Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पान ४ फास्ट

$
0
0

'महावितरण'तर्फे

शहीदांना अभिवादन

नाशिकरोड : स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयात नुकतेच अभिवादन करण्यात आले. मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी शहिदांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने, जनसंपर्क अधिकारी विजयसिंह दुधभाते, राजेंद्र ओहोळ, अनिल चौधरी, मनोज वानखेडे, संतोष म्हस्के यांच्यासह परिमंडळ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील यांनी केले.

रंगपंचमी साजरी

नाशिकरोड : जेलरोडच्या आशिष मोंटेसरी स्कूल व अभिनव बालविकास मंदिर व विद्यालयात रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. संस्थेचे संस्थापक दत्तात्रय धात्रक, मुख्याध्यापिका जयश्री सरोदे, बालवाडी विभागप्रमुख विजया कोल्हे, शुभांगी खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती. बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना नैसर्गिक रंग लावून रंगपंचमी साजरी केली. यावेळी नैसर्गिक रंगांचा वापरण्याचा व पाण्याचा गैरवापर टाळण्याचा संकल्प दिला. शुभांगी खैरनार यांनी रंगपंचमीचा गाणी सादर केली.

अध्यक्षपदी गोतिले

देवळाली कॅम्प : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, लहवितच्या अध्यक्षपदी सागर गोतिले यांची निवड झाली. सचिन जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मिरवणूक अध्यक्ष शिवा गायकवाड, उपाध्यक्ष मनोज आहिरे, कार्याध्यक्ष किरण गवारे, प्रमोद जाधव, सचिन गायकवाड, सचिन राव, आकाश गायकवाड, संपत लोहकरे व संजय शिंदे यांनी निवड करण्यात आली. बैठकीस अविनाश गायकवाड, अंबादास गवारे, विनोद जगताप, अशोक भवार, राहुल भालेराव, विक्रम मोरे, अनिल गायकवाड, सोना मोरे, बाजीराव आहिरे, निकोलस खाडीया आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकसभा रिंगणातून दशरथ पाटलांची माघार

$
0
0

विधानसभा निवडणूक लढविण्याचे सूतोवाच

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेची उमेदवारी जाहीर होण्याच्या तीन दिवसांपूर्वी माजी महापौर दशरथ पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका २४ मार्चला जाहीर करण्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांना पत्र पाठवून ही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण, विधानसभा निवडणुकीत १०० टक्के शहरातील कोणत्याही मतदारसंघातून निश्चित लढवेल, असे आश्वासन त्यांच्या समर्थकांना दिले आहे.

पाटील यांनी आपल्या संपर्क कार्यालयात शुक्रवारी (दि. २२) दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. पण, सायंकाळी शिवसेनेची उमेदवारी घोषित झाली. त्यामुळे त्यांच्या या भूमिका बदलण्याचे हे कारण आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ लागला आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी रविवारी (दि. २४) मी भूमिका जाहीर करू असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी सर्व माध्यमांना पत्र पाठवून लोकसभेऐवजी विधानसभा लढवणार असल्याचे सांगितले. नाशिककरांची ताकद राजकारणापलीकडे आहे. ती माझ्या पाठीशी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. या पत्रात त्यांनी शहरात महापौर असतांना केलेल्या कामांचा उल्लेख करीत मिस्ड कॉल व प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार मानले आहे.

पाटील शिवसेनेच्या संपर्कात?

पाटील हे शिवसेच्या मुंबईतील नेत्यांच्या संपर्कात होते. गोडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही, असे सर्व सांगत होते. पण, त्यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे पाटील यांच्या संपर्काचा फारसा फायदा झाला नाही. अशी चर्चा त्यांचे विरोधक करत आहे. पण, पाटील यांनी संपर्कात होतो, असे अगोदर सांगितले असले तरी त्यांनी कोणत्या नेत्यांची नावे मात्र घेतली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवार बदलाने कार्यकर्ते संभ्रमात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दोन्ही प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांची अदलाबदली केल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. प्रचार नेमका काणाचा व कसा करायचा, असा प्रश्नही त्यांना सतावत आहे. गेल्या निवडणुकीत ज्या पक्षांच्या उमेदवारांच्या विरोध मते मागितली त्यांच्यासाठी आता मतांचा जोगवा जनतेपुढे कसा मागायचा, या प्रश्नाने कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत. तसेच लोकसभेत आपलेच नेते उमेदवार असतील, असे समजून आतापर्यंत प्रचार करणाऱ्यांना दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार बदलल्याने मतदारांपुढे जाणे अवघड वाटू लागले आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना सलग तिसऱ्यांना उमेदवारी पुन्हा मिळेल, असा भाजप कार्यकर्त्यांना विश्वास होता. त्यांनी खासदारांनी केलेल्या मतदारसंघातील कामाचे दाखले देऊन त्यांच्या मितभाषी स्वभावाचे कौतुक करत होते. पण, भाजपने दिंडोरीतून राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांना ऐनवेळी उमेदवारी दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला आहे. गेल्या निवडणुकीत डॉ. पवार या 'राष्ट्रवादी'च्या उमेदवार होत्या. त्यांना फारसा अनुभव नाही, मतदारसंघाचा अभ्यास नाही, असे सांगून अनुभवी उमेदवार म्हणून खासदार चव्हाण यांचे नाव पुढे केले जात होते. तसेच डॉ. पवार यांनी गेल्या निवडणुकीनंतर पाच वर्षे भाजपविरुद्ध विविध आंदोलनात सहभाग घेऊन मतदारसंघात रान उठवले. त्यामुळे त्यांना भाजपसाठी मतदान द्या, असे कसे सांगायचा असा प्रश्न आहे.

भाजपप्रमाणेच 'राष्ट्रवादी'चीही कोंडी झाली आहे. यंदा पक्षाकडून डॉ. भारती पवार यांनाच पुन्हा संधी दिली जाईल, असे समजून कार्यकर्ते कामाला लागले. पण, महिन्याभरापूर्वी 'राष्ट्रवादी'ने शिवसेनेतून आलेले माजी आमदार धनराज महाले यांना उमेवादारी देऊन डॉ. पवार यांचा पत्ता कट केला. त्यामुळे 'राष्ट्रवादी'लाही महाले यांचा प्रचार करणे अवघड झाले आहे. त्यांनी सुद्धा डॉ. पवार यांना प्रत्येक आंदोलनात साथ दिली. तसेच दुसरीकडे डॉ. पवार यांच्या विरोधात कसे बोलायचे, असाही प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यांना अनुभव नाही किंवा त्यांना काम करता येणार नाही, असे बोलणे सुद्धा अंगाशी येणारे आहे.

लोगो : दिंडोरी लोकसभा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व्हिस वोटर्सला इटीपीबीएस मतपत्रिका

$
0
0

उत्तर महाराष्ट्रात २७ हजार मतदार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकारी नोकरीत असलेल्या राज्यातील १ लाख ८ हजार तर उत्तर महाराष्ट्रातील २७ हजार मतदारांना अत्याधुनिक अशी इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम (इटीपीबीएस) उपलब्ध करून दिली जाणार आहे. लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलिस दलातील जवान (सर्व्हिस वोटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी भारत निवडणूक आयोगाने ईटीपीबीएस उपलब्ध करून दिली आहे.

निवडणूक आयोगाने सी-डॅकच्या साहाय्याने 'इटीपीबीएस' यंत्रणा विकसित केली आहे. २०१६ मध्ये पुद्दुचेरी विधानसभेच्या नेल्लीथोप मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा 'इटीपीबीएस'चा वापर करण्यात आला. या यंत्रणेच्या माध्यमातून मतपत्रिका ऑनलाइनरित्या सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचवल्या जातात. लष्करी दले अथवा अन्य सर्व्हिस वोटर्स असलेल्या सेवांमधील नोडल अधिकारी सर्व्हिस वोटर्सचे 'इटीपीबीएस'साठीचे अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे (डीईओ) पाठवितात. 'डीईओं'नी जिल्ह्यातील सर्व्हिस वोटर्सची यादी संबंधित मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे (इआरओ) पाठविल्यानंतर 'इआरओ' या अर्जावर निर्णय घेतात. मतदानाच्या साधारणतः १० दिवसापूर्वी सर्व्हिस वोटर्सना इटीपीबी यंत्रणेद्वारे ऑनलाइन पद्धतीने मतपत्रिका पाठविल्या जातात. मतपत्रिकांचा पारंपरिक पद्धतीने पोस्टाद्वारे होणारा मतदारांपर्यंतचा एका बाजूचा प्रवास वाचण्यासह निवडणूक प्रशासनावरील बराचसा ताण कमी होतो. या मतपत्रिका डाउनलोड आणि प्रिंट काढून मतपत्रिकेवर आपले मत नोंदविल्यानंतर विहित पद्धतीने पोस्टाने पाठविणे आवश्यक असते. पोस्टल मते पाठविण्यासाठी कोणतेही टपाल तिकीट लावण्याची गरज नसते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

असे आहेत मतदार

▪- सेवेनिमित्त आपल्या मतदारसंघाच्या बाहेर असलेले लष्करी, निमलष्करी दलातील जवान

- ▪केंद्रीय सशस्त्र पोलिस बलांमधील जवान

- ▪निवडणूक कालावधीत राज्याबाहेर कर्तव्यावर असलेले राज्य सरकारच्या सशस्त्र पोलिस बलांमधील जवान

▪- जवानांबरोबर निवास करत असलेल्या त्यांच्या पत्नी

- ▪परदेशात शासकीय सेवा बजावत असलेले भारतीय शासकीय सेवेतील अधिकारी-कर्मचारी (ओव्हरसीज वोटर्स)

'इटीपीबीएस'ची वैशिष्ट्ये

- 'इटीपीबीएस' यंत्रणेला द्विस्तरीय सुरक्षितता लाभलेली आहे

▪- इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट डाउनलोड करण्यासाठी ओटीपी आणि पिन नंबर आवश्यक

▪- युनिक क्यूआर कोडमुळे पोस्टल मतपत्रिकेची सुरक्षितता राखली जाण्यासह नक्कल (डुप्लिकेशन) होऊ शकणार नाही

असे आहेत सर्व्हिस वोटर्स

मतदारसंघ.............संख्या

अहमदनगर - ६६८३

जळगाव - ५६४०

दिंडोरी- ३८५१

धुळे - ३०५७

नाशिक - २६३८

शिर्डी -२४८७

रावेर-१८१२

नंदुरबार - ९०२

एकूण - २७०७०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रचारी’ शिक्षकांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारकडून वेतन घेणारे शिक्षक हे सरकारी कर्मचारीच असून ते राजकीय उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होत असतील तर त्यांच्यावर निलंबानासारख्या कठोर कारवाईसाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज असल्याचे निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांनी रविवारी स्पष्ट केले. प्रचारकामात शिक्षकांना जुंपू नये अशा आशयाचे पत्र सर्व शैक्षणिक संस्थाना देण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात शिक्षकांचा वापर थांबविण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी होणार का हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात बहुतांश शैक्षणिक संस्था या राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींच्या मालकीच्या आहेत. अनेकांनी सत्तेमध्ये आल्यावर स्वत:च्या शैक्षणिक संस्था उघडल्या तर काहींनी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सत्तेत महत्वाची पदे प्राप्त केली आहेत. शैक्षणिक संस्थांचे कारभारी असलेले अनेक राजकीय पदाधिकारी विविध निवडणुकांमध्ये उमेदवारी करतात. अशा संस्थांमधील शिक्षकांचा संस्था चालकांकडून सर्रास स्वत:च्या प्रचारासाठी वापर करून घेतला जातो. नोकरीत अडथळे नकोत यासाठी नाईलाजास्तव अशा संस्थांमधील शिक्षकांना संबंधित कारभाऱ्यांपुढे मान तुकवावी लागते. ते सांगतील ते करावे लागते. परंतु, राजकीय उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करा असे आदेश निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. उमेदवारांच्या प्रचारयात्रांचे व्हिडीओ शूटिंग केले जावे. त्यामध्ये शिक्षक सहभागी असेल तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी असे या आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यातही अनेक शैक्षणिक संस्थांचे कारभारी राजकारणातही सक्रीय आहेत. त्यामुळे या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने कंबर कसली आहे. निवडणुकीशी संबंधित कामात संस्था व राजकारणाशी संबंधित व्यक्तींनी शिक्षकांचा वापर करू नये. शिक्षकांनी देखील अशा कामात सहभागी होऊ नये अशा आशयाचे पत्र सर्व शैक्षणिक संस्थांना देण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेतील सूत्रांनी दिली. याखेरीज उमेदवारांच्या प्रचारात शिक्षक सक्रीय आहेत का, यावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवली आहे. सरकारकडून वेतन घेणारे खासगी व सरकारी शाळांमधील शिक्षक हे सरकारी कर्मचारीच असून, ते निवडणूक प्रचारात सहभागी झाले तर त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’ला मुदतवाढ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागास घटकांतील बालकांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागा प्रवेशासाठीची मुदत वाढविण्यात आली असून, ३० मार्चपर्यंत पालकांना अर्ज नोंदणी करता येणार आहे. ५ मार्चपासून सुरू झालेल्या नोंदणीस जिल्ह्यातून १३ हजार १२१ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अर्ज नोंदणीत नाशिक चौथ्या क्रमांकावर असून, उर्वरित पालकांना अर्ज नोंदणी करता यावी, म्हणून राज्य सरकारच्या निर्णयानुसार ही मुदतवाढ केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

शिक्षणहक्क प्रक्रियेअंतर्गत (आरटीई) जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७३५ जागांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. २२ मार्चपर्यंत अर्ज नोंदणीची मुदत असल्याचे प्रथमत: जाहीर करण्यात आले होते. मात्र, सरकारच्या सूचनेनुसार ३० मार्चपर्यंत अर्ज नोंदणी सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आरटीईच्या अर्ज नोंदणीत काही ठिकाणी पालकांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींमुळे अनेक पालकांकडून अर्ज नोंदणी करणे राहून गेले आहे. शाळांच्या मॅप लोकेशनला देखील वेबसाइटवर अडचण येत असल्याने, अर्जात शाळेचे नाव नोंदवणे पालकांना शक्य होत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे सरकारने ही मुदतवाढ केली आहे.

नाशिकमधून १३ हजार १२१ अर्ज

रविवारपर्यंत (दि. २४ मार्च) आरटीईच्या वेबसाइटद्वारे १३ हजार ८३ तर, अॅपद्वारे ४१ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातून ९ हजार १९४ शाळांतील १ लाख १६ हजार ७७२ जागांसाठी २ लाख २० हजार ८१८ अर्ज प्राप्त झाले आहेत. पुण्यातील १६ हजार ५९४ जागांसाठी ४९ हजार ५८७, नागपूरच्या ७ हजार २०४ जागांसाठी २४ हजार ५७७, ठाण्यातील १३ हजार ४०० जागांसाठी १४ हजार ६४०, तर, नाशिकच्या ५ हजार ७३५ जागांसाठी १३ हजार १२१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या खालोखाल औरंगाबाद व मुंबईच्या जागांसाठी अर्ज नोंदणी झाली आहे.

आरटीईच्या प्रवेशाचा टक्का अधिकच आहे. राज्यस्तरावरुनच आरटीई अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ करण्याच्या सूचना आल्या आहेत. रोज शेकडो अर्ज नोंदवले जात असल्याने, आरटीई प्रवेशाचा टक्का नक्कीच वधारणार आहे.

- डॉ. वैशाली झनकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनवर मलजल शुद्धिकरण प्रकल्प

$
0
0

शुभवार्ता

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

जैविक कचरा प्रकल्प (बायोडायजेस्टर) उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर आता नाशिकरोड रेल्वेस्टेशन स्वतःचा मलनिस्सारण प्रकल्प (एसटीपी) उभारणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.

नाशिकरोड रेल्वेस्टेशनचा समावेश ए-वन क्लासमध्ये (इको स्मार्ट) केलेला असल्यामुळे या स्टेशनला राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशांनुसार स्वतःचा मलनिस्सारण प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) कार्यालयामागील सिमेंट काँक्रिटच्या मैदानात या प्रकल्पासाठी जागा निश्चित केल्याची माहिती रेल्वेच्या भुसावळ कार्यालयातील सूत्रांनी दिली. या मैदानात पूर्वी दुचाकींचे पार्किंग होते. ते आता सुभाष रोडला स्थलांतरित करण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनमध्ये निर्माण झालेला सर्व मल एसटीपी प्रकल्पात सोडून त्यावर प्रक्रिया केली जाईल. नाशिकरोड रेल्वेस्टेशन स्वच्छतेबाबत देशात पहिल्या दहा क्रमांकांत होते. आता त्याचा क्रमांक शंभराच्या पुढे गेल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

नाल्यावर फुली

मैदानाशेजारीच सुभाषरोडहून आलेला नाला आहे. सध्या थेट नाल्यात घाण सोडली जाते. त्यामुळे येथून जाताना प्रवाशांना नाक मुठीत धरावे लागते. आता एसटीपी प्लान्टचा प्रवाह नाल्यात न सोडता महापालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पाला वाहिनी जोडून त्यात सोडला जाणार आहे. सध्या महापालिकेच्या पाणी पुरवठ्यातून स्टेशनवर पिण्याच्या व वापराच्या पाण्याची सोय केलेली आहे. स्टेशनमध्ये सुलभ शौचालय, सार्वजनिक स्वच्छतागृह, शौचालय आहे. यातील मलजल एसटीपी प्रकल्पात सोडले जाईल. त्यावर प्रक्रिया करण्यात येईल.

कचरा प्रक्रिया प्रकल्पही

हरित लवादाच्या निर्देशांनुसार रेल्वे स्टेशनच्या आवारातच कचऱ्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. जैविक कचऱ्यात प्रामुख्याने उष्टे जेवण, खरकटे, सडका भाजीपाला आदींचा समावेश होतो. रेल्वे स्टेशनमध्ये कँटिन सुविधा आहे. तसेच वडापाव व अन्य खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. परिसरात हॉटेल्स आहेत. त्यांच्याद्वारे दररोज मोठ्या प्रमाणावर जैविक कचरा निर्माण होतो. त्यावर प्रक्रियेसाठी वीजेवरील बायोडायजेस्टर बसवले जाणार आहे. या यंत्रणेत आठ तासांत खतनिर्मिती केली जाणार आहे. ही यंत्रणा इलेक्ट्रॉनिक कम्पोस्ट सिस्टिमवर आधारित आहे. सध्या जमा झालेला कचरा स्टेशनवर एका ठिकाणी गोळा केला जातो. तो महापालिकेच्या घंटागाडीत दिला जातो. बायोडायजेस्टर स्वच्छ केल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रक्रियेसाठी हे यंत्र पुन्हा तयार होते. बायोडायजेस्टरचा खर्च साडेतीन लाख रुपये आहे. रेल्वेकडे निधीची टंचाई असल्याने समाजसेवी संस्था, नागरिक, खासगी कंपन्या यांचीही यासाठी मदत घेतली जाणार आहे. बायोडायजेस्टरप्रमाणेच एसटीपी प्लान्टसाठी निधीची व्यवस्था कशी करावी, यावर प्रशासन विचारमंथन करीत आहे. रेल्वे स्टेशनवर सरकते जिने, लिफ्ट, मिनरल वॉटर मशिन, तिकीट व्हेडिंग मशिन, शंभरावर सीसीटीव्ही, एलईडी बल्ब अशा आधुनिक सुविधा असल्याने हे स्टेशन इको स्मार्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज रंगांची उधळण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पेशवेकालिन रहाडीत धप्पा घेऊन रंग खेळण्याची जुन्या नाशिकची परंपरा आहे. आज, सोमवारी (दि. २५) साजऱ्या होत असलेल्या रंगपंचमीनिमित्त जुन्या नाशकातील रहाडी खोदण्यात आल्या असून, त्यात उडी घेत रंगांची उधळण करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत.

नाशिकमध्ये फाल्गुन कृष्ण पंचमी अर्थात रंगपंचमीला रंगांचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. त्याचे खास वैशिष्ट्य असते ते म्हणजे, रहाडीत खेळण्यात येणारी रंगपंचमी. पेशवेकाळापासून असलेल्या जुन्या नाशिकमधील रहाडी रंगपंचमीनिमित्ताने खोदल्या जातात. यंदा काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजाकडील शनी चौकातील रहाड, तिवंधा चौकातील बुधा हलवाई दुकानाजवळील रहाड आणि जुन्या तांबट लेनमधील रहाड उघडण्यात आली आहे. दिल्ली दरवाजा येथील रहाड यंदा उघडण्यात आलेली नाही. त्यामुळे तरुणांचा जल्लोष तांबट लेन, तिवंधा चौक आणि शनी चौकात अधिक असणार आहे. रहाडी उघडल्यानंतर त्यांची नव्याने रंगरंगोटी करण्यात आली आहे. सोमवारी रहाडीची विधीवत पूजा झाल्यानंतर रहाडीला नैवेद्य दाखविण्यात येईल. त्यानंतर रहाडीत धप्पा मारण्यास म्हणजेच उड्या घेत रंगपंचमीची मजा लुटण्यास प्रारंभ होणार आहे. रहाडीचा रंग तयार करण्याची लगबग कार्यकर्त्यांमध्ये रविवारी सायंकाळपासून दिसून आली. सोमवारी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत शहरात रंगपंचमीचा जल्लोष असणार आहे. रहाडीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, रहाडीच्या तीन बाजूंनी बॅरकेडिंग करण्यात आले आहे.

\Bवेगळे रंग ही रहाडींची खासियत\B

शनी चौकातील रहाड १२ बाय १२ फूट आकाराची असून, तिचा रंग गुलाबी आहे. तिवंध्यातील रहाड १२ बाय १० फूट आकाराची, उंची १२ फूट खोल असून, या रहाडीचा रंग पिवळा आहे. जुन्या तांबट लेनमधील रहाड १५ फूट खोल असून, या रहाडीचा आकार १० बाय १३ इतका आहे. या रहाडीचा रंग केशरी किंवा लाल असतो. त्यामुळे नाशिकच्या कोणत्या रहाडीत धप्पा घेतला हे लागलीच लक्षात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हायकोर्टात आव्हान देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षक व प्राध्यापकांनी निवडणूक प्रचारात सहभाग घेतला तर त्यांना निलंबित केले जाईल, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले असले तरी या आदेशाबाबत अशासकीय महाविद्यालयातील व खासगी शाळांतील शिक्षक व प्राध्यापक, शिक्षक संघटना, प्राध्यापक संघटनांमध्ये तीव्र नाराजी आहे. या निर्णयाला स्फुक्टो संघटना उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. नंदू पवार यांनी रविवारी दिली.

निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई असे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याने शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. आयोगाचा हा निर्णय लोकशाहीने दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांमधून उमटू लागल्या आहेत. शिक्षकांना निवडणूक लढण्याचा व प्रचार करण्याचाही अधिकार कायद्याने व लोकशाहीने दिला आहे. परंतु, आयोगाचे हे आदेश या हक्कांची गळचेपी असल्याची भावना शिक्षकांमधून व्यक्त होऊ लागली आहे. चुकीचे नियम दाखवून शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोग करीत असल्याचा आरोप डॉ. पवार यांनी केला आहे. शिक्षक आणि प्राध्यापकांना या अधिकारापासून वंचित ठेवण्याचे काम निवडणूक आयोगाने करू नये. निवडणूक आयुक्तांनी काढलेले हे आदेश लोकशाहीचा अपमान करणारे आहेत. फावल्या वेळेत व सुटीच्या दिवशी काय काम करावे व काय करू नये हे शिक्षक व प्राध्यापकांनी ठरवावे. स्फुक्टो संघटनेच्या माध्यमातून लवकरच उच्च न्यायालयात आव्हान देणात येणार आहे, असे संघटनेचे नेते प्रा. डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदरसूलची कन्या जळगावच्या रिंगणात

$
0
0

स्मिता वाघ यांना भाजपकडून उमेदवारी

म. टा. वृत्तसेवा, येवला

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जळगावमधून विधान परिषद आमदार स्मिता उदय वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. स्मिता वाघ यांचे माहेर येवला तालुक्यातील अंदरसूल येथील आहे. जहागीरदार कुटुंबात जन्मलेल्या सिमता वाघ यांच्या लढतीकडे अंदरसुलच नव्हे तर तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.

सिमता वाघ या अंदरसूलचे २८ वर्षे ग्रामपंचायत सदस्य राहिलेल्या व येवला पंचायत समितीचे सभापतीपद भूषविलेल्या स्व. रावसाहेब रंगराव जहागीरदार यांची कन्या. येवला तालुक्‍यात 'आबा' नावाने प्रसिद्ध असलेले रावसाहेब जहागीरदार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते. स्मिता यांना दोन भाऊ आहेत. अंदरसूल येथे प्राथमिक शिक्षणानंतर त्या जळगाव येथील आत्यांकडे गेल्या. या काळात त्या आत्यांचे पती बंडू नाना चव्हाण यांच्या घराजवळील शाखेत जात असत. पुढे महाविद्यालयीन जीवनात स्मिता यांनी भारतीय विद्यार्थी परिषदेमध्येही काम केले. स्मिता यांचा जळगाव येथील उदय वाघ यांच्याशी विवाह झाला. स्मिता यांचे सासरे भिकानराव वाघ हे देखील राजकारणात सक्रिय होते.

गेली १५ वर्षे जळगाव जिल्हा परिषदेत भाजप सदस्य राहिलेल्या स्मिता वाघ यांनी अडीच वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले आहे. त्यांना पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी देखील संधी मिळाली होती. त्या सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. स्मिता वाघ यांच्या उमेदवारीची घोषणा होताच जहागीरदार कुटुंबियांसह अंदरसूल ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावची लेक आता संसदेत पोहोचावी, असे आस ग्रामस्थांना लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७ हजार उमेदवारांनी दिली ‘एमपीएससी’ परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ५५५ जागांसाठी रविवारी संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी घेण्यात आली. जिल्ह्यातून १७ हजार १०७ उमेदवार परीक्षेसाठी हजर होते. उमेदवारांनी पूर्व परीक्षेचा पेपर सोपा असल्याचे सांगत, गुणवत्ता यादी आणि मुख्य परीक्षेची आता आतुरता असल्याचे मत उमेदवारांनी मांडले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक कक्ष अधिकारी गट - ब (अराजपत्रित) २४ पदे, वित्तविभागातील राज्यकर निरीक्षक (एसटीआय) ३५ पदे आणि गृह विभागातील पोलिस उपनिरीक्षक ४९६ पदे, अशा एकूण ५५५ जागांसाठी रविवारी (२४ मार्च) रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील ५६ केंद्रावर सकाळी ११ ते १२ या वेळेत ही परीक्षा झाली. जिल्ह्यातून एकूण २१ हजार ५१ उमेदवारांनी अर्ज नोंदणी केली होती. पण, परीक्षेस ३ हजार ९४४ उमेदवारांनी दांडी मारली. परीक्षेसाठी सर्व केंद्रांवर मिळून जिल्हा प्रशासनातर्फे १ हजार ३२० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. परीक्षा कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू नये त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक विभागातून महिला, तरुणांना संधी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक विभागातील आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये पाच महिला उमेदवार आहेत. यात असून भाजपने चार तर वंचित बहुजन विकास आघाडीने जळगावमधून महिला उमेदवाराला संधी दिली आहे. याच निवडणुकीत भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीने तरुण उमेदवारही देण्याकडे प्राधान्य दाखविले आहे. यात डॉ. सुजय पाटील, संग्राम जगताप व कुणाल पाटील तसेच विद्यमान खासदार रक्षा खडसे व हिना गावित यांचा समावेश आहे. इतर बहुतांश उमेदवार वयवर्षे पन्नाशीच्या खालीच आहेत.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक, दिंडोरी, धुळे, अहमदनगर, शिर्डी, जळगाव, रावेर, नंदुरबार हे आठ लोकसभा मतदार संघ आहे. या निवडणुकीत सर्वाधिक तरुण व महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. अहमदनगर मतदारसंघात भाजपतर्फे डॉ. सुजय विखे-पाटील व राष्ट्रवादीतर्फे आमदार संग्राम जगताप या दोन तरुणांमध्ये काट्याची टक्कर आहे. धुळ्यातून काँग्रेसने आमदार कुणाल पाटील यांना संधी दिली. गेल्या निवडणुकीत खासदार झालेल्या रावेरच्या खासदार रक्षा खडसे व नंदुरबारच्या हिना गावित या देखील तरुण उमेदवार आहेत. जळगाव मतदारसंघातून स्मिता वाघ, नंदुरबार हिना गावित, दिंडोरीत डॉ. भारती पवार यांच्या नावाचा समावेश आहे. तर वंचित बहुजन विकास आघाडीने जळगाव मतदारसंघातून अंजली बाविस्कर यांना रिंगणात उतरवले आहे. विशेष म्हणजे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने मात्र महिला उमेदवारांना संधी दिलेली नाही. एकूणच या आठही लोकसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांनी तगडे उमेदवार असावे, यासाठी भर दिलेला आहे. त्यामुळे येथील निवडणुका अटीतटीच्या होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचा बंदोबस्त

$
0
0

नाशिक : रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी ठाण्यानिहाय बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे. टवाळखोरांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले असून, शांतता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे. शहरात पंचवटी, सरकारवाडा पोलिस स्टेशन हद्दीतील गावठाण भागात रंगपंचमी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. शहराच्या इतर भागातही हा उत्सव जल्लोषात साजरा होतो. मात्र, यात अनेकदा विनयभंगासारखे प्रकार घडतात. भरधाव वेगात ट्रिपल सीट दुचाकीस्वारांमुळे अपघात घडतात. हाणामारीच्या घटनासुद्धा होतात. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी पोलिस ठाणे निहाय बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे. महिला व तरुणींची छेड काढण्याचे प्रकार झाल्यास याची गंभीर दखल घेतली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चव्हाणांच्या भूमिकेकडे समर्थकांचे लागले लक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

ऐनवेळी उमेदवारी नाकरली गेल्याने भाजपचे तीन वेळा खासदार झालेले हरिश्चंद्र चव्हाण यांची नाराजी अद्यापही कायम आहे. आपल्या समर्थक, कार्यकर्त्यांचा मेळावा ते घेणार आहेत. मात्र, ५० वर्षांपासून सार्वजनिक व राजकीय कार्यात सोबत असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांना घडलेल्या घटनाक्रमाबद्दल व उमेदवारी का कापली गेली याचे काय उत्तर द्यावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

हा प्रश्न झाला चव्हाण यांचा; मात्र पक्षात आयात नेत्यांना अचानक देण्यात आलेली उमेदवारी दोन्ही पक्षांच्या काही कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अतिशय गंभीर ठरत आहे. पक्षनिष्ठा यांसह नीतीमूल्यांना राजकारणात स्थान नाही का, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. पक्षांतर्गत गटबाजी या आयात उमेदवारांना डोकेदुखी देणारी ठरू शकते. कमी कालावधीत साडेनऊ तालुक्याला पिंजून काढणे अवघड तर ठरेलच; शिवाय अंतर्गत कलह सोडवित कार्यकर्त्यांना पक्षकार्यात जुंपविणे दोन्ही उमेदवारांना जिकरीचे ठरणार आहे.

आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. त्यासाठी सोमवारी (दि. २५) प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून मेळावाची तारीख व ठिकाण कळविले जाईल. माझी उमेदवारी का नाकारली, नवख्या-आयात उमेदवाराला संधी का दिली, या प्रश्नाचे उत्तर पालकमंत्री गिरीश महाजन यांना द्यावे लागणार आहे. आपण पक्ष सोडणार नसून, अपक्ष आमदार झालो होतो म्हणून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार नाही.

- हरिश्चंद्र चव्हाण, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएआयच्या अध्यक्षपदी सूर्यवंशी

$
0
0

\Bअध्यक्षपदी सूर्यवंशी\B

नाशिक : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी राहुल सूर्यवंशी तर, सचिवपदी भाऊसाहेब सांगळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विलास बिरारी तसेच वरिष्ठ सदस्य मोहन कटारिया, भूपेंद्र लाल, राजेंद्र मुथा, रामेश्वर मालाणी, मदन जगोटा, गोपाल अटल व इतर सभासद उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून वरिष्ठ सदस्य आर. एम. भंडारी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संशयिताची रवानगी सेंट्रल जेलमध्ये

$
0
0

नाशिक : विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी अटक केलेल्या प्रशिक्षण अधिकाऱ्यास कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. कोर्टाच्या आदेशानंतर संशयित मच्छिंद्र एम. करपे याची लागलीच नाशिक सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली. भोसला मिलिटरी स्कुल येथे प्रशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असताना करपेने हा उद्योग केला होता. या प्रकाराची वाच्यता होताच संस्थेने करपेला निलंबीत केले. करपे याने इतर मुलींना त्रास दिल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तक्रारदार पुढे आल्यास साक्षीदार म्हणून संबंधितांचे नाव घेतले जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेहऱ्यावर हास्य, मनी खदखद

$
0
0

चव्हाण-पवार निफाडमध्ये आमनेसामने; कार्यकर्त्यांच्या आग्रहाखात फोटोशेसन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आलेले भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि त्यांचा पत्ता कट करून दोन दिवसांपूर्वी भाजपवासी झालेल्या आणि दिंडोरीतून उमेदवारीही मिळविणाऱ्या भारती पवार रविवारी निफाड येथे आमनेसामने आले आणि राजकीय चर्चेला फोडणी मिळाली. चव्हाण आणि पवार यांनी एकमेकांसामोर आल्यावर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी फोटोशेसनही केले.

सध्या लोकसभेचे वारू जोरात वाहत आहेत. भाजपने भारती पवार यांना पक्षात घेत उमेदवारीही बहान केल्याने खासदार चव्हाण तसे नाराज झालेले आहेत. अशा परिस्थितीत हे दोघेही एकत्र आल्याने तालुक्यात दिवसभर विविध प्रकारची चर्चा सुरू होती. सोशल मीडियावरून हे फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

निफाड येथे भाजपचे चिटणीस शंकर वाघ यांच्या पत्नी कै मंगला वाघ यांच्या वर्षश्राद्धानिमित्त भाजपच्या उमेदवार भारती पवार आल्या. त्यांच्या पाठोपाठ विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाणही आले. वाघ यांच्या घरात भेट घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी दोघांचेही स्वागत करीत फोटो काढण्यासाठी आग्रह धरला. आपली उमेदवारी हातातून गेल्याने नाराज असलेल्या चव्हाण यांच्यापुढे पेच पडला असला तरी चेहऱ्यावरील ताण दूर करीत फोटोसेशसाठी मूक संमती दिली. उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यासाठी हा एकत्रित फोटो म्हणजे संधीच होती. पवार यांनी आनंदी चेहऱ्याने सहभागी होत उपस्थितांना फोटो काढू दिले. फोटोत दोन्ही नेत हसताना दिसत असले तरी चव्हाण यांचे हसणे उसणे होते, तर उमेदवार भारती पवार यांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता.

अवघ्यात १५ मिनिटांच्या भेटीत मात्र दोघेही एकमेकांशी बोलले नाहीत. या भेटीप्रसंगी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, भाजपचे युवा नेते वैकुंठ पाटील होते.

...म्हणून भाजपात प्रवेश

उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने चार महिलांना उमेदवारी दिली. या पक्षात महिलांना मानाचे स्थान आहे, हे यावरून लक्षात येते. पंतप्रधान मोदींच्या कार्याने भारावून गेली. आपणही यात सहभागी व्हावे, या उद्देशाने भाजपात प्रवेश केल्याचे भाजपच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी सांगितले. लासलगाव येथे आयोजित महिला कार्यकर्ती मेळाव्यात त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारली तरीही याबाबत आणि राष्ट्रवादी पक्ष, नेते याबाबत त्यांनी काहीही भाष्य किंवा टीका केली नाही. अतिशय संयमी शब्दात त्यांनी महिलांशी संवाद साधला.

यावेळी भाजप महिला प्रदेश अध्यक्षा अॅड. माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस आरती पुगावकर, प्रदेश चिटणिस संध्या कुलकर्णी, जिल्हा अध्यक्ष मंदा पारख, रोहिणी नायडू, बांधकाम सभापती मनीषा पवार, पं. स. सदस्य रंजना पाटील, सुवर्णा जगताप, महिला शहर अध्यक्ष नीता पाटील, आमदार डॉ राहुल आहेर हे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्सक्लेम’ प्रदर्शनातून ग्रीन साहित्याचा संदेश

$
0
0

\B'एक्सक्लेम' प्रदर्शनातून

ग्रीन साहित्याचा संदेश

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यावर्धन ट्रस्ट यांचे इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हारमेन्ट अॅण्ड आर्किटेक्चर (आयडीया) कॉलेज आयोजित 'एक्सक्लेम २०१९' या प्रदर्शनातून ग्रीन साहित्य वापरण्याचा संदेश देण्यात आला. ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गाला मोठी हानी पोहचत असून, बांधकाम व्यवसायात ग्रीन साहित्याचा वापर करण्याची गरज असल्याचे प्रबोधन विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातून केले.

'एक्सक्लेम २०१९' प्रदर्शनाचा रविवारी (२४ मार्च) समारोप झाला. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. समारोपाप्रसंगी उद्योजक सतीश पारख आणि वनाधिपती विनायकदादा पाटील यांची विशेष उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाकृती व नवीन संकल्पनांना अतिथींकडून विशेष दाद मिळाली. पर्यावरणपूरक सामग्रीचा वापर बांधकाम व्यवसायात वाढल्यास जागतीक तापमान कमी करता येईल, असा आशावाद विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातून जागवला.

प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या 'चक्र' या प्रकल्पास राष्ट्रीय पारितोषिक जाहीर झाले आहे. जगातील वाढते प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग, हे मानवी जीवनासाठी घातक ठरत आहे. हे चक्र भेदण्याची शक्ती मानवाकडे असून, त्यासाठी समतोल राखण्याची गरज असल्याचे 'चक्र' प्रकल्पातून मांडण्यात आले. या तीन दिवसीय प्रदर्शनास नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे आणि संकल्पनांचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा जाहीरनामा : प्रशांत भरवीरकर

$
0
0

मटा जाहीरनामा : प्रशांत भरवीरकर

---

चौकट : मटा जाहीरनामा वाचकांच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. साहजिकच राष्ट्रीय पातळीवरील मुद्दे, सरकारची त्याबद्दलची धोरणे, त्याचा विविध घटकांवर होणारा परिणाम आदींची चर्चा या व्यासपीठावरून होणार आहे. त्यामध्ये संबंधित क्षेत्रामध्ये अनेक वर्षे काम करणारे कार्यकर्ते, तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या चर्चेची नाशिकच्या भावी खासदारांना त्यांच्या कामाची दिशा ठरविण्यासाठी मदत होईल, अशी आशा वाटते.

---

कॅप्शन : महागाईचा प्रश्न अतिशय संवेदनशील झाला आहे, यासह विविध समस्या शहरातील महिला वर्गाने 'मटा जाहीरनामा'च्या व्यासपीठावर केल्या. यावेळी डावीकडून शिक्षिका निर्मला अष्टपुत्रे, प्रा. गितांजली पाटील, प्रतिभा पाटील, अॅड. वर्षा देशमुख, शिक्षिका ज्योती कदम आणि उद्योजिका वासंती ठाकूर

---

बातमी

हेडिंग : महिला संरक्षणास प्राधान्य द्यावे

सब हेड : महिला वर्गाची सरकारकडून अपेक्षा

लीड : महिलांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांना राजकारणात आरक्षण देण्यात आले आहे. मात्र त्याजागी झेरॉक्स उमेदवार काम करीत असून, महिलांना स्वतंत्र निर्णय घेऊ द्यावेत, असा सूर 'मटा राऊंड टेबल'मध्ये निघाला. महिलांच्या संरक्षणासाठी सरकारने अधिक लक्ष द्यावे, असे मत महिला वर्गाने व्यक्त केले.

---

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'मटा जाहीरनामा' उपक्रमांतर्गत राऊंड टेबलमध्ये विद्यमान सरकारने महिलांच्या हिताचा न केलेला विचार आणि त्यांचे एकुणच विचारात न घेतलेले मत यांचा उहापोह करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी काही पर्यायदेखील सुचवले. महिला सक्षम आहे, परंतु त्यांच्या शक्तीचा योग्य उपयोगच झालेला नसल्याचे मत मांडताना महिलांचा अधिक अंत पाहिल्यास रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचीही चर्चा रंगली.

देशात महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न आता उपस्थित होत असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकार काय करते, याकडे राजकीय पक्षांनी गांभिर्याने पाहीले पाहीजे. महिलांच्या सुरक्षिततेबद्दल विचार करताना देशातील महागाईचा विचारही करणे क्रमप्राप्त असल्याची चर्चा यावेळी रंगली. शालेय शिक्षणव्यवस्था त्यात होणारी मुलींची कुचंबना आणि त्यांच्या समस्यांवर वेळीच न मिळालेला तोडगा याकडे लक्ष वेधताना महिला वर्गाने सध्या शालेय मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न प्रचंड ऐरणीवर आला असल्याचे सांगितले. वर्गांमध्ये मुलींनी आपला डिफेन्स कसा करावा हे शिकवण्याची आज गरज असल्याचे मत मांडतानाच देशात सामाजिक सलोखा शून्य असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

---

चौकट : विशाखा समिती शोभेपुरतीच

शालेय स्तरापासून अगदी महाविद्यालयापर्यंत असणारी विशाखा समिती ही केवळ शोभेपुरतीच असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. या समितीकडून मुलींसाठी कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. त्यांच्या कोणत्याच अडचणी सोडवल्या जात नाहीत. त्यामुळे आपल्या समस्या घेऊन जायचे कुठे असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. शाळांमध्ये तर पुरूष शिक्षकांचीच संख्या अधिक असल्याने मुली आपल्या अनेक अडचणी सांगतच नाही. त्यामुळे

हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर घेऊन लोकप्रतिनिधींनी काम करायला हवे अशी चर्चा महिला वर्गामध्ये झाली.

---

चौकट : आमचा जाहीरनामा

ग्रामीण भागात शेतकरी महिलांसाठी असावे समुपदेशन केंद्र

सुशिक्षित महिलांनी पुढाकार घेऊन सुरू करावे केंद्र; सरकारने द्यावा पाठिंबा

स्मार्ट सिटी आहेच, परंतु सरकारने सौर सिटी कल्पना राबबावी

मुलांचे नेतृत्त्वगुण वाढीस लागतील असे अभ्यासक्रम निर्माण करावे

शिक्षकांच्या राजकारणातल्या सहभागाला द्यावे प्रोत्साहन

मराठी माध्यमात समुपदेशन नाही; त्याची व्यवस्था करावी

महागाईचा प्रश्न खुपच गहन आहे, ती कमी करावी

ज्येष्ठ महिलांसाठी बँकेत स्वतंत्र विभाग असावा

महिलांना सुरक्षितता हवी; सरकारने प्राधान्याने हे काम करावे

ग्रामीण भागातील महिलांना पुढे आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे

सरकारने महिलांसाठी शैक्षणिक धोरण आखावे

महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, त्यासाठी सरकारचे स्वतंत्र योगा केंद्र असावे

शालेय स्तरावर मुलींसाठी डिफेन्स विषय असायला हवा

उद्योजिका बनण्यासाठी महिलांना प्रोत्साहन मिळावे; सरकार त्यासाठी वेगळा प्रयत्न करत नाही

सेंद्रिय भाज्यां मार्केट, भाव नाही; यासाठी सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा

सरकारचा मीडियावर कंट्रोल असावा

शिक्षणव्यवस्थेबद्दल पुनर्विचार करण्याची गरज

---

प्रतिक्रिया :

गावोगावी शेतकरी समाजासाठी समुपदेशन केंद्र स्थापन करावे. शेतकरी कुटुंबातील स्त्री आपले दु:ख कुठे व्यक्त करू शकत नाही. पुरूषही शक्यतो जास्त संवेदशील असतो त्यामुळे आत्महत्येसारखे प्रकार घडतात. त्यामुळे समुपदेशन केंद्राची गरज आहे. ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न खूप सतावणारा आहे, गावे टँकरमुक्त करताना खरोखर ती झालीय का हे पाहणेदेखील सरकारचे काम आहे. ज्या गावांमध्ये पाच हजार लोकसंख्या आहे तेथे वाचनालय सुरू करावे. सौर खेडी, कॉलनी निर्माण करावी.

-प्रतिभा पाटील, गृहिणी

आपला देश दिवसेंदिवस अधोगतीकडे चालला आहे. भारतामध्ये आता खऱ्या क्रांतीची गरज आहे. परंतु खंत एकच वाटते की क्रांती आपल्या पुढील पिढीला करावी लागणार आहे. त्यांच्यासाठी काहीही सुरक्षित राहिलेले नाही. संरक्षण शून्य पातळीवर आहे. सरकारी यंत्रणा ढेपाळलेली आहे. देशाला अतिशय मारक गोष्टी राजरोसपणे सुरू आहेत. सर्वांगिण विकास आहे कुठे त्यामुळे लोकशाही धोक्यात येत चालली आहे. स्वच्छ भारत अभियानाचा मागमूस तरी दिसतोय का? नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य माणूस नाक मुठीत धरून चालतो, कोर्टाचीही अवस्था तिच आहे, या प्रश्नांकडे लक्ष कधी जाणार आहे?

-वर्षा देशमुख, वकील

एक स्त्री व शिक्षिका म्हणून असे वाटते की, सर्व क्षेत्रात समानता यावी. सामान्य घरातून देखील राजकारणात प्रवेश व्हावेत. तसेच प्रशासकीय सेवेत अधिकाधिक महिलांनी जावे. क्षमतेनुसार विविध संधी मिळणारच यात शंका नाही. महिला सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची आज गरज आहे. शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थी दशेतच नेतृत्त्वगुण-स्वसंरक्षण या विषयी अभ्यासक्रमात समावेश असावा. विशाखा समितीच्या कार्याबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. शाळांमध्येा समुपदेशनाच्या सुविधा असणे गरजेचे आहे.

-निर्मला अष्टपुत्रे, शिक्षिका

शिक्षण व राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शिक्षण हे आदर्श मूल्यांसाठी असते, सगळीकडे समानता असावी असा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे शिक्षण घेतलेल्यांकडून आणि एकुणच सर्वांकडून स्त्रीयांना आदराची वागणूक मिळावी, आत्मसन्मान मिळावा असा वाटते. महाविद्यालयीन स्तरावर अभ्यासक्रम करताना आता थोडा वेगळा विचार करण्याची गरज आहे. अर्बन इको सिस्टिमवर काम व्हायला हवे आणि वेस्ट मॅनेजमेंट करणाऱ्याला इन्सेंटिव्ह मिळावा. शिक्षण व्यवस्थेचा पुर्नविचार होणे ही गरज असून या क्षेत्रात विविध प्रयोग करण्याची संधी देण्यात यावी.

-गीतांजली पाटील, प्राध्यापिका

ज्याला जेथे हवे तेथे शिक्षण मिळावे यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी आजही शहर गाठावे लागते. असे का व्हावे, याचा विचार करण्याची गरज आहे. शालेय स्तरावर जे अहवाल सादर केले जातात त्याचे पुढे काय होते हा वादाचा विषय आहे. त्याबाबत सखशेल चिंतन कधी होते का? याचे उत्तर नकारार्थी येते.

-ज्योती कदम, शिक्षिका

मी एक उद्योजिका आहे, मला असे वाटते की सरकारचे उद्योगाकडे सर्वात कमी लक्ष आहे. कोणत्याही प्रकारचा उद्योग सध्याच्या परिस्थितीत लवकर यश मिळवू शकत नाही. मनासारखी प्रगती करू शकत नाही. आज सराफी व्यवसायात तीन टक्के जीएसटी आहे, तो दोन टक्क्यावर येणे गरजेचे आहे, माझ्यासारखी महिला उद्योजक या अशा गोष्टीमुळे उद्योगात पाऊल टाकायला कचरत आहे, त्यामुळे व्यवस्था अशी बनवावी की निर्भिडपणे व्यापार करता यायला हवा.

-वासंती ठाकूर, उद्योजिका

सरकारचा कारभार अतिशय उत्तम सुरू आहे परंतु तो खरोखरच समाधान देणारा आहे का हा प्रश्न उरतोच. महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात त्यांच्या विकासाचा विचार होतोय का? जी समानता आपल्याला आणायची होती ती आज आहे का, त्यासाठी सरकारने महिलांना आणखी आरक्षण देण्याची गरज आहे. त्यामुळे महिलांना आपल्याला समानतेची वागणूक दिली जातेय याचे समाधान मिळेल.

-रत्नप्रभा भणगे, सचिव, स्नेहवर्धिनी महिला मंडळ

महिलांच्या आरोग्याविषयी आणि आत्मनिर्भरतेविषयी प्रखर जागृती हवी. ज्येष्ठांसाठी आज मोठ्या प्रमाणात आधाराची गरज आहे, स्मार्ट सिटीत महिलांना प्रतिनिधीत्त्व असावे. महिलांच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज असून भजनी मंडळासाठी स्वतंत्र व्यासपीठ असावे. योगासाठी महिलांना स्वतंत्र दालन खुले करून द्यावे असे वाटते.

-अनघा पाटील, अध्यक्षा, श्री गजानन महाराज महिला भजनी मंडळ

---

संरक्षण अंतर्गत सुरक्षा ७.८/१०

परराष्ट्र धोरण ८.८/१०

आर्थिक नीती ७.८/१०

वाहतूक दळणवळण ९.८/१०

सामाजिक सलोखा ७.४/१०

पर्यावरण, ऊर्जा ७.६/१०

कृषी ७/१०

सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता ९.२/१०

शिक्षण ७.६/१०

महिला ७.६/१०

---

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनवर मलजल शुद्धीकरण

$
0
0

शुभवार्ता

नाशिक : जैविक कचरा प्रकल्प (बायोडायजेस्टर) उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर आता नाशिकरोड रेल्वे स्टेशन स्वतःचा मलनिस्सारण प्रकल्प (एसटीपी) उभारणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशनमध्ये निर्माण झालेला सर्व मल एसटीपी प्रकल्पात सोडून त्यावर प्रक्रिया केली जाईल.

सविस्तर वृत्त... नाशिक प्लस १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images