Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आयपीएल सट्टा खेळणाऱ्यांना अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंडियन प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांवर बेटींग करणाऱ्या संशयितांच्या क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने पंचवटीतील तीळभांडेश्वर लेनमध्ये मुसक्या आवळल्या. स्पर्धेतील सामन्यांच्या चुरशीबरोबर बेटींगचा जोरसुद्धा वाढतो आहे.

नोबोकुमार मोहनलाल बेरा (३४, रा. अभिनव भारत लेन, मूळ रा. पश्चिम बंगाल), सुप्रभात विश्वनाथ सामंता (३१, रा. नागचौक, ढिकले नगर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित सट्टेबाजांची नावे आहेत. आयपीएल स्पर्धेदरम्यान बेटींग जोरात सुरू असते. नुकतेच ग्रामीण पोलिसांनी बेलू शिवारात छापा मारून काही सट्टेबाजांना अटक केली. क्राइम ब्रँचच्या युनिट एकचे पथक अशाच सट्टेबाजांच्या शोधात असताना युनिटचे कॉन्स्टेबल दीपक जठार यांना संशयितांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने संशयित बेटींग घेत असलेल्या घरावर छापा मारला. त्यावेळी संशयित आरोपी तीन मोबाइल फोनच्या मदतीने दिल्ली कॅपिटल विरुद्ध सनराइज हैदराबाद या सामन्यावर सट्टा घेताना सापडले. सट्ट्याच्या भावाबाबत माहिती पुरवून संबंधित लोकांकडून सट्टा स्वीकारण्याचे काम संशयित करीत असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. संशयितांकडून रोख पाच हजार ६०० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य असा सुमारे ५५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार संशयिताविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास क्राइम ब्रँचच्या युनिट एकचे हवालदार संजय मुळक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनपा शाळांसाठी ‘विद्यारोहा’ अॅप्लीकेशन

$
0
0

आता 'विद्यारोहा'चा वॉच

मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी; मनपा आयुक्तांचा निर्णय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमेंनी आपला मोर्चा शिक्षण विभागाकडे वळवला आहे. महापालिका शाळांमधील शिक्षकांसह विद्यार्थी, अंगणवाडीत शिकणारे विद्यार्थ्यांची हजेरी स्वंयचलित पद्धतीने घेण्यासाठी कुंभथॉनच्या विद्यारोहा टीमने तयार केलेल्या 'विद्यारोहा' अॅप्लिकेशन वापरात आणण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. यामुळे शिक्षकांच्या हजेरीसह शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखणे आणि अंगणवाड्यांमधील बालकाची अचूक हजेरी टिपता येणार आहे. दरम्यान हे अॅप्लिकेशन महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठीही लागू करता येईल काय याचीही चाचपणी सुरू झाली आहे.

महापालिका मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढले आहे. सोबतच आता सफाई कर्मचाऱ्यांना सेल्फी हजेरी लावण्याची तयारी सुरू आहे. सध्या शिक्षण विभागात मस्टर हजेरी घेतली जात आहे. तसेच विद्यार्थ्यांची हजेरी तपासणीचीही पद्धत नाही. त्यामुळे या ठिकाणीही ऑनलाइन हजेरीचा विचार आयुक्तांनी केला आहे. महापालिकेच्या ९० शाळांमध्ये ९५० शिक्षक कार्यरत आहेत. तसेच सद्यस्थितीत २८ हजार विद्यार्थी असून अंगणवाड्यामध्ये सुमारे १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शिक्षकांच्या हजेरीबाबत बेफिकीरी आहे. तर विद्यार्थ्यांची मोजदाद केली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नावाने अनुदान लाटण्याचाही प्रकार समोर आला होता. अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारा सकस आहार पोहोचत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यात सुधारणा करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काही दिवसांपूर्वी टीसीएस सेंटरला दिलेल्या भेटीत विद्यारोहा अॅप्लिकेशनची माहिती घेतली होती. त्यात एकाच वेळी विद्यार्थ्यांची संख्या ऑनलाइन पाहता येणार आहे. कुंभथॉनच्या इनोव्हेशन सेंटरमध्ये स्टार्टअप योजनेंतर्गत काम करणाऱ्या नवीन संशोधकांनी विद्यारोहा अॅप्लिकेशनची निर्मिती केली असून त्यामुळे विद्यार्थ्यांची हजेरी तपासण्यासह कमी पटसंख्येची दररोज नोंद होणार आहे. मध्यान्ह भोजणासाठीही हे अॅप्लिकेशन उपयोगी ठरणार असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या २३ शाळांमध्ये २४ शिक्षक, २३ मुख्याध्यापक व ८१४ विद्यार्थ्यांवर या अॅपचा प्रयोग केला जाणार आहे. कुंभथॉनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांच्याकडे सोमवारी अॅप्लिकेशनचे सादरीकरण केले. याच्या रिझल्टनंतर संपूर्ण शाळांवर तसेच अंगणवाड्यांना हे अॅप लागू केले जाणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कामकाजात सुधारणा येणार आहे

०००

मनपा मुख्यालयासाठीही विचार

शिक्षण विभागात विद्यारोहा अॅप्लिकेशन यशस्वी झाल्यानंतर हे अॅप्लिकेशन महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी वापरण्याबाबतचाही विचार केला जाणार आहे. सध्या पालिकेत बायोमेट्रिक हजेरी ही कामावर येताना तसेच काम संपल्यानंतर घेतली जाते. परंतु, या अॅपमुळे थेट कर्मचाऱ्यांवरच वॉच ठेवता येणार आहे. महापालिका कर्मचाऱ्याची हजेरी अचुक पद्धतीने करता येणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्रतिसाद देणे सर्वांनाच बंधनकारक राहणार असून प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून कामकाजातही सुसूत्रीकरण होणार आहे. त्यामुळे हे अॅप्लिकेशन हे महापालिकेसाठी एक वरदानच ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुहास कांदेंना जामीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक गेल्या फेब्रुवारीमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करीत दिलासा दिला आहे. मात्र, त्यासाठी सदरील खंडणीच्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर होत नाही, तोपर्यंत त्यांना नाशिक शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. कांदे यांच्यावर खंडणीचे तीन गुन्हे दाखल असून, त्यापैकी एकाच गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झालेला आहे. गेल्या ७ फेब्रुवारी रोजी सरकारवाडा पोलिसात गौरव प्रदीप मेहरा यांच्या फिर्यादीनुसार, खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव यांचा कॅनडा कॉर्नरवरील गाळा त्यांनी विक्रीस काढला असता, कांदे यांनी तो अवघ्या १० लाख रुपयांत मागितला. मेहरा यांनी नकार दिल्यानंतर संशयिताने गाळा विक्री व भाडोत्री देण्यास अडथळा आणला. याप्रकरणी कांदे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता, तो फेटाळण्यात आला. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. कांदे यांच्या वतीने अॅड. अनिकेत निकम यांनी, तर सरकारी पक्षातर्फे अॅड. जाधव यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकी प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ एप्रिल रोजी सभा घेण्यासाठी जिल्ह्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सुरक्षेबाबत आढावा बैठक घेऊन यंत्रणेला सूचना केल्या.

नाशिक लोकसभा मतदार संघाचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरी मतदार संघाच्या उमेदवार डॉ. भारती पवार आणि धुळे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार केंद्रीय राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्ष व महायुतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन केले आहे. सोमवारी (दि. २२) रोजी सकाळी नऊ वाजता ही सभा घेण्याचे नियोजन आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे जोपूळ रस्त्यावरील मैदानात ही सभा घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मांढरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावून सुरक्षेचा आढावा घेतला. बैठकीला पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, आमदार अनिल कदम, आमदार डॉ. राहुल आहेर, राज्य उत्पादन शुल्क, अन्न आणि औषध प्रशासनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबत मांढरे यांनी निर्देश दिले. सभास्थळाची पाहणी करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षकांना देण्यात आले. पंतप्रधानांच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे पथक १८ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांनुसार सुरक्षा व्यवस्थेबाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुलडाण्यात अपघातात एकाच कुटुंबातील पाच ठार

$
0
0

- सहा जण जखमी; मेहकर तालुक्यातील घटना

म. टा. वृत्तसेवा, बुलडाणा

भरधाव ट्रक आणि स्कॉर्पिओच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले. ही हृदयद्रावक घटना सोमवारी पहाटे मेहकर तालुक्यातील अंजनी फाट्याजवळ घडली. अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील अंजनी येथील जुमडे कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक मध्यप्रदेशातील महू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी गेले होते. महू येथून परत येत असताना हा अपघात झाला. विशेष म्हणजे अंजनी हे गाव घटनास्थळापासून अवघे एक किमी अंतरावर असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणार ट्रकला त्यांच्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. स्कॉर्पिओमधील मनोहर जुमडे (वय ५०), गोलू जुमडे (वय २२), जयवंता जुमडे (वय ६०), कोमल जुमडे (वय ६०), राजरत्न जुमडे (वय ५ महिने) यांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच कमला विश्वास जुमडे (वय ५३) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, विदर्भात चार दिवसांत पाच अपघाताच्या घटना घडल्या. या अपघातामध्ये १५ जण ठार झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री बालाजी चरणी कलाकारांची सेवा रूजू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

श्री व्यंकटेश बालाजी संस्थान ट्रस्टतर्फे आयोजित श्री बालाजी संगीत नृत्य सेवे अंतर्गत कलाहोत्र पर्व २ ची सुरूवात नुकतीच करण्यात आली. मागील २ वर्ष चाललेल्या कलाहोत्र 'पर्व १' ला नाशिक मधील विविध संगीत नृत्य संस्था, गुरु, विद्यार्थी यांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर 'पर्व २' चे आयोजन करण्यात आले आहे.

संगीत व नृत्याची जुनी परंपरा असलेल्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात गेल्या काही वर्षांपासून मासिक संगीत सेवा हा उपक्रम राबविला जात आहे. ही संकल्पना विस्तृत करत श्री व्यंकटेश बालाजी संस्थांनतर्फे श्री बालाजी संगीत व नृत्य सेवा, कलाहोत्र हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हा उपक्रम हा नाशिकमधील शास्त्रीय संगीत व नृत्य या कलांमधील विद्यार्थ्यांसाठी एक मंच तयार व्हावा या हेतूने सुरु झालेला असून, शहरातील विविध संगीत व नृत्य संस्थेमध्ये शिकणारे विद्यार्थी यात सहभागी होत असतात. 'कलाहोत्र पर्व २' ची सुरूवात नुकतीच झाली. यात पुष्कराज भागवत यांनी भूपाळी रागातील भजन सादर केले त्यानंतर राग तिलंगमधील वंदना व राग देसमध्ये झुला सादर केला तर आशीष रानडे यांनी चंद्रकंस रागातील विलंबित एकतालातली 'नाथ मोहि अब ली बेर उबारो तुम नाथन के नाथ स्वामी दाता नाम तिहारो' आणि द्रुत तीनतालातील 'पपीहा न बोले डारन पे' ही बंदिश सादर केली.

यावेळी त्यांना हार्मोनियम वर दिव्या रानडे तर तबल्यावर सुजीत काळे यांनी साथ केली. सोनाली करंदीकर यांनी भरतनाट्यम या नृत्यप्रकारात सरस्वती रागातील, रूपक तालातील 'माता सरस्वती देवी हे कौतुकम आणि गीतम सादर केले. दीपा मोनानी बक्षी यांनी कथ्थक नृत्यप्रकारात, मध्य्लायातील तीनतालात परमेलु, तिहाई, घाट, निकास गतभाव माखनलीला, परन तसेच ठुमक चालत रामचंद्र यांचे सादरीकरण केले. अदिती नाडगौडा पानसे यांनी कथ्थक नृत्यप्रकारात झपताल तालातील श्री राम वंदना, विलंबित थाट, अमाद, तत्कार व मध्यलयीतील प्रीमालू आणि गिनती यांचे सादरीकरण केले. ईश्वरी आणि गौरी दसककर यांनी बिहाग रागातील बंदिश दुर्गे महाराणी, तराना आणि धन्य झालो देवा हा अभंग सादर केला. निवेदिता तांबे यांनी कथ्थक नृत्यप्रकारात वंदना- ताल झपताल, थाट, अमाद, तत्कार व अभिसारिका नायिका हा अभिनय सादर केला. कीर्ती भवाळकर यांनी गणेशवंदना श्लोक, तीनताल विलंबलयीत थाट, तत्कार, अमाद मध्यलयीत तुकडा, फर्माईश चक्रधार, गिनती , तसेच अभिनयात ध्यान लागले रामाचे हा अभंग सादर केला तर प्रीतम नाकील यांनी गायन सेवा दिली

रेखाताई नाडगौडा यांनी कथ्थक नृत्य प्रकारात प्रभू को नियम बदलते देखा या भजनावर प्रभू आणि भक्त यांचे नाते विस्तृत केले. उमा निशाणदार यांनी सतार वादन करत एक भजन सादर केले. संजीवनी कुलकर्णी यांनी कथ्थक या नृत्यप्रकारात झुला सादर केला. शिल्पा देशमुख यांनी भरतनाट्यम या नृत्य प्रकारात शिव महिम्नः प्रस्तुत केले.

प्रिया दाते यांनी भरतनाट्यम नृत्य सादर केले. रागिणी कामतीकर यांनी रामाचे भजन सादर केले. अविराज तायडे यांनी राग सोहोनी त्यात रूपक तालातील बंधीश जीयरारे कल नाही पायो तसेच धृत तीन तालातील बंधीश रंग ना डारो श्यामजीया बंदिशीने कार्यक्रमाचा सुखद शेवट केला. दोन्ही दिवस नितीन पवार यांनी तबला, मोहन उपासनी यांनी बासरी, बल्लाळ चव्हाण यांनी तबला, गौरव तांबे यांनी तबला यांनी उत्तम साथ सांगत केली. तरी कलाहोत्र २ मधील सर्व गुरूंच्या कलासेवेस दोन्ही दिवस नाशिककरांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. आता श्री बालाजी संगीत नृत्य सेवेत पुढील महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी म्हणजेच दिनांक १० मे रोजी पंडित जयंत नाईक व शिल्पा देशमुख यांच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुधवारपासून महावीर व्याख्यानमाला

$
0
0

लोगो - सोशल कनेक्ट

उद्यापासून महावीर व्याख्यानमाला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार ते शुक्रवार या कालावधीत सायंकाळी ७ वाजता परशुराम सायखेडकर सभागृहात ही व्याख्यानमाला होणार आहे.

भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त् महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंतांची जाहीर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. व्याख्यानमालेचे यंदा २४ वे वर्ष आहे. बुधवारी (१७ एप्रिल) साहित्यिक आणि जेष्ठ विचारवंत डॉ. अनिल अवचट हे 'आजची बदलती संस्कृती' या विषयावर बोलणार आहे. गुरुवारी (१८ एप्रिल) मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे हे 'थोडसं, डोक्याने चालु' या विषयावर संवाद साधणार आहेत. तर शुक्रवारी (१९ एप्रिल) शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांचे 'विचार कसा करावा?' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. समाजप्रबोधनच्या या उपक्रमास एक तास वेळ देत नाशिककरांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. व्याख्यानमालेचे संयोजन उत्सव समिती अध्यक्ष राजू धाडीवाल, यतिश डुंगरवाल, सुनील बुरड, गौतम सुराणा, अनिल नाहर, राजेंद्र डुंगरवाल, पारस बाफणा आणि महावीर रांका करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय कार्यालयांचा कारभार ढेपाळला

$
0
0

आयुक्त नाराज, प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण नसल्याचा ठपका

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तुकाराम मुंढे आयुक्तपदावरून पायउतार झाल्यानंतर महापालिकेच्या मुख्यालयासह विभागीय कार्यालयांचा कारभार ढेपाळल्याचे चित्र आहे. खुद्द नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गेल्या पंधरवड्यात केलेल्या विभागीय कार्यालयांच्या पाहणीत ही बाब उघड झाली असून, सहा विभागीय कार्यालयांमधील विभागप्रमुखांचे त्यांच्या अधिनस्थ असलेल्या प्रशासकीय यंत्रणेवरच नियंत्रण नसल्याचे समोर आले आहे. या विभागीय कार्यालयांना दिलेल्या भेटीदरम्यान केलेल्या सूचनांचेही पालन न झाल्याने आयुक्त गमे नाराज झाले आहेत. संबंधित सहा विभागीय अधिकाऱ्यांना कामकाजात सुधारणा करण्यासह दर आठवड्याला कार्यअहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

मुंढे यांनी महापालिकेच्या ढेपाळलेल्या कारभाराला शिस्त लावत कामचुकारांना वठणीवर आणले होते. परंतु, मुंढेंची बदली होताच पालिकेच्या कामकाजात ढिसाळपणा आला. आयुक्त राधाकृष्ण गमेंनी पालिकेच्या कामकाजाचा अभ्यास केल्यानंतर मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वठणीवर आणले आहे. मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी लागू केल्यानंतर त्यांनी आता विभागीय कार्यालयांकडे मोर्चा वळवला आहे.

गेल्या पंधरवड्यात आयुक्त गमे यांनी महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांना अचानक भेटी घेत प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. विभागीय अधिकाऱ्यांचे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण असणे आवश्यक असते. परंतु, प्रभागातील मिळकती, प्रभागाची स्वच्छता, रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, करवसुली आदींबाबत विभागीय अधिकाऱ्यांमध्येच उदासीनता आढळून आली. विभागीय अधिकाऱ्यांचे त्यांच्या अधिनस्थ असलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासकीय कामकाजावर कुठलेही नियंत्रण नसल्याचे आयुक्तांच्या लक्षात आले. कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचे प्रमाण जास्त आहे. एकीकडे अपुऱ्या कर्मचारीवर्गाचे कारण देत कामे प्रलंबित राहत असताना आयुक्तांनी विभागीय कार्यालयांना दिलेल्या भेटीत काही कर्मचाऱ्यांकडे पुरेसे कामकाज नसल्याने ते काम न करताच बसून असल्याचे दिसून आले. त्यामुळे आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांकडे समप्रमाणात कामाचे वाटप करून सुयोग्य नियोजन करण्याचे निर्देश आयुक्त गमे यांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत दिले आहेत. तसेच, कामात गतिमानता आणण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

--

कार्यअहवाल द्या

आयुक्त गमेंनी दिलेल्या भेटीदरम्यान कामकाजात अनेक त्रुटी व उणिवा आढळून आल्या आहेत. तसेच, कामकाज सुधारण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. संबंधित विभागीय अधिकाऱ्यांकडून त्यासंदर्भात माहिती मुख्यालयाला पाठवणे आवश्यक होते. परतु, दिलेल्या सूचनांबाबत कोणतेही पावले उचलली नसल्याने आयुक्त गमेंनी विभागीय अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यालयातील खातेप्रमुखांना संबंधित विभागात जाऊन कामाचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर देखील अंमलबजावणी झाली नसल्याने आयुक्तांनी विभागीय अधिकाऱ्यांना कार्यअहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुहास कांदे यांना जामीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या फेब्रुवारीमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करीत दिलासा दिला आहे. मात्र, त्यासाठी सदरील खंडणीच्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायलयात सादर होत नाही, तोपर्यंत त्यांना नाशिक शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. दरम्यान, कांदे यांच्यावर खंडणीचे तीन गुन्हे दाखल असून, त्यापैकी एकाच गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झालेला आहे.

गेल्या ७ फेब्रुवारी रोजी सरकारवाडा पोलिसात गौरव प्रदीप मेहरा यांच्या फिर्यादीनुसार, खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव यांचा कॅनडा कॉर्नरवर असलेला गाळा त्यांनी विक्रीस काढला असता, संशयित कांदे यांनी तो अवघ्या १० लाख रुपयांत मागितला होता. मेहरा यांनी नकार दिल्यानंतर संशयिताने सदरचा गाळा विक्री व भाडोत्री देण्यास अडथळा आणला होता. याप्रकरणी कांदे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असता, न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. यात कांदे यांच्या वतीने अॅड. अनिकेत निकम यांनी, तर सरकारी पक्षातर्फे अॅड. जाधव यांनी युक्तिवाद केला. यात उच्च न्यायालयाचे न्या. पी. एन. देशमुख यांनी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कांदे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र, सदरच्या गुन्ह्यात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांना नाशिक शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, कांदे यांच्याविरोधात खंडणीची आणखी दोन गुन्हे त्याच कालावधीमध्ये दाखल आहेत. त्यातही त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावलेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी रोडवर बसला अपघात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सप्तशृंगी गडावरून नाशिकला येणाऱ्या बसने मायको दवाखान्यासमोरच्या रस्त्यावर सोमवारी (दि. १५) सायंकाळी सहाच्या सुमारास गायीला धडक दिली. ही बसनंतर मेरीच्या हायड्रो प्रकल्पाच्या भिंतीलगत असलेल्या लोखंडी विद्युत पोलवर धडकली. या अपघातात महिला वाहकासह सहा प्रवाशी जखमी झाले आहेत.

वणीच्या सप्तशृंगी गडाहून एसटी बस (एम एच ४०, एन ८८३२) ही नाशिककडे येत होती. ही बस सायंकाळी सहाच्या सुमारास दिंडोरी रोडवरील मायको दवाखानाच्या समोरच्या रस्त्यावरून जात असताना बसच्या समोर अचानकपणे दुचाकी आली. या दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात बस एका गायीवर धडकली. नंतर येथे टाकण्यात आलेल्या लोखंडी पाइपवरून बस ही विजेच्या खांबावर जाऊन आदळली आणि रस्त्यावर पलटी झाली. बसच्या धडकेने गाय गंभीर जखमी झाली. बसच्या पुढील व मागची काच फोडून बसमधील प्रवाशांना त्वरित बाहेर काढण्यात आले. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईटीच्या सराव परीक्षेला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी विद्याशाखेतील प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीच्या पूर्वतयारीसाठी ऑनलाइन सराव परीक्षेला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. सोमवारपासून सुरू झालेली ही परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर पार पडणार आहे. सराव परीक्षेसाठी सुमारे ५५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

सराव परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण प्रविष्ट झालेल्या विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत अत्यल्प आहे. चार लाख १३ हजार विद्यार्थ्यांनी राज्यभरातून या परीक्षेसाठी अर्ज भरला आहे. यंदा पहिल्यांदाच ही परीक्षा ऑनलाइन होत आहे. यामुळे या बदललेल्या माध्यमाचा सराव विद्यार्थ्यांना व्हावा याकरिता सीईटी सेलच्या वतीने सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सराव परीक्षा ऑनलाइन माध्यमातून देण्यासाठी विद्यार्थ्यांना भाषेचा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये सुमारे पावणेसहा हजार विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून परीक्षा देण्याचा पर्याय निवडला आहे.

..

संपर्क साधण्याचे आवाहन

ज्या विद्यार्थ्यांनी ही सराव परीक्षा देण्यासाठी वैयक्तिक नोंदणी केली आहे, त्यांना मोबाइल क्रमांक व लॉग इन आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने सराव परीक्षा देता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी http://mhtcetpractisetest2019.offee.in या वेबसाइटवर संपर्क साधावा, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांची धावपळ अन् बचावकार्याला वेग

$
0
0

सिटी सेंटर मॉलमध्ये मॉक ड्रील

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असल्याने सध्या शहरातील मॉल्समध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. सोमवारी दुपारीही उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलला गर्दी झाली असतानाच अचानक अग्निशामक दलाचे बचावकार्य सुरू झाल्याने नागरिकांची धावपळ सुरू झाली. पण, अग्निशामक दलाच्या जवानांनी या मोहिमेची माहिती देताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

अग्निशमन सप्ताहात (१४ ते २० एप्रिल) आपत्कालीन स्थितीत नागरिकांच्या बचावासाठी दल सज्ज असल्याचा संदेश देण्यासाठी सिटी सेंटर मॉलमध्ये मॉक ड्रील करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने आपत्तीग्रस्त नागरिकांची सुटका, आग विझविणे आणि बचावकार्य या तीन मुद्द्यांवर भर देण्यात आला. पहिल्या टप्प्यात मॉलच्या टेरेसवर अडकलेल्या नागरिकांना मुक्त करण्यात आले. यामध्ये सहा महिलांचा समावेश होता. यानंतर जिन्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात येऊन या दोन्ही स्थळी अडकलेल्या नागरिकांना सुखरूप सोडवून अॅम्ब्युलन्समध्ये बसविण्यात आले. यानंतरच्या टप्प्यात मॉल परिसरात लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. या मोहिमेत लिडिंग फायरमन म्हणून श्याम राऊत, अर्जुन पोरजे, इक्बाल शेख यांसह शिवाजी फुगट, भीमा खोडे, दिनेश लासुरे, विजय शिंदे, ज्ञानेश्वर दराडे, ईसाक शेख व वाहनचालक देवीदास इंगळे आणि अभिजित देशमुख आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृतांच्या कुटुंबीयांना आज मिळणार मदत

$
0
0

नाशिक : रविवारी जिल्ह्यात पावसाने चार जणांचे बळी घेतले. संबंधित मृत व्यक्तींच्या नातलगांना सरकारद्वारे प्रत्येकी चार लाखांची मदत मंजूर करण्यात आली आहे. आज (दि. १६) दुपारपर्यंत ही मदत कुटुंबीयांकडे सुपूर्द केली जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दिंडोरी तालुक्यातील मानोरी येथे वीज अंगावर पडून अनिल गवे (वय ३२), सागर गवे (वय १७) व रोहित गायकवाड (वय १८) या तरुणांचा मृत्यू झाला. खडक ओझर (ता. चांदवड.) येथे वीज अंगावर पडल्याने जनाबाई सुभाष गिरी (वय ४०) ही महिला ठार झाली. या चारही मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकारी निकषानुसार प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारच्या निकषानुसार जनावरांच्या मालकांनाही मदत देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैसाखी उत्साहात; प्रकाशपर्वास प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरात सर्व शीख बांधवांनी बैसाखी सण उत्साहात साजरा केला. यातील प्रकाशपर्वाचा सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. ५५० व्या प्रकाशपर्वाच्या प्रारंभी शिंगाडा तलाव येथील गुरुद्वारात श्री गुरू ग्रंथसाहिबचे अखंड पाठ व अन्य धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. गुरू नानकदेवजी सेवा असोसिएशनतर्फे नाशिक व मनमाड येथील गुरुद्वारांच्या सहकार्याने गुरू नानकदेवजी यांचे '५५० वे प्रकाश पर्व' मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे. रविवारी (१४ एप्रिल) रोजी या प्रकाशपर्वास प्रारंभ झाला. त्यानिमित्ताने लंगर आयोजित करण्यात आले होते. अमृतसर येथील भाई गुरजीत सिंग यांची प्रमुख उपस्थिती लंगरला होती. प्रकाश पर्वानिमित्त यंदा नाशिक व मनमाडमध्ये वर्षभर अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यामध्ये कीर्तन, कथा, प्रभात फेरी, लंगर यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचा सहभाग असेल. माहितीपूर्ण कार्यशाळा आणि व्याख्यानांचेही आयोजन असोसिएशनतर्फे केले जाणार आहे. सोहळ्यानिमित्त गुरुद्वारांमध्ये प्रत्येक महिन्यात वैद्यकीय शिबिरे होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांची कसोटी; पेशंटची वाढली जीवनदोरी

$
0
0

अठ्ठावीस दिवस इक्मो मशिनद्वारे उपचार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शरीरातील प्राणवायू कमी झाला की मनुष्याच्या मेंदूसह किडनी व इतर अवयवांवर परिणाम होऊ लागतो. अशावेळी व्हेंटिलेटरचा पर्याय वापरला जातो. कृत्रिम श्वासोश्वास देऊनही पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही, तर पेशंटचे बरेवाईट होण्याचा धोका असतो. अशाच घटनेला ४७ वर्षांच्या इंजिनीअरला समोरे जावे लागले. सुमारे ४५ दिवस व्हेंटिलेटर आणि त्यानंतर २८ दिवस इक्मो मशिन्सद्वारे उपचार केल्यानंतर या पेशंटला मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यात यश मिळाले.

किरण उज्जैनकर असे या पेशंटचे नाव असून, ते एकलहरा औष्णिक केंद्रात अतिरिक्त एक्झिक्यूटिव्ह इंजिनीअर म्हणून काम पाहतात. अडीच महिन्यांपूर्वी त्यांना व्हायरल निमोनियाचा त्रास झाला. हळूहळू त्रास वाढला आणि त्यांच्या फुफ्फुसाने काम करणे बंद केले. फुफ्फुसाद्वारे रक्ताला मिळणारे ताजे ऑक्सिजन बंद झाले. शेवटी त्यांना एका हॉस्पिटलमध्ये तब्बल ४५ दिवस ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. व्हेंटिलेटरवर ठेवूनही उज्जैनकर यांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळेना. त्यामुळे त्यांना तातडीने मॅग्नम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याठिकाणी इक्मो हे मशिन असून, भारतात अवघ्या १० ते १२ ठिकाणी हे मशिन उपलब्ध आहे. शरीरातील अशुद्ध रक्त बाहेर काढून त्यात ऑक्सिजन टाकून तेच रक्त पुन्हा पेशंटला देण्यात येते. डॉ. मनोज चोपडा, डॉ. स्वप्निल साखला, भूलतज्ज्ञ डॉ. संदीप भंगाळे, बायपास शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. प्रणव माळी, परफ्युजनिस्ट सोनम तसेच अॅडमिनिस्टेटर डॉ. खुशमन वैद्य यांनी उपचार सुरू केले. मात्र या उपचारांना सुद्धा पेशंटचा प्रतिसाद मिळेना. शक्यतो या मशिनचा वापर फारतर १० दिवसांपर्यंत करण्यात येतो. मात्र, उज्जैनकर यांच्या कुटुंबीयांनी उपचार सुरू ठेवण्याचा आग्रह धरला. उपचार खर्चिक होता. मात्र उज्जैनकर कुटुंबीयाची घालमेल लक्षात घेता हा उपचार पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल २८ दिवसांच्या प्रदीर्घ उपचारानंतर उज्जैनकर यांचे फुफ्फुस काम करू लागले. जवळपास ७२ दिवस उज्जैनकर यांनी मृत्युशी झुंज दिली. कुटुंबियाचा पाठिंबा, वेळेवर झालेली आर्थिक मदत आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे उज्जैनकर या आजारातून पूर्णत: बरे झाले.

...

इक्मो मशिनचा वापर भारतातच नव्हे, तर जगभरात फारच कमी प्रमाणात केला जातो. पेशंटवर २४ तास लक्ष ठेवणे आवश्यक असते. रक्ताची गाठ होणे किंवा रक्तात हवेचा फुगा तयार होणे याकडे लक्ष पुरवावे लागते. अठ्ठावीस दिवस इक्मो उपचारानंतर एखाद्या पेशंटचा जीव वाचविणे ही भारतातच नव्हे, तर जगभरातील पहिलीच घटना असावी.

- डॉ. मनोज चोपडा, मॅग्नम हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


७५ आठवडे बाजारांना २९ला सुटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक, दिंडोरीसह धुळे मतदार संघातही २९ एप्रिलला मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने या दिवशीचे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने दिले आहेत. प्रत्यके तालुक्यात साधारण पाच गावांमध्ये सोमवारी आठवडे बाजार भरतो. मतदानाच्या दिवशी सोमवार आल्याने या दिवशीचे आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असताना प्रशासनानेही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. प्रत्येक व्यक्तीने मतदानाचा हक्क बजवावा आणि मतदानाचा टक्का वाढावा याकरीता निवडणूक आयोग आग्रही आहे. म्हणूनच यंदा मतदानाचे दिवशी दिव्यांग बांधवांच्या घरापर्यंत वाहन पाठविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. खेड्यापाड्यांमध्ये भरणाऱ्या आठवडे बाजारांना आसपासच्या गावांमधील ग्रामस्थांची खरेदीसाठी गर्दी होते. व्यावसायिकांनी दुकाने थाटली तर तेदेखील मतदानापासून वंचित राहू शकतात. यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य सरकारने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनानेही संबंधित यंत्रणेला या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. १५ तालुक्यांमधील किमान ७५ गावांमध्ये आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. काही गावांत आठवडे बाजाराच्या जवळच मतदान केंद्र असण्याची शक्यता आहे. शंभर मीटर झोन लागू केल्यानेदेखील बाजार भरवण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदानासाठी व आठवडे बाजारासाठी होणाऱ्या दुहेरी गर्दीचे व्यवस्थापन करणे अवघड होऊ शकते. यामुळे मतदानाच्या प्रक्रियेत राजकीय किंवा वैद्यकीय वादाचा प्रश्न उद्भवल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचीदेखील शक्यता आहे. म्हणूनच आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रथोत्सवाचा आज उत्साह

$
0
0

श्रीरामरथ आणि गरूड रथाची मिरवणूक

...

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम जन्मोत्सवातील चैत्र शुध्द एकादशीला निघणाऱ्या रथोत्सवात नाशिककर मोठ्या श्रध्देने आणि उत्साहाने सहभागी होतात. यंदाचा रथोत्सवाची तयारी झाली असून, आज (दि.१६) सायंकाळी ५ वाजता श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती रथात विराजमान करून या रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

काळाराम मंदिराच्या पूर्वदरवाजा येथे मंदिरात असलेल्या पाषाणाच्या मूर्ती हलविणे शक्य नसल्यामुळे श्रीरामचंद्रांच्या बहुमूर्ती पालखीतून अगोदर गरूड रथातून पुढे आणून दोन्ही रथ समांतर आणले जातात. गरूड रथातील मूर्ती रामरथात आणल्या जातात. मान्यवरांच्या उपस्थितीत आरती झाल्यानंतर रथोत्सव सुरू होतो. या रथोत्सवात सनई चौघडा, बॅण्डपथक, गरूडरथ, रामरथाकडे मुख करून उलट्या दिशेने चालणारे मानकरी बुवा, रामरथ अशी हा रथोत्सव बघण्यासाठी आणि दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होत असते.

श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी सवाई माधवराव पेशवे यांना आरोग्यप्राप्ती व्हावी, यासाठी नवस केला होता. नवस पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रभू श्रीरामाला रामरथ अर्पण केला. या रथाची देखभालीची जबाबदारी त्यांचे मामा श्रीमंत सरदार रास्ते यांच्याकडे दिली होती. त्यांनी रास्ते आखाडा तालीम संघाची स्थापना केली. त्यात व्यायामप्रेमी घडविले. तेच व्यायामप्रेमी पुढे रथ ओढण्याची जबाबदारी पार पाडू लागले. आजतागायत रथ ओढण्याची जबाबदारी रास्ते आखाडा तालीम संघाकडेच आहे.

पूर्वी रथाचा मार्ग हा कच्चा होता. वाघाडी नाल्यातून रथ नेत असताना रथ गाळात रूतला, तो काढण्यासाठी पाथरवट समाजाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. तेव्हापासून पाथवट समाजालासुद्धा रथ ओढण्याचा मान मिळाला. गरूड रथ ओढण्याचा मान अहिल्याराम व्यायामशाळेला आहे. दोन्ही रथ नाड्याच्या साह्याने ओढलेले जातात. रथाच्या पुढे आणि मागे दोन्ही बाजूला जाड नाडे असतात. उताराला मागील नाड्यांनी रथाचे नियंत्रण केले जाते. रथ वळविण्यासाठी धुरीचा वापर केला जातो. धुरी म्हणजे लाकडाचा मोठा वासा असतो. त्यासाठी प्रशिक्षित धुरंधर नेमले जातात. ते आपले कसब पणाला लावून रथाला दिशा देण्याचे काम करतात.

श्री काळाराम मंदिरातील पुजाऱ्यांपैकी एका पुजाऱ्याला दरवर्षी या श्रीरामजन्मोत्सवाच्या वेळी पूजेचा मान असतो. त्याला मानकरी बुवा म्हटले जाते. हे मानकरी बुवा चैत्र प्रतिपदा ते नवमीपर्यंत व्रत धारण करतात. हे बुवा रथोत्सवाला श्रीरामाच्या रथापुढे मुख करून उलट्या दिशेने मार्गक्रमण करीत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटीतटीचा सामना

$
0
0


गौतम संचेती

गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सलग यश मिळवणाऱ्या भाजपला धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी सोपी नाही. भाजपचे विद्यमान खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या या मतदारसंघात काँग्रेसने माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र व धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. या निवडणुकीत भाजपचा राजीनामा देऊन धुळे येथील आमदार अनिल गोटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे भाजपला, तर माजी आयपीएस अधिकारी डॉ. संजय अपरांती यांनी बसपा, समाजवादी पार्टीतर्फे अर्ज दाखल केल्यामुळे काँग्रेसला फटका बसणार आहे.

धुळे व नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे तीन, तर भाजप- शिवसेना युतीचे तीन आमदार होते. अनिल गोटे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यामुळे आता ही संख्या दोनवर आली आहे. या लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण हे तीन मतदारसंघ येतात. या मतदारसंघात २००९ मध्ये भाजपतर्फे प्रतापदादा सोनवणे व त्यानंतर २०१४ मध्ये डॉ. सुभाष भामरे यांनी बाजी मारली. या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसने अल्पसंख्याक असलेल्या आमदार अमरिशभाई पटेल यांना उमेदवारी दिली होती. पण, आता काँग्रेसनेही तुल्यबळ मराठा समाजाचा उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक अटीतटीची झाली आहे.

या मतदारसंघात दोन्ही प्रमुख उमेदवार मराठा समाजाचे आहेत. पक्षीय पातळीवर दोघांचे बळ व नातेगोतेही समसमान असल्यामुळे ही निवडणूक रंगतदार आहे. भाजपने चार महिन्यांपूर्वी झालेल्या धुळे महानगरपालिकेत ७४ पैकी ५० जागा जिंकत वर्चस्व मिळवल्यामुळे लोकसभेतही धुळे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे पारडे जडच राहणार आहे. मुस्लिमबहुल असलेल्या मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व जनता दलाने कुणाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्याचा चांगलाच फायदा होईल.

एकुण मतदार - १९०४८५९
मतदान केंद्र - १७६८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस, भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई

$
0
0

सन २०१४ पूर्वीपर्यंत बालेकिल्ला राहिलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीतील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागलेला असून, हा गड परत मिळवण्यासाठी काँग्रेस यंदा पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे; तर भारतीय जनता पक्षानेही काँग्रेसला दुसऱ्यांदा धोबीपछाड देण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. परंतु, विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांच्या विरोधात भाजपचेच निष्ठावंत डॉ. सुहास नटावदकर यांची बंडखोरी आणि धनगर आरक्षणावरून आदिवासी समाजाच्या नाराजी भाजपला भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसने अॅड. के. सी. पाडवी यांच्या रूपाने उमेदवारीबाबत फिरवलेली भाकरी आणि माणिकराव गावित यांच्या प्रचारातील सक्रियतेमुळे काँग्रेस एकसंध झाली असतानाच, भाजपमध्ये मात्र डॉ. गावित आणि निष्ठावंत असे दोन गट पडले आहेत. नटावदकर यांनी बंडखोरी केली असली, तरी मुख्य लढत पाडवी आणि गावित यांच्यातच होणार आहे. परंतु, आदिवासींच्या मतांमध्ये विभाजन अटळ असल्याने बिगर आदिवासींची मते निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

आदिवासीबहुल नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा १९५२पासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. येथील आदिवासी समाज आणि काँग्रेसचे अतूट नाते राहिले असून, देशभरातील काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात नंदुरबार येथून करण्याची परंपरा २०१४ पर्यंत कायम राहिली होती. विशेषत: इंदिरा गांधी यांना मानणारा आदिवासी वर्ग मोठा आहे. जनता पक्षाच्या लाटेतही काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यात काँग्रेसला यश आले होते. परंतु, सन २०१४ मध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत मात्र काँग्रेसचा हा बालेकिल्ला नेस्तनाबूत झाला अन् प्रथमच आदिवासी भागात कमळ फुलले. तब्बल नऊ वेळा खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांचा नवख्या डॉ. हीना गावित यांनी पराभव केला. हा पराभव चांगलाच जिव्हारी लागल्याने काँग्रेसने हा गड परत मिळविण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू करीत उमेदवार बदलण्याचे धोरण स्वीकारले. त्यासाठी अक्कलकुवा येथून तब्बल पाच वेळा आमदार म्हणून निवडून येत असलेले आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे अॅड. के. सी. पाडवी यांना आधीच चाल देण्यात आली. अपेक्षेप्रमाणे त्यांना या निवडणुकीत उमेदवारी बहाल करण्यात आली आहे, तर भाजपनेही डॉ. हीना गावित यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. डॉ. हीना यांच्यापेक्षा त्यांचे वडील तथा माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा मतदारसंघात प्रभाव आहे. त्यामुळे डॉ. हीना या पूर्णपणे वडिलांवरच अवलंबून आहेत, दुसरीकडे या मतदारसंघात काँग्रेसची स्वतंत्र फळी आहे.

या मतदारसंघात सहापैकी नवापूर, साक्री, शिरपूर, अक्कलकुवा या चार मतदारसंघांवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. सोबतच विधान परिषदेचे दोन आमदारही काँग्रेसचे असून, सहा आमदारांचे बळ काँग्रेसच्या पाठीशी आहे. जिल्हा परिषदेसोबतच नवापूर, नंदुरबार, शिरपूर, साक्री या नगरपालिका काँग्रेसकडे आहेत. मुलाला उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले माजी मंत्री माणिकराव गावित मनधरणीनंतर काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत, तर माजी मंत्री स्वरूपसिंह नाईक, अमरीश पटेल, अॅड. पद्माकर वळवी यांनीही आपले बळ पाडवींच्या पाठीशी उभे केले आहे. काँग्रेसच्या आजी-माजी बड्या नेत्यांचे बळ आणि स्थानिक स्वराज संस्थांमध्ये काँग्रेसची पाळेमुळे खोल असली, तरी डॉ. विजयकुमार गावित यांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे असलेले छुपे पाठबळ ही काँग्रेससाठी डोकेदुखी आहे. डॉ. गावित यांनी बरीच वर्षे राष्ट्रवादीत काढलेली असल्याने राष्ट्रवादीवरील त्यांची पकड अजूनही कायम आहे. त्याचाच वापर ते आजही काँग्रेसच्या विरोधात सफाईदारपणे करून घेत आहेत. डॉ. गावित यांचा स्वत:चा एक चाहता वर्ग आहे. वैयक्तिक करिश्मा अन् राष्ट्रवादीचे छुपे बळ पाठीशी असूनही भाजपच्या निष्ठांवतांचा मोठा गट डॉ. गावित कुटुंबीयांच्या विरोधात आहे. तळोद्याचे भाजपचे आमदार उदेसिंग पाडवी हे प्रचारापासून अंतर राखून आहेत, तर डॉ. सुहास नटावदकर यांनी थेट बंडखोरी केली आहे. डॉ. नटावदकर यांच्या पाठीशी नंदुरबार, तळोदा, अक्कलकुव्यातील मोठा गट असल्याने भाजप दोन गटांत विभागली गेली आहे. त्यामुळे डॉ. गावितांना या ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे.

आदिवासी समाज काँग्रेससोबत वर्षानुवर्षे राहिला असला, तरी या भागातील स्वच्छ पाणी, आरोग्य, कुपोषण, शिक्षणाच्या सुविधांचा अभाव, रोजगाराचा प्रश्न सोडविण्यात काँग्रेसला अपयश आले. पायाभूत सुविधांच्या निर्मितीकडेही आतापर्यंत दुर्लक्ष झाले आहे. खेड्या-पाड्यांतील महिलांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी भटंकती करावी लागते. दळणवळणाच्या सुविधांकडे फारसे फारसे लक्ष दिले गेले नाही. आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी काँग्रेससोबतच त्यांनंतर आलेल्या भाजपने फारसे प्रयत्न केलेले नाहीत. आदिवासींच्या योजनांचा बट्ट्याबोळ करीत भ्रष्टाचार करण्यातच आदिवासी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. काँग्रेसनंतर भाजपला संधी मिळल्यानंतर त्यांनीही आदिवासींची निराशा केली आहे. आदिवासींचे प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच जटील बनले आहेत. आदिवासी तरुण हा शिक्षित झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आदिवासींचा एक तरुण वर्ग निर्णायक भूमिका निभावणार असल्याचे चित्र आहे.

भाजप सरकारने धनगर आरक्षणाचा सुरू ठेवलेल्या घोळावरून या भागात भाजपविरोधात मोठी नाराजी आहे. भाजप धनगरांना आदिवासींचे आरक्षण देणार असल्याचा प्रचार करण्यात काँग्रेस यशस्वी ठरली आहे, दुसरीकडे या मतदारसंघात धनगरांचीही मते मोठ्या प्रमाणावर असून, अद्याप धनगरांना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले नसल्याने ते भाजपवर नाराज आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर डॉ. हीना गावित यांनी अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आदिवासींनंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा समाज असलेल्या मराठा समाजाने थेट डॉ. हीना यांना मतदान न करण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपची अडचण झाली आहे. शिवसेना नंदुरबारमध्ये काँग्रेससोबत सत्तेत असून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत जाण्यास थेट विरोध केला आहे. त्यामुळे डॉ. हीना गावित यांच्या अडचणींत वाढ झाली आहे, तर आजारपणामुळे प्रचारापासून लांब असलेले आमदार चंद्रकात रघुंवशी हे शेवटच्या टप्प्यात प्रचारात सहभागी होणार असल्याने काँग्रेसला बळ मिळणार आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी काँग्रेसला सकारात्मक वातावरण असले, तरी भाजपकडे मतदारांवर प्रभाव पाडण्याची असलेली क्षमता, नरेंद्र मोदी यांची प्रस्तावित सभा आणि डॉ. विजयकुमार गावितांकडे निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेला करिश्मा यामुळे भाजपकडे वातावरण झुकण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

मतदार : १८,७०,११७
मतदान केंद्रे : २,११५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीईचे १३२५ प्रवेश निश्चित

$
0
0

- राज्यभरातील प्रवेश : ११ हजार ६०५

- २६ एप्रिलपर्यंत प्रवेश मुदत

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत मंगळवार सायंकाळपर्यंत १३२५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. प्रवेश प्रक्रियेला ११ एप्रिलपासून सुरुवात झाली असून, २६ एप्रिलपर्यंत मुदत आहे.

बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार आरटीई प्रक्रिया राज्यभरात राबविण्यात येत असून, २५ टक्के राखीव असलेल्या जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राज्यभरात सुरू आहे. जिल्ह्यात पाच हजार ७६४ जागांसाठी १४ हजार ९९५ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा स्तरावर होणारी लॉटरी प्रक्रिया यंदा प्रथमच राज्यस्तरावरून काढण्यात आली आहे. पुणे येथे ही प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांची निवड या लॉटरीतून झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी समिती करून प्रवेश निश्चिती केली जात आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून सर्व तालुक्यांमध्ये, शाळांजवळ पडताळणी केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्यभरात १ लाख १६ हजार ७७९ जागांसाठी ११ हजार ६०५ प्रवेश निश्चित झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images