Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

टागोर करंडक स्पर्धेत ‘होरायझन’ची आघाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रवींद्रनाथ विद्यालयाच्या वतीने आयोजित रवींद्रनाथ टागोर क्रिकेट चषक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी होरायझन अॅकॅडमीच्या संघाने आघाडी घेतली. द्वारका येथील रवींद्रनाथ विद्यालयात ही स्पर्धा सुरू आहे. तिसऱ्या दिवशीचा प्रथम सामना रवींद्रनाथ टागोर इंग्रजी मीडियम स्कूल विरुद्ध होरायझन अॅकॅडमी यांच्यात झाला. होरायझन अॅकॅडमीने प्रथम फलंदाजी स्वीकारत रवींद्रनाथ टागोर स्कूलपुढे १६४ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात रवींद्रनाथ टागोर संघ ४८ धावांत गारद झाला. सामनावीराचा किताब ९१ धावा व दोन बळी घेणाऱ्या होरायझनच्या आदित्य मोरेने पटकावला. रवींद्र विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज पिंगळे, बँकेचे व्यवस्थापक विकास झामटे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धर्मा पाटील प्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हा

$
0
0

धुळे ः जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्या वर्षी २८ जानेवारी २०१८ रोजी जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरणचे शेतकरी धर्मा पाटील यांनी मुंबईत मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी जाणीवपूर्वक वाढीव मूल्यांकन करीत बनावट कागदपत्राद्वारे सरकारची फसवणूक केल्याबाबत धुळे येथील तत्कालीन भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रतिभा सपकाळ, तत्कालीन तलाठी रोहिदास भटू खैरनार आणि साक्री तालुक्यातील कासारे येथील व्यक्ती दत्तात्रय जयदेव देसले यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत मंत्रालयात धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्मत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत चौकशी सुरू असताना शनिवारी (दि. २) धुळे जिल्ह्यातील तत्कालीन भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रतिभा सपकाळ, तत्कालीन तलाठी रोहिदास भटू खैरनार आणि साक्री तालुक्यातील कासारे येथील व्यक्ती दत्तात्रय जयदेव देसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संबंधित आधिकाऱ्यांनी धर्मा पाटील यांच्या गावातील गट क्रमांक २९०/३ मधील डाळींब फळ झाडांचे जाणीवपूर्वक वाढीव ९४ लाख ७१ हजार ५२१ रुपयांचे मूल्यांकन करून बनावट कागदपत्रे तयार केली होती. यामुळे त्यांनी सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारने धुळ्याचे अवर सचिव अ. ज. शेट्ये यांनी जिल्हाधिकारी यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने तपासअंती अखेर शनिवारी (दि. २) रात्री गुन्हा नोंद करण्यात आला असून, याप्रकरणी सर्व संशयितांची चौकशी करून सरकारला अहवाल सादर करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्याचे आदेशदेखील सरकारकडून देण्यात आल्याने तपास शिरपूर येथील उपपोलिस अधीक्षक संदीप गावीत करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन्यजीव चालताहेत ‘शहराची’ वाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या आसपास असलेल्या वन्यप्राण्यांच्या अधिवासातून भक्ष्याची कमतरता भासू लागल्याने वन्यजीव आता शहराची वाट चालू लागले आहेत. शहराच्या अनेक भागांतील शेतीमध्ये वन्यजीवांचा वावर दिसून येत असून, उपासमारीमुळे वन्यजिवांचा मृत्यू ओढावत असल्याचे समोर आले आहे. याला वन विभागानेही दुजोरा दिला असून, शहरातील लहान प्राणी व कचरा हे वन्यजिवांचे खाद्य झाल्याचे वन अधिकाऱ्यांचे मत आहे.

गोवर्धन शिवारातून शुक्रवारी रानमांजर भक्ष्याच्या शोधात मोतीवाला कॉलेज परिसरात आल्याचे आढळले. रानमांजराला भक्ष्य न मिळाल्याने त्याचा अखेरीस मृत्यू झाला. दहा ते पंधरा दिवसांपासून हे रानमांजर भक्ष्याच्या शोधात असल्याचे पशुवैद्यकीय अहवालात सांगण्यात आले. बिबट्यादेखील भक्ष्याच्याच शोधात शहराची वाट धरत आहे. आतापर्यंत गोवर्धन, मखमलाबाद शिवारातील पाच ते सहा कुत्री बिबट्याने फस्त केली आहेत. बिबट्या दिसल्याची ओरड होते; पण त्याच्या जोडीला रानमांजराप्रमाणे इतर वन्यजीवदेखील भक्ष्याच्या शोधात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वन विभागाचे मत आहे. शहराच्या बाहेर असलेल्या नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या वन्यजिवांच्या जैवसाखळीवर परिणाम होत आहे. त्यांना नैसर्गिक अधिवासात भक्ष्य किंवा खाद्य उपलब्ध होत नसल्याने ते शहरात येत आहेत, तसेच वन्यजिवांचा अधिवास संपत आल्याने त्यांनी आता शहराची वाट धरली असून, शहरातील भटकी कुत्री आणि उघड्यावरील कचरा त्यांचे खाद्य ठरत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, अनेकदा भक्ष्याच्या शोध त्या प्राण्यांना घेता येत नसल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. मृत्यू झालेला प्राणी शहरात असल्यास निदर्शनास येतो. मात्र, भक्ष्याच्या शोधात अनेकदा वन्यजीव शहरात येतात. त्यांना भक्ष्य मिळाल्यावर ते पुन्हा त्यांच्या अधिवासात जातात, असे वन विभागाने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी वन्यप्राणी दिसल्यास वन विभागाच्या १९२६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

\Bबदलते हवामानही कारण!\B

शहरातील तापमानात होणारे बदल ज्याप्रमाणे मानवी जीवनावर परिणामक ठरतात, अगदी त्याप्रमाणेच जंगलसदृश भागातही थंडीत वन्यजिवांना राहणे कठीण होते. त्यामुळे दमट किंवा थोड्या फार उष्ण हवमानाकडे येण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणून बहुतांश वेळा थंडीच्या काळात वन्यजीव शहरात आल्याचे दिसून येते, असे वन विभागाने सांगितले आहे.

रानमांजर, कोल्हा, बिबट्या हे भक्ष्याच्या शोधात शहराकडे येतात. शहरातील भटकी कुत्री, लहान प्राणी, कचरा हे त्यांचे खाद्य ठरते. जंगलसदृश भागात खाद्याची कमतरता भासू लागल्याने त्यांची उपासमार होत आहे. ते रानमांजर शुक्रवारी याच उपासमारीची शिकार ठरले.

- रवींद्र भोगे, वन परिक्षेत्र अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आणखी चार सिग्नल!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात नव्याने चार ट्रॅफिक सिग्नल्स बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कॉलेजरोड, विहितगाव, आणि शरणपूर रोडवरील जुने पोलिस आयुक्तालयासमोर हे सिग्नल्स लवकरच कार्यान्वित होतील. सातपूर- अंबड लिंकरोडवरील सिग्नल सुरू झाला आहे.

शहरातील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे सातत्याने वाहतूक कोंडीला समोरे जावे लागते. अर्थात यात बेशिस्त वाहनधारकांचा मोठा वाटा असतो. या पार्श्वभूमीवर सतत वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा सर्व्हे करून वाहतूक पोलिस त्या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल्स बसविण्याबाबत महापालिकेला प्रस्ताव सादर करतात. सध्या असे १८ नवीन प्रस्ताव महापालिकेला सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी चार ठिकाणी सिग्नल्स बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांनी सांगितले, की त्र्यंबकरोडवर नवीन सिग्नल बसविण्यात आला आहे. नाशिकरोड परिसरातील विहीतगाव आणि कॉलेजरोडवरील प्रिन्सीपल टी. ए. कुलकर्णी चौकात सिग्नल बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यापाठोपाठ शरणपूररोडवरील जुने पोलिस आयुक्तालयासमोरील चौकात सुद्धा सिग्नल्स बसविण्यात येणार आहे. वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नलपाठोपाठ स्पीड ब्रेकर्स, कॅटआय, दिशादर्शक फलक बसविण्यात येतात. स्पीड ब्रेकरबाबत वाहतूक समोर आलेल्या २७१ पैकी ६९ ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्यात आले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तर, १७७ ठिकाणी कॅटआय आणि दिशादर्शक फलक लावण्यात आले होते. आजमितीस शहरात प्रमुख रस्त्यांवर तसेच राष्ट्रीय महामार्गावर ४८ सिग्नल कार्यान्वीत असून, यापैकी राष्ट्रीय महामार्गावरील सात सिग्नल हे बिंल्करमोडवर असतात. शहरातील रस्त्यांवर वर्षागणिक ट्रॅफिक सिग्नल्सची संख्या वाढते आहे. त्र्यंबक नाका ते पपया नर्सरी या अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतरात सहा सिग्नल्स असून, दोन प्रस्तावीत आहेत.

--

सद्यस्थितीत सुरू सिग्नल्स-३९

ब्लिंकर मोडवरील महामार्गावरील सिग्नल्स-७

ब्लिंकरमोडवरील शहरातील सिग्नल्स-३

बंद सिग्नल्स-३

एकूण सिग्नल्स-४८

नवीन बसवण्यात येणारे सिग्नल्स-४

प्रस्तावीत सिग्नल्स-१४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-कल्याण लोकल लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांना चातकासारखी प्रतीक्षा असलेली नाशिक-कल्याण लोकल चेन्नईच्या रेल्वे कारखान्यातून मुंबईच्या कुर्ला कार्यशाळेत दाखल झाली असून गाडीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. ही बहुप्रतिक्षीत लोकल चालू महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात नाशिककरांच्या सेवेत रुजू होईल. सामान्यांबरोबरच शेतकरी, उद्योजक आणि विद्यार्थी वर्गाला ही लोकल वरदान ठरणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

ज्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी ही लोकल वरदान ठरणार आहे. गाडीचे दोन डबे सामानाचे असतील. त्यामधून नाशिकचे शेतकरी ताजा शेतीमाल मुंबईला पाठवू शकतील. सध्या खासगी वाहनांतून मुंबईपर्यंत शेतीमाल पाठवण्यासाठी किमान हजार रुपये खर्च येतो. तज्ज्ञांच्या मते, या लोकलमुळे खर्च १० टक्क्यांवर येईल. या लोकलमधून घोटी, अस्वली, इगतपुरी ये ठिकाणचे आदिवासी विद्यार्थी नाशिक तसेच मुंबईत जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकतील. त्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागेल असा विश्वास व्यक्त होत आहे. नाशिक-कल्याणबरोबरच पुणे-कल्याण लोकलही सुरू होणार आहे. त्यामुळे पुण्याला जाणेही नाशिककरांना सोपे होणार आहे.

१० ते १३ फेब्रुवारीदरम्यान, कसारा आणि लोणावळा घाटात या लोकलच्या चाचण्या होतील. चाचणी अहवाल मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक डी. के. शर्मा व सुरक्षा आयुक्त जैन यांना सादर केला जाईल. त्यानंतर उदघाटनाची तारीख जाहीर केली जाणार आहे. नाशिक-कल्याणच्या तीन लोकल तयार ठेवल्या जातील. नाशिककरांचा प्रतिसाद पाहून गाडीची वेळ व फेऱ्या यांचा निर्णय होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएलओंकडून नागरिकांची दिशाभूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) अशी नोंदणी करू पाहणाऱ्यांना पिटाळून लावत असल्याचे प्रकार जिल्ह्यात घडू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठीची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यामुळे आता या निवडणुकीनंतरच मतदार नोंदणी होईल, अशी दिशाभूल करणारी माहिती नागरिकांना दिली जात असल्याचे प्रकार जिल्ह्यात घडू लागले आहेत.

लोकशाही व्यवस्थेने भारतीयांना मतदानाचा अधिकार प्रदान केला आहे. हा अधिकार बजावण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारी कोणतीही व्यक्ती निवडणूक आयोगाकडे मतदार नोंदणी करू शकते. अधिकाधिक मतदारांची नोंदणी व्हावी आणि अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करावी, याकरिता भारत आणि राज्य निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार पुनरीक्षण मोहीम जिल्हाभर राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसादही मिळाला. त्यामुळे गत निवडणुकांनंतर आतापर्यंत सुमारे दोन लाख मतदार वाढल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. यामध्ये पहिल्यांदाच मतदानाची संधी मिळणार असलेल्या युवा मतदारांची संख्याच सुमारे ५७ हजार आहे. लोकसभा निवडणुकीसाठीची अंतिम मतदारयादी गुरुवारी (३१ जानेवारी) प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, या यादीचा आधार घेत बीएलओ नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचे प्रकार शहरात घडू लागले आहेत. लोकसभेसाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, ही निवडणूक झाल्यानंतरच मतदार नोंदणी करता येईल, असे नागरिकांना सांगितले जात आहे. खरे तर मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. नागरिक आपापल्या तहसील क्षेत्रातील निवडणूक शाखेत आवश्यक ती कागदपत्रे सादर करून कधीही मतदार नावनोंदणी करू शकतात. याशिवाय निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल (www.nvsp.gov.in) या वेबसाइटवर जाऊनही नागरिक मतदार नोंदणी करू शकतात. मात्र, ही माहिती न देता निवडणुकीनंतर मतदार नोंदणी करता येईल असे सांगत बीएलओंकडून जबाबदारी झटकली जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मा पाटील प्रकरणात तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा

$
0
0

तपास जलदगतीने करण्याच्या सूचना

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जमिनीच योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्यावर्षी दि. २८ जानेवारी २०१८ रोजी मुंबई मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी केला होता. या प्रकरणी जाणीवपूर्वक वाढीव मुल्यांकन करीत बनावट कागदपत्राद्वारे सरकारची फसवणूक केल्याबाबत धुळे येथील तत्कालीन भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रतिभा सपकाळ, तत्कालीन तलाठी रोहिदास भटू खैरनार आणि साक्री तालुक्यातील कासारे येथील व्यक्ती दत्तात्रय जयदेव देसले यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई मंत्रालयात धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्मत्येचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याबाबत चौकशी सुरू असताना शनिवारी (दि. २) धुळे जिल्ह्यातील तत्कालीन भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रतिभा सपकाळ, तत्कालीन तलाठी रोहिदास भटू खैरनार आणि साक्री तालुक्यातील कासारे येथील व्यक्ती दत्तात्रय जयदेव देसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संबंधित आधिकाऱ्यांनी धर्मा पाटील यांच्या गावातील गट क्रमांक २९०/३ मधील डाळींब फळ झाडांचे जाणीवपूर्वक वाढीव ९४ लाख ७१ हजार ५२१ रुपयांचे मूल्यांकन करून बनावट कागदपत्रे तयार केली होती. यामुळे त्यांनी सरकारची फसवणूक केल्याप्रकरणीदोंडाईचा पोलिस ठाण्यात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारने अवर सचिव अ. ज. शेट्ये यांनी जिल्हाधिकारी धुळे यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने तपासअंती अखेर शनिवारी (दि. २) रात्री गुन्हा नोंद करण्यात आला असून, या प्रकरणी सर्व संशयितांची चौकशी करून सरकारला अहवाल सादर करण्यात येणार आहे. तर या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्याचे आदेशदेखील सरकारकडून देण्यात आल्याने तपास शिरपूर येथील उपपोलिस अधीक्षक संदीप गावीत हे करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकरांचे विचार आवश्यक

$
0
0

स्वा. सावरकर साहित्य संमेलनात दिलीप करंबळेकर यांचे मत

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सावरकरांनी हिंदू राष्ट्राबरोबरच सुबकतेसंदर्भातही विचार मांडले आहेत. संपूर्ण जग भारताकडे महासत्ता आर्थिक महासत्ता होर्इल या आशेने पाहत असून, त्यासाठी देशाला आजही सावरकरांनी मांडलेल्या विचारांची गरज असल्याचे मत दिलीप करंबेळकर यांन व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबर्इ सावरकर दर्शन प्रतिष्ठान, धुळे एज्युकेशन सोसायटी यांच्या विद्यमाने धुळ्यात दोन दिवसीय अखिल भारतीय स्वा. सावरकर साहित्य संमेलन भरविण्यात आले होते. या संमेलनाचा समारोप रविवारी (दि. ३) सायंकाळी मराठी विश्वकोश महामंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावरकरांची भूमिका साकारणारे कलावंत शैलेंद्र गौड, संमेलनाचे स्वागताध्यक्ष रवी बेलपाठक, विनोद पवार, सावरकर प्रतिष्ठानचे रवींद्र साठे, भिकूजी इदाते, संतोष अग्रवाल, हर्षल विभांडिक आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विष्णू जाधव यांच्या ‘ने मातृभूमी’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

भारताने सक्षम होणे गरजेचे
याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना दिलीप करंबेळकर यांनी सांगितले की, संमेलन खऱ्या अर्थाने यशस्वी झाले कारण इतर संमेलनाप्रमाणे याठिकाणी केवळ गर्दी नव्हती तर दर्दीची उपस्थिती होती. चीनची आक्रमकता पाहता इतर देश भारताकडे आशेने पाहत आहे. त्यासाठी भारताने सक्षम होणे गरजेचे झाले आहे. हेच विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडले होते, असे करंबळेकर म्हणाले. स्वा. सावरकर यांनी दुसऱ्यावर आपला प्रभाव पाडण्यासाठी देशाचे लष्कर सक्षम व्हावे असे विचार मांडले होते. काही वर्षांपूर्वी विकसनशील देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा विकसित देशाचा नकारात्मक होता. मात्र, आजच्या काळात आर्थिक सुबकतेसंदर्भात लोकसंख्या प्रभावी घटक ठरत असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पसंख्याकसाठी प्रस्ताव मांडणार

$
0
0

आमदार एकनाथ खडसे यांचे बारी समाजाला आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

बारी समाज ओबीसीमध्ये गणना होत असली तरी आजही इतर समाजांच्या तुलनेत बारी समाज मागासलेला आहे. त्यामुळे या समाजाच्या प्रगतीसाठी अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देणे गरजेचे असून, यासाठी विधानसभेत प्रस्ताव मांडणार, असे आश्वासन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी समस्त बारी समाजबांधवांना दिले.

शहरातील शिरसोली रस्त्यावर सकल बारी समाज विकास परिषदेतर्फे रविवारी (दि. ३) अखिल भारतीय बारी समाजाच्या १०० व्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री रामदास बोडके, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार शिरीष चौधरी, ‘नाळ’ चित्रपटातील बालकलाकार चैत्या उर्फ श्रीनिवास पोकळे, बारी समाजाचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अनुप बारी यांच्यासह उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशसह राज्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अधिवेशनाच्या खास वैशिष्ट म्हणजे या अधिवेशनात समाजातील महिलांचीदेखील लक्षणीय उपस्थिती होती. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिला व युवकांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

देशासाठी मोठे योगदान
एकनाथ खडसे म्हणाले, बारी समाज संपूर्ण भारतात अनेक पोटजातींमध्ये विखुरला असून, या समाजाचे देशासाठी मोठे योगदान आहे. तसेच रुपलालजी महाराज यांनीदेखील समाजासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे. सरकारने रुपलालजी महाराज यांना राष्ट्रसंताचा दर्जा देण्याची गरज आहे. यासाठी विधानसभेत प्रस्ताव मांडण्यात येईल. तसेच मुख्यमंत्र्यांसह सरकारच्या कोणत्याही मंत्र्यांशी याबाबत बोलून निर्णय घेण्याची मागणी करणार, असेही त्यांनी सांगितले. समाजबांधवांनी एकत्र येण्याची गरज असून, पोटजातींमध्ये ‘रोटी-बेटी’ व्यवहार व्हावा यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असेही खडसे म्हणाले.

‘एक बारी, सब पे भारी’
बारी समाजाने प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली असून, ‘एक बारी, सब पे भारी’ हे वाक्य सार्थ ठरवले असल्याचेही खडसे यांनी सांगितले. समाजातील युवक देखील स्पर्धा परीक्षेत यश मिळवत असून, समाजातील मुलींनी देखील आता पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक अधिवेशनाचे कार्याध्यक्ष मनोज बारी यांनी केले.

राजकीय फटकेबाजी
डॉ. उल्हास पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भविष्यात राज्यामध्ये आमचेच सरकार येणार असल्याने बारी समाजाची मागणी आम्ही पूर्ण करू. त्यांच्या भाषणादरम्यानच एकनाथ खडसे यांनी उल्हास पाटलांनी उद्देशून ‘आधी तुमचे फाइनल करा’ असे सांगितले. त्यांच्या वक्तव्यावर अधिवेशनात चांगलाच हशा पिकलेला पहायला मिळाला. त्यानंतर डॉ. उल्हास पाटील म्हणाले सरकार कोणाचेही येवो, मात्र बारी समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, रुपलालजी महाराज यांना राष्ट्रसंताचा दर्जा मिळवून देण्यासाठीदेखील प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. पाटील म्हणाले. दरम्यान, ‘नाळ’ चित्रपटातील ‘चैत्या’ श्रीनिवास पोकळे याला पाहण्यासाठी चिमुकल्यांनी मोठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किमान तापमान चार अंशांनी वाढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातून थंडी हळू हळू गायब होत आहे. सोमवारी किमान तापमानात चार अंशांनी वाढ होऊन ते १७.४ अंशांवर पोहोचले.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असून, ते नागरिकांच्या आरोग्यासाठीही त्रासदायक ठरू लागले आहेत. २९ जानेवारी रोजी निफाडमध्ये चार तर नाशिकमध्ये सात अंशांपर्यंत घसरलेले किमान तापमान दिवसगाणिक वाढण्यास सुरुवात झाली. ३० जानेवारी रोजी ७.६ तर ३१ जानेवारी रोजी हेच तापमान ८.६ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. परंतु, त्यात टप्प्या टप्प्याने वाढत जाऊन रविवारी १३.२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. सोमवारी त्यात आणखी ४.२ अंश सेल्सियसने वाढ झाली. त्यामुळे हे तापमान १७.४ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने थंडी गायब होऊ लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान असून त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी उद्भवू लागल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेश्या व्यवसायास प्रवृत करणारे दोघे ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुना गंगापूर नाका परिसरातील आनंदकुंज अपार्टमेंट या इमारतीमध्ये चालविल्या जाणाऱ्या वेश्या व्यवसायावर सरकारवाडा पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आलेल्या तीन तरुणींची येथून सुटका करण्यात आली असून, एका महिलेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षक योगिता नारखेडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. जुना गंगापूर नाका परिसरातील आनंद कुंज अपार्टमेंटमध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दुपारी चार वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी राजू वैजनाथ यादव (वय २८, रा. भगवती अपार्टमेंट, तिवंधा चौक) याच्यासह आणखी एका संशयित महिलेला ताब्यात घेतले. वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आलेल्या तीन तरुणींची आरोपींपासून सुटका करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदन्यासात हरखले नाशिककर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ताल तीन तालात रंगलेला पदन्यास, विविध गीतांवर नर्तिकांनी धरलेला ठेका, कथकच्या मनभावन हालचाली अशा माहोलमध्ये परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पदन्यास रंगला. रिदम डान्स अॅण्ड म्युझिक अॅकॅडमी यांच्या विद्यमाने 'नृत्यार्पण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील पदन्यास पाहताना नाशिककर हरखून गेले होते.

यावेळी गुरू डॉ. सुचित्रा हरमालकर यांनी नृत्य सादरीकरण केले. देवीस्तुती, ताल तीन तालात राजा चक्रधर सिंह रचित रायगड घराण्याच्या बंदिशी यावेळी हरमालकर यांनी सादर केल्या. भाव अभिनयात बिन्दादिन महाराज यांची ठुमरी 'डगर चलत' ही त्यांनी भावाभिनयातून प्रस्तुत केली. याचवेळी नृत्यांगना शिल्पा सुगंधी यांचेही नृत्य सादरीकरण झाले. त्यांच्या शिष्यांनी तराना, होरी, मधुराष्ट्क यावर नृत्य केले. सुगंधी यांनी द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग नृत्यातून सादर केला. गणेशवंदना, म्युझिकल पिसेस, त्रिताल रंगमंच, गत भाव, परफॉर्मन्स आदी सादर करण्यात आले. तबल्यावर संगीता अग्निहोत्री, स्वर : मयंक स्वर्णकर, पढंत : शाश्वती हरमालकर, तर संवादिनीवर पु्ष्कराज भागवत यांनी साथसंगत केली. सुगंधी यांना तबल्यावर गौरव तांबे, बासरीवर मोहन उपासनी, कीबोर्डवरवर अनिल धुमाळ यांनी साथसंगत केली. प्रकाश व ध्वनी योजना तुषार बागूल यांची होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना मदत सरसकट नव्हे, तत्त्वत:च!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले असले तरी प्रत्येक शेतकऱ्याला या मदतीचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्जमाफी योजनेप्रमाणेच सरसकट आणि तत्त्वत: या प्रकारात ही योजना अडकणार असून, शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित ठेवण्याचा घाट तर सरकारने घातला नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे. दोन हेक्टरपेक्षा कमी सामायिक क्षेत्रासाठीही सहा हजार रुपयेच मिळणार असल्याने खातेफोड न झालेले लाखो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत, शिवाय या योजनेमुळे शेतकरी कुटुंबात तंटे वाढून एकत्र कुटुंब पद्धतीलाच सुरुंग लागण्याची भीतीही शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीतील गुंतागुंत कायम असताना, आता केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. दोन हेक्टरपेक्षा (पाच एकर) कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, असे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे; परंतु या योजनेतही अटी टाकण्यात आल्याने सरसकट सर्वांनाच योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सामायिक गट असेल, तर त्या सर्वांना मिळून वर्षाकाठी सहा हजार रुपयेच मदत दिली जाणार आहे. या सर्वांनी खातेफोडद्वारे जमिनीची विभागणी केलेली असेल तर प्रत्येकी सहा हजार रुपये लाभ त्यांना मिळू शकेल. अजूनही अनेक शेतकरी कुटुंबांचे सामायिक क्षेत्र असून, ते विभक्त राहत असले त्यांनी खातेफोड केलेली नाही. अशा कुटुंबाला सहा हजार रुपयेच मदत मिळणार असून, सातबाऱ्यावरील अन्य लाभार्थी या थेट मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ज्या खातेदारांचा उतारा १ फेब्रुवारीपूर्वीचा आहे अशांनाच चालू वर्षात सहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. एक फेब्रुवारीनंतर खातेफोड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील वर्षीपासून ही मदत मिळू शकेल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संबंधित शेतकऱ्याचा मृत्यू झाला व त्याच्या सज्ञान मुलांच्या नावांची सातबारा उताऱ्यावर नोंद झाली तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. कर्जमाफीच्या योजनेतही अटी-शर्तींमुळे अनेक शेतकरी प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहिले. यातून कौटुंबिक कलहही निर्माण झाले. केंद्र सरकारनेही शेतकरी सन्मान योजनेतून तत्त्वत: लाभ देण्याचे धोरण अवलंबल्याने कौटुंबिक कलह विकोपाला जाण्याची व यातून नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.

डाटाबेस तयार करण्याचे आव्हान

केंद्राच्या या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करता यावी याकरिता महसूल आयुक्त राजाराम माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन महसुली अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकरी कुटुंबांची यादी तयार करा, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. अशा शेतकऱ्यांचे बँक खाते, आधार नंबर, आयएफसी कोड, सातबारा उतारा आणि कुटुंबातील व्यक्तींची संख्या अशी सर्व माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे सहा हजार रुपये प्रत्येकी दोन हजार रुपये अशा तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केले जाणार आहे. एक डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी पहिला

हप्ता तीन हजार रुपयांचा दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची सर्व माहिती पुढील पंधरवाडयापर्यंत गोळा करून त्यात लाभार्थी कुटुंबांची संख्या २ हेक्टरपर्यंत मर्यादेतील एकूण क्षेत्र अशी आकडेवारी सादर करावी, असे आदेश माने यांनी दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा डाटाबेस तत्काळ तयार करण्याचे आव्हान यंत्रणेला पेलावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्याततरसाचा मृत्यू?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील डोंगराळे शिवारात मादी तरस मृतावस्थेत आढळल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. वनविभागाला सायंकाळी चारच्या सुमारास याची माहिती मिळताच वनपाल व्ही. एस. बोरसे, वनरक्षक ए. जी. शिंदे व डॉ. जावेद खाटिक यांच्यासह वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याच्या हल्ल्यात या तरसाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गाळणे वनपरिक्षेत्रात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून येत असला तरी तरस प्राण्याचा वावर तसा दुर्मिळ म्हटला जातो. सोमवारी डोंगराळे गावानजीक वनक्षेत्रात ही पाच वर्षाची मादी तरस मृतावस्थेत आढळून आली. डॉ. खाटिक यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या मादी तरसच्या मानेला व डोक्याला जबर मार मागला असून, खालचा जबडा तुटल्याचे त्यांनी सांगितले. तर शिंदे यांनी जंगलात बिबट्या किंवा अन्य प्राण्यासमवेत झालेल्या झटापटीत मादी तरस मृत पावली असावी असा अंदाज व्यक्त केला. वनविभागाच्या पथकाने पंचनाम करून जागेवरच डॉ खाटिक यांनी मादी तरसचे शवविच्छेदन केले. रात्री उशिरा लोणवाडे शिवरात मृत तरसचे दहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनर्स उतरले रस्त्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

इपीएफ पेन्शनर्सना साडेसहा हजार रुपये पेन्शन, महागाई भत्ता मिळावा तोपर्यंत कोशियारी कमिटीच्या शिफारशींप्रमाणे इंटरिम रिलीफ म्हणून तीन हजार रुपये पेन्शन महागाई भत्ता मिळावा, मोफत वैद्यकीय सेवा मिळावी या व इतर विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा इपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने सोमवारी निफाड तहसीलवर मोर्चा काढण्यात आला.

तहसीलजवळ मोर्चा आल्यानंतर सभा घेण्यात आली. याप्रसंगी राजू देसले, हंसराज वडघुले यांची भाषणे झाली. मोर्चेकऱ्यांच्या वतीने निफाडच्या तहसील अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महागाईचा विचार करता डॉक्टर कोशियारी कमिटीची शिफारसप्रमाणे तीन हजार रुपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता मिळणे आवश्यक आहे. आताच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद करण्यात आली नाही. या प्रसंगी जिल्हा पीएफ पेन्शन पेन्शनर्स फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, सुधाकर मोगल, शिवराम रसाळ, पंढरीनाथ काळे, लक्ष्मण काळे आदींसह पेन्शनर्स उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवलातील सहा जण तडीपार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येवला शहरातील सहा सराईत गुन्हेगारांना नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले. सराईतांविरूद्ध येवला आणि कोपरगाव तालुक्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

सचिन उर्फ नल्ला संजय पवार (रा. गंगादरवाजा, येवला), अजय उर्फ छोट्या प्रभाकर वाघ (रा. पिंपळगाव जलाल, ता. येवला) रंगनाथ उर्फ संपत युवराज भोरकडे (रा. पिंपळगाव जलाल, ता. येवला), सागर गुलाब पवार (रा. पारेगाव, ता. येवला), शंकर ज्ञानेश्वर कुमावत (रा. बाजीरावनगर, येवला) आणि संतोष उर्फ सोन्या बबन वाघचौरे (रा. पारेगाव, ता. येवला) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. संशयितांविरूद्ध येवला शहर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव पोलिस स्टेशनमध्ये घरफोडी, जबरीचोरी, लुटमार असे १५ गुन्हे दाखल आहेत. मागील तीन वर्षांपासून या टोळीने नाशिक अहमदनगर सीमाभागात उच्छाद मांडला. पोलिसांनी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र, या टोळीला त्याचा तिततकाचा परिणाम झला नाही. यामुळे मनमाडच्या सहायक पोलिस अधिक्षक रा. रागसुधा यांनी या टोळीविरूद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधिक्षक संजय दराडे यांना सादर केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुष्पोत्सवात स्पर्धात्मक प्रदर्शनाचे रंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तब्बल नऊ वर्षांच्या कालखंडानंतर महापालिकेच्या माध्यमातून येत्या २२ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पुष्प, वृक्ष, फळे, भाजीपाला यांचे स्पर्धात्मक प्रदर्शन मांडण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे आणि महापौर रंजना भानसी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेच्या पुष्पोत्सवासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्तांनी ही माहिती दिली. महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन पुन्हा एकदा फुलांनी बहरणार असल्याने नाशिककरांसाठी हा पुष्पोत्सव पर्वणीच ठरणार आहे. पुष्पोत्सवाच्या लोगोचे, तसेच फेसबुक पेजचे अनावरण महापौरांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत येत्या २२ तारखेला दुपारी साडेचार वाजता या पुष्पोत्सवाचे उदघाटन होणार आहे. पुष्पोत्सवांतर्गत विविध गटांत स्पर्धाही रंगणार असून, ७५ बक्षिसे दिली जाणार आहेत. विजेत्यांना मानांकनाची ट्रॉफीही दिली जाईल. पुष्पोत्सवाकरिता महापालिकेच्या अंदाजपत्रकात तब्बल ३० लाखांची तरतूद करण्यात आली होती. खासगी मक्तेदारामार्फत हे आयोजन केले जात असून, त्यासाठी २४ लाख ७५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अनिता दाते आणि महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली पुष्पोत्सवाचे उद्घाटन आणि विजेत्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती गमे यांनी दिली.

शरणपूररोडकडील महापालिका प्रवेशद्वाराच्या आत उजव्या बाजूस ३१ नर्सरी स्टॉल्स व स्टेज असेल. डावीकडे फूड स्टॉल्स असणार आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस महापालिका कर्मचारीनिर्मित परिसर प्रतिकृती असेल. मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावर गुलाब पुष्पे, पुष्परचना, कारंजा परिसर, शोभिवंत कुंड्या, दुसऱ्या मजल्यावर मोसमी व बहुवर्षीय फुले, गुलाब पुष्पे क गट, तिसऱ्या मजल्यावर फळे व भाजीपाल, हार-बुके, तिसऱ्या मजल्यावरील रेकॉर्ड हॉलमध्ये बोन्साय व कॅक्टसचे प्रदर्शन असेल. सर्व पुष्प व्यावसायिक, बगीचाप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनात सहभाग घेऊन विविध स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त प्रवेशिका देऊन प्रदर्शन यशस्वी करावे, असे आवाहन महापौर भानसी, आयुक्त गमे, उद्यान उपायुक्त शिवाजी आमले, कार्यकारी अभियंता महेश तिवारी, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य चंद्रकांत खाडे, डॉ. वर्षा भालेराव आदींनी केले आहे.

--

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

पुष्पोत्सवांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मोहन उपासनी प्रस्तुत 'वेणुनाद' हा कार्यक्रम होईल. दि. २३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रकाश भागवत प्रस्तुत 'हास्य विनोद' हा कार्यक्रम होईल. दि. २४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता मिसेस ग्लोबल युनायटेड लाइफ टाइम क्वीनच्या मानकरी डॉ. नमिता कोहक यांच्या हस्ते उर्वरित बक्षिसांचे वितरण, तसेच सायंकाळी ७ वाजता अनघा राजवाडे प्रस्तुत 'स्वरांजली' हा कार्यक्रम होईल.

--

या गटांत होणार स्पर्धा

पुष्पोत्सवांतर्गत गुलाब पुष्पे, कृत्रिम आच्छादनात वाढलेली गुलाब पुष्पे, मोसमी व बहुवर्षीय फुले (एकूण १५ प्रकार), कुंडीतील शोभेच्या वनस्पती (बोन्साय व कॅक्टस), पुष्परचना- खुला व शालेय गट, फळे व भाजीपाला (कच्च्या भाज्यांची सजावट), कुंड्यांची सजावट(परिसर प्रतिकृती व तबक उद्यान) अशा विविध गटांत स्पर्धां घेण्यात येणार आहेत. विविध कंपन्यांकडून बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीपी स्कीम नजरेच्या टप्प्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हरित क्षेत्र विकासाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मखमलाबाद, हनुमानवाडीतील स्मार्टनगर परियोजनेला (टीपी स्कीम) शेतकऱ्यांचा विरोध कमी करण्यासाठी कंपनीच्या वतीने तीन मॉडेलचे पर्याय समोर ठेवण्यात आल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ६०-४०, ५०-५० आणि ५५-४५ याप्रमाणे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठेवण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीअंतर्गत नाशिकमधील मखमलाबाद व हनुमानवाडीतील ७५४ एकर क्षेत्रात स्मार्ट नगर परियोजना राबविण्यात येणार आहे. परंतु, स्थानिक शेतकऱ्यांनी या स्कीमला विरोध केल्यानंतर कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना गुजरातमधील अहमदाबादचा अभ्यास दौरा करण्यात आला होता. या ठिकाणी जमीन वाटपाचा फॉर्म्युला ६०-४० असताना नाशिकमध्ये ५०-५० टक्के जागा वाटप केले जाणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेलाच विरोध केला होता. एफएसआयबाबतचेही धोरण स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांनी या योजनेलाच खो घातला आहे. कंपनीकडून सुरू असलेले सर्वेक्षणही बंद पाडले आहे. शेतकऱ्यांनी जागावाटप सूत्र, बेटरमेंट चार्जेस, अॅमिनिटी चार्जेस, आर्थिक दुर्लभ घटकांसाठी देण्यात येणाऱ्या १० टक्के जमिनीच्या वादाबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले होते. त्याशिवाय सर्वेक्षणाला नकार दिला होता. अखेर कंपनीनेही याबाबत नरमाईची भूमिका घेतली असून, आता शेतकऱ्यांसमोर तीन पर्याय ठेवले आहेत. त्यापैकी एका पर्यायाची निवड शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. राज्यातील नागपूर, कल्याण व पुणे येथे राबवल्या जात असलेल्या टीपी स्कीमचा अभ्यास करून नाशिकसाठी प्रस्ताव तयार केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासंदर्भात लवकरच शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्यासमोर हे तीनही पर्याय ठेवले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी एका पर्यायाची निवड केल्यानंतर महापालिका आणि राज्य सरकारसमोर हे पर्याय ठेऊन त्याला अंतिम रूप मिळणार आहे.

अतिरिक्त एफएसआयचा लाभ

टीपी स्कीमसाठी असलेल्या तीन पर्यायांमध्ये बेसिक एफएसआय हा १.१ वरून थेट २ ते ३ पर्यंत वाढवून मिळणार आहे. विशेष म्हणजे हा एफएसआय शेतकऱ्यांना या टीपी स्कीमसोबत शहरात कुठेही विक्री करता येणार, असा पर्याय ठेवण्यात आला आहे. शहरातील एफएसआय आणि टीडीआर हा या टीपी स्कीममध्ये वापरता येणार आहे. गोदावरी पात्रालगत असलेल्या जमिनींना सध्या ०.१० इतकाच एफएसआय वापरण्यास मिळतो. या योजनेत संबंधित शेतजमीन ताब्यात घेऊन जागामालकांना अन्यत्र जागा दिली जाणार असल्यामुळे त्यांनाही वाढीव एफएसआयचा लाभ मिळेल, असाही दावा गमे यांनी केला.

आरक्षणे होणार मुक्त

सध्या ज्यांच्या जमिनीवर आरक्षणे आहेत, ती या तीन पर्यायांमध्ये मुक्त होणार आहेत. सध्याच्या रहिवासी वस्ती वगळण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात अध्यक्षांशी चर्चा सुरू असून रहिवासी वस्ती वगळता येईल काय, त्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. मोरे मळ्यातील नागरिकांना यातून दिलासा मिळणार असून, जेथे अस्तित्वातील घरे पाडून नवीन घरे बांधण्याचा खर्च येईल, तेथे मात्र त्या घरांना दिलासा देण्याचाच प्रयत्न राहणार आहे.

अशी आहेत मॉडेल

६०-४० सूत्र

शेतकऱ्यांना ६० टक्के जागा परत मिळणार

१.१ एफएसआय ऐवजी २ बेसिक एफएसआय मिळणार

पालिकेला प्रीमियम दिल्यास एफएसआय ३ पर्यंत मिळेल,

बेटरमेंट चार्जेस द्यावे लागणार

अॅमिनिटी स्पेस द्यावी लागणार

आर्थिक दुर्बल घटकांसाठी ५ टक्के जागा द्यावी लागेल

५० ५० सूत्र

शेतकऱ्यांना ५० टक्के जागा परत मिळणार

एफएसआय ३ मिळणार

बेटरमेंट चार्जेस लागणार नाहीत

अॅमिनिटी स्पेस देण्याची गरज नाही

आर्थिक दुर्लभ घटकांसाठी जागा सोडण्याची गरज नाही

एफएसआय शहरात कुठेही वापरता किंवा विकता येणार.

५५-४५ सूत्र

शेतकऱ्यांना ५५ टक्के जागा परत मिळणार

एफएसआय २.५ पर्यंत मिळणार

बेटरमेंट चार्जेस लागणार नाहीत

अॅमिनिटी स्पेस देण्याची गरज नाही

आर्थिक दुर्लभ घटकांसाठी जागा सोडण्याची गरज नाही

एफएसआय कुठेही वापरता अथवा विकता येणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-कल्याण लोकल ठरणार वरदायी

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, जेलरोड

नाशिककरांना चातकासारखी प्रतीक्षा असलेली नाशिक-कल्याण लोकल चेन्नईच्या रेल्वे कारखान्यातून मुंबईच्या कुर्ला वर्कशॉपमध्ये दाखल झाली आहे. तेथे गाडीवर अखेरचा हात फिरविला जात असून, फेब्रुवारीच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात ती नाशिककरांच्या सेवेत रुजू होईल. ही लोकल विविध समाजघटकांसाठी वरदायी ठरणार आहे.

गाडीच्या दोन राखीव डब्यांमार्फत नाशिकचे शेतकरी ताजा शेतमाल मुंबईला पाठवू शकतील. सध्या खासगी वाहनांतून मुंबईपर्यंत शेतमाल पाठविण्यासाठी किमान हजार रुपये खर्च येतो. तज्ज्ञांच्या मते या लोकलमुळे तो शंभरापर्यंत येईल. परिणामी शेतकऱ्यांना मोठा नफा मिळू शकणार आहे. या लोकलमधून घोटी, अस्वली, इगतपुरीचे आदिवासी विद्यार्थी नाशिक-मुंबईत जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकतील. त्यामुळे सामान्यांबरोबरच शेतकरी, उद्योजक आणि विद्यार्थिवर्गाला ही लोकल वरदान ठरणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

पैसा आणि वेळेची बचत

नाशिक-कल्याण एसटीचे भाडे सव्वाशे रुपयांपर्यंत आहे. लोकलचे तिकीट सुमारे साठ रुपये राहील. पंचवटी, गोदावरी, राज्यराणी गाड्यांमध्ये जागेवरून प्रवाशांचे दररोज वाद होतात. या लोकलमुळे या गाड्यांवरील ताण कमी होईल. लांबपल्ल्याच्या प्रत्येक गाडीच्या आरक्षणात वाढ होऊन रेल्वेचा महसूलही वाढू शकेल. शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक, नोकरदार अशा सर्वांनाच ही लोकल वरदान ठरणार आहे. नाशिक-कल्याणबरोबरच पुणे-कल्याण लोकल सुरू होणार आहे. त्यामुळे पुण्याला जाणे नाशिककरांना सोपे होईल. नाशिक-कल्याणदरम्यानच्या गावांचा विकास होऊन रोजगार, व्यवसायाला चालना मिळेल. दळणवळणाचे नवे साधन उपलब्ध झाल्याने महामार्गावरील कोंडी कमी होऊन अपघातही टळतील. दि. १० ते १३ फेब्रुवारीदरम्यान कसारा आणि लोणावळा घाटांत या लोकलच्या चाचण्या होतील. चाचणी अहवाल मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक डी. के. शर्मा व सुरक्षा आयुक्त जैन यांना सादर केला जाईल. त्यानंतर उद्घाटनाची तारीख जाहीर केली जाणार आहे. नाशिक-कल्याणच्या तीन लोकल तयार ठेवल्या जातील. नाशिककरांचा प्रतिसाद पाहून गाडीची वेळ व किती फेऱ्या याचा निर्णय होईल.

पंधरापैकी तीन सूचना मान्य!

पतंप्रधान नरेंद्र मोदींनी २०१६ मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिल्लीत विकास शिबिर घेतले होते. तुम्ही एक दिवस रेल्वेमंत्री झाल्यास राष्ट्रासाठी काय कराल, अशी स्पर्धा घेतली. त्यामध्ये नाशिकचे रेल्वे इंजिनतज्ज्ञ वामनराव सांगळे यांनी पंधरा सूचना मांडल्या. त्यातील नाशिक-कल्याण लोकलसह तीन मान्य झाल्या. खासदार गोडसे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लोकलसाठी पाठपुरावा केला. रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांसाठी स्वच्छतागृहे सक्तीची असतात. लोकलचे अंतर १३० किलोमीटरचे असेल, तर ही सक्ती नाही. नाशिक-कल्याण अंतर १३० किलोमीटर आहे. त्यामुळे गाडी या दोन शहरांदरम्यानच धावेल. त्यापुढे धावणार नाही.

--

बारा डबे अन् अडीच तास... (स्वतंत्र चौकट)

कल्याण-नाशिक लोकल बारा डब्यांची आहे. नाशिक-कल्याण प्रवास ती अडीच तासांत पूर्ण करेल. गाडीचा वेग ताशी शंभर किलोमीटर राहील. तीन कोचेस मिळवून एक युनिट असेल. प्रत्येक युनिटमध्ये एक इंजिन असेल. महिला राखीव दोन, दिव्यांगांना एक, लगेजचे दोन, तीन फर्स्ट क्लास डबे आहेत. गाडीचा वेग ताशी शंभर किलोमीटर आहे. घाटात तो साठ किलोमीटर असेल. गाडीची क्षमता अठराशे प्रवाशांपर्यंतची आहे. अडीच तासांत ती कल्याणला पोहोचेल. मुंबईतील लोकलसेवेसाठी आता बम्बार्डियर या आधुनिक गाड्या वापरण्यास सुरुवात झाली आहे. आकर्षक व मॉडर्न कोच, उत्तम सुरक्षा, अॅटोमॅटिक ब्रेक आदी बम्बार्डियरची वैशिष्ट्ये आहेत. नाशिक-कल्याण लोकलही याच प्रकारातील असल्याची माहिती मुख्य लोको नियंत्रक वामन सांगळे यांनी दिली. राजधानी एक्स्प्रेसप्रमाणे या लोकलला पुश-पुल तंत्र वापरले आहे. कसारा ते इगतपुरीदरम्यान पंधरा किलोमीटरचा घाट असून, या घाटाला सहा बोगदे आहेत. पहिला बोगदा पार करण्यासाठी या लोकलला एक मिनीट पाच सेकंद लागतील, तर इतर बोगदे पार करण्यासाठी पंधरा ते सतरा सेकंद लागतील. मात्र, तरीही सुरक्षेचा निकष म्हणून मागे बॅँकर इंजिन जोडण्यात येईल. नवीन तंत्रामुळे इगतपुरी, कसाऱ्यात गाडीला बॅँकरसाठी थांबावे लागणार नाही. त्यामुळे गाडीचा वेग मंदावणार नाही आणि अपघातही टळतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संग्रहासाठी टपाल तिकिटे मिळणार ‘ऑनलाइन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टपालाची विविध तिकिटे संकलित करणे हा अनेकांचा छंद असतो. आता हा संग्रह 'अॅप' स्वरुपातही उपलब्ध झाला असून, एका क्लिकवर जुनी टपाल तिकिटे खरेदी करता येणार आहेत. याशिवाय संग्राहकांची माहिती मिळवणे या अॅपमुळे सोपे झाले आहे.

टपाल तिकिटांच्या संग्रहाचे अनेक फायदे असून, टपाल विभागही आता ऑनलाइन कामकाज करण्यास प्राधान्य देत आहे. त्यानुसार देशासह जगातील टपाल संग्राहकांना एकत्र जोडण्यासाठी 'इंडियन फिलेटेली डायजेस्ट' अॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. याद्वारे टपाल तिकिटे संकलित करण्याचा छंद असलेल्यांना, एका क्लिकवर टपाल तिकिटांची संपूर्ण माहिती घेणे सोपे झाले आहे. या अॅपमध्ये संग्राहकांची माहिती, संग्रह मंडळे, टपाल तिकिटे विक्री करणाऱ्यांची माहिती, ब्युरो, टपाल तिकिटांवरील लेख, टपाल तिकिटांच्या प्रदर्शनाची संपूर्ण माहिती उपलब्ध होते. सध्या एक हजारांहून अधिक संग्राहक हे अॅप वापरत असून, टपाल विभागाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या प्रदर्शनात त्याची माहिती दिली जात आहे. त्यासोबतच हे अॅप फेसबुक, ट्विटरला लिंक असल्याने, त्यावरही अपडेट मिळवता येतात. अॅपमध्ये दिलेल्या संपर्क क्रमांकांद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहणे संग्राहकांना शक्य झाले आहे. या अॅपमुळे टपाल तिकीट संग्राहकांची संख्या वाढेल, याबरोबरच जुन्या तिकिटांचा ठेवा जतन होईल, अशी अपेक्षा टपाल विभागाकडून व्यक्त होत आहे.

\Bवेबसाइटवर माहिती\B

टपाल संग्राहकांची माहिती https://www.indianphilately.net या वेबसाइटवरदेखील आहे. अॅप व वेबसाइटचा लाभ घेण्यासाठी खाते तयार करावे लागते. त्यानंतर टपाल तिकिटांचा इतिहास, माहिती, संग्रहकांची माहिती व इतर सुविधांचा लाभ घेता येतो.

टपाल तिकिटे वेबसाइटद्वारे मागवता येतात. टपालाने ही तिकिटे घरी येतात. त्यामुळे एका क्लिववर तिकिटांच्या माहितीसह खरेदी करणे अतिशय सोपे झाले आहे. टपाल तिकिटांचा ठेवा या सुविधेमुळे जगभरात पोहोचण्यास मदत होते आहे.

- विनय शिंत्रे, टपाल तिकिट संग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>