Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

राजकीय गुन्हेगारांची कुंडली निर्मिती

$
0
0

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पोलिसांची सतर्कता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईस वेग देण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सराईत आणि संशयित गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात येते आहे.

आगामी निवडणुका तोंडावर असून, त्याची तयारी आतापासूनच सुरू करा. प्रतिबंधक कारवाई, समाजकंटकांवर कारवाईस गती देण्यासह राजकीय गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत करा, असा आदेश राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलीगकर यांनी काही दिवसांपूर्वी दिले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पडसलगीकर यांनी हे आदेश दिले आहेत. जातीय तेढ, दंगली, राजकीय गुन्हेगारी अशा सर्वच बाबींवर यापुढे लक्ष केंद्रित करून कारवाई वाढविण्याबाबत त्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांशी थेट संबंध असलेल्या सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली जात असून, अशा गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिक महापालिका निवडणुकीवेळी नाशिकरोड भागात उमेदवारीसाठी इच्छूक सुरेंद्र शेजवळ या अनेक गुन्हे दाखल असलेल्या तरुणाची हत्या झाली होती. काही महिन्यापूर्वी भाजपशी संबंधित नगरसेवक हेमंत शेट्टी यास हत्या प्रकरणी अटक झाली. राजकीय गुन्हेगारीच्या दृष्टीकोनातून पंचवटी, नाशिकरोड तसेच अंबड पोलिस स्टेशन सर्वाधिक संवेदनशील मानले जातात. शहरातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये अशा गुन्हेगारांचा समावेश असून, त्यातील बऱ्याच व्यक्तीविरूद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, दंगल, खंडणी उकळणे, अपहरण, आर्म अॅक्ट असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. राजकीय पक्षांशी संबंधित गुन्हेगारांचा आढावा लवकरात लवकर घेऊन अशा व्यक्तींविरूध्द कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुरुंगातून सुटलेल्या गुन्हेगारांना सुद्धा रडारवर घेतले जाणार आहे.

निवडणूक आयोगाला माहिती देणार

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाचे काम सुरू झाले आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात येते आहे. ही सर्व माहिती निवडणूक आयोगास सादर केली जाते. त्यामुळे आपल्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती उमेदवार लपवू शकणार नाहीत. दुसरीकडे, या माहितीच्या आधारावरून प्रतिबंधक कारवाईस गती देण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रतिष्ठेसाठी आयोग दक्ष

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

-

नाशिक : प्रतिष्ठीत व्यक्तींची नावे मतदार यादीत नसल्यास निवडणूक आयोगाची प्रतिमा खराब होते. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत असे प्रकार अनेकदा घडले असून, त्यामुळे निवडणूक विभाग तोंडघशी पडला आहे. असे प्रकार टाळण्यासाठी निवडणूक विभाग सरसावला असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांची नावे मतदार यादीत राहतील याची विशेष दक्षता घ्या, असे फर्मान संबंधित तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना सोडले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अशा २५०९ व्यक्तींची महत्त्वाच्या व्यक्ती म्हणून निवडणूक विभागाने वेगळी नोंद घेतली आहे.

मतदान हा लोकशाही व्यवस्थेने प्रत्येक भारतीयाला प्रदान केलेला मूलभूत अधिकार आहे. प्रत्येक मतदाराने हा अधिकार बजवावा याबाबत निवडणूक आयोग यंदा कमालीचा आग्रही आहे. मतदार यादीत आपली अचूक माहिती राहील याची खबरदारी घेण्याची जबाबदारी प्रत्येक मतदाराची आहे. याखेरीज निर्दोष, अद्ययावत आणि परिपूर्ण मतदार यादी बनविण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडे सोपवली आहे. मतदार यादीमधील त्रुटींनी जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातही निवडणूक आयोगाची मान अनेकदा तुकली आहे. त्या त्या मतदार संघांमधील प्रतिष्ठीत व्यक्तींची नावेच मतदार यादीत नसल्याने निवडणूक यंत्रणा अनेकदा टीकेची धनी ठरली आहे. म्हणूनच निवडणूक आयोगाने यंदा त्या त्या मतदारसंघातील राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींसह समाजाशी या ना त्या कारणाने जोडल्या गेलेल्या बहुपरिचित व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट राहील याची कटाक्षाने काळजी घेतली आहे. उपलब्ध मतदार यादीमधील अशा महत्त्वाच्या व्यक्तींना चिन्हांकित करण्याचे काम निवडणूक शाखेने हाती घेतले आहे. तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशा महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावांची यादी बनविली असून, ती मतदार यादीतील नावांशी पडताळण्यात आली आहेत. यामुळे मतदारसंघामध्ये वास्तव्यास असूनही मतदार यादीमध्ये नावे नसलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींचा शोध घेणे निवडणूक शाखेला शक्य होत असून, त्यांचे मतदार नोंदणी अर्जदेखील भरून घेण्यात आले आहेत. त्यामुळे अशा मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट झाली आहेत. मालेगाव आणि नाशिक महापालिकेतील आजी-माजी नगरसेवक व अन्य पदाधिकारी, नगरपालिका, नगरपंचायतींचे आजी-माजी पदाधिकारी, जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार, राजकीय पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, इतकेच नव्हे तर प्रशासनातील अधिकारी पदावरील महत्त्वाच्या व्यक्ती, कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील सुपरिचित आणि महत्त्वाच्या अशा तब्बल २५०९ व्यक्तींच्या नावांची चिन्हांकित म्हणून वेगळी नोंद घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

..

मतदारसंघनिहाय महत्त्वाच्या व्यक्ती

मतदार संघ महत्त्वाच्या व्यक्तींची संख्या

नाशिक पूर्व ११९

नाशिक मध्य १९४

नाशिक पश्चिम २०३

मालेगाव मध्य २८५

मालेगाव बाह्य ११९

नांदगाव १११

बागलाण २१७

कळवण/सुरगाणा २९१

चांदवड/देवळा २०३

येवला १४७

सिन्नर १२७

निफाड १३०

दिंडोरी/पेठ १०४

देवळाली १३७

इगतपुरी/त्र्यंबकेश्वर १२२

एकूण २५०९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. वैशाली मुळे यांना सौंदर्य स्पर्धत किताब

$
0
0

वैशाली मुळे यांचे

सौंदर्य स्पर्धेत यश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाथर्डी फाटा परिसरातील रहिवाशी डॉ. वैशाली मुळे यांना नुकतेच मिसेस महाराष्ट्र क्वीन ऑफ नाशिक अॅण्ड फिटनेस दिवा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे विवाहित महिलांसाठी ही स्पर्धा आयोजित कारण्यात आली होती. त्यामध्ये राज्यातून ३८० महिला सहभागी झाल्या. डॉ. वैशाली यांची सुरुवातीला टॉप ४० मध्ये तर नंतर अंतिम पाच जणींमध्ये निवड झाली. चुरशीच्या स्पर्धेत त्यांनी मिसेस महाराष्ट्र क्वीन ऑफ नाशिक आणि फिटनेस दिवाचा मुकुट पटकावला. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेला मारणाऱ्या सहा जणांवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

म्हसरुळ, गोरक्षनगर परिसरातील महिलेच्या डोक्यात लोखंडी सळई मारून तिला गुरुवारी (दि. २७) दुपारी तीनच्या सुमारास बेदम मारहाण झाली होती. आपल्या पतीला नादाला लावून वारंवार घरी बोलावते या कारणावरून भांडण काढीत मारहाण करणाऱ्या सहा संशयितांवर म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित महिलेच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास महिला घरात असताना जहीर शेख तेथे आला. त्याच्याशी दीपाली बोलत असताना अर्शद शेख, हाजरा शेख, जमील शेख, सायरुन शेख, जुबेर शेख व आजीम शेख हे तेथे आले. त्यातील दोन महिलांनी दीपालीला तू जहीरला नादाला का लावते, असे विचारत शिवीगाळ केली. हातातील लोखंडी सळई डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तर उर्वरित जणांनी तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात महिला जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण समितीत आज भाजप-सेनेत लढत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावणेदोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती व उपसभापती पदासाठी आज (दि. २९) निवडणूक होत आहे. सभापतिपदासाठी भाजपच्या प्रा. सरिता सोनवणे व शिवसेनेचे सुदाम डेमसे यांच्यात लढत होत असून, उपसभापतिपदासाठी भाजपच्या वतीने प्रतिभा पवार, तर शिवसेनेच्या वतीने संतोष गायकवाड रिंगणात आहेत. समितीत भाजपचे बहुमत असले तरी शिवसेनेकडून चमत्काराची भाषा केली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे.

महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील महिला व बालकल्याण समितीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची निवडणूक सभा होईल. शिक्षण समिती सभापतिपदासाठी भाजपतर्फे प्रा. सरिता सोनवणे यांनी, तर शिवसेनेकडून सुदाम डेमसे यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. सुरुवातीला सभापतिपदासाठी निवड प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर उपसभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात येईल. उपसभापतिपदासाठी भाजपच्या वतीने प्रतिभा पवार, तर शिवसेनेकेडून संतोष गायकवाड यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे. या समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. समितीच्या नऊ सदस्यांपैकी पाच भाजपचे, तर उर्वरित चारपैकी तीन शिवसेनेचे तर एक कॉँग्रेसचा सदस्य आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असतांनाही शिवसेनेने ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हा दाखल करण्याची धमकी देत लाचखोरी

$
0
0

सहायक पोलिस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत प्रथम ५० व नंतर १० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या मुंबईनाका पोलिस स्टेशनच्या सहायक निरीक्षकाविरोधात अखेर अॅण्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत १६ नोव्हेंबर रोजी एसीबीने सापळापूर्व पडताळणी केली होती.

संतोष निवृत्ती शिंदे, असे संशयित लाचखोर सहायक निरीक्षकाचे नाव आहे. तक्रारअर्जाचा तपास करीत असताना शिंदे यांनी तक्रारदारास चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलविले होते. यावेळी एपीआय शिंदे याने तक्रारदाराकडे ५० हजारांची मागणी केली. पैसे दिले नाही तर फसवणुकीचा गुन्हा दाखल करील, अशी धमकी शिंदे यांनी तक्रारदारास दिली होती. त्यामुळे तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला. त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी एसीबीने पोलिस स्टेशन आवारात सापळापूर्व पडताळणी केली. यावेळी संशयित शिंदे याने पंच आणि साक्षीदारांसमक्ष दहा हजाराची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. या सापळ्याची चाहूल लागताच शिंदे यांनी लाच स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे एसीबीचा हा सापळा फसला होता. महिनाभराच्या तपासानंतर अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये एपीआय शिंदे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आत्महत्येबाबत आज बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली आहे. आज (दि. २९) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होणार आहे. बैठकीत २० प्रकरणे ठेवण्यात येणार असल्याची माहिती टंचाई शाखेने दिली.

जिल्ह्यात चालू वर्षात १०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून मृत्यूला कवटाळले आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी, बँकांचा तगादा यासारख्या कारणांनी आत्महत्या केल्यास संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना राज्य सरकार एक लाख रुपयांची मदत देते. नोव्हेंबरपासूनच्या शेतकरी आत्महत्येच्या २० प्रकरणांचा या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर स्वच्छ ठेवा, नदी स्वच्छ राहील!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'नदी ही आपली जबाबदारी आहे, या अर्थाने तिच्याकडे पहायला हवे. शहरातील घाण नदीत जाणार नाही याकडे कटाक्षाने पहायला हवे. शहरात, घरात जितकी स्वच्छता अधिक असेल तितकी नदी प्रदुषित होण्यापासून वाचेल,' असा सूर गोदावरी या विषयावरील चर्चासत्रात रंगला.

संस्कारभारती व इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण प्रदुषणाबाबत कलांच्या माध्यमाद्वारे जनजागृती व्हावी, या उद्देशाने आयोजित गोदास्पंदन कार्यक्रमात जलतज्ज्ञ, नदीविषयक अभ्यासक, आध्यात्मिक गुरु यांच्या माध्यमातून हे चर्चासत्र झाले.

यावेळी डी. एम. मोरे म्हणाले, 'नदी म्हणजे स्वच्छ पाणी घेऊन जाणारा प्रवाह मात्र या व्याख्येला सगळीकडे छेद दिला जातो. नदी प्रदूषित होऊ नये म्हणून जग बदलण्यापेक्षा आपण स्वत:त बदल घडविण्याची अधिक गरज आहे. आपल्या ताटामध्ये अन्न उरू नये कारण ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नदीत जाते व ती प्रदूषित होते. झाडावरील फुले तोडू नये, कारण तीही नदीत जातात.'

एन. डी. शर्मा म्हणाले,'पुराणामध्ये नदीचे माहात्म्य मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तिचे पावित्र्य जपण्याची काळजी आपण घ्यायला हवी. स्वर्ग प्राप्त करून देणाऱ्या नदीमध्ये सर्वात श्रेष्ठ गोदावरी आहे. ब्रह्मा नारद संवाद रूपाने ब्रह्मपुराणात १०५ अध्याय आहेत. कार्तिक मासाच्या कृतिका नक्षत्रावर गोदावरी स्नानाचे महत्त्व आहे.'

डॉ. प्राजक्ता बस्ते म्हणाल्या,'नदी ही सगळ्या देशात शहरी आणि ग्रामीण भागातून वाहते; परंतु दोन्ही भागांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांची आवश्यकता आहे. नदी प्रदूषण करणारा पहिला स्त्रोत म्हणजे सांडपाणी आहे. त्यावर लोकसहभागातून नियंत्रण आणले पाहिजे. किनारा हा नदीच्या जीवनाचा भाग आहे, किनारा संवर्धन जतन करण्यासाठी चिन्हांकन आवश्यक आहे.'

राजेश पंडित यांनी गोदावरी पूर्वी व आता व पुढे या विषयावर आपले मत नोंदवले. यावेळी दावांग जानी म्हणाले,'गोदावरी व तिच्या उपनद्यांची अवस्था अशी का होत आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गोदापात्रातील लक्ष्मणकुंड, धनुष्यकुंड, रामकुंड, सिताकुंड यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कुणाला वेळ नाही. प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवे.'

कार्यक्रमात 'गोदास्पंदन' या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्मरणिकेत नाशिकमधील तज्ज्ञ अभ्यासकांनी गोदावरी या विषयावर लेख लिहिलेले असून, त्यात अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. गोदावरीचे प्राचिनत्व ते गोदावरीचे आजचे स्वरूप अशा विषयांचा स्मरणिकेत समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थी प्रतिनिधी काळे

$
0
0

\Bविद्यार्थी प्रतिनिधी काळे\B

नाशिक : बीवायके कॉलेजमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यासाठी विद्यार्थी समितीची निवड करण्यात आली आहे. या समिती अंतर्गत जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात बीवायके कॉलेजमध्ये स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी निवडलेल्या समितीत विद्यार्थी प्रतिनिधीपदी कमलेश काळे, तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून रिध्दी भावसार हीची निवड करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थिनी मंच प्रतिनिधी मृणाल पाटील, तर सांस्कृतिक प्रतिनिधी निखिल बोरसे आणि गीतांजली खताळ यांची निवड करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयाच्या धुक्यात ‘पती, पत्नी आणि प्रियकर’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपल्याला प्रेम मिळत नाही, मग ते कुणालाच मिळू द्यायचे नाही. ती आपली पत्नी असली तरी तिच्याबाबत अढी ठेऊनच वागायचे, मित्रांनादेखील प्रेम मिळू द्यायचे नाही, अशा आशयाचे नाटक सादर करण्यात आले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ६६ व्या नाट्यमहोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत 'पती, पत्नी आणि प्रियकर' हे नाटक कामगार कल्याण केंद्र, देवळाली गाव यांच्या वतीने शनिवारी सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

पुरुषी अहंकार आपल्यातल्या कमतरता कुणाला जाणवू देत नाही. परंतु त्या कुणाला कळल्याच तर मात्र त्याच्यातला राक्षस जागा होतो. पत्नीला इतर कोणाकडून निर्व्याज्य प्रेम मिळत असेल तर ते त्याला सहन होत नाही. मनात सुडबुद्धी जागृत होते. आपल्याला लहानपणापासून कुणाचे प्रेम मिळाले नाही मग ते पत्नीला देखील मिळू द्यायचे नाही. पत्नीच्या बाबतीत कुणाच्या मनात हळवा कोपरा असला तर त्याचा काटा काढण्यापर्यंत मजल जाते. मग त्याच्यातील नराधम जागा होऊन समोरच्याचा बळी घेऊ पहतो अशा आशयाचे 'पती पत्नी आणि प्रियकर' हे नाटक सादर करण्यात आले.

नाटकाचे लेखन रमेश मंत्री यांनी केले होते. दिग्दर्शन प्रदीप देवरे यांनी केले. नाटकात प्रदीप देवरे, जयकुमार चव्हाण यांनी भूमिका साकारल्या. नेपथ्य माणिक कानडे, देवीदास निगड, प्रकाश योजना काका राणे, संगीत बाळकृष्ण तिडके, जयेश जाधव यांचे होते.

---

आजचे नाटक

आधारशीला

कामगार कल्याण भवन, सातपूर

स्थळ: प.सा. नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ६ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे परत करा, अन्यथा फौजदारी गुन्हे

$
0
0

मनमाड पालिकेच्या शौचालय लाभा‌र्थ्यांना नोटिसा

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नगरपालिकेकडून शौचालय बांधण्यासाठी अनुदान घेऊनही शौचालय न बांधणाऱ्या लाभार्थ्यांवर मनमाड पालिका प्रशासनाने आता कायद्याचा बडगा उगारला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अनुदानाचे पैसे पालिकेकडे परत करा, नाहीतर फौजदारी गुन्हे दाखल करू, अशा नोटिसा ४७ लाभार्थ्यांना पालिकेने पाठविल्या आहेत, त्यामुळे अनुदान घेऊनही वैयक्तिक शौचालय न बांधणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान या कारवाई मागे गेल्या आठवड्यात कामगारांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाचा मोठा प्रभाव असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सदर अनुदानाची वसुली न केल्याने कामगारांच्या पगारातून पालिका प्रशासन कपात करीत असल्याने कामबंद आंदोलनातून कामगारांनी सदर लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती.

मनमाड पालिकेने स्वच्छता अभियानातंर्गत दीड ते दोन वर्षांपूर्वी वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनुदान जाहीर केले होते. त्या लाभार्थीपैकी ४७ जणांनी शौचालय बांधले नाही, अनुदान परत केले नाही, पालिका कर्मचाऱ्यांनी नोटिसांद्वारे वारंवार सांगूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे प्रशासनाने वसुली केली नाही म्हणून कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करणे सुरू केले, त्यामुळे कर्मचाऱ्यानी गेल्या आठवड्यात काम बंद आंदोलन करून सदर लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. अखेर ४७ लाभार्थ्यांना पालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत अनुदान रक्कम जमा न केल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. सरकारी निधीचा गैरवापर व उघड्यावर शौचालयाला गेल्याने सार्वजनिक आरोग्याला हानी या कारणाने फौजदारी कारवाई करण्याचा इशारा नोटिसीत देण्यात आला आहे. हे नोटीस प्रकरण पाहून अनुदान घेऊनही शौचालय न बांधणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दीड ते दोन वर्षे उलटूनही अनुदान रकमेतून लाभार्थ्यांनी शौचालय बांधले नाही. अनुदान परत केले नाही, त्यामुळे आता फौजदारी कारवाईची नोटीस पाठवली आहे.

--डॉ. दिलीप मेनकर, मुख्याधिकारी, मनमाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीचा कडाका आणखी वाढणार!

$
0
0

नाशिक:

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये असलेल्या कडाक्याच्या थंडीने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. थंडीचा पारा आता १ अंश सेल्सियसने घरसला असून, शनिवारी किमान ५.१, तर कमाल २५.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात दिवसरात्र गारठा आहे. शनिवारीही थंडीचा पारा खाली आला असून, आर्द्रताचे प्रमाण पहाटे ३२ तर सायंकाळी फक्त २७ टक्के इतके होते. नाशिकमध्ये वाऱ्यांचा मंदावलेला वेग पाहता, पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका आणखीन वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरभरतीसाठी स्मरणपत्रे

$
0
0

२१०० पदे भरण्याची मागीतली परवानगी; तांत्रिक पदे तातडीने भरण्याचा आग्रह

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचा १४ हजारांहून अधिक पदांचा सुधारित आकृतीबंध दीड वर्षांपासून नगरविकास विभागाच्या मान्यतेसाठी प्रलंबित असताना आता वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तांत्रिक पदेही मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली आहेत. पालिकेतील रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे शासनाकडून नोकरभरतीला हिरवा कंदिल मिळत नसल्याने नोकरभरतीला परवानगी मिळावी यासाठी सरकारला स्मरणपत्र देण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. आकृतीबंधाला नाही तर किमान रिक्त पदांमधील तांत्रिक संवर्गातील १०९ पदांना तरी परवानगी द्या, अशी विनंती पालिकेने स्मरणपत्रातून केली आहे.

महापालिकेत सध्या 'क' वर्गानुसारच भरती असलेल्या रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. दरमहिन्याला किमान १० ते २५ कर्मचारी रिक्त होत आहेत. जुन्या आकृतीबंधानुसार महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावरील ७०९० मंजूर पदांपैकी विविध संवर्गातील सुमारे २१००हून अधिक पद रिक्त आहेत. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याने पर्यायाने नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याच्या महापालिकेच्या जबाबदारीतही वाढ होत आहे. मात्र, सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती वा विविध कारणांमुळे महापालिकेच्या आस्थापनेवरील मंजूर पदांपैकी रिक्त पदांची संख्या २१०० वर पोहचली आहे. यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच कामाचा ताण वाढला आहे. रिक्त पदांच्या भरतीसाठी महापालिकेच्या महासभांमध्ये अनेक वेळा ठराव मंजूर करण्यात आले. तसेच महापालिकेचा राज्यातील 'ब' वर्गीय महापालिकांमध्ये समावेश झाल्यानंतर सुमारे १४ हजारांहून अधिक पदांचा समावेश असलेला सुधारित आकृतिबंध शासनाला पाठविण्यात आला आहे.

हा आकृतीबंध पाठवून दीड वर्ष झाले तरी, सरकारकडून त्याला मंजुरी मिळालेली नाही. महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांवर गेल्याने शासनाकडून नोकरभरतीला रेड सिग्नल दाखविला गेला. पंरतु तुकाराम मुंढेंच्या काळात पालिकेचा आस्थापना खर्च हा ४२ टक्क्यांवरून ३४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. ही परिस्थिती नोकरभरतीला पोषक असल्याने मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी किमान जुन्या आकृतिबंधानुसार मंजूर पदांपैकी रिक्त असलेल्या २१०० पदांच्या भरतीसाठी शासनाने मंजुरी द्यावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाने नगरविकास विभागाकडे पत्राद्वारे केली होती. परंतू, नगरविकास विभागाने सुधारित आकृतीबंधातील दोषांकडे अंगुलीनिर्देश करताना नोकरभरतीच्या प्रस्तावावर मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. यामुळे रिक्त पदांच्या भरतीसाठी आता स्मरणपत्र पाठवावे लागले असून, त्वरीत निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

१०९ पदे तरी भरा!

जुन्या आकृतिबंधातील मंजूर पदांपैकी रिक्त असलेल्या २१०० पदांच्या भरतीला शासनाकडे मंजुरी मागण्यात आली असली, तरी ती शक्यता कमी दिसत असल्याने किमान वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ४८ व अग्निशमन विभागातील फायरमनच्या ६१ अशाप्रकारे १०९ रिक्त पदांच्या भरतीसाठी तरी शासनाने विशेष बाब म्हणून तात्काळ मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. नगरविकास विभागाकडे यासाठी वारंवार विनंत्या करण्यात आल्या असल्या तरी, नगरविकास विभागाने याबाबत कानाडोळा केला आहे. त्यामुळे निदान तातडीची गरज म्हणून १०९ पदांना तरी परवानगी द्या, असे स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेरी रस्त्यालगत झुडपांना आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पेठरोडवरील शरदचंद्र मार्केट यार्ड सिग्नल ते तारवालानगर सिग्नल यांना जोडणाऱ्या जलविज्ञान केंद्राच्या परिसरातील लिंक रोडलगतच्या गवत, झाडा-झुडपांना शनिवारी आग लागण्याची घटना घडली. या आगीत परिसरातील गवत, झुडपे जाळली. आगीच्या ज्वालामुळे मोठ्या झाडांची पालवी करपली. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग विझवली.

दिंडोरी रोड आणि पेठरोड यांना जोडणारा मेरीच्या आवारातील या रस्त्याच्या दोन्ही बाजूस दाट झाडी आणि झुडपे आहेत. या दाट झाडीत कचरा फेकण्यात येतो. या भागात गवतही वाढलेले होते. त्याला शनिवार (दि.२९) पावणेपाच वाजेच्या सुमारास आग लागल्याचे एका जागरूक नागरिकाला दिसले. त्यांनी त्वरित पंचवटी विभाग अग्निशामक दल कार्यालयाला माहिती दिली. अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. लिडिंग फायरमॅन पगारे, एम के. सोनवणे, व्ही. आर. गायकवाड, भालेराव आदी कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली. ही आग कुणी लावली की लागली हे मात्र समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतनासाठी धरणे

$
0
0

दोन महिन्यांपासून कामगार पगाराविना

..

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अंबड एमआयडीसी व सारूळ गावात दोन कंपनीतील कामगारांना दोन महिन्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. वेतनासाठी कंपनीत कार्यरत असलेल्या शंभरहून अधिक कामगारांनी शनिवारी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांचे थकीत वेतन तत्काळ अदा करावे, अशी मागणी सीटू संघटनेच्या वतीने कामगार उपायुक्तांकडे करण्यात आली.

शहराला लागून असलेल्या सारूळ गावात जेटेक्स इंजिनीअर्स नावाची कंपनी आहे, तर अंबड औद्योगिक वसाहतीत हेक्सटेक इंजिनीअर्स ही दुसरी कंपनी आहे. दोन्ही ठिकाणी सीटू संघटनेची युनियन असून, जवळपास १०० हून अधिक कामगार काम करतात. परंतु कंपनी व्यवस्थापनाने ऑक्टोबर, नोव्हेंबर व आता संपत आलेला डिसेंबर महिन्याचे वेतन अदा न केल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कंपनीचे कुठलेही नुकसान होऊ नये म्हणून कामगार त्यांच्या वेळेनुसार काम करीत आहेत. परंतु, कंपनी व्यवस्थापन थकीत वेतन देत नसल्याने कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांचे हित बघता थकीत वेतन अदा करावे, अशी मागणी सीटू संघटनेच्या वतीने कामगार उपायुक्तांकडे करण्यात आली आहे. एकदिवसीय धरणे आंदोलनात दोन्ही कंपनीतील कामगार व सीटू संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘चलो पंचायत अभियान यशस्वी करा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या 'चलो पंचायत अभियान' प्रत्येक गावात जाऊन यशस्वी करण्याची जबाबदारी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. तुम्ही करत असलेल्या कामाच्या प्रमाणपत्राची तुम्हाला गरज नाही. गावातील एका व्यक्तीने जरी सांगितले की, हा आमच्यासाठी धावून येतो तिच तुमच्या कामाची पावती असेल. त्यामुळे युवा क्रांती यात्रेच्या माध्यमातून गाव पातळीवर संघटन मजबूत करा, असे आवाहन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे-पाटील यांनी केले.

भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या युवा क्रांती मोर्चाच्या नियोजन संदर्भातील आढावा दौऱ्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे पाटील, प्रभारी प्रतिभा रघुवंशी, सहप्रभारी मनीष चौधरी, सचिव ब्रिज दत्त आदी पदाधिकारी सटाणा येथे आले असता जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक राहुल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर चिनार विश्रामगृहावर आढावा बैठक घेण्यात आली. युवकांना रोजगार पाहिजे, भावनेचे राजकारण नको, काँग्रेसचा विचारच युवाशक्तीला सशक्त भविष्य देईल, ही भूमिका अधिकाधिक युवकापर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

यावेळी 'मविप्र'चे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, नगरसेवक दिनकर सोनवणे, प्रदेश सरचिटणीस आनंद दुबे, प्रा. जितेंद्र देहाडे उपस्थित होते.

000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळेगावरोहीत अनास्थेच्या प्रसूतीकळा!

$
0
0

रुग्णवाहिकेत बिघाड; प्रसूतीसाठी मुलीला नेले हातगाडीने!

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

चांदवड तालुक्यातील तळेगावरोही उपकेंद्राची रुग्णवाहिका सुरू न झाल्याने प्रसूतीच्या कळा असह्य झालेल्या मुलीसाठी आई-बापावरच कडाक्याच्या थंडीत रुग्णवाहिका लोटण्याची वेळ आली. शनिवारी (दि. २९) रोजी पहाटे ४ वाजता हा धक्कादायक प्रकार घडला. शर्तीचे प्रयत्न करून देखील रग्णवाहिका सुरू न झाल्याने हताश झालेल्या आई-बापाने मालवाहतूक गाडीने मुलीला प्रसुतीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

शेतकरी नवनाथ लक्षण इगे (रा. निळखेडे ता. येवला) यांनी मुलगी सोनाली नवनाथ नन्नावरे (वय २२) हिला प्रसूतीसाठी (दि.२८) रोजी रात्री अकराच्या सुमारास तळेगावरोही उपकेंद्रात दाखल केले. आरोग्य सहाय्यक थेटे यांनी सोनालीची तपासणी करून प्रसुतीसाठी दाखल करून घेतले. नैसर्गिकरित्या प्रसूती होईल अशी परिस्थिती असताना पहाटे चारच्या सुमारास सोनालीची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला चांदवड उपजिल्हा रुग्णलयात दाखल करण्याचा सल्ला थेटे यांनी दिला. मात्र रुग्णालयाची रुग्णवाहिका सुरू होत नव्हती. इकडे मुलीची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे सोनालीच्या आई-वडिलांनाच रुग्णवाहिकेला धक्का देण्यास सुरुवात केली. पहाटे चारच्या सुमारास कडाक्याच्या थंडीत इगे दाम्पत्याने तब्बल अर्धा तास रुग्णवाहिकेला धक्का दिला. मात्र तरीही ती सुरू न झाल्याने अखेर नातेवाइकांच्या मदतीने मालवाहतूक वाहनाने सोनालीला चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चांदवड रुग्णालयात पोहोचताच सोनालीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र तळेगावरोही येथील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्यामुळे सोनालीला मरणयातना सोसाव्या लागल्या.

आरोग्य सेवेचे दोन रंग

तळेगावरोही उपकेंद्रात भल्या पहाटे पोटच्या गोळ्यासाठी आई-बापाला रुग्णवाहिका लोटण्याची वेळ आली तर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात येताच त्याच्यावरील संकटाचे चुटकीसरशी निरसन झाले अन् सोनालीची प्रसूती सुखरूप झाली. त्यामुळे तिचे वडील नवनाथ इगे यांनी चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक राजपूत व सहकार्यांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधुनिक शेतीकडे वळा!

$
0
0

फोटो - सतीश काळे

--

आधुनिक शेतीकडे वळा!

मंत्री महादेव जानकर यांचा शेतकऱ्यांना सल्ला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोणत्याही व्यवसायात मार्केटिंगची सर्वाधिक गरज निर्माण झाली आहे. पण शेतकरी पिकाचे मार्केटिंग करण्यात कमी पडतात. बदलत्या शेती तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास, चांगले उत्पादन मिळवता येते. सेंद्रीय पद्धतीने शेती करणे, तसेच मार्केटिंगद्वारे शेती व्यवसाय घरोघरी पोहोचवणे, असे यशस्वी प्रयत्न होत आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता आधुनिकतेची कास धरावी, असा सल्ला पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिला. 'कृषिरत्न' सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

जय किसान फार्मर्स फोरम आणि आमची माती आमची माणसं कृषी मासिकातर्फे कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त 'कृषिरत्न' पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शनिवारी गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात हा सोहळा झाला. यावेळी आमदार किशोर दराडे, कृषि शास्त्रज्ञ डॉ. जयराम पुरकर, आकाशवाणी मुंबई केंद्राचे प्रसारण अधिकारी डॉ. संतोष जाधव, फोरमचे संस्थापक प्रा. संजय जाधव व्यासपीठावर होते.

जानकर म्हणाले, शेतकऱ्यांची मुले इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत आहेत. पण इंजिनीअरिंग झाल्यावर नोकरी करणाऱ्यापेक्षा त्या तंत्रज्ञानाचा शेतीच्या विकासासाठी उपयोग करायला हवा. सोहळ्यास शेतकरी कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१८ हजार कोटींचे बजेट!

पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्रालयाकडून अनेक योजना राबविल्या जातात. मंत्रालयाचे बजेट यापूर्वी ६५० कोटी रुपयांचे होते. मात्र, शेती व्यवसाय आणि पशुसंवर्धनास चालना देण्यासाठी बजेटमध्ये तिपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळेच १८ हजार कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जानकर यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्यमंत्री घेणार ‘मौलवीं’ची भेट

$
0
0

गोवर आणि रुबेलाबाबत मालेगावी उद्या चर्चा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोवर आणि रुबेला या लसीकरणाला मालेगावमध्ये कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. त्यासाठी ते सोमवारी नाशिकचा दौरा करणार असून दुपारी ३.३० वाजता मालेगावमध्ये मौलवींची भेट घेणार आहे. या भेटीत ते लसीकरणाबाबत चर्चा करणार आहे.

गेल्या महिनाभरापासून ही मोहीम शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जिल्ह्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र मालेगावमध्ये कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे आरोग्यमंत्री थेट मौलवींची चर्चा करणार आहे. या चर्चेत ते मौलवींना नागरिकांना आवाहन व जागृती करण्याबाबतही बोलणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २०१६ साली जगातील गोवर आजाराने मृत्यूचा अभ्यास केल्यानंतर त्यात जगातील १ लाख ३४ हजार बालमृत्यू गोवरने झाल्याचे आढळले. या अभ्यासातच ४९ हजार बालके भारतातील होती. त्यामुळे हा विषय सरकारने गांभीर्याने घेतला. त्यानंतर देशभर गोवरचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण मोहीम आखली गेली. या मोहिमेतच रुबेला लसीकरणाचा सुद्धा समावेश करण्यात आला.

रुबेलामुळे येणारे बालकांतील व्यंग व मातेला होणार त्रास कमी करण्यासाठी या लसीकरणाचे नाव गोवर रुबेला झाले व देशभर ही मोहीम सुरू झाली. गोवर आणि रुबेलाचे बहुसंख्य रुग्ण १५ वर्षाखालील बालके असल्याचे आढळून आल्याने मोहिमेच्या या वयोगटावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

मालेगावमध्ये ४७ टक्के लसीकरण

जिल्ह्यात ८० टक्केहून अधिक लसीकरण झाले आहे. पण, मालेगावमध्ये आतापर्यंत ४७ टक्के लसीकरण झाले आहे. १ लाख ५१ हजार ७८२ बालकांना हे लसीकरण करायचे आहे. त्यात आतापर्यंत ७२ हजार बालकांचे लसीकरण झाले आहे. त्यात पश्चिम भागात या लसीकरणाचे प्रमाण ९० टक्के आहे. तर उर्दू भाषिक भागात हे प्रमाण कमी आहे. काही शाळांमध्ये तर ४ टक्के लसीकरण झाले आहे.

कोट

लसीकरणाबाबत असलेल्या शंका व त्यांचे समाधान करण्याचे काम आरोग्य विभागामार्फत आम्ही करीत आहोत. पण, काही भागात प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत सोमवारी मुस्लिम धर्मगुरुंची भेट घेणार आहे.

--डॉ. भिमराव त्रिभुवन,

नोडल ऑफीसर, गोवर रुबेला लसीकरण मोहीम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आत्महत्येची १३ प्रकरणे मदतीस पात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत झालेल्या शेतकरी आत्महत्यांच्या २० घटनांपैकी १३ घटनांमध्ये जिल्हा प्रशासनाने संबंधित पीडित कुटुंबांना मदत मंजूर केली आहे. सहा प्रकरणे निकषांत बसत नसल्याने त्यांना मदत नाकारण्यात आली असून, एका प्रकरणाच्या फेरचौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

विविध समस्यांनी गांजलेला शेतकरी हतबलतेने मृत्यूला कवटाळत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात तब्बल १०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. दुष्काळ, नापिकी, निसर्गाच्या लहरीपणामूळे पिकांना बसणारा फटका, घसरणारे शेतमालाचे दर, कर्जबाजारीपणा आणि कर्ज वसुलीसाठी बँकांकडून सुरू असणारा तगादा यांसारख्या कारणांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून एक लाखांची मदत दिली जाते. परंतु याव्यतीरिक्त वैयक्तिक किंवा कौटुंबीक कारणातून शेतकऱ्याने आत्महत्या केली तर त्यास जिल्हा प्रशासनाकडून मदत नाकारण्यात येते. शेतकरी आत्महत्येची आढावा बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीमध्ये गेल्या दोन अडीच महिन्यांमधील २० प्रकरणे मंजुरीसाठी ठेवण्यात आले. त्यापैकी १३ प्रकरणे नियमात बसत असल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना एक लाखांची मदत देण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. तर सहा आत्महत्या वैयक्तिक व कौटुंबीक कारणांनी झाल्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत नाकारण्यात आली आहे. एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याबाबत जिल्हा प्रशासनाला अपूर्ण अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे या प्रकरणाची फेरचौकशी करा असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यात चालू वर्षात १०८ शेतकरी आत्महत्या झाल्या असून त्यापैकी ६० प्रकरणे जिल्हा प्रशासनाने अपात्र ठरवून मदत नाकारली आहे. ४७ प्रकरणांमध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना एक लाखाची मदत करण्यात येणार आहे तर एक प्रकरण फेरचौकशीसाठी ठेवल्याने त्याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images