Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिकची हवा होणार स्वच्छ

0
0

'स्वच्छ हवा मिशन'मध्ये समावेश

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हवा प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने 'स्वच्छ हवा मिशन' हा प्रकल्प हाती घेतला असून, त्यात नाशिकचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात नाशिकमध्ये बैठक झाली असून, या मिशनमध्ये स्वीत्झर्लंड सरकारही सहभागी होणार आहे. नाशिक शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत.

नाशिकचे आल्हादायक हवामान हे सर्वांसाठी आकर्षण असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रदूषित वायूच्या क्रमवारीत नाशिक शहराचा क्रमांक देशात सतरावा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या 'क्लीन एअर सीटी' प्रकल्पांतर्गत राज्यातून नाशिक आणि पुण्याची निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत स्वीत्झर्लंड सरकारच्या वतीने नाशिकमध्ये कृती आराखडा राबविण्यात येणार असून, नाशिकची हवा शुद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात यासंदर्भात बुधवारी बैठक झाली. त्यास अर्थ सायन्स अ‍ॅण्ड क्लायमेट चेंजेस डिव्हिजन टेरीचे संचालक सुमित शर्मा तसेच, थिमेटिक अ‍ॅडव्हायर एनर्जीचे वरिष्ठ अधिकारी आनंद शुक्ला उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रदूषणकारी हवामापन आणि ती बदलण्यासाठीच्या योजनांचे प्राथमिक सादरीकरण केले. महापालिकेत आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेटदेखील घेतली. हवा प्रदूषणाच्या बाबतीत दिल्ली, मुंबईसारखी महानगरे गंभीर अवस्थेत आहेत. त्या ठिकाणी जागतिक संस्थांच्या मदतीने उपाययोजना केल्या जात असल्या, तरी आता नाशिक-पुण्यासारखी शहरे वाचविण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे. 'एचडीसी' या संस्थेच्या माध्यमातून नाशिक शहरात काय करता येईल. या संदर्भातील आराखडा महिनाभरात शासनाला, तसेच, महापालिकेलाही सादर करण्यात येणार आहे.

...

अभ्यासानंतर उपाययोजना

वाहनातून बाहेर पडणारा प्रदूषित वायू, कचरा जाळणे आणि बांधकाम करतानाचे धुलीकण यामुळे प्रामुख्याने वायू प्रदूषण होत असते. नाशिक शहरातील याच समस्येवर 'एचडीसी' एजन्सी अभ्यास करणार आहे. या अभ्यासचा अहवाल आल्यानंतर उपाययोजनांची निश्चिती केली जाणार आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नर्मदा परिक्रमा’वर उद्या अनुभव कथन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माणसातील अपुरेपण घालवून त्याला परिपूर्ण करणारा अभिनव प्रवास म्हणजे नर्मदा परिक्रमा. या परिक्रमेचे अनुभव व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिक्रमा नुकतेच पायी पूर्ण करून आलेले विशाल मित्रा यांची मुलाखत डॉ. सुनीता वावरे या घेणार आहेत. ही मुलाखत रविवारी (दि. १९) सकाळी ९.३० वाजता अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक मेक वल्ड बेटर व विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास, विश्वास गार्डन, कम्युनिटी रेडिओ यांचे सहकार्य लाभले आहे.

या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष विनायकदादा पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे, विक्रम मोरे व मेक वर्ल्ड बेटरच्या मंजू बेळे-राठी, विनायक रानडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीओडी’प्रश्नावर पालिका तोंडघशी

0
0

गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या बैठकीत

..

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गोदावरी नदीपात्रातील पाण्याच्या 'बीओडी' (पाण्यातील जैविक ऑक्सिजन) चा अविश्वसनीय आणि दिशाभूल करणारा अहवाल नाशिक पालिका प्रशासनाने सादर केल्याचा प्रकार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या बैठकीत शुक्रवारी (दि. १७) उघड झाला. बीओडीचा आपलाच अहवाल खरा या मुद्द्यावर पालिकेच्या आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी दंड थोपटले. मात्र विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावर विश्वासार्हतेची मोहोर लावल्याने पालिका अधिकारी अक्षरशः तोंडघशी पडले.

गोदावरी नदी प्रदूषण जनहित याचिकेत या विषयावर उपाययोजना करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने जानेवारी महिन्यात विविध विभागांच्या स्तरावरील जबाबदाऱ्या आणि त्यांनी हाताळावयाचे विषय यानुसार आणखी पाच उपसमित्या तयार करून त्यांना, त्यांनी केलेल्या कामकाजाचा मासिक अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार या उपसमित्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे सचिव, उपायुक्त ज्ञानेश्वर खिल्लारे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. १७) दुपारी विभागीय आयुक्तालयात बैठक झाली. या बैठकीत गोदावरी नदीपात्रातील पाण्याचा बीओडीचा मुद्दा चांगलाच गाजला. गोदापात्रातील पाण्याचा बीओडी हा आजवर ३० पेक्षा कमीच असल्याचा पालिकेच्या अधिकाऱ्यांचा दावा यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी खोडून काढत बीओडी ५८ ते ६० असल्याचा लेखी अहवालच समितीपुढे सादर केला. यावेळी दोन्हीबाजूकडून आपलाच अहवाल खरा असा आग्रह धरण्यात आला. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावर विभागीय आयुक्तांना विश्वासार्हतेची मोहोर लावल्याने पालिका अधिकारी तोंडघशी पडले. पालिकेच्या मलनिस्सारण केंद्राच्या ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही यावेळी विभागीय आयुक्तांनी दिले. पालिका, जिल्हाधिकारी, जलसंपदा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ स्तरावरील उपसमित्यांच्या प्रतिनिधिंनी केलेल्या कामकाजाचा आढावा सादर करून आलेल्या अडचणीही मांडल्या. एमआयडीसी स्तरावरील उपसमितीचा अहवाल पुढील महिन्यात सादर करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा परिषद स्तरावरील उपसमितीचे प्रतिनिधी या बैठकीस गैरहजर राहिले. गोदापात्रातील काँक्रिटीकरण काढण्याच्या मुद्द्यावर 'निरी'चे सहकार्य घेण्याची सूचना माने यांनी दिली. मलनिस्सारण केंद्र अद्ययावत करण्याचे, प्रदूषण रोखण्यासाठी ग्रीन पोलिस यंत्रणा राबविण्याचे, पुलांवर जाळ्या बसविण्याचे आणि नदीपात्रातील तात्पुरत्या स्वरुपातील अतिक्रमणे त्वरित हटविण्याचे आदेशही त्यांनी दिले.

...

चार कारखान्यांवर बंदची कारवाई

गोदा व तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणास हातभार लावल्याचे निदर्शनास आल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने आतापर्यंत ३८ कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. एका कंपनीला अंतरिम आदेश, तर अंबड एमआयडीसीतील युनायटेड इंडस्ट्रीज, रचना इल्क्ट्रोमेक्स, ग्रीन कोट्स आणि पुष्कर इंडस्ट्रिज या चार कारखान्यांवर बंदची कारवाई केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवारबाजी संघटनेचे वार्षिक पुरस्कार जाहीर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेच्या वतीने वार्षिक पुरस्कार जाहीर झाले असून, सांगलीचा गिरीश जकाते व नागपूरची दामिनी रभांड यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कारांचे वितरण २० मे रोजी पन्हाळा, कोल्हापूर येथे सकाळी साडेअकराला होणार आहे.

याप्रसंगी २०१७-१८ या वर्षातील एकूण सहा शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू, मार्गदर्शक, संघटक, ६ जिल्हा गुणवंत खेळाडू, मार्गदर्शक व संघटक पुरस्कार विजेते, २२ आंतरराष्ट्रीय खेळाडू व ६७ राष्ट्रीय पदक विजेत्यांचाही संघटनेतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. कनिष्ठ गटात मुलांमध्ये औरंगाबादचा अभय शिंदे, तर मुलींमध्ये औरंगाबादचीच कशीश भरडला उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्याला उत्कृष्ट राज्यस्तरीय स्पर्धा आयोजक, तर बुलडाणा जिल्ह्याला प्रगतिपथावरील जिल्हा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांची घोषणा राज्य संघटनेचे अध्यक्ष अशोक दुधारे व राज्य सचिव प्रा. डॉ. उदय डोंगरे यांनी केली. डॉ भूषण जाधव, प्रा. डॉ. दिनेश वंजारे, विनय जाधव व राज्य संघटनेचे सचिव डॉ. डोंगरे यांच्या निवड समितीने पुरस्कारार्थींची निवड केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोइंगपटू भोकनळवर फसवणुकीचा गुन्हा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आंतरराष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळने लग्नास नकार देऊन छळ केल्याची तक्रार एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने केल्याने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. भोकनळशी वैदिक पद्धतीने लग्न केल्याचा दावा या महिला पोलिसाने केला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने दत्तू भोकनळ अडचणीच्या भोवऱ्यात सापडला आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रोइंगमध्ये पात्र ठरणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला होता. कुटुंबापासून लपून वैदिक पद्धतीने विवाह केल्यानंतर सर्वांसमोर लग्न करण्यास दोन वेळा नकार दिल्याने आपली फसवणूक व छळ झाल्याची फिर्याद आशा दत्तू भोकनळ (वय २६) यांनी दिली आहे.

आशा भोकनळ यांनी फिर्यादीत नमूद केले आहे, की तळेगाव रोही येथील दत्तू भोकनळशी रेडगाव (ता. चांदवड) येथे २०१५ मध्ये एका कार्यक्रमात आमची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्री व पुढे प्रेमात झाले. आम्ही २२ डिसेंबर २०१७ रोजी आळंदीतील जय अंबे मंगल कार्यालयात वैदीक पद्धतीने लग्न केले. मात्र, याची माहिती आम्ही कुटु्ंबापासून दडवून ठेवली होती. दत्तू पुण्यातील नाशिक फाटा येथे आर्मी रोइंग नोड येथे कार्यरत असून, सोयीनुसार तो आडगाव येथील घरी मला भेटण्यासाठी येत होता. आम्ही पती-पत्नी म्हणून संसार करीत होतो. काही वेळा मीही पुण्याला जात होते. तेव्हा आमचा मुक्काम हॉटेलमध्ये असायचा. कुटुंबापासून दडवून ठेवलेला आमचा विवाह सर्वांसमोर थाटामाटात करण्याचा निर्णय ३ फेब्रुवारी रोजी घेतला. त्यासाठी ९ फेब्रुवारी २०१९ रोजी विवाह करण्याची तारीखही निश्चित केली. दत्तूने माझ्या गावी येऊन कुटुंबीयांना आम्ही विवाह करणार असल्याची माहितीही दिली. माझा भाऊ विलास रमेश काळे यांनी निमगव्हाण येथील समर्थ लॉन्सचे बुकिंग केले; परंतु ७ फेब्रुवारी रोजी दत्तूने फोन करून सांगितले, की मी रुग्णालयात उपचार घेत असून, विवाहाला येणार नाही. मला लग्नाबाबत फोन केला तर विष पिऊन आत्महत्या करीन, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी दत्तू आडगाव येथे घरी आला. लग्नाबाबत वाद घालून मला शिवीगाळ केली. नंतर संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे २४ फेब्रुवारी रोजी दुपारी लग्न करण्याचा पुन्हा निर्णय घेतला. माझे वडील रमेश काळे व दत्तू यांनी पुन्हा लॉन्स बुक केले. आमंत्रणेही दिली गेली. मात्र, लग्नाच्या दोन दिवस आधी पुन्हा दत्तूने फोन करून मी लग्न करणार नाही; माझा नाद सोडून दे, असे सांगितले. दत्तूला भेटण्यासाठी आशा तीन मार्च रोजी पुण्याला गेल्या. तेथे दत्तूने सांगितले, की आपण एकदा लग्न केले आहे. पुन्हा लग्न समारंभ करणार नाही, तसेच तुला माझ्या घरीही नेणार नाही. त्यामुळे छळ, तसेच आपली फसवणूक झाल्याची फिर्याद दिल्याचे आशा भोकनळ यांनी दिली आहे.

कोण आहेत आशा

आशा भोकनळ मूळच्या रेडगाव (ता. चांदवड) येथील असून, नाशिक येथील ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षात शिपाई आहेत. त्या ५ जून २०१२ पासून ग्रामीण पोलिस दलात आहेत. त्यांच्या कुटुंबात आईवडील, भाऊ आणि वहिनी आहेत. रेडगावात गुणवंतांच्या सत्कार समारंभात दत्तूशी त्यांचा परिचय झाला. दत्तूचे घरी येणे- जाणे वाढले. त्यातून मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याचा आशा यांचा दावा आहे.

कोट

आशा भोकनळ यांनी फिर्याद देताना वैदिक पद्धतीने लग्न केल्याचे पुरावे सादर केले आहेत. सर्वांसमक्ष लग्न करण्यासाठी त्यांनी खरोखरच लॉन्स बुक केले होते का, यासह फिर्यादीत नमूद दाव्यांची शहानिशा आम्ही करीत आहोत.

- सूरज बिजली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आडगाव

कोट

दत्तूभाऊच्या लग्नाबाबत आम्हाला आजच समजले. त्याने विवाहासाठी लॉन्स बुक केले होते का, याची माहिती नाही. आम्ही त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. या प्रकरणात किती तथ्य आहे याबाबत सांगता येणार नाही.

- गोकुळ भोकनळ, दत्तूचे भाऊ

कोट

संबंधित महिलेच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. दत्तू भोकनळ यांच्या जामिनासाठी आम्ही कोर्टात विनंती अर्ज करणार आहोत. त्यावरील सुनावणीनंतर या विषयावर अधिक भाष्य करणे योग्य राहील.

- अॅड. चार्वाक कांबळे, दत्तू भोकनळचे वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे१

0
0

सुटीच्या दिवशीच

रेल्वेगाड्या रद्द

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्य रेल्वेच्या अप व डाउन मार्गावर कल्याण आणि कसारादरम्यान रेल्वेच्या कामासाठी १९ मे रोजी सकाळी सव्वाअकरा ते दुपारी पावणेतीन दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (१८ मे) व रविवारी (१९ मे) काही गाड्या रद्द असून, काही उशिरा धावतील. पुणे-भुसावळ १९ मे रोजी पनवेल, कल्याणऐवजी दौंड, मनमाडवरून भुसावळला जाईल. ती नाशिकरोडमार्गे जाणार नाही. उन्हाळी सुटीमुळे नाशिककरांनी शनिवारी व रविवारी बच्चे कंपनीसह गावाला जाण्याचे नियोजन केलेले असतानाच गाड्या रद्द झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ऐनवेळी पंचाईत झाल्याने काहींनी जादा पैसे मोजून खासगी वाहनाने, तर काहींनी बसने जाण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने ब्लॉकच्या तीन दिवस आधी सूचना प्रसिद्ध करावी, अशीही मागणी होत आहे.

रद्द गाड्या

भुसावळ - मुंबई पॅसेंजर १८ मे रोजी, तर मुंबई- भुसावळ पॅसेंजर १९ मे रोजी रद्द राहील. मनमाड- एलटीटी-गोदावरी आणि एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस, तसेच मनमाड-मुंबई राज्यराणी आणि मुंबई- मनमाड राज्यराणी १९ मे रोजी रद्द राहतील.

उशिरा सुटणाऱ्या गाड्या

११०६१ एलटीटी मुझफ्परपूर एक्स्प्रेस १२:१५ ऐवजी १:३० वाजता सुटेल. १२८६९ मुंबई -हावडा एक्स्प्रेस ११:०५ ऐवजी ३:०० वाजता, ११०५५ एलटीटी गोरखपूर १०:५५ ऐवजी २:३० वाजता, १२५४२ एलटीटी गोरखपूर ११:१० ऐवजी ३:०० वाजता, ०२०२१ मुंबई- नागपूर हॉलिडे स्पेशल ११:३० ऐवजी ३:३५ वाजता सुटेल. ११०७१ एलटीटी वाराणसी १२:४० ऐवजी २:१० वाजता, १२१८८ मुंबई-जबलपूर १:३० ऐवजी १:४५ वाजता, ०४११६ मुंबई-अलाहाबाद हॉलिडे स्पेशल ४:४० ऐवजी २० मे रोजी १२:२० वाजता, १२०७२ जालना-दादर जनशताब्दी जालन्याहून पहाटे ४:४५ ऐवजी ०७ :४५ वाजता सुटेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूरमध्यमेश्वरला होणार पक्षीगणना

0
0

निफाड : देशी विदेशी पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यातील पक्षीतीर्थस्थळावर शनिवारी (दि. १८) पक्षी गणना केली जाणार आहे. नेहमी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घेण्यात येणारी पक्षीगणना यंदा मात्र रात्री घेतली जाणार आहे. सर्व पक्षीमित्रांनी नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यातील चापडगाव येथे पर्यटन केंद्राजवळ उपस्थित राहावे, सफेद कपडे घालू नये, सुगंधी द्रव्य वापरू नये, पक्षी गणनेसाठी असणाऱ्या मचाणावर शांतता ठेवावी, असे मार्गदर्शन असलेले पत्र वन्यजीव विभागाने प्रसिद्ध केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबड वेअर हाऊस येथे इलेक्ट्रॉनिक गॅझेटला मज्जाव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी २३ मे रोजी अंबड वेअर हाऊस येथे होणार आहे. मतमोजणी केंद्रात नेमणूक असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरण्यास परवानगी नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी दिले.

कालिदास कलामंदिर येथे आयोजित मतमोजणी प्रशिक्षण वर्गात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, नितीन मुंडावरे, गीतांजली बाविस्कर, संदीप आहेर, निवडणूक तहसीलदार प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

मांढरे म्हणाले, की आयोगाच्या सूचनेनुसार मतमोजणी केंद्रात नियुक्त कर्मचाऱ्यांना कुठलेही इलेक्ट्रानिक उपकरणे आत नेता येणार नाही. वैद्यकीय उपचार सुरू असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपली औषधे सोबत ठेवावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. प्रत्येक नियुक्त कर्मचाऱ्याने आपल्या गतीने शांततेत व बिनचूक काम करावे, असेही निर्देशही त्यांनी दिले. नियुक्त कर्मचाऱ्यांना मतमोजणी केंद्रात ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. खबरदारी म्हणून मतमोजणीच्या ठिकाणी वैद्यकीय पथक तसेच, तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे नीलेश सागर यांनी स्पष्ट केले.

आनंदकर यांनी सादरीकरणाद्वारे मतमोजणी प्रक्रियेची माहिती दिली. मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय टेबल असणार असून, प्रत्येक टेबलवर सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक व एक शिपाई यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच व्हीव्हीपॅट मशिनचे चिठ्ठ्यांच्या मोजणी, टपाली मतपत्रिकांच्या मोजणी प्रक्रियेविषयीची माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी शोधाणारे वानर ट्रकखाली ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव-मनमाड मार्गावर पाणी शोधासाठी आलेल्या तहानलेल्या पाच पैकी एका वानराचा वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. हिसवळ नजीक शुक्रवारी ही घटना घडली.

नांदगाव तलुक्यातील हिसवळ खुर्द गावात पाच वानरे अन्न-पाण्याच्या शोधात आले आहेत. त्यांच्यातील एक वानर गावाबाहेर एक किमी अंतरावर नांदगाव-मनमाड रोडच्या कडेला निंबाच्या झाडावर बसले होते. तेथून पाण्याचा शोध घेण्यासाठी ते खाली उतरून रस्ता ओलांडत होते. मात्र, त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकची वानराला जबर धडक बसली आणि ते गंभीर जखमी होऊन लगेच मृत झाले.

स्थानिक नागरिकांनी वाहनचालकाचा शोध घेतला, मात्र तो वाहनासह पसार झाला. दरम्यान, वानराच्या मृत्यूची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनपाल बी. जे. सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. यानंतर हिसवळ खुर्दमधील रहिवाशांनी मृत वानराचा अंत्यविधी करण्याची मागणी केली. त्यानुसार भजन गात, रामनामचा गजर करून माकडाच्या अंगावर नवा कपडा टाकून त्याची विधीवत पूजा करुन अंत्यविधी केला. यावेळी बापू पल्हाळ, शुकदेव बिन्नर, विजय आहेर, बाळासाहेब आहेर, भास्कर आहेर, रावसाहेब आहेर, शिवाजी आहेर, रामचंद्र आहेर, दीपक आहेर, विजय अरणे आदी उपस्थित होते.

दुष्काळाची तीव्रता अधिकच जाणवू लागली असून पाण्याच्या शोधासाठी वन्य प्राणी जंगल सोडून मनुष्य वस्तीकडे येत आहेत. नांदगाव-मनमाड रोडवर चारा पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडताना गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल सात हरणांचा व एका वानराचा मृत्यू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौऱ्याचे फलित काय?

0
0

\Bपालक सचिवांसमोर बंद पाणी योजनांच्या माहितीचे पितळ उघड

\Bम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा पालक सचिवांच्या दुष्काळ आढावा बैठकीत पाणी पुरवठ्याच्या किती योजना बंद आहेत, याची तपशीलवार माहितीच अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीतच ही माहिती पुढे येणार नसेल तर या योजनांद्वारे लोकांचे भले कसे होणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. या योजनांच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार झाल्याने पोलिस तपास आणि रक्कम वसुलीची कामे सुरू असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली. दुष्काळी उपाययोजनांच्या कार्यवाहीबाबत पालक सचिवांनीही समाधान व्यक्त केल्याने या एकूणच दौऱ्याचे फलित काय, असा प्रश्नही यामुळे उपस्थित होतो आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालक सचिव सिताराम कुंटे यांनी आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून जिल्ह्याचा दौरा केला. चारा छावणीसह दुष्काळी गावांची गुरुवारी (दि. १६) पाहणी करीत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात शुक्रवारी सकाळी बैठक घेत त्यांनी दुष्काळी उपायांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्यासह विविध सरकारी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर कुंटे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. दुष्काळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीची सिन्नर तालुक्यात पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले. या अंमलबजावणीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात पेठ, सुरगाणा यासारख्या काही तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर असल्या तरी त्या बंद अवस्थेत आहेत. गावासाठी पाणीपुरवठा योजना असल्याने त्यांना अन्य दुष्काळी उपायोजनांचा लाभ मिळत नसल्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. परंतु, अशा गावांची माहिती द्यावी, आम्ही तातडीने उपाययोजना करू, असे गिते यांनी सांगितले.

चारा छावणीसाठी 'तो' निकष नाही

चारा छावणी सुरू करण्यासाठी संबंधित संस्थेकडे किमान १० लाख रुपये असावेत, असा निकष प्रशासनाकडून सांगितला जात होता. परंतु, सरकारचा असा काही निकष नसल्याचे कुंटे यांनी स्पष्ट केले. छावणीत चारा, पाणी, शेड पुरविण्याची संबंधित संस्थेची क्षमता असायला हवी. ती नसेल तर जनावरांची हेळसांड होऊ शकते. यामुळे अन्य जिल्ह्यांनी संबंधित संस्थेकडे किमान १० लाखांची रक्कम असावी, असे धोरण ठरविले आहे. त्याचीच अंमलबजावणी नाशिकमध्येही केल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी स्पष्ट केले.

आटोपती पत्रकार परिषद

जिल्ह्यात किती पाणीपुरवठा योजना बंद आहेत, अशी विचारणा माध्यम प्रतिनिधींनी केली. परंतु, ही माहिती माझ्याकडे आता नाही. जिल्हा परिषदेतून इंत्यंभूत माहिती उपलब्ध करून दिली जाईल, असे डॉ. गिते यांनी स्पष्ट केले. पाणीटंचाईची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना का केल्या जात नाहीत, तात्पुरत्या स्वरुपाच्याच उपाययोजनांवर का खर्च केला जातो, यासारखे प्रश्न या पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आले. शक्य त्या प्रश्नांबाबत समाधान करण्याचा प्रयत्न उपस्थित अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. परंतु, प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नसताना ही पत्रकार परिषद आटोपती घेण्यात आली.

७०० गावांत फळबागांना आच्छादन

वातावरणातील बदलांमुळे जिल्ह्यात कांद्याचे २५ टक्के नुकसान झाल्याची माहिती कुंटे यांना कृषी विभागाकडून देण्यात आली. डाळींब, द्राक्ष यांसारख्या फळबागांचेही मोठे नुकसान होते आहे. सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथे डाळींब बागांची पाहणी कुंटे यांनी केली. फळबागांचे नुकसान टाळता यावे, याकरीता जिल्ह्यात ७०० गावांमध्ये फळबागांना आच्छादन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गाव आणि वाड्यांवरील व्यक्तींची संख्या लक्षात घेत टँकरच्या फेऱ्या मंजूर केल्या जातात. परंतु, जनावरांची संख्या विचारात घेऊन या फेऱ्या मंजूर करण्यात याव्यात, अशी मागणी कुंटे यांच्याकडे नोंदविण्यात आली आहे. पाहणीतील निरीक्षणांबाबतचा अहवाल सरकारकडे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

छावणी, टँकरच्याच तक्रारी अधिक

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुष्काळी तालुक्यांचा दौरा केला. तर मुख्यमंत्र्यांनी सरपंचांशी संवाद साधून दुष्काळी परिस्थिती व ग्रामस्थांच्या अपेक्षा समजून घेतल्या. विशिष्ट क्रमांकाच्या व्हॉट्सअॅपवरही तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यामध्ये चारा छावण्या व डेपोशी संबंधित सात तर टँकरच्या खेपा वाढवाव्यात अशा नऊ मागण्या नोंदविण्यात आल्या. पाणीपुरवठा योजनांशी संबंधित १६ तक्रारी आहेत. धोरणात्मक विषय वगळता प्रशासकीय पातळीवरील समस्यांचा निपटारा करण्यात येत असल्याचे कुंटे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा सादर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिल्याने विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी नाशिक धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार येथील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. या बैठकीत नाशिक महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आराखडा सादर केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत पाच जिल्ह्यांतील अधिकारी उपस्थित होते. यावेळी महापालिकेने सादर केलेल्या आराखड्यातील उपाययोजनांबाबतची माहिती विभागीय आयुक्तांनी जाणून घेतली. महापालिकेने शहरातील सर्व भूमिगत गटारींची सफाई करण्यात आली आहे. त्यामुळे कुठेही पाणी तुंबणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. अनेक ठिकाणच्या छोट्या-मोठ्या गटारी साफ करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे धोकादायक वाडे, इमारती व काझी गढी येथील रहिवाशांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नाशिक महापालिकेच्या सहाही विभागांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केले असून, ते राजीव गांधी भवन येथील मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी २४ तास संलग्न असणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या उद्यान विभागाच्या वतीने छाटण्यात येत आहे. जलसिंचन विभागामार्फत पाणी सोडण्याची सूचना आल्यानंतर काठावरच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यासाठी कर्मचारी व वाहने तैनात ठेवण्यात आली आहे. आपत्ती आल्यास महापालिकेच्या शाळा या निवासासाठी देण्यात येणार आहेत. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडतात. त्यासाठी २३ वूडकटर सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य विभागालाही सज्जतेचा इशारा देण्यात आला असून अत्यावश्यक औषधांचा साठा करण्यात आला आहे.

९० फायरमन भरणार

नाशिक महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असून, ९० फायरमन सहा महिन्यांसाठी मानधनावर घ्यावेत असा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे साहित्य कमी असल्याने त्याची पूर्तता करावी यासाठी दोन रबरबोटी खरेदी कराव्यात अशीदेखील मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेईई अॅडव्हान्स २७ मे रोजी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जेईई मेन्समध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची जेईई अॅडव्हान्स परीक्षा २७ मे रोजी विविध केंद्रांवर पार पडणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी रुर्कीच्या वतीने अॅडव्हान्स परीक्षा घेतली जाईल. जेईई मेन परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्ससाठी ऑनलाइन नोंदणीसाठीची मुदत नुकतीच संपली. जेईई अॅडव्हान्स परीक्षा सकाळ व दुपार अशा दोन सत्रात होणार आहे.

राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षा देणे सक्तीचे आहे. यंदा प्रथमच नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत जेईई मेन्स परीक्षा घेण्यात आली होती. जानेवारी व एप्रिल महिन्यात दोन टप्प्यात मेन्स परीक्षा घेण्यात आली होती. दोन्ही परीक्षांच्या कामगिरीच्या आधारे जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची पात्रता निश्‍चित करण्यात आली. जेईई अॅडव्हान्स २७ मे रोजी देशभरातील विविध केंद्रांवर होणार आहे. सकाळच्या सत्रात ९ ते दुपारी १२ या वेळेत पेपर क्रमांक एक, तर दुपारच्या सत्रात दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत ही परीक्षा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेहेडीत अळ्यामिश्रित पाणीपुरवठा

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पाण्यात अळ्या आढळून आल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी चेहेडी गावात घडला. या दूषित पाण्यामुळे चेहेडी गावातील नागरिकांना नळांना पाणी येऊनही या पाण्याचा वापर पिण्यासाठी करता आला नाही.

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे चेहेडी गावातील नागरिकांना पुरविण्यात आलेल्या पाण्यात गुरुवारी अळ्या दिसून आल्याने नागरिकांची मोठी पंचाईत झाली. नागरिकांनी शेजारी चौकशी केली असता, त्यांच्याकडील पाण्यातही अळ्या असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे चेहेडीतील नागरिकांना गुरुवारी सकाळी पाणी भरता आले नाही. या दूषित पाण्यामुळे स्थानिक नागरिकांनी पालिका पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त केला.

चेहेडी गावात दूषित पाणीपुरवठ्याची समस्या ठाण मांडून बसलेली आहे. याविषयी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारीही केल्या आहेत. परंतु, या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.

...

जीर्ण वाहिन्या बदलण्याची मागणी

चेहेडी गावातील पालिकेच्या जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या आहेत. जुन्या वाहिन्या गंजलेल्या असून, त्यांना ठिकठिकाणी गळती लागली आहे. यापैकी काही वाहिन्या नुकत्याच नवीन टाकण्यात आलेल्या आहेत. मात्र उर्वरित वाहिन्याही बदलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. कधीकधी पाण्यात खडे आणि मातीही येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

..

चेहेडी गावात दूषित पाणीपुरवठ्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. गुरुवारी सकाळी अळ्यायुक्त पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका पाणीपुरवठा विभागाचे या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना कायमच दूषित पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.

- प्रकाश संचेती, नागरिक

...

चेहेडी पंपिंग स्टेशन येथील पालिकेच्या साठवण बंधाऱ्यातून अळ्यायुक्त पाण्याचा पुरवठा नाशिकरोड येथील जलशुद्धीकरण केंद्राला झाल्याने दुसऱ्या दिवशी नागरिकांपर्यंत देखील अळ्यायुक्त पाणीपुरवठा झाल्याचे चेहेडीत घडले. या प्रकाराची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिली. पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचेही आदेश दिले.

- पंडित आवारे, प्रभाग सभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉकीत ऑस्ट्रेलियाचा भारतीय संघावर विजय

0
0

वृत्तसंस्था, पर्थ

भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता विजयाने करता आली नाही. अखेरच्या पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतावर ५-२ असा विजय नोंदविला.

या दौऱ्यातील सलामीच्या लढतीत भारतीय संघाने थंडरस्टिक्सवर २-० ने मात केली, त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया 'अ' संघावर ३-० ने विजय नोंदविला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया 'अ'विरुद्धची आणखी एक लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. मात्र, जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने भारतावर ४-० असा विजय नोंदविला. त्यानंतर अखेरचा सामना जिंकून भारतीय संघ दौऱ्याची सांगता विजयाने करणार का, याबाबत औत्सुक्य होते. मात्र, ऑस्ट्रेलियाने जोरदार सुरुवात केली. तिसऱ्याच मिनिटाला फ्लिन ऑगिलव्हीने गोल नोंदवून ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले. त्यानंतर आठव्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. मात्र, निलकांत शर्माने ही संधी दवडली. त्यानंतर दोनच मिनिटांनी ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, हा प्रयत्न भारतीय खेळाडूंनी हाणून पाडला. मात्र, अकराव्या मिनिटाला ट्रेंट मिटनने गोल नोंदवून ऑस्ट्रेलियाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला भारताने जोरदार प्रतिआक्रमण रचले. निलकांतने गोल नोंदवून भारताचे खाते उघडले. १९व्या मिनिटाला मनदीपसिंगला संधी मिळाली होती. मात्र, चेंडू बारवरून गेला. २४व्या मिनिटाला ट्रेंटने, तर २८व्या मिनिटाला ब्लेक गोव्हसने गोल नोंदवून ऑस्ट्रेलियाला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतराला ही आघाडी कायम होती. त्यात ४३व्या मिनिटाला टिम ब्रँडने गोल नोंदवून भर घातली. अखेरच्या टप्प्यात रूपिंदरपाल सिंगने (५३ मि.) गोल नोंदविला. मात्र, त्यानंतर ५-२ असा आघाडीसह ऑस्ट्रेलियाने विजयावर शिक्कामोर्तब केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिलीप ब्लास्टर्सचा दुसरा विजय

0
0

खो-खो प्रीमियर लीग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा खो-खो संघटनेच्या वतीने महाराष्ट्रात आणि भारतात प्रथमच नाशिक जिल्हा खो-खो प्रीमियर लीग सुरू असून आजच्या तिसऱ्या दिवशी दिलीप ब्लास्टर्सने दुसऱ्या विजयाची नोंद करीत आगेकूच केली आहे. आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांमध्ये दिलीप खांडवीने आजही अष्टपैलू खेळाची चुणूक दाखवून ब्लू आणि रेड हे दोन्हीही बँड पटकावले.

लीगमधील तीन साखळी सामन्यांपैकी पहिला सामना दिलीप ब्लास्टर्स विरुद्ध मनीषा रॉयल्स या दोन संघात झाला. या सामन्यात दिलीप ब्लास्टर्स संघाने आक्रमण करताना पहिल्या सत्रात सात, तर दुसऱ्या सत्रात तब्बल दहा गडी टिपून आपले इरादे स्पष्ट केले, तर संरक्षण करताना पहिल्या सत्रात केवळ सहा गडी गमावले, तर दुसऱ्या सत्रातही याच जोमाने खेळ करीत केवळ सहा गडी गमावले. या फरकामुळे दिलीप ब्लास्टर्सला याचा फायदा झाला आणि त्यांनी हा सामना १६ विरुद्ध १२ अशा चार गुणांनी जिंकून आपला दुसरा विजय साजरा केला. या विजयामुळे दिलीप ब्लास्टर्सने तीन सामन्यानंतर आपल्या खात्यात सहा गुणांची कमाई करून आपणही विजेतेपदाच्या रेसमध्ये आहोत, याची प्रचीती दिली. विजयी संघांतर्फे राष्ट्रीय खेळाडू कर्णधार दिलीप खांडवीने आजही अष्टपैलू खेळाची चुणूक दाखवून आपल्या संघाच्या विजयात प्रमुख भूमिका पार पाडली. त्याने बचावात अनुक्रमे ३.३० मिनिटे आणि १.५० मिनिटे पळतीचा खेळ केला, तर आक्रमणातही तब्बल ६ गडी टिपले. संघाच्या जगन फौजदारनेही बचावात १.४० आणि २.१० मिनिटे

खेळ करून ५ गडी टिपून मोलाचे योगदान दिले आणि आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

या सामन्यात्ल कामगिरीच्या आधारे जगन फौजदारला अष्टपैलू म्हणून रवी पवारला संरक्षक म्हणून, तर कौशल्या पवारनेही ५ गडी टिपल्यामुळे तिला उत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. खेळाडूंच्या गुणवत्तेत प्रगती व्हावी, यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. याचा फायदा खेळाडूंच्या गुणवत्तेत होत आहे, असे दिसून येत आहे.

आजच्या तिसऱ्या दिवशी आपले कसब पणाला लावणाऱ्या खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बास्केटबॉल कोच राजेश क्षत्रिय, प्रकाश तांबट, ज्येष्ठ खो-खो प्रशिक्षक विजय शिंदे आदींनी प्रत्यक्ष मैदानात येऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या वेळी बोलताना राजेश क्षत्रिय यांनी सांगितले, की सध्याच्या स्पर्धेच्या युगात खेळाडूंसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून त्यांच्या खेळात प्रगती साधली पाहिजे, असे सांगून नाशिक जिल्हा खो-खो संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

गुणतालिका

संघ- सामने- विजय- पराजय- बरोबरी- एकूण गुण

दिलीप ब्लास्टर्स ३ २ १ ० ६गुण

सागर वॉरिअर्स, २ १ १ ० ३ गुण

स्वप्नील फ्लायर्स, २ १ १ ० ३ गुण

चंदू डेअरडेव्हिल २ १ १ ० ३ गुण

मनीषा रॉयल चॅलेंजर ३ १ २ ० ३ गुण

निशा रायझिंग २ ० १ ० ० गुण

नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनच्या खो-खो प्रीमियर लीगच्या तिसऱ्या दिवशीच्या सामन्यातील चुरशीचा क्षण.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सौरव, पाँटिंगकडून खूप काही शिकलो

0
0

भारताचा युवा फलंदाज पृथ्वी सावचे मत

वृत्तसंस्था, मुंबई

नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्याकडून खेळाच्या मानसिक पैलूंबद्दल खूप काही शिकता आल्याचे मत भारताचा युवा फलंदाज पृथ्वी सावने व्यक्त केले. आयपीएलमध्ये पृथ्वी दिल्ली कॅपिटल्स संघातर्फे खेळतो. पाँटिंग या संघाचे मुख्य प्रशिक्षक असून गांगुली संघाचे सल्लागार आहेत.

पाँटिंग व गांगुली या दोघांनाही १५ ते २० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे. हा अनुभव तीन-चार सामन्यांतून शिकवता येत नसतो. ते आमच्याशी फलंदाजीचे तंत्र, कौशल्य वगैरे गोष्टींबाबत फारसे बोलायचे नाहीत. त्या स्तरावर सर्वांनाच याविषयी माहिती असते. मात्र, आम्हाला मानसिकरीत्या कणखर बनवण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. इतक्या कमी वयात आयपीएलमध्ये खेळणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यांच्यापुढे मी काहीसा अस्वस्थ असायचो. परंतु, त्यांनी मला शांत राहण्यास मदत केली, असे पृथ्वी म्हणाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावकऱ्यांनी धरणाचे गेट तोडल्याने तणाव

0
0

नाशिक

जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील धनोली धरणाचे गेट काही लोकांनी तोडले. यामुळे सात ते आठ एमसीएफटी पाणी वाया गेल्याचा अंदाज आहे. गेट तोडणारे चार जण दळवट गावातील रहिवासी आहेत.

ऐन टंचाईच्या काळात पाणी वाया गेल्याने गावकरी संतापलेत. गेट तोडणाऱ्या चारही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज संध्याकाळी सहा वाजता ही घटना घडली. परिसरात तणावाचे वातावरण आहे. प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल आहेत. पाणी वळवण्याचा नादात ही घटना घडल्याचं अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तमाशा कलावंताच्या दोन मुलींचा विनयभंग

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

महिला तमाशा कलावंताच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करून अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी तमाशातील ५४ वर्षीय व्यक्तीविरुद्ध शनिवारी नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

नांदगाव तालुक्यात कासारी येथे शुक्रवारी (दि. १७) एका तमाशा फडाचा कार्यक्रम होता. यावेळी सायंकाळी सर्व कलावंत कामात गुंतलेले असताना त्याच फडात काम करणाऱ्या ५४ वर्षीय धोंडू नथु कोळी (रा. शिरपूर, जि. धुळे) या व्यक्तीने तमाशातील सह कलाकार महिलेच्या नऊ आणि सात वर्षांच्या दोन मुलींना नजिकच्या शॉपिंग सेंटरच्या टेरेसवर नेले. तेथे विनयभंग करीत त्यांच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याची फिर्याद मुलींच्या आईने शनिवारी नांदगाव पोलिस ठाण्यात दिली. पोलिस उपनिरीक्षक चौगुले पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, पोटाची खळगी भरण्यासाठी मुलाबाळांसह तमाशाच्या फडात काम करणाऱ्या महिलेबाबतीत घडलेल्या या प्रकाराने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ती’ लिंक ओपन करू नका

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये जिंकली म्हणून जिओचे तीन महिन्यांचे रीचार्ज फ्री आणि मुंबई इंडियन्सचा टीशर्ट फ्री अशा मजकुराचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक लिंक दिली असून, त्यात त्याद्वारे खासगी माहिती भरुन घेतली जात आहे. यामुळे फ्रॉड होण्याची शक्यता असून कुणीही माहिती भरून देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याकडून करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी पत्रक प्रसिद्ध केले असून, त्यात म्हटले आहे की, सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यात दिलेल्या लिंकमध्ये व्यक्तिगत माहिती भरायला सांगितली आहे. या माध्यामातून मित्राच्या फोनवरही रीचार्ज मारू शकता, असेही त्यात म्हटले आहे. हा ब्लॉगस्पॉट आहे. गुगलची फ्री वेबसाइट आहे. या माध्यमातून कदाचित हॅकर्स http/https ip वापरून नवीनही साइट बनवू शकतील. जिओ कंपनीला अशी सूट द्यायची झाल्यास jio.com वरच देतील. यासाठी या वेबसाइटवर पर्सनल माहिती भरू नका, अन्यथा ती माहिती थर्डपार्टी कंपन्यांना विकली जाईल. त्या आधारे गैरप्रकारही होऊ शकतात. अशी लिंक आली असेल तर मित्रांना सावध करा, असे आवाहनही सायबर पोलिस ठाणे निरीक्षक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील ९१४ हातपंप बंद

0
0

जिल्ह्यातील ९१४ हातपंप बंद

पाणीपातळी खालावल्याने वाढली चिंता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात भूजल पातळी खालावल्याने ग्रामीण भागातील ७९९ हातपंप बंद पडले आहेत. दुसरीकडे, ११५ हातपंप हे तात्पुरते बंद असल्याने ही संख्या ९१४ झाली आहे. या हातपंप बंदमुळे पाणीटंचाईची दाहकता येथे वाढली आहे. जिल्हा परिषदेने १५ तालुक्यात ६ हजार २१८ हातपंप आतापर्यंत सुरू केले त्यातील ५ हजार ३०४ हातपंप सुरू आहेत. बंद हातपंपामध्ये सर्वाधिक संख्या दुष्काळाने ग्रासलेल्या सिन्नर व चांदवड तालुक्याची आहे.

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात भूजल पातळी मोठ्या प्रमाणात कमी होत असून त्याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही. मार्च महिन्यात भूजल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सटाणा येथील पाणीपातळी १२.१३ मीटरने खाली गेली. तर सिन्नर येथील ९.१४ मीटर, चांदवड येथील ११.२८ मीटरने खाली गेल्याचे समोर आले आहे. मे महिन्यात हाच आकडा अजून वाढणार आहे. विशेष म्हणजे दुष्काळी तालुक्याबरोबरच पाण्याचा साठा असलेल्या तालुक्याचे चित्रही फारसे चांगले नाही.

ग्रामीण भागात सार्वजनिक पाणीपुरवठा प्रादेशिक व स्थानिक नळपाणीपुरवठा योजनेमधून होतो. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमधून पाणी धरणातून येते. तर स्थानिक नळपाणीपुरवठा योजनेसाठी बहुतांश ठिकाणी गावातील विहिरीतूनच केला जातो. याबरोबरच हातपंप हे ग्रामीण भागासाठी वरदान ठरले आहे. पण, पाणीपातळी खाली गेल्याने हे हातपंप कुचकामी ठरत आहेत.

तात्पुरते बंद की दुरुस्ती?

जिल्हा परिषदने दिलेल्या माहितीत ११५ हातपंप तात्पुरते स्वरुपात बंद आहे. यामागील कारण दुरुस्ती सांगितले जात आहे. पण, दुष्काळ स्थितीत दुरुस्तीचे काम हे युद्ध पातळीवर होणे गरजेचे आहे. या हातपंप बंद संख्येमध्ये सर्वाधिक संख्या ही दिंडोरी तालुक्यातील आहे. येथे २५ हातपंप बंद आहे. तर निफाड येथे हीच संख्या २१ आहे.

खासगी हातपंप अधिक

जिल्हा परिषदेच्या हातपंपापेक्षा खासगी हातपंपाची संख्या ग्रामीण भागात मोठी आहे. पाणीपातळी खालावल्याने ते देखील बंद पडले आहे. शासकीय पातळीवर याचे कोणतेही आकडे उपलब्ध नसल्याने त्याची संख्या समोर येत नाही.

हातपंपाची स्थिती तालुकानिहाय

तालुका - एकूण हातपंप - चालू हातपंप

सिन्नर - ७३० - ५६५

बागलाण - ६४० - ५७२

येवला - ३७४ - ३१६

देवळा - ३५६ - ३१८

मालेगाव - ७४६ - ६८२

निफाड - ६२० - ५३४

कळवण- ४०६ - ३८१

दिंडोरी - ४०९- ३१६

चांदवड- ४१२ - २९६

पेठ - १३६ - ७६

सुरगाणा - ३२८ - ३०३

इगतपूरी - २५३ - २३५

नांदगाव - ३६४ - २९२

त्र्यंबकेश्वर - १८२ - १६५

नाशिक - २६२ - २५३

एकूण - ६२१८ - ५३०४

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images