Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

खर्चात तफावत; उमेदवारांना नोटिसा

$
0
0

स्पष्टीकरणासाठी प्रशासनाकडून ७२ तासांचा अवधी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार समीर भुजबळ, हेमंत गोडसे, आणि माणिकराव कोकाटे यांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चात निवडणूक विभागाला तफावत आढळून आली आहे. निवडणूक शाखेने शनिवारी (दि. १९) याबाबतच्या नोटिसा बजावल्या असून त्याचे उत्तर देण्यासाठी त्यांना ७२ तासांचा कालावधी दिला आहे.

नाशिकमध्ये २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदानापूर्वी उमेदवारांना तीन वेळा खर्चाचा तपशील सादर करणे अनिवार्य आहे. त्यानुसार, उमेदवारांनी शुक्रवारी (दि.१९) पहिल्या टप्प्यातील खर्च जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडे सादर केला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी २० लाख ७३ हजार ७२० रुपये खर्च केल्याचे अहवालात म्हटले आहे. कोकाटे यांनी १३ लाख २४ हजार ९५६ रुपये खर्च दाखविला तर शिवसेना-भाजपचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी ११ लाख ४८ हजार ९३७ रुपयांचा खर्च सादर केला आहे. या खर्चाच्या रकमांचा प्रशासनाने त्यांच्याकडील खर्चाच्या आकडेवारीशी ताळमेळ घातला असता त्यामध्ये मोठी तफावत आढळली आहे. तिनही उमेदवारांनी प्रत्यक्षात झालेल्या खर्चापेक्षा कमी रक्कम दाखविल्याचे प्रशासनाचे निरीक्षण आहे. त्यामुळे निवडणूक शाखेने शनिवारी या उमेदवारांना नोटीस बजावल्या. पुढील तीन दिवसांमध्ये उमेदवारांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे त्यामध्ये नमूद केले आहे. उमेदवार काय स्पष्टीकरण देतात त्यानुसार निवडणूक शाखा पुढील निर्णय घेईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गुन्हेगारी माहिती प्रसिद्धीबाबत स्मरणपत्र

गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांनी त्याबाबतची माहिती वर्तमान पत्रांमधून तीन वेळा प्रसिद्ध करावी असे निर्देश यंदा प्रथमच निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच ही माहिती प्रसिद्ध केल्यानंतर तसे जिल्हा प्रशासनाला कळविणेही अपेक्षित आहे. परंतु, अद्याप काही उमेदवारांनी ही माहिती प्रसिद्ध केलेली नाही तसेच काहींनी त्याबाबत कळविले नसल्याचे निरीक्षक जिल्हा प्रशासनाने नोंदविले आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार हेमंत गोडसे, समीर भुजबळ, माणिकराव कोकाटे, पवन पवार आणि सुधीर देशमुख यांना स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे. आपण जाहिराती प्रसिद्ध केल्याचे भुजबळ यांचे म्हणणे आहे. तर जाहिराती प्रसिद्धीबाबत भुजबळ यांनी अद्याप निवडणूक शाखेला कळविले नसल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंतप्रधान मोदी स्वप्रतिमेत मश्गूल

$
0
0

ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांची टीका

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २०१४ चा चेहरा आणि आताचा चेहरा यामध्ये टोकाचे अंतर आहे. सन २०१४ मध्ये देशातील एका मोठ्या वर्गासाठी त्यांची आश्वासने ही स्वप्नवत होती. त्यावेळी जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखविला. पण, गेल्या पाच वर्षांच्या काराकिर्दीत मोदी या सर्व आश्वासनांपासून दूर जाऊन स्वप्रतिमेतच मश्गूल झाले आहेत, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी केली.

नरेंद्र दाभोलकर व्याख्यानमालेचे पुष्प भटेवरा यांनी गुंफले. कुसुमाग्रज स्मारकाच्या स्वगत सभागृहात या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 'लोकसभा २०१९ : निवडणुकीचे अंतरंग' या विषयावर ते बोलत होते. भटेवरा पुढे म्हणाले, की सत्तेत आल्यानंतर मोदींच्या स्वकेंद्रित धोरणांमुळे इतरांना काम करण्यास फारसा वाव मिळू शकला नाही. त्यांनी सत्तेत आणलेली सर्वच माणसे चुकीची आहेत, असे नाही पण अशी माणसे त्यांच्या नेतृत्वात अल्पकाळ तग धरू शकली. यामागे स्वकेंद्रित प्रतिमेवर प्रेम करीत सत्ता करण्याचे त्यांचे तंत्र कारणीभूत आहे. पाच वर्षांच्या कालावधीत तब्बल ८६ देशांमध्ये पंतप्रधानांनी दौरा केला. या दौऱ्यांमधून देशासाठी फारसे काही हाशील झाले नाही. उलट शेजारील देश आणि मित्र राष्ट्रे या उफरट्या धोरणांमुळे दुखावली गेली. देशात शेतकरी, तरुण आणि कामगार या वर्गांचे प्रश्न अद्यापही 'जैसे थे'च आहेत. या घटकांच्या श्रमदानावर देश चालत असूनही सरकारला या घटकांना न्याय देता आलेला नाही. माध्यमांच्या अभिव्यक्तीची गळचेपी, राफेल भ्रष्टाचार, नोटाबंदीची घाई, अर्थहीन जीएसटी यामुळे जनतेचे अतोनात नुकसान झाले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांदाच संरक्षण मंत्रालयातून गोपनीय कागदपत्रे चोरीला जातात किंवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांनाच पत्रकार परिषद घेऊन लोकशाही धोक्यात आल्याचे जनतेला सांगावे वाटते, ही उदाहरणे पंतप्रधान देशाला कुठल्या दिशेने घेऊन जाण्यास निघाले आहेत हे सांगण्यासाठी पुरेशी आहेत, असेही भटेवरा यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर अंनिसचे व्ही. टी. जाधव आणि मानव उत्थान मंचच्या भारती जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा जनआंदोलन छेडू

$
0
0

सातपूर : कामगारांचा आवाज बुलंद करणारे कामगार नेते डॉ. कराड यांना बजावण्यात आलेली हद्दपारीची नोटीस मागे घ्यावी, अशी मागणी 'सिटू'च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विलास जाधव यांना 'सिटू'च्या वतीने निवेदन देण्यात आले. किमान वेतन व न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. कराड नेहमीच कामगारांच्या पाठीशी उभे असतात. त्यासाठी लढा उभारतात. केवळ आकसापोटी डॉ. कराडांवर तडीपारीची नोटीस देणे चुकीचे असल्याचे सिटू संघटनेचे म्हणणे आहे. तडीपारीची नोटीस मागे न घेतल्यास जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा सिटू संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संघटनेच्या सिंधू शार्दुल, मंगला पाटील, जनार्दन मुळीक, एकनाथ इंगळे, प्रभाकर पेंढारे, गोविंदा पाटील, संतोष दळवी यांच्यासह सिटूचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसाद सेवनाचा अधिकार भक्तांना

$
0
0

शिवलिंग स्वामी लातूरकर यांचे प्रतिपादन

...

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

गेल्या शंभर वर्षापेक्षा अधिक कालखंडापासून देवळालीतील भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळाने या ईश्वरनामाच्या कार्यक्रमाचे दिव्यत्व व भव्यत्व वाढवले आहे. यामुळे भावी पिढीवर संस्कार आणि महाराष्ट्राची संस्कृती जोपासली असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. शिवलिंग स्वामी लातूरकर यांनी केले.

देवळालीच्या लामरोड भागात असलेल्या भैरवनाथ मंदिर येथील नामसप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

विश्वाचा जनिता, म्हणे यशोदेसी माता

ऐसा भक्ताचा अंकित, लावी तैसी करी प्रीत

निष्काम निराळा, गोपी लावियेल्या चाळा

तुका म्हणे आले, रूपा अव्यक्त चांगले.

या चार चरणाच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगातून भगवान कृष्णरूपाने अद्वैतच जन्माला आले आणि यशोदेला माता म्हणू लागले. म्हटला तर भक्तांचा असा अंकित, की लावावे तसे प्रेम लावून घेतो. गोपींशी चाळेही करतो. पण तुकोबा पुढे म्हणतात, असा तो कृष्ण आपल्यासारखा दिसला तरी मूळ तो निराळा आहे. तो अगदी निष्काम आहे. तो अगदी स्वाभाविक तसा आहे, कारण शेवटी तो अवघ्या विश्वाचा जनिता आहे. असे भगवंतांचे नामाचे महत्त्व विशद करताना शिवलिंग स्वामी लातूरकर यांनी काल्याच्या प्रसादाचे महत्त्व वर्णन केले. ते म्हणाले, की काल्याचा प्रसाद हा देवादिकांना देखील घेता आला नाही कारण तो सेवन करण्याचा अधिकार भगवंतांनी केवळ भक्तांना दिला आहे. यावेळी भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळाच्या वतीने सकाळी वीणापूजन करून नामसप्ताहाची सांगता करण्यात आली. सांयकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन पालखी सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी विठोबा रखुमाईच्या तालावर भाविकांनी पावल्या खेळल्या. सायंकाळी काल्याच्या कीर्तनानंतर पंचक्रोशीतील भाविकांना व कावडीधारकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

..

सप्ताहात कीर्तनांची मेजवानी

सात दिवस सप्ताहादरम्यान काकडा भजन, गाथा भजन, महिला भजन, हरिपाठ व सायंकाळी ७ ते ९ हरिकीर्तन पार पडले. यामध्ये अनुक्रमे ह.भ.प. शांताराम महाराज बोडके, तुकाराम महाराज मुळीक, किशोर महाराज खरात, सुभाष महाराज गेठे, जयंत महाराज गोसावी, एकनाथ महाराज गोळेसर, आबासाहेब महाराज गोडसे आदी नामवंत कीर्तनकारांची कीर्तने झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या नंदुरबारला सभा

$
0
0

डॉ. हीना गावितांच्या प्रचारार्थ सभा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारासाठी उद्या (दि. २२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुळे रोडवरील स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरातील मोकळ्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. याठिकाणी नुकतेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल यांच्यासह पंतप्रधानांच्या प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांनी मैदानाची पाहणी करीत आढावा घेतला. भाजपच्या स्थानिक बंडखोरीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून प्रचार सुरू आहे. त्यांच्याविरोधात भाजपचेच मात्र आता अपक्ष निवडणूक लढविणारे डॉ. सुहास नटावदकर यांनी बंड केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून अॅड. के. सी. पाडवी हेही रिंगणात असून, तिघांमध्ये ही लढत होणार असून, अंतिम टप्प्यात प्रचारसभांनी मैदान मारण्याची व्यूहरचना प्रत्येक पक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. उद्या (दि. २२) होणाऱ्या या सभेसाठी सध्या सभास्थळावरील जागेचे सपाटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासोबतच केंद्र आणि राज्य सुरक्षा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनीही याठिकाणी दाखल होऊन आढावा घेतला आहे.

पाण्याची बाटली, बॅग, पर्सना बंदी
पंतप्रधान मोदी यांच्या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री तथा आरपीआयचे नेते रामदास आठवले, शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे आदी उपस्थित राहणार आहेत. पोलिस प्रशासनाकडून सभेत कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी विशेष निेयोजन करण्यात आले असून, सभेला वेळेच्या दोन तास आधी प्रवेश बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख संजय पाटील यांनी सांगितले आहे. याचबरोबर सभेच्या ठिकाणी कोणीही पिण्याच्या पाण्याची बाटली, बॅग, पर्स आदी आणल्यास त्यांना सभेच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार नसल्याचेही या वेळी सांगण्यात आले आहे.

अगोदरच्या आश्वासनांचे काय?
गेल्यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी दिलेले ‘चिली पार्क’चे आश्वासन, शिक्षण आणि कुपोषणाबाबतचे आश्वासन या सर्व मुद्द्यांवर पंतप्रधान काय बोलतात, याकडे नंदुरबारकरांच्या नजरा आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी हे धुळ्यात विकासकामांच्या भूमिपूजनासाठी येऊन गेले. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीही धुळ्यात आले होते. आता नंदुरबारला मोदींची सभा होत असल्याने काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस आघाडी काय रणनिती आखते, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. हीना गावितांना बोलण्यास मज्जाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. हिना गावित यांना प्रकाशा येथील गुजर समाजातील एका विवाह समारंभात भाषण करण्यासाठी लोकांनी मज्जाव केल्याची घटना शनिवारी (दि. २०) घडली. मराठा समाज, आदिवासी समाज, यांच्यासह अन्य घटकांनी खासदार डॉ. हिना गावित यांच्या कार्यपद्धतीवर उघडउघड नाराजी व्यक्त करून विरोध दर्शवला आहे.

महायुतीचा धर्म मजबुरीने निभवण्यासाठी एक पाऊल पुढे सरकलेल्या शिवसेनेनेदेखील त्यांच्या प्रचारावर बहिष्कार टाकण्याचे अस्त्र उगारले आहे. ही घटना ताजी असतानाच शनिवारी (दि. २०) भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांना प्रकाशा येथे एका विवाह समारंभात माइकवर बोलण्यास लोकांनी मनाई केल्याची घटना घडली. प्रकाशा येथे गुर्जर समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी समाजाचे नेते दीपक बापू पाटील यांचे अध्यक्षीय भाषण संपले असताना पुन्हा डॉ. हिना गावित यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोन शब्द बोलण्याचा गळ घातली. मात्र, प्रोटोकॉलनुसार अध्यक्ष भाषण संपल्यानंतर कुणाला बोलता येत नाही यावर बोट ठेवत गुर्जर समाजातील लोकांनी डॉ. गावित यांना या ठिकाणी राजकारण आणू नका असे सांगत बोलण्यास मज्जाव केला. त्यामुळे याच विवाह सोहळ्यात भाजप व काँग्रेस गटातील दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येणार...

$
0
0

नाशिक:

आठ दिवसांपूर्वी शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर तापमानाचा पारा काहीअंशी खाली आला होता. पण, गुरुवारपासून पारा पुन्हा चढण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी शहरात कमाल ३८ अंश सेल्सिअस, तर किमान १८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत विदर्भासह राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येणार आहे.

रविवारी (दि. १४) शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यावेळी शहरातील कमाल तापमान ३९.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यानंतर तापमानात घट झाली. बुधवारी (दि. १७) कमाल तापमान ३३.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले होत. तीन दिवस तापमानात सातत्याने घट होत असल्याने शहरातील उष्णता कमी झाल्याचे जाणवत होते. मात्र, गुरुवारपासून उष्णतेचा चटका पुन्हा जाणवू लागला आहे. शनिवारी तापमान पुन्हा ३८ अंश सेल्सिअवर पोहोचल्याने उष्णतेच्या तीव्र झळा नागरिकांना जाणवल्या. त्यामुळे दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. आठ दिवसांपमध्ये कमाल तापमानासह किमान तापमानातही चढ-उतार झाल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अवकाळी पावसानंतर आता राज्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. परिणामी राज्यातील बदलत्या हवामानानुसार शहरातील तापमानाचा पाराही चढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

गत सप्ताहातील तापमान

दिनांक............................ कमाल...................... किमान



१४ एप्रिल........................ ३९.८ ....................... २२.४

१५ एप्रिल........................ ३८.० ....................... २२.२

१६ एप्रिल........................ ३४.७ ....................... २१.७

१७ एप्रिल........................ ३३.१ ....................... २०.९

१८ एप्रिल........................ ३५.२ ....................... १७.४

१९ एप्रिल........................ ३७.३ ....................... १९.८

२० एप्रिल........................ ३८.० ....................... १८.६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे-भाजपात व्हिडीओ वॉर

$
0
0

नाशिक:

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणादरम्यान 'लाव रे तो व्हिडीओ' हे प्रकरण भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. मनसेच्या या व्हिडीओ स्ट्रॅटेजीला भाजपनेही व्हिडीओनेच उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केलेल्या आरोपांचे जुने व्हिडीओ भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून प्रसारीत करण्यात येत असलेल्या व्हिडीओलाही 'लाव रे तो व्हिडीओ' असे शीर्षक देण्यात येत आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपमध्ये रंगलेल्या या व्हिडीओ वॉरची जोरदार चर्चा रंगली आहे.

मनसेकडून राज्यातील लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यात आले नसले तरी गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर असलेले राज ठाकरे यंदा मात्र त्यांच्याविरोधात प्रचार करीत आहेत. राज ठाकरे यांच्याकडून विशेषत: मोदी आणि शाह या दोघांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या सभा राज्यात चांगल्याच प्रभावी ठरत असून त्याचा लाभ थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होताना दिसत आहे. दुसरीकडे राज ठाकरेंकडून मोदी आणि शाह यांनी दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षात असलेल्या स्थितीचे व्हिडीओद्वारे पुरावेच सादर केले जात आहे. या व्हिडीओंचा भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच येत्या २६ रोजी नाशिकमध्ये राज ठाकरेंची सभा होणार असून, त्यात मोदी, शाह यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले जाण्याची भीती भाजपला आहे. त्यामुळे भाजपनेही आता राज ठाकरेंना काउंटर करण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरेंनी गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल केलेल्या आरोपांचे व्हिडीओ भाजपने व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. राज यांनी अजित पवारांवर केलेली जहरी टीका, भुजबळांवर केलेले आरोप, मोदींबाबत केलेले दावे आणि मोदी पंतप्रधान व्हावेत याबाबत व्यक्त केलेली अपेक्षा, राहुल गांधींवर केलेल्या टीकेचे व्हिडीओ भाजप समर्थकांकडून फेसबुक, ट्वीटर आणि सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओंना राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडीओ' या संवादाचेच शीर्षक दिले जात आहे. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर सध्या राज ठाकरे आणि भाजप समर्थकांच्या व्हिडीओंचीच चर्चा रंगली आहे.

भुजबळांचेही व्हिडीओ

येत्या २६ एप्रिल रोजी नाशिकमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने माजी खासदार समीर भुजबळ उमेदवार आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या सभेचा लाभ भुजबळांना होण्याची शक्यता असल्याने भाजपने त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. भाजप समर्थकांकडून रमेश किणी प्रकरणात भुजबळांनी राज ठाकरेंवर केलेल्या आरोपांचे व्हिडीओ व्हायरल करण्यात आले आहेत. भुजबळांसाठी राज ठाकरे सभा कसे घेऊ शकतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


?????

$
0
0

मटा विशेष

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : @bharvirkarPMT

चांदोरी गावातील गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर असलेली चंद्रभट यांची समाधी नदी काँक्रिटीकरणाच्या कामात जमिनीखाली दबली जाण्याची चिन्हे आहेत. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास हा अनमोल ठेवा काही दिवसांत काळाच्या उदरात गडप होणार आहे. येथे गोदावरी चंद्राकार झाल्याने तिचे चंद्रावती असे नामकरण झाले आहे.

चंद्रभट हे चांदोरी गावातील एक सत्पुरूष होते. दौलताबादचे किल्लेदार जनार्दनस्वामी आणि त्यांचे शिष्य संत एकनाथ महाराज नाशिक-त्र्यंबकेश्वरी निघालेले असताना वाटेत चंद्रगिरी (पूर्वीची दौलताबादची राजधानी व आताची चांदोरी) या गावात विश्रांतीसाठी एका ब्राह्मणाच्या ओसरीत थांबले असताना त्यांना संस्कृत श्लोकांचे निरूपण ऐकू आले. त्यांनी शोध घेतला असता तेथे चंद्रभट नावाचे सत्पुरूष पोथी वाचत होते. हे निरूपण ऐकून चतु:श्लोकी भागवत लिहिण्याची प्रेरणा जनार्दन स्वामींनी एकनाथांना दिली. याच चांदोरीच्या चंद्रभटांचा उल्लेख पुढे चतु:श्लोकी भागवताच्या ओवी क्रमांक १०१२ ते १०२४ मध्ये संत एकनाथांनी केला आहे. चांदोरीच्या रमणीय वातावरणात चंद्रभट निरूपण करीत असत. पुढे त्यांनी तेथेच समाधी घेतली. आज या दुर्मिळ ठेव्याची अत्यंत दुरवस्था असून नदीचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने ही समाधी काळाच्या उदरात गडप होण्याची चिन्हे आहेत.

चंद्रभटाच्या समाधीप्रसंगी स्वत: संत एकनाथ महाराज चंद्रगिरीला (चांदोरी) उपस्थित असल्याचा दावा डॉ. भीमाशंकर देशपांडे यांनी ह.भ.प. सोनोपंत दांडेकर यांनी सुरू केलेल्या 'प्रसाद' या मासिकाच्या जून २००८ च्या अंकात केलेला आहे. इतक्या मोठ्या सत्पुरुषाची समाधी नदीच्या किनारी काँक्रिटीकरणाखाली जाणार असल्याने अभ्यासक व संशोधकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने या समाधींची काळजी घेतली पाहिजे अशी मागणीही करण्यात येत आहे.

चांद बोधळे व चंद्रभट वेगळे

सुफी संत शेख महंमद यांनी आपल्या 'योगसंग्राम' या ग्रंथात 'ओम नमोजी सदगुरू चांद बोधले, त्यांनी जानोपंता अंगिकारले, जानोबाने एका उपदेशले, दास्यत्वगुणे' अशी संत एकनाथांची गुरूपरंपरा दिली आहे. चांद बोधळे हे शेख महंमदचा पिता राजे महंमद कादरी यांचे शिष्य होते कालांतराने त्यांनी शेख महंमदाला शिष्य म्हणून स्वीकारले. यांची समाधी दौलताबादला आहे. चंद्रगिरी गावात संत एकनाथांना भेटणारे चंद्रभट आणि चांद बोधळे या एकच व्यक्ती असल्याचे प्रसृत करण्यात आले आणि पुढे हा गोंधळ वाढला.

चांदोरी गावातील चंद्रावती नदीत अनेक मंदिरे असून येथे इंद्रदेवाचेदेखील मंदिर आहे. २०१६ मध्ये नदी कोरडी पडलेली असताना अनेक मंदिरे वर आली. येथेच चंद्रभट नावाच्या सत्पुरूषाचीही समाधी आहे. परंतु, अलिकडच्या काळात तिची दुरवस्था झाली असून, गेल्या काही दिवसांपासून नदीचे काम सुरू असून ती दबली गेली आहे.

-प्रा. विजय कदम, चांदोरी रहिवासी

संत एकनाथांचे आजेगुरू व दौलताबादच्या जनार्दन स्वामींचे गुरू चांद बोधळे हे आणि चंद्रगिरी येथील चंद्रभट या दोघांमध्ये नेहमी गल्लत केली जाते. हे दोघे एकच आहे असा देखावा अनेक संशोधकांनी निर्माण केला आहे. मात्र, हे दोघे भिन्न असून चंद्रगिरीला चंद्रभटाची तर दौलताबादला चांद बोधळे यांची समाधी आहे.

-प्रमोद वडाळकर, समाधी संशोधक

समाधी हा अनुभूतीचा विषय असून तिची देखभाल करणे हा व्यवस्थेचा भाग आहे. प्रशासनाने समाधीसदृश इतिहासकालिन ऐवजांची काळजी घेतली पाहिजे. चांदोरी येथे चंद्रभट यांच्या समाधीची दुरवस्था असून ती काँक्रिटीकरणाखाली जाण्याची शक्यता आहे. त्याआधीच ती वाचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.

-देवेंद्रनाथ पंड्या, इतिहास अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..तर प्रस्तावांचा विचार नाही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थी विकास मंडळाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांची माहिती मागविली आहे. १५ एप्रिलपर्यंत हे प्रस्ताव मागवूनही कॉलेजांनी प्रस्ताव देण्यास दिरंगाई केल्याने २५ एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर न झाल्यास कॉलेजांचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार नाही, असा इशारा कॉलेजाना केला आहे.

विद्यार्थी परिषदांच्या खुल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, नवीन शैक्षणिक वर्षात त्या होण्याची शक्यता आहे. त्यानुसार विद्यापीठातर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांचा आणि कॉलेजांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव कॉलेजांकडून मागविण्यात आला आहे. त्यासाठी १५ एप्रिल ही मुदत देण्यात आली होती. मात्र, विद्यापीठाच्या सूचनेनुसार कॉलेजांनी अद्याप प्रस्ताव सादर केलेले नाहीत. त्यामुळे प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळाली असली, तरी कॉलेजांनी दिरंगाई न करण्याची सूचना विद्यापीठाने केली आहे.

विद्यार्थी विकास मंडळाच्या अंतर्गत कॉलेजमध्ये विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला चालना देणारे उपक्रम राबविण्यात येतात. त्यासाठी विद्यार्थी विकास अधिकारी कार्यरत असतात. प्रत्येक कॉलेजमधील विद्यार्थी समितीसाठी हे अधिकारी कार्यरत असतात. यंदा सप्टेंबर महिन्यात विद्यार्थी परिषदेच्या खुल्या निवडणुका झाल्या, तर विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढणार आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच कॉलेजांनी विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठीचा प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठविण्याचे सूचित करण्यात आले आहे. २५ एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर झाल्यानंतर विद्यार्थी विकास अधिकारी पदासाठीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. या अर्जात प्राध्यापकास नामनिर्देशित करायचे असून त्यांची संपूर्ण माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवरील बीसीयूडी लॉगिनद्वारे अपलोड करायची आहे. त्यावर विद्यापीठ प्रशासनाकडून कार्यवाही झाल्यानंतर विद्यार्थी विकास अधिकारी नेमणूक पत्र कॉलेजांना पाठविण्यात येणार आहे.

\Bतरच उपक्रम...\B

सध्या कॉलेजांमध्ये प्राध्यापकांना निवडणुकांची कामे असून, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांमुळे प्रस्ताव सादरीकरणास उशीर होत असल्याचे कॉलेजांचे मत आहे. विद्यापीठाच्या सूचनेनुसार दिलेल्या मुदतीत प्रस्ताव देणाऱ्या कॉलेजांनाच नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी विकास मंडळांतर्गत येणारे उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्याची परवानगी असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशिक्षण वर्गाला कंत्राटी कर्मचारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणूक प्रशिक्षणाला हजर राहणे अनिवार्य असूनही एका महिला अधिकाऱ्याने स्वत: हजर न राहता कंत्राटी कर्मचाऱ्याला खोटी स्वाक्षरी करण्यासाठी पाठविल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. नाशिकचे तहसीलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, निवडणूक विभागाची फसवणूक केल्याचा गुन्हा संबंधितांवर दाखल करण्यात आला आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतीम टप्प्यात आला आहे. एकीकडे राजकीय पक्षांनी निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी कंबर कसली असताना जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागानेही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. जिल्हाभर मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी तब्बल ३० हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदा व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार असल्याने कर्मचाऱ्यांना यासंदर्भातील प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला जिल्ह्यात १९ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. असे असतानाही भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात स्वत: प्रशिक्षणाला हजर न राहता रोहिदास चर्मद्योग व कर्मचारी विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक संगिता विजय पराते यांनी त्यांच्याच कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी प्रशांत विजय थोरात यांना प्रशिक्षणासाठी पाठविले. संध्याकाळी पाच वाजता प्रशिक्षण वर्ग संपला. त्यावेळी प्रशांत थोरात याने पराते यांच्या नावासमोर स्वाक्षरी केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रशिक्षण वर्ग घेणाऱ्या यंत्रणेने थोरात यांना हटकले. पराते यांनीच मला त्यांच्याऐवजी प्रशिक्षण वर्गास जाऊन स्वाक्षरी करण्यास सांगितल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे तहसीलदार अनिल दौडे यांनी मुबईनाका पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार थोरात आणि पराते यांच्यावर फसवणुकीसह निवडणूक कामात हलगर्जीपणा, टाळाटाळ व गंभीर वर्तन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशिक्षण वर्गांचा समारोप

निवडणूक प्रशिक्षण वर्गास उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेऊन येण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोलिसांचे वाहन पाठविण्यात येईल, असा इशारा उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिला होता. या इशाऱ्याच्या धास्तीने बहुतांश कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण वर्गास हजेरी लावल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात दुसरे प्रशिक्षण सत्रही यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती आनंदकर यांनी दिली. त्यामुळे आता प्रशिक्षण वर्ग संपले असून कर्मचाऱ्यांना २८ एप्रिलला निवडणुकीची यंत्रसामग्री घेण्यासाठी पाचारण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन अल्पवयीन मुलीप्रियकरांसह ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भिवंडीहून पळून आणलेल्या दोन अल्पवयीन मुलींना त्यांच्या दोन्ही प्रियकरांसह नाशिकरोड रेल्वेस्टेशन पोलिसांनी पालकांच्या ताब्यात दिले. सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र पाटील, जावेद शेख व सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.

मुलीच्या पालकांनी भिवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीच्या मुलीचे त्यांच्याच चाळीत राहणारा नातेवाईक अजय कसबे याच्याशी प्रेमसंबंध होते. त्याला एकदा समज देण्यात आली होती. फिर्यादीची मुलगी गिरणीत गेली असता परतली नाही. शोध घेतला असता तिची मैत्रीणही घरी नसल्याचे स्पष्ट झाले. कसबे व त्याचा मित्र झिनुआ बिंद हेदेखील घरी नव्हते. त्यांचे फोनही बंद असल्याने त्यांच्यावर संशय बळावला. भिवंडी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांनी शोध सुरू केला. हे युवक बिहारला रेल्वेने निघाले असल्याची माहिती भिवंडी पोलिसांना मिळाली. मात्र, त्यांचे फोन बंद होते. नाशिकरोड रेल्वे पोलिसांना त्यांनी ही माहिती दिली. या चौघांचे फोटो त्यांनी मोबाइलवर पाठवले. त्याचा उपयोग नाशिकरोड रेल्वे पोलिसांना झाला. या मुलांनी नाशिकरोडला आल्यावर फोन सुरू केले होते. पोलिसांनी मोबाइलच्या आधारे लोकेशन शोधले. मागोवा घेतला तेव्हा चौघे नाशिकरोड रेल्वेस्टेशनमध्ये आल्याचे निष्पन्न झाले. ते प्लॅटफॉर्मवर दुसऱ्या गाडीची वाट पाहात होते. त्यांना ताब्यात घेऊन पालकांना पाचारण करण्यात आले. ओळख पटल्यावर पालकांसह त्यांना भिवंडी पोलिसांकडे पाठवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ सिग्नलवर लूटमार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुचाकीवरून घराकडे परतणाऱ्या युवकाला कारमधून आलेल्या संशयितांनी अडवून मारहाण करीत त्याच्याकडील १० हजार रुपये काढून घेत पोबारा केला. अथर्व राजेंद्र शिरसाठ (रा. किशोर सूर्यवंशी मार्ग, पंचवटी) याने याप्रकरणी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, गेल्या शनिवारी (दि. २०) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. अशोक स्तंभाकडून ड्रीम कॅसलमार्गे बुलेटवरून तो घराकडे निघाला होता. आरटीओ सिग्नल येथे पाठीमागून विना क्रमांकाच्या लाल रंगाच्या आय २० कारमधून आलेल्या चौघांनी त्याच्या बुलेटला कार आडवी लावली. चौघांनी कारमधून उतरून अथर्वजवळ जात बळजबरीने त्याच्या खिशातील पाकीट काढून घेत पोबारा केला. पाकिटात १० हजार ७०० रुपयांची रोकड होती. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दरोडा व लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकूने हल्ला

हिरावाडीमध्ये १७ वर्षाच्या युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला. अविनाश, काळू (पूर्ण नाव नाही, दोघे रा. साईनाथनगर, हिरावाडी) आणि त्याच्या दोन साथीदारांनी शुक्रवारी (दि. १९) रात्री अकरा वाजता हिरावाडीतील साईनाथनगर येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून एका अल्पवयीन युवकावर चाकूने हल्ला करून जखमी केले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भंडाऱ्यात मारहाण

वारंवार भंडाऱ्याचा प्रसाद घेतला म्हणून तिघा संशयितांनी मारहाण केली. भावड्या कुलकर्णी (रा. शनी गल्ली), राकेश कातकर आणि सागर कातकर (रा. लोणार गल्ली) अशी संशयितांची नावे आहेत. दीपक विठ्ठल गोंधळी (३२, रा. आदर्शनगर, रामवाडी, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार शनिवारी (दि.२०) शनी गल्लीत भंडाऱ्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी दीपक गोंधळी यांचा पुतण्या दोन-तीन वेळा भंडाऱ्याचा प्रसाद घेण्यासाठी गेला. त्यामुळे संशयित भावड्या कुलकर्णी याने त्यास मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी गोंधळी यांचा भाऊ मुकेश उबाळे गेले असता, संशयितांनी त्यांनाही मारहाण केली. सागर कातकर याने विट फेकून मारल्याने दीपक गोंधळी यांच्या डोक्याला दुखापत झाली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पर्समधून मोबाइल चोरी

गांधीनगर येथील हनुमान मंदिरात आलेल्या महिलेच्या पर्समधून महागडा मोबाइल चोरून नेला. अश्विनी ज्ञानेश्वर सोनवणे (३६, रा. टागोरनगर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि. १९) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्या पुणे महामार्गावरील गांधीनगर येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधून १० हजार रुपयांचा सॅमसंगचा मोबाइल व एक हजार रुपयांची रोकड असा ११ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हत्यारासह एकाला अटक

पवननगर येथील मैदानासमोरून धारदार हत्यारासह एकाला अटक करण्यात आली. पवन विनायक वायाळ (२१, रा. सावतानगर, सिडको) असे संशयिताचे नाव आहे. अंबड पोलिसांनी शुक्रवारी (दि. १९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित पवन यास कुकरी या हत्यारासह ताब्यात घेत, अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करून अटक केली.

वाघाडीत जुगार अड्ड्यावर छापा

पंचवटीतील वाघाडी नदीपात्रात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. तुळशीराम शामराव खंदारे (६५, रा. वाघाडी, पंचवटी), राकेश विजय शिंदे (३२, रा. निलगीरी बाग), भीकन शंकर खरात (५७, रा. वाल्मीकनगर, पंचवटी) असे संशयिताची नावे आहेत. वाघाडी नदी किनारी असलेल्या पुलाजवळ जुगार खेळला जात असल्याची खबर मिळाल्याने पंचवटी पोलिसांनी शनिवारी (दि. २०) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी संशयित मटका जुगार खेळत होते. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतवार्ता

घराघरांत मतदार चिठ्ठ्यापोहोचविण्याचे आव्हान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

मतदानासाठी आता केवळ सात दिवस उरल्याने राजकीय पक्षांसमोर आता घराघरांत मतदार चिठ्ठ्या पोहोचविण्याचे आव्हान आहे. विविध पक्ष कार्यालयांत मतदारांच्या चिठ्ठ्यांचे वर्गीकरण व प्रत्यक्ष त्या चिठ्ठ्या मतदारांपर्यंत वाटपासाठी मोठे मनुष्यबळ कामाला लावण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन-तीन दिवसांत चिठ्ठ्या मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे लक्ष्य पक्षांनी समोर ठेवले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात १८ लाख ८२ हजार ५ असे एकूण मतदार आहेत. याआधी प्रत्येक उमेदवाराकडून पदयात्रा, सभा, बैठकी, मेळावे, गाठीभेटी घेतल्या गेल्या आहेत. मात्र, प्रत्येक घरात प्रत्येक मतदारापर्यंत आपल्या उमेदवाराची मतदार चिठ्ठी पोहोचविण्यासाठी पक्ष कार्यालयात धावपळ सुरू आहे. या मतदार चिठ्ठ्यांच्या माध्यमातून स्थानिक नेते प्रचाराची संधीही साधत आहेत. त्यासाठी हजारो कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात आले आहे. सर्वच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून विविध माध्यमांतून प्रचार केला जात आहे; पण प्रत्यक्ष मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती पोहोचविण्यासाठी राजकीय पक्षांकडून चढाओढ सुरू झाली आहे. मतदानाच्या चिठ्ठ्यांबरोबरच उमेदवाराची जाहिरातही केली जात आहे. राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदाराची स्लीप तयार केली असून, बूथ अध्यक्ष, पोलिंग एजंटकडे बूथनिहाय मतदारांची यादी सुपूर्द केली आहे. बूथप्रमुख अशी यंत्रणा पक्षांनी उभारली आहे. प्रत्येक बूथनिहाय मतदारांना चिठ्ठ्या वाटण्यासाठी उमेदवारांनी कार्यकर्त्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे. पुढच्या दोन-तीन दिवसांत चिठ्ठ्यांच्या वाटपाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅपवरूनही माहिती

सर्व बूथप्रमुखांकडे एव्हाना मतदारांच्या याद्या व चिठ्ठ्या पोहोचविण्याचे काम सुरू झाले आहे. काही प्रभागांमध्ये प्रत्यक्ष चिठ्ठ्यांच्या वाटपाचे कामही सुरू करण्यात आले आहे. मतदाराचे नाव, पत्ता, मतदान केंद्र अशी माहिती या चिठ्ठीवर आहे. उमेदवाराचे छायाचित्र, चिन्ह व त्यांना निवडून देण्याचे आवाहन या चिठ्ठीद्वारे करण्यात आले आहे. मतदानाच्या एक-दोन दिवस आधी याचे वाटप पूर्ण केले जाईल. काही तरुण वर्गाने व्हॉट्सअॅपवर चिठ्ठ्या पाठवण्याचा आधुनिक मार्ग स्वीकारला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाच वर्षांत नाशिकला काय मिळाले?

$
0
0

टॉक टाइम- समीर भुजबळ, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस

---

नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडून पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावत प्रचारात जातीपातीऐवजी नाशिकच्या विकासालाच प्राधान्य दिले आहे. आपण खासदार असतानाच अनेक प्रकल्प आणून, विकासाला चालना दिली. परंतु, गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात दृष्टिक्षेपात येईल असे एकही काम झाले नाही. खासदारांनी एकतरी ठोस काम जनतेसमोर मांडावे. युतीचे खासदार, आमदार असताना नाशिकला काय मिळाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यांबाबत महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्याशी विनोद पाटील यांनी साधलेला संवाद...

प्रश्न : लोकसभेची उमेदवारी नेमकी कशासाठी?

- नाशिकच्या प्रगतीसाठी आणि वर्ल्ड डेस्टिनेशन अशी नवी ओळख तयार करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. गेल्या पाच वर्षांत विकासाचा बॅकलॉग मला भरून काढायचा आहे. विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकले नाही. शेतीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. वाइन उद्योग संकटात आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यासह शेती, उद्योग, दळणवळणाला प्राथमिकता देण्यासाठी मी उमेदवारी करीत आहे.

-

प्रश्न: विद्यमान खासदारांच्या कामाचे मूल्यमापन कसे कराल?

- मी खासदार असताना २००९ ते २०१४ मध्ये नाशिकच्या विकासाला चालना दिली. विमानतळ, मेगा फूडपार्क, बोटक्लब, कलाग्राम, इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब, नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प आदी कामांना चालना दिली. पर्यटन स्थळांसाठी निधी आणला. परंतु, गेल्या पाच वर्षांत खासदाराला एकही काम पूर्ण करता आले नाही. मी मंजूर करून आणलेल्या कामांची फित कापण्याची संधी विद्यमान खासदारांना होती. परंतु, त्यांनी केवळ पत्रकबाजी करण्यातच आपला पाच वर्षांचा वेळ वाया घालवला. त्यामुळे नाशिक हे अन्य शहरांच्या मानाने पिच्छाडीवर पडले.

-

प्रश्न : भाजप-सेनेच्या एकतेचे आव्हान कसे पेलणार?

- शिवसेना भाजपची जुमलेबाजी आता जनतेसमोर उघड झाली आहे. गेली पाच वर्षे दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात घालवले. शिवसेनेच्या लोकांचे राजीनामे खिशातच राहिले. आता केवळ सत्तेसाठी दोघांनी युती केली आहे. त्यामुळे जनतेला गृहीत धरण्याचा महायुतीचा प्रयत्न असला तरी, जनता यावेळी आघाडीबरोबर आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नाही. नुसतेच जनतेला गाजर दाखवले. सेना आणि भाजपमध्ये एकता दिसत असली तरी ती वर वरची आहे. जनता युतीला स्वीकारणार नाही.

००

प्रश्न : नाशिकबाबत आपले व्हिजन काय?

- नाशिक हे जागतिक दर्जाचे शहर व्हावे अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठीची सर्व अनुकूल स्थिती आहे. मुबलक पाणी, अनुकूल हवामान, उत्तम शेती, उद्योगाचे केंद्र, आयटी पार्कसाठी अनुकूल स्थिती आहे. एचएएलसारखा मोठा प्रोजेक्ट नाशिकमध्ये आला पाहिजे. रोजगार वाढला पाहिजे. आम्ही सत्तेत असताना महिंद्राचा नवीन प्रोजेक्ट नाशिकला आणला होता. परंतु, गेल्या पाच वर्षांत येथून उद्योग स्थलांतरीत झाले. त्यामुळे एक आयडीयल सिटी उभारण्याचा माझा संकल्प आहे.

-

प्रश्न: भुजबळ कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत?

- आमच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. भाजप आणि सेनेच्या लोकांना यावर बोलण्याचा अधिकार नाही. आमचा आवाज दाबण्याचा आणि आम्ही पक्ष सोडावा यासाठीचे हे दबावतंत्र होते. राज्यातील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. हे नेते शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्यावर पावन झाले. परंतु, भुजबळ कुटुंबीयांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. कदाचित आम्ही साथ सोडली असती तर पावन झालो असतो. परंतु, आम्ही राष्ट्रवादी आणि पवारांसोबत खंबीर उभे राहिलो. अमित शाह, साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावरही आरोप आहेत. त्यामुळे हा आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. न्याय व्यवस्थेवर आमचार विश्वास आहे.

प्रश्न : नाशिककरांना काय संदेश द्याल?

-नाशिकला प्रगतीपथावर आणण्यासाठी परिवर्तन हा एकमेव मार्ग आहे. युतीकडे महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपालिका आहेत. परंतु, नाशिकला गेल्या साडेचार वर्षांत काहीच मिळाले नाही. नाशिकवर अन्याय झाला आहे. एका नेत्याला गुजरात समृद्ध करायचे आहे, तर दुसऱ्याला नागपूर समृद्ध करायचे होते. त्यामुळे या दोन नेत्यांनी नाशिकला बरबाद केले आहे. नाशिकचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. नाशिककर परिवर्तन करतील अशी अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा विकासासाठी संयुक्तिक काम करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना महापालिकेत सामावून घ्यावे, तसेच एसटीची सुविधा मिळवताना अनेक कटकटींचा सामना करावा लागतो, तो कमी करावा यासह अनेक गैरसोयींबाबत पहिल्या शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंच्या स्नेहसंमेलनात चर्चा करण्यात आली. यावेळी क्रीडा विकासासाठी संयुक्तिक काम करण्याचा निश्चय करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या संकल्पनेतून या स्नेह मेळा‌व्याचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी सर्व पुरस्कारार्थिंनी आपल्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीची माहिती सांगितली. यापुढे नाशिकच्या क्रीडा विकासासाठी जे जे उपक्रम राबविणे शक्य आहेत, त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचे ठरविले. ज्या खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे, अशा खेळाडूंना महापालिकेत नोकरी देण्याबाबत पाठपुरावा करावा, पुरस्कारार्थींना एसटी बस सवलत मिळताना त्रास होतो. ही प्रक्रिया सुटसुटीत होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा. खेळाडू, क्रीडा संघटक, प्रशिक्षक यांना क्रीडा विषयक कामासाठी वारंवार पुणे आणि दिल्ली येथे जावे लागते. यासाठी पुणे येथे बालेवाडीमध्ये आणि दिल्ली येथे महाराष्ट्र सदनमध्ये व्यवस्था व्हावी, यासदंर्भात चर्चा करण्यात आली. त्यासाठी पाठपुरावा करण्याचे सर्वांनी ठरवले. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची दाखल घेऊन नाशिकच्या ५६ जणांना महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. या मेळाव्यामध्ये १९७६-७७ पासून ते सन २०१७-१८ पर्यंतच्या पुरस्कारार्थींचा समावेश होता. या सर्वांना स्नेहमेळाव्यासाठी सपत्नीक पाचारण करण्यात आले होते. स्नेहसंमेलनात नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, अविनाश टिळे, आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र नाईक यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राला हक्काचे पाणी मिळणार का?

$
0
0

पिंपळगाव सभेपूर्वी \Bवांजुळपाणी समितीचा मोंदीना थेट प्रश्न\B

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, सोमवारी पिंपळगाव बसवंत येथे धुळे, नाशिक व दिंडोरी मतदार संघातील भाजप-शिवसेना उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी वांजूळपाणी समिती सदस्यांनी पाणीप्रश्नी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले असून, सभास्थळी त्यांनी याची उत्तरे द्यावीत असे आवाहन केले आहे. समितीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात महाराष्ट्राला त्याच्या हक्काचे पाणी मिळणार का? पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी जल आराखडा तयार करून गोदावरी, तापी-गिरणा नदीखोऱ्यातून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कोणती ठोस कृती करणार? असा थेट सवाल यात विचारण्यात आला आहे.

वांजुळपाणी संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाही वळण पद्धतीने पश्चिम वाहिनी नार-पार, अंबिका-औरंगा, ताण-माण या खोऱ्यातील ५० टीएमसी पाणी तुटीच्या गिरणा-तापी खोऱ्यात वाळवावे अशी मागणी करीत आहे. सुरगाणा-कळवणचे आमदार जे. पी. गावित यांनी देखील स्थानिक आदिवासी बांधवांचे नुकसान होत नसल्याने ही मागणी लावून धरली आहे. या मागणीसाठी लाँग मार्चदेखील काढण्यात आला होता. आता प्रतप्रधान मोदींच्या सभेच्या पूर्वसंध्येला समितीने पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्राच्या पाणीप्रश्नावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, केंद्र सरकारने दिलेले १० हजार २११ कोटी रुपये खर्च करून नार-पार-तापी-नर्मदा लिंकच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातच्या शेती सिंचनासाठी वापरले जाणार आहे. मात्र राज्यातील मराठवाडा व तापी-गिरणा खोऱ्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकार समन्यायी भूमिका न बजावता गुजरात धार्जिणे धोरण राबवत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरात राज्याचे? असा प्रश्न समितीने विचारला आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला नेणार नाही, महाराष्ट्रच्या हक्काच्या पाण्यावर गुजरात हक्क सांगणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव येथील सभेप्रसंगी जाहीर करावे, अशी मागणी वांजुळपाणी संघर्ष समितीतर्फे के. एन. आहिरे, विश्वासराव देवरे, निखील पवार, देवा पाटील, प्रा. आनिल निकम, शेखर पवार, दत्तू खैरनार, प्रभाकर शेवाळे, कुंदन चव्हाण, शरद पवार, संजय खैरनार आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची सातपूरला प्रचार रॅली

$
0
0

सातपूर : नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी सातपूरला रॅली काढण्यात आली. सातपूरला स्वारबाबानगर येथून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. यानंतर स्वारबाबानगर, शिवाजी चौक, सातपूर गाव, सातपूर कॉलनी, सावरकरनगर, अशोकनगर, राज्य कर्मचारी वसाहत, विश्वासनगर, राधाकृष्णनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, ध्रुवनगर, गंगापूर गाव, गंगापूररोड, जेहान सर्कल आदी भागात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. या वेळी उमेदवार भुजबळांसह माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, मनसे गटनेता सलीम शेख आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींची सभा २० मिनिटे उशिराने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (ता. २२) पिंपळगाव बसवंत येथे सभा होत असून, अनुचित प्रकार टाळण्यासाठीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. मोदी यांचे सभास्थळी २० मिनिटे उशिराने आगमन होणार असून, त्यामुळे सभा सकाळी सव्वाअकरानंतर सुरू होईल, असे जिल्हा प्रशासनाने रविवारी स्पष्ट केले.

दिंडोरी, नाशिक आणि धुळे लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या देशाच्या विविध भागांत सभा घेत आहेत. जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथेही मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जोपूळ रस्त्यावरील मोकळ्या मैदानात ही सभा होणार असून, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या सभेत सुरक्षेच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सभास्थळापासून पाच किलोमीटरच्या परिघात ड्रोन वापरास मज्जाव करण्यात आला आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारच्या व्हिडीओ शूटिंगलाही बंदी असणार आहे. व्हीव्हीआयपी पासेस बनविण्यात आले असून, पासधारकांनाच व्यासपीठाजवळ प्रवेश मिळू शकणार आहे. मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील सभेला उपस्थित राहणार आहेत. पिंपळगाव बसवंत येथे सभास्थळी चार हेलिपॅड बनविण्यात आले असून, यापैकी तीन हेलिपॅड मोदी यांच्या हेलिकॉप्टरसाठी, तर एक हेलिपॅड मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.

नियोजित वेळेत बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी साडेदहाला ओझर विमानतळावर पोहोचणार होते. तेथून हेलिकॉप्टरने ते पिंपळगाव बसवंत येथे पोहोचून सकाळी ११ वाजता सभेला सुरुवात होणार होती. मात्र, आता मोदी यांचे ओझर विमानतळ येथे २० मिनिटे उशिराने म्हणजेच सकाळी ११.१५ नंतर आगमन होणार आहे. त्यामुळे सभेलाही २० मिनिटे विलंब होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images