Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पाच लाखांचा गुटखा नाशिकरोडला जप्त

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड परिसरातील सुभाष रोडवरील लक्ष्मी मार्केटमध्ये उभ्या असलेल्या टेम्पोमधील पावणेपाच लाख रुपयांचा पानमसाला (गुटखा) जप्त करण्यात आला. क्राइम ब्रँचच्या सेंट्रल युनिट आणि अन्न व औषध विभाग (एफडीए) यांनी संयुक्तपणे कारवाई केली. या प्रकरणी संशयित व्यावसायिकाविरुद्ध नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

रामविलास शिवनारायण लोहिया (५५, रा. लोकमान्यनगर, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. बंदी घालण्यात आलेल्या गुटखाची विक्री लक्ष्मी मार्केटमध्ये होत असल्याची माहिती युनिटचे पोलिस निरीक्षक के. डी. पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी (दि. १६) सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी छापा मारला. यावेळी 'एफडीए'चे अन्न सुरक्षा अधिकारी डी. के. सोनवणे आपल्या पथकासह हजर होते. या संयुक्त पथकाने लक्ष्मी मार्केटमधील चोरडिया भवनच्या पाठीमागे कोपऱ्यात उभ्या असलेल्या टेम्पोकडे (एमएच १५ एफक्यू ००१३) मोर्चा वळविला. पथकाने केलेल्या तपासणीत चार लाख ७३ हजार ९८० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखू (पानमसाला) आढळून आला. पोलिसांनी गुटखा आणि टेम्पो असा एकूण सहा लाख २३ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी डी. के. सोनवणे यांच्या तक्रारीनुसार, नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये रामविलास लोहियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन सावंत करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक के. डी. पाटील, कुमार चौधरी, सहायक निरीक्षक एस. सी. सावंत, उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, सहायक उपनिरीक्षक शंकर गोसावी, हवालदार बी. आर. कर्डीले, हवालदार ए. व्ही. रेवगडे, दिपक पाटील, पोलिस नाईक जी. एस. केदार, एस. पी. गामणे, एस. एस. पवार, रेखा गायकवाड, शिपाई भरत दिंडे, कॉन्स्टेबल जर्नादन जाधव, अतुल पाटील आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षाचालकाकडून विनयभंग

0
0

मॅरेथॉन चौकात घटना; महिलेला दुखापत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाठलाग करीत रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केला. रिक्षात खेचल्याने महिलेला दुखापत सुद्धा झाली. ही घटना गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकात घडली असून, याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नीलेश कोठुळे असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, दुपारच्या सुमारास महिला गंगापूररोडवरील ज्योती बुक स्टोअर्सजवळ उभी असताना हा प्रकार घडला. या ठिकाणी आलेल्या संशयित आरोपीने तिचा हात पकडला. यानंतर सदर महिला बसमध्ये बसून निघाली असता त्याने तिचा रिक्षाने (एमएच १५, झेड ८३८५) थेट घरापर्यंत पाठलाग केला. बसमध्ये उतरून घराकडे निघालेल्या महिलेला थांबवून संशयिताने तिला रिक्षात बसण्यासाठी बळजबरी सुरू केली. यात महिलेच्या डोक्यास रॉड लागून दुखापत झाली.

किरकोळ कारणातून मारहाण

किरकोळ कारणातून कुरापत काढून तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. यावेळी संशयितांनी फिर्यादीच्या गळ्यातील अर्धा तोळा वजनाची सोन्याची चेन लांबविली असून, ही घटना बिटको कॉलेजजवळील आत्मतीर्थ कॅफेजवळ घडली. याबाबत तिघांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी शुभम दिलीप चौधरी (२१, रा. गवळीवाडा, देवळाली कॅम्प) याने फिर्याद दिली. शुभम बुधवारी (दि. १६) दुपारी ३ वाजेच्या सुमारास आत्मतीर्थ कॅफेजवळ चहा पित होता. याच वेळी संशयित अनिकेत वाजे (रा. फर्नांडिसवाडी, नाशिकरोड) व त्याचे दोन साथीदार शुभमजवळ आले. त्यांनी त्याला "बाजूला हो," असे म्हणून कुरापत काढत शिवीगाळ केली, तर मारहाण करून त्याच्या गळ्यातील अर्धा तोळे सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून नेली. संशयितांनी त्यास ठार मारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून पोबारा केला.

शेकोटीच्या कारणावरून घरावर दगडफेक

शेकोटीत पालापाचोळा टाकल्यामुळे धूर झाल्याने संशयितांनी तरुणाला शिवीगाळ करीत त्याच्या घरावर दगडफेक केली. ही घटना देवळाली गावातील महात्मा फुले रोडवर असलेल्या भैरवनाथ मंदिरासमोर घडली. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भैरवनाथ मंदिरासमोर संजय वर्मा (१८, रा. महात्मा फुले रोड, देवळाली गाव) आणि त्याचा मित्र ओमकार साखला हे रात्री शेकोटी करून शेकत होते. शेकोटीत त्यांनी पालापाचोळा टाकला. त्यामुळे धूर होऊन संशयित उद्देश चंदेल, किशोर निकम, राहुल निकम, बाबू मणियार (सर्व रा. देवळाली गाव, नाशिकरोड) यांनी संजय वर्मा यास शिवीगाळ सुरू करीत धक्काबुक्की केली. तसेच तो घरी असताना त्याच्या घराजवळ येऊन संशयितांनी त्याच्या घराच्या दरवाजावर दगडफेक करून लाथा मारल्या. यानंतर संशयित उद्देश चंदेल याने धारदार तलवार संजय वर्मा याच्या घराच्या दरवाजाच्या फटीतून आत घालून दरवाजा तोडला, तसेच त्याला ठार मारण्याची धमकी दिली.

चॉपर बाळगणारा अटक

चॉपर व गावठी कट्ट्यासारखे दिसणारे लायटर बाळगणाऱ्या तरुणास पंचवटी पोलिसांनी अटक केली. पंचवटीतील अमरधाम रोडवर बुधवारी (दि. १६) दुपारी सव्वाचार वाजता ही कारवाई करण्यात आली. विजय राजेंद्र पाटील (२०, लाकडी वखारीजवळ, अमरधाम, पंचवटी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. विजयकडे धारदार चॉपर व गावठी कट्ट्यासारखे दिसणारे लायटर असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यानुसार, त्याला अटक करण्यात आली. पोलिस नाईक काकड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.

..........

हौदात पडल्याने तरुणाचा मृत्यू

पाणी घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला फिट येऊन हौदात पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना हेडगेवारनगर परिसरात झाली असून, याबाबत अंबड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

लखन कारभारी जाधव (२८, रा. मनपा ऑफिससमोर, हेडगेवारनगर, अंबड) असे तरुणाचे नाव आहे. जाधव हा मंगळवारी (दि. १५) रात्री ८ वाजेच्या सुमारास घराजवळील हौदात पाणी आणण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला अचानक फिट आल्याने तो हौदात पडला. पाण्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

कुंभारवाड्यात आत्महत्या

अमरधामरोडवरील कुंभारवाड्यात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कामधंदा नसल्याच्या नैराश्यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नरेंद्र नंदूशेठ इखनकर (३२, रा. साईबाबा मंदिराच्या मागे, कुंभारवाडा) असे या व्यक्तीचे नाव आहे. नरेंद्र इखनकर याने बुधवारी (दि. १६) रात्री सव्वाआठ वाजता घरातील हॉलमधील सिलिंगला हुकाच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली.

जाधव संकुलमध्ये तरुणाचा गळफास

अंबड येथील जाधव संकुलाजवळ असलेल्या पाटील पार्कमध्ये २६ वर्षाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण कळले नसून, याबाबत अंबड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दिलीप पामेश्‍वर मल्हा (रा. पाटील पार्क, जाधव संकुल) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दिलीप मल्हा याने अज्ञात कारणातून घरी असताना मंगळवारी (दि. १५) रात्री ८ वाजेच्या सुमारास गळफास लावून घेत आत्महत्या केली.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चित्रपट चावडी’ मध्ये उद्या ‘नाझरीन’

0
0

'चित्रपट चावडी'त उद्या 'नाझरीन'

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि. यांच्यावतीने 'चित्रपट चावडी' उपक्रमांतर्गत उद्या (१९ जानेवारी) सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध स्पॅनिश दिग्दर्शक लुई ब्युनेल यांचा 'नाझरीन' हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे. १९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या स्पॅनिश चित्रपटाचा कालावधी ९४ मिनिटांचा आहे. हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन लाख रुपये आणायचे कोठून?

0
0

लोकहितवादी मंडळाचा संतापजनक सवाल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्योतिकलश सभागृह पूर्ववत सुरू करण्यासाठी महापालिकेने ३,१८,५१५ रुपये त्वरित भरण्याची सूचना करून त्यासोबत काही अटी शर्ती ठेवलेल्या आहेत. परंतु, लोकहितवादी ही लोकोपयोगी संस्था असून इतकी रक्कम आणायची कोठून, असा संतापजनक सवाल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

महापालिकेने राका कॉलनीतील ज्योतिकलश सभागृह सील केल्यानंतर सांस्कृतिक वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणी महापालिका चुप्पी साधून होती; परंतु राजकीय क्षेत्रातील मंडळींनी यात हस्तक्षेप केल्यानंतर महापालिकेने अधिकारी वर्ग आणि लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात तोडगा काढण्याऐवजी मंडळाला कोड्यात टाकल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महापालिकेने या प्रकरणी जो तोडगा काढला आहे तो अत्यंत खर्चिक असून इतकी रक्कम उभी कोठून करायची असा सवाल मंडळाचे पदाधिकारी करीत आहेत. स्वतंत्र गेटसाठी पैसा आणायचा कोठून, तसेच पैसा उभा करण्यासाठी या जागेचा वापर होऊ न देण्याची अट तर विचित्र आहे. असे असेल तर संस्था पैसा कोठून उभा करणार, असा पेच पदाधिकाऱ्यांपुढे पडला आहे. नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेणे, त्यासाठी साहित्य आणणे, रंगमंच किंवा इतर वस्तू, चहा, नाश्ता यांचा खर्च भागविण्यासाठी कलाकार खिशातून खर्च करेलही; परंतु तो किती दिवस करणार? कलाकार एकवेळ आपला वेळ देऊ शकेल. परंतु, रोज पैसा कसा खर्च करणार, असाही प्रश्न पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

महापालिकेने या अटीशर्तींच्या बाबतीत शिथिलता बाळगावी, अशी विनंतीदेखील लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या प्रकरणी पुढे काय होते, याबाबत कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशा आहेत अटी-शर्ती

- तीन लाख वीस हजार रुपये भरणे,

- भाडे भरल्यावरच करारनामा होणार,

- उद्यान विकसित करून त्याचा वापर नागरिकांसाठी खुला करणे

- उद्यानाच्या जागेसाठी स्वतंत्र गेटची व्यवस्था ठेवावी

- २४ तास सुरक्षारक्षक नेमावा

- जागेचा गैरवापर वा गैरकृत्य होणार नाही याची काळजी घ्यावी

- जागेचा व्यावसायिक वापर न करणे

- करारनाम्यातील इतर अटी-शर्तींचे पालन करणे

लोकहितवादी मंडळ संस्थेला कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही. ना महापालिकेचे ना सरकारचे. त्यामुळे इतकी रक्कम आणायची कोठून, असा प्रश्नच आहे. लोकोपयोगी कामासाठी लोकहितवादी मंडळ काम करते. समाजसेवेचे वसा घेऊन काम करणाऱ्या संस्थेकडून इतके पैसे मागणे योग्य वाटते का?

- मुकुंद कुलकर्णी,

कार्याध्यक्ष, लोकहितवादी मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यसाठा लुटण्याचा प्रयत्न

0
0

शस्त्रे दाखवून ट्रक पळविला; उत्पादन शुल्ककडून ४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात बंदी असलेला दमणमध्ये उत्पादित तब्बल ४७ लाख रुपयांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला. मद्यसाठा घेऊन जाणारा ट्रक शस्त्रास्त्रांच्या जोरावर तस्करांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सतर्कता दाखवत तस्करांचा हा प्रयत्न हाणून पाडला.

या प्रकरणी संशयित जावीद अलाउद्दीन तेली (३१, रा. शास्त्रीनगर, नवापूर), अमर कैलास वर्मा (२२, रा. जनता पार्क, नवापूर), राहुल राजू गायकवाड (२८, रा. चिंचबन, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी), शरदभाई नारायण ठाकूर (३७, रा.जयशक्तीनगर, जलालपूर, नवसारी, गुजरात) यांना अटक करण्यात आली. दमणमध्ये उत्पादित मद्य स्वस्त असल्याने तस्करी करून ते राज्यात आणले जाते. या मद्यामुळे राज्याचा महसूल घटतो. नाशिकला असे प्रकार सातत्याने घडतात. त्यामुळे येथील भरारी पथकांना सातत्याने कारवाई करावी लागते. याच मद्याचा मोठा साठा चांदवड तालुक्यातील नाशिक-देवळा रोडवरील खेलदरी शिवारातून शहराकडे येणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार आयुक्त अश्विनी जोशी, संचालक सुनील चव्हाण, उपआयुक्त प्रसाद सुर्वे, चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक एम. बी. चव्हाण, देवदत्त पोटे, कैलास कसबे आदिंनी या मार्गावर सापळा रचला.

संशयित दहा चाकी ट्रक (जी.जे ३१ टी. १५४९) यावर पथकाला संशय आला. पथकाने तो ट्रक रोखून तपासणी केली असता पोत्यांमागे मद्याचा साठा आढळून आला. त्यानुसार भरारी पथकाने विविध कंपनीची व्हिस्की, बियर बॉक्स असा ४७ लाख ६६ हजार ४०० रुपयांचा मद्दसाठा तसेच ट्रक आणि स्विफ्ट कार असा ६५ लाख ९१ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, जप्त करण्यात आलेला ट्रक मुख्यालयात जमा करण्यासाठी आणत असताना तस्करांनी चारचाकी, दुचाकीवरून पाठलाग करत ट्रक घेऊन जाणाऱ्या पथकावर दगडफेक करुन शस्त्रे रोखली. पिंपळगाव बसवंत येथील उड्डाणपुलावर संशयित आरोपी मिलींद मधूकर पवार (४०, रा. चिंचबन, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी) व त्याचे चार साथिदार झायलो कारमधून आले. त्यांनी ट्रक रस्त्यात अडवून शस्त्रे दाखवून ट्रक पळवून देण्यास हातभार लावला. मात्र, भरारी पथकाने सर्तकता दाखवून संबंधित ट्रक दुसऱ्या पथकाच्या मदतीने पकडला. या प्रकरणी वरील संशयितांसह मद्यविक्रेते, मद्य पुरवठादार, मद्य विकत घेणार अशा ज्ञात व अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगर हत्येतील तिसरा संशयित अटकेत

0
0

भुसावळ येथे सापळा रचून कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर येथील सुपरमार्केटचे मालक अविनाश शिंदे यांच्या हत्येप्रकरणी पंचवटी पोलिसांनी भुसावळ येथे दडून बसलेल्या तिसऱ्या संशयित आरोपीस गुरुवारी अटक केली. या प्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या दोघा संशयितांना कोर्टाने २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तिसऱ्या आरोपीच्या अटकेमुळे या गुन्ह्याची स्पष्ट उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

विलास राजू मिरजकर (२६, रा. तेलंगवाडी, पेठरोड) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. शिंदे हत्याकांडानंतर परागंदा झालेल्यापैकी दोघा संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. मात्र, त्यांचे इतर साथिदार फरार आहेत. आरोपींपैकी एक असलेला मिरजकर भुसावळ येथे दडून बसल्याची माहिती पंचवटी स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना समजली होती. त्यानुसार, एसीपाअय शेगर यांच्यासह एक पथक भुसावळला रवाना झाले. तिथे अत्यंत शिताफीने पोलिसांनी तपास करीत मिरजकरला ताब्यात घेतले. मिरजकरने खूनाच्या गुन्ह्यातील सहभागाबाबत कबुली दिली. दरम्यान, शिंदे हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची संख्या आता तीन झाली आहे. पोलिसांनी यापूर्वी चिमा नाना पवार आणि सुनील रामचंद्र पवार यांना अटक बुधवारी (दि. १६) केली. त्यांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले.

२५ जानेवारीपर्यंत कोठडी

फरार झालेल्या आरोपींचा शोध घेणे, चाकू आणि रोकड हस्तगत करणे आदी कारणांसाठी संशयितांना पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षातर्फे करण्यात आली. त्यानुसार कोर्टाने दोघांना २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, आज ताब्यात घेण्यात आलेल्या मिरजकरला शुक्रवारी (दि. १८) कोर्टात हजर करण्यात येईल. अटक झालेले आणि फरार आरोपी यांच्यापैकी शिंदे यांच्यावर नक्की हल्ला कोणी केला. तसेच लूट करून नेण्यात आलेली रक्कम कोठे आहे, याचा तपास अद्याप सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक संघटनेचेआज आंदोलन

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षक महासंघाच्या वतीने आज, शुक्रवारी गोल्फ क्लब येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षक महासंघाचे सचिव संजय शिंदे यांनी दिली.

शिक्षक संघाच्या वतीने हे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन आहे. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कायम विनाअनुदान तत्त्वावरील मूल्यांकन पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी घोषित करून त्यांना त्वरित अनुदान देणे, २०११-१२ पासूनच्या शिक्षकांच्या वाढीव पदांना मंजुरी देणे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील जास्तीत जास्त कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. शिंदे, अनिल महाजन यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हत्या प्रकरणी दोघांना जन्मठेप

0
0

सराईत गुन्हेगाराच्या हत्येचा घेतला होता बदला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील सराईत अल्पवयीन गुन्हेगार ऋतिक उर्फ पाप्या शेरगीलच्या खुनाचा बदला घेण्यासाठी चेतन पवार या अल्पवयीन संशयित आरोपीची हत्या केल्या प्रकरणी जिल्हा कोर्टाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हत्येची घटना १९ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गजबलेल्या तिबेटियन मार्केट येथे झाली होती.

हरिश राजू शेरगील उर्फ हऱ्या (२२, रा. फुलेनगर, पंचवटी) आणि ललित सुरेश राऊत उर्फ लल्या (१९, रा. फुलेनगर, पंचवटी) अशी कोर्टाने शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. हरिशचा भाऊ पाप्या शेरगील या सराईत आरोपीची पंचवटीतील उन्नती शाळेजवळ ७ फेब्रुवारी २०१७ रोजी हत्या झाली होती. पाप्याच्या हत्येत चेतन पवार हा एक संशयित आरोपी होता. इयत्ता दहावीच्या सराव परीक्षेचा पेपर देऊन शाळेबाहेर पडणाऱ्या पवारसह त्याच्या तीन ते चार शाळकरी मित्रांनी पाप्याची हत्या केली होती. चेतनवर हत्येप्रकरणी बालन्याय मंडळात खटला सुरू झाला होता. १९ ऑगस्ट २०१७ रोजी चेतन त्याच्या आई-वडील आणि भावासह सुनावणीसाठी बालन्याय मंडळासमोर हजर झाला होता. सुनावणीनंतर हे सर्व खरेदीसाठी तिबेटियन मार्केट येथे पोहचल्यानंतर आरोपींनी आपल्या अल्पवयीन साथिदारांसह चाकू, चॉपर आणि कोयत्यानिशी हल्ला चढविला. यावेळी चेतनच्या पालकांसह त्याच्या भावासही मारहाण करण्यात आली. यात गंभीर जखमी झालेल्या चेतनचा मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सहायक पोलिस निरीक्षक विलास शेळके यांनी तपास करून जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अॅड. रवींद्र एल. निकम यांनी काम पाहिले. समोर आलेले साक्षीदार, फिर्यादी, पंच तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार कोर्टाने दोघा सज्ञान आरोपींना हत्येप्रकरणी दोषी ठरवित जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पोलिस नाईक रवींद्र पानसरे, पैरवी अधिकारी हवालदार व्ही. एन. लांडे, पोलिस नाईक आर. आर. जाधव यांनी खटल्याच्या कामाचा बारकाईने पाठपुरावा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डिफेन्स हबवर शिक्कामोर्तब

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशातील दुसरे डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिकला जाहीर झाले आहे. तशी अधिकृत घोषणा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली. ओझर टाऊनशिप येथे आयोजित 'डिफेन्स इंडस्ट्री स्टेकहोल्डर्स सेमिनार'च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी डॉ. भामरे म्हणाले की, संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेवर देशाच्या लष्कराची क्षमता अवलंबून आहे. त्या दृष्टीने संरक्षण सामग्रीसाठी स्थानिक पातळीवर संशोधन व उत्पादन होण्यासाठी पहिले डिफेन्स हब कोईम्बतूर येथे असून, दुसरे हब नाशिक येथे सुरू करण्यात येत आहे. या क्षेत्रातील सहभागीदारांना याचा लाभ होईल आणि देशांतर्गत उद्योगांनादेखील प्रोत्साहन मिळेल. या हबचा फायदा राज्यभरातील लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगाला होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, संरक्षण निर्मिती विभागाचे सचिव डॉ. अजय कुमार, एअर मार्शल व्ही. आर. चौधरी, भारतीय नौसेनेचे व्ही. मोहनदास, डीआरडीओचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. के. मेहता, एचएएलचे अध्यक्ष आर. माधवन, भारत फोर्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. भाटिया, संरक्षण सचिव संजय जाजू आदी उपस्थित होते. डिफेन्स हबसाठी देशातील पाच शहरांनी जोर लावला होता. मात्र, नाशिकध्ये हे हब व्हावे, अशी आग्रही मागणी आपण केली. अखेर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांनी त्यास दुजोरा दिला. त्यामुळे नाशिकमध्ये हे हब जाहीर करताना आपणास विशेष आनंद होत असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.

उद्योजकांना प्रोत्साहन

हबसाठी सर्वप्रथम आता विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाणार आहे. त्यात 'निमा' या उद्योजकांच्या संस्थेची भूमिका मोलाची राहणार आहे. नाशिक परिसरात कुठले संरक्षण उद्योग आहेत, त्यांना नक्की काय मदत हवी आहे, कुठल्या सुविधा हव्या आहेत, येथे संरक्षण उद्योगवाढीसाठी काय उपाययोजना करायच्या आहेत, आदी बाबी अहवालातून स्पष्ट होतील. त्यानंतर याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी एचएएल आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बेल) या दोन सरकारी संस्थांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येईल. खासगी उद्योगांना संशोधन व विकासासाठी अधिकाधिक प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांची उत्पादने खरेदी केली जातील. लष्कर, हवाईदल आणि नौदलाला नक्की काय हवे आहे, हे उद्योगांना सांगितले जाईल. आयात घटवून देशांतर्गत भागात उत्पादनांच्या निर्मितीला चालना देण्यात येईल. यातून नाशिक, तसेच उत्तर महाराष्ट्रात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येईल आणि रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणावर होईल, असे भामरे यांनी स्पष्ट केले.

देशांतर्गत उत्पादन

जागतिक पातळीवर शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचे स्थान होते. शस्त्रांची मागणीही वाढत आहे. लष्करी सामग्री निर्मिती क्षेत्रात स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे पोषक वातावरणाची निर्मिती झाली आहे. परेदशी उद्योगांना या बाजारातील संधी साधण्यासाठी स्थानिकांच्या सहकार्याने देशातच शस्त्र सामग्री उत्पादनाचा प्रयत्न 'डिफेन्स इनोव्हेशन हब'च्या माध्यमातून करण्यात येईल, असेही डॉ. भामरे म्हणाले.

रोजगार निर्माण होणार

हबमुळे उद्योजकांना अनेक संधी प्राप्त होतील. प्रगत शैक्षणिक संस्थांमुळे मिळणारे कुशल मनुष्यबळ, विमानसेवा, मुंबई- आग्रा महामार्ग, रेल्वेमार्ग, धरणांमुळे असणारी पाण्याची उपलब्धता असल्याने नाशिकचा विकास आणि विस्तार वेगाने होत आहे. देशाच्या संरक्षण सिद्धतेत नाशिकचे यापुढे योगदान राहणार आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. हबमुळे स्थानिक स्तरावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीलादेखील चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत पहिल्या पाचमध्ये

संरक्षण उत्पादन धोरणांतर्गत २०२५ पर्यंत संरक्षण क्षेत्रातील उत्पादन करणाऱ्या पहिल्या पाच देशांत भारताला आणण्याचे व ३५ हजार कोटी निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी आवश्यक सुविधा आणि भविष्यातील तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी उद्योग जगताचा संरक्षण मंत्रालयाशी असणारा संवाद महत्वाचा आहे. दोघांच्या परस्पर सहकार्याने संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णता आणि सिद्धतेसाठी मदत होईल, असे डॉ. भामरे यांनी सांगितले. संरक्षण क्षेत्रातील नव्या धोरणानुसार संरक्षण क्षेत्रातील भारतीय खासगी क्षेत्राच्या भागीदारीला चालना मिळण्यासाठी थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्के करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

हनी ट्रॅपची दखल

पाकिस्तानकडून हनी ट्रॅपसारख्या तंत्रांचा वापर केला जात आहे. याप्रकरणी लष्कराने संबंधित जवानांची चौकशी सुरू केली आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईलच. पण, संरक्षण मंत्रालयानेही त्याची गंभीर दखल घेतली आहे. असे प्रकार यापुढे घडू नयेत यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार चव्हाण अनुपस्थित

0
0

खासदार चव्हाण अनुपस्थित

हा कार्यक्रम ज्या ठिकाणी झाला ते ओझर टाऊनशीप दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येते. मात्र, तेथील भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे कार्यक्रमाला अनुपस्थित होते. तर, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे थेट व्यासपीठावर उपस्थित होते. ज्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम आहे तेच गायब असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. दरम्यान, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाची समिती लक्षद्वीप दौऱ्यावर गेलेली असून, यात खासदार चव्हाणही सहभागी झालेले असल्याने ते कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत, अशी माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात संशयितांना पोलिस कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रिणीशी ठेवलेल्या प्रेमसंबंधांमुळे उद्भवलेल्या वादातून अरबाज शेरू पठाण या तरुणाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सात संशयितांना कोर्टाने २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भिमवाडी परिसरात संक्रांतीच्या दिवशी रात्री आठच्या सुमारास हत्येचा प्रकार घडला होता. हत्येच्या गुन्ह्यात कुणाल बापू कापसे (२१), बॉबी बथुवेल जगदाने (१९), विशाल बेकारू भगवती (१८), राहुल दत्तू लहांगे (१८, सर्व रा. मल्हारखान, अशोकस्तंभ), अनिकेत नितीन टोपले (२०), गौरव दिलीप उन्हवणे (१८,) आणि विकी पाटील अशा सात जणांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली होती. या संशयितांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले. सरकारी व बचाव पक्षाच्या युक्तीवादानंतर कोर्टाने संशयितांना २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजित दादा फोटो

गोवर्धनेमध्ये भूगोल दिन साजरा

0
0

गोवर्धने कॉलेजात भूगोल दिन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इगतपुरी येथील मविप्र समाजाचे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स भूगोल विभागाच्या वतीने भूगोल दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन व पृथ्वी गोलाचे पूजन करण्यात केले. प्रास्तविक पूजा जाखेरे या विद्यार्थिनीने केले. प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थांनी नेहमी पृथ्वीवरील सर्व घटकांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, पर्यावरण संतुलन राखण्यास जणजागृती करावी तसेच सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी पर्यटन स्थळ यांना भेटी देऊन संशोधन करावे असे त्यांनी सांगितले. तसेच राजेश गोवर्धने, रश्मी बिडवे, प्रेरणा जाधव, या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, भूगोल विभागप्रमुख प्रा. यू. एन. सांगळे, प्रा. डॉ. एम. एस. पाटील, प्रा. बी. एस. राजेभोसले, प्रा. एल. सी. देवरे व विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रजनीताईंमुळे विशेष मुलांच्या सक्षमीकरणास बळ

0
0

रजनीताईंमुळे विशेष मुलांचे सक्षमीकरण

नीलिमा पवार यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देव प्रत्येक व्यक्तीचे नशीब लिहून त्याला पाठवत असतो, तसे; रजनीताईंचे नशिबही देवाने लिहून पाठवले होते. त्यांच्या पोटी 'विशेष' मुलाला देऊन शेकडो मुलांमध्ये सक्षमीकरणाचे बीज त्यांनी रोवले. या मुलांच्या प्रश्नाचे उत्तर त्या स्वत:च्या मुलामध्ये शोधत असत. एक आई आपल्या मुलाला घडविण्यासाठी किती कष्ट घेऊ शकते, हे रजनीताईंनी वेळोवेळी दाखवून दिले, असे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले.

प्रबोधिनी ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्षा रजनीताई लिमये यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त 'दरवळ रजनीगंधाचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या सुनीता महाले यांना लिमये यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शंकराचार्य संकुलातील कुर्तकोटी सभागृहात हा कार्यक्रम बुधवारी पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नीलिमा पवार होत्या. रजनीताईंचे अनुकरण खूप लोकांनी करत मानसिक अपंग असलेल्या मुलांना बळ दिले असेही त्या म्हणाल्या. पुरस्कारार्थी सुनीता महाले यांनी रजनीताईंच्या कामाला आणखी सक्षम करू, अशी भावना व्यक्त केली. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संध्या देवरुखकर यांनी पत्ररुपातून रजनीताई आणि त्यांची मैत्री समोर आणली. कवी किशोर पाठक यांनी रजनीताई या दीपस्तंभासारख्या होत्या असे म्हणत कवितेचे सादरीकरणही केले. लिमये यांची मुलगी अंजू यांनीदेखील आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रबोधिनी ट्रस्टच्या अध्यक्षा सुलभा सरवटे, उद्योजक प्रकाश रत्नपारखी, दिलीप भगत आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी 'आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही', या गीतांनी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात उदंड जाहली दारू!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक कार्यालयाला दारूच्या उत्पादन शुल्कापोटी नऊ महिन्यांत गेल्या वर्षीपेक्षा ५१४ कोटींचे जास्त उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१७ या नऊ महिन्यांत १३६० कोटी रुपये शुल्क मिळाले होते. पण, २०१८ मध्ये ही रक्कम १८७४ कोटींपर्यंत गेली आहे. ही वाढ तब्बल ३८ टक्के आहे. जिल्ह्यात चार दारू निर्मिती कारखाने असून, त्यांच्या उत्पादनावरील हे शुल्क आहे. त्यात किरकोळ रक्कम जिल्ह्यातील मद्यपरवाना शुल्काची आहे.

या विभागाला २०१७-१८ या आर्थिक वर्षात १८८० कोटी रुपये उत्पादन शुल्क मिळाले होते. त्यावेळी त्यात ४० कोटी रुपये जिल्ह्यातील दारु दुकानांच्या लायसन्स फीचे होते. ही वाढ त्यावेळेस १३ टक्के होती. २०१६-१७ मध्ये हेच उत्पन्न १६६२ कोटी होते. पण, २०१८ मधील अवघ्या नऊ महिन्यांतच हे उत्पन्न १८७४ कोटी झाले आहे. जिल्ह्यातील दारू बनविणाऱ्या चार कारखान्यांमधून उत्पादन झाल्यानंतर ते राज्यात व देशभरात जाते. पण, त्याचे उत्पादन शुल्क हे संबंधित जिल्ह्यात भरावे लागते. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाला हा फायदा झाला आहे. राज्यात या उत्पन्नामुळे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जिल्ह्यात चाळीसहून अधिक वायनरीज् असल्या तरी सरकारने २०२१ पर्यंत त्यांना करात सूट दिली आहे. त्यामुळे या उत्पन्नामध्ये मोठा भाग हा दारू, बीअर व देशी दारुच्या उत्पादनावरील आहे. त्यातून हे शुल्क मिळालेले आहे. जिल्ह्यात दारूचे तीन कारखाने दिंडोरी तालुक्यात आहेत, तर एक इगतपुरी तालुक्यातील गोंदे येथे आहे. या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात दारू उत्पादन केले जाते.

महामार्गावरील दुकाने सुरू झाल्याचा फायदा

सर्वोच्च न्यायालयाने राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख मार्गांपासून ५०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारे दारू विक्री करण्यास बंदी घातल्यानंतर देशभर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकाने बंद झाली. नंतर हळूहळू यातील अटी शिथील केल्यामुळे अधिकृत दुकानांची संख्या वाढली. त्यामुळे देशभर दारूची मागणीही वाढली. त्यामुळे उत्पादन शुल्कही वाढले. दारूच्या किमती वाढल्याचाही शुल्कावर सकारात्मक परिणाम झाला आहे.

जिल्ह्यातील उत्पादन शुल्क

२०१६-१७ - १६६२ कोटी

२०१७-१८ - १८८० कोटी

२०१८ -१९ - १९७४ कोटी

(एप्रिल ते डिसेंबर २०१८)

जिल्ह्यातील चार कारखान्यांतून झालेले दारू उत्पादन व लायसन्स फीमुळे नऊ महिन्यांत १८७४ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. २०१७ मध्ये हेच उत्पन्न १३६० कोटी होते. ही वाढ ३८ टक्के असून, त्यामुळे उत्पादन शुल्काच्या बाबतीत जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

- सी. बी. राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादीचा सेनेला धक्का

0
0

राजकारण लोगो लावणे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला धक्का दिला असून, शिवसेनेचे माजी आमदार व जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते धनराज महाले यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रावादीत प्रवेश केला आहे.

मनमाड येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने दिंडोरी लोकसभा मतदार संघातील राजकीय गणिते बदलली आहेत. राष्ट्रवादीकडून महाले यांना लोकसभेची ऑफर दिल्याची चर्चा असून, शिवसेनेला मात्र या निर्णयाने मोठा झटकाच बसला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसह राष्ट्रवादीने अन्य पक्षांतील बडे मासे गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी शिवसेनेला झटका दिला असून, माजी आमदार महाले यांना पक्षात घेऊन एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. एकाच वेळी शिवसेना आणि भाजपला चेकमेट देत, दिंडोरीसाठी महाले यांच्या रुपाने तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. शुक्रवारी मनमाडमध्ये राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेत महाले यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. महाले हे जनता दलाचे माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे पुत्र असून, त्यांनी गेल्या वर्षभरापासून दिंडोरी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु, शिवसेना आणि भाजपमधील युतीबाबतचा घोळ मिटत नसल्याने अखेरीस महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करीत, उमेदवारी मिळ‌वण्याची खेळी खेळली आहे. महालेंच्या रुपाने राष्ट्रवादीला दिंडोरीत तगडा उमेदवार मिळाला असून, भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. महाले यांच्या वडिलांचे समर्थक दिंडोरी मतदार संघात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाल्यास फायदा होणार असून, चव्हाण यांना फटका बसणार आहे.

भारती पवार यांचे काय?

दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी डॉ. भारती पवार यांचे जवळपास नाव निश्चित झाले असताना महाले यांच्या प्रवेशामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वेळी त्यांनी या मतदार संघातून उमेदवारी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षा रक्षक द्या!

0
0

नाशिक : जुने नाशिकमधील जहांगिर मशिद कब्रस्थानमधील सुरक्षा भिंत कोसळल्याने तेथे मोकाट कुत्री घूसून दफन केलेले मृतदेह उकरून काढत आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त करण्यासह भिंतही उभी करण्याची मागणी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष शेख हनिफ बशीर यांनी महापौरांकडे केली आहे. महापौरांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोरांकडून धुडगूस

0
0

शाळा, क्लास परिसरात

टवाळखोरांचा धुडगूस

सातपूर : कामगारनगरी असलेल्या सातपूर भागात शाळा, खासगी क्लासेसच्या परिसरात टवाळखोरांचा धुडगूस नित्याचा झाला आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यावर पेंट्रोलिंग वाहन शाळा व खाजगी क्लासच्या परिसरात येतात. परंतु, पोलिसांचे वाहन येताच टवाळखोर धूमस्टाइल दुचाकी चालवत पोबारा करताना दिसतात. पोलिसांनी टवाळखोरांची योग्य माहिती घेत कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. महापालिकेच्या शाळांसह खासगी शाळा व क्लासेसचे मोठे जाळे सातपूर भागात पसरले आहे. शाळा व खाजगी क्लास भरतेवेळी व सुटतांना टवाळखोरांचा जाच विद्यार्थिनींना सहन करावा लागतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्थाचालकांनीच ठोकले शाळेला कुलूप

0
0

धुळ्यातील प्रकार; शिक्षकांच्या मनमानीमुळे निर्णय

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील साक्रीरोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयामागील अग्रसेन शाळेतील गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रकरणात संस्थाचालक आणि शिक्षक, कर्मचाऱ्यांचा गुरुवारी (दि. १७) सकाळी वाद झाला. यातून संस्थाचालक नंदलाल अग्रवाल यांनी संतापाच्या भरात शाळेलाच कुलूप ठोकल्याने पालकांचा संताप अनावर झाला. पालक व विद्यार्थ्यांनी चेअरमन अग्रवाल यांच्या घरावर मोर्चा नेत घोषणाबाजी केली. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने वाद आटोक्यात आला.

महाराजा अग्रसेन शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांचा संस्थाचालक यांच्यासोबत अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्याचे आज मोठ्या वादात रुपांतर होऊन संस्थाचालक नंदलाल अग्रवाल यांनी शाळेलाच कुलूप ठोकल्याचा प्रकार समोर आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे म्हणून कुलूप ठोकल्याचा खुलासा चेअरमन अग्रवाल यांनी केला. तर दुसरीकडे संस्थाचालक विश्‍वासात घेत नसल्याची ओरड मुख्याध्यापक, शिक्षकांनी केली. मात्र, या वादात मात्र ऐन थंडीत विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी भेट देऊन माहिती घेत शाळेचे कुलूप काढले. याबाबत सविस्तर माहिती घेऊन जो जबाबदार असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे अहिरे यांनी सांगितले.

असे आहे प्रकरण...
साक्रीरोडवरील विद्यावर्धिनी कॉलेज परिसरातील अग्रसेन शाळेत आजमितीस बालवाडी ते दहावीपर्यंत सुमारे १८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना ४० शिक्षक अध्यापनाचे धडे देत आहेत. शाळेच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते, शाळेच्या इमारतीत सर्व खोल्या, व्हरांड्यांमध्ये खूप घाण साचलेली आहे. मुख्याध्यापकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे, शिपायांचा कामचुकारपणा, शिक्षकांची असहकार्याची भूमिका यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने होणारी हेळसांड पहाता प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रत्यक्ष पहाणी करण्यास येईपर्यंत शाळा बंद ठेवली जाईल, असा फलक लिहून चेअरमन नंदलाल अग्रवाल यांनी गुरुवारी (दि. १७) सकाळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शाळेबाहेर काढून शाळेच्या मुख्य दरवाजाला कुलूप ठोकल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर पालक व विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा चेअरमन नंदलाल अग्रवाल यांच्या घराकडे वळविला. घरात चेअरमन व त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. परंतु, त्यांनी मोर्चेकरी पालकांच्या घोषणांकडे दुर्लक्ष केले. तब्बल दोन तास हा प्रकार सुरू होता. पोलिस निरीक्षक गणेश चौधरी यांना या घटनेची माहिती लागताच त्यांनी घटनास्थळी पोहोचत अग्रवाल यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणात संस्थाचालक अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. विद्यार्थ्यांना योग्य त्या शाळेत वर्ग केले जाईल, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉम्बच्या अफवेने धुळे कारागृहात धांदल

0
0

औरंगाबाद पथकाला निनावी फोन; चर्चांना उधाण

म. टा. वृत्तसेवा, धुळे

औरंगाबाद बॉम्बशोधक पथकाला अज्ञात व्यक्तीने गुरुवारी (दि. १७) फोनवरून माहिती दिली की, धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बॉम्ब ठेवण्यात आला आहे. यानंतर औरंगाबाद बॉम्ब शोधक विभागाने ही माहिती धुळे जिल्हा पोलिस कंट्रोल रूमला कळविली. तातडीने गुरुवारी सायंकाळी धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृह परिसर बॉम्बशोधक पथकाने पिंजून काढला मात्र, त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे ही केवळ अफवा ठरली असून, रात्रभर धुळ्यात यावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

अज्ञात व्यक्तीने गुरुवारी (दि. १७) फोन करून धुळे जिल्हा कारागृहात बॉम्ब असल्याची माहिती दिली. याबाबत धुळे पोलिस यंत्रणेला माहिती मिळाल्यावर तातडीने बॉम्ब शोध पथक बोलाविण्यात आले. ही बातमी समजल्यावर नागरिकांनी कारागृहाजवळ गर्दी केली होती. पोलिस निरीक्षक गणेश चौधरी व कर्मचाऱ्यांनी कारागृह व परिसराला छावणीचे स्वरूप दिले होते. या घटनेमुळे शहरासह जिल्ह्यात निरनिराळ्या अफवा पसरत होत्या. सोशल मीडियावरदेखील याबाबत चर्चांना उधाण आले होते.

अगोदरच्या अफवांची झाली आठवण
याअगोदरही गेल्यावर्षी धुळे बसस्थानकावरही बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविण्यात आली होती. या वेळी बसस्थानकावर प्रवाशांची धावपळ उडाली होती. शहरात याची माहिती गेल्यावर नागरिकांत भीतीचे वातावरण निार्मण झाले होते. शहरातील कनोसा इंग्लिश स्कूलमध्येही याअगोदर बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली होती. त्यावेळीही सकाळच्यावेळी आलेल्या या अफवेने शिक्षकांची दमछाक उडाली होती. शहरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अशा अफवेच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या अफवेमागे कोण आहे, याचा शोध अजूनही पोलिसांना लागलेला नाही. हा निव्वळ मनोरंजनाचा भाग असल्याने काहींमध्ये या विषयाची चर्चा रंगली होती.

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी सायंकाळी औरंगाबाद फोन आल्याने धुळे जिल्हा बॉम्बशोधक पथकाने तत्काळ कारागृह व परिसराची मेटल डिटेक्टरने तपासणी केली. मात्र, याबाबत कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना कळवावे.
- वैभव आगे, जिल्हा कारागृह अधीक्षक, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images