Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

झिप झॅप झूम- आवाहन

$
0
0

बालदोस्तांसाठी पाठवा साहित्य

--

बालदोस्तांसाठी सुटी म्हणजे मज्जा, धमाल आणि फुल टू एन्जॉय. सुटीमध्ये बालगोपाळ खेळ आणि विविध शिबिरांमध्ये दंग असतात. मात्र, मैदानी खेळांबरोबरच बौद्धिक क्षमतावाढही तेवढीच महत्त्वाची असते. हेच लक्षात घेऊन चिमुकल्यांचे मनोरंजन व्हावे, त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी 'झिप झॅप झूम' या पानासाठी छोट्या दोस्तांना रुचेल, आवडेल असे साहित्य तुम्हीदेखील पाठवा. लहान मुलांच्या गोष्टी, कविता, कोडे, चित्र, चुटकुले, तसेच त्यांच्या सामान्यज्ञानात भर पडेल असे साहित्य यासाठी अपेक्षित आहे. साहित्य पसंतीस उतरल्यास त्याला यथायोग्य प्रसिद्धी दिली जाईल. साहित्य पाठविताना त्यावर 'झिप झॅप झूम' असा उल्लेख करावा.

साहित्य पाठविण्यासाठी...

पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, तिसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड

ई मेल आयडी : nashikplus18@gmail.com

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदान केंद्रात मोबाइलला नो-एन्ट्री

$
0
0

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोबाइल हा प्रत्येकाच्याच जीवनात सवयीचा भाग बनला असला तरी २९ एप्रिल रोजी सजग नागरिकांना मोबाइलपासून काही काळ दूर राहावे लाागणार आहे. मतदानाची प्रक्रिया सोमवारी (दि. २९) राबविण्यात येणार असून मतदान केंद्रांवर मोबाइल नेण्यास मनाई असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोबाइल घरी ठेऊनच मतदानासाठी बाहेर पडावे लागणार आहे.

मतदानाची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निवडणूक शाखेत सध्या लगीनघाई पहावयास मिळते आहे. मतदान प्रक्रियेची तयारी करताना बारीक सारीक गोष्टींचा विचार प्रशासनाकडून केला जातो आहे. तयारीत कोणतीही कमतरता आणि त्रुटी राहणार नाहीत याची खबरदारी यंत्रणेकडून घेण्यात येते आहे. मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अंमलबजावणी कसोशीने होईल याकडे जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेचा कटाक्ष आहे. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करण्यासाठी, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानाचे दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव असणार आहे. किंबहुना मतदान केंद्रांपासून २०० मीटर बाहेर मोबाइल ठेऊन नागरिकांना मतदान करण्यासाठी जावे लागेल. त्यामुळे नागरिकांनी मोबाइल घरी ठेऊनच मतदान करण्यासाठी जावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांनाही मज्जाव

मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास नागरिकांप्रमाणेच कर्मचाऱ्यांनाही मज्जाव असणार आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहेत. परंतु, या कर्मचाऱ्यांनाही मतदान केंद्रावर मोबाइल नेता येणार नाही. नेमून दिलेल्या जबाबदारीचा कालावधी संपत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांना मोबाइल वापरता येणार नाही. प्रिसायडिंग ऑफिसर अर्थात केंद्र प्रमुखांना मोबाइल बाळगण्यास परवानगी आहे. परंतु, तो त्यांना सायलेंट मोडवर ठेवावा लागणार आहे. याखेरीज निवडणुकीचे सुपरव्हिजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र मोबाईल बाळगता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रिकुटाने दुचाकीस्वारास लुटले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कामावरून घराकडे परतणाऱ्या दुचाकीस्वारास बेदम मारहाण करीत पल्सरस्वार त्रिकुटाने लुटल्याची घटना दिंडोरी रोड भागात घडली. आरोपींनी खिशातील २०० रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीलुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

रेवननाथ जगन्नाथ जाधव (रा. वरवंडी रोड, म्हसरूळ) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. जाधव रविवारी (दि. १४) रात्री आपले कार्यालयीन कामकाज आटोपून दुचाकीवरून (एमएच १५ बीएम ८३७९) घराकडे परतत असतांना ही घटना घडली. दिंडीरो रोडवरील वीज कंपनी कार्यालयासमोर लुटमारीचा प्रकार घडला. जाणाऱ्या जाधव यांना पाठीमागून काळ्या रंगाच्या पल्सरवर आलेल्या तिघांनी अडविले. आरोपींनी जाधव यांना थेट मारहाण सुरू केली. आरोपींनी बळजबरीने जाधव यांच्या खिशातील दोनशे रुपयांची रोकड काढून घेतली. तसेच एटीएममधून पैसे काढून दे, नाही तर पुन्हा मारू असे म्हणत त्यांनी एटीएम कार्डचा शोध घेतला. मात्र, कार्ड मिळून न आल्याने आरोपींनी पोबारा केला.

बसवर दगडफेक

बसला अ‍ॅक्टिव्हा आडवी करीत चालकास शिवीगाळ करीत दोघांनी एसटीवर दगडफेक केल्याची घटना द्वारका परिसरात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गोरक्षनाथ सानप या बस चालकाने तक्रार दिली. सानप सोमवारी (दि. १५) नाशिक-सिन्नर या बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास ते सिन्नरच्या दिशेने बस (एमएच १४ बीटी ४०७५) घेऊन जात असतांना द्वारका सर्कल परिसरात पाठीमागून अ‍ॅक्टिव्हावर ((एमएच १५ ईक्यू २९४४) आलेल्या दोन अनोळखी संशयितांनी आपले वाहन एसटीला आडवे लावून बस थांबविली. यावेळी संशयितांनी कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ करीत बसवर दगडफेक केली. या घटनेत बसची काच फुटून सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले.

शेजाऱ्याकडून मारहाण

सासरच्या मंडळीस माहिती दिल्याचा जाब विचारल्याने शेजाऱ्याने बेदम मारहाण केली. ही घटना शिंदेनगर भागात घडली असून, या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. युवराज दिलीप येलमामे (रा. गजानन कृपा अपार्ट. शिंदेनगर) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी उदय पदमाकर शिरसाठ (रा. सदर) यांनी तक्रार दिली. शिरसाठ दांपत्यात कौटुंबिक वाद आहे. त्यामुळे पत्नी माहेरी राहते. एकाच इमारतीत राहणारा येलमामे सासरवाडीस माहिती कळवितो या संशयातून ही हाणामारी झाली. येलमामे पत्नी आणि सासूस माहिती कळवित असल्याच्या संशयावरून शिरसाठ यांनी सोमवारी (दि.१५) येलमामे यास इमारतीच्या पार्किंगमध्ये गाठून जाब विचारला. यावेळी संशयीताने शिवीगाळ करीत त्यास बेदम मारहाण केली.

कारमध्ये तलवार

शस्त्रबंदी आदेश लागू असतांना कारमध्ये तलवार बाळगणाऱ्या चालकास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जतिंदरसिंग उर्फ जितेंद्रसिंग मनमोहनसिंग बिद्रा (५३, रा. उत्तरानगर, काठेगल्ली) असे संशयिताचे नाव आहे. आडगाव पोलिसांनी औरंगाबादरोडवर सोमवारी (दि.१५) वाहन तपासणी सुरू केली. यावेळी संशयिताच्या कारमध्ये (एमएच १५ इएफ ०६८८) धारदार तलवार आढळून आली.

घरासमोरील कारची चोरी

घरासमोर पार्क केलेली अल्टो कार चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना कामटवाडे भागात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोपान किसन कांबळे (रा. चाणक्यनगरी, कामटवाडा) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. कांबळे यांची अल्टो कार (एमएच १५ एफएफ २५७४) शनिवारी (दि. १३) रात्री घरासमोरील हनुमान मंदिराच्या आवारात लावलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान केल्यास मोफत थायरॉइड तपासणी

$
0
0

क्रस्ना डायग्नोस्टिक्सचा उपक्रम; पाच केंद्रांवर आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असून, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी ठिकठिकाणी प्रबोधन करण्यात येत आहे. यामध्ये राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांबरोबरच विविध संस्था पुढे येत आहेत. पुणेस्थित क्रस्ना डायग्लोस्टिक्स या संस्थेतर्फेदेखील मतदानाचा टक्का व महिलांमध्ये वाढत जाणाऱ्या थायरॉइड या आजाराविषयी प्रबोधन करण्यासाठी मतदान केलेल्या महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पल्लवी जैन-भटेवरा यांनी ही माहिती मंगळवारी कालिदास कलामंदिरच्या हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

प्रत्येक एक हजार महिलांमागे ८० महिलांना थायरॉइड आजाराने ग्रस्त आहेत. वयाच्या तिशीनंतर आढळून येणारा हा आजार सध्या वयाच्या दहा ते चौदा वर्षे वयापासूनच आढळून येत असल्याची धक्कादायक बाब सध्या समोर येत आहे. बऱ्याच वेळा या आजाराची लक्षणे दिसूनसुद्धा महिला त्याकडे दुर्लक्ष करतात, परिणामी, आजाराला गंभीर स्वरूप प्राप्त होते. सध्या सर्वत्र निवडणुकांचे वातावरण असल्याने महिला मतदारांना आरोग्याबाबत सजग रहा, असा सल्ला आपल्या उपक्रम क्रस्ना डायग्नोस्टिक्सकडून देण्यात येणार आहे. या उपक्रमातून दोन्ही उद्देश साध्य होणार असल्याचे संस्थेच्या पल्लवी जैन-भटेवरा व रुची सोनवणे यांनी सांगितले.

या केंद्रांवर तपासणी

मतदान केल्या दिवसापासून बोटावरची शाई जाईपर्यंत तपासणीचा लाभ घेता येणार आहे. नाशिकमध्ये बिटको हॉस्पिटल, नाशिकरोड, स्वामी समर्थ हॉस्पिटल, अंबड, झाकीर हुसेन हॉस्पिटल द्वारका, इंदिरागांधी हॉस्पिटल, पंचवटी, नामको हॉस्पिटल, पेठरोड या केंद्रांवर तपासणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींची सभा तटबंदीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या सोमवारी (दि. २२) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करायला निघालेल्या भाजपला आता सभाच उधळण्याची धास्ती सतावत आहे.

कांद्याचे भाव पडल्याने थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरच कांदे भिरकावणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुभवाची आठवण भाजप नेत्यांना आली असून, मोदींची सभा आता तटबंदीत घेण्याची तयारी केली जात आहे. दुसरीकडे वर्धा आणि अहमदनगरमध्ये मोदींची सभा सुरू असतानाच नागरिकांनी सभा सोडल्याच्या घटनेचीही धास्ती घेत सभेभोवती आता भाजपच्या कार्यकर्त्यांचे कडे उभारण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. सोबतच सभेत साप सोडण्याचा इशारा देण्यात आल्याने आता सभेत सर्पमित्रांची फौजही उभी केली जात आहे. त्यामुळे मोदींची सभा भाजपसाठी चांगलीच प्रतिष्ठेची बनली आहे.

गेल्या वेळेस नरेंद्र मोदींच्या सभेमुळे युतीला दोन्ही जागांवर फायदा झाला होता. त्यामुळे यंदाही मोदींच्या सभेसाठी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि भाजपच्या डॉ. भारती पवार आग्रही आहेत. परंतु, गेल्या तीन ते चार वर्षांपासून कांदा, तसेच डाळिंबाचे भाव पडले आहेत. विशेषत: कांद्याचे सतत भाव पडत असल्याने येथील शेतकरी जेरीस आला आहे. त्यातच शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे आश्वासन भाजपने पाळले नाही. गेल्या पाच वर्षांत युतीबाबत नकारात्मक वातावरण असले, तरी मोदींची अजूनही ‘क्रेझ’ आहे. त्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सकाळी साडेदहा वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु, ही सभा उधळण्याच्या इशारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. सभेत गनिमीकाव्याने साप सोडले जाण्याचा सुगावा पोलिसांना लागला असून, शेतकऱ्यांकडून मोदींच्या सभेत हुल्लडबाजी करण्यासह कांदाफेकही केली जाण्याचीही शक्यता आहे.
त्यामुळे या संभाव्य स्थितीचा सामना एकीकडे प्रशासकीय पातळीवरून सुरू असतानाच भाजपनेही विरोधकांकडून देण्यात येणारे इशारे गंभीरतेने घेतले आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी भाजपच्या कार्यालयात मोदींच्या सभेबाबत बैठक घेऊन सभेची चाचपणी केली. यावेळी शेतकऱ्यांकडून सभा उधळली जाण्याची शक्यता गृहित धरून त्यावरही चर्चा झाली. थेट पवारांच्या सभेचाही संदर्भ देण्यात आला असून, कार्यकर्त्यांना माहिती घेण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. सभेत हुल्लडबाजी होऊ नये यासाठी अशाच लोकांना सभेच्या ठिकाणी आणा जे आपल्या विचारांचे आहेत, असे आदेश देण्यात आले आहेत. आजूबाजूच्या कार्यकर्त्यांवर लक्ष देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सभेत काळे कपडे घालून कोणी येऊ नये, अशी दक्षताही घेतली जाणार आहे.

गर्दीभोवती कडे

विदर्भ आणि नगरमधील सभेत मोदींची सभा सुरू असतानाच नागरिक सभेतून बाहेर पडल्याचे चित्र होते. परिणामी माध्यमांमध्ये मोदींची ‘क्रेझ’ घटल्याच्या बातम्या सुरू झाल्या होत्या. त्यामुळे एकाच वेळी गर्दी करण्यासह सभा सुरू असताना कार्यकर्ते बाहेर पडू नयेत यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पिंपळगावची सभा दुपारच्या वेळेस आहे. त्यामुळे ही शक्यता गृहित धरून आजूबाजूला कडे उभारा, परंतु, लोकांना सभा सुरू असताना बाहेर पडू देऊ नका, अशा सूचना देण्याच आल्याचे समजते.

सापांनी वाढविली धास्ती

दरम्यान, मोदींची सभा उघड्या मैदानावर आहे.या ठिकाणी सापांचेही वास्तव्य आहे, तसेच सभेत गडबड करण्यासाठी साप सोडले जाण्याचीही प्रशासनाला धास्ती आहे. त्यामुळे प्रशासनाने या सभेच्या ठिकाणी ३० ते ४० सर्पमित्र तैनात करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी जिल्हाभरातील सर्पमित्राकडून आधार कार्ड, तसेच पासपोर्ट साइजचे फोटो मागविण्यात आले आहेत. या सर्पमित्रांनी आम्हाला सभेसाठी स्वतंत्र ड्रेसकोड द्यावा, अशी अजब मागणी प्रशासनाकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकंदरीतच मोदींच्या सभेत एकाच वेळी हुल्लडबाजी करण्यासह कांदे फेकण्याचा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड रेल्वे पोलिस स्टेशनचे होणार संग्रहालय

$
0
0

सर्वसामान्यांना मिळणार अनोखी माहिती

...

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

नाशिक : मध्य रेल्वेने त्यांच्या ताब्यातील जुन्या वास्तूंना पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गतच नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील पोलिस स्टेशनचा कायापालट करून तेथे रेल्वे संग्रहालय तयार करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू आहे.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील पोलिस स्टेशनच्या जागेवरच मुख्य स्टेशन होते. ८ जानेवारी १८६१ रोजी इगतपुरी ते न्यायडोंगरी ही रेल्वेसेवा सुरू झाली. नाशिकच्या या वास्तूची निर्मिती भगवंतसिंग कपुर्स कन्स्ट्रक्शन कंपनीने केली. या दगडी इमारतीतून नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा कारभार व्हायचा. कालांतराने रेल्वे स्टेशनचा विस्तार वाढल्याने जुन्या दगडी इमारतीला लागूनच नवीन कॉँक्रीटची इमारत उभी राहिल्याने या रेल्वे स्टेशनचा विसर पडला. मध्ये रेल्वेने जुन्या वास्तूंना पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिकरोडच्या या जागेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

...

पोलिस स्टेशन जाणार

दगडाच्या भिंतींवर चढवलेले रंगाचे थर काढण्यात येणार आहेत. या जागेतील पोलिस स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर जाणार आहे. नाशिक हे ऐतिहासिक, धार्मिक ठेवा असलेले शहर आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर पर्यटकांना रेल्वेचा इतिहास पाहता यावा, याकरिता या वास्तूमध्ये रेल्वे संग्रहालय करण्याचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे.

..

असे असणार संग्रहालय

रेल्वेची झालेली स्थित्यंतरे, सिग्नल यंत्रणा, संदेश वहनातील बदल अशी बहुविध प्रकारची माहिती या संग्रहालयातून मिळणार आहे. तसेच, देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनला देखील पुनर्वैभव प्राप्त करून दिले जाणार आहे. हा उपक्रम प्राथमिक अवस्थेत आहे.

…...

ही वास्तू अत्यंत पुरातन आहे. या वास्तूला पुनर्वैभव प्राप्त होणार आहे. मध्य रेल्वेने तेथे संग्रहालय करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वेचा इतिहास समजण्यास मदत होईल.

- मधुकर सोनवणे, निवृत्त इंजिनीअर, मध्य रेल्वे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक आयोगही ‘अॅक्टिव्ह’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या पाठोपाठ महाराष्ट्र निवडणूक आयोगही सोशल मीडियावर अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रबोधनपर पोस्ट, व्हिडीओ आणि मेसेजेस मतदारांकडून लाइक केले जात असून, आयोगाच्या वेबसाइटला २ कोटींहून अधिक मतदारांनी भेट दिली आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सोशल मीडियावर चांगलाच रंगात आला आहे. प्रत्येक उमेदवार नवनवीन कल्पना लढवत सोशल मीडियाद्वारे मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. उमेदवारांचाच सोशल मीडियावरील प्रचार तेजीत आहे असे नाही, तर महाराष्ट्र निवडणूक आयोगही ऑनलाइन सक्रीय आहे. त्यामुळे मतदारांना अचूक माहिती मिळणे सोपे झाले आहे. निवडणूक आयोगाने नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत फेसबुक, ट्विटरसह युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर खाते तयार केले आहे. या खात्यावर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. व्हीव्हीपॅटचा उपयोग कसा करायचा, त्यासह निवडणूक आयोगाच्या अॅप्सची माहिती सोशल मीडियाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचत आहे.

महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ या वेबसाइटला २ कोटींहून अधिक मतदारांनी भेट दिली आहे. @CEO_Maharashtra या नावाने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर आयोगाचे खाते आहे, तर Chief Electoral Officer Maharashtra या नावाने फेसबुकवर खाते आहे. आयोगाने आतापर्यंत १ हजार २४६ ट्विट्स केले असून, इन्स्टाग्रामवर ६९० पोस्ट अपलोड केल्या आहेत. खास बाब म्हणजे, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आयोगाचे हजारो फॉलोवर्स आहेत. या खात्यांवर मतदानाच्या तारखा, आयोगाची हेल्पलाइन यासह इतर माहिती अपडेट करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांना एका क्लिकवर माहिती मिळविणे सोपे झाले आहे. त्यामुळे उमेदवारांसोबत आयोगानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रभावशाली मार्ग अवलंबल्याचे दिसून येते आहे.

--

\Bअसे आहेत फॉलोवर्स\B

\Bवेबसाइट - \B२ कोटी ५७ लाख ३८ हजार ८१५ व्हिजिटर्स

\Bइन्स्टाग्राम - \B२ हजार ३१३

\Bफेसबुक - \B७७ हजार ८१८

\Bट्विटर - \B२२.८ हजार

\Bयुट्यूब -\B ५६३ सबस्क्राइबर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अवकाळी’ने पाणीपुरवठा विस्कळीत

$
0
0

तीन दिवसात होणार पाणीपुरवठा सुरळीत

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या दोन दिवसांपासून शहरासह तालुक्याला ठिकठिकाणी वादळी वारा व अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. अनेक ठिकाणी वीज कोसळली. त्यामुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होवून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरात मंगळावरपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सायने व दहिवाळ सबस्टेशन ते गिरणा पंपिंग स्टेशन दरम्यान १७ किमी वीजवाहिनी वारंवार नादुरुस्त होत असल्याने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागत आहे. तब्बल १६ ते १८ तासांनंतर वीजपुरवठा बुधवारी सुरळीत झाल्याने शहरात दुपारी पाणी पोहचले असे असले तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्यास तीन दिवस लागणार असून, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शहरासह तालुक्यात रविवारपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाबरोबरच मोठ्या प्रमाणात वादळ वारा व विजांचा कडकडाट झाल्याने झाडे उन्मळून पडणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडल्या. यामुळे शहरात मंगळवारी सायंकाळपर्यंत वीजपुरवठा विस्कळीत होता. शहरातील वीजपुरवठा सुरळीत झाला असला तरी शहरातील पाणीपुरवठा मात्र अद्याप सुरळीत होऊ शकलेला नाही. गिरणा पंपिंग स्टेशनला सायने व दहिवाळ सबस्टेशन येथून वीजपुरवठा होत असतो. सबस्टेशन ते पंपिंग स्टेशन या १७ किमी विद्युत वाहिनी दरम्यान गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारा व विजांच्या कडकडाटामुळे मोठे नुकसान झाले. तारा तुटणे, इन्सुलेटर फुटणे असे तांत्रिक बिघाड झाल्याने वीज वितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. बुधवारी दुपारी वीजपुरवठा सुरळीत झाल्याने शहरातील जलकुंभामध्ये पाणी पोहचायला सुरुवात झाल्याची मनपाचे विद्युत अभियंता अभिजित पवार यांनी सांगितले.

शहरात सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. सोमवारपासूनच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने बुधवारी शहरात पाणी पोहचले. मात्र पाणीपुरवठा सुरळीत होण्यास तीन दिवस लागतील अशी माहिती अभियंता सचिन माळवळ यांनी दिली. शहरात सोमवारी, मंगळवारी ज्या भागात पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. त्या भागात दोन दिवस उशिराने म्हणजे बुधवारी दिवसभरात पाणीपुरवठा केला जात होता. मात्र पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने जलवाहिनी कोरड्या पडल्याने कमी दाबाने पाणी येणे, पाणीपुरवठा उशिराने होणे अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी शहरातील कॅम्प, संगमेश्वर, निहालनगर, आझादनगर भागात सकाळी होणार पाणीपुरवठा यामुळे उशिराने होणार आहे. शहरातील पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत व्हावा यासाठी पाणीपुरवठा व विद्युत विभागाकडून युद्धपातळीवर काम सुरू असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे व पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जेथे जातो तेथे समस्यांचा पाढाच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या पाच वर्षात नाशिकसह तालुक्याचा विकासच खुंटला आहे. जेथे मी नागरिकांना भेटण्यासाठी जातो तेथे नागरिकांनी केवळ समस्यांचाच पाढा वाचत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक लोकसभा मतदार संघाचे उमेदवार समीर भुजबळ यांनी एकलहरे येथे केली. या समस्या न सोडवणे हे सरकारचे अपयशच असल्याचे ते म्हणाले.

एकलहरे परिसरात विविध गावांत प्रचार करीत त्यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी नाशिक तालुक्यातील शेती, पिण्याचे पाणी तसेच इतर मूलभूत समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासनही दिले. यावेळी गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून मिरवणूक काढली. यावेळी माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव, पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंभळे, विष्णूपंत म्हैसधुणे, राजाराम धनवटे, निवृत्ती अरिंगळे, मनोहर बोराडे आदी उपस्थित होते. माडसांगवी, एकलहरे, सिद्धार्थनगर, गंगावाडी, सामनगाव, कोटमगाव, मोहगाव, बाभळेश्वर, हिंगणवेढे, गंगापाडळी, कालवी या गावांमध्ये जाऊन भुजबळ यांनी ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेतल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेमिचंद राका यांचा जैन सेवा संघातर्फे सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री जैन सेवा संघाच्यावतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने नेमिचंद राका यांना सन्मानित करण्यात आले. गेल्या ६० वर्षांपासून भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव आयोजित करण्यात त्यांनी विशेष योगदान दिले आहे. या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.

शहरातील जैन समाजबांधवांना एकसंघ करून महावीर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी व्हावी, यासाठी राका यांनी कठोर परिश्रम घेतले आहे. १९६० मध्ये अशोक मुनीजी यांनी नाशिकमध्ये जैन बांधवांना एकत्र करत जैन सेवा संघाची स्थापना केली. त्यानंतर अ‍ॅड. विजय लोहाडे, अ‍ॅड. दीपचंद बेदमुथा, अ‍ॅड. चंपालाल बोरा, सुमतीलाल शहा, चौधरी पंडीतजी, रसिकलाल शहा आणि त्यानंतर नेमिचंद राका यांनी संघातर्फे महावीर जयंती साजरी करण्यास हातभार लावला. या विशेष कार्याची दखल घेत जैन कॉन्फरन्स नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष मोहनलाल चोपडा, राजेंद्र शहा, संघपती राजमल भंडारी, जे. सी. भंडारी, जैन सेवा संघाचे अध्यक्ष पवन पटणी, सेक्रेटरी सचिन गांग, सुनील कासलीवाल यांनी नेमीचंद राका यांनी राका यांचा गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटरसायकल चोरट्यांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह ग्रामीण भागातून मोटरसायकलींची नंबर प्लेट बदलून त्या कमी किंमतीत ग्राहकांच्या गळ्यात मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. संशयितांकडून तीन लाख रुपये किंमतीच्या पाच मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

नरेंद्र रवी वाघ (वय १९, रा. टेलिफोन कॉलनी, भवानीनगर, दिंडोरी), हेमंत उर्फ सन्नी दगडु शेळके (वय १८ , रा. कोकणगाव खुर्द, ता. दिंडोरी) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांचे अन्य तीन साथीदार मात्र अद्याप पोलिसांना मिळू शकलेले नाहीत. संशयित दिंडोरी बस स्टॅण्ड परिसरात चोरीच्या मोटर सायकल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस निरीक्षक अशोक करपे, उपनिरिक्षक स्वप्नील नाईक, संदीप कहाळे, सहायक उपनिरीक्षक रामभाऊ मुंढे, पोलीस हवालदार दीपक आहिरे, प्रकाश तुपलोंढे, जयवंत सूर्यवंशी, संजय गोसावी यांच्या पथकाने दिंडोरी बस स्टॅण्ड परिसरात सापळा रचला. दोन संशयित काळ्या रंगाच्या पल्सर मोटर सायकलवर दिंडोरी बस स्टॅण्ड परिसरात येताना दिसताच पोलिसांनी त्यांना पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पल्सर मोटर सायकलचे कागदपत्र व लायसन्सची मागणी केली असता ते उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागले.

ओझर विमानतळ रोड परिसरातून मोटरसायकल चोरल्याची कबुली त्यांनी दिली. ओझर, पिंपळगाव, कळवण व नाशिक शहरातील म्हसरूळ, पंचवटी परिसरातून मोटरसायकली चोरल्याची कबुली त्यांनी दिली. सहा गुन्हे उघडकीस आले असून आणखी काही मोटरसायकल मिळून येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१९६७ मध्ये सर्वाधिक ६५.७९ टक्के मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत झालेल्या निवडणुकांत सर्वाधिक मतदान १९६७ साली ६५.७९ टक्के इतके झाले होते. त्याखालोखाल १९१४ मध्ये ५८.८३ टक्के तर तिसऱ्या क्रमांकावर १९९९ मध्ये ५७.८८ टक्के मतदान झाले आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघात १९५१ मध्ये सर्वप्रथम निवडणूक घेण्यात आली. २०१४ पर्यंत एकूण १६ वे‌ळा निवडणुका पार पडल्या. यात मतदारांनी १९६७ साली सर्वाधिक मतदान केले. यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघात ४ लाख ३६ हजार ८७५ मतदार होते. त्यापैकी २ लाख ८७ हजार ४३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावर्षी सर्वात जास्त म्हणजेच ६५.७९ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर मतदानाचा हा विक्रम अद्याप मोडला नाही. यानंतर २०१४ मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मतदान झाले. यावे‌ळी नाशिक लोकसभा मतदार संघातील मतदारांची संख्या १५ लाख ९३ हजार ७७४ इतकी होती. त्यापैकी ९ लाख ३७ हजार ६०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी एकूण मतदानापैकी ५८.८३ टक्के मतदान झाले. यानंतर १९९९ साली झालेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकासाठी मतदान झाले. यावेळी १३ लाख ४४ हजार ७५५ मतदारांपैकी ७ लाख ७८ हजार २८४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ५७ .८८ टक्के मतदान झाले. गेल्या १६ निवडणुकांमध्ये सर्वात कमी मतदान हे २००४ च्या निवडणुकीत झाले. यावेळी ९ मतदार रिंगणात होते. आजपर्यंत सर्वात जास्त मतदान १९६७ मध्ये झाले असल्याची नोंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिकअप-दुचाकी धडकेत युवक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

म्हसरुळ-मखमलाबाद लिंकरोडवरील तारांगण सोसायटीसमोर पिकअप आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाला. विशाल शांताराम गांगुर्डे (वय १९, रा. पीयूष बंगला, नयन हॉटेलमागे, पेठरोड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

रोहित सुभाष दळवी (वय १९, रा. चाणक्यपुरी सोसायटी, म्हसरुळ), प्रतीक देशमुख (वय १९, रा. बोरगड) या दोघांसोबत विशाल गांगुर्डे हा (एमएच १५ जी एफ ६३३९) या दुचाकीवरून म्हसरुळ-मखमलाबाद लिंक रोडहून म्हसरुळकडे जात होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने लिंक रोडने मखमलाबादकडे येणाऱ्या पिकअप (एमएच १५एफ पी ७५७९) ने धडक दिली. या अपघातात विशाल गांगुर्डे हा तरुण ठार झाला, तर त्याचे दोघे मित्र गंभीर जखमी झाले. अपघातातील दोघा जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसस्थानकात तरुणाचा खून

$
0
0

चांदवडमधील घटना; तणावपूर्ण वातावरण

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

तालुक्याचे वर्दळीचे ठिकाण असलेल्या चांदवड बसस्थानकात बुधवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास सद्दाम फारुख शेख (वय २५, रा. नाईकवाडा पुरा, चांदवड) या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने छाती तसेच पोटात वार करण्यात आले. त्यास उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याचा मूत्यू झाल्याचे सांगितले. आरोपीस अटक व्हावी, अशी मागणी मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण झाले होते.

सद्दाम फारुख शेख हा स्वत:ची मालवाहू पिकअप वाहन चालवत असे. प्रेम निवृत्ती पवार (रा. आडगाव ता. चांदवड) या मित्रासोबत तो बस स्थानकावरील रसवंतीगृहासमोर बोलत होता. अज्ञात कारणावरून त्यांच्यात वाद झाला. यात प्रेम पवार याने तीक्ष्ण हत्याराने सद्दामच्या छाती तसेच पोटावर वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत सद्दाम जमिनीवर कोसळला. उपस्थित लोकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच त्याचा मोठा भाऊ इम्रान यास मोबाइलवर माहिती कळवित बोलविण्यात आले. उपचार सुरू असतांना सद्दामचा मृत्यू झाला. दरम्यान, सद्दामवर हल्ला करणारा प्रेम पवार गर्दीतून पसार झाला.

इम्रान शेख याने चांदवड पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार चांदवड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. या घटनेची माहिती कळताच शहरातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रागसुधा आर यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजगर्जनेमुळे महायुतीत अस्वस्थता

$
0
0

मनसेतर्फे सभेचे नियोजन सुरू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभेसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणाऱ्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवार, २६ एप्रिल रोजी ही सभा होणार आहे. गोल्फ क्लब मैदानावर सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या सभेच्या यशस्वीतेसाठी नियोजन सुरू आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना महायुतीत अस्वस्थता वाढली आहे.

महायुतीच्या उमेदवारांसाठी नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २२ एप्रिल तर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची २४ एप्रिल रोजी सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या सभेचेही नियोजन सुरू आहे. मात्र, नाशिककरांना राज ठाकरे यांच्या सभेबद्दल उत्सुकता आहे. गेल्या वेळी छगन भुजबळांवर ठाकरेंनी जहरी टीका केल्याने यंदा नाशिकमध्ये सभा होणार की नाही, याबाबतचा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, राज ठाकरेंनी नाशिकमध्ये सभा घ्यावी, असा आग्रह मनसैनिकांकडून ठाकरेंनाही करण्यात आला. त्यामुळे अखेरीस नाशिकमधल्या सभेबाबत ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, शहराध्यक्ष अनिल मटाले, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, मनसेचे गटनेते सलीम शेख यांच्यासह मनसेचे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात २६ एप्रिल रोजी नाशिकमध्ये सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

आघाडीत आनंदाचे वातावरण

राज ठाकरेंच्या सभा यशस्वी ठरत असल्याने भाजप- शिवसेनेच्या गोटात आधीच धडधड निर्माण झाली आहे. ठाकरे प्रत्येक सभेत नवीन मुद्दा पुराव्यानिशी मतदारांसमोर मांडत असल्याने ठाकरेंच्या सभा गेमचेंजर ठरत आहेत. नाशिक शहर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे, तर शिवसेना विरोधी पक्षात आहे; परंतु नाशिकची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे ठाकरेंकडून नाशिकच्या विकासासह भाजप-शिवसेनेकडून झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेने एकीकडे आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर महायुतीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंढरीची वारी न केलेल्यांना तुरुंगवारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी पुन्हा नाशिकमध्ये माजी मंत्री छगन भुजबळांच्या कुटुंबाला लक्ष्य केले आहे. छगन भुजबळ यांनी आता संन्यास घायला पाहिजे. सभा दिसली की त्यांना बळ येते आणि कोर्टाची तारीख आली की छातीत कळ येते, असा टोला लगावत ज्यांनी पंढरपूरची वारी न करता तुरुंगवारी भोगली, अशांना नाशिककर मतदान करणार का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. नाशिक मतदारसंघातून महायुतीचा उमेदवारच निवडून येईल असा दावाही राऊत यांनी केला.

सातपूरला अशोकनगर येथे युतीचे लोकसभेचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, व्याख्याते नितीन बानगुडे पाटील, आमदार सीमा हिरे, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेते दिनकर पाटील, गटनेते विलास शिंदे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, नगरसेविका माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, राधा बेंडकोळी, नयना गांगुर्डे यांसह भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. नाशिकमध्ये तुरुंगवीर उभे आहेत. पण त्यांचा आतापत्ताच नाही, असा टोला लगावत, तुरुंगातील भत्ता खाऊन जॉगिंग ट्रॅकवर फिरत ते वजन कमी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यांच्या आत्मविश्वासाला दाद द्यायला पाहिजे. अंधार समोर दिसत असतानाही युद्ध करायची ताकद शाहिस्तेखान आणि अफजलखानाला होती आणि त्यानंतर भुजबळ यांच्यात असल्याचा टोला त्यांनी लगावला. देशाची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी खंबीरपणे मतदारांनी उभे रहावे, असे आवाहन खासदार राऊत यांनी केली. काँग्रेसकडे पंतप्रधानाचा उमेदवार नक्की कोण याबाबत मतदारांमध्येच संभ्रम आहे. यासाठी महायुतीचे एकमेव पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले मोदी हेच असल्याचे राऊत म्हणाले. देशातील राष्ट्रवाद, हिंदूत्व धोक्यात आले आहे. पश्चिम बंगालपासून सगळीकडे कोथळे काढण्याचं काम सुरू केलंय. फैजल अहमद नावाच्या प्रचारकाला बांगलादेशमधून ममता बॅनर्जी यांनी प्रचाराला बोलावलं, पाकिस्तानपेक्षा जास्त त्रास बांगलादेशचा आहे. पंतप्रधानपदासाठी ममतांचे नाव भुजबळ घेताहेत. त्यांना आधी नाशिकमधून हद्दपार करा, असे आवाहन करीत, जगभरात मोदींचा उल्लेख 'बॉस' म्हणून केला जातो असेही ते म्हणाले.

गरिबी हटलीच नाही

यावेळी शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनीही काँग्रेसवर हल्लाबोल केला. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी पंतप्रधान मोदी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसच्या काळात केवळ 'गरिबी हटाव'चा नारा देण्यात आला. परंतु, तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ सत्ता भोगूनही आजही राहुल गांधी 'गरिबी हटाव'चा नारा देत असल्याचे सांगतात. देशासाठी ही शोकातिंका असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. देशाच्या सुरक्षेसाठी या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना मतदान करावे असे आवाहनही बानगुडे पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारसाहक्क : १

$
0
0

(सीरिज)

जागतिक वारसादिन विशेष

पुरातत्त्व कायद्यात अडकली वारसास्थळे!

वास्तू संरक्षित करण्याचे अधिकार संचालकांकडेच हवेत; श्रेणी तयार करण्याची गरज

ramesh.padwal@timesgroup.com

MTRameshp

नाशिक : कायद्याची चौकट ही नियमात राहून काम सुरळीत चालावे यासाठी असते. मात्र, काळानुरूप त्यात बदल झाले नाहीत तर हा कायदा कामात अडथळे निर्माण करू लागतो, अशी स्थिती आहे राज्य पुरातत्त्व कायद्याची. वास्तू संरक्षित करण्याचे अधिकार थेट संचालकांकडे नसल्याने अनेक प्रस्ताव मंत्रालय पातळीवर लाल फितीत अडकले आहेत. राज्यातील अनेक ऐतिहासिक व पुरातत्त्वीय वास्तूंना किमान कायद्याचे संरक्षण हवे आहे. त्यासाठी श्रेणीनुसार ऐतिहासिक वास्तूंची रचना केल्यास राज्यातील शेकडो ऐतिहासिक वास्तू मातीमोल होण्यापासून वाचविली जाऊ शकतात.

राज्य पुरातत्त्व विभागाचे कामकाज महाराष्ट्र प्राचीन स्मारक आणि पुराणवास्तूशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० (१९६१चा महाराष्ट्र अधिनियम क्र.१२) या ६० वर्षे जुन्या कायद्यानुसार चालते. यात काळानुरूप बदलही झालेले नाही. त्यामुळे एखादी वास्तू संरक्षित करण्याची मागणी विभागीय कार्यालयाकडून प्रस्तावाद्वारे केली जाते. हा प्रस्ताव राज्य पुरातत्त्व संचालक आवश्यकतेनुसार राज्य सरकारकडे पाठवितात. मात्र, मंत्रालय पातळीवर आर्थिक तरतूद नसल्याचे कारण देत प्रस्ताव नाकारले जातात. असे अनेक प्रस्ताव सध्या मंत्रालयात धूळ खात पडून आहेत. यामुळे 'संरक्षित वास्तू' म्हणून कायद्याच्या संरक्षणाची गरज असतानाही राज्यातील वारसास्थळे बेवारसपणे अतिक्रमणे व हेळसांड यामुळे जमीनदोस्त होत आहेत. अशा वास्तू, स्थळे नंतर काही वर्षांनी संरक्षित करायला घेतल्यास त्यांचा खर्चही वाढतो अन् मेहनतही वाया जाते.

राज्यातील अनेक वास्तूंना आर्थिक नव्हे, तर कायद्याने संरक्षित असल्याचा शिक्कामोर्तब करण्याची गरज आहे. राज्य सरकारने संरक्षित वास्तूंची यादी श्रेणीनुसार केल्यास अनेक वास्तूंना संरक्षण मिळू शकते. यात 'अ' श्रेणीतील वास्तूंना तातडीने लक्ष देण्याची गरज, 'ब' आर्थिक तरतुदीनुसार कामांची गरज, तसेच 'क' अशा पद्धतीने वास्तूंची श्रेणी करून कोणत्या वास्तूंना तातडीने आर्थिक गरज आहे, याची यादी करून निर्णय घ्यायला हवा. तसेच 'ड' श्रेणी करून ज्या वास्तूंना संरक्षित करायचे आहे; मात्र आर्थिक तरतूद नाही अशा वास्तू 'ड' श्रेणीत घेऊन त्यांना कायद्याने संरक्षित जाहीर करण्याचे अधिकार थेट पुरातत्त्व संचालकांना द्यायला हवेत. असे केल्यास या वास्तूंना कायद्याने संरक्षण मिळाल्याने त्या वास्तूंची होणारी हेळसांड नक्कीच थांबेल. भविष्यात त्या वास्तूंवर आर्थिक तरतुदीसाठी गरजेनुसार मंत्रालय पातळीवर प्रस्ताव पाठवून त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करता येतील. सध्या कायद्याचे संरक्षण मिळाल्याने कायद्याच्या भीतीने का होईना त्याची हेळसांड व होणाऱ्या अतिक्रमणांपासून त्याचे संरक्षण होऊ शकेल. सध्या राज्यात साधारण ४०० संरक्षित वास्तू आहेत. दोनशेहून अधिक प्रस्ताव मंत्रालयात पडून आहेत, तर राज्यातील हजारहून अधिक वास्तूंना किमान कायद्याने संरक्षणाची गरज आहे.

राज्य सल्लागार मंडळच नाही

१९६० च्या पुरातत्त्व कायद्यानुसार संरक्षित स्मारके सुस्थितीत राखण्याबाबत राज्य सरकारला सल्ला देण्यासाठी राज्य सरकारने सल्लागार मंडळाची स्थापना करायला हवी. मात्र, गेल्या ६० वर्षांत याची अंमलबजावणीच झालेली नाही. किल्ल्याबाबत राज्य सरकारने अशा मंडळाची स्थापना केली आहे. मात्र, पुरातत्त्व वास्तूंच्या संरक्षणासाठी अशा स्वरूपाचे मंडळ केव्हा स्थापन करणार, असा सवाल या क्षेत्रातील मान्यवरांकडून केला जात आहे.

(क्रमश:)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारी 'सिम्पल स्टेप्स

लक्ष्मण महाडिक यांची भारतीय काव्योत्सवासाठी निवड

$
0
0

महाडिक यांची

काव्योत्सवासाठी निवड

नाशिक : गोवा येथे होणाऱ्या अखिल भारतीय बहुभाषिक काव्योत्सवात पिंपळगाव बसवंत येथील कवी व बी. के. कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण महाडिक यांची निवड झाली आहे. २० व २१ एप्रिल रोजी होणाऱ्या या दोन दिवस काव्योत्सवाचे उद्घाटन साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव, कोकणी कवी प्रकाश पाडगावकर, बोडो परामर्श मंडल साहित्य अकादमीचे अनिल बोडो व कोकणी परामर्श मंडल साहित्य अकादमीचे भूषण भावे, साहित्य अकादमी मुंबईचे कार्यक्रम अधिकारी ओम प्रकाश नायर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींच्या सभेत पेन्शनरचा धसका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत येथील सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतापाचे वादळ घोंगावत असताना आता पेन्शनर्सच्या आंदोलनाचा धसका भाजपने घेतला आहे. या पेन्शनरनी अगोदरच पंतप्रधानांना दिलेले आश्वासन भाजपने पाळले नसल्याने सभेत 'नो वोट'ची भूमिका जाहीर करणार आहे. जिल्ह्यात 'ईपीएस ९५' अंतर्गत ४० हजार पेन्शनर असून, त्यांची मोठी संख्या निफाड व दिंडोरी तालुक्यात आहे. त्यात नगर जिल्ह्यातील पेन्शनर या आंदोलनात सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपची चिंता अधिकच वाढली आहे.

पाच दिवसांपूर्वीच नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनचे पंतप्रधानांच्या सभेत गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी या आंदोलनासाठी टोप्या व फलकही बनवण्याचे काम सुरू केले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर आता दबाव टाकणे सुरू केले आहे. फोनाफोनी करून त्यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावले जात आहे. आंदोलन केल्यास गुन्हा दाखल करू, असा इशाराही दिला जात आहे. त्यामुळे हे पेन्शनर अधिकच भडकले आहेत.

भाजपने पाच वर्षांपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याबद्दल पेन्शनर्स संतप्त आहेत. त्यामुळे त्यांनी अगोदरच 'भाजपला मतदान का करावे?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. पेन्शनर्स फेडरेशनेने 'नो कोशाहारी, नो वोट' ही भूमिकाही जाहीर केली आहे. कांदा उत्पादक शेतकरी अगोदरच भडकले आहेत. त्यामुळे त्यात या पेन्शनरनी आंदोलन केले तर त्यांना आवरणेही अवघड होऊन बसणार आहे. त्यांना रोखताना बळाचा वापर करता येणार नसल्यामुळे पोलिसांची अडचण वाढली आहे. त्यामुळे त्यांनी दबावतंत्राचा वापर सुरू केला असला तरी पेन्शनर मात्र अजूनही आंदोलनावर ठाम आहे.

काय आहे प्रश्न‌?

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी 'ईपीएफ ९५' पेन्शनरांना भगतसिंग कोशाहारी रिपोर्टप्रमाणे तीन हजार अधिक महागाई भत्ता, असे आश्वासन २३ फेब्रुवारी २०१४ ला दिले होते. आम्ही सत्तेत आल्यावर ९० दिवसांच्या आता पेन्शनवाढ दिली जाईल, असे ते त्यावेळी म्हणाले होते. त्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेऊन ६३ लाख पेन्शनरांनी मतदान केले. भाजप सत्तेत आल्यानंतर सरकारने हे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे पेन्शनरनी दिल्लीबरोबर जिल्हास्तरावरही आंदोलन केले. पण, त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे हे पेन्शनर संतापले असून, आता ते थेट मोदींनाच सभेच्या ठिकाणी जाब विचारणार आहेत. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images