Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शिवसेनेचा भाजपला अल्टिमेटम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

भाजपने जर शिवसेनेला स्थानिक पातळीवरील जिल्हा परिषद व पालिकेच्या सत्तेत समाविष्ट केले तरच भाजपचे काम करू, असा अल्टिमेटम सोमवारी (दि. १) झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात देण्यात आला. दि. १० एप्रिलपर्यंत यासाठी मुदत देण्यात आली असून, ज्यांनी आतापर्यंत शिवसेना संपविण्यासाठी काम केले, शिवसैनिकांवर अन्याय, अपमान केला. जिल्हा परिषदेत काँग्रेसला घेऊन सत्ता मिळविली अशा भाजपसाठी आम्ही काम करायचे का, अशा संतप्त शब्दात भाजप-शिवसेना युतीवर शिवसैनिकांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या मेळाव्यात भावना व्यक्त केल्या. या वेळी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर आपला रोष प्रकट केला.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाली आहे. अशा परिस्थितीत सोमवारी (दि. १) जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासाठी काम करायचे की नाही, याबाबतच्या भूमिकेसाठी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, विष्णू भंगाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्यात शिवसेनेला साडेचार वर्षांत भाजपने दिलेल्या सापत्न वागणूकीचा पाढाच शिवसेनेच्या नेत्यांसमोर वाचला. भाजपने गेल्या साडेचार वर्षांत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शिवसैनिकांना अडचणीत आणले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाचोऱ्यात शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्याचा सूचना पोलिसांना दिल्या. तसेच जळगाव महापालिकेत युती करणार असल्याचे सांगत शेवटपर्यंत युती केली नाही, असा आरोपही या वेळी करण्यात आला.

‘भाजपकडून मलाही त्रासच’
भाजपने जसा शिवसैनिकांना त्रास दिला तसाच मलादेखील दिला. आईचे निधन झाले असताना भाजपच्या नेत्यांनी मला तुरूंगात टाकले यापेक्षा मोठा अन्याय काय आहे, अशी बोचरी टीका राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली युती ही शिवसैनिकांसाठीच असून, पक्षाचे संघटन वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवसैनिक हे आदेशावर चालणारे आहेत. मात्र, भाजपकडून निमंत्रण आल्यशिवाय प्रचाराला जावू नका, कार्यकर्त्यांचा सन्मान राखणेदेखील महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. तसेच गुलाबराव देवकरांसंदर्भातील गोष्टी अफवा असल्याचा खुलासा गुलाबराव पाटलांनी केला. आम्ही १० एप्रिलपर्यंत वाट पाहू असेही गुलाबराव पाटलांनी सांगितले. तसेच भाजपच्या उमेदवाराबाबत आमच्यापेक्षा त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचा टोलाही राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला.

महाजनांसोबत आज चर्चा
संजय सावंत यांनी सांगितले की, भाजप व शिवसेनेची युती देव, देश व धर्माच्या व्यापक जनहितासाठी केली आहे. गेल्या वर्षांत काय झाले हे विसरून आता काम करायचे आहे. आपण भाजपचे गिरीश महाजन यांची आज (दि. २) भेट घेऊन शिवसेनेच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेला सत्तेत सहभागी करून, काही सभापतिपद देण्यात यावीत. जळगाव महापालिकेत शिवसेनेला उपमहापौरपद द्यावे. पाचोरा तालुक्यातील शिवसैनिकांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावे. अमळनेर विधानसभेची जागा शिवसेनेला सोडावी अशा अनेक मागण्या या मेळाव्यात करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकसभेचे भविष्य सांगा, २१ लाख मिळवा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सतराव्या लोकसभा निवडणुकीचे भविष्य वर्तवा, असे आव्हान देशभराच्या ज्योतिषांना देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने २१ लाखांचे बक्षीस सोमवारी नाशिक येथे जाहीर केले. या आव्हानप्रक्रियेचा तपशील आणि वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल व ज्योतिष संस्था व व्यक्तींना ते व्यक्तिश: पाठवले जाईल, अशी माहिती अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. २०१४ च्या निवडणुकीतसुद्धा हे आव्हान दिले होते; पण कोणीही हे भविष्य वर्तवले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

फलज्योतिषशास्त्र आहे, असा दावा करणाऱ्या मंडळींना समितीतर्फे नेहमीच आव्हान दिले गेले. काही वेळा आव्हान स्वीकारण्याचा दावा करून वाद-संवाद झाला; परंतु प्रत्यक्षात आव्हानप्रक्रिया सिद्ध झाली नाही. भविष्य वर्तवणाऱ्यांना जर आपले नाणे खणखणीत असेल तर भीती कशाला, असा प्रश्नही पाटील यांनी केला. गेल्या वेळी एकानेही सहभाग घेतला नाही. आता त्यांनी सहभाग घ्यावा, असे आव्हानही दिले आहे. या वेळी त्यांनी फलज्योतिष हे शास्त्र नाही तर थोतांड आहे. ही भूमिका घेऊन फलज्योतिषाचा व्यवसाय करणाऱ्या ज्योतिषांना ग्राहक कायदा लागू करा, अशी मागणी अंनिसने पुन्हा एकदा केली. यामुळे आपले भविष्य खरे ठरले नाही तर नुकसानभरपाई मिळण्याची संधी ग्राहकाला मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

‘दारू पाजणाऱ्या उमेदवाराला पाडा’

या वेळी त्यांनी दारू पाजणाऱ्या उमेदवाराला पाडा, असे आवाहनही केले. निवडणुकीमध्ये व्यसन हा मुद्दा सर्वांनी घ्यावा. बिहारमध्ये निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी हा मुद्दा घेत दारूबंदी केली. त्यामुळे नंतर त्याचे परिणामही चांगले दिसले. पंजाबमध्येसुद्धा काँग्रेसने ड्रग्जचा मुद्दा घेतला व त्यानंतर त्यात नियंत्रणही आणले गेले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी त्यांनी भाजप सरकारवर टीका करीत देशातील संस्थेच्या स्वातंत्र्यावर घाला घातल्याचा आरोप केला. अंनिसला ३० वर्षे पूर्ण होत असून, त्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. पत्रकार परिषदेत अंनिसचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडलेल्या मोरास जीवदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यातील खोपडी खुर्द येथील पंडित दराडे यांच्या पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या मोरास स्थानिक तरुणांनी दोराच्या सहाय्याने बाहेर काढत जीवदान दिले. पाण्याच्या शोधात हा मोर विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

वन परीक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोराला ताब्यात घेतले. त्यानंतर वनविभागाच्या उद्यानात आणून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. जखमी मोराला मोहदरी वन उद्यानात ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. दोन ते तीन दिवसानंतर मोर पूर्ण बरा झाल्यावर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. जंगल परिसरातील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे वन्यजीव पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. वनविभागाने अशा तहानलेल्या जिवांसाठी परिसरात पाणवठे तयार करावेत, अशी मागणी परिसरातून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉलसमोरील खड्डा अखेर बुजवला

$
0
0

मॉलसमोरील खड्डा अखेर बुजवला

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेल्या कॉलेजरोड परिसरातील मॉलसमोरील रस्त्यावर पडलेला खड्डा अखेर बुजविण्यात आला आहे.

या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला होता. परिणामी वाहनचालकांना हा खड्डा चुकवत वाहने चालवावी लागत होती. त्यामुळे किरकोळ अपघात होऊन वादावादीचे प्रसंगदेखील उद्भवत होते. याबाबतचे वृत्त 'मटा'ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या पश्चिम विभागातील बांधकाम विभागाने येथील मॉलसमोरील खड्डा तात्काळ बुजवून रस्ता वाहनचालकांसाठी खुला केला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले असून, आता ठिकठिकाणी रस्त्यांना अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्यादेखील महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटवाव्यात, जेणेकरून रस्त्यांना मोकळा श्वास घेता येईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योग विभागाकडूनही दखल

$
0
0

'आदिवासी विकास'मधील फर्निचर खरेदीचा मागितला अहवाल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागाकडून कायापालट अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या फर्निचर खरेदीतील अनागोंदीची राज्याच्या उद्योग विभागानेही गंभीर दखल घेतली आहे. तिनशे कोटींच्या फर्निचर खरेदीच्या निविदा प्रक्रियेत शासन निर्णयाचे पालन करण्यात न आल्याने उद्योग विभागाने आदिवासी विकास विभागाकडून अहवाल मागितला आहे. त्यामुळे आदिवासी आयुक्तालयाची कोंडी झाली आहे.

राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये मुलांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. परंतु, त्यात त्रुटी असल्याने कायापालट अभियान राबवून पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याअंतर्गत आदिवासी मुलांसाठी फर्निचर खरेदीचा निर्णय झाला. परंतु, विशिष्ठ ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून ही खरेदी प्रक्रिया ११२ कोटींवरून थेट तिनशे कोटींपर्यंत वाढविण्यात आली. तसेच विशिष्ट कंपन्यांनाच खरेदी प्रक्रियेत झुकते माप देण्यात आले. जेम्स पोर्टलद्वारे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असली तरी त्यात नामांकित कंपन्याच पात्र ठरतील अशा अटी ‌व शर्ती ठेवण्यात आल्या. परिणामी अन्य कंपन्यांचा पत्ता कट झाला.

आश्रमशाळांसाठी खरेदी करण्यात येत असलेल्या साहित्याचे दर हे बाजारभावापेक्षा दुप्पट ते तिप्पट असल्याचा आरोप करण्यात आला. फर्निचर खरेदीतील ही अनागोंदी 'मटा'नेही वृत्तमालिकेद्वारे जनतेसमोर आणली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या खरेदीबाबत आदिवासी मंत्री, मुख्यमंत्री तसेच उद्योग विभागाकडे तक्रार करत, भ्रष्टाचाराचा आरोप केला. १ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार, स्टार्टअप, मेक इन इंडिया आणि लघु उद्योगांना शासन खरेदीत प्राधान्य देण्याचा निर्णय असतांनाही, तो विभागाने डावलल्याची तक्रार करण्यात आली. या खरेदी प्रक्रियेविरोधात थेट उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली. तरीही आदिवासी आयुक्तालयाने संबंधित खरेदीदार कंपन्याना बँकडेटेड आदेश दिले. 'मटा'च्या वृत्त मालिकेनंतर तसेच धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी या खरेदीप्रक्रियेला स्थगिती दिली. तसेच राज्याच्या उद्योग विभागाने या खरेदी प्रक्रियेची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

'आदिवासी विकास'ची कोंडी

शासन निर्णयातील तरतुदींचे उल्लघन झाल्याबाबतचा अहवाल उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आदिवासी विभागाच्या प्रधान सचिवांकडून मागितला आहे. नियमानुसार खरेदीप्रक्रिया राबविण्यात यावी; तसेच खरेदीचा मुद्देनिहाय अहवाल अभिप्रायासह उद्योग संचालनालयाकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आदिवासी विभागाची कोंडी झाली आहे.

उच्च न्यायालयात आज सुनावणी

आदिवासी विभागाच्या फर्निचर खरेदी प्रक्रियेसंदर्भात शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याचा आक्षेप घेत, काही ठेकेदार कंपन्यानी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या याचिकांवर बुधवारी (दि. ३) न्या. ए. एस. ओखा यांच्या पिठासमोर सुनावणी होणार आहे. त्यासंदर्भात आदिवासी विभागाच्या प्रधान सचिवांसह आदिवासी विभाग, राज्य सरकार यांच्यासह कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिटनेस दाखवा, पसंतीचे ठाणे मिळवा!

$
0
0

पुढील महिन्यातील पोलिस बदल्यांसाठी निकष

...

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

..

नाशिक : पुढील महिन्यात पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेत पोलिसांच्या आरोग्याला महत्त्व देण्याचा निर्णय पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी घेतला आहे. पसंतीचे पोलिस ठाणे हवे असल्यास कर्मचाऱ्यांना धावण्याच्या स्पर्धेत बाजी मारून आपले फिटनेस सिद्ध करावे लागणार आहे.

शहर पोलिस आयुक्तालयात अडीच हजारांच्या घरात पोलिस कर्मचारी आहेत. पोलिस ठाणे तसेच, वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दर सहा वर्षांनी बदल्या होतात. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी बदलीसाठी अर्ज करू शकतात. क्राईम ब्रँच, एसबी, आर्थिक गुन्हे शाखा तसेच, इतर ठिकाणावरील कर्मचाऱ्यांच्या दर तीन वर्षांनी बदल्या होतात. बदली प्रक्रिया राबविताना पोलिस कर्मचाऱ्यांना तीन पोलिस ठाण्याचा पसंतीनुसार क्रमांक नमूद करावा लागतो. त्यानंतर कर्मचारी व प्रशासनाची निकड लक्षात घेऊन बदली प्रक्रिया अंतिम केली जाते. यंदा मात्र पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या निर्णयामुळे या प्रक्रियेत मोठा टि्वस्ट निर्माण झाला आहे. पसंतीनुसार पोलिस ठाणे हवे असल्यास पोलिस कर्मचाऱ्यांना आपले फिटनेस सिद्ध करावे लागणार आहे. वीस ते तीस वयोगटातील कर्मचाऱ्यांना १० किलोमीटर, तर त्यानंतरच्या वयोगटातील कर्मचाऱ्यांना किमान पाच किलोमीटर स्पर्धेत यशाचा झेंडा गाडावा लागणार आहे. यामुळे फक्त कर्मचाऱ्याच्या सोयीचा विचार होणार नाही, तर तो ज्या ठिकाणी कामास इच्छुक आहे, त्या ठिकाणी कितपत क्षमतेने काम करू शकेल, याचा अंदाज बांधता येणे शक्य होणार आहे. पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी याबाबतचे पत्रच कर्मचाऱ्यांना दिले असून, काही कर्मचाऱ्यांनी तर सराव सुद्धा सुरू केल्याचे सांगितले.

...

कर्मचाऱ्यांना पसंतीचे पोलिस ठाणे हवे असल्यास त्यांना आपले फिटनेस सिद्ध करावे लागेल. फिटनेस सिद्ध करणाऱ्यांना आपल्या आवडीनुसार पोलिस ठाण्यात नियुक्ती देता येऊ शकेल.

- विश्वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट न्यूज -

$
0
0

\Bस्वामी समर्थ भजनी मंडळाचा वर्धापन दिन सोहळा

\Bनाशिक : जुन्या नाशिक येथील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाचा २९ वा वर्धापन दिन सोहळा ६ व ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता कुंभारवाडा, पाटील गल्ली, बुधवार पेठ येथे साजरा होणार आहे. त्यासाठी लोकशाहीर सुरेश तसेच संपत खैरे, डॉ. झुंझार गवळी, डॉ. वसंत ठाकूर, संतोष खैरे उपस्थित राहणार आहेत असून, नाशिककरांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन रघुनाथसिंग परदेशी, गणेश सोनवणे यांनी केले आहे.

--

\Bसंगणकीय चित्रकला स्पर्धेत श्रावणी गितेचे यश

\Bनाशिक : ए. के. पटेल संगणक अकॅडमीच्या वतीने संगणकीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेसाठी विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत लहान गट व मोठा गट अशी विभागणी करण्यात आली. यात लहान गटासाठी पेंटमध्ये, मोठ्या गटाने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनमध्ये चित्रे काढावयाची होती. यात सेंट लॉरेन्सच्या श्रावणी गिते हिने लहान गटात यश संपादन करून पारितोषिक पटकावले. या यशासाठी तिचे मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. चित्रकला स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे याप्रसंगी प्रमुख परीक्षकांनी सांगितले.

--

\Bमोफत स्थूलता निदान शिबीर\B

नाशिक : श्रीगुरुजी रुग्णालयाच्या वतीने मोफत स्थूलता निदान शिबिराचे आयोजन बुधवारी (३ एप्रिल) रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत श्रीगुरुजी रुग्णालय आयुर्वेद विभाग, आनंदवल्ली चौक, गंगापूररोड येथे करण्यात आले आहे. शिबिरात स्थूलपणावर नियंत्रण करण्यासाठी आयुर्वेदिय दृष्टिकोनातून आहार, विहार, व्यायाम, औषधे आणि पंचकर्म यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर, गोवर्धनमध्ये राजरोस जुगार अड्डा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

शहरात पोलिस आयुक्तांनी जुगाराच्या अड्ड्यांवर छापासत्र सुरू असले तरी शहराच्या हद्दीलगत ग्रामीण भागात गंगापूर, गोवर्धन शिवारात जुगार अड्डा सुरू आहे. विशेष म्हणजे शहर व ग्रामीण पोलिसांच्या सिमेवरच जुगाराचा अड्डा शक्कल लढवत संबंधिताने सुरू केला आहे. यामुळे तेथे कारवाई करणार कोण, असा सवाल आहे.

शहराच्या हद्दीत पोलिसांकडून जुगार अड्ड्यांवर छापेसत्र सुरू आहे. यात अनेक दिगजांचे जुगार अड्डे पोलिसांनी बंद केले. परंतु, आता जुगार अड्डे शहर व ग्रामीण पोलिसांच्या सिमेवर सुरू केले जात आहे. गंगापूर, गोवर्धन गाव शिवारात शहरातील एक जुगार अड्डा सुरू केला आहे. स्थानिकांचा विरोध असला तरी काही स्थानिक पुढाऱ्यांचे जुगार अड्ड्याला सहाय्यक असल्याचे बोलले जात आहे. याबाबत ग्रामीण व शहर पोलिसांनीच माहिती घेत कारवाई करावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महावादनाने निनादला गोदाघाट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय विकास मंडळ, संचलित नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात मंगळवारी महावादन झाले. तरुणवर्गाचे आकर्षण असलेला ढोल-ताशा वादनाचा महोत्सव या वर्षी भारतीय सैन्यदलातील जवानांनी केलेल्या कामगिरीला समर्पित करण्यात आला. ढोलवादनाचे १५ ते ७ पर्यंत हात असून त्यातील पहिला हात, तिसरा हात आणि पाचवा हात मंगळवारी महावादनात वाजविला गेला. या महावादनाचा शेवट पुणे ढोलने झाला.

सन २०१६ पासून नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे दरवर्षी महावादनाचा कार्यक्रम घेतला जात आहे. यावर्षी नाशिक जिल्ह्यातील ३५ ढोलपथके या कार्यक्रमात सहभागी झाले. प्रत्येक पथकात ३०-३५ ढोल व ताशावादक होते. यावेळी मुख्यध्वज व इतर सहध्वज नाचविले गेले. सुमारे १५०० ढोलवादक, ताशावादक आणि तास-झांज वादकांच्या सहभागातून लय-ताल आणि नाद यांची एकतानता साधली गेली. तब्बल दीड ते दोन तास ब्रह्मनादाचा अनुभव या कार्यक्रमाद्वारे नाशिककरांनी घेतला. विक्रमांत सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. अभिजित वाघचौरे व रोहित गायधनी यांनी सूत्रसंचालन केले. मनोज कुलकर्णी यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी ढोलताशा महासंघ अध्यक्ष पराग ठाकूर, ज्येष्ठ ताशावादक राजन घाणेकर, श्रध्दा नालंगवार, प्रवीण व्यवहारे, हर्षल सदगिर, मोनिका आथरे, शैलजा जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. पाडवा पटांगण, गोदाघाट येथे हा कार्यक्रम झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचप्रकरणी महिला तलाठ्यास अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील वाघेरे येथे खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या सात बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी करून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारल्या मुंढेगाव येथील महिला तलाठी यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिला तलाठी यांना मदतनिसामार्फत रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. तक्रारदाराने वाघेरे शिवारात शेतजमीन खरेदी केली होती. सातबारा उताऱ्यावर नाव नोंद लावण्यासाठी अनेकदा विनंती अर्ज केले. मुंढेगाव सजा येथील महिला तलाठी भाग्यश्री रावसाहेब धायताडक यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लूटमार टोळीच्या आवळल्या मुसक्या

$
0
0

कुलकर्णी कॉलनीतील लुटीची घटना उघड; सहा जणांना अटक

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हवेत गोळीबार करून बंदुकीचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीला क्राईम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकाने शिताफीने अटक केली. या टोळीने व्यापाऱ्यांना टीप आणि रेकीच्या आधारे लुटल्याची काही प्रकरणे समोर आली असून, टोळीवर मोक्का लावण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. मागील तीन दिवसांत दोन मोठ्या गँग जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले.

योगेश घनश्याम बस्ते (वय २६, रा. राणेनगर, इंदिरानगर, मूळ मु.पो. अजंग वडेल, ता. मालेगाव), विजय देवीदास धनगर (वय २१, मारुती मंदिरासमोर, कामटवाडा गाव), प्रवीण प्रकाश किरवे (वय २५, दुर्गामाता मंदिरामागे, जेलरोड), तुषार भास्कर मगर (वय २०, रा. मोरे मळ्याच्या समोर, उपेंद्रनगर, अंबड), हरिष व्यंकट पटेल (वय २९, रा. भाग्योदय रो हाऊस, उपेंद्रनगर, अंबड) आणि नीलेश पोपट शिंगाडे (वय २९, रा. वडारवाडी, दिंडोरीरोड, पंचवटी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या आरोपींनी ३० मार्च रोजी एअरगनचा धाक दाखवून विराग सी. शाह या फार्मासिस्टकडील तीन लाख रुपयांची लूट केली होती. शरणपूररोड येथील कुलकर्णी कॉलनीतील शाह राहतात, त्या गजानन स्मृती या इमारतीत हा प्रकार घडला होता. या गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात आला होता. युनिट दोनचे पोलिस नाईक परमेश्वर दराडे यांना या टोळीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर पीएसआय रवींद्र हसहारे, विजय लोंढे, रूपाली खांडवी, हवालदार श्रीराम सपकाळ, पोलिस नाईक मोतीलाल महाजन, परमेश्वर दराडे, गुलाब सोनार, पोलिस शिपाई विजय पगारे, योगेश सानप, बाळासाहेब नांद्रे, महेंद्र साळुंखे आदींनी राणेनगर येथे सापळा रचून गुन्ह्याचा सूत्रधार योगेश बस्ते यास अटक केली. त्यानंतर पुढील साथिदार सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून एअर पिस्टल, चार दुचाकी आणि ३६ हजार ५०० रुपयांची रोकड असा मुद्देमाल हस्तगत केला

...

रेकी आणि टीप

या टोळीतील हरिष पटेल आणि नीलेश शिंगाडे यांनी काही दिवसांपासून रेकी करण्याचे काम केले. घटनेच्या दिवशी पटेलने टोळीतील इतर सदस्यांना टीप दिली. त्यानंतर उर्वरित चौघांनी लूट केली. ही संघटनात्मक गुन्हेगारी आहे. आरोपींनी यापूर्वी व्यापाऱ्यांना लुटल्याचे कबूल केले असून, या प्रकरणी अंबड, मुंबईनाका आणि सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. दुकान बंद करून रोकड घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्यांना आरोपींनी लक्ष केले. यातील प्रत्येक संशयित आरोपींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, या टोळीवर मोक्का तसेच, वैयक्तिक स्वरूपात एमपीडीएसारखी कारवाई करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील, तसेच क्राईम ब्रँचचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

..

नवी मोडस ऑपरेंडी

व्यापाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची आणि त्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने लूट करण्याची नवीन मोडस ऑपरेंडी काही गुन्हेगारांनी सुरू केली आहे. या टोळीप्रमाणे आणखी काही गुन्हेगार या पद्धतीने गुन्हे करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हड्डी कारखान्यातील पाच जण ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील पवारवाडी हद्दीतील दरेगाव शिवारात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हड्डी, चरबी कारखान्यांवर अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह पथकाने रविवारी सायंकाळी कारवाई केली होती. याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून ५ वाहनांसह अन्य साहित्य असा एकूण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील पाच संशयित आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

शहरातील दरेगाव परिसरात गेल्याच आठवड्यात याच ठिकाणी मृत जनावरे फेकून दिल्याचा प्रकार नागरिकांनी उघडकीस आणला होता. परिसरात कत्तलखाने व बेकायदेशीर हड्डी कारखाने यामुळे नेहमीच दुर्गंधी पसरते. त्यात नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. रविवारी सायंकाळी उशिरा छापा टाकून कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संशयित आरोपी हाजी भिकन खान नूर खान, तन्वीर शेख अनिस, शेख अतिक शेख मुनाफ, शेख सुलतान शेख मुनाफ, शेख दाउद शेख जहांगीर या पाच जणांना ताब्यात घेतले असून अन्य पाच आरोपी फरार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएसई शाळा आयुक्तांच्या अखत्यारित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका अंतर्गत सीबीएसई शाळांना परवानगी देताना मनपा आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक असतानाही शिक्षण विभागाने परस्पर या शाळांना शहरात परवानगी दिली आहे. त्यामुळे या पुढच्या काळात महापालिका हद्दीत सीबीएसई पॅटर्नच्या शाळांना परवानगी देण्यासाठी आयुक्तांची परवानगी बंधनकारक करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील निर्णय महापालिकेच्या वतीने लवकरच घेतला जाणार असल्याने शहरातील सर्व सीबीएसई पॅटर्नच्या शाळा मनपा आयुक्तांच्या अखत्यारीत येणार आहेत.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत महापालिका हद्दीत खासगी शाळांना परवानगी देताना आयुक्तांची परवागनी घेणे बंधनकारक करण्यात आली आहे. परंतु, शहरात खासगी शाळांनी परवानगीसाठी महापालिकेची परवानगी न घेताच शिक्षण विभागाकडून जुमलेबाजी करीत परवानगी मिळाल्याचे समोर आले आहे. शहरातील सीबीएसई पॅटर्नसह अन्य पॅटर्नच्या शाळांनी विस्तार अधिकाऱ्यांच्या मदतीने थेट शिक्षण उपसंचालकांच्याच परवानग्या मिळवल्या आहेत. तसेच, शाळांसाठी एक किलोमीटर अतंराचे असलेल्या नियमांचीही मोडतोड केली आहे. त्यामुळे पालिकेच्या शिक्षण विभागाने ही बाब गंभीरपणे घेतली असून, यापुढच्या काळात शहराच्या हद्दीत सीबीएसई पॅटर्नची शाळा सुरू करण्यासाठी मनपा आयुक्तांचीच परवानगी घेण्यात यावी, असा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला आयुक्तांची मंजुरी घेऊन तो शिक्षण उपसंचालकांकडे माहितीसाठी पाठवला जाणार आहे. तसेच, पालिकेच्या परवानगीशिवाय खासगी शाळांना परवानगी देऊ नये याची आठवण शिक्षण विभागाला करून दिली जाणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व खासगी शाळा या मनपा आयुक्तांच्या अखत्यारित येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ स्कोडाने पोलिसांची धावपळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शस्त्रास्त्रे घेऊन जाणाऱ्या एका स्कोडा कारच्या टिपने शहर आणि ग्रामीण पोलिसांची मंगळवारी दिवसभर धावपळ उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत त्या संशयित कारचा कोणताही थांगपत्ता पोलिसांना लागला नाही. मात्र, पोलिसांचा तपास सुरूच होता.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रे, मोठी रक्कम तसेच अवैध मद्य वाहतूक याकडे लक्ष वेधले आहे. शहर तसेच ग्रामीण पोलिसांनी आपआपल्या हद्दीत बॉर्डरवर तसेच अंतर्गत भागात २४ तास नाकाबंदी पाँईटस लावले आहेत. येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे. तसेच याबाबत येणाऱ्या प्रत्येक माहितीची पोलिसांकडून खातरजमा सुद्धा होती. शहर पोलिसांना मंगळवारी सकाळी एका संशयित स्कोडा कारबाबत माहिती मिळाली. या कारमध्ये शस्त्रास्त्रे असल्याची माहिती असल्याने पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ठिकठिकाणी नाकाबंदी लावली. तसेच ही माहिती ग्रामीण पोलिसांना सुद्धा देण्यात आली. पोलिस अधीक्षक आरतीसिंह यांनी सुद्धा संशयित स्कोड कारचा शोध लावण्याबाबत आवश्यक त्या हलचाली केल्या. पोलिसांच्या काही तासांच्या तपासानंतरही त्या संशयित स्कोड कारचा थांगपत्ता लागला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोनशे रुग्णालयांचे नूतनीकरण फेटाळले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई सुश्रुषागृह अधिनियम, १९४९ च्या सुधारित नियम २००६ नुसार रुग्णालयांकडून नूतनीकरणासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे मिळवण्यात अपयश आल्याने वैद्यकीय विभागाने दोनशे रुग्णालयांचे नूतनीकरण परवाने फेटाळले आहेत. मनपा अधिनियमाप्रमाणे फायर ऑडिटची पूर्तता करण्यात या रुग्णालयांना अपयश आल्याने पालिकेने ही कारवाई केली आहे. प्रमाणपत्रांची पूर्तता केल्याप्रकरणी आतापर्यंत तीनशे रुग्णालयांना नूतनीकरण प्रमाणपत्र देण्यात आले आहेत, तर ३६ रुग्णालयांची नूतनीकरण प्रमाणपत्रांची प्रक्रिया सुरू आहे. मनपा नियमांची पूर्तता करण्यात अपयश आल्यास महापालिकेकडून या रुग्णालयांना टाळे लावले जाण्याची शक्यता आहे. कोलकाता दुर्घटनेनंतर राज्य सरकारने रुग्णालयांसंदर्भातील नियम कडक करण्यात आले आहेत. त्यानुसार फायर ऑडिट सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु, शहरातील जुन्या रुग्णालयांकडून या ऑडिटची पूर्तता केली जात नसल्याने पालिकेने यापूर्वीच नोटिसा बजावल्या होत्या. या रुग्णालयांमध्ये उपचार केल्यास वैद्यकीय विम्याचाही लाभ घेता येणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चतुर यांना पारितोषिक

$
0
0

नाशिक : भगूर येथे आयोजीत सौंदर्यवती स्पर्धेमध्ये काठे गल्ली येथील रहिवाशी सविता चतुर यांना सौंदर्यवती या किताबाने सन्मानित करण्यात आले. भगूर येथील बलकवडे स्टेडियम येथे ब्यूटी कॉन्टेस्टचे आयोजन करण्यात आले होते. चतुर यांना तुझ्यात जीव रंगला फेम राणादा यांच्या हस्ते सौंदर्यवतीचा किताब देऊन सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई-इलाहाबाद सुपरफास्ट रेल्वे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

उन्हाळ्याच्या सुटीमुळे रेल्वे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई-इलाहाबाद दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक ०४११६ ही गाडी सात एप्रिल ते ३० जूनपर्यंत दर रविवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सायंकाळी ४.४० वाजता निघेल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.२५ वाजता इलाहाबाद पोहोचेल. गाडी क्रमांक ०४११५ सहा जून ते २९ जूनदरम्यान दर शनिवारी इलाहाबादहून दुपारी ३.२५ वाजता प्रस्थान करेल. दुसऱ्या दिवशी दुपारी ३.२० वाजता मुंबईला पोहोचेल. कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, हरदा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर तथा शंकरगड येथे गाडीला थांबा आहे.

गाडीत एक वातानुकूलित दोन टियर, १० वातानुकूलित तीन टियर, चार शयनयान, सहा सामान्य द्वितीय श्रेणी बोगी आहेत. विशेष शुल्‍क भरून गुरुवारपासून (दि. ४) सर्व पीआरएस आणि www.irctc.co.in वेबसाईटवर तिकीट आरक्षण सुरू होईल. सामान्य द्वितीय श्रेणीचे डब्बे अनारक्षित रुपात चालवले जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पर्यटन क्षेत्रात करा करियर’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जागतिकीकरणामुळे हवाई, पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात भारताने वेगाने प्रगती केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंचतारांकित हॉटेल्स, हवाई वाहतूक व पर्यटन क्षेत्रात उपलब्ध रोजगाराच्या विविध संधींचा लाभ घेत ग्रामीण भागातील युवक-युवतींनी करियर घडवावे, असे आवाहन राज्य मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष व सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले.

येथील राधाई मंगल कार्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चिंचवड (पुणे) व जेट इंडिया एव्हिएशन इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे सटाणा शहर व बागलाण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित मोफत करियर मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. धोंडगे बोलत होते. जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती एस. बी. मराठे, माजी मुख्याध्यापक बी. एस. देवरे, नंदकिशोर शेवाळे, पूनम जगताप उपस्थित होते. डॉ. धोंडगे म्हणाले, भारत हा तरुणांचा देश आहे. तरुणांची ऊर्जा ही देशातील सर्वच क्षेत्राला उन्नत करणारी असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी मिळत आहे. वाढत्या बेरोजगारीच्या काळात हवाई, पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करियर केल्यास तरुणांना देश व परदेशात मोठ्या पगाराच्या रोजगाराची संधी मिळणार आहे असेही डॉ. धोंडगे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळकरी मुलांची गँग

$
0
0

घरफोडी प्रकरणात चौघे ताब्यात

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरफोडीच्या गुन्ह्यात सरकारवाडा पोलिसांनी चौघा विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले. इयत्ता नववी ते अकरावी या दरम्यान शिक्षण घेत असलेल्या मुलांनी होलाराम कॉलनीत घरफोडी करून तब्बल तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

हत्या, हत्येचा प्रयत्न, घरफोडी, मारहाण, चोरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग ही पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कमी श्रमात जास्त पैसे मिळण्याच्या अपेक्षेने शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी गुन्हेगारी करतात. सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार अल्पवयीन मुलांची सुद्धा ही परिस्थिती! होलाराम कॉलनीतील पार्क अॅव्हेन्यू या इमारतीत राहणारे चेतन गुलाबचंद राठी हे आपल्या कुटुंबासोबत २१ ते ३१ मार्च या दरम्यान बाहेरगावी गेले. घरात कोणी नसल्याची संधी साधत चौघा अल्पवयीन मुलांनी त्यांचा बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तसेच, घरातील तीन लाख सात हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. बाहेरगावी गेलेले राठी परत आल्यानंतर घरफोडीची घटना उघडकीस आली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक योगिता नारखेडे यांनी करीत या मुलांचा शोध लावला. सध्या त्याची रवानगी मुलांच्या निरीक्षणगृहात करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नारखेडे, हवालदार आर. जी. शेळके, पोलिस नाईक प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, सुनील जगदाळे, पोलिस शिपाई अरुण भोये, सागर हजारी यांनी केली. पोलिसांनी या मुलांकडून एक लॅपटॉप, दोन कॅमेरे, तीन मोबाइल फोन, रोख रक्कम, घरफोडीचे हत्यार असा मुद्देमाल हस्तगत केला. या टोळीने यापूर्वी काही गुन्हे केल्याचे तपासाधिकारी नारखेडे यांनी स्पष्ट केले.

...

मोबाइल चोरीत तीन अल्पवयीनांचा समावेश

व्ही. एन. नाईक कॉलेजच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून मोबाइल फोन चोरी करणाऱ्या तिघा अल्पवयीन मुलांना सरकरवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी चार चोरीचे मोबाइल हस्तगत केले. १६ मार्च रोजी मोबाइल चोरीची घटना घडली होती.

..

विधी संघर्षित बालकांची गुन्हेगारी हा सध्या गंभीर विषय ठरला आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये मुलांचा सहभाग आढळून येतो आहे. सरकारवाडा पोलिसांनीच सात मुले ताब्यात घेतली. याबाबत मोठी मोहीम हाती घेणे आवश्यक आहे.

- विश्वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक-प्रशासन संघर्षात विद्यार्थ्यांची होरपळ

$
0
0

शाळा वेळाबदलाच्या संघर्षावर अखेर तोडगा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या महिनाभरापासून जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षक यांच्यात शाळा वेळांबाबत सुरू असलेला संघर्ष सोमवारी अखेरीस मिटला. तरी तब्बल पाच वेळा पत्रके काढून शाळांच्या वेळा बदलल्याने विद्यार्थ्यांची नाहक होरपळ झाली. राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे शाळा सकाळ सत्रातच भरवाव्यात, या मागणीवर शिक्षक ठाम तर दुसरीकडे प्रशासनाकडून सातत्याने होणारा बदलत्या वेळांचा मारा यामध्ये विद्यार्थी भरडले गेले.

दरवर्षी १ मार्चपासून शाळांच्या वेळेत बदल करण्यात येतो. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास, बसण्यास गैरसोय होऊ नये ही यामागील कारणे असतात. राज्यभरात हे बदल करण्यात येतात. नाशिकमध्येही उन्हाळ्याच्या दिवसात सकाळ सत्रात शाळा भरविल्या जातात. यंदा मात्र जिल्हा परिषदेकडून शाळांच्या वेळांबाबत वारंवार पत्रके काढून वेळेत बदल करण्यात आले. कडाक्याचे ऊन, दुष्काळी परिस्थिती यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने ठरवून दिलेली शाळेची वेळ शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत असल्याने शाळा सकाळ सत्रातच भरविण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षकांनी लावून धरली. या मागणीचा विचार न करता पुन्हा सकाळी पावणेअकरा ते सायंकाळी ५ या वेळेतच शाळा भरविण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्यानंतर शिक्षकांनी गेल्या शनिवारी सामूहिक रजा घेत निषेध नोंदविला. जिल्ह्यातील बारा हजार शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले. हे सर्व निर्णय विद्यार्थी हिताच्या दृष्टीने घेतले जात असले तरी बदलत्या वेळांमुळे विद्यार्थी, पालकांचा प्रचंड संभ्रम गेल्या महिन्याभरात झालेला दिसून आला.

शुक्रवारपासून अंमलबजावणी

मार्च महिन्यानंतर केवळ दीड महिना या शैक्षणिक वर्षाचा काळ उरला असला तरी एक महिना वेळांचाच खेळ सुरू असल्याने शिक्षकांची नाराजी जिल्हा परिषद प्रशासनाने ओढावून घेतली. शिवाय विद्यार्थ्यांचीही यात होरपळ झाली. आता सकाळी ७ ते दुपारी १२.३० या वेळेत शिक्कामोर्तब झाला असून या निर्णयाची शुक्रवारपासून (दि. ५) अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

\Bअसे झाले बदल

\B१ मार्च - सकाळी ७.३० ते दुपारी १२.३०

९ मार्च - सकाळी ७.५० ते दुपारी १.१५

१४ मार्च - सकाळी ७.१५ ते दुपारी १२.४५

२६ मार्च - सकाळी १०.४० ते सायंकाळी ५

१ एप्रिल - सकाळी ७ ते दुपारी १२.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images