Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वीरोत्सवात हरखले सारे

$
0
0

शहरात दाजीबा वीराच्या मिरवणुकीचा उत्साह

…..

- दाजीबा वीराची घरोघरी पूजा

- रामकुंड परिसराला जत्रेचे स्वरूप

- देवदेवतांच्या लक्षवेधी वेशभूषा

- काठी, तलवार, खोबऱ्याची वाटी आणि टाक घेऊन नाचले वीर

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या दाजीबा वीराच्या मिरवणुकीने गुरुवारी शहरात उत्साह संचारला होता. मिरवणुकीला सुरुवात झाल्यापासून हा वीर नृत्य करीतच मार्गक्रमण करीत होता. बाशिंगे वीर नवसाला पावणारे असल्याने त्याची घरोघरी मनोभावे पूजा करण्यात आली. दुपारपासून सुरू झालेला हा जल्लोषाचा माहोल रात्री उशिरापर्यंत टिकून होता. उत्तरोत्तर या मिरवणुकीच्या उत्साहाला उधाण आले होते.

गुरुवारी दुपारी दोन वाजता बुधवार पेठेतील बेलगावकरांच्या निवासस्थानातून वीराची मिरवणूक काढण्यात आली. नाशिकमध्ये वीरांची परंपरा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी शहराच्या विविध भागातून वीर नाचवले जातात. मुख्य मानाचा असलेल्या दाजीबा वीराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून भाविक येतात. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे दुपारी बुधवार पेठेतून दाजीबा वीर निघाल्यानंतर शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बाशिंगे वीराची मिरवणूक बुधवार पेठेतून निघून म्हसरूळ टेक, संभाजी चौक, टाकसाळ लेन, दूधबाजार, मेनरोड, रविवार कारंजामार्गे रामकुंडावर जाते. तेथे विधिवत पूजा करण्यात येते आणि तेथून पुन्हा परतीच्या मार्गाने बुधवार पेठेत येते. ही मिरवणूक दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता संपते.

बाशिंगे वीराला देवाचे वस्त्र परिधान केल्यानंतर त्याच्या डोक्यावर देवाचा मुकुट चढविला जातो आणि आकर्षकरित्या बाशिंग बांधले जाते. डोक्यावरील मुकुट आणि बाशिंग दोरखंडाच्या सहाय्याने कमरेच्या भोवती बांधलेले असते. दोन्ही हातांच्या मनगटांना आणि गळ्यात फुलांच्या माळा असतात. तसेच, अंगाला नवरदेवाप्रमाणेच हळद लावण्यात आलेली असते.

मिरवणुकीला सुरुवात झाल्यापासून हा वीर नृत्य करीतच मार्गक्रमण करीत असतो. मध्यरात्रीनंतर मिरवणुकीचा समारोप होतो. बाशिंगे वीर नवसाला पावणारे असल्याने त्यांची घरोघरी मनोभावे पूजा केली जाते. विवाह इच्छुक मुला-मुलींचे विवाह जमत नसतील अशांनी या वीराला बाशिंग वाहण्याची परंपरा आहे. दोनशे वर्षांपासून बेलगावकर कुटुंबीयांकडे त्याचा मान आहे. या वीराचे मूळ स्थान दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथे आहे.

..

येसाजी वीराची मिरवणूक

नाशिक शहरात मानाचा दुसरा असलेल्या येसाजी वीराची मिरवणूक घनकर गल्लीतून रात्री ९ वाजता काढण्यात आली. घनकर गल्ली, रविवार पेठ, बोहरपट्टी मार्ग रामकुंडावर पोहचल्यानंतर तेथे बाशिंग वीर व योसाजी वीर यांची भेट झाली. त्यानंतर विधीवत पूजन होऊन येसाजी वीरांची मिरवणूक पुन्हा घनकर गल्लीकडे रवाना झाली.

...

घरातील वीर वाजत गाजत रामकुंडावर

शहरात अनेकांच्या घरातील देव्हाऱ्यात वीरांचे टाक आहेत. या टाकांना धुलिवंदनच्या दिवशी रामकुंडावर नेऊन स्नान घालण्याची प्रथा आहे. घरातील वीरांचे टाक खोबऱ्याच्या वाटीत घेऊन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आल्या. दुपारपासून छोट्या मिरवणुका रविवार पेठ, जुने नाशिक, पंचवटी, भद्रकाली भागातून रामकुंडाकडे येत होत्या. यावेळी लहान मुलांनी विविध वेषभूषा केल्या होत्या. त्याचप्रमाणे मोठ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. अनेकांनी भगवे फेटे बांधले होते. लहान मुलांच्या वेशभूषेमध्ये यंदाही जय मल्हारमधील खंडेराय व भगवान शंकराच्या वेशभूषेला पसंती होती. विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषादेखील वाखाणण्याजोग्या होत्या. संध्याकाळी सातच्या सुमारास रामकुंड परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. अनेक लोकांनी रामकुंडावर पेटविण्यात आलेल्या होळी भोवती हलगीच्या तालावर नाचत पाच प्रदक्षिणा मारल्या. त्यानंतर आपल्या सोबत आलेल्या लहान मुलांना सांभाळत खोबऱ्याच्या वाटीतील देवांना रामकुंडात स्नान घातले. गर्दीचा ओघ रात्री साडेबारापर्यंत सुरू होता.

.....

पोषण आहारावर जनजागृती

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने यंदा प्रथमच वीरांच्या मिरवणुकीचे निमित्त साधून जनजागृती करण्यात आली. महिला व बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारासंबंधी फलक प्रदर्शित करण्यात आले. यावेळी उपस्थित पुरुष व स्तनदा मातांना पोषण आहाराचे महत्त्व पटवून देण्यात येत होते. यंदा प्रथमच असा उपक्रम राबविल्याने अनेकांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंगांची आनंद उधळण

$
0
0

शहरात धूलिवंदनाचा उत्साह

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'बुरा ना मानो होली है' असे म्हणत गुरुवारी धूळवड उत्साहात साजरी करण्यात आली. उत्तर भारतीयांचा रंगोत्सव चांगलाच रंगला होता. नागरिकांनी पारंपरिक पध्दतीपेक्षा कोरड्या रंगाचा वापर केला. होळीच्या राखेने धुळवड खेळणे तर नाशिककरांनी अनुभवलेच, शिवाय परंपरेप्रमाणे वीर नाचवण्याची प्रथा जपत, भव्य मिरवणूक गुरुवारी काढण्यात आली.

फाल्गून पौर्णिमेनंतर दुसरा दिवस बऱ्याच ठिकाणी 'धूलिवंदन' म्हणून साजरा केला जातो. उत्तर भारतीय तसेच महाराष्ट्रातील काही भागात हा दिवस रंगपंचमीसारखा साजरा होतो. नाशिक शहरातील शिवाजीनगर, अंबड-सातपूर लिंक रोड, चुंचाळे आदी भागात उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. या परिसरात धूलिवंदन साजरा करण्यावर विशेष जोर असल्याचे दिसले. उत्तर भारतीयांप्रमाणे बच्चे कंपनीने हा दिवस रंगपंचमी म्हणून कारणी लावला. नाशिकमध्ये होळीनंतरचा पाचवा दिवस 'रंगपंचमी' म्हणून साजरा केला जातो. उत्तर महाराष्ट्रातील काही भागात धूलिवंदनाला महत्त्व असल्याने गुरुवारी धूळवड उडविली गेली. सातपूर, सिडको परिसरात तसेच पंचवटी येथे धूलिवंदन उत्साहात साजरी झाली. अबालवृद्धांसह अनेकांनी गुलाल वा कोरड्या रंगाचा टिळा लावत काही ठिकाणी एकमेकांवर रंगाची मुक्त हस्ते उधळण करीत हा सण साजरा केला. बच्चे कंपनीने पिचकाऱ्यांनी रंगाची उधळण केली.

...

यशवंतराव महाराज पटांगणावर जत्रा

विविध वेशभूषेने नटलेल्या चिमुरड्यांसह जथ्थेच्या जथ्थे यशवंत महाराज पटांगण येथे लोटले होते. पटांगणाला उत्सवी स्वरूप लाभले होते. कडू-गोड आठवणींना तिलांजली देत धूवळड सण मोठ्या उत्साहाने साजरा झाला. शिवरायांची पराक्रमी वेशभूषा वा कृष्णाची वृंदावनात शोभेलशी वेशभूषा अशा विविध रूपांमध्ये लहान लहान मुले नटून-थटून आली होती. वीर नाचविण्याच्या वर्षानुवर्षाच्या परंपरेमध्ये ही मुले उत्साहाने सहभागी झाली होती. एकूणच पटांगण शंकर, शिवाजी महाराज, पेशवे, कृष्ण अशा विविध वीरांनी भरून गेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तडीपारास अटक

$
0
0

नाशिक : विविध गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर तडीपार करण्यात आलेल्या संशयितास क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. मुज्जफर उर्फ सर्किट रज्जाक शेख (३५, रा. रसुल बाग कब्रस्थान, खडकाळी) असे या संशयित तडीपाराचे नाव आहे. संशयित आरोपी खडकाळी सिग्नल परिसरात येणार असल्याबाबतची माहिती पोलिस नाईक आसिफ इसाक तांबोळी यांना मिळाली होती. त्यानुसार युनिटच्या पथकाने खडकाळी सिग्नल येथे सापळा रचून तडीपार शेखला अटक केली. त्याच्याविरूद्ध भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेदिक डॉक्टरांचे नोंदणी नूतनीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील ९० हजार आयुर्वेदिक डॉक्टरांच्या नोंदणी नूतनीकरणाची प्रक्रिया महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन या आयुर्वेदीय डॉक्टरांच्या परिषदेतर्फे सुरू करण्यात आली आहे. दर पाच वर्षांनी आयुर्वेदिक डॉक्टरांना आपल्या नोंदणीचे नूतनीकरण करावे लागते. ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व आयुर्वेदिक डॉक्टरांना ही नोंदणी नूतनीकरण प्रक्रिया अनिवार्य आहे.

नोंदणी नूतनीकरण प्रक्रिया १८ एप्रिल २०१९ पर्यंत सुरू राहणार असून, mcimtatpar या अॅप्लिकेशनद्वारे काही आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन स्वरूपात नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी अर्ज भरावयाचा आहे, असे नाशिक येथील आयुर्वेद चिकित्सक वैद्य विजय कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामध्ये आपला फोटो, स्वाक्षरी, तसेच आपले वैद्यकीय व्यवसायासाठीचे प्रमाणपत्र आणि आवश्यक पदवी इत्यादी प्रमाणपत्रांचा समावेश आहे. ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर १८ एप्रिल २०१९ नंतर प्रत्येक जिल्हास्तरावर एक नोंदणी नूतनीकरण केंद्र कौन्सिलतर्फे सुरू करण्यात येणार आहे. तिथे पूर्वीचे नोंदणी प्रमाणपत्र आणि ओळखपत्र सुपूर्द करून नवीन नोंदणी प्रमाणपत्र ताब्यात घ्यायचे आहे. यासाठी दोन हजार रुपये शुल्क असून, सर्व आयुर्वेदीय डॉक्टरांनी आपल्या नोंदणीचे नूतनीकरण नियोजित वेळेमध्ये करून घ्यावे, असे आवाहन वैद्य विजय कुलकर्णी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी www.mcimindia.org.in या संकेतस्थळावर संपर्क करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवाद’ सामान्यांच्या हितातून सिद्ध होतो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'देशात शेतकरी आणि बेरोजगारीचे प्रश्न गंभीर होत चालले असताना जातीपातींचे मुद्दे उपस्थित करण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. 'राष्ट्रÑवाद' शब्दाचा चिथावणीसाठी वापर केला जात असून, भारताला राष्ट्रÑवादाचा नव्हे; तर विवेकीवाद्यांचा वारसा आहे. राष्ट्रÑवाद हा केवळ सीमेवर सिद्ध होत नसतो. आपली व्यवस्था सामान्यांच्या हिताला किती बांधली आहे, यावरून राष्ट्रÑवाद सिद्ध होतो,' असे प्रतिपादन जेष्ठ समाजवादी अभ्यासक, पुरोगामी चळवळीतील अग्रणी नेते प्रा. सुभाष वारे यांनी केले. डॉ नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ६३वे पुष्प त्यांनी 'संवैधानिक राष्ट्रवाद' या विषयावर गुंफले. सावाना परिसरातील मु. शं. औरंगाबादकर सभागृह हे व्याख्यान बुधवारी पार पडले.

वारे म्हणाले, शेतकरी घाम गाळतो, कष्टकरी कष्ट करतो तेव्हा राष्ट्रÑवाद सिद्ध होतो. मात्र, घामाचे दाम न मिळाल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत असेल तर तेथे राष्ट्रÑवाद दुबळा ठरतो. आज मात्र, पुरोगामी विचारांवर काजळ चढवून सनातन विचारधारेतून राष्ट्रवादाची व्याख्या केली जात आहे. यामुळे आत्महत्याग्रस्तांची मुले, बेरोजगार, काबाडकष्ट करणाऱ्यांना आपण कोणता राष्ट्रÑवाद शिकवत आहोत, असा प्रश्न वारे यांनी उपस्थित केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद वाघ यांनी तर सूत्रसंचालन अ‍ॅड. शामला चव्हाण यांनी केले. व्यासपीठावर सुनील संधानशिव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बससेवेसाठी चुरस

$
0
0

टाटा मोटर्स, अशोक लेलॅण्डची तयारी

...

- निविदापूर्व अर्हता बैठकीत पाच कंपन्यांनी दाखवली तयारी

- विधानसभा निवडणुकीआधीच धावणार मनपाच्या बसेस

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनपामार्फत शहर बससेवा चालविण्यासाठी काढलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, टाटा मोटर्स, अशोका लेलॅण्डसारख्या बड्या कंपन्यांनी बससेवा चालविण्याची तयारी दर्शवली आहे. बससेवेसाठी महापालिकेने बोलावलेल्या निविदापूर्व अर्हता बैठकीस टाटा मोटर्ससह पाच कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच शहर बससेवेला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

राज्य परिवहन महामंडळामार्फत तोट्यात सुरू असलेली बससेवा महापालिकेमार्फत चालविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि पालिका प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी जोमाने कामाला लागली आहे. महासभेने शहर बससेवा 'ग्रॉस कॉस्ट कटिंग' तत्त्वावर चालविण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर बससेवेचा ठेका देण्याची तयारी वेगाने सुरू केली आहे. पालिकेने यासंदर्भात एकाच वेळी निविदा काढत बससेवेच्या संचालनासाठी कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ठेकेदारामार्फत बससेवा चालविण्यासाठी पालिकेने निविदा प्रसिद्ध केली आहे. बससेवेकरिता बसेसची खरेदी व चालक पुरविण्याची जबाबदारी संबंधित मक्तेदार कंपनीची राहणार असून, प्रवासी तिकीट वसुलीसाठी वाहक नियुक्ती तसेच बसथांबे, टर्मिनल, डेपो आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची राहणार आहे. बससेवेकरिता २०० बसेस डिझेल, सीएनजीवर चालणाऱ्या तसेच इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या २०० बसेस घेण्यात येणार आहेत. डिझेल, सीएनजी तसेच इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या बसेसकरिता महापालिकेने सुरुवातीला एकच निविदा जारी केली होती. इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या बसेसचे तंत्रज्ञान नवीन असल्याने डिझेल, सीएनजीसाठी स्वतंत्र तर इलेक्ट्रीक बसेसकरीता वेगळी निविदा काढली होती. यासंदर्भात महापालिकेत बुधवारी मक्तेदार कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत निविदापूर्व अर्हता बैठक बोलावली होती. त्यात टाटा मोटर्स, अशोका ले लॅण्डसह जेबीएम कंपनी, फरिदाबाद, ओलेट्रा, हैदराबाद व आर. एन. कॅब्स मुंबई या पाच कंपन्या यांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या कंपन्यांनी बससेवा चालविण्यास इच्छुक असल्याचे सांगत काही अटी ‌व शर्ती वगळण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील निविदा आता १८ एप्रिल रोजी उघडल्या जाणार आहेत.

...

सुरक्षा अनामत रक्कम कमी करण्याची मागणी

बससेवा चालविण्यासाठी निविदेत नमूद करण्यात आलेली अनुभवाची अट कमी करण्यात यावी, बससेवा चालविण्यासाठी बसेस खरेदीची जबाबदारी मक्तेदार कंपनीचीच असणार असल्याने बससेवेकरिता महापालिकेने नमूद केलेली सुरक्षा अनामत रक्कमही कमी केली जावी. यासह अन्य काही तांत्रिक मुद्दे कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून यावेळी मांडण्यात आले. लेखी स्वरूपात म्हणणे सादर करण्याचे निर्देश मनपाच्या वतीने यावेळी संबंधितांना देण्यात आले.

....

कंपनीची नोंदणी

शहर बससेवेच्या संचालनासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या कंपनीचे 'नाशिक महानगर परिवहन कंपनी लिमिटेड' असे नामकरण करण्यात आले आहे. तशी नोंदणीही करण्यात आली आहे. एकीकडे बससेवेसाठी निविदा प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे कंपनी स्थापन झाल्याने महापालिकेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीआधीच बसेस रस्त्यावर धावतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतमोजणी केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांबरोबरच प्रशासनाने निवडणूक पारदर्शक व्हावी, यासाठी जोरदार तयारी केली आहे. गुरुवारी सुटीच्या दिवशीही जिल्हाधिकारी सूरज मांढरे व पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी मतमोजणी केंद्र असलेल्या अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामास भेट देऊन पाहणी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीचा भाग म्हणून ही भेट असली तरी त्यासाठी या अधिकाऱ्यांनी सुटीचा दिवस निवडला. नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी अंबड येथील गोदाम येथे २३ मे रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने सदर मतमोजणी केंद्रांत मतदान केंद्रातून येणाऱ्या मतपेट्यांची वाहतूक व पार्किंग व्यवस्था, अग्निशमन तसेच विद्युत व्यवस्था, मतमोजणी केंद्रात पुरेशी हवा व प्रकाश व्यवस्था, इंटरनेट सुविधा तसेच मतमोजणीच्या वेळी होणाऱ्या गर्दीच्या नियंत्रणाबाबत कायदा व सुव्यवस्था याबाबींचा यावेळी आढावा यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे संबंधित यंत्रणा अधिकाऱ्यांना त्याबाबत जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांनी सूचना दिल्या.

मतमोजणी केंद्र पाहणीच्या वेळी अपर जिल्हाधिकारी गितांजली बाविस्कर, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या उपमहानिरीक्षक सरिता नरके, कार्यकारी अभियंता सिध्दार्थ तांबे, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी कुंदन सोनवणे, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले, अमोल तांबे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश थविल आदी अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनच्या आमिषाने गमावले दागिने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेन्शन सुरू करून देतो, असे सांगणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीच्या आमिषाला फसून वृद्धेला स्वत:सह नातेवाइकांच्या दागिन्यांनादेखील मुकावे लागले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलारा इश्तियाक घासी (वय ६५, रा. बुखारी शाह दर्गाहजवळ, चांदवड) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. घासी यांचे माहेर बागवानपुरा येथे असून, विविध कामांमुळे त्या सतत माहेरी येतात. २० मार्च रोजी त्या माहेरी आल्या होत्या. बुधवारचा बाजार असल्याने त्या खरेदीसाठी बाजारात गेल्या. तेथे त्यांना एक अनोळखी व्यक्ती भेटली. तुम्हाला पेन्शन सुरू करून देतो, असे सांगत त्याने घासी यांच्याशी ओळख वाढवली. लागलीच सिव्हिल हॉस्पिटलला चला, असे म्हणून तो घासी यांना घेऊन गेला. तेथे तो एकटाच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेला. पाच मिनिटांनी बाहेर पडलेल्या भामट्याने घासी यांना तुमचे आधार कार्ड, तसेच गॅरंटी म्हणून तुमचे काही दागिने दाखवावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर संशयित आणि घासी दोघे बागवानपुरा येथे आले. तेथे संशयित घासी यांच्या घराबाहेरच थांबला. लवकरात लवकर आले तर काम होईल, असेही त्याने सांगितले. घरी परतलेल्या घासी यांनी आपल्यासह इतर नातेवाइकांचे दागिने जमा केले आणि आधार कार्ड घेऊन त्या संशयिताकडे परतल्या. यावेळी घरातील कुटुंबीयांनी त्यांना थांबवलेसुद्धा. मात्र, पेन्शन मिळण्याचे आमिष समोर असल्याने त्या थांबल्या नाहीत.

--

फसवणुकीची झाली जाणीव...

घरातून दागिने घेतल्यावर संशयित घासी यांना घेऊन ठक्कर बाजार येथे आला. तुम्ही येथेच थांबा, असे सांगून त्याने दागिने आणि आधार कार्ड असलेली पिशवी स्वत:कडे घेतली. या पिशवीत तीन तोळे वजनाची सोन्याची पोत, तीन ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग, पाच ग्रॅम सोन्याची पोत, तसेच पाच ग्रॅमची अंगठी असा एक लाख सात हजारांचा मुद्देमाल होता. पिशवी हातात पडताच पाच मिनिटांत आलो असे म्हणून संशयित निघून गेला. एक ते दीड तासानंतरही तो परत न आल्याने घासी यांना फसवणुकीची जाणीव झाली. त्यानंतर त्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात पोहोचल्या. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक नाईद शेख तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विहिरीत पडलेल्या बिबट्याची ३ तासांनी सुटका

$
0
0

नाशिक

आज (शुक्रवारी) पहाटे साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुमारे तीन तासांनंतर सुखरूप सुटका करण्याच आली. सावज आणि पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या पहाटे नांदूरमध्यमेश्वर येथील एका विहिरीत पडला होता. बिबट्या विहिरीत पडल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वनविभागाला कळविले. वनविभागाच्या बचाव पथकाने सकाळी ९ वाजता बिबट्याला बाहेर काढत पिंजऱ्यात जेरबंद केले.

दरम्याम बिबट्याला जखम झाली असून, त्याच्यावर निफाड पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरु आहेत.नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर येथील शेतकरी राजेंद्र पंढरीनाथ नाईकवाडे यांच्या विहिरीत पहाटे साडेचारच्या दरम्यान सावज आणि पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत कोसळला. विहिरीत पडल्यावर तो जोरजोरात डरकाळ्या फोडू लागला. त्यानंतर नाईकवाडे यांनी लागलीच वनविभागाला कळविल्यानंतर वनपरीक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत क्रेन सोडून बिबट्याला बाहेर काढण्यात आले. सकाळी ७ पासून सुरु झालेले रेस्क्यू ऑपरेशन ९.१५ च्या दरम्यान संपले. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले.

68518788


बिबट्याला जखम झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला पिंजऱ्यात टाकून निफाड पशुवैधकीय दवाखान्यात नेण्यात आले आहे. वैद्यकीय आधिका-यांकडून बिबट्याची तपासणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान न केल्यास ३५० रुपये वजा होणार नाहीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणुकीत कुणी काय शक्कल लढवेल, याचा भरवसाच नसतो. कधी मतदारांना आमिष दाखवले जाते, तर कधी भीती. यामुळे निवडणूक आयोगाला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. यावेळी तर कमालच झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकडे पाठ फिरवली तर मतदारांच्या बँक खात्यातून ३५० रुपये वजा होणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याबाबत विचारणा होऊ लागल्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेला स्पष्टीकरण द्यावे लागले. या पोस्टमध्ये काहीही तथ्य नसून, हा निव्वळ खोडसाळपणा असल्याचे शुक्रवारी स्पष्ट करावे लागले.

मतदान हा भारतीय लोकशाही व्यवस्थेने प्रत्येक पात्र भारतीय नागरिकाला दिलेला अधिकार आहे. निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मतदारांना आवश्यक सुविधा पुरविण्यासह त्यांची गैरसोय टाळण्याकडेही निवडणूक आयोगाचा कटाक्ष असतो. मतदानाचा अधिकार बजावता यावा, याकरिता सरकारी तसेच खासगी आस्थापनांसह सर्वांनाच सुटीही दिली जाते. सुटी देणे शक्य नसेल, तर मतदानासाठी काही तासांची सवलतीची तजवीजही नेहमीच करण्यात आली आहे. तरीही मोठ्या संख्येने मतदार मतदानाच्या कर्तव्याकडे पाठ फिरवितात हे वास्तव आहे.

मतदान न करणाऱ्या मतदारांबाबत आयोग कठोर भूमिका घेणार असल्याची पोस्ट व्हॉट्सअॅप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर व्हायरल झाली. मतदान न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध एक आदेश आयोगाने जारी केला असून, मतदान न करणाऱ्या व्यक्तींची ओळख आधारकार्डद्वारे होणार आहे. मतदारांचे कार्डद्वारे लिंक असलेल्या बँकेतून ३५० रुपये वजा होणार असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने यांसदर्भात सर्वच सरकारी बँकांना आदेश दिले असून, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीदही सर्व बँकांना दिल्याचे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. देशातील सर्वच मतदार मतदानाचा हक्क बजावतील असे गृहीत धरून मतदान प्रक्रियेची तयारी करण्यात येते. त्यामुळे जे मतदार मतदानाचा हक्क बजावत नाहीत, त्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने केलेला खर्च व्यर्थ जातो. प्रत्येकी एका मतदानासाठी आयोगाला ३५० रुपये खर्च येतो. म्हणूनच, जो मतदार मतदान करणार नाही, त्याच्याकडून निवडणूक आयोग ३५० रुपये वसूल करेल, असे या पोस्टमध्ये म्हटल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली.

जिल्हा निवडणूक विभागाशी संपर्क साधून अनेक नागरिकांनी या पोस्टबाबत शहानिशा केली. सोशल मीडियावर पसरविण्यात आलेल्या पोस्टमध्ये तथ्य नाही. मतदान हा आपला हक्क असून, प्रत्येकाने तो बजावावा.

- अरुण आनंदकर, जिल्हा उप निवडणूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकाटेंचा बंडाचा झेंडा

$
0
0

अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार

...

म..टा.खास प्रतिनिधी,नाशिक

भाजपपाठोपाठ शिवसेनेकडूनही उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी अखेर बंडाचे निशान फडकावले आहे. कोकाटेंनी अपक्ष निवडणूक लढवण्याची मानसिकता तयार केली आहे. दोन दिवसात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ते आपली उमेदवारी जाहीर करणार आहेत. त्यामुळे युतीच्या उमेदवारासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. परंतु, शिवसेनेने विद्यमान खासदार गोडसे यांच्या नावालाच पसंती दिल्याने कोकाटे यांनी आता अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर कोकाटे यांनी मतदारांसह आपल्या समर्थकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. शिवसेना आणि भाजप युती होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश कोकाटे यांना दिले होते. त्यानुसार कोकाटे यांनी तयारीही सुरू केली होती. परंतु, युती झाल्याने कोकाटे यांची कोंडी झाली. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोकाटे यांना सबुरीचा सल्ला दिला होता. कोकाटे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले होते. परंतु, ही शक्यता मावळल्यानंतर कोकाटे यांनी अधिकृतपणे अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षांनीच शिवसेना उमेदवारासमोर बंडाचा झेंडा फडकावल्याने नाशिकची निवडणूक चुरशीची होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इतिहास घडणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघात अंतर्गत विरोधाला थारा न देता शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली. नाशिक लोकसभा मतदारसंघात खासदार रीपीट होत नाही, हा इतिहास आहे. मात्र, गोडसे यांना या मतदारसंघात इतिहास घडविण्याची संधी असेल. मात्र, त्यांच्यासमोर विरोधकांबरोबरच पक्षांतर्गत व मित्र पक्षातील नाराजी दूर करण्याचे आव्हानसुद्धा आहे. तसेच, राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनाही विजय मिळवून नवा इतिहास निर्माण करण्याची संधी आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे गोडसे यांना पुन्हा संधी मिळणार नाही, अशी चर्चा होती; पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही गटबाजी रोखण्यासाठी पंधरा दिवस अगोदर मुंबईत इच्छुकांची बैठक घेऊन मनोमिलन घडवून आणले होते. त्या वेळी ज्याला पक्षातर्फे उमेदवारी मिळेल, त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय सर्वांनी घोषितही केला. त्यानंतरही त्यांचा विरोध कमी झाला नाही. मात्र, या मनोमिलनाचा आता गोडसे यांना फायदा होणार आहे. त्यानंतर नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या दोन्ही पक्षांच्या मनोमिलन मेळाव्यामुळे भाजपशी असलेली दुरीसुद्धा संपली. त्यामुळे गोडसे यांना प्रचार करणे सोपे जाणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार पुन्हा निवडून येत नसल्याचे आतापर्यंत घडले आहे. त्यामुळे गोडसे यांना मतदार पुन्हा संधी देईल का, या प्रश्नाचे उत्तर निवडणुकीच्या निकालानंतरच मिळणार आहे. तूर्त तरी खासदार गोडसे यांना त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांच्याबरोबर निवडणुकीच्या रिंगणात संघर्ष करावा लागणार आहे.

...

पराभवाचे उट्टे काढले

समीर भुजबळ यांनी गोडसे यांचा २००९ मध्ये पराभव केला होता; पण त्या वेळी गोडसे यांना मनसेकडून उमेदवारी मिळाली होती. सन २०१४ मध्ये शिवसेनेकडून लढताना गोडसे यांनी या पराभवाचे उट्टे काढत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा पराभव करीत विजय मिळवला होता. नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ कुटुंबीयांच्या उमेदवाराबरोबर तिसऱ्यांदा खासदार हेमंत गोडसे यांचा सामना होणार आहे. दोन निवडणुकीत एक पराभव एक विजय त्यांनी मिळवला आहे. त्यामुळे तिसऱ्या निवडणुकीत मतदार काय कौल देतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोठारी शाळेत जलदिन

$
0
0

कोठारी कन्या शाळेत जलदिन

नाशिकरोड : जलदिनाच्या निमित्ताने जेलरोडच्या कमलावती कोठारी मुलींची प्राथमिक शाळा आणि कुसुमबेन कोठारी मुलींचे शिशुवृंद या शाळेत पाणी बचत या विषयावरील विद्यार्थी हस्तलिखिताचे अनावरण शालेय समितीचे अध्यक्ष विश्वास बोडके यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्याध्यापिका सुरेखा बोकडे उपस्थित होत्या. विश्वास बोडके यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना पानी बचतीचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिकांनी जल प्रतिज्ञेद्वारे पाणी बचतीची शपथ दिली. शालेय परिसरात फेरी काढून पाणी बचतीचा संदेश दिला. नागरिकांना जलदुत संदेशाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींनी पाणी बचत या विषयावर पथनाट्य सादर केले. जलसाक्षरता विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या जलचित्रांचे शाळेत प्रदर्शनही भरविण्यात आले. या प्रदर्शनास स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनाच्या धडकेने तरुण ठार

$
0
0

सिन्नर : डुबेरे येथील सुनील उत्तम वाजे (वय २५) हा तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. सुनील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील केएसबी कंपनीत कामाला होता. रात्री बारा वाजता सुटी झाल्यानंतर नाशिक-पुणे बायपासमार्गे दुचाकीने (एमएच १५ बीएच ५०९७) परतत असताना सरदवाडी जवळील पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. मित्रांनी त्याला खासगी दवाखान्यात हलवले मात्र सुनीलचा जागेवरच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या पश्चात आई, वडील मोठा भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक निरीक्षकांनाही आचारसंहिता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासह पूर्ण मतदानप्रक्रियेच्या निरीक्षणासाठी येणार असलेल्या निरीक्षकांनाही निवडणूक आयोगाने यंदा आचारसंहिता ठरवून दिली आहे. त्यांनी ही आचारसंहिता पाळणे अनिवार्य असून, त्यामुळे अशा निरीक्षकांचे हट्ट पुरविण्याच्या कटकटीपासून जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची सुटका होणार आहे.

निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. हा उत्सव सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी सर्वच घटकांची असते. मात्र, तरीही आचारसंहिता भंगासारख्या प्रकाराच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पाडण्यात अडथळे निर्माण होत असतात. प्रशासनाच्या कार्यवाहीसह एकूणच निवडणुकीच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांची नेमणूक केली जाते. मात्र, या निरीक्षकांना अतिथीसारखी वागणूक द्यावी लागते. त्यांना काय हवे काय नको हे पाहून लाड पुरवावे लागतात. मात्र, निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या अधिकाऱ्यांची त्यामुळे कोंडी होते. वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू असल्याने निरीक्षकांच्या कार्यपद्धतीबाबत निवडणूक आयोगाला देशभरातून तक्रारी प्राप्त झाल्या. अशा तक्रारींची दखल घेऊन यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासूनच आयोगाने निरीक्षकांनाही आचारसंहिता लागू केली आहे. निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून निरीक्षकांनी त्यांची जबाबदारी पार पाडावी. त्यांच्याकडून शिस्त, तसेच नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश या आचारसंहितेमधून देण्यात आले आहेत. निरीक्षकांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवित जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. निरीक्षक म्हणून मतदारसंघात जाणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या पार्टीमध्ये सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. उच्चभ्रू राहणीमान वगळून साधेपणाचा अंगीकार करावा, निरीक्षणाचा अचूक अहवाल आयोगाला पाठवावा, असे आदेशही निवडणूक आयोगाने या आचारसंहितेच्या माध्यमातून निरीक्षकांना दिले आहेत.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या निरीक्षणासाठी ३१ मार्चनंतर टप्प्याटप्प्याने १२ निरीक्षक नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. त्यांना सहकार्य करण्यासाठी नाशिकमधील विविध विभागांच्या वर्ग एक व दोनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थोडक्यात -

$
0
0

'माय लाइफ' उपक्रम (स्कूलमेट)

नाशिक : गोसावी बहुउद्देशीय संस्थेतर्फे इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात 'माय लाइफ' उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थिनींना मासिक पाळी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थिनींमधील मासिक पाळीचे समज गैरसमज यांवर चर्चा केली गेली. संस्थेच्या अध्यक्षा सुनीता गोसावी यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या दिवसांत शारीरिक स्वच्छता आणि प्रकृतीची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. वैद्यकीय तत्वांवर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. मुख्याध्यापिका अस्मिता कटारे, संस्थेचे सचिव विनोद गोसावी, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी शुभम पगारे यावेळी उपस्थित होते.

--

शक्ती अकादमी तर्फे निबंध स्पर्धा (थोडक्यात)

नाशिक : जागतिक जलदिनाचे औचित्य साधून शक्ती विकास अकादमीतर्फे 'जल हेच जीवन' या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष मनोहर जगताप व सचिव मनीषा जगताप यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेत सागर शिंदे प्रथम, दिलीप राठोड द्वितीय तर गुडलक राय यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. दुष्काळी परिस्थिती पाणी संवर्धनाची मोहीम तरुणांनी हाती घेण्याचे आवाहन त्यानिमित्त मनोहर जगताप यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी चोरट्यांवर मनमाडमध्ये गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शहरात भीषण पाणी टंचाई असताना व नागरिकांना २७ दिवसाआड पाणी मिळत असताना पालिकेच्या जलवाहिनीवरून बेकायदेशीररित्या पाणी चोरी होत असल्याचा प्रकार मनमाड पालिका प्रशासनाने उघडकीस आणला. पाणी चोरी करणाऱ्या नगर चौकी भागातील तिघांविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी या बाबत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. संशयितांविरुद्ध लवकरच गुन्हा दाखल होईल असे पालिकेचे मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर यांनी सांगितले.

मनमाड शहरावर पाणीटंचाईचे सावट आहे. पालखेडच्या आवर्तनातून थोडा दिलासा मिळत असतानाच पालिकेच्या कॅम्प विभागातून नगर चौकी विभागाकडे पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व उघडून अवैधरित्या पाण्याची चोरी होत असल्याचा प्रकार पालिका कर्मचाऱ्यांनी उघडकीस आणला. या ठिकाणी सुनील खाडे, दिलीप खाडे, रमेश खाडे यांनी व्हॉल्व्ह लिक करून आपल्या विहिरीत पाणी साठवल्याचे निदर्शनास झाले.गुरुवारी याबाबत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. मनमाड शहराची पाणीस्थिती पाहता व आवर्तनासाठी संघर्ष करून लाखो रुपये खर्चून शहराला पाणीपुरवठा होत असताना अशाप्रकारे जर कोणी पाणी चोरी करीत असेल तर ते योग्य नाही. त्यामुळे संशयितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी फिर्याद डॉ. मेनकर यांनी पालिका प्रशासनाच्या वतीने पोलिस ठाण्यात दिली आहे.

पाणीटंचाईच्या काळात पाणी चोरी करणे दुर्दैवी आहे. असे प्रकार करणाऱ्यांवर पालिका प्रशासन कठोर कारवाई करणार आहे. फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना धडा शिकवला जाणार आहे.

--डॉ. दिलीप मेनकर, मुख्याधिकारी, मनमाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट न्यूज १

$
0
0

शिल्प कारागीर ट्रेडच्या

परीक्षार्थींना आवाहन

नाशिक : शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत जानेवारी-फेब्रुवारी २०१९ या कालावधीत झालेली अखिल भारतीय व्यवसाय सत्र परीक्षा सत्र एक ते चारमधील नियमित व पुनर्परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती. परीक्षेत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे ई-मेल आयडी व मोबाइल नंबर एनसीव्हीटी एमआयएस पोर्टवर पडताळणी होतील, अशाच प्रशिक्षणार्थ्यांचे इंजिनीअरिंग व ड्रॉइंग व प्रात्यक्षिक विषयांचे गुण एनसीव्हीटी एमआयएस पोर्टलवर अपलोड होणार असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी कळविले आहे. ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर येथे प्रवेश घेतला आहे, अशा प्रशिक्षणार्थ्यांनी याबाबत तत्काळ कार्यवाही करावी. संबंधित प्रशिक्षणार्थ्यांचा निकाल प्रलंबित राहिल्यास अथवा भविष्यात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास संस्था जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अप्रेंटिस भरती मेळावा २६ ला

नाशिक : सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता अप्रेंटिस भरती मेळावा होणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांचे प्रतिनिधी अप्रेंटिसशिप भरतीसाठी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. जे उमेदवार आयटीआय व एमएसबीव्हीई उत्तीर्ण आहेत अशा उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन अंशकालीन प्राचार्य व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रातर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा प्रवाशाची तिघांकडून लूट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

परराज्यातील प्रवाशाला बळजबरीने रिक्षात कोंबून व चाकूने वार करीत त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाइल असा १८ हजार ७०० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना नाशिकरोड येथे घडली. या घटनेत राजकुमार सिंग (वय २७, रा. वावी, ता सिन्नर) हा प्रवासी जखमी झाला आहे.

मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला राजकुमार सिंग हा सध्या समृद्धी हायवे साइटवर काम करतो. बुधवारी रात्री राजकुमार सिंग रेल्वेने आपल्या गावावून नाशिकरोड रेल्वे स्टेशनला उतरला. वावी येथे जाण्यासाठी तो शिवाजी पुतळ्याकडे रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून आलेल्या रिक्षाचालकाने राजकुमार पुढे रिक्षा आडवी उभी केली. यावेळी रिक्षातील अन्य दोघांनी राजकुमारला धरून बळजबरीने रिक्षात कोंबून बिटको हॉस्पिटलजवळील भाजी मार्केटच्या अंधार असलेल्या ठिकाणी नेऊन मारहाण केली. त्याच्या खिशातील रोख ५ हजार ७०० रुपयांची रक्कम काढून घेतली. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने राजकुमारकडील १३ हजार रुपये किमतीचा मोबाइलही हिसकावून घेतला. परंतु, मोबाइलला लॉक कोड असल्याने त्यांना सुरू करता आला नाही. त्यामुळे त्यांनी राजकुमारकडे मोबाइलचा कोड विचारला. परंतु, राजकुमारने त्यास नकार देताच तिघांपैकी एकाने राजकुमारच्या खांद्यावर व पाठीवर चाकूने वार करून गंभीर जखमी करीत घटनास्थळावरून पोबारा केला. जखमी राजकुमारने दुसऱ्या दिवशी नाशिकरोड पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ दुकानात महिलांची हातचलाखी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील सटाणा रोडवरील शिवाजी रामचंद्र ज्वेलर्स या सराफ दुकानातून दोन अज्ञात महिलांनी चैन खरेदीच्या नावाने २१ ग्रॅमची ६७ हजार २०० रुपयांची सोन्याची चैन लंपास केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी सराफ दुकानदार राजेंद्र शिवाजी पवार (वय ४९, रा. संगमेश्वर, मालेगाव) यांनी छावणी पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. १४ मार्च रोजी दुपारच्या वेळी हा चोरीचा प्रकार घडला. दोन अज्ञात महिला एका अनोळखी लहान मुलासोबत सोन्याची चैन खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आल्या होत्या. त्यावेळी दुकानातील कर्मचारी कैलास आहेर यांनी त्यांना सोन्याची चैन दाखवीत असताना त्या महिलांनी ती चैन गळ्यात घालून पाहत एकमेकांना दाखवत अहिरे यांची नजर चुकवली. व आपल्या पर्सच्या खाली ती चैन लपवून लंपास केली. दरम्यान १५ मार्च रोजी सकाळी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहताना हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. पवार हे खासगी कारणाने बाहेरगावी असल्याने गुरुवारी परत आल्यावर पवार यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विवाहितेचा छळ

मालेगाव : माहेरून ट्रक घेण्यासाठी १० लाख रुपये घेऊन यावेत या कारणासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह अन्य तिघांवर येथील छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती हितेश साहेबराव मोरे (रा. सोयगाव, मालेगाव) व सासरे, दीर यांनी विवाहित सासरी नांदत असताना तिला माहेरून ट्रक घेण्यासाठी १० लाख रुपये घेवून येण्याचे कारण पुढे करून मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत पैसे आणले तरच तुला नांदवू अन्यथा ठार मारू, असा दम देत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images