Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ढोलबारेजवळ उलटला तेलाचा टँकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

विंचुर-शहादा-प्रकाशा महामार्गावरील ढोलबारे गावानजीक असलेल्या तीव्र वळणावर सोयाबीन तेल घेवून जाणारा ट्रँकर उलटल्याने हजारो लिटर सोयाबीन तेल नाल्यात वाहून गेले. टँकरचा चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी असून त्यांच्यावर सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी (दि.२९) रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गुजरातमधील गांधीनगर येथून आंध्र प्रदेशकडे सुमारे ३४ हजार लिटर सोयाबीन तेल घेवून जाणारा टँकर (एनएल ०१० क्यू ३५४३) हा ट्रँकर ढोलबारे शिवाराजवळ आला असता म्हसोबा मंदिराजवळील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने सदरहू टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांमध्ये उलटला. त्यामुळे टँकरमधील हजारो लिटर तेल नाल्यात वाहून गेले. अपघाताची माहिती मिळताच या परिसरातील अपघातग्रस्तांना नेहमीच मदत करणारे केवळ देवरे यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून जखमी चालक व क्लिनरला सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुकीवर नियंत्रण मिळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कळवणकरांशी उद्या मोदींचा थेट संवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ते अन् नागरीकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (दि. ३१) थेट संवाद साधणार आहेत. यात कळवणमधील छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयातील डॉ. दौलतराव आहेर सभागृहात सायंकाळी ५ वाजता हा संवाद कार्यक्रम होणार आहे.

महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, प्रभारी डॉ. राहुल आहेर, अनिल कदम, भाजप जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही पक्षातील विविध पक्षांचे पदाधिकारी ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता 'मै भी चौकीदार' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना नागरिकांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमास नागरिक व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेते एकीची नांदी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे अखेर खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारात सहभागी झाले असून, शिवसेनेतील नाराजांची फळी आता प्रचाराच्या कामाला लागली आहे. शिवसेनेतील एकीच्या नांदीने गोडसेंना काहीसा दिलासा मिळाला आहे.

लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी भाजप-शिवसेनेच्या प्रचारात समन्वय राहावा यासाठी विजय करंजकर आणि भाजपचे लक्ष्मण सावजी यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात युतीचा संयुक्त मेळावा घेतला जाणार आहे, तर ८ एप्रिल रोजी गोडसे शक्तिप्रदर्शनाद्वारे अर्ज दाखल करणार आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात एकीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी प्रचाराचा जोर लावला असतानाच शिवसेनेत मात्र नाराजीनाट्य सुरू होते. उमेदवारीच्या स्पर्धेत असलेले जिल्हाप्रमुख विजय करंजकर उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले होते. करंजकरांसह मोठा गट या उमेदवारीवर नाराज झाला होता. परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराज झालेल्या करंजकरांची समजूत काढली असून, अन्य नेत्यांनाही कामाला लागण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अखेरीस शिवसेनेतील नाराज गट आता गोडसेंच्या प्रचारात सक्रिय झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या युतीच्या समन्वय बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या नियोजनासाठी करंजकर आणि सावजी यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानुसार करंजकर प्रचारात सक्रिय झाले असून, त्यांनी हेमंत गोडसेंच्या प्रचाराचे नियोजन सुरू केले आहे. त्यानुसार ग्रामीण आणि शहरी भागात विभागवार मेळावे आयोजित केले जात आहेत. त्यामुळे गोडसेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

---

८ एप्रिलला दाखल करणार अर्ज

शिवसेना आणि भाजपच्या वतीने खासदार गोडसे यांच्या प्रचार मोहिमेंतर्गत शहरात शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना आणि भाजपचा संयुक्त मेळावा आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन करण्याचा शिवसेनेचा इरादा असून, त्यासाठी मोठ्या नेत्यांना आमंत्रित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे गोडसे ८ एप्रिल रोजी शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नेते अर्ज दाखल करण्यासह संयुक्त मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकीचे बळ, मिळते फळ!

$
0
0

प्रवीण बिडवे

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

'ऐसे निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचि फळ' या उक्तीचा प्रत्यय दिंडोरी तालुक्यातील अवनखेड गावात येतो. ग्रामस्थांचा दृढनिश्चयी बाणा अन् एकात्मतेमुळे या गावाने विकासाचे आयाम बदलले आहेत. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छतेचे अत्यंत प्रतिष्ठेचे नाशिक विभागाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक या गावाने अलीकडेच पटकावले. राज्यस्तरावरील पहिल्या पारितोषिकावर आपलीच मोहोर उमटविण्यासाठी हे गाव सिद्ध झाले आहे.

दिंडोरी तालुक्यातील अवनखेड हे अवघ्या ४५० उंबऱ्यांचे गाव. विकासासाठीचे झपाटलेपण येथे पहावयास मिळते. विकास हा एकट्याने ओढावयाचा गाडा नाही. ती अंगणवाडीत जाणाऱ्या बालकापासून जख्खड आजोबांपर्यंत सर्वांचीच जबाबदारी आहे. गावातील सर्वच्या सर्व २,८५० ग्रामस्थ ही जबाबदारी पार पाडतात. म्हणूनच उत्तर महाराष्ट्रातील ६ हजार ६९६ गावांमधून अवनखेड या गावाला गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे पहिले १० लाखांचे पारितोषिक मिळाले. आता राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी १२ गावांमध्ये अवनखेडनेही दंड थोपटले असून, राज्याचे पहिले पारितोषिक मिळविण्याचा संकल्प सोडला आहे.

ग्राम स्वच्छता अभियान कशासाठी

ग्रामीण जनतेचे आरोग्यमान व पर्यायाने जीवनस्तर उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग वाढावा, ग्रामीण जनतेला स्वच्छतेची सवय लागावी त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेतली जाते.

नाशिक विभागातील जिल्हानिहाय गावे

जिल्हा गावांची संख्या

नाशिक १९६०

जळगाव १५१३

अहमदनगर १६०२

नंदुरबार ९४३

धुळे ६७८

एकूण ६६९६

जिल्हास्तरावर प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायती विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र असतात. त्यानुसार नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांत एकूण १० ग्रामपंचायती विभागस्तरावर स्पर्धेसाठी पात्र होत्या.

जिल्हा ग्रामपंचायतीचे नाव तालुका

नाशिक अवनखेड दिंडोरी

नाशिक राजदेरवाडी चांदवड

धुळे अजंदे बु शिरपूर

धुळे परसामळ शिंदखेडा

नंदुरबार वाटवी नवापूर

नंदुरबार राजविहीर तळोदा

जळगाव मेहेरगाव अमळनेर

जळगाव सुसरी भुसावळ

अहमदनगर लोणी बु राहाता

अहमदनगर वडनेर बु पारनेर

अशी होती १०० गुणांची परीक्षा

विषय गुण

शौचालय व्यवस्थापन ४०

पाणीगुणवत्ता २०

सांडपाणी व्यवस्थापन १०

लोकसहभाग १०

घनकचरा व्यवस्थापन ०५

घर/गाव परिसर स्वच्छता ०५

वैयक्तिक स्वच्छता ०५

स्मार्ट व्हीलेज संकल्पनेनुसार उपलब्धी ०५

एकूण १००

स्वच्छतेसाठी नेमणूक

जबाबदारी सोपविली की, कामे व्यवस्थित होतात, असा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा अनुभव आहे. गावातील त्या-त्या वस्तीवर स्वच्छता राखण्याची जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. त्या-त्या भागातील ग्रामपंचायत सदस्यांनी परिसरात आठ ते दहा जणांची समिती स्थापन केली आहे. आठवड्यात दोन दिवस निश्चित करण्यात आले असून, त्या दिवशी न सांगता प्रत्येकजण आपआपली जबाबदारी पार पाडतो.

शिवारही स्वच्छ

गावाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला आठ किलोमीटपर्यंत शिवार पसरले आहे. गावाचा केवळ दर्शनी भाग स्वच्छ ठेऊन उपयोग नाही. ग्रामस्थ गावापासून दूर मळ्यामध्ये राहात असतील तर तेथेही स्वच्छता नांदली पाहिजे याची कटाक्षाने काळजी घेतली जाते. गावातील शेतकरी बांधव प्राधान्याने द्राक्ष आणि उसाचे पिक घेतात. त्यांच्या शिवारापर्यंत वायफाय सुविधा पुरविण्यात आली आहे.

पंतप्रधानांकडूनही अवनखेडचे कौतुक

गाव हागणदारीमुक्त, तंटामुक्त आहे. येथील कचराही नैसर्गिक साधनसंपत्ती मानून त्याचा गांडूळखत निर्मितीसाठी उपयोग केला जातो. त्याकरिता तसे युनिट गावात साकारण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून जख्खड आजोबांपर्यंत सारेच स्वच्छतेचे पुजारी आहेत. गावात वायफाय सुविधा, अत्याधुनिक स्वरूपाचे टॉयलेट्स, शालेय विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन आणि डिस्पोजल मशीन्स, शुद्ध पाण्यासाठी आरो यंत्रणा बसविण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या भाषणातून अवनखेडचा उल्लेख करून या ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.

आयएसओ मानांकन

आधारकार्ड ही अनिवार्य बाब झाल्याने गावातील सर्व ग्रामस्थांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. अंगणवाडी, प्राथमिक शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीचे दिवे सौरउर्जेवर चालतात. गावात स्वामी पदमानंद सरस्वती महाराज सभागृहाचे नूतनीकरण सुरू आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गावात तंटे नाहीत अन् अतिक्रमणही नाही. सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी शोष खड्डे, परसबाग, बंदिस्त गटारे यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने मदत घेतली जाते.

स्वच्छता राहिली तर रोगराई पसरत नाही. त्यामुळे ग्रामस्थ स्वच्छतेला महत्त्व देतात. सर्वजण एकोप्याने राहतात म्हणूनच गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. गवत वाढू न देणे, रस्ते व त्यालगतचा परिसर स्वच्छ ठेवणे हे काम प्रत्येकजण आपली जबाबदारी समजून करतो. स्वच्छतेवर नजर ठेवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर समितीही काम करते.

- भिका शिंदे, ग्रामस्थ

अंगणवाडीत ४० बालके येतात. ते स्वच्छ व नीट नेटकी असावीत याकडे आमचा कटाक्ष असतो. कपडे अस्वच्छ असतील तर पालकांना बोलावून समजावून सांगितले जाते. साबणाने हात स्वच्छ धुणे, केस अधिक वाढू न देणे आणि डब्यामध्ये खाद्यपदार्थ देतानाही योग्य काळजी घेण्याबाबत बालके आणि पालकांनाही मार्गदर्शन केले जाते. बालकांची नखे वाढली असतील तर ती अंगणवाडीतही काढली जातात.

- जयश्री पिंगळ (अंगणवाडी सेविका)

चॉकलेटचे रॅपर देखील डस्टबीनमध्ये टाकण्याची सवय शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये बाणविली आहे. शाळेतील वर्गांमध्ये नेलकटर ठेवले आहेत. पसायदानानंतर वर्ग शिक्षक विद्यार्थ्यांची नखे तपासतात. ती वाढली असतील तर कमी करण्याबाबत सूचना देतात. गुरूवारी शाळेतच नखे काढली जातात. केस वाढलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी वर्गामध्ये उभे केले जाते. केस कमी करून येण्याच्या सूचना त्यांना दिल्या जातात.

- बाळूकाका शेवाळे, मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय, अवनखेड

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार मिळणे हे अवनखेड ग्रामस्थांचे यश आहे. कोणत्याही चांगल्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामस्थांनी प्रत्येक वेळी हिरीरीने हा सहभाग दिला. राज्य स्तरावरील स्पर्धेत अवनखेडसह १२ गावांचा समावेश आहे. राज्य स्तरावरील समितीने अलीकडेच गावाची पाहणी केली असून, ग्राम स्वच्छतेचे राज्य स्तरावरील पहिले पारितोषिकही अवनखेडलाच मिळेल हा विश्वास आहे.

- नरेंद्र जाधव, सरपंच अवनखेड

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विभागस्तरीय समिती

राजाराम माने, विभागीय आयुक्त - अध्यक्ष

सुदर्शन कालिंके, मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण - सदस्य

शिवाजी दहीते, अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे - सदस्य

डॉ. किरण मोघे - उपसंचालक माहिती व जनसंपर्क - सदस्य

प्रतिभा संगमनेरे - उपायुक्त विकास - सदस्य सचिव

स्वागत अन् बँडबाजाला नकार

गावाची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या सरकारी समितीचे ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत केले जाते. या स्वागताआड समितीला खूश करण्याचा प्रयत्न अधिक असतो हे नव्याने सांगायला नको. परंतु, विभागीय स्तरावर गावांची पाहणी करणाऱ्या समितीने स्वागत आणि बँडबाजाला स्पष्ट शब्दांत नकार दिला. सर्व औपचारिकतांना फाटा देऊन गावाच्या पाहणीला महत्त्व दिले. समितीमधील काही सदस्यांनी गावाचे डॉक्युमेंटशन तपासले तर काहींनी थेट ग्रामस्थांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. खरोखरच लोकसहभाग आहे का हे तपासण्यासाठी ग्रामस्थांना अनपेक्षित प्रश्न विचारण्यात आले. स्पर्धेत सहभागी काही गावांमध्ये समितीला शौचालयांचा वापर चारा साठवणुकीसाठी होत असल्याचे आढळले, तर काही गावांचा दर्शनी भाग लख्ख असला तरी सांडपाणी दूर कोठे शोष खड्ड्यात न सोडता जलाशयात सोडल्याचे आढळून आले. अशी गावे स्पर्धेतून बाद झाली. घनकचऱ्याचे काय करता? असे प्रश्न महिलांना तर नखे कोणत्या दिवशी कापतात असा प्रश्न कोणत्याही विद्यार्थ्याला विचारले गेले. केवल डॉक्युमेंटेशनवर विश्वास ठेऊन गुण न देता प्रत्यक्ष पाहणी, संवाद आणि क्रॉस व्हेरिफिकेशनला महत्त्व देण्यात आले.

गावाने काय केले?

घनकचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खत प्रकल्प निर्मिती

बंदिस्त गटारांची निर्मिती

सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी शोषखड्डे

परसबाग निर्मिती

प्रत्येक घरी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी शौचालये

नदीकाठालगत कचरा टाकू नये याकरिता जॉगिंग ट्रॅक निर्मिती

जनावरांच्या मलमूत्राचेही व्यवस्थापन

विद्यार्थ्यांची नखे व केस कापण्याबाबत पाठपुरावा

जलजन्य आजार पसरू नयेत याकरिता टीसीएलचा वापर

शाळेत बसविले सॅनिटरी नॅपकीन व डिस्पोजल मशिन

वैयक्तिक स्वच्छता आणि घर स्वच्छतेलाही प्राधान्य

गावात १०० टक्के आधारकार्डधारक

गावकरी देतात श्रमदानाला महत्त्व

स्मशानभूमी परिसरात हिरवाई

सौर उर्जेवर चालतात सार्वजनिक दिवे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कायडायव्हिंगचा विक्रम शहिदांना समर्पित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कारगिलच्या युद्धात एक पाय गमवावा लागल्यानंतरही तब्बल नऊ हजार फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करण्याचा पराक्रम मेजर डी. पी. सिंह यांनी केला आहे. देशात अशा प्रकारे युद्धातील जखमी सैनिकाने स्कायडायव्हिंग केल्याची घटना प्रथमच घडली आहे.

हा विक्रम नाशिकमध्ये झाला असून, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावरच हे शक्य झाले असून, हा पराक्रम देशासाठी शहीद झालेल्या जवानांना आणि त्यांच्या पश्चात अनेक बाबींना तोंड देणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना समर्पित करीत असल्याची भावना सिंह यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केली.

पाकिस्तानविरोधातील कारगिलच्या रणसंग्रामात एक पाय गमावलेले मेजर डी. पी. सिंह यांनी अजूनही आपला जोश कायम असल्याचे दाखवून दिले आहे. कारगिल युद्धात पाकिस्तानविरुद्ध लढताना सिंह यांनी पाय गमावला. त्यानंतर त्यांना लोखंडी पाय बसवावा लागला. मात्र, त्यानंतरही काहीतरी वेगळे करावे आणि आपल्या सैन्याचे नाव उंचवावे या उद्देशाने सिंह यांनी स्कायडायव्हिंगचे खडतर उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. गेल्या चार वर्षांच्या अथक मेहनतीनंतर सिंह यांनी गुरुवारी (दि. २८ मार्च) नाशिकमधून स्कायडायव्हिंग करीत नवा पराक्रम नोंदवला. युद्धातील जखमी सैनिकाचे हे देशातील पहिलेच स्कायडायव्हिंग ठरले आहे. सिंह यांनी नाशिकमधील कॉम्बॅट एव्हिएशन ट्रेनिंग येथे प्रशिक्षण घेतले. ध्रुव हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्यांनी समुद्रसपाटीपासून नऊ हजार फूट उंचावरून उडी मारली. ही घटना ऐतिहासिक ठरली आहे.

मेजर डी. पी. सिंह यांना भारतीय लष्कराच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्कायडायव्हिंगचे प्रशिक्षण दिले. युद्ध किंवा लष्करी कामात जखमी झालेल्या किंवा अपंगत्व आलेल्या जवानांना प्रेरणा देण्यासाठी सिंह यांनी हा उपक्रम राबविला. सिंह यांनी नाशिकमध्ये १८ मार्च पासून आर्मीच्या साहसी प्रशिक्षणाला प्रारंभ केला आहे. त्यानंतर गुरुवारी प्रत्यक्ष स्कायडायव्हिंग करीत त्यांनी इतिहास रचला. या मोहिमेबाबत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांनी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले, तसेच सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे आपण हा पराक्रम करू शकलो, असे सिंह यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. लष्करासह वायू दलाचेही सहकार्य त्यांना मिळाले आणि स्कायडायव्हिंगची परवानगी मिळाली. कर्तव्यावर असताना अपंग झालेल्या जवानांप्रति विशेष वार्षिक कार्यक्रम लष्कराकडून राबविला जात आहे. ही मोहीम त्याचाच एक भाग असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. या पराक्रमामुळे इतरही दिव्यांग जवानांना प्रेरणा मिळेल, नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

वेगळी ओळख

मेजर डी. पी. सिंह यांची ओळख 'इंडियन ब्लेड रनर' अशीही आहे. १९९९ च्या कारगिल युद्धात तोफगोळा लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. प्राथमिक माहितीच्या आधारे त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. पण, सुदैवाने ते जीवित असल्याचे दिसून आले. गंभीर जखमेमुळे त्यांना गँगरिन झाले. त्यामुळे त्यांचा एक पाय गुडघ्यापासून कापावा लागला. वयाच्या पंचविसाव्या वर्षी असा प्रसंग आला, तरी त्यास त्यांनी धैर्याने तोंड दिले. हिंमत न हारता त्यांनी आपली वाटचाल कायम ठेवली. त्यांनी १८ पेक्षा जास्त मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्या पूर्णही केल्या आहेत.

--

काही तरी वेगळे करण्याची माझी इच्छा होती. चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर अखेर मी स्कायडायव्हिंग करू शकलो. लष्कराचे अधिकारी, माझे प्रशिक्षक यांनी मला मोठे मार्गदर्शन आणि सहकार्य केले. शहिदांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मी हा पराक्रम समर्पित करीत आहे. काही ठरविले तर आपण निश्चितच ते करू शकतो, हे सिद्ध झाले आहे.

-डी. पी. सिंह, मेजर (निवृत्त)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तब्बल २४ कोटींची वसुली!

$
0
0

जिल्हा प्रशासनाची मार्च एण्डला कामगिरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा प्रशासनाने शनिवारी (दि. ३०) एकाच दिवसात २४ कोटी रुपयांचा महसूल वसुल केला. यामुळे प्रशासनाच्या तिजोरीत १६१ कोटी रुपये जमा झाले असून मार्च एण्डमुळे रविवारी (दि. ३१) प्रशासनाचे कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारने प्रशासनाला १६५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे.

मार्चच्या अखेरच्या आठवड्यात ६४ कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल वसुलीसाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे पहावयास मिळत होते. शनिवारी एकाच दिवसात प्रशासनाच्या तिजोरीत २४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. यामध्ये समृद्धी महामार्गासाठीच्या भू-संपादनाचे एक कोटी ४७ लाख रुपये, एमआयडीसीच्या सिन्नर येथील भूसंपादनासाठीच्या तीन कोटी ७० लाख रुपयांचा समावेश आहे. याशिवाय भाम धरणाच्या रॉयल्टीतूनही चार कोटी आणि विविध विभागांकडील थकीत ११ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. रविवारी देखील मार्च एण्डमुळे प्रशासनाचे कामकाज सुरू राहणार आहे. आत्तापर्यंत १६१ कोटी रुपयांची वसुली झाली असून वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्‍वास निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी व्यक्त केला आहे.

अशी झाली वसुली

समृद्धी भू-संपादन : एक कोटी ४७ लाख

सिन्नर एमआयडीसी भूसंपादन : तीन कोटी ७० लाख

भाम धरण रॉयल्टी : चार कोटी

विविध विभागांकडील थकीत : ११ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये महायुतीत फूट?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महायुतीत समावेश असूनही स्थानिक पातळीवरील नेत्यांना शिवसेना भाजपकडून विचारले जात नसल्याने नाशिकमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या(रिपाइं) आठवले गटाने नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक जिल्हा समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवार देण्याचा ठराव संमत करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिली. महायुतीच्या बैठकांना बोलविले जात नाही तसेच रिपाइं नेत्यांचे फोटोही लावले जात नसल्याने कार्यकर्ते संतप्त आहेत. जिल्ह्यातील स्थितीबाबतचा अहवाल गुरुवारी, चार ४ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना सुपूर्द केला जाणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले.

आरपीआय (आठवले गट) केंद्रात आणि राज्यात महायुतीत सहभागी आहे. परंतु, नाशिक जिल्ह्यात आरपीआयच्या आठवले गटाला विश्वासात घेतले जात नसल्याचा दावा करत, जिल्हाध्यक्ष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक प्रक्रियेत 'रिपाइं'ला डावलले जात असल्याचा आरोप बहुसंख्य कार्यकर्त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात झालेल्या मनोमिलन बैठकीत 'रिपाइं'च्या नेत्यांना बोलविण्यात आले नाही. दोन दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये झालेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही रिपाइंच्या नेत्यांना विश्वासात घेतले गेले नाही. युतीच्या मेळाव्यांमध्ये 'रिपाइं' अध्यक्ष रामदास आठवले यांचा फोटा लावला गेला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत 'रिपाइं'ला डावलले जात असल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे 'रिपाइं'ने नाशिक आणि दिंडोरीसाठी स्वतंत्र उमेदवार द्यावा, असा एकमुखी ठराव बैठकीत संमत करण्यात आला. या बैठकीचा अहवाल येत्या ४ एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत सादर केला जाणार आहे. यावेळी रामदास आठवले जो आदेश देतील त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती प्रकाश लोंढें यानी दिली.

'मराठा उमेदवार द्यावा'

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 'रिपाइं'ची मोठी ताकद आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र उमेदवार द्यावा तसेच नाशिकमधून मराठा समाजाला उमेदवारी द्यावी, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. त्यासाठीच्या नावाची शिफारसही रामदास आठवले यांच्याकडे करण्यात येणार आहे, असे प्रकाश लोंढे यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

परीक्षेत मदत करतो असे सांगत विद्यार्थिनीशी जवळीक साधण्याच्या प्रयत्न करणाऱ्या प्राध्यापकाविरुद्ध देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात लैंगिक अपराध केल्याबद्दल विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रा. डॉ. संतोष वाघ असे या प्राध्यापकाचे नाव आहे.

येथील एसव्हीकेटी महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने प्रा. वाघ याच्याविरोधात देवळाली कॅम्प पोलिसात आपल्या आई व मामा यांना सोबत नेत तक्रार नोंदविली. पोलिस संबंधित प्राध्यापकाचा शोध घेत आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २६ मार्चपूर्वी १० दिवस आधी व त्यानंतर २७ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास प्रा. वाघ हा वर्गात परीक्षा देत असतांना तिची इच्छा नसतांना तिच्या जवळ गेला. भावनिक जवळीक साधून परीक्षेत मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच तिच्या सोबत वाईट वर्तवणूक केली. याशिवाय पीडितेशी फोनद्वारे संपर्क साधला आणि पाठलाग केला. पीडितेने तिच्या कुटुंबीयांना याबद्दल सांगितले. यानंतर त्यांनी देवळाली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आरटीई’ची लॉटरी राज्यस्तरावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेमुळे यंदा 'आरटीई'ची लॉटरी प्रक्रिया राज्यस्तरावरून पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी ही माहिती दिली.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागास घटकांतील बालकांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी यंदा पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील ४५७ शाळांमधील ५ हजार ३७५ जागांसाठी तब्बल १४ हजार ६२९ अर्ज शनिवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाले आहेत. आता पालकांचे लक्ष लॉटरी प्रक्रियेकडे लागले आहे. बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार आरटीई (राइट टू एज्युकेशन) प्रक्रिया राबविण्यात येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने ही प्रक्रिया राबविण्यात येते. यंदा, शाळा नोंदणीमुळे प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला होता. ५ मार्चपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. पहिल्या चोवीस तासांतच नाशिक जिल्ह्यात १ हजार ५४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर दिवसागणिक या अर्जांची संख्या वाढतच जात उपलब्ध जागांच्या तिपटीपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. शनिवारी (दि. ३०) या प्रक्रियेत अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. या दिवशी सायंकाळपर्यंत १४ हजार ६२९ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जांची संख्या जागांच्या तुलनेत जास्त असल्याने पालकांचे लक्ष लॉटरी प्रक्रियेकडे लागले आहे. दर वर्षी जिल्ह्यांनुसारच लॉटरी काढण्यात येते. यंदा मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे राज्यस्तरावरूनच लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अद्याप लॉटरीच्या तारखा, वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसल्याचे शिक्षणाधिकारी झनकर यांनी सांगितले.

- -

\Bउत्तर महाराष्ट्रातील अर्जसंख्या

--

\Bजिल्हा शाळांची संख्या प्राप्त अर्जांची संख्या

--

नाशिक ४५७ १४ हजार ६२९

धुळे ९७ २ हजार ३२५

जळगाव २७४ ६ हजार ७८७

नंदुरबार ४७ ५६२

- -

\Bराज्यात नाशिक चौथे

--

\Bजिल्हा शाळांची संख्या प्राप्त अर्जांची संख्या

--

पुणे ९६३ ५३ हजार ५८६

नागपूर ६७५ २५ हजार ९२२

ठाणे ६५२ १५ हजार ९३६

नाशिक ४५७ १४ हजार ६२९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृत भाषा सभेची कार्यकारिणी जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संस्कृत भाषा सभेची नुकतीच अंतर्गत सभा झाली. सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणी अशी : अध्यक्ष- रमेश देशमुख, कार्याध्यक्ष- सरिता देशमुख, सहकार्याध्यक्ष- तेजश्री वेदविख्यात, कोशाध्यक्ष- शोभा सोनवणे, उपाध्यक्ष- डॉ. देवदत्त देशमुख, सदस्य- शुभांगी गोखले, रूपाली झोडगेकर, श्रद्धा शहा, नूपुर सावजी, सारंग भार्गवे, डॉ. अभिजित सराफ, अमित नागरे, पद्माकर महाजन, अंकुश जोशी. येत्या काळात संस्कृत भाषेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचा मानस कार्यकारिणीने व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा घसरला, चटके कायम!

$
0
0

दुपारी टळटळीत ऊन; उष्णतेच्या लाटेचा अंदाज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेले दोन दिवस चाळिशी पार गेलेल्या शहराच्या तापमानात शनिवारी हलकीशी घट झाली. मात्र, उन्हाचा पारा घसरला असला तरी चटके कायम आहेत. नाशिकमध्ये शनिवारी कमाल तापमान ३९.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले, तर १९.६ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाचीही नोंद झाली. गुरुवारी कमाल तापमान ४०.४ अंश सेल्सिअस होते. नाशिकसह अहमदनगरमध्येही उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे खूपच गरज असेल तरच दुपारी १२ ते साडेतीन या वेळेत घराबाहेर पडा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तास तापमान ३९ ते ४० अंशांच्या दरम्यान राहू शकते. एप्रिल-मेमध्ये मात्र कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे तरण तलावावर नागरिकांची गर्दी होत आहे, तर वाढत्या तापमानापासून बचावासाठी डेझर्ट कूलरला मागणी वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हीव्हीपॅटचे सेटिंग सिलिंग मुख्यालयातच

$
0
0

जिल्ह्याच्या प्रस्तावाची देशभरात अंमलबजावणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतुकीदरम्यान व्हीव्हीपॅट मशिनची सेटिंग बिघडण्याची शक्यता गृहीत धरून भारत निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅटची सेटिंग आणि सिलिंग विधानसभा मतदार संघाच्या मुख्यालयात करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने सतर्कता दाखवित ही बाब आयोगाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल आयोगाने घेतली असून देशभरात आता विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सेटिंग आणि सिलिंग होणार आहे.

वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) ही नाजूक यंत्र असून ती अधिक अंतरावर वाहून नेताना त्यांची सेटिंग बिघडण्याची भीती जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने व्यक्त केली होती. याबाबचे पत्र राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविण्यात आले. यंत्रांच्या हाताळणीतील जोखीम कमी व्हावी आणि सेटिंग बिघडून निवडणूक प्रक्रियेत गोंधळ उडू नये यासाठी जिल्हा मुख्यालयाऐवजी विधानसभा मतदार संघाच्या मुख्यालयांत या यंत्रांची सेटिंग आणि सिलिंग करणे उचित ठरेल असे या पत्रामध्ये नमूद केले होते. याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने रविवारी (दि. २४) प्रसिद्ध केले होते. जिल्हा प्रशासनाने निदर्शनास आणून दिलेली ही बाब निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतली असून विधानसभा मुख्यालयांमध्येच व्हीव्हीपॅटची सेटींग आणि सिलिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही विधानसभा मतदार संघांच्या यंत्रणेकडे ही यंत्र सोपविण्यास सुरुवात केली असून १५ विधानसभा मतदार संघांमध्ये तेवढ्याच स्ट्राँग रूमची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या निर्णयामुळे व्हीव्हीपॅट मशिन्सची हाताळणी सोपी आणि प्रभावी होणार असून तांत्रिक बिघाडाचे, सेटिंग हलण्याचे प्रकारही टाळता येणार आहेत.

अधिक अंतरांवरील मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशिन्स वाहून नेताना त्यांची सेटिंग हलण्याची शक्यता होती. त्यामुळे ऐनवेळी निवडणूक यंत्रणेपुढील अडचणी वाढल्या असत्या. विधानसभा मतदारसंघांच्या मुख्यालयांच्या ठिकाणी मशिन्सचे सेटिंग आणि सिलिंग करण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने मान्य केला आहे. देशभरात त्याची अंमलबजावणी होणार आहे.

- अरुण आनंदकर,

उपजिल्हा निवडणूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप झूम - चित्राची जागा

$
0
0

झिप झॅप झूम - चित्राची जागा

- -

प्राजक्ता सोनवणे, इयत्ता चौथी, नाशिक

- -

सर्वेश कांबळे, इयत्ता दहावी, नाशिक

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची मेट्रो कागदारवरच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीपूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नाशिक शहरात मेट्रो सेवा सुरू करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांनी केलेली घोषणा हवेतच विरली आहे. मेट्रो सेवा सुरू करण्याबाबत 'महामेट्रो'च्या माध्यमातून दोन महिन्यांत व्यवहार्यता अहवाल तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. परंतु, या घोषणेला आता तीन महिने उलटले, तरी अद्यापही अहवाल आलेला नाही. त्यामुळे मेट्रो कागदावरच असल्याची चर्चा आहे.

महापालिका निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर भाजपच्या हाती सत्ता गेली. त्यामुळे नाशिकच्या विकासासाठी आता भरभरून मिळेल, अशी नाशिककरांची अपेक्षा होती. परंतु, ही अपेक्षा आता फोल ठरली आहे. नाशिकच्या सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे असलेली तोट्यातील बससेवा महापालिकेच्या माथी मारली. त्याची प्रक्रिया सुरू असतानाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. विभागीय महसूल आयुक्तालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा करीत त्यासाठी लवकरच व्यवहार्यता तपासणी करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले होते.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेपूर्वी शहरात मेट्रोसाठीची चाचपणी करण्यात आली होती. दिल्लीस्थित अर्बन मास ट्रान्झिट सिस्टीम या कंपनीने शहरात सर्वेक्षण करीत नाशिकमध्ये मेट्रो सेवा व्यवहार्य नसल्याचा अहवाल सादर केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा नाशिककरांना मेट्रो सेवेचे स्वप्न दाखविले. या आढावा बैठकीनंतर तीन महिन्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहरासाठी मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम राबविण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. 'महामेट्रो'ला हा आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यासही आता तीन महिन्यांचा काळ उलटत आला असला, तरी अद्याप व्यवहार्यता तपासणी अहवाल तयार होऊ शकलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली मेट्रोची घोषणा हवेत विरल्याचे बोलले जात असून, केवळ निवडणुकांपुरतेच गाजर होते की काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

---

आचारसंहितेचा दिलासा

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सिडको, नाशिक महापालिका आणि महामेट्रो एकत्रितपणे नाशिक शहरासाठी मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम राबविण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याचे जाहीर केले गेले. परंतु, त्यालाही दोन महिने उलटले असून, आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेत त्याबाबतची घोषणा करता येत नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, या आचारसंहितेनंतर लागलीच विधानसभेचीही आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे लागोपाठ येणाऱ्या दोन आचारसंहिता सत्ताधाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार असल्याची स्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई-पुणे महामार्गांवर ‘टोलधाड’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाने पुणे व मुंबई महामार्गांवरील टोलमध्ये दर वर्षीप्रमाणे वाढ केल्यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या महामार्गांवर करण्यात आलेली वाढ 'होलसेल प्राइस इंडेक्स'प्रमाणे असली, तरी तिची झळ जिल्ह्यातील मुंबई, पुणे व मालेगाव-धुळ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.

प्राधिकरणाने केलेली ही टोल दरवाढ मुंबई महामार्गावर पिंपळगाव बसवंत येथे, तर पुणे महामार्गावर चालकवाडी आणि हिवरगाव पावसा या टोल नाक्यावर लागू होणार आहे. विशेष म्हणजे चालकवाडी टोल नाका अद्याप सुरू झालेला नाही, तरी त्याचे दर जाहीर करण्यात आले आहेत. दि. १ एप्रिलपासून ही नवीन दरवाढ लागू होणार आहे.

नाशिक-चांदवडदरम्यान असलेल्या पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर ही दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककरांना मालेगाव, चांदवड, धुळे येथे जाण्यासाठी हे वाढीव दर लागणार आहेत. पिंपळगाव बसवंतहून गोंदे येथे जाण्यासाठी हा टोल मालेगाव, चांदवडमार्गे जाणाऱ्यांनाही बसणार आहे. पिंपळगाव बसवंत ते गोंदे या ५० किलोमीटरच्या रस्त्यासाठी ही वाढ असून, जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहनांना त्यातून सुट देण्यात आली आहे. या टोल दरवाढीत कार, जीप, व्हॅन, एलएमव्ही वाहनांकरिता एकेरी फेरीसाठी इतर जिल्ह्यातील वाहनांना १४० रुपये टोल लागणार आहे, तर जिल्ह्यातील वाहनांना हाच टोल ७० रुपये राहणार आहे. त्याचप्रमाणे एलसीव्ही, एलजीव्ही, मिनी बस यासाठी २२५ रुपये इतरांसाठी, तर जिल्ह्यातील वाहनांसाठी ११५ रुपये टोल राहणार आहे. बस व ट्रकसाठी इतर जिल्ह्यांतील वाहनांना ४७५ रुपये, तर जिल्ह्यातील वाहनांना २३५ रुपये टोल राहणार आहे. त्याचप्रमाणे कमर्शिअल वाहनांसाठी ही दरवाढ वाहनांच्या प्रकारानुसार आहे. त्यात सर्वाधिक वाढ सात किंवा अधिक अॅक्सल असणाऱ्या अवजड वाहनांसाठी असून, ती तब्बल ९०१ रुपयांपर्यंत आहे.

---

पुणे महामार्गावरही वाढ

पुणे येथे जाताना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावरही टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यात कार व जीपसाठी ४५ रुपये, हलक्या वाणिज्य वाहनांसाठी ७० रुपये, तर ट्रक व बससाठी १५० रुपये टोल राहणार आहे. त्याचप्रमाणे इतर वाहनांचे दरदेखील वाढविण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोने खरेदी व्यवहारात गंडा

$
0
0

पाच लाख रुपयांची बॅग लांबविली

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अल्पदरात सोने विक्रीस असल्याचे सांगून घरात घुसलेल्या चौघांनी पाच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हातोहात लांबविली. ही घटना पाथर्डी फाटा भागातील नरहरीनगर परिसरात घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

भावेशकुमार जिवनलाल कलारिया (रा. पालीहिल अपार्ट.) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. दीपक सिंग, संतोष यादव, कल्याण आणि राजू नावाच्या संशयितांनी ही फसवणूक केली. संशयितांनी बुधवारी (दि. १३) दुपारी कलारिया यांच्याशी फोनवर संपर्क साधला. पावतीसह सोने असून ते विक्री करायचे असल्याचे सांगत संशयितांनी २५ हजार तोळे दराने हा व्यवहार निश्चित केला. कलारिया यांनी त्यांना आपल्या घरी बोलावले. संशयित आरोपींनी सोमवारी (दि. १८) कलारिया यांच्या घर येऊन पैशांची खातरजमा केली. यावेळी कलारिया पैशांसह तयार होते. संशयितांनी कलारिया यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने खऱ्या नोटा असलेली बॅग चोरी केली. बनावट नोटांची हुबेहुब बॅग ठेवून सोने घेऊन येतो, असे सांगून पोबारा केला. संशयित घराबाहेर पडताच कलारिया यांनी पैशांची खातरजमा केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

ऑनलाईन फसवणूक

बँकेतून बोलत असल्याचे सांगून भामट्यांनी ग्राहकाच्या एटीएम कार्डची माहिती मिळवित लाख रुपयांची रोकड ऑनलाईन काढून घेतली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. विक्रमजित सतीप्रसाद भट्ट (रा. दत्तमंदिररोड, शिवाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चोरट्याने सोमवारी (दि. २५) ८८७३६४१९४९ या क्रमांकावरून भट्ट यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी त्याने सेंट्रल बँक ऑफ इंडियातून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून एटीएम कार्डचा तपशिल घेतला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून परस्पर एक लाख तीन हजार २९३ रुपये ऑनलाईन काढून घेतले.

दोन तडीपार अटकेत

गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपार करण्यात आलेल्या दोघा तडीपार गुन्हेगारांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आले. बुऱ्हाण शाकीर शेख (२० रा. झिनतनगर, वडाळानाका) आणि वैभव उर्फ सोनू गजानन खिरकाडे (रा. मेहरधाम) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यातील वैभव याच्याकडे एक चॉपर आढळून आला. गडकरी चौकात शुक्रवारी (दि. २९) रात्री बुऱ्हाण गस्ती पथकाच्या हाती लागला. तर खिरकाडेला शुक्रवारी रात्री इंद्रकुंड भागातून त्याच्या साथिदारासह अटक करण्यात आली. संशयितांच्या अंगझडतीत धारदार चॉपर आढळून आला.

..

विवाहितेची आत्महत्या;

पती, सासूविरोधात गुन्हा

लग्नात भांडी घेण्यासाठी कमी पैसे दिले या कारणातून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सासू विरुद्ध आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ज्ञानेश्वर सुरेश गवांदे व निर्मला सुरेश गवांदे (रा. वृंदावननगर, आडगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मायलेकाची नावे आहेत. पूनम ज्ञानेश्वर गवांदे (वय १९) या विवाहितेने गुरुवारी (दि.२८) आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत तिचे वडिल दिलीप सोनबा कोल्हे (वय ४२, रा. विडणी, जि. सातारा) यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, पती ज्ञानेश्वर व सासू हे पूनमचा मानसिक व शारिरीक छळ करीत होते. लग्नात भांडी घेण्यासाठी कमी पैसे दिले, माहेरून पैसे आण असे म्हणून तिचा छळ सुरू होता. या छळास कंटाळून तिने आत्महत्या केली.

मायलेकीचा

सिडकोत विनयभंग

पाणी फेकतांना अंगावर पडल्याने संतप्त झालेल्या दोघांनी कुटुंबियास मारहाण करीत मायलेकींचा विनयभंग केला. सिडकोतील या घटनेप्रकरणी अंबड पोलिसांनी विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. रावसाहेब सुभाष देवरे आणि बंटी गंगाधर सूर्यवंशी (रा. दोघे सिडको) अशी संशयितांची नावे आहेत. साईबाबानगरमधील महिलेने तक्रार दिली. विनयभंगाची घटना रविवारी (दि. २४) घडली. अंगणात पाणी फेकतांना संशयितांच्या अंगावर पाणी पडले. संशयितांनी महिलेसह तिच्या पतीस व मुलीस घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी दोघांनी महिला आणि अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक कामाचा बाऊ!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी महापालिकेचे दीड हजार कर्मचारी आणि अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक कामांसाठी वर्ग केल्याचा महापालिकेतील विभागप्रमुखांचा दावा हा कांगावाच असल्याचे उघड झाले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणुक कामांसाठी अवघे ८४ अधिकरी कर्मचारी पूर्णवेळेसाठी वर्ग केले असून, ५७२ कर्मचाऱ्यांना मतदान आणि मतमोजणी या दोन दिवसांच्या कामांसाठी नियुक्ती दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अवघे ८४ कर्मचारीच कार्यरत असताना उर्वरित १४०० कर्मचारी कुठे गायब होतात, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. महापालिकेचे हे कर्मचारी बायोमॅट्रिक हजेरी लावून निवडणूक कामाचा बाऊ करीत गायब होत असल्याचे समोर आल्याने प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांकडून कर्मचाऱ्यांची यादी मागविण्यात आली होती. महापालिकेकडूनही मनुष्यबळ मागविण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने आपल्या १३०० कर्मचाऱ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेला दिली होती. या यादीसोबत पाणीपुरवठा, विद्युत, आरोग्य व वैद्यकीय विभागांतील कर्मचारी घेऊ नयेत, अशी विनंतीही करण्यात आली होती. मार्च महिना असल्याने वित्त आणि लेखा विभागांतील कर्मचारीही निवडणुकीसाठी वर्ग करू नयेत, अशी मागणीही करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने याची काळजी घेत आतापर्यंत महापालिकेचे ८४ कर्मचारी व अधिकारी निवडणूक कामांसाठी पूर्णवेळ आपल्याकडे वर्ग केले आहेत. ५७२ कर्मचाऱ्यांना मतदानासाठी दोन, तर मतमोजणीसाठी दोन अशी चार दिवसांची ड्युटी देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत महापालिकेचे केवळ ६५६ कर्मचारी आणि अधिकारीच घेतले असताना दुसरीकडे महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालये ओस पडत आहेत. महापालिकेतील विभागप्रमुख जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आमचे कर्मचारी निवडणूक कामांसाठी कसे पळविले जात आहेत, याच्या कहाण्या नागरिकांसह नगरसेवकांपुढे वाचत आहेत. अधिकारी व कर्मचारीच नसल्याने काम कसे करायचे, असा बागुलबुवा उभा करीत आहेत.

माहिती मागविल्यावर उलगडा

या सगळ्या प्रकाराची आयुक्त राधाकृष्ण गमे आणि प्रशासन उपायुक्त महेश बच्छाव यांनी गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून किती कर्मचारी आणि अधिकारी घेण्यात आले याची माहिती मागविण्यात आली. त्यात हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ ८४ कर्मचारीच वर्ग झाले असताना निवडणुकीच्या कामांसाठी महापालिका ओस का पडली, याची चौकशी केली जात आहे. विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांकडून कामचुकारपणा केला जात असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. निवडणुकीचा बाऊ करून कर्मचारी आणि अधिकारी खासगी कामे करीत असल्याचा प्रशासनाला संशय असून, आता बायोमॅट्रिक हजेरी तपासली जात आहे. विभागप्रमुखांकडून कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा अहवालही मागविण्यात आला आहे.

--

हजेरी लावून पसार

निवडणुकीच्या नावाखाली महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी मुख्यालयातून गायब होत असल्याचा संशय आता अधिकच बळावला आहे. सकाळी हे कर्मचारी बायोमॅट्रिक हजेरी लावून दिवसभार भटकंती करतात आणि सायंकाळी पुन्हा बायोमॅट्रिक हजेरी लावण्यासाठी येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. ८४ कर्मचारी आणि अधिकारी वगळता अन्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा अहवाल सर्व विभागप्रमुखांकडून मागविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, तसेच विभागांना अचानक भेटी देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, कर्मचारी अनुपस्थित आढळला, तर थेट निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात

$
0
0

संस्कृत संभाषण वर्ग उद्यापासून

नाशिक : संस्कृतभारतीतर्फे विनामूल्य संस्कृत संभाषण वर्गाचे आयोजन केले आहे. अशोकस्तंभावरील मोहिनीदेवी रुंग्टा विद्यालयात १ ते १० एप्रिल दरम्यान सायंकाळी ६ ते ७:३० या वेळेत हा वर्ग होणार आहे. सोप्या भाषेत संस्कृत संभाषण यामध्ये शिकविले जाणार असून शिबिरासाठी वय, शिक्षण याची कोणतीही अट नाही, असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

- -

शिक्षकेतर संघटनेची बैठक

नाशिक : महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेची सभा आयोजित करण्यात आली आहे. मा. रा. सारडा कन्या विद्यामंदिर, नेहरू उद्यानाजवळ येथे ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता ही सभा होणार आहे. २४ वर्षांची दुसरी कालबद्ध पदोन्नतीसाठीच्या न्यायालयीन प्रकरणांवर माहिती घेऊन चर्चा करणे, शिपाई कर्मचाऱ्यांच्या न्यायालयीन दाव्याची माहिती करुन घेणे, सातव्या वेतन आयोगातील वेतन निश्चितीच्या त्रुटींबाबत चर्चा करुन कार्यवाही ठरवणे असे विषय या सभेपुढे असणार आहे. ही सभा आज, ३१ मार्च रोजी होणार होती, मात्र त्यात बदल करण्यात आला असून ७ एप्रिल रोजी सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

- -

ध्यान शिबिराचे आयोजन

नाशिक : विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नाशिक शाखा व सन्मित्र ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ओंकार ध्यान योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १ ते ५ एप्रिल या कालावधीत हे शिबिर अजय मित्रमंडळाचे सभागृह, इंदिरानगर येथे सकाळी ७.३० ते ८.३० यावेळेत होणार आहे. या शिबिराचा लाभ इच्छुकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

- -

वाचनालयाचा वर्धापनदिन उत्साहात

नाशिक : नाशिकरोड येथील स्वयंसिद्धा महिला विकास मंडळ संचलित सोहम सार्वजनिक वाचनालयाया दहावा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. ग्रंथ तुमच्या दारीचे सर्वेसर्वा विनायक रानडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर लेखक दत्ता पाटील प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. वाचन संस्कृती कशी टिकविली पाहिजे, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा अंजली विसपुते, उपाध्यक्षा मेघा पिंपळे, खजिनदार प्रतिभा कुंभकर्ण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजा पारुंडेकर यांनी केले. वाचनालयाच्या अध्यक्षा पुष्पा गवांदे यांनी प्रास्ताविक केले.

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोरास सक्तमजुरीची शिक्षा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेत जमिनीची मोजणी होऊन हद्द निश्चितीसाठी शेतकऱ्याकडून आठ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मालेगाव येथील भूमीअभिलेख कार्यालयातील शिरस्तेदारास मालेगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) २०११ मध्ये ही कारवाई केली होती.

दीपक झुलाल वाल्हे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिरस्तेदाराचे नाव आहे. तक्रारदाराने मालेगाव शिवारातील सर्व्हे नंबर ११५ - १ क्षेत्र १.४० ही शेतजमीन खरेदी केली होती. सदर शेतीची मोजणी करून हद्द निश्चिती करण्यासाठी तक्रारदाराने मालेगाव भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. अनेक दिवस उलटूनही कार्यवाही होत नसल्याने तक्रारदाराने शिरस्तेदार वाल्हे याची भेट घेतली असता त्याने लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने 'एसीबी'कडे याबाबत तक्रार केली होती. 'एसीबी'च्या पथकाने २० जानेवारी २०११ रोजी पडताळणी करून वाल्हे यास त्याच्याच कार्यालयात रंगेहात पकडून अटक केली. या प्रकरणी मालेगाव कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा खटला बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालला. सरकारतर्फे अ‍ॅड. संजय सोनवणे यांनी काम पाहिले. समोर आलेल्या साक्षीपुराव्यांनुसार न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ प्रमाणे एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड तर कलम १३ प्रमाणे २ वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अनुक्रमे एक महिना साधी कैद आरोपीस भोगावी लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेसह दोघांची रेल्वेखाली आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्टेशनलगत शुक्रवारी (दि. २९) महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. शुक्रवारी रात्री पावणे नऊ वाजता पोल क्रमांक १८९/२६ जवळ एका अनोळखी महिलेने जेएनपीटी लोकल गाडीखाली आत्महत्या केल्याची माहिती पायलटने स्टेशन प्रशासनाला दिली. त्यानुसार ए. के. शर्मा यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यास कळविले. दुसऱ्या एका घटनेत एकलहरे भागात रेल्वे लाईनवर पोल क्रमांक १८८/१८ येथे एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती गाडी क्रमांक १५०६५ च्या चालकाने स्टेशन प्रशासनाला दिली. नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे उपस्टेशन प्रबंधकांनी या घटनेची माहिती नाशिकरोड पोलिसाना दिली. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नाशिकरोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images