Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वक्त्यांची नावे सुचविण्याचे आवाहन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वसंत व्याख्यानमाला, नाशिक या संस्थेच्या ९८ व्या वर्षाच्या ज्ञानसत्राचा प्रारंभ १ मेपासून गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणावर होणार आहे. संपूर्ण मे महिनाभर विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरलेल्या या व्याख्यानमालेत आपल्या आवडत्या वक्त्याचे नाव व व्याख्यानाचा विषय इच्छुक नागरिकांनी कळवावी, असे आवाहन व्याख्यानमालेच्या वतीने करण्यात आले आहे.

वक्त्याचे नाव सुचवितांनाच त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक,भ्रमणध्वनी क्रमांक कळविल्यास संबंधित वक्त्यांशी संपर्क साधणे व्याख्यानमालेच्या कार्यकर्त्यांना सोयीचे होणार आहे. सदर माहिती रविवारपर्यंत (दि. १५) वसंत व्याख्यानमाला सभागृह, सर्वे नं. ५१२/३, लोकशाहीर गजाभाऊ बेणी मार्ग, समतानगर, ऋणानुबंध मंगल कार्यालयामागे, मुंबई-आग्रा रोड, व्दारका,नाशिक : ४२२ ०११ या पत्त्यावर कळवावी, असे आवाहन व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष चंद्रशेखर शाह, उपाध्यक्ष विलास ठाकूर, विजय हाके, चिटणीस संगिता बाफणा, कार्योपाध्यक्ष सुनील खुने, कोषाध्यक्ष अरुण शेंदुर्णीकर यांनी केले आहे.

सुचविलेल्या वक्त्यांपैकी कुणाचे व्याख्यान आयोजित करावयाचे याचा निर्णय व्याख्यानमालेचे कार्यकारी मंडळ घेणार आहे. कृपया स्वतःचेच नाव सुचवू नये तर आपल्या आवडत्या वक्त्याचे नाव सुचवावे, असे या संदर्भातील पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेन्शनर्सचा थाळीनाद

0
0

खासदारांच्या कार्यालयापुढे आंदोलन; सरकारचा निषेध

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ई.पी.एस ९५ पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबत केंद्र सरकारने केलेल्या फसवणुकीच्या निषेधार्थ नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयावर नाशिक जिल्हा इ. पी. एफ. पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने गुरुवारी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारचा निषेध असो, जगण्याइतकी पेन्शन द्या, प्रकाश जावडेकर आश्वासन पाळा, असे फलक ज्येष्ठांनी हाती घेतले होते.

सन २०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने तीन हजार रुपये पेन्शन अधिक महागाई भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते अद्यापही पाळलेले नाही. भाजप खासदारांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या डॉ. कोशियारी कमेटीच्या अहवालाच्या शिफारशीही अंमलात आणलेल्या नाहीत. माजी श्रम व रोजगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिलेले पेन्शनवाढीचे आश्वासनही नवीन मंत्र्यांनी पाळलेले नाही. एकूणच ज्येष्ठांचा विश्वासघात केला आहे. त्याचप्रमाणे ३१ जानेवारी २०१९ च्या अर्थसंकल्पामध्ये ईपीएस ९५ बाबत काहीही तरतूद केलेली नाही. याबाबत गेल्या पाच वर्षांत खासदार व मंत्र्यांना शेकडो निवेदने दिली. मात्र त्याचा फायदा झालेला नाही. सध्या आरोग्य सुविधा महाग झाल्या आहेत. बाहेर उपचार घेणे परवडत नाही. ईएसआयच्या दवाखान्यात मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. देशातील आमदार-खासदारांच्या पेन्शनमध्ये सातत्याने वाढ होते. मात्र देशाला उभ्या करणाऱ्या कष्टकरी कामगारांची पेन्शनवाढ का करण्यात येत नाही हा मोठा प्रश्न आहे. आगामी काळात पेन्शनवाढ न झाल्यास यापुढे कुणीही निवृत्त नागरिक भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही, असा इशारा यावेळी देण्यता आला.

यावेळी नाशिक शहरातील राज्य परिवहन महामंडळ, वीज महामंडळ, एच.ए.एल, मायको, साखर, एफसीआय, सहकारी बॅँका, विविध कार्यकारी सोसायटी सेवक वर्ग, औद्योगिक कामगार असे एकूण १८६ उद्योगातील सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

...

खासदार चव्हाणांना निवेदन

खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयात थाळीनाद केल्यानंतर सेवानिवृत्त नागरिकांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळविला. मात्र, तेथे थाळीनाद आंदोलन न करता निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांमध्ये २८ पर्यंत ‘स्वच्छतेचा जागर’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांवर स्वच्छतेचे संस्कार व्हावे व मुलांमार्फत स्वच्छतेचा प्रचार घरोघरी व्हावा यासाठी सर्व महापालिका शिक्षण विभाग सरसावला आहे.

शहरातील सर्व खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळांमध्ये 'स्वच्छ हवा व स्वच्छतेचा जागर' हा उपक्रम २८ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. सप्तरंग बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.

देशाची पुढची पिढी स्वच्छतेविषयी अधिक जागृत असावी, यासाठी विविध उपक्रमांतून शाळांकडून प्रयत्न करण्यात येतात. 'स्वच्छ हवा व स्वच्छतेचा जागर' या उपक्रमांतर्गत वर्गामध्ये वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ हवा व घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व व कचरा वर्गीकरणाचे फायदे सांगावे, अशी सूचना शिक्षणाधिकारी उदय देवरे यांनी शाळांना दिल्या आहेत.

पर्यावरणपूरक स्वच्छतेचे तीन संदेश विद्यार्थ्यांना सांगत त्याची जाणीव करून द्यायची आहे. 'आम्ही झाडाचा पालापाचोळा व कचरा जाळत नाही. कचरा जाळल्यास रुपये पाच हजार दंड होतो, हे आम्हाला माहित आहे', 'आम्ही कचऱ्याचे वर्गीकरण करतो', 'आम्ही कचरा घटागाडीतच टाकतो रस्त्यावर नाही', असे तीन संदेश शाळेतील विद्यार्थ्यांनी कोऱ्या कागदावर कलात्मकरित्या लिहून त्यावर पालकांची स्वाक्षरी घेऊन शाळेतील वर्ग शिक्षकांकडे जमा करायचे आहे. त्यानुसार, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी संदेश लिहून त्यावर पालकांची स्वाक्षरी तपासणी करुन वर्ग शिक्षकांनी त्याची नोंद घ्यावी व सर्वोत्कृष्ट कलात्मक पद्धतीने संदेश लिहून आणलेला संदेश मुख्याध्यापकांकडे जमा करणे गरजेचे आहे.

शाळेतील मुख्याध्यापकांसोबत एक फोटो काढून त्याचा अहवाल मनपा शिक्षण विभाग कार्यालयात जमा करायचा आहे. या उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांच्या वार्षिक गुण पत्रकात अ, ब, क, ड यानुसार श्रेणीत गुणदान करायचे आहे. स्वच्छ हवा व स्वच्छतेचा जागर हा उपक्रम शाळेमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आम्हाला शाळा पाहिजे’ प्रथम

0
0

\Bबालनाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण\B

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाट्य परिषदेची नाशिक शाखा आणि सुविचार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालनाट्य स्पर्धेत महात्मा गांधी हायस्कूल, इगतपुरीच्या 'आम्हाला शाळा पाहिजे' या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या 'रिले' नाटकाने द्वितीय, तर विद्या प्रबोधिनी प्रशालाच्या 'ताटी उघडा' या नाटकाने तृतीय क्रमांक मिळवला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुविचार हॉस्पिटलचे डॉ. अविनाश आंधळे, ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, नाशिक नाट्य परिषदचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, राजेंद्र जाधव, परीक्षक प्रणव प्रभाकर, डॉ. राजीव पाठक, श्रीया जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

दिग्दर्शनासाठी प्रथम विजय कुमावत (आम्हाला शाळा पाहिजे), द्वितीय धनंजय वाबळे (रिले), तृतीय सागर रत्नपारखी (ताटी उघडा), रंगभूषेचे पहिले पारितोषिक अनिता गायकवाड (रिले), वेशभूषेचे प्रथम नुपूर सावजी (ताटी उघडा). नेपथ्य प्रथम राजबहादूर हितांगे (रिले), द्वितीय अशोक इंपाळ (आम्हाला शाळा पाहिजे), तृतीय नुपूर सावजी (ताटी उघडा). प्रकाशयोजनेचे प्रथम कृतार्थ कन्सारा (रिले), द्वितीय प्रसाद प्रतीक (सेल), तृतीय आकाश सागर (थेंबांचे टपाल). संगीत प्रथम अभिजित दळवी (आम्हाला शाळा पाहिजे), द्वितीय राहित सरोदे (रिले), तृतीय रोहिणी आदित्य (थेंबांचे टपाल) तर लेखनासाठी प्रथम धनंजय वाबळे (रिले), द्वितीय सुजित जोशी (ताटी उघडा), तृतीय विजय कुमावत (आम्हाला शाळा पाहिजे) तर अभिनयासाठी मुले शर्वायू ढेमसे, वरुण, कृष्णा राजपूत तर मुली लावण्या जाधव, युगा कुलकर्णी, आर्या देशपांडे यांनी यश संपादन केले.

...

अभिनयात उत्तेजनार्थ बक्षीस

अभिनयात उत्तेजनार्थ अजिंक्य कुलकर्णी, अनुज जाधव, अभिषेक जाधव, शुभम जाधव, मयुरी म्हसणे, स्नेहा गायकवाड, दीक्षा डावखर, मधुरा कट्टी, सृष्टी पंडित यांनी पारितोषिक मिळवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रवींद्र कदम यांनी तर सूत्रसंचालन राजेश भुसारे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांजा विक्रीला विराम, पण पिणारे भरमसाट

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिक

गोदाघाट परिसर झिंग आणणाऱ्या नशिल्या पदार्थांच्या सेवनाचा अड्डाच बनला आहे. एकीकडे भक्तीचा जागर होत असताना दुसरीकडे नशेत डुबणारे असे चित्र येथे सध्या दिसत आहे. गांजासारख्या नशिल्या पदार्थांची पंचवटीत सध्या विक्री होत नसली तरी शहराच्या इतर ठिकाणांहून हे पदार्थ गोदाघाटावर आणले जातात. गांजा पिणारे जुन्या नाशिकमधील काही ठिकाणांहून गांजा विकत आणून टोळक्या टोळक्यांनी गोदाघाटाच्या परिसरात गांजा पित असल्याचे चित्र दिसते.

तीर्थस्थान म्हणून प्रसिध्द असलेल्या गोदाघाट परिसराला अंमली पदार्थांच्या नशेचा विळखा बसलेला आहे. रामसेतू पुलाच्या खालच्या भागात, दिंडोरी नाक्यापासून मार्केट यार्डकडे जाणाऱ्या दक्षिण रस्त्याजवळ, पेठफाट्याजवळ या ठिकाणी पूर्वी थेट गांजा विक्री होत होती. ती सध्या बंद असल्याचे दिसते. पंचवटीत सध्या गांजा विक्री होत नसली तरी गांजा पिणारे थेट भद्रकाली आणि वडाळा नाका पुलाखालच्या परिसरातून गांजा घेऊन गोदाघाट परिसरात पित असल्याचे दिसते.

पंचवटी परिसरातील गांजा तस्करीबाबतीत दोन नावे कृप्रसिध्द होती. त्यातील लक्ष्मी ताठे यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. दुसरे एका महंताचे नाव अग्रेसर होते. त्यांच्या निधनानंतर पंचवटीतील गांजा विक्रीची अनेक ठिकाणे बंद पडलेली दिसत आहेत. तरीही गोदाघाटावरील गांजा पिणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. होळकर पुलाखालच्या भागात एकमुखी दत्त मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या उत्तरेला, गांधी तलावाच्या कथड्यांवर, यशवंतराव महाराज पटांगणाशेजारील राणी काशीबाई भोसले यांचे समाधीस्थळ, रामसेतू पुलाखालचा भाग, कपूरथळा, भाजीबाजार पटांगण, टाळकुटेश्वर पुलाखालच्या भागात, तपोवनात गांजा पिणारे आढळतात.

पंचवटीत अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू होते. 'मटा' मालिकेत नाशिकरोडच्या भागातील अवैध धंद्यांची पोलखोल केल्यानंतर पंचवटीतील अनेक भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा बसल्याचे दिसते.

ऐंशी रुपयाला पुडी

वीस वर्षांपूर्वी गांजाची साधारणतः २ ते ३ ग्रॅमची पुडी फक्त २५ पैशांना मिळत होती. तिची किंमत आता ८० रुपये आहे. प्लास्टिकच्या छोट्या पाऊचमध्ये हा गांजा मिळतो. त्यातही अनेकदा भेसळ असल्याचे आढळून येत असल्याची माहिती वीस वर्षांपासून गांजा पित असलेल्या एक अट्टल गांजा पिणाऱ्याने दिली.

दारुड्यांचे अड्डे

पंचवटी अमरधामच्या टाळकुटेश्वर पुलाखालच्या बाजूला, पुलाच्या झुडपांत गावठी दारू विक्रीचा अड्डा आहे. प्लास्टिकच्या छोट्या पिशवीत दारू विक्री केली जाते. दिवसाही झिंग येऊन पडलेले दारुडे गोदाघाट परिसरात दिसतात.

व्हाइटनरचेही नशेसाठी सेवन

गोदाकाठ तसेच झोपडपट्टीत राहणारी मुले-मुली हे व्हाइटनरचे सेवन करीत असल्याचे दिसतात. व्हाइटनर रुमालावर घेऊन ते हुंगून त्याची नशा केली जाते. अशी नशा करणऱ्यांचर संख्या मोठी आहे. नशेसाठी गोदापात्रात पाण्यात डुबकी मारून पैसे काढणे, मासे पकडणे असे प्रकार हे मुले-मुली करीत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लू बळावतोय

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वातावरणातील चढ-उतारामुळे धोकादायक स्वाइन फ्लूने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या स्वाइन फ्लू कक्षात जानेवारी महिन्यापासूनच सातत्याने रुग्ण दाखल होत असून, सध्या येथे दोघा संशयितांवर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गतवर्षाच्या अखेरीस या आजाराने तब्बल दोन महिने विश्रांती घेतली होती. वातावरणातील चढ-उतार स्वाइन फ्लू आजारासाठी पोषक ठरतो. आजाराचा विषाणू प्रत्येक ऋतूमध्ये कमी-अधिक प्रमाणात आपले अस्तित्व टिकवून ठेवत असल्याचे रुग्णांच्या संख्येवरून दिसते. याबाबत बोलताना सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले की, या आजाराचे रुग्ण समोर येत असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. वातावरणातील सातत्याने होणाऱ्या बदलामुळे हे घडते. मुळात प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती या आजारास बळी पडण्याची शक्यता असते. मागील वर्षी सुद्धा हे समोर आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्याच दिवशी ग्राहकांची गर्दी

0
0

जिल्हा कृषी महोत्सवाला प्रारंभ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांनी पिकविलेला माल थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावा, यशस्वी शेतकऱ्यांची यशोगाथा इतरांपर्यंत पोहोचून त्यांनाही प्रेरणा मिळावी या उद्देशाने आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांच्या हस्ते गुरुवारी झाले. २१४ हून अधिक स्टॉल असलेल्या या महोत्सवाला पहिल्याच दिवशी ग्राहकांचा चांगला प्रतिसादही मिळाला.

कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने आयोजित हा महोत्सव गोल्फ क्लब मैदानावर ११ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. उद्घाटन सोहळ्यात आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित, विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, कृषी विकास अधिकार रमेश शिंदे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्य कृ‍षी पुरस्कार जाहीर झालेल्या शेतकऱ्यांचा आणि चांगली कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याच्या महत्त्वाबाबत माहिती देणारे भित्तीपत्रक तसचे शेती पुस्तिकेसह आदर्श गट शेती पुस्तिका आणि माती परिक्षण माहिती पु‍स्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत लाभार्थ्यांना वाहनाचे वाटपदेखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

भाजीपाला, फळे स्वस्त

महोत्सव सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुला असून त्यात सेंद्रीय भाजीपाला, फळे, हातसडीच्या तांदळासह सर्व प्रकारचा तांदूळ, कडधान्य, बचत गटांनी तयार केलेले रुचकर खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बाजारभावाप्रमाणे येथे भाजीपाला व फळे स्वस्त आहे. तसेच विविध खते, शेतीसाठी लागणारी अवजारे, यासारखे स्टॉलही येथे आहे.

असे आहेत परिसंवाद

सेंद्रीय शेती, गट शेती व शेतकरी उत्पादक कंपन्या या विषयावर ८ फेब्रुवारी रोजी परिसंवाद होणार आहे. खरेदीदार व विक्रेता यांचे संमेलन ९ फेब्रुवारी रोजी, कांदा व भाजीपाला पिक परिसंवाद १० फेब्रुवारीला, द्राक्ष, डाळींब व कृषी यांत्रिकीकरण या विषयावर ११ फेब्रुवारीला परिसंवाद होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी दोन या काळात हे परिसंवाद होणार आहे.

२१४ स्टॉल्स

महोत्सवात २१४ स्टॉल्स आहेत. यात सरकारी विभागांचे ४८ स्टॉल्स आहेत. तेथे सरकारी योजनांची माहिती दिली जात आहे. धान्य महोत्सवाचे ४०, कृषी तंत्रज्ञान व सिंचनाशी संबंधित ४८, शेती अवजारांचे १०, खाद्य पदार्थांचे २०, गृहोपयोगी वस्तूंचे ४८ स्टॉल्स येथे आहेत. सरकारी विभागाच्या स्टॉलमधून शासनाच्या योजना, पीकनिहाय उपलब्ध तंत्रज्ञान, पाणलोट व्यवस्थापन, बाजारपेठ व्यवस्थापन, सेंद्रीय कृषि उत्पादने आदींची माहिती देण्यात येत आहे.

..

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोवळ्या स्वर-तालांनी रंगली ‘सूर विश्वास’ मैफल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तरुण पिढीतील अस्सल भारदार स्वरांनी 'विश्वास गार्डन' परिसरात रसिकांना अनोखी स्वर अनुभूती मिळाली. शब्दांच्या पलीकडे असणारा आशयाचा नाद, स्वरतालातून हलकेच निथळत होता आणि त्याला उपस्थित चिंब न्हाऊन निघाले.

'सूर विश्वास' या अनोख्या मैफलीचे आयोजन विश्वास गार्डन येथे करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, ग्रंथ तुमच्या दारी सारस्वत बँक व रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांच्यातर्फे कार्यक्रम झाला. विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे.

उद्योन्मुख गायक प्रीतम नाकील यांनी आपल्या दमदार सादरीकरणाने मैफलीत रंग भरला. नाकील यांनी मैफलीची सुरुवात 'मियाँ की तोडी मध्ये विलंबित ख्यालाने केली. त्यानंतर तिलक कमोद राग गायला. संत तुकारामांच्या अभंगातून त्यांनी भाव-भक्ती रसाने स्वराभिषेक केला. 'हेचि माझे तप' व 'लक्ष्मी वल्लभा' या दोन अभंगातून भक्ती रंगात सारे न्हाऊन निघाले. कुमार गंधर्वांच्या गायकीची आठवण प्रीतमेने ताजी केली. दोन प्रसिद्ध निगुर्णी भजनांचे गायन केले. शून्य गढ शहर व गुरूजी 'मै तो' या भजनांनी मनाच्या निर्गुणतेचा वेध घेतला. 'अवधूता गगन घटा' या भैरवीने मैफलीची सांगता केली. साथसंगत ईश्‍वरी दसककर (हार्मोनियम), दिगंबर सोनवणे (तबला), मृत्युंजय वाघ (तानपुरा), हिमांशू कुलकर्णी (तानपुरा) यांनी केली. यावेळी 'ग्रंथ तुमच्या दारी'चे शिल्पकार विनायक रानडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कवी सी.एल. कुलकर्णी यांच्या हस्ते रानडे यांचा सत्कार करण्यात आला. सी.एल. कुलकर्णी यांनी विनायक रानडे यांच्या ग्रंथ चळवळीच्या वाटचालीचा प्रवास व त्यांची योजकता कथन केली. निरपेक्ष वृत्तीने कार्याचा गौरव केला. डॉ. स्मिता मालपुरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मनोज शिंपी यांनी आभार मानले. याप्रसंगी आमदार हेमंत टकले, अ‍ॅड. विलास लोणारी, आर्कि. संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

लोगो : कल्चरल वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमणांवर कुऱ्हाड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेने शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निमूर्लन मोहीम सुरू केली असून, गुरुवारी नाशिक पूर्व विभागातील, काठे गल्ली येथील सौभाग्य इस्टेट इमारतीमधील १४ वाढीव बांधकामे काढण्यात आली आहेत. तसेच सातपूर विभागात देखील दोन ठिकाणी अतिक्रमणे काढण्यात आली.

काठेगल्ली परिसरातील तिगरानिया कंपनी जवळ असलेल्या सौभाग्य इमारतीत १५ नागरिकांनी सदनिकेत वाढीव बांधकाम केले होते. त्यापैकी सखाराम बारी, पुलकेशी टांकसाळे, एस. आर. भानोसे यांचे साईड मार्जिनमधील शेड व लगतची भिंत, रामनिवास कुमावत, संतोषीदेवी कुमावत, प्रतिक साळुंके, नरेंद्र गायकवाड यांचे साईड माजिर्नमधील शेड, हेमंत जाधव यांचे ओपन टेरेसमधील शेड, भालचंद्र कांकरीया, जितेंद्र वराडे, प्रितीश कर्नावट, सोहनकुमार कुमावत यांची ३० मीटर शेडची अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.

या मोहिमेला सकाळी ११.३० वाजता सुरुवात करण्यात आली. नाशिक महापालिकेचा फौजफाटा परिसरात पोहचताच नागरिकांकडून सुरुवातीला मज्जाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमच्याकडे मनाई हुकूम असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनाई हुकूमाची मागणी केली असता ते देऊ शकले नाहीत. त्यानुसार दुपारी अडीच वाजेपर्यंत १५ वाढीव बांधकामांपैकी १४ कामे काढण्यात आली. दुपारी २.३० वाजता मनाई हुकूम मिळाल्यानंतर काम थांबविण्यात आले.

सातपूर विभागात रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांबाबत अनेक तक्रारी होत्या त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला जप्त करण्यात आला असून, तो परशुराम साइखेडकर वाचनालयाजवळ असलेल्या रमाबाई आंबेडकर वसतिगृहाला देण्यात आला आहे. सातपूर विभागात रस्त्यावर फेरीवाले उभे रहात असून, त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्याना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तिसरी कारवाई सातपूर येथील प्रभाग क्रमांक ८ मध्ये करण्यात आली आहे.

हळदीकुंकू मंडपावरही कारवाई

गंगापूर रोड सावरकर नगर येथे रस्त्यावर हळदीकुंकू समारंभासाठी १५ फूट बाय १५ मांडव टाकण्यात आला होता. या मांडवाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मांडव टाकणाऱ्या प्रसाद विजय खैरनार यांना २ हजार २० रुपये दंड आकारण्यात आला आहे.

अंबड परिसराकडे दुर्लक्ष का?

अंबड, पवननगर, कामटवाडे, खुटवडनगर, महालक्ष्मीनगर, इंद्रनगरी, अभियंतानगर या भागातही अनेकांनी अतिक्रमणे केली असून, याचा त्रास वाहतुकीला व परिसरातील रहिवाशांना होतो आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक दुकानदारांनी दुकानांसमोर पक्की बांधकामे व शेड उभारले असून, महापालिकेचे पथक परिसरात जात असूनही या दुकानदारांवर कारवाई करत नसल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुद्दा मिळेल का मुद्दा?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोणतीही निवडणूक म्हटली की प्रचार आपसूकच येतो. हाच प्रचार करण्यासाठी राजकीय पक्ष व नेत्यांना हाती असावे लागतात मुद्दे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या याच मुद्द्यांचा शोध विविध राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांकड़ून घेतला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे थेट जनतेच्या दरबारात जाऊनच मुद्दे शोधले जात आहेत. पक्षासोबतच काही इच्छुकांनी व्यक्तिगत पदरमोड करून सर्वेक्षणे हाती घेतली आहेत. स्वत:च्या क्षमतेचे आकलन करतानाच कोण, किती पाण्यात आहे याचाही अंदाज या माध्यमातून शोध घेतला जात आहे.

निवडणुकीच्या प्रचार काळात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील विषयांची वानवा नसते. परंतु, स्थानिक पातळीवर प्रचार करताना स्थानिक विषयांना हात घालावाच लागतो. लोकांशी ‘कनेक्ट’ दिसला तर त्याचा नक्कीच फायदा होतो. त्यामुळेच लोकांना काय वाटते हे जाणून घ्यावे लागते. जाहीरनामा बनविण्यासाठीही त्याचा उपयोग होत असतो. नेमकी हीच बाब शोधण्यासाठी इच्छुकांनी काही खासगी सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी चालवली आहे.

नाशिकमध्ये विद्यमान खासदार आणि इतर काही प्रबळ इच्छुकांकडून सर्वेक्षणाचे काम मुंबईतील काही एजन्सीजना देण्यात आले आहे. नाशिकमधील दोन प्रबळ इच्छुकांनी या सर्वेक्षणासाठी प्रत्येक सहा ते आठ लाख रुपये मोजल्याचे समजते. मागील पाच वर्षांत कोणते चांगले काम शहरात घडले, तुमच्या समस्या सुटल्या का, विद्यमान लोकप्रतिनिधीचे काम समाधानकारक आहे काय, त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत, मतदारसंघात कोणती विकासकामे झाली, कोणती विकासकामे गरजेची आहेत, लोकप्रतिनिधी तुम्हाला सहज उपलब्ध होतात का, अशा आशयाच्या प्रश्नांचा भडिमार एका फॉर्मद्वारे केला जात आहे.

एक हजार नमुन्यांचे संकलन

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन साधारण एक हजार लोकांकडून सर्वेक्षणाची फॉर्म भरून घेतले जात आहेत. या माध्यमातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून काही निष्कर्ष काढले जात आहेत. निवडणुकीची रणनीती ठरविताना ही माहिती नक्कीच उपयोगी ठरेल, असा इच्छुकांचे होरा आहे. अशा सर्वेक्षणातून नवी माहिती हाती येण्याबरोबरच लोकांचा नेमका कल कुठे आहे, कोणत्या भागावर आणि कोणत्या मुद्द्यांवर फोकस ठेवण्याची गरज आहे यासंबंधीची खात्रीलायक मिळते, ही बाब माहिती संबंधित एजन्सीजकडून इच्छुकांना पटवून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीतर्फे 'ठाकरे'चा विशेष शो, भुजबळही पाहणार

0
0

नाशिक :

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमाचा एक विशेष शो राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी ठेवण्यात आला आहे. शिवसेना खासदार आणि या सिनेमाचे निर्माते संजय राऊत यांच्या या सिनेमाचा शो राष्ट्रवादी आयोजित करत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही वर्षांपूर्वी शिवसेनेला 'अखेरचा जय महाराष्ट्र' करत आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हेदेखील हा सिनेमा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादीचा हा खास शो रविवार १० फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता बिग बझार येथील सिनेमॅक्स चित्रपटगृहात आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी या विशेष शोला उपस्थित असतीलच, शिवाय काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही आमंत्रण आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे यांनी या खास शो बद्दल माहिती दिली. ते म्हणाले, 'महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, बॅ. ए. आर. अंतुलेंपासून तर शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान राहिले आहे. शरद पवार यांनी सतत जात, धर्म आणि पक्षविरहित शिकवण दिली आहे.

ठाकरे यांच्या कार्याचा प्रवास त्यांच्या जीवनपटावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटातून जनतेच्या समोर मांडण्यात आला आहे. हा चित्रपट सध्या प्रदर्शित झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने या चित्रपटाचे एक विशेष प्रदर्शन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ठेवण्यात आले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणीसाठी युवकाचे अपहरण

0
0

दहा लाख रुपयांची मागणी; एकास अटक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दहा लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या १६ वर्षीय मुलाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. या कारवाईत एक खंडणीखोर पोलिसांच्या हाती लागला असून, त्याचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत. खंडणीसाठी तीन दिवसांपासून अल्पवयीन मुलास संशयीतांनी अंबड एमआयडीसीतील चुंचाळे भागात डांबून ठेवले होते. पोलिसांनी त्यांना हुडकून काढले. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.

गंगापूर रोड भागातील १६ वर्षांचा मुलगा मंगळवारी (दि. ५) सकाळी कॉलेजला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. कॉलेज सुटल्यानंतरही तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र, त्याचा थांगपत्ता लागला नाही. अखेर मुलाच्या वडिलांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल दिली. मुलाचे वडील घरी पोहच नाही तोच त्यांना वेगवेगळ्या दोन मोबाइल नंबरवरून फोन आले. 'मुलगा आमच्या ताब्यात असून, दहा लाख दिल्यास सुटका करू' असे सांगितल्याने अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी पुन्हा पोलिस ठाणे गाठले. या घटनेची पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी गंभीर दखल घेतल्याने सरकारवाडा पोलिस आणि शहर गुन्हे शाखा कामाला लागली. युनिट एकच्या पथकाने औद्योगिक वसाहत गाठून साहिलकुमार अरुणकुमार झा (रा. रूम नं. ८, बिल्डींग नं. ९, चुंचाळे घरकुल योजना) या दुचाकीस्वारकास संशयावरून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत मुलास चुंचाळे येथील घरात डांबून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्यास सोबत घेत युवकाची सुखरूप सुटका केली.

मुलाने दिलेल्या माहितीनुसार करण नावाच्या व्यक्तीने तीन साथीदारांसमवेत कॉलेजला सोडून देतो, असे सांगून चुंचाळे येथील घरकुल योजनेच्या एका घरात डांबून ठेवल्याचे सांगितले. यावेळी आरडाओरड केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचे सांगितल्याने पोलिसांनी उर्वरित संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली. लवकरच संशयित पोलिसांच्या हाती लागतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, अटक केलेल्या खंडणीखोराच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १५ डीआर ७४३१) आणि मोबाइल सिमकार्ड असा सुमारे ६१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील, निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक बलराम पालकर, सहायक उपनिरीक्षक पोपट कारवाळ, बाळासाहेब दोंदे, हवालदार रवींद्र बागूल, वसंत पांडव, येवाजी महाले, प्रवीण कोकाटे, अनिल दिघोळे, विजय गवांदे, संजय मुळक, नाईक आसिफ तांबोळी, दिलीप मोंढे, संतोष कोरडे, मोहन देशमुख, शांताराम महाले, शिपाई नीलेश भोईर, विशाल काठे, विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, गणेश वडजे, राहुल पालखेडे, रावजी मगर, प्रवीण चव्हाण, प्रतिभा पोखरकर आदींच्या पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांना पुन्हा हुडहुडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडी मुक्कामी आली असून, वातावरणातील गारव्याने नाशिककरांना हुडहुडी भरविली आहे. राज्यात नीचांकी तापमानाची नोंद झालेल्या पहिल्या तीन शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक लागला आहे. येथे शुक्रवारी किमान तापमान ९.८ अंश सेल्सियस नोंदविले गेले. निफाडमध्ये पुन्हा सहा अंश सेल्सियसपर्यंत पारा घसरला आहे. आणखी आठवडाभर नाशिककरांना हुडहुडी अनुभवावी लागू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नाशिककर आणि थंडी यांचे पूर्वीपासूनच सख्य आहे. म्हणूनच राज्यातील थंड हवेच्या मोजक्या काही ठिकाणांमध्ये नाशिकचा उल्लेख आवर्जून होतो. उत्तरेकडील राज्यांमध्ये झालेल्या पाऊस आणि बर्फवृष्टीचा येथील हवामानावरही परिणाम झाला असून, शहरासह जिल्ह्यात थंडी परतली आहे. त्यामुळेच नाशिककरांनाही दिवसभर गारठ्याचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी राज्यातील नीचांकी तापमान महाबळेश्वर येथे ९.० अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. पाठोपाठ अहमदनगरमध्ये ९.६ तर नाशिकमध्ये ९.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये कमाल तापमानही २३.२ अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरले असून, दिवसभर गारठ्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांत किमान तापमान तब्बल आठ अंश सेल्सियसने खाली उतरले आहे. कमाल तापमानही ७.५ अंश सेल्सियसने घसरले आहे.

वातावरणातील गारठा वाढल्याने पुन्हा एकदा ऊबदार कपडे परिधान करण्यास नागरिकांकडून पसंती दिली जाऊ लागली आहे. पुढील आठवडाभर किमान तापमान ११ अंशांच्या जवळपास असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. भल्या सकाळी शाळेसाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांसह कामगार आणि सर्वांनाच थंडीपासून रक्षणाकरीता काळजी घ्यावी लागणार आहे.

४ फेब्रुवारीपासूनचे तापमान

-

दिनांक किमान तापमान कमाल तापमान

४ फेब्रुवारी १७.४ ३०.७

५ फेब्रुवारी १५.० ३२.०

६ फेब्रुवारी १४.४ ३०.९

७ फेब्रुवारी १३.२ २४.२

८ फेब्रुवारी ९.८ २३.२

-

येत्या आठवड्याचा अंदाज

-

दिनांक किमान कमाल

९ फेब्रुवारी ९.० २८.०

१० फेब्रुवारी १०.० ३०.०

११ फेब्रुवारी ११.० ३०.०

१२ फेब्रुवारी ११.० २९.०

१३ फेब्रुवारी ११.० २९.०

१४ फेब्रुवारी ११.० २९.०

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीनासह तीन जण ताब्यात

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अशोकनगर भागात रात्री बारा वाजेनंतर चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या तीन संशयितांना गस्तीवर असलेल्या सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

सातपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक संदीप वऱ्हाडे यांना गस्त घालत असताना तीन जण संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. विचारपूस केली असता यातील त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सचिन रामभाऊ विश्वकर्मा (१९), सचिन बबन वड (२६, रा. रामवाडी, पंचवटी) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. त्यांच्यासोबत एक अल्पवयीन मुलगा देखील असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून कुलूप तोडण्यासाठी लागणारे तीन किलोच्या गॅस हंडीसह नोझल व कटर, गॅसगनसह लागणारे साहित्य, फायटर, दुचाकी असा ८८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसाद योजनेच्या कामांचे भूमिपूजन

0
0

त्र्यंबकेश्वर : राम मंदिरासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, सोबत प्रभुरामचंद्राचा पदस्पर्श झालेल्या स्थळांचा विकास करण्यासाठी रामयण सर्किटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येत आहे. असे राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी त्र्यंबकेश्वर येथे प्रसाद योजनेच्या विकासकामांचे भूमिपूजन करतांना सांगितले.

रोजगाराची निर्मिती करण्यासाठी राज्यातील ४५० किल्ल्यांचे सेंदर्यकरण हाती घेण्यात येत आहे. रायगडावरून येत्या ११ तारखेस याची घोषणा करण्यात येत आहे. किल्ल्यांच्या सौंदर्यीकरणातून स्थानिकांना रोजगार हमी अंतर्गत काम उपलब्ध होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे ३७.५५ कोटी रुपयांच्या प्रसाद योजनतील कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कामांचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर येथ अहिल्या गोदावरी संगमघाटावर असलेल्या नारायण नागबली धर्मशाळेच्या भूमिपूजनाने करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीसीटीव्ही धूळखात

0
0

इंदिरानगर येथील बोगद्यात आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वीत करण्यात आले आहेत. मात्र, पंधरा दिवसांपासून ही यंत्रणा धूळखात पडली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईच केली जात नाही. त्यामुळे या ठिकाणी वन वे असतानाही रात्रीच्या सुमारास दुतर्फा वाहतूक असते.

फोटो- सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय खो-खोत वैजलला दुसरे सुवर्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्नाटक येथील मंड्या येथे २८ ते ३१ जानेवारी दरम्यान झालेल्या १४ वर्षाखालील मुला-मुलींच्या ६४ व्या शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत नाशिकच्या निशा वैजल हिने राष्ट्रीय स्पर्धेत दुसरे सुवर्ण पदक पटकावले आहे.

स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात नाशिकच्या शासकीय कन्या शाळेच्या निशा वैजल हिची निवड झाली होती. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे एकाच वर्षी दोन राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारी निशा वैजल नाशिक जिल्ह्याची पहिली खेळाडू आहे.

डिसेंबर २०१८ मध्ये रुद्रपूर येथे झालेल्या २९ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्राच्या संघात नाशिकच्या मनीषा पडेर, ललिता गोबाले, निशा वैजल या खेळाडूंच्या अष्टपैलू खेळाचा मोठा वाटा होता. मंड्या येथील शालेय राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्राच्या यशात निशा वैजल हिच्या संरक्षणाचा मोठा वाटा आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या शाळेत शिकणाऱ्या कुमारी निशा वैजल व मनीषा पेडर या दोन खो-खो खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत विजेत्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. या वर्षी जिल्हा परिषदेच्या या दोन्ही खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावले आहे. निशा वैजल ही दोन तर मनीषा पडेर ही एका सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे. त्यांना गीतांजली सावळे व उमेश आटवणे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९३३ गावांचा डेटा डाउनलोड

0
0

किसान सन्मानसाठी माहिती संकलनास वेग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती संकलनाचे काम जिल्ह्यात युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून १९६६ पैकी ९३३ गावांमधील बहुतांश शेतकऱ्यांची माहिती डाउनलोड करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने दिली.

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत. जिल्ह्यात सुमारे पाच लाख अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. त्यासाठी विविध माध्यमातून जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची माहिती संकलनाचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी विशेष मोहिमही हाती घेण्यात आली असून आतापर्यंत ९३३ गावांमधील शेतकऱ्यांचा डेटा डाउनलोड करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आधारकार्ड, मोबाइल क्रमांक आणि बँकेच्या पासबुकचा तपशील तातडीने तलाठ्यांकडे जमा करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर सुरू असलेल्या तयारीचा आढावा राज्याच्या मुख्य सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. त्यामध्ये ९३३ गावांमधील शेतकऱ्यांसंबंधीचा डेटा डाउनलोड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट प्रकल्पांच्या फेरनिविदा

0
0

पालिकेवरील आर्थिक संकट तूर्तास टळले

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीअंतर्गत असलेल्या 'प्रोजेक्ट गोदा' आणि 'गावठाण विकास' योजनेतील चढ्या निविदा दरांबाबत विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर तसेच याबाबत थेट पंतप्रधान कार्यालयाकडेही तक्रारी गेल्यानंतर कंपनीने दोन्ही निविदा अखेर रद्द केल्या आहेत. आता या प्रकल्पांसाठी फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यास महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे या एकत्रित निविदांमधील कामांचीही विभागणी केली जाणार आहे. त्यामुळे या जादा निविदादरांमुळे पालिकेवरील ३०४ कोटींच्या कर्जरोख्याचे आर्थिक संकट तूर्तास तरी टळले आहे.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत 'प्रोजेक्ट गोदा' व 'गावठाण विकास' असे दोन महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट हाती घेण्यात आले होते. परंतु, या प्रकल्पासाठी प्राप्त झालेल्या जादा दराच्या निविदांमुळे थेट कंपनीसह प्रकल्पही अडचणीत आले होते. प्रोजेक्ट गोदाची ७३ कोटींची निविदा ही ३८.८८, तर गावठाण विकासची ३२४ कोटींची निविदा ६० टक्के जादा दराने आली होती. स्मार्ट कंपनीला १४४ कोटींच्या आर्थिक तुटीचा सामना करावा लागत असताना या जादा दराच्या निविदांमुळे आर्थिक तूट ३०४ कोटींवर गेली. ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून कर्जरोखे (म्युनिसीपील बॉन्ड) काढण्याचा तसेच पालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात स्वतंत्र निधीची तरतूद करण्याच्या पर्यायावर विचार केला जात असल्याचे कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले होते. स्मार्ट प्रकल्पांचा भार पालिकेवर एकीकडे टाकण्याची तयारी सुरू असतानाच पालिकेची आर्थिक स्थिती डामाडोल झाली आहे. त्यामुळे हे कर्जरोखे पालिकेला परवडणारे नव्हते. त्यामुळे स्मार्ट कंपनीतील संचालकांसह महापालिकेतील विरोधी पक्षांनी कर्जरोख्याला तीव्र विरोध दर्शविला. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, कॉँग्रेस गटनेते शाहू खैरे, माजी उपमहापौर गुरमित बग्गा यांनी जादा दराच्या या निविदांना विरोध दर्शविला तर कॉँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील व नगरसेवक राहुल दिवे यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करीत भ्रष्टाचाऱ्याच्या चौकशीची मागणी केली होती.

कामांची होणार विभागणी

प्रोजेक्ट गोदा व गावठाण विकास प्रकल्पासाठी एकत्र निविदा काढल्याने लहान ठेकेदारांना भाग घेता आला नाही. त्यामुळे मोठ्या एकाच कंपनीने जादा दराच्या निविदा भरल्या होत्या. त्यामुळे आता फेरनिविदा काढताना या प्रकल्पातील कामांची विभागणी करून स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहेत. गावठाण विकास प्रकल्पांतर्गत जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ, जलवाहिनी, रस्ते बांधणी, ड्रेनेज, पथदीप आदी कामांसाठी यापूर्वी एकत्र निविदा काढण्यात आली होती. आता या कामांसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार असून, याद्वारे प्रकल्पाचा जादा खर्च कमी होणार असल्याचे आयुक्त गमे यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगत यांना पीएच.डी.

0
0

नाशिक : केटीएचएम कॉलेजमधील जैवतंत्रज्ञान विभागातील प्रा. डॉ. अनिरुद्ध भगत यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून 'बायोनॅनोटेक्नॉलॉजिकल अॅप्रोचेस फॉर द स्टॅबिलिटी अँड अॅप्लिकेशन ऑफ नॅनोमटेरियल्स' या मायक्रोबायोलॉजीतील विषयावर त्यांनी पीएच.डी. संपादित केली आहे. त्यासाठी त्यांना डॉ. अनिरुद्ध पेठकर यांचे मार्गदर्शन लाभले. पीएच.डी. मिळविल्याबद्दल प्राचार्य व्ही. बी. गायकवाड आणि जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख एस. एन. पाटील यांनी त्यांचा गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images