Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिडकोत दोन आत्महत्या

0
0

सिडको : सिडको परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

प्रशांत कैलास मांडे (वय २२, रा. शिवशक्‍ती चौक) याने गुरुवारी (दि. ७) सायंकाळी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिंसेचा जन्म सहानुभूतीत

0
0

लेखिका सोनाली नवांगुळ यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पॅराफ्लेझिक होणे ही अचानक आलेली आपत्ती असते; परंतु अशावेळी समाजाने त्या पेशंटकडे सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून न पाहता त्याला धैर्य देण्याचा प्रयत्न करावा, कारण सहानुभूतीमध्ये हिंसेचा जन्म होत असतो, असे प्रतिपादन लेखिका सोनाली नवांगुळ यांनी केले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कुसुमाग्रज स्मरण अंतर्गत कुसुमाग्रज स्मारकात महिला दिनानिमित्त लेखन, अनुवाद, मुक्त पत्रकारिता व सूत्रसंचालन क्षेत्रात काम करणाऱ्या सोनाली नवांगुळ (कोल्हापूर) यांचे 'मी ठरवलं तर' या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी त्या बोलत होत्या. मंचावर 'मविप्र'च्या सरचिटणीस नीलिमा पवार, प्रतिष्ठानच्या माजी विश्वस्त रंजना पाटील यांची उपस्थिती होती. लोकेश शेवडे यांनी डॉ. यशवंत बर्वे यांचे स्वागत केले.

नवांगुळ म्हणाल्या, की पॅराफ्लेझिक ही असाध्य आपत्ती कोसळल्याने बालपण अत्यंत दु:खात गेले; परंतु या आपत्तीची जाणीव करून देणारे लोक आसपास नसल्याने त्यातही आभार मानले पाहिजे. अंगावर बैलगाडी पडल्याने मी या व्याधीची बळी झाले. मात्र, अशा अपघाताच्या प्रसंगी अपघातग्रस्तांना कशाप्रकारे मदत करावी हे माहीत नसल्याने माझ्या शरीराचे नुकसान झाले. शरीर आपणहून आपल्यासाठी किती काम करते हे एखादा अवयव दुखावल्यावर कळते. ज्या वयात कुणीतरी लपंडाव खेळत होते त्या वयात मी अंथरुणावर पडलेले होते त्यामुळे मला माझा राग येत असे. रोजचाच नवा संघर्ष असतो हे एव्हाना अंगवळणी पडलेले आहे, असेही त्या म्हणाल्या.

अध्यक्षीय भाषणात नीलिमा पवार म्हणाल्या, की आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून बर्वे कुटुंब काम करीत आहे, हे स्पृहणीय आहे. स्वत:साठी काम करताना आपण समाजाचे कधी होऊन जातो हे सोनाली नवांगुळ यांच्या कामातून दिसते. प्रतिकूल परिस्थितीतून कसे वर यावे, हे सोनाली यांनी शिकवले, असेलही पवार म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सपकाळ कॉलेजची परीक्षा पुढे ढकलली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संस्थास्तरावरील प्रशासकीय अडचणी आणि विद्यार्थी संघटनांची सातत्याने होणारी आंदोलने यामुळे चर्चेत असणाऱ्या सपकाळ नॉलेज हब या कॉलेजमधील नियोजित इनसेम परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य विजय सोनवणे यांनी दिली.

या संस्थेत दोन महिन्यांपासून फार्मसी आणि इंजिनीअरिंग या विद्याशाखांचे लेक्चर्स होत नसल्याचा विद्यार्थी व पालकांचा आरोप आहे. संस्थास्तरावर प्राध्यापकांचेही पगार खोळंबल्याच्या तक्रारी आहेत. या अनागोंदीचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे सांगत युवासेना आणि शिवसेनेनेही शुक्रवारी आंदोलन छेडले होते. यानंतर विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य विजय सोनवणे यांनी लेक्चर्सअभावी विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाण्याऐवजी काही दिवस या परीक्षा पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी विद्यापीठात पाठपुरावा केला. यावर परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा याकरिता केवळ सपकाळ नॉलेज हबची इनसेम परीक्षा पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुरशीच्या सामन्यात पीएमए संघ विजयी

0
0

निमा करंडक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)तर्फे तीनदिवसीय निमा करंडक क्रिकेट महोत्सवाला शुक्रवारी (८ मार्च) गोल्फ क्लब मैदानावर जल्लोषात सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील तालुकास्तरीय डॉक्टरांच्या स्पर्धा रंगल्या. या वेळी अंतिम सामना पाथर्डी आणि पीएमए या संघांमध्ये झाला. या वेळी सामना बरोबरीचा झाल्यामुळे सहा चेंडू पुन्हा खेळविले गेले. त्यात पीएमए संघ विजयी झाला.

क्रीडा महोत्सवाच्या सुरुवातील सकाळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांच्या हस्ते 'निमा करंडक'चे उद्घाटन झाले. निमाचे राष्ट्रीय शाखेचे सहखजिनदार शैलेश निकम, निमा राज्य शाखेचे खजिनदार डॉ. भूषण वाणी, उपसचिव डॉ. अनिल निकम उपस्थित होते. 'खेल खेल है, निमा करंडक सब के दिलों का मेल है' हे घोषवाक्य घेऊन सुरू झालेल्या स्पर्धेत या वेळी जिल्ह्यातील निमा नाशिक, सातपूर, पाथर्डी, पंचवटी, दिंडोरी, पेठ, आयएमए, लासलगाव येथील शिवगर्जना यांच्यात सहा षटकांचे सामने खेळविले गेले. या वेळी तांबे यांनी असोसिएशनच्या कामाचे कौतुक केले. शरीरस्वाथ्यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे मत निमाच्या अध्यक्षा डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगांची क्रिकेटमध्येही चुणूक

0
0

महिलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर शुक्रवारी दिव्यांग महिलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेची रंगत पाहायला मिळाली. महाराष्ट्र ए व महाराष्ट्र बी या संघांत झालेल्या सामन्यात महाराष्ट्र ए संघाने विजय मिळवला. गोलंदाजी, फलंदाजीसोबतच उत्तम क्षेत्ररक्षण करून दिव्यांग खेळाडूंनी क्रिकेट कौशल्याची चुणूक दाखवली. तुळसाई बहुद्देशीय संस्थेच्या वतीने ही स्पर्धा झाली.

संस्थेच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यातील मतिमंद, कर्णबधिर व इतर दिव्यांगांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी क्रिकेट स्पर्धा झाली. गेल्या वर्षी दिव्यांग महिलांच्या सांस्कृतिक स्पर्धा झाल्या. त्या वेळी विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा या वेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, छत्रपती पुरस्कारप्राप्त रोशनी मुर्तडक, राजू मुजावर यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेत १२ जिल्ह्यांतील ४० खेळाडू सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये आता ‘ह्यूमन मिल्क बँक’

0
0

नाशिक : बाळाच्या नैसर्गिक संगोपनासाठी आणि आईच्या दुधाचे महत्त्व लक्षात घेऊन लवकरच नाशिक शहरात पहिली 'ह्यूमन मिल्क बँक' स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील बालरोगतज्ज्ञांच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटना 'इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक'च्या (आयएपी) नाशिक शाखेने पुढाकार घेतला आहे. या सुविधेमुळे गरजू बालकांना अमृततुल्यरूपी सकस दुधाची संजीवनी मिळण्यास मदत होणार आहे.

सविस्तर वृत्त... प्लस १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा चालकाची पोलिसांना धक्काबुक्की

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फ्रंटसीट प्रवासी वाहतुकीविरुद्ध कारवाई सुरू असताना रिक्षा चालकासह मालकाने वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की केली. ही घटना वर्दळीच्या सीबीएस चौकात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

स्वप्निल सुरेश गुरव (३० रा. कार्बनाका, सातपूर) आणि गजानन प्रकाश दुधाडे (२१ रा. श्रमिकनगर, सातपूर) अशी अनुक्रमे रिक्षाचालक आणि मालकाची नावे आहेत. शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी द्वारका यादव व सोमनाथ गायकवाड हे सीबीएस चौकात सेवा बजावत असताना ही घटना घडली. सीबीएस बस स्टॅण्ड परिसरात एमएच १५, ईएच ०५८६ या ऑटो रिक्षावर पोलिस फ्रंटसीट कारवाई करीत असताना हा वाद झाला. चालकाशेजारी बसलेल्या स्वप्निल गुरव याने आपण रिक्षामालक असून, तुम्ही काही करू शकत नाही, असा आरडाओरड करीत पोलिस कर्मचारी यादव यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली. या घटनेत हवालदार यादव यांच्या मदतीला शिपाई गायकवाड गेले असता चालक दुधाडे याने गायकवाड यांच्याशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली. या घटनेत दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांचे गणवेश फाटले.

नोट प्रेसमध्ये हाणामारी

वर्कशॉप विभागातील टाइम ऑफिसजवळ टोकन बोर्डावर दोन टोकन घेऊन लावत असताना तेथील कर्मचाऱ्याने विरोध केला असता त्यास मारहाण करण्यात आली. ही घटना ६ मार्च रोजी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास आयएसपी नोटप्रेस येथे घडली. या प्रकरणी भास्कर रंगनाथ कोलमकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात एकनाथ बाळू टिळे याच्याविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक के. एल. सोनोणे करीत आहेत.

मंदिराचा कळस चोरला

मंदिरावरील पितळी धातूचा कळस चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना खडकाळी भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सुभाष भिकाजी नवसे (रा.पंचशिलनगर,नाशिक) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. खडकाळी सिग्नल परिसरातील रॉयल हेरिटेज हॉटेल मार्गावर असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिराचा सुमारे तीन हजार रुपये किमतीचा कळस गुरुवारी रात्री चोरट्यांनी चोरून नेला. अधिक तपास लभडे करीत आहेत.

घरात घुसून महिलेचा विनयभंग

चावी ठेवण्यासाठी घरात आलेल्या शेजाऱ्याने महिलेचा विनयभंग केल्याची घटना अंबड लिंक रोडवरील रामकृष्ण नगर भागात घडली. पोलिसांनी संशयितास अटक केली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नरेश बनवारी पाल (रा. रामकृष्णनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. २० वर्षांच्या पीडित विवाहितेने या प्रकरणी तक्रार दिली. गुरुवारी महिला आपल्या घरात एकटी असल्याची संधी साधत संशयिताने घराची चावी ठेवण्याचा बहाणा करून महिलेचे घर गाठले. यावेळी तुझा नवरा दारूड्या आहे. त्याचे बाहेर प्रेमसंबंध असल्याने तुझ्यावर प्रेम करीत नाही. त्याला सोडून माझ्याशी लग्न कर, असे म्हणून विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक घोडके करीत आहेत.

गोडावून फोडून सिमेंटची चोरी

गोडावूनचे कुलूप तोडून चोरट्यांनी सिमेंटची चोरी केल्याची घटना मालधक्का भागात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सचिन ओमप्रकाश सोमाणी (रा. तरण तलावाजवळ, नाशिकरोड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. सचिन सोमानी यांचे सिमेंट व्यावसायिक असून, त्यांचे मालधक्का भागातील जियाउद्दीन डेपोत कोरोमंडल नावाचे सिमेंटचे गोडावून आहे. बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी गोडावूनचे कुलूप तोडून ५५ हजार ३६० रुपये किमतीच्या १७३ सिमेंटच्या गोणी चोरून नेल्या. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेलकर करीत आहेत.

अल्टो मार्केट भागात जुगारी गजाआड

महामार्गावरील भगतसिंग नगर वसाहतीस लागून असलेल्या अल्टो मार्केट भागात उघड्यावर जुगार खेळणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्टो मार्केटच्या भिंतीच्या आडोशाला काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी पोलिसांनी छापा टाकला असता दीपक मुर्तडक व त्याचे तीन साथीदार 'टाइम जनता, टाइम ओपन' नावाचा मटका जुगार खेळताना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पाळदे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षिकेची अमानुष मारहाण

0
0

गणित न जमल्याने साडेतीन वर्षांच्या बालकांसोबत क्रूर वर्तन

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्याला वस्तूंचे आकार, गणित समजत नाही म्हणून संतापलेल्या शिक्षिकेने साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना येथील पाइपलाइन रोडजवळील किड-झी प्री प्रायमरी स्कूलमध्ये घडली. हा प्रकार शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, शिक्षिकेचे क्रूर वर्तन समोर आले आहे.

श्रेयस चौधरी हा साडेतीन वर्षांचा मुलगा गेल्या सहा महिन्यांपासून किड-झी प्री प्रायमरी स्कूलमध्ये नर्सरीच्या वर्गात शिक्षण घेतो. शाळेत गेल्या दोन दिवसांपासून त्याला आकार व काही गणिते शिकवून देखील कळत नसल्याच्या रागातून संतापलेल्या शिक्षिकेने त्याला शुक्रवारी वर्गात क्रूरपणे मारहाण केली. यामुळे घाबरलेला श्रेयस गेले दोन दिवस तापाने फणफणला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या शिक्षिकेची मानसिक स्थिती बिघडली असून, तिच्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

या प्रकरणामुळे पूर्व प्राथमिक शाळांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. या शाळांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने अशा प्रकारच्या घटना वाढत असून, पालकांचा जीव टांगणीला लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

...

श्रेयस घरी आल्यानंतर त्याच्या गालावर ओरखडलेले दिसले. शाळेत जाऊन चौकशी केली, तर संचालकांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. या फुटेजमध्ये शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याचे दिसून आले. त्या शिक्षिकेला समज देण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. परंतु, तिचा भविष्याचा विचार करता तक्रार नोंदवली नाही.

\B- कविता चौधरी, श्रेयसची आई\B

...

घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. आमच्या शाळेतील शिक्षिकेचे असे वर्तन पाहता आम्ही तिला ताबडतोब काढून टाकले आहे. यापुढेही संस्था या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

- मंगला मांडे, संचालक, किड झी स्कूल, पाइपलाइन रोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आपल्यावरील अन्यायाबाबत महिलांनी वेळीच बोलावे

0
0

प्रा. प्रतिभा जाधव यांचे प्रतिपादन

..

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महिलांची आपली भूमिका, आपली मतं असली पाहिजेत. आपल्यावरील अन्यायाबाबत महिलांनी वेळीच बोलले पाहिजे. चुप्पी तोडली पाहिजे. या जन्मात असे उदात्त कार्य करा की, पुढील सात पिढ्यांनी आपली आठवण काढली पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. प्रतिभा जाधव-निकम यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे ऋतुरंग भवनमध्ये प्रा. जाधव यांनी 'मी अरुणा बोलतेय' हा एकपात्री प्रयोग सादर केला. चाळीस वर्षांपूर्वी मुंबईच्या के. ई. एम. रुग्णालयात अरुणा शानबाग या परिचारिकेवर अत्याचार झाला होता. त्या कोमात गेल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना वाळीत टाकले. मात्र, शासन, हॉस्पिटल प्रशासन व महिला सहकाऱ्यांनी मरणासन्न अवस्थेतील अरुणाची सेवा करून तिला अनेक वर्षे जगवले. अशा अरुणाची कहानी प्रतिभा जाधव यांनी सादर केली. देशमुख महिला मंडळ हे कार्यक्रमाच्या सहआयोजक होते.

प्रयोगानंतर प्रा. जाधव म्हणाल्या, की आयुष्यात काही वाईट केले तर त्याचा हिशेब द्यावाच लागतो. पाच वर्षांपासून हा एकपात्री प्रयोग सादर करीत आहे. अरुणा काळजापासून मेंदूपर्यंत विचार करायला प्रवृत्त करते. अरुणा सोडत नसते. महिलांनी आपल्यावरील अन्यायाबाबत वेळीच आवाज उठवला पाहिजे.

यावेळी मसापचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, दत्ता गायकवाड, नितीन ठाकरे, सुजाता हिंगे, दशरथ लोखंडे, रवींद्र मालुंजकर, वसंत पाटील, सुधाकर जाधव, विश्वास गायधनी, कामिनी तनपुरे, सुमन हिरे, वर्षा देशमुख, सुरेखा गणोरे, वासंती ठाकूर, माधवी मुठाळ, वैशाली राठोड, जयश्री लाहोटी, गीता लोखंडे, प्राचार्य कऱ्हाडकर, संगीता पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. वर्षा देशमुख यांनी प्रास्तविक, तर ज्योती कदम यांनी सूत्रसंचालन केले. वासंती ठाकूर यांनी आभार मानले. यावेळी महिला दिनानिमित्त महिलांचा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.

...

महिलांचे पाणावले डोळे

अरुणा शानबाग यांची दुर्दैवी कहाणी जाधव यांनी आपल्या जिवंत अभिनयातून सादर केली अन् तासभर समस्त प्रेक्षक खिळून राहिले. अनेक महिलांचे तर डोळे पाणावले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सापडलेली पर्स रिक्षाचालकाकडून परत

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अमेरिकन इंजिनीअरची रस्त्यात पडलेली पर्स रिक्षाचालकाने तिचा शोधून परत केली. या पर्समध्ये अमेरिकन व्हिसा, पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, लायसन्स, डॉलर, रुपये, महत्त्वाची कागदपत्रे होती.

कनन तेजनानी यांनी नाशिकला इंजिनीअरींगचे शिक्षण पूर्ण करुन अमेरिकेत आयटी इंजिनीअर म्हणून नोकरी मिळवली. तेथील नागरिकत्वही मिळवले. दोन महिन्यांच्या सुटीसाठी त्या बोधलेनगर येथील ड्रीम सिटीत परतल्या होत्या. ७ मार्चला दुपारी त्या दुचाकीवरुन नाशिकरोडला निघाल्या. आंबेडकरनगरजवळ त्यांची पर्स खाली पडली. रिक्षाचालक कुमार प्रभाकर जाधव यांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र त्या निघून गेल्या. व्हिसा, पासपोर्ट, डॉलरसह महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स हरविल्याचे लक्षात आल्यावर तेजनानी यांनी नाशिकरोड पोलिस ठाणे गाठले. मात्र, घटना उपनगरच्या हद्दीतील असल्याने त्यांना तिकडे पाठविण्यात आले. तेथील पोलिसांनी कंट्रोल रुमला कळवले. तेजनानींचा शोध घेत रिक्षाचालक जाधव नाशिकरोडच्या दिशेने गेले. वॉस्को चौकाजवळील पान टपरीवाल्याला त्यांनी याबाबत सांगितले. टपरीवाल्याने नाशिकरोड पोलिस ठाण्याचे बीट मार्शल गणेश गोसावी, विकास ढेरिंगे यांना ही बातमी कळवली. पोलिसांनी उपनगरहून तेजनानींचा फोन नंबर मिळवून संपर्क साधला. व्हिसा, पासपोर्ट, डॉलर नसल्याने अमेरिकेला कसे परत जायचे, या चिंतेने ग्रासलेल्या तेजनानींना याचा सुखद धक्का बसला. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एन. एस. माईनकर यांनी स्टेशनवर जाऊन रिक्षाचालक जाधव यांचा सत्कार केला. तेजनानी यांनीही रोख बक्षीस दिले.

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळेच मला माझी लाखमोलाची पर्स एका तासात मिळाली. व्हिसा, पासपोर्ट मिळाले नसते तर मला येथेच राहावे लागले असते. पोलिस व नागरिकांनीही चांगले सहकार्य केले.

- कनन तेजनानी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीवर गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माहेराहून पैसे आणावेत या मागणीसाठी पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीविरूद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दीपक दोंदे (३६, रा. पाथर्डीगाव, दत्तमंदिराजवळ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दीपकच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी शीतल हिने २ मार्च रोजी गळफास घेतला. गंभीर अवस्थेत तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी शीतलचा भाऊ रितेश गावंडे (रा. कपिलेश्वर, ता. अकोला, जिल्हा अहमदनगर) यांनी फिर्याद दिली. मद्यपानाचे व्यसन असलेला दीपक दोंदे १२ वर्षांपासून सातत्याने शीतलचा छळ करीत असल्याचे त्याने तक्रारीत नमूद केले. शीतलने आत्महत्या करण्यापूर्वी दीपकने तिला जबर मारहाण केली होती. यावेळी तिने ही बाब फोन करून आपल्या वडिलांना सांगितली. मुलांची परीक्षा झाल्यानंतर माहेरी निघून येईल, असेही तिचे वडिलांशी बोलणे झाले. मात्र, यानंतर तिने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित दोंदेवर गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य जपा!

0
0

'महिलांनी आरोग्य जपावे'

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कार्यक्षम बनताना आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे गृहिणी असो वा काम करणारी महिला, सर्व महिलांनी व्यायामाची सवय लावली पाहिजे. जेव्हा आरोग्य सृदृढ राहिल तेव्हाच संसाराचा गाडा नेटका आणि आनंदात ओढता येईल. त्यासाठी महिलांनी आरोग्य जपणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉ. कल्पना कुटे यांनी महिलांना दिला.

महानगरपालिका व बालकल्याण विभागातर्फे जागतिक महिना दिनानिमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम झाला. त्यावेळी महापौर रंजना भानसी, महिला व बालकल्याण सभापती कावेरी घुगे, सदस्या अर्चना थोरात, आरोग्य विभागाच्या डॉ. कल्पना कुटे व्यासपीठावर होत्या. यावेळी विविध बचत गटाच्या संचालिकांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी महापौर रंजना भानसी यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत, महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी बचत गटाचा मार्ग अवलंबवा, असा सल्ला दिला. महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी माणुसाने उद्योजक बनावे

0
0

जयंती कठाळे यांचा आशावाद

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'मराठी माणसाने पारंपरिक साच्यातले जगणे सोडून व्यापक दृष्टीने जगाकडे बघायला हवे. मराठी माणसांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्तम क्षमता दडल्या आहेत. या क्षमतांना न्याय देण्यासाठी मराठी माणसाने उद्योजकतेची निवड केल्यास ती चूक ठरणार नाही. केवळ या क्षेत्रात येताना अविश्रांत मेहनत, सूक्ष्म नियोजन आणि आपल्याजवळील उत्तम ते ग्राहकांना देण्याची तयारी असायला हवी', असा संदेश बेंगळुरू येथील पूर्णब्रह्मा मराठी रेस्टॉरेंटच्या संस्थापक जयंती कठाळे यांनी दिला.

जागतिक महिला दिनानिमित्त मविप्रचे केबीटी कॉलेज आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. केबीटी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये हे व्याख्यान पार पडले.

कठाळे यावेळी म्हणाल्या, की दीड दशकापर्यंत कम्प्युटर इंडस्ट्रीत विविध पदांवर काम केल्यानंतर त्याच त्या दिनक्रमाचा उबग आला होता. सातत्याने नावीन्याचा शोध मनातून सुरू होता आणि एकदा विमानातील दीर्घवेळच्या प्रवासात शाकाहारी पदार्थांचा पर्यायच हाती नसल्याच्या अनुभवाने पूर्णब्रह्माची चावीच माझ्या हाती पडली. विमानातील या २७ तासांतील प्रवासात शाकाहाराच्या प्रतीक्षेत केवळ ब्रेड-बटर खाऊन उपाशी रहावे लागले. त्यानंतर इन्फोसिसमधली नोकरी सोडून पूर्णब्रह्माची मुहूर्तमेढ बेंगळुरू येथे रोवली. अमराठी प्रांतात खास मराठी पदार्थांची रेलचेल होऊ लागल्यानंतर खव्वयांचाही याला चांगला प्रतिसाद मिळाला. हा प्रवास सोपा नसला तरीही योग्य नियोजनामुळे तो अशक्य ठरला नाही.

तुमच्या वाट्याला येणारे कोणतेही काम नकारात्मक नसते. तुम्ही त्याकडे केवळ नकारात्मकतेने बघत असतात. नवीन प्रयोग करण्याअगोदर अनेकदा विचार करा पण एकदा विचार पक्का झाला की अंमलात आणण्यास विसरू नका. बहुतांश देशांमध्ये खाद्यसंस्कृतीत शाकाहाराचा अभाव आहे. त्या देशांमध्ये गेल्यानंतर शाकाहारी भारतीयांची मोठी पंचाईत होते. त्या देशांमध्येही शाकाहारी भारतीयांसाठी काय करता येईल, या विचारातून पूर्णब्रह्माने देशाचीही सीमा ओलांडून तो ग्लोबल ब्रॅण्ड बनला आहे.

यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस केबीटी कॉलेजचे प्राचार्य नितीन देसले, रोटरी क्लबचे अध्यक्ष अर्जुन येवले यांनी कठाळे यांचे स्वागत केले. विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापकांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...

महिलांना प्राधान्य

विशेष म्हणजे पूर्णब्रह्मामध्ये महिलांना प्राधान्य दिले जाते. नेतृत्वापासून तर संस्थेचे अनेक आयाम सांभाळण्यात महिलांचे विशेष योगदान आहे. एका महिलेवर कुटुंब अन् समाजाने विश्वास ठेवून तिला प्रोत्साहन दिल्यास किती सकारात्मक घडू शकते, याचे उदाहरण म्हणजे पूर्णब्रह्मा आहे असेही कठाळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी धोरणालाच हरताळ!

0
0

खरेदी प्रक्रियेत स्टार्टअप, मेक इन इंडियाला डावलले

...

vinodpatil@timesgroup.com

Tweet : vinodpatilMT

...

नाशिक : आदिवासी विभागाने कायापालट अभियानांतर्गत बड्या कंपन्यांना फर्निचर खरेदीचा ठेका देताना केंद्र आणि राज्याच्या स्टार्टअप आणि मेक इन इंडियाच्या धोरणालाच हरताळ फासल्याचे समोर आले आहे. विशिष्ट कंपन्यांना मलिदा मिळावा, यासाठी निविदेत २०० कोटींच्या 'टर्नओव्हर'ची अट टाकण्यात आल्याने सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना अखेर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला आहे. उच्च न्यायालयात पहिल्या निविदा अडचणीत येऊ नये, यासाठी घाईगडबडीत प्रशासकीय खर्च वाढविताना ३ मार्च रोजी विभागाने स्टार्टअप आणि मेक इन इंडियाअंतर्गत सूक्ष्म व लघुउद्योजकांसाठी निविदा प्रसिद्ध केल्याने या खरेदीतील गोलमाल समोर आला आहे.

देशातील सूक्ष्म व लघुउद्योगाला चालना मिळावी, यासाठी केंद्राने स्टार्टअप आणि मेक इन इंडियाचे धोरण आणत सरकारच्या सर्व खरेदी प्रक्रियांमध्ये आरक्षण देण्यात आले आहे. तसेच, राज्य सरकारच्या उद्योग व ऊर्जा विभागाने १ डिसेंबर २०१६ रोजी अध्यादेश काढत सरकारी निविदांमध्ये सूक्ष्म व लघुउद्योग आणि स्टार्टअपमधील उद्योगांना प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार १० टक्के स्टार्टअप, २० टक्के लघुउद्योग आणि २० टक्के मेक इन इंडियाअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या उद्योगांना काम देण्याचे आदेश काढले आहेत. परंतु, आदिवासी विभागाने केंद्र आणि राज्य सरकारच्या या आदेशांना केराची टोपली दाखवली. विभागाने फर्निचर खरेदीसाठी दोनदा राबविलेल्या निविदा प्रक्रियेत हे आरक्षण ठेवले नसून, बड्या कंपन्यांनाच कसे काम मिळेल याची पुरेपूर व्यवस्था केली आहे. जेम पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या निविदेत २०० कोटींच्या 'टर्नओव्हर'ची अट टाकून लघुउद्योजकांना डावलले आहे. त्यामुळे या फर्निचर खरेदीत स्पर्धा करू इच्छिणाऱ्या लहान उद्योजकांनी थेट उच्च न्यायालयात दरवाजा ठोठावला. उच्च न्यायालयानेही या खरेदी प्रक्रियेवर आक्षेप घेत सरकारला १३ मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे २५६ कोटींच्या कामांच्या निविदा उघड केल्यानंतर आणि या कंपन्यांना अडचण येऊ नये, यासाठी विभागाने घाईगर्दीत पुन्हा फर्निचर खरेदीसाठीची मंजूर किंमत ही २३५ कोटींवरून २८६ कोटींपर्यत नेली आहे. तसेच, ३ मार्च रोजी नव्याने जेमवर पोर्टल स्टार्टअप आणि मेक इन इंडिया धोरणाअंतर्गत फर्निचरसाठी निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या प्रक्रियेत बड्या कंपन्यांचे काम अडकू नये, यासाठी हा खटाटोप केल्याचे समोर आले आहे.

...

वित्त विभागाचा आदेश डावलला

राज्याच्या विविध विभागांतर्फे आर्थिक वर्षाच्या खरेदीसंदर्भात वित्त विभागाने ३१ जानेवारी २०१९ रोजी आदेश काढून नव्याने निविदाप्रक्रिया राबवू नये, असे आदेश काढले आहेत. एखाद्या खरेदीला प्रशासकीय मान्यता असली तरी निविदा प्रसिद्ध करता येणार नाही. तरीही आदिवासी विभागाने ३ फेब्रुवारी रोजी या कामांच्या निविदा प्रसिद्ध करीत वित्त विभागाचा आदेशच डावलला आहे.

....

खरेदी प्रक्रियेत लघुउद्योजकांना डावलल्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. १३ तारखेला सुनावणी होणार असतानाच त्यापूर्वीच निविदा उघडून न्यायालयाचा अवमान केला आहे.

- अॅड. तुषार सोनवणे, याचिकाकर्त्याचे वकील

....

राज्य शासनाच्या धोरणानुसार फेरनिविदा काढली आहे. स्टार्टअप आणि मेक इन इंडियांत नोंदणीकृत असलेल्या उद्योगांनाही काम देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या कामांची देयके पुढील आर्थिक वर्षात दिली जाणार असल्याने अडचण नाही.

- किरण कुलकर्णी, आयुक्त, आदिवासी विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला वकीलांची बाईक रॅली

0
0

महिला वकिलांची बाइक रॅली

महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा कोर्टातील वकिलांनी बाइक रॅली आयोजित केली. या रॅलीचा समारोप सिव्हिल हॉस्पिटल येथे झाला. या ठिकाणी महिला वकिलांनी नवजात अर्भक मातांचा सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामीण जीवन्नोती अभियानात भरती

0
0

लोगो - मेगाभरती

जीवन्नोती अभियानात संधी

१ हजार ३६० जागा; २७ मार्चपर्यंत अर्जाची मुदत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत (एमएसआरएलएम) १ हजार ३६० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून, पदवीधर, पदव्युत्तर आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करता येणार आहे. २७ मार्चपर्यंत अर्ज नोंदवता येणार असून, त्यानंतर उमेदवारांना भरतीची पुढील प्रक्रिया सांगण्यात येणार आहे.

राज्यात दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प (एनआरईटीपी) च्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुका व्यावस्थापक कक्षांमध्ये भरती करण्यात येत आहे. ही भरती अकरा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. भरतीप्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना २० ते ९० हजारांपर्यंतचा मासिक पगार मिळणार आहे. त्यासाठी २७ मार्चपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार असून, उमेदवारांनी http://jobs.msrlm.org/job-openings.php किंवा http://umed.in/ या वेबसाइटवर अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

--

पद जागा

राज्य अभियान व्यवस्थापक ३

अभियान व्यवस्थापक ६

जिल्हा व्यवस्थापक १५

तालुका समन्वयक १३२

क्लस्टर समन्वयक १०५

तालुका अभियान व्यवस्थापक १८१

तालुका व्यवस्थापक २०१

कार्यालय अधीक्षक व जिल्हा व्यवस्थापक १९

क्लस्टर समन्वयक ५८०

प्रभाग संघ सल्लागार ११८

एकूण १ हजार ३६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुमन हिरे यांचा शोधनिबंध सादर

0
0

सुमन हिरे यांचा

शोधनिबंध सादर

नाशिक : नाशिकच्या सुमन हिरे यांचा 'नारीशक्ती'वर आधारित शोधनिबंध दिल्ली येथे आयोजित 'भारतीय नारी - कल, आज और कल' या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला. देशभरातून ५०० महिला, तर राज्यातून सुमन हिरे यांचा शोधनिबंध या परिषदेत सादर केला गेला.

शैक्षिक फाउंडेशन, देशबंधू कॉलेज व चौधरी बंन्सीलाल विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषेदत शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. सिंघल, संघटक महेंद्र कपूर उपस्थित होते. नाशिकमधून सहभागी झालेल्या सुमन हिरे यांनी वैदिक काळापासून आजपर्यंतचा समाजिक, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक, औद्योगिक, साहित्यिक, नाट्य, संगीत, चित्रपट, क्रीडा आणि कृषी या क्षेत्रातील स्त्री प्रवासाचा आढावा घेतलेला शोधनिबंध सादर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांना निधीसाठी साकडे

0
0

कॅन्टोन्मेंट बोर्डाचा १३.७० कोटींचा प्रस्ताव

...

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

कॅन्टोन्मेंट कायद्यातील बदलानुसार केंद्र शासनाच्या अखत्यारित असणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्डांना राज्य शासनाच्या माध्यमातून मूलभूत सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने पालकमंत्री गिरीश महाजन यांना साकडे घातले. सुमारे १३.७० कोटींच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला. यावर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे.

महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाने गतवर्षी ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार कॅन्टोन्मेंट बोर्डांना केंद्र शासनाकडून आलेल्या निधीतून विविध विकासकामांसाठी नगरविकास खात्यांतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे. आतापर्यंत पुणे, देहुरोड व खडकी येथील कॅन्टोन्मेंट बोर्डांना प्रत्येकी पाच कोटींहून जादा निधी तेथील पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार प्राप्त झाला आहे. या धर्तीवर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य बाबुराव मोजाड, दिनकर आढाव, भगवान कटारिया, भाजप तालुकाध्यक्ष तानाजी करंजकर यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात पालकमंत्री महाजन यांची भेट घेऊन शहराचा पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, पथदीप व रुग्णालयासाठी औषधे आदींकरिता १३.७० कोटींचा प्रस्ताव सादर केला. त्यावर महाजन यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सदर निधी उपलब्धतेबाबत आदेश होण्याची कार्यवाही करण्याची विनंती केली.

...

मंगळवारी बैठक

येत्या मंगळवारी (दि.१२) मुख्य सचिवांकडे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी किती निधी मिळणार याकडे नगरसेवकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केमोथेरपीनंतर केसगळतीला विराम

0
0

नाशिकमध्ये स्काल्प कूलिंग मशिन

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कॅन्सरसारख्या आजारात केमोथेरपी ही उपचार पद्धती असून, त्याचे रुग्णांवर विविध परिणाम दिसून येतात. केस गळणे हे एक सर्वसामान्य लक्षण मानले जाते. महिलांसह पुरुषांना सुद्धा यामुळे एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर स्काल्प कूलिंग प्रणाली ही महत्त्वाची ठरते. यामुळे उपचारादरम्यान केस गळतीचे प्रमाण ८० ते ९० टक्के कमी होते, असा दावा करण्यात आला आहे..

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर येथे ही प्रणाली कार्यरत करण्यात आली. यावेळी हॉस्पिटलचे प्रमुख राज नगरकर, डॉ. श्रृती काटे आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून पूर्णत: बरे झालेल्या नमिता कोहोक, रिमा पंजवाणी, रेखा शेकोकर उपस्थित होते.

या पद्धतीबाबत डॉ. काटे यांनी सांगितले, की केमोथेरपी करण्यापूर्वी रुग्णाच्या डोक्याचे तपमान उणे ५ डिग्री सेल्सिअस करण्यात येते. या तापमानामुळे डोक्यातील अनेक रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. याचवेळी केमोथेरपीची सुरुवात होते. यामुळे केमोथेरपीचे औषध डोक्यातील केस वाढविणाऱ्या सेल्सपर्यंत पोहचत नाही. औषधाची कोणतीही इजा न पोहचल्याने केस गळतीचे प्रमाण १० टक्के सुद्धा राहत नाही. दरम्यान, कॅन्सर आजारामुळे रुग्णाला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते.

डोक्यावर केस नसताना समाजात फिरताना थोडाफार न्यूनगंड तयार होतो. लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन सदैव सहानभूतीपूर्वक असतो. या उपचार पद्धतीमुळे महिलांना मोठा दिलासा मिळेल, असे मनोगत कोहोक, पंजवाणी आणि शेकोकर यांनी व्यक्त केले.

...

उपयुक्त प्रणाली

केमोथेरपीचे साइड इफेक्टस होतात. मात्र, बरे होण्यासाठी त्यास पर्याय नसतो. याच काळात रुग्ण मानसिक व शारीरिक पातळीवर खचण्याची शक्यता असते. डोक्यावरील विरळ होत जाणारे केस आणि बारीक होणारे शरीर रुग्णाला अस्वस्थ करते. त्यात रुग्ण महिला असेल तर जास्तच त्रास होतो. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान असलेली ही प्रणाली उपयुक्त ठरू शकेल, असे डॉ. राज नगरकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ वी उत्तीर्णांना एअर इंडियात संधी

0
0

एअक इंडियात 'केबिन क्रू' पदासाठी परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एअर इंडियात केबिन क्रू पदासाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत असून, बारावी उत्तीर्णांना त्यासाठी अर्ज नोंदणी करता येणार आहे. या भरतीतून निवडलेल्या उमेदवारांना दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैद्राबाद आणि बंगलोर येथे केबिन क्रू पदावर नोकरी करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

एअर इंडियात केबिन क्रू पदासाठी होणाऱ्या भरतीप्रक्रियेतील जागा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. गुणवत्ता यादीनुसार योग्य उमेदवारांना नोकरीची संधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या पदासाठी अर्ज नोंदणी सुरू असून, १५ मार्चपर्यंतच अर्ज नोंदवता येणार आहेत. उमेदवारांना अर्जासोबत बारावी उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक व प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. अर्ज नोंदविलेल्या उमेदवारांची २४ मार्च रोजी लेखी परीक्षा घेण्यात येईल. तत्पूर्वी परीक्षेच्या दिवशी उमेदवारांची शारीरिक तपासणी केली जाईल. त्यामध्ये पुरुषांची उंची १७२ सेमी तर, महिलांची उंची १६० सेमी असणे. तसेच पुरुषांचा बीएमआय १८ ते २५, तर महिलांचा बीएमआय १८ ते २२ दरम्यान असणे अनिवार्य आहे. उमेदवारांची शारीरिक तपासणी झाल्यानंतर, लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यातून गुणवत्ता यादीनुसार नोकरीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. ही परीक्षा राज्यात मुंबईत परीक्षा केंद्र असेल, तर देशात दिल्ली व चेन्नई येथे परीक्षा घेण्यात येईल. या पदासाठी अर्ज नोंदविणाऱ्या उमेदवाराचे इंग्रजी व हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे असल्याची अट असून, इच्छुकांनी www.airindia.in या वेबसाइटवर अर्ज नोंदवावेत, असे आवाहन एअर इंडियातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images