Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आई..., स्त्री जन्म घेऊन काय गुन्हा मी केला?

0
0

महिला दिनाच्या दिवशीच मातेने सोडले स्वतःच्या चिमुकलीला वाऱ्यावर

....

म. टा. वृत्तसेवा इंदिरानगर

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या सन्मानासाठी शहरात एकीकडे शेकडो कार्यक्रम होत असताना पांडवलेणीच्या पायथ्याशी मात्र एक माता आपल्या चिमुकलीला सोडून निघून गेल्याची धक्‍कादायक घटना शुक्रवारी घडली. महिलांचा आत्मसन्मान करण्याबरोबरच 'बेटी बचाव' या धोरणाची जनजागृती होत असतानाच अशा प्रकारे एक दिवसाच्या स्त्री अर्भकाला वाऱ्यावर सोडून जाण्याच्या प्रकाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्‍त केला आहे.

जागतिक महिला दिन असल्याने शुक्रवारी (दि. ८) सकाळपासून महिलांसाठी शहरात विविध कार्यक्रम सुरू होते. मात्र पांडवलेणीच्या पायथ्याशी वेगळाच प्रकार घडल्याचे समोर आले. पांडवलेणीच्या पायथ्याशी सचिन दत्तात्रेय घुगे यांची चहाची टपरी आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास घुगे हे टपरीजवळ बसलेले असताना त्यांना अचानकपणे लहान बालकाचा रडण्याचा आवाज आला. त्यामुळे उत्सुकतेने त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले, तर या ठिकाणी एका पांढऱ्या कपड्याच्या पिशवीत स्त्री जातीचे अर्भक असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी तातडीने आजूबाजूच्या नागरिकांना बोलावून या बाळाच्या पालकांचा शोध घेण्याची विनंती केली. नागरिकांना शोध घेतला मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेरीस याबाबत इंदिरानगर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांना बाळास ताब्यात घेऊन दवाखान्यात दाखल केले. हा प्रकार अनैतिक संबंधातील आहे की, मुलीच्या जन्मावरून वाद झाल्याने हा प्रकार घडला याबाबत परिसरात चर्चा सुरू होती. पोलिसांनी घुगे यांच्या फिर्यादीवरून बेवारस सोडून जाणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या बाळाच्या पालकांचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

....

दुपारी एका बंद पिशवीतून बालकाच्या रडण्याचा आवाज येत असल्याने पाहिले तर त्या पिशवीत अर्भक आढळून आले. तातडीने परिसरातील नागरिक व महिलांना बोलाविले. बाळ खूपच रडत असल्याने काही महिलांनी त्याला सावलीत नेऊन पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. पालक कोणी दिसूनच येत नसल्याने अखेरीस पोलिसांना याची माहिती दिली.

- सचिन घुगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकांसमोर कानउघाडणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पंचवटीतील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आडगाव पोलिसांनी शुक्रवारी टवाळखोरांची धरपकड केली. त्यांना ताब्यात घेऊन पालकांसमक्ष समज देऊन सोडून देण्यात आले. पुन्हा टवाळखोरी करताना दिसल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

पंचवटी महाविद्यालयात बाहेरील तरुणांचा वावर वाढला आहे. त्याचा त्रास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होतो. ही बाब लक्षात घेऊन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी तब्बल ३५ युवक-युवतींना ताब्यात घेतले. त्यांना आडगाव पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्या पालकांना प्रत्यक्ष बोलावून त्यांना आणि पाल्यांना समज देण्यात आली. जे पालक येऊ शकले नाहीत त्यांच्याशी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी फोनवरून संपर्क साधत आपले पाल्य काय करतात, याची कल्पना दिली. पुन्हा अशी टवाळखोरी करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

प्रेमीयुगलांना समज

तपोवनातील रामसृष्टी उद्यान हे गेली कित्येक वर्षांपासून प्रेमीयुगलांचा अड्डा बनले आहे. या उद्यानात ठिकठिकाणी बसणाऱ्या प्रेमी युगलांमुळे पर्यटक फिरकत नाहीत. या उद्यानातही पोलिसांनी शुक्रवारी दुपारी काही प्रेमीयुगलांना ताब्यात घेतले. पोलिस उद्यानात पाहणी करीत असल्याचे बघून काहींनी पळ काढला तर काही उद्यानात जाणेच टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोरांवर संक्रात

0
0

शहरात पोलिसांकडून ५१ जणांवर कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी टवाळखोरांविरोधातील कारवाई कायम आहे. यात शंभरहून अधिक व्यक्तींवर मुंबई पोलिस अॅक्टनुसार वेगवेगळी कारवाई करण्यात आली. कारवाईच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी शहरातील विविध भागात ५१ जणांविरुद्ध कारवाई झाली. त्यात भद्रकाली पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली.

अंबड पोलिस ठाण्याचे हवालदार विजय शिंपी यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार स्टेट बँक चौक परिसरात बुधवारी (दि. ६) रात्री दहा ते बारा इसमांनी बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता अडवून जमाव बंदी आदेशाचे उलंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सर्व आरोपी अज्ञात आहेत. आडगाव पोलिस ठाणे हद्दीत पंचवटी कॉलेजसमोर रात्री अकरा वाजेच्या सुमारास भगवान टोचे, पंकज शिंदे, ऋषिकेश साळवे, श्वेतांबर जोशी आणि अभिजीत बोराडे या पाच तरुणांनी जमावबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी पोलिस नाईक अनिल केदारे यांनी तक्रार दाखल केली आहे.

इंदिरानगर पोलिसांनी पाथर्डी रोडवरील हॉटेल रायबासमोर रस्त्यावर थांबलेल्या संतोष पवार, गणेश माळी, गजानन वाघमारे, हरी कोकाटे, संतोष कडाळे, जनार्दन खंदारे या सहा जणांना अटक केली. गंगापूर पोलिसांनी ध्रुवनगर बस थांबा परिसरात गौरव चौधरी, रवींद्र मटाले, योगेश गुंबाडे, पवन गवई सुधाकर वाठोरे यांना जमावबंदी आदेशाचे भंग केल्याबद्दल अटक करून जामिनावर मुक्त केले.

सातपूर, स्वारबाबानगर येथील पवन पवार, देवानंद काळे, अविनाश शिंदे, अमिन शेख, हेमंत सोनवणे, कमलेश जाधव, इस्माईल शेख, निलेश जाधव यांच्यासह पन्नास ते साठ जणांविरूद्द सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी हाती सापडलेल्या सहा जणांना अटक करून त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

भद्रकालीत मोठी कारवाई

भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत गंजमाळ, कोमलकुशन आणि तलावडी अशा ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. शालिमार येथील नेपाळी कॉर्नर परिसरात भद्रकाली पोलिसांनी केलेल्या कारवाईत जितेश वाघेला, दिपक अग्रवाल, संदिप जाधव, इम्रान खान, सागर वाघेला, ताहेर बेग या सहा जणांना समज देऊन सोडण्यात आले. खडकाळी सिग्नलजवळ जमावबंदी आदेशाचे भंग करणारे गोपी आचारी, मुझेफ्फर कुरेशी, वसीम बंजारी, सलीम खान, अबीद हुसेन या पाच जणांना अटक केली. कोमल कुशन समोर जमलेल्या मोजेस लांडगे, विशाल चिलवंते, दीपक जोंधळे, सुधाकर जाधव, आनंद जाधव, अमिर शेख, सनी वारे या सात जणांना अटक केली. तलावडी परिसरात बाळासाहेब पाईकराव, विशाल सदन, रवी वाळे, जलीश ठाकूर, नंदू क्षिरसागर यांच्यावर तर दुसऱ्या घटनेत याच भागातील इरफान पठाण, जय लभडे, दिपक तोकडे, श्यामसिंग चव्हाण, कल्लू चव्हाण, नागराव पिंगळे या सहा जणांवर कारवाई झाली. यातील काही संशयितांना जामीन मंजूर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट प्रकल्पांची विभागणी

0
0

प्रोजेक्ट गोदाच्या पाच, तर गावठाण पुनर्विकासच्या दोन निविदा

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीअंतर्गत असलेल्या 'प्रोजेक्ट गोदा' आणि 'गावठाण विकास' योजनेतील चढ्या निविदा दरांबाबत विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर या दोन्ही कामांची वेगवेगळ्या भागात विभागणी करून शुक्रवारी नव्याने फेरनिविदा काढण्यात आल्या आहेत. गोदा प्रोजेक्टच्या ११० कोटींच्या कामांची पाच भागांत, तर गावठाण पुनर्विकास प्रकल्पाच्या कामांची दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. या कामांच्या स्वतंत्रपणे निविदा कंपनीने काढल्याने या कामांना चालना मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत 'प्रोजेक्ट गोदा' व 'गावठाण विकास' असे दोन महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट हाती घेण्यात आले होते. त्यासाठीच्या निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. परंतु, या प्रकल्पासाठी प्राप्त झालेल्या जादा दराच्या निविदांमुळे थेट कंपनीसह प्रकल्पही अडचणीत आले होते. प्रोजेक्ट गोदाची ७३ कोटींची निविदा ही ३८.८८, तर गावठाण विकासची ३२४ कोटींची निविदा ६० टक्के जादा दराने आली होती. स्मार्ट कंपनीला १४४ कोटींच्या आर्थिक तुटीचा सामना करावा लागत असताना या जादा दराच्या निविदांमुळे आर्थिक तूट ३०४ कोटींवर गेली. ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून कर्जरोखे (म्युनिसिपल बॉण्ड) काढण्याचा विचार सुरू झाला होता. त्यावरून संचालकांसह नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. तसेच, थेट पंतप्रधान कार्यालयाकडेही तक्रार करण्यात आली होती. या कामांची विभागणी केल्यास निविदा कमी येतील, असा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यामुळे अखेर वाद टाळण्यासाठी कंपनीच्या वतीने फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनीने शुक्रवारी गोदा प्रोजेक्टच्या कामांचे पाच, तर गावठाण पुनर्विकास योजनेचे दोन भाग केले. प्रोजेक्ट गोदाच्या कामांचे ११० कोटींच्या पाच निविदांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. गावठाण पुनर्विकासमधील ३५० कोटींच्या कामांची दोन भागात विभागणी केली आहे. या कामांच्या स्वतंत्र निविदा जारी करण्यात आल्याने त्याला छोट्या ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळून दर कमी येतील, असा आशावाद कंपनीने व्यक्त केला आहे.

....

निविदा दर घटण्याची शक्यता

या दोन कामांची आता स्वतंत्र भागात विभागणी केल्याने निविदा दर घटतील असा दावा कंपनीने केला आहे. गावठाण विकास प्रकल्पांतर्गत जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ, जलवाहिनी, रस्ते बांधणी, ड्रेनेज, पथदीप आदी कामांसाठी यापूर्वी एकत्र निविदा काढण्यात आली होती. आता रस्ते वेगळे करण्यात आले असून, पाणीपुरवठ्याशी संबंधित कामांची वेगळी निविदा केली आहे. प्रोजेक्ट गोदामध्ये गोदा सौंदर्यीकरणात आता गोदागार्डन, हेरिटेज वॉक, सायकल ट्रॅक, जे. टी. पॉईंटचा सहभाग केला आहे.

....

प्रोजेक्ट गोदाच्या कामांची विभागणी

गोदा सौंदर्यीकरण - ६७.८८ कोटी

गोदा स्वच्छता - १४.८ कोटी

मॅकेनिकल गेट - १९.८ कोटी

गोदा सिवील - १४ कोटी

गोदा गाळ काढणे - ११.१६ कोटी

...

गावठाण पुनर्विकास कामाची विभागणी

शहर अंतर्गत रस्ते - २४१ कोटी

वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर - १०९ कोटी

स्काडा प्रोजेक्ट - २८४ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोड-रोमियोंसाठी आता स्पाय कॅमेरा

0
0

हैदराबादच्या धर्तीवर महिला पोलिसांचे विशेष पथक

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet : @ArvindJadhavMT

नाशिक : रस्त्यावर अथवा एखाद्या कोपऱ्यात महिलांची छेड काढणाऱ्या रोड रोमियोसाठी स्पाय कॅमेऱ्याचा वापर करणाऱ्या एका विशेष महिला पोलिस पथकाची नाशकात नियुक्ती करण्यात येणार आहे. हैदराबाद येथे हा प्रयोग यशस्वी झाला असून, काहीच दिवसात हे पथक नाशिक पोलिस दलात कार्यान्वित होणार आहे.

घराबाहेर पडणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी छेडछाडीच्या घटनांना सामोरे जावे लागते. मात्र, रोड रोमियांना तोंड देण्यापेक्षा गप्प राहण्याचे धोरण महिलांना स्वीकारवे लागते. छोट्या मोठ्या घटनांकडे सर्वच पातळींवर कानाडोळा होत असल्याने अशा प्रकरणांमध्ये वाढ होते आहे. टवाळखोरीचे उच्चाटन करण्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना विशेष सुचना केल्या असून, त्यानुसार पोलिस ठाणे निहाय कारवाई सुरू झाली आहे. आता एक पाऊल पुढे टाकत शहर पोलिसांनी एका विशेष पथकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी सांगितले, की छेडछाडीच्या घटनांना पायबंद घालून महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर हैदराबाद पोलिसांनी सुरू केलेल्या महिलांच्या एका विशेष पथकाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यात येणार आहे. या पथकात महिला पोलिसांचा समावेश असतो. त्यांच्याकडे स्पाय कॅमेरे देण्यात येतात. कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून कार्यरत असताना या पद्धतीने ७२ हजारांहून अधिक टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली होती. रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासाठी पोलिस रस्त्यावरील दिसतील, अशा पद्धीतीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येत असून, त्याचा चांगला परिणाम दिसून येईल.

टवाळखोरांचे चित्रिकरण

महिला पोलिस कर्मचारी साध्या वेषात गर्दीच्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी टवाळखोरांचे चित्रिकरण करून टवाळखोरांवर कारवाई करण्यात येते. स्पाय कॅमेऱ्यांमुळे पुरावा पोलिसांच्या हाती असतो. त्यामुळे कडक कारवाई सोपे होते. हा प्रयोग शहरातील कॉलेजरोड सारख्या भागाबरोबर बस स्थानक, झोपडपट्टी भाग, बाजार अशा वेगवेगळ्या ठिकाणी राबविण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमपीएससीत शंभरावर तरुणांचे यश

0
0

स्पर्धा परीक्षेत नाशिकची चढती कमान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने गेल्या वर्षात घेण्यात आलेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या संयुक्त परिक्षेतील पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकमधील किमान शंभरावर विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. पोलिस उपनिरीक्षक पदाकरीत एकूण ६५० जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. इतर पदे मिळून एकूण १००८ पदे होती.

एमपीएससीच्या वेबसाइटवर शुक्रवारी दुपारी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालाचे नाशिककरांसाठी विशेष महत्त्व आहे. विविध प्रवर्गातून नाशिकमधील चार उमेदवारांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याशिवाय शंभरपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत बाजी मारली आहे. ही संख्या नाशिकसाठी आजवरच्या आलेखातील सर्वोच्च ठरावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारिरीक चाचणी आणि मुलाखत अशा चार टप्प्यात ही परीक्षा पार पडली होती.

यांनी राखले अव्वल स्थान

परीक्षेत एससी प्रवर्गातून राहुल अशोक केदारे याने राज्यात प्रथम, सोनाली देवीदास अहिरे हिने एससी महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम, भगवंत संतोष भगदाणे याने एनटी बी प्रवर्गातून राज्यात प्रथम आणि अर्चना पंढरीनाथ निकम हिने एससी प्रवर्गातल खेळाडूंमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. तर, अमोल पांडूरंग मांजरे याने एससी प्रवर्ग खेळाडूंमध्ये राज्यात चतुर्थ, स्वप्नील भगवान दळवी याने खुल्या प्रवर्गातील खेळाडूंमध्ये राज्यात चतुर्थ, सुनील तुळशीराम खैर याने ओबीसी प्रवर्गात राज्यात सातवा आणि वंदना राजाराम कनोजा हिने एससी प्रवर्गातून राज्यात चतुर्थ क्रमांक पटकाविला.

नाशिकमधील शंभरापेक्षाही अधिक उमेदवारांनी या परीक्षेत मिळविलेले यश हे निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. निकालातील या नाशिककरांच्या भरघोस यशाने शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यंदाच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश यशस्वी विद्यार्थी हे ग्रामीण आणि अतिशय सामान्य कुटूंबातील आहे. यातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनतीचा साक्षीदार मला होता आले. त्यांचे यश इतरांनाही प्रेरणादायी आहे.

\B- राम खैरनार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला सक्षमीकरणासाठीच रात्रीची रॅली

0
0

तुप्ती देसाई यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महिला आता अन्यायाविरुद्ध लढणार आहेत. त्यामुळे ही रॅली महिला सुरक्षिततेची रॅली आहे. महिला रात्रीदेखील सक्षमपणे रस्त्यावर फिरू शकतात, हे दाखवून देण्यासाठी आम्ही ही रॅली काढली असल्याचे प्रतिपादन भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी केले.

जळगाव जिल्हा महिला असोसिएशन, भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त जळगावात गुरुवारी मध्यरात्री 'महिला रात्र' हा एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांची उपस्थिती होती. यावेळी जळगावातील महिला संघटाना असोसिएशनसह अनेक महिला मंडळांनी या रॅलीत सहभाग घेतला.

रडणार नाही लढणार

'महिला रात्र' या अभिनव उपक्रमात जळगाव शहरातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. मध्यरात्रीही महिला पुरुषांच्या बरोबरीने निर्भयपणे फिरू शकतात, महिला आता रडणार नाही तर अन्यायाविरुद्ध लढणार आहेत, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांनी एकत्र येऊन शहरातील काव्यरत्नावली चौक ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलापर्यंत हातात मशाल घेऊन रॅली काढली. महिलांना आज पुरुषांच्या बरोबरी स्थान असल्याचे सांगितले जाते. महिलांना अनेक पुरस्कार दिले जातात, त्यांचा सत्कार केला जातो. पण आजही पुरुषी मानसिकतेमुळे सुरक्षित आहेत का, हा खरा प्रश्न आहे. महिला आता अन्यायाविरुद्ध लढणार आहेत असेही तृप्ती देसाई यावेळी म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅफिक एज्युकेशन हवे अभ्यासक्रमात

0
0

परिवहन आयुक्त चन्ने यांनी सांगितले महत्व

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शालेय अभ्यासक्रमात ट्रॅफिक एज्युकेशन नियमित असले पाहिजे. ट्रॅफिकसाठी अनेक चिन्ह ठिकठिकाणी लावले जातात. पण, त्यातील काही चिन्ह चित्रांमुळे कळते, पण बऱ्याच जणांना ते माहीतच नसते. त्यामुळे ते अभ्यासक्रमातून आले तर त्यातून अपघाताचे प्रमाणही घटेल असे सांगत राज्य परिवहन विभागाचे आयुक्त शेखर चन्ने यांनी या नियमांचे महत्त्वही सांगितले.

नाशिक फर्स्टतर्फे रस्ता सुरक्षा पंधरवडात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळयात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ट्रॅफिक एज्युकेशन पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमात मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील हे उपस्थित होते.

या सोहळ्यात नाशिक फर्स्टला शालेय मुलांना रस्ता सुरक्षा वाहतुकीचे प्रशिक्षण देण्यासाठी मे. मुंगी इंजिनीअर्स यांनी स्कूलबस भेट दिली. त्या बसचेही उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते हे उपस्थित होते. नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली.

..

पारितोषिक वितरण

नागरिकांमध्ये वाहतूक सुरक्षेविषयी जागृती निर्माण व्हावी यासीट नाशिक फर्स्टने पोलिस आयुक्तालय, आरटीओ व हिरो मोटोकॉर्पच्या सहकार्याने 'रस्ता सुरक्षा पंधरवडा' आयोजित केला होता. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी व वाहतूक शाखेतील पोलिसांच्या वाहतूक सुरक्षेविषयी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी केले.

..

हे आहेत पारितोषिक विजेते

रोवर रायडर चॅम्पियन

प्रथम : अल्पेश वासानी, आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेज (१० हजार रुपये रोख)

द्वितीय : कल्पेश खैरनार, आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेज (७५०० रुपये रोख)

तृतीय : शुभम चौधरी, संदीप फाउंडेशन (पाच हजार रुपये रोख)

...

पोलिस स्पर्धा

विजेते : प्रभाकर आहिरे, देवराम सुरंजे, सागर चौधरी आणि गणेश धेरिंगे (प्रत्येकी २० हजार रुपये)

उपविजेते : अशोक दराडे, गोकुळ वाबळे, मनीष चौधरी, दीपक चव्हाणे (बक्षीस प्रत्येकी १० हजार रोख)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयएपी’ अध्यक्षपदी डॉ. संजय आहेर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालरोग तज्ज्ञांची राष्ट्रीय स्तरावरील संघटना 'इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक' (आयएपी) च्या नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी शिशुतज्ज्ञ डॉ. संजय आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०२० पर्यंत त्यांचा कार्यकाल राहणार असून, आयएपीची इतर कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली.

'आयएपी'ची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यात द्वि-वार्षिक नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सभेच्या प्रारंभी माजी अध्यक्ष डॉ. जयंत रणदिवे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा सांगितला. नवीन कार्यकारिणीत डॉ. संदीप पाटील व डॉ. प्रवीण काळे यांनी सचिवपदी तर डॉ. कविश मेहता यांची कोषाध्यक्षपदावर नियुक्ती झाली आहे.

नवनियुक्त अध्यक्ष डॉ. आहेर म्हणाले, की ज्ञान संवर्धन व सामाजिक बांधिलकीचे अनेक कार्यक्रम आगामी वर्षात संघटनेच्या माध्यामातून घेण्यात येतील. ग्रामीण व आदिवासी भागातील कुपोषण तसेच लसीकरण जागरुकता यावरही विशेष भर दिला जाईल. शिशुतज्ज्ञांच्या ज्ञानसंवर्धनासाठी कार्यशाळा तसेच राष्ट्रीय परिषदेचे आयोजन संघटनेतर्फे केले जाईल. तसेच देश-विदेशातील नामांकित बालरोग तज्ज्ञांचे चर्चासत्र भरविण्यात येतील, अशीही माहिती त्यांनी दिली. सभेत शहरातील बालरोग तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाचे विषप्राशन

0
0

नाशिक : विषारी औषध सेवन करून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.७) रात्री सिडकोतील दत्तचौक परिसरात घडली. मच्छिंद्र धर्मा तेली (२७, रा. दत्तचौक, केबल ऑफिसजवळ) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मच्छिंद्र याने गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घरात विषारी औषध सेवन केले. ही बाब लक्षात येताच पत्नीच्या त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केले. उपचार सुरू असताना मध्यरात्री त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकटीतून बाहेर पडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चौकटीबद्ध जीवनाच्या नियमावलीत अडकून राहिल्यास नेतृत्वगुण विकसित होत नाहीत. त्यामुळे धैर्यवान होण्यासाठी स्त्रियांनी चौकटीतून बाहेर पडावे, असा सल्ला भारतीय वायुसेनेतील निवृत्त स्क्वॉड्रन लीडर सुप्रिया चित्रे यांनी दिला. 'निमा' येथे आयोजित जागतिक महिलादिनच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

कुशल नेतृत्वासाठी विशिष्ट संधीची आ‌वश्यकता नसते, तर येणाऱ्या आव्हानांना बेधडकपणे सामोरे जाणे हेच खरे नेतृत्वकौशल्य असते. महिलांनी आपल्यातील नेतृत्वक्षमता हेरून प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सक्षम असणे गरजेचे आहे, असेही चित्रे यांनी नमूद केले. नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'निमा'चे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, मानद सचिव सुधाकर देशमुख, खजिनदार कैलास आहेर व्यासपीठावर होते. 'निमा'च्या महिला उद्योजिका समितीच्या अध्यक्षा नीलिमा पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

मनातल्या गोष्टींना वाट करून द्या

महिला उद्योजिकांशी संवाद साधताना चित्रे म्हणाल्या, की मानसिक आरोग्य निरोगी असणेदेखील गरजेचे आहे. पण, बहुतांश वेळा मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. परिणामी ताणतणाव वाढून नैराश्य येण्याची भीती अधिक असते. मानसिक संतुलन बिघडल्यास त्याचा आयुष्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे मनातल्या गोष्टींना वाट करून देणे गरजेचे असते. प्रत्येक महिलेने कोणतीही गोष्ट मनात ठेवण्यापेक्षा जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करायला हवी. संवादातून उपाय आणि मानसिक समाधान मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंत व्याख्यानमालेच्या अनुदानासाठी उपोषण

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या वर्षी मे २०१८ मध्ये झालेल्या वसंत व्याख्यानमालेचे तीन लाख रुपये अनुदान महापालिकेने अदा न केल्याने वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी शुक्रवार (दि. ८) पासून आमरण उपोषणास प्रारंभ केला. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सकारत्मकता दर्शवूनही कार्यवाही न केल्याचे अध्यक्ष बेणी यांचे म्हणणे आहे.

नाशिकच्या गोदाकाठावर गेल्या ९७ वर्षांपासून मे महिन्यात वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानयज्ञात हजारो नागरिक दरवर्षी उत्साहात सहभागी होत असतात. नाशिक नगरपालिका आणि त्यापाठोपाठ महापालिकेकडून दरवर्षी मिळणारे अनुदान, स्मृती व्याख्यान योजनेतील उभारलेल्या निधीतून मिळणारे व्याज आणि श्रोत्यांकडून मिळणारी देणगी या माध्यमातून व्याख्यानमालेचा उपक्रम अखंडपणे सुरू असतो. परंतु, मे २०१८ मध्ये झालेल्या व्याख्यानमालेसाठी मनपा महासभेने तीन लाख रुपये अनुदान देण्याचा ठराव पारीत केला असून, त्या अनुषंगाने सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता एप्रिल २०१८ मध्येच केलेली आहे, तरीही प्रशासनाकडून अनेकवेळा पाठपुरावा करूनही अद्याप अनुदानाचा धनादेश मिळालेला नाही, असे अध्यक्ष बेणी यांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने नंतर ती रक्कम मिळणार नाही म्हणून उपोषणाचा मार्ग अवलंबत असल्याचे बेणी म्हणाले.

महापालिकेने आजवर दिलेल्या अनुदानाचा वसंत व्याख्यानमालेने गैरवापर केल्याचा पुरावा असल्यास श्रीकांत बेणी यांच्याविरुद्ध महापालिकेने कायदेशीर कारवाई करावी किंवा मे २०१८ च्या मालेच्या ज्ञानसत्रासाठी मनपा महासभेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ३ लाख रुपये अनुदानाचा धनादेश तात्काळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

...

वसंत व्याख्यानमालेला अनुदान नाहीच : गमे

महापालिकेच्या नियमात बसत नसल्याने वसंत व्याख्यानमालेला तीन लाख रुपयांचे अनुदान देण्यासंदर्भातील प्रस्ताव तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंनीच नाकारला आहे. हा प्रस्ताव माझ्याकडे पुन्हा आल्यानंतर मी सुद्धा अनुदान देण्याचे नाकारले असल्याचे स्पष्टीकरण आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे. बेणी यांनी या निर्णयाबाबत फेरविचार करण्याची मागणी केल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांना सदरची फाइल नव्याने तपासण्याचे आदेश दिले आहेत, असे गमे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फाळके स्मारकात मनोरंजन पार्क

0
0

पीपीपी तत्त्वावर ठेकेदारांकडून मागवले स्वारस्य प्रस्ताव

.....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

फाळके स्मारकात फिल्मसिटी उभारण्याची घोषणा झाली असतानाच प्रशासनाने या पार्कचा मनोरंजन पार्क म्हणून विकास करण्यासाठी पीपीपी तत्त्वावर निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. फाळके स्मारकाच्या विकासासाठी ठेकेदारांकडून स्वारस्य प्रस्ताव मागविण्यात आले असून, ठेकेदारानेच या पार्कच्या विकासाचा आराखडा पालिकेला २२ मार्चपर्यंत सादर करायचा आहे. त्यामुळे फाळके स्मारकाचा वनवास संपण्याची चिन्हे असून, या ठिकाणी फिल्मसिटी विकसित करण्याच्या दृष्टीने पालिकेने पहिले पाऊल टाकले आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे मूळचे नाशिककर होते. त्यामुळे फाळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पांडवलेणीच्या पायथ्याशी भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय अशोक दिवे यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत घेण्यात आला. या प्रकल्पावर महापालिकेने गेल्या १७ वर्षांत १८ कोटींचा खर्च केला. पंरतु, यातून पालिकेला अवघे ८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. तोट्यातील या स्मारकाची सध्या दुरवस्था झाली आहे. येथील संगीत कारंजे बंद असून, उपाहारगृह आणि विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. स्मारकाची दुरवस्था बघून पालिकेने बीओटी तत्त्वावर विकास करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फाळके स्मारकाचा प्रश्न प्रलंबित होता.

स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी या स्मारकाचा फिल्मसिटी म्हणून विकास करण्याचा निर्णय घेतला. तशी तरतूद बजेटमध्ये केली असून, त्याला महासभेनेही मंजुरी दिली आहे. प्रशासनाने या स्मारकाच्या विकासाला चालना दिली असून, स्मारकात मनोरंजन पार्क उभारण्यासाठी ठेकेदारांकडून स्वारस्य प्रस्ताव मागवले आहेत. त्यामुळे उशिरा का होईना फाळकेंच्या नावाने उभारलेल्या स्मारकाला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.

...

असा आहे प्रस्ताव

आता ठेकेदारामार्फत स्मारकाची डागडुजी केली जाणार असून, मनोरंजन पार्क म्हणून त्याचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी ठेकेदार प्रथम आर्थिक गुंतवणूक करेल. तसा आराखडाही पालिकेला येत्या २३ मार्चपर्यंत पालिकेला सादर केला जाईल. पालिकेने मंजुरी दिल्यानंतर ठेकेदार पर्यटकांसाठी शुल्काची आकारणी करून आपली गुंतवणूक वसूल करेल. ठेकेदाराची गुंतवणूक वसूल झाल्यानंतर हे स्मारक पालिकेकडे पुन्हा हस्तांतरित केले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध मद्यसाठा त्र्यंबकला हस्तगत

0
0

एलसीबीची कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवैध मद्याची तस्करी रोखण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश मिळाले. पोलिसांनी एक लाख ७५ हजार ६५३ रूपयांच्या मुद्देमालासह एक पीकअप वाहन जप्त केले.

शंकरलाल भवरलाल लोहार (३८, रा. देवगड, राजस्थान) आणि श्रवणसिंग शसुसिंग चौहाण (३५, रा. बुगडीकलीया, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्र्यंबकेश्वर पोलिस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना त्र्यंबक ते जव्हाररोडने मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्र्यंबकेश्वर ते सापगावमार्गे आंबोली फाटा परिसरात सापळा रचला. यावेळी वाहनांची तपासणी करीत असताना संशयित घेऊन जात असलेली महिंद्रा बोलेरो पीकअप पोलिसांच्या हाती लागली. गाडीत बीअर आणि विदेशी मद्याचे ८१ बॉक्स आढळून आले. दादरा नगर हवेली येथून तस्करी करून हा माल ते राज्यात वितरित करणार होते. संशयितांनी यासाठी वाहनामध्ये एक विशेष कप्पा तयार केला होता. तर, हा कप्पा झाकण्यासाठी लोकर असलेल्या १३ गोण्या वाहनात ठेवल्या होत्या.

पोलिस अधीक्षक आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक करपे, पीएसआय स्वप्नील नाईक, एएसआय चंद्रभान जाधव, हवालदार राजू दिवटे, नाईक जालिंदर खराटे, कॉन्स्टेबल लहू भावनाथ, कपालेश्वर ढिकले, संदीप लगड, बापू चैधरी आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा गायींची व्हॅनमधून सुटका

0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

नाशिकमधून संगमनेर येथे कत्तलीसाठी पिक अप व्हॅनद्वारे कोंबून वाहतूक केल्या जाणाऱ्या सहा गायींची शिंदे टोलनाका येथे सुटका करण्यात आली. हा प्रकार गुरुवारी (दि. ७) रात्री दहा वाजेच्या दरम्यान उघडकीस आला.

शोएब नवाज खान (वय २२, रा. द्वारका) हा चालक साथिदार गंगाधर गणपत गायकवाड (वय ३०, रा. जळे, ता. पेठ) याच्यासोबत पिक अप व्हॅनमधऊन (एमएच १५ जीव्ही १२१६) सहा गायी संगमनेर येथे कत्तलीसाठी घेऊन जात होता. नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे गावाजवळील टोल नाक्यावर नाशिकरोड पोलिसांनी चालक खान व गायकवाड यांना ताब्यात घेत वाहनासह एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल व गायी जप्त केल्या. दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक जखमी

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडणाऱ्या वाहनाची धडक बसल्याने दुचाकीचालक ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. ही घटना एकलहरे रोडवरील गणेशा व्हॅली सोसायटीसमोर घडली. रमेशचंद्र पाटील असे जखमी ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. ते स्वतःकडील ॲक्टीव्हाने (एमएच १५ डीए २५६९) गायकवाड मळ्याकडे जात असतांना गणेशा व्हॅलीच्या गेटसमोरील सोसायटीतून बाहेर पडणाऱ्या दुचाकीची (एमएच १५ एफझेड ००७३) जोरदार धडक बसली. अपघातानंतर दुचाकीस्वाराने पोबारा केला. जखमी पाटील यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्लील चित्रफितींप्रश्नी सखोल चौकशी करा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिलादिनाच्या पूर्वसंध्येला महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने प्रशिक्षणात देण्यात आलेल्या नव्या स्मार्ट फोनमध्ये अश्लील चित्रफिती आणि छायाचित्रे आढळल्याने त्याचा निषेध व्यक्त करून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे शुक्रवारी महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली.

अश्लील चित्रफितींप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली. यावेळी केंद्र व राज्य सरकार, तसेच महापालिकेतील बेजबाबदार अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले. नवीन स्मार्ट फोनमध्ये अश्लील चित्रफिती आणि छायाचित्रे असणे हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. या मोबाइलमध्ये २०१५ पासूनचे फोटो व व्हिडीओ असल्याने हे मोबाइल नवीन आहेत, की नाही अशी शंका निर्माण होत आहे. यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा संशय आहे. याबाबत तांत्रिक कारण देत मोबाइल पुन्हा जमा करून घेण्यात आले असले, तरी या घडलेल्या घृणास्पद प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी डॉ. शेफाली भुजबळ, योगिता हिरे, कविता कर्डक, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, नगरसेविका सुषमा पगारे, माजी नगरसेविका चित्रा तांदळे, पूनम वीर, सुरेखा निमसे, दीपा कमोद, शोभा आवारे, सरिता पगारे, मनीषा अहिरराव, रजनी चौरसिया, मीनाक्षी गायकवाड, शाकेरा शेख, माधवी पहेकर, शकिरा शेख, साहिरा शेख, सलमा शेख यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवानगी ऑनलाइनच!

0
0

बांधकामची ऑफलाइन परवानगी आयुक्तांनी फेटाळली

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बांधकाम परवानगी ऑनलाइन करण्यासाठी महापालिकेने नगररचनात सुरू केलेल्या ऑटो डीसीआर प्रणालीचे काम समाधानकारक नसले तरी, त्यात हळूहळू सुधारणा होत असल्याचे सांगत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ऑफलाइन परवानगी देण्याची वास्तुविशारद आणि बिल्डरांची मागणी फेटाळून लावली आहे. ऑटो डीसीआरमुळे टाइमलाइनमध्ये काम होणे अपेक्षित असल्याने संबंधित कंपनीला अंतिम समज देण्याबरोबरच सीईओनाही त्याची जाणीव करून दिली आहे. प्रणालीत लवकरच सर्व सुधारणा होतील, असा आशावाद आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

शहर विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार बांधकाम विषयक परवानगी देण्यासाठी महापालिकेने जुलै २०१७ पासून ऑटो-डीसीआर संगणक प्रणाली कार्यान्वित केली. पुणे येथील सॉफ्टटेक कंपनीला काम देण्यात आले. परंतु, या ऑनलाइन प्रणालीमुळे कामकाजात गतिमानता येण्याऐवजी अधिक विलंब होऊ लागल्याने तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे वास्तुविशारद आणि बांधकाम व्यावसायिकांचीच कोंडी झाली आहे. नूतन आयुक्त राधाकृण गमे यांनी पदभार घेतल्यानंतर संबंधित कंपनीला सर्व त्रुटी दूर करण्यासाठी जानेवारीचा अल्टिमेटम दिला होता. तरीही प्रलंबित प्रकरणे आणि दाखल प्रकरणांमधील तफावत दूर होत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे गेल्या मंगळवारी आयुक्तांनी वास्तुविशारद यांच्यासह नगररचना विभागातील अधिकारी आणि कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. अधिक केसेस प्रलंबित राहणे, पीडीएफ न मिळणे यासारख्या तक्रारी कायम असल्याचे स्पष्ट झाल्याने कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा इशारा आयुक्त गमेंनी दिला होता. त्यामुळे या दणक्यानंतर कंपनीचे सीईओ विजय गुप्ता यांनी आयुक्त गमेंसोबत चर्चा करीत कामात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे या परवागन्या पुन्हा ऑफलाइन सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे याबाबत बोलताना आयुक्तांनी ऑफलाइन परवानगी देण्याची मागणी फेटाळून लावत कामात सुधारणा होत असल्याचा दावा केला आहे. प्रणालीतील शॉर्टफॉल दूर करण्यात आले असून, त्यांची ट्रायल रन सुरू आहे. कंपनीसोबत झालेला करारनामाही अभ्यासासाठी पाठवला आहे. एका टाइम लिमिटमध्ये काम व्हायला हवे. त्यांची जाणीव कंपनीला करून देण्यात आली असून, लवकरच त्यात सुधारणा होईल असा दावा केला आहे.

...

....तर गुन्हा दाखल करू

कंपनीच्या वतीने शहरातील एका पेट्रोलपंपाला चुकीच्या पद्धतीने परवानगी देण्यात आली आहे. त्या संदर्भात तक्रार आल्यानंतर त्याची तपासणी केली जात आहे. या प्रकरणात कंपनीच्या वतीने चुका केल्याचे आढळल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा आयुक्तांनी कंपनीला दिला आहे. परवानगी देताना काही चुका झाल्या असतील, तर त्याचीही गय केली जाणार नाही असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाहिरातबाजीवर अंकुश

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात विविध ठिकाणी विनापरवाना जाहिरात फलक लावून शहराच्या विद्रुपीकरणात भर टाकणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे असे गुन्हे दाखल होत असून, नागरिकांकडून त्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

सिडकोत साईबाबानगर भागातील महाकालीनगर येथे साईराज मित्रमंडळ आणि शिवमुद्रा मित्रमंडळ यांनी मंडळाचे बेकायदा फलक लावले होते. या प्रकरणी दोन्ही फलक लावणाऱ्यांचा शोध घेण्यात आला. त्यांच्याविरोधात महापालिका कर्मचारी राजेंद्र उगले यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. कामटवाडे येथेही डीजीपीनगर, माऊली लॉन्स भागात भोरे कोचिंग क्लासेस यांनी महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता फलक लावल्याची तक्रार सत्येन शिंदे यांनी दिली होती. त्यानुसार अंबड पोलिसांनी क्लास संचालक नितीन चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

द्वारका सर्कल आणि टाकळीरोड परिसरातदेखील अशीच कारवाई करण्यात आली. या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा फलक लावण्यात आले होते. त्यांच्याविरोधात पांडे यांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र रेडिएटरर्स टाकळी फाटा, महाराजा जिलेबी सेंटर काठे गल्ली, एस. एन. पेस्ट कंट्रोल, कुरिअर व्यावसायिक सतीश लुथरा, बुऱ्हाणी कलेक्शन, टाकळीरोड, गोल्डन होरायझन स्कूल, ऑक्स्फर्ड अकादमी, वात्सल्य अनाआश्रम, शहा मोटार स्कूल, ड्रायव्हर प्रोव्हायड सर्व्हिसेस, हिरा अकादमी, एलआयसी एजंट हप्ता स्वीकृती केंद्र अशा १२ जणांविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

--

मोबाइल क्रमांकावरून तपास!

सातपूर येथे विविध ठिकाणी आणि झाडांवर जाहिरात फलक लावणारे एस. एन. पेस्ट कंट्रोल, सैन्य भरती अकादमी, हिरा अकादमी यांच्यासह संगणक विक्रीचे फलक आणि ए शेप मी मोबाइल व बंदूक मोबाइल असे जाहिरात फलक लावणाऱ्यांविरोधात महापालिकेचे राजेंद्र पांडे यांच्या तक्रारीवरून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काही फलकांचे मालक न सापडल्यामुळे फलकांवरील मोबाइल क्रमांकावरून पुढील तपास करण्यात येत आहे. थेट कायद्यानुसार कारवाई होत असल्याने शहरातील बकाल अवस्थेस आळा बसेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रणरागिणी पुरस्काराने महिला पोलिसांचा गौरव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस दलात वेगवेगळ्या पदांवर उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

आतंरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पोलिस आयुक्तालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, माधुरी कांगणे यांच्यासह इतर महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत्या. यावेळी महिला सफाई कर्मचारी, महिला कार्यालयीन शिपाई यांना साडी व पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पोलिस आयुक्तांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत सर्वांना मार्गदर्शन केले. महिला अत्याचार, स्त्री भ्रृण हत्या आदी विषयांवर आयुक्तांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. माधुरी कांगणे यांनी प्रास्ताविक केले तर उपायुक्त चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images