Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गल्लोगल्ली शॉवर डान्स

$
0
0

नाशिक : एकीकडे दुष्काळाची भीषण परिस्थिती असून, दुसरीकडे रंगपंचमीनिमित्त गल्लोगल्ली शॉवर डान्सचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत लावण्यात आलेल्या शॉवर डान्समुळे दुष्काळाचा विसर आयोजकांना पडल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी जुन्या नाशिकमध्ये किमान तीन शॉवर डान्सचे आयोजन केले जाते. मात्र, यंदाची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत लोकप्रतिनिधींनी शॉवर डान्सचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले आहे. यंदा सोमवार पेठ, साक्षी गणेश मंदिर चौक, गाडगे महाराज पुतळा चौक, तिळभांडेश्वर लेनसह भद्रकाली व पंचवटीतील अनेक ठिकाणी शॉवर बसविण्यात आले आहे. अनेक सामाजिक संस्थांनी सोशल मीडियावरून कोरडी रंगपंचमी खेळण्याचे आवाहन केले आहे. टिळा रंगपंचमी खेळून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह पाच तालुक्यांमधील ४४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी राबविण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सरासरी ८२ टक्के मतदान झाले. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले असून विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे सोमवारी (दि. २५) स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील ४४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये इगतपुरीतील सर्वाधिक २७ ग्रामपंचायतींमध्ये मतदान शांततेत पार पडले. त्र्यंबकेश्‍वरमधील १०, नाशिक तालुक्यातील चार, येवल्यातील दोन, मालेगावातील एका ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. पाचही तालुक्यांमध्ये मतदारांचा उत्साह चांगला असल्याचे पहावयास मिळाले. दुपारी साडेतीनपर्यंत ६० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. शेवटच्या दोन तासांत मोठ्या संख्येने मतदारांनी केंद्रांवर गर्दी केली. मतमोजणीला सोमवारी सकाळी सुरुवात होणार असून तीन तासांमध्ये सर्व निकाल हाती येतील असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी

तालुका टक्केवारी

येवला ९१.५९

मालेगाव ८४.०३

नाशिक ८३.७६

इगतपुरी ७६

त्र्यंबकेश्‍वर ७५.२६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार्टर, हेलिकॉप्टर रडारवर

$
0
0

आयकरसह भरारी पथकांची नजर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत चार्टर विमान किंवा हेलिकॉप्टरच्या वापरावर आयकर आणि भरारी पथकांची नजर राहणार आहे. उमेदवार किंवा पक्षाच्या खर्चात त्याचा समावेश करावा लागणार आहे. त्यामुळे व्हीआयपी किंवा सेलिब्रेटींच्या आग्रहासाठी असलेल्या उमेदवारांना त्याचा विचार करावा लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून यापुढील काळात प्रचाराला वेग येणार आहे. त्यामुळेच सभा, रॅली तसेच मेळावे घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय नेते, महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रेटी किंवा अभिनेता, अभिनेत्री यांना पाचारण करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न उमेदवार करतात. यंदाही हा ट्रेण्ड कायम आहे. मात्र, या सेलिब्रेटींच्या आगमनासाठी किंवा परागमनासाठी हेलिकॉप्टर किंवा चार्टर विमानांचा वापर केला जातो. वेळ वाचविण्यासाठी हे हवाई साधन अतिशय महत्त्वाचे ठरते. पण, बहुतांशवेळा हा हवा-हवाई खर्च दाखविला जात नसल्याची ओरड होते. म्हणूनच आता आयकर विभागासह भरारी पथकांची नजर या साऱ्या हालचालींवर राहणार आहे. हेलिकॉप्टर किंवा चार्टर विमान कुठून आले, कुठे जाणार आहे, कुठल्या पक्षाचे नेते त्यात आहेत, कुणाचा प्रचार केला जाणार आहे, प्रचारानंतर कुठे जाणार आहेत? यासंबंधीची खातरजमा निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर केली जाणार आहे. तसेच, संबंधित उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चात हेलिकॉप्टर किंवा चार्टर विमानाच्या भाड्याचा समावेश केला आहे किंवा नाही हे सुद्धा पडताळले जाणार आहे. जर, उमेदवाराच्या खर्चात नसेल तर पक्षाच्या खर्चात तरी त्याचा उल्लेख आहे का, हे पाहिले जाणार आहे. दोन्ही ठिकाणी त्याचा समावेश नसेल तर त्याची गंभीर दखल घेतली जाणार असून संबंधितांना नोटिस बजावून विचारणा केली जाणार आहे.

पथकाचेही नेटवर्क

एखादा सेलिब्रेटी नाशिकला हेलिकॉप्टिर किंवा चार्टर विमानाद्वारे प्रचारासाठी आला तर जेथून हे विमान किंवा हेलिकॉप्टर आले तेथील भरारी पथक किंवा आयकराचे अधिकारी नाशिकच्या पथक आणि आयकर विभागाला तत्काळ सूचित करतील. नाशिकहून एखादा सेलिब्रेटी एखाद्या ठिकाणी गेला तर तत्काळ तेथील भरारी पथकांना क‌ळविले जाणार आहे.

काळ्या पैशाचा शोध

हवाई वाहतूक ही अतिशय महागडी आहे. त्यामुळे त्यासाठी काळ्या पैशाचा वापर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर किंवा चार्टर विमान भाड्याने घेताना किंवा त्याची रक्कम अदा करताना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.

हवाई वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांवर आमची नजर असेल. यासाठी काळ्या पैशाचा वापर झाला आहे किंवा नाही याची खातरजमा केली जाईल. संशयास्पद व्यवहार आढळले तर कसून चौकशी केली जाईल.

- जय राज काजला, प्रधान संचालक, आयकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांचा गाठीभेटीवर भर

$
0
0

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला वेग

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदार संघात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता प्रचाराला वेग येण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच उमेदवारांनी रविवारी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. वैयक्तिक भेटी, बैठका व छोटी रॅली काढत या उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी संसरी येथून प्रचाराला शुभारंभ केला तर माजी खासदार समीर भुजबळ हे चार दिवसांपासून सिन्नर तालुक्यातील विविध भागांत मतदारांच्या भेटी घेत आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे पवन पवारही प्रचाराच्या रिंगणात उतरले असून त्यांनी सुद्धा वैयक्तिक भेटीवर भर दिला आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी ३५ दिवस मिळणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या टप्यात वैयक्तीक भेटी व बैठकांवर सर्वांचा भर दिसत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आपल्या मित्र पक्षांची मनधरणी करण्याचे सुद्धा मोठे काम आहे. त्यात पक्षांतर्गत असणारी गटबाजी सुद्धा थोपवणे महत्त्वाचे असल्याने या उमेदवारांना तूर्त तरी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नाशिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा भुजबळ व गोडसे आमने-सामने असल्याने दोघांनाही एकमेकांचे प्रचाराचे तंत्र अवगत आहे. त्यामुळे दोघांनी त्याचप्रमाणे नियोजन केले आहे. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा उतरलेल्या वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना प्रचारासाठी अधिक श्रम घ्यावे लागणार आहेत. या प्रमुख पक्षांबरोबरच इतर उमेदवारही आपल्या परीने प्रचारात रंगत आणत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. ऑनलाइन वृत्त, येवला

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारात अन्न, पाण्याच्या शोधात असलेल्या एका हरणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मनमाड-नगर महामार्गावर ही घटना घडली. वाहनाच्या धडकेत ठार झालेले हरिण तीन वर्षांचे होते. वाहनाच्या धडकेनंतर रस्त्याच्याकडेला तडफडत असलेले हे हरिण ग्रामस्थांना दिसले. यानंतर गावकऱ्यांनी हरणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अपघातात ठार झालेले हरिण हे मादी जातीचे होते. ही हरिणी गरोदर होती. त्यामुळे अपघातात एक नव्हे तर दोन मुक्या प्राण्यांचा जीव गेल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.

येवला तालुक्यातील अनेक गावं पाणी टंचाईचा सामना करत आहेत. वनक्षेत्रातील हरिण, काळवीट यासारखे वन्यजीव देखील त्याला अपवाद नाहीत. एरवी वनक्षेत्रातील आपल्या नैसर्गिक अधिवासात स्वच्छंदी विहार करणारे हे वन्यजीव आता उन्हाळ्याच्या तडाख्यात सैरभैर झाले आहेत. वनक्षेत्रातील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटल्याने वन्यजीव चारा-पाण्यासाठी आता शेतशिवारातील वाड्यावस्त्यांसह रानोमाळ भटकंती करत आहेत. हरिण व काळविटांचे कळपच्या कळप गेल्या काही दिवसांपासून येवला वनक्षेत्राबाहेरील तालुक्याच्या पूर्व, दक्षिण पट्टयात दिसत आहेत.

नर काळवीटला जीवदान

अपघातात हरणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली असतानाच दुसरीकडे एका विहिरीत नर काळवीट पडल्याची घटना समोर आली. मात्र वनविभागाच्या मदतीने त्याला जीवदान मिळाले. तालुक्यातील चिचोंडी शिवारातील सुभाष गोसावी या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत ४ ते ५ वर्षांचा हा नर काळवीट पडला होता. गोसावी यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या पथकाने पिंजऱ्याद्वारे काळवीटाला विहिरीतून बाहेर काढले आणि नंतर त्याला सोडून दिले.
68564156

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कचराकुंडी’प्रकरणीचौकशीचे आदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या कचराकुंडी खरेदी प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना राज्याचे उपलोकायुक्त डॉ. शैलेश कुमार शर्मा यांनी तसे आदेश दिले आहेत. तक्रारदार निखील पवार यांनी कचराकुंडी खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार लोकायुक्त यांच्याकडे सप्टेबर २०१७ रोजी केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर उपलोकायुक्तांनी कचराकुंडी खरेदीत पालिकेकडून झालेली कारवाई योग्य नसल्याचे ताशेरे ओढले आहेत.

महापालिकेकडून सन २०१६ मध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून शहरासाठी ५०० कचराकुंडी खरेदीची निविदा मागवण्यात आली होती. एका कंपनीकडून या कचराकुंड्या वाजवीपेक्षा जास्त दरास पालिकेने खरेदी केल्याची बाब निदर्शनास आल्याने पवार यांनी याबाबत तत्कालीन महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने संबधित कचराकुंडी पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराशी वाटाघाटी करून दर कमी करून घेतले होते. मात्र कचराकुंडी खरेदीस प्रशासकीय मान्यता व करारनामा झाल्यानंतर करण्यात आलेल्या या वाटाघाटीवरून या खरेदीत सुमारे ९ लाखाचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार पवार यांनी लोकायुक्त यांच्याकडे करीत तसे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. याप्रकरणी लोकायुक्त यांच्याकडे वेळोवेळी झालेल्या सुनावणी दरम्यान पालिका प्रशासनाकडून कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे म्हणणे मांडण्यात आले. आयुक्तांनी देखील तसा अहवाल लोकायुक्त यांच्यापुढे सादर केला होता.

आर्थिक नुकसान वसूल होणार

सुनावणी दरम्यान उपलोकायुक्त यांनी पालिकेने कचराकुंडी खरेदी करतांना निविदाधारकाने लावलेले दर बाजारभावाप्रमाणे तुलना न करता निश्चित केले आहेत. तसेच अवाजवी दराने कुंड्या खरेदी केल्यानंतर तक्रारदराने तक्रार केल्यानंतर वाटाघाटी करून दर निश्चित करताना देखील शहानिशा केलीली नसल्याचा अभिप्राय नोंदवला आहे. पालिकेने केलेली कार्यवाही योग्य नसल्याचा ताशेरा ओढला आहे. आता याप्रकरणी विभागीय चौकशी होणार असून त्यात आर्थिक अनियमितता दिसून आल्यास संबधित अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून पालिकेचे आर्थिक नुकसान वसूल करण्याचा आदेश दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत मज्जाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर, शरीरावर रंग दिसत असतील, तर त्यांना घरी पाठविण्यात येईल, असा अजब निर्णय शहरातील एका शाळेने घेतला आहे. या निर्णयामुळे, विद्यार्थ्यांनी सुटीच्या दिवशी सणांचा आनंद लुटतानाही विचार करायचा का, असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत. हल्लीच्या इंग्रजी शाळा कोणत्या ना कोणत्या कारणांनी सातत्याने चर्चेत असतात. शहरातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा भारतीय संस्कृतीची जपणूक करत असल्याचा गाजावाजा करताना दिसत असल्या तरी या सण, उत्सवांचे वैशिष्ट्यांची जपणूक करण्यापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याच्या विरोधाभासी भूमिकाही घेत आहेत. शहरातील शाळांना रंगपंचमीनिमित्त सोमवारी सुटी होती. या सणाचा आनंद लुटण्यात शालेय विद्यार्थीवर्ग पुढे असतो. मात्र, शहरातील एका शाळेने पालकांना मेसेज करुन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याला, शरीराला रंग लागलेला असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवून देण्यात येईल, अशी तंबीच दिली. या मेसेजमुळे पालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जबाबदारी’ निश्चित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पोलिस आयुक्तांनी जबाबदारी निश्चित करण्याचे धोरण स्विकारले आहे. किमान पाच वर्गवारीत ही जबाबदारी देण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. सध्या ज्या पोलिस ठाण्यांमध्ये मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, त्याच ठिकाणी सध्या हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.

पोलिस आयुक्त ते सहायक पोलिस आयुक्त या पदांवरील अधिकाऱ्यांच्या कामाची वर्गवारी निश्चित असते. पोलिस ठाण्यांमध्ये मात्र सर्व विभागाची कामे वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर अवलंबून असतात. याचा परिणाम गुणवत्तेवर होतो. एकच अधिकारी सर्व ठिकाणी पुरे पडत नाहीत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलिस ठाण्यांची जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. हाती असलेल्या मनुष्यबळाचा योग्य तो वापर व्हावा, असा त्यामागील हेतू असल्याचे पोलिस आयुक्त नांगरे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. नवीन कार्यप्रणालीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अथवा प्रभारी अधिकारी वगळता उर्वरीत पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक अथवा पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना गुन्हे-तपास, कम्युनिटी पोलिसिंग, प्रतिबंधक कारवाई अशा वेगवेगळ्या विभागात विभागले जाईल.

जबाबदीरी दिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याच विभागाशी संबंधित कामांच्या यश अपयशासाठी जबाबदार धरले जाणार आहे. यामुळे पोलिस ठाण्यांमधील कामांचा वेग वाढेल. दुसरीकडे कारणे देण्याचे प्रकार थांबतील. पोलिस ठाण्यांमध्ये प्रलंबित कामांची यादी मोठी असून, ती शून्यावर आणण्याचे लक्ष गाठता येईल, असे नांगरे-पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकींमुळे पोलिस अधिकाऱ्यांच्या अकार्यकारी विभागात बदल्या झाल्या आहेत. काही पोलिस ठाण्यांमध्ये अधिक तर काही पोलिस ठाण्यांमध्ये कामापुरतेच मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या पोलिस ठाण्यांमध्ये पुरेसे अधिकारी उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीनंतर उपलब्ध होणाऱ्या अधिकाऱ्यांना या निर्णयानुसारच कामाची जबाबदारी देण्यात येणार आहे. ही योजना कार्यन्वित झाल्यास प्रत्येक पोलिस ठाणे हे स्मार्ट होऊ शकते, असा दावा पोलिसांकडून करण्यात येतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेवेची मिळेना शाश्वती; प्राध्यापकांपुढे पेच

$
0
0

इंजिनीअरिंग शाखेत वाढत्या अडचणी

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यामध्ये इंजिनीअरिंग कॉलेजांमधून विद्यार्थीसंख्येच्या घटत्या आलेखाचे थेट परिणाम या संस्थांच्या अर्थकारणावरही होत असल्याचे चित्र समोर आले आहे. परिणामी, या कॉलेजांमध्ये चार-चार महिन्यांपासून रखडणारे पगार आणि सेवेची व निश्चित वेतनाची शाश्वती नसल्याशी सहमत असणारे उमेदवाराचे हमीपत्र, अशा वातावरणात नवोदित प्राध्यापकांना करिअरची स्वप्ने बघावी लागत आहेत.

बहुतांश इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्राध्यापकांचे वेतन महिनोमहिने रखडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, प्राध्यापकांचे गृहकर्ज-विम्याचे नियमित हप्ते, पाल्यांचा शैक्षणिक खर्च आदी बाबींचे चक्रच बिघडले आहे. नव्याने सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी विद्यापीठाकडून नव्या शैक्षणिक वर्षासाठी मान्यता घेणाऱ्या प्राध्यापकांकडून चक्क हमीपत्र लिहून घ्यायची शक्कलही काही संस्थांनी लढवली आहे. ढासळत्या विद्यार्थीसंख्येच्या मुद्द्याबाबत आपणास कल्पना असून, संस्था देईल तेच वेतन आपण घेऊ, नियमानुसार वेतन मिळाले नाही तरीही आपली कुठलीही तक्रार नसेल किंवा भविष्यात फरकाची मागणीही करणार नाही', अशा आशयाचा मजकूर शंभर रुपयांच्या बॉण्डवर काही संस्था लिहून घेत आहेत.

इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये रखडणारे पगार असोत वा लिहून घेतले जाणारे हमीपत्र, या मुद्द्यांसंदर्भात राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजांची अंतर्गत परिस्थिती प्रातिनिधीक स्वरूपात जाणून घेण्यासाठी शहरातील प्रतिष्ठीत के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजच्या व्यवस्थापनासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न 'मटा' ने केला असता या प्रश्नांवर कुठलाही प्रतिसाद मिळू शकला नाही.

...

वादाचे प्रसंग टाळण्यासाठी हमीपत्राचा उपाय

उच्च शिक्षणातील करिअरसाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेले पर्याय आणि दुसरीकडे इंजिनीअरिंग संस्थांचे काही वर्षांमध्ये फुटलेले पेव यामुळे या विद्याशाखेत उपलब्ध जागा आणि विद्यार्थी यांचे प्रमाण व्यस्त राहते आहे. राज्यात दरवर्षी सुमारे ४० हजारांवर इंजिनीअरिंगच्या जागाही रिक्त राहत असल्याने या संस्थांना कॉलेजांचा मोठा डोलाराही चालवावा लागतो. परिणामी प्राध्यापकांना सेवेची शाश्वती न देता भविष्यातील आंदोलने, कोर्ट केसेस सारखे वादाचे प्रसंग टाळण्यासाठी अगोदरच हमीपत्रासारखे उपाय केले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूल न भरणारे सात खडी क्रशर सील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गौण खनिजांचे अधिक उत्खनन करूनही कमी उत्खनन दाखविणाऱ्या तसेच दगडाची ४०० रुपयांप्रमाणे रॉयल्टी न भरणाऱ्या गौण खनिज वाहतुकदारांवर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. आवाहन करूनही महसूल न भरणाऱ्या वाहतुकदारांचे सात खडी क्रशर सील करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

दगड, माती, मुरूम, वाळू यांसारख्या गौण खनिजांचे विहीत मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन केल्याचा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आला आहे. मायनिंग अॅपद्वारे करण्यात आलेल्या तपासणीत हा गैरप्रकार पुढे आला. अवैध उत्खनन झाल्याचे काही वाहतुकदारांनी मान्यही केले. मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन करण्यात आलेल्या गौण खनिजांचा महसूल प्रशासनाकडे जमा करावा, असे आवाहन बैठक बोलावून त्यामध्ये वाहतुकदारांना करण्यात आले होते. या माध्यमातून नऊ कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो, असा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला होता. परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत ९३ लाख ५३ हजार रुपयांचाच महसूल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्या खडी क्रशर व्यावसायिकांवर जिल्हा प्रशासनाने कारवाई सुरू केली असून, सात खडी क्रशर सील केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

बहुतांश क्रशर चालकांनी २०० रुपये याप्रमाणे रॉयल्टी भरून खडी उचलली. परंतु सरकारने जानेवारीत एक निर्णय दिला असून, त्यात ४०० रूपयांप्रमाणे रॉयल्टी घेण्यास सांगण्यात आले. प्रशासनाने जिल्ह्यातील ७० खडीक्रशर चालकांकडून २०१५ पासूनची फरकाची रक्कम वसुल करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम नऊ कोटी ४० रूपये इतकी जमा होणे अपेक्षित असून, यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाचा असह्य तडाखा

$
0
0

कमाल तापमान ३८ अंशांवर; किमान तापमानातही वाढ

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मार्चअखेरीस नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून, उष्णतेचा पारा ३८ अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. कमालसोबतच किमान तापमानातही दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मार्च महिन्यातच मे महिन्याप्रमाणे उष्णतेच्या झळा बसू लागल्या आहेत. सन २००२ मध्ये मार्च महिन्यात ४३.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. त्यामुळे सध्या ३८ अंशांवर असलेले तापमान मार्चअखेरीस किंवा एप्रिलच्या प्रारंभी नाशिकचा हा रेकॉर्ड ब्रेक करण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे हवामान विभागाने सांगितले.

नाशिकमध्ये उष्णतेच्या त्रासाने नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. मार्चच्या मध्यापासून नाशिकचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. तसेच मार्चच्या मध्यावर १३.६ अंश सेल्सिअस असलेले किमान तापमान आता १७.८ अंश सेल्सिअसवर येऊन पोहचले आहे. मंगळवारी (२६ मार्च) ३८ अंश सेल्सिअस कमाल, तर १७.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली.

हवामानातील बदल लक्षात घेता नाशिकमध्ये ३१ मार्चपर्यंत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवारी (२५ मार्च) ३९.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीस २००२ मधल्या तापमानाचा रेकॉर्ड ब्रेक होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

--

\Bतापमानातील बदल\B

\Bदिनांक........................... किमान................. कमाल

\B२१ मार्च.......................... १५.६ ................... ३५.०

२२ मार्च.......................... १५.६ ................... ३५.१

२३ मार्च.......................... १६.४ ................... ३६.९

२४ मार्च.......................... १७.२ ................... ३७.६

२५ मार्च.......................... १७.८ ................... ३९.१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टरोडच्या दुसऱ्या बाजूकामाला प्रारंभ

$
0
0

त्र्यंबक नाका ते मेहर सिग्नल एकेरी वाहतूक

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट रोडच्या त्र्यंबक नाका ते सीबीएस सिग्नल या रस्त्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्र्यंबक नाका ते मेहर सिग्नल हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी सुरू झाला असून, मेहर सिग्नल ते अशोक स्तंभ हा रस्ता लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ हा जवळपास सव्वा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गत वर्षी जूनमध्ये स्मार्ट रोडच्या कामास वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुरुवात झाली. पहिला टप्पा त्र्यंबकनाका ते सीबीएस, सीबीएस ते मेहर सिग्नल आणि मेहर सिग्नल ते अशोक स्तंभ असा होता. मात्र, या रस्त्यावरील प्रचंड वाहतूक कामासाठी डोकेदुखी ठरली. रस्त्याच्या एकाच लेनमधून दुहेरी वाहतूक सुरू असल्याचा फटका या कामास बसला. यामुळे कामास दिरंगाई होत गेली. ऑक्टोबर २०१८ मध्ये शहर वाहतूक शाखेने एकेरी वाहतुकीचा पर्याय समोर आणला. या निर्णयास काहीअंशी विरोधही झाला. एकेरी वाहतुकीमुळे चांगला परिणाम झाला. वाहतूक कोंडीची समस्या कमी होत गेली. याच दरम्यान मेहर सिग्नल ते सीबीएस सिग्नल हा टप्पा पूर्ण झाला. त्यामुळे प्रशासनाने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करून याच्याविरुद्ध बाजूचा म्हणजे जिल्हा कोर्टालगत असलेल्या रस्त्याचे काम हाती घेतले. आता सीबीएस ते त्र्यंबकनाका हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या रस्त्यावर विरुद्ध बाजूने म्हणजे त्र्यंबकनाका येथून वाहने सीबीएसकडे जातील. या मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू राहणार नाही. प्रशासनाने लागलीच त्र्यंबक नाका ते सीबीएस या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. थोड्याच दिवसात मेहर सिग्नल ते अशोक स्तंभ हा टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार असून, त्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम सुरू करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा खटल्यांवर आता अॅपचा ‘वॉच’

$
0
0

प्रलंबित खटल्यांची संख्या २७५८ वर; खातेप्रमुखांना अॅपद्वारे दिली जाणार माहिती

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रलंबित खटले आणि दाव्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याने महापालिकेच्या विधी विभागाने आता या खटले आणि दाव्यांवर अॅपद्वारे वॉच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या अॅपमध्ये पालिकेतील सर्वच्या सर्व २७५८ खटल्यांची माहिती अपलोड केली जाणार आहे. या अॅपवर खटल्याचा निकाल विरोधात गेल्यास त्याची कारणमिमांसा, कारणांची पडताळणीही संबंधित वकिलांना द्यावी लागणार आहे. या संदर्भात विधी विभागाला तत्काळ सर्व माहिती संकलित करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिल्या असून, त्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेच्या वतीने विविध प्रकारचे दावे आणि खटले हे विविध प्रकारच्या न्यायालयात चालवले जातात. बहुतांश दावे २५ ते ३० वर्षांपूर्वीचे असून, त्यांच्या बाबतीत तारीख पे तारीख सुरू आहे. काही दावे महापालिका कधी हारते आणि कोणत्या कारणाने हरते याचीही माहिती विभागांना नसते. संबंधित खातेप्रमुखांनी दावे हरल्यानंतर त्याची माहिती मिळते. सध्या न्यायालयात त्या दाव्यांची स्थिती काय याबाबत संबंधित विभागांना देखील माहिती नसते. संबंधित वकिलांकडून सुद्धा त्याची माहिती दिली जात नाही. त्यामुळे महापालिकेचे खटले हरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे आता पालिका या सर्वच खटल्यांवर ऑनलाइन वॉच ठेवणार आहे. सर्व खटल्यांची माहिती संकलित करून प्रत्येक दाव्याची सद्यस्थिती अॅपद्वारे प्रत्येक विभाग प्रमुखांना दिली जाणार आहे. त्यासाठीचे काम सुरू करण्यास विधी विभागाला आदेशित करण्यात आले आहे.

..

या विभागांचही दावे प्रलंबित

वित्त व लेखा विभागाचे ३, फाळके स्मारक २, झोपडपट्टी विभाग ८, नगरसचिव विभाग ५, आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन ४, भुयारी गटार योजना ८, पर्यावरण विभाग २, विद्युत व यांत्रिकी विभाग ६, फेरीवाला विभाग ४ असे विभागनिहाय दावे प्रलंबित आहेत.

....

२७५८ खटले प्रलंबित

नगररचना विभाग : १२७३

विविध कर : ३५४

अतिक्रमण : ३२४

सामान्य प्रशासन : १८१

मिळकत व परवाने : १६५

आरोग्य व वैद्यकीय : १२८

पाणीपुरवठा : ६५

बांधकाम विभाग : ९५

जकात व एलबीटी : ४३

शिक्षण विभाग : ४०

निवडणूक शाखा : ३३

उद्यान व वृक्ष प्राधिकरण : १५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसेसोबत मेळावे

$
0
0

\Bराष्ट्रवादी काँग्रेसचे

मनसेसोबत मेळावे

\B

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांना मदत करण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर नाशिकमध्ये मनसेचे नेते राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी सक्रिय झाले आहेत.

नाशिकमधील मनसैनिकांनी नाशिक व दिंडोरी या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्रित प्रचार करतांना दिसणार आहे. सोबतच येत्या शनिवारपासून (दि. ३०) मनसे आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्रित प्रचारासाठी संयुक्त मेळावेही घेणार आहेत. त्यासाठीच्या भेटीगाठी छगन भुजबळ यांनीही सुरू केल्या असून त्यांनी मनसेच्या नेत्यांच्या घरोघरी जाऊन मनोमिलन सुरू केले आहे.

नाशिकमध्ये असलेली मनसेची मोठी ताकद आपल्याकडे वळविण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले आहेत. सोबतच राज ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा घेण्याची तयारीही 'राष्ट्रवादी'कडून केली जात असून छगन भुजबळ आणि ठाकरे यांची अनंत कान्हेरे मैदानावर जंगी सभा घेण्याचे नियोजन केले जात आहे. माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना जिल्ह्यातील स्थितीची माहिती दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोळक्याकडून बापलेकास मारहाण

$
0
0

टोळक्याकडून

बापलेकास मारहाण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरासमोर दुचाकीवर बसून मद्यपान करणाऱ्याना विरोध केल्याने टोळक्याने बापलेकास मारहाण केल्याची घटना सुकेनकर लेन भागात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हरजींदर कौर त्रिलोचनसिग राजपूत (रा. सुकेनकर लेन, पंचवटी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी दुपारी ही घटना घडली. हर्षद सोनवणे व त्याचे तीन साथीदार सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राजपूत यांच्या इमारती समोरील रोडवर दुचाकीवर बसून मद्यपान करीत होते. यावेळी संशयित आरडाओरड करीत असल्याने राजपूत यांचा मुलगा मनींदरसिंग त्यांना समजावून सांगण्यास गेला. मात्र संशयितांनी शिवीगाळ करीत त्यास मारहाण केली. यावेळी मनींदरसिंगचे वडील त्याच्या मदतीस धावून गेले असता संशयितांनी त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली. यात त्यांच्या डोळ्यास मार लागला. घटनेचा अधिक तपास हवालदार झाडे करीत आहेत.

वीज कर्मचाऱ्यास ग्राहकाची शिवीगाळ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घराचे आणि व्यावसायिक ठिकाणाचे वीज खंडीत केल्याने संतप्त झालेल्या ग्राहकाने वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करीत धमकी दिली. देवळाली गावात ही घटना घडली असून, या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात संशयिताविरूद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

गुडू संतोष शेलार (रा. मांडे लॉन्स जवळ, दे.गाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी संदिप तानाजी चव्हाण (रा. जत्रा हॉटेलजवळ) यांनी तक्रार दिली. वीज कर्मचारी संदिप चव्हाण सोमवारी (दि.२५) सायंकाळी शेलार यांच्या निवासस्थानी वीज खंडीत करण्यासाठी गेले असता ही घटना घडली. संशयित थकबाकीदार ग्राहक असल्याने चव्हाण यांनी शेलार यांच्या निवास आणि व्यावसायीक ठिकाणाचा वीज पुरवठा खंडीत केला. यावेळी संतप्त झालेल्या संशयिताने चव्हाण यांना शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर देवळाली गावातील उपविभागीय कार्यालयात जावून त्याने चव्हाण बसलेल्या खुर्चीस लाथ मारून, 'तू येथे कसा राहतो', असे म्हणत मारहाणीचा प्रयत्न केला. घटनेचा अधिक तपास हवालदार कुंदे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची आज होणार सरमिसळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

​​​​निवडणुकीपूर्वी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशिन्स यांचे दोन वेळा रॅन्डमायझेशन अनिवार्य असून, पहिले रॅन्डमायझेशन बुधवारी (दि. २७ मार्च) रोजी सकाळी नऊ वाजता अंबड एमआयडीसीतील केंद्रीय वखार महामंडळ येथे करण्यात येणार आहे. यावेळी सर्व राष्ट्रीय व राज्य स्तरावरील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

मतदान प्रक्रियेत मतदान यंत्रे अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत. मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक बॅलट युनिट्स, कंट्रोल युनिट्स व व्हीव्हीपॅट यंत्राला युनिक नंबर देण्यात आला आहे. त्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या ईएमएस (EVM Management System) या ऑनलाइन प्रणालीमध्ये डाटाएन्ट्री देखील करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविताना ईएमएस प्रणालीमध्ये बॅलट युनिट्स, कंट्रोल युनिट्स व व्हीव्हीपॅट यंत्रांचे दोनवेळा रॅन्डमायझेशन करणे अनिवार्य आहे.

​​पहिल्या रॅन्डमायझेशनमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय बॅलट युनिट्स, कंट्रोल युनिट्स व व्हीव्हीपॅट यंत्रे नेमून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तर ​​दुसऱ्या रॅन्डमायझेशनमध्ये विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रनिहाय बॅलट युनिट्स, कंट्रोल युनिट्स व व्हीव्हीपॅट यंत्रे नेमून देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा कार्यान्वित होत असल्याने आगामी दहा दिवसांसाठी राज्यातील आधार सुविधा केंद्र बंद ठेवण्याच्या सूचना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाने दिल्या आहेत. परिणामी, आधार अपग्रेडेशनच्या भरवश्यावर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यातच भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क-परीक्षा शुल्क योजना आणि इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी अपग्रेड आधारसह विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. मुदतीच्या दिनांकानुसार कागदोपत्री विद्यार्थ्यांच्या हाती आठ दिवस दिसत असले तरीही आधार केंद्र १ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या हातची मुदत आताच संपली आहे. ही मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत.

शासनाच्या सर्वच योजनांसाठी आधारकार्डचा अद्ययावत तपशील गरजेचा आहे. मात्र, आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा यापुढील कालावधीत वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे आगामी ७ ते १० दिवस आधार केंद्र बंद राहणार आहेत. १ मार्चनंतर ही सुविधा पुन्हा सुरू होईल. मात्र त्या अगोदर २८ फेब्रुवारीपर्यंत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. ज्यांचे आधार अपडेट नाही त्यांना मात्र या योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हा कालावधी शासनाने वाढवून द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

...

अन्य लाभार्थ्यांचीही परवड

शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक नागरिक, खासगी क्षेत्रातील कामगार, नोकरदार आदींना याचा फटका बसणार आहे. यासंदर्भातील सूचना ऐनवेळी मिळाल्याने नागरिकांच्या हाती दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे. सद्यस्थितीत शहरात १६ शासनाधिकृत, तर जिल्ह्यात १०० केंद्र सुरू आहे. या सर्व ठिकाणचे काम आगामी आठ ते दहा दिवस ठप्प होणार असल्याने नागरिकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक शाखेने वाढवला गोंधळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या प्रलंबित स्थायी समितीच्या सदस्य नियुक्तीसाठी विशेष महासभा बोलावण्याची परवानगी मागणाऱ्या महापालिका प्रशासनाला जिल्हा निवडणूक शाखेच्या आचारसंहिता कक्षाने थेट मार्गदर्शन न करता आचारसंहितेत काय करावे आणि करू नये, असे गोलमोल उत्तर दिल्याने महापालिका प्रशासन गोंधळात पडले आहे.

जिल्हा निवडणूक शाखेच्या आचारसंहिता कक्षाने दिलेल्या संदिग्ध उत्तरामुळे आचारसंहिता काळात स्थायी सदस्यपदाची नियुक्ती करावी की नाही, याचे कोडे उलगडण्यासाठी नगरसचिवांना थेट जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. यासंदर्भातील निर्णयाकडे शिवसेनादेखील डोळे लावून बसली आहे.

महापालिकेत भाजप नगरसेवकाच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेचा फायदा घेत शिवसेनेने स्थायी समितीतील आपले संख्याबळ एकने वाढविण्यासाठी जोर लावला आहे. त्यासाठी थेट विभागीय आयुक्तांसह उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने विभागीय आयुक्तांकडे, तर विभागीय आयुक्तांनी महासभेचा अधिकार असल्याचा निकाल दिल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. सदस्य नियुक्तीचा निर्णय आता महासभेवर निर्णय घ्यायचा असल्याने गेल्या मंगळवारी नगरसचिव विभागाने जिल्हा निवडणूक शाखेतील आचारसंहिता कक्षाशी पत्रव्यवहार करीत विशेष महासभा बोलावण्यासाठी परवानगी मागितली होती. त्याबाबत जिल्हा निवडणूक विभागाने महापालिकेला मार्गदर्शन पाठविले आहे. मात्र, त्यामुळे या प्रकरणातील संभ्रम दूर होण्याऐवजी त्यात भरच पडल्याचे दिसून येत आहे.

--

नक्की करायचे तरी काय?

लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता काळात स्थायी सदस्य नियुक्तीसाठी विशेष महासभा घ्यावी की नाही, याबाबत जिल्हा निवडणूक शाखेच्या आचारसंहिता कक्षाने दिलेल्या पत्रात थेट मार्गदर्शन न करता 'आचारसंहितेबाबत भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशित केलेल्या सूचनांमधील प्रश्न क्रमांक २७ मधील उत्तरानुसार आवश्यक कार्यवाही करावी,' असे नमूद केले आहे. यासोबत 'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी,' अशा शब्दांत महापालिकेचे कान टोचल्याने नक्की करायचे काय, असा प्रश्न महापालिकेच्या नगरसचिव विभागाला पडला आहे. त्यामुळे याबाबत आता पुन्हा निवडणूक आयोगाशी संपर्क साधला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग्य उपचाराने होतो एपिलेप्सीचा धोका कमी

$
0
0

योग्य उपचाराने आजारावर मात करणे शक्य

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

झटके, फिट्स, अपस्मार अथवा आकडी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळख असलेला एपिलेप्सी हा मेंदूशी निगडीत आजार फक्त गैरसमजुतीमुळे बळावतो. हा आजार योग्य त्या औषधोपचारामुळे कमी करता येतो. मात्र, बऱ्याचदा भोळसट समजुतींमुळे अशा पेशंटला वेळीच उपचार मिळू शकत नसल्याची खंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त होते. जगभरात एपिलेप्सी आजाराचे रुग्ण आढळून येतात. या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी २६ मार्च रोजी पर्पल डे किंवा अपस्मार जागृती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

..

आजाराची कारणे

अपस्मार होण्याची कारणे वेगवेगळी आहेत. मेंदूतील ट्यूमर, डोक्याला झालेली इजा, जंतुसंसर्ग, स्ट्रोक म्हणजेच पक्षाघात, जनुकीय आजार यांचा समावेश आहे. परंतु, ७० टक्क्यांपर्यंत एपिलेप्सी रुग्णांच्या बाबतीत कोणतेही कारण सापडत नाही.

..

अपस्माराची लक्षणे

सामान्यत: मिर्गी आल्यानंतर रुग्ण बेशुध्द होऊन हातपाय घट्ट होतात. तोंडातून फेस येतो. दातखिळी बसते. काही सौम्य फिटमध्ये रुग्ण दाद न देणे, अचानक दचकणे, वारंवार पडणे ही लक्षणे दिसतात. याचे कारण म्हणजे त्या व्यक्तीच्या मेंदूतील विद्युत लहरींमध्ये अचानक वाढ होते.

...

तपासण्या व ट्रीटमेंट

फिट येणाऱ्या रुग्णांमध्ये एमआरआय, ईईजी या तपासण्या केल्या जातात. सत्तर टक्के रुग्णांमध्ये एक किंवा दोन गोळ्यांनी हा आजार बरा होतो. ज्या रुग्णांमध्ये हा आजार गोळ्यांनी नियंत्रित होत नाही, विशिष्ट अद्ययावत एपिलेप्सी शस्त्रक्रिया करून आजार बरा होतो.

...

काय करावे व करू नये?

- दादखिळी बसल्यास तोंडात चमचा, बोटे घालू नयेत.

- कांदा, चप्पल नाकाला सुंगवू नये.

- कपडे सैल करावेत व पूर्ण शुध्दीवर येईपर्यंत एका कुशीवर झोपवावे. तोंडाने काहीही देऊ नये

..

फिट येणे हा एक सामान्य आजार असून, त्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. योग्य निदान व उपचार यामुळे फिटचे रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतात.

- डॉ. सुमंत बियाणी, मेंदूविकार तज्ज्ञ

..

या रुग्णांना इतरांप्रमाणे आयुष्य जगता येते. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, लग्न, गरोदर होणे व अंगावर दूध पाजता येणे हे सर्व डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे घेतलेल्या औषधाने सहज शक्य आहे.

- डॉ. आनंद दिवाण, मेंदूविकार तज्ज्ञ

..

कोणत्याही आजाराबाबत गैरसमज असणे हेच रुग्णांसाठी धोकादायक ठरते. त्यात आजार मेंदूशी संबंधित असेल तर व्यापक अडचणी निर्माण होतात. या आजारावर योग्य ते उपचार मिळाल्यास रुग्ण बरे होतात.

- डॉ. प्रणव शिंदे, मेंदूविकार तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगवेगळ्या घटनांत तिघांचा अपघाती मृत्यू

$
0
0

नाशिक : वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा अपघाती मृत्यू झाला. नाशिक-पुणे मार्गावर अपघातग्रस्त मिळून आलेल्या गुजरातमधील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसात नोंद करण्यात आली आहे. चंद्रकांत प्रकाश कुलथे (वय १९, रा. सुरत, गुजरात) असे मृत युवकाचे नाव आहे.

दुसऱ्या घटनेत भरधाव रिक्षाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना औरंगाबाद मार्गावरील मांजरगाव परिसरात घडली. या प्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गजानन रामराव साळुंखे (वय ४०, रा. कुबेर रो हाऊस, अशोकनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तिसऱ्या घटनेत भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. विलास अंबादास जाधव (वय ५४, रा. कुंभारी, ता. कोपरगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

..

श्रमिकनगरला आत्महत्या

नाशिक : श्रमिकनगर भागात राहणाऱ्या शिवाजी शंकर ठाकरे (वय ५५, रा. प्रीतीश अपा. एकविरा चौक, श्रमिकनगर) यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ठाकरे यांनी मंगळवारी (दि.२६) दुपारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images