Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पालकांसाठी वैचारिक समुपदेशनाची मुहूर्तमेढ

$
0
0

'समर्थ ट्रस्ट'तर्फे रविवारी व्याख्यान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपले अपत्य जगातील सर्वोत्तम बनावे, अशी प्रत्येक पालकांची अपेक्षा असते. या अपेक्षेस अनुसरुनच 'समर्थ ट्रस्ट'तर्फे अनोख्या व्याख्यान सत्राची मुहूर्तमेढ गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरात रोवली जाणार आहे. 'मेक यूवर चाईल्ड युनिक इन दि वर्ल्ड' या संकल्पनेंतर्गत नामवंत समुपदेशक आणि करिअर मार्गदर्शकांच्या व्याख्यानांचा लाभ रविवारी (दि. ६) नाशिककरांना घडणार आहे.

भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या 'व्हिजन २०२०'चे ध्येय समोर ठेऊन समर्थ ट्रस्टने 'पालकत्व, समाज आणि देश' हा उपक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत शहरात समुपदेशनाचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उपक्रमास प्रारंभ होणार आहे. कालिदास कलामंदिरात दुपारी साडेबारा ते चार या वेळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन पालकांना मिळणार आहे. ट्रस्टचे सचिव मनीष मंजुल, निवृत्त लेफ्टनंट कर्नल अमित बत्रा, करिअर मार्गदर्शक डॉ. मंगेश भांगे, ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर आणि रंजिथ कुमार रेड्डी या तज्ज्ञांचे व्याख्यान कार्यक्रमात होईल. व्याख्याते प्रत्येकी ३० मिनिटे मार्गदर्शन करणार असून, त्यानंतर पालकांना तज्ज्ञांसोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

व्याख्यानातून पालकांची पाल्याबाबतची भूमिका, पालकत्व जोपासताना घ्यायची काळजी, पाल्याच्या करिअरबाबतची पालकांची भूमिका, यासह आदर्श पाल्य घडविण्यासाठीच्या टिप्स पालकांना देण्यात येणार आहेत. समाजात जबाबदार नागरिक घडविण्यासाठी पुढील पिढीला पालकांना कशा पद्धतीने प्रोत्साहन द्यावे, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रम मोफत असून, नाशिककरांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रलय सरकार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तासाभरात अपहरणकर्ते गजाआड

$
0
0

किरकोळ वादातून होणारी युवकाची हत्या टळली

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकारवाडा पोलिसांनी दाखवलेल्या सतर्केतेमुळे जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण झालेल्या युवकाची अवघ्या तासाभरात सुटका झाली. यामुळे मोठा अनर्थ टळला आणि युवकही सुखरूप परतला.

या प्रकरणी पोलिसांनी किरण शांताराम डगळे (वय २८, रा. डोंगरे वसतिगृह मैदान), छोटू गोनामी पहाडे (वय ४५, रा. सावकरनगर), चेवीन विश्वनाथ पवार (वय २७, रा. खामगाव, बुलढाणा), धनराज हरिभाऊ हरणकोरे (वय ३६, रा. हनुमानवाडी) यांना अटक केली. या संशयितांनी विकी प्रकाश कसबे या युवकाचे प्रमोद महाजन गार्डन येथील कोपऱ्यावरून दोरीने हातपाय बांधून अपहरण केले होते. ही घटना ३० मार्च रोजी भरदुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास घडली होती. हा प्रकार घडला त्यावेळी विकीचा भाऊ शिवा आणि विकीची पत्नी हे देखील तिथे होते. किरकोळ वादातून थेट अपहरण करून संशयित विकीला एका छोटा हत्ती वाहनात घालून निघून गेले. शिवाने ही माहिती लागीलच पोलिस कंट्रोल रूमला कळविली. त्यानुसार तपास करण्याबाबतच्या सूचना सरकारवाडा पोलिसांना मिळाल्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक देवराज बोरसे, पीएसआय योगिता नारखेडे, हवालदार शेळके, सहाणे, पोलिस नाईक प्रशांत मरकड, अमित शिंदे, प्रकाश नागरे, भगवान गवळी आदींनी तपास सुरू केला. त्याआधारे पोलिसांनी मोरेमळा परिसर गाठले. तिथे झाडी झुडपात हातपाय बांधलेला विकी पोलिसांना आढळला.

...

पोलिसांनी वेळीच हालचाल केली, अन्यथा संशयित आरोपी हातपाय बांधून त्या युवकास नदीपात्रत फेकून देणार होते. अवघ्या तासाभरात युवकाची सुटका झाली, तसेच संभाव्य गुन्हादेखील टळला.

- संजय सांगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमचे कुटुंब काँग्रेसशी एकनिष्ठ

$
0
0

भरत गावित यांची स्पष्टोक्ती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मी आणि माझे कुटुंब आम्ही सर्वजण काँग्रेसचेच आहोत. गेल्या पन्नास वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी निष्ठा राखत पक्षप्रमुखांच्या आदेशापलीकडे कधी गेलो नाही. ज्या काळात माझे वडील माजी केंद्रीयमंत्री माणिकराव गावित यांना दोनवेळा मंत्रिपद आणि नऊवेळा खासदार म्हणून पक्षाकडून उमेदवारी मिळाली. यामुळे आमचे कुटुंब काँग्रेस पक्ष कधीही सोडणार नाही, असे स्पष्ट संकेत भरत गावित यांनी नवापूरला झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात दिले. त्यांनी अखेर काँग्रेस पक्षासोबत बंडखोरी न करता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याने आता भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराच्या अडवणी वाढल्या आहेत. नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छूक असलेले माजीमंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांची पक्षाकडून उमेदवारी जाहीर न झाल्याने गावित कुटूंब नाराज झाले होते. मात्र, मंगळवारी (दि. २) सकाळी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे भरत गावित यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. त्यावेळी त्यांनी ठामपणे सांगितले की, मी व माझे कुटूंब काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत. पक्षाक्षी एकनिष्ठ राहू आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार ॲड के. सी. पाडवी यांना निवडून आणण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न करून नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे, नंदुरबारला उद्यापासून अर्जस्वीकृती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे व नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी रणधुमाळीला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. त्यासंदर्भात अधिसूचना जारी झाली असून, निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आपला उमेदवारी अर्ज उद्या (दि. ४) पासून दाखल करू शकणार आहेत. मात्र, दोन्ही जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस व भाजप या प्रमुख पक्षांचे उमेदवार मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर गुढीपाडव्यानंतर आपले उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जयत तयारी करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल करण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. धुळ्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व नंदुरबारसाठी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांच्याकडेच सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची विधानसभा मतदारसंघ निहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करताना उमेदवारास त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपशील तसेच शपथपत्रादवारे सांपत्तिक स्थितीची माहितीही सादर करावी लागणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार असल्यास त्याला रोखीने २५ हजार रुपये अनामत रक्कम तर राखीव प्रवर्गातील व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केल्यास त्याला रोखीने १२ हजार ५०० रुपये व त्याबरोबर जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडणे बंधनकारक असून, पासबुकची झेरॉक्स प्रत उमेदवारी अर्जासोबत जोडावी लागणार आहे.

निवडणूक कार्यक्रम असा...
उमेदवारी अर्ज दाखल .. २ ते ९ एप्रिल
नामनिर्देशन पत्रांची छाननी .. १० एप्रिल
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत .. १२ एप्रिल दुपारी ३ वाजेपर्यंत
मतदानाची तारीख .. २९ एप्रिल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. भामरे आज फोडणार प्रचाराचा नारळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या जाहीर प्रचाराचा शुभारंभ आज (दि. ३) सकाळी शहरातील पांझरा नदीकिनारी खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या आशीर्वादाने होणार आहे. डॉ. सुभाष भामरे महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नारळ वाढवून प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करून त्यानंतर पायी रॅली काढत पारोळा रोडवरील राम पॅलेस येथे शिवसेना-भाजपा-रिपाई महायुतीचा महामेळावा घेण्यात येणार आहे. या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, भाजप जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, रिपाई जिल्हाध्यक्ष संजय पगारे, महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहतील.

‘शेतमालाला कवडीमोल भाव दिला’
धुळे : शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा भाव कधी नव्हे एवढा पाच वर्षांत घसरला आहे. कांदा, कापूस या पिकांना कवडीमोल भाव या सरकारने दिला, असा आरोप काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमदेवार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांनी केला. शेतकरी कर्जबाजारी झाला असून, आता दोन वेळची भाकरी हवी म्हणून शेतात मोलमजुरी करून तो पोट भरत आहे. ही सर्व परिस्थिती बदलायची असेल तर हे सरकार बदलायला हवे, असेही अश्विनी पाटील यांनी सांगितले. त्यांनी प्रचारादरम्यान, शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या भेटी घेतल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ए. टी. पाटलांनी निवडणूक लढवावीच

$
0
0

जलसंपदामंत्री गिरीश महाजनांचे आव्हान

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

खासदार ए. टी. पाटील यांना वाटत असेल त्यांनी खूप चांगले कार्य केले आहे. लोकं त्यांना निवडून देतील तर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवूनच दाखवावी, असे खुले आव्हान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी (दि. २) पत्रकारांशी बोलताना दिले.

लोकसभा निवडणुकीबाबत भाजपच्या बैठकीसाठी जलंसपदामंत्री गिरीश महाजन मंगळवारी जळगावात आले होते. या वेळी जीएम फाउंडेशन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, खासदार ए. टी. पाटलांनी फार मोठे काम केले आहे. त्यांना वाटत असेल लोकं त्यांना निवडून देतील तर त्यांनी निवडणूक लढवावी व अनामत रक्कम वाचवून दाखवावी, असे आव्हान मंत्री महाजन यांनी दिले. खासदार ए. टी. पाटील यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. त्यांनी काम केले असल्यास लोकसभेची निवडणूक लढवावी. असेच आव्हान मी धुळ्यात महापालिकेच्या निवडणुकीत आमदार अनिल गोटे यांनादेखील दिले होते. मात्र, त्याठिकाणी त्यांचे किमान एक तरी जागा आली. अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्या बंडाबाबत बोलताना, चौधरी यांच्यासोबत बोलणे झाले असून, ते माघार घेतील, असा विश्वास मंत्री महाजनांनी व्यक्त केला.

गावितांबाबत ‘वेट अॅण्ड वॉच’
नंदुरबार येथील काँग्रेसचे माजी खासदार माणिकराव गावित यांच्या मुलाच्या भाजपप्रवेशाबद्दल विचारले असता, आता मला काही माहीत नाही. दोन दिवस वाट बघा, असा सूचक इशारादेखील महाजन यांनी या वेळी बोलताना दिला.

शिवसेनेचा सत्तेत सहभाग अवघड
शिवसेनेला स्थानिकपातळीवर सत्तेत सामावून घेण्यासाठीच्या मागणीबद्दल चर्चा होईल. मात्र, मनपा आणि जिल्हा परिषदेत आम्ही स्पष्ट बहुमतात आहोत. त्यामुळे तेथे शिवसेनेला सत्तेत सहभागी करणे अवघड असल्याचेही मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. राज्यात काही ठिकाणी भाजप तर काही ठिकाणी शिवसेना स्थानिक पातळीवर स्पष्ट बहुमतात आहे. आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो आहोत, असेही महाजन यांनी सांगितले.

भाजप-शिवसेनेत दिलजमाई
जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेच्या युतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतरदेखील जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपने सन्मान दिल्याशिवाय प्रचाराचे काम न करण्याचा पावित्रा घेतला होता. अखेर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी (दि. २) शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर केली. यानंतर शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपसोबत असल्याचे जाहीर केले. या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन मतभेद मिटल्याचे जाहीर केले.
राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा युतीच्या निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, तसे झाल्यास आश्चर्य वाटू नये, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. जी. एम. फाउंडेशन येथे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी गिरीश महाजन यांनी नगरसेवकांची हजेरी घेतली. शहरात होणा­ऱ्या मतदानापैकी ८० टक्के मतदान भाजपलाच झाले पाहिजे याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. राज्यातील २ ते ३ जागांच्या विजयाबाबत संशय असून, त्यांची जबाबदारी मी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्णधार खासदार शरद पवार यांना त्यांच्या नातवानेच बाद केले आहे. दि. ६ एप्रिल रोजी युतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फुटणार असून, याच दिवशी नंदुरबार येथे युतीचे उमेदवार अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरविणार

$
0
0

काँग्रेस आघाडीच्या मेळाव्यात निर्धार ; शक्तिप्रदर्शनाने डॉ. उल्हास पाटलांचा अर्ज दाखल

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सत्तेची मस्ती आली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून बाहेर काढून सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरविण्याचा संकल्प मंगळवारी (दि. २) शहरातील लेवा भवन येथे कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या मेळाव्यात करण्यात आला. रावेर लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचा उमेदवारी अर्ज जंगी मेळाव्याद्वारे शक्तिप्रदर्शन करून दाखल करण्यात आला.

मेळाव्यात माजी विधानसभाध्यक्ष अरुण गुजराथी, कॉँग्रेसच्या जळगाव प्रभारी डॉ. हेमलता पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, राष्टÑवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, अरुण पाटील, कॉँग्रेसचे महानगरप्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, गफ्फार मलीक, राष्ट्रवादीचे निरीक्षक करण खलासे, पीआरपीचे जगन सोनवणे यांच्यासह कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. विद्यमान खासदारांनी गेल्या निवडणुकीत जी काही आश्वासने दिली होती. त्यापैकी कोणतेही आश्वासन पूर्ण केले नसून, केवळ रेल्वेला थांबा देण्याचे काम केले. आता त्यांना थांबा देण्याची वेळ आली असल्याचे माजीमंत्री अरुण गुजराथी यांनी सांगितले.

एकही विकासाचे काम नाही
काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षानी एकमेकांचे काम करणे गरजेचे आहे. कारण या निवडणुकीत जर आपला पराभव झाला तर भविष्यात भाजपविरोधात लढण्यासाठी आपल्याला उमेदवार मिळणार नाही, असे मत राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी व्यक्त केले. तसेच दोन्ही जागा जिंकून गिरीश महाजनांची झोप उडवून द्या, असेही आवाहन डॉ. पाटील यांनी केले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन व आमदार एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यात एकही विकासाचे काम केले नाही. बोदवडला १५-१५ दिवस पाणीपुरवठा होत नाही. डॉ. उल्हास पाटील यांनी निवडून आल्यानंतर बोदवडचा पाणी प्रश्न सोडविण्याची हमी दिली तरच आम्ही त्यांचे काम करू, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी दिला.

मंत्र्यांचा फुगा फोडा
जिल्ह्यातील एक मंत्री नाशिक येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे टॉनिक घेऊन फुगला आहे. त्यांच्या अहंकाराचा फुगा आपल्याला या निवडणुकीत फोडायचा असल्याचे आवाहन कॉँग्रेसच्या प्रभारी डॉ. हेमलता पाटील यांनी काणाचेही नाव न घेता केले. त्यांची सत्तेची मस्ती आता जिरवण्याची वेळ आली असून, संधीचे सोने करून दाखवण्याचे आवाहनदेखील त्यांनी या वेळी बोलताना केले. डॉ. उल्हास पाटील यांनी जबरदस्त शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सुरुवातीला कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यानंतर लेवा भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील ७१ कैद्यांची होणार मुक्तता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महात्मा गांधी यांनी काढलेल्या ऐतिहासिक दांडी यात्रेला येत्या ६ एप्रिलला ८९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्यातील विविध कारागृहांमधील ७१ कैद्यांची मुक्तता करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. गंभीर गुन्हे नसलेले व चांगली वर्तणूक असलेले कैदी यासाठी पात्र ठरणार आहेत. आचारसंहितेमुळे मुक्ततेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल. त्यांच्या मान्यतेनंतरच कैद्यांची मुक्तता होणार आहे. दरम्यान, नाशिकरोड कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कैद्यांच्या मुक्ततेबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट केले.

केंद्र सरकार २ ऑक्टोबर २०१८ ते २ ऑक्टोबर २०१९ दरम्यान महात्मा गांधींची दीडशेवी जयंती साजरी करत आहे. ही पार्श्वभूमीही कैद्यांच्या मुक्ततेला आहे. जे कैदी ६ एप्रिलला मुक्त केले जाणार आहेत, त्यात येरवड्याचे १४, तळोज्याचे १२, नाशिकरोडचे सात, मुंबईचे सहा, ठाण्याचे पाच, भंडाऱ्याचे दोन, अमरावतीचे तीन यांचा समावेश आहे. देशात सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्याने हा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. काही दिवसांत त्यांच्याकडून होकार मिळाल्यानंतर कैदी मुक्ततेची कार्यवाही केली जाईल. राज्याच्या गृहसचिवांना याबाबतची फाइल पाठविण्यात आली आहे. त्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याचे इतिवृत्त गृहखात्याला पाठवले जाईल. कैद्यांची मुक्तता केल्याने निवडणूक आचारसंहितेचा भंग होतो का, याबाबत दुमत आहे. त्यामुळे ही फाइल निवडणूक आयोगाला पाठविण्याची गरज आहे का, यावर गृहसचिव निर्णय घेतील. सूत्रांनी सांगितले की, आचारसंहितेआधी लाभार्थी प्रकल्पातील लाभार्थ्यांची नावे निश्चित झालेली असतील तर आयोगाची परवानगी घेण्याची गरज नाही. मुख्यमंत्री हे गृहखात्याचे प्रमुख आहेत. त्यांनी लाभार्थ्यांची नावे निवडणूक आचारसंहितेआधीच निश्चित केली आहेत. तथापि, आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यपालांनी फाइलवर सही केली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून निवडणूक आयोगाकडे कैदी मुक्ततेचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

गेल्या वर्षी १२ कैदी मुक्त

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात प्रशासनाने गेल्या वर्षी गांधी जयंतीला बारा कैद्यांची मुक्तता केली होती. १४ वर्षे शिक्षा भोगलेल्या आणि वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या कैद्यांचा त्यात समावेश होता. अशक्त, आजारी कैद्यांना या १४/६५ योजनेत प्राधान्य देण्यात येते. या कारागृहात साडेतीन हजारांवर कैदी असल्याने प्रशासनावर ताण येत आहे. कमी मनुष्यबळात काम करावे लागत आहे. त्यामुळे येथून काही कैदी औरंगाबाद कारागृहात हलविण्यास सुरुवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चारा छावण्यांऐवजी डान्स बारला प्राधान्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील चाराटंचाईमुळे शेतकरीवर्ग पुरता हैराण असल्याने शेतकरी सरकारकडे जनावरांसाठी चारा छावण्यांची मागणी करीत आहेत. मात्र, हे कर्मदरिद्री सरकार चारा छावण्यांऐवजी डान्स बार आणि लावण्यांना प्राधान्य देत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर तालुक्यांचा दौरा केला. यावेळी सिन्नर येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार निर्मला गावित, माजी खासदार डॉ, प्रताप वाघ, देवीदास पिंगळे, डॉ. तुषार शेवाळे, कोंडाजीमामा आव्हाड, अॅड. राहुल ढिकले, शरद आहेर आदी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, की शेतकरी चारही बाजूंनू संकटात सापडलेला आहे. त्यामध्ये चाराटंचाईची भर पडली आहे. आज चाराटंचाईमुळे शेतकरी आपल्या धडधाकट जनावरांसह भाकड जनावरांना कत्तलखान्याकडे नेताना दिसत आहे, हे फडणवीस सरकारचे दुर्दैवच म्हणावे लागेल. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे, तसेच तरुण आणि सुशिक्षित तरुण रोजगाराअभावी वैफल्यग्रस्त होत आहे. गॅसच्या वाढत्या दरामुळे महिलावर्ग नाराज आहे, तर इंधन दरवाढीत संपूर्ण यंत्रणाच होरपळून निघत आहे. कष्टकरी आणि कामगारांना खासगीकरणाच्या माध्यमातून रोजगार काढून घेतला जात आहे. अशा येनकेन मार्गाने हे सरकार देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेला पुरते परेशान करीत असून, या नाकर्तेपणाचे धोरण अवलंबिणाऱ्या सरकारला लगाम लावा, असे आवाहन छगन भुजबळ यांनी यावेळी केले. दरम्यान, उमेदवार समीर भुजबळ यांनी मंगळवारी नाशिक शहरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन प्रचार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्किटेक्टचे अधिकार वाढविण्याची तयारी

$
0
0

- दोनशे चौ.मी.पर्यंतच्या बांधकाम परवानगीचे अधिकार देण्याचे प्रयत्न

- बांधकाम क्षेत्राला होणार फायदा

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना विभागाकडून आता विकसक आणि आर्किटेक्टना दोनशे चौरस मीटरपर्यंतच्या प्लॉटवरील बांधकाम परवानगी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यापूर्वीच आर्किटेक्टना दीडशे चौरस मीटरपर्यंतच्या बांधकाम परवानगीचे अधिकार देण्यात आले होते. परंतु, एफएसआयच्या कटकटीमुळे आणि ऑटो डीसीआरच्या किचकट प्रणालीमुळे त्याचा फायदा होत नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यात आयुक्तांनी आता ५० चौरस मीटरची वाढ करण्याची तयारी दर्शवल्याने छोट्या प्लॉटवरील बांधकाम परवानग्यांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

नाशिक शहरातील बांधकाम क्षेत्रामागे गेल्या तीन-चार वर्षांपासून विविध सरकारी नियमांचे शुक्लकाष्ठ लागून आहे. त्यामुळे या क्षेत्राची पुरती कोंडी झाली आहे. एनजीटीचे निर्बंध, कपाट वाद, टीडीआर बंदी यामुळे बांधकाम परवानग्या रखडल्या आहेत. त्यातच ऑटो डीसीआर प्रणालीमुळे प्रकरणे प्रलंबित राहण्याची संख्या वाढतच आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नगररचना विभागाच्या कामकाजाला गती दिली असून, प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी धाडसी निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगररचना विभागात लहान प्लॉटधारकांची बांधकाम परवानगी मिळवण्यासाठी होणारी ससेहोलपट थांबवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आर्किटेक्टना यापूर्वी असलेले दीडशे चौरस मीटरपर्यंतच्या बांधकाम परवानगीचे अधिकार आता दोनशे चौरस मीटरपर्यंत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीकांत बेणी यांचा सचिवपदाचा राजीनामा

$
0
0

'सावाना'तील कलहाची परिणीती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयातील कलहाची परिणीती अखेर प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांच्या राजीनाम्याने झाली आहे. अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी राजीनामा स्वीकारला असून बेणी यांना पदमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रमुख सचिवपदी कुणाची नियुक्ती होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कार्यक्षम आमदार पुरस्कार समारंभ सोहळ्यात बेणी यांनी त्यांच्या भाषणात काही आरोप केले. पुरस्कारासाठी धनंजय मुंढे यांची निवड केल्याने दबावासाठी फोन आल्याचे त्यांनी समारंभात सांगितले. याप्रकरणी सावाना अध्यक्षांनी खुलासा करून तसे काही नसल्याचे स्पष्ट केले. यानिमित्ताने सावानामध्ये उभी फूट पडल्याचे समोर आले. पुढेही ही धुसफूस कायमच होती. नवीन पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांमध्ये उघड दोन गट पडले होते. प्रमुख सचिव या पदासाठी काहींनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते. गेल्या आठवड्यातील बैठकीत स्वाभाविकपणेच त्याचा स्फोट झाला. या बैठकीत बेणी व पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. एकमेकाच्या गळ्याला हात लावण्यापर्यंत वेळ गेली. एका महिला पदाधिकाऱ्याबद्दल अश्लाघ्य शेरेबाजीही झाली. या बैठकीचा बभ्रा माध्यमांमध्ये झाल्यानंतर या कलहाची परिणीती कोणाच्या तरी बळीत होणार हे अपेक्षित होतेच. यापार्श्वभूमीवर बेणी यांनी मिलिंद जहागिरदार, स्वानंद बेदरकर व विनया केळकर यांच्या चौकशीसाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे पत्र पाठविले. त्याची पत्रपरिषदेत माहिती दिली. ही माहिती बेणी देत असताना उर्वरित सर्व पदाधिकारी त्यांच्यापासून फटकून तर होतेच; शिवाय या पत्राबाबत आमचा काहीही संबंध नाही, असे सांगत होते. त्यामुळे 'सावाना'तील कलह आता टिपेला पोहचल्याचे दिसून आले. कार्यकारिणीतील बदलते वारे लक्षात घेऊन बेणी यांनी रातोरात अध्यक्षांकडे राजीनामा दिला. अध्यक्ष औरंगाबादकर यांनीही तात्काळ तो स्वीकारुन बेणी यांना कार्यमुक्त करण्याची तत्परता दाखविली. यातून हा संघर्ष किती तीव्र झाला होता, याची प्रचिती आली आहे.

बेणी यांनी राजीनामा दिल्यानंतर घटनेची सर्व चौकशी करून आणि 'सावाना'च्या हितास्तव बेणी यांना पदमुक्त केले आहे.

- विलास औरंगाबादकर,

अध्यक्ष, सावाना

भ्रष्टाच्या विविध आरोपांमध्ये अटक होऊन जामिनावर सुटका झालेली व्यक्ती वाचनालयासारख्या प्रतिष्ठित संस्थेत पदाधिकारी म्हणून मिरविते हेच मुळात सावानचे दुर्दैव आहे. जेथे तात्यासाहेब, म्हात्रे, बाळासाहेब दातार यांच्यासारख्या दिग्गज मंडळींनी काम केले तेथे बेणीसारख्या व्यक्तीचे असणे धोकादायक आहे. अशा गुन्हेगारी व्यक्तीचे सामान्य सभासदत्वही रद्द केले गेले पाहिजे.

- रमेश जुन्नरे,

माजी पदाधिकारी, सावाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधी विभागातही आउटसोर्सिंगचे वारे!

$
0
0

विभागप्रमुख कंत्राटी तत्वावर नेमण्याचा विचार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपल्या आस्थापनातील रिक्त पदांचा फटका महापालिकेला कायदेशीर सल्ला देणाऱ्या विधी विभागालाही बसला आहे. या विभागाला सध्या कोणी वाली नसल्याने महापालिकेशी संबंधित विविध न्यायालयांमधील दाव्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे महापालिकेविरोधात दावे जात आहेत. त्यामुळे एकीकडे वकील पॅनलची पूनर्रचना करण्यासह विधी विभागप्रमुखपद आउटसोर्सिंगद्वारे भरण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

महापालिकेच्या विविध विभागांना कायदेशीर सल्ला देणारा विधी विभागच सध्या अपंग झाला आहे. महापालिकेशी संबंधित तब्बल २ हजार ७५८ खटले जिल्हा, उच्च व सर्वोच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. या खटल्यांची संख्या वाढतच आहे. विशेष म्हणजे खटल्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतांना दुसरीकडे रिक्त पदांचा फटका या विभागाला बसला आहे. भूसंपादन, घरपट्टी-पाणीपट्टी देयकांचा वाद, विकासकामांच्या ठेक्यांबाबत मक्तेदार आणि महापालिकेत उद्भवलेल्या वादाकडे लक्ष देण्यासाठी आवश्यक असलेले विधी विभागप्रमुखपदसुद्धा रिक्त आहे. त्यामुळे जिल्हा, उच्च व सर्वोच्च न्यायालयात असलेल्या खटल्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. जिल्हा, उच्च व सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिलांची या पॅनलवर नियुक्ती करण्यात आली आहे; मात्र दावा दाखल झाल्यानंतर त्यासंदर्भातील माहिती न्यायालयाला सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवायला हवी, ती दाखविली जात नसल्याने दाव्यांचा निकाल महापालिकेच्या विरोधात जाण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. या प्रकाराची महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली आहे. प्रलंबित दाव्यांची माहिती मागविली आहे. सद्यस्थितीत वाढत्या आस्थापना खर्चाचे कारण देत सरकारने महापालिकेच्या नोकरभरतीला बंदी घातल्याने विधी विभागप्रमुखपद आउटसोर्सिंगद्वारे भरता येईल काय, याची देखील चाचपणी केली जात आहे. आता या विभागाचे प्रमुख पदही आउटसोर्सिंग केल्यास संपूर्ण विधी विभागाचेच खासगीकरण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरसाठ, भावसार यांचाही उमेदवारी अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी बुधवारी आणखी दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सिडकोतील धनंजय भावसार आणि देवळा तालुक्यातील विनोद शिरसाठ यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले. दिंडोरी मतदारसंघात अद्याप एकाही इच्छुकाने उमेदवारी अर्ज सादर केला नसला तरी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि त्यांच्या पत्नी कलावती यांच्यासाठी मुलाने उमेदवारी अर्ज नेले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, उमेदवारी अर्ज वितरणास सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज घेऊन जाणाऱ्यांचा ओघ अधिक होता. महेश झुंजार आव्हाड या अपक्ष उमेदवाराने पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज सादरही केला. पाठोपाठ बुधवारी आणखी दोघांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. त्यामध्ये देवळा तालुक्यातील उमराणे येथील विनोद वसंत शिरसाठ या तरुणाने हिंदुस्थान जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर सिडकोतील सावतानगर येथील साईबाबा चौकातील रहिवासी धनंजय अनिल भावसार यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आतापर्यंत तीन उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे.

इच्छुक घोड्यावर...

उमेदवारी अर्ज घेऊन जाणाऱ्यांचा ओघ बुधवारी काहीसा कमी झाल्याचे पहावयास मिळाले. बहुजन पक्षाच्या अॅड. वैभव शांताराम आहिरे यांच्यासाठी संतोष शांताराम आहिरे यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे, तर आम आदमी पक्षाच्या योगेश अशोक कापसे यांच्यासाठी अभिजीत बबनराव गोसावी यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. याखेरीज रमेश बन्सी भाग्यवंत, महेश भिका शिरूडे, रंजना आनंद म्हात्रे, लक्ष्मण शिवचरण वाल्मीकी, शिवाजी सुभाष वाघ, संजय सुकदेव घोडके, शरद तुकाराम शिंदे, मंगेश मनोहर ढगे आणि डॉ. भाऊसाहेब मनोहर ढगे या इच्छुकांसाठी उमेदवारी अर्ज नेण्यात आले.

खासदार चव्हाण यांच्यासाठी अर्ज

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी नाकारलेल्या खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह त्यांची पत्नी कलावती हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासाठी मुलगा समीर चव्हाण यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज नेले. याखेरीज राष्ट्रीय मराठा क्रांती पक्षाच्या वतीने दादासाहेब हिरामण पवार यांच्यासाठी दशरथ पोपट गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे. अॅड टिकाराम बागुल, रवींद्र कराटे, अशोक जाधव, बाळासाहेब बर्डे, रामदास बर्डे, किशोर डगळे यांच्यासाठीही समर्थकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. उमेदवारी अर्ज घेऊन जाणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर यांच्याकडे अद्याप एकाही इच्छुकाने उमेदवारी अर्ज सादर केलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा संकुलात प्रवेशबंद!

$
0
0

मतदान यंत्राच्या सुरक्षिततेसाठी मनाई आदेश जारी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्र शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुल येथे ठेवण्यात येणार आहेत. मतदान यंत्रांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सहाय्यक निवडणूक अधिकारी गणेश मिसाळ यांनी तालुका क्रीडा संकुल परिसरात मनाई आदेश जारी केला असून यामुळे ३१ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत हे क्रीडा संकुल नागरिकांना बंद करण्यात आले आहे.

साठ फुटी रोडवर असलेल्या या तालुका क्रीडा संकुलात सकाळी तसेच सायंकाळी फेरफटका, प्राणायाम तसेच विविध मैदानी खेळ खेळण्यासाठी खेळाडूंसह ज्येष्ठ नागरिकांची गर्दी असते. मनाई आदेश लागू झाल्याने नागरिकांना काही दिवस तरी अन्य मैदानांचा वापर करावा लागणार आहे. क्रीडा संकुलात लोकसभा निवडणुकांसाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्र ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे या यंत्रणाच्या सुरक्षिततेला बाधा पोहचू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने हा आदेश लागू करण्यात आला आहे.

या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी व नाशिक पोलिस अधीक्षक यांनी आवश्यक प्रतिबंधात्मक आदेश निर्देशित करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मालेगाव बाह्य सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसळ यांनी मनाई आदेश जारी केले असून आदेशाचा अवमान करणाऱ्यांवर पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी येथे २४ तास बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना या मनाई आदेशाची माहिती व्हावी यासाठी प्रवेशद्वारावर नोटीस लावण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता अन्वये विशेष कार्यकारी दंडाधिकारी घोषित करण्यात आले आहे. त्या अधिकाराचा वापर करून हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

- गणेश मिसाळ, निवडणूक निर्णय अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिका, थंडगार आइस्क्रीम मेकिंग

$
0
0

(मटा कल्चर क्लब लोगो, क्यू आर कोड वापरावा)

शिका, आईस्क्रीम आणि डेझर्ट मेकिंग

'मटा कल्चर क्लब'तर्फे कार्यशाळा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील तापमान दिवसेंदिवस वाढत असून, या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी सगळ्यांची पाऊले थंडगार आइस्क्रीम खाण्याकडे वळू लागली आहेत. उन्हाळ्यात घरात विविध फ्लेवर्सचे आईस्क्रीम असावे आणि ते मनसोक्त खाता यावे, असे प्रत्येकाला वाटते. हीच आ‌वड हेरुन 'मटा कल्चर क्लब'तर्फे 'अॅडव्हान्स आईस्क्रीम आणि डेझर्ट मेकिंग' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'कल्चर क्लब' तर्फे 'अॅडव्हान्स आईस्क्रीम आणि डेझर्ट मेकिंग' कार्यशाळा रविवारी (७ एप्रिल) दुपारी ३ वाजता गंजमाळ येथील हॉटेल रॉयल हेरिटेज येथे होईल. या कार्यशाळेत आईस्क्रीम आणि डेझर्ट एक्स्पर्ट प्रात्यक्षिकांसह रेसिपी शिकविणार आहेत. त्यामध्ये संडे आईस्क्रीम, फ्राईड आईस्क्रीम, ब्लॅक फॉरेस्ट केक आईस्क्रीम शिकण्याची संधी मिळेल. तसेच फुज ब्राउनी, रेड वेलवेट लावा केक, चिया फ्रुट कस्टर्ड पुडिंग, असे डेझर्ट शिकता येतील. या सहभागी होण्यासाठी कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये, तर इतरांसाठी ४०० रुपये शुल्क असेल. कार्यशाळेत सहभागासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी दुपारी १ ते ५ या वेळेत ९४२२५१३५६९ या क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा 'महाराष्ट्र टाइम्स', २ रा मजला, अल्फा स्केअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड या पत्त्यावर संपर्क साधू शकतात.

--

'आइस्क्रीम आणि डेझर्ट मेकिंग वर्कशॉप'

दिनांक : ७ एप्रिल, रविवार

वेळ : दुपारी ३ वाजता

ठिकाण : हॉटेल रॉयल हेरिटेज, गंजमाळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावात उष्माघाताचा पहिला बळी?

$
0
0

लखाणे गावातील मुलाचा धुळ्यात उपचारदरम्यान मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या आठवडाभरापासून मालेगाव शहर व तालुक्याचे तापमान चाळीशीपार गेले आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून हे उन नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहे. तालुक्यातील लखाणे गावातील आदिवासी वस्तीवरील अजय श्रावण सोनावणे (वय १८) याचा मंगळवारी सायंकाळी धुळे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. अजयचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे त्याचे कुटुंबीय व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे एप्रिलच्या प्रारंभीच मालेगावी वाढलेले उन जीवघेणे ठरले असून अजय उष्माघाताचा बळी ठरला आहे.

शहर व तालुक्यात सध्या तापमान ४१ ते ४२ अंशापर्यंत गेले आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन प्रभावित झाले असून नागरिक उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी बाहेर पडणे टाळत आहेत. तालुक्यातील लखाणे गावातील अजय शेळ्या चरण्याचे काम करीत असे. शनिवारी देखील भर उन्हात दिवसभर शेळ्या चरण्यासाठी गेल्याने सायंकाळी त्यास अस्वस्थ वाटू लागल्याने चक्कर येऊन पडल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. अजय यास उपचारासाठी झोडगे येथे आणले होते. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यास रविवारी धुळे जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी लावण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सायंकाळी उशिरा त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

उष्माघाताचा बळी?

अजय आदिवासी कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील श्रावण मोलमजुरी करतात. त्यास एक मोठी बहीण आहे. अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या या कुटुंबातील अजयच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र इंगळे यांनी भेट देऊन आर्थिक मदत केली. इंगळे यांच्यासह अजयचे कुटुंबीय, ग्रामस्थांनी उष्माघाताने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान धुळे जिल्हा ग्रामीण रुग्णालयाकडून त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी बँकेला साडेचार कोटींचा नफा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेस २०१८-१९ या आर्थिक वर्षात शून्य एनपीए राखत ११ कोटी ३२ लाख रुपये इतका ढोबळ, तर ४ कोटी ५५ लाख १३ हजार रुपये इतका निव्वळ नफा मिळवल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी बुधवारी (दि. ३) दिली.

व्यापारी बँकेच्या कामगिरीबाबत माहिती देताना गायकवाड म्हणाले की, बँकिंग क्षेत्रात वाढलेली स्पर्धा, नोटाबंदी आणि जीएसटी करप्रणाली लागू झाल्यानंतर उद्भवलेल्या अडचणींतही बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आर्थिक निकष पूर्ण केल्याने शून्य एनपीए राखण्यात यश आले आहे. सध्या बँकेकडे ४८१.११ कोटींच्या ठेवी आहेत. बँकेने २७९.२० कोटी रुपयांचे कर्ज वितरित केलेले आहे. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात ७६०.३१ कोटी रुपये इतका व्यवसाय केला आहे. याशिवाय २३४.७९ कोटी रुपयांची गुंतवणूकही केली आहे. व्यापारी बँक एक हजार कोटी रुपयांचा व्यवसाय आणि शेड्यूल्ड दर्जा मिळविणे या ध्येयाजवळ पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. विविध स्तरांवरील २१ पुरस्कार बँकेला मिळालेले आहेत. सर्व शाखांत करभरणा, एटीएम, एबीबी बँकिंग, ऑनलाइन बँकिंगसोबतच आता बीबीपीएस सुविधाही सुरू करण्यात आली आहे. लवकरच 'एक कुटुंब एक बँक' ही संकल्पना राबविली जाणार असल्याचेही गायकवाड म्हणाले.

याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष अशोक चोरडिया, जनसंपर्क संचालिका रंजना बोराडे, संचालक निवृत्ती अरिंगळे, सुनील आडके, श्रीराम गायकवाड, अशोक सातभाई, जगन्नाथ आगळे आदींसह मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब जाधव, एकनाथ कदम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय संस्कृतीचे रांगोळीतून दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय सण-उत्सव, दाग दागिने, राष्ट्रभावना, कौटुंबिक स्नेहभाव, स्वावलंबन आदींविषयी तब्बल २५०० फूट रांगोळी रेखाटत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. निमित्त होते, नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचे. समितीतर्फे १ एप्रिलपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येत असून, या अंतर्गत बुधवारी विविध परिसरांमध्ये वीरपत्नींच्या उपस्थितीत ही महारांगोळी काढण्यात आली होती. ६ एप्रिलपर्यंत या सर्व रांगोळी नाशिककरांना पाहण्यासाठी खुल्या असणार आहेत.

इंदिरानगर गटातून विभागप्रमुख विदुला अष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोदकेश्वर मंदिर येथे 'राष्ट्रभावना' या विषयाला अनुसरून गणेशयंत्राची रांगोळी काढण्यात आली. यावेळी वीरपत्नी सुषमा मोरे उपस्थित होत्या. मुंबई नाका गटातून अनुराधा शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कालिका मंदिर येथे नारीशक्ती या विषयी दुर्गा यंत्र काढण्यात आले आहे. यावेळी वीरपत्नी रुपाली बच्छाव उपस्थित होत्या. आडगाव गटातून हिरावाडी येथे बनारसीनगरसमोरील मैदानात सरोजिनी धनोकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'कौटुंबिक स्नेहभाव' या विषयाला अनुसरून राशी यंत्र काढण्यात आले. म्हसरूळ मेरी गटातून अंजली वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत मंगल कार्यालय येथे 'स्वावलंबन' या विषयाला अनुसरून लक्ष्मी यंत्र काढण्यात आले असून, या वेळी वीरपत्नी रेखा खैरनार या उपस्थित होत्या. गंगापूर रोड गटातील मंजुषा नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुजी रुग्णालयात आरोग्य विचार या विषयाला अनुसरून 'धन्वंतरी यंत्र' काढण्यात आले आहे. यावेळी वीरपत्नी भारती चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होत्या. सिडको गटातून छाया परेवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश चौक येथे कृतज्ञता या विषयाला अनुसरून विष्णू यंत्र काढण्यात आले आहे. यावेळी वीरमाता बाळूबाई सोनवणे या उपस्थित होत्या. या सर्व गटांचे प्रमुख म्हणून पूजा अष्टेकर व सहप्रमुख म्हणून भारती सोनवणे यांनी भूमिका बजावली. आज (४ एप्रिल) राजमाता जिजाऊ यांच्या ४२१ व्या जयंती वर्षानिमित्ताने २५ हजार चौरस फुटांची महारांगोळी पाडवा पटांगण, गोदाघाट येथे काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळ विक्रेत्यांना इथिलीन वापराचे धडे

$
0
0

'एफडीए'कडून मार्केट यार्डमध्ये शिबिर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कृत्रिमरित्या फळ पिकविताना मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम कार्बाइड व अॅसिटिलीन गॅसचा वापर केला जात असल्याने पेठ रोडवरील मार्केटयार्ड येथे जाऊन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) फळ विक्रेत्यांना कायद्याचे धडे दिले. तसेच व्यापाऱ्यांना अन्न व सुरक्षा मानदे कायद्यातंर्गत इथिलीन या हार्मोनल गॅसचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

'एफडीए'चे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे, अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी यासाठी व्यापाऱ्यांची बैठक पेठरोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट येथे घेतली. फळे ही आरोग्यासाठी लाभदायक आहे. पण, केळी, आंबे, पपई, सारख्या फळांना झाडावरून काढल्यानंतर कृत्रिमरित्या पिकविले जाते. काही व्यापारी त्यात कॅल्शिअम कार्बाइड व अॅसिटिलीन गॅसचा वापर करतात. मात्र, याचा वापर टाळून व्यापाऱ्यांनी फळे पिकविण्यासाठी इथिलीन चेंबरची उभारणी करावी. त्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत वैज्ञानिक समितीने परवानगी दिल्याची माहिती देण्यात आली. यावेळी ज्या व्यापाऱ्यांना इथिलीन गॅस चेंबर तूर्त उभारता येऊ शकत नसतील त्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या इथिलीन गॅस उत्पादनांचा वापर करण्यास हरकत नसल्याचे सांगण्यात आले.

व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन

इथिलीन गॅस चेंबरमध्ये फळे पिकवितांना घ्यावयाची काळजी व चेंबरमधील इथिलीन गॅस वापराबाबतच्या तांत्रिक बाबींची माहिती व्यापाऱ्यांना देण्यात आली. यावेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप पाटील, अनिल बुब, ईश्वर गुप्ता, राजू भामरे हे सुद्धा हजर होते. शिबिरात याकूब शेख, कुशवाही या फळ व्यापाऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. 'एफडीए'च्या अधिकाऱ्यांनी त्यांचे शंकानिरसन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामविकास अधिकाऱ्यांचे निलंबन

$
0
0

कामात अनियमितता आढळल्याने कारवाई

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

कामकाजात अनियमितता आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत ताहाराबाद व साल्हेरचे ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सोमवारी (दि.१) रोजी निलंबनाची कारवाई केली. अचानक दफ्तर तपासणी मोहिमेंतर्गत ही कारवाई केल्याने ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.

अनेक वर्षांपासून ताहाराबाद व साल्हेर ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले किशोर भामरे यांच्या विरोधात ताहाराबाद व मुल्हेर येथील घरकुल योजना, शौचालय आदी विकासकामांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. अनेकवेळा त्यांच्या विरुद्ध शिष्टमंडळदेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेली होती. मात्र अनेक अधिकाऱ्यांनी त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काही दिवसांपासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांच्याकडे तक्रारी पाऊसच पडला. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी डॉ. गिते यांनी अचानक सटाणा पंचायत समितीला भेट देऊन दफ्तर तपासणी केली. या तपासणी मोहिमेत बहुतांश ग्रामसेवकांच्या दफ्तरामध्ये अनियमितता आढळून आल्याने डॉ. गिते यांनी भामरे यांना दफ्तर सादर करण्याच्या सूचना दिल्या; मात्र भामरे यांनी दफ्तर न दाखवता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने डॉ. गिते भडकले. डॉ. गिते यांनी भामरे यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देऊन त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची सूचना केली. डॉ. गिते यांच्या या कारवाईमुळे सर्वच ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.

टॅँकर घोटाळ्याची चर्चा

बागलाण तालुक्यात पस्तीसहून अधिक गावांना टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकरच्या फेऱ्या आणि कागदोपत्री लांबचे अंतर दाखवून कमी अंतरावर टॅँकरने टॅँकर भरले जातात. यामुळे डिझेल आणि फेऱ्यांमध्ये फेरफार करून लाखो रुपयांचा घोटाळा झाला असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images