Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अंत्यसंस्कारात नातवाचा गोळीबार; एकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे आजोबाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी नातवाने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी बेकायदेशीरपणे पिस्तूलातून हवेत दोन फैरी झाडल्या. यातील तिसरी अडकलेली गोळी अंत्ययात्रेत हजर असलेल्या एका वृद्धाच्या छातीत घुसली. यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. शनिवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. तुकाराम वना बडगुजर (वय ६०, रा. दक्षतानगर पोलिसलाइन, जळगाव, मूळ रा. पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) असे मृत वृद्धाचे नाव आहे. मृत वृद्ध पोलिसपिता आहे.

धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक विठ्ठल श्रावण बडगुजर यांचे वडील श्रावण बारकू बडगुजर (वय ८७) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. सायंकाळी ५ वाजता पिंप्री येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जळगाव येथील तुकाराम बडगुजर हे मृत बडगुजर यांचे नातेवाईक असल्याने अंत्यसंस्कारासाठी गेले होते. अग्निडाग दिल्यानंतर मृत बडगुजर यांचा नातू दीपेश विठ्ठल बडगुजर (वय २८, रा. पिंप्री, ता. धरणगाव) याने श्रद्धांजली वाहण्यासाठी स्वत:जवळील पिस्तूल काढून हवेत फैरी झाडल्या. दोन फैरी हवेत झाडल्यानंतर तांत्रिक कारणामुळे पिस्तूल लॉक झाले. हा बिघाड शोधत असताना त्याने हात खाली केल्यानंतर त्यात अडकलेली तिसरी गोळी अचानक झाडली गेली. ही गोळी शेजारी उभ्या असलेल्या तुकाराम बडगुजर यांच्या छातीत घुसली. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्मशानभूमीत प्रचंड खळबळ उडाली. जमलेल्या नागरिकांनी तुकाराम बडगुजर यांना रुग्णवाहिकेतून जळगावातील खासगी रुग्णालयात आणले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. मृत बडगुजर यांचे दोन मुलगे जिल्हा पोलिस दलात सेवेत आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्याने गोळीबार केला, त्याची सिक्युरिटी एजन्सी असल्याचे कळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'शालार्थ'प्रकरणी संघटना आक्रमक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयात धुळखात पडलेले शालार्थ आयडीचे सर्व १४७ प्रस्ताव नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, टीडीएफ आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षक-शिक्षकेतर संघटनेने संचालक कार्यालयात शुक्रवारी ठिय्या आंदोलन केल्यानंतर नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आले. याशिवाय त्रुटी आढळून आलेले उच्च माध्यमिकचे ५२ आणि माध्यमिकचे ८२ असे १३४ प्रस्ताव दोन दिवसांत निकाली काढण्याची मुख्याध्यापक संघाची मागणीही शिक्षण संचालकांनी मंजूर केली. शालार्थ आयडीच्या कामकाजात राज्यात नाशिक जिल्ह्याचे कामकाज सर्वांत मागे आहे. सध्या नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक पदाचा अतिरिक्त कारभार शिक्षणाधिकारी नितिन बच्छाव यांच्याकडे आहे. दोन्ही पदांचा भार त्यांनाही पेलवला नसल्याने शालार्थ आयडीचे कामकाज गेल्या महिनाभरापासून बासनात गुंडाळले गेले होते. त्यामुळे संतप्त शिक्षकांनी मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी थेट पुणे येथे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून आपल्या मागण्या मांडल्या. नाशिक शिक्षण उपसंचालक आणि वेतन पथक अधीक्षक एकमेकांना जुमानत नसल्याने शिक्षकांपुढे आर्थिक संकट ओढवल्याची वस्तुस्थितीही यावेळी मांडण्यात आली. सुनावणी झालेल्या उच्च माध्यमिकच्या सर्व फाईल शनिवारपर्यंत निकाली काढण्यास म्हमाणे यांनी संमती दिली. बुधवारपर्यंत (१५ मे) नाशिकला उपसंचालक दर्जाचा अधिकारी देणार असल्याचेही संचालकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वसाका’ला नोटीस देण्याचे कारण काय?

$
0
0

'वसाका'ला नोटीस देण्याचे कारण काय?

माजी अध्यक्ष शांताराम आहेर यांचा सवाल

म. टा. वृत्तसेवा, कळवण

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची (वसाका) मालमत्ता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखान्याला जप्तीची नोटीस देण्यामागे नेमका हेतू काय, असा प्रश्न 'वसाका'चे माजी अध्यक्ष, माजी आमदार शांताराम आहेर यांनी देवळा येथे पत्रकार परिषदेत केला.

राज्य सहकारी बँकेने धाराशिव साखर कारखान्याला 'वसाका' २५ वर्षांच्या कराराने चालविण्यास दिला आहे. त्यातील अटी-शर्तीचा विचार केल्यास इतर बँकांची देणी देण्याबाबत अंतिम टप्प्यात देण्याचा उल्लेख करारात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत 'वसाका'वर २५ वर्षांपर्यंत राज्य सहकारी बँकेचे नियंत्रण असेल. तरीही जिल्हा बँकेने 'वसाका'ला जप्तीची नोटीस कोणत्या आधारावर दिली, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. 'वसाका' चालू करण्यासाठी साधारणपणे २५ कोटी रुपयांची गरज असताना २०१५-१६ व २०१७-१८ मध्ये तत्कालीन प्रशाकीय मंडळाने सत्तेचा वापर करून जिल्हा बँकेकडून पहिल्यांदा साडेसात कोटी व नंतर दहा कोटींचे कर्ज घेतले. अत्यंत अल्प गाळप केल्याने कारखान्यावर ८० कोटी रुपयांच्या तोट्यात भर टाकली. त्यास सर्वस्वी तत्कालीन प्रशाकीय मंडळच जबाबदार असल्याचा आरोप शांताराम आहेर यांनी केला. कारखान्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना तत्कालीन प्रशासकीय मंडळाने स्वतःच्या स्वार्थासाठी दोनवेळा कारखान्याचे गाळप सुरू करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अगोदरच कर्जाच्या विळख्यात असलेल्या कारखान्यवर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा केला. झालेल्या नुकसानीची भरपाई तत्कालीन प्रशासकीय मंडळाकडून वसूल करावी, अशी मागणी आहेर यांनी यावेळी केली. जिल्हा बँकेच्या माध्यमातून मागील काळात जिल्हा सहकारी सूतगिरणीची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केला गेला. तसाच प्रकार 'वसाका'बाबत तर होत नाही ना, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

तीन वर्षांपासून बंद असलेला वसाका २०१५-१६ मध्ये जिल्हा बँकेकडून कर्ज घेत चालू करण्याचा प्रशासकीय मंडळाचा प्रयत्न निश्चितच यशस्वीततेकडे नेणारा होता, याबाबत कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. त्यावेळी जिल्हा बँकेकडून कर्ज उपलब्ध झाले नसते तर 'वसाका'ची चाके फिरू शकली नसती. आपण प्रतिनिधित्व करीत असलेल्या संस्थेला उर्जितावस्थेत आणणे हे आपलेच कर्तव्य आहे. त्यावेळी 'वसाका'साठी केलेले प्रयत्न हे चुकीचे नव्हते तसेच आता जिल्हा बँक वाचविण्यासाठी कारखान्याकडून कर्जवसुली होणे गरजेचे आहे. त्यामुळे कर्जाची वसुलीत आपण कोणताही भेदभाव केला नाही.

- केदा आहेर, अध्यक्ष, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाणीव नेणीव : डॉ. भरत केळकर

$
0
0

जाणीव नेणीव : डॉ. भरत केळकर

---

विस्थापित... निर्वासित

झतारी, २०१४ साली जगातील सर्वात मोठा निर्वासितांचा कॅम्प. सिरिया-जॉर्डन बॉर्डरवर MSF ने चालू केलेल्या तात्पुरत्या हॉस्पिटलमध्ये सिरियामध्ये चालू असलेल्या घमासान यादवी युद्धात जखमी/जायबंदी झालेल्या नागरिकांवर उपचार करण्यासाठी मी गेलो होतो. इमर्जन्सी ऑपेरशन/उपचारानंतर झतारी कॅम्पमध्ये, कंटेनरमध्ये असलेल्या स्टेपडाउन हॉस्पिटलमध्ये रुग्णांना हलवले जायचे. त्यांच्याही उपचारासाठी मी या निर्वासितांच्या कॅम्पमध्ये जात होतो आणि यावेळी एका सर्वतोपरी वेगळ्या विश्वाचे दर्शन घडले.

हिरव्यागार असलेल्या सिरियामध्ये अतिशय संपन्नतेत राहणारी ही लाखो माणसे होती. परंतु जिवाच्या आकांताने आपले सर्वस्व मागे सोडून, जॉर्डनमध्ये रणरणत्या वाळवंटात, यूनायटेड नेशन्सने दिलेल्या साध्या तंबूत, निर्वासित म्हणून राहत होते. एकदा कॅम्पमध्ये रस्त्याने जाताना एक आईस्क्रीमवाला दिसला. मी माझ्या सहकाऱ्यांसाठी आईस्क्रीम घेतले आणि करन्सी द्यायला लागलो. त्याने नम्रपणे नाकारून मी भारतीय डॉक्टर म्हणून हात जोडून नमस्कार केला. त्याच्याबरोबर फोटो घ्यायची इच्छा व्यक्त केल्यावर त्याने नकार दिला.

दुभाष्याने संगितले की, 'तो सिरियात मोठ्या कार कंपनीचा मालक होता आणि हे डिजिटल फोटो, इंटरनेटवर त्याच्या नातेवाइकांनी बघितले तर त्याची परिस्थिती त्यांना कळेल. संपन्न असणारा माणूस जगण्यासाठी पडेल ते काम करत होता. लहान मुलेसुद्धा खूप काम करीत होती. बरेच पुरुष एक तर मारले गेले होते किंवा लढत होते. म्हणून महिला आणि बहुसंख्य मुले तिथे होती. पुरुषप्रधान संस्कृतीत आता महिलांना घर चालवावे लागत होते. तिथे एक शाळा, प्रार्थनास्थळही होती. जॉर्डन देशाने या निर्वासितांना वर्क-परमिट देणे बंद केले, कारण हीच लोकं फार कमी बिदागीत जोर्डनियन कामगारांशी स्पर्धा करायला लागले. अशा निर्वासितांच्या कॅम्पमध्ये पोलिस नव्हते. त्यामुळे सर्व प्रकारची गुन्हेगारी खूप वाढत होती. त्यामुळे अगदी लहान मुलींची लग्न, आजूबाजूलाच उपलब्ध असलेल्या मुलांशी करून देत होते. संपूर्ण कॅम्पमध्ये हे एकच हॉस्पिटल असल्याने, ओपीडीला पण बरीच गर्दी असायची. मी जून २०१४ ला तिथे होतो. ईसीस आणि राजा असाद यांच्याशी सिरियन जनता यादवी सशस्त्र युद्धं करत होती, तेव्हा ते म्हणत होते की हे युद्धं कमीत कमी १० वर्षे चालेल. पण पाचच वर्षात आजमितीला राजा असादचा विजय झाला आहे आणि सिरियन नागरिक अजूनही बऱ्याच वाढलेल्या संख्येने जगभर निर्वासित झाले आहेत.

आता काही महिन्यांपूर्वी मी मोसुल, इराकमध्ये अशाच humanitarian कार्यासाठी गेलो होतो. तिथे त्याच देशातील लाखो नागरिक मोसुल शहर बेचिराख झाल्याने विस्थापित झाले आहेत. हजारो तंबूत ते तिथे जुजबी व्यवस्थेत जीवन काढत आहेत. त्यात ईसीसने अत्याचार केलेली कुटुंब आहेत, तसेच इराकी सैन्य आणि अमेरिकी सेनेने भरडलेली माणसेही आहेत. विशेष म्हणजे ईसीसला पाठिंबा देणारी कुटुंबेही त्याच IDP कॅम्पसमध्ये आहेत. या ईसीस कुटुंबीयांना तर बाकीच्यांनी वाळीत टाकले आहे असेही कळले. दुर्दैवाने यातील मुलांच्या इर्षेला खतपाणी घालणारे आणि उद्याचे ईसीस घडवणारे ग्रुप सक्रिय झाले आहेत. अशा वेगवेगळ्या ग्रुप्सचे वास्तव्य अशा कॅम्पसमध्ये असण्याची दाट शक्यता इराकी लोकच सांगत होते. जगाच्या इतिहासात एकदाका निर्वासित/विस्थापितांचा असा कॅम्प स्थापित झाला की, त्यांचे पूर्ण पुनर्वसन झाल्याचे कोठेही दिसत नाही.

यापूर्वी मला माझ्या घरी किंवा हॉस्पिटलमध्ये एखादी वस्तू जरी नेहमीच्या जागेवरून हललेली दिसली तर मी खूप चिडायचो, अस्वस्थ व्हायचो. अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून माझ्याकडे येणारे पेशंट्स त्यांच्या ठरवलेल्या कामात व्यत्यय आला, काही आठवडे घरीच आराम करावा लागणार किंवा ऑपरशन लागणार हे ऐकूनच असेच अस्वस्थ होतात. बहुतेक जण अशा कम्फर्ट झोनला धक्का लागला की विलक्षण चिडतात. या कॅम्पमध्ये आलेल्यांचे सर्व आयुष्यच त्याच्या नेहमीच्या जागेवरून कायमचे विस्थापित झालेले बघितले. पुनर्वसन तर फार स्वप्नातील गोष्ट. तरीही त्यातील काही जण जिद्दीने नवीन आयुष्य उभारायचा प्रयत्न करत होती.

(लेखक डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स संघटनेचे स्वयंसेवक सर्जन आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणी प्रकरणी तक्रार अर्ज मागे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

एका व्यावसायिकास पाच दिवसांपूर्वी ड्युटीवर नसलेल्या पोलिस अधिकाऱ्याने मध्यरात्रीच्या सुमारास अवैध धंदे करत असल्याचे कारण पुढे करीत, आडगाव परिसरात नेऊन मारहाण करून धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संबंधित व्यावसायिकाने आडगाव पोलीस ठाण्यात दिलेला तक्रार अर्ज मागे घेतला असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी सांगितले.

टकलेनगर परिसरात राहणारे मयूर वसंत सोनवणे (३३, रा. छाया सोसायटी, टकले नगर) यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार, मंगळवारी (दि.७) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पंचवटी पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक दीपक गिरमे, कर्मचारी सागर पांढरे हे घरी आले. त्यानंतर आपल्या खासगी गाडीत बसविले. गाडीत यावेळी इतर दोघे बसलेले होते. गिरमे यांनी गाडी आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्रताप ढाबा लगत असलेल्या इमर्शन प्लांट येथे थांबविली. यावेळी गिरमे यांनी 'तुझा धंदा बेकायदेशीर आहे' असे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत गिरमे यांनी सोनवणे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत असलेल्या दोघांनीही गच्ची पकडून शिवीगाळ केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सोनवणे यांनी आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. परंतु हा तक्रार अर्ज सोनवणे यांनी मागे घेतला असल्याचे आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'नीट'च्या अटी शिथिल कराव्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्यासाठी 'नीट' ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांवर अनेक अटी लादल्या जातात. त्यामुळे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक मिळते. त्यामुळे 'नीट'च्या अटी शिथिल कराव्यात, अशा आशयाचे निवेदन भिमशक्ती या सामाजिक संघटनेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिले आहे. ५ मे रोजी नाशिकमधील २७ केंद्रांवर 'नीट' ही परीक्षा घेण्यात आली. या केंद्रांवर सुमारे २४ हजार विद्यार्थ्यांनी वैद्यकीय विद्याशाखेत प्रवेश मिळविण्याच्या हेतूने ही परीक्षा दिली. त्यावेळी मात्र विद्यार्थ्यांना कपडे परिधान करण्याच्या बंधनासह अनेक अटी लादण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. परीक्षा केंद्रांत पालकांनाही प्रवेश नाकारण्यात आल्याने भर उन्हात पालक व विद्यार्थ्यांना ताटकळत उभे रहावे लागले, हे प्रकार गैर असल्याचे भिमशक्ती संघटनेने म्हटले आहे. तसेच परीक्षा केंद्रात कॉपीसारखे गैरप्रकार झाल्यास त्यावर नियंत्रण ठेवणे हे पर्यवेक्षकाचे काम आहे. मात्र, त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना त्रास देणे चुकीचे आहे. या पुढे घेण्यात येणाऱ्या 'नीट' परीक्षेच्या वेळेस या अटी शिथिल कराव्यात. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भिमशक्ती तर्फे देण्यात आला आहे. शिक्षणमंत्री तावडे यांना संघटनेतर्फे लेखी निवेदन देण्यात आले असून अविनाश आहेर, राम ठाकूर, सूर्यकांत आहेर, चंद्रकांत बोंबले, सुनंदा मोरे, गितांजली बर्गे यांसह इतर सदस्यांच्या त्यावर स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतगणना प्रतिनिधी नेमण्यात कोकाटे, गोडसेंची आघाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी उमेदवारांची मतगणना प्रतिनिधी नेमण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने सुरू केली असून, नाशिक लोकसभा मतदारसंघातील केवळ चारच उमेदवारांनी आतापर्यंत त्यास प्रतिसाद दिला आहे. यामध्ये शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार माणिक कोकाटे यांचा समावेश असून, उर्वरित उमेदवारांनीदेखील लवकरात लवकर प्रतिनिधींची माहिती देऊन त्यांची ओळखपत्रे प्राप्त करून घ्यावीत, असे आवाहन निवडणूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाची निवडणूक शाखा मतमोजणीची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्याच्या तयारीला लागली आहे. २९ एप्रिल रोजी राबविण्यात आलेल्या मतदानप्रक्रियेत नाशिक लोकसभा मतदारसंघातील १८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले आहे. कोणाच्या पारड्यात नाशिककरांनी भरभरून मतांचे दान टाकले हे २३ मे रोजी स्पष्ट होईल. मतमोजणीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला मतमोजणीच्या टेबलजवळ आपला प्रतिनिधी नेमण्याचा अधिकारी निवडणूक आयोगाने प्रदान केला आहे. मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक वातावरणात पार पडावी याकरिता हे प्रतिनिधी नेमण्याचे स्वातंत्र्य उमेदवारांना आहे. तसे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडून करण्यात आले असून, त्यास आतापर्यंत चार उमेदवारांनीच प्रतिसाद दिल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली. गोडसे आणि कोकाटे यांनी प्रत्येक टेबलवर एक याप्रमाणे ८४ टेबलसाठी ८४ प्रतिनिधी नेमले आहेत, तर अपक्ष उमेदवार शिवनाथ कासार आणि विलास देसले यांनी प्रत्येकी १५ आणि सहा प्रतिनिधी नेमले आहेत. अजून आठवड्याचा कालावधी उमेदवारांच्या हाती असला तरी या प्रक्रियेला काही वेळ द्यावा लागतो. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर प्रतिनिधी नेमून त्यांची आणि प्रतिनिधींची गैरसोय टाळावी. प्रतिनिधी नेमण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करून ओळखपत्रे निवडणूक शाखेकडून ताब्यात घ्यावीत, असे आवाहन आनंदकर यांनी केले आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून खासगी सुरक्षारक्षक नेमता येणार नाहीत, असेही आनंदकर यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाघाटी रंगला भक्तीचा मेळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वसंत व्याख्यानमाला नाशिक संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेच्या सत्रात शनिवारी 'भक्तिगीतांचा सत्संग' आयोजित करण्यात आला. हे अकरावे पुष्प गीतांनी गुंफण्यात आले. बाबुराव हाके यांच्या स्मृतींना हे पुष्प अर्पण करण्यात आले होते. यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट येथे ही व्याख्यानमाला सुरू आहे.

श्री गणरायापासून ते शंभू महादेवापर्यंत व विठ्ठलापासून ते जगदंबेपर्यंतच्या देवी-देवतांच्या भक्तिगीतांनी गोदाघाट उजळला. मुंबई येथील श्रीकांत कोटूरवार व नाशिकच्या आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे हे पुष्प गुंफण्यात आले. या पुष्पात निरनिराळी भक्तिगीते सादर करण्यात आली. त्यात महागणपते गजानना, शंकर गुरू जय शंकर गुरू, जननी जगदंबा, शंभो महादेवा, माधवा मधुसूदना, मनमोहना रे मधुसूदना, विठ्ठल हरी विठ्ठला, मन से कहो, सुंदरानना सुंदरानना, नारायण नारायण जय जय, भोले की जय जय, शंकराय शंकराय शंकराय आदी भक्तिगीतांचा समावेश होता.

श्रीकांत कोटूरवार, कनन अय्यर, ऋषिकेष कुलकर्णी, गिरीश बालातील यांनी गायन केले. मंदार सोमण (संवादिनी), हरीश परमार (तबला) यांनी साथसंगत केली. प्रारंभी कलावंतांच्या हस्ते हाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सूत्रसंचालन श्रीकांत बेणी यांनी केले.

आजचा कार्यक्रम

विषय : वेणुनाद प्रस्तुत शब्द-सूर-संवाद 'त्रिवेणी'

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघातप्रकरणी गुन्हा

$
0
0

नाशिकरोड : कार आणि दुचाकी अपघातात जखमी दुचाकीस्वारास नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी दुचाकीस्वाराच्या फिर्यादीवरून कारचालकाविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदाम भालेराव या दुचाकीस्वारास कारचालक शिवाजी उल्होळकर (रा. पळसे) यांच्या कारची (एमएच १५/सीडी ९१८५) एक डिसेंबर रोजी पळसे येथे नाशिक-पुणे महामार्गावर समोरासमोर धडक झाली. अपघातात गंभीर जखमी झालेले सुदाम भालेराव यांना सिन्नर फाटा येथील साई केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कारचालक शिवाजी उल्होळकर यांनी गाडीच्या नुकसानभरपाईपोटी आणि वैद्यकीय खर्च देण्याचे कबूल केले होते. मात्र, नंतर शिवाजी उल्होळकर यांनी खर्चाची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने दुचाकीस्वार सुदाम भालेराव यांनी शिवाजी उल्होळकर यांच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमान पुन्हा चाळिशीकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील तापमान पुन्हा चाळिशीकडे वाटचाल करू लागल्याने दुष्काळाची दाहकता आणि पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याचे संकेत त्यामुळे मिळू लागले आहेत. येथील कमाल तापमानात दोन दिवसांत ३.२ अंश सेल्सियसने वाढ होऊन ते ३७.५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. मालेगावात हाच तापमानाचा पारा ४२.४ अंशापर्यंत पोहोचला असून, पुढील आठवड्यातही उन्हाच्या झळा नाशिककरांना हैराण करणार आहेत.

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकला मुसळधार पाऊस झोडपून काढतो तसे ऊनही घाम काढते. गतवर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे जलाशये जानेवारीपासूनच कोरडी पडण्यास सुरुवात झाली. यातच यंदा उन्हाळाही तापदायक ठरत असून, नाशिककरांचा घसा सुकू लागला आहे. गत महिन्यात २८ एप्रिलला नाशिकचे कमाल तापमान ४२.८ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. परंतु, त्यानंतर ते कमी होत अगदी ९ मे रोजी ३४.३ अंश सेल्सियपर्यंत खाली आले. आता पुन्हा कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. शनिवारी येथील कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. म्हणजेच त्यामध्ये ३.२ अंश सेल्सियसने वाढ झाली आहे. पुढील आठवड्यात या तापमानाची पुन्हा चाळीशीकडे वाटचाल होण्याची शक्यता असून पुन्हा उन्हाच्या तप्त झळांचा सामना नाशिककरांना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागागडून वर्तविली जात आहे.

दिनांक कमाल तापमान

४ मे ३५.१

५ मे ३६.०

६ मे ३८.३

७ मे ३७.२

८ मे ३५.०

९ मे ३४.३

१० मे ३४.९

११ मे ३७.७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छंद वर्गात मिळाली मूल्यशिक्षणाची ठेव

$
0
0

साठ विद्यार्थ्यांनी सुटीचे केले सोने

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना कला, क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकासाच्या अधिक संधी प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रसेवा दल, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच व मनपा शाळा क्रमांक १८, आनंदवली यांच्या वतीने छंद वर्ग या विनामूल्य शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले.

दहा ते तेरा वयोगटातील सुमारे ६० मुला-मुलींनी या शिबिराचा आनंद लुटला. शिबिराची रोजची सुरुवात 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' या साने गुरुजींच्या प्रार्थनेने होत असे व शेवट 'सदैव सैनिका पुढेच जायचे जायचे' या गीताने होत असे. स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण, ग्रीटिंग कार्ड बनविणे, आकाशकंदील तयार करणे, लोकरीची व क्रेप कागदाची फुले तयार करणे, मुखवटे बनविणे या कला शिकविण्यात आल्या. याचबरोबर समूह नृत्य, समूहगीत, स्वच्छतेवरील पथनाट्य मुलांनी बसविले व त्याचे सादरीकरण समारोपात करण्यात आले. स्वच्छतेची गाणी म्हणत, शिबिराचा परिसर मुले रोज स्वच्छ करीत होती. सगळ्यांसमोर बोलून सभाधीटपणा आणणे हे उपक्रम सुद्धा या शिबिरात घेण्यात आले. कराटेच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षकाची व्यवस्था नाशिक जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांनी करून दिली व प्रशिक्षक प्रणव कमोद व सचिन पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पथनाट्यासाठी संदीप फाऊंडेशन नाट्यविभागाचे हर्षल पाटील व दिपु सैनी यांनी मार्गदर्शन केले . कला व हस्तकला शिकवण्याची जबाबदारी मनांजली शुक्ल व प्रगती जाधव यांनी उचलली. की बोर्डवर समूहगीत 'हीच अमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे' ओमकार जोशी यांनी बसविले. स्वच्छतेचे कृतीतून मूल्यशिक्षण निर्मलग्रामच्या संध्याताई नावरेकर व डॉ . हेमा काळे यांनी दिले.

समारोप प्रसंगी या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे व गोष्टीची पुस्तके भेट देऊन मान्यवरांचे हस्ते गौरवण्यात आले. समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासनाधिकारी उदय देवरे, जिल्हा क्रीड़ाधिकारी रवींद्र नाईक हे उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी शिबिराचे समन्वयक मंजुषा जोशी, ज्योती भोसले - लांडगे व वसंत एकबोटे यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच जेष्ठ कार्यकर्ते विलास सूर्यवंशी, नानाजी गांगुर्डे, शरद खाडे, शाळेचे मुख्याध्यापक कैलास ठाकरे व शिक्षक, शाळेचे शिपाई बोलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

---

सापडलेले १० हजार केले जमा

'छत्रपती शिवराय' हे आठशे पानी पुस्तक हाताळत असताना इयत्ता सहावीतील विद्यार्थी सोनू वसंत ठोके व पाचवीतील राजू शहा या विद्यार्थ्यांनी पुस्तकात सापडलेले १० हजार रुपये शिबिरातील शिक्षिका यांच्याकडे त्वरित जमा केले. ही रक्कम पुस्तकाच्या मालकाला सुपूर्द करण्यात आली. या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने छंद वर्गातून प्रामाणिकपणाचे मूल्यशिक्षण मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात : २

$
0
0

म्हसोबा यात्रा उत्साहात

नाशिक : सरदार चौक मित्र मंडळाच्या वतीने म्हसोबा यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. म्हसोबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. रात्री बोहाडा, भजन, दशावतारी सोंगाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आरती करण्यात आली. यात्रेनिमित्त येथे विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. नाशिकसह पिंपळगाव, ओझर येथील भाविकया यात्रेत सहभागी झाले होते. भाविकांनी नवस फेडला. यानिमित्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. म्हसोबा महाराजाचा गजर झाल्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

शिक्षकांसाठी कार्यशाळा

नाशिक : नन्ही कलीच्या शिक्षकांसाठी मोबाइल, इंटरनेट, व्हिडीओ गेमचा अतिवापर व व्यसन यावरील कार्यशाळा झाली. २१२० शिक्षकांनी सहभाग नोंदवला. डॉ. प्रमोद महाजन यांनी मोबाइल, इंटरनेट, व्हिडीओ गेमचा वापर, यातून निर्माण होणाऱ्या वर्तनाच्या, व्यक्तिमत्त्वाच्या व आंतरसंबंधाच्या समस्येवर मार्गदर्शन केले. डॉ. प्रमोद महाजन यांनी मोबाइल, इंटरनेटचा वापर चांगल्या कामासाठीच करा, असे आवाहन करून सोशल मीडियाचा वापर करू नका, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नळ योजना दुरुस्तीला मुदत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या टंचाई कृती कार्यक्रमातील तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना व नळ योजनांच्या दुरुस्तीच्या मंजुरीला राज्य सरकारने १५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत काही उपाययोजना करणे शक्य होऊ शकणार आहे.

केवळ नाशिकमधीलच नव्हे, तर राज्यातील बहुतांश भागातील रहिवासी यंदा भीषण दुष्काळी स्थितीचा सामना करीत आहेत. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांना हव्या असलेल्या चाऱ्याची टंचाई भासू लागली आहे. या दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे; परंतु याच काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने उपाययोजना राबविण्यावर मर्यादा आल्या. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नवीन कामे सुरू करण्यातही यामुळे अडचणी निर्माण झाल्या. टंचाई कृती आराखड्यानुसार दुसऱ्या टप्प्यात करावयाच्या कामांना ३१ मार्चनंतर परवानगी देऊ नये, असे सरकारचे आदेश होते. मात्र, १० मार्चला आचारसंहिता लागू झाल्याने टंचाईग्रस्त गावांसाठी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना व नळ दुरुस्ती योजनांना मंजुरी मिळू शकली नाही. परिणामी, टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याशिवाय अन्य पर्यायच शिल्लक राहिला नाही. काही योजनांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रशासनाने मंजुरी दिली होती; परंतु या योजना सुरू होण्यापूर्वीच आचारसंहिता जारी झाल्याने ही कामेही होऊ शकले नाहीत.

मंजूर कामेही सुरू होणे शक्य

आता मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील पाणीप्रश्न विचारात घेऊन तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना व नळ दुरुस्ती योजनेला मंजुरी देऊ शकणार आहेत. आचारसंहितेपूर्वी मंजूर असलेल्या परंतु काम सुरू न झालेल्या योजनांची कामेही आता सुरू करता येणार आहेत. पाणीपुरवठ्याच्या योजना सुरू करणे आवश्यक असल्याने मंत्रिमंडळाच्या उपसमितीने दोन दिवसांपूर्वी या संदर्भातील निर्णय घेतले. यापूर्वी ३१ मार्चअखेरपर्यंत नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरीचे अधिकार होते. त्यास आता १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताडी भेसळीचे नाशिक कनेक्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

मुंबईत ताडीत मिक्स करण्यात येणारे तब्बल ३५०० किलो क्लोरल हायड्रेट हे रसायन दिंडोरी तालुक्यातील अल्फा सॉल्व्हन्ट या कंपनीतून मुंबई पोलिसांनी जप्त केले. या रसायनाची किंमत ७० लाखांच्या घरात आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीचा मालक दिलीप पोपटराव जाधव (५६) याला अटक केली आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर ताडीत भेसळ होत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर खार पोलिस स्टेशनचे निरीक्षक दया नायक आणि आरे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली. यात मुंबईतून अटक केलेला आरोपी प्रकाश गोपवानी याच्याकडून हे दिंडोरी कनेक्शन उघड झाले. त्यानुसार या संयुक्त पथकाने दिंडोरी तालुक्यातील लखमापूर शिवारातील अल्फा सॉल्व्हंट कंपनीतून सदर केमिकल या कंपनीवर शुक्रवारी छापा मारला व ३५०० किलो क्लोरल हायड्रेट हे विषारी रसायन जप्त केले. याबाबत स्थानिक पोलिस, उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी आपणास याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

दोन वर्षांपूर्वी मुंबईच्या उत्पादन शुल्क विभागाने सदर कंपनीत तपासणी करीत याच रसायनाचा मोठा साठा जप्त केला होता. आता पुन्हा तेच रसायन ताडीत भेसळ करण्यासाठी जात असल्याचे उघड झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकच स्वत:चं आणि दुसरं दत्तक!

$
0
0

saurabh.bendale@timesgroup.com

Tweet : SaurabhbMT

नाशिक : स्वत:चं मूल आणि दत्तक मूल यात अनेकदा फरक केला जातो. ज्यांना मूल नसते, तेच शक्यतो दत्तक मूल घेण्याचा निर्णय घेतात. मात्र, नाशिकच्या सात मैत्रिणींनी स्वत:चं एकच मूल होऊ द्यायचे आणि दुसरे मूल दत्तक घ्यायचे असा दंडक स्वत:ला घालून घेतला. यातून अनाथ मुलांना आईचे हक्काचे प्रेम लाभले आणि मातृत्वाने आपले-परके या भिंतीही भेदल्या. सामाजिक कार्यकर्त्या मधू चौगावकर आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींनी दत्तक मुलामुलींच्या आयुष्यात हे ममतेचे बीज पेरले.

जागतिक मातृत्व दिन साजरा होत असताना, अनाथांच्या डोळ्यांत आजही मातेच्या प्रेमाची भूक जाणवते. संकुचित मानसिकेतेमुळे अनाथांना नातेवाइकांच्या घोळक्यात मोकळेपणाने जगण्याचा अधिकार मिळत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी १९९३-९४ च्या दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या मधू चौगावकर आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींनी एक अपत्य दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. या सात मैत्रिणींनी लग्नानंतर स्वत:चे एक अपत्य होऊ दिले आणि दुसरे अनाथ अपत्य दत्तक घेतले. दोघांना वाढविताना कधीच भेदभाव झाला नाही. दोघांनाही उच्चशिक्षणाच्या वाटा खुल्या झाल्या. शिवाय आदर्श पालकत्वातून अनाथ असूनही त्यांना आईची माया लाभली. आधाराश्रमातील नियमांनुसार मुलगा आणि मुलगी दत्तक घेण्यात आले. पोटच्या पोरांप्रमाणे दोघांनाही जीव लावण्यात आला. आपण दत्तक आहोत, याची पुसटशीही कल्पना आजवरही त्या पाल्यांना झाली नसल्याचे चौगावकर आणि त्यांच्या सहकारी सांगतात. चौगावकरांसोबत संजिवनी कुलकर्णी, धनश्री गोखले, सीमा क्षत्रिय यांसह इतर मैत्रिणींनी मायेची सावली त्या बालकांवर घातली.

'आई' ही भावना नात्यापलिकडे

'दत्तक' मूल म्हणजे, रक्ताचं नातं नसतं असा समज आहे. पण, जेव्हा आपल्या मुलाप्रमाणे दत्तक मुलांना आपण वाढवतो, तेव्हा त्यांच्यात आणि आपल्यात रक्ताचेच नाते निर्माण होते. 'दत्तक' ही मानसिकता असून, ती मोडीत काढल्यानंतर त्यापलिकडे ममता, वात्सल्य आणि 'आई' ही एकमेव भावना असल्याचे मधु चौगावकर सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहिरीतून समाज वास्तवाचे प्रतिबिंब

$
0
0

प्रा. शिरीष गंधे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अतिशय उत्तम भाषावैभव आणि संवेदनशीलता यांचे अनोखे समीकरण शाहिरीतून जाणवते. अनंत फंदी यांची शाहिरी देखील काळाचे नेमके चित्रण करणारी होती. सामान्य माणसाचे दु:ख, त्याची हतबलता त्यांच्या शाहिरीतून स्पष्ट उमटायची. फंदी यांच्या प्रत्येक शाहिरीतून समाज वास्तव्याचे प्रतिबिंब उभे राहायचे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक प्रा. शिरीश गंधे यांनी केले.

शाहीर अनंत फंदी यांच्या द्विशताब्दी स्मृतिवर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिकतर्फे 'अनंत फंदी-चरित्र व कार्य' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. गंगापूर रोडवरील ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर येथे शनिवारी सायंकाळी व्याख्यान झाले. अनंत फंदी हे पेशवाईतील दरबारी कवी होते. त्यांचा जन्म १७४४ रोजी झाला. अनंतफंदी हे मुळात तमासगीर शाहीर. बहुश्रुतता, वक्तृत्व आणि भाषेवरील प्रभुत्व यामुळे ते पुढे कीर्तनकार झाले. फंदी यांनी लावण्या, पोवाडे, कटाव आणि फटके रचले. 'बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको' हा त्यांचा उपदेशपर फटका फार प्रसिद्ध आहे. १८१९ रोजी त्यांच्या मृत्यू झाला.

प्रा. गंधे म्हणाले, की शाहिरी ही लोककला समाजाचा आरसा आहे. समाजातील अनेक घटनांवर शाहिरीतून प्रकाशझोत टाकण्यात येतो. शाहिरीतून समाजप्रबोधनासह कलाकारांच्या गुणकौशल्यांना वाव मिळतो. या कलेचे जनत आणि संवर्धन केल्यास खऱ्या अर्थाने अनंत फंदी यांना आदरांजली ठरू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सपट'कॉलेजला बी प्लस प्लस श्रेणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेजला राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन समितीतर्फे (नॅक) 'बी प्लस प्लस' ही श्रेणी देण्यात आली आहे. २५ व २६ एप्रिल रोजी नॅकच्या शिष्टमंडळाने कॉलेजला भेट दिली. कॉलेजची अत्याधुनिक इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, परिपूर्ण ग्रंथालय, प्लेसमेंटच्या संधी या आधारे २.९४ स्केल प्राप्त करून 'बी प्लस प्लस' श्रेणी देण्यात आली आहे. नॅक श्रेणी प्राप्त झाल्यानंतर संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, एचआरएम डायरेक्टर डॉ. दीप्ती देशपांडे, आस्थापना संचालक शैलेश गोसावी, प्राचार्य डॉ. पी. सी. कुलकर्णी यांनी सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामको रुग्णालयातमोफत उपचाराची सुविधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या आयुषमान भारत (पंतप्रधान जनआरोग्य) योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी नामको ट्रस्ट संचलित पेठरोडवरील रुग्णालयात मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नंदुरबार येथील एका कर्करुग्णावरील उपचाराने या योजनेला सुरुवात झाली.

नंदुरबार येथील जयेश पाडवी हा व्यक्ती मुखाच्या कर्करोगाने पीडित असून, त्याच्यावर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. मुकेश चंद्रे उपचार करीत आहेत. मात्र, या योजनेला केवळ दीड लाखापर्यंत खर्चाची मर्यादा असल्याने, पाडवी यांची आर्थिक दुर्बल परिस्थिती आणि तातडीच्या उपचारांची गरज लक्षात घेता नामको ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सेक्रेटरी शशिकांत पारख यांच्या मार्गदर्शनाखाली आयुषमान योजनेसाठी कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यासाठी आरोग्यमित्रांचीही मदत झाली. आयुषमान योजनेंतर्गत उपचारावर पाच लाखांपर्यंत कॅशलेस उपचार शक्य होतात, तसेच १,३५० आजारांवर उपचार करता येतात. नामको रुग्णालयात आजवर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत हजारो रुग्णांना फायदा झाला असल्याची माहिती पारख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाकिस्तानची वाटचाल विनाशाकडेच

$
0
0

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'पाकिस्तानचा जन्मच मुळात फाळणीतून झाला आहे. या फाळणीला लाखो माणसांच्या रक्तरंजिततेच्या काळ्या इतिहासाची किनार आहे. इतक्या मोठ्या घटनेतूनही या राष्ट्राने स्वातंत्र्यापासून आजवर काहीच बोध घेतलेला दिसत नाही. आज पाकिस्तानची वाटचाल ज्या दिशेने सुरू आहे ती तशीच सुरू राहिल्यास पाकिस्तानचे भविष्यात आणखी सहा तुकडे होतील. पाकिस्तानची वाटचाल तसे पाहता विनाशाकडेच सुरू आहे', असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

सार्वजनिक वाचनालय आणि लेट्स टॉक यांच्या वतीने प. सा. नाट्यगृहात आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. सच्चिदानंद शेवडे व डॉ. परिक्षित शेवडे लिखित 'पाकिस्तान विनाशाकडून विनाशाकडे' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी मंचावर निवृत्त ब्रिगेडिअर जगदिशचंद्र बागूल, जयप्रकाश जातेगांवकर, अभिजित बगदे, उदयकुमार मुंगी, डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परिक्षित शेवडे उपस्थित होते. डॉ. सच्चिदानंद शेवडे म्हणाले, की टिळकयुगाचा अस्त झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी नको तितक्या चुका करून ठेवल्या. त्याची फळे आजवर देशाला भोगावी लागत आहेत. फाळणीचे भळभळते क्षण तर भारत विसरूच शकत नाही. लाखो लोकांची कत्तल त्यावेळी झाली. अखंड भूभागाचे दोन तुकडे पडून निर्माण झालेल्या दोन्ही देशात वैमनस्य आले. हिंदू महासभेच्या घोषणा निवडणूकीपूर्वी काँग्रेसने चोरल्या अन् अखंड हिंदूस्थानची स्वप्ने भारतीयांना दाखवून काँग्रेसने भरघोस मतांचे पीक स्वातंत्र्यानंतर पदरात पाडून घेतले. पण सत्तेत आल्यानंतर याच काँग्रेसच्या नेत्यांनी नेमके बोलण्याच्या विरुद्ध वर्तन करत फाळणीचा ठराव केला. पाकिस्तानने स्वभावानुसार पहिल्यांदा हिंदुस्थानची खोडी काढली, त्यावेळी त्यांनी सपाटून मार खाल्ला. त्यानंतर त्यांच्याकडून ही आगळीक वारंवार घडली. भारतानेही त्या राष्ट्राची नांगी वारंवार ठेचली. पण भारतापुढे निभाव लागत नाही म्हटल्यावर आता या राष्ट्राने भारताविरोधात छुपे युद्ध पुकारले आहे. पण याचाही परिणाम पाकिस्तानसाठी अतिशय वाईट असेल. पाकिस्तानचे भविष्यात सहा तुकडे होतील. ते कसे याचे भाकीत तुम्ही 'पाकिस्तान विनाशाकडून विनाशाकडे' या पुस्तकात वाचू शकतात'', असेही डॉ. शेवडे यांनी सांगितले.

यावेळी पुस्तकाचे सहलेखक डॉ. परिक्षित शेवडे यांनीही मनोगत व्यक्त केले. भारत-पाकिस्तान या विषयावर प्रकाशझोत टाकला. इतिहासातील संदर्भांपासून तर पाकिस्तानच्या वर्तमानकालीन वागणूकीपर्यंतचे मुद्दे त्यांनी मनोगतात मांडले. अगोदर निवृत्त ब्रिगेडिअर जगदीशचंद्र बागूल यांनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांची फुल्ल कमाई

$
0
0

एप्रिल महिनाभरामध्ये तब्बल ८३ लाखांवर डल्ला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एप्रिल महिन्यात चोरट्यांनी अवघ्या चार ते पाच गुन्ह्यांच्या प्रकारांमध्ये नागरिकांच्या ८३ लाख ६७ हजार रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला. यात सोने, रोकड, मोबाइल अशा मुद्देमालाचा समावेश आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांनंतर एप्रिलमध्ये अचानक वाढलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे हा भुर्दंड सर्वसामान्यांना सहन करावा लागला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा गुंतलेली असताना चोरट्यांनी संधी साधली. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असताना चोरट्यांनी सुरक्षा यंत्रणांना चकावा देत हात साफ केले. जबरी लूट व जबरी चोरीच्या १५ गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी तब्बल सात लाख ८४ हजार १९९ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यात व्यावसायिकांना लुटण्याच्या दोन घटनांचा समावेश होता. पैकी एका घटनेतील आरोपींना पोलिसांना वेळीच जेरबंद केले. मात्र, लुटलेली सर्व रकम हस्तगत करण्यात पोलिसांना अपयश आले होते. महिला, वृद्ध नागरिकांच्या हातातील मोबाइल, पर्स खेचून नेण्याच्या घटना याच महिन्यात वाढीस लागल्या. शहरात चोरीच्या २१ घटनांची नोंद या काळात झाली. घरातून दागिने चोरी, कंपनीतून चोरी, सराफी दुकानातून सोन्याच्या बांगड्या, कारमधील टेप, तोतया पोलिस अशा प्रकराच्या घटनांमधून चोरट्यांनी १० लाख ९४ हजार ५०० रूपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. घरात चार्जिंगला लावलेले, हॉलमध्ये ठेवलेले ८० हजार रुपये किंमतीचे मोबाइल केल्याप्रकरणी सहा गुन्हे दाखल झाले आहेत. तर, चोरी गेलेल्या मोबाइलची संख्या दहाच्या पुढे आहे. घरफोडीच्या घटनांनी सुद्धा डोके वर काढले आहे. ३० दिवसांच्या कालावधीत दिवस व रात्रीच्या १३ घटना घडल्यात. त्यात चोरट्यांनी सोने, चांदी, रोकड आदी मिळून तब्बल ११ लाख ४७ हजार ६५० रूपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला.

सायबर फसवणुकीचा वाढला जोर

एप्रिल महिन्यात सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांनी गती पकडली. ओटीपी, कार्ड बदल, ऑनलाइन व्यवहार अशा वेगवेगळ्या पद्धतीने सायबर चोरट्यांनी नागरिकांच्या बँक खात्यातील २६ लाख ३६ हजार ५८६ रुपये काढून घेतले. सायबर संबंधित ११ गुन्हे दाखल झाले असून, यातील गुन्ह्यांचा अद्यापपर्यंत तपास लागल्याचे समोर आलेले नाही. यापूर्वी सायबर गुन्हेगारांना दिल्ली, झारखंड आदी ठिकाणाहून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे असे गुन्हे जवळपास बंद झाले होते. मात्र, सायबर चोरटे अचानक सक्रिय झाले असून, नागरिकांनी याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.

..

चोरट्यांचे कारनामे

घटना...............नोंदविले गेलेले गुन्हे

पर्स चोरी : २१

जबरी चोरी : १५

घरफोडी : १३

मोबाइल चोरी : १०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images