केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री सिंह यांचे स्पष्टीकरण म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबमुळे नाशिक हे विकासाचे केंद्र होईल. आसपासच्या उद्योजकांना फायदा होईल. नवीन इलेक्ट्रिकल उद्योग येथे येतील, असे सांगत केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंह यांनी या लॅबचे महत्त्व स्पष्ट केले. केंद्रीय विद्युत अणुसंधान ही संस्था फक्त टेस्टिंग पुरती मर्यादित नसून ती संशोधन सुद्धा करते. या संस्थेत देशातील कामांबरोबरच विदेशातील इलेक्ट्रिकल उपकरणेही येथे टेस्ट केली जातात. त्यामुळे तिचे महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील शिलापूर येथे राज्यातील पहिल्या केंद्रीय इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबच्या कामाच्या भूमिपूजन सोहळयाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, देवयानी फरांदे, योगेश घोलप, ऊर्जा मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार राज पाल, सीपीआरआयचे महासंचालक व्ही. एस. नंदकुमार, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव आदी उपस्थित होते. यावेळी सिंह यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली. आतापर्यंत काँग्रेस सरकारने ७० वर्षात काय केले? हजारो घरात वीज कनेक्शन नव्हते. पण, एक हजार दिवसात वीज कनेक्शन सर्वापर्यंत पोहचवण्याचे काम सरकारने हाती घेतले आणि ९८७ दिवसात वीज पोहचवली. आता देशातील सर्व गावात वीज दिसते. त्यासाठी सॅटेलाईट फोटो बघितल्यास ते चित्र समोर येते. आम्ही २ कोटी ५५ लाख घरात वीज दिली. अजूनही ६० हजार घरे बाकी आहेत. महाराष्ट्रतही साडेबारा लाख कनेक्शन १० महिन्यात दिल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी खासदार गोडसे यांनी नाशिक हे इलेक्ट्रिकल हब होईल, असे सांगत या प्रकल्पासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. दोन हजार कोटी देणार आतापर्यंत प्रत्येक गावात वीज जोडणी देण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेव्यतिरक्त ८०० कोटी रुपये देण्यात आले आहे. राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी मागणी केल्याप्रमाणे ग्रीड स्वतंत्र करण्यासाठी आणखी दोन हजार कोटी देण्यात येतील असे आश्वासनही सिंह यांनी यावेळी दिले. अशी असेल लॅब १०० एकर जागेवर केंद्रीय विद्युत अणुसंधान संस्थेमार्फत ११५ कोटी खर्च करून पश्चिम विभाग केंद्रीय इलेक्ट्रिकल टेस्टिगं लॅब येथे होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र व आजूबाजूच्या राज्यांनाही या लॅबचा फायदा होणार आहे. आतापर्यंत इइलेक्ट्रिकल वस्तूंचे टेस्टिंग करण्यासाठी बेंगळुरू, दिल्ली व भोपाळ येथे जावे लागत होते. पण, आता राज्यातील सर्वांना या लॅबचा फायदा होणार आहे. या लॅबच्या पहिल्या टप्यात ट्रान्सफॉर्मर, विद्युत मीटर, ट्रान्सफॉर्मर ऑइल, स्वीच गिअर टेस्टिंगची सुविधा मिळणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट