Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

प्रवरानगरच्या चौघी ‘महिला क्रिकेट’मध्ये

$
0
0

गायत्री, श्रुती, ऋतुजा,

युगंधराची निवड

म. टा. वृत्तसेवा, शिर्डी

गुरूग्राम येथे सुरू झालेल्या राष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या चार मुलींची निवड झाली आहे.

ही राष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धा १० ते १३ मे या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नगर जिल्ह्यातील प्रवरा शिक्षण संस्थेच्या 'प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडिययम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या युगंधरा सप्रे, गायत्री पाटील, श्रुती पाटील आणि ऋतुजा डेरे या खेळाडूंची निवड झाली झाली आहे. त्या दिल्लीला रवाना झाल्या आहेत. याची माहिती देतांना प्राचार्या संगीता देवकर म्हणाल्या, 'नेहरू स्टेडियम येथे निवड चाचणी घेण्यात आली. राज्यातून ७६ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यात प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या १५ खेळाडू सहभागी झाल्या होत्या .त्यातील युगंधरा सप्रे, गायत्री पाटील, श्रुती पाटील आणि ऋतुजा डेरे या चार खेळाडूंची उत्तम कामगिरी पाहून निवड समितीने त्यांची निवड केली.' प्रवरा शिक्षण संस्थेच्या वतीने या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अलबत्या गलबत्या बॅगा छू...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाटकासाठी आलेल्या बॅक स्टेज आर्टिस्टच्या दोन बॅगा चोरट्यांनी चोरी करून नेल्याची धक्कादायक बाब महाकवी कालिदास कलामंदिरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी कानावर हात ठेवले असून, अस्पष्ट सीसीटीव्ही फुटेजमुळे, तसेच सुरक्षारक्षकांच्या ढिसाळ कारभारामुळे 'कालिदास'च्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

'कालिदास'मध्ये गुरुवारी अलबत्या गलबत्या नाटकाच्या प्रयोगासाठी आलेल्या दोन बॅक स्टेज आर्टिस्टबाबत हा प्रकार घडला. नाटक संपल्यानंतर सर्व कलाकर परतीच्या प्रवासात निघाले. 'कालिदास'मधून बाहेर पडल्याबरोबर दोन कलाकरांना आपल्या बॅगा नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे परतीला निघालेले वाहन पुन्हा 'कालिदास'ला आले. तेथे बराच वेळ शोधाशोध करण्यात आली. मात्र, दोन्ही बॅगा मिळाल्या नाहीत. एकाचे मानधनाचे १५ हजार, तर दुसऱ्याचे आठ हजार रुपये त्या बॅगांमध्ये होते. याशिवाय कपडे, आधार कार्ड, पॅन कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रेही त्यात होती. कालिदासमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे चोर सापडेल अशी आशा बाळगून सर्वांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या क्वॉलिटीमुळे त्यातून काहीही स्पष्ट होऊ शकले नाही. या कलाकरांनी लागलीच भद्रकाली पोलिस ठाणे गाठून आपले म्हणणे मांडले. मात्र, अशी कोणतीही तक्रार आपल्यापर्यंत आली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

--

'कालिदास'ची वॉल कम्पाउंड फारच छोटी असून, चोरट्याला उडी मारून आत येणे शक्य होते. ही चोरीही याच पद्धतीने झाली. चोरटा पार्किंगमधील वाहनात पोहोचला. सुरक्षारक्षकाने संशयितांना हटकायला हवे. मात्र, तसे झालेले नाही.

-राहुल भंडारे, निर्माता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीरशैव युवक संघटनेतर्फे महात्मा बसवेश्वर जयंती

$
0
0

लोगो - सोशल नेटवर्किंग

वीरशैव युवक संघटनेतर्फे महात्मा बसवेश्वर जयंती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती नुकतीच रविवार कारंजा येथे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रमुख पाहुणे म्हणून पंडितराध्य शिवाचार्य वडांगळीकर महाराज उपस्थित होते. महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पश्चिम विभागाच्या सभापती वैशाली भोसले, नगरसेविका वत्सला खैरे, शिवा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल कोठुळे, जिल्हाप्रमुख सुनील वाडकर आदींसह संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवा वीरशैव संघटनेच्या वतीने आखणी एका दुसऱ्या कार्यक्रमात महात्मा बसवेश्वर यांची ८८८ जयंती साजरी करण्यात आली. वडांगळीकर महाराज यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे पूजन केले. प्रामाणिकपणे मेहनत केल्यास फळ मिळते, असे मत यावेळी रंजना भानसी यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक अनिल कोठुळे यांनी केले. सूत्रसंचालन उमेश आटवणे यांनी केले. त्यांनी महात्मा बसवेश्वर यांचे कार्य अत्यंत परिणामकारक असून सर्व समाजांसाठी मार्गदर्शक असे होते असे सांगून बसवेश्वर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरटे जोमात, पोलिस कोमात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात सध्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, पोलिस मात्र हेल्मेट कारवाईत रममाण झाल्याचे दिसून येत आहे. घरात घुसून, तसेच वाहनास कट मारून चेन स्नॅचिंग, महाकवी कालिदास कलामंदिरातील कलावंतांचे साहित्य लंपास करण्यासह थेट पोलिस मुख्यालयातील एटीएम फोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. यावरून चोरटे जोमात अन् पोलिस कोमात असे चित्र शहरात निर्माण झाले आहे.

पोलिसांच्या सुस्त कामगिरीमुळे सक्रिय झालेल्या चेन स्नॅचर्सची हिंमत चांगलीच वाढली असून, थेट घरात घुसून महिलेवर चाकूहल्ला करीत चेन स्नॅचिंग करण्याची पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना गुरुवारी सायंकाळी इंदिरानगरच्या राजीवनगर परिसरात घडली. मीनाक्षी मिलिंद केसकर (वय ६०, रा. कृष्ण पार्क सोसायटी, राजीवनगर) असे या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरात एकट्या असताना हा प्रकार घडला. चोरट्याने थेट केसकर यांचे घर गाठून दरवाजा ठोठावला. केसकर यांनी दरवाजा उघडताच त्याने त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. केसकर यांनी चोरट्याला विरोध केला. केसकर यांच्याकडून विरोध होत असल्याचे लक्षात आल्याने चोरट्यांने आपल्याकडील चाकूने केसकर यांच्यावर वार केला. केसकर यांनी प्रसंगावधान राखत आपला हात पुढे केला. त्यात त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. केसकर व चोरट्यामधील झटापट आणि त्यातून होणाऱ्या आरडाओरड्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी केसकर यांच्या घराकडे धाव घेतली. परंतु, तोपर्यंत चोरट्याने तेथून पळ काढला होता. चेन स्नॅचर्सकडून थेट एकट्यादुकट्या महिलेवर चाकूहल्ला होण्याच्या या प्रकारामुळे इंदिरानगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा पुढील तपास सहायक निरीक्षक नागेश मोहिते करीत आहेत.

--

जाब विचारणारी महिला 'टार्गेट'

दुसऱ्या घटनेत वाहनाला कट का मारला, असा जाब विचारणाऱ्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून चोरट्याने धूम ठोकली. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अंबड येथे चेन स्नॅचिंगचा हा प्रकार घडला. अंबड येथे महिलेला गाडीचा कट मारून तिची छेड काढली. याचा जाब विचारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला चोरट्याने टार्गेट केले. याबाबत स्वाती रवींद्र जोशी (वय ४२, रा. गणेश कॉलनी, अंबड) यांनी तक्रार दिली. गुरुवारी दुपारी त्या रस्त्याने पायी जात असताना काळ्या दुचाकीवरून पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांना दुचाकीचा कट मारला. त्याचा जाब विचारण्यासाठी जोशी संशयितांपर्यंत पोहोचल्या. ही संधी साधत दोघा चोरट्यांपैकी एकाने जोशी यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे १२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक खडके करीत आहेत.

--

रस्त्यावरील पोलिस कागदोपत्री

पोलिसांची 'व्हिजिबिलिटी' वाढविण्याचे सूतोवाच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी वेळोवेळी केले. मात्र, पोलिसांची रस्त्यावरील घनता कागदोपत्री वाढली की नाही, असा प्रश्न वाढत्या गुन्हेगारीमुळे उपस्थित होत आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत शहरात चेन स्नॅचिंगच्या चार घटना घडल्या होत्या. मार्च महिन्यापासून पोलिस आयुक्तांच्या सुचनेनुसार पोलिस कर्मचारी रस्त्यावर आले. पुढे एप्रिलच्या एकाच महिन्यात चेन स्नॅचिंगच्या चार घटना घडल्या आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीलाच दोन ठिकाणी स्त्रीधन लुटण्यात आले असून, हातातील मोबाइल, पर्स लुटण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. रस्त्यावर महिला सुरक्षित नसल्याची भावना यामुळे वाढीस लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजयासाठी पश्चिमच ‘खास’दार!

$
0
0

राजकारण लोगो

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दाट लोकवस्तीचा आणि सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे नाशिकचा खासदार कोण होईल, याचा फैसला याच मतदारसंघातील कौलावर अवलंबून असेल. २६ व्या फेरीपर्यंत अटीतटीची लढत झाली तर नाशिक पश्चिमची एकमेव २७ वी फेरीच विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, याबाबत निर्णायक ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात दंड थोपटणाऱ्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य २९ एप्रिल रोजी ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. २३ मे रोजी मतमोजणीची प्रक्रिया राबविण्यात येणार असून, नाशिक आणि दिंडोरीचा संसदेमधील प्रतिनिधी कोण असेल हे या दिवशी स्पष्ट होऊ शकेल. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. मतदार आणि मतदान केंद्रांची संख्या यासह झालेल्या एकूण मतदानाच्या अनुषंगाने कोणत्या विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या किती फेऱ्या होतील, याचा अंदाज जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने दिला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३६५ मतदान केंद्रे असून, येथील मतदारसंख्या सर्वाधिक ३ लाख ९० हजार ३८६ आहे. त्यापैकी २ लाख १७ हजार १०५ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अन्य मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या जास्तीत जास्त २६ फेऱ्या होणार असून, सर्वाधिक २७ फेऱ्या एकट्या नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली. नाशिक पूर्व मतदारसंघात मतमोजणीच्या २६ फेऱ्या असून, या फेरीपर्यंत अटीतटीची लढत झाली तर नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या शेवटच्या फेरीतून कोण अधिक मते घेतो, यावर विजयाचे गणित अवलंबून असेल. त्यामुळे नाशिक पश्चिमची अखेरची फेरी होत नाही तोपर्यंत निकालदेखील कळू शकणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

निकाल दुसऱ्या दिवशी?

मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात होणार असून, प्रत्येक फेरीनंतर उमेदवारांना मिळालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघांत मतमोजणीच्या एकूण २७ फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीच्या या प्रक्रियेला कमीत कमी १२ तासांचा अवधी लागू शकतो, असा जिल्हा निवडणूक शाखेचा प्राथमिक अंदाज आहे. मतमोजणीनंतर व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची प्रातिनिधिक स्वरूपात मोजणी करण्यात येणार आहे. ही एकूणच प्रक्रिया पूर्ण करताना दुसरा दिवस उजाडू शकतो, अशी शक्यता निवडणूक शाखेने व्यक्त केली आहे.

दिंडोरीतही २५ फेऱ्या

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा चुरशीची लढत पाहायला मिळत असून, येथील निकालाकडेही जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात १,८८४ मतदान केंद्रे असून, सर्वाधिक ३३८ मतदान केंद्रे प्रत्येकी नांदगाव आणि कळवण विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या प्रत्येकी २५ फेऱ्या होणार आहेत. निफाडमध्ये सर्वांत कमी १९ फेऱ्या होतील.

विधानसभा मतदारसंघ- मतदान केंद्रे- फेऱ्या

सिन्नर- ३२९- २४

नाशिक पूर्व- ३५५-२६

नाशिक मध्य-२९९-२२

नाशिक पश्चिम-३६५-२७

देवळाली-२७०-१९

इगतपुरी/त्र्यंबकेश्वर-२८९-२१

विधानसभा मतदारसंघ- मतदान केंद्रे- फेऱ्या

नांदगाव-३३८-२५

कळवण/सुरगाणा-३३८-२५

चांदवड/देवळा-२९७-२२

येवला-३१६-२३

निफाड-२७२-१९

दिंडोरी/पेठ-३२३-२४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आज, उद्या विजेचा ‘मेगा ब्लॉक’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मान्सूनपूर्व तयारी व देखभाल-दुरुस्ती या अत्यंत तातडीच्या कामांसाठी आज, शनिवारी (दि. ११) आणि रविवारी (दि. १२) शहर व परिसरातील काही भागाचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून, वीजग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम वेळेच्या आत पूर्ण झाल्यास वीजपुरवठा त्वरित सुरू केला जाणार आहे.

वीजवाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी पुढील भागात शनिवारी व रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान चार ते सात तास वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महावितरण प्रशासनाकडुन कळविण्यात आली आहे.

नाशिक शहर विभाग-१- पंचवटी उपविभाग : के. के. वाघ कॉलेज परिसर, अयोध्यानगर, रासबिहारी लिंकरोड, धात्रक फाटा, कृष्णानगर, टकलेनगर, गणेशवाडी, दिंडोरीरोड, आरटीओ कॉर्नर, लामखेडे मळा, तारवालानगर, मखमलाबाद नाका रोड.

शहर उपविभाग : कुलकर्णी व पंडित कॉलनी, शरणपूर रोड, गंजमाळ परिसर, नानावली, काजीपुरा, बुधवार पेठ, कोकणीपुरा.

सिडको उपविभाग : अंबड एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ए, बी, आय, के, एम, डब्ल्यू, तसेच अश्विननगर, राणेनगर, उत्तमनगर, विल्होळी, उपेंद्रनगर, मोरवाडी गाव, गणेश चौक, लेखानगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक, चेतनानगर, पाथर्डी फाटा.

नाशिक शहर विभाग-२ - शनिवार : गंगासागर, राधाकृष्णनगर, पाझर तलाव, सावरगाव, पेनिन्सुला, उंटवाडी, कालिका पार्क, श्रमिकनगर, गंगावऱ्हे, मुक्त विद्यापीठ परिसर, कर्णनगर, विठाईनगर, आरटीओ परिसर, पेठरोड, इंद्रप्रस्थ कॉलनी, नवीन जकात नाका, त्र्यंबक, मोटवानीरोड, दत्त मंदिर स्टॉप, डीजीपीनगर, देवळाली, शिंगवे बहुला, लामरोड, इंदिरानगर, जाधव संकुल, बेळगाव ढगा.

रविवार : जेलरोड, पंचक, दसक, नांदूर, मानूर, शिखरेवाडी, नारायणबापूनगर, सामनगावरोड, सिन्नर फाटा, गोरेवाडी, कलानगर, एकलहरे, शिलापूर, ओढा, सामनगाव, हिंगणवेढे, कोटमगाव या ठिकाणचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातृभाषेतील शिक्षणासाठी गांधीजी आग्रही

$
0
0

मुकुंद दीक्षित यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गांधीजी हे कोणत्याही काळात समकालीनच होते. कारण त्यांच्याकडे विचारांची परिपक्व बैठक होती. राजकीय बाबींविषयी ते जितके सतर्क होते त्यापेक्षा अधिक पटीने शिक्षणाविषयी त्यांची मते ठाम होती. मातृभाषेतूनच शिक्षण दिले पाहीजे असा त्यांचा आग्रह होता, असे प्रतिपादन गांधीप्रेमी कार्यकर्ते मुकुंद दीक्षित यांनी केले.

यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट येथे वसंत व्याख्यानमाला नाशिक संस्थेच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेच्या सत्रात 'महात्मा गांधी विचारांची आजच्या काळात उपयुक्तता' या विषयावर ते बोलत होते. हे पुष्प प्रा. सुरेश मेणे यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले. दीक्षित म्हणाले, की गांधीवादी लोकांनी अनेक चुका करून ठेवल्या आहेत. कारण एकदा तो विचार स्वीकारला की त्यात व्यक्तिपूजा येते. गांधींजींची पूजा करणारे अनेक लोक होते. परंतु, त्यांची पूजा करणे महत्त्वाचे नाही तर त्यांचा विचार घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे. प्रत्येक माणूस आपली एक क्षमता घेऊन जन्माला येतो. गांधीजी त्यापैकी एक होते. गांधी ही चांगली गोष्ट आहे. मात्र, ते माणूस होते हे कबूल करायला हवे. त्यासाठी मोठेपणा लागतो. रोजच्या जीवनात माणसाला आपल्याला जीवनाचे तत्त्वज्ञान ठरवावे लागते, तसे गांधीजींनी ठरवलेले होते. जीवनाला दिशा देणारे शिक्षण हवे, अशी त्यांची धारणा होती.

यावेळी मंचावर शोभना मेणे, सत्यजीत मेणे, जुई मेणे यांची उपस्थिती होती. सुरेश मेणे यांच्या स्मृतींना सुभाष सबनीस यांनी उजाळा दिला. प्रमुख वक्त्यांचा परिचय सचिन मालेगावकर यांनी करून दिला. संगीता बाफणा यांनी सूत्रसंचालन केले.

...

आजचे व्याख्यान

वक्ता : श्रीकांत कोतुरवार

विषय : सत्संग (भक्तीगीत)

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिलंवहिलं

$
0
0

पहिलंवहिलं

अधिवेशनाचा अनुभव

प्रा. एस. बी. फाकटकर, नाशिक

एखादे अधिवेशन म्हणजे काय असते त्याचा अनुभव मला नुकताच मिळाला. त्याचे महत्त्व्, नियोजन, तेथे मिळणारे मार्गदर्शन या सगळ्या गोष्टींनी माझ्या मनात घर केले.

-------

अधिवेशन कसं असतं. त्याचा पहिला अनुभव घेणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं व भावनिकदृष्ट्या महत्त्वाचं होतं. कारण ते आपल्या समाजाचं होतं. कारण अधिवेशन हे आपल्या समाजाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रगतीचा आरसा असतो. त्यात आपल्या समाजाच प्रतिबिंब दिसते. असा क्षण आला तो 'अखिल देशस्थ दैवज्ञ सोनार समाज प्रांतिक मंडळ, महाराष्ट्र राज्य आयोजित दहावे पंचवार्षिक अधिवेशन श्रीक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांच्या पवित्र भूमीत.

१२ जानेवारी या अधिवेशनाच्या प्रथम दिवशी 'ताण-तणावाचे व्यवस्थापन' व्याख्याते श्री.अमित फापाळे, 'स्पर्धा परीक्षा' व्याख्याते स्वप्निल खोल्लम यांचे व्याख्यान अधिवेशनासाठी आलेल्या युवकांसाठी फारच प्रेरणादायी होते. कारण ते स्वतः संघर्ष करत एक प्रशासकीय अधिकारी झाले होते. त्यांनी चिकाटी आणि जिद्द याशिवाय यश मिळत नाही हे सांगितलं. हे व्याख्यान मनाला फार भावले. त्याशिवाय आणखी एक नाशिकच्या भूमिपुत्राच व्याख्यान डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांचं 'तरूणाई: सहभाग आणि विकास' हे व्याख्यान मनाला चिरंतन काल स्पर्श करून गेलं. 'मधुमेह प्रतिबंध' यासाठी आहार नियोजन- व्याख्याते डॉ. वेदा नलावडे व डॉ. अरूण नावगे तसेच बालसंगोपन व्याख्यात्या डॉ. रूपाली खोल्लम यांच्या व्याख्यानातून उपस्थितांना आरोग्य विषयक अनमोल अशी माहिती मिळाली. तर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात एकनाथ खोल्लम यांचा लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम झाला.

उपस्थितांचे चांगले मनोरंजन झाले .अशा प्रकारे अधिवेशनाचा पहिला दिवस बौद्धिक, मानसिक समाधान देणारा ठरला. तर अधिवेशनाच्या दुसऱ्या व शेवटच्या दिवशी आधुनिक स्रियांसमोरील आव्हाने, आरोग्य आणि आयुर्वेद, महिला सबलीकरण, योगाचे महत्त्व, व्यवसायातील आव्हाने व संधी' या विषयांवर मार्गदर्शन मिळाले. रोखठोक सदरात हुंडा बंदी या विषयावर प्रा. नितीन फाकटकर यांचे प्रेरणादायी विचार ऐकायला मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंदिर जिर्णोद्धार निधीसाठी उपोषणाचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज मंदिर परिसर विकास आराखड्याचा निर्धारित निधी दिला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारकऱ्यांसह उपोषण करण्याचा निर्धार जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण महाराज लहवीतकर यांनी व्यक्त केला आहे.

निवृत्तिनाथ महाराज मंदिरात झालेल्या जिर्णोद्धार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. मंदिर जिर्णोद्धाराचे काम सुरू झाल्या नंतर दीड वर्षांत पहिल्यांदाच अशा प्रकारे बैठक झाली. डॉ. लहवीतकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पंडित महाराज कोल्हे, सचिव जिजाबाई लांडे, त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिक थेटे, रामभाऊ मुळाणे उपस्थित होते.

पंडित कोल्हे यांनी गावोगावच्या वारकरी भाविकांनी दररोज दहा रुपयांची बचत करत निधी संकलीत केला तर शासनाच्या मदतीची गरज भासणार नाही असे मत व्यक्त केले.

सुकाणू समिती करणार निधीचे संकलन

संत निवृत्तिनाथ मंदिर जिर्णोद्धार करण्यासाठी २ कोटी ५८ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी ८१ लाख ६५ हजार रुपये ठेकेदारास दिले आहेत. मंदिराचे काम वेगाने सुरू आहे. उर्वरित सुमारे १ कोटी ७७ लाख रुपये वारकरी भाविकांमधून जमा करणे आवश्यक आहे. त्याकरिता सुकाणू समिती स्थापन करून गावोगाव दौरा काढण्यात येणार आहे. मंदिर ट्रस्टकडे ९० लाखांची गंगाजळी आहे. तथापि कायम मुदत ठेव असलेली ही रक्कम आणखी वाढविण्याची आवश्यकता या बैकठीत व्यक्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिर स्थलांतराची व्यवहार्यता तपासणार

$
0
0

राज्य पुरातत्त्व संचालक तेजस गर्गे यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैतरणा धरणात गेलेले वांजोळे गावचे शिवमंदिर धरणातील पाणी घटल्याने उजेडात आले आहे. हे वाचविण्याचा प्रयत्न होण्याची गरज लक्षात घेता मंदिर व मंदिराचे अवशेष स्थलांतरीत करणे शक्य आहे का, याबाबत त्याची व्यवहार्यता व खर्चाबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जार्इल, असे आश्वासन राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी व्यक्त केले आहे.

इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणातील वांजोळे गावचे शिवमंदिर धरणाचे पाणी घटल्याने उजेडात आले आहे. हे मंदिर साधारण आठशे वर्षे जुने असून, धरणाच्या पाण्यात मंदिर जात असल्याने ते निखळून पडले आहे. मंदिराच्या सभा मंडपाचेच काही अवशेष शिल्लक असल्याने हे मंदिर वाचविता येर्इल का, अशी आर्त हाक वांजोळेकरांनी दिली होती. 'मटा'च्या वृत्ताची दखल राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी घेतली असून, मंदिर स्थलांतराबाबतची व्यवहार्यता तपासली जाणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

प्राचीन ठेवा वाचवायलाच हवा!

'मटा'मधील वृत्ताने सोशल मीडियावर राज्यभरातील वाचकांनी मंदिर वाचविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली आहे. अनेकांनी प्राचीन वारशाबाबत समाजात जागृती होत असून, सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर चांगले उदाहरण निर्माण होऊ शकते, असे म्हटले आहे. तरी काहींनी आपण एकत्र येऊन एखादे वारसास्थळ वाचवू शकतो, ही भावना निर्माण करण्यासाठी का होर्इना, या मंदिराच्या माध्यमातून एकजूट दाखवायला हवी, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्थिक मदतीचा हात

वांजोळे येथील प्राचीन मंदिर वाचविण्यासाठी पुरातत्त्व विभागाने समिती स्थापन करून त्यामाध्यमातून या मंदिराच्या स्थलांतरासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे. अशा समितीच्या माध्यमातून आर्थिक मदत उभारणे सोपे जार्इल व पुरातत्त्व विभागावरही आर्थिक दडपण राहणार नाही, अशी प्रतिक्रियाही वाचकांनी व्यक्त केली. पुणे येथील इतिहास अभ्यास व मोडी तज्ज्ञ मंदार लवाटे म्हणाले, की मंदिर वाचविले पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका योग्य आहे पण, या कामासाठी प्रत्येकाने आर्थिक बळ देण्याचे आश्वासनही दिले पाहिजे. सरकारने सगळे करावे हे योग्य नाही. मंदिर स्थलांतरासाठी आपण सगळ्यांनी आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्यायला हवा.

मंदिर स्थलांतर प्रक्रिया सोपी नसते; मात्र हे अशक्यही नाही. मंदिराचे स्थलांतर करणे व्यवहार्य आहे का, तसेच त्यासाठी किती खर्च येऊ शकतो, याचे अंदाजपत्रक तयार करून याबाबत निर्णय घेतला जार्इल.

- तेजस गर्गे,

संचालक, राज्य पुरातत्त्व विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकांना मिळेना ‘आधार’

$
0
0

(पान-३साठी अँकर)

मटा विशेष

pravin.bidve@timesgroup,com

Tweet : BidvePravinMt

नाशिक : तांत्रिक अडथळे आणि तत्सम अडचणींमुळे राज्यात ० ते ५ या वयोगटांतील बालकांचे आधार कार्ड काढण्याचे उद्दिष्ट गाठण्यात प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. बालकांचे आधार कार्ड काढण्याचे प्रमाण राज्यात अवघे २७ टक्के असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून, तब्बल ७३ टक्के बालकांची आधार कार्डे काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. विशेष म्हणजे बालकांच्या आधार कार्डाचा टक्का वाढविण्यासाठी विशिष्ट कालमर्यादा दिली जाणार असून, या कालावधीतच हे काम मार्गी लावण्याचे काम यंत्रणेला करावे लागणार आहे. नाशिकमध्ये अवघ्या २३.९४ टक्के बालकांकडेच आधार कार्ड आहे.

सरकारच्या बहुतांश योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आधार नोंदणीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात शुक्रवारी घेण्यात आला. बैठकीला युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे (युआडीएआय) उपमहासंचालक संजय चहांदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील आधार केंद्रांची सद्य:स्थिती, वयोगटानुसार आधार नोंदणीची टक्केवारी, आधार केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. ग्रामीण भागात बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये आधार केंद्रांची संख्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या. याशिवाय नाशिकमधील ४० आधार केंद्रे काळ्या यादीत टाकण्यात आली असून, त्याऐवजी तेवढेच नवीन सेंटर्स महापालिका, तहसील कार्यालयांसारख्या गर्दीच्या ठिकाणांवर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.

आधार नोंदणी अपूर्णच

राज्यात ० ते ५ वयोगटांतील आधार कार्डधारक बालकांची संख्या अवघी २६.७५ टक्के आहे, तर नाशिक जिल्ह्यात २३.९४ टक्के बालकांकडेच आधारकार्ड आहे. विशेष म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा योजनेत आधार नोंदणी झालेल्या व आधारकार्ड योजनांशी लिंक असलेल्या लाभार्थींनाच योजनांचा लाभ देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या योजनांपासून बालके वंचित राहू नयेत, यासाठी अंगणवाड्यांतील बालकांची आधार नोंदणी ३१ मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करणे सरकारला अपेक्षित होते. मात्र, आजही राज्यात हे काम अपूर्णच आहे.

नोंदणीपुढे तांत्रिक अडचणी

हॉस्पिटल्समध्येच नवजात अर्भकांचे आधार कार्ड काढण्यासाठी काही हॉस्पिटल्सला टॅबलॉइडसारखी सामग्री पुरविण्यात आली आहे; परंतु आधार नोंदणीच्या सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे नोंदणी रखडली. त्यामुळे बहुतांश बालकांची आधार नोंदणी होऊ शकली नाही. ग्रामीण भागात वीज भारनियमन, इंटरनेटला रेंज न मिळणे यांसारख्या तांत्रिक अडचणींमुळेही नोंदणीवर विपरित परिणाम झाला. दुर्गम भागात आधार नोंदणीसाठी फोर जीचा वापर करता येईल का, याचे प्रात्यक्षिक लवकरच घेण्यात येणार असून, अंगणवाड्यांमध्ये नोंदणीसाठी मोहीम उघडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

राज्यातील 'आधार' स्थिती

० ते ५ वर्षे वयोगट

९९,२२,४९६ बालके राज्यात

२६,४९,३०६ बालकांकडे आधार

७२,७३,१९० बालके वंचित

राज्यात

२६.७५% बालकांकडे आधार

जिल्ह्यात

२३.९४% बालकांकडे आधार

नाशिक जिल्ह्यातील स्थिती

६,१९,२५९ एकूण बालके

१,४८,२७८ बालकांकडे आधार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टरोडच्या उंचीने पावसाळी पाण्याचा धोका

$
0
0

व्यावसायिकांसह घरांपुढे ठाकला प्रश्न

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संथ गतीने सुरू असलेल्या स्मार्टरोडची उंची परिसरातील नागरिक व व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. बांधकामांच्या प्लिंथ लेव्हलपासून हा रस्ता उंच असून, यामुळे पावसाळ्यातील पाणी आजुबाजुच्या दुकानांमध्ये तसेच घरांमध्ये घुसण्याची शक्यता वाढली आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा रस्ता स्मार्टरोड योजनेतंर्गत तयार केला जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील या रस्त्याच्या कडेला व्यावसायिक अस्थापनांची संख्या मोठी असली तरी काही घरांची संख्या देखील कमी नाही. स्मार्टरोड संकल्पनेनुसार हा रस्ता क्राँकटीकरणाचा असून भूमिगत पाईपलाईन व इतर काही सुविधा येथे पुरविण्यात येणार आहे. मुळातच रस्त्याच्या कामास बराच उशिर झाला असून, अजूनही ४० टक्क्याहून अधिक काम बाकीच आहे. हा रस्ता तयार करण्याचे नियोजन आखताना रस्त्याच्या उंचीकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार पुढे येत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुची बांधकामे जुनी असून, दर काही वर्षांनी पडणाऱ्या थरांमुळे रस्त्यांची उंची वाढते आहे. आजमितीस हा रस्ता खोदून तयार करण्यात आला असला तरी पूर्वीपेक्षा रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे. यामुळे दोन्ही बाजुंच्या बांधकामांची प्लिंथ लेव्हर रस्त्याच्या खाली पोहचली आहे. पाणी जिरण्याचा कोणताच मार्ग नसल्याने पावसाचे पाणी आजुबाजुच्या दुकानांमध्ये तसेच घरांमध्ये घुसण्याची शक्यता दिसून येते आहे.

याबाबत स्थानिक रहिवाशी आणि इंजिनीअर दिलीप ओढेकर यांनी सांगितले, की याबाबत खूप आधीच मी हरकत नोंदवली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत अधिकाऱ्यांनी रस्त्याची उंची वाढवली. यामुळे पावसाचे पाणी दुकाने व घरांमध्ये घुसण्याचा मोठा धोका आहे. पूर्वीच्या बांधकामाकडे सपशेल दुर्लक्ष करून रस्ता बांधण्याचा घाट घालण्यात आला असून, ही गंभीर चूक करणाऱ्यांना शासन होणे आवश्यक आहे. या रस्त्याच्या उंचीमुळे एम. जी. रोड, शालिमार, अशोकस्तंभ अशा महत्त्वपूर्ण ठिकाणी व्यापक समस्या निर्माण होणार असून, याबाबत महापालिका प्रशासनाने गंभीर विचार करणे आवश्यक असल्याचे ओढेकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शन संघर्ष समितीची सोमवारी बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड जुनी पेन्शन संदर्भात नाशिक विभाग शिक्षण संघर्ष समितीच्या सहविचार सभेचे आयोजन सोमवारी (१३ मे) सकाळी ११ वाजता औरंगाबाद हायवेवरील नांदुरनाका येथील गुरुदत्त लॉन्स येथे करण्यात आले असुन या सभेस विभागातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त आणि १ नोव्हेंबर २००५ नंतर शंभर टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त आणि १ नोव्हेंबर २००५ नंतर शंभर टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जुनी पेन्शन संघर्ष समितीने याचिका दाखल केलेली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा हा निर्णय योग्य असल्याचा नुकताचा निर्वाळा दिला. त्यामुळे ४५ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झालेले आहे. या प्रश्नावरील पुढील लढ्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये १५ पासूनखो-खो प्रीमियर लीग

$
0
0

\B- जिल्हा संघटनेची राज्यातील पहिली लीग

- लीगच्या लोगोचे नाशिकमध्ये अनावरण

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

छत्रपती शिवाजी स्टेडियमवर १५ ते १९ मेदरम्यान खो-खो प्रीमियर लीग होणार असून, या लीगच्या लोगोचे अनावरण शनिवारी झाले. विश्वास बँकेचे संस्थापक विश्वास ठाकूर, नितीन पाठक, ऋणानुबंध ग्रुपचे संजय गवळी, राहुरीच्या काकासाहेब तांबे पेट्रोलियमतर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे, बागड प्रॉपर्टीजचे प्रसाद बागड, जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. लीगमध्ये एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. जिल्हा संघटनेतर्फे महाराष्ट्रात प्रथमच खो-खो प्रीमियर लीग होणार आहे.

विश्वास बँकेने 'दिलीप ब्लास्टर्स', ऋणानुबंध ग्रुपने 'चंदू डेअर डेव्हिल', काका तांबे पेट्रोलियम राहुरीने 'स्वप्नील फ्लायर्स', रेडिओ विश्वास व विश्वास गार्डनने 'निशा राईझिंग जायंट्स', बागड प्रॉपर्टीजने 'सागर वॉरियर्स', तर ग्रॅंडियुर रिलेटर्सने 'मनीषा रॉयल चॅलेंजर्स' या संघांना पुरस्कृत केले आहे. स्पर्धेत रोज सायंकाळी प्रकाशझोतात तीन सामने खेळवण्यात येणार आहेत. ही स्पर्धा राउंड रॉबिन लीग पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतील. त्यापैकी चार खेळाडू मुली असून, प्रत्यक्ष मैदानावर त्यातील ३ मुलींना प्रत्येक सामन्यात भाग घेणे अनिवार्य आहे. स्पर्धेत १८ राष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार असून, त्यातील दोन खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा बहुमान मिळालेला आहे. प्रत्येक सामन्यात तीन खेळाडूंना रोख पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. विजेत्या, उपविजेत्या संघांना आकर्षक चषक व रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परस्पर वृक्षतोड बेसुमार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. वृक्षप्राधिकरण समितीच्या कठोर जाचातून जाण्याऐवजी नागरिक परस्पर वृक्षांची तोड किंवा छाटणी करत असतांना महापालिका हद्दीत वर्षभरात अवघे ८२ जणांवर वृक्षतोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत. अपुरे मनुष्यबळ व अधिकाऱ्यांना दुर्लक्षामुळे वृक्षतोड करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करता येत नसल्याची कबुलीही महापालिकेच्या उद्यान विभागाने एका तक्रारकर्त्याला दिली आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी आणि बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी राज्य सरकारने वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा केला. वृक्षतोड करण्यासाठी नियमावली आहे. वृक्षतोडीपूर्वी महापालिका क्षेत्रात वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी आवश्यक आहे. धोकेदायक व जोखमीचे वृक्ष असल्यासच वृक्षतोड करू दिली जाते. तसेच विकासकामांसाठी काही ठिकाणी पर्यायी झाडे लावल्यानंतर वृक्षतोडीला परवानगी दिली जाते. परंतु, वृक्षप्राधिकरण समितीच्या अटी शर्ती कठीण असल्याने या जाचातून जाण्याऐवजी शहरी भागात मोठ्या प्रमाणत वृक्षतोड केली जाते. तसेच वृक्षांच्या फांद्या छाटण्यासाठी सुद्धा परवानगीची गरज आहे. मात्र, नागरिक परस्पर फांद्याची छाटणी करतात. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात पोलिसात थेट गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. परंतु, महापालिकेच्या उद्यान विभागाकडे असलेल्या अपुरे मनुष्यबळ आणि विभागीय अधिकाऱ्यांकडून वृक्षतोडी संदर्भात होत असलेल्या दुर्लक्षामुळे वर्षभरात शहरात केवळ ८२ जणांवरच गुन्हे दाखल झाले आहेत. सर्वाधिक वृक्षतोड होत असलेल्या पंचवटी परिसरात सर्वात कमी गुन्हे दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गोदा संवर्धन मोहिमेचे सदस्य अमित कुलकर्णी यांनी केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेच्या उद्याने विभागाने सदरची माहिती दिली.

म्हणे, खूप वाईट वाटते!

तक्रारदाराने वृक्षतोडी संदर्भात उद्यान विभागाकडे माहिती मागितली. उद्यान विभागाने मात्र धक्कादायक विधान केले. शहरात वृक्षतोड करण्याऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसह उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करत असतो. परंतु, आम्हाला सांगायला वाईट वाटते, की याकडे अधिकारी दुर्लक्ष करतात, कुठेही कारवाई केली जात नाही, अशी कबुलीच उद्यान अधीक्षकांनी दिली आहे. त्यामुळे पत्रातील या मजकुराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पन्नासवर मोर दुष्काळाचे बळी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड तालुक्यातील दहीवद, दिघवद परिसरात वर्षानुवर्षे शेकडो मोर अस्तित्वात आहेत. मागील महिनाभराच्या कालावधीत अन्न-पाण्याची भीषण परिस्थिती व त्या जोडीला भयंकर उष्णतेमुळे मोरांमध्ये अशक्तपणा आला आहे. अशात उष्माघात, अज्ञात आजाराने तर काही परिसरातील मोकाट कुत्र्यांची शिकार झाल्याने ५० ते ६० मोर दगावल्याची माहिती स्थानिक नागरिक देतात. वन विभागाच्या दफ्तरी आतापर्यंत १३ मोर मेल्याचे आढळून आले असून, त्यांचा पंचनामा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दहीवद, दिघवद परिसरात दररोज एक-दोन मोर शेतकऱ्यांना मृतावस्थेत सापडत आहेत. बुधवार दि. ८ रोजी दिघवद ता. चांदवड येथील सुनील गंगाधर गांगुर्डे यांच्या शेतात दोन कुत्र्यांनी एका मोरावर हल्ला करीत मोरास गंभीर जखमी केले. यावेळी शेतकरी सुनील गांगुर्डे व सहकाऱ्यांनी मोराचे प्राण वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, अशक्तपणा, त्यात गंभीर दुखापतीने मोरांचा मूत्यू झाला. दिघवद परिसरातीलच पांडू रसाळ यांच्या शेतातील विहिरीत पाण्याच्या शोधार्थ एक मोर विहिरीत पडून मूत्यू पावला. ही बाब गुरुवारी सकाळी लक्षात आल्यावर स्थानिक शेतकऱ्यांनी मृत मोरास विहिरीतून बाहेर काढत वनविभागाकडे सुपूर्द केले. गुरुवारी सायंकाळी कुत्र्यांनी हल्ला करून एका मोराला फाडल्याचे शेतकरी रेवण गांगुर्डे यांनी सांगितले. मृत्यू उष्माघातानेच! मोरांच्या मृत्यूंबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. काही दिवसांपूर्वी एका मोरावर कुत्र्याने हल्ला केला होता, तर दुसरा मोर परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. उपचारानंतर या मोरांचा मृत्यू उष्माघाताने होत असल्याची बाब पशुवैद्यकीय डॉक्टर दत्ता मोटेगावकर, डॉ. अर्जुन गांगुर्डे यांनी निदर्शनास आणली होती. मृत मोरांचा व्हिसेरा तपासणीसाठी पुण्याला रोगनिदान प्रयोगशाळेत आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, मोरांचा मूत्यू उष्माघातानेच होत असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती डॉ. मोटेगावकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामायण महाकाव्यास वास्तवाचा आधार

$
0
0

यशोदीप देवधर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रामायण हा केवळ ग्रंथ नाही. रामायण भारतीयांची आस्था, श्रद्धा आणि इतिहास आहे. या प्रतिभावान रचनेस साहित्याचा स्पर्श झाल्याने रामायण इतिहास आहे की कल्पना याबाबत सातत्याने वाद-प्रतिवाद घडत असतात. पण रामायण नेमके आहे याचा शोध बाहेर घेण्याची गरज नाही. याबाबत स्वत: वाल्मिकी ऋषींनी केलेल्या उल्लेखानुसार रामायण हे विशिष्ट कालखंडातील घडामोडींचे वृत्तांकन आहे. केवळ निरसपणे हे वृत्तांकन न मांडता याला कथास्वरूपाचा साज चढवून ती साहित्य कलाकृती आकाराला आली असली तरीही मुळात तिला वास्तवाचा आधार आहे, असे प्रतिपादन रामायणाचे अभ्यासक यशोदीप देवधर यांनी केले.

'रामायण : सत्य की कल्पना' या विषयावर देवधर यांचे कुसुमाग्रज स्मारकमधील विशाखा सभागृहात व्याख्यान झाले. इंग्रजीतील सादरीकरण आणि रामायणकालीन घटना-प्रसंगाची उकल करण्यासाठी 'स्लाईड शो'चा घेतलेला आधार यामुळे सभागृहात रामायणाचा चाहता व अभ्यासू वर्ग उपस्थित होता.

देवधर म्हणाले, की रामायण वास्तव आहे की कल्पना याचे उत्तर वाल्मीकी रामायण स्पष्टपणे देते. सुरुवातीच्या श्लोकांची उकल करत गेल्यास असे निदर्शनास येते, की अयोध्येसारख्या नगरीचे वर्णण हे केवळ कल्पनेतील नाही तर नागरी जीवनाचे ते वृत्तांकन आहे. अयोध्येच्या रचनेबाबतची वर्णने या मतास पुष्टी देतात. या नगरीला साहित्य-कला-संस्कृतीचाही साज आहे, तो ही काल्पनिक म्हणता येणार नाही. श्रीरामांच्या वनवास काळातील वर्णन हे साहित्यदृष्ट्या रसग्रहणाचे आहे. त्याचा अपभ्रंश न करता त्याकडे बघितले तर रामायणातील वानरे हे अन्य प्राणी नसून ती अतिशय शक्तीशाली व बुद्धिमान मनुष्य जाती होती. स्वत: वाल्मीकी ऋषी या घटनांचे साक्षीदार नसले तरीही या कालखंडातील अनेक साक्षीदारांसोबतच्या थेट संवादातूनच हे महाकाव्य आकाराला आले', असे देवधर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ये शाम मस्तानी, मदहोश किये जा...!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

ये शाम मस्तानी, मदहोश किये जा..., ये जो मोहब्बत है, ये उनका है काम..., ये रेश्मी जुलफे, ये शरबती आंखे..., हमे और जिनेकी चाहत ना होती अगर तुम ना होते... अशा एकापेक्षा एक मधुर गीतांद्वारे बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत राजेश खन्ना यांच्या स्मृती जागविण्यात आल्या.

नाशिकरोड वसंत व्याख्यानमालेचा समारोप शुक्रवारी राजेश खन्नांच्या चित्रपटातील गीतांनी झाला. अविट गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले होते. गायक नितीन कुमार, अल्का अंबोरे, राज ढगे यांनी ही गीते सादर केली. उस्मान पटणी यांनी निवेदन केले. नाशिकरोड बँकेचे संचालक दत्ता गायकवाड, ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, अशोक चोरडिया, श्रीराम गायकवाड, मनोहर कोरडे, अरुण जाधव, रमेश धोंगडे, वसंत अरिंगळे, सुधाकर जाधव आदींची प्रमुख उपस्थित होती. नंदन बूब अध्यक्षस्थानी होते.

गेल्या ३५ वर्षांपासून महापालिका शाळा क्रमांक १२४ च्या मैदानावर नाशिकरोड देवळाली सहकारी बँकेतर्फे वसंत व्याख्यानमाला सुरू आहे. त्यास यंदा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेचे सहकार्य लाभले. राहुल साउंड ट्रॅक्सने राजेश खन्ना हिट्स गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. 'तुने वो रंगिले कैसा जादू किया.... हम तुमसे प्यार कितना..., गुलाबी आंखे जो तेरी देखी...., मे तेरे प्यार पागल मे... आदी गाण्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. ही गाणी स्क्रीनवर पाहण्याची सोय होती. बॅंकेच्या वतीने गायक कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामको रुग्णालयात मोफत उपचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक केंद्र सरकारच्या आयुषमान भारत (पंतप्रधान जनआरोग्य) योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी नामको ट्रस्ट संचलित पेठरोडवरील रुग्णालयात मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नंदुरबार येथील एका कर्करुग्णावरील उपचाराने या योजनेला सुरुवात झाली. नंदुरबार येथील जयेश पाडवी हा व्यक्ती मुखाच्या कर्करोगाने पीडित असून, त्याच्यावर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. मुकेश चंद्रे उपचार करीत आहेत. मात्र, या योजनेला केवळ दीड लाखापर्यंत खर्चाची मर्यादा असल्याने, पाडवी यांची आर्थिक दुर्बल परिस्थिती आणि तातडीच्या उपचारांची गरज लक्षात घेता नामको ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सेक्रेटरी शशिकांत पारख यांच्या मार्गदर्शनाखाली आयुषमान योजनेसाठी कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यासाठी आरोग्यमित्रांचीही मदत झाली. आयुषमान योजनेंतर्गत उपचारावर पाच लाखांपर्यंत कॅशलेस उपचार शक्य होतात, तसेच १,३५० आजारांवर उपचार करता येतात. नामको रुग्णालयात आजवर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत हजारो रुग्णांना फायदा झाला असल्याची माहिती पारख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज चोरीचा गोलमाल उघड

$
0
0

महावितरणला १० लाख रुपयांचा चुना; दोघांविरोधात गुन्हा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वीज मीटरमध्ये फेरफार करून अवैधरित्या विजेची चोरी करणाऱ्या दोघा ग्राहकांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील एकाने प्लास्टिक कारखान्यात तर दुसऱ्याने घरगुती वापरात वीज चोरी केल्याचे समोर आले आहे.

युसूफ उस्मान शेख (रा. कोकणी तबेला, वडाळागाव) आणि शेख अल्लाउद्दीन अब्दुल मजीद (रा. झियाउद्दीन डेपो, देवळालीगाव) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी वीज कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांकडे दाखल गुन्ह्यातील माहितीनुसार, वडाळागावातील तबेला नजिकच्या प्लास्टिक कारखान्यात वीज चोरी होत असल्याची माहिती वीज कंपनीस मिळाली. त्यानुसार २ मे रोजी अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी संशयित युसूफ शेख यांनी आपल्या कारखान्यात अधिकृत कनेक्शन न घेता मिनी प्लेअर बॉक्समधून थेट वीज जोडणी केली. वीज कंपनीचे सहा महिन्यांमध्ये ५५ हजार ४३६ युनिट वापरण्यात आले. त्याचा आकार सात लाख २९ हजार २४५ रुपये इतका होतो.

दुसरा छापा देवळाली गावात टाकण्यात आला. शेख अल्लाउद्दीन अब्दुल मजीद यांच्या घरात विजेची चोरी होत असल्याच्या माहितीवरून कंपनी अधिकाऱ्यांनी शनिवारी (दि. ४) छापा टाकला. यात शेख कुटुंबियांनी वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज मीटर ६४.०१ टक्के मंद गतीने फिरेल व वीज वापराची योग्य नोंद वीज मीटरमध्ये होणार नाही, अशी व्यवस्था केली. सुमारे २४ महिन्यांच्या कालावधीत या कुटुंबाने ४३ हजार ५०३ युनिटची वीज चोरी केली. यामुळे कंपनीचे तीन लाख २९ हजार ९८५ रुपयांचे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images