Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आरक्षित जागा बनताहेत अवैध धंद्यांचे आगार

0
0

एसटी महामंडळाच्या दत्त मंदिर रस्त्यावरील जागेचा प्रश्न ऐरणीवर

...

- पंचवीस वर्षांपासून जागा पडून

- बाभूळवनात दिवसभर जुगार व मटका अड्डे सुरू

- महिला छेडछाडीच्या घटनांत वाढ

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

स्मार्ट सिटीच्या दिशेने नाशिकची वाटचाल सुरू असली तरी विविध शासकीय विभाग आणि पालिका प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे शहरातील बकालपण कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. यामुळे निर्माण झालेल्या समस्यांनी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकरोड येथे कचरा पेटवून त्यात स्वतःला जाळून घेत एका ज्येष्ठ नागरिकाने नुकतीच आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना ज्या ठिकाणी घडली ती जागा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासाठी आरक्षित आहे. महामंडळ प्रशासनाने ही जागा वाऱ्यावर सोडल्याने गेल्या काही वर्षांपासून येथे गुन्हेगारीचे पीक फोफावले आहे. महामंडळाचे या जागेकडे होत आलेले दुर्लक्षच या गैरप्रकारांसाठी कारणीभूत ठरत आहे.

मनपा शाळा क्रमांक ५७ च्या मैदानालगत दत्त मंदिर रस्त्यावर एसटी महामंडळाची पाच एकर आरक्षित जागा आहे. ही जागा गेल्या २५ वर्षांपासून रामभरोसे पडून आहे. महामंडळाकडून या जागेचा काहीही वापर होत नाही. परिणामी या जागेवर बाभूळवन उभे राहिले आहे. याशिवाय या जागेचा वापर कचरा, डेब्रिज टाकण्यासाठी आणि शौच विधीसाठीही होताना दिसतो. महामंडळाकडून या जागेकडे दुर्लक्ष झाल्याने ही जागा डंपिंग ग्राऊंड बनली आहे. याच ठिकाणी साचलेला कचरा पेटवून त्यात त्र्यंबक लोहकरे या ज्येष्ठ नागरिकाने स्वतःला जाळून घेत रविवारी (दि. १७) आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने एसटी महामंडळाच्या जागेमुळे नागरिकांच्या सुरक्षेलाच बाधा निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. एसटी महामंडळ प्रशासनही आपल्याला काही घेणे देणे नसल्याच्या अविर्भावात कामकाज करीत आहे.

...

गुन्हेगारीचा अड्डा

एसटीची येथील वापराविना पडून असलेली जागा गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारांचा आणि अवैध धंद्यांचा अड्डाच बनली आहे. या ठिकाणी वाढलेल्या बाभूळवनात दिवसभर जुगार व मटका अड्डे सुरू असतात. काही दिवसांपूर्वी याच दाट झाडीत एका बालिकेवर बलात्काराची गंभीर घटना घडली होती. या झाडीच्या आडोशाला दररोज मद्यपी ठाण मांडून बसलेले असतात. येथून जाणाऱ्या महिलांना कायमच मद्यपी आणि टवाळखोरांकडून होणाऱ्या छेडछाडीचा सामना करावा लागतो. पायवाटेने जाणाऱ्या महिलांना वाटेत अडवून झाडीत ओढून नेण्याचे प्रकारही यापूर्वी घडलेले आहेत. या गैरप्रकारांनी कळस गाठलेला असल्याने सभोवताली वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

...

महामंडळाच्या जागेवर कचरा, डेब्रिज टाकणाऱ्यांचा शोध घेतला जाईल. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यासाठी पालिका प्रशासनाशीही समन्वय साधणार आहे. या आरक्षित जागेला वॉल कंपाऊंड करण्याचे प्रस्तावित आहे.

- नितीन मैंद, विभागीय वाहतूक नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांमुळे पाणी उशिराने

0
0

मनमाड बचाव समितीचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पालखेडच्या आवर्तनातून पाटोदासाठी पाणी नेण्याचा हट्ट केला नसता तर मनमाडकरांवर पाण्यासाठी हिंडण्याची वेळ आली नसती. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बेपर्वाइमुळे पाणी मिळण्यास उशीर झाल्याचा आरोप मनमाड बचाव समितीने केला आहे. दरम्यान मनमाड शहराला पालखेड आवर्तनातून सुटलेल्या पाण्यातून पाटोदा साठवणूक तलाव भरण्याचे व तेथून वागदर्डी धरणात पाणी घेण्याचे काम युद्ध पातळीवरून सुरू आहे.

शहरासाठी पालखेडचे आवर्तन सुटण्यास उशीर झाल्याने शहरातील पाणीपुरवठा नियोजन कोलमडले आहे. सध्या आवर्तनासाठी ३ पंपाद्वारे पाणी घेतले जात आहे. पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे, अशी मागणी पालिका प्रशासनाने केली आहे.

पाणीपुरवठा तीन ते चार दिवस लांबल्याने मनमाडकरांना पाणी टंचाईशी सामना करावा लागत आहे. २० ते २२ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा सव्वीस दिवसांवर गेल्याने साठवलेले पाणी तरी किती दिवस टिकवायचे व कसे वापरायचे? असा प्रश्न महिला वर्गाला पडला आहे. पाणी मिळविण्यासाठी शहरवासियांची धडपड सुरू आहे. हातपंप, बोअरवेल, पाण्याची टाकी या ठिकाणाहून पाणी घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान पाटोदासाठी आवर्तन देण्यास विलंब झाला नसता तर मनमाडकरांवर पाण्यासाठी हिंडण्याची वेळ आली नसती. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बेपर्वाइमुळे पाणी मिळण्यास उशीर झाल्याचा आरोप मनमाड बचाव समितीने केला आहे. दरम्यान वागदर्डी धरण आवर्तनातून मोठ्या प्रमाणावर भरून घेऊन पाणी पुरवठ्याचे दिवस कमी करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोसला परिवाराने जागविल्या पर्रीकरांच्या स्मृती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून सैनिकी शिक्षणासाठी देशात लौकिक असणाऱ्या सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला कॅम्पसने आजवर देशातील दिग्गजांशीही ऋणानुबंध जुळवून ठेवले आहेत. देशातील नामवंत राजकारणी, नेते आणि विविध क्षेत्रात उंची गाठलेल्या अनेकांचे स्वागतही 'भोसला'च्या आवाराने केले आहे. मात्र, या सर्व दिग्गजांच्या मांदियाळीत गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या स्मृती जागविताना भोसला परिवार भावूक झाला.

देशाचे संरक्षणमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पर्रीकरांनी भोसला शिक्षण संस्थेच्या आवाराला भेट देत सैनिकी विद्यार्थ्यांनी दिलेली मानवंदना स्वीकारली होती. भोसला कॅम्पसची पाहणी करताना संस्था पदाधिकाऱ्यांना त्यांच्या शब्दांनी दिलेले प्रोत्साहन अन् कॅम्पसमधील रामदंडी विद्यार्थ्यांबाबत व्यक्त केलेला आशावाद, अद्याप या संस्थेतील विविध घटकांच्या डोळ्यांसमोर चित्र बनून उभा आहे.

काही वर्षांपूर्वी ते नाशिकमध्ये भोसला कॅम्पसमध्ये आले असता सीएचएमई सोसायटीचे माजी अध्यक्ष वसंत बेडेकर, विद्यमान कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, संस्थेचे नाशिक विभागाचे तत्कालीन सहकार्यवाह आणि विद्यमान सदस्य आशुतोष रहाळकर आदींनी त्यांचे स्वागत अन् सत्कार केला होता. सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांना मानवंदनाही दिली होती. पर्रीकर यांनी 'भोसला'चे संस्थापक धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले होते.

देशाच्या सामरिक क्षेत्रासमोरील आव्हाने लक्षात घेऊन सीएचएमई सोसायटीने काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने कान्होजी आंग्रे मेरीटाइम रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. या इन्स्टिट्यूटतर्फे मुंबईत 'अॅन अॅस्पेक्ट्स ऑफ ब्लू इकॉनॉमी ऑफ इंडिया इन ओशिनिक थिएटर' या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटनही देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री पर्रीकर यांच्या हस्ते झाले होते. या मंचावरून त्यांनी विचार करताना भोसला परिवाराच्या योगदानाचाही गौरवास्पद उल्लेख केल्याच्या आठवणी संस्था पदाधिकाऱ्यांनी जागविल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्रीकरांच्या साधेपणाने भारावले होमगार्ड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकांनी निवडून दिल्यानंतर सरपंच किंवा नगरसेवकपदाचे लेबल चिकटताच संबंधितांचा तोरा वाढल्याचे पहावयास मिळते. परंतु, देशाच्या संरक्षणमंत्रीपदासह विविध जबाबदाऱ्या लीलया पेलणाऱ्या मनोहर पर्रीकर यांचा साधेपणा नाशिककरांनाही भावला. काही कार्यक्रमांच्या निमित्ताने पर्रीकर यांचे नाशिकमध्ये येणे झाले. त्या प्रत्येकवेळी पर्रीकर यांच्या साधेपणाची नाशिककरांना भुरळ पडली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भगूर येथील जन्मस्थानी एका कार्यक्रमानिमित्त पर्रीकर आले होते. त्यावेळी काही होमगार्ड मागण्या मांडता याव्यात यासाठी तेथे येऊन थांबले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी एका सुरक्षारक्षकाकडे पर्रीकर साहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सुरक्षा रक्षकाने पर्रीकर यांना याबाबत सांगितले. पर्रीकर लगेच चालत त्यांच्याजवळ आले. रस्त्याने चालताना त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे, खासदार संजय राऊत, नगरसेवक सुधाकर बडगुजर असे अनेकजण उपस्थित होते. त्यांनी होमगार्डसचे निवेदन स्वीकारले अन् गांभीर्याने वाचलेही. ३६५ दिवस रोजगार मिळणे हा तुमचा अधिकार आहे. आम्ही गोव्यात होमगार्डला वर्षभर काम देतो. तुम्हालाही ते मिळावे यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतो, अशी ग्वाही त्यांनी दिली. स्वीय सहायकाला याबाबत नोंद घेण्यास सांगितले. पर्रीकर यांच्या या आश्वासक दिलाशामुळे आम्हाला हायसे वाटल्याची भावना नितीन गुणवंत, माधुरी दिवे, नसरीन खान, शबाना खाटिक, संजय जगताप, विलास सोनवणे, राजेश जाधव, पंकज ठाकूर यांसारखे होमगार्डस व्यक्त करतात.

आम्ही होमगार्ड सैनिक आहोत, असे समजल्यानंतर पर्रीकर साहेबांनी आमच्याशी संवाद साधला. तोही अस्खलित मराठी भाषेत. सर्वसामान्यांच्या खांद्यावर हात ठेऊन बोलणारा असा संरक्षणमंत्री पाहिला नाही. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते, याचाही खूप हेवा वाटतो.

- नितीन गुणवंत, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य होमगार्ड समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिबंदी कागदावरच

0
0

शहरात होतेय सर्रास विक्री

…..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम, २००६ नुसार महाराष्ट्रात प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री, साठवण, तसेच थर्माकॉल इत्यादींच्या वापरावर पूर्ण बंदी घातली. १५ मार्च २०१८ रोजी याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला एक वर्ष होऊनही राज्यात सर्वत्र प्लास्टिक बंदी झालेली नसल्याचे दिसून येत आहे.

प्लास्टि बंदीमुळे राज्यात प्रदूषणमुक्ती होईल अशी पर्यवरणप्रेमींची समजूत होती मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. प्रदूषण नियंत्रण महामंडळ व महापालिका यांनी बंदी घातल्यानंतर तात्पुरती कारवाई करण्याचा देखावा केला. भाजी बाजारातील छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करून बक्कळ दंडाची रक्कम वसूल केली. या दंडाच्या पावत्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लोकांमध्ये फिरवून दुकानदारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र मोठ्या प्लास्टिक विक्रेत्यांना कारवाईपासून दूर ठेवले. लोकांनीही कारवाईच्या भीतीने सुरुवातीचे काही दिवस कागदी पिशव्यांचा वापर सुरू केला. मात्र काही दिवसातच बंदी घालण्यात आलेल्या कमी मायक्रोनच्या पिशव्या बाजारात पुन्हा दिसू लागल्या. आज नाशिक शहराचा विचार केल्यास ज्या प्लास्टिक पिशव्यांना बंदी घालण्यात आली होती, त्या पिशव्या बाजारात सर्रास विकत मिळत आहेत.

…..

महापालिका ढिम्म

राज्य सरकारच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेने सहा विभागांतील प्रत्येकी दोन या प्रमाणे १२ अशासकीय सदस्य घेऊन प्लास्टिक व्यवस्थापन व नियोजन समिती गठीत केली. या समितीच्या सुरुवातीला दोन बैठका झाल्या, मात्र त्यानंतर महापालिकेने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे या समितीचे कामकाजही ठप्प आहे.

…..

नदी प्रदूषणाचे काम करताना अनेक ठिकाणी पिशव्यांचे ढीग साचलेले दिसत आहेत. महापालिकेत अनेकदा तक्रार करून याची दखल घेतली जात नाही. बाजारात सध्या सर्रास प्लास्टिक पिशव्या विक्री होत आहेत.

- अमित कुलकर्णी, कार्यकर्ता, गोदा सवर्धन मोहीम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होळी पौर्णिमेसाठी शहरात सज्जता

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

फाल्गून महिन्याच्या शेवटच्या दिवशी (दि. २० मार्च) साजऱ्या होणाऱ्या होळीसाठी तरुणाई सज्ज झाली असून, गल्लोगल्ली खड्डे खणून ठेवण्यात आलेले आहेत. होळीसाठी गेल्या महिनाभरापासून लाकडे जमविण्याची तयारी तरुणवर्गाने केली होती. उद्या मोठ्या जल्लोषात हा सण साजरा होणार आहे.

नाशकात सर्वात मोठी होळी गोपाळ मंगल कार्यालयाजवळ सरदार चौकात पेटवली जाते. याठिकाणी नैवेद्य दाखविण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. त्यापाठोपाठ नेहरू चौक, रविवार कारंजा, घनकर गल्ली आणि पंचवटीतील नाग चौकात मोठ्या प्रमाणात होळी उत्सव साजरा केला जातो. सध्या नाशिकच्या प्रत्येक भागात होळी पेटत असल्याने गल्लोगल्ली हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. प्रतिपदा येत असल्याने सायंकाळी ५.३० वाजेच्या आत होळी प्रज्ज्वलीत करण्यासाठी चांगला मूहूर्त आहे.

या लोकोत्सवात होलिकोत्सव (होळी), धूलिकोत्सव (धूळवड) आणि रंगोत्सव (रंगपंचमी) हे तीन मुख्य पदर उठून दिसतात. जडवाद आणि भोगवाद यांना जाळून, त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करण्याचा किंवा समाजातल्या विकृती भस्मसात करून त्यांच्या नावाने शिमगा करत सदवृत्तींचा जयघोष करण्याचा हा उत्सव आहे, असे वेदशास्त्रसंपन्न अमोल किरपेकर गुरूजी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलतरण स्पर्धेत नाशिकला ११ सुवर्ण

0
0

…डाऊन सिंड्रोम खेळाडूंच्या स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आयुर्वेद संमेलन व स्वयंम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी बाजी मारली असून ११ सुवर्णपदकांची कमाई केली आहे.

स्वतंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातून ३५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यात नाशिकच्या स्वयंम पाटील, मयुरी चौधरी, पुण्याच्या गौरी गाडगीळ आणि ऋत्विक जोशी या स्पर्धकांनी चार प्रकारच्या स्ट्रोकमधून प्रत्येकी चार सुवर्णपदकांची कमाई केली. नाशिकच्या खेळाडूंनी ११ सुवर्ण, ७ सिल्व्हर, २ ब्राँझ अशी पदके मिळवली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अखिल भारतीय आयुर्वेद संमेलनाच्या संघटन मंत्री डॉ. शशी आहिरे, क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलतरण तलावाचे मुख्य व्यवस्थापक हरी सोनकांबळे, स्वयंम फाउंडेशनच्या विद्या पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुजय-विजय’मुळे वाढला संभ्रम

0
0

उद्धव ठाकरे यांच्या गुगलीने शिवसेनेत चर्चेला उधाण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजप शिवसेनेच्या मनोमिलन मेळाव्यात नाशिकच्या उमेदवाराबाबत घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका वाक्याने शिवसैनिकांसह भाजप कार्यकर्तेही गोंधळात पडले आहेत. 'मला सुजयही हवा अन् विजयही हवा' या त्यांच्या टिप्पणीमुळे नाशिकमधून नेमकी कोणाला चाल मिळते याची चर्चा शिवसेनेत सुरू झाली आहे. नाशिक लोकसभेसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासह पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनीही दावा ठोकला आहे. त्यामुळे 'विजय'च्या बाजूने तर कौल नाही ना, अशी चर्चा आता शिवसैनिकांमध्ये सुरू झाल्याने उमेदवाराबाबत गोंधळ अधिकच वाढला आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक आणि दिंडोरी या दोन मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करत, आघाडी घेतली. दुसरीकडे, नाशिकच्या उमेदवारीवरून शिवसेनेत तर दिंडोरीच्या उमेदवारीवरून भाजपात गोंधळ सुरू आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा उमेदवारी मागितली आहे. तर गोडसेंच्या उमेदवारीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनीच आव्हान दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील पदाधिकाऱ्यांशी दोनदा चर्चा केली आहे. या चर्चेत बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी गोडसेंच्या विरोधात भूमिका घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्धव यांनी नाशिकच्या जागेबाबत अद्यापही निर्णय घेतलेला नाही. त्यातच रविवारी नाशिकमध्ये झालेल्या शिवसेना आणि भाजपच्या मनोमिलन मेळाव्यात उद्धव यांच्याकडून संभाव्य उमेदवाराबाबत संभ्रम दूर होईल, अशी अपेक्षा शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांची होती. परंतु, उद्धव यांच्या एका वाक्याने संभ्रम दूर होण्याऐवजी अधिकच वाढल्याची चर्चा आहे.

भाषणाच्या जोशात उद्धव ठाकरे यांनी नगरमध्ये डॉ. सुजय विखे यांचे स्वागत करतांना, 'मला सुजयही हवा अन् विजयही हवा' अशी घोषणा केल्याने विजय करंजकर गटाचे हौसले अधिकच बुलंद झाले आहेत. करजंकर गटाने हा आपल्यासाठी संभाव्य कौल असल्याचे ठासून सांगण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारी करंजकर यांनाच मिळेल, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे गोडसे गटातही चिंतेचे वातावरण आहे. उद्धव यांनी नेमकी भूमिका स्पष्ट न केल्याने आणि मेळाव्याच्या खर्चावरूनही संभाव्य उमेदवारांनी हात आखडता घेतल्याने चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. त्यामुळे उद्धव यांच्या या वाक्याचा प्रत्येक जण वेगवेगळा अर्थ काढत असल्याने शिवसेनेचा नेमका उमेदवार कोण, याची संभ्रमावस्था अधिकच वाढली आहे.

खर्च कोण उचलणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये रविवारी पार पडलेल्या मेळाव्याच्या खर्चावरूनही उलटसुलट चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे उमेदवार निश्चित नसल्याने खर्च कोणी करायचा हा प्रश्न पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर पडला होता. पक्षाने उमेदवारी अद्याप जाहीर केली नसल्याने कोणाकडून खर्च घ्यायचा, अशा विवंचनेत पदाधिकारी पडले होते. कोणी एक जण खर्च करायला पुढे न आल्याने अखेरीस पक्षालाच हा खर्चाचा भार उचलावा लागल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सैन्यभरतीसाठी ध्येय अन् चिकाटी हवी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'सैन्यात अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी करिअरची दिशा स्पष्ट ठेवली पाहिजे. सैन्य दलात भरती होणे ही सोपी प्रक्रिया नाही. त्यासाठी शारीरिक व मानसिक संतुलन अबाधित असणे आवश्यक आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहताना मानसिकतेने सक्षम आणि सर्वांगिण विषयांचे आकलन विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे. त्या जोडीला विद्यार्थ्यांनी उराशी बाळगलेले ध्येय कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची चिकाटी ठेवावी', असा सल्ला निवृत्त लेफ्टनंट कर्नल गोडबोले यांनी दिला.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरतर्फे सोमवारी (दि. १८) दुपारी ४ वाजता 'भारतीय सैन्य दलात अधिकारी पदाच्या करिअर संधी' या ‌विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. वकीलवाडीतील पद्मश्री बाबुभाई राठी सभागृहात हे व्याख्यान झाले. त्यावेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, प्रा. स्नेहा कुलकर्णी व्यासपीठावर होत्या.

यावेळी गोडबोले म्हणाले, सैन्यात अधिकारी होण्यासाठी भरतीप्रक्रियेचा पहिल्यांदा पूर्ण अभ्यास करा. कोणत्या दलात रुजू व्हायचे आहे, ते ध्येय ठरवा. फक्त हायप्रोफाइल करिअर संधी म्हणून याकडे पाहू नका. तर, देशासाठी सर्वात महत्त्वाचे कार्य करण्याची संधी मिळणार असल्याचा अभिमान बाळगत सैन्यात सामील व्हा, असे ते म्हणाले.

प्रा. कुलकर्णी म्हणाल्या, की भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी उमेदवारांनी किमान दोन ते तीन वर्षे आधीपासून तयारी सुरू केली पाहिजे. मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतरच भरतीसाठीचा अर्ज नोंदवावा. तसेच सैन्यात भरती होण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. इंग्रजी सुधारण्यासाठी इंग्रजी सिनेमांसह लोकसभा, राज्यसभा यांच्या बैठकांचे चित्रीकरण पहावे. इंग्रजी वाचण्यापेक्षा श्रवण करण्यावर भर द्यावा. श्रवण केलेली गोष्ट पटकन लक्षात राहते, असे त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन हेमांगी दांडेकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला स्वच्छतागृह बनले साहित्य भांडार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मुख्यालयातील महिला स्वच्छता गृहाचे रुपांतर चक्क आरोग्य विभागाचे साहित्य भांडारात करण्यात आले आहे. महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचा दावा करत, स्वच्छतागृहाचे रुपांतर थेट भांडारगृहात करण्यात येत असल्याने मुख्यालयातील महिला कर्मचाऱ्यांची संताप व्यक्त केला आहे.

महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर महिलांसाठी तीन स्वच्छतागृहे आहेत. पैकी एका स्वच्छतागृहाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना उर्वरित दोन पैकी एक स्वच्छतागृह चक्क बंद करून त्याठिकाणी आरोग्य विभागाने टेबल खुर्च्या मांडत साहित्य भांडार म्हणून वापर सुरू केला आहे. एकीकडे शहरात महिला स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्यासाठी कसरत सुरू असताना नाशिक महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनाच्या तिसऱ्या मजल्यावरील महिला स्वच्छतागृहाचे रुपांतर आरोग्य विभागाचे साहित्य भांडार म्हणून करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे महापालिका कर्मचारी तसेच विविध कामानिमित्त मुख्यालयात येणाऱ्या महिलांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, महापालिका मुख्यालयातील महिला स्वच्छतागृह बंद करून त्याठिकाणी साहित्य भांडार करण्याचा प्रकार गंभीर असल्याने सांगत, आरोग्य विभागाने याबाबतची माहिती मागवल्याचा दावा केला आहे. तसेच सदरचे स्वच्छतागृह सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धाराशिव’च्या अधिकाऱ्यांना घेराव

0
0

विठेवाडी विश्रांतीगृहात शेतकऱ्यांचा संताप

म. टा. वृत्तसेवा, कळवण

थकीत ऊस बिलासंदर्भात वसाका चालविणाऱ्या धाराशिव कारखाना प्रशासनाला ऊस उत्पादकांनी जाब विचारत घेराव घातल्याने खळबळ उडाली.

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा भाडेतत्त्वावर धाराशिव कारखान्याने चालविण्यास घेतला आहे. सुरवातीला दोन महिने कारखाना सुस्थितीत होता. मात्र त्यानंतर ऊस उत्पादकांचे देणेच न दिल्यामुळे शेतकरी संतापले आहेत. त्यातच २२ जानेवारीपासून कामगारांनी थकीत वेतनाबाबत लढा उभा केल्याने कारखान्याचे कामकाज पुन्हा ठप्प झाले आहे. कामगारांच्या थकीत वेतनाबरोबरच ऊस उत्पादकांचेही गाळपास गेलेल्या उसाचे पेमेंट अडकल्यामुळे ऊस उत्पादक हवालदिल झाले आहेत. धाराशिव कारखान्याचे अभिजित पाटील हे कुणाचाही फोन उचलत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी कारखाना स्थळावरील विश्रामगृहावर गाठत ऊस बिलासंदर्भातच्या दिरंगाईबद्दल जाब विचारला.

विठेवाडी येथील काही उस उत्तपादकांना कारखान्याच्या विश्रातीगृहात धाराशिवचे अधिकारी उपस्थित असल्याची माहिती मिगली. त्यामुळे सर्व उस उत्पादक विश्रांमगृहाकडे गेले. तेथे उपस्थित असलेले धाराशिवचे प्रशासकीय अधिकारी मनोहर जावळे यांना घेराव घातला. मात्र जावळे यांनीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.

पुन्हा आश्वासनावर बोळवण

जावळेंनी काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे उत्पादकांनी तिथेच ठिय्या मांडून जोपर्यंत मागण्यांबाबत ठाम निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्हाला बाहेर जावू दिले जाणार नाही, अशी भूमिका घेतली. तेव्हा जावळे यांनी संचालक खंरात यांना फोनवर माहिती दिली. २५ मार्चनंतर बील अदा केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी उत्पादक भास्कर निकम, ईश्वर निकम, लक्ष्मण निकम, वामण निकम, शांताराम निकम, दादाजी निकम, पोपट निकम उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्चच्या मध्यातच उन्हाचे असह्य चटके

0
0

तापमानाच्या पाऱ्याची वाटचाल ३७ अंशांकडे

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात मार्चच्या मध्यावरच उन्हाचे असह्य चटके जाणवण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाच्या झळा असह्य ठरू लागल्याने दुपारी १२ नंतरच रस्ते ओस पडण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी (दि. १८) नाशिकचे कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. आठवडाभरात हे तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

होळीनंतर थंडी गायब होते असा सर्वसाधारण समज असला तरी यंदा ती मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच गायब झाल्याचे चित्र आहे. होळी दोन दिवसांवर असली तरी गत आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा असह्य वाटू लागल्या आहेत. सकाळी नऊपासूनच उन्हाचा चटका जाणवण्यास सुरुवात होते. सायंकाळी सहापर्यंत काही प्रमाणात हे चटके जाणवत असल्याचा अनुभव नाशिककर घेत आहेत. दुपारी तर उन्हाच्या झळा नकोशा वाटतात. त्यामुळे नागरिक घर, कार्यालये, आस्थापनांबाहेर पडणे टाळत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. वातावरणातील या बदलांमुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी भेडसावू लागल्या आहेत.

-

दिनांक कमाल तापमान

११ मार्च ३२.६

१२ मार्च ३४.३

१३ मार्च ३२.७

१४ मार्च ३१.८

१५ मार्च ३३.७

१६ मार्च ३६.५

१७ मार्च ३४.६

१८ मार्च ३५.५

...

राज्यातील सर्वात कमी तापमान नाशकात

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये किमान तापमान अजूनही १५ अंश सेल्सिअसच्या खाली आहे. सोमवारी राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. हे तापमान १४.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. पुढील आठवडाभरात किमान तापमान १७, तर कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फूड डिलिव्हरी’ रडारवर

0
0

नाशिक : फूड डिलिव्हरी करणाऱ्या प्रमुख कंपन्यांनी फूड डिलिव्हर बॉइजसाठी आवश्यक असलेल्या अन्न व औषध विभागाच्या (एफडीए) परवान्यांकडेच दुर्लक्ष केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या सर्व कंपन्यांना एफडीएने नोटीस बजावण्यास सुरुवात केली असून, सात दिवसांच्या आत अन्न परवाने तयार करून घेण्यात आले नाही, तर हा व्यवसाय बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ऑनलाइन फूड डिलिव्हरी हा व्यवसाय शहरी भागात जोर पकडत आहे. स्पर्धक कंपन्या नवनवीन योजना ग्राहकांना देत असल्याने ग्राहकांच्या संख्येतही भर पडते आहे. अगदी घरपोच आणि कमी किमतीत अन्न ग्राहकांच्या घरापर्यंत येत असल्याने या वर्षात नवनवीन कंपन्या जोमाने या क्षेत्रात उतरल्या. बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीने कमीत कमी वेळेत सेवा पुरविणे या कंपन्यांचे उद्दिष्ट आहे. यासाठी जास्तीत जास्त डिलिव्हरी बॉइज नियुक्त करण्यात येतात. मात्र, व्यवसाय स्पर्धेत या प्रमुख कंपन्यांनी डिलिव्हरी बॉइजसाठी आवश्यक असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा अन्न परवाना घेतला नसल्याची गंभीर बाब एफडीएने अधोरेखीत केली आहे. याशिवाय फूड डिलिव्हरी बॉइजला संसर्गजन्य आजार नसल्याचेही प्रमाणपत्र एफडीएकडे सादर करण्यात आलेले नाही.

याबाबत बोलताना एफडीएचे सहआयुक्त (अन्न) चंद्रशेखर सांळुके यांनी सांगितले, की बहुतांश डिलिव्हरी बॉइजकडे अन्न नोंदणी प्रमाणपत्र नाही. अन्न सुरक्षा कायदा २००६ आणि अन्न नियंत्रण कायदा २०११ नुसार हे आवश्यक असते. संबंधित कंपन्यांना याबाबत सूचित करण्यात आले असून, सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यानंतर संबंधित कंपन्यांनी दुर्लक्ष केल्यास हा व्यवसाय बंद करण्याच्या हालचाली आम्ही करू शकतो, अशी स्पष्ट भूमिका साळुंके यांनी मांडली. दरम्यान, हे प्रमाणपत्र ऑनलाइन आणि १०० रुपये शुल्कात उपलब्ध आहे.

शहरात अडीच हजार डिलिव्हरी बॉय

सहायक आयुक्त भूषण मोरे यांनी सांगितले, की शहरात प्रमुख तीन कंपन्यांचे अडीच हजार डिलिव्हरी बॉइज असून, त्यांच्याकडे अन्न नोंदणी प्रमाणपत्र नाही. एका ठिकाणावरील अन्न दुसऱ्या ठिकाणी पोहचविण्यासाठी या परवान्याची आवश्यकता असते. तसेच, हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास संसर्गजन्य आजार नाही, याची खात्री करण्यासाठी एक मेडिकल प्रमाणपत्र आवश्यक असते. या दोन प्रमाणपत्रानंतरच डिलिव्हरी बॉइज आपले काम सुरू करू शकतात, असे मोरे यांनी सांगितले. एफडीएने आतापर्यंत दोन कंपन्यांना नोटिसा बजावल्या असून, आणखी एका कंपनीस नोटीस बजावण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एडीजी सक्सेना यांच्याकडून साधुग्राम जागेची पाहणी

0
0

शहरासह ग्रामीण पोलिसांच्या तयारीचा घेतला आढावा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी मंगळवारी शहर आणि ग्रामीण पोलिस दलाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. शहरात मोठ्या सभेच्या दृष्टीकोनातून साधुग्राम हे एकमेव ठिकाण असल्याने सक्सेना यांनी या ठिकाणाची सुद्धा पाहणी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर आणि ग्रामीण पोलिस दलाने केलेली तयारी, त्यांना आवश्यक असलेली साधनसामुग्री, मनुष्यबळ आदींबाबत सक्सेना यांनी पोलिसांकडून माहिती घेतली. यावेळी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त व इतर अधिकारी हजर होते. शहरातील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. व्हीआयपी सुरक्षा या मुद्द्यावर त्यांनी सखोल चर्चा केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनेक मोठे नेते दाखल होण्याची शक्यता आहे. त्याच्या तयारीचा सविस्तर आढावा सक्सेना यांनी घेतला. याबरोबर त्यांनी साधुग्रामच्या जागेची पाहणी करून सुरक्षेसंदर्भात काय उपाययोजना राबविता येतील, याची माहिती दिली. याच धर्तीवर सक्सेना यांनी ग्रामीण पोलिस दलाच्या तयारीचा सुद्धा आढावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीचे इच्छुक सैरभैर

0
0

उमेदवारीसाठी मुंबई-दिल्ली वाऱ्या; भुजबळांचा मात्र गाठीभेटींवर भर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना आणि भाजपच्या इच्छुक उमेदवारांची उमेदवारीसाठी एकीकडे धावाधाव सुरू असतानाच दुसरीकडे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शहरातील मान्यवर व मातब्बरांच्या भेटीगाठी घेण्याचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी मात्र मतदारांच्या गाठीभेटींवर भर देत गावागावांत कार्यकर्त्यांच्या प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम सुरू ठेवला आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरीच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केली आहे. नाशिकमधून समीर भुजबळ, तर दिंडोरीतून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांनी आपल्या प्रचाराला अधिसूचना जाहीर होण्याच्या आधीच सुरुवात केली आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून नाशिकचा, तर भाजपकडून दिंडोरीचा उमेदवार ठरत नसल्याने गोंधळ वाढला आहे. भुजबळ फार्ममधून स्वत: भुजबळ निर्णायक घटकांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या इच्छुकांची घालमेल अधिकच वाढली असून, भुजबळांचे वाढते बळ रोखण्यासह उमेदवारी मिळविण्याचे आव्हानही दोन्ही खासदारांसमोर उभे ठाकले आहे.

नाशिकमधून हेमंत गोडसे, तर दिंडोरीतून हरिश्चंद्र चव्हाण यांनी पुन्हा उमेदवारीवर दावा केला आहे. परंतु, दोन्ही पक्षांकडून या दोन्ही खासदारांना निवडणुकांबाबतचा ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे युतीतल्या बड्या नेत्यांनी नाशिकमध्ये येऊन प्रचाराचे रणशिंग फुंकले असले, तरी स्थानिक पातळीवर उमेदवार निश्चित नसल्याने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. गोडसे आणि चव्हाण यांची शक्ती सध्या उमेदवारी मिळविण्यासाठी खर्ची पडत आहे. स्थानिक पातळीवर काही पदाधिकाऱ्यांचा विरोध असला, तरी 'मातोश्री'वरून थेट उमेदवारी मिळविण्यासाठी गोडसेंनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. दुसरीकडे खासदर चव्हाण यांनीसुद्धा पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी दिल्ली, मुंबईच्या वाऱ्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या इच्छुकांची शक्ती उमेदवारी मिळविण्यासाठी वाया जात असताना छगन भुजबळांनी मात्र गाठीभेटींचा धडाका लावला आहे. विविध समाजातील बड्या नेत्यांसह 'नरेडको', 'क्रेडाई'सारख्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दुसरीकडे भुजबळांचा एक गट थेट ग्रामीण, तसेच शहरी भाग पिंजून काढत आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवारांची तूर्त तरी कोंडी झाल्याचे चित्र आहे.

---

चुंभळेंची हवा गुल

शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी सुरू केलेले प्रयत्न थंडावले आहेत. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मदतीने चुंभळे यांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली होती. त्यासाठी उद्धव ठाकरेंना भावनिक पत्रही लिहिले होते. परंतु, यापूर्वी चुंभळेंचा राष्ट्रवादीशी असलेला घरोबा आणि भुजबळांशी असलेल्या जवळिकीमुळे शिवसेनेकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. चुंभळे सध्या शिवसेनेत असले, तरी त्यांचे भुजबळ कुटुंबाशी असलेले संबंध पाहता त्यांना उमेदवारी दिल्यास थेट भुजबळांनाच मदत करण्यासारखे होईल, अशी माहिती 'मातोश्री'वर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोहोचविल्याची चर्चा आहे. त्यामुळे चुंभळेंच्या उमेदवारीची हवा तूर्तास गुल झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मपना आयुक्तांचीपंचवटीत पाहणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि. १९) पंचवटी विभागात पाहणी दौरा केला. यात प्रामुख्याने पंचवटी विभागीय कार्यालय आणि इंदिरा गांधी रुग्णालयात सुरू असलेल्या सर्वच विभागातील कामकाजाची पाहणी केली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काम करीत असताना येत असलेल्या अडचणींबाबत माहिती घेत त्यांनी काही सूचनाही केल्या.

पंचवटी विभागीय कार्यालय, स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यालय, इंदिरा गांधी रुग्णालय, कलानगर, दिंडोरीरोड, कोणार्कनगर, विडी कामगार नगर येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयाची पाहणी केली. त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, उपायुक्त रोहिदास बहिरम, शहर अभियंता संजय घुगे, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रकाश थविल, कार्यकारी अभियंता महेश तिवारी, पंचवटी विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा काळे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पंचवटी विभागीय कार्यालय येथील सामान्य प्रशासन विभाग, ई-सुविधा, उद्यान, जन्म-मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी, रेकॉर्ड-स्टोव्हर विभाग, घरपट्टी विभाग, करवसुली विभागांची पहाणी केली. यात नागरिकांच्या आलेल्या ऑफलाइन तक्रारी ऑनलाइन करण्याबाबत काही सूचना केल्या. याप्रसंगी कार्यालयात विविध कामकाजासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत काही अडचणी येतात का याबाबत माहिती घेतली. स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यालयाचे कामकाज यावेळी बघितले. यानंतर इंदिरा गांधी रुग्णालयात जाऊन तेथील कक्षांची पाहणी केली. दिंडोरी रोडवरील कलानगर येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची, कोणार्क नगरमधील जलकुंभाचे सुरू असलेले काम आणि विडी कामगारमधील अग्निशमन दलाच्या कार्यालयास भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छेड काढल्याची विद्यार्थिनीची तक्रार

0
0

नाशिक : पंचवटीतील एका नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थिनीची प्राध्यापकांनीच छेड काढल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे केली आहे. महाविद्यालयातील दोन प्राध्यापक हे सातत्याने विद्यार्थिनींना त्रास देत असल्याचे तक्रारकर्त्या विद्यार्थिनीचे म्हणणे आहे. असभ्य भाषेमध्ये बोलणे, विद्यार्थिनींचे मोबाइल तपासणे, आक्षेपार्ह शब्द वापरणे आदी प्रकारे मानसिक व शारिरीक त्रास देण्याचा प्रयत्न या प्राध्यापकांकडून केला जात असल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही विद्यार्थिनीची बाजू प्राचार्यांकडे मांडली. या प्रकरणी कॉलेज प्रशासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा 'अभाविप'च्या नगर सहमंत्री भक्ती दोडे आणि महानगर कार्यमंत्री योगेश्वरी सोनवणे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती सरकारचा नाशिकवर सायकॉलॉजिकल स्ट्राइक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत एकीकृत विकास नियंत्रण नियमावली जाहीर होऊन त्यात नाशिकवर झालेल्या अन्यायामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. नियमावलीत नाशिकला वगळून राज्यातील इतर शहरांना एकीकृत नियमावली लागू करून नाशिकला विकासापासून दूर ठेवण्याचे सरकारचे कारस्थान असल्याचा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला. युती सरकारने नाशिकवर केलेला हा सायकॉलॉजिकल स्ट्राइक असल्याचा आरोपही त्यांनी केला.

इतरांच्या तुलनेत वेगळे काही नको, जे इतरांना जे देणार ते नाशिकला द्या, मात्र आहे ते काढून घेऊ नका, असे आवाहन भुजबळ यांनी केले. 'नरेडको' संस्थेच्या वतीने एसएसके हॉटेल येथे आयोजित शहर विकास नियंत्रण नियमावली संवाद सत्रात भुजबळ बोलत होते. यावेळी 'नरेडको'चे सुनील गवांदे, राजन दर्यानी, जयेश ठक्कर, अविनाश शिरोडे, अमित रोहमारे, सुनील भायभंग, शंतनू देशपांडे, जयंत भातंबरेकर, दीपक बागड, राजेंद्र बागड, गोपाल अटल, संजय म्हाळस, सुजॉय गुप्ता आदी उपस्थित होते. यावेळी 'नरेडको'च्या प्रतिनिधींनी भुजबळांना यात लक्ष घालण्याचे साकडे घातले. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, की अजयचा सुजय झाला हे समजून घेता येईल. परंतु, विकासाची दिशा ठरविणाऱ्या नियमावलीत झालेली चूक मान्य करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेतले, की सापत्न वागणूक दिली जातेय हेच समजत नाही. इतर शहरांप्रमाणेच नाशिकलाही नियम लावले पाहिजेत. विकासाच्या बाबतीत नागपूर नाशिकच्या पुढे जात असेल, तर आनंद आहे. परंतु, नाशिकला डावलून विकास मान्य नसल्याचे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

--

विकास रोखण्याचा प्रयत्न

'नरेडको'च्या या बैठकीत व्यावसायिकांनी यावेळी सरकारडून शहराचा विकास रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. सन २०१७ मध्ये शहर विकास नियंत्रण नियमावली मंजूर करताना त्यातील चुकीच्या बाबी दुरुस्त करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु, बदल तर झाला नाहीच, शिवाय नाशिकवर दुसरी अन्यायकारक नियमावली लादली गेली. 'नाशिक वगळून' अशा केलेल्या उल्लेखामुळे नाशिक महाराष्ट्रात आहे की नाही, असा सवाल जयेश ठक्कर यांनी केला. बांधकामातील कपाटे, नवीन नियमावली, छोट्या रस्त्यांवर टीडीआर अनुज्ञेय न करणे, हरित लवादाची बंदी आदींमुळे नाशिकमध्ये बांधकाम व्यवसाय करायचा की नाही, असा उद्विग्न सवाल व्यावसायिकांनी यावेळी केला.

--

'क्रेडाई'चे भुजबळांना साकडे

नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळ फार्म येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन बांधकाम क्षेत्राबाबत निर्माण झालेल्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी उमेश वानखेडे, सुनील कोतवाल, अनिल आहेर, अनंत राजेगावकर, जयंत भातंबरेकर, मनोज खिंवसरा, रवी महाजन, राजेश आहेर, तुषार संकलेचा, श्याम जगताप, सुनील भायभंग आदींसह क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते. बांधकाम व्यवसायाबाबत संपूर्ण महाराष्ट्राला वेगळा न्याय आणि फक्त नाशिकसाठीच अन्यायकारक धोरण, हा राजकीय कट आहे. नाशिकच्या बांधकाम उद्योगासाठी लादलेल्या जाचक अटींमुळे नाशिकमधील बांधकाम व्यवसाय अडचणीत आले आहे. परिणामी नाशिक शहराचा विकास खुंटला आहे. यापुढील काळात सत्तेवर आल्यावर बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावू, असे आश्वासन भुजबळ यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चिऊताई’ची गणनाच नाही!

0
0

चिमण्यांचे संवर्धन अल्प; पक्षिमित्रांनी व्यक्त केली खंत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून चिमणी संवर्धनाचा फक्त गवगवा केला जातोय. पण, चिमण्यांची ऐकून संख्याच कोणाला ज्ञात नाही. 'चिऊताई'ची गणना करण्यासाठी आजवर कोणत्याही पक्षिमित्र संघटनांनी किंवा नागरिकांनीही पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे 'चिऊताई'ची गणना झालेली नसून, चिमण्यांचे संवर्धनालाही अल्प प्रतिसाद लाभत असल्याचे नाशिकच्या पक्षिमित्रांनी सांगितले आहे.

जागतिक चिमणी दिवसानिमित्त 'चिमणी गणना' संदर्भात पक्षिमित्रांशी 'मटा'ने संवाद साधला. जळगावमधील पक्षिमित्रांनी एकत्रित येत लोकसहभागातून तेथील चिमण्यांची गणना केली. त्यामध्ये २२ भागात १२३७ चिमण्यांची नोंद झाली. पण, असा कोणताही उपक्रम नाशिकमध्ये कधीही राबविण्यात आलेला नाही. चिमणी संवर्धनाचे नारे सोशल मीडियावर आणि सामाजिक प्रबोधनाच्या वेळी लगावले जातात. पण, मुख्यत्वे त्यासाठी जे कार्य उभारण्याची गरज आहे. त्यामध्ये नाशिककर आणि पक्षिमित्र खूपच मागे आहेत, असे पक्षीमित्रांनी सांगितले. सध्या शहरातील चिवचिवाट ऐकायलाच मिळत नसून, चिमणी संवर्धन चळवळीत लोकांचा सहभाग अतिशय कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चिमण्यांचे संवर्धन करणे कठीण झाले आहे. फक्त घरातल्या बाल्कनीत कृत्रिम घरटे उभारून चिमणी संवर्धन होणार नाही. तर, त्यासाठी शहरातील अनेक गोष्टींमध्ये बदल करावे लागतील. त्यासाठी मात्र लोकसहभाग मिळत नाही. त्यामुळे चिमण्यांची गणना देखील कधी केली गेली नाही. चिमण्यांची गणना करण्यापूर्वी संवर्धनाची च‌ळवळ बुलंद होणे गरजेचे आहे, असे मत पक्षिमित्रांनी व्यक्त केले.

चिमणी संवर्धन चळवळ नाशिकमध्ये कठोर नाही. चिमणी तसेच पक्षी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्यांची संख्याही थोडकी आहे. त्यामुळे आजवर इथे कधी चिमण्यांची नोंद झाली नाही. त्यामुळे युवकांनी आता पुढाकार घेत ही चळवळ उभारत चिमण्यांची नोंद करायला हवी.

\B- दिगंबर गाडगीळ, पक्षिमित्र\B

नाशिकमध्ये चिमणी संवर्धनासाठीच फारसा पुढाकार घेतला जात नाही. त्यामुळे चिमण्यांची नोंद करण्याचीही संकल्पना कधी मांडली गेली नाही. 'ई-बर्ड' वेबसाइटवरही नाशिकच्या चिमण्यांची माहिती पक्षिमित्र किंवा नागरिकांनी अपलोड केलेली नाही. त्यामुळे चिमण्यांची संख्या नोंदवण्यासाठी 'ई-बर्ड'चा वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा.

- मोहम्मद दिलवर, पक्षिमित्र

..

फोटो : पंकज चांडोले

लोगो : जागतिक चिमणी दिवस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिठे यांना साहित्य जीवनगौरव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साहित्यज्योती काव्यमंच यांच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील विविध साहित्यकृती व साहित्यिकांचा सन्मान केला जातो. यंदा ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांना साहित्य जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यंदापासून महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकास त्याच्या आयुष्यभराच्या लेखन कार्याचा गौरव म्हणून साहित्यज्योती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. त्यासाठी पालखेड बंधारा (ता. दिंडोरी) येथील ग्रामीण साहित्यिक व कादवाशिवार मासिकाचे संपादक विजयकुमार मिठे यांची निवडसमितीने एकमताने निवड केली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी प्रकाश घोडके व प्रभाकर साळेगावकर यांच्या हस्ते नुकतेच या पुरस्काराचे वितरण विजयकुमार मिठे यांना करण्यात आले. पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. विजयकुमार मिठे यांनी ग्रामीण कथा, ललित आणि कविता लेखन विपूल केले आहे. नाशिक व जळगाव आकाशवाणी केंद्रावर त्यांचं घरकुल हे सदर जवळपास बावीस वर्षे सुरू होतं. गेल्या बारा वर्षांपासून विजयकुमार मिठे हे 'कादवा शिवार' या मासिकातून अनेक हातांना लिहितं करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक साहित्यिक कवींची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. साहित्याची सेवा करता यावी म्हणून १९७७ साली ग्रॅज्युएट असणारा हा माणूस नोकरीत न रमता शेती-मातीचं मातीमळण अधोरेखित करीत राहिला. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणूनच त्यांना साहित्यज्योती काव्य मंचचा पहिला जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

याप्रसंगी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास आष्टीचे तहसीलदार कवी हिरामण झिरवाळ, प्राचार्य डॉ. विधाते, कवी इंद्रकुमार झांजे, मुख्य संयोजक कवी नागेश शेलार, नाशिकचे कवी राजेंद्र उगले, दत्ता अलगट आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कवी हरीश हतवटे, युवराज वायभासे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images