Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

राजकारणात ‘स्वास्थ्य’ महत्त्वाचे

$
0
0

पालकमंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राजकारणात अनेकदा वेळेचे बंधन नसते. अनेक बैठका, दौरे आणि कामकाजाच्या व्यापातून शारीरिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होते. पण, राजकीय वर्तुळात टिकून राहण्यासाठी फक्त कुशाग्रताच नव्हे तर मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकवून ठेवणे महत्त्वाची आहे. दैनंदिन कामातून वेळ काढत मी व्यायाम करतो, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

'आरोग्य दौलत हेल्थ कार्ड'च्या अनावरणप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. शताब्दी हॉस्पिटलतर्फे रुग्णांना आरोग्य सेवेत विशेष फायदा व्हावा, यासाठी 'आरोग्य दौलत हेल्थ कार्ड' योजनेचा शुभारंभ करण्यात आला. दिवंगत माजी आरोग्यमंत्री दौलतराव आहेर यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेसाठीच्या कार्डचा अनावरण सोहळा कालिदास कलामंदिरात झाला. यावेळी मंचावर पालकमंत्री महाजन, डॉ. जगन्नाथ दीक्षित, खासदार हरिशचंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर, स्थायी समिती अध्यक्षा हिमगौरी आहेर-आडके होते. उपस्थितांना आमदार डॉ. आहेर यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली.

याच कार्यक्रमात उपस्थितांसोबत संवाद साधताना पालकमंत्री महाजन म्हणाले, की काही दिवसांपासून अहमदनगरला अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या. तेथे जाताना प्रवासात अधिक वेळ खर्च व्हायचा. त्यामुळे वेळेचे गणित बघडले होते. बैठका, कामकाज, प्रवास यातून झोपण्यासाठी फक्त एक ते दीड तास वेळ मिळायचा. याचा परिणाम स्वास्थावर होतो. त्यामुळे राजकीय मंडळींना राजकारणासोबतच शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला हवे. योग्य आहार, व्यायाम आणि दिनचर्येचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे, असे ते म्हणाले.

आहारात हवा योग्य बदल

उपस्थितांना मार्गदर्शन करताता डॉ. दीक्षित म्हणाले, की अनेक आजारांवर आहारातील बदलांच्या माध्यमातून बदल करता येतो. जीवनशैलीत महत्त्वाचे बदल केल्यास शारीरिक व्याधींपासून मुक्ती मिळवता येते. त्यामुळे आहारात योग्य बदल, आहाराची वेळ, सवय आणि व्यायामाची यांची सांगड प्रत्येकाने घालायला हवी.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गरज असेल तेथे चारा छावण्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आवश्यकता लक्षात घेऊन चारा छावण्या सुरू करण्यास राज्य सरकारने संमती दिली असली तरी जिल्ह्यात तूर्तास चारा छावण्या सुरू करण्याची गरज नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दुष्काळाची दाहकता वाढल्यास निश्चितच चारा छावण्या सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सरकारने राज्यात १५१ तालुके आणि त्या व्यतिरिक्त २६८ मंडळे दुष्काळी जाहीर केली आहेत. याखेरीज ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केली आहे. या दुष्काळग्रस्त भागांमधील पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाराटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच सरकारच्या महसूल आणि वन विभागाने चारा छावण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याबाबत शासन निर्णय घेण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांनाही तसे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात आठ तालुके आणि काही मंडळे दुष्काळी जाहीर केली आहेत. येथे चाराटंचाईची समस्या भेडसावू नये, याकरिता आवश्यक ती खबरदारीही प्रशासन घेत आहे. जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर तसेच, अन्य राज्यांत जाणार नाही याची काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात अधिकाधिक क्षेत्रावर गाळपेरा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून, ११०० हेक्टर क्षेत्रावर चाऱ्याची लागवडही सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे. जिल्ह्यात अजूनही तीव्र स्वरूपात चाराटंचाईची समस्या भेडसावलेली नाही. त्यामुळे सरकारचा आदेश असला तरी जिल्ह्यात तूर्तास चारा छावण्या सुरू करण्यात येणार नसल्याचे प्रशासनातील सूत्रांनी स्पष्ट केले. परंतु, चारा छावण्यांची मागणी वाढल्यानंतर तेथील दाहकतेचा अंदाज घेऊन छावण्या सुरू केल्या जाऊ शकतात, असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामांचा नारळ फुटणार कधी?

$
0
0

जलयुक्तची ६० टक्के कामे अजूनही सुरू नाहीच

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

टंचाईमुक्तते स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियान योजनेविषयी प्रशासनात सकारात्मक दृष्टीकोनाचाच दुष्काळ असल्याचे दिसून येत आहे. चालू वर्षाच्या आराखड्यातील नियोजित पैकी नाशिक जिल्ह्यात अवघी ११ तर विभागात ११.७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. विभागात अवघी २८.३० टक्के कामे सुरू आहेत. विभागात अद्याप ६० टक्के कामांसाठी प्रशासनाला मुहूर्त सापडू शकलेला नाही.

दरवर्षी पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र स्वरुप धारण करू लागले आहे. पाणीटंचाईचा कालावधीही वाढू लागला आहे. भूजल पातळीतही चिंताजनक घट आलेली असल्याचे चित्र आहे. सरासरी पर्जन्यमानातही घट येणाऱ्या वर्षांचे प्रमाणही वाढले आहे. या सर्व पार्श्वभूमिवर राज्यातील बहुतेक तालुक्यांतील नागरिकांना वर्षातील सुमारे सहा महिने आपली तहान भागविण्यासाठी शासकीय टँकर्सची वाट बघावी लागत आहे. पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान ही योजना हाती घेतली. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीबाबत स्थानिक प्रशासनाकडे सकारात्मक दृष्टीकोन नाही, असे नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांतील या योजनेच्या प्रगतीवरून स्पष्ट झाले आहे.

फक्त ११ टक्के उद्दिष्ट्य साध्य

विभागात २०१८-१९ या वर्षासाठी जलयुक्त शिवारसाठी १ हजार १२३ गावांची निवड झाली. या गावांमध्ये आराखड्यानुसार १९ हजार ७३ इतक्या कामांचे उद्दिष्ट्य आहे. मात्र, चालू वर्षातील १० महिन्यांमध्ये अवघी २ हजार ३१३ अर्थात ११.७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. याच कामांच्या पूर्ततेचे प्रमाण नाशिक जिल्ह्यात ११.०६, धुळ्यात ६.६३, जळगावमध्ये २०.७५, नंदुरबारमध्ये ७.०४ तर नगर जिल्ह्यात १०.०१ टक्के इतकी अल्प आहे.

निम्म्या निविदा रखडलेल्या

विभागात अद्याप ५९.९९ टक्के कामे सुरू करण्यासाठी मुहूर्तही सापडलेला नाही. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सुरगाणा आणि पेठ या आदिवासी बहुल तालुक्यांत अद्यापपर्यंत चालू वर्षाच्या आराखड्यातील एकही काम पूर्ण झालेले नाही. विभागातील निम्म्यापेक्षा जास्त कामांची निविदा प्रक्रियाही अद्याप राबविण्यात आलेली नाही.

जिल्ह्यातील 'जलयुक्त'ची प्रगती (२०१८-१९)

तालुका निवडलेली गावे प्रस्तावित कामे पूर्ण कामे

त्र्यंबकेश्वर २२ ३४६ ६०

इगतपुरी ९ १७१ ०

पेठ २५ ३९ ४ ०

निफाड १८ २३ ९ ३

चांदवड ३५ ५७३ ५६

सिन्नर २९ ४४१ ४

येवला १२ ३७८ ५०

कळवण २१ २६४ ४१

दिंडोरी १६ ४०६ १८

सुरगाणा ३० ५२५ ०

देवळा ७ १६७ ७५

मालेगाव ३४ ७१७ १५६

सटाणा २८ ४९२ ६५

नांदगाव १५ ४०७ ८३

एकूण ३०१ ५५२० ६११

नाशिक विभाग जलयुक्त शिवारची झालेली कामे

तालुका निवडलेली गावे प्रस्तावित कामे पूर्ण कामे

नाशिक ३०१ ५४४४ ६११

धुळे १५७ १७४७ ११६

नंदुरबार १८० २४९८ १७६

जळगाव २३६ ३७३४ ७७५

नगर २४९ ६३४० ६३५

एकूण ११२३ १९७६३ २३१३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेरिटेज वॉक

$
0
0

लोगो : मटा हेरिटेज वॉक

प्राचीन गोवर्धनची मोहिनी!

महाराष्ट्र टाइम्सतर्फे गोवर्धन, गंगापूर, जलालपूर या तीन गावांमध्ये आयोजित केलेल्या 'मटा हेरिटेज वॉक'ला नाशिककरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या गावांचा प्राचीन ते मराठा कालखंडापर्यंतचा इतिहास, समाजजीवन, मंदिरे, वाडे, गोदाघाट तसेच प्राचीन गोवर्धनचा दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास नाशिककरांनी अनुभवला. या वॉकला गंगापूर गावातील दे. ना. पाटील विद्यालयातून सकाळी ९ वाजता सुरूवात झाली. गंगापूर, जलालपूर व अखेरीच गोवर्धनमधील गोवर्धनेश्वर मंदिर पाहून वॉक दुपारी एक वाजता संपला. या वॉकसाठी ज्ञानसाधना शिक्षण प्रसारचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, अॅड. सुदर्शन पाटील, इतिहास अभ्यासक महेश शिरसाट, पप्पू मोहिते याचे सहकार्य लाभले.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलविक्रेत्याचा मालेगावात खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

कॅम्प परिसरातील पुलाजवळ रविवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून एका फुल विक्रेत्यावर धारदार चाकूने वार करीत त्याचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेनंतर वडनेर खाकुर्डी पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे.

प्रकाश काशिनाथ गायकवाड (५५, रा. जाजुवाडी) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते सकाळी दहाच्या सुमारास वडगाव शिवारातील फुल बाजारातून फुले विकत घेऊन कॅम्पात येत होते. त्यांच्या स्कुटीचा समाधान दादाजी धिवरे या तरुणास धक्का लागला. यातून दोघांत वाद होऊन हाणामारी झाली. यावेळी समाधानने आपल्या जवळील धारदार चाकूने प्रकाश यांच्यावर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी हिम्मतनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या काही नागरिकांनी गायकवाड यांना रुग्णालयात नेले. मात्र, अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेतील संशयित हल्लेखोर समाधान याने आपल्या जवळील चाकू नदीपात्रातील पाण्यात फेकून देत तेथून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच वडनेर खाकुर्डी पोलिसांना घटनास्थळी त्वरित धाव घेतली. पोलिस निरीक्षक मोताळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फरार झालेल्या समाधान यास सायंकाळी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मितभाषी व गरीब फुलविक्रेता अशी गायकवाड यांची शहरात ओळख होती. ते नेहमी प्रमाणे सकाळी फुले घेऊन आपल्या रावळगांव नाक्यावरील दुकानाकडे येत असतानाच माथेफिरुच्या हल्ल्यात बळी पडला. या घटनेबद्दल कॅम्पसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रजासत्ताकदिनी कर्तृत्वाला सलाम!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आकाशात फडकत असलेल्या तिरंग्यासमोर देशभक्तीची ज्योत मनामनांत फुलविणारी गीते...देशहितासाठी योगदान देणाऱ्यांचे करण्यात आलेले स्मरण... संस्कृती अन् परंपरांचे अनोखे दर्शन घडवित शहरासह जिल्ह्यात शनिवारी प्रजासत्ताकदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्यांच्या कर्तृत्वाला सलाम करतानाच देशहितासाठी सर्वतोपरी योगदान देण्याचा मनोदयही व्यक्त करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, खासगी आस्थापना, संस्था आणि संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध भागांत सकाळपासूनच देशभक्तीपर गीतांचे सूर कानांवर पडू लागल्याने वातावरणात चैतन्य संचारले. ठिकठिकाणी ध्वजवंदनाची लगबग सुरू असल्याचे चित्रही सकाळी पहावयास मिळाले. शहरातील मुख्य चौकांमध्ये झेंडे, तिरंगी फुगे विक्रेत्यांनी दुकाने थाटली. पोलिस कवायत मैदानावर सकाळी सव्वानऊ वाजता ध्वजवंदनाचा मुख्य सोहळा पार पडला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मुख्य उपस्थितीत ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिसांचे संचलन पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता १७० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची सुखवार्ता प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री महाजन यांनी जिल्हावासियांना दिली. जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका यांसह शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, संस्थांमध्येही प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. याखेरीज विविध कार्यक्रमांचा आनंदही अबालवृद्धांनी लुटला. मानव उत्थान सेवा समितीने शहरातून सद्भावना यात्रा काढत नाशिककरांना सदभावना, समता आणि सदाचाराचा संदेश दिला. प्रजासत्ताक दिनाची सुटी एन्जॉय करण्यासही अनेकांनी पसंती दिली. त्यामुळे पर्यटन स्थळे, मॉल्स, मल्टिप्लेक्स, हॉटेल अशा सर्वच ठिकाणी नागरिकांची गर्दी पहावयास मिळाली. व्हॉटसअॅप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावरूनही प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण दिवसभर सुरू होती. विविध आस्थापना, मॉल्सकडून खरेदीवर आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या होत्या. त्यामुळे शहरातील मॉल्स गर्दीने ओसंडून वाहत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस पथकावर हल्ला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक/ म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेलेल्या पथकावर १० ते १५ जणांच्या जमावाने हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. पंचवटीतील गणेशवाडी परिसरातील शेरी मळ्यातील या प्रकाराबाबत पंचवटी पोलिसांनी जमावाविरुद्ध दंगलीसह सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी चौघा संशयितांना अटक करण्यात आली. जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनांची काच फुटली.

पुंडलिक गोविंद उशीर, संदीप मधुकर पगारे, गौरव पुंडलिक उशीर व सुनील मधुकर सोळसे अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणात दोन महिलांसह आणखी १० ते १२ संशयितांचा समावेश असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादी प्रशांत पन्नालालजी कर्नावट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन वादाशी निगडित असलेल्या या प्रकरणातील संशयित शेरी मळ्यात राहतात. संशयितांच्या तपासासाठी व चौकशीसाठी रविवारी (दि. २७) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सरकारवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विवेक विनायक बैरागी यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांचे एक पथक शेरी मळ्यात पोहचले. यावेळी संशयित पुंडलिक गोविंद उशीर, संदीप मधुकर पगारे, गुलाब तरळ, मोहन उशीर, संजय पाटील, गौरव पुंडलिक उशीर, सुनील मधुकर सोळसे यांच्यासह दोन महिला व चार पाच जणांचे टोळके पोलिसांच्या समोर आले. या जमावाने पोलिस पथकास शिवीगाळ करीत पोलिस अधिकारी बैरागी व कर्नावट यांच्या अंगावर काचकुयरी टाकली. याच दरम्यान संजय पाटील या संशयिताने दोघांना मारहाणसुद्धा केली. काचकुयरी अंगावर पडल्याने बैरागी यांच्यासह कर्नावट यांच्या अंगाची खाज होऊन संपूर्ण अंग लालसर झाले. दरम्यान संशयितांनी पोलिस वाहनावर (एमएच १५, एए२४८) दगडफेक केली. यात वाहनाची मागील काच फुटली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अतिरिक्त फौजफाटा गणेशवाडीतील शेरी मळ्यात पोहचला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून वरील चौघा संशयितांना लागलीच अटक केली.

इतर संशयितांचा शोध सुरू

या घटनेतील फरार संशयित आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच सर्वांना अटक करण्यात यश मिळेल, असे पोलिस निरीक्षक कड यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक बैरागी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दंगल, सरकारी कामात अडथळा आणणे यांसह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे गणेशवाडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधवा पुनर्विवाहास२५ हजारांची मदत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

विधवांचे प्रश्न बिकट आहेत. अनेक योजना राबवूनही त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यातील एकलहरे ग्रामपंचायतीने गावातील विधवांसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच उपेक्षेचे जिणे वाट्याला आलेल्या विधवांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन देण्याचा ठराव ग्रामसभेने केला असून, त्यांच्या पुनर्विवाहासाठी २५ हजार रुपयांची मदत देण्याचा मानवतावादी निर्णय ग्रामसभेने प्रजासत्ताकदिनी घेतला आहे. असा निर्णय घेणारी जिल्ह्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत असून, या आदर्श निर्णयाचे स्वागत होत आहे.

पतिनिधनानंतर महिलेचे सामाजिक जीवन उद्धवस्त होत असते. राजा राममोहन राय, ईश्वरचंद विद्यासागर, शाहू महाराज, महात्मा फुले यांनी विधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. तोच वसा एकलहरे ग्रामपंचायतीने घेतला आहे. गावातील ज्या विधवा तरुणी पुनर्विवाह करतील, त्यांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा पुरोगामी निर्णय ग्रामसभेने घेतला आहे. एकलहरे ग्रामपंचायत सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असते. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीने पुरोगामी विचारांचा निर्णय घेऊन इतर ग्रामपंचायतींना आदर्श घालून दिला आहे.

ग्रामनिधीची तरतूद

वाढते अपघात व कर्करोग, हृदयरोग अशा आजारांनी तरुणांना येणारे अकाली मृत्यू यामुळे तरुण वयात विधवा होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, संपूर्ण आयुष्य एकटेपणाने जगण्याची वेळ महिलांवर येते. समाजातही तिची बहुधा उपेक्षाच होताना दिसते. अशा विधवा महिलांना पुन्हा सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी त्यांच्या पुनर्विवाहासाठी ग्रामपंचायतीकडून २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे. अशा प्रकारच्या ठरावाची मागणी ग्रामस्थ राजाराम धनवटे, रामदास डुकरे, सागर जाधव आदींनी केली होती. त्याला एकमुखी पाठिंबा देत तसा ठराव ग्रामसभेने केला. यासाठी महिला व बालकल्याणसाठी तरतूद असलेल्या दहा टक्के ग्रामनिधीतून मदत दिली जाणार आहे. ग्रामसभेस सरपंच मोहिनी जाधव, उपसरपंच अशोक पवळे, ग्रामविकास अधिकारी सुरेश वाघ, सदस्य विश्वनाथ होलीन, सुरेखा जाधव आदी उपस्थित होते.

विधवांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय एकलहरे ग्रामपंचायतीने घेतला. असा निर्णय घेणारी एकलहरे ही पहिलीच ग्रामपंचायत असावी. विधवा महिलांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले जाईल.

- मोहिनी जाधव, सरपंच, एकलहरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऋतुरंग फोटो

गोदाकाठी ‘नाशिक आर्ट’ची रंगत

$
0
0

नाशिककरांच्या कलागुणांची खास नजराणा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवोदित कलाकारांच्या कलांचे होणारे अफलातून सादरीकरण. चित्र, शिल्प, नृत्य, गायन, वादन अन् अभिनयाच्या विविध रंगातल्या छटा. कलाविष्कारांच्या जोडीला असलेले विविध खेळ अन् गोदाकाठी झालेली अबालवृद्धांची गर्दी, अशा बहारदार वातावरणात 'नाशिक आर्ट फेस्ट'ची रंगत नाशिककरांनी अनुभवली.

'टॅलेंट ऑफ नाशिक'तर्फे शुक्रवारपासून 'नाशिक आर्ट फेस्ट'चे आयोजन करण्यात आले होते. यंदा फेस्टचे तिसरे वर्ष होते. नाशिकच्या कलाकारांना कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टमध्ये चित्रकला, अक्षरलेखन, हस्तकला यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. तीन दिवसाच्या फेस्टमध्ये शहरातील हौशी कलाकारांनी गायन, वादन, शास्त्रीय संगीत, नाटक अशा सर्वच कलांचे सादरीकरण केले. या प्रत्येक सादरीकरणाला रसिकांची दाद मिळाली. तसेच फेस्टमध्ये रॉक बॅण्ड परफॉर्मन्ससह शिल्पकला, रांगोळी, वारली चित्रकला यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सोबतच विविध प्रकारचे खेळ फेस्टमध्ये खेळले गेले. फेस्टमध्ये येणाऱ्यांसाठी हटके सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले होते. नाशिककरांनी कुटुंबीयांसह फेस्टमध्ये सहभागी होत कलेची रंगत अनुभवली.

..

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याची दहशत कायम

$
0
0

मखमलाबाद शिवारात वासरांवर हल्ला

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मखमलाबाद शिवारातील चांदशीरोड, काकड मळा व गंगापूर-मखमलाबाद लिंकरोड पठाडे फार्म येथील वासरांवर शनिवारी (दि.२६) हल्ला केला. मानूर शिवारातही बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मखमलाबाद चांदशीरोड शाळेच्या मागे संजय काकड यांचा मळा आहे. या मळ्यात शनिवारी (दि. २६) रात्री नऊ वाजता अचानक बिबट्याने मोकळ्या जागेत बांधलेल्या अडीच वर्षांच्या वासरावर हल्ला केला. त्याच्या गळ्याला बिबट्याचे दात व नखे लागल्याचे दिसून आले. गंगापूररोड- मखमलाबाद लिंक रोडवरील पठाडे फार्म येथे दहा वाजेच्या सुमारास गुरांचा आरडाओरडा सुरू होता. त्यावेळी येथील तीन वर्षांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्याचे पठाडे यांनी पाहिले. रविवारी (दि. २७) पठाडे यांनी शेतात बघितले असता त्यांना बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसले. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून, ते पाहणी करण्यास येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मानूर शिवारात शनिवारी (दि. २७) रात्री अकराच्या सुमारास पाटाजवळील मळ्यात नामदेव माळोदे यांना बिबट्या दिसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरापतीतून युवकावर कोयत्याने हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आठ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून एकाने कोयत्यासारख्या धारदार हत्याराने वार करीत युवकाला जखमी केले. ही घटना एकलहरा येथील सिद्धार्थनगर परिसरात घडली.

या प्रकरणी सुनील कचरू खैरे (वय २३, रा. सिद्धार्थनगर, एकलहरा) याने तक्रार दिली. त्यानुसार संशयित गणेश सूर्यवंशी (पूर्ण नाव माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सूर्यवंशी याने आठ दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणावरून शिवीगाळ करीत कोयत्यासारख्या धारदार हत्याराने दुखापत करीत जखमी केले. जखमी सुनीलवर बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

...

सामनगावला घरफोडी

बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करीत चोरट्यांनी एक लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना नाशिकारोडच्या सामनगाव रोडपरिसरातील भोर मळा येथे घडली. या प्रकरणी विजय केशव पांडव (रा. भोर मळा, सामनगाव रोड) यांनी तक्रार दिली. शुक्रवारी (दि. २५) पांडव कुटुंबीय बाहरे गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. कपाटातील एक लाख १२ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी पसार केला. यामध्ये ४५ हजारांची रोकड, दीड तोळे सोन्याचे नेकलेस, दोन तोळ्याची चेन, चार अंगठ्या, नथ, मंगळसूत्र अशा सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

...

मारहाण करणाऱ्या तिघांना अटक

भांडण करीत असल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने दोघांना लोखंडी गजाने व लाकडी दांड्याने मारहाण करीत गंभीर जखमी करण्यात आले. या प्रकरणी तिघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली. गोपाल शेर ओली (वय २३, रा. हिरावाडी, पंचवटी), वसंत मोहन (वय १९), भालू शेर ओली (वय २०) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी फर्शबल बहादूर उर्फ विनोद (वय ४७, रा. पाइलपलाइन रोड, गंगापूर रोड) यांने तक्रार दाखल दिली. फिर्यादी विनोद यांचा शालक रामसिंग क्षत्रिय याला संशयितांनी मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी विनोद गेले असता, संशयित भालू ओली याने इतर दोघा संशयित आरोपींना बोलावून घेत फिर्यादींना लोखंडी गजाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. दुखापत झाल्याने फिर्यादी फर्शबल बहादूर यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

..

क्‍लासेसवर गुन्हे

महापालिकेची परवानगी न घेता शहर विद्रूप करण्याच्या दृष्टीने बेकायदेशीररित्या खासगी क्लासेसचालकांनी उपेंद्रनगर, सिंहस्थनगर व सह्याद्रीनगर येथे जाहिरात फलक लावल्याप्रकरणी महापालिकेने चार खासगी क्लासेसचालकांसह एका शाळेच्या संचालकांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.

दिशा कॉम्प्युटर, वेदांत क्लासेस, साई सार्थ क्लासेस, स्ट्रॉबेरी क्लास व बँकिंग परीक्षा मार्गदर्शन केंद्र अशी गुन्हा दाखल झालेल्या क्लासेसची नावे आहेत. वरील क्लास व शाळेच्या संचालकांनी महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बुधवार (दि. २३) दुपारी उपेंद्रनगर, सिंहस्थनगर व सह्याद्रीनगर भागात विनापरवानगी जाहिरात फलक लावले. ही बाब लक्षात येताच महापालिका प्रशासनाने क्लासेसच्या संचालकांवर महाराष्ट्र महापालिका अधिनियम मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम व मालमत्ता विद्रूपीकरण कायद्यान्वये फिर्याद दिली.

..

मोबाइल हिसकावले

दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी एकाकडील ४३ हजार रुपयांचे एकूण चार मोबाइल फोन बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी विनोद रामदास भगत (रेणुका मंदिराजवळ, देवळाली गाव) यांनी फिर्याद दिली. गुरुवारी (दि. २५) रात्री पावणेआठ वाजता इंदिरानगर बोगद्याजवळील शनी मंदिराजवळून भगत जात असताना ही घटना घडली. यावेळी एका पल्सरवरून २५ वयोगटातील दोघे संशयित आले. त्यांनी भगत यांच्याकडील विविध कंपनीचे चार मोबाइल बळजबरीने हिसकावून घेत नाशिकरोडच्या दिशेने पल्सरवरून पळ काढला.

..

तीन दुचाकींची चोरी

शहरच्या विविध भागांतून चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत. या प्रकरणी सरकारवाडा, पंचवटी व गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. पंचवटीतील निमाणी बस स्टॅण्डजवळ असलेल्या सूर्या हॉस्पिटलसमोरून योगेश भाऊराव नाईक (रा. बोरगड, म्हसरूळ) यांची ३० हजार रुपयांची दुचाकी (एमएच १५ जीडी ३८५१) ७ जानेवारी रोजी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर रोडवरील बेंडकुळे मळ्याजवळ असलेल्या हिराबागजवळून चोरट्यांनी सोमवारी (दि. १४) सायंकाळी साडेसात वाजता रवींद्र पांडुरंग साठे (रा. ध्रुवनगर, नाशिक) याची दुचाकी (एमएच १५ जीबी १९११) चोरून नेली. तिसऱ्या घटनेत नानासाहेब जालिंदर काजळे (रा. महालक्ष्मीनगर, मखमलाबाद) यांची एमएच १५ बीएफ ०६८३ या क्रमांकाची दुचाकी बुधवार दि. २६ डिसेंबर २०१८ रोजी ठक्कर बझार बस स्टॅण्ड येथून चोरट्यांनी चोरून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकांचे विचार बदलणे आवश्यक

$
0
0

महेश झगडे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शेतकऱ्यांवर ५६ टक्के देशातील सर्व काही अवलंबून असतानादेखील न्याय मिळत नाही आणि शेतकऱ्यांचे राज्य नाही. यासाठी ७० वर्षांपासून शेतकऱ्यांसह लोकांचे विचार बदलले पाहिजेत, असे प्रतिपादन महेश झगडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. पैशांची, पैशांसाठी, पैशांकरिता असलेली लोकशाही आता निर्माण झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथे शनिवारी (दि. २६) प्रजासत्ताक दिनी प्रशासकीय अन्याय निवारण परिषद घेण्यात आली. गेल्यावर्षी जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्यासह राज्यातील सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा हा मुख्य उद्देश समोर ठेऊन ही परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रकाश पोहरे, जुबेर शेख, संजय सोनवणे, डॉ. गिरधर पाटील यांच्यासह मान्यवर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषदेला सुरुवात झाल्यानंतर प्रथम धर्मा पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन केले.

शेतकरी आत्महत्येबाबत सरकारला जबाबदार धरण्यापेक्षा कृषी सचिव किंवा कृषिमंत्रीला जबाबदार धरत नाहीत याचा विचार करणेदेखील गरजेचे असल्याचे झगडे यांनी सांगितले. धर्मा पाटील यांना न्याय मिळावा यासाठी धुळे ते मुंबईपर्यंतचा प्रवास करावा लागला. मात्र, असे न करता जिल्हा भूसंपादन विभागातील अधिकाऱ्यांनी हा प्रश्न सोडवला असता तर पुढील प्रकार घडला नसता. सरकारी यंत्रणेला गंज लागला असून, हा गंज काढणे गरजेचे झाले आहे. यासाठी आपण एकत्र येऊन शेतकऱ्यांना न्याय देणं हेच एक ध्येय समोर ठेवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

मॅटमध्ये जाण्याची सुविधा असावी
या वेळी परिषदेचे मुख्य आयोजक गिरधर पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, धर्मा पाटील यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी या ठिकाणच्या आमदारांनी मोठी दहशत निर्माण केली आहे. धर्मा पाटलांचा नावावर पैसे खाल्ले जाणार होते. मात्र, त्यांनी वेळीच धुळे ते मुंबईपर्यंत विविध माध्यमातून पाठपुरावा सुरू केला, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा हादरली, असेही ते म्हणाले. आता प्रशासकीय अन्याय निवारण परिषदेच्या माध्यमातून मुख्य सचिवांकडे दाद मागून शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी सरकारी लवाद नेमणूक करावा, शेतकऱ्याला मॅटमध्ये जाण्याची सुविधा असावी ही मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोशपूर्ण संचलनाने डोळ्यांचे पारणे फेडले

$
0
0

खान्देशात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा; ध्वजवंदनासह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

टीम मटा
जळगाव शहरासह खान्देशात शनिवारी (दि. २६) प्रजासत्ताक दिन ध्वजवंदन, मानवंदना, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे जोशपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शासकीय, खासगी आस्थापनांसह शैक्षणिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांतर्फे ध्वजवंदन करून ‘प्रजासत्ताकदिन चिरायू होवो’चा नारा देण्यात आला. जळगावात पोलिस दलाच्या वाद्यवृंदाने वाजविलेल्या देशभक्तीपर गीतांच्या धूनवर झालेल्या शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण संचलनाने कार्यक्रमस्थळावरील वातावरण भारावले होते. तर सांस्कृतिक कार्यक्रमांचे उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.


कृषिमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन
जळगाव : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ६९ वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने शनिवारी (दि. २६) ध्वजावंदनाचा समारंभ पोलिस कवायत मैदानावर राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पार पडला.

या समारंभानंतर राज्यमंत्र्यांना पोलिस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. संचलनाचे नेतृत्व प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक सचिन कदम यांनी केले. या वेळी झालेल्या संचलनात पोलिस मुख्यालय, महिला व पुरुष पथके, शहर वाहतूक शाखा, होमगार्ड महिला व पुरुष पथके, पोलिस दलाचे बॅण्ड पथक, पोलिस श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वरुण पथक, अग्निशमन दल, रेस्क्यू पथक, वनविभागाचा वृक्ष लागवडीचा चित्ररथ, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा चित्ररथ, महापालिकेचा स्वच्छ भारत अभियानाचा चित्ररथ, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या चित्ररथांचा या संचलनामध्ये समावेश होता. या वेळी आर. आर. विद्यालय, प. न. लुंकड विद्यालय, किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, नंदिनीबाई वामनराव मुलींचे विकास विद्यालय, ओरिऑन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. योगा प्रशिक्षक अनिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली चमुने महात्मा गांधी थिम भारतीय योगशास्त्र योगासने सादर केली. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ लोककलेतून लोकजागर कार्यक्रम, जिल्हा महिला बाल विकास विभाग, जळगाव व रिजनल आऊटरेज ब्युरो गीत नाटक विभाग, पुणे द्वारा प्रस्तुत ‘फिजिकल डेमो आणि वेपन टॅक्टिस’ क्यूआरटी ग्रृप पोलिस मुख्यालय, जळगाव यांनीही विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. या सोहळ्यास आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, आयुक्त चंद्रकांत डांगे, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलभ रोहन, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.

मान्यवरांचा सन्मान
परेड निरीक्षणानंतर राज्यमंत्री खोत यांच्या हस्ते पोलिस दलामध्ये, नक्षलग्रस्त भागात दोन वर्षे समाधानकारक सेवा पूर्ण केल्याबद्दल सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागूल, पोलिस उपनिरीक्षक सुजित ठाकरे यांना विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले. तर पोलिस नाईक मनोज अण्णा मराठे यांना उत्कृष्ट पोलिस प्रशिक्षक पदक प्रदान करण्यात आले. क्रीडा पुरस्कारांमध्ये विजय लक्ष्मण न्हावी, पुजा अरुण महाजन या खेळाडूंचा तर गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून प्रा. हरिष मुरलीधर शेळके, गुणवंत क्रीडा संघटक - आसिफ खान अजमल खान यांनाही गौरविण्यात आले. या वेळी दत्तूसिंग पाटील, अमरनाथ चौधरी, दिगंबर वामनराव पगार (उप वनसंरक्षक), मिनाक्षी राजाराम निकम, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, मधुकर जुलाल ठाकूर आदींचा सन्मान करण्यात आला. सोहळ्याचे सूत्रसंचालन जी. एम. उस्मानी, राजेश यावलकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातही जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, शुभांगी भारदे, प्रमोद भामरे, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील उपस्थित होते.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक ३ च्या आवारातही सकाळी आठ वाजता उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, सहायक मुद्रांक अधिकारी सुनील पाटील, महिला व बालविकास अधिकारी सरस्वती बागूल उपस्थित होते.

पाच दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी
प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये लोकशाही महोत्सव साजरा केला जात असून, त्याला अनुसरून शहरातही यंदा पुरोगामी विचारांच्या राजकीय ,सामाजिक संस्था व संघटनांतर्फे लोकशाही महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २६ ते ३० जानेवारीदरम्यान संविधान दिंडी, रांगोळी प्रदर्शन, काव्य संमेलन, अभिरुप संसद, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रांतिकारक भगतसिंग यांचे विचार आणि जीवनपट यावर सादरीकरण असे विविध उपक्रम आयोजित केले आहेत.

‘सदैव शेतकऱ्यांच्या पाठिशी’
धुळे : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार नेहमीच तत्पर असून, शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाचा ६९ वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी उत्साहात झाला. यानिमित्त प्रथमच जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ झाला. या वेळी महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, डॉ. मीनाक्षी गजभिये, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, वरीष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री भुसे यांनी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. या वेळी जे. आर. सिटी हायस्कूल, जयहिंद हायस्कूल, कनोसा कॉन्व्हेंट, कमलाबाई कन्या विद्यालय, एच. आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालय, शिरपूर, वरुळ, आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय, सावळदे, खंबाळे, खर्दे, आर. सी. पटेल माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य सादर केले.


नंदुरबारची विकासाकडे वाटचाल

पालकमंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

धुळे : नंदुरबार जिल्ह्याने विविध क्षेत्रात अलौकिक कामगिरीचा ठसा उमटविला आहे. जिल्हा विकासाकडे वाटचाल करीत असून, भविष्यात मागास जिल्ह्याचा ठसा पुसून टाकण्याचे काम विकासाच्या माध्यमातून होणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ वा वर्धापन दिनानिमित्त शनिवारी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते नवीन पोलिस कवायत मैदान, पोलिस मुख्यालय येथे मुख्य ध्वजवंदनाचा शासकीय कार्यक्रम झाला. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, खासदार डॉ. हिना गावीत, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक संजय पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी वान्मती सी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्यासह विभाग प्रमुख, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

रावेरला मॅरेथॉनचे आयोजन
रावेर : प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील अंबिका व्यायामशाळेतर्फे रविवारी (दि. २७) मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. यामध्ये खुल्या गटातून डांभुर्णी येथील विशाल कुंभार प्रथम आला तर मुलींच्या गटातून भुसावळ येथील सिंड्रेला पवार या बालिकेने तृतीय क्रमांक पटकावून यश मिळवले. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत दोनशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र वानखेडे होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष दारा मोहंमद, तहसीलदार विजयकुमार ढगे, सुरेश धनके, प्रकाश मुजुमदार, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे व्यायामशाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन व सहकाऱ्यांनी स्वागत केले. संचालन ई. जे. महाजन यांनी केले. यशस्वीतेसाठी रवींद्र महाजन, अशोक पाटील, प्रणीत महाजन, भगवान चौधरी, अनिल पाटील, गणेश महाजन आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोंदे दुमालातबिबट्या जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील तानाजी पारू नाठे यांच्या मळ्यात अनेक दिवसांपासून दर्शन देणाऱ्या बिबट्या सोमवारी (दि. २८) पहाटे वनविभागाने लावलेल्या पिजऱ्यात जेरबंद झाला.

गेल्या दोन महिन्यांपासून गोंदे दुमाला येथील नाठे मळ्यातील वस्तीवर हा बिबट्या अनेकांच्या निदर्शनास आला असून, दहा ते पंधरा दिवसांपूर्वी येथील भाऊसाहेब जाधव यांचे एक पारडू तर तानाजी नाठे यांच्या गायीचे वासरू त्याने फस्त केले होते. शिवव्याख्याते विनोद नाठे यांनी याबाबत माहिती दिली. या परिसरात अजुनही बिबट्याचे दोन बछडे असल्याची भीती येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नाठे वस्तीवर पिंजऱ्यात पकडण्याची बातमी परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरताच येथील औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी तसेच परिसरातील शेतकऱ्यांना या बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. सदर बिबट्या जाधव वस्ती, मुकणे धरण परिसर, तसेच नाठे यांच्या मळ्यामध्ये सतत निदर्शनास येत होता. या वस्तीवर अनेक शेतकऱ्यांच्या म्हशी, गायी, शेळ्या, मेंढ्या तसेच लहान मुले देखील असल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आज हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे समजताच येथील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी विनोद नाठे, वनविभागाचे देशपांडे, श्रीमती पवार, साबळे, बाळू पागेरे, भगवान नाठे, गणेश वाजे, आदींसह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मृत्यू पत्करला; हेल्मेट नाही!

$
0
0

९१ टक्के दुचाकीस्वारांची हेल्मेटला नकारघंटा

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : शहरात दुचाकीस्वारांची संख्या लाखोंच्या घरात असून, वर्षागणिक त्यात वाढ होते आहे. सुरक्षेसाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या हेल्मेटकडे मात्र ९१ टक्के दुचाकीस्वार दुर्लक्ष करतात. हेल्मेटचा प्रभावी वापर होत नसल्याने एकूण मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत दुचाकीस्वारांची संख्या तब्बल ५८ टक्क्यांपर्यंत आहे.

शहरात २०१६ मध्ये विविध अपघातांमध्ये २१३ जणांचा बळी गेला होता. २०१७ मध्ये हे प्रमाण घटून १७१ इतके झाले होते. गतवर्षी यात आणखी घट अपेक्षित असताना बळींची संख्या मात्र २१७ इतकी झाली. २०१८ मध्ये जीवघेण्या अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या २१७ पैकी ५८ टक्के म्हणजे १२६ व्यक्ती या दुचाकीस्वार होत्या. यानंतर सर्वाधिक बळी हे पादचाऱ्यांचे गेले. २०१८ तब्बल ५९ व्यक्ती रस्ता ओलंडताना किंवा रस्त्याच्या कडेला उभ्या असताना वाहनांच्या खाली सापडलेत. १२६ पैकी ९१ टक्के म्हणजे ११२ दुचाकीस्वारांनी अपघातावेळी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. तर, १४ व्यक्तींचा हेल्मेट असताना मृत्यू झाला.

याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की शहरात हत्या, हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांपेक्षा रस्त्यावर बळी जाण्याचे प्रमाण खूप अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात आले. यापुढेही हे प्रयत्न सुरू राहतील. पण, दुचाकीस्वारांनी सुद्धा आपल्या जीवाचे मोल ओळखयला हवे. मृत्यूमुखी पडलेल्या ११२ पैकी निम्याहून अधिक दुचाकीस्वारांकडे हेल्मेट असते तर हा आकडा निश्चित कमी झाला असता. यात बहुतांश तरुणांचा सहभाग आहे, हे अधिक गंभीर. तसेच सीट बेल्टकडे होणारे कारचालकांचे दुर्लक्ष देखील महत्त्वाचे ठरते. २०१८ मध्ये १५ कारचालकांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकानेही सीट बेल्टचा वापर केलेला नव्हता. प्राणांतिक अपघातांमध्ये होणारी वाढ आणि हेल्मेट वापराकडे होणारे दुर्लक्ष याकडे वाहतूक शाखेचे विशेष लक्ष राहणार असल्यात्ही त्यांनी सांगितले.

..

२०१८ मधील जीवघेणे अपघात

प्रकार.........बळी संख्या

दुचाकी - १२६

चारचाकी - १५

पादचारी - ५९

सायकलस्वार - ६

इतर - ११

एकूण मृत्यू - २१७

..

वर्ष जीवघेणे अपघात मृत्युमुखी गंभीर जखमी एकूण अपघात

२०१२ १६५ १७५ ५५६ ६०८

२०१३- १२६ -१३० -५७२ -६०५

२०१४- १६८ -१७४ -४४६ -५४९

२०१५- २२५ -२३४ -३९९ -६१८

२०१६- २०३ -२१३ -३५१ -६२८

२०१७- १५८ -१७१ -३९० -५०३

२०१८- २०९ -२१७ -३९६ -५८०

एकूण- १२५४ -१३१४ -३११० -४०९१

..

मटा विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाड्यांना ‘आधार’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेल्या १३६ अंगणवाड्या पुन्हा सुरू करण्याचा दबाव वाढवल्यानंतर विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबत मधला मार्ग काढला आहे. अंगणवाड्यांची पटसंख्या तपासण्यासाठी तसेच बनवेगिरी रोखण्यासाठी यातील बालकांची आधारनोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. यानंतर अंगणवाड्यांतील पटसंख्या निश्चित केली जाणार आहे.

महापालिका हद्दीत सध्या २७७ अंगणवाड्या अस्तित्वात आहेत. महापालिकेच्या माध्यमातून प्रत्यक्षात ४१३ अंगणवाड्या सुरू असतानाच, तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पटसंख्या कमी असल्याचे कारण देत, तब्बल १३६ अंगणवाड्या बंद केल्या होत्या. महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात अंगणवाड्यांमध्ये पाच ते दहाच मुले आढळून आली होती. एकाच बालकाचे नाव अनेक अंगणवाड्यांमध्ये आढळून आले होते. त्यामुळे या सर्वेक्षणाचा आधार घेत, मुंढे यांनी एका फटक्यात १३६ अंगणवाड्यांना टाळे लावून त्यातील मुलांना जवळच्या अंगणवाड्यांमध्ये स्थलांतरीत केले होते. सरकारी निकषांनुसार चार हजार लोकसंख्येला एक अंगणवाडी आवश्यक असते. परंतु, शहराची २० लाख लोकसंख्या लक्षात घेत नियमानुसार १२४० अंगणवाड्यांची आवश्यकता असतानाही, मुंढे यांच्या निर्णयाविरोधात पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी रान पेटवले होते. या अंगणवाड्यांमधील २७२ सेविका-मदतनिसांचे पुनर्वसन न करता कामावरून कमी करण्यात आले होते. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी आंदोलन सुरू केले होते. तीन महासभांमध्ये यावर चर्चा झाली. अंगणवाडीतील पटसंख्या वाढविण्यासाठी सहा महिने संधी द्यावी व त्यानंतर पटसंख्या न वाढल्यास बंद करण्याचा निर्णय घ्यावा, असाही निर्णय झाला. मात्र मुंढे भूमिकेवर ठाम राहीले होते.

आता मुंढे यांच्या बदलीनंतर सत्ताधारी भाजपने नूतन आयुक्तांकडे या अंगणवाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. १० डिसेंबर १९९३ मधील ठरावानुसार अंगणवाडी पटसंख्या किमान ४० असणे अपेक्षित आहे. त्यामुळे गेल्या वेळी ही ४० पटसंख्या दाखविण्यासाठी एकाच बालकाचे नाव दोन ते तीन अंगणवाड्यांमध्ये आढळून आले होते. त्यामुळे पटसंख्या फुगवून अंगणवाडी चालवली जात असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले होते. त्यामुळे आयुक्तांनी यातून मार्ग काढत आता पटसंख्या मोजण्यासाठी अंगणवाडीमधील बालकांना आधार नोंदणीची सक्ती केली आहे. बालकांचे आधार कार्ड काढण्यात येणार असून, ते अंगणवाड्यांना लिंक केले जाणार आहे. त्यानंतरच गरज पडल्यास पटसंख्या जास्त असल्यास नव्याने अंगणवाड्या सुरू केल्या जाणार आहेत.

मागीतले ३०, मिळाले ६ युनिट

महापालिकेने अंगणवाड्यांमधील बालकांच्या आधारनोंदणीसाठी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३० युनिटची मागणी केली आहे. पालिकेत सध्या सहा विभागांत सहा आधारकार्ड नोंदणीचे युनिट सुरू आहेत. परंतु, ते पुरेसे नसल्याने अधिकचे ३० युनिट देण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने आतापर्यंत सहा युनिटच पालिकेला उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे बालकांच्या आधार नोंदणीची मोहीम आणखी लांबणीवर पडणार आहे. अधिकचे युनिट मिळावेत असा आग्रह पालिकेने धरला आहे.

सत्ताधाऱ्यांना झटका

मुंढे गेल्यानंतर आलेले नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे बंद पडलेल्या १३६ अंगणवाड्या पुन्हा सुरू करतील, अशी सत्ताधारी भाजपची अपेक्षा होती. परंतु, मुंढे यांचा निर्णय हा सर्वेक्षणानंतरच घेतलेला असल्याने तो फिरवण्याऐवजी गमेंनी आधार नोंदणीचे आदेश देऊन भाजपलाच झटका दिला आहे. या आधारनोंदणीमुळे अंगणवाड्यांमधील पटसंख्येची बोगसगिरी उघड होणार असून, खरी आकडेवारी समोर येणार आहे. या सर्वेक्षणात पटसंख्या वाढली तर निर्णय घेऊ असे सांगत, गमे यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हिंदू असल्याने माझ्यावर टीका’

$
0
0

वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या अमेरिकी काँग्रेसच्या खासदार तुलसी गब्बार्ड यांनी त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. गब्बार्ड हिंदू राष्ट्रवादी असल्याची टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गब्बार्ड यांनी टीकाकार दुटप्पी असल्याचे म्हटले आहे. आपल्या अमेरिकेबद्दलच्या कटिबद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे लोक बिगर हिंदू नेत्यांवर प्रश्नचिन्ह लावत नाहीत. हा दुटप्पीपणा असल्याचे गब्बार्ड यांनी म्हटले आहे. ३७ वर्षीय गब्बार्ड यांनी अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे ११ जानेवारीला जाहीर केले होते. हिंदू राष्ट्रवादी असल्याची टीका माझ्यावर होते आहे. उद्या ती मुस्लिम किंवा ज्यू अमेरिकींबद्दल असेल? जपानी, हिस्पॅनिक किंवा आफ्रिकन अमेरिकींबद्दल असेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नारपार’साठी एल्गार रॅली

$
0
0

मनमाड : 'नार-पार'च्या डीपीआरमध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश करण्यात यावा, तसेच माणिकपुंजचे पाणी

प्राधान्याने नांदगाव तालुक्यासाठीच मिळावे, या मागण्यांसाठी येत्या एक फेब्रुवारी रोजी नांदगाव येथे शेतकरी व जनतेची एल्गार रॅली काढण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकरी, मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होणार असल्याचे नांदगाव तालुका सर्वपक्षीय नार पार जलहक्क समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

$
0
0

मन्सुरी कुटुंबीयांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पतीच्या मृत्यूस कारागृहातील अधिकारीच जबाबदार असल्याचा दावा करीत या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीच्या पूर्ततेसाठी संबंधित कैद्याचे कुटुंबीय बेमुदत उपोषणाला बसले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हे उपोषण सुरू करण्यात आले. या प्रकरणाची मालेगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू असून उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती जिल्हा प्रशासनाच्या वतीने संबंधित कुटुंबाला करण्यात आली आहे.

शहानवाज मोहम्मद मन्सुरी यांचा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात १६ जानेवारी रोजी मृत्यू झाला. कारागृहाचे अधीक्षक साळी, जेलर कारकर आणि डॉ. कुमावत यांच्या हलगर्जीपणामुळे मन्सुरी यांना वेळेत योग्य उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मन्सुरी यांचे कुटुंबीय सोमवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसले आहेत.

शहानवाज मन्सुरी यांच्या समवेत मुलगा शोएब आणि अन्य तिघेजण कारागृहात बंदिस्त आहेत. प्रकृती ठीक नसल्याने शहानवाज हे उपचारासाठी कारागृहातील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत होते. उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे, अशी विनंतीही त्यांनी केली होती. मात्र, मोबदल्यात कारागृह प्रशासनाच्या काही अपेक्षा असल्याचा आरोप मुमताज मन्सुरी यांनी केला आहे.

उपचारांबाबत केलेल्या अर्जांच्या प्रती जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनासोबत जोडल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना सेवेतून काढून टाकावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची व्यथा समजून घेतली. मालेगाव उपविभागीय अधिकाऱ्यांनी मन्सुरी यांच्या मृत्यूची चौकशी सुरू केली असून उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. प्रशासनाला सहकार्य करीत उपोषण मागे घेण्याची तयारी या कुटुंबाने दर्शविल्याचे डॉ. मंगरूळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images