Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

प्रकल्पांचे काम रखडल्याने तरुणांवर बेरोजगारीची वेळ

$
0
0

\B

\Bप्रकल्पांचे काम रखडल्याने

\Bतरुणांवर बेरोजगारीची वेळ\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'सिन्नर तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी विविध उद्योगधंद्यांसाठी जमिनी दिल्या. पण, त्या जमिनीवरील प्रकल्पांचे काम आजवर रखडले आहे. त्या ठिकाणी उद्योगधंदे उभे राहू न शकल्याने सिन्नरमधील तरुणांवर बेरोजगारीची वेळ आली आहे,' असे प्रतिपादन नाशिक लोकसभा आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी केले.

सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील नागरिकांसोबत शनिवारी समीर भुजबळांनी संवाद साधला. त्यावेळी सिन्नर तालुक्याचा विकास आणि तरुणांसाठीचा रोजगार यावर चर्चा झाली. दरम्यान, सिन्नरमधील अनेक गावात भेटी दिल्यानंतर बेरोजगार तरुणांचा टक्का वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. रखडलेले प्रकल्प मार्गी लागल्यास ही समस्या सुटेल, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोकाटे निवडणूक लढवण्यावर ठाम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी 'मी अपक्ष उमेदवारी करणारच', असा पुनरुच्चार केला असून, निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. शनिवारी कोकाटे यांनी पत्रक काढून जिल्ह्यात नाविण्यपूर्ण काम उभे राहण्यासाठी आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन मतदारांना केले आहे. त्यामुळे कोकाटेंच्या या प्रचारामुळे शिवसेनेची डोकेदु:खी मात्र वाढणार आहे.

शिवसेनेकडून गोडसेंच्या नावाची घोषणा जाहिर झाल्यानंतर कोकाटें युती धर्माचे पालन करतील अशी अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात कोकाटेंनी आता अपक्ष निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली आहे. आपण शिवसेनेकडे नव्हे; तर भाजपकडे उमेदवारी मागीतली होती. त्यामुळे शिवसेनेने त्यांचे बघावे असे सांगत, आपण अपक्ष उमेदवारी करणारच असा त्यांनी पूर्नरुच्चार केला आहे. तसेच संभाव्य मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर गोडसे यांनी शनिवारी नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदारांना आवाहन करणारे एक पत्रक काढले आहे. त्यात आपण उमेदवारी का करत आहोत, याची कारणमिंमासा केली आहे. आपण गेल्या दोन ते तीन वर्षापासून निवडणूक तयारीला लागलो होतो. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धार केला आहे. नाशिकचा कायापालट करावा, अशी इच्छा असल्याने आपण निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभेची संधी हुकल्याने विधानसभेसाठी मतदारसंघात आपला गट टिकवून ठेवण्यासाठी त्यांना कार्यकर्ते शिवसेनेकडे जाता कामा नये व विरोधासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडेही वळू नयेत, असे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत. त्यामुळे कोकाटेच्या या एंट्रीमुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दांडी बहाद्दरांना कारणे दाखवा नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या निरीक्षणासाठी जिल्ह्यात येणार असलेल्या निरीक्षकांसाठी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. समन्वयाच्या अनुषंगाने सूचना देण्यासाठी शनिवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीला काही अधिकाऱ्यांनी पूर्वसूचना न देताच दांडी मारली. तर काहींनी त्यांच्या प्रतिनिधींना बैठकीला पाठविले. अशा अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून निवडणूक आयोगाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निरीक्षकांच्या संपर्क अधिकाऱ्यांची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात घेण्यात आली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांच्यासह विभागीय सहनिबंधक एम. डी. भालेराव, कार्यकारी अभियंता एन. टी. पाटील, एस. एम. अहिरे, एस. एम. पाटील, उपवन संरक्षक तुषार चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी जी. डी. वाघ, डी. जे. देवरे, संजय सूर्यवंशी, के. पी. खैरनार, सरकारी कामगार अधिकारी चं. ना. बिराट, की. क. जोशी, उपकार्यकारी अभियंता व्ही. जी. जाधव, समाज कल्याण अधिकारी डॉ. नीलेश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय विसावे आदी अधिकारी उपस्थित होते. काही अधिकारी मात्र बैठकीला अनुपस्थित होते. अशा अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविण्याचे निर्देश आनंदकर यांनी दिले. ज्या कार्यालयांमध्ये राजकीय व्यक्तींशी संबंधित पोस्टर, बॅनर लावले असतील ते त्यांनी तत्काळ काढून घ्यावेत. आचारसंहिता संपेपर्यंत कोनशिला सुस्थितीत झाकून ठेवाव्यात, ज्या कार्यालयांनी सरकारी वाहने जमा केली नसतील त्यांनी ती आजच जमा करावीत असे निर्देश यावेळी देण्यात आले. आयोगाच्यावतीने नियुक्त करण्यात आलेल्या निवडणुक निरीक्षकांच्या निवास व्यवस्था, वाहन, टेलिफोन, पोलिस सुरक्षा याबाबत सविस्तर सूचनाही यावेळी समन्वय अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

निवडणूक निरीक्षकांचे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्याची आणि सर्व मतदार संघाची भौगोलिक सर्वसाधारण माहिती पुस्तिका सोबत ठेवावी. त्याचप्रमाणे आपल्याच विभागातील इंग्रजी भाषेचे ज्ञान असलेल्या अधिकारी किंवा कर्मचारी तसेच मदतीसाठी आपल्या कार्यालयातील शिपाई यांची लेखी नावे या कार्यालयास कळवावीत असे निर्देश यावेळी आनंदकर यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हीव्हीपॅटसाठी सजगता

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) ही नाजूक यंत्रणा असून, ते अधिक अंतरावर वाहून नेताना त्यातील सेटिंग बिघडण्याची शक्यता आहे. या यंत्रांच्या हाताळणीतील जोखीम कमी व्हावी आणि सेटिंग बिघडून निवडणूक प्रक्रियेत गोंधळ उडू नये यासाठी जिल्हा मुख्यालयाऐवजी विधानसभा मतदार संघाच्या मुख्यालयांत या यंत्रांची सेटिंग आणि सिलिंग करणे उचित ठरेल असे पत्र जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने भारतीय निवडणूक आयोगाला पाठविले आहे. जिल्हा प्रशासनाने निदर्शनास आणून दिलेली ही बाब निवडणूक आयोगाने विचारात घेतली तर देशभरात त्याची अंमलबजावणी होऊ शकणार आहे.

लोकसभा निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आग्रही आहे. मतदान यंत्रांमध्ये घोळ केला जात असल्याचा मतदारांचा समज दूर व्हावा आणि अपेक्षित उमेदवारालाच आपले मत गेले याची संबंधित मतदारांना खात्री पटावी यासाठी यंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वीच लोकसभा मतदार संघांच्या मुख्यालयांच्या ठिकाणी हे व्हीव्हीपॅट मशिन्स दाखल झाले. हे यंत्र नेमके कसे काम करते याची प्रात्यक्षिकेही नागरिकांना दाखविण्यात आली आहेत. परंतु, ते नाजूक असल्याने त्यांची काळजीपुर्वक हाताळणी करण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांपुढे आहे. व्हीव्हीपॅट मशिन्सची हाताळणी, प्रात्यक्षिके करताना त्यामध्ये तांत्रिक बिघाडाचे प्रमाण सरासरी पाच टक्के राहिले असून, प्रशासनाने अतिरिक्त व्हीव्हीपॅट मशिन्सची उपलब्धताही करवून घेतली आहे. अंबड वेअर हाऊस येथे मतदानासाठीची सर्व मशिनरी ठेवण्यात आली आहे. नेमके किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार हे उमेदवारी अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यानंतर उमेदवारांची नावे, त्यांची चिन्हे, मतदान यंत्रावरील क्रमांक निश्चित होऊन व्हीव्हीपॅट मशिन्सवरही त्याची सेटिंग करावी लागणार आहे. या सर्व मशिन्सची सेटिंग आणि सिलिंग जिल्ह्यातील मुख्यालयाच्या ठिकाणी करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. सेटिंग आणि सिलिंग पूर्ण झाल्यानंतर मतदानाच्या एक दिवस आधी ही सर्व मशिन्स जिल्ह्यातील ४ हजार ४४६ मतदान केंद्रांवर पोहोच करावी लागणार आहेत. अधिक अंतरांवरील मतदान केंद्रांवर मशिन्स वाहून नेत असताना त्यांची सेटिंग हलण्याची भिती यंत्रणेकडून व्यक्त होऊ लागली आहे. तसे झाले तर गोंधळ निर्माण होऊन संबंधित कर्मचाऱ्यांपुढील अडचणी ऐनवेळी वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. यामुळेच जिल्हा मुख्यालयाऐवजी विधानसभा मतदार संघांच्या मुख्यालयांच्या ठिकाणी मशिन्सचे सेटिंग आणि सिलिंग करण्याबाबत विचार व्हावा असा पत्रव्यवहार जिल्हा निवडणूक शाखेने निवडणूक आयोगाशी केला आहे.

विधानसभा मतदार संघांच्या मुख्यालयात व्हीव्हीपॅट मशिन्सचे सेटिंग आणि सिलिंग केले तर तेथून जवळच्या मतदान केंद्रांवर मशिन्स घेऊन जाणे यंत्रणेला अधिक सोयीस्कर ठरेल. त्यामुळे सेटिंग हलण्याची व तांत्रिक बिघाडाची शक्यता कमी होईल.

- अरुण आनंदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोदकामामुळे वाहतूक कोंडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गाचे सिन्नर फाटा ते चेहेडी गावादरम्यान गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या कामाला सुरुवात झाली आहे. महावितरणच्या वीज पुरवठ्यासाठीच्या केबल भूमिगत करण्यासाठी शनिवारी चेहेडी जकात नाक्याजवळ महामार्गावर खोदकाम केल्याने महामार्गावर एकेरी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले.

नाशिक-पुणे महामार्गाचे सिन्नर फाटा ते चेहेडी गाव यादरम्यान २.३ किमीचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडलेले आहे. या महामार्गाच्या कडेला असणारी झाडे तोडण्यास वृक्षप्रेमींनी हरकत घेतल्याने महामार्गाचे रुंदीकरण रखडले होते. परंतु, काही महिन्यांपूर्वी येथील झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानंतर सर्व झाडे तोडण्यात आली होती. या कामास तीन महिने होऊनही महामार्गाचे काम सुरू झाले नव्हते. गेल्या महिन्यात जलवाहिन्या बदलण्याचे व भूमिगत गटारीची कामे झाली होती. शनिवारी (दि. २३) सकाळी चेहेडी जकात नाका भागात महामार्ग ओलांडणाऱ्या विजेच्या केबल भूमिगत करण्यासाठी महामार्गावर जेसीबीच्या सहाय्याने मोठे खोदकाम करण्यात आल्याने या ठिकाणी एकेरी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. सिन्नरकडून येणारी वाहतूक ट्रक टर्मिनसमार्गे वळविण्यात आली. या ठिकाणी प्रचंड प्रमाणात धूळ निर्माण झाल्याने प्रवाशी व वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. ठेकेदाराच्या वतीने पर्यायी रस्त्यावर टँकरने पाणी टाकून धुळीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, प्रंचंड उन्हामुळे त्यात अपयश आले.

खोदकामामुळे आधीच अरुंद असलेल्या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यातच माती पसरल्याने वाहने हळू ये-जा करीत होती. पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि खडी असल्याने काही वाहनांचे एकमेकांना धक्के लागून तुटफूट झाली. त्यामुळे वाहनचालकांत शाब्दिक वादही उद्भवल्याचे प्रकार घडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवनेरीवर पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

तिथीनुसार साजरा होणारा शिवजयंती सोहळा किल्ले शिवनेरीवर आज, शनिवारी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

शिवव्याख्याते पराग ठाकूर यांनी शिवरायांच्या कार्याची महती सांगितली. प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे उपस्थित होते. गडावर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी पारंपरिक पाळणा म्हणून शिवजन्मोत्सव साजरा केला. समितीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, कार्याध्यक्ष मधुकर काजळे यांच्यासह व्रतधारी शिवप्रेमी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही शिवनेरीवर उपस्थित राहून शिवरायांचे आशीर्वाद घेतले.

शिवजन्म सोहळ्यानंतर शिवकुंज येथे धर्मसभा झाली. या वेळी शाहीर गणेश टोकेकर आणि सहकाऱ्यांनी पोवाडे सादर केले. दरम्यान सकाळी शिवजन्मस्थळापासून पालखी काढण्यात आली. पालखीसमोर पारंपरिक वाद्यांसोबत, कोंडाजीबाबा डेरे वारकरी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नृत्य केले. टाळ-मृदंगाच्या तालावर हा सोहळा शिवकुंजाकडे मार्गस्थ झाला. शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापक, कीर्तनकार डॉ. मोहिनी पाबळे यांना प्रदान करण्यात आला.

- शिवजयंती सोहळ्यानिमित्त महिलांनी पारंपरिक पद्धतीने पाळणा म्हणून शिवजन्मसोहळा साजरा केला.

- किल्ले शिवनेरीवर शनिवारी सकाळी पारंपरिक पद्धतीने पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी बालवारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर पालखीसमोर फेर धरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंग घटनेचा ‘भोंसला’ला धक्का!

$
0
0

सहाय्यक प्रशिक्षकावर गुन्हा दाखल; संस्थेकडून चौकशी

..

- विशाखा समितीच्या माध्यमातून चौकशी

- प्रशिक्षकाकडून घेतला राजीनामा

- कारवाईसाठी पालकांचा ठिय्या

- संशयित पोलिसांच्या ताब्यात

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील नामांकित सैनिकी शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा सहाय्यक प्रशिक्षकाकडूनच विनयभंग करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून संबंधितास गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी संस्थेने तात्काळ कारवाई करीत त्या प्रशिक्षकाचा राजीनामा घेतला आहे.

शहरातील भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांकडून या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर तपासास सुरुवात करण्यात आली. एका अल्पवयीन विद्यार्थिनीने तिच्यासोबत माजी सैनिक सुभेदार मच्छिंद्र करपे या प्रशिक्षकाने गैरवर्तन केल्याची तक्रार केली होती. यानुसार पोलिस ठाण्याच्या वतीने चौकशी केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असे पोलिस निरीक्षक किशोर मोरे यांनी सांगितले.

या प्रकरणी विनयभंग आणि पॉस्को कायद्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत पोलिसांनी शैक्षणिक संस्थेशी संवाद साधल्यानंतर संस्थेच्या वतीनेही विशाखा समितीच्या माध्यमातून चौकशी सुरू असल्याचे सांगितले. चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन संस्थेने पोलिसांशी बोलताना दिल्याचेही मोरे यांनी सांगितले.

संबंधित प्रशिक्षकावर त्वरित कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी सकाळपासूनच संस्थेच्या आवारात पालकांनी गर्दी केली होती. यानंतर गंगापूर पोलिस ठाण्यातही संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांनी ठिय्या दिला होता. संस्थेच्या वतीनेही पालकांच्या तक्रारीची दखल घेण्यात येऊन विशाखा समितीची बैठक शनिवारी दीर्घवेळ सुरू होती. समितीची बैठक झाल्यानंतर संबंधित सहाय्यक प्रशिक्षकाचा तातडीने राजीनामा घेण्यात येऊन पोलिसांकडे त्याला सुपूर्त करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

...

माजी सैनिक सुभेदार मच्छिंद्र करपे यांची भोंसला मिलिटरी गर्ल्स स्कूल संस्थेत १५ फेब्रुवारी २०१९ रोजी सहाय्यक प्रशिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी चार मुलींसोबत गैरवर्तन केल्याची तक्रार आल्यानंतर ताबडतोब व्यवस्थापन समितीने विशाखा समितीची बैठक बोलावली. यानंतर व्यवस्थापनाने त्यांचा राजीनामा घेतला असून, योग्य त्या कारवाईसाठी त्यांना पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले आहे.

- हेमंत देशपांडे, कार्यवाह, सीएचएमई सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ मतदारांच्या दोन्ही हातांवर शाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींमधील रहिवाशी यंदा एका अर्थाने नशिबवान ठरणार आहेत. ग्रामपंचायत आणि लोकसभा अशा दोन्ही निवडणुकांसाठी मतदान करण्याची संधी त्यांना या दिवसांत उपलब्ध झाली असून, याची विशेष दखल निवडणूक आयोगालाही घेणे भाग पडले आहे. त्यामुळेच या मतदारांच्या दोन्ही हातांच्या बोटांवर यंदा शाई लागणार आहे.

एप्रिल ते जून २०१९ या कालावधीत कार्यकाळ संपणाऱ्या राज्यातील ५४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानंतरची सर्व कार्यवाही पार पडली असून रविवारी (२४ मार्च) रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात ४८ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक घेण्यात येत असून त्याकरीता यंत्रणा सज्ज झाली आहे. मधल्या काळात लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २९ एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदाराने मतदान केले हे स्पष्ट व्हावे आणि एकाच मतदाराच्या नावावर अनेक मतदारांकडून बोगस मतदान होऊ नये याकरीता मतदाराच्या विशिष्ट बोटावर शाई लावण्यात येते. ही शाई काही काळ बोटावर तशीच राहाते. यामुळे अशा मतदारांना लोकसभा निवडणुकीच्यावेळी मतदान करताना अडचण येऊ नये याकरीता ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने यंत्रणेला दिले आहेत. तर लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेसचे प्रमुख चेहरे अजूनही प्रचारापासून दूर

$
0
0

काँग्रेसचे प्रमुख चेहरे

अजूनही प्रचारापासून दूर

भुजबळ 'आघाडी'चे की 'राष्ट्रवादी'चे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने समीर भुजबळ यांना उमेदवारी दिली असून, भुजबळ समर्थकांनी प्रचाराला सुरूवातही केली आहे. काँग्रेसचे प्रमुख चेहरे मात्र अजूनही प्रचारात कोठे दिसत नसल्याने भुजबळांची उमेदवारी 'आघाडी'ची की 'राष्ट्रवादी'ची असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये यंदाची निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. खासदारकीची माळ आपल्याच गळ्यात पडावी याकरीता अनेकांनी कंबर कसली आहे. आघाडीने समीर भुजबळ यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. तर शिवसेना-भाजप युतीने शुक्रवारी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचीच उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित आघाडीने माजी नगरसेवक पवन पवार यांना उमेदवारी दिली असून, छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक करण गायकर यांनीही अपक्ष उमेदवारी करीत प्रचाराला सुरूवात केली आहे. सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनीही बंडाचे निशान फडकावले असून, माजी महापौर दशरथ पाटील यांनीही निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक बहुरंगी असणार आहे. समीर भुजबळ यांनी प्रचाराला सुरूवात केली असून, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह भुजबळ कुटुंबीय, निकटवर्तीय आणि समर्थकांनी स्वत:ला प्रचारात झोकून दिले आहे. छगन भुजबळ यांनी स्वत: नाशिकमधील अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे.

शेफाली भुजबळ यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यास सुरूवात केली आहे. समीर भुजबळ यांनीही तालुक्यांच्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांसह मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे. परंतु या सर्व प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेसचे शहरासह जिल्ह्यातील चेहरे मात्र प्रचारापासून अलिप्तच असल्याचे पहावयास मिळते आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री असताना छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये काँग्रेस संपविल्याचा आरोप काँग्रेसजनांकडून होत आला आहे. या निवडणुकीतही काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही सध्या तरी प्रचारात फारसे स्वारस्य दाखविले नसल्याचे पहावयास मिळते आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी काँग्रेस कमिटीमध्ये येऊन सर्वांची बैठक घेतली. आघाडीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी जेथे जेथे बोलावले जाईल तेथे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते जातील.

- शरद आहेर, शहराध्यक्ष काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित आघाडीचा प्रभाव ओसरला?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राज्यात स्थापन केलेली वंचित बहुजन आघाडी ही भाजपची 'बी टीम' असल्याचा संदेश पोहचविण्यात काँग्रेस यशस्वी झाल्याचे चित्र निर्माण होत आहे. औरंगाबाद आणि मुंबई वगळता वंचित आघाडीच्या सभांकडे असदुद्दिन ओवैसींनी पाठ फिरवल्याने मुस्लिम समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आंबेडकरांच्या सभांना मुस्लिम मतदारांची अनुपस्थिती आणि आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल मागासवर्गीय समाजात साशंकता निर्माण झाल्याने काँग्रेसमध्ये खुशीचे वातावरण आहे. वंचित आघाडीची जळगावची सभा फ्लॉप ठरल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचे हसू परतले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला विरोध करीत राज्यात ताकद उभी करणाऱ्या अॅड. आंबेडकरांनी एमआयएमचे असदुद्दिन ओवैसींना बरोबर घेऊन राज्यात वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपला पर्याय म्हणून ही आघाडी स्थापन करीत, आंबेडकरांनी काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेल्या मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजाला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला होता. भाजपला विरोध आणि काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी स्थापन झालेल्या वंचित आघाडीचा कोरेगाव-भीमा दंगलीनंतर राज्यातील प्रभाव चांगलाच वाढला होता. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धडकी भरली. आंबेडकर आणि ओवैसी यांनी औरंगाबाद येथे भव्य जाहीर सभा घेऊन आघाडीची हवा निर्माण केली होती. भाजपला ही आघाडी पूरक असल्याची लागलीच चर्चा सुरू झाली. काँग्रेसनेदेखील ही आघाडी भाजपची बी टीम असल्याचा प्रचार सुरू केला. त्याकडे दुर्लक्ष करीत आंबेडकर यांनी सभांचा धडाका लावला. औरंगाबाद, नाशिक, मुंबईच्या सभांना मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता आता काँग्रेस, राष्ट्रवादीला त्याचा फटका बसेल, असेच चित्र निर्माण झाले. काँग्रेसने या आघाडीला महाआघाडीत घेण्याचा प्रयत्न करीत राज्यात चार जागा देण्याची तयारी दर्शवली. परंतु,आंबेडकरांनी 'आरएसएसला घटनेच्या चौकटीत कसे बसविणार' याचा आराखडा द्या आणि आघाडीला २२ जागा देण्याची अवास्तव मागणी केली. त्यातून आंबेडकरांना भाजपलाच मदत करायची आहे, असा प्रचार महाआघाडीकडून सुरू करण्यात आला. अशातच ओवैसींनीही वंचित आघाडीच्या सभांकडे पाठ फिरवली. त्यामुळे या सभांना मुस्लिम समाजही उपस्थित राहात नसल्याने आंबेडकर भाजपसाठीच काम करीत असल्याचा समज निर्माण करण्यात काँग्रेस यशस्वी झाल्याचे चित्र आहे. मुस्लिम समाजातही ओवैसींच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे वंचित आघाडीविषयीचे सुरुवातीचे आकर्षण कमी होऊ लागले आहे. या बदललेल्या परिस्थितीत आंबेडकरांचीच हवा गुल झाल्याने आघाडीला दिलासा मिळणार आहे.

ओवैसी सभांमधून गायब

राज्यात सर्वच सभांना ओवैसी येणार असे चित्र निर्माण केले गेले. त्यांचा मुस्लिम समाजात एक मोठा चाहता वर्ग आहे. परंतु, ते औरंगाबाद आणि मुंबई वगळता कुठेच आले नाहीत. त्यामुळे मुस्लिम मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यातच आंबेडकरांनी यादीत उमेदवारांची जातच टाकल्याने मागासवर्गीयांसह बहुजन समाजातील नेते नाराज झाले आहेत. वंचित आघाडीने महाआघाडीत जावे, अशी मागासवर्गीय समाजाची इच्छा होती. परंतु, तसे न झाल्याने समाजातही संभ्रमाचे वातावरण असून आंबेडकरांच्या प्रतिमेवरच प्रश्निचिन्ह उपस्थित झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमपीएससी’ची आज ५६ केंद्रांवर परीक्षा

$
0
0

२१ हजार ७२ परीक्षार्थी

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील ५६ उपकेंद्रावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 'महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब'ची पूर्व परीक्षा आज (२४ मार्च) होणार असून, २१ हजार ७२ परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 'महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब' पदाची पूर्व परीक्षा रविवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील ५६ उपक्रेंदांवर होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून १ हजार ३० कर्मचारी परीक्षेसाठी कार्यरत असणार आहेत. परीक्षार्थींनी उपकेंद्रावर परीक्षेच्या दीड तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक असून, सकाळी १०.३० वाजेनंतर कोणत्याही परीक्षार्थीला प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या हॉल तिकिटासोबतच परीक्षार्थिंनी आधारकार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक ओळखपत्र सोबत बाळगावे. मोबाइल घेऊन उपकेंद्रात प्रवेश करता येणार नाही, अशा सूचना आयोगातर्फे करण्यात आल्या आहेत. परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार घडू नये, त्यासाठी पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेलिमेडिसिनची साथ, आजारांवर मात!

$
0
0

नाशिकचे सिव्हिल हॉस्टिपटल उपचारांत राज्यात दुसरे

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माहिती तंत्राचा वापर करून वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व आरोग्यसेवेचे घटक यांच्या समन्वयातून टेलिमेडिसिन प्रकल्पामार्फत आधुनिक आरोग्य सेवा जिल्हा रुग्णालयामार्फत देण्यात येत आहे. टेलिमेडिसिनच्या सहाय्याने २०१८-१९ या वर्षात १७७८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. राज्यात अशा प्रकारे काम करणारे नाशिक सिव्हिल हे द्वितीय क्रमाकांचे हॉस्पिटल ठरले आहे.

जिल्हा रुग्णालयात २००९ साली टेलिमेडिसिन सुविधा सुरू करण्यात आली. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवर, नवजात बालक, गरोदर माता यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार केले जात आहेत. आदिवासी, अतिदुर्गम भागातील रुग्णांना दिलासा मिळत असल्याचे सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले. याचा रुग्णांना फायदा होत असून, डॉक्टरांना नेमके कुठले उपचार करावयाचे आहेत, याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांचे सल्ले मिळत आहे.

सेंट्रल जेलमधील बंदीवान विविध आजारांनी त्रस्त असतात. त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात आणले जाते. तो वेळ वाचवावा व तज्ज्ञ सल्ला मिळावा या हेतूने सिव्हिल हॉस्पिटल आणि तुरुंग अधिकारी, पोलिस विभागात समन्वय साधून कैदी रुग्णांना तज्ज्ञ सल्ला टेलिमेडिसिनेद्वारे दिला जात असल्याचे डॉक्टर जगदाळे यांनी स्पष्ट केले. मागील महिन्यात सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात ही सुविधा सुरू करण्यात आली.

...

काय आहे टेलिमेडिसिन

व्हिडिओ कॉन्फरन्सिंसद्वारे परजिल्हातील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून आजाराबाबत मार्गदर्शन घेण्यात येते. कॅमेराच्या सहाय्याने रुग्णांची आजाराबाबत माहिती, त्यांनी घेतलेले उपचार यांची छयाचित्रे तज्ज्ञ डॉक्टरांना पाठवली जातात. त्यानंतर व्हिडिओ कॉफ्रन्सिंगद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करण्यात येतात.

...

नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना टेलिमेडिसिनद्वारे मोफत सेवा मिळते. दरवर्षी याचा लाभ अनेक रुग्णांना मिळत आहे.

- डॉ. अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी

...

टेलिमेडिसिन प्रकल्पाद्वारे जिल्ह्यातील दुर्गम भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळते. मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करून देण्यास टेलिमेडिसिन प्रकल्प खूप फायदेशीर ठरत आहे.

- डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोडसेंचे जल्लोषात स्वागत

$
0
0

लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा घेऊन परतलेल्या हेमंत गोडसे यांचे नाशिकमधील शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. मुंबई-नाशिक महामार्गावरील घाटणदेवीपासून शालिमार येथील शिवसेना कार्यालयापर्यंत रॅली काढून गोडसे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. परंतु यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पाथर्डी फाटा येथेही त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही रॅली शालीमार येथील शिवसेना कार्यालयात पोहोचली. तेथे शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. परंतु काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या स्वागत सोहळ्याकडे पाठ फिरविली.

रविंद्र सोनवणे

अखेर निलंबित

नाशिक : महापौरांच्या निवासस्थानी गेल्या १० वर्षांपासून कार्यरत वादग्रस्त लघुलेखक रविंद्र सोनवणे यांच्यावर अखेर महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. प्रत्यक्ष कामावर हजर न राहता बनावट सह्या करून सोनवणे वेतन काढत असल्याचा आरोप नगरसेवक दिनकर पाटील यांनी केला होता. सोनवणे याच्या हजेरीबाबत आजी-माजी महापौरांकडूनही आयुक्त गमे यांनी अहवाल मागविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वंचित’चा उमेदवार बदलणार?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झालेली नसतानाही वंचित बहुजन आघाडीच्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांची मालेगावी सभा झाल्याने वातावरण निर्मितीचा प्रयत्न झाला होता. यावेळी जाहीर सभेत धुळे मालेगाव लोकसभेसाठी आंबेडकर यांच्याकडून कमाल हासीम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, पहिल्या यादीत त्यांचे नाव नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता. आता वंचित आघाडीकडून उमेवार बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असून कमाल हासीम यांचा पत्ता कट होऊन राष्ट्रवादीचे नगरसेवक नबी अहमद अहमदुल्ला यांना उमेवारी दिली जाणार आहे. भारिपचे जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे यांनीदेखील यास दुजोरा दिला आहे.

काँग्रेससोबत जागावाटपाचा तिढा न सुटल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीने नुकतेच आपले ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत धुळे मालेगावसाठी आधीच मालेगावच्या सभेत जाहीर केलेल्या कमाल हासीम यांचे नाव नसल्याने चर्चांना उधाण आले होते. आपली उमेदवारी रद्द करण्यासाठी अपप्रचार सुरू असल्याचा आरोपदेखील हासीम यांनी केला होता. तसेच एमआयएमने या जागेसाठी आग्रह धरल्याचेदेखील त्यांचे म्हणणे होते. मात्र, आता वंचित आघाडीकडून हासीम यांचा पत्ता कट करून नवा उमेदवार दिला जाणार आहे. दादर येथील आंबेडकर भवनमध्ये आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे, एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेज, जिल्हा उपाध्यक्ष नीलेश केदारे, अनिल जाधव आदींनी भेट घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले नबी अहमद हे देखील उपस्थित होते.

म्हसदे यांनीदेखील उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू असल्याचे म्हटले आहे. दादर तसेच जळगाव येथील सभेत प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली असून, मतदार संघात सामाजिक बाबींचा विचार करता व निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार द्यावा अशी मागणी केली आहे. आघाडीतर्फे नबी अहमद यांच्या नावाचा विचार सुरू असून, त्यासह अन्य तीन नावेदेखील समोर असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियाद्वारे महिलेची बदनामी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेअरचॅट या सोशल मीडियावर अज्ञात संशयिताने लोकांशी चॅट करून सातपूर येथील एका महिलेचा मोबाइल क्रमांक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातपूरमधील श्रमिकनगर परिसरात राहणाऱ्या महिलेने सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात फिर्याद दाखल केली. महिलेच्या फिर्यादीनुसार ९ ते २७ फेब्रुवारी दरम्यान संशयिताने शेअर चॅट या सोशल मीडिया अॅपवर आयडी तयार करून लोकांशी चॅटिंग केली. अनेकांना सातपूर येथील महिलेचा मोबाइल क्रमांक देत संपर्क साधण्यास सांगितले. त्यामुळे संबंधित महिलेस वारंवार अनोळखी फोन सुरू झाले. त्यामुळे महिला त्रस्त झाली. तिने चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे करीत आहेत.

सायकलवरून पडून एकाचा मृत्यू

सायकलवरून जात असताना खाली पडून गंभीर जखमी झालेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना त्र्यंबकरोडवर घडली. मिलिंद कच्छेश्वर थोरात (रा. आनदंनगर) असे या व्यक्तीचे नाव आहे. १८ मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास थोरात लेखानगरकडून मायको सर्कलच्या दिशेने जात असताना अपघात झाला होता. सायकलवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि. २२) त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तलवार बाळगणारा अटक

घराबाहेर तलवार घेऊन बसलेल्या संशयितास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. लखन दिलीप वाघ (२८, रा. पवननगर, सिडको) असे या संशयिताचे नाव आहे. लखन हा त्याच्या घराबाहेर ओट्यावर तलवार घेऊन बसलेला होता. त्यामुळे त्यास ताब्यात घेत त्याच्याकडील तलवार जप्त करण्यात आली. संशयित लखन विरोधात अंबड पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाहितेची आत्महत्या

पाथर्डी रोडवरील पार्कसाइडच्या समोरील साईप्रसाद इमारतीतील टेरेसवर विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. नयना विजय धनानी (३६) असे या विवाहितेचे नाव आहे. नयना यांनी इमारतीच्या टेरेसवर अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्महत्या केली. हा प्रकार सकाळच्या सुमारास घडला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मटा कट्टा : युनिव्हर्सल अकॅडमी : चौकट, पॉइंटर्स

$
0
0

लक्षवेधी मुद्दे

- विकासाची प्रक्रिया दीर्घ असून विकासाची व्याख्या मतदारांनीही जाणून घ्यावी.

- सर्व समावेक्षक विकास महत्त्वाचा आहे.

- वाचनालयांची संख्या वाढविण्याची गरज आहे.

- ग्रामीण आणि शहरी विकास समान पातळीवर व्हावा.

- दर्जेदार शिक्षणाच्या तुलनेत दर्जेदार रोजगाराची वणवा.

- रोजगार निर्मितीत विद्यामान सरकार अग्रेसर.

- सामाजिक मुद्द्यांचे राजकारण नको.

--

विकासात समानता असावी

देशात शहराचा विकास झपाट्याने होत असला तरी, त्या तुलनेत ग्रामीण विकासाची प्रक्रिया कमी आहे. त्यामुळे शहरात अनेक संधी उपलब्ध होत असल्या तरी ग्रामीण भाग अद्यापही अनेक सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे ग्रामीण विकासालाही तितकेच प्राधान्य देणे अपेक्षित आहे. त्यासाठी शेती विषयक उद्योगधंदे, तंत्रज्ञानावर आधारित शेती आणि शहरी भागातील सुविधा ग्रामीणस्तरावर पोहोचविण्यात याव्यात. समृद्ध शेतीसाठी योजनांचा आधार देण्यासह त्याचे तंत्र शेतकऱ्यांना समजावून सांगितल्यास ग्रामीण विकासाला चालना मिळेल, असे मत विद्यार्थ्यांनी मांडले.

--

नागरिकांचीही जबाबदारी

विकास, रोजगार, योजना, सोयीसुविधा यांसह इतर बाबतीत सरकारकडून नागरिक अपेक्षा ठेवतात. देशाचे नागरिक म्हणून सरकारकडून अपेक्षा ठेवणे हा हक्कच आहे. पण, फक्त सरकारच्या योजनांवर किंवा कार्यपद्धतीवर नागरिकांनी अवलंबून राहणे योग्य नव्हे. समाजातील काही परिस्थिती बदलण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यायला हवा. जेणेकरुन तळागाळातील समस्यांचे निवारण होईल. नागरिकांनी स्वत:हून सरकार दफ्तरी समस्या पोहोचविल्यास त्या मार्गी नक्कीच लागतील. सरकारने रोजगार द्यावा, अशी मागणी केली जात असली तरी त्यासाठीचे शिक्षण आणि बौद्धिक क्षमता असणे विद्यार्थ्यांचे काम आहे. त्यामुळे प्रत्येक बाबतीत सरकारला दुषणे देण्यापेक्षा स्वत:च्या जबाबदाऱ्या नागरिकांनी ओळखायला हव्यात. नोकऱ्यांच्या मागे धावण्यापेक्षा उद्योजक बनल्यास रोजगाचा मोठा प्रश्न मार्गी लागले, असा आशावाद विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

--

शिक्षणाचे बाजारीकरण सध्या वाढले आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांवर सरकारने अंकुश ठेवायला हवा. विद्यार्थ्यांपर्यंत अनेक योजना कॉलेजांमार्फत पोहोचू दिल्या जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होते. यावर नव्या सरकारने अंकुश आणावा.

- शुभम गवते

--

ग्रामीण भागात विकासाचा जोर कमी आहे. शेती विषयक योजना अधिक वाढायला हव्यात. सुसज्ज तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठीची मोहीम सरकारने हाती घ्यायला हवी. कृषी क्षेत्राला नवी झळाळी प्राप्त करुन दिल्यास देशाच्या आर्थिक उलाढालीस अधिक बळ येईल.

- साक्षी सिद्धपुरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिलाव आचारसंहितेच्या कचाट्यात

$
0
0

आठवडे बाजारांचे लिलाव प्रक्रिया होणार पुढील महिन्यात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये आठवडा बाजारांच्या दुकानाचे लिलावही अडकू लागले आहेत. आचासंहितेच्या कारणास्तव गिरणारे येथील लिलाव प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून, ती आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात घ्यावी लागणार आहे.

निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली की कुठल्याही नवीन कामांची निविदा प्रक्रिया राबविता येत नाही. लिलाव प्रक्रियेवरही त्यामुळे मर्यादा येतात. गिरणारे येथील आठवडे बाजाराची निविदा प्रक्रियाही आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे. प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी येथे बाजार भरतो. आसपासच्या अनेक गावांमधील लोक येथे खरेदीसाठी येतात. त्यामुळे आठवडे बाजारात दुकाने लावण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये मोठी स्पर्धा असते. अशा व्यापाऱ्यांना आठवडे बाजारातील जागा वर्षभराकरीता निश्चित करून देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येते. गतवर्षी या प्रक्रियेतून गिरणारे ग्रामपंचायतीला १६ लाखाहून अधिक उत्पन्न मिळाले. यंदाही बुधवारी (दि. २७ मार्च ) ही प्रक्रिया राबविण्यात येणार होती. परंतु आचारसंहिता काळात ही प्रक्रिया राबविल्यास आचारसंहितेचा भंग होऊ शकतो, याची जाणीव ग्रामपंचायतीला झाल्याने हा लिलाव पुढे ढकलण्यात आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर ही लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच तानाजी गायकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलमध्ये कैद्याला मारहाण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चार वर्षांपासून नाशिक सेंट्रल जेलमध्ये असलेल्या कच्च्या कैद्यास कैदी निरीक्षकांकडून मारहाण झाली. तक्रारीनंतरदेखील तुरुंग प्रशासन कैदी निरीक्षकास पाठिशी घालत आहे. कैद्याच्या जीवास धोका असल्याचा गंभीर आरोप ठाणे येथील कैद्याच्या नातेवाईक लक्ष्मी भगत यांनी पत्रकार परिषदेत केला.

संतोष जयराम भगत असे कच्च्या कैद्याचे नाव असून, तो लक्ष्मी भगत यांचा दीर आहे. चार वर्षांपूर्वी दरोड्याच्या गुन्ह्यात त्याची चारचाकी गाडी वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यास नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून तो कारागृहातील बॅरॅक क्रमांक एकमध्ये आहे. २० मार्च रोजी नातेवाईक भेटण्यास गेले असता त्याने अत्याचार होत असल्याबाबत सांगितले. चार ते पाच दिवसांपूर्वी त्याच्याकडे शस्त्रे सापडल्याच्या कारणातून त्यास कैदी निरीक्षक अजगर मैसुरी याने बेदम मारहाण केली होती. तसेच त्याच्याकडील खाद्यपदार्थ व इतर साहित्य जप्त करण्यात आले. याबाबत विचारणा केली असता मैसुरीसह इतर कैदी निरक्षकांनीही भगतला पुन्हा मारहाण केली. यामुळे भगत याने कारागृहातच उपोषण सुरू केले आहे. याबाबत कारागृह अधीक्षकांना पत्रव्यवहार करूनही त्यांनी काहीच दखल घेतली नसल्याचा आरोप लक्ष्मी भगत यांनी केला.

बंदिवानाकडे धारदार वस्तू तसेच मोबाइल आढळून आला. त्यामुळे त्याच्याकडील साहित्य जप्त करण्यात आले. त्यास कोणी मारहाण केली नाही. उलट त्यानेच कारागृहात गोंधळ घातला. याबाबतचा सविस्तर अहवाल कारागृह प्रशासन न्यायालयाला पाठवत आहे.

- राजकुमार साळी, कारागृह अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचे ‘मिशन ऑल आऊट’

$
0
0

८७ गुन्हेगारांवर कारवाई

....

- ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या २१ केसेसे

- १३६ वाहनधारकांकडून दंड वसुली

- नाकाबंदीत १० वाहने पोलिस स्टेशनला जमा

- दोन संशयित तडीपार पोलिसांच्या हाती

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत शुक्रवारी रात्री 'मिशन ऑल आऊट' मोहीम राबवत सराईत गुन्हेगारांची तपासणी केली. दरम्यान, १५२ सराईतांची तपासणी केली असून, ८७ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. सोबतच टवाळखोर, रॅश ड्रायव्हिंग करणारे, यांसह ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह अंतर्गत कारवाई केली गेली.

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशानुसार शुक्रवारी रात्री शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मिशन ऑल आऊट मोहीम राबविण्यात आली. नांदूरनाका, सिन्नर फाटा, संसरी नाका, म्हसरूळ गाव, पिंपळगाव बहुला, अंबड टी पॉईंट, सिडको हॉस्पिटल, मालेगाव स्टॅण्ड, ठक्कर बझार, त्रिकोणी गार्डन, जेहान सर्कल, चोपडा लॉन्स, भाभानगर, पाथर्डी फाटा, नारायणबापू चौक, अशा १६ ठिकाणी प्रत्येकी एक अधिकारी व सहा कर्मचारी नाकाबंदीसाठी तैनात करण्यात आले होते. याशिवाय पोलिस आयुक्त नांगरे पाटील, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, पौर्णिमा चौगुले-श्रीगी, सर्व सहायक पोलिस आयुक्त, शहर वाहतूक शाखा, १७ पोलिस निरीक्षक, ४६ एपीआय वा पीएसआय तसेच ३६२ पोलिस कर्मचारी आणि ३४ होमगार्ड्स यांनी मिळून तपासणी मोहीम राबवली.

पोलिस आयुक्तांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वच पोलिस यावेळी रस्त्यावर उतरले. या तपासणीत रेकॉर्डवरील १५४ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तडीपार असलेले दोन संशयित यावेळी पोलिसांच्या हाती लागले. लॉज व हॉटेल्सची तपासणी करून मुंबई पोलिस अॅक्टनुसार दोन केसेस करण्यात आल्या. ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या २१ केस करण्यात आल्या. नाकाबंदीत ७०१ वाहनांची तपासणी केली गेली. त्यातील १३६ वाहनांकडून दंड वसुली करण्यात आली. २८ हजार ७०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला. ८७ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. रात्री ११ ते २ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. यावेळी २५ झोपडपट्टी भागांची पोलिसांनी कसून तपासणी केली. नाकाबंदीत १० वाहने पोलिस स्टेशनला जमा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस उपाध्यक्षपदी डॉ. श्रीराम लहामटे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

नाशिक जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी घोटी येथील डॉ. श्रीराम लहामटे यांची तर सरचिटणीसपदी अॅड. जी. पी. चव्हाण यांची आज निवड करण्यात आली. इगतपुरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी कुऱ्हेगावचे उपसरपंच ज्ञानेश्वर धोंगडे आणि इगतपुरीचे सामाजिक कार्यकर्ते गणेश कौटे यांची ही नियुक्ती झाली आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये पक्षवाढीसाठी अधिकाधिक योगदान द्यावे, असे जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे यांनी म्हटले आहे.

या प्रसंगी आमदार निर्मला गावित, तालुकाध्यक्ष कचरू पाटील डुकरे, पांडुरंग शिंदे, बाळासाहेब कुकडे, डॉ. जयंत कोरडे, राजाराम गव्हाणे, जितेंद्र पवार, डॉ. दिगंबर चौरे, शिवाजी तातळे, दत्ता कोरडे, सागर साबळे, विकास परदेशी, मोहन कडाळी, हिरामण कौटे, विठ्ठल माळी, विष्णू माळी, नवनाथ गातवे, कृष्णा वळवी, चित्रा मेंगाळ, संतोष जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images