ पादचारी ठार

शहरातील रस्तेही पादचाऱ्यांसाठी असुरक्षित आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जानेवारीपासून आतापर्यंत म्हणजे अवघ्या साडेचार महिन्यांमध्ये तब्बल १४ पादचाऱ्यांचा बळी गेला आहे. विविध ठिकाणी आणि विविध कारणांमुळे हे बळी गेले असले तरी वाहतूक पोलिस आणि महापालिकेने याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शास्त्र योग्यच, वापरकर्ते चुकतात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'ज्योतिषशास्त्राचा व्यासंग फार मोठा आहे. ज्योतिष अभ्यासकांनी शास्त्रातील ओंजळीभरच ज्ञान संकलित केलेले असते. त्यामुळे कदाचित त्यांचे काही अंदाज चुकीचे ठरतात. पण, त्यासाठी शास्त्राला दोष देणे अयोग्य आहे. शास्त्र कधीच चुकीचे नसते. ते त्याच्या जागी योग्यच असतात. त्याचा वापर करणारे चुकतात,' असे प्रतिपादन डोंबिवलीचे ज्योतिषलंकार सुनील घैसास यांनी केले. राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशनात ते बोलत होते.

श्री कालिका देवी मंदिराच्या सभागृहात पहिले राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. रविवारी अधिवेशनात 'प्रश्नकुंडली' या विषयावर ज्योतिषांलकार सुनील घैसास यांनी संवाद साधला.

घैसास म्हणाले,'ज्योतिषाचार्यांनी अंदाज व्यक्त करताना ज्योतिषशास्त्रानुसार योग्य भूमिका मांडाव्यात. प्रासंगिक उत्तरे न देता ठोस उत्तरे देणे अपेक्षित असते. प्रश्नकुंडतील चंद्र हा त्या कुंडलीचा आत्मा असतो. कारण, चंद्र हा कायम प्रश्न दर्शवित असतो. भविष्यातील घटनांचे अंदाज वर्तविताना भुतकाळातील घटनांबद्दलचे अंदाज लक्षात घ्यावे.'

अधिवेशनात रविवारी पुण्याचे सिध्देश्वर मारटकर, कोल्हापुरचे डॉ. चंद्रकांत वाघुळदे, गोव्याचे प्राजक्ता जोशी, साताऱ्याचे अ‍ॅड. नारायण फडके, पुण्याचे धुंडीराज पाठक यांनी ज्योतिषशास्त्राच्या अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. या दोन दिवशीय अधिवेशनाचा रविवारी सायंकाळी समारोप करण्यात आला. या अधिवेशनाचे संयोजन वसुंधरा संतान, शुभांगिनी पांगारकर, स्मिता मुळे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अधिवेशनाचे सूत्रसंचालन श्यामला पांगारकर-वाघ आणि सागर गोसावी यांनी केले. अधिवेशनास राज्यभरातील ज्योतिष शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे आहेत सन्मानार्थी

अधिवेशनात ज्योतिषशास्त्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्योतिषांना सन्मानित करण्यात आले. सिध्देवर मारटकर आणि व. दा. भट यांना 'ज्योतिष महर्षी' पुरस्काराने गौरविण्यात आले. प्राजक्ता जोशी, प्रदीप पंडीत आणि चंद्रकांत शेवाळे यांना 'जीवनगौरव' आणि डॉ. प्रदीप जाधव यांना 'विशेष कार्य' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, पण...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'नरेंद्र मोदी यांची पत्रिका कन्या राशीची असून, ते वृश्चिक राशीचे आहेत. त्यांच्या पत्रिकेद्वारे राशीत गुरुचे भ्रमण सुरु आहे. याचा त्यांना निश्चितच फायदा होईल. भाजपच्या अनेक उमेदवारांच्या पत्रिकेत केंद्रस्थानी गुरुचे भ्रमण सुरू आहे. मात्र त्यांना बहुमत मिळणार नाही. असे असले तरी महायुतीतील घटक पक्ष व इतर छोट्या पक्षांच्या आधारे ते सत्तास्थापन करतील. त्यानंतर पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील,' असे भाकीत राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशनात महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे माजी अध्यक्ष सिध्दे‌श्वर मारटकर यांनी वर्तविले आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येक उमेदवाराला, राजकीय पक्षांना आणि सामान्यांचे लक्ष सत्तास्थापनेकडे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर ज्योतिषी सिध्देश्वर मारटकर यांनी राजकीय नेत्यांच्या पत्रिकांचा अभ्यास करुन निकालाचा अंदाज वर्तविला आहे. ज्योतिषशास्त्राच्या आधारे यंदा पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील पण, सेना-भाजपला बहुमत नसेल, असे भाकीत त्यांनी वर्तविले आहे. रविवारी सकाळी कालिका देवी मंदिरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मारटकर म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पत्रिकेत गुरु तूळ राशीत असून, रवी व मंगळ मिथून राशीत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत त्यांचे बोलणे त्यांचे प्रभावी झाल्याचे दिसते आहे. त्यांच्या पत्रिकेनुसार ते पंतप्रधान होणार नाहीत. पण, सेना-भाजपला काँग्रेसच्या नेत्यांचा मोठा फटका बसेल. चांगल्या संख्येने महाआघाडीचे उमेदवार निवडणून येतील. तसेच प्रियंका गांधी यंदा लोकसभेच्या रिंगणात नाहीत. त्यामुळे त्यांच्या विजयी होण्याचा प्रश्न येत नाही. प्रियंका यांची मूळ पत्रिका धनू रवी अशी आहे. त्यांच्या पत्रिकेतील शनी हा वृषभ राशीत आहे. त्यामुळे जुलै २०२० नंतर प्रियंका यांचा राजकारणातील प्रभाव अधिक जाणवू लागेल, असे भाकीत त्यांनी वर्तविले. त्यामुळे २३ मे रोजी मताधिक्य कोणाच्या पारड्यात पडते आणि ज्योतिषी मरटकरांनी वर्तविलेले भाकीत अचूक ठरेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समीर यांची पत्रिका चांगली

नाशिक लोकसभेच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची पत्रिका पाहता महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांची कन्या राशीची पत्रिका आहे. त्यांची रास कुंभ असून, त्यांच्या केंद्र स्थानातून शनी आणि गुरुचे भ्रमण सुरू आहे. त्यामुळे त्यांची सध्याची ताकद वाढली आहे. याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. या उलट महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांची कर्क रवीची पत्रिका असून, त्यांच्या ६ व्या स्थानात शनीचे भ्रमण सुरू आहे. त्यामुळे त्यांचे मताधिक्य कमी होण्याची शक्यता आहे. या रिंगणात अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांचाही प्रभाव असणार आहे. तो हेमंत गोडसे यांना अधिक त्रासदायक ठरेल. त्यामुळे नाशिकमधून विजयी होणाऱ्या उमेदवाराला अगदी अटतटीचा विजय प्राप्त होणार आहे, असेही मरटकर म्हणाले.

राज्यात 'महायुती'ला फटका!

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रिका कर्क रवीची आहे. त्यांचा मूळ शनी कर्क राशीत आहे. १२ व्या स्थानात मंगळ आणि राहू आहे. त्यामुळे सेना-भाजपच्या जागेत केंद्रासह महाराष्ट्रातही घट होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्रिकेत रवी वृश्चिक राशीत असून, या राशीत गुरुचे भ्रमण सुरू आहे. हे त्यांच्यासाठी अनुकूल असेल. यंदा महाआघाडीच्या जागेत वाढ होईल, असेही भाकीत मरटकरांनी वर्तविले.

'राज' यांना विधानसभा!

'मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रिकेत रवी मंगळ हा मिथून राशीत आहे. धनू राशीतील गुरू त्यांचा प्रभाव वाढविणारा आहे. लोकसभेच्या निवडणुकांमध्येही त्यांच्या नेतृत्वाचा आणि भाषणाचा प्रभाव होता. त्यांच्या पत्रिकेतील गुरूचा सर्वाधिक प्रभाव विधानसभेत जाणवले. मनसेचे काही उमेदवार विधानसभेत विजयी होतील, असेही मरकटकर म्हणाले.

सुजय-पार्थ विजयी होणार?

सुजय विखे-पाटील व पार्थ पवार यांची पत्रिका चांगली आहे. सुजय यांच्या पत्रिकेत रवी समोर गुरू चालून आला. त्यांचा एकतर्फी विजय होऊ शकतो. पार्थ यांच्या पत्रिकेत रवी मीन राशीत असून, मंगळ, राहू व शनी मकर राशीत आहेत. त्यामुळे त्यांची राजकारणातील सुरुवात त्यांची दमदार झाली आहे. त्यांना मात्र फार कमी फरकाने विजय-पराजयचा सामना करावा लागेल, असा अंदाज मारटकरांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवेदनशीलतेने हाताळावी टंचाई परिस्थिती

$
0
0

धुळ्यातील आढावा बैठकीत पालक सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या सूचना

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, दुष्काळजन्य परिस्थितीत प्रशासनातील प्रत्येक घटकाने संवदेनशील राहून टंचाई परिस्थिती हाताळावी. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह जनावरांना चारा आणि मागेल त्याच्या हाताला काम या प्राधान्याने काम करण्याचे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालक सचिव तथा महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी रविवारी (दि. १९) दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात रविवारी (दि. १९) जिल्ह्याचे पालक सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षेखाली दुष्काळी परिस्थिती आणि टंचाई संदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उप जिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, प्रातांधिकारी भीमराज दराडे उपस्थित होते.

जिल्ह्यात धुळे, शिरपूर, शिंदखेडा या ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली. त्यामध्ये धुळे व शिंदखेडा येथे गंभीर स्वरुपाचा तर शिरपूर येथे मध्यम स्वरुपाचा दुष्काळ आहे. साक्री तालुक्यातील दहा सर्कलमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती जाहीर केली आहे. जिल्ह्यात ४८ गावे, सहा वाड्यांमध्ये एकूण ३६ टँकर सुरू आहेत. त्यात शासकीय १७, तर १९ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ज्या गावांना पाण्याची टंचाई भासत आहे त्या गावांमध्ये सुरू असलेल्या टँकरच्या फेऱ्या वाढविण्याबरोबरच या गावांमध्ये बोअरवेल घेण्याबाबत परिस्थिती जाणून घ्यावी अशा सूचनाही पालक सचिव श्रीवास्तव यांनी या वेळी दिल्या. जनावरांना चाऱ्याचे नियोजन करताना जुलै अखेरपर्यंत पुरेल असे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

सुक्ष्म नियोजनाच्या सूचना
जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती लक्षात घेता मागेल त्याच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेतंर्गत कामे उपलब्ध करून देण्यात यावी. जिल्ह्यात मागणी आल्यास प्रत्येक गावांमध्ये कामे उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी जिल्ह्यात २१ हजार ६४३ कामे सेल्फवर उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.
याचबरोबर शासनाकडून प्राप्त झालेले खरीपातील दुष्काळी अनुदानाचे शंभर टक्के वाटप करावे, पिण्याचे पाण्यासाठी आरक्षण, जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास प्रतिबंध, वैरण विकास योजनेतून दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्यांचे नियोजन, या सर्व बाबींचे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी प्रशासनास दिल्या.

शेतजमीन सुधारसाठी प्रस्ताव सादर करा
जिल्ह्यातील गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत सर्वेक्षण केलेल्या तलावामध्ये वनक्षेत्रावरील तलावांची संख्या जास्त आहे. या तलावातील गाळ शेतजमीन सुधारण्यासाठी स्वखर्चाने वाहतूक करण्यास शेतकरी तयार आहेत. तथापि वनविभागाकडील निर्देशानुसार सदरचा गाळ वनेत्तर क्षेत्रात वापरण्यास परवानगी नसल्याने केवळ वनपट्टेधारक आदिवासी शेतकरी यांनाच परवानगी आहे. परंतु, या आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक क्षमतेमुळे वनविभागातील तलावातील गाळ वाहतुकीचा खर्च त्यांना परवडणारा नाही. तसेच काढलेला गाळ वनक्षेत्रात पसरविण्यासाठी वनविभागाकडे पुरेशी तरतूद करण्यात आलेली नाही. परिणामी, वनक्षेत्रातील तलावांचे खोलीकरणासह पाणीसाठा वाढविणे शक्य होत नाही. याबाबत वनेत्तर शेतजमीन सुधारण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचनाही पालक सचिव श्रीवास्तव यांनी या वेळी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगावला चाऱ्याअभावी दोन गायींचा मृत्यू

$
0
0

मनमाड :

दुष्काळाने नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अक्षरशः रडकुंडीस आणले असून, चाऱ्याअभावी शनिवारी (दि. १८) शास्त्रीनगर येथील दोन गायींचा तडफडून मृत्यू झाला.

नांदगावात अद्यापही चारा छावणीचा प्रश्न जैसे थे असल्याने अजून किती जनावरांचा मृत्यू झाल्यावर चारा मिळणार, असा सवाल उद्वेगाने शेतकरी विचारत आहेत. शास्त्रीनगर येथील शेतकरी रमेश जोरवर यांच्याकडे ३५ ते ४० जनावरे आहेत. मात्र चाराटंचाई असल्याने गाय, बैल, वासरे जगवायची कशी या चिंतेने त्यांच्यासह सर्वच पशूधन मालकांना ग्रासले आहे. रमेश जोरवर यांच्याकडील दोन गायींचा शनिवारी (दि. १८) चाऱ्या अभावी तडफडून मृत्यू झाला. दुष्काळाची तीव्रता वाढली असून, जनावरांना अशा स्थितीत जगवणे अवघड झाले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुष्काळी दौऱ्यादरम्यान, दोन दिवसांत चारा डेपो सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप चाराछावणी, चारा डेपो सुरू न झाल्याने शेतकरी नाराज आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये भीषण अपघात, ४ भाविक ठार, ६ जखमी

$
0
0

कळवण: नाशिक रस्त्यावरील कृष्णगाव येथे भाविकांच्या कारला भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चारजण जागीच ठार झाले. या अपघातात तीन महिलांसह सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. भाविकांची आयशर गाडी नादुरुस्त होती, त्यामुळे रस्त्याच्याकडेला ही कार पार्क करण्यात आली होती. मात्र पाठिमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने या कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं.

मुलाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी त्र्यंबकेश्वर येथील माणिक ठाकूर हे त्यांच्या २५ ते ३० नातेवाईकांसह रविवारी सप्तश्रृंगी गडाकडे रवाना झाले होते. त्यासाठी त्यांनी आयशर कार बुक केली होती. दुपारी दीड वाजता धार्मिक कार्यक्रम उरकल्यानंतर रात्री साडेआठ वाजता ठाकूर कुटुंबीय परतीच्या प्रवासाला निघाले होते. रात्री नऊ वाजता नांदुरी येथे आल्यानंतर त्यांची कार बंद पडली. काही वेळानंतर कार दुरुस्त करून ती सुरू करण्यात आली. त्यानंतर पुन्हा दोन किलोमीटर अंतरावर गाडी बंद पडली. त्यानंतर पुन्हा रात्री १२ वाजेच्या सुमारास दहा किलोमीटर अंतरावर वणी-नाशिक मार्गावरील कृष्णगाव येथे ही कार बंद पडली. त्यामुळे दुसऱ्या कारची व्यवस्था करण्यासाठी आठ ते दहा भाविक कारच्या खाली उतरले. दुसऱ्या कारची वाट पाहत असतानाच वणीहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या एका मालवाहू ट्रकने रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या आयशर कारला पाठिमागून जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या या अपघातामुळे कारच्या मागे उभे असलेले गणेश भगवती प्रसाद ठाकूर, कुणाल कैलास ठाकूर, सागर अशोक ठाकूर आणि आशिष माणिक ठाकूर हे चारही जण जागीच ठार झाले.

हा अपघात प्रचंड भीषण होता. मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेमुळे ही कार २० ते २५ फूट अंतरापर्यंत फरफटत गेली. या अपघातात कारचा संपूर्ण चक्काचूर झाला. कारमध्ये बसलेले ललीताबाई अशोक ठाकूर, अनिल रमेश ठाकूर, ध्रुप बिंद्राबन ठाकूर, रंजिता ध्रुप ठाकूर, माणिक चिंतुलाल ठाकूर आणि पल्लवी ठाकूर हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून इतर दहा ते बाराजणांना किरकोळ मार लागला आहे. अपघातानंतर जखमी भाविकांनी प्रचंड आक्रोश केल्याने ग्रामस्थ जागे झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोरगरिबांसाठी माणुसकीची ‘फूड व्हॅन’

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

विविध समारंभांतील उरलेले अन्नपदार्थ फेकून न देता ते गरजूंच्या पोटात जावेत यासाठी रॉबिनहूड आर्मी ग्रुपने पुढाकार घेतला आहे. मंगल कार्यालये, लॉन्स येथे मोठ्या प्रमाणात अन्न पदार्थ उरतात. हे अन्न फेकून न देता गरजूंना त्याचा उपयोग व्हावा यासाठी शहरातील मानव उत्थान मंच आणि सृजन नागरिक मंच यांनी उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत ‘फूड व्हॅन’ शहरात १७ मेपासून ‘फूड व्हॅन’ फिरवली जात आहे.

मंगल कार्यालये, लॉन्स येथील समारंभांत उरलेले अन्नपदार्थ फेकून न देता ‘फूड व्हॅन’द्वारे ते संकलित केले जातात. या अन्न पदार्थांचे शहराच्या विविध भागांत वाटप केले जाते. सप्टेंबर २०१८ मध्ये मोजक्या स्वयंसेवकांच्या मदतीने आर्मी ग्रुप विविध भागात अन्न वाटप करीत असे. याची दखल घेत जगबीर सिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या मानव उत्थान मंचद्वारे १७ मे रोजी त्यांना फूड व्हॅन भेट देण्यात आली. एकाच वेळी जास्तीत जास्त अन्न वाटप व्हावे, हा त्यामागे हेतू आहे. या उपक्रमात ४०० स्वयंसेवक सहभागी असून, शहराच्या विविध भागात अन्नवाटपाचे काम करीत आहेत. दिल्ली येथे रॉबिनहूड आर्मी ग्रुपचे मुख्यालय आहे. आर्मी ग्रुपच्या वतीने वर्षभरात ५५ हजार गरजूंना अन्नपदार्थांचे वाटप करण्यात आले आहे. शहरातील डॉक्टर, इंजिनीअर, बिल्डर तसेच इतर अन्य क्षेत्रातील तरुण एकत्र येऊन या उपक्रमात सहभागी होत आहेत.

येथे फिरते व्हॅन!

म्हसरूळ, नाशिकरोड, जेलरोड, बालभारती, राजीवनगर, पेठरोड तसेच शहराच्या सर्व भागात फूड व्हॅनद्वारे अन्नवाटपाचे काम सुरू आहे. त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी पाड्यांवरील अनाथाश्रम व वृद्धाश्रमांतही दोनशेहून अधिक आदिवासींना अन्नपदार्थांचे वाटप करण्यात आले. शहरातील बहुतांश मंगल कार्यालये तसेच लॉन्सचे प्रतिनिधी उरलेले सर्व अन्न उपलब्ध करून देत असल्याने फूड व्हॅनद्वारे गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हातभार लागत आहे. ५० वा त्याहून अधिक लोकांसाठीचे अन्नपदार्थ संकलित करून थेट गरजूंपर्यंत पोहोचवले जात आहेत.

सहभागी होण्यासाठी
ज्यांना या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल, त्यांनी ८६६८९३६०४८, ८०५५९६६०६९ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगतज्ज्ञ दादाजी वैशंपायन यांचे वृद्धापकाळाने निधन

$
0
0

म टा प्रतिनिधी, नाशिक

योगतज्ज्ञ दादाजी वैशंपायन यांचे सोमवारी (२० मे) दुपारी अडीचच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त गेल्या शनिवारी (१८ मे) शेवगाव येथे त्यांचा मोठा सोहळा झाला होता. महात्मानगर येथील निवासस्थानाहून सोमवारी रात्री त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. पंचवटीतील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचे मोठे कार्य होते. सनातन या संस्थेचे ते सक्रीय पदाधिकारी होते. शेवगाव येथील दत्त देवस्थानचे ते आधारस्तंभ होते. पुराणातील कथेमागे आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोन कसा आहे हे ते समजावून सांगत. त्यांनी त्यांच्या साधकांना डोळसपणे विचार करण्यास उद्युक्त केले. आपण ज्या समाजात राहतो त्याचेही आपण देणे लागतो. अशा सर्वांना भरघोस दान देणे आणि ते योग्य त्यांनाच देणे हे त्यांनी स्वतःच्या वागण्यातूनच साधकांना सांगितले. त्यांचा कुठेही आश्रम किंवा मठ नव्हता तसेच त्यांचा सत्संग किंवा प्रवचन सोहळाही होत नसायचा तरीही त्यांचे देशविदेशात हजारो साधक आहेत.

वयाच्या १४व्या वर्षीच परमेश्वराचा शोध घेण्यासाठी ते घराबाहेर पडले होते. अध्यात्मिक वाटचालीत हिमालयात भ्रमंती करताना त्यांना अनेक सिद्धयोगी अवलिया भेटले. अनेक योग्यांचा सहवास व मार्गदर्शन लाभले. प. पू. आनंदस्वामी यांच्याकडून त्यांना अनुग्रह मिळाला. या साऱ्या घडामोडींच्या एकत्रित परिणामामधून त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडले. पोटात अन्नाचा कणही न घेता, क्षणभरही न झोपता, सतत सात दिवस पाण्यात राहून केलेले गायत्री मंत्रानुष्ठान, सूर्याकडे एकटक बघून केलेली सूर्योपासना, जमिनीत खोल विवर खणून विशिष्ट आसनस्थितीत केलेली भूगर्भसाधना, मस्तकावर अत्यंत जड दगड सांभाळीत अशा कितीतरी साधना त्यांनी केल्या होत्या. त्यांनी वर्तविलेली काही भाकिते खरी ठरली होती, असा त्यांच्या साधकांचा दावा आहे. ज्येष्ठ पुरोगामी पत्रकार माधव गडकरी यांनी त्याबद्दल त्यांचे 'नियतीचे भाष्यकार' अशा शब्दांत कौतुक केले होते.

सामाजिक बांधिलकीचा वसा जपणे हे त्यांचे अध्यात्म होते. पीडितांचे संकट निवारण व गरजू, गरीब, अंध, अपंग, मूक-बधीर व्यक्ती व संस्था यांना आर्थिक मदत, अनेक चांगले काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना 'सामाजिक पुरस्कार' असे त्यांचे कार्य सुरू होते. नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे दादाजी वैशंपायन नगर उभे झाले असून २००९ पासून त्यांच्या नावे वृद्धाश्रम चालविला जात आहे. २००६मध्ये तेथे दत्तमंदिर उभारण्यात आले असून त्यांनी अनेक सामाजिक कामांची उभारणी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात ​अल्पवयीन​ मुलीवर बलात्कार ​

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील पवारवाडी पोलिस ठाणे हद्दीतील तैय्याबाबाद परिसरात रविवारी रात्री सुमारास एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. सोमवारी त्यास नायायालयसमोर हजर केले असता २५ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गेल्याच आठवड्यात पवारवाडी पोलिस ठाणे हद्दीत एका युवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. आठवडाभरात दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीतील स. नं. ८७ तैय्यबाबाद येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजता नऊ वर्षीय मुलगी आपल्या घरासमोर खेळत होती. ती खेळत असतानाच घरासमोरच राहणारा मसुद अयाज फारुख बफाती याने पीडित मुलीस घरात बोलावून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने घडलेला प्रसंग आईस कथन केल्याने हा प्रकार समोर आला. मुलीच्या आईने पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पवारवाडी पोलिसांनी संशयित आरोपी मसुद अयाज फारुख बफाती यांच्या विरोधात बलात्कारासह पोस्का अंतर्गत गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक मार्गात बदल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबडमधील वखार महामंडळाच्या गोदाम येथे पार पडणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेमुळे येथील वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. हे बदल गुरुवारी (दि. २३) मध्यरात्री १ वाजेपासून निकाल प्रक्रिया संपेपर्यंत कायम राहतील.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक, राजकीय कार्यकर्ते येतात. वाहनांचीही गर्दी असते. त्यामुळे पोलिसांनी वाहतूक मार्ग बदलला आहे. त्यानुसार, अंबडगांव, पाथर्डी फाटा, डीजीपीनगर, एमएसईबी पॉवर हाऊसमार्गे अंबड गोदाम, संजीवनी बॉटनिकल नर्सरीपर्यंत (ग्लाक्से कंपनी) दोन्ही बाजूने ये-जा करणाऱ्या सर्व वाहनांना एमएसईबी पॉवर हाऊसची भिंतीच्या सुरुवातीच्या टोकापासून अंबड गोदाम, संजीवनी बॉटनिकल नर्सरी/ जीएसके कंपनी टी पॉइण्टपर्यंत वाहतुकीस बंदी घातली आहे. दरम्यान, जीएसके, ग्लॅक्सो, संजीवनी बॉटनिकल टी पॉइण्ट ते अंबड वेअर हाऊस मार्गे एमएसईबी पॉवर हाऊसच्या मेनगेट दरम्यान मुख्य मार्गास जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यावरून मुख्य मार्गावर येणाऱ्या वाहनांना सुद्धा प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. यातून निवडणूक मतदान प्रक्रियेसंबंधित वाहने वगळण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनांनी इतर रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

विजयी रॅलीला बंदी

मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांना रॅली काढता येणार नाही. जमावबंदी आदेश लागू असल्याने विजयी रॅली काढणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल मॅनेजमेंट सीईटी

$
0
0

नाशिक : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने आयोजित हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (एचएमसीटी) या अभ्यासक्रमाची सीईटी सोमवारी पार पडली. अशोका बिझनेस एन्क्लेव्हमध्ये आयोजित ही परीक्षा तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली. शंभर गुणांच्या या परीक्षेत इंग्रजी विषयावर ४० प्रश्न, रिझनिंग विषयाचे ३० प्रश्न, तर सामान्य ज्ञान या विषयाच्या ३० प्रश्नांचा समावेश होता. सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपातील होते. निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनकार्ड वितरण ठप्प

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड येथील धान्य वितरण अधिकारी कार्यालयात नवीन रेशनकार्ड काढणे किंवा दुरुस्तीचे काम गेल्या काही महिन्यांपासून ठप्प पडले आहे. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कासवगती कारभारामुळे नागरिकांना महिनोनमहिने खेटा घालूनही काम मार्गी लागत नसल्याची प्रचीती येत आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनीही या कार्यालयातील ढिसाळ कामकाजाची दखल घेऊन रखडलेल्या कामांना चालना द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नाशिक शहराचे धान्य वितरण अधिकारी कार्यालय नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय मार्गावर आहे. शहरातील विविध सेतू कार्यालयात नागरिकांनी रेशनकार्ड संबंधित कामांचे जमा केलेले सर्व अर्ज शेवटी याच कार्यालयाकडे येतात. परंतु, या कार्यालयाला गेले काही महिने पूर्णवेळ अधिकारी नसल्याने रेशनकार्ड वितरणाचे आणि दुरुस्तीची कामे ठप्प पडलेली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी या कार्यालयात पूर्णवेळ तहसीलदारांची नेमणूक झालेली आहे. परंतु, तरीही रेशनकार्डशी संबंधित कामे होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. या कार्यालयात दररोज शहरातील सर्व भागातील नागरिक रेशनकार्डशी संबंधित कामांसाठी गर्दी करीत आहेत. मात्र एकाही नागरिकाचे काम होत नाही. या नागरिकांना या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. रेशनकार्ड वितरण किंवा दुरुस्तीच्या कामाचे कोणतेही ठोस नियोजन या कार्यालयाने केलेले नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

...

कार्यालयातील सावळागोंधळ

नाशिकरोड येथील धान्य वितरण कार्यालयातील कामकाजाचे नियोजन पूर्णपणे कोलमडलेले आहे. वेगवेगळ्या मीटिंगांसाठी येथील अधिकारी व कर्मचारी कायम कार्यालयाबाहेर गेलेले असल्याचे येथील उपस्थित कर्मचारी नागरिकांना सांगतात. त्यामुळे नागरिकांची कामे ठप्प पडली आहेत. वेगवेगळ्या सेतू कार्यालयांशी संबंधित दलालांचा या कार्यालयाला दररोज विळखा पडलेला असतो. दलाल या कार्यालयात घुसून स्वतः फाइली काढून स्वतःची कामे करून घेत असल्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या सह्यांसाठी फाइली थेट कार्यालयाबाहेरही पोहचवल्या जात असल्याचे येथे येणारे नागरिक सांगतात. या कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी दलालधार्जिणे कामाला प्राधान्य देत असल्याने सामान्य नागरिकांची रेशनकार्डची कामे महिनोनमहिने प्रलंबित पडली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघांना मारहाण करून लुटले-- केशव वाळू ढोन्नर ञ्

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड रेल्वे ओवर ब्रिजसह नजीकच्या तुफान चौकात प्रवाशांना मारझोड करून लुटण्यात आल्याच्या दोन घटना सोमवारी सकाळी घडल्या. या प्रकाराने प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

रेल्वे ओव्हर ब्रिज येथे पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता अमृत काजवे यांना तिघांनी मारहाण करून लुटले. दुसरी घटना तुफान चौकात घडली. बस स्थानकाकडे जाणाऱ्या एका प्रवाशाला जवळच्या बोळीत नेवून मारझोड करीत लुटण्यात आले. या प्रकरणी दोघांनी पोलिसात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी मोबाइल व पर्स हरविल्याची नोंद केल्याची ओरड प्रवासी करीत आहेत.

अभियंता अमृत काजवे हे मूळ पुण्याचे असून सुटीत ते गावी गेले होते. सोमवारी ते शिवशाही बसने मनमाडला आले. येथे रेल्वे ओव्हर ब्रिजवर उतरल्यानंतर ३ जणाच्या टोळीने त्यांना अडविले. एकाने त्यांचे दोन्ही हात धरले तर दुसऱ्याने मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे काजवे घाबरले. काही कळण्याच्या आत लुटारूंनी त्यांच्या खिशातील पाकीट व मोबाइल काढून पसार झाले. काजवेंना लुटल्यानंतर या टोळीने एका तरुणाचा पाठलाग करीत त्यालाही मारझोड करून लुटले. काजवे व या तरुणाने पोलिस स्थानकात धाव घेतली. मात्र तेथे एकच पोलिस होता तो पण झोपलेला होता. त्याला या दोघांनी उठवून घडलेला प्रकार सांगितला असता तो या दोघांसोबत घटनास्थळी आला. मात्र लुटारू फरार झालेले होते. या प्रकरणी दोघांनी तक्रार दिली. मात्र पोलिसांनी पर्स व मोबाइल गहाळ झाल्याची नोंद केली असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लिपिक एसीबीच्या जाळ्यात

$
0
0

म. टा. वृतसेवा, मालेगाव

वारस नोंद होणेकरिता अपिलाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहात पकडले. याप्रकरणातील मध्यस्थ नाना जाधव मात्र फरार झाला आहे.

तक्रारदार यांनी ७/१२ उताऱ्यावर वारस नोंद होणेकरिता येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयात अपील दाखल केले होते. या अपिलाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावून देण्यासाठी कनिष्ठ लिपिक विशाल बबनराव लोहार व मध्यस्थी नाना जाधव यांनी १४ व २० मे रोजी तक्रारदार यांच्याकडे १ लाख १५ हजार रुपयांची लाचेची मानी केली होती. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सोमवारी नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा रचला होता. २५ हजार रुपये घेताना विशाल लोहार यास कार्यालयातच पकडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळसमध्ये दोन भावांचा बुडून मृत्यू

$
0
0

श्याम सुरवाडे

हर्षद गुंजाळ

म. टा. वृत्तसेवा, निफाड

बहिणीच्या लग्नाच्या पूर्वसंध्येलाच दोन भावांचा गोदापात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना पिंपळस (रामाचे) येथे रविवारी घडली. हे दोन्ही भाऊ सख्खे मामे आणि आतेभाऊ असून, त्यांचे मृतदेह सोमवारी दुपारी हाती लागले. त्यांच्या बहिणीचे आज (ता. २१) लग्न होते. लग्नाची लगबग सुरू असतानाच दोन भावांच्या मृत्यूचे वृत्त धडकल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर लग्न स्थगित करण्यात आले आहे.

निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरामनगर (कोळवाडी) येथील हर्षद ठकाजी गुंजाळ (वय १४) हा आतेभाऊ श्याम बाळासाहेब सुरवाडे (वय २३, रा. पिंपळस रामाचे) यांच्याकडे आलेला होता. हे दोघे पिंपळस येथील स्मशानभूमीमागे गोदावरी नदीवर रविवारी दुपारी चारच्या सुमारास पोहण्यासाठी गेले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ते न परतल्याने त्यांची शोधाशोध केली असता गोदावरीच्या काठावर दोघांचे कपडे आढळले. त्यांचा रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात शोध न लागल्याने सोमवारी पुन्हा सकाळी सातपासून शोधमोहीम राबविण्यात आली. चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीचे सागर गडाख, अनिल गडाख, राजेंद्र टर्ले, शुभम गारे, वैभव जमधडे, फकिरा धुळे, गोलू टर्ले यांनी पुन्हा शोध घेतला असता सोमवारी दुपारी एक वाजता हर्षदचा मृतदेह हाती लागला, श्यामचा मृतदेह दुपारी साडेचारच्या सुमारास सापडला.

श्याम बाळासाहेब सुरवाडे याची बहीण नेहा हिचा मंगळवारी रसलपूर फाट्यावरील वात्सल्य लॉन्समध्ये विवाह होणार होता. त्या निमित्त घरात सर्व जवळचे नातेवाईक आले होते. श्यामने बहिणीला मेंदी काढण्यासाठी पोहोचवले आणि घ्यायला येतो, असे सांगून मामेभाऊ हर्षदला सोबत घेऊन पोहण्यासाठी गेला. मात्र, दोघांचाही बुडून मृत्यू झाला. श्याम गणेश बजाज येथील शो-रूममध्ये कामाला होता, तर त्याचे वडील छोटा हत्ती वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

एकुलत्या मुलाचा मृत्यू

हर्षद गुंजाळ हा ठकाजी (नीलेश) गुंजाळ यांचा एकुलता मुलगा होता. निफाड इंग्लिश स्कूलमध्ये तो नववीतून दहावीत गेला होता. नीलेश गुंजाळ यांचा निफाड येथे त्रिमूर्ती फोटो स्टुडिओ आहे. निफाड उपजिल्हा रुग्णालयात हर्षदच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. हर्षदवर श्रीरामनगरमध्ये सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदोबस्तासाठी पाच हजार पोलिस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. २३) मतमोजणी होणाऱ्या अंबड येथील केंद्रीय अन्न धान्य वखार महामंडळाच्या गोदामासह इतरत्र बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. शहरात दीड हजार तर ग्रामीणमध्ये सुमारे साडेतीन हजार असा एकूण पाच हजार पोलिस अधिकारी-कर्मचारी आणि होमगार्ड असा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.

नाशिक व दिंडोरी मतदार संघातील मतमोजणी वखार महामंडळाचे गोदाम येथे सकाळी सातला सुरू होणार आहे. यावेळी ही प्रक्रिया दबावमुक्त पार पडावी, तसेच निकालाचे पडसाद इतरत्र उमटून काही अप्रिय घटना घडू नये, यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहर आणि ग्रामीण पोलिसांनी त्यांच्याकडील ८० टक्के मनुष्यबळ वापरले असून, त्यांच्या मदतीला इतर ठिकाणावरील पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह २६ निरीक्षक, ९५ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, ९६४ कर्मचारी, ३०० होमगार्डस, पाच शीघ्रकृतीदले, केंद्रीय व राज्य सुरक्षा दलाच्या दोन तुकड्या असा सुमारे दीड हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा शहरात तैनात असेल. मतमोजणी केंद्रातील इव्हीएम मशिन सुरक्षेसाठी तीन स्थरीय बंदोबस्त यापूर्वीच तैनात आहे. दरम्यान ग्रामीण पोलिसांनीही त्यांच्याकडील दोन हजार १९२ कर्मचारी तसेच बाहेरुन सुमारे एक हजार पोलिसांचा फौजफाटा अतिरिक्त मागवला आहे. यासह प्रत्येक विधानसभा मतदान संघात पोलिस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी विभागीय अधिकारी म्हणून तैनात केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिकाऱ्यांची पुन्हा शहरात धरपकड

$
0
0

पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात वेगवेगळ्या रस्त्यावर, चौकात आणि पर्यटनस्थळी भीक मागणाऱ्या व्यक्तींची शहर पोलिस धरपकड करणार आहेत. गत वर्षी हा प्रयोग पोलिसांनी राबविला होता. मात्र, भिकाऱ्यांचे पुनर्वसनच योग्यरितीने होत नसल्याने हायकोर्टाने या कारवाईवरच गंभीर ताशेरे ओढले होते.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच, विविध ठिकाणांवर भिकारी आढळून येतात. त्यात वृद्ध तसेच बाल भिकाऱ्यांची संख्या मोठी असते. संपूर्ण कुटुंबच व्यवसाय म्हणून भिक्षा मागतात. दुष्काळामुळे यंदा हे प्रमाण जरा वाढलेले दिसते. यातून बालगुन्हेगारीची समस्यासुद्धा पुढे येते. मात्र प्रशासनाचा सावळा गोंधळ या नागरिकांच्या मुळावर उठते. भीक मागणे तसेच हे कृत्य करण्यास भाग पाडणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो. मात्र, अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी शहरात येतात. मिळेल त्या जागेत छोटा-मोठा व्यवसाय सुरू करतात. दुसरीकडे त्यांची मुले, वृद्ध व्यक्ती भीक मागतात. या भिकाऱ्यांच्या पुनर्वसनाचा मोठा मुद्दा असून, महिला बाल कल्याण विभागासह जबाबदार विभाग याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हा प्रश्न वर्षागणिक गंभीर बनतो. गतवर्षी पोलिसांनी पकडलेल्या काही भिकाऱ्यांची ठाणे जिल्ह्यातील एका संस्थेत रवानगी करण्यात आली होती. मात्र, तेथील सोयी सुविधांच्या अभावामुळे एका सामाजिक संस्थेला मुंबई हायकोर्टात धाव घ्यावी लागली होती. त्यावेळी हायकोर्टाने प्रशासनाच्या या कारवाईबाबत ताशेरे ओढले होते. दरम्यान, हा इतिहास ताजा असताना पोलिसांनी आता पुन्हा ही मोहीम हाती घेतली आहे. महापालिका तसेच महिला व बाल कल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात २५० भिकारी आहेत. लवकरच या भिकाऱ्यांना पकडून त्यांची रवानगी वेगवेगळ्या जिल्ह्यातील भिक्षेकरी गृहांमध्ये करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

..

अडीचेश भिकाऱ्यांची नोंद

गत वर्षी एप्रिल महिन्यातच पोलिसांनी शेकडो भिकाऱ्यांना पकडून त्यांचे पुनर्वसन केले होते. आता अवघ्या वर्षभराच्या कालावधीत अडीचशे भिकाऱ्यांची सर्वेक्षणात नोंद झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकूर कुटुंबातीलचौघांवर अंत्यसंस्कार

$
0
0

पेठरोडसह त्र्यंबकेश्वरमध्ये दुकाने बंद

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

वणीच्या गडावरून रविवारी रात्री नाशिकला परत येत असताना झालेल्या अपघातात ठाकूर कुटुंबातील चार जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने पंचवटीतील पेठरोड परिसरात शोककळा पसरली असून, त्याच्यावर पंचवटी अमरधाममध्ये सोमवारी रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पेठरोडवर शनिमंदिराजवळील ठाकूर कुटुंबीयांच्या घरी नागरिकांनी गर्दी केली होती. परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली. ठाकूर कुटुंबीयांचे काही नातेवाईक अकोला, अमरावती येथून येणार असल्यामुळे त्यांच्या प्रतीक्षेत अंत्यसंस्कारास रात्री उशीर झाला. तोपर्यंत पेठरोड परिसरात मोठ्या संख्येने जनसमुदाय जमा झाला.

अपघातात मृत्युमुखी पडलेले गणेश भगवती ठाकूर (वय ३१) यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ते डीजे वादक म्हणून काम करीत होते. आशिष माणिक ठाकूर (२७) यांच्या मागे आईवडील, पत्नी, बहीण व सव्वा महिन्याची मुलगी आहे. त्यांचे त्र्यंबकेश्वर येथे कटलरीचे दुकान आहे. सागर अशोक ठाकूर (२४) यांच्या मागे आईवडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांचे रामकुंड परिसरात बेंटेक्सचे दुकान आहे. त्यांचे नुकतेच लग्न ठरले होते. पुढच्या महिन्यात त्यांचा साखरपुडा होणार होता. कुणाल कैलास ठाकूर (२२) केटीएचएम महाविद्यालयात एमएच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याच्यामागे आईवडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या अपघातात सागरची आई गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आशिषचे वडीलही जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. ठाकूर कुटुंबीय मूळचे अकोला येथील असून, ते २५ वर्षांपासून पेठरोड येथे स्थायिक आहेत.

त्र्यंबकेश्वरमध्येही हळहळ

त्र्यंबकेश्वर : वणी-दिंडोरी मार्गावरील अपघातात मृत्युमुखी पडलेले आशिष माणिक ठाकूर त्र्यंबकेश्वर येथील व्यावसायिक असल्याने दिवसभर परिसरातील सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. नेहमी गजबजलेल्या या परिसरात शुकशुकाट होता. अपघातात जखमी माणिक ठाकूर तीस वर्षांपासून त्र्यंबकेश्वर येथे पूजासाहित्याची विक्री करतात. आशिष हा त्यांच्या एकुलता मुलगा होता. अपघाताचे वृत्त समजताच ज्येष्ठ समाजसेवक बाळासाहेब सावंत, शिवसेना शहर संघटक भूषण अडसरे, विजय नाईकवाडी आदींसह नागरिक नाशिकला रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images