Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बेशिस्तांना बसणार बॉसची बोलणी!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तुम्ही वाहतुकीचे नियम मोडत असाल तर सावधान! यापुढे वाहतुकीचा नियम मोडला तर थेट तुमच्या कामाच्या ठिकाणचे प्रमुख तुम्हाला जाब विचारणार आहेत. 'तुमच्या कर्मचाऱ्यास वाहतूक नियम पाळण्याचे भान नाही. त्याला समज द्या' अशा स्पष्ट शब्दांत कार्यालय प्रमुखांना पोलिसांकडून पत्र लिहिले जात आहे. नोकरीच्या ठिकाणी बॉसकडून कानउघाडणी होऊ नये, असे वाटत असेल तर वाहतुकीचे नियम पाळा असा संदेशच या माध्यमातून पोलिस देऊ लागले आहेत.

वाहन तपासणी, दंडात्मक कारवायांचा बडगा उगारूनही बहुतांश नागरिक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याचे चित्र पोलिसांना रोजच पहावे लागते. हेल्मेट वापराचा आग्रह धरूनही अनेक मोटरसायकलस्वार हेल्मेट परिधान करीत नसल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. यामुळेच रस्ते अपघातात अनेक वाहनधारक जीव गमावत आहेत. दंडात्मक कारवाईनंतरही बेशिस्त वाहनचालकांच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने पोलिस आयुक्तांनी आता अनोखी शक्कल लढविली आहे. सरकारी कार्यालये, बँका, खासगी कंपन्या, कार्यालये यांमधील कामगारांनी वाहतुकीचे नियम मोडले तर त्यांच्याकडून दंड वसूल करतानाच संबंधित वाहनचालक कोठे नोकरी करतो, त्याच्या कार्यालयाचा पत्ता, कार्यालय प्रमुखांचे नाव याबाबतची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. ही सर्व माहिती नोंदवून घेण्यात येत आहे. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याच्या कार्यालयीन प्रमुखांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह पत्र पाठविले जात आहे. ज्यामध्ये आपल्या कर्मचाऱ्यास वाहतुकीचे पाळण्याबाबतची समज द्या, असे नमूद केले जात आहे. आतापर्यंत कारवाई केलेल्या विविध विभागांच्या ८० कर्मचाऱ्यांची यादी पोलिसांकडे तयार झाली असून, त्यापैकी २० कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन प्रमुखांना अशा प्रकारची पत्रे पाठविण्यात आली आहेत. ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, फॉरेन्सिक लॅब, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महावितरण यांसारख्या कार्यालयीन प्रमुखांना त्यांच्या बेशिस्त कर्मचाऱ्यांबद्दलची माहिती पाठविण्यात आली आहे.

दंड वसुली करणे हा आमचा उद्देश नाही. लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, यासाठी आम्ही कारवाई करतो. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. ते कमी करणे आमचा उद्देश आहे. वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत कार्यालय प्रमुखांनी कर्मचाऱ्यांना सूचना आणि समज द्यावी, यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

-रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट सिटी कामांची सखोल चौकशी व्हावी

0
0

नगरसेवक राहुल दिवे यांची मागणी

…..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार होत असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक राहुल दिवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिवे यांनी एक निवेदन पंतप्रधान कार्यालयात, तर दुसरे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना भेटून दिले.

सरकारने देशभरात निवडक महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी प्रकल्प तयार करण्याचा निर्णय घेतला. परंतु, ज्या संस्थांनी हे काम घेतले आहे, त्या संस्था केंद्र व पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत आहेत म्हणून याची सखोल चौकशी व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे. नाशिक शहरात अशोकस्तंभ ते मुंबई नाका हा रस्ता स्मार्ट सिटीअंतर्गत येतो व त्याचे कामदेखील चालू आहे. परंतु, काम वेळेत पूर्ण होत नाही. या संस्था कामाची मुदत वाढून घेत आहेत. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून स्मार्ट सिटी कामांची ६० टक्के जादा दराने कामे मंजूर करण्यात आली आहेत. काही ठराविक राजकीय संबंध असलेल्या संस्थांसाठी हे निर्णय घेण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

केंद्र सरकारने स्मार्ट सिटीअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीचा गैरवापर होत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम शहराचे हिताचे होत नसल्याचे समोर येत आहे. स्मार्ट सिटी कामांचा आढावा घेऊन योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी दिवे यांनी नाशिककरांच्या वतीने पंतप्रधानांकडे केली आहे. यावेळी खासदार हेमंत गोडसे व उदय सांगळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक विषयांवर भाष्य

0
0

नाशिक : मोबाइलच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम, पर्यावरण, टपाल यासह शैक्षणिक व सामाजिक विषयांवर सादर होणाऱ्या बालनाट्यांनी रसिकांची दाद मिळवली. निरागसपणे बालनाट्याच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाच्या विविध विषयांवर होणारे भाष्य रसिकांना भावले. सकाळी ११ वाजेपासून सुरु झालेली ही स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली. अभिरंग बालकला त्र्यंबक या संस्थेने 'तायडी जेव्हा बदलते' हे कौटुंबिक आशयाचे बालनाट्य सादर केले. त्यानंतर लोकहितवादी मंडळातर्फे 'थेंबाचे टपाल' हे नाट्य सादर करण्यात आले. मोठ्यांच्या आयुष्याचे असलेले आकर्षण आणि त्यांच्या आयुष्यातील संकट जाणून घेत, मोठ्ठं होण्याची स्वप्ने पाहणारा नायक, या आशयाचे 'मला मोठं व्हायचंय' हे बालनाट्य सौंदर्य निर्मिती तर्फे सादर केले गेले. द प्रोग्रेसीव्ह एज्युकेशन सोसायटी तर्फे 'रिले' हे नाट्य सादर झाले. श्रीमती सुनंद लेले विद्या मंदिर संस्थेच्या 'वनराई' या विशेष बालकारांनी सादर केलेल्या बालनाट्याने रसिकांना मोहीत केले. सायंकाळी ७ वाजता दीपक मंडळाचे 'कोणी मोडलं' आणि ल्युमिनिअर फाउंडेशनचे 'सेल' हे बालनाट्य सादर झाले. 'सेल'मध्ये देखील स्मार्टफोनमुळे लहानग्यांच्या जीवनावर झालेला परिणाम, यावर भाष्य करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीए निवडणुकीत सात जणांची वर्णी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सीए शाखेच्या २०१९ ते २०२२ च्या कार्यकारिणी पंचवार्षिक निवडणुकीत सीए पियुष चांडक, रोहन आंधळे, संजीवन तांबुळवाडीकर, सोहील शाह, हर्षल सुराणा, राकेश परदेशी, राजेंद्र शेटे यांची निवड झाली.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत ११ उमेदवार रिंगणात होते. त्यात सात जणांची वर्णी लागली. या सात जणांच्या कार्यकारिणी सदस्यांमधून आता पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. आयसीएआय भवन येथे ही निवडणूक घेण्यात आली. यात सर्व सीएनी सहभाग घेतला. निवडणुकीत मतदानानंतर लगेच मतमोजणी करण्यात आली. पश्चिम विभागीय सीए कार्यकारिणी सदस्य सीए विक्रांत कुलकर्णी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. सर्व विजेत्यांचे विद्यमान अध्यक्ष सीए मिलन लुणावत, माजी अध्यक्ष सीए रवी राठी व सीए विकास हासे यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरेतील पावसामुळे नाशिककरांना हुडहुडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या तीन महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीचा सामना केल्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला वाढत्या उन्हाने नाशिककरांना दिलासा दिला होता. मात्र, दोन-तीन दिवस होत नाहीत तोच वातावरणात पुन्हा गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. उत्तर भारतात झालेल्या पावसामुळे वातावरणात बदल झाल्याचे सांगण्यात येत असून, गुरुवारी सकाळपासूनच ताशी १३ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे गुरुवारचा पूर्ण दिवस शहरवासीयांना थंडी जाणवली. सातत्याने वातावरणात मोठा चढ-उतार होत असल्याने आरोग्यविषयक समस्यांचा सामना नाशिककरांना करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चलो जी मन राम-सीया दर्शनको’

0
0

'चलो जी मन

राम-सीया दर्शनको'

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मेनरोड येथील गणेश मंदिराच्या वार्षिक माघी उत्सवात पं. उल्हास कशाळकर यांचे गायन रंगले. पं. कशाळकर यांनी आपल्या गायन सेवेची सुरुवात श्री रागाने 'बाजे रे गजवदन वा' या पदाने केली. त्यानंतर 'चलो जी मन रामसीया दर्शनको' ही बंदिश पेश केली. यानंतर श्रीकृष्णावरील रचित एक हिंदीपद सादर करून रसिकांची ब्रह्मानंदी टाळी लावली. दोन तासाहून अधिक काळ शास्त्रीय गायन सादर करीत त्यांनी नाशिककरांना एका प्रसन्न वातावरणात नेले.

गणेशोत्सवानिमित्त रंगलेल्या या संगीत सभेतील गायन हा रसिकांसाठी अपूर्व योग होता. नाशिकमध्ये मोठ्या कालखंडानंतर पं. कशाळकरांचे गायन ऐकण्याचा अनुभव नाशिककरांनी घेतला. प. सा. नाट्यगृहात झालेल्या या गायन मैफलीची सुरुवातच पं. कशाळकर यांनी शहराच्या आठवणीतून केली. खूप दिवसांपूर्वी गुरुंसोबत नाशिकमध्ये तीन ते चार महिने निवास करण्याचे भाग्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. पं. राम मराठे व गजाननबुवा जोशी यांच्याकडून गायकीचे शिक्षण घेतलेले पं. कशाळकर यांच्या गायनात आग्रा घराण्याची लयकारी, जयपूर घराण्याची रागदारी व ग्वाल्हेर घराण्याची नजाकत यांचा सुंदर मिलाफ पहावयास मिळाला.

पंडित कशाळकर यांना ज्ञानेश्वर सोनवणे यांनी संवादिनीवर, आशय कुलकर्णी यांनी तबल्यावर तर आरोह ओक,साई महाशब्दे, ऐश्वर्य महाशब्दे यांनी तंबोऱ्यावर स्वरसाथ केली. कार्यक्रमाचे निवेदन, प्रास्ताविक, पं. कशाळकर यांचा परिचय आणि आभार डॉ. अविराज तायडे यांनी मानले. मेनरोड गणेश मंदिर भक्त मंडळाचे विश्वस्थ व अध्यक्ष संदीप कुलकर्णी यांनी पं. कशाळकर यांचा तर सुहास अष्टपुत्रे यांनी इतर कलाकारांचा सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मच्छर अगरबत्तीमुळे गेले वृद्धाचे प्राण

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मच्छर दूर पळविण्यासाठी पेटविण्यात आलेली अगरबत्ती अंथरुणावर पडून लागलेल्या आगीत गंभीर जखमी झालेल्या ६० वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना येवल्या तालुक्यातील पाटोदा येथे घडली. मच्छर चावल्याने होणारे आजार टाळण्यासाठी केलेले प्रयत्न अखेरीस या वृद्धाच्या मृत्यूचे कारण ठरले. या प्रकरणी येवला तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शांताराम भिकाजी पगारे (वय ६० रा. पाटोदा, ता. येवला) असे या वृद्धाचे नाव आहे. डासांचा उपद्रव टाळण्यासाठी शांताराम पगारे यांनी मंगळवारी (दि.५) रात्री झोपण्यापूर्वी आपल्या बिछाण्याजवळच अगरबत्ती पेटविली होती. पहाटेच्या सुमारास अचानक पेटती अगरबत्ती पगारे यांच्या बिछाण्यावर पडली. थोड्याच वेळात आगीने रूद्ररूप धारण केले. निद्रावस्थेत असलेले पगारे पहाटेच्या सुमारास अचानक आरडाओरड करू लागल्याने हा प्रकार समोर आला. कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. यानंतर त्यांना तत्काळ येवला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्रथमोपचार करून बुधवारी सकाळी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मात्र, रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७० बंधारे होणार गाळमुक्त

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात ब्रिटिशकालीन वळण बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि युवा मित्र संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे जिल्हाभरातील आठ तालुक्यांमधील १४२ गावातील १७० बंधाऱ्याचा गाळ काढला जाणार आहे. गाळ काढण्यासाठी ५० टक्के खर्च सरकार, ४१.९ टक्के खर्च टाटा ट्रस्ट व इतर संस्था आणि ८.१ टक्के खर्च लोकसहभागातून करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. आणि युवा मित्रच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक सुनील पोटे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. गाळ काढण्याबरोबर पीक पद्धतीत अपेक्षित बदल घडवून आणणे, स्थानिक नागरिकांचे कामात सहाकार्य घेणे, भविष्यात पाण्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी पाणीवापर संस्था स्थापन करण्यावरही भर देण्याचे कामही केले जाणार आहे. या कामात जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे.

सामंजस्य करार करतांना टाटा ट्रस्टचे कार्यक्रम व्यवस्थापक मुकुल गुप्ते, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, युवा मित्र संस्थेचे कार्यक्रम व्यवस्थापक अजित भोर आदी उपस्थित होते.

७० जेसीबीचा वापर

आतापर्यंत २६ वळणबंधाऱ्यातील गाळ काढल्याचे चांगले परिणाम दिसून आल्याने पुढील टप्प्यात १७० वळणबंधाऱ्यातील गाळ काढण्यात येणार आहे. यासाठी ३१ जेसीबी उपलब्ध करून देण्यात आले असून ही संख्या ७० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. या करारामुळे ७१ हजार कुटुंबांना याचा लाभ होणार असून ५५ हजार एकर क्षेत्राला सिंचनासाठी लाभ होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

अशी असतील गावे

गाळ काढण्यात येणाऱ्या गावांमध्ये बागलाण तालुक्यात ३५ गावातील ४० बंधारे, चांदवड तालुक्यात ३२ गावातील ३९, दिंडोरी १० गावातील १३, कळवण २१ गावातील २४, मालेगाव १३ गावातील १३, नाशिक १ तालुक्यातील २, निफाड २२ गावातील २५ आणि सिन्नर तालुक्यात ८ गावातील १४ बंधाऱ्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्यायमंचाचा बँकेला दणका

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

केवायसीची पूर्तता न केलेल्या ग्राहकाचे खाते पूर्वसूचना न देता अंशतः गोठवून ग्राहकाचा धनादेश अनादरीत केल्याप्रकरणी ॲक्सिस बँकेच्या नाशिकरोड दत्तमंदिर चौकातील शाखेला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दोषी ठरवत तक्रारदारास आठ हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.

अशोक बूब व त्यांच्या मुलाच्या नावे दत्तमंदिर चौकातील ॲक्सिस बँकेच्या शाखेत संयुक्त बचत खाते आहे. त्यांच्या मुलाचे पॅनकार्ड रीअपडेट न केल्याच्या कारणास्तव या बँकेने त्यांचे खाते गोठविले होते. बूब यांनी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीचा कर्ज रोखा विकत घेण्यासाठी या बँकेच्या शाखेतील त्यांच्या खात्यावरील २० हजार रुपयांचा धनादेश जून २०१८ मध्ये काढला होता. मात्र हा धनादेश खाते गोठविल्याच्या कारणावरून अनादरीत केल्याचे त्यांना बँकेने मोबाइल मेसेजद्वारे कळविले होते. वास्तविक रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे खाते गोठविण्यापूर्वी खातेदारास विहित कालावधीपूर्वी नोटीस देणे बंधनकारक असतानाही बँकेने या नियमाचे उल्लंघन केले. याबाबतची तक्रार बूब यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात केली होती. त्यानुसार बँकेला भरपाईचे आदेश देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीच्या सीईओंची गच्छंती?

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाला नाशिक शहरात घरघर लागली आहे. या कंपनीचे सीईओ प्रकाश थवील यांच्या कामाबाबत अनेक स्तरातून नाराजी व्यक्त होत असल्याने त्यांना परत पाठाविण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या असल्याचे समजते.

नाशिक महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक कामे सुरू केली. त्या अंतर्गत नेहरु गार्डनचे नुतनीकरण, शवदाहिनी, कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालन इत्यादींच्या कामांचा समावेश होता. मात्र प्रत्येक कामात अनियमीतता आढळून आल्याने सर्वच ठिकाणी कामे रेंगाळली. यातील प्रत्येक कामात लोकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत्या. कालिदास कलामंदिराच्या कामात सदोष ध्वनीयंत्रणा, नाटकाला लागणारे लाईट्स न वापरता जुजबी सामान वापरण्यात आल्याने रंगकर्मींमध्येही नाराजी होती. याठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चूनही उपयोग नसल्याचे रंगकर्मींचे म्हणणे होते. त्याच प्रमाणे अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या रस्त्याच्या कामाची मुदत संपूनही हे काम अद्यापही तसेच आहे. राज्य सरकारने या कामाबाबत दोनदा मुदतवाढ दिली तरीही ठेकेदाराला पाठिशी घालण्याचा प्रकार सुरू आहे.

थवील यांच्या कार्य पध्दतीला कंटाळून संचालक मंडळानेही नाराजी व्यक्त केली आहे. यातील काही मंडळींनी राजीनामे देण्याची तयारी केली असल्याचे समजते. 'कंपनीत राहून कामकाज होत नाही व काही बोलताही येत नाही,' या कोंडीत संचालक अडकले आहे. प्रकाश थवील यांच्या कार्यपध्दतीबाबत तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. त्याच प्रमाणे विद्यामान आयुक्त राधाकृष्ण गमे हे देखील थवील यांच्या कार्यपध्दतीवर नाराज असल्याचे बोलले जाते. मुळात थवील यांचा कामाचा आवाका नाही, मिंटीगला येताना त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती नसते, अधिकाऱ्यांनी काही प्रश्न विचारल्यास थवील, आपल्या ज्युनिअर लोकांना जाब विचारतात. आपल्याला काय करायचे आहे याचे नियोजन नसल्याने स्मार्ट सिटीचा कारभार दिशाहीन झाला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सीईओंच्या कामाची मुदत एक वर्षाची आहे. सीईओ थवील यांना एकवर्षापेक्षा जास्त कार्यकाळ झाल्याने त्यांना परत पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. थवील यांच्या कार्यपद्धतीबाबत महापालिकेतील अधिकारी देखील नाराज आहेत. त्यामुळे त्यांची गच्छंती अटळ आहे, असे बोलले जाते.

पंतप्रधानांना पत्र

स्मार्ट सिटीच्या कामाबाबत सर्वच पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे नगरसेवक राहुल दिवे यांनी याबाबत पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवले आहे. याबाबत त्यांनी स्मार्ट सिटी हा फसलेला प्रयोग असल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिसास धक्काबुक्की

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक सप्ताहानिमित्त बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत असलेल्या वाहतूक पोलिसास एकाने शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. ही घटना जेहान सर्कल भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित वाहनचालकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर संबंधितास अटक करण्यात आली.

अंकुश निवृत्ती कराड (३७ रा. ऋतुरंग पार्क, नाईकमळा, ता. सिन्नर) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. वाहतूक शाखेचे कर्मचारी गोरख फड हे बुधवारी (दि.६) सकाळी आपल्या सहकाऱ्यांसमवेत जेहान सर्कल भागातील भोसला कॉलेज परिसरात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत असतांना ही घटना घडली. वाहतूक सप्ताहानिमित्त पोलिसांकडून सिटबेल्ट, हेल्मेट, सिग्नल जम्पिंग आणि वाहन चालवितांना मोबाइलवर बोलतांना आढळून येणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येते आहे. फड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशयित कराड यास अडवून नियम भंग केल्याप्रकरणी दंड भरण्यास सांगितले. मात्र, संशयित तरुणाने शिवीगाळ आणि धक्काबुक्की करीत ढकलून दिले. यावेळी इतर पोलिसांनी संशयित कराड यास गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक साबळे करीत आहेत.

बॅगेतून मोबाइल लंपास

दुचाकीस टांगलेल्या बॅगेतून तरुणाचा मोबाइल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दिंडोरी रोडवरील वज्रेश्वरी भागात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चेतन भगवान परदेशी (२५, रा. वडनगर, म्हसरूळ) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. चेतन परदेशी रविवारी (दि. ३) वज्रेश्वरी भागात गेला होता. सार्वजनिक शौचालय भागात तो आपल्या दुचाकी पार्क करून लघुशंकेसाठी गेला असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीस टांगलेल्या बॅगेतून दहा हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक बस्ते करीत आहेत.

अ‍ॅल्युमिनियम पट्ट्यांची चोरी

इदगाह मैदानावर ठेवलेले २५ हजार रुपये किंमतीच्या अ‍ॅल्युमिनिअमच्या पट्ट्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

औरंगाबाद येथील अर्षद यार खान यांनी या प्रकरणी तक्रार दिली. खान यांनी इदगाह मैदान येथे अल्युमिनिअमच्या पट्या ठेवल्या होत्या. चोरट्यांनी बुधवारी (दि. ६) दुपारी त्यातील एक मीटर ४०० लांबीच्या जुन्या पट्या चोरून नेल्यात. अधिक तपास हवालदार क्षिरसागर करीत आहेत.

जुगार अड्ड्यावर कारवाई

संसरी शिवारातील गोडसे मळा भागात चालणारा जुगार अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत चार जुगारींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शाम नारायण गोडसे, अनिल लक्ष्मण गुंबाळे, बाळू दशरथ कडाळे आणि सागर विश्राम शिंदे अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. शाम गोडसे याच्या मळ्यात घराच्या छतावर जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, बुधवारी (दि. ६) रात्री पोलिसांनी छापा मारला. यावेळी संशयित जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी पोलिस शिपाई सचिन गावले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

शिवाजीनगरला

महिलेची आत्महत्या

शिवाजीनगर भागातील विठ्ठलनगर येथे राहणाऱ्या ३१ वर्षाच्या महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

प्रतिभा उर्फ साक्षी रामनरेया वर्मा (३१ रा. भगवा चौक, पवारवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. प्रतिभा वर्मा यांनी बुधवारी (दि. ६) आपल्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले. ही बाब लक्षात येताच दीर राकेश वर्मा यांनी त्यांना जयराम हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार भोईर करीत आहेत.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

0
0

रविशंकर मार्गावर अपघातात दोन जखमी

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

नाशिकरोड आणि इंदिरानगरला जोडणाऱ्या रविशंकर मार्गावर बुधवारी (दि. ६) रात्री भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. रस्त्यालगतच्या अन्य दोन गाड्यांनाही धडक दिल्यानंतर संबंधित कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या नाल्याच्या कथड्यावर जाऊन थांबली. अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुंबई नाका पोलीसांनी अपघाताचा गुन्हा दाखल झाला. कारचालकास अटक केली आहे.

राकेश प्रकाश चव्हाण (२१, रा. सिटी सेंटर गार्डन, इंदिरानगर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. राकेश हा रविशंकर मार्गाकडे वळत असताना वडाळा गावाकडून भरधाव वेगात आलेल्या कारने (आरजे ४२ यूए ११४१) धडक दिली. कारचा वेग इतका जबरदस्त होता की दुचाकीचे दोन तुकडे झाले. राकेश दूरवर फेकला गेला. या धडकेनंतर कारचालक योगेश दिनकर भगुरे याने गाडीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची गाडी कार (एमएच १५ एफव्ही ५८९५) आणि टाटा इंडिका (एमएच ०३ एएम ५१५९) या दोन्ही गाड्यांवर जाऊन आदळली. त्यांनतर कार नाल्याच्या कथड्याजवळ गेल्यावर थांबली. गंभीर जखमी झालेल्या राकेशला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. अपघातात कारचालक योगेश याच्यासह त्याचा मित्र सचिन शिवाजी पवार हे दोघे जखमी झाले. दरम्यान, अपघातात ठार झालेला योगेश हा इंदिरानगर परिसरातील रहिवासी होता. त्याच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. योगेश हा डब्ल्यूएनएस कंपनीत नोकरील होता. रात्री कोणतीही चूक नसताना कारचालकाच्या बेफाम गाडी हाकण्याने त्याला जीव गमवावा लागला.

पथदीपांची कमी

रविशंकर मार्गावर रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. मात्र, या रस्त्यावर पथदीपांची संख्याही कमी आहे. गेल्या काही वर्षात वर्दळीच्या झालेल्या या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे. या मार्गावर गतिरोधक उभारण्याबरोबरच पथदीपांची संख्या वाढवावी, असे नागरिकांची जुनी मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गार वाऱ्याने नाशिककर कुडकुडले

0
0

उत्तर भारतातील बदलत्या हवामानाचा परिणाम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तर भारतातील बदलत्या हवामानामुळे नाशिककर गुरुवारी पुन्हा थंडीने कुडकुडले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीपासून दिलासा मिळाल्यानंतर नाशिककरांना हायसे वाटले होते.

यंदाची थंडी नाशिककरांना लक्षात राहील, अशीच ठरली. नोव्हेंबरपासून घसरलेले तापमान थंडीचे प्रमाण वाढवत होते. अनेकदा तर राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंदही नाशिकमध्ये करण्यात आली. फेब्रुवारीच्या प्रारंभीपासून मात्र या थंडीपासून काहीसा दिलासा मिळण्यास सुरुवात झाली होती. एक फेब्रुवारी रोजी ११ अंश सेल्सिअस असलेले किमान तापमान ४ फेब्रुवारी रोजी १७.४ अंश सेल्सिअसवर स्थिरावले होते. केवळ तीनच दिवसांत ६.४ अंश सेल्सिअसनी तापमानात वाढ झाली. त्यामुळे गारवा कमी होऊन वातावरण स्थिर झाले. गुरुवारी, ७ फेब्रुवारी रोजी किमान तापमान १३.२ अंशावर आले. मात्र, यामध्ये ताशी १३ किलोमीटर जोरदार वेगाने वारे वाहत असल्याने शहरवासीयांनाही गारठा भरला. उत्तर भारतात झालेल्या पावसामुळे गारवा वाढला असून, येत्या काही दिवसांपर्यंत वातावरणात असाच चढ-उतार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

तापमानात चढ-उतारामुळे वातावरणात बदल होतो. परिणामी, आपल्या शरीराला या वातावरण बदलात स्थिर होण्यास वेळ लागतो. कोमट पाणी पिणे, वेळेत जेवण करणे, बाहेरील तेलकट, तूपकट पदार्थ खाणे टाळल्यास अनेक समस्या दूर होऊ शकतात.

- डॉ. त्रिवेंद्र शिंदे, जनरल फिजिशियन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंधन कंपन्यांना अच्छे दिन!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर विमानतळावरुन प्रवासी आणि कार्गो विमानसेवा सुरू असल्याने हवाई इंधनालाही सुगीचे दिवस आले आहेत. ओझर विमानतळावर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे इंधन स्टेशन असून, त्यांच्याकडे मागणी वाढली आहे. नजीकच्या काळात आणखी दोन ते तीन कंपन्यांची सेवा सुरू होणार असल्याने येथील हवाई इंधनाची मागणी वाढणार आहे.

केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत राजधानी नवी दिल्लीसाठी जेट एअरवेजची सेवा जूनमध्ये सुरू झाली आहे. १ फेब्रुवारीपासून अलायन्स एअरची हैदराबाद आणि अहमदाबाद सेवा सुरू झाली आहे. तर, स्पाईसजेट कंपनीचे कार्गो विमानही सध्या पूर्णवेळ ओझरहून सेवा देत आहे. त्यामुळे ओझर येथील इंडियन ऑईलच्या स्टेशनकडे हवाई इंधनाची मागणी वाढली आहे. उडान योजनेमुळे हवाई इंधन भरण्यासाठी विमान कंपन्यांना सवलती देण्यात आल्या आहेत. त्यात एक्साईज ड्युटी आणि व्हॅटची आकारणी केली जात नाही. त्यामुळे दिल्ली, हैदराबाद आणि अहमदाबाद या तीन शहरांच्या तुलनेत ओझर येथे स्वस्तात इंधन मिळते. परिणामी विमान कंपन्यांनी या तिन्ही शहरांऐवजी ओझरलाच इंधन भरण्याला पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

ओझर विमानतळावर अधून मधून जम्बो कार्गो विमानाची वाहतूक होते. मात्र, हे विमान आखाती देशातून येते. ते सध्या इंधन घेत नसले तरी येत्या काळात या विमानाकडूनही मागणी राहण्याची शक्यता असल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, येत्या १३ फेब्रुवारीपासून ट्रुजेट कंपनीची अहमदाबाद सेवा सुरू होत आहे. तर, स्पाईसजेट कंपनीची गोवा आणि हैदराबाद तर इंडिगो कंपनीची बंगळुरू, भोपाळ आणि हिंदण या सेवाही येत्या एक-दीड महिन्यात सुरू होणार असल्याने या दोन्ही कंपनीकडूनही हवाई इंधन विमानामध्ये भरले जाणार आहे. त्यामुळे इंडियन ऑईल कॉर्पोरेशननेही त्यासंबंधीची तयारी सुरू केली आहे. आजच्या मागणीपेक्षा दहापट अधिक मागणी झाली तरी त्याचा योग्य तो पुरवठा करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, असे कंपनीने सांगितले आहे.

मुंबई किंवा अन्य मोठ्या शहरांच्या तुलनेत ओझर विमानतळावरील हवाई इंधन स्वस्त मिळते. विमान कंपन्या सहाजिकच त्याचा लाभ घेतात. या विमानतळावरुन विविध सेवा सुरू झाल्याने इंधनाची मागणी वाढणारच आहे.

- मंदार भारदे, तज्ज्ञ, हवाई वाहतूक क्षेत्र

इंडिगोची सेवा एप्रिलपासून

इंडिगो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी ओझर विमानतळावर येऊन विविध प्रकारची माहिती घेतली. तसेच, सुविधांची पाहणी केली. त्यानंतर आता कंपनीकडून विविध प्रकारच्या मनुष्यबळाची भरती सुरू आहे. येत्या काही दिवसातच सर्व प्रक्रिया पूर्ण करुन येत्या एप्रिल महिन्यापासून नाशिकहून बंगळूरू, भोपाळ आणि हिंदण (गाझियाबाद) या सेवा सुरू करण्याचे कंपनीने निश्चित केले असून, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला आहे.

रनवेचे काम प्रगतीपथावर

हवाई वाहतूक संचालनालयाचे पथक नुकतेच ओझर विमानतळावर येऊन गेले. नाईट लँडिंगसाठी आवश्यक त्या विविध सुविधांची त्यांनी पाहणी केली आहे. त्यांनी काही सुधारणा सुचविल्या आहेत. यातीलच एक रनवे लगतच्या दिव्यांचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. सहा किलोमीटर लांबीचा हा रनवे असून, त्यालगत दिवे आणि रिफ्लेक्टर्स आवश्यक आहेत. या सर्व उपाययोजना येत्या काही दिवसातच पूर्ण केल्या जाणार असून, संचालनालयाकडून नाईट लँडिंगचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यानंतर स्पाईस जेटच्या गोवा आणि हैदराबाद या दोन विमानसेवा सुरू होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट’ कामांच्या फेर निविदा काढा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीचा काराभार हा मनमानी असून, त्यांनी काढलेली टेंडर ही अवास्तव आहेत. या कामांचे फेर मुल्यांकन करुन फेर निविदा काढाव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे.

अजय बोरस्ते यांनी स्मार्ट सिटीच्या कामाबाबत कंपनीला धारेवर धरले आहे. कंपनीच्या संचालकांनीच आक्षेप घेतल्याने ही टेंडर प्रक्रिया वादात सापडली आहे. बोरस्ते म्हाणाले, 'नाशिककरांचे स्मार्ट सिटी हे स्मार्ट स्वप्न रहायला नको. या कंपनीने काढलेले टेंडर हे नाशिकरांवर बोजा टाकणारे आहे. यातील कामांचे इस्टीमेट करताना ते तुकड्यात करणे गरजेचे होते. ते तसे न केल्याने कामाची किंमत वाढली आहे. या कामांचे तुकड्यात किंमत काढण्यात यावी त्यानुसार निविदा काढण्यात याव्यात. स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याची कामे, जलकुंभ, पाणीपुरवठा योजना, भूमीगत गटार योजना अशा मुलभूत सोयींसाठी ३१० कोटींची कामे प्रस्तावित केली आहेत. ही कामे प्रत्यक्षातील किंमतीपेक्षा ३८ टक्के जादा दराने आहेत. तसेच गोदावरी शुद्धीकरणासाठी ७३ कोटीचे टेंडर काढण्यात आले आहे. ते मूळ किंमतीपेक्षा ६० टक्के जादा दराने काढलेले आहे. या कामांचे सरकारी नियमानुसार १० टक्के जादा दराने किंवा २० टक्के कमी दराने टेंडर काढणे गरजेचे होते; मात्र हे नियम डावलण्यात आले आहेत.' या कामांमुळे महापालिकेवर २१९ कोटींचा बोजा पडणार आहे. हा पैसा नाशिक महापालिकेच्या तिजोरीतून जाणार असून, या कामचे फेर मुल्यांकन करुन फेर निविदा काढाव्यात, अशी मागणी विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


…पंचवटी विभागात अद्यावत नाट्यगृह

0
0

म. टा. प्रतिनिदी, नाशिक

पंचवटीतील नागरिकांची मागणी लक्षात घेता महापालिका प्रशासनातर्फे पंचवटीत अद्यावत नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत ठेवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पंचवटीकरांना २१ कोटी रुपयांचे अद्यावत नाट्यगृह मिळणार आहे.

नाशिक महापालिकेने शहरातील पंचवटी विभागात २१ कोटी रुपये खर्च करुन नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सध्या पंचवटी परिसरात पंडित पलुस्कर सभागृह आहे; मात्र त्यात व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत नाही. संपूर्ण शहरात कालिदास कलामंदिर हे एकमेव अद्यावत नाट्यगृह आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात भार असल्याने तो कमी करण्यासाठी पंचवटी विभागात नाट्यगृह असावे, यासाठी प्रशासनातर्फे महासभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. हे नाट्यगृह पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधील सर्व्हे क्रमांक २११ मध्ये सहा एकर जागेत प्रस्तावित केले आहे. या ठिकाणी ३१ हजार ५०० चौरस फूट बांधकाम करण्यात येणार आहे. या नाट्यगृहाच्या कामासाठी बांधकाम विषयक कामांसाठी ९ कोटी ८२ लाख ३ हजार १९० रुपये, साईट लेव्हलिंग व कंपाऊंडसाठी ३ कोटी ३८ लाख, ७७ हजार, ३०० रुपये, अॅकॉस्टीकच्या कामासाठी १ कोटी ४८ लाख ४२ हजार ५९० रुपये, स्टेजच्या कामासाठी ३१ लाख ९९ हजार ४०२ रुपये, इतर कामांसाठी ६ लाख, ५३ हजार ६३५ रुपये, आसन व्यवस्थेसाठी ५२ लाख ११ हजार ४२२ रुपये, फायर सेफ्टीसाठी ५२ लाख ४८ हजार ९८८ रुपये, विद्युत विषयक कामांसाठी ५ कोटी १८ लाख ४७ हजार २५ रुपये, टेस्टींग खर्चासाठी १ लाख ४१ हजार २०० रुपये तांत्रिक सल्लागार फीसाठी ५६ लाख ७५ हजार ३४ रुपये, असे एकूण २१ कोटी ८८ लाख ९९ हजार ७९१ रुपयांच्या कामाचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. या कामाला महासभेने मंजुरी दिल्यास नाशिकमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे अद्यावत नाट्यगृह साकारले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’ची जंम्बो कार्यकारिणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

परिवर्तन यात्रेनंतर राष्ट्रवादी काँग्रसने आपले लक्ष नाशिक लोकसभा मतदार संघावर केंद्रीत केले असून, त्यासाठी ३३ पदाधिकाऱ्यांची जंम्बो कार्यकारणी जाहीर करुन कार्यकर्त्यांना खूष केले आहे. माजी खासदार समीर भुजबळ व जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी ही कार्यकारणी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादीच्या या नव्या कार्यकारीणीत बारा उपाध्यक्ष, नऊ सरचिटणीस, चार चिटणीस, दोन संघटक तर चार कार्यकारिणी सदस्य आहेत. नाशिक लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या तीन विधानसभा अध्यक्षांसह शहर अध्यक्षांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आता उपाध्यक्ष पुंडलिक धर्मा साबळे, दत्तात्रय बाबुराव माळोदे, खंडेराव वाळूजी गायकवाड, अशोक केशवराव ठुबे, अरुण लक्ष्मण मेढे, नामदेव देवराम जाधव, विष्णू खंडू पोरजे, संतु रामचंद्र पाटील, दिपक विष्णू वाघ, सचिन पंडितराव पिंगळे, रतन दगडू जाधव, प्रल्हाद जाधव हे काम बघणार आहे.

सरचिटणीस म्हणून पांडुरंग त्र्यंबकराव वारुंगसे, दौलतराव पुंजाजी पाटील, रामदास केरू मालुंजकर, योगेश चिंधूजी निसाळ, रमेश सदाशिव जाधव, पांडुरंग लक्ष्मण काकड, दिलीपराव किसन कातकाडे, गोरख बलकवडे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. चिटणीस पदासाठी कल्पना संदीप बोंबले, साहेबराव रामभाऊ पेखळे, ईश्वरसिंग स्वरूप परदेशी, नामदेवराव दादाजी कसबे. संघटक म्हणून जयप्रकाश मधुकर गायकवाड, अॅड. भाऊसाहेब लक्ष्मण अदिक यांची नियुक्ती केली आहे. तर कार्यकारिणी सदस्य म्हणून मधुकर शिवराम पखाणे, सैय्यद मुख्तार इस्माईल, गोकुळ केशव बत्ताशे, योगेश शांताराम देवरगावकर हे जबाबदारी बघणार आहेत.

तालुका अध्यक्ष राजाराम धनवटे

नाशिक तालुका अध्यक्ष राजाराम धनवटे, कार्याध्यक्ष निवृत्ती कापसे, इगतपुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब गाढवे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर फोकणे, त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष बहिरू मुळाणे कार्याध्यक्ष हिरामण जाधव, सिन्नर तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ, देवळाली कॅम्प शहराध्यक्ष अॅड. बाळासाहेब कुष्णाजी आडके, कार्याध्यक्ष सागर गोडसे, प्रशांत कारभारी बच्छाव, सिन्नर शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष मनोज कान्नव, इगतपुरी शहराध्यक्ष वसिम सैय्यद हे काम बघणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा दिवसांमध्ये २६ लाखांची वसुली

0
0

हेल्मेटचा भुर्दंड पडला; सात हजार वाहनचालकांवर कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण पोलिस दलाने १ फेब्रुवारीपासून सुरू केलेल्या हेल्मेट सक्ती कारवाईदरम्यान जवळपास सात हजाराहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या वाहनचालकांकडून ६ फेब्रुवारीपर्यंत सुमारे २६ लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई अद्याप सुरू असून, यात प्रामुख्याने हायवे परिसरात कारवाईचा जोर दिसतो.

जिल्ह्यात दरवर्षी शेकडो वाहनचालकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडतात. यात दुचाकीस्वारांचा मोठा असतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी १५ दिवस जनजागृती देखील करण्यात आली. मात्र, यानंतरही नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना पोलिसांनी रडारवर घेतले. यासाठी पोलिस स्टेशन आणि वाहतूक शाखा यांचे संयुक्त पथके तयार करण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस अधीक्षक यांनीही ठिकठिकाणी नियम पाळणाऱ्या वाहनचालकाचा सत्कार केला. १ ते ६ फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यातील ४० पोलिस स्टेशन हद्दीतील प्रमुख रस्त्यावर ही कारवाई झाली. हेल्मेट न वापरणाऱ्या तीन हजार ६७६ दुचाकीस्वारांकडून १८ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर, ट्रिपलशीट, सीटबेल्टकडे दुर्लक्ष, ओव्हरलोड, जास्त प्रवाशी वाहतूक अशा वेगवेगळ्या नियमांचा भंग केल्या प्रकरणी तीन हजार ६६३ वाहनचालकांवर कारवाई झाली. यातून सात लाख ४३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सहा दिवसात ग्रामीण पोलिस दलाने सात हजार ३३६ वाहनचालकांकडून एकूण २५ लाख ८३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई यापुढे सुरूच राहणार असून, नागरिकांनी वाहतूक नियम पाळावेत, असे आवाहन ग्रामीण पोलिस दलाने केले आहे.

हायवेवर जोर

हायवेवर भरधाव वेगाने होणाऱ्या अपघातांची संख्या लक्षणीय आहे. त्यात गंभीर जखमी होणाऱ्या वाहनचालकांचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिस दलाने आपले लक्ष या हायवेकडेच केंद्रीत केल्याचे दिसते. इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे, पिंपळगाव, निफाड, लासलगाव, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, मनमाड, येवला शहर, चांदवड, सटाणा, वडनेर खाकुर्डी, मालेगाव तालुका या ठिकाणी शंभराहून अधिक दुचाकीस्वारांवर कारवाई झाली. तर, उर्वरित ठिकाणी हा आकडा शंभरच्या घरात आहे.

मालेगाव शहर दुर्लक्षित

मालेगाव शहरामध्ये काही ब्लॅक स्पॉट असून, त्या ठिकाणी सातत्याने होणाऱ्या अपघातांमध्ये नागरिकांचा जीव जातो. मात्र, १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेत मालेगाव शहराकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. मालेगावमध्ये रमजानपूरा (३२) पवारवाडी (३४), किल्ला (३७), छावणी (३७), कॅम्प पोलिस स्टेशन हद्दीत सर्वाधिक म्हणजे ६४ दुचाकीस्वारांवर कारवाई झाली. मालेगावात शहर पोलिस स्टेशन, आझादनगर आणि आयशानगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकही कारवाई झाली नाही.

..

विनाहेल्मेट कारवाईचा दणका

पोलिस स्टेशन.........दाखल केसेस

चांदवड............२२१

घोटी............१९३

इगतपुरी ..........१७७

वडनेर खाकुर्डी............१७७

निफाड............१६९

सटाणा............१५६

सिन्नर............१४१

मनमाड............१३९

मालेगाव जिल्हा वाहतूक ....१२२

त्र्यंबकेश्वर............१२१

येवला शहर............१२१

मालेगाव तालुका............१२०

लासलगाव............१२०

येवला शहर............११६

पिंपळगाव............१०४

वाडीवऱ्हे............१०३

मालेगाव शहर वाहतूक .......५३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलकांना आता शहरात ‘स्मार्ट बंदी’

0
0

पोलिसांनी परवानगी न देण्याचा घेतला पवित्रा

...

- जिल्हाधिकारी कार्यालय, जवळील अन्य शासकीय कार्यालय, आदिवासी विकास महामंडळ, जिल्हा परिषद येथे आंदोलनास बंदी

- आंदोलन कुठे करायचे अस्पष्ट, आंदोलकांपुढे अडचण

- ४ एप्रिल २०१९ पर्यंत संबंधित ठिकाणी आंदोलनास बंदी

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विविध संघटना व राजकीय पक्षांना आता पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय व त्या जवळील शासकीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यास परवानगी न देण्याचा पवित्रा घेतला आहे. त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ या दरम्यानच्या जुना आग्रा महामार्गावर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्त्याचे काम सुरू करण्याचे कारण त्यासाठी त्यांनी पुढे केले आहे. पण, स्मार्टरोडसाठी हा स्मार्टपणा दाखविताना मात्र आंदोलकांनी कुठे आंदोलन करायचे हा पर्याय न दिल्यामुळे आंदोलकांची अडचण वाढणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय तसेच, जवळील अन्य शासकीय कार्यालयाजवळ असलेल्या आदिवासी विकास महामंडळ, जिल्हा परिषद येथे आता आंदोलकांना आंदोलन करता येणार नाही. आंदोलक विविध मागण्यासाठी आपल्या संघटनेतर्फे, राजकीय पक्षातर्फे मोर्चे, निदर्शने, उपोषण, रॅली, सभा, मेळावे घेत असतात. आता या परिसरात आंदोलनांना पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी ४ एप्रिल २०१९ पर्यंत मुंबई फौजदारी प्रक्रिया संहितानुसार परवानगी नाकारली आहे.

...

पोलिसांचा कायदेशीर कारवाईचा इशारा

रस्त्याचे काम दीर्घ कालावधीसाठी चालणार असून, जाणारी-येणारी वाहतूक रस्त्याच्या एका बाजूस वळविण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारचे आंदोलन झाल्यास वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही परवानगी नाकारण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

..

पुन्हा गोल्फ क्लबचा आसरा

गेल्या काही दिवसांपासून आंदोलक गोल्फ क्लब मैदानावर आंदोलन करतात, तर काही जण येथून रॅली काढून ती जिल्हाधिकारी कार्यालयावर नेतात. पण, त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे आता पोलिसांनी कडक पवित्रा घेतला असून, त्यामुळे पुन्हा पर्याय म्हणून गोल्फ क्लबचे मैदानच आंदोलकांना आसरा ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरीवाला क्षेत्रासाठी लवकरच नियमावली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिका क्षेत्रात महापालिका प्रशासनाने फेरीवाला सर्वेक्षण करुन शहराच्या विविध भागात फेरीवाला क्षेत्र तयार केले असून, त्याची नियमावली तयार करण्यात आली आहे. ती नियमावली येत्या महासभेत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या २०१४ च्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक महापालिका क्षेत्रात फेरीवाला झोन तयार करणे बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार नाशिक महापालिकेने कार्यवाही केली. यातील बहुतांश क्षेत्रात वाद असल्याने त्याचे फेर सर्वेक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार वाद मिटवण्यात आले असून, काही ठिकाणे वगळता सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. या फेरीवाला झोनच्या वापराबाबत नियमावली तयार करण्यात आली असून, ती येत्या महासभेत ठेवण्यात येणार आहे. महासभेत मान्यता मिळाल्यानंतर ती राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात कार्यवाहीला सुरुवात होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images