Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘वॉटर्स एज’च्या खेळाडूंची राज्यात कामगिरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'नाशिक वॉटर्स एज बोट क्लबच्या खेळाडूंनी शिवछत्रपती पुरस्कार, दोन एशियन स्पर्धा तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय नौकानयन खेळात प्रभावशाली कामगिरी केली आहे,' प्रतिपादन बोट क्लबचे संस्थापक तथा माजी महापौर प्रकाश मते यांनी केले.

वॉटर्स एज बोट क्लबच्या खेळाडूंचा गौरव समारंभ नंदनवन लॉन्स येथे नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक अंबादास तांबे, खेळाडू वैशाली तांबे, संतोष कडाळे, पूजा जाधव, राजेंद्र सोनार जागृती शहारे, तुषार कडाळे, मुकेश राजगुरू, मृण्मयी साळगावकर, मयूर मसाळ, किरण कोते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

मते म्हणाले,'नाशिकच्या खेळाडूंना रोईंग या खेळामध्ये कामगिरी करता यावी या उद्देशाने बोट क्लबची स्थापना केली तो हेतू पार पाडत असून, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा विविध स्पर्धेत पदके मिळवून खेळाडूंनी नोकरीदेखील मिळवलेली आहे.'

यावेळी माजी नगरसेवक दामोदर मानकर यांनीही नौकानयनमधील खेळाडूंच्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच त्यांनी स्थापन केलेल्या नारायण मानकर प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कारासाठी मृण्मयी साळगावकर हिची निवड केली. माजी नगरसेवक तथा बोटक्लबचे उपाध्यक्ष विक्रांत मते यांनी रोईंगमधील महाराष्ट्राच्या संघात ७५ टक्के नाशिक वॉटर एज बोट क्लबच्या खेळाडूंचा समावेश असणे ही बाब नाशिककरांसाठी दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे सांगितले. बोट क्लबच्या खेळाडूंना आपण मदतीसाठी सदैव तत्पर राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निलेश साळगावकर, प्रा. हेमंत पाटील, के. बी. अडसरे, रवींद्र बोडके, शशिकांत टर्ले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशिक्षक अंबादास तांबे, सूत्रसंचलन प्रा. सोपान एरंडे यांनी तर आभार शशिकांत टर्ले यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रताप देशमुख मिलिंद कदम, तुषार ठाकरे, सुमंत खांदवे, डी. डी. जाधव, भाऊराव सानप, श्रावण जाधव, अविनाश देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुकणेचे पाणी अडकले आचारसंहितेत

$
0
0

प्रकल्पाचे काम पूर्ण मात्र पाणीपुरवठ्याबाबत संभ्रम

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील आदर्श आचारसंहितेचा फटका जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेलाही बसला आहे. मुकणेचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून, त्याची चाचणीही यशस्वी झाली आहे. परंतु, निवडणुकीत या योजनेचा प्रत्यक्ष लाभ दिल्यास आचारसंहितेचा भंग होण्याची प्रशासनाला धास्ती वाटते. त्यामुळे हा वाद ओढवून घेण्याऐवजी निवडणूक संपल्यानंतर मुकणेचे पाणी उचलण्याचे नियोजन केले जात आहे.

केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत नाशिक शहराच्या सन २०४१ पर्यंतच्या लोकसंख्येचा अंदाज बांधत मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. एकूण २६८ कोटींची ही योजना पूर्णत्वास आली आहे. संबंधित ठेकेदाराला मार्च १९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार काम पूर्ण झाले असून, या योजनेची चाचणीही यशस्वी झाली आहे. मुकणे धरणात यंदा नाशिकसाठी ३०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे एप्रिलपासून हे पाणी उचलण्याचे प्रशासनाचे प्रयत्न होते. परंतु, आचारसंहिता लागू झाल्याने पाणी उचलण्याचा मोठा अडसर उभा राहिला आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले तरी पाणीपुरवठा मात्र अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, सद्यस्थितीत लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असल्यामुळे प्रकल्प सुरू केल्यास आचारसंहिताभंगाचे संकट येऊ शकते, अशी भीती प्रशासनाला वाटत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू करण्याचा विचार केला जात आहे.

...

पहिल्या टप्प्यात पाथर्डीला लाभ

मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजनेचा सर्वाधिक लाभ पाथर्डी फाट्याला होणार आहे. त्यानंतर सिडकोचा काही भाग आणि इंदिरानगर परिसरात हे पाणी पोहचणार आहे. निवडणूक काळात पाणीपुरवठा केल्यास आणि कोणी त्याची थेट तक्रार केल्यास प्रशासनाची अडचण होऊ शकते. त्यामुळे प्रसासनाने सध्या या प्रकल्पाबाबत आस्ते कदमची भूमिका घेतली आहे. यामुळे स्थायी समिती, विषय समित्यांपाठोपाठ आता मुकणेचा मुहूर्तही हुकला आहे. त्यामुळे नाशिककरांना निवडणुकीनंतरच मुकणेचे पाणी मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप - चित्र

राष्ट्रीय बॉक्सरपटू अमोल मोरेंचे निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भगूर येथील बॉक्सर आणि हॉटेल अंबिकाचे संचालक अमोल खुशीराम मोरे (वय ४२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. भगूरचे सामाजिक कार्यकर्ते खुशीराम रामचंद्र मोरे यांचे पुत्र होत.

अमोल मोरे यांनी नूतन विद्यामंदिरात शालेय शिक्षण घेऊन भाटिया कॉलेज रोड येथे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. लहानपणापासून कराटे, बॉक्सिंग यांची त्यांना आवड होती. राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी बॉक्सिंग स्पर्धेत चमक दाखवली. अनेक ठिकाणी त्यांनी पंच म्हणूनही काम केले. भगूर देवळाली नाशिकरोड बॉक्सिंग असोसिएशन स्थापना त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तिभावात रंगला रथोत्सव

$
0
0

नाशिककरांच्या अमाप उत्साहात रामरथाची मिरवणूक

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सनई चौघड्याचे सूर, कपालेश्वराच्या पालखीचा नाद, पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात 'सियावर रामचंद्र की जय'च्या जयघोषात मंगळवारी संध्याकाळी रथोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी नाशिककरांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीरामाला उपस्थितांनी वंदन केले.

अनादी काळापासून ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या श्रीरामरथ व गरुड रथोत्सवाला भागवत एकादशीच्या दिवशी मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता काळाराम मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. दुपारी चार वाजता गरुड रथाचे मानकरी, रामरथाचे मानकरी, पूजाधिकारी घराण्याचे प्रतिनिधी यांचा मंदिर प्रशासनाच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ढोलताशाच्या निनादात 'जय सीता राम सीता', 'सियावर रामचंद्र की जय', 'महारुद्र हनुमान की जय'च्या जयघोषात रामाच्या उत्सवमूर्ती वाजतगाजत मंदिराबाहेर आणण्यात आल्या. भावपूर्ण वातावरणात रामाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांनी 'सियावर रामचंद्र की जय'चा एकच जयघोष केला. मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर यंदाचे मानकरी श्रीकांतबुवा पुजारी यांनी त्या गरुड रथात ठेवल्या. तेथे पुजारी कुटुंबीयांतर्फे व राममंदिराच्या विश्वस्तांतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दोन्ही रथ पूर्वदरवाजाजवळील रामनाम आधाराश्रमजवळ येताच ब्रह्मवृंदाकडून गरुड रथातील मूर्तींची आरती श्रीकांतबुवा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर गरुड रथातील मूर्ती पालखीने रामरथात आणण्यात आल्या. तेथेही पुजारी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. रामाच्या रथाला व गरुडाच्या रथाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यंदा एलईडी लाइटच्या माळा लावण्यात आल्या होत्या. यावेळी दोन्ही रथावर राजकीय नेत्यांची हजेरी होती. यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी रामरथावर हजेरी लावली. रामरथ ओढण्याचा मान रास्ते आखाडा तालिम संघाकडे, तर गरुड रथ ओढण्याचा मान अहिल्याराम व्यायामशाळेच्या कार्यकर्त्यांकडे होता. रथासमोर सनई चौघडे, झांजपथक, ढोलपथक यांनी परिसर दुमदुमून गेला होता. जागोजागी फटाक्याची आतषबाजी करण्यात येत होती. भव्य कमानी उभ्या करून परिसर मंगलमय करण्यात आला होता. परिसरात महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते. संपूर्ण पंचवटी परिसर भाविकांच्या गर्दीने ओसंडून वहात होता. गरुड रथ वाजतगाजत गणेशवाडीमार्गे गंगाघाटावर आला. त्यानंतर दहीपुलावरून मेनरोड, बोहरपट्टी, कापडबाजार, म्हसोबा पटांगणमार्गे रामकुंडावर नेण्यात आला. तेथे अवभ्रृत स्नान झाले. अवभ्रृत स्नानाचा सोहळा पहाण्यासाठी रामकुंडावर भाविकांनी गर्दी केली होती. गंगेला पाणी असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. अवभ्रृत स्नानानंतर रामाच्या मूर्ती पुन्हा मंदिरात नेण्यात आल्या.

...

गर्दीमुळे देवदर्शन दुर्लभ

रथाच्या गर्दीमुळे भाविकांना देवतांचे दर्शन होत नव्हते. उभे राहून, कुणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून मोठा आटापिटा करीत दर्शन घ्यावे लागत होते. देवांच्या ऐवजी 'यांचे' दर्शन घ्या असा उपरोधिक सल्ला नागरिक देत होते.

...

महावितरणचे पथक

महावितरणने सालाबादप्रमाणे यंदाही खबरदारी घेऊन खास पथक तैनात केले होते. गरुड रथावर दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले, तर ज्या मार्गावरून रथ मार्गस्थ होणार होता त्या मार्गावर देखील कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

...

जागोजागी रांगोळ्या

रथ ज्या मार्गावरून जाणार आहे त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. नाव दरवाजा, नेहरू चौक, कानडे मारुती लेन, चांडवडकर गल्ली, मेनरोड, बोहरपट्टी या ठिकाणच्या रांगोळ्या बघण्यासाठी नागरिक गर्दी करीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरणारे दोघे संशयित अटक

$
0
0

१० गुन्हे उघडकीस

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी नाशिक तालुक्यातील पळसे येथील दोघांना अटक केली. संशयितांच्या ताब्यातून तीन लाख ९० हजार रुपये किमतीच्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आल्यात. ही कारवाई क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने केली. संशयितांच्या अटकेने आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

समाधान उर्फ गोकुळ बळीराम गव्हाणे (२५) व प्रशांत भगवान जाधव (२०, रा. पळसे ता. जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील रुग्णालयांच्या पार्किंगमधून सातत्याने दुचाकी चोरी जाण्यास सुरुवात झाली होती. एकापाठोएक घटनांमुळे क्राईम ब्रँचने आपले लक्ष या घटनांकडे वळविले. युनिटचे कर्मचारी रवींद्र बागूल यांना या प्रकरणी धागेदोरे मिळाले. शनिवारी (दि. १३) चोरटे गोल्फ क्लब मैदान परिसरातील पार्किंगमध्ये येणार असल्याच्या माहितीनंतर सापळा रचल्याने पोलिसांच्या हाती संशयित आले. संशयितांच्या ताब्यातील दुचाकीबाबत चौकशी केली असता ती त्यांनी जिल्हा रुग्णालयातून चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांना दुचाकीसह ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यात त्यांनी तब्बल १० गुन्ह्यांची कबुली दिली. गेल्या काही दिवसात त्यांनी जिल्हा रुग्णालयातून चार, एसएनबीटी मेडिकल कॉलेजमधून तीन, बिटको रुग्णालय आवारातून एक, देवळाली कॅम्प येथील सुमन लॉन्स येथून एक आणि सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) येथील ओमरान लॉन्सच्या पार्किंगमधून एक १० दहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या सर्व दुचाकी ताब्यात हस्तगत करण्यात आल्या. संशयितांच्या अटकेने शहरातील सहा, ग्रामिण पोलिस दलाशी संबंधीत तीन आणि बुलढाणा जिह्यातील एक असे दहा गुन्हे उघडकीस आले.

यांनी केली कामगिरी

युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक सचिन खैरनार, महेश कुलकर्णी, पुष्पा निमसे, उपनिरीक्षक बलराम पालकर, एएसआय पोपट कारवाळ, बाळू दोंदे, हवालदार रवींद्र बागूल, संजय मुळक, वसंत पांडव, प्रवीण कोकाटे, येवाजी महाले, पोलिस नाईक आसिफ तांबोळी, शिपाई गणेश वडजे, विशाल काठे, नीलेश भोईर, प्रतिभा पोखरकर, दीपक जठार आदींच्या पथकाने कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतवार्ता

$
0
0

कुणाल पाटील

आज बागलाणमध्ये

सटाणा : धुळे लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ बागलाण तालुक्यातील ठेगोंडा व ब्राम्हणगाव जिल्हा परिषद गटात आज, बुधवारी प्रचार रॅली व प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली. बागलाण तालुक्यातील ठेगोंडा व ब्राम्हणगाव जिल्हा परिषद गटातील ठेगोंडा, आराई, ब्राम्हणगाव, मुंजवाड, व लखमापूर या ठिकाणी जाहीर सभा तसेच ठिकठिकाणी कॉर्नर सभा व मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात येणार आहेत. धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, मविप्रचे अध्यक्ष व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हे या वेळी उपस्थित राहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात मृत्यूची पन्नाशी!

$
0
0

पहिल्या दोन महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये अपघाती बळी कमी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात १ जानेवारी ते ३१ मार्च २०१९ या काळात झालेल्या ४७ जीवघेण्या अपघातांमध्ये ५० जणांचा बळी गेला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात अपघात आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

शहरातील रुंद आणि व्यवस्थित रस्ते आणि वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन यामुळे सातत्याने अपघात होतात. शहरात होणाऱ्या हत्यांच्या घटना किंवा वेगवेगळ्या साथीच्या आजारात मृत्यू पावणाऱ्या नागरिकांपेक्षाही रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय ठरते. शहरात २०१६ पासून रस्ते अपघातांमध्ये चांगली घट झाली होती. २०१६च्या तुलनेत २०१७ मध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या तब्बल ४१ इतकी घटली होती. राज्यात हे प्रमाण सर्वाधिक नोंदवले गेले होते. रस्ते अपघात आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आणखी कमी व्हावी यासाठी प्रयत्न होत असताना २०१८ मध्ये हा आकडा वाढला. २०१९ मध्ये पहिल्याच तीन महिन्यात ४७ प्राणांतिक अपघातांमध्ये ५० जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने अपघातांचे प्रमाण कमी होत असून, त्यात आणखी घट होणे महत्त्वाचे ठरते. जानेवारीमध्ये शहरात २१ प्राणांतिक, २४ गंभीर तर पाच किरकोळ अपघात झाले. यात २२ जणांचा मृत्यू झाला तर ३४ नागरिक जायबंदी झाले. फेब्रुवारीत अपघातांच्या संख्येत घट नोंदली गेली. १४ प्राणांतिक, २१ गंभीर, सहा किरकोळ तर दोन दुखापतरहीत अपघात झाले. त्यात १५ जणांचा आपल्या प्राणांना मुकावे लागले. ३० जण गंभीर जखमी तर १५ व्यक्तींना किरकोळ दुखापतीस सामोरे जावे लागले. मार्चमध्ये प्राणांतिक अपघातांची संख्या १२ इतकी राहिली तर त्यात १३ जणांचा मृत्यू झाला. शहरात सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे होतात. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ५० पैकी ३५ व्यक्ती या दुचाकीस्वार होत्या. त्यानंतर रस्ता क्रॉस करताना पादचाऱ्यांना वाहनांनी धडक देणे हे प्रमाण सुद्धा मोठे आहे. हेल्मेट, सीटबेल्टचा वापर केला आणि वाहनांच्या गतीला थोडा ब्रेक लावून नियमांचे पालन झाल्यास अपघातांचे प्रमाण खूप कमी होऊ शकते.

दुचाकी स्लिप झाल्याने तरुण ठार

भरधाव दुचाकी घसरल्याने एक तरुण ठार झाला. अपघाताची घटना नाशिक तालुक्यातील गंगाम्हाळूंगी शिवारात झाली. यात आणखी दोन तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी हरसूल पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. भास्कर सोनू फसाळे (३५) असे मृत तरुणाचे तर, खंडू कोंडाजी फसाळे (२५) आणि जगन धर्मा फसाळे (२५ रा. तिघे गंगाम्हाळूंगी) अशी जखमींची नावे आहेत. तिघे मित्र दुचाकीने आपल्या घराकडे जात असतांना सोमवारी (दि.१५) दुपारी ही घटना घडली. तिघांनाही जिल्हा रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले. मात्र, भास्कर फसाळे यांचा उपचार सुरू असतांना मध्यरात्री मृत्यू झाला.

महिना-प्राणांतिक अपघात-मृत्यू-गंभीर अपघात-गंभीर जखमी

जानेवारी-२१-२२-२४-३४

फेब्रुवारी-१४-१४-२१-३०

मार्च-१२-१३-२४-२८

..

वाहनाचा प्रकार- प्राणांतिक अपघात-मृत्यू

दुचाकी-३३-३५

अॅटो रिक्षा-३-३

कार/टॅक्सी-५-५

ट्रक-२-२

टेम्पो/ट्रॅक्टर-१-२

सायकल-३-३

एकूण-४७-५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवडणूक पाठिंब्यावरून मराठा समाजात फूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सकल बहुजन मराठा संघटनेने नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना तर दिंडोरीत डॉ. भारती पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. परंतु, हा निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे. आम्ही कुणालाही पाठिंबा दिला नसून वरिष्ठ पदाधिकारी लवकरच त्याबाबत निर्णय घेतील, असे महानगरप्रमुख हार्दिक निगळ यांनी स्पष्ट केले आहे.

सकल बहुजन मराठा समाजाने गोडसे आणि पवार यांना पाठिंबा दिल्याचे दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, शिवसंग्राम संघटना, मावळा संघटना, संभाजी ब्रिगेड, छत्रपती शासन, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती व अन्य संघटनांनी एकमताने दोन्ही उमेदवारांना पाठिंबा जाहीर केल्याचा दावा केला. परंतु, निगळ यांनी हा दावा खोडून काढला आहे. संभाजी ब्रिगेडने कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिला नसल्याचे पत्र महानगरप्रमुख निगळ यांनी दिले आहे.

डॉ. संदीप कोतवाल यांनीही या पाठिंब्याच्या भूमिकेबाबत संदिग्धता व्यक्त केली आहे. मराठा क्रांती मोर्चाने कोणत्याही पक्षाच्या समर्थनाचा अथवा विरोधाचा निर्णय घेतल्याचे ऐकिवात नाही. तशी प्रक्रिया राबवायची असल्यास किंवा नसल्यास त्याचा निर्णय समस्त मराठा समाज एकत्रितरित्या घेईल. मराठा क्रांती मोर्चा ही समाजाची पवित्र चळवळ आहे. कोणत्याही संघटनांचे वैयक्तिक मत अथवा राजकीय भूमिकेचा संबंध मराठा क्रांती मोर्चाशी लावू नये, अशी अपेक्षा कोतवाल यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिता भंगाचा पोलिस निरीक्षकांवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतांना फेसबुकवर आपत्तीजनक पोस्ट केल्याप्रकरणी मनमाड येथील पोलिस निरीक्षकांवर भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेशकुमार घुसर असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.

भंडारा येथील रहिवासी शैलेंद्र श्रीवास्तव यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या सी व्हिजल या एप्सद्वारे आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती. या प्रकरणी भंडाऱ्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अहवाल मागवला होता. असा अहवाल मागविण्यात आल्याच्या वृत्तास येथील अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दुजोरा दिला असून गुन्हा भंडारा पोलिसांकडे दाखल झाल्याचे म्हटले आहे. यानंतर भंडारा पोलीस अधीक्षक यांच्या अभिप्रायावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाड येथील सदर पोलिस निरीक्षक काही वर्षांपूर्वी भंडारा पोलीस दलात कार्यरत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये अवकाळीचे आणखी दोन बळी

$
0
0

६८ गावांना फटका; गहू, कांद्याचे नुकसान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये थैमान घालणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका ६८ गावांना बसला आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने आणखी तिघांचा बळी घेतला आहे. मालेगावात झाड अंगावर पडून एकजण दगावला. तर दिंडोरी आणि बागलाण तालुक्यात वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू झाला.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने मुक्काम ठोकला आहे. सिन्नर, बागलाण, नाशिक, मालेगाव आणि निफाड या तालुक्यांमधील एकूण ६८ गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यामुळे या तालुक्यांमधील कांदा, गहू, डाळींब, द्राक्षासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मालेगावात सोमवारी (दि. १५) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झाड अंगावर पडून विकास शामराव अग्रवाल (वय ५०) यांचा मृत्यू झाला. तर बागलाण तालुक्यात मंगळवारी (दि. १६) दुपारी वीज अंगावर पडून योगेश बापू शिंदे (वय ३२) यांचा मृत्यू झाला. ते मुळचे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आयाने येथील रहिवाशी आहेत. दिंडोरी तालुक्यातही दुपारी तीन ते चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये अक्राळे येथील संपत शंकर उदार (वय ६५) यांचा वीज पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली. यामुळे आतापर्यंत अवकाळी पावसामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. कळवण तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास बीजोरे येथे वीज अंगावर पडून विलास बबन वाघ यांची म्हैस ठार झाली.

तीन दिवसांत दगावली १६ जनावरे

अवकाळी पावसाने जनावरांचाही बळी घेतला असून घरांचेही मोठे नुकसान केले आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात ११ मोठी आणि लहान पाच जनावरे दगावली आहेत. सिन्नरमध्ये १५, देवळ्यात १४, येवल्यात ७, बागलाणमध्ये तीन, चांदवडमध्ये दोन तर त्र्यंबकेश्वरमध्ये एका घराची पडझड झाली आहे. याशिवाय चार गोठे, चार पोल्ट्री फार्म, तीन शेड आणि चार पडव्यांचेही या पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मृतांच्या नातलगांच्या हाती मदत

वीज पडून दगावलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे चार लाख रुपयांची मदत केली जाते. घटना घडल्यानंतर ४८ तासांच्या आत ही मदत देणे अनिवार्य आहे. दिंडोरी येथील मृतांच्या नातलगांना मंगळवारी आर्थिक मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले. मृत्यू झालेल्या अन्य व्यक्तिंच्या कुटुंबीयांना पुढील दोन दिवसांत मदत दिली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अग्रवाल राहणार मदतीपासून वंचित

वीज अंगावर पडून मृत्यू झाला तरच मदत देण्याचे सरकारचे निकष आहेत. मालेगावात वादळी वाऱ्यामुळे झाड अंगावर पडल्याने अग्रवाल यांचा मृत्यू झाला. अग्रवाल कुटुंबीयांना मदत देता येईल का, याबाबत जिल्हा प्रशासनाने सरकारकडे मार्गदर्शन मागविले. परंतु, वीज अंगावर पडल्यासच मदत देता येत असल्याने अग्रवाल कुटुंबीयांना मदत देता येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पंचनामा आदेशाची प्रतीक्षा

अवकाळी पावसाने जिल्ह्याच्या काही भागांत दाणादाण उडविली आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतपिकांचेही नुकसान झाले आहे. सलग तीन दिवस पाऊस होऊनही सरकारने अजून पंचनाम्यांचे आदेश दिलेले नाही. याबाबतचे मार्गदर्शन मागविल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

शहरात विश्रांती

ग्रामीण भागात धुडगुस घालणाऱ्या अवकाळी पावसाने शहरात मात्र विश्रांती घेतली आहे. शहरात रविवारी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. सोमवारी रात्रीही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मंगळवारी दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चार तासांत पावसाच्या जोरदार सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातून दोघे हद्दपार

$
0
0

जिल्ह्यातून दोघे हद्दपार

निफाड : निफाड उपविभागीय पोलिस अधिकारी माधव पडिले यांनी लासलगाव पोलिस स्टेशन हद्दीतील मनोज राजेंद्र उर्फ बाळासाहेब रनशूर (रा. गोंदेगाव, ता. निफाड) आणि सिन्नर हद्दीतील सोमनाथ किरण पवार (रा. सिन्नर-डुबेरे रोड, वाजे मळा, सिन्नर) या दोघांना जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार केले आहे. नाशिक जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलिस अधीक्षक आरती सिंग, अप्पर अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बापू शार्दूल यांचे निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळयात शिवसेनेची स्थापना करून पक्ष शिवसेनेला तन-मन-धनाने वाढविणारे, निष्ठावान शिवसैनिक देवीदास सीताराम शार्दूल उर्फ बापूदादा शार्दूल यांचे सोमवारी (दि.१५) रोजी मुंबईत मध्यरात्री अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पतनी, मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी, सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, यांनी बापूंच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजीमंत्री रोहिदास पाटील, आमदार अनिल गोटे, कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजीमंत्री शालिनीताई बोरसे, महापौर चंद्रकांत सोनार, अनुप अग्रवाल, प्रथम महापौर भगवान करणकाळ यांच्यासह बापूंच्या हजारो चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी ४ वाजता त्यांच्यावर शहरातील पांझरा नदीकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सन १९६६ मध्ये मुंबईत शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर बापूंनी धुळ्यातही सन १९६७ मध्ये शिवसेनेची स्थापना झाली. त्यावेळी शहरातील स्व. सुधाकर आप्पा मोगलाईकर हे देखील होते. सन १९६९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या चुडामण पाटलां विरोधात लोकसभा निवडणूक लढविली. त्यात पराभव झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचारसाहित्याच्या मागणीत ५० टक्के घट

$
0
0

(फोटो - सतिश काळे)

ऑनलाइन प्रचारामुळे अत्यल्प प्रतिसाद; विक्रेत्यांना आर्थिक फटका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून ऑनलाइन प्रचारावर यंदा अधिक भर देण्यात आल्याने पारंपरिक प्रचारसाहित्य त्यांना नकोसे झाल्याचे दिसते आहे. राजकीय पक्षचिन्हांचे बॅच, झेंडे, उपरणे आणि टोपी या साहित्याच्या मागणी जवळपास ५० टक्क्यांहून अधिक घटली आहे. सोशल मीडियावर वाढलेल्या प्रचारामुळे पारंपरिक प्रचारसाहित्य विक्रेत्यांना आर्थिक फटका बसला असून, हे साहित्य दुकानात तसेच पडून आहे.

निवडणूक आली की बाजारपेठेत प्रचारसाहित्याची मागणी वाढते. मात्र, यंदाची लोकसभा निवडणूक प्रचारसाहित्य खरेदीला अपवाद ठरत असल्याचे चित्र आहे. सोशल मीडियाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नवनवीन संकल्पना वापरल्या जात आहेत. सोशल मीडियावरील हायटेक प्रचारासाठी उमेदवारांकडून खर्च केला जात असला तरी प्रचार साहित्याची खरेदी यंदा झालेली नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रचार साहित्याच्या मागणीत तब्बल ५० टक्के घट झाल्याचे व्यावसायिक सांगतात. त्यामुळे पारंपरिक प्रचारसाहित्य शहरातील दुकानांमध्येच तसेच पडून आहे. हे साहित्य विधानसभा निवडणुकांमध्ये वापरावे लागेल, तेव्हाही विक्री न झाल्यास मोठा आर्थिक फटका सहन करावा लागेल, असे विक्रेत्यांनी सांगितले.

\Bजीएसटीमुळे किंमतवाढ\B

प्रचारसाहित्याची किंमत जीएसटीमुळे वाढली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकांच्या तुलनेत किमतीत दुप्पटवाढ झाली आहे. शिवाय, प्रचार साहित्याची खरेदी मुंबईतून करण्यात आल्याने वाहतुकीचा खर्चही अधिक झाला आहे. प्रचारसाहित्याची विक्री मंदावल्यामुळे वाहतुकीचा खर्चही निघाला नसल्याचे विक्रेते सांगतात.

\Bरोजगार घटला

\Bप्रचारासाठीचे झेंडे आणि मफलरची शिलाई करण्यासाठी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारसाहित्य विक्रेत्यांनी काही महिलांना काम दिले होते. पण, यंदा साहित्य खरेदीलाच कोणी नसल्याने शिलाई कामगार महिलांना रोजगार देण्यात आलेला नाही. तसेच होर्डिंग आणि डिजिटल फ्लेक्सवर अधिक भर असल्याने कटआऊट्स आणि फलक तयार करणेही मंदावले आहे. त्यामुळे फलक बनविणाऱ्यांचाही रोजगार हुकला आहे.

--

सोशल मीडियावरच उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात आहे. महिन्याभरापासून प्रचारसाहित्य दुकानात तसेच पडलेले आहे. यावेळी अर्ध्यापेक्षा जास्त माल उरला असून, मोठा तोटा सहन करावा लागतो आहे.

- सागर गोसावी, प्रचार साहित्य विक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिलरशिप देतो सांगून सहा लाख रुपयांना गंडा

$
0
0

इलेक्ट्रिकल गाडी कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इलेक्ट्रिकल गाडीची डिलरशिप यवतमाळसाठी मिळवून देतो, असे सांगून त्याचा करारनामा करूनही गाडीही दिली नाही आणि पैसेही दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने इंदिरानगर पोलिस ठाण्यात के. के. ई व्हेईकल्स डिकॉन होम्सच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमराव धोंडबाजी वाघमारे (वय ६६, रा. यवतमाळ) यांनी या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वाघमारे हे त्यांचा मुलगा अक्षय याच्यासाठी व्यवसाय किंवा नोकरी शोधत होते. त्याचवेळी पाथर्डी फाटा येथील के. के. ई. व्हेईकल्स या कंपनीला इलेक्ट्रिक गाड्यांची डिलरशिप द्यावयाची असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वाघमारे यांनी कंपनीचे संचालक अजयकुमार गवई यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक लाख रुपयांची अनामत रक्‍कम चेकद्वारे दिली. त्यानंतर काही दिवसांत कंपनीतर्फे वृषभ मंदोट यांच्याशी याबाबतचा करारनामाही करण्यात आला. त्यावेळी आणखी पाच लाख ६३ हजार रुपये चेकने देण्यात आले. त्यानंतर या कंपनीकडून वाघमारे यांना १३ गाड्या देण्यात येणार असल्याचे सांगून दरपत्रकही देण्यात आले. हे सर्व काम झाल्यावर वाघमारे यांनी यवतमाळ येथे भाडे तत्वाने जागा घेतली आणि गाड्या केव्हा येणार, यासाठी नाशिक येथे संपर्क सुरू केला. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यावेळी ही कंपनी वैशाली अजयकुमार गवई यांच्या मालकीची असल्याचे समजले. गाड्या मिळत नसल्याने वाघमारे यांनी पैशाची मागणी केली. त्यावर करारनामा रद्द करावा लागेल असे सांगण्यात आले. त्यामुळे वाघमारे यांनी करार रद्द करण्याचे पत्र दिले. मात्र, त्यानंतरही पैसे किंवा गाड्या न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रश्नी वाघमारे यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अजय गवई, वैशाली गवई व वृषभ मंदोट यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसैनिकांचा रोष सटाण्यात कायम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

धुळे लोकसभा मतदारसंघातील बागालण विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युती एकत्रित असली तरीही शिवसेनेतील विद्यमान पदाधिकारी व शिवसैनिक अद्यापही भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सरसावले नसल्याने युतीमधील बेबनाव चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना युतीच्या उमेदवारांसाठी जीवाचे रान करून प्रचारात उतरण्याचे आदेश जारी केलेले असले तरीही बागलाण विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसैनिकांमध्येच दुफळी असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे शिवसैनिकांना अद्यापही 'इकडे आड तिकडे विहीर' अशी गत झाली आहे. युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सूर्या लॉन्स येथे महामेळावा झाला होता. या महामेळाव्यात व्यासपिठावर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, माजी तालुकाप्रमुख अरविंद सोनवणे हे दोघेच व्यासपिठावर होते. मात्र, तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत पाटील, शहर प्रमुख जयप्रकाश सोनवणे यांनी या महामेळाव्याकडे पाठ फिरवली. महामेळावा होवून आठ दिवस उलटून गेले असतानाही शिवसेना अद्यापही प्रचार रिंगणात उतरलेली नाही. यामुळे सद्य:स्थितीत डॉ. भामरे यांची सारी मदार भाजपवरच अवलंबून आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपाला सडेतोडे बोल सोशल मीडीयाच्या माध्यमातून सुनावले होते. तसेच, युतीच्या महामेळाव्यास शिवसैनिकांनी जावू नये, असे खुले आवाहन केले होते. यानंतर आठ दिवसांचा कालावधी उलटूनही शिवसैनिकांचा रोष कमी करण्यात डॉ. भामरे यांना अपयश आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुटबॉलचा प्रचार-प्रसार ग्रामीण भागात व्हावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'नाशिक जिल्ह्यात फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्टची स्थापना होऊन तीन वर्ष झाले आहेत. या तीन वर्षात संस्थेने तिसरा क्रमांक पटकावला असून, येत्या काही दिवसात प्रथम क्रमांक पटकावेल यात शंका नाही. या संस्थेने नाशिक शहरात फुटबॉल खेळाचा चांगला प्रसार केला आहे. यापुढे जिल्ह्यात प्रसार करावा,' असे प्रतिपादन नाशिक शहर पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले.

फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रीक्ट या संस्थेतर्फे आयोजित वार्षिक पारितोषिक समारंभप्रसंगी ते बोलत होते. रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी हा समारंभ झाला. यावेळी जिल्हा क्रिडा अधिकारी रवींद्र नाईक, फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिरुध्द धर्माधिकारी, अविनाश टिळे, अर्जून टिळे, के. जी. गुप्ता, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

लक्ष्मीकांत पाटील म्हणाले,'पू‌र्वी कलेला किंवा खेळाला राजाश्रय असायचा त्यामुळे खेळाला चालना मिळत होती, तो खेळ बहरत होता. आताही खेळाला चांगले दिवस आले आहेत. फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक या संस्थेला मान्यता मिळाल्याने अवघ्या तीन वर्षात संस्थेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. चीन, जपान, कोरीया या सारख्या देशांमध्ये लहानपणापासून खेळाडू तयार करण्याची प्रक्रिया केली जाते. आपल्याकडे मुलगा त्रास देतो म्हणून क्रिकेटची बॅट हातात दिली जाते, हे कुठेतरी बदलायला हवे. यशाची संधी प्रत्येक क्षेत्रात असते, फक्त आपल्याला त्याचा सूर गवसणे गरजेचे आहे. आज खेळात अर्थिक प्राप्ती देखील चांगली असल्याने खेळाडूंनी या क्षेत्राकडे करियर म्हणून पहावे.'

कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष अनिरुध्द धर्माधिकारी यांनी प्रस्ताविक केले. यावेळी त्यांनी संस्थेचा अहवाल सादर केला. यावेळी बेबी लीग, स्कूल लीग, के. जी. गुप्ता कप, उत्कृष्ट प्रशिक्षक, उत्कृष्ट पंच यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी फुटबॉल क्षेत्राच्या विकासासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या निहाल अहमद खान, अंबादास भालेराव यांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलास पाटील यांनी तर कार्यक्रमासाठी मुकूंद झनकर, प्रशात भाबड यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पॉप्युलर प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार व मोस्ट डीसीप्लीन अॅन्ड कन्सीस्टन्स टीम ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उकाड्याने नाशिककर हैराण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात उष्णतेची लाट दिवसागणिक तीव्र होत असून, गेले दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे उष्णता अधिक वाढली आहे. उन्हाच्या चटक्यांनी नाशिककरांना हैराण केले असून, मंगळवारी ३४.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तापमानात चार अंश सेल्सिअसने घट झाली असली, तरी ऊन-सावलीच्या खेळामुळे उष्णतेचा चटका मात्र कायम आहे.

दोन दिवस अवकाळी पावसाने शहरात हजेरी लावली. मंगळवारीदेखील ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. त्यामुळे उष्णता अधिक जाणवत होती. मंगळवारी दुपारी अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने उकाडा जाणवत होता. बाहेरील प्रखर ऊन आणि घरातील उकाड्यामुळे नाशिककर घामाघूम झाल्याचे दिसून आले. शहरातील हवेचा वेगदेखील मंदावला असून, उष्णतेच्या झळा बसत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या दोन ते तीन दिवसांत तापमानात अधिक वाढ होणार आहे.

अवकाळी पावसानंतर शहरातील आर्द्रतेचे प्रमाणही वाढले असून, सकाळी ७० टक्के, तर सायंकाळी ४१ टक्के आर्द्रतेची नोंद करण्यात आली. ढगाळ वातावरणातही दिवसभर अंगाची लाहीलाही करणारे ऊन होते. तसेच, सायंकाळी व रात्रीदेखील बदलत्या हवामानामुळे नाशिककरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

तापमान ४ एप्रिल रोजी ४० अंश सेल्सिअसवर गेल्यानंतर सातत्याने ३६ ते ३९ अंश सेल्सिअस दरम्यान नोंद झाली. सोमवारी कमाल ३८ अंश, तर किमान २२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. हे तापमान मंगळवारी कमाल ३४.७ अंश, तर किमान २१.७ अंश सेल्सिअस होते. कमाल तापमानात घट झाली असली, तरी किमान तापमान स्थिर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झृम - काव्यकोडी

$
0
0

सांगा बरे मी कोण?

- कमलाकर पाटील, नाशिक

आला वारा गेला वारा

भिर भिर फिरते मी

बालगोपाल माझे मित्र

हरएक जत्रेत असते मी

फिरणे माझा स्वभाव

तुम्हीही असू द्या अंगी

प्रगतीच्या या मार्गाने

होते जीवन सप्तरंगी

(उत्तर उद्याच्या अंकात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - बालकविता

$
0
0

झिप झॅप झूम - बालकविता

- -

जगा, जगू द्या

शोभा बडवे

जगी जो जो जीव जगे, त्याला मारू नका

फुलपाखरे उडती त्यांना धरू नका

कण कण मधु जमवितो मधमाशी

पोळे उडेल उठेल ऐसे करू नका

रातकिडा किरकिरे कटकट वाटे

कानाकोपऱ्यात शोधण्यास शिरू नका

रिकामटेकडेपणी करमत नसो

उंदिर वा असो ससा बीळ कोरू नका

वटवाघळे झाडास दिवसा लोंबती,

गलोलीने त्यांच्यावर नेम धरू नका

सुस्तावला साप दिसे जपा जपा,

डिवचून उगा त्याला वेडे ठरू नका

सापडेल जखमीसा पोपट बागेत,

पाजा पाणी पिंजऱ्यात कैद करू नका

प्रत्येकाला जगण्याचा जन्मसिद्ध हक्क,

नियम हा पायमल्ली त्याची करू नका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images