Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

डॉ. कोल्हेंच्या रॅलीने वेधले लक्ष

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

छोट्या पडद्यावर छत्रपती संभाजी राजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी शुक्रवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढलेल्या प्रचार रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले.

राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी निघालेल्या या रॅलीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोटारसायकल घेऊन मोठ्या संख्येने सामील झाले होते. उघड्या जीपवर निघालेल्या रॅलीत कोल्हे यांना पाहण्यासाठी रस्त्यांच्या कडेला गर्दी झाली होती. या रॅलीची सुरुवात सकाळी लेखानगर येथील छत्रपती महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून झाली. त्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ही रॅली गेली. शिवाजी चौक, महाराणा प्रातप चौक, विजयनगर, उत्तमनगर, पवननगर, सावतानगर, दिव्या अॅडलॅब, त्रिमूर्ती चौक, सिटी सेंटर चौक, सिबल हॉटेल, श्रद्धा मॉल, कॅनडा कॉर्नर, राजीव गांधी भवन, सीबीएस, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा या मार्गाने ही रॅली गेली. त्यानंतर जुना आडगाव नाका येथे या रॅलीचा समारोप झाला.

या रॅलीत उमेदवार समीर भुजबळ, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक गजानन शेलार, डॉ. हेमलता पाटील, गुरुमित बग्गा, लक्ष्मण जायभावे, शेफाली भुजबळ, सुरेखा निमसे यांच्यासह महाआघआडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

--

मोदी, शहांवर टीका

या रॅलीदरम्यान डॉ. कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. या जोडगोळीने देशाची वाट लावली आहे. देशाबरोबरच महाराष्ट्रातही जातीपातीचे राजकारण करून जातिधर्मांत तेढ निर्माण करण्याचे काम या सरकारने केले आहे. गेल्या पाच वर्षांत कोणतेही काम या सरकारने न केल्यामुळे आता शहीद जवानांच्या नावावर हे सरकार मते मागत आहे, असे ते म्हणाले. समीर भुजबळ यांनी तयार केलेल्या शपथपत्राचेही त्यांनी कौतुक केले.

--

कार्यकर्त्यांपेक्षा चाहतेच जास्त

सिडको : लेखानगर येथे छोट्या पडद्यावरील राजे संभाजींच्या भूमिकेत असलेले डॉ. अमोल कोल्हे येणार हे सर्वांनाच माहिती झाले होते. त्यामुळे सकाळपासूनच या ठिकाणी आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमा होताना दिसत असले, तरी कार्यकर्त्यांपेक्षा डॉ. कोल्हे यांना पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्याचे दिसून आले. रॅलीदरम्यान नागरिकांकडून ठिकठिकाणी डॉ. कोल्हे यांचे स्वागत करण्यात येत होते, तर महिलांकडून त्यांचे औक्षणही करण्यात येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घंटागाडीमार्गांचे आता ‘जीओ फेन्सिंग’

$
0
0

तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी आयुक्तांचे निर्देश

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घंटागाड्यांबाबतच्या तक्रारी कमी होत नसल्याची गंभीर दखल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतली आहे. आता घंटागाड्यांविषयक नागरिक व नगरसेवकांच्या तक्रारींचे कायमस्वरुपी निराकरण होण्यासाठी प्रत्येक घंटागाडीच्या दैनंदिन केरकचरा संकलन मार्गाची भौगोलिक परिसीमा (जिओ फेन्सिंग) निश्चित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या ऑनलाइन ट्रॅकवर या घंटागाड्या राहणार असून, त्यांचे मार्ग नागरिकांना कळणार आहेत.

महापालिकेच्या घंटागाड्यांचा ठेका सर्वात वादग्रस्त ठरला आहे. महापालिका पाच वर्षांसाठी या घंटागाड्यांवर तब्बल १७६ कोटींचा खर्च करणार आहे. असे असूनही केरकचरा संकलनाबाबत तक्रारी जैसे थे आहेत. घंटागाडी वेळेवर न येणे, मार्गावरील संपूर्ण केरकरचा न उचलणे, काही भागात घंटागाडी पोहचत नसल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे नागरिकांसोबतच नगरसेवकांच्याही याच तक्रारी असून प्रभाग सभा, स्थायी समिती आणि महासभेतही याच तक्रारींचा पाढा वाचला जातो. त्यामुळे आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाची बैठक घेतली. यावेळी ठेकेदारांनाही आमंत्रित करण्यात आले होते. त्यावर ठेकेदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आयुक्तांनी तक्रारी कमी होण्यासाठी घंटागाडी संकलन मार्गाची भौगोलिक परिसीमा निश्चित करण्याचे आदेश दिले.

घंटागाड्यांकरिता दैनंदिन केरकरचा संकलनाचा मार्ग पुन्हा परिभाषित करून जीपीएस कार्यप्रणालीत त्याचा अंतर्भाव करण्यात यावा, तसेच घंटागाडीविषयी वारंवार येणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. या निर्णयामुळे घंटागाड्यांच्या कचरा संकलनाचे सुयोग्य नियोजन होईल. सध्या घंटागाडीचे असलेले असमान वाटप यामुळे कमी होणार आहे. त्यामुळे नागरिक तसेच, नगरसेवकांच्या तक्रारी कमी होतील, असा दावा पालिकेने केला आहे.

...

वर्गीकरणावरूनही खडे बोल

महापालिकेने ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्यानुसार नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असताना काही घंटागाड्यांमध्ये मात्र वर्गीकरणाची व्यवस्था नसल्याचे आढळून आले आहे. त्या संदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांनी ठेकादारांना खडे बोल सुनावले. घंटागाड्यांची तपासणी करून प्रात्यक्षित देण्याच्या सूचना मक्तेदारांना देण्यात आल्या. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचरा संकलनाची जबाबदारी ही घंटागाड्यांचीच असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

...

मक्तेदारांचे अर्धे देयक थांबवली

नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेण्याची सूचना पालिकेकडून ठेकेदारांना केली जाते. परंतु, ठेकेदारांकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने पालिकेने ठेकेदारांची मार्चची देयके थांबवली होती. परंतु, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इंधनखर्च अत्यावश्यक बाब असल्याचे सांगत ठेकेदारांनी वेतन अदा करण्याची विनंती केली. ठेकेदारांच्या मागणीचा विचार करीत आयुक्तांनी केवळ अर्धेच देयक देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, संगणकीय कार्यप्रणालीत आवश्यक बदल करण्याच्या निर्देशांचे पालन केले नाही तर थेट प्रशासकीय कारवाईचा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज तोफा थंडावणार!

$
0
0

प्रचाराची सायंकाळी सांगता; आता भर छुप्या प्रचारावर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यात नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील निवडणूक प्रचाराची सांगता आज, शनिवारी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेला जाहीर प्रचाराचा धुराळा शांत होणार आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महायुती, महाआघाडी, वंचित आघाडीसह अपक्षांनी जोरदार प्रचारसभा घेवून निवडणुकीचे तापवलेले वातावरण आज थंड होणार आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून छुपा प्रचार मात्र मतदानाच्या दिवसा(ता. २७)पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण १८ उमेदवार असले तरी मुख्य लढत शिवसेनेचे हेमंत गोडसे, राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, वंचित आघाडीचे पवन पवार आणि अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यात चौरंगी लढत होत आहे. दिंडोरीत आठ उमेदवार असले तरी राष्ट्रवादीचे धनराज महाले, भाजपच्या डॉ. भारती पवार आणि माकपचे जे. पी. गावित यांच्यात तिंरगी लढत होणार आहे. दोन एप्रिलपासून नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती, तर १२ एप्रिल रोजी माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले होते. नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत मुख्य लढत रंगेल, असे चित्र असतानाच अपक्ष कोकाटे आणि वंचित आघाडीचे पवार यांनी निवडणुकीत रंगत आणली आहे. गतवेळच्या पराभवामुळे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, तर शिवसेनेनेही भुजबळांचा पराभव करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, छगन भुजबळ, अॅड. प्रकाश आंबेडकर या दिग्गज नेत्यांसह राज्यातील मंत्री आणि राजकीय नेत्यांच्या सभांनी गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्याचे वातावरण चांगलेच तापवले आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात नाशिक आणि दिंडोरीतील निवडणूक ही रंगतदार झाली आहे. या नेत्यांच्या प्रचारसभा, रॅलीमुळे निवडणुकीचा माहोल उशिरा का होईना तयार झाला. शनिवारी प्रचाराची औपचारिक सांगता होणार असून, प्रचारतोफाही थंडावणार आहेत.

शक्तिप्रदर्शनाची चौरंगी चढाओढ!

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार असल्याने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा संपल्यानंतर शहरात रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे, तर राष्ट्रवादीकडूनही रॅलीची जय्यत तयारी केली जात आहे. अपक्ष उमेदवार अॅड. कोकाटेंकडूनही शहरात रॅली काढली जाणार असून, या शक्तिप्रदर्शनासाठी तब्बल १०० ट्रॅक्टर नाशिकमध्ये आणण्यात आले आहेत. कोकाटेंकडून काही सिनेकलावंतांना प्रचाराच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे, तर वंचित आघाडीच्या पवन पवार यांच्याकडूनही रॅली काढून ताकद दाखवून दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुना आग्रा रोडवर अवजड वाहनांना बंदी

$
0
0

उड्डाणपूल बांधकामामुळे निर्णय

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात जुना आग्रा रोडवर नवीन बसस्थानकासमोर म्युन्सिपल हायस्कूल ते सुपर मार्केटपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच आहे. अखेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न व वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून १७ मे पर्यंत या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जुना आग्रारोडवरील दूध बाजार ते खोकानाका, कुसुंबा रोडवर गोंड वाडा ते नवीन बस स्टॅण्ड या मार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकाटेंची दुसऱ्यांदा प्रचारपत्रके

$
0
0

नाशिकरोड : नाशिक लोकसभा मतदारसंघातुन अपक्ष उमेदवार माणिक कोकाटे यांच्या प्रचारार्थ नाशिकरोडमधील विविध उपनगरात शुक्रवारी (दि.२६) दुसऱ्यांदा घरोघरी प्रचारपत्रके वाटप करण्यात आली. या प्रचार पत्रकांसोबत कोकाटे यांनी मतदारांसाठी तयार केलेला जाहीरनामाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी देतानाच मतदान करण्याचे आवाहन केले. यापूर्वीही कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांनी शहरी भागातील जवळजवळ सर्वच उपनगरांत घरोघरी प्रचार पत्रकांचे वाटप केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हास्य क्लब समितीची शहिदांना आर्थिक मदत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड काश्मीरमधील पुलवामा हल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी हास्ययोग क्लब समन्वय समितीतर्फे ५३ हजार २११ रुपयांची मदत देण्यात आली. निवासी जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. नाशिकमध्ये शंभराहून अधिक हास्ययोग क्लब आहेत. त्यामध्ये सुमारे तीन हजारांवर नागरिक दररोज हास्ययोगांचे प्रात्यक्षिके करतात. ते स्वत:चे आणि समाजाचे आरोग्य सुदृढ ठेवतात. त्याचबरोबर सामाजिक कामे करतात. पुलवामा येथे झालेला हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी हास्ययोग क्लब समन्वय समितीने मदतीचे आवाहन केले होते. क्लबच्या सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने मदत केल्याने ५३ हजार २११ रुपयांचा निधी गोळा झाला. समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष आदित्य वाघमारे, उपाध्यक्ष राजेंद्र भंडारी, अश्‍विनी धोपावकर, महासचिव आर. टी. बाफणा, खजिनदार सुभाष कुलकर्णी, रत्नाकर लुंगे, सुमन वाघ, अरुण वाघमारे, किसन सातपुते, नवनाथ दाणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरसाठी ‘शिंदे’चा प्रस्ताव

$
0
0

नाशिकरोड : पिण्याच्या पाण्यासाठी गावातील नागरिकांनी मोर्चा काढल्यावर शिंदे ग्रामपंचायत प्रशासनाला खडबडून जाग आली असून, टँकरसाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती सरपंच माधुरी तुंगार यांनी दिली.

ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून गावातील पांडुरंग बोराडे या शेतकऱ्याच्या विहिरीतून पाणी ग्रामपंचायतीच्या विहिरीत घेत या पाण्याचा पुरवठा गावात करण्यात आला. शिंदे गावातील नागरिकांना सध्या आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गावाला टँकरदवारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा या मागणीचा प्रस्तावही शिंदे ग्रामपंचायत प्रशासनाकडून तहसीलदार आणि गटविकास अधिकारी कार्यालयास सादर करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक भान, गावाची भागवताहेत तहान

$
0
0

त्र्यंबक तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा

...

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शहरात पाण्याचा बेसुमार अपव्यय होतो आणि ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पाण्यासाठी जीवही धोक्यात घालावा लागतो. आदिवासी पाड्यांवरचे पाण्याचे चित्र खूपच भीषण आहे. समाजाप्रति आपले काही तरी देणे लागते, या भावनेने एका कामगाराने स्व:खर्च करीत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका गावाची तहान भागविण्यासाठी टँकर सुरू केला आहे. आणखी काही गावात टँकर सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

इंदिरानगर येथील अतुल कुलकर्णी हे त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यावरील गंगाद्वार या गावात फिरण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर येथील जनतेला पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत असल्याचे त्यांना दिसले. कोणी पाहुणे आले, तर एका ग्लासापेक्षा जास्त पाणीसुद्धा देत येत नसल्याचे सत्य त्यांच्यासमोर आले. या गावातील ही भीषण स्थिती पाहून पाणी देण्याचे आश्वासन कुलकर्णी यांनी दिले. सुरुवातीला गंगाद्वार येथील एका गावात त्यांनी टँकर पाठवून पाणी दिले. मात्र याठिकाणी असलेल्या रस्त्याचा विचार करता या टँकरला वरती नेण्यासाठी अजून एका गाडीची गरज असल्याने त्या गाडीचीही व्यवस्था त्यांनी करून दिली. आता त्र्यंबकेश्वर जवळील सपुलीची मेट या गावाला एक टँकर देण्याचे निश्चित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक शहरात नागरिकांकडून एकीकडे पाण्याचा अपव्यय होत असताना या शहरापासून काही अंतरावर असलेल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते हे चित्र दुर्दैवी आहे. हे चित्र बदलण्याचे काम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या कामातून कोणतीही प्रसिद्धी किंवा नाव मोठे करण्याचा उद्देश नसून, असेच कार्य अनेकांनी केले तर निश्चितच सर्वत्र असलेली पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

...

नाशिक शहरालगत असलेल्या अनेक ठिकाणी महिना दीड महिना पाणीपुरवठा होत नसल्याने तेथे टँकर देण्याचे कार्य हाती घेतले आहे. हे काम वाढविण्याचीही इच्छा असून, पाणीबचतीचा संदेश याद्वारे देण्याचे काम सुरू केले आहे.

- अतुल कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोकाटेंचे दोनशे ट्रॅक्टर दाखल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत ताकद पणाला लावली आहे. भगूर, पखालरोड, चौक मंडईत गुरुवारी जाहीर सभा घेऊन त्यांनी शक्तिप्रदर्शन केले, तर शुक्रवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यात सभा घेतल्यानंतर शहरात ट्रॅक्टर रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. आज, शनिवारी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शहरात दोनशे ट्रॅक्टरची रॅली त्यांच्याकडून काढली जाणार आहे. शेतकरी त्यांच्या प्रचारासाठी स्वत:हून ट्रॅक्टर आणत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कोकाटेंनी ग्रामीण भागामध्ये प्रचाराची राळ उठवल्यानंतर शहरातील तीनही मतदारसंघांत ट्रॅक्टररॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. प्रचारासाठी त्यांनी मैदानात शंभर ट्रॅक्टर उतरवले असून, हे ट्रॅक्टर सध्या नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरले आहेत. आपल्याला मतदारसंघातील दहा मराठा संघटनांनी पाठिंबा दिल्याचा दावा कोकाटे यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्तक बापाने काय केले?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मतदारांना गृहित धरून आश्वासनांची खैरात वाटली जाते. नाशिकला दत्तक घेण्याची अशीच घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. अशाच आश्वासनांच्या आधारे भाजपने सत्ता हस्तगत केली. दत्तक घेणार, पण बाप पळून जाणार, अशी टीका करतानाच दत्तक बापाने काय केले, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली विकासकामे भाजपने स्मार्ट सिटीसाठी चोरल्याचा आरोपही त्यांनी ठाकरी शैलीत केला. ही निवडणूक लोकशाही राहणार की हुकूमशाही येणार याचा फैसला करणारी असल्याचे मतदारांनी पक्के लक्षात घ्यावे, असे आवाहनही राज यांनी केले. मुंबई आणि पनवेलच्या सभेनंतर ठाकरे यांची तोफ शुक्रवारी नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर धडाडली. ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. नाशिकच्या मनसेच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात ५१० किलोमीटरचे अंतर्गत रस्ते बांधले, वाहतूक बेटे, चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क, गोदा पार्क, बोटॅनिकल गार्डन, बाळासाहेब ठाकरे स्मारक, घनकचरा प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, मलजल प्रक्रिया केंद्र, मुकणे धरणातून थेट पाइपलाइन योजना अशा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कामांची जंत्रीच ठाकरे यांनी सादर केली. भाषणादरम्यान त्यांनी राफेल, जीएसटी, नोटाबंदी, बेरोजगारी, गोहत्या अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे भाजपा सरकारवर कठोर टीका केली.

नाशिककरांच्या निर्णयाचं वाईट वाटलं


नाशिककरांनी जो निर्णय द्यायचा तो दिला. त्याचं वाईट वाटलं. पण, जी कामं केली ती छातीठोकपणे सांगितली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखं, नाशिक दत्तक घेतो असली खोटी आश्वासनं दिली नाहीत. मला सांगा दत्तक घेतलेल्या या बापानं काय केलं? स्मार्ट सिटीच्या नावाखाली मनसेने केलेली कामे भाजपने आम्ही केली असे दाखवले. या बातम्या नाशिकच्या वर्तमानपत्रांत आल्या होत्या. कोणत्या गोष्टींवर या सरकारला मार्क द्यायचे, असा जाब ठाकरे यांनी विचारला.

भुजबळांवरील कारवाई दिखाऊपणा

राज्यात २९ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुसरीकडे सरकार एक लाख ३० हजार विहिरी खोदल्याचे सांगते. जलसिंचनासाठी एवढा पैसा खर्च झाला, तर दुष्काळ का जाहीर करावा लागला? मग हा जलसिंचनाचा पैसा गेला कोठे? असे प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केले. आघाडी सरकारच्या काळात घोटाळा झाला होता तर मागील तीन वर्षांत भाजप सरकारने अजित पवार आणि सुनील तटकरेंविरुद्ध काय कारवाई केली? राजकारणासाठी सिंचन घोटाळा फुगविला गेल्याचा आरोपही त्यांनी केला. छगन भुजबळांना जेलमध्ये टाकले, पण पुढे काय? ही सर्व कारवाई दिखाऊ असल्याची टीका त्यांनी केली.

कांदा उत्पादकांची फसवणूक

नाशिकमध्ये कांदा उत्पादन शेतकऱ्यांची मोठी फसवणूक भाजपाने केली. मोदी व फडणवीस यांनी काँग्रेस सरकारची धोरणे बदलण्याचे आश्वासन दिले. त्यातून मिळालेल्या सत्तेचा उपभोग घेतला. शेतकऱ्यांचे कांदे एक-दोन रुपये किलो दराने विकले गेले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. याचे सरकारला कोणतेही घेणेदेणे नाही आणि नव्हते, असा हल्लाबोल राज यांनी केला.


राज ठाकरे उवाच…...

-खोटं बोलायला काही मर्यादा असतात. पण, भाजपाला मर्यादा नाही

-राज्याचे जलसंपदामंत्री शहराचे पालकमंत्री आहेत, कुठे गेले जलसिंचन?

-राज्यात भाजप-शिवसेनेच्या काळात १४ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

-नोटाबंदीत रांगेत माणसे मेली

-नोटाबंदी-जीएसटीत पाच कोटी रोजगार गेले

-मोदींनी मलाही फसविले

-शेतकऱ्यांबाबत भाजप नेत्यांनी मुक्तफळे उधळली

-मोदींची वाटचाल हिटलरच्या दिशेने

-देश वाचवायचा असेल, तर मोदी-शहांना घालवा

-मोदी-शहा यांच्या सत्तेचा माज उतरवा

-जवानांच्या भावनांचे राजकारण केले जातेय

-सत्ताकाळात पाच वर्षांत मनसे काय करू शकते, हे सर्वांनी पाहिले

-शहिदांचा अवमान करणारी साध्वी प्रज्ञा ठाकूर हिला उमेदवारी देऊन भाजपकडून मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तस्वर संस्थेतर्फे जेलरोडला संगीत रजनी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सप्तस्वर संस्थेतर्फे जेलरोडच्या वीर सावरकरनगरमध्ये संगीत रजनी कार्यक्रम झाला. गायक संदीप मुळाणे, सुरेश काफरे, गजानन महाजन, वैष्णवी उदावंत, दीपिका सुरुसे यांनी देशभक्तिपर गाणी सादर केली. भावगीते आणि भक्तिगीतांना विशेष प्रतिसाद मिळाला. हनुमान भक्त मंडळ, ओम गुरुदेव भक्त परिवार, वीर सावरकरनगर मित्र मंडळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. संतोश शिंदे, अमोल देशमुख, सैफुद्दीन सय्यद, विक्रम साळी, मनोज देसले, रवींद्र हिंगमिरे, बाजीराव सूर्यवंशी, अरुण माळोदे, वसंत हिंगमिरे, सुनील सोनार, राजेंद्र पेनमहाले आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त कर्मचाऱ्यांची बुधवारी परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. १) निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या परिषदेचे तसेच, भव्य मेळाव्याचे हुतात्मा स्मारक येथे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेअंतर्गत जानेवारी २००६ ते फेब्रुवारी २००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने अनुज्ञेय सुधारीत निवृत्ती वेतनाचा शासनाने तत्काळ पूर्णलाभ द्यावा, केंद्र सरकारप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू झालेला असतानाही फरकाची थकबाकी तीन हफ्त्यात देण्याचे मान्य करूनही ते पाच हफ्त्यात दिले जाईल, असे शासनाने जाहीर केले. परंतु, शासनाने हा फरक पुन्हा तीन हफ्त्यात देण्याचे सुधारीत आदेश निर्गमित करावे, निवृत्ती वेतनधारकांना केंद्राप्रमाणे वैद्यकीय भत्ता मिळावा आदी विषयांसह इतर विषयांवर राम गायटे, बापूसाहेब भामरे, बापूसाहेब कुलकर्णी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मंथन केले जाणार आहे. निवृत्तीधारकांना भेडसावणारे विविध प्रश्न, समस्या दूर व्हाव्यात यासाठी सकाळी ११ वाजता निवृत्त शासकीय आणि परिषद सेवकांनी या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माधव भणगे, उत्तम गांगुर्डे, महेश आव्हाड, रवी थेटे, मधुकर कांगणे, पी. एन. पगारे, पी. एस. धुमाळ, पद्माकर देशपांडे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंत व्याख्यानमालेचे१ मेपासून आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक प्रौढ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने डिसुझा कॉलनीतील सभागृह येथे १ ते ८ मे या कालावधीत सायंकाळी ६ वाजता वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार १ मे रोजी ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे यांचे 'भारतीय राज्यघटनेच्या कळा' या विषयावर व्याख्यान होणार आहे. श्याम पाडेकर यांचे २ मे रोजी त्रिदल (पुल, गदिमा व सुधीर फडके) या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. सुरेश पाठक यांचे ३ मे रोजी जगी सर्व सुखी असा कोण आहे, ४ मे रोजी सुवर्णा महाबळ यांचे मी सीता बोलतेय, ५ मे रोजी स्वामी श्री कण्ठानंद यांचे गीत व वेदांत, डॉ. जोगेश्वर नांदूरकर यांचे अडॉल्फ हिटलर व दुसरे महायुद्ध, ६ मे रोजी प्रा. सुनील हिंगणे यांचे हास्य आणि आरोग्य या विषयावर, तर बुधवार ८ मे रोजी प्रकाश पाठक यांचे नाती जपूया या विषयावर व्याख्यान होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान जागृतीसाठी कुटुंबाची प्रचार यात्रा

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भरघोस मतदान करावे यासाठी शहरातील सायकलिस्ट विजय घुमरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सायकल रॅलीद्वारे नाशिक-घोटी-सिन्नर या भागात फिरून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

सरकारी पातळीवर सर्वच ठिकाणी मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे. या मोहिमेत आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने घुमरे कुटुंबीयांनी ही मतदार जागृती मोहीम राबविला होती. शनिवारी सकाळी सात वाजता घुमरे कुटुंबीयांनी गोल्फ क्लब येथून या प्रचार यात्रेला सुरुवात केली. या प्रचार यात्रेत विजय घुमरे, त्यांच्या पत्नी अर्चना घुमरे, मुलगा प्रथम घुमरे व मुलगी विधी घुमरे सहभागी झाले होते. रॅलीच्या मार्गवरील गर्दीच्या ठिकाणी जाऊन या चौघांनी मतदारांना मतदानाचे आवाहन केले. नाशिक, घोटी, सिन्नर येथील सामाजिक संस्थांना भेटी देऊन तेथेही मतदानाचा प्रचार केला. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. गावाच्या विहिरीवर मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी आहे अशा ठिकाणी या कुटुंबाने प्रचार केला. त्याचप्रमाणे मुख्य बाजारपेठेत जाऊन लोकांना मतदानाचे आवाहन केले. भर दुपारी या कुटुंबीयांनी ही मोहीम राबविल्याने नागरिकांनी देखील त्याच्या मोहीमेला प्रतिसाद दिला.

आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून ही मोहीम राबविण्यात आली. कुणी सांगितले म्हणून नव्हे तर आमच्या कुटुंबानेच पुढाकार घेऊन ही मोहीम आखली होती. यात माझे कुटुंबीय सहभागी झाले. आपण देशासाठी काही तरी करतो आहे यामुळे समाधान वाटले. लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.--विजय घुमरे, सायकलीस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगाव, मालेगावात ‘प्रॉपर्टी एक्स्पो’

$
0
0

…म. टा. प्रतिनधी, नाशिक

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीने पहिल्यांदाच नाशिक शहराबाहेर मालेगाव आणि पिंपळगाव येथे २ व ३ मे रोजी 'क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०१९' प्रदर्शन आयोजित केले आहे.

हे प्रदर्शन मालेगाव मध्ये मालू कॉम्प्लेक्स, कॅम्प रोड, येथे व पिंपळगाव येथील शगुन हॉल, मुंबई-आग्रा हायवे येथे २ व ३ मे रोजी सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत सुरू रहाणार आहे, अशी माहिती क्रेडाईचे अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिकमधील बिल्डर्स आपापले गृहप्रकल्प, फ्लॅट्स, प्लॉट्स, शॉप्स, ऑफिस, फॉर्म हाऊस आणि प्रॉपर्टीज इ. प्रदर्शित करणार आहेत. सटाणा, देवळा, ताहराबाद, पिंपळगाव, निफाड, लासलगाव, ओझर आणि आजू-बाजूच्या गावकऱ्यांना या प्रदर्शनाचा लाभ होईल असा विश्वास क्रेडाई नाशिकचे प्रेसिडेंट उमेश वानखेडे यांनी व्यक्त केला.

लोकांनी या एक्स्पोमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा यासाठी एक 'सरप्राईझ लकी ड्रॉ' देखील ठेवण्यात आला आहे. या लकी ड्रॉमार्फत मालेगाव आणि पिंपळगाव या दोन्ही ठिकाणी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्व लोकांमधून पाच-पाच नशीबवान विजेत्यांना बम्पर बक्षिसे देण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'वोट कर नाशिककर' अभियान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखा सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्या तरी पहिल्या तीन टप्प्यांत अनेक ठिकाणी कमी मतदान झाले आहे. नाशिकमध्ये मतदानाचा टक्का वाढावा याकरिता वोटकर नाशिककर हे अभियान राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. अधिकाधिक मतदान करणाऱ्या आस्थापनांना विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी दिली.

महाराष्ट्रातील काही मतदार संघांमध्ये पहिल्या तीन टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया पार पडली. परंतु यापैकी बहुतांश मतदान संघात गतवर्षीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढण्याऐवजी तो कमी झाल्याचे पहावयास मिळते आहे. नाशिकसह दिंडोरी मतदार संघामध्ये चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. येथे मतदानाचा टक्का घसरू नये याकरिता नाशिकमधील विविध संघटना आणि जिल्हा प्रशासनाने आश्वासक पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. वोटकर नाशिककर या अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक मतदान करणाऱ्या आस्थापनांना विशेष बक्षिस देऊन गौरविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती मांढरे यांनी दिली.

वोटकर नाशिककर या टॅगलाइनच्या माध्यमातून मतदान जनजागृतीबाबत विविध संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. ज्या आस्थापनांमधील अधिकाधिक अधिकारी कर्मचारी मतदानाचा हक्क बजावतील त्या आस्थापनांना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरचे लोकार्पण करण्यात आले. मतदानासाठी प्रेरीत करणारे असे १५० फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत. बोट दाखविण्यापेक्षा बोट वापरा, तुमचं एक मत निर्णायक ठरू शकते, एक योग्य उमेदवार निवडावाच लागेल अशा आशयाचे हे फलक ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत. या अभियानात क्रेडाई, रेडिओ मिर्ची, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरिअर डिझायनर, आयएमए, नरेडको, ट्रॅव्हल्स एजंट असोसिशन यांसारख्या संघटनांनी सहकार्य दिले आहे.

-

दांपत्याला मोफत कोकण सहल

सजून धजून मतदान करण्यासाठी जाणाऱ्या दांपत्याने त्याचा फोटो ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनकडे पाठविला तर अशा फोटांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. या लकी ड्रॉ मधील एका विजेत्या दांपत्याला कोकण पर्यटनाची मोफत सहल दिली जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी यावेळी दिली.

-

फेसबुक पेजची निर्मिती

सरकारी आणि खासगी आस्थापना, कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी मतदान करण्याची शपथ घेत असल्याचे छायाचित्र काढून ते अपलोड करण्यासाठी फेसबुकचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत शपथ घेऊन ते फोटो फेसबुक पेजवर अपलोड करावेत. त्यानंतर मतदानाचे दिवशी पुन्हा त्या सर्वांनी मतदान केल्यानंतर ज्या हाताच्या बोटाला शाई लावली आहे तो हात पुढे करून सर्वांचा एकत्रित फोटो काढून तो वोट कर नाशिककर या फेसबुक पेजवर अपलोड करावा असे आवाहन मांढरे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बर्डेची वाडीची पाहणी

$
0
0

तहसीलदारांनी दिली भेट

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबेकश्वर तालुक्यातील बर्डेची वाडी येथे पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्याची बाब 'महाराष्ट्र टाइम्स'ने शुक्रवारी निदर्शनास आणून दिली. जीव धोक्यात घालून विहिरीमध्ये उतरणाऱ्या महिलांच्या या विदारक स्थितीची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

बर्डेची वाडी येथील ग्रामस्थांकडून अद्याप टँकरच्या मागणीचा प्रस्ताव आला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तरीही त्र्यंबकेश्वर येथील तहसीलदारांनी प्रत्यक्ष गावात जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले. तहसीलदारांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदनामी करणाऱ्या पत्रकांचे वाटप

$
0
0

नाशिक : आपल्याबाबत बदनामी करणाऱ्या पत्रकांचे वाटप केले जात असल्याची तक्रार राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी जिल्हा निवडणूक विभागाच्या आचारसंहिता कक्षाकडे केली आहे. प्रतिस्पर्ध्यांकडून आचारसंहितेचे उल्लंघन होत असून, संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.

पत्रकबाजीच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर चिखलफेक करण्याचे उद्योग शहरात सुरू झाले आहेत. निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणारे आणि शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना पाठिंबा देणारे छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी करण गायकर हे बदनामी करणाऱ्या पत्रकांचे वाटप करीत असल्याचा दावा आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षाकडे केला आहे. भुजबळ यांच्या तक्रारीची आचारसंहिता विभागाने दखल घेतली असून, शहानिशा करण्यासाठी ही तक्रार पोलिस आयुक्त कार्यालयाकडे पाठविली आहे. या पत्रकांच्या प्रति वाटण्यासंदर्भात मीडिया सेलकडे परवानगी घेतली होती का, याचीही शहानिशा करण्याचे निर्देश आचारसंहिता विभागाने दिली आहे. दरम्यान, आपण अशी कोणतीही पत्रके वाटली नसल्याचा दावा गायकर यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याअभावी पक्षी पडला बेशुद्ध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तीव्र उन्हाळ्यामुळे माणसं भाजून निघत आहेत. माणसांना तरी पिण्यासाठी गार पाणी, एसी, पंखा, सावली असे पर्याय उन्हापासून संरक्षणासाठी उपलब्ध आहेत. मात्र मुकी जनावरे आणि पक्षी या जीवघेण्या उष्णतेने खूप विव्हळत आहेत. निफाड येथे पाण्याअभावी तडफडणाऱ्या पक्ष्याला वेळीच उपचार करून जीवदान मिळाले आहे.

निफाड येथे कीर्तनकार साहेबराव महाराज इरोळे यांना मार्टिन हा पक्षी बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यांनी त्याला त्वरित पक्षीमित्र डॉ. उत्तम डेर्ले यांच्याकडे आणले. डॉ. डेर्ले यांनी त्याला तपासले तेव्हा त्याला कुठेही जखम मार लागल्याचे दिसले नाही. मात्र त्याच्या शरिरात पाण्याची कमतरता असल्याने तो बेशुद्ध झाला, असा अंदाज करून त्याला पाणी पाजले. थोडा वेळ सावलीत ठेवल्याने त्याची हालचाल वाढली अणि काही दाणे टिपल्यानंतर त्याने पुन्हा नव्या उमेदीने आकाशाकडे झेप घेतली.

.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ताप’दायक आठवडा

$
0
0

- उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

- नाशिकचे तापमान ४१.७ अंश सेल्सिअसवर

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे कमाल तापमान ४१.७ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील तापमानाचा पारा वाढतच आहे. हवामान विभागाने २८ एप्रिलपर्यंत नाशिकसह जळगाव व अहमदनगरमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज शुक्रवारी वर्तविला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासाठी हा आठवडा तापदायक ठरत आहे.

मंगळवारपासून शहरातील तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. दोन दिवस ४० अंशांवर स्थिर असलेला तापमानाचा पारा शुक्रवारी ४१.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. किमान तापमानही २३.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. किमान तापमानासोबतच कमाल तापमानातही वाढ होत असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. उष्णतेच्या तीव्र झळा बसत असल्याने दुपारी घराबाहेर पडण्यास नागरिक टाळताना दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरातील तापमान उच्चांक गाठणार असून, मे महिन्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

राज्यभरात कमाल तापमानात वाढ झाली आहे. नाशिक, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यात २८ एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट असणार असून, त्यानंतरही तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे विकेंडला राज्यभरात उष्णता अधिक असणार आहे.

एप्रिलच्या सुरुवातीस नाशिकचे तापमान ४०.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. मे महिन्याप्रमाणे उष्णतेच्या झळा एप्रिलअखेरीसच जाणवू लागल्याने मे महिन्यात उष्णेतेने नागरिक अधिक हैराण होणार आहेत. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्याही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी जास्त पाणी प्यावे तसेच, अशक्तपणा वाटल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

...

मालेगाव @ ४३.२

मालेगाव : शहर परिसरात मागील आठवड्यात तापमान खाली आले होते. आता मात्र तापमान पुन्हा वाढू लागले असून, शुक्रवारी कमाल ४३.२, तर किमान २६.८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. तापमानाने त्रेचाळीस अंशचा आकडा पार केल्याने शहरात उकाडा वाढू लागला आहे. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे कमाल तापमान थेट ७ अंशांनी खाली आले होते. आता पारा पुन्हा वर चढू लागला आहे. वाढत्या तापमानाने जनजीवन प्रभावित झाले आहे. सकाळी १० पासूनच ऊन चटका देत असल्याने दुपारनंतर रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उन्हामुळे होणारी जीवाच्या काहिली थांबण्यासाठी नागरिक शीतपेयांसाठी गर्दी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images