Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दोघा वकिलांसह तिघांना कारावास

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विनयभंगाच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कोर्टाने दोघा वकिलांसह एकास कोर्टाने कारावासाची शिक्षा ठोठावली. झुंजार म्हसूजी आव्हाड (वय ९१) आणि गोविंद वसंतराव जाधव (५५) अशी एका प्रकरणात शिक्षा झालेल्या दोघा वकिलांची नावे आहेत.

कोर्टाच्या आवारात दोघा वकिलांनी ३ नोव्हेंबर २०१२ रोजी अश्लिल भाषा वापरून फिर्यादी महिलेस मारहाण केली होती. या विनयभंगाच्या घटनेप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अनुजा राजगुरू यांनी केला. प्रथमवर्ग न्यायाधीश जी. के. आर. टंडन यांच्या कोर्टासमोर सरकारी पक्षातर्फे अॅड. चंद्रलेखा पगारे यांनी काम पाहिले. कोर्टासमोर आलेल्या साक्षीपुराव्यानुसार कोर्टाने दोघा वकीलांना एक वर्षे सश्रम कारवास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

दरम्यान, अन्य एका प्रकरणात कोर्टाने इंदिरानगर परिसरातील मनोज नारायण नायर (४३) या आरोपीस विनयभंगाच्या गुन्ह्यात दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. आजारावर उपचार करण्यासाठी एका हॉस्पिटलमध्ये नायर दाखल झालेला असताना हा प्रकार घडला होता. उपचार करणाऱ्या महिलेची आरोपीशी नायर याची ओळख झाली होती. त्यातून आरोपीने महिलेचा मोबाइल क्रमांक मिळविला. तसेच त्याआधारे वेळोवेळी महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एच. आर. घुगे यांनी तपास केला. प्रथमवर्ग न्यायाधिश जे. जी. पांडे यांच्या कोर्टासमोर सरकारी पक्षातर्फे अॅड. सुधीर सपकाळे यांनी बाजू मांडली. त्यानुसार कोर्टाने आरोपीला दोन वर्षे सश्रम कारवास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मांस विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

$
0
0

- पशुवैद्यकीय विभागाचा दणका

- परवान्यासाठी साडेतीनशे प्रस्ताव दाखल

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक वधारण्यासाठी आता उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांबाबत महापालिकेने कडक धोरण स्वीकारले आहे. परवाने नसलेल्या आणि परवाने घेऊनही दुकानाबाहेर मांसची विक्री करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पशुवैद्यकीय विभागाने घेतला आहे. दरम्यान, महापालिकेने शहरात उघड्यावर मांस विक्रीबाबत तयार केलेल्या धोरणाला शहरातून केवळ साडेतीनशे विक्रेत्यांनीच प्रतिसाद दिला असून, परवान्यासाठी अर्ज केले आहेत. नाशिकरोड, नाशिक पश्चिम आणि पंचवटीतून सर्वात कमी अर्ज आले आहेत.

शहरात उघड्यावर मांस विक्री होत असल्याने अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. या मांस विक्रीच्या दुकानामुळे अस्वच्छतेसोबतच भटक्या कुत्र्यांचीही संख्या वाढत चालली आहे. शहरात उघड्यावर मांस विक्री करण्यासंदर्भात धोरण नाही. महापालिकेने तब्बल दहा वर्षांपूर्वीच मांस विक्रीसाठी एक नियमावली तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवल्याचे सांगितले. मात्र त्यास मान्यता मिळत नसल्यामुळे त्यावर कारवाई करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नवीन धोरण तयार केले आहे. त्याला स्थायी समितीनेही मंजुरी दिली आहे. उघड्यावर मांस विक्री बंद करण्यात आली असून, बंदिस्त ठिकाणी मांस विक्रीसाठी पालिकेने परवाना बंधनकारक केला आहे. परवानाधारक मांस विक्रेत्यांकडून शहराचे आरोग्य राखण्याच्या दृष्टीने उपाययोजना होऊन पालिकेलाही महसूल मिळणार आहे. नियमावली लागू झाल्यानंतर साधारण ३५० प्रस्ताव परवानान्याकरिता महापालिकेच्या विभागीय कार्यालयांकडे आले आहेत. त्यातील विभागीय अधिकाऱ्यांनी छाननी सुरू केली आहे. काहींमध्ये त्रुटी असल्याने परत पाठवले आहेत. काही प्रस्तावही मंजूर करून परवाने दिले आहेत.

..

अस्वच्छता केल्यास पाचशे रुपये दंड

परवाना मिळाल्यानंतर जर संबंधित विक्रेता दुकानाबाहेर मांस लटकवून व्यवसाय करीत असेल, तर त्यावर अस्वच्छता केल्याप्रकरणी पाचशे रुपये दंडाची कारवाई केली जाणार आहे. तसेच त्यात बदल केला नाही, तर परवाना निलंबित करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, ज्यांनी आतापर्यंत परवाने घेतले नाहीत त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघांना अटक

$
0
0

पंचवटी : हिरावाडीतील गुंजाळबाबा नगर येथील गटारीच्या चेंबरमध्ये सराईत गुन्हेगार विक्की उर्फ टेम्बऱ्या भुजबळचा याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. त्याचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांच्या तपासात खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणी गुरुवारी (दि.२५) पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित रोहन दिलीप भुजबळ (वय ३०, रा. कालिकानगर, फुलेनगर) आणि अनिल मुन्ना भोंड (वय ३१, रा. महाराणा प्रताप चौक, फुलेनगर) या दोघा संशयितांना अटक केली आहे. मंगळवारी (दि.१६) एप्रिलला अनोळखी युवकाचा मृतदेह पंचवटी पोलिसांना आढळून आला होता. यावेळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राज’वादळ धडकणार

$
0
0

नाशिक:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात रान उठविणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज, शुक्रवारी (दि. २६) नाशिकमध्ये होत आहे. राज ठाकरे या सभेत कोणता व्हिडीओ दाखविणार याचीच चर्चा शहरवासीयांत रंगली आहे.

गोल्फ क्लबवर सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या सभेत राज कोणता नवा बॉम्ब टाकणार याची धास्ती आता भाजपसह शिवसेनेला वाटू लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकच्या सभेत राज ठाकरेंकडून भाजपच्या कामांचा पंचनामाच केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीचे तयार झालेले वातावरण बिघडू नये यासाठीची धावपळ आता महायुतीने सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या राजगर्जनेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराला आता अवघे दोन दिवस उरले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या सभांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रमुख नेत्यांच्या नाशिकमधील सभा संपल्या असून, आता केवळ राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फड‌णवीस या दोन बड्या नेत्यांच्या सभा शिल्लक राहिल्या आहेत. विशेष म्हणजे शेवटच्या टप्प्यात या सभा होत असल्याने त्या परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे शिवसेनेला बळ मिळाले असले, तरी राज ठाकरेंच्या सभेमुळे ते जाऊ नये, अशी धास्ती आता शिवसेना आणि भाजपला सतावत आहे.

राज यांची सभा नाशिकसाठी गेमचेंजर ठरण्याची चिन्हे आहेत. सुरुवातीला केवळ मोदी आणि शहा यांच्यावर हल्ले करणारे ठाकरे आता शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांवरही हल्लाबोल करीत आहेत. त्यामुळे नाशिकच्या सभेत फडणवीसही टार्गेट राहण्याची शक्यता आहे. फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीत नाशिक दत्तक घेतले आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांत दत्तक नाशिकची अवस्था बिकट झाली असून, नाशिकचे प्रकल्प गुजरात आणि नागपूरमध्ये पळविण्यात आले आहेत. औरंगाबादला दोनशे कोटींचा निधी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकसाठी अजून दमडीही दिलेली नाही. त्यातच मनसेच्या प्रकल्पांचा समावेश स्मार्ट सिटीत करण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरेंकडून भाजपच्या विकासकामांचा भंडाफोड केला जाण्याची शक्यता असल्याने या सभेची धास्ती आता भाजपसह शिवसेनेलाही वाटू लागली आहे. राज ठाकरेंच्या गुरुवारच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून, या सभेसाठी नवीन व्हिडीओही बनविल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ठाकरे आता नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेचा कसा पंचनामा करणार याकडे लक्ष लागून आहे.

उद्धव ठाकरेही लक्ष्य?

राज यांनी आतापर्यंत केवळ मोदी, शहा आणि फडणवीस यांनाच लक्ष केले होते. परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन सभांमध्ये राज ठाकरेंचे प्रत्यक्ष नाव न करता त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नाशिकच्या सभेत तर थेट नागरिकांना कळेल अशा भाषेत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना डिवचल्याने त्याची परतफेड राज ठाकरेंकडून नाशिकधून केली जाण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचा उमेदवार असल्याने राज ठाकरेंकडून शिवसेनेलाही लक्ष्य केले जाण्याची शक्यता असल्याने त्याचा थेट फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लाव रे तो व्हिडीओ’चा राज्यभर ट्रेंड

$
0
0

राष्ट्रवादी, भाजपपाठोपाठ आता शिवसेनेतही बोलबाला; पारंपारिक प्रचाराचे बदलले तंत्र

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'लाव रे व्हिडीओ' या नव्या प्रचारतंत्रामुळे राज्यातील पारंपरिक प्रचाराची दिशाच बदलवली असून, जाहीर सभांमधून थेट व्हिडीओद्वारे विरोधकाला कोंडीत पकडण्याच्या त्यांच्या शैलीची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंचे हे सादरीकरण राज्यभर प्रभावी ठरत असल्याने त्याचा मोह आता इतरानांही आवरेनासा झाला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजपने हा ट्रेंड स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंसोबत विळ्याभोपळ्याचे नाते असलेले उद्धव ठाकरे यांनीही आता त्यांची कॉपी सुरू केली आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडीओ' हा ट्रेंड राज्यभर प्रभावी ठरल्याने सध्या त्याचीच चर्चा सुरू आहे.

सार्वत्रिक निवडणुकांमध्ये चौकसभा, प्रचार रॅली, जाहीर सभा, तसेच वाहनांमधून गावागाव प्रचार करण्याचा पारंपरिक ट्रेंड असतो. आतापर्यंत हा ट्रेंड सुरू असला तरी कालानुरूप त्यात बदल झाले आहेत. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तर भाजपने या पारंपरिक मतदान प्रचारासोबतच सोशल मीडियाचा निवडणुकीत प्रभावी वापर केला. पारंपरिक प्रचारासोबतच त्याला सोशल मीडियाचा टच दिल्यानेच देशात भाजपची एकहाती सत्ता आली; परंतु कालांतराने सोशल मीडिया भाजपवरच उलटला. त्यामुळे भाजपची कोंडी झाली. यंदाच्या निवडणुकीत याच सोशल मीडियाचा वापर विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे आधीच कोंडी झाली असताना, राज ठाकरेंच्या व्हिडीओद्वारे नव्या प्रचारतंत्रामुळे भाजप पुरते नामोहरम झाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेली आश्वासने, केलेल्या जाहिराती, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बदलत्या भूमिकांची चिरफाड ठाकरे आपल्या जाहीर सभेत व्हिडीओद्वारे करीत आहेत. भाजपने केलेल्या जाहिराती कशा फसव्या आहेत, याचा पंचनामा ते थेट व्हिडीओद्वारे जाहीर सभेत करीत आहेत, तसेच शहा, मोदींचे जुने-नवे व्हिडीओ दाखवत प्रचारात रंगत आणत आहेत. त्यामुळे राज्यभर मनसेचे उमेदवार नसले तरी राज ठाकरेंच्या सभांनी थेट भाजप- शिवसेनेच्या विरोधात वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे ठाकरेंच्या या सभा राज्यभर चर्चेचा विषय बनल्या असून, सर्व जण आता त्यांच्या या 'लाव रे व्हिडीओ'ची कॉपी करताना दिसत आहेत. ठाकरेंचे हे प्रभावी प्रचारंतत्र पाहून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आधीपासूनच अशा प्रकारे प्रचार सुरू केला आहे. पायाखालची वाळू सरकत असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपनेही या तंत्राचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांच्यासह भाजपचे नेतेही या 'लाव रे व्हिडीओ' तंत्राद्वारे राज ठाकरेंची पोलखोल करीत आहेत. त्यामुळे 'लाव रे व्हिडीओ' या प्रचारतंत्राचा या निवडणुकीत बोलबाला सुरू झाला असून, निवडणूक प्रचारांना या तंत्राने नवा आयाम दिला आहे.

भावाकडूनही कॉपी

शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमधील विळ्याभोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे; परंतु ठाकरेंच्या या प्रचारतंत्राची भुरळ उद्धव ठाकरेंनाही पडली असून, त्यांनीही नाशिकच्या सभेत या प्रचारतंत्राचा अवलंब केला आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या कॉपीची आता शिवसैनिकांसोबतच मनसैनिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरेंच्या या प्रचारतंत्राचा चांगलाच प्रभाव पडत असल्यानेच उद्धव ठाकरेंनीही त्याचाच अवलंब करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज ठाकरेंसाठी ही पावतीच असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॅलीतून हिवतापाविषयी आरोग्य विभागाकडून जनजागृती

$
0
0

रॅलीतून हिवतापाविषयी जनजागृती

आरोग्य विभागाकडून उपक्रमाचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'डंख छोटा, धोका मोठा', 'लवकर निदान त्वरीत उपचार, डेंग्यु-हिवताप होईल पसार', 'अॅनाफिलीस डास-हिवताप, एडिस डास-डेंग्यु ताप', अशा विविध घोषणांद्वारे हिवतापाविषयी जनजागृती करण्यात आली. निमित्त होते, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, जिल्हा हिवताप कार्यालय, जिल्हा रुग्णालय व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हिवताप जनजागरण सप्ताहाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रॅलीचे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती.

रॅलीचे उद्घाटन उपसंचालक नाशिक परिमंडळ नाशिक डॉ. रत्ना रावखंडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. त्र्यंबके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सेंधाणे आदी मान्यवर उपस्थित होते. रॅलीची सुरुवात जिल्हा रुग्णालयापासून करण्यात आली. त्यापुढे जिल्हा परिषद, गंजमाळ सिग्नल, शालिमार, सीबीएस मार्गे पुन्हा जिल्हा रुग्णालयात येऊन रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये आरोग्य सेवक व सेविका यांनी सहभाग घेतला होता.

रॅलीमध्ये कर्मचाऱ्यांनी हातात विविध म्हणी, घोषणाफलक घेत जनजागृती केली. लाऊड स्पीकरवरून हिवतापाविषयी माहिती सांगितली जात होती. हिवताप सप्ताहानिमित्त आठवडाभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सुरुवात या रॅलीतून करण्यात आली. याप्रसंगी निरोगी गाव राहण्यासाठी हिवतापाच्या जनजागरणतेची शपथ घेण्यात आली. 'हिवतापा झिरो करू, माझ्यापासून सुरुवात करु' या वर्षाच्या हिवताप दिनाच्या घोषवाक्य प्रमाणे सर्व नागरिकांनी हिवतापाविषयी स्वतःपासून सर्व स्तरावर सुरुवात केल्यास आपण मलेरिया दूर ठेवू शकतो, मानवी जीवन सुखकर करू शकतो असे आवाहन उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्वाणीच्या सभांचा फड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सांगतेस एक दिवस येऊन ठेपल्यामुळे आज, शुक्रवारचा (दि. २६) दिवस निर्वाणीच्या सभांचा राहणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात आज राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, गिरीश महाजन, पाशा पटेल यांच्या सभा होणार आहेत, तर डॉ. अमोल कोल्हे यांची रॅली शहरात पार पडणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येवल्याचे, तर धनंजय मुंडे सिन्नर, चांदवड, सायखेड्याची मैदाने गाजवणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि असादुद्दिन ओवेसी यांची वडाळा गाव येथे सकाळी १० वाजता सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची जाहीर सभा सरदवाडीरोड, अजिंक्यतारा हॉटेलजवळ, सिन्नर येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, म्हाडा नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवजीराव ढवळे, भाजप नेते पाशा पटेल यांची जाहीर सभा बीएसएनल ऑफिससमोर, सिन्नर येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

--

फडणवीस-मुंडेंचा सामना

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रचारात रंगत वाढली असून, आरोप-प्रत्यारोपांनंतर आता शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्या सभांनी त्यात भर पडणार आहे. मुख्यमंत्री यांची येवला येथे दुपारी १२.५५ येथे सभा होत आहे. विरोधी पक्षनेते मुंडे यांची चांदवड येथे दुपारी १ वाजता, तर अडीच वाजता सायखेडा येथे सभा होणार आहे. या दोन्ही सभांत हे राज्यातील नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव येथे सभा घेतल्यानंतर आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेतली आहे. राष्ट्रवादीने राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सभा घेतल्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या दोन सभा ठेवल्या आहेत. या दोन्ही सभांमुळे येथील वातावरण ढवळून निघणार आहे. दिंडोरीत भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार व राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार धनराज महाले यांनी अगोदरच प्रचारात आघाडी घेऊन संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यात आता या दोन नेत्यांच्या सभांमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश वाढणार आहे.

--

भुजबळांच्या मतदारसंघात प्रथमच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येवला विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदात सभा होत आहे. त्यामुळे तेथे ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अगोदर त्यांनी भुजबळांवर टीका केल्यानंतर शरद पवार यांनी त्यांना अनुभवाचे डोस दिले आहेत. आता त्यावर मुख्यमंत्री काय बोलतात याबद्दल उत्सुकता आहे. दुसरीकडे धनजंय मुंडेसुद्धा भाजपच्या ताब्यात असलेल्या चांदवड विधानसभा मतदारसंघात तोफ डागणार आहेत. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या निफाड मतदारसंघातही ते बोलणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघांत ते नेमके काय बोलतात आणि सत्ताधारी पक्षांवर काय टीका करतात याकडे सर्वांच लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड माकप सभा

$
0
0

'पाणीप्रश्न सोडविण्यात गावितच सक्षम'

मनमाड : मनमाड शहराला सध्या २५ ते ३० दिवसाआड पाणी मिळत असून, संपूर्ण नांदगाव तालुका भीषण पाणीटंचाईने होरपळून निघत आहे. भाजप- शिवसेनेच्या खासदाराने १५ वर्षे आणि काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आमदाराने १० वर्षे नार-पारच्या पाण्याचे केवळ आश्वासनच दिलेले आहे. मात्र, नार-पारचे पाणी मनमाडसह संपूर्ण नांदगाव तालुक्यालाही मिळावे यासाठी माकपचे उमेदवार जे. पी. गावित यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अशोक परदेशी यांनी केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ५० हजार शेतकरी बांधवांचा मुंबईपर्यंत लाँग मार्च काढणारे जे. पी. गावित एकमेव असल्याचेही ते म्हणाले. गावित यांच्या प्रचारासाठी धर्मराज शिंदे आणि परदेशी चौकाचौकांत मतदारांना आवाहन करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिमोफिलियावर मोफत उपचार

$
0
0

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी सुविधा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जखम झाली की वाहणार रक्त हळूहळू गोठते आणि पुढील हानी टळते. शरीराने स्वत:च्या बचावासाठी तयार केलेली ही यंत्रणा कधीतरी निकामी ठरली तर... रक्तातील काही महत्त्वाच्या घटकांनी काम केले नाही किंवा त्या घटकांचा अभाव असेल तर त्या आजारास हेमोफिलिया म्हणतात. आजारावर खर्च करण्यासाठी लाखो रुपये प्रत्येकवेळी खर्च होतात. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या आजारावर मोफत उपचार उपलब्ध झाले आहेत.

सिव्हिलमध्ये आतापर्यंत ६३० रुग्णांची नोंदणी झाली असून, त्यात लहान मुलांची संख्या जास्त असते. हिमोफिलिया या अनुवांशिक आजारावर उपचार उपलब्ध असले तरी ते सामान्यांना परवडणारे नाहीत. हिमोफिलिया हा एक आनुवंशिक आजार असून पालकांच्या जनुकाद्वारे हा आजार बालकांमध्ये येतो. पुरुषामध्ये या आजाराची लक्षणे दिसून येतात तर स्त्री या आजाराची वाहक असते. हिमोफिलिया आजारामध्ये रक्त गोठणायची प्रक्रिया सदोष असल्याने या आजारात जखम झाल्यावर, अगदीच ब्रश करताना हिरड्यांमधून रक्तस्त्राव सुरू झाला की बंद होत नाही. हिमोफिलिया आजाराचे सामान्यता दोन प्रकार असतात.

काय आहे हिमोफिलिया?

हिमोफिलिया हा अनुवांशिक आजार आहे. या आजारात रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेले फॅक्टर ००० हा घटक नसतो. सामान्य व्यक्तींना जखम झाली तर रक्त वाहते काही मिनिटात वाहणारे रक्त थांबते. पण हिमोफिलिया ग्रस्त असलेल्या व्यक्तीचे रक्त वाहत राहते. उष्णता वाढल्यास रुग्णांच्या कान, नाक, डोळ्यातून रक्त वाहू लागते. कधी कधी शरीराच्या आतल्या आत देखील रक्तस्राव होतो पोटात तर कधी मेंदूत रक्तस्राव होऊन मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

हिमोफिलियावरील उपचार

रक्ताला गोठवण्यासाठी आवश्यक फॅक्टर इंजेक्शनद्वारे शिरेत देऊन तो घटक भरून काढणे हा हिमोफिलियाच्या उपचाराचा पर्याय आहे. खासगी ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णास लाखो रुपये खर्च येतो. सिव्हिलमध्ये मात्र हा उपचार व चाचण्या मोफत होतात.

गरोदरपणात दहा ते बारा आठवड्यात अँटी नेटल तपासणी केल्यास होणाऱ्या अपत्यास हिमोफिलिया हा आजार आहे किंवा नाही, हे जाणून घेण्यासाठी तपासणी करणे गरजेची असते.

- डॉ चंद्रशेखर आवारे, बालरोगतज्ज्ञ व हिमॅटॉलॉजिस्ट, सिव्हिल हॉस्पिटल

हिमोफिलिया, सिकलसेल आणि थॅलेसिमीया या रक्तांच्या आजारावर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये सुविधा आहे. खर्चिक ठरणाऱ्या आजारांवर मोफत उपचार होतात. उपचारासाठी विभागातील पाच जिल्ह्यांबरोबर ठाणे आणि अगदी गुजरात राज्यातून रूग्ण येतात. हिमोफिलिया रूग्णांना फिजिओथेरीपीची सुद्धा सुविधा पुरविली जाते.

- डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ईओडब्लू’ची टीम संशयितांच्या मागावर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कार्ड क्लोन करून हातोहात खात्यातील रोकड लंपास करणाऱ्या टोळीतील आरोपींचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे (ईओडब्लू) पथक परराज्यात पोहचले आहे. या गुन्ह्यातील अटक आरोपीने कळवण येथे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला कळवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या टोळीने राज्यभरात गुन्हे केले आहेत.

जावेद वजीद खान (वय २४, रा. बांकीपूर, पाटणा, बिहार) असे अटक असलेल्या संशयिताचे नाव आहे. डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्ड क्लोन करण्यासाठी हायटेक उपकरणांचा वापर करणाऱ्या जावेद खानचा साथिदार मोहम्मद जावेद उर्फ एहसान खान (रा. दशरथपूर, जि. गया, बिहार) हा फरार आहे.

जावेद खानला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बिहारमधून अटक केली होती. बिहार राज्यसेवा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या जावेदने ५ मार्च रोजी पिंपळगाव बसवंत येथून संतोष पाचोरकर यांच्या खात्यातील पैसे काढले होते. अशाच तक्रारी जिल्ह्याच्या काही भागातून समोर येत होत्या. पोलिसांनी जवळपास एक महिना तपास करीत जावेदच्या मुसक्या आवळल्या. मात्र, त्याचा साथिदार फरार झाला होता.

याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांनी सांगितले, की फरार संशयितांच्या तपासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. या गुन्ह्यांमध्ये बरेच आरोपीची शक्यता आहे. या टोळीने कळवण येथे दोन गुन्हे केल्याची कबुली संशयिताने दिली. संशयित आरोपीची २४ एप्रिल रोजी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला कळवण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. संशयित आरोपीने राज्यभरात गुन्हे केले असून, कळवणनंतर त्याचा ताबा जळगाव, हिंगोली, लातूर आदी जिल्ह्यातील पोलिस घेणार आहे. संशयित आरोपींनी तंत्रज्ञानाचा वापर करीत देशभरातील अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक केली आहे.

फरार आरोपीस पकडण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यास यश मिळेल, असे आवाहन पोलिस निरीक्षक अनमुलवार यांनी केले आहे. अशा फसवणुकीचे प्रकार झाल्यास अथवा यापूर्वी झाले असल्यास नागरिकांनी नजीकचे पोलिस ठाणे, बँक शाखा अथवा नाशिक ग्रामिण सायबर पोलिस ठाणेच्या ०२५३- २२००४०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पीआय अनमुलवार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बंधन

$
0
0

महापालिका राबविणार सर्वेक्षण मोहीम

...

- भूजलपातळी वाढविण्यासाठी पालिकेचा निर्णय

- एक हजार रुपये दंड करणार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भूजल पातळी वाढविण्यासाठी महापालिका क्षेत्रात इमारत उभारताना पर्जन्य जलसंधारण अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले असतानाही नाशिक शहरात त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शहरातील बहुतांश इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग नसल्याचे तसेच, ज्या इमारतींमध्ये आहे तिथे ते सुस्थितीत नसल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाच्या वतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग तपासणीसाठी व्यापक सर्वेक्षण मोहीम हाती घेतली जाणार आहे. ज्या इमारतींमध्ये सदरची व्यवस्था सुस्थितीत नसेल, त्या इमारतीतील रहिवाशांना प्रति चौरस मीटरला एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती नगररचना विभागाने दिली.

नाशिक शहरासाठी मंजूर झालेल्या शहर विकास नियंत्रण नियमावलीत ५०० चौरस मीटर क्षेत्रावरील इमारतींमध्ये रेन हार्वेस्टिंग बंधनकारक करण्यात आले आहे. शहरात बोअर खोदण्याचे प्रमाण वाढले असून, पावसाळी व भुयारी गटार योजनांमुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे भूजल पातळी खालावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेने आता रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय गंभीरतेने घेतला आहे. पाचशे चौरस मीटर क्षेत्रावरील बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केल्याचे पुरावे सादर करावे लागतात. त्यानंतरच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला सदरील इमारतीस दिला जातो. परंतु, सदरची व्यवस्था ही फोटो सेशनसाठीच असल्याचे पालिकेच्या लक्षात आले आहे. तसेच, काही इमारतींमध्ये सदरची व्यवस्था सुरू झाली. परंतु, कालातंराने बंद पडली. अशा इमारतींबाबत महापालिकेकडे तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे पालिकेने हा प्रकार गंभीरतेने घेत नगररचना विभागाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आता नवीन इमारतींना बांधकामाचा दाखला देताना जागेवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय केल्याचे पाहूनच दाखला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर जुन्या इमारतींमधील व्यवस्थादेखील तपासणार आहे. त्यासाठी व्यापक सर्वेक्षण मोहीम राबवली जाणार आहे.

...

दंडात्मक कारवाई करणार

ज्या इमारतींमध्ये रेन हार्वेस्टिंगची व्यवस्था नसेल, त्या इमारतीला प्रतिचौरस मीटर याप्रमाणे एक हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. विशेष म्हणजे नगररचना विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे असताना उशिराचे शहाणपण दाखवले आहे. आता नव्याने आदेश काढून नगररचना विभागाचे वराती मागून घोडे दामटण्याचा प्रकार मानला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएस चौक बंद

$
0
0

स्मार्ट रोडच्या कामामुळे वाहतूक मार्गात बदल

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकनाका ते अशोक स्तंभ या स्मार्ट रोडचे काम सुरू असून, सीबीएस चौकातील काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शालिमारकडून शरणपूररोडकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

स्मार्टरोडच्या अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या रस्त्याचे एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या बाजूचे काम सुरू आहे. मात्र, मेहेर सिग्नल, सीबीएस सिग्नल आणि त्र्यंबक नाका सिग्नल या प्रमुख चौकातील काम पूर्ण करणे हेच प्रशासनासमोर आवाहन आहे. सध्या तरी प्रशासनाने सीबीएस चौकातील काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतूक मार्गातील बदलाबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. हा बदल २५ एप्रिलपासून काम पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. स्मार्ट रोडच्या कामामुळे सिडको, सातपूर भागातून असंख्य वाहनचालक आणि रिक्षाचालक ठक्कर बाजारमार्गे जुने सीबीएसकडे येऊन शहरात अन्यत्र जात होते. आता हा वर्दळीचा चौक बंद पडल्यामुळे रिक्षाचालकांसह, एसटी बसेस आणि इतर वाहनचालकांची सुद्धा पंचाईत होणार आहे.

...

असे आहेत बदल

- शालिमारकडून सीबीएसमार्गे टिळकवाडी शरणपूररोडकडे जाणाऱ्या वाहनांनी शालिमार, गंजमाळ सिग्नल, जिल्हा परिषद मोडक सिग्नल मार्गे प्रवास करावा किंवा शालिमारहून मेहर चौक अशोकस्तंभ मार्गे मार्गस्थ व्हावे.

- टिळकवाडीकडून जुने सीबीएसकडे येणाऱ्या वाहनांनी सरळ न येता त्र्यंबकरोडवरील जलतरण तलाव सिग्नल, मोडक सिग्नल (त्र्यंबकनाका) मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा अथवा टिळकवाडी सिग्नलमार्गे गंगापूररोडवर मॅरेथॉन चौकमार्गे ये जा करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरमधील मंदिरात चोरीचा प्रयत्न

$
0
0

सिन्नर : शहरातील भगवतीमाता मंदिरात बुधवारी (दि. २४) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास दोघा अज्ञात चोरट्यांनी मंदिराची दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हाती काही न लागल्याने चोरट्यांनी काढता पाय घेतला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे दिसून आले.

आडव्या फाट्याजवळ हेमाडपंथी ऐश्वर्य मंदिरजवळ भगवतीमाता मंदिर आहे. चोरट्यांनी पाठीमागील बाजूस असलेल्या नदीच्या मार्गाने मंदिरात प्रवेश केला. लोखंडी पहारीच्या सहाय्याने दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दानपेटी खोल व लोखंडी जाळी असल्याने चोरट्यांचा हात ऐवजापर्यंत पोहोचला नाही.

मंदिराच्या पुजारी शोभा तनपुरे व वसंत तनपुरे या मंदिराच्या परिसरात राहतात. शोभा तनपुरे यांनी सकाळी उठल्यावर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, घराला बाहेरील कडी लावली असल्याने त्यांनी भाविकांना आवाज दिला. काही भाविकांनी दरवाजाची कडी उघडली. तनपुरे मंदिरात आल्या असता दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. ही बाब त्यांनी स्थानिक नागरिकांना तात्काळ सांगितली. यानंतर सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वास्तव स्वीकारल्यावर ध्येय मिळते

$
0
0

ग्लोबल युथ अॅम्बेसॅडर दीक्षा दिंडे यांचे प्रतिपादन

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपल्या आयुष्यात जे वास्तव आहे, ते स्वीकारले म्हणजे ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी बळ मिळते. एकदा वास्तवाशी आपला सामना झाला आणि त्याला टाळून पुढे जाता येणार नाही याविषयी आपली खात्री पटली की ते स्वीकारण्यासाठी सोपे जाते, असे प्रतिपादन ग्लोबल युथ अॅम्बेसॅडर दीक्षा दिंडे (पुणे) यांनी केले. जागर मनाचा या संस्थेतर्फे आयोजित 'करिअरच्या अलिकडे आणि पलिकडे' कार्यक्रमात त्यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

'गर्ल ऑन द विंग चेअर'चा अर्थ उलगडून सांगा या प्रश्नाचे उत्तर देताना दीक्षा पुढे म्हणाल्या, की पुण्याच्या बाहेर कधीही न गेलेली मुलगी मलेशियाला जाते आणि तेथे विविध अॅवॉर्ड घेऊन येते याला काय म्हणाल. वयाच्या दीड वर्षानंतर कळले की आपल्याला अपंगत्व आले आहे, त्यानंतर नातेवाईकांचा, ही मुलगी आहे, हिला हॉस्टेलला टाकून द्या, पालन पोषण कसे करणार, वगैरे सल्ल्यांचा मारा झाला. परंतु, माझ्या आईवडिलांनी कुणाचेही न ऐकल्याने मी आज या जागी आहे. ही ऊर्जा येण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. मी आयुष्य संपवले तर आईचा त्रास कमी होईल असा विचार अनेकवेळा माझ्या मनात आला परंतु, मी त्यावेळी विचारांच्या जोरावर जिंकत गेले. मी वास्तव स्वीकारले. माणसाच्या आयुष्यात आव्हाने असावीत, त्यामुळे संघर्ष करण्याला बळ मिळते.

यशाचे रहस्य सांगताना दीक्षा म्हणाल्या, की आवड व निवड एकत्र झाली की यश मिळते. त्यासाठी 'स्व'ची ओळख होणे महत्त्वाचे आहे. यश मिळवताना समाधान मिळणेही महत्त्वाचे असते. यावेळी श्रीया गुणे यांनी दीक्षा दिंडे यांची मुलाखत घेतली. शंकरचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात हा कार्यक्रम झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजचा दिवस हवाहवाई!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्यानंतर आज, शुक्रवारचा (दि. २६) दिवस हवाहवाई ठरणार असल्याचे चित्र आहे. दिवसभरात हेलिकॉप्टर आणि विमानांची मोठी वाहतूक होणार असल्याने प्रशासनाची मोठीच धावपळ उडाली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची संगमनेरला सभा असली, तरी ते विमानाने ओझर येथे येणार आहेत. त्यानंतर ते ओझरहून संगमेनरकडे हेलिकॉप्टरने रवाना होणार आहेत. त्यानंतर संगमेनरहून ओझरला ते कारद्वारे येणार आहेत, तर ओझरहून विमानाने पुढील सभेसाठी रवाना होणार आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे मुंबईतील महाक्ष्मी रेस कोर्स येथून हेलिकॉप्टरने चांदवडला येणार आहेत. तेथील सभा झाल्यानंतर हेलिकॉप्टरने ते निफाड तालुक्यातील सायखेडा येथे जाणार आहेत. सायखेडा येथील सभा संपल्यानंतर ते तेथून सिन्नर येथे हेलिकॉप्टरने जाणार आहेत. तेथील सभा आटोपल्यानंतर ते नाशिकला कारने येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टरने दुपारी साडेबारा वाजता येवला येथे आगमन होणार आहे. येवला येथील सभा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने धुळे येथील गोंदूर विमानतळाकडे जाणार आहेत. या सर्व ठिकाणच्या हेलिपॅडची परवानगी देण्याचे काम आचारसंहिता कक्षाकडे गुरुवारी दिवसभर सुरू होते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी चाचणीही घेण्यात येत होती. गांधी यांच्या दौऱ्यासाठी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून, विविध बाबींवर ते बारीक लक्ष ठेवून आहे. लोकसभा निवडणूक लागल्यापासून आतापर्यंत शुक्रवारचा दिवस नाशिकमध्ये हवाई वाहतुकीसाठी अत्यंत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...तर रॉकेटसह पाठवले असते

$
0
0

धुळे:

पाकिस्तानच्या बालाकोटवर एअर स्ट्राईक करून दहशदवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले असून, त्याचे पुरावे विरोधक मागून आपल्या सैन्याच्या शौर्यावर शंका घेतात. तुम्ही पुरावे मागणार हे आधी सांगितले असते तर तुमच्यातला एक नेता रॉकेटला बांधून पुरावे गोळा करण्यासाठी पाठवून दिला असता, असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेससह विरोधकांवर केला. शिरपूर शहरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत हाते.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. २५) शिरपूर शहरातील शहादा रस्त्यावरील मोकळ्या मैदानावर विजय संकल्प सभा झाली. सभेला महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. हीना गावित, डॉ. जितेंद्र ठाकूर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, राजू टेलर, रमेश वसावे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, कॉंग्रेस सत्तेच्या ५५ वर्षांत दुराचार, भ्रष्टाचार, अनाचार हेच जनतेला मिळाले. तर मोदींच्या पाच वर्षांच्या सरकारने पारदर्शी प्रामाणिकतेतून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करून सन्मानाने त्याला उभे करण्याचे काम केले. त्यामुळे पुन्हा एकदा देशाचे मजबूत सरकार निवडण्याची ही संधी आहे. निवडणुका आल्या की कॉंग्रेसवाले तीच आश्वासने, तेच आरोप, खोटा प्रचार सुरू करतात. यांना लाज कशी वाटत नाही, कॉंग्रेसचे राहुल गांधी गरिबी हटविण्याच्या घोषणा करीत आहेत. मात्र, राहुल गांधी तुमच्या पणजोबांनीदेखील त्याच घोषणा केल्या, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनपी या वेळी केली.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरही टीका केली. गरिबांना ७२ हजार रुपये देण्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंडसुख घेतले. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली असून, शहरातील अंबिकानगर, भगतसिंग नगर यासह इतर परिसरात अतिक्रमणधारकांना बेघर न होता त्यांना हक्काची घरे मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच जागा मोजणी चा खर्च देखील उचलण्यास सरकार तयार आहे तापी नदीतून उपसा जलसिंचन योजना देखील लवकरच कार्यान्वित करून शेतकऱ्यांसह आदिवासी बांधवांच्या देखील विविध मागण्यांचा पाठपुरावा करून त्या मार्गी लावू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

गेल्या पाच वर्षांत ३५ हजार गॅस कनेक्शन लाभार्थी आहेत. तर तालुक्यातील बोराडे येथे एका दिवसात तब्बल पाच हजार गॅस कनेक्शन वाटप करण्याचा मोठा विक्रमदेखील केलेला आहे, असा दावा युतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांनी बोलताना केला. सौभाग्य योजनेतून विद्युतीकरणाचे कामदेखील करण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा मला संधी देऊन लोकसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवावे, असेही त्या म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराच्या तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव धुळे, नंदुराबारसह अवघ्या खान्देशातच उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे खान्देशवासीयांच्या अंगाची लाही लाही होत आहे. 'स्कायमेट' या हवामानाच्या संकेतस्थळावर गुरुवारी जळगावचे दुपारी ३ वाजेचे तापमान ४६ अंश इतके नोंदविण्यात आले. तर दुसरीकडे भारतीय हवामान संकेतस्थळानुसार शहराचे कमाल तापमान हे ४३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.
शहरासह जिल्ह्यातील तालुक्यातही तापमानाचा पारा चांगलाच तापल्याने या परिसरातील नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी (दि. २५ ) तापमान ४६ अंशावर असल्याने लहानग्यांसह वृद्ध हैराण झाले आहेत. जळगाव पाठोपाठ स्कायमेटच्या नोंदीनुसार धुळे येथे गुरुवारचे तापमान ४४ ते ४५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे शहरातील शीतपेयाची दुकाने, टोप्या, हातरूमाल यांच्या दुकानावर नागरिकांनी गर्दी केली आहे. एप्रिल महिन्याची अखेर असल्याने शाळांना सुट्या लागल्या असल्या तरी महाविद्यालयीन परिक्षा सुरु आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अभ्यासक्रमाची व बाहेर उनाच्या झळा सोसण्याची अश्या दुहेरी परिक्षांना समोरे जावे लागत आहेत. या उन्हाच्या तीव्रतेने शहरातील शिवतीर्थ मैदान, मणियार ग्राऊंड, सागर पार्क यासारखी मोठी मैदाने ओस पडलेली आहेत. गेल्या चार दिवसांपासून पारा कायम असून, उपनगरांमधील बहुतांश रस्तेदेखील दुपारी १२ ते ४ निर्मनुष्य दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात कार्टून वॉर

$
0
0

निवडणूक प्रचारात रंगत

म. टा. वृत्तसेवा, धुळे

लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात धुळे, नंदुरबारसाठी मतदान होणार असून, या ठिकाणी प्रचार शिगेला पोहोचला आहे. पारंपरिक पद्धतीने प्रचारासोबत आता सोशल मीडियाचाही वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, धुळ्यात प्रचारासाठी व्यंगचित्रांचा सर्रास वापर करण्यात येत आहे. या व्यंगचित्रांनी धुळ्यातच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आणली असून, आपण किती उजवे हे ठरविण्याचा प्रयत्न प्रत्येक उमदेवार करीत असताना पाहायला मिळत आहे.

गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर सर्वच उमेदवारांनी प्रचारास जोरदार सुरुवात केली आहे. या सोशल मीडियाच्या वापराने दररोज उमेदवार प्रचार करीत असल्याचे फोटो व व्हिडीओ पाहून मतदारांना ताजी बातमी तत्काळ मिळत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियासोबत निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवार व त्यांचे विरोधक यांचे दररोज व्यंगचित्रेदेखील फेसबुक व व्हॉटसअॅपवर पाहायला मिळत आहेत.

सोशल मीडियाने गेल्या काही वर्षांत निवडणुकांच्या प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसत आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातही याच सोशल मीडियाचाच बोलबाला आहे. सध्या धुळ्यात भाजप व काँग्रेस या प्रमुख उमेदवारांसह इतर उमेदवारदेखील मैदानात आहेत. शेवटच्या तीन दिवसांत प्रचार शिगेला पोहोचला असताना मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आता व्यंगचित्रांद्वारे आपले म्हणणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासा पक्षनेते सरसावले आहेत. धुळ्यातील महत्त्वाच्या पाणीप्रश्नाला या व्यंगचित्रातून वाचा फोडण्यात येत आहे. अगोदरच्या मिळालेल्या दगाफटक्यालाही या व्यंगाच्या माध्यमातून मांडून आपली मते सुरक्षित करण्याची धडपड प्रत्येक पक्षांच्या उमदेवारांनी सुरू केलेली दिसून येत आहे.

तरुणांच्या हातांना रोजगार
लोकसभा निवडणूक आली की, प्रत्येकाच्या हाताला काम मिळते. मग रिक्षावाला असो की, पत्रके वाटणारा सर्वांनाच या दिवसांत मागणी असते. आता नवीन प्रचारपद्धतीने सोशल मीडियावर पेज बनविण्यापासून तर थेट पूर्ण प्रचार यंत्रणा साभाळणारी टीम उभी राहिली आहे. त्यांनाही यामुळे रोजगाराची संधी प्राप्त होत आहे. प्रचारासाठी लागणारे कार्टून काढणे, स्लोगन करणे, गाणी करणे यासाठीही चांगलीच मागणी वाढली आहे. व्यंगचित्रकारांना देखील त्यांच्या कला सादर करण्याचे मानधन मिळत आहे. आधीच्या काळात उमेदवारांचा फोटो असलेले टी-शर्ट, पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या याच मोठ्या प्रमाणावर दिसत होत्या. मात्र, कालातंराने प्रसारमाध्यमासोबत आधुनिक विकासाकडे वाटचाल झाल्याने हे सर्व कालबाह्य होऊन आता सोशल मीडियावर लागलीच निवडणुकीची माहिती मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोट्या आश्वासनांनी जनतेची फसवणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

भाजप सरकारने विकासाची कोणतीही कामे न केल्याने देशभक्ती हा प्रचाराचा मुद्दा पुढे केला आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपने या देशातील जनतेची खोटी आश्वासने देऊन फसवणूक केली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिंदखेड्यात आयोजित जाहीर सभेत बोलताना केली.
या सरकारला सत्तेपासून दूर करून परिवर्तन घडवायची संधी मिळाली असल्याचेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा शहरातील गांधी चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, देशातील भाजप सरकारने दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम केले आहे. देशद्रोहाचा खटला असणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे हे सरकार फेकू सरकार असल्याचे ते म्हणाले. गुगलवर फेकू टाईप केले तर मोदींचे नाव येते अशीही टीका त्यांनी केली. आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सांत्वन करण्याचे कामदेखील भाजपच्या मंत्र्यांनी केले नाही. या देशातील जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यामध्ये भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा ठपका चव्हाण यांनी या वेळी ठेवला. या जिल्ह्यात भाजपचे दोन मंत्री असतानादेखील कोणतीही विकासाची कामे झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार मुजफ्फर हुसेन यांच्यासह माजी मंत्री हेमंत देशमुख, ज्ञानेश्वर भामरे, प्रा. सुरेश देसले, देवा कोळी यांनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेऊन काय केलं?

$
0
0

नाशिक: मुंबई आणि पनवेलच्या सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर धडाडली. मैदान गर्दीने तुडूंब भरले होते. या गर्दीच्या साक्षीनेच राज यांनी सर्वात आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. नाशिकला दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी थेट प्रश्न विचारला.

नाशिकच्या ५ वर्षाच्या सत्ताकाळात आम्ही ५१० किमीचे अंतर्गत रस्ते बांधले, वाहतूक बेटं, चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क, गोदा पार्क, बोटॅनिकल गार्डन, बाळासाहेब ठाकरे स्मारक, घनकचरा प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, मलजल प्रक्रिया केंद्र, मुकणे धरणातून थेट पाईपलाईन योजना, प्रकल्प राबवले. हे सर्व आम्ही ५ वर्षात करून दाखवलं. नाशिककरांनी जो द्यायचा तो निर्णय दिला. त्याचं वाईट वाटलं पण जी कामं केली ती छातीठोकपणे सांगितली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखं, नाशिक दत्तक घेतो असली खोटी आश्वासनं दिली नाही. मला सांगा दत्तक घेतलेल्या काय केलं ह्या बापाने? स्मार्ट सिटीच्या नावाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलीच कामं भाजपने आम्ही केली असं दाखवलं. ह्या बातम्या नाशिकच्या वर्तमानपत्रात आल्या होत्या. कोणत्या गोष्टींवर ह्या सरकारला मार्क द्यायचे?, असा जाब राज यांनी विचारला.

राज यांनी मुख्यमंत्र्यांनंतर आपला मोर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांकडे वळवत दोन्ही नेत्यांवर धारदार शब्दांत टीकास्त्र सोडले.

मोदींवर प्रश्नांची सरबत्ती...

- मध्यंतरी नरेंद्र मोदींनी एक नवीन कार्ड काढलं की मी खालच्या जातीतील आहे म्हणून माझ्यावर आरोप होत आहेत. आम्ही जे प्रश्न विचारत आहोत त्याचा कोणाच्या जातीशी काय संबंध?

- गोरक्षेच्या नावाखाली दलित तरुणांना उना मध्ये बेदम मारहाण झाली, त्या तरुणांनी गाय मारली नव्हती तर मृत गायीचं कातडं काढायला लोकांनी बोलावलं म्हणून ते तरुण गेले. त्या तरुणांचा काय दोष होता? गोरक्षेच्या नावाखाली ४०-५० लोकं मारली गेली, त्यावर नरेंद्र मोदी कधी बोलणार?

- आज शेती तोट्यात आहे म्हणून शेतकरी कुटुंबातील मुलं-मुली शेती सोडून नोकरीच्या शोधात फिरत आहेत. ह्या तरुण-तरुणींना मोदींनी २०१४ ला सांगितलं की, आम्ही दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ. पण पुढे झालं काय? किती नोकऱ्या दिल्या गेल्या?

- रोजगार निर्माण करणं सोडाच पण उलट मोदींनी अचानक नोटबंदी जाहीर केली. ह्या नोटबंदीच्या काळातील एक चित्रफीत माझ्याकडे आहे. बँकाच्या रांगेत उभे असलेल्याना लाठ्या मारल्या गेल्या? देशाला कळत नव्हतं का हा निर्णय का घेतला?

- नाशिकमध्ये नरेंद्र मोदींनी येऊन कांदा उत्पादकांना भाव देऊ असं सांगितलं. देवेंद्र फडणवीस २ वर्षांपूर्वी म्हणाले की, आम्ही १२०००० विहिरी बांधल्या. तरीही २८,००० गावं आज दुष्काळग्रस्त आहेत. नाशिकच्या जवळच्या तालुक्यातील गावात जीवावर बेतून पाणी भरत आहेत. काय झालं त्या विहिरींचं?

- नरेंद्र मोदी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस म्हणाले होते, की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी आश्वासनांच्या पलीकडे काय दिलं? कांदा एक रुपये किलोवर येऊन थांबतो अशा वेळेस शेतकऱ्यांनी कसं जगायचं?

<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FMaharashtraNavnirmanSenaAdhikrutPage%2Fvideos%2F1014918065360620%2F&show_text=0&width=560" width="560" height="315" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allowFullScreen="true"></iframe>

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images