Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एचपीटी-‘आरवायके’लानॅककडून अ श्रेणी

$
0
0

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्टस अॅण्ड आरवायके सायन्स कॉलेजला नॅकअंतर्गत पुन्हा 'अ' श्रेणी प्राप्त झाली आहे. २८ व २९ डिसेंबर २०१८ रोजी नॅक समितीने कॉलेजमध्ये भेट दिली होती. त्यानुसार नॅकने कॉलेजला 'अ' श्रेणी देत, ३.११ चा स्कोर दिला आहे. यापूर्वी झालेल्या नॅकमध्येही कॉलेजला 'अ' श्रेणी असल्याने, कॉलेजच्या प्रगतीचा आलेख कायम राहिला आहे. श्रेणी प्राप्त झाल्यानंतर प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्या डॉ. वृन्दा भार्गवे, प्रा. मृणालिनी देशपांडे यांनी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाघ खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेतवाघ खूनप्रकरणातील सूत्रधार अटकेतम. टा. वृत्तसेवा, जेलरोडजेलर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

चंपानगरी परिसरात लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमावेळी टोळक्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात जीव गमावलेल्या रोहित वाघ या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी मुख्य सूत्रधार रोहित पारखेला पोलिसांनी शिर्डी येथून गुरुवारी (दि. ७) मध्यरात्री अटक केली. दुसरा संशयित करण केदारेचा तपास सुरू आहे.

आतापर्यंत अटक झालेल्यांमध्ये अमित वाघमारे, ललित वाघले, सागर गांगुर्डे, विशाल जाधव, समाधान आव्हाड, बाळा केदारे, एक अल्पवयीन युवक, सूत्रधार रोहित पारखेचा समावेश आहे. जेलरोडच्या कॅनाल रोडलगत असलेल्या चंपानगरी येथे २८ जानेवारीला हळदीचा कार्यक्रम होता. रात्री साडेनऊ वाजता संशयित रोहित पारखे, करण केदारे, विशाल झुलाल जाधव बाळा केदारे, ललित प्रवीण वाघले, मयूर गायकवाड, सागर बाळू गांगुर्डे, समाधान

सुरेश आव्हाड, अमित गौतम वाघमारे आशिष वाघमारे हे आले. त्यांच्यात मागील कारणावरून भांडण सुरू झाले. यावेळी रोहित वाघने हळदीचा कार्यक्रम सुरू असल्याने भांडण करू नका आणि निघून जा, असे सांगितले होते. सर्वजण तेथून निघून गेले. रात्री दहा वाजता संशयितांबरोबर तीन-चार युवक शस्त्रांसह दुचाकीवर बसून पुन्हा हळदीच्या ठिकाणी आले. रोहित वाघ, त्याचा मित्र रितेश पांडव, अलकेश जॉन यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता रोहित पारखे व करण केदारे यांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. रोहित वाघचा मृत्यू झाला तर रितेश व अलकेश गंभीर जखमी झाले. पोलिसांनी सहा जणांना अटक करीत त्यांच्याकडून हत्यारे जप्त केली होती. मुख्य सूत्रधार रोहित पारखे व करण केदारे फरार होते. आता रोहित पारखेला

पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मातृवंदना’पासून गर्भवती वंचित

$
0
0

घरोघरी पोहोचून प्रशासन करणार सर्वेक्षण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका क्षेत्रातील बहुतांश गर्भवती महिला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभापासून वंचित रहात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पात्र महिलांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने यंत्रणेला शुक्रवारी दिले. विवाहितेच्या माहेरच्या आणि सासरच्या नावातील तफावत हा यामध्ये प्रमुख अडसर ठरत असल्याने माहेरचे नावही योजनेचा लाभ देण्यासाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेण्यात आला.

गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना सकस आहार घेण्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी तसेच माता मृत्यू आणि बालमृत्यूच्या दरात घट व्हावी, यासाठी राज्य सरकारद्वारे प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येते. प्रथमत: गर्भवती महिला व स्तनदा मातांनाच या योजनेंतर्गत पाच हजार रुपये दिले जातात. लाभ द्यावयाच्या रकमेची तीन टप्प्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिला एक हजार रुपयांचा हप्ता मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर दिला जातो. दुसरा दोन हजार रुपयांचा हप्ता किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यानंतर व गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात जमा केला जातो. तर प्रसुतीनंतर अपत्याची जन्म नोंदणी, बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटॅटिस बी यांसारख्या लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर तिसरा हप्ता लाभार्थीच्या खात्यात जमा केला जातो.

मातृवंदना योजनेच्या जिल्हास्तरीय सुकाणू व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य तर जिल्हा शल्य चिकित्सक सदस्य सचिव आहेत. या बैठकीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात घेण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महापालिका, जिल्हा परिषदेसह आरोग्य विभागाशी संबंधित विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात आतापर्यंत किती गर्भवती मातांना व त्यांच्या बालकांना या योजनेचा लाभ देण्यात आला याचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

नाशिकमध्ये ५५ लाख वितरण

नाशिक महापालिका क्षेत्रात लाभ मिळालेल्या महिलांची संख्या खूपच कमी आहे. या योजनेंतर्गत शहरातील गर्भवती महिलांना ५५ लाख २८ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. लाभार्थींचे प्रमाण खूपच कमी असल्याने ते वाढविण्यासाठी सूक्ष्म नियोजनावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. याकामी आशा वर्कर्स, परिचारिका आदींची मदत घेण्यात येणार असून घरोघरी जाऊन गर्भवती महिलांची माहिती घेण्याच्या सूचना यंत्रणेला करण्यात आल्या आहेत.

योजनेचा लेखाजोखा

जानेवारी २०१७ ते मार्च २०१९ दरम्यान अमलबजावणी

जिल्ह्यात ५८,७२० महिला ठरणार लाभार्थी

ग्रामीण भागात ३८,८३८ गर्भवतींचा समावेश

ग्रामीण भागात १९ कोटी ४१ लाख रुपयांचे होणार वितरण

ग्रामीण भागात १३ कोटी ०३ लाख रुपये आतापर्यंत वितरित

शहरी भागातील ७८ लाख ५० हजार रुपये होणार वितरित

मालेगावात सर्वाधिक एक कोटी ३२ लाख ८६ हजार रुपयांचे वाटप

निफाडमध्ये एक कोटी १७ लाख २० हजार रुपयांचे वाटप

बागलाण तालुक्यात एक कोटी १० लाख ३७ हजार रुपयांचे वितरित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाचा दिवसाढवळ्या खून

$
0
0

शुभम पार्क परिसरात जुन्या भांडणातून वाद

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शुभम पार्क परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून तरुणाचा शुक्रवारी खून करण्यात आला आहे. भरवस्तीत दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीबद्दल नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे. शहरात पोलिसांचा वचकच राहिला नसल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

वैभव विजय गांडोळे (वय २३, रा. शुभम पार्क) असे घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी शुभम पेंढारे याच्यासह अन्य एका तरुणावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशजयंती कार्यक्रमाकरिता हॅलोजन लाइट खरेदीसाठी वैभव हा त्याचा मित्र निखिल सोनवणे यांच्यासोबत दुचाकीवर शुभम पार्क येथे एका दुकानात आला. त्यावेळी संशयित आरोपी शुभम पेंढारे व त्याचा मित्र हे दोघे दुचाकीने त्याचा पाठलाग करत तेथे पोचले. यावेळी त्यांच्यात वाद झाला. दोघा संशयितांपैकी एकाने वैभवच्या पोटात चाकू खुपसला. यानंतर ते दोघे फरार झाले. वैभव काही काळ येथे पडून होता. परिसरातील नागरिकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेनंतर शुभम पार्क भागात नागरिकांनी गर्दी केली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. दरम्यान, वैभवसोबत असलेल्या निखिल सोनवणे याने अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी शुभम पेंढारे याच्यासह अन्य एका तरुणावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त शांताराम पाटील, वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे, निरीक्षक विलास जाधव आदी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरण्यात आालेला चाकू जप्त केला आहे. वैभव हा सम्राट ग्रुपमध्ये कामाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राकेश शेवाळे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच सहकारी संस्थांचे ७१ संचालक गोत्यात

$
0
0

नासाका, निसाका, श्रीराम बँकेतील मंडळींचा समावेश, भुजबळ कुटुबियांचाही अडथळा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून बेकायदेशीर कर्जवाटपात आजी-माजी ३८ संचालकांवर वसुलीसाठी कारवाई सुरू असतानाच जिल्ह्यातील पाच बड्या थकबाकीदार सहकारी संस्थांचे तत्कालीन संचालक गोत्यात आले आहेत. थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बँकेने निसाका, नासाका या साखर कारखान्यांसह, आर्मस्ट्रॉग, रेणुका देवी यंत्रमाग सहकारी संस्था व श्रीराम सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालकांच्या खाजगी मालमत्तांचा शोध घेवून त्यांच्यावर टाच आणण्याची तयारी बँकेने सुरू केली आहे. जिल्ह्यातील दिग्गज आणि बड्या नेत्यांचा यात समावेश असल्याने या कारवाईने खळबळ उडाली आहे.

जिल्हा बँकेने आता खराब आर्थिक स्थितीतून बाहेर निघण्यासाठी थकबाकीदारावंर कारवाईचा फास आवळला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्यापाठोपाठ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खरे यांनीही कारवाईसाठी पुढाकार घेतला आहे. खरे यांनी पत्रकारपरिषद बँकेच्या थकबाकी, वसुली व कारवाईसंदर्भात सुरू असलेल्या कारवाईबाबत माहिती दिली. जिल्हा बॅंकेची थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात असली तरी थकबाकीदार शेतकऱ्यांकडून कर्जमाफी होईल या अपेक्षावर वसुलीस प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. बँकेची एकूण २,७५० कोटींची थकबाकी आहे. या वसुलीसाठी मोहीम राबविण्यात आली. मात्र, दुष्काळात सक्ताची वसुली नको असा शासन आदेश आल्याने वसुलीस पुन्हा ब्रेक लागला आहे. मात्र, बँकेने बिगर शेतीच्या २५२ कोटी कर्जवसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. यात मोठ्या थकबाकीदार असलेला नाशिक कारखाना (१३८ कोटी), निफाड कारखाना (१३९.५० कोटी), आर्मस्ट्राँग साखर कारखाना (२४ कोटी), रेणुकादेवी यंत्रमाग सहकारी संस्था (१७ कोटी), श्रीराम सहकारी बँक (११ कोटी) यांचा समावेश आहे. या संस्थांकडून वसुलीसाठी त्यांच्या मालमत्ता जप्त करीत बँकेने प्रशासक नेमले आहेत. या मालमत्तांच्या लिलावांनाही प्रतिसाद मिळत नाही. तसेच, थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बँकेने या संस्थांच्या तत्कालीन संचालकांच्या खासगी मालमत्ता जप्त करून त्यावर बोजा चढविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याकरिता सहकार खात्यांकडून परवानगी मिळालेली आहे. श्रीराम बँकेने याविरोधात न्यायालयात दावा केला असून, त्यावर ५ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या कारवाईत कोणताही हलगर्जीपणा केला जाणार नसून, ११ फेब्रुवारीपासून ही कारवाई केली जाणार असल्याचे खरे यांनी सांगितले.

कारवाईस पात्र तत्कालीन संचालक

निफाड कारखाना : भागवत (बाबा) बोरस्ते, लक्ष्मण टर्ले, देवराम मोगल, बाळासाहेब जाधव, शिवाजीराव गडाख, हिरालाल सानप, उद्धव कुटे, शहाजी डेर्ले, कचरू राजोळे, दिलीप बनकर, ॲड. शांताराम बनकर, एकनाथ डुंबरे, बबनराव पानगव्हाणे, रावसाहेब रायते, दिनकर मत्सागर, बबनराव सानप, अंबादास कापसे, राजेंद्र कटारनवरे, सिंधूताई खरात, गंगूबाई कदम, लिलावती तासकर, दिलीप मोरे, राजेंद्र डोखळे, मनिषा टर्ले, आनंदा बोराडे, रामनाथ दराडे, भाऊसाहेब सुकेणकर, दिनकर निकम, कार्यकारी संचालक ऐ. आर. पाटील.

नाशिक कारखाना : देवीदास पिंगळे, जगन्नाथ आगळे, विष्णू कांडेकर, अशोक डावरे, निवृत्ती जाधव, मधुकर जगळे, तुकाराम दिघोळे, संतू पाटील, डॉ. सुनील ढिकले, केरू धात्रक, विश्वास नागरे, ॲड. जे. टी. शिंदे, राजू वैरागर, चंद्रभान जाधव, बाळासाहेब बरकले, यंशवतराव पिंगळे, अनिता करंजकर, लता जाधव.

श्रीराम सहकारी बँक : अरुण जोशी, विजय बळवंत पाटील, जगदाशी डागा, प्रमोद भार्गवे, मुकुंद कोकीळ, हरजीतसींग आनंद, संजय पाटील, राजेंद्र बागमार, अमर कलंत्री, भाऊसाहेब मोरे, भास्कर मोरे (मयत), अरविंद वर्टी, सुहास शुक्ला, लक्ष्मण धोत्रे, शिवाजीराव निमसे, कांतीभाई पटेल, मधुकर भालेराव, श्रेयसी रहाळकर, वर्षा बस्ते.

'आर्मस्ट्राँग'वर ईडीचा ताबा

'ऑर्मस्ट्राँग'कडे असलेल्या २४ कोटी वसुलीसाटी तत्कालीन संचालक समीर भुजबळ व आमदार पकंज भुजबळ यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी त्यास 'ईडी'चा अडथळा आहे. ईडीने आर्मस्ट्रॉंग जप्त केलेला असून, तो सध्या त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे बँकेला कारवाई करता येणार नाही. मात्र, या मालमत्तेवरील कर्ज वसुलीबाबत 'ईडी'ला पत्र दिले जाणार आहे. ३ मे २०१९ रोजी न्यायालयात सुनावणीदरम्यान, बँकेकडून हे पत्र दिले जाईल, असेही खरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषप्राशन करीत विवाहितेची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

व्यवसाय वृद्धिसाठी माहेरुन पाच लाख रुपये आणण्यास नकार दिल्यानंतर सासरच्यांकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला वैतागून विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना जेलरोडला घडली. प्रतिभा उर्फ साक्षी रामनरेश वर्मा असे या विवाहितेचे नाव आहे.

प्रतिभा यांचा भाऊ अरुणकुमार रामशरण शर्मा (रा. अवसाणी कौटय्या, उत्तर प्रदेश) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात प्रतिभा यांचा पती रामनरेश यांच्यासह तिचे सासरे रामसमुज व दीर राकेश वर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विवाहितेचा विवाह २०१० मध्ये जेलरोडच्या पवारवाडीतील विठ्ठलनगर येथे राहणाऱ्या रामनरेश वर्मा यांच्यासोबत झाला होता. गेल्या काही वर्षांपासून माहेरुन व्यवसाय वृद्धिसाठी पाच लाख रुपये आणावेत यासाठी प्रतिभाचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. त्यास वैतागून प्रतिभाने आत्महत्या केल्याचा आरोप अरुणकुमार यांनी फिर्यादीत केला आहे.

पोलिसांनी रामनरेश व राकेश वर्मा यांना ताब्यात घेत नाशिकरोड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रतिभाचे सासरे रामसमुज फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक कुंदन सोनोने यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डकोटा विमानाचे अखेर उड्डाण

$
0
0

डकोटा विमानाचे

अखेर उड्डाण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऐतिहासिक अशा डकोटा विमानाचे शुक्रवारी विन्टेज उड्डाण झाले. हे विमान दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर आले. याप्रसंगी वैमानिक आणि सहवैमानिकांचे स्वागत करण्यात आले. दुसरे महायुद्ध आणि पाकिस्तानच्या युद्धात या विमानाची मोलाची भूमिका होती. आधुनिकीकरण केल्यानंतर तब्ब्ल ४५ वर्षांनंतर या विमानाने पुन्हा उड्डाण केले.

बंगळुरूत होणाऱ्या एरो इंडिया शोमध्ये हे विमान कवायती सादर करणार आहे. युनायटेड किंगडममध्ये दोन वर्षे या विमानाच्या आधुनिकीकरणाचे काम केल्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये ९ हजार किलोमीटरचा प्रवास करून ते भारतात आणण्यात आल्याचे ओझर हवाई दल केंद्राचे एअर कमोडोर समीर बोराडे यांनी सांगितले. तर, विंटेज प्लेन उडवणं हे प्रत्येक वैमानिकाचे स्वप्न असते. मात्र, युद्धभूमीवर महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या आणि तब्ब्ल ४५ वर्षांनंतर टेक ऑफ घेणाऱ्या या विमानाला उडविण्यात वेगळाच अभिमान असल्याची प्रतिक्रिया वैमानिक ग्रुप कॅप्टन एस मेनन यांनी दिली. डकोटाच्या माध्यमातून भारतीय वायू दलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे विमान पुन्हा हवाई दलात दाखल झाले आहे. यानिमित्ताने इतिहासाच्या शौर्याच्या स्मृती जाग्या झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचपीटीत चंदनाची चोरी!

$
0
0

नाशिक : चोरट्यांनी चक्क एचपीटी- आरवायके महाविद्यालयाला लक्ष्य करीत चंदनाच्या झाडाचे खोड कापून नेले आहे. हा खळबळजनक प्रकार शुक्रवारी पहाटे उघडकीस आला. या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनाने बंद पाकिटात पोलिस स्टेशनमध्ये चोरीची चौकशी करण्याबाबतचे पत्र दिले आहे. एचपीटी आर्टस अँड आरवायके सायन्स कॉलेजच्या सायकल पार्किंगमध्ये असलेल्या चंदनाच्या झाडाचे खोड चोरट्यांनी कापले आहे. ही बाब शुक्रवारी पहाटे लक्षात आली. कॅम्पसमध्ये शुक्रवारी मध्यरात्री चोरांनी झाडाचे खोड लंपास केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. रात्री कॅम्पसमध्ये सुरक्षारक्षक तैनात असूनही, चोरी झाली तरी कशी, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. खरेच चंदनाचीच चोरी झाली आहे का, याची खात्री करून गुन्हा नोंदवू, असे पोलिसांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पशुधनावर चोरट्यांचा डोळा

$
0
0

येवला तालुक्यातील दोन गायींची चोरी

म. टा. वृत्तसेवा, येवला

तालुक्यातील अंदरसूल व नगरसूल येथील वेगवेगळ्या चोरीच्या दोन घटनांमध्ये दोन गायींची चोरी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावण निर्माण झाले आहे.

काही महिन्यात येवला शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात अज्ञात चोरट्यांकडून घरफोडीचे सत्र सुरू आहे. चोरट्यांच्या भीतीपोटी वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झालेली असतानाच, या आठवड्यात बुधवार (दि. ६) रात्री ते गुरुवार (दि. ७) पहाटेच्या दरम्यान अंदरसूल व नगरसूल येथून दोन गायी चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला आहे. नगरसूल येथील कुडके वस्तीवरील दत्तू मुरलीधर कुडके यांच्या घरासमोरील तांबड्या रंगाची सुमारे ३० हजार रुपये किंमतीची १ गाय चोरट्यांनी चोरून नेली. दुसऱ्या घटनेत अंदरसूल येथील बाजार समिती आवरानजिक राहणाऱ्या संतोष हरिश्चंद्र सोनवणे यांचीही तांबड्या रंगाची सुमारे ३५ हजार रुपये किंमतीची गाय चोरट्यांनी चोरून नेली. गायी चोरीप्रकरणी येवला तालुका पोलिसांत शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सानेगुरुजी कथामालेतर्फे बालनाट्य स्पर्धा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय, नाशिक बालभवन साने गुरुजी कथामालेअंतर्गत कै. रत्नाकर गुजराथी स्मृती बालनाट्य स्पर्धेचे दि. १० व ११ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी साडेआठ वाजता होणार असून यात शहरातील एकूण १५ शाळा सहभागी झाल्या आहेत. या शाळांमधील विद्यार्थी दोन दिवस विविध नाट्यप्रयोग सादर करणार आहेत.

स्पर्धेत प्रथम येणाऱ्या नाटकास स्मृतीचिन्ह व १००१ रुपये रोख, द्वितीय क्रमांकास स्मृतीचिन्ह व ५०१ रुपये आणि तृतीय क्रमांकास स्मृतीचिन्ह व ३०१ रुपये रोख या प्रमाणे बक्षिसे देण्यात येणार आहेत. वैयक्तिक अभिनयासाठी प्रथम क्रमांक ७०१ रुपये, द्वितीय क्रमांक ५०१ रुपये, तृतीय क्रमांकास ३०१ रुपये बक्षिसे आहेत. ग्रामीण भागातील शाळेला विशेष पुरस्कार दिला जाईल. प्रत्येक नाटकास वैयक्तिक अभिनयाची दोन पारितोषिके वस्तुरुपाने किंवा पुस्तकरुपाने दिली जातील. वैयक्तिक अभिनयाचे प्रथम बक्षीस कै. यशवंत अ. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ देणगीतून पुस्तक रुपाने देण्यात येईल. या नाट्यस्पर्धेसाठी एका दिवसासाठी १० रुपये प्रवेशिका आहे. विद्यार्थी व नाट्य रसिकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.

रविवारच्या स्पर्धा

रविवारी, १० रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्पर्धा होतील. सकाळी ९ वाजता नाशिक महापालिका क्रमाांक ८६ चे 'प्रकाशातले तारे', सकाळी १० वाजता महात्मा गांधी हायस्कूल (इगतपुरी) यांचे 'आम्हाला पण शाळा पाहिजे', सकाळी ११ वाजता न्यू इरा इंग्लिश मीडियम स्कूलचे 'फिनिक्स' हे नाटक होणार आहे. दुपारी २ वाजता सुनंदा केले विद्यामंदिरचे 'वनराई', दुपारी ३ वाजता कृपा शैक्षणिक संस्थेचे 'देवाचं दान' नाटक होणार आहे. दुपारी ४ वाजता सौंदर्य निर्मिती ग्रुपचे 'मला मोठ व्हायचं' हे नाटक होईल.

सोमवारच्या स्पर्धा

सोमवारी, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता र. ज. चव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूलचे 'पराधीन आहे जगती' हे नाटक होणार आहे. सकाळी ९वाजता न्यू इरा इंग्लिश मीडियम स्कूलचे 'हरवले ते माझे घर', सकाळी १० वाजता स्वामी नारायण इंग्लिश स्कूलचे 'अकलेने लावली राज्याची वाट', सकाळी ११ वाजता स्व. प्रभाकर पुरुषोत्तम वैशंपायन विद्यालयाचे 'श्रीमंत डोके दुखी', दुपारी १ वाजता प्रबोधिनी विद्यामंदिरचे 'मोल अनमोल', दुपारी २ वाजता डी. डी. बिटको बॉईज हायस्कूलचे 'प्लास्टिक बंदी : वसुंधरेला वाचविण्याची संधी', दुपारी ३ वाजता बालशिक्षण मंदिराचे 'विठाबाईचा कावळा' हे नाटक होणार आहे. सायंकाळी ४ वाजता शिशुविहार व बालकमंदिरचे 'कडकलक्ष्मी' तर सायंकाळी ५ वाजता नाट्यसेवा मंडळाचे 'माँ' नाटक सादर होणार आहे.

लोगो : कल्चरल वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंगल

$
0
0

शेतकरी-मनसे बैठक

नाशिक : कांदा उत्पादन व कांदा दर समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय, राजगड येथे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी व मनसे नेते यांची बैठक पार पडली. शासनाचे कांदाविषयक धोरण, कांदा उत्पादन करण्यासाठी लागणारा खर्च, कांदा साठवण, कांदा विक्रीसाठी मार्केटपर्यंत वाहतुकीसाठी लागणारा खर्च व कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतकरी त्रस्त असल्याने शेतकरी कर्जबाजारी तसेच आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेतो, अशा विविध समस्या शेतकऱ्यांनी मांडल्या. मनसे नेते जयप्रकाश बावीस्कर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मानधनापासून वंचित

नाशिक : महानगरपालिकेने सुरू केलेल्या इंग्लिश मीडियमच्या मदतनीसांचे मानधन त्वरित सुरू करावे, या मागणीचे निवेदन माजी गटनेत्या कविता कर्डक, राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले आहे. महापालिकेने दोन ते तीन वर्षांपासून झोपडपट्टीतील नागरिकांच्या मागणीनुसार इंग्लिश मीडियमच्या अंगणवाड्या सुरू केल्या होत्या. त्यावेळी अंदाज पत्रकात निधीची तरतूद करण्यात आली. सद्यपरिस्थितीत अंगणवाड्या सुरू असून, काही मदतनीस व शिक्षकांना मानधन मिळते आहे. परंतु, काही मदतनीस आजही वंचित आहेत. यासंदर्भात आयुक्तांनी ठोस निर्णय घ्यावा व त्वरित मदतनीसांचे मानधन सुरू करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळ येशूची यात्रा आजपासून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिक-पुणे महामार्गावर बाळ येशूच्या दोन दिवसीय यात्रेला शनिवारी (दि. ९) सुरुवात होत आहे. यात्रेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. यात्राकाळात नाशिक-पुणे महामार्गावर अवजड वाहनांना सकाळी सहापासून रात्री अकरापर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. ही वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

नेहरूनगरसमोरील सेंट झेवियर्स शाळेच्या आवारात बाळ येशूचे मंदिर आहे. शाळेच्या मैदानावर मुख्य शामियाना उभारण्यात आला आहे. देश-विदेशातून भाविकांची दर्शनाबरोबरच मिसासाठी (धर्मगुरुंचा उपदेश) गर्दी होत असते. भाविकांसाठी मराठी, हिंदी, तामिळ व इंग्रजी भाषेत मिसा होणार आहेत. फादर ही मिसा देणार आहेत. भाविकांसाठी मंदिरामागील जुन्या व नव्या सभागृहात व्यवस्था करण्यात आल्यामुळे त्यांची सोय झाली आहे. ३१ जानेवारीपासून मिसाबली व नोव्हेनाची इंग्रजी, मराठी, तामिळ व कोकणी भाषेत भक्ती सुरू झाली आहे. ९ फेब्रुवारीला सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी सहा वाजता मराठी, दुपारी चारला तामिळ व सायंकाळी आठला कोकणी भाषेत मिसा होईल. अन्य वेळेत इंग्रजी मिसा होतील. १० फेब्रुवारीला सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत मिसा होणार आहेत. यात्रेमुळे खेळणी, विविध वस्तू, फळे आदींचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था जेतवननगर, जयभवानीरोड, नेहरुनगरमधील केंद्रीय विद्यालय परिसर, उपनगर परिसरात करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी टळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकत जप्ती बासनात!

$
0
0

अवघ्या ६८ मालमत्ता ताब्यात; लोकप्रतिनिधींचा कारवाईस विरोध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाममात्र भाडेतत्त्वावर स्वयंसेवी संस्थासह लोकप्रतिनिधींच्या विविध मंडळांच्या ताब्यात असलेल्या महापालिकेच्या ९०३ मिळकतींच्या जप्तीची कारवाई आता थंडावली आहे. करारनामा नसलेल्या परंतु लोकप्रतिनिधींच्या संस्थांकडे असलेल्या ४०० पैकी महापालिकेडून आतापर्यंत केवळ ६८ मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. नाशिक पूर्व, सिडको, सातपूर या तीन विभागात सर्वाधिक मिळकती जप्त करण्यात आल्या असल्या तरी नाशिकरोड, पंचवटी, नाशिक पश्चिम या विभागांत नावापुरती कारवाई करण्यात आली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांची झालेली बदली आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा कारवाईला होणारा विरोध लक्षात घेता प्रशासनानेही याबाबत 'आस्ते कदम'ची भूमिका घेतली आहे.

मिळकतींच्या मालकीची नोंदच पालिकेकडे नसल्याने तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अशा मिळकतींचे धडक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात मनपाची समाज मंदिरे, अभ्यासिका, व्यायामशाळा, सभामंडप, वाचनालये, खुल्या जागा अशा जवळपास ९०३ मिळकती आढळून आल्या होत्या. या मिळकती नाममात्र भाडेतत्त्वावर स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था, मंडळे यांना सामाजिक उपक्रमांसाठी देण्यात आल्या असताना, त्यांचा व्यावसायिक वापर होत असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले होते. काही ठिकाणी पोटभाडेकरूही आढळून आले होते. विशेष म्हणजे या सर्व मिळकती आजी माजी नगरसेवकांसह लोकप्रतिनिधींच्या मंडळांनाच ताब्यात असल्याचे समोर आले होते. ९०३ पैकी ४०० मिळकतींचा तर करारनामा नसतानाही वापर सुरू होता. त्यामुळे गेडाम यांनी या प्रकरणात कारवाई सुरू करताच त्यांची बदली झाली होती. त्यानंतर आलेल्या अभिषेक कृष्णा यांनी या प्रकरणात कारवाई केलेली नाही. तब्बल दीड वर्ष पडून असलेल्या या अहवालावरील धूळ तुकाराम मुंढे यांनी झटकत त्यांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या होता. एवढ्यावरच न थांबता ज्या मिळकतींचे करारनामे नसतील, त्या जप्त करण्याचेही आदेश दिले होते. त्यानुसार सहा विभागांमध्ये ही कारवाई सुरू करण्यात आली होती. परंतु, करवाढ आणि या मिळकतींवरील कारवाईमुळे मुंढे यांनाही बदलीला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, या मिळकतींवरील कारवाईला नागरिकांसह लोकप्रतिनिधींचाही विरोध वाढला होता. तरीही पालिकेने विरोधानंतरही आतापर्यंत ६८ मिळकती या जप्त करून त्या सील केल्या आहेत. परंतु, गेल्या पंधरवाड्यापासून मात्र ही जप्तीची कारवाई थंडावली आहे. लोकप्रतिनिधींचा दबाव वाढल्याने जप्तीची कारवाई थंडावल्याची चर्चा आहे.

विभाग जप्त केलेल्या मिळकती

नाशिक पूर्व १७

नाशिक पश्चिम ०६

पंचवटी ०६

नविन नाशिक १९

सातपूर १७

नाशिकरोड ०३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चायनीय भाजीपाल्याचे कुतूहल

$
0
0

सेंद्रीय भाजीपाला व फळांना मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने गोल्फ क्लब मैदानावर आयोजित कृषी महोत्सवात चायनीय भाजीपाल्याचे कुतूहल आहे. तर सेंद्रीय भाजीपाला व फळांना मोठी मागणी आहे. दुसऱ्या दिवशी या महोत्सवाला नागरिकांनी प्रतिसाद देत या महोत्सवातून सेंद्रीय भाजीपाला, फळे, तांदूळ, कडधान्याची खरेदी केली.

२१४ स्टॉल्स असलेल्या या प्रदर्शनात विविध परिसंवाद आयोजित केले होते. तर दुसऱ्या बाजूला नागरिक प्रदर्शानातील विविध स्टॉलला भेटी देऊन खरेदीसाठी गर्दी होती. या महोत्सवात चायनीय भाजी आलेल्या स्टॉलवरही अनेक जण कुतूहलाने चायनीय भाजीबद्दल विचारणा करत होते. येथे कोंथबीर (सॅलरी), लसून (लिक), पालक (आइस बक), फुल कोबी (ब्रोकोली), लाल कोबी (रेड कॅबीज) यासारख्या भाज्या येथे लक्ष वेधत होते. २५ ते ४० रुपये किलो असे या भाज्यांचे दर आहेत.

याच स्टॉलवर देशी, विदेशी, सेंद्रीय भाजीपाला, धान्य सुद्धा विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. सिन्नर येथील ठाणगाव, वडगाव, लोणारवाडी, पांढुर्ली, शिवडा येथील ८०० शेतकऱ्यांनी एकत्र येते स्थापन केलेल्या व्यावव्हॅली अॅग्री कल्चरल प्रोड्युसर कंपनीबद्दल संदीप जेजुरकर यांनी माहिती दिली. चायनीय भाज्याची मागणी नाशिक परिसरात नाही. मात्र, मुंबई, हैदराबाद येथे आम्ही मोठ्या प्रमाणात या भाज्या दररोज पाठवतो. अडीच टन भाज्या सिन्नरमधून जात, असल्याचे त्यांनी सांगितले.

महोत्सव ११ फेब्रुवारीपर्यंत

कृषी महोत्सव सोमवारपर्यंत (दि. ११) असून सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत तो सर्वांसाठी खुला आहे. येथे रुचकर खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहे. खरेदीदार व विक्रेता यांचे संमेलन तसेच परिसंवाद शुक्रवारी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुहास कांदेविरुद्ध खंडणीचा गुन्हा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आणि नाशिक जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे यांच्याविरुद्ध आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. गाळा मालकास धमकावून ४५ लाख रुपये किंमत असलेला गाळा अवघ्या १० लाख बळकावण्यासाठी गाळ्याचा रस्ता बंद देखील करण्यात आला, अशी फिर्याद असून, या प्रकरणी कांदे यांच्यासह अन्य एकाविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला.

या प्रकरणी गौरव प्रदीप मेहरा (एलआयसी कॉलनी, टाकळीरोड) यांनी फिर्याद दिली. मेहरा यांचे कॅनडा कॉर्नरवरील सिल्व्हर प्लाझा या इमारतीत १२ क्रमाकांचा गाळा आहे. मेहरा यांनी हा गाळा काही कारणास्तव भाड्याने देण्याचा किंवा विक्रीचा निर्णय घेतला होता. १ फेब्रुवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत सुहास कांदे व त्यांचा साथीदार मनोज यांनी मेहारा यांना गाळ्याची त्यास प्रतिबंद केला. मेहरा यांच्या गाळ्याची किंमत ४५ लाख रुपये असताना हाच गाळा कांदे यांनी अवघ्या १० लाख रुपयांत विकत मागितला. एवढ्या कमी किंमतीत देण्यास मेहारा यांनी नकार दर्शविला. त्यामुळे कांदे व मनोज यांनी मेहरा यांच्या गाळ्यासमोर थुंकदाणी ठेवली व त्यात घाण केली. तसेच गाळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर खुर्च्या ठेवून रस्ता बंद केला. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शेळके करीत आहेत. दरम्यान, याच ठिकाणावरील अन्य एका गाळ्यावरून कांदे यांच्याविरुद्ध आर्म अॅक्टसह खंडणीचा आणखी एक गुन्हा सरकारवाडा पोलिसात दाखल झाला होता. तो तपास सुरू असताना आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांच्या पुढील भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दबावापोटी कारवाई

फिर्यादी मेहरा यांना मी ओळखत नाही. मागील सहा महिन्यात त्यांच्याशी संपर्क सुद्धा आलेले नाही. सध्या मी नांदगाव येथे असून, तिथे विधानसभा निवडणूक आणि धडक मोर्चाच्या तयारीत गुंतलो आहे. मेहरा यांनी विक्रीस काढलेला गाळा नाशिक डायोसेशनच्या मिळकतीत असून, त्यावर स्थगिती आदेश आहेत. त्यामुळे हा गाळा विकत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या प्रकरणाशी माझा काडीमात्रही संबंध नाही. फिर्यादी मेहरा यांच्या मदतीने पोलिसांनी दबावापोटी ही कारवाई केली असल्याचे कांदे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तपोवनातील अज्ञात लेणीसमूह प्रकाशात

$
0
0

नाशिक : तपोवनातील गोदा-कपिला संगमावर १० अज्ञात लेणीचा समूह प्रकाशात आला आहे. या लेणी नेमक्या कोणत्या कालखंडातील, कोणी खोदल्या तसेच या लेणी बौद्ध, जैन की हिंदू आहेत, याबाबत इतिहास अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या लेण्यांचा अभ्यास करून त्या संरक्षित होण्याची गरज इतिहास व पुरातत्त्व अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

तपोवनातील गोदावरीच्या पलीकडील काठावर महापालिकने राम, सिता व लक्ष्मणाची प्रतिमा उभी केली आहे. ती पाहण्यासाठी भाविक हमखास तेथे जातात. मात्र, या प्रतिमेच्या समोरच गोदापात्रातील खडकात खोदलेल्या नऊ व एक अपूर्ण अशा दहा लेणीच्या रांगेकडे आतापर्यंत कोणाचे फारसे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे या गुहा 'लेणी' असाव्यात का, कोणी बांधल्या असाव्यात, त्यांचा कालखंड कोणता हे अजूनही अज्ञात आहे. शहराच्या मध्यभागी असूनही राज्य व केंद्र पुरातत्त्व विभागाने या लेणींची आजपर्यंत दखल घेतलेली नाही. नाशिकसह राज्यभरातील अभ्यासकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले असून, या लेणींच्या अभ्यासाची गरज व्यक्त केली आहे.

नाशिकला दोन हजार वर्षांपूर्वीचा सातवाहन राजांचा लिखित इतिहास पांडवलेणी या बौद्ध लेणीच्या माध्यमातून लाभला आहे. सातवाहन, अभीर, राष्ट्रकूट, कलचुरी, चालुक्य, यादव या घराण्यांच्या इतिहासाने नाशिकला समृद्ध केलं आहे. बौद्ध लेणी प्रमाणेच नाशिक परिसरात जैन व हिंदू लेणी व असंख्य प्राचीन मंदिरे आहेत. तसेच सिंहस्थामुळे अनेक पंथ व उपपंथांच्या उपासकांचा वारसाही या शहराला लाभला आहे. याच्या खाणाखुणा शहर परिसरात पावलोपावली अनुभवायला मिळतात.

तपोवनात गोदा-कपिला संगम आहे. या संगमाला अनेक धार्मिक आख्यायिका आहेत. त्यामुळे भाविक श्रद्धेने या परिसराला भेट देतात. लेणी दुर्लक्षित आणि अज्ञात असल्याने त्या पाहण्यासाठी पर्यटकांना माहिती देणारी फलकेही येथे नसल्याचे दिसते. या परिसरात जुगारी मंडळी व जोडप्यांची गर्दी असते. लेणीच्या संरक्षणासाठी प्रयत्न होण्याची गरज असून, पुरातत्त्व विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी अभ्यासकांनी केली आहे. पुरातत्त्व विभागाकडून आतापर्यंत झालेल्या दुर्लक्षामुळेच नाशिकच्या इतिहासाचे अनेक पैलू अजूनही अज्ञात राहिल्याचा आरोप केला जातो.

लेणी नेमक्या कशा आहेत?

गोदा-कपिला संगमावरील लाकडी पुलाखालून नदीपात्रात उतरल्यावर उजव्या हाताच्या २० फूट उंच खडकात या दहा लेणी खोदलेल्या पहायला मिळतात. पहिल्यांचा खडकावर लेणी कोरण्यासाठी आणखी केलेली दिसते. मात्र, हे काम अर्धवट आहे. त्यानंतरच्या नऊ लेणीच्या समोरचा भाग आयताकृती कोरला असून, या लेणींमध्ये कोणतेही नक्षीकाम अथवा मूर्ती नाही. दोन लेणींमध्ये सभामंडप व गर्भगृह अशी रचना दिसते. तर एका लेणी बाहेर ब्राह्मी अक्षरे कोरल्याचे दिसते; मात्र, ही अक्षरे खराब झाली आहेत. क्रमांक ९ मध्ये हनुमानाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. तर शेवटच्या दहाव्या क्रमांकाच्या लेणीचे एका साधूने दोन भाग केले असून, एकात ते राहतात तर दुसऱ्या भागात शिवलिंग आहे.

सर्वसाधारणपणे बौद्ध अथवा जैन लेणी या उंच टेकडीवर पहायला मिळतात. तर हिंदू पंथांच्या उपासकांचे स्थळे ही नदी काठावर असतात. तपोवनातील या गुहा सिंहस्थात येणाऱ्या साधूंसाठी त्यांच्या उपासणेसाठी खोदल्या गेल्या असाव्यात. त्या कोणत्या कालखंडात बांधल्या गेल्या हा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे या गुहांचा अभ्यास व्हायला हवा.

- गिरीष टकले, अध्यक्ष, नाशिक इतिहास संशोधन मंडळ

नाशिकमध्ये गोदापात्रात आतापर्यंत गोवर्धन व तपोवनातील संगमावर सातवाहन नाणी मिळाली आहेत. जेथे ही नाणी मिळाली आहेत त्या भागाचा सातवाहनांशी संबंध आलेला दिसतो. त्यामुळे या लेणी सातवाहनकालिन असाव्यात असे वाटते. या लेणी खोदण्याची पद्धत पांडवलेणीशी मिळती जुळती आहे.

- चेतन राजापूरकर, नाणे अभ्यासक

तपोवनातील लेणींची रचना चामर लेणीशी मिळती जुळती आहे. काही लेणींमध्ये गर्भगृह आहे. त्यामुळे या जैन लेणी असाव्यात, असे वाटते. नाशिक परिसरात जैन लेणी संख्येने अधिक आहेत.

- डॉ. जी. बी. शहा, जैन धर्माचे अभ्यासक

बौद्ध लेणींच्या प्राथमिक अवस्थेसारखी ही लेणी दिसत असून, यात सापडलेल्या धम्मालिपीतील अर्धवट शिलालेख तसेच छंनी हतोड्याचे घाव हे त्रिरश्मीवरील बुद्ध लेणींसारखेच दिसत असल्याने ही लेणी सातवाहन काळातील असल्याचे सूचित करते. या लेणीवर संशोधन करून माहिती लोकांसमोर आणावी.

- अतुल भोसेकर, बौद्ध धर्माचे अभ्यासक

तपोवनातील ही लेणी आहे की, गुहा हे या स्थळाचा अभ्यास केल्यानंतरच सांगता येईल. नाशिकला बौद्ध, जैन, हिंदू तसेच अनेक पंथांचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे अभ्यासानंतर त्याचा कालखंड ठरविला जाऊ शकेल. काही अनुमान लावण्यापूर्वी या गुहांचा अभ्यास होणे गरजेचे आहे.

- डॉ. अभिजीत दांडेकर, सहायक प्राध्यापक, डेक्कन कॉलेज

तपोवनातील ही लेणी आहे हे निश्चित मात्र त्या कोणत्या कालखंडातील आहे हे, या स्थळाचा अभ्यास केल्यानंतरच सांगता येईल. नाशिकला बौद्ध, जैन, हिंदू लेण्या आहते. त्यामुळे अभ्यासानंतर त्याचा कालखंड ठरविला जाऊ शकेल. नाशिकच्या इतिहासासाठी या लेणी महत्त्वाच्या आहेत.

- डॉ. श्रीकांत प्रधान, पुरातत्त्वज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज महाप्रसाद

$
0
0

नाशिक : माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील श्री भारत मित्र मंडळाने महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रविवारी (१० रोजी) दुपारी १२ ते ३ यावेळेत जुन्या तांबट गल्लीतील कासार कालिका मंदिर प्रांगणात महाप्रसादाचे वितरण होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडाळागावात घराला आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

वडाळागावातील सादिकनगर झोपडपट्टीमध्ये एका बंद घराला आग लागल्याने या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीमुळे लगतच्या दोन घरांचेही नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशामक दलाला दाट वस्तीमुळे अडथळे आले. स्थानिक युवकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सादिक नगर परिसरात पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मुख्तार शेख यांच्या घरातून अचानक धूर येत असल्याचे नागरिकांना दिसले. तातडीने अग्निशामक दलाला याबाबतची माहिती देण्यात आली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. यावेळी घरात कोणीही नसल्याने आग विझविण्याचे मोठे आव्हान अग्निशामक दलासमोर होते. घरालगत अत्यंत दाट वस्ती असल्यामुळे गाड्या जाणे शक्य नव्हते. परिसरातील युवकांनी गच्चीवर चढून या घराच्या छताचे पत्रे तोडून अग्निशामक दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. आग लागली तेव्हा या घरात कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. या आगीमुळे लगतच्या दोन घरांमधील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. सिडको अग्निशामक दलाचे इस्माईल काजी, बाळासाहेब लहामगे, संजय गाडेकर, अविनाश सोनवणे, मुकुंद सोनवणे यांनी तीन बंबांच्या सहाय्याने दीड तासात ही आग आटोक्यात आणली. आग लागलेल्या ठिकाणी दाट वस्ती असल्याने व बघ्यांची गर्दी जास्त असल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या. इंदिरानगर पोलिसांनी बघ्यांना दूर केल्याने अग्निशमन दलाचे काम थोडे सोपे झाले. आगीचे कारण समजू शकले नसले तरी याप्रकरणी पोलिसांनी नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध मद्यसाठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात विक्रीस बंदी असलेला आणि केंद्र शासित प्रदेशात निर्मित मद्याने भरलेली होंडा सिटी कार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाती लागली आहे. या कारमधून बेकायदा मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती एक्साईज विभागाच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार जव्हार-नाशिक मार्गावरील अंबोली घाटात सापळा रचून चालकास बेड्या ठोकत भरारी पथकाने कारसह मद्यसाठा असा सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई भरारी पथक क्रमांक एकने केली.

अमित संजय महाले (रा. सारंग अपार्टमेंट, चेतनानगर) असे संशयित चालकाचे नाव आहे. दादरा नगर हवेली निर्मित मद्याची एका कारमधून वाहतूक केली जात असल्याची माहिती भरारी पथकास मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी जव्हार-नाशिक मार्गावरील अंबोली घाटात सापळा लावण्यात आला होता. छत्रपती हॉटेलसमोर पथक वाहन तपासणी करीत असताना संशयित कार (एमएच ०४, एच ६८६०) अडवून पथकाने तपासणी केली. त्यात देशीविदेशी मद्याचे खोके मिळून आले. पथकाने संशयित चालक अमित महाले यास जेरबंद करीत मद्यासह कार असा सुमारे पाच लाख ५८ हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई निरीक्षक मधुकर राख यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, जवान विलास कुवर, विरेंद्र वाघ, सुनील पाटील, विष्णू सानप, पूनम भालेराव आदींच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक मंडलिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात -

$
0
0

\Bआज रक्तदान शिबीर\B

नाशिक : लाडशाखीय वाणी समाज सन्मित्र मंडळाच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्ताने रविवारी (१० फेब्रुवारी) रक्तदान व अवयव दान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत हे शिबीर होईल. या शिबीरासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भूषण महाजन, विश्वस्त मधुकर ब्राह्मणकर, संजय येवले, ज्ञानेश्वर धामणे यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

\B'गोएसो'त आज पदवीप्रदान\B

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आठ महाविद्यालयांचा एकत्रित पदवीप्रदान सोहळा रविवारी (१० फेब्रुवारी) रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता संस्थेच्या कॉलेज रोड कॅम्पसमधील टी. ए. कुलकर्णी हॉलमध्ये हा सोहळा होईल. पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांना सोहळ्यात सन्मानित केले जाणार असून, विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images