Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तक्रारीशिवाय ‘लोकसंवाद’

$
0
0

घरकुलासाठी खेटा घालणारा मजूर प्रवेशापासून वंचित

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साहेब, २०१५ पासून सरकारी कार्यालयांना खेटा घालतोय. घरकुलासाठी अर्ज करून तीन वर्षे झाली. पण अजून घर मिळाले नाही. पाठपुरावा करूनही कुणी दाद लागू देत नाही. घरकुलांबाबत मुख्यमंत्री साहेब लोकांशी थेट बोलणार असल्याचे समजले. मलाही त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडू द्याल असे आर्जव करून सिन्नर तालुक्यातील मजूर घायकुतीला आला. परंतु, छान चाललेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उगीच रडगाणे नको, म्हणून त्याला प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स जिल्हा प्रशासनाला हवी होती अगदी तशीच पार पडली. हताश मजूर हात हलवित माघारी परतला असला तरी ही व्हिडीओ कॉन्फरन्स व्यवस्थित पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.

प्रत्येकाला हक्काचा निवारा मिळावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आग्रही आहे. आतापर्यंत हजारो लाभार्थींना घर दिल्याचा दावा केला जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यभरातील निवडक लाभार्थींशी संवाद साधला. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील रहिवाशी असलेला रमेश भगत मोलमजुरी करतात. राहण्यासाठी घरकुल मिळावे यासाठी त्यांनी २०१५ मध्ये अर्ज केला आहे. मात्र, अजूनही त्यांना घर मिळू शकलेले नाही. जिल्हा स्तरावरील सरकारी कार्यालयांमध्ये पाठपुरावा करूनही दाद दिली जात नसल्याने मंगळवारी त्यांनी थेट मंत्रालय गाठले. तेथील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून व्यथा मांडली. मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घरकुल योजनांच्या लाभार्थींशी बुधवारी (दि.२) संवाद साधणार आहेत. तुम्ही तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या कॉन्फरन्समध्ये व्यथा मांडा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे भगत हे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी दाखल झाले. या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये निवडक लाभार्थींनाच प्रवेश असल्याने त्यांना मज्जाव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांकडे थेट व्यथा मांडण्याची संधी आहे, मला माझे गाऱ्हाणे मांडू द्या, अशी वारंवार विनंती त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना केली. परंतु, या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांना आल्या पाऊली माघारी परतावे लागले.

'साहेब आमच्या गावी या!'

मुख्यमंत्र्यांशी संवाद साधता येणार असल्याने लाभार्थींमध्ये कमालीची उत्सुकता होती. नाशिकमधील सात-आठ लाभार्थींशी फडणवीस यांनी संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या स्मृती जपण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी आमच्या गावात स्तुप बांधला आहे. मात्र, या स्तुपाला वंदन करण्यासाठी एकही मंत्री गावी आलेला नाही. आपण आमच्या गावात अवश्य या, अशी विनंती सैय्यद पिंप्री येथील रहिवाशी दशरथ लोखंडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांना केली. तर सिन्नर तालुका नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसत असल्याने 'साहेब आमचा पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढा' असे आर्जव दातली येथील रहिवाशी रज्जाक सय्यद यांनी मुख्यमंत्र्यांना केले. या कॉन्फरन्सला जिल्हाभरातून ३० लाभार्थी उपस्थित होते. सरकारने हक्काचा निवारा दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करीत धन्यवादही दिले.

'घर सुंदर बांधलं तुम्ही!'

महिरवणी येथे आपल्या घरासमोरून संवादात सहभागी झालेले लक्ष्मण आणि नंदा पाडेकर यांना फडणवीस यांनी घराबद्दल विचारले. 'नमस्कार' असे म्हणत संवादाची सुरुवात करून 'फार सुंदर घर बांधलं तुम्ही, रंग वगैरे छान दिला' असे मुख्यमंत्री म्हणाले. 'रंग वगैरे तुम्ही ठरविला की साहेबांनी ठरविला' असे गमतीने विचारताच ती आमची पसंत असल्याचे नंदा पाडेकर म्हणाल्या. घर सुंदर झाल्याचे पुन्हा नमूद करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले. मातीचे घर असल्याने पावसाळ्यात खूप त्रास होत असे. प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळाल्याने मुलांना विशेष आनंद झाल्याचे सांगत पाडेकर दाम्पत्याने सरकारबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

२०१५ मध्ये अर्ज करूनही मला घरकुल मिळू शकलेले नाही. ते लवकर मिळावे यासाठी मी मंत्रालयापर्यंत जाऊन आलो. मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधता यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो. परंतु, मला आत जाऊ दिले नाही. लोकसंवादात माझी व्यथाही ऐकून घ्यायला हवी होती.

- रमेश भगत, मजूर

सामाजिक आणि आर्थिक सर्व्हेक्षण २०११ च्या यादीनुसार पात्र ठरू शकणाऱ्या लाभार्थींची यादी बनविण्यात आली आहे. रमेश भगत यांच्या नावाचा समावेश प्रपत्र डमध्ये असून त्यांच्यासारखे ३० हजार लोक घरकुलाच्या प्रतिक्षेत आहेत. घरकुलाच्या लाभापासून कुणालाही डावलले जाणार नाही.

- राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी

लोगो : निष्पक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नावा’ चषक स्पर्धा रविवारी रंगणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ६ जानेवारी रोजी क्रिकेट स्पर्धा रंगणार असून, या 'नावा चषका'च्या सामन्यांमुळे मीडिया क्रिकेट संघात उत्साहाचे वातावरण आहे.

नाशिक अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन(नावा)तर्फे टी-१० इंटर मीडिया क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (६ जानेवारी) रोजी सकाळी ८ वाजेपासून फ्रावशी इंटरनॅशनल स्कुलच्या मैदानावर स्पर्धेचे सामने होणार आहेत. या सामन्यांचे लॉट्स जाहीर झाले आहेत. त्यानुसार स्पर्धेत महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, लोकमत, माय.एफ.एम, दिव्य मराठी, पुण्यनगरी, सकाळ, देशदूत या माध्यमांच्या क्रिकेट संघांनी सहभाग घेतला आहे. नावा संघटनेचाही क्रिकेट संघ स्पर्धेत सहभागी होणार असून, नावा विरुद्ध पहिल्या सामन्यातील विजेत्या संघासोबत स्पर्धा होईल. त्यानंतर क्वॉटर फायनल, सेमी फायनल आणि फायनल स्पर्धा होतील. या स्पर्धेत विजेत्या संघाला 'नावा चषक' मिळणार असून, उत्कृष्ट बॅटसमॅन, बॉलर, मॅन ऑफ द मॅन आणि मॅन ऑफ द सिरिज, हे पुरस्कार देण्यात येणार आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी 'नावा'चे अध्यक्ष विठ्ठल देशपांडे, क्रिकेट समिती प्रमुख सचिन गिते व रवी पवार यांसह 'नावा'चे सर्व सदस्य आणि माध्यमांचे प्रतिनिधी संयोजन करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खबरदार! मुलांना वाहन दिले तर...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अल्पवयीन वाहनचालक आढळून आल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करण्याऐवजी त्यांना आता थेट कोर्टात धाडण्याचे काम नाशिक पोलिसांनी सुरू केले आहे. याप्रकरणी अल्पवयिनाचे पालक किंवा वाहन मालकाला जबाबदार धरण्याची मोहीम पोलिसांकडून राबविली जात आहे. त्यामुळे तीन जणांना थेट कोर्टात पाठविण्यात आले आहे. शहरातील ही पहिलीच कारवाई आहे.

यंदा वर्षी रस्ते अपघातांची संख्या कमी व्हावी, यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून वाहतूक सुरक्षेवर भर देण्यात येत आहे. त्याअंतर्गत अल्पवयिनांना वाहन देणाऱ्या पालकांवर, तसेच वाहन मालकांवर थेट कोर्टात केस केली जात आहे. २८ डिसेंबर रोजी वाहतूक पोलिसांनी तीन अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई केली. या वाहनांच्या मालकावर बाल न्याय मंडळात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार कोर्टाने दोन मालकांना दंडात्मक कारवाईची शिक्षा सुनावली. तिसऱ्या वाहनमालकावरील तक्रारीवर लवकरच सुनावणी होणार असल्याचे वाहतूक शाखेने सांगितले. शहरात वय वर्षे १५ ते १८ दरम्यानची अनेक मुले मुली विनापरवाना वाहन चालविताना वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्यास ते पुन्हा वाहने चालवितात. पण, अल्पवयीन वाहनचालकांना वाहने देणाऱ्यांनाही शिस्त लागावी, यासाठी मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन वाहनचालकांना वाहन चालविण्यास देणाऱ्यांवर कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारण्यास सुरुवात केली आहे. ही मोहीम कायमस्वरुपी सुरू राहणार असून, अल्पवयीन वाहनचालकास पडकल्यावर त्याचे वाहन जप्त करण्यात येणार आहे. ते वाहन कोर्टात हजर करून मालकाविरोधात बाल न्याय मंडळात तक्रार दाखल केली जाईल. त्यानंतर कोर्टाच्या सुनावणीनंतरच वाहन मिळेल. तसेच कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेस वाहन मालक जबाबदार असेल, असे वाहतूक शाखेने सांगितले आहे. तसेच या वाहन मालकांवर होणाऱ्या तक्रारींचा स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येईल. ज्या वाहन मालकावर तीनपेक्षा अधिक वेळा तक्रार नोंदवली जाईल, त्याचा वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवण्यात येईल, असे वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले.

पालकांनी १८ वर्षांखालील मुलामुलींना वाहने चालविण्यास देऊ नये. अनेकदा पालकांच्या नकळत आणि परवनागीशिवाय मुले वाहने चालवितात. त्यामुळे अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांवर किंवा ज्याचे वाहन असेल, त्या मालकाविरोधात तक्रार नोंदविण्यात येईल.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, आयुक्त

\Bशिक्षण संस्थांना पत्र

\Bवय वर्षे १८ खालील कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी रॅश ड्रायव्हिंग करतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. त्यामुळे १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांनी वाहने कॉलेजमध्ये आणू नयेत, अशी सूचना कॉलेजांनी विद्यार्थ्यांना द्यावी, तसेच वाहतुकीच्या नियमांसंदर्भात माहिती व प्रबोधन करावे, असे पत्र वाहतूक शाखेने शहरातील शिक्षण संस्थांना पाठविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डझनभर वाहने पेटवली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोडच्या आयएसपी-सीएनपी प्रेसच्या नेहरूनगर कर्मचारी वसाहतीमध्ये माथेफिरूने काल मध्यरात्री तब्बल तीन ठिकाणी दहा दुचाकी व दोन कारसह एकूण बारा वाहने पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे उपनगर पोलिस ठाण्यापासून जवळच हा प्रकार घडला. या वाहनांमध्ये चार सरकारी दुचाकी आहेत.

सीआयएफचे जवान संजयकुमार नरहरी बनसोडे यांच्या तक्रारीनुसार उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात समाज कंटकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहने पेटविण्याची उपनगर परिसरातील सहा महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. सहा महिन्यांपूर्वी नेहरूनगरमध्ये सीआयएसएफचे समाजकंटकाने शासकीय वाहन पेटवले होते. त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेस कामगारांसाठी नेहरूनगर वसाहत स्थापन करण्यात आली आहे. या वसाहतीमध्येच उपनगर पोलिस ठाणे आहे. या वसाहतीत प्रेस कामगारांबरोबरच प्रेसची सुरक्षा सांभाळणारे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (सीआयएसएफ) कर्मचारी राहतात. बुधवारी उत्तररात्री दोन ते चारच्या सुमारास नेहरूनगर वसाहतीमधील क्वार्टर नंबर २, १६ आणि अन्य एका क्वार्टरजवळ वाहने पेटवून दिल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. ज्वलनशील पदार्थ टाकून आणि शार्ट सर्किट करून ही वाहने पेटवून दिल्याचा अंदाज आहे. आगीत स्प्लेंडर कंपनीची एमएच १५, ८०१२, एमएच १५-८०१४, एमएच १५-८०१६, एमएच १५-७४३९, तसेच डिस्कव्हर कंपनीची एमएच ०५-९८४७, बजाज प्लॅटिना एमएच १५-८००६, हीरो सीबीझेड कंपनीची ०५८६, स्कूटर एपी ३१- २४०५, टीव्हीएस कंपनीची दुचाकी तसेच दोन चारचाकी वाहने खाक झाली. काही वाहनांचे नंबर नाहीसे झालेले आहेत. चार दुचाकी या सरकारी म्हणजेच सीआयफच्या मालकीच्या आहेत. घटना घडलेली ठिकाणे उपनगर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहेत. जळालेली वाहने उपनगर पोलिस ठाण्याच्या आवारात आणण्यात आली असून, झाकून ठेवण्यात आली आहेत. नाशिकच्या फॉरेन्सिक लॅब तज्ज्ञांनी या ठिकाणी भेट देऊन नमुने घेतले आहेत. त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर घटनेवर अधिक प्रकाश पडेल.

माथेफिरुचे कृत्य?

उपनगरचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सांगितले की, एखाद्या माथेफिरुने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अंतर्गत कलहातून ही वाहने पेटवली का, याचाही शोध पोलिस घेत आहे. संशयिताने ज्वलनशील पदार्थ टाकून, तसेच शार्ट सर्किटच्या सहाय्याने वाहने पेटवली. दोन शासकीय निवासस्थानांच्या जिन्यातील सार्वजनिक मीटर सर्किट होऊन जळालेली आहेत. सुरुवातीला या मीटरवर ज्वलनशील पदार्थ फेकला असावा, असा अंदाज आहे. नाशिकरोड आणि उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठराविक कालावधीने वाहने जळीताचे प्रकार घडत आहेत. सिन्नरफाटा, उपनगर, लोखंडे मळा, नारायण बापूचौक, देवळालीगाव आदी ठिकाणी वाहने पेटवल्याचे प्रकार घडले आहेत. या समाजकंटकांवर कठोर कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा २९, ३० रोजी संप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवृत्त होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यास सरकारी सेवेत घ्यावे, यासह विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने बुधवारी निदर्शने केली. प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास २९ आणि ३० जानेवारीला लाक्षणिक संप करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाला याबाबतचे निवेदन दिले आहे. चतुर्थश्रेणीमधून तृतीयश्रेणी अशी ५० टक्क्यांऐवजी २५ टक्केच पदोन्नती दिली तरी हरकत नाही. परंतु, रिक्त होणारी २५ टक्के पदे भरली जावीत, अशी संघटनेची मागणी आहे. अनुकंपावरील सेवाभरती विनाअट करावी, वैद्यकीय दृष्ट्या अपात्र कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास सरकारी सेवेत सामावून घ्यावे, राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे सरळ सेवेन भरली जावीत यासारख्या मागण्यांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही त्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. सरकारी नोकरीतील ठेकेदारी पद्धत बंद करावी, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना गणवेशाऐवजी त्यासाठी २५०० रुपये रोख स्वरूपात द्यावेत, २००५ नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची अंशदायी पेन्शन योजना रद्द करून पूर्वीप्रमाणे निवृत्तीवेतन योजना लागू करावी, महसूल विभागात कोतवाल पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना कोणतीही टक्केवारी न लावता थेट सरकारी सेवेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन सरकारी सेवेत सामावून घ्यावे, यासारख्या मागण्यांसाठी ७ ते ९ ऑगस्ट या कालावधीत संप पुकारण्यात आला होता.

सरकार उदासीन

सरकारने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची अजूनही गांभीर्याने दखल घेतली नसल्याबाबत संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कासार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या मागण्यांचे निवेदन सरकारपर्यंत पोहोचवावे अशी विनंती यावेळी करण्यात आली. प्रलंबित मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संप अटळ असल्याचा इशाराही कासार यांच्यासह राजेंद्र अहिरे, बाबा जाधवर, सुरेश घाडगे, अरुण तांबे, संजय शिंदे, किसन सानप आदींनी दिला आहे.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून लॅपटॉप, डेबिट कार्ड लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नववर्षाचे स्वागत निर्विघ्नपणे व्हावे यासाठी पूर्वसंध्येपासूनच पोलिसांनी शहरात रंगीत तालीम करूनही चोरट्यांनी वर्दळीच्या परिसरात चार वाहनांच्या काचा फोडून किंमती मुद्देमाल लांबविला. यात लॅपटॉप, डेबिट कार्डसह महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ डिसेंबरला अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिसांनी सायंकाळपासून पहाटेपर्यंत ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. परंतु, याच कालावधीत रात्री आठच्या सुमारास चोरट्यांनी तिबेटियन मार्केट ते चोपडा लॉन्सपर्यंतच्या परिसरात काही वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉप, डेबिटकार्ड यासारखा महत्त्वाचा मुद्देमाल चोरून नेला. चोपडा लॉन्ससमोर उभ्या असलेल्या कारच्या (एमएच १५ डीएस ८२२० आणि एमएच १५ जीएल ६०००) काचा फोडून चोरट्याने बँकेची महत्त्वाची कागदपत्रे, डेबिट कार्ड असा ऐवज चोरला.

गंगापूर रोडवरील खतीब डेअरीसमोर उभ्या कारची (एमएच १५ डीएस ६५०३) काच फोडून चोरट्यांनी २० हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला. विशेष म्हणजे हा प्रकार घडला तेथून हाकेच्या अंतरावर गंगापूर नाका सिग्नल चौकात पोलिसांचा चोख पोलिस बंदाबेस्त होता. कॉलेजरोड परिसरात कारची (एमएच ४६ एयू ३०७१) काच फोडून चोरट्याने महत्त्वाची कागदपत्रे लांबविली तर तिबेटीयन मार्केट परिसरात उभ्या कारची (एमएच १५ डीएस ६५०३) काच फोडून चोरट्याने लॅपटॉप लांबविली. या प्रकरणी डॉ. राजेश श्रीधर भावसार (वय ४८, रा. जिल्हा रायगड) यांनी सरकारवाडा पोलिसात फिर्याद दिली आहे.

बंदोबस्त दंडवसुलीसाठी!

पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी असतानाही वर्दळीच्या ठिकाणी वाहनांमधून चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बंदोबस्त मद्यपी आणि बेशिस्त चालकांकडून दंड वसुलीसाठी होता की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी असा सवाल त्यामुळे उपस्थित होऊ लागला आहे. सरकारवाडा पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहिता आत्महत्या; सात जणांविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेती उपयोगी औषधांचे दुकान सुरू करण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणावेत यासाठी सासरकडील मंडळींकडून छळ होत असल्याने एका विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी तिरडशेत येथील भावले कुटुंबीयांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलिमा उर्फ आदिका उमेश भावले (वय २६) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. तिने सोमवारी (दि. ३१) घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नीलिमाचा भाऊ गणेश पोपटराव खर्जुल (वय ३०, रा. नाशिकरोड) याने सातपूर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी पती, सासरे, दीर, जाऊ यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 'आता मला सहन होत नाही, सॉरी!' असा मजकूर सोमवारी सकाळी नीलिमाने पती उमेश सुकदेव भावले यांना व्हॉट्सअॅपवर पाठविला. त्यानंतर उमेश घाईघाईने घरी पोहोचले असता नीलिमा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी उमेश याच्यासह नीलिमाचे सासरे सुकदेव दादा भावले, दीर संदीप आणि किरण भावले, जाऊ गायत्री आणि सोनाली भावले आणि जावांचे वडील बाळासाहेब बंदावणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी उमेश, संदीप आणि किरण या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. नीलिमाचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.

बलात्कार प्रकरणी

तरुणावर गुन्हा

नाशिक : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करीत गर्भवती ठेवल्याचा प्रकार काझीगढी परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी आकाश राजू खाडे (वय १९, रा. काझीगढी) या संशयितास अटक केली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. संशयित आकाशने जानेवारी २०१८ पासून अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवले. तिला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. ती गर्भवती राहिल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेच्या आईने भद्रकाली पोलिसात फिर्याद दिली असून आकाश याच्यावर पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक व्ही. के. शिंदे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात नवीन मलवाहिका

$
0
0

नेटवर्क सुधारले जाणार

..

\B-\B १६० कि. मी.च्या मलवाहिका टाकणार

- दोन वर्षात ९० कोटींचा खर्च होणार

- शहरात सद्यस्थितीत १५४५ कि. मी. लांबीच्या मलवाहिका

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वतीने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासह मलनिस्सारण व्यवस्थेच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे शहरात महापालिकेच्या माध्यमातून तब्बल १६० किलोमीटर लांबीच्या नव्या मलवाहिका टाकण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल ९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, चालू वर्षात ५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. पुढील बजेटमध्ये यावर ४० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे मलवाहिकांचे नेटवर्क सुधारणार आहे.

शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात दारणा धरणातून दररोज ४३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. या पाण्याचा पुरवठा केल्यानंतर ७० टक्के पाणी हे सांडपाण्याच्या रुपाने मलवाहिकांमध्ये सोडले जाते. मलवाहिकांच्या माध्यमातून हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. शहरात सद्य:स्थितीत १५४५ कि. मी. लांबीच्या मलवाहिका असून, मलवाहिकांच्या माध्यमातून सांडपाणी मलनिस्सारण केंद्रांपर्यंत आणले जाते. तेथे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीपात्रात सोडण्यात येते. सद्य:स्थितीत शहरात ९० टक्के मलवाहिकांचे जाळे आहे. नव्याने निर्माण झालेल्या वसाहतींमध्ये आता महापालिकेच्या माध्यमातून १६० कि.मी. लांबीच्या नव्या मलवाहिका टाकण्यात येणार आहेत. यासाठी ९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या कामांच्या निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाल्या आहेत.

...

आरेखन व मोजमाप सुरू

सद्या मलवाहिका टाकण्याच्या कामांचे आरेखन व मोजमाप सुरू आहे. या कामांसाठी चालू आर्थिक वर्षात सुमारे ५० कोटींची तरतूद उपलब्ध आहे. उर्वरित ४० कोटींची तरतूद आगामी बजेटमधून उपलब्ध केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘राष्ट्रवादी’चा गणनिहाय दौरा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेस गुरुवार, ३ जानेवारीपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात गणनिहाय दौरा करणार आहे. यात पदाधिकारी गावनिहाय बुथप्रमुखांची नेमणूक आणि पक्षबांधणीचा आढावा घेणार आहे. दौऱ्यात माजी खासदार समीर भुजबळ, तालुकाध्यक्ष तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नाशिक लोकसभा जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड व कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी दिली.

दौऱ्यात शुकवारी (दि. ३) सकाळी ९ वाजता गिरणारे गण-मातोरी, १० वाजता देवरगाव गण-धोंडेगाव, ११ वाजता गोवर्धन गण, दुपारी १२ वाजता विल्होळी गण, १ वाजता पिंप्री सय्यद गण, २ वाजता एकलहरे गण, ३ वाजता पळसे गण व सायंकाळी ४ वाजता लहवित गणाचा आढावा घेणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्याचा गणनिहाय दौरा शुक्रवारी (दि. ४) करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता मुलवड गण, साडेदहा वाजता ठाणापाडा गण, दुपारी १२ वाजता हरसूल गण, दीड वाजता वाघेरा गण, ३ वाजता अंजनेरी गण व सायंकाळी साडेचार वाजता देवगाव गण येथे आढावा घेणार आहे. तसेच, शनिवारी (दि. ५) सिन्नर तालुका गणनिहाय दौरा करण्यात येणार असून सकाळी ९ वाजता शिवडे गण पांढुर्ली, १०.३० वाजता ठाणगाव गण, दुपारी १२ वाजता डूबेर गण पाटोळे, दीड वाजता चास गण, ३ वाजता नांदूरशिंगोटे गण- दोडी बु, सायंकाळी चार वाजता पांगरी बु गण-वावी व ५ वाजता भरतपूर गण-शहा येथे आढावा बैठक घेणार आहे.

तसेच रविवारी, ६ जानेवारी रोजी इगतपुरी तालुक्याचा दौरा करणार असून सकाळी ९ वाजता वाडीवऱ्हे गण, साडेदहा वाजता नांदगाव बु. गण, दुपारी १२ वाजता मुंढेगाव गण, १ वाजता घोटी बु. गण, २ वाजता खंबाळे गण, ३ वाजता शिरसाटे गण- कावनाई, सायंकाळी साडेचार वाजता काळूस्ते गण व सायंकाळी ६ वाजता नांदगाव सदो गण येथे आढावा बैठका घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीपासून अंशत: दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डिसेंबर महिन्यापासून शहर थंडीच्या लाटेमुळे गारठले आहे. किमान तापमानातील घसरणाबरोबरच हवेतील गारवा शहरवासीयांना त्रस्त करणारा ठरत होता. हवेतील गारवा कमी झाल्यामुळे बुधवारी मात्र, थंडीपासून काहीसा दिलासा नाशिककरांना मिळाला. येत्या काही दिवसांमध्ये तापमानात चढ-उतार कायम राहणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.

राज्यात बहुतांश भागात काही दिवसांपासून थंडीचा कहर सुरू आहे. सकाळी हुडहुडी भरवणारी थंडी आणि दिवसभर थंडीचे बोचरे वारे असा अनुभव नाशिककरही घेत आहेत. वाहत्या वाऱ्यांमुळे थंडीचे प्रमाण अधिकच जाणवत होते. शहरात २९ डिसेंबर रोजी ५.१ अंश सेल्सियस असलेले किमान तापमान ३० डिसेंबर रोजी ७ अंश सेल्सियसवर स्थिरावले होते. ३१ डिसेंबर रोजी ७.२ अंश सेल्सियस, १ जानेवारी रोजी ६.२ अंश सेल्सियस तर २ जानेवारी रोजी पुन्हा किमान तापमान ७.१ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. साधारणत: चार दिवसांच्या कालावधीत २ अंश सेल्सियसने तापमान वाढले. किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही चार दिवसात ६ अंश सेल्सियसनी वाढ झाली आहे. २९ डिसेंबर रोजी २५.३ अंश सेल्सियस असलेले कमाल तापमान २ जानेवारी रोजी ३१.८ अंश सेल्सियसवर स्थिरावले. तापमानाच्या या चढ उतारामुळे व वाहणारे गारे वारे नसल्याने थंडी कमी झाल्याचा अनुभव नाशिककरांनी घेतला.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेतक महोत्सवात सिनेकलाकारांची मांदियाळी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे सुरू असलेल्या चेतक महोत्सवात ४ जानेवारी रोजी सिनेकलाकारांची उपस्थिती असणार आहे. देशभर प्रसिध्द होत असलेल्या या घोडेबाजाराचे आकर्षण चित्रपत्रसृष्टीला अगोदरपासूनच आहे. त्यामुळे या फेस्टिव्हलमध्ये सिनेकलाकार शेखर सुमन, रणदीप हुडा, अर्चना पुरणसिंग, परमीत सेठे, अली फजल येणार आहे.

सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत ते येथे असणार असून, त्यात ते संपूर्ण महोत्सवाचा आनंद घेणार आहेत. या महोत्सवात हे कलाकार अश्व महोत्सव पाहणी, टेंट सिटी भेट व छोटेखानी करमणुकीच्या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहेत. १२ जानेवारीला या महोत्सवाचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर विविध कार्यक्रम या महोत्सवात सुरू असून, या महोत्सवाचा समारोप ८ जानेवारीला होणार आहे. या महोत्सवाला नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. या महोत्सवाचा आनंद सर्वांनी घ्यावा असे आवाहन पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन मुंडावरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित धुळवड अखेर ‘कनेक्ट’!

$
0
0

दूरसंचार विभागाकडून 'हाय स्पीड इंटरनेट'

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ट्राय आणी दूरसंचार विभागाच्या गाव तेथे दूरध्वनी सेवा या धोरणातून डोंगरांनी वेढलेल्या सिन्नर तालुक्यातील धुळवड गावात दूरसंचार सेवा सुरू झाली. त्यानंतर गावात हाय स्पीड इंटरनेट सेवा मिळू लागली. सिन्नर पासून अवघ्या २७ किलोमीटरवर असलेल्या १५०० लोकवस्तीच्या हे गाव आतापर्यंत दूरसंचार सेवेपासून वंचित होते. पण, दूरसंचार विभागाने येथे मनोरा लावला त्यानंतर हे गाव जगाच्या संपर्कात आले.

धुळवड या छोट्याशा गावात कोणत्याही कंपनीनीची दूरसंचार सेवा नसल्याने तेथील लोकांना छोटछोट्या कामांसाठी सिन्नरला यावे लागत होते. पण, आता गावात इंटरनेट सेवा उपलब्ध झाल्याने त्यांना फायदा होणार आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी दूरसंचार कंपनीच्या सल्लागार समितीच्या बैठकीत या विषयावर लक्ष वेधले. त्यानंतर दूरसंचार कंपनीचे महाव्यवस्थापक नितीन महाजन यांनी या विषयाचा पाठपुरावा करीत ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मनोरा उभारला. त्यानंतर खासदार गोडसे, महाजन व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या उपस्थितीत या सेवेचा उद्घाटन सोहळा नुकताच झाला.

यावेळी महाप्रबंधक नितीन महाजन यांनी दूरसंचार सुविधा आणी इंटरनेट उपलब्धतेचे महत्त्व गावकऱ्यांना तसेच विशेषत: तरुण पिढीला समजावून सांगितले. ग्रामसेवक, तलाठी, टेलिमेडिसीन व इतर ऑनलाइन उपक्रमासाठी योग्य तो इंटरनेट स्पीड उपलब्ध झाल्याचे घोषित केले. निव्वळ नफा किंवा फायदा न बघता ट्राय आणी दूरसंचार विभागाच्या गाव तेथे दूरध्वनी सेवा या धोरणात बसवून दूरसंचार सेवा सुरू केल्याचे सांगितले. या सेवेनंतर बीएसएनएलचे सिमकार्ड घेणेसाठी ग्राहकांची गर्दी झाली.

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदारांचा ठेंगा!

$
0
0

'संदर्भ'च्या लिफ्ट कामासाठी वीज विभागाकडून फेर ई-निविदा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विभागीय संदर्भ रुग्णालयातील लिफ्टच्या नुतनीकरणासाठी ठेकेदार मिळत नसल्याने ६१ लाख रुपयांचे अनुदानही वापराविना पडून आहे. या कामासाठी फेरनिविदा काढण्याची वेळ वीज विभागावर आली आहे. आता फेरनिविदांमध्ये ठेकेदारांनी टेंडर भरल्यानंतर या लिफ्टचे काम सुरू होणार आहे. चारपैकी एका लिफ्टचे काम दोन महिन्यांपूर्वी झाले; मात्र तीन लिफ्टचे काम अद्याप बाकी आहे. त्यासाठी मोठ्या ठेकेदारांना गळ घातली जात असून त्यांनी टेंडर भरल्यानंतर तीन महिन्यात हे काम पूर्ण होऊ शकणार आहे.

विभागीय संदर्भ रुग्णालयातील असुविधांबाबत तक्रारी वाढल्यानंतर आरोग्य विभागाच्या आयुक्त संजीवकुमार यांनी एप्रिल महिन्यात रुग्णालयात बैठक घेत तीन कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानंतर यातील काही कामे सुरू झाली असली तरी तीन लिफ्टचे काम अद्याप बाकी आहे. १९ वर्षांपूर्वीच्या या लिफ्टचे पूर्ण नुतनीकरण केले जाणार आहे. त्यामुळे त्यासाठी मोठ्या कंपनीचे ठेकदार शोधले जात आहे. एका लिफ्टचे काम झाल्याने आता तीन लिफ्टसाठी ३४ लाख ८५६ रुपये खर्च करून हे काम केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वीज विभागाकडे हे काम आहे. त्यांनी त्यासाठी ई-निविदा काढल्या आहे. या निविदा ठेकेदारांनी भरल्यानंतर १५ जानेवारी रोजी हे टेंडर उघडले जाणार आहे. त्यानंतर या लिफ्टचे काम सुरू होणार आहे.

अशा आहेत लिफ्ट

संदर्भ रुग्णालयात रुग्णांना नेण्यासाठी चार लिफ्ट आहे. त्यातील २० प्रवासी क्षमता व स्ट्रेचर घेऊन जाणारी एक लिफ्ट दोन महिन्यापूर्वी सुरू झाली आहे. आता २० प्रवासी क्षमता व स्ट्रेचर, १५ प्रवासी व स्ट्रेचर असणाऱ्या दोन लिफ्टचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. तसेच औषधे घेऊन जाण्यासाठी एक हजार किलो क्षमता असलेली लिफ्टही दुरुस्त केली जाणार आहे.

३८८ पैकी ९ उपकरणे नादुरुस्त

संदर्भ रुग्णालयातील ३८८ पैकी जवळपास सर्व उपकरणे आता दुरुस्त करण्यात आली आहे. त्यातील ९ उपकरणे नादुरुस्त आहेत. मात्र, येत्या काही दिवसात ती उपकरणे दुरुस्त केली जाणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात 'संदर्भ'चा कारभार सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोठ्या कंपन्या निरुत्साही

शासकीय व नुतनीकरणाचे काम असल्याने मोठ्या नावाजलेल्या कंपन्या टेंडर भरण्यास उत्सुक नाहीत. त्यांच्या दृष्टिने 'संदर्भ'चे काम छोटे आहे. त्यात शासकीय कामात अनेक अडथळे येत असल्याने त्यांनी हे टेंडर अगोदर भरले नसल्याचे समजते.

..

फोटो : संदर्भ हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणिततज्ज्ञांना चक्रावणारा ‘खोपडी’ निकाल

$
0
0

सर्वोच्च न्यायालयात मिळाला सरपंचाला न्याय

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खोपडी (ता. सिन्नर) येथील सरपंचाच्या अविश्वास ठरावाला थेट सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलेले आव्हान आणि त्याचा मिळालेला निकाल सध्या गणिततज्ज्ञांना चक्रावून टाकत आहे. आठ सदस्य असलेल्या या ग्रामंपचायतीत अविश्वासासाठी लागणारे दोन तृतीयांश मते ५.३३ होतात. त्यामुळे हा आकडा ५ पकडायचा की सहा यावर हा निकाल आहे. पण, न्यायालयाने हा आकडा ६ पकडल्यामुळे गणिततज्ज्ञ चक्रावले आहेत.

सरपंच गणेश सुकदेव गुरुळे यांच्यावर १४ सप्टेंबर रोजी अविश्वास ठराव आला. त्यानंतर त्यांनी या अविश्वासाला आव्हान देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर उच्च न्यायालयात आव्हान दिले. पण, त्यांची याचिका दोन्ही ठिकाणी फेटाळण्यात आली. अखेर त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. येथे त्यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर त्यांना पुन्हा सरपंचपदही बहाल करण्यात आले आहे. या निकालाला १५ दिवसांहून अधिक दिवस उलटले तरी न्यायालयाने दिलेल्या निकालाची मात्र सर्वत्र चर्चा होत आहे.

नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये गुरुळे यांच्यावर सहा सदस्यांनी अविश्वास ठराव आणला. त्यात एक सदस्य गैरहजर होते. त्यामुळे हा अविश्वास ठराव तहसीलदारांनी मंजूर केला. पण, या निकालाला गुरुळे यांनी आव्हान दिले. अविश्वास ठराव आणणाऱ्यांमध्ये एका सदस्याचे जातवैधता प्रमाणपत्र मुदतीत न दिल्यामुळे अपात्र ठरले होते. त्यामुळे त्यांचे मत ग्राह्य धरू नये, अशी गुरुळे यांची मागणी होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यामुळे आठ सदस्यांच्या दोन तृतीयांश निकषावर हा निकाल दिला.

..

असे होते अविश्वासाचे गणित

अविश्वास ठराव संमत होण्यासाठी ५.३३ मते हवी होती. अविश्वासाच्या बाजूने सहा सदस्य असले तरी त्यातील एक जण अपात्र ठरला. त्यामुळे ५ सदस्यच अविश्वास ठरावाच्या बाजूने होते. त्यामुळे न्यायालयाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अॅक्ट सेक्शन ३५ चा आधार घेतला. त्यात अविश्वासाच्या दोन तृतीयांशपेक्षा कमी सदस्य नको. त्यामुळे या निकालात सहा आकडा ग्राह्य धरण्यात आला. हा निकाल तीन सदस्यीय खंडपीठाचे न्यायाधीश ए. के. सिक्री, अशोक भूषण, एस. अब्दुल नाझीर यांनी दिला आहे.

...

गणिततज्ज्ञांमध्ये चर्चा

प्रचलित नियमानुसार साडेपाचच्या पुढील गुण असतील, तर सहा अंक निश्चित केला जातो. मात्र, साडेपाचच्या आतील संख्या असताना सहा हे गुण या निकालामुळे निश्चित होत असल्याने गणिततज्ज्ञांमध्ये त्याची विशेष चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकणेचेही पाणी दूषित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराला नव्याने पाणीपुरवठा होणार असलेल्या मुकणे थेट पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहराला मिळणारे पाणीही दूषित असल्याचे समोर आले आहे. गोंदे एमआयडीसीतील कंपन्यांचे रसायनेमिश्रित पाणी थेट मुकणे धरणात जात असल्याने पालिकेने महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाकडे तक्रार केली आहे.

सातपूर आणि अंबड एमआयडीसीतील कंपन्यांकडून प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जात असल्याने गोदावरीसह तिच्या उपनद्यांचे प्रदूषण वाढले आहे. त्यासंदर्भात थेट हायकोर्टानेच कानउघडणी केली असून, पालिकेने या कंपन्यांवर कारवाईसाठी एमआयडीसीला नोटीस बजावली आहे. त्यानंतर आता मुकणे धरणतून मिळणारे पाणीही दूषित असल्याचे समोर आले आहे. मुकणे धरणातून दररोज चारशे एमएलडी पाणी नाशिक शहरासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यासाठी अठरा किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. मार्चपासून महापालिकेकडून पाण्याची उचल केली जाणार आहे. विल्होळी येथील जलशुद्धिकरण केंद्रदेखील पूर्ण झाले आहे. आता येथील पाणीसुद्धा दूषित असल्याची तक्रार महापालिकेने केली आहे. पाण्याचा एक थेंबदेखील शहरात जिरला नसताना पाणी दूषित असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

एमआयडीसी, उद्योगांवर कारवाई?

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींमध्ये मलनिस्सारण केंद्र बांधण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे, तर नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडू नये याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण महामंडळाची आहे. त्यामुळे आता आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सहीनेच थेट सदस्य सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे. एमआयडीसीसह या कंपन्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. महामंडळाकडून कंपन्यांसह एमआयडीसीवरही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खानापुरे, गर्गे पहिल्या महिला मलखांब पंच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र हौशी मलखांब संघटनेतर्फे अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय पंच परीक्षेत नाशिकच्या यशवंत व्यायाम शाळेच्या प्रशिक्षिका उत्तरा खानापुरे व साक्षी गर्गे यांनी ऐतिहासिक यश मिळवले असून, दोघींनी नाशिकच्या पहिल्या महिला मलखांब व दोरीचा मलखांब या खेळाच्या राज्य पंच होण्याचा मान मिळवला आहे.

ही राज्यस्तरीय पंच परीक्षा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे घेण्यात आली होती. यशवंत व्यायामशाळेतर्फे अध्यक्ष दिपक पाटील, प्रशिक्षक यशवंत जाधव व यशवंत व्यायाम शाळेच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी सत्कार केला व अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोची व्यवहार्यता पुन्हा तपासणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी दिल्लीस्थित अर्बन मास ट्रांझिट कंपनीने (यूएमटीसी) शहरात मेट्रोची व्यवहार्यता फेटाळून लावली असली तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात 'मास रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम'चा (एमआरटी) वापर करण्यासाठी व्यवहार्यता अहवाल सादर करण्याचे आदेश महामेट्रोला दिले आहेत.

शहराचा विस्तार झपाट्याने होत असतानाही, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून शहरात बससेवा सुरू असली तरी ती तोट्यात असल्याचे सांगत महामंडळाने ती चालविण्यास नकार दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फड‌णवीस यांनी वर्षभरापूर्वीच नाशिक महापालिकेला बससेवा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्याबाबतची एकीकडे तयारी सुरू असतानाच, मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबरमध्ये नाशिकमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीत मेट्रो सुरू करण्याची घोषणा केली होती. सिडकोमार्फत मेट्रो सुरू करण्याचे सूतोवाच करीत महामेट्रोमार्फत त्याची व्यवहार्यता तपासली जाईल, असे आश्वासन दिले होते. शहरात मेट्रोसाठीची चाचपणी यापूर्वीच पालिकेकडून करण्यात आली आहे. सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करताना दिल्लीस्थित यूमएमटीसी या कंपनीने शहरात बीआरटीएस आणि मेट्रो व्यवहार्य नसल्याचा अहवाला दिला होता. या संदर्भातील वस्तुस्थिती तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगरविकास विभागाच्या लक्षात आणून दिली होती. त्यामुळे मेट्रो होईल की नाही, याबाबत शंका होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तब्बल तीन महिन्यांनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहरात मास रॅपिड ट्रान्सिट सिस्टिमबाबत आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळात झालेल्या या निर्णयानुसार महामेट्रोला हा आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सिडको, महापालिका आणि महामेट्रो एकत्रितपणे हा आराखडा तयार करणार असल्याची माहिती दिली. शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी वेगळा आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार वाहतूक कोंडी टाळून सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढावा, यासाठी मास रॅपिड ट्रान्सिट सिस्टिमचा वापर नाशिकमध्ये होणार असून, त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प आराखडा येत्या दोन महिन्यांत तयार केला जाणार आहे. त्यानंतर हा अहवाल नगरविकास विभागाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत तीनही एजन्सी एकत्रितपणे काम करून व्यवहार्यता अहवाल तयार करणार असल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील तोडगा दृष्टिपथात येण्याची शक्यता आहे.

मिनी मेट्रो धावणार?

शहरात सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट नाही. त्यातच बीआरटीएसचाही पर्याय तपाण्यात आला आहे. त्यामुळे महामेट्रोकडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी बसेसेवेचे जाळे विस्तारण्याबाबत चाचपणी केली जाणार आहे. एखाद्या रस्त्यावर एका तासाला २० हजार पेक्षा लोकांचा वावर असेल तर, त्या ठिकाणी मोठ्या मेट्रोला प्राधान्य दिले जाते. परंतु, हीच संख्या प्रतितास १० ते १५ तास असेल तर तेथे मिनी मेट्रोची चाचपणी केली जाते. नाशिकमध्ये दुसऱ्या प्रकारातील वाहतुकीचे तीन ते चार रस्ते आहेत. त्या ठिकाणी मिनीमेट्रोची चाचपणी होईल, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली. त्यामुळे शहरात मिनी मेट्रो धावण्याची शक्यता बळावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी एक विकासमार्ग!

$
0
0

मराठी मुलखात

उत्तर महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. मुंबई-आग्रा, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गानंतर आता चेन्नई-सुरत या महामार्गासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याशिवाय अन्य राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांचे जाळे नाशिकला आहेच. त्यामुळे नशिक हे दक्षिण भारतासह गुजरातशी जोडले जाणार आहे.

भावेश ब्राह्मणकर

केवळ मुंबई शहराच्या नजीक एवढेच काय ते नाशिकचे महत्त्व असे काही काळ बोलले जात होते; पण नाशिकचे भौगोलिक स्थान हेसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळेच नाशिकच्या विकासाचे अनेक मार्ग प्रशस्त होतात. मुंबई-आग्रा या तिसऱ्या क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाचे नुकतेच रुंदीकरण पूर्ण झाले आहे. चौपदरी झालेल्या या महामार्गाने राजधानी मुंबईला नाशिकच्या आणखी जवळ आणले आहेच, शिवाय उत्तर भारतात जाण्याचे मार्गही खुले केले आहेत. हाच मार्ग आता सहापदरी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे त्याचेही काम नजीकच्या काळात होण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी भाजप सरकार आणि त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्गही नाशिकमधूनच जातो. मुंबई आणि नागपूर यांना जोडणारा हा महामार्ग आहे. या महामार्गासाठीचे भूसंपादन जवळपास अंतिम टप्प्यात आल्याने आता त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. या दोन महामार्गांमुळे राज्याची उपराजधानी नागपूर ही समीप येणार आहे. त्यामुळे ही दिलासादायक बाब आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून 'भारतमाला' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे. तब्बल सात लाख हजार कोटी रुपयांची ही भव्य योजना आहे. देशातील विविध टोके महामार्गाद्वारे जवळ आणून ठेवणे आणि विकासाच्या चक्राला गती देण्याचे त्यात प्रस्तावित आहे. या योजनेत राज्याला एकूण ११ महामार्ग लाभणार आहेत. देशातील एकूण ४४ आर्थिक कॉरिडॉरमध्ये उत्तर महाराष्ट्रासाठी तीन कॉरिडॉर आहेत. मुंबई-कोलकाता, मुंबई-आग्रा आणि सुरत-नागपूर या तीन कॉरिडॉरमुळे उत्तर महाराष्ट्रात प्रगतिशील महामार्ग होणार आहेत, तसेच सुरत-चेन्नई हा महामार्गही 'भारतमाला'अंतर्गत प्रस्तावित आहे. याच महामार्गाचे सध्या सर्वेक्षण केले जात आहे. हैदराबादस्थित कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांमधून हा मार्ग जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, निफाड, नाशिक आणि सिन्नर या तालुक्यांमधून हा महामार्ग जाणार आहे. या कंपनीच्या वतीने जे सर्वेक्षण केले जाणार आहे, त्यात प्रामुख्याने भूसंपादन आणि मार्गाची दिशा हे प्रमुख असणार आहे. हा अहवाल आल्यानंतर तो केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला सादर होईल. त्यात या मार्गाला मंजुरी दिली जाईल. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू होऊन महामार्गाचे काम करण्याचे प्रस्तावित आहे.

उत्तर भारत, विदर्भ आणि आता गुजरात व दक्षिण भारताला जोडणारा महामार्ग नाशिकच्या व्यापार, दळणवळण आणि उद्योगाला नवे बळ देणार आहे. मध्य रेल्वेद्वारे नाशिक हे मुंबई आणि उत्तर भारताशी कनेक्ट आहेच, आता रस्तेमार्गाद्वारे नाशिकच्या विकासाला नवी चालना लाभणार आहे. मात्र, हे होत असताना वास्तव आणि नजीकच्या भविष्याचाही वेध घेणे आवश्यक आहे. चेन्नई-सुरतचा अहवाल मंत्रालयाला सादर होण्यास साधारण सहा महिने लागतील, असे गृहीत धरायला हवे. म्हणजे तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुका त्या वेळी झालेल्या असतील आणि नवे सरकार स्थापन झालेले असेल. ते सरकार कोणते असेल त्यावरही या महामार्गाचे भवितव्य आहे. मोदी सरकारच पुन्हा आले तर गडकरी हे त्यांचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य देतील. जर अन्य सरकार आले तर या अहवालाचे काय होणार? नाशिकचे लोकप्रतिनिधी केंद्रीय दरबारात दबाव टाकणार का, की पाठपुरावा करणार, हे सारे महत्त्वाचे आहे. या सर्व प्रक्रियेत राज्य सरकारची भूमिका अतिशय मोलाची असेल. कारण भूसंपादनाचे महत्कार्य हे राज्य सरकारकडे आहे. या वर्षाच्या अखेरीस राज्याची विधानसभा निवडणूक आहे. निवडणुकीच्या तोंडावर विरोध उभा करणारा भूसंपादनाचा प्रस्ताव साहजिकच सरकार हाती घेणार नाही. त्यामुळे नवे सरकार याकडे कशा पद्धतीने पाहणार, त्यास हिरवा कंदील देणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हिरवा कंदील दिला तरी प्रत्यक्ष भूसंपादन धीम्या गतीने होणार की समृद्धी महामार्गासारखे वेगाने हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे आहे. ज्या ज्या जिल्ह्यांमधून हा मार्ग जातो आहे, तेथील जनता आणि लोकप्रतिनिधी यांची इच्छाशक्ती या महामार्गासााठी अतिशय महत्त्वाची आहे, तसेच सरकारची भूमिकाही. त्यामुळे तूर्त या सर्वेक्षणाने नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी हे सारे अडथळे लक्षात घेणे गरजेचे आहे. संभाव्य अडथळे दूर करण्यासाठी आताच काही प्रयत्न करता आले तर ते अतिशय प्रभावी ठरतील; पण ते कोण करणार हाही प्रश्नच आहे. नाशिकच्या संस्था-संघटनांनी ते हाती घेतले तर ते शक्य आहे. अन्य विकासवाटांसाठी ज्या पद्धतीने नाशिककर एकत्र आले तसे या प्रकल्पासाठीही आले तर ते शक्य आहे; अन्यथा निधी, भूसंपादन किंवा कारणांच्या जंजाळात हा महामार्ग अडकेल आणि आणखी एक संधी नष्ट होईल. संधी साधायची की दवडायचे हे मात्र ठरवायचे आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभीची ही एक चुणूकच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुयोजित व्हॅलीजवळ उद्या ‘हॅप्पी स्ट्रीट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतुकीची कोंडी, प्रदूषणासह धकाधकीच्या जीवनातील टेन्शनपासूनही सुटका करून घेण्याची संधी शनिवारी नाशिककरांना मिळणार आहे. नाशिककरांच्या प्रचंड प्रतिसादामुळे उद्या, शनिवारी सुयोजित व्हिरिडीयन व्हॅली ते बापू पूल या रस्त्यावर सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान 'हॅप्पी स्ट्रीट' रंगणार आहे. नाशिककरांना पुन्हा धमाल, मस्ती अन् कल्ला करता येणार आहे.

नेहमीच्या रस्त्यांवर असणारा वाहनांचा गोंगाट अन् कर्कश हॉर्न यांपासून मुक्ती मिळवत, रस्त्यावर हवे तसे बागडता येणे, या विचारानेच आनंद मिळतो. त्यातच या रस्त्यांवर डान्स, गाणी, गेम अन् अफलातून कार्यक्रमांची रेलचेल असेल तर उत्साह अधिक वाढतो. हीच उत्साहवर्धक पर्वणी हॅप्पी स्ट्रीटमधून नाशिककरांना अनुभवता येणार आहे. या उपक्रमाला नाशिककरांचा नेहमी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमात अबालवृध्दांना धम्माल, मस्ती करण्याची संधी मिळते. शनिवारी होणाऱ्या हॅप्पी स्ट्रीटवर झुम्बावर थिकरण्यासह व्हिंटेज गाड्या बघण्याची, सेल्फी अन् फोटोसेशन करण्याची, हटके गेम्स खेळण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. हा उपक्रम संध्याकाळी होत असल्याने नाशिककरांच्या उत्साहाला उधाण येणार आहे.

--

\Bनाव नोंदविण्याची कलाकारांना संधी\B

तुमची कला हॅप्पी स्ट्रीटवर सादर करण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. कलेसह वेगवेगळे उपक्रम सादर करण्यासाठीही तुम्हाला नावनोंदणी करता येईल. त्यासाठी कलाकारांनी महाराष्ट्र टाइम्सच्या ०२५३-६६३७९८७ किंवा ९४२२५१३५६९ या क्रमांकावर दुपारी १२ ते ४ या वेळेत संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयी वृत्तीने घेरलेले ‘अपूर्णांक’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोणाच्याही आयुष्यात घडू शकेल अशी घटना घडते आणि तिच्या अनुषंगाने पुढे घडणाऱ्या घटनांमध्ये येणारी नाट्यमयता याने भरलेले नाटक म्हणजे अपूर्णांक. सरोगसी मदरची कथा नाटकातून मांडण्यात आली.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ६६ व्या नाट्यमहोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत गुरुवारी कामगार कल्याण केंद्र, एकलहरेच्या वतीने अविनाश चिटणीस लिखित 'अपूर्णांक' हे नाटक सादर करण्यात आले. प. सा. नाट्यगृहात या स्पर्धा सुरू होत्या. स्पर्धेचा शुक्रवारी (दि. ४) समारोप होत आहे.

'अपूर्णांक'ची कथा आहे, शीला व तिचा पती सतीश यांची. सतीशला असाध्य आजार झालेला असल्याने त्याच्या शस्त्रक्रियेसाठी पैसा उभा करावा लागणार असतो. त्यामुळे शीला कर्नलच्या नातवासाठी गर्भ स्वत:च्या गर्भाशयात वाढविण्यासाठी तयार होते. मिळालेले पैसे सतीशच्या शस्त्रक्रियेसाठी वापरून ती त्याचा जीव वाचवते. कर्नलच्या सुनेला, रेश्माला अपत्यप्राप्तीचा आनंद देते; मात्र सतीश व तिच्या मुलांपासून हे लपवते आणि एकदा हे खोटे पकडले जाते. शीलाने कोणत्या मार्गाने पैसे मिळवले असा संशय सतीशच्या मनात घोंघावतो. संशयाचे तुफान उठते आणि तो शीलावर व्याभिचाराचा आरोप करून तिला घटस्फोटाची नोटीस देतो. शीला हादरते; मात्र नंतर खंबिरपणे स्वत:ला सावरून घराबाहेर पडते. इकडे रेश्माचा पती शहीद होतो. त्यामुळे ती त्या बाळाला सांभाळायला असमर्थ ठरते. कर्नल त्या बाळाला घेऊन शीलाकडे येतात; मात्र तेथे त्यांना कहाणी समजते. ते सतीशला खूप सुनावतात. आपली चूक उमगून सतीश तिला आणायला निघतो. परंतु, आता तो अधिकार गमावला आहे, असे सांगून कर्नलच शीलास आणण्यासाठी निघतात. अशा आशयाची ही कथा होती.

नाटकाचे निर्मितीप्रमुख भरत बोरसे होते. दिग्दर्शन अर्चना नाटकर यांचे होते. प्रकाशयोजना कृतार्थ कन्सारा, नेपथ्य आनंद ढाकिफळे, संगीत भूषण भावसार, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. रंगमंच राहुल शिरवाडकर यांचे तर रंगमंच सहाय्य विजय धुमाळ, अमोल हिवराळे, रिया भेले, प्रवीण ठाकरे, महेंद्र चौधरी यांचे होते. वेशभूषा सानिका मेहेत्रे तर सहाय्य सुहासिनी ठाकूर, प्रवीण ठाकरे यांचे होते. नाटकात धनश्री महाजन, साक्षी गांपुर्डे, दीपक ठाकूर, स्मृती शेगोकार, सागर कोरडे, ऋषिकेश रोटे, विनोद सावे, प्रवीण ठाकरे, चंद्रशेखर कवर, दीपक पारखे यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक

देहासक्त

ललित कलाभवन, सिडको

स्थळ : प. सा. नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ६

लोगो : कामगार कल्याण नाट्य स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images