Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

फास्ट

$
0
0

\Bअनुदान योजनेसाठी

लाभार्थींना आवाहन

\Bनाशिक : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात मातंग समाज आणि १२ पोट जातीतील लाभार्थींसाठी बँकेमार्फत अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा मातंग समाज बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

\Bहॉल तिकीट उपलब्ध

\Bनाशिक : १०८ व्या अॅप्रेंटिसशिपसाठी ऑनलाइन परीक्षा २७ डिसेंबरपासून होणार असून, परीक्षेसाठी हॉल तिकिट विद्यार्थ्यांनी संबंधित अस्थापनेकडून उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासदार चव्हाणांची कृषिमंत्र्यांसोबत चर्चा

$
0
0

कांदाप्रश्नी तोडगा काढण्यासाठी साकडे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सततचा पाठपुरावा सुरू आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची खासदार चव्हाण यांनी नवी दिल्ली येथे कृषी मंत्रालयात भेट घेतली.

गेल्या २० वर्षांपासून कांद्याच्या मंदीचे नीट व्यवस्थापन होत नसल्याने प्रत्येक अडीच-तीन वर्षाआड मोठ्या तेजी-मंदीचे चक्र सुरू आहे. या मंदीकडे दीर्घकालीन व्यवस्थापनाची संधी म्हणूनही पाहता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत खासदार चव्हाण यांनी तात्काळ उपायोजना करण्याची मागणी कृषिमंत्र्यांकडे केली.

किमान दहा वर्षांसाठी कांदा निर्यात धोरण निश्चित करणे, केंद्र आणि राज्य सरकारने खासगी क्षेत्राच्या साह्याने किमान एक महिन्याच्या सुमारे १२ ते १५ लाख टन संरक्षित कांद्याच्या साठ्याची व्यवस्था उभारणे, खासगी क्षेत्राच्या माध्यमातून १२ ते १५ हजार टनाच्या कांदा शीतगृहे उभारणे, त्यासाठी अनुदान देणे, महाराष्ट्राखेरीज अन्य राज्यांत शेतकऱ्यांना कांदा चाळींसाठी अनुदान देणे, कांद्यातील सूक्ष्मसिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी किमान ५० टक्के अनुदान देणे, कांदा निर्यातीसाठी कायमस्वरुपी निर्यात अनुदान निश्चित करणे, अमेरिकेतील कृषी खात्याच्या धर्तीवर मासिक मागणी आणि पुरवठ्याचा अहवाल प्रसिद्ध करणे, देशांतर्गत कांदा लागवड आणि उत्पादनाची आकडेवारी देणारी यंत्रणा सक्षम आणि पारदर्शी करणे अशी मागणी त्यांच्याकडे केली.

सरकार सकारात्मक

केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी खासदार चव्हाण यांची प्रमुख मागणी कायमस्वरूपी कांदा निर्यात सुरू ठेऊन अनुदान देणेबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. तसेच येत्या काही दिवसात सदरचा निर्णय होण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याचेही सांगितले. या भेटीप्रसंगी नांदगावचे माजी जि. प. सदस्य राजेंद्र पवार, सुदामराव थेटे-पाटील, बापूसाहेब जाधव यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुटपुंज्या अनुदानाची टिमकी

$
0
0

कांदा उत्पादकांमध्ये संताप; शिल्लक कांद्याचा प्रश्न अनुत्तरितच

म. टा. वृत्तसेवा, निफाड

मातीमोल दराने कांदा विकला जात असल्याने गल्ली ते दिल्ली अशी चर्चा कांद्यावर सुरू होती. कांदा उत्पादकांचे आंदोलन, गांधीगिरी, बाजार समिती प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची पंतप्रधानांशी भेट अशा घडामोडी घडत असताना कांदा उत्पादकांना सरकार काही ना काही दिलासा देईल अशी शक्यता होती. त्यानुसार राज्य सरकारने कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. मात्र या तुटपुंज्या अनुदानावर कांदा उत्पादक समाधानी नाहीत. २०० ते २५० रुपये क्विंटल भावाने विकल्या गेलेल्या कांद्याला अनुदान मिळूनही खर्च निघणार नसल्याचे उत्पादकांनी सांगितले. त्यामुळे कांद्याला अनुदान दिल्याची टिमकी सरकार वाजवत असले तरी उत्पादकांमध्ये नाराजी आहे.

तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक संजय साठे यांनी दीड रुपया किलोप्रमाणे विक्री झालेल्या कांद्याचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनिऑर्डर केल्यामुळे नाशिकच्या कांदा उत्पादकांच्या व्यथा दिल्लीपर्यंत पोहोचल्या. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कांदा उत्पादकांनी रस्त्यावर कांदा ओतून सरकारचा निषेध केला. यामुळे कांदा या विषयावर गेले दोन आठवडे ढवळून निघाले होते. त्यातच लासलगाव आणि चांदवड बाजार समितीचे प्रशासन मंडळ आणि आमदार अनिल कदम व आमदार राहुल आहेर. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून कांद्याला एक हजार रुपये अनुदान व बाजार हस्तक्षेप योजनासह इतर उपाययोजना राबवण्याची विनंती केली होती. यावेळी मोदी यांची भेट सकारात्मक असल्याचे या सर्वांनी सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी राज्य सरकारने प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले.

सन २००० साली कांद्याचे भाव कोसळल्याने महाराष्ट्र सरकारने फेडरेशनच्या माध्यमातून ३५० रु क्विंटलने शिल्लक कांदा खरेदी केला होता. आज १८ वर्षानंतर २०० रुपये अनुदान दिले जात आहे. सन २००० साली कांदा पीक घ्यायला लागणारा खर्च, डिझेल- पेट्रोल खताचे, मजुरीचे भाव आणि आजचा खर्च याच्यात खूप वाढ झाली आहे. त्याप्रमाणत आजचे २०० रुपये म्हणजे मदतीचा उलटा प्रवास असून ही कांदा उत्पादकांची थट्टा आहे.

- जयदत्त होळकर, सभापती, लासलगाव बाजार समिती

उन्हाळ कांदा ३०० ते ३५० रुपये विकला गेला त्या शेतकऱ्यांना २०० रुपये अनुदानाने काय लाभ होणार आहे. वास्तविक दोन हजार रुपये हमी भाव कांद्याला ठरवून लिलावात पुकारलेल्या भावाची उर्वरित फरकाची रक्कम सरकारने दिली तरच कांदा उत्पादकांना परवडेल. मंत्रीमंडळातील निर्णयात उन्हाळ की लाल कांद्याला अनुदान तेही संदिगध आहे. शिवाय आता लाल कांद्याचेही दर ७०० रुपयांच्या खाली आले आहेत. त्यांना काय देणार, सरकारने बाजार समित्यांकडून वर्गीकरण करून मागितले असते तर वस्तुस्थिती समजली असती, पण ही तात्पुरती मलमपट्टी आहे.

- दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बाजार समिती

कांदा अनुदानासाठी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत लिलाव झालेल्या कांद्याची मुदत दिली आहे. माझ्याकडील उन्हाळ कांदा अजूनही चाळीत आहे. मग मी हा कांदा असाच फेकून द्यायचा का, तारखेची अट टाकून अनुदान देतानाही सरकारने शेतकऱ्यांची कोंडी केली आहे.

- अनुरूप कुंभार्डे, कांदा उत्पादक

सरकारने जाहीर केलेल्या अनुदानाचा शेतकऱ्यांना फायदा मिळणार नाही. इतका खर्च तर कांदे चाळीतून मार्केटला घेऊन जाताना भाडे, मजुरी, तोलाईसाठी येतो. उन्हाळ कांदा साठवल्याने त्याच्यात घट झाली आहे. जवळपास ५० टक्के नुकसान होऊनही भाव कमी त्यामुळे किमान हजार रुपये अनुदान दिले तरच दिलासा मिळेल.

- संपत व्यवहारे

कांद्याला २०० रुपये अनुदान जाहीर केले. पण चाळीत शिल्लक कांद्याचे काय? आज कमी भावाने कांदा विकला जात आहे. त्याचे काय? सर्वांसाठी योग्य निर्णय घ्यायला पाहीजे होता. हा प्रश्न कायमचा निकाली काढायला हवा होता. शेतकऱ्यांनी अनुदान नाकारायला हवे.

- संजय साठे, कांदा उत्पादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व जागांवर बिनविरोध निवड

$
0
0

आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यार्थी परिषदेचे गठन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी परिषदेचे गठण झाले आहे. विद्यापीठ विद्यार्थी परिषद प्रतिनिधींची सर्व जागांवर बिनविरोध निवड झाली. विद्यापीठ अधिसभेसाठी तीन विद्यार्थी प्रतिनिधी तर विद्यार्थी परिषदेसाठी एक अध्यक्ष, एक सरचिटणीस, दोन उपाध्यक्ष व दोन संयुक्त सचिव या कार्यकारी प्रतिनिधींची बिनविरोध निवड झाली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये बीड येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचा पद्मसिंह जामकर, अमरावतीच्या विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीच्या दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाचा विद्यार्थी अभिनंदन बोकरिया, शिरपूरच्या केव्हीटीआर आयुर्वेद कॉलेजचा विद्यार्थी निखिल चौधरी या तीन विद्यार्थी प्रतिनिधींची विद्यापीठाच्या अधिसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.

विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी मुंबईचे आर. ए. पोतदार वैद्यकीय महाविद्यालयाचा शिवराज काळे यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदासाठी कोल्हापूरच्या कै. केदारी रेडेकर आयुर्वेद महाविद्यालयाचा विद्यार्थी पवनकुमार भोईर, नाशिकच्या श्रीमती के. बी. आव्हाड होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी तृप्ती जोशी यांची, सरचिटणीसपदी कोल्हापूरचे पी. एस. एम. प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ॲण्ड रिसर्च महाविद्यालयाचा सौरव मुळे यांची व संयुक्त सचिवपदी अहमदनगर येथील एसएमबीटी दंत महाविद्यालयाची प्रेरणा सूर्यवंशी आणि मुंबई येथील शासकीय दंत महाविद्यालयाची गायत्री कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी काम पाहिले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर आणि विद्यापीठ प्रशासनातील पदाधिकाऱ्यांतर्फे अभिनंदन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेडाईचा प्रॉपर्टी एक्स्पो आजपासून

$
0
0

अनेक आकर्षक योजना एकाच छताखाली

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०१८' प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून शुक्रवारी (दि. २१) या तीन दिवस प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा सकाळी साडेनऊ वाजता डोंगरे वसतिगृह मैदानावर असणार आहे. यात १०० हून अधिक बांधकाम व्यावसायिक, १५ पेक्षा जास्त गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था व अन्य बांधकाम साहित्य कंपन्यांचे स्टॉल्स असतील. त्यासाठी दोन लाख चौरस फूट एवढ्या विस्तीर्ण परिसरात आकर्षक डोम उभारण्यात आले आहेत. ३०० गृह प्रकल्पातील १५ लाख ते २ कोटी पर्यंतच्या ५००० पेक्षा जास्त सदनिकांची माहिती येथे उपलब्ध होणार आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, योगेश घोलप, राहुल आहेर, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती अध्यक्षा हिमगौरी आडके, विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते व सभागृह नेते दिनकर पाटील उपस्थित राहणार आहे.

क्रेडाई ही भारतातील बांधकाम व्यावसायिकांची सर्वोच्च संस्था असून सुमारे ११००० हून अधिक बांधकाम व्यावसायिक या संस्थेशी जोडले आहेत. अर्थपुरवठा करणाऱ्या नामांकित वित्तीय संस्था, बांधकाम साहित्यातील नामांकित कंपन्या, फूड, अपारंपरिक उर्जा, सेवा पुरविणाऱ्या विविध संस्था आदींचा या प्रदर्शनात सहभाग राहणार आहे. प्रदर्शनाचे संयोजन क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल, मानद सचिव कृणाल पाटील, उपाध्यक्ष रवी महाजन, अनिल आहेर,अतुल शिंदे, राजेश पिंगळे, नरेंद्र कुलकर्णी, राजेश आहेर, ऋषिकेश कोते हे करीत आहेत. प्रदर्शन कालावधीत बुकिंग करणाऱ्या तीन भाग्यवंतांना 'हॅचिको किचन ट्रॉली'तर्फे किचन ट्रॉलीचे गिफ्ट व्हाउचर जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच या प्रदर्शनासाठी ऑनलाइन तिकीट फ्री मिळणार आहे.

गृहखरेदीसाठी पोषक वातावरण

प्रदर्शनाबाबत क्रेडाईचे अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी सांगितले, की अनेक आकर्षक योजनांसह विविध प्रकल्पात फ्लॅट, प्लॉट, फार्महाऊस,शेतजमीन, शॉप्स, ऑफिसेस, व्यावसायिक जागा, बांधकाम साहित्य, गृहकर्ज आदी सर्वच एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहे. 'रेरा' कायद्यामुळे या व्यवसायात आणखी पारदर्शकता आल्याने सद्यस्थितीत अर्थसहाय्य कारणाऱ्या संस्थांनीही कर्जाचे दर बरेच कमी केले असून कर्जाचा अवधीही वाढवला आहे. तसेच सरकारनेही पहिले घर खरेदी करण्यासाठी २.६७ लाखपर्यंत सूट दिली आहे. एकूणच, सध्या गृहखरेदीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे हे प्रदर्शन गृहखरेदीची महत्त्वाची संधी ठरणार आहे.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहीदीत दोन बिबटे पिंजराबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील दहीदी शिवारात दोन बिबट्यांना दोन वेगवेगळ्या पिंजऱ्यात बंद करण्यात मालेगाव वनविभागाला यश आले आहे. वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात हे दोन्ही बिबटे शुक्रवारी पिंजराबंद झाल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ४ डिसेंबर रोजी दहीदी परिसरातील समाधान कचवे यांच्या नर्सरीत काम करीत असताना लक्ष्मण धनाजी सोनवणे या शेतमजुरावर एका बिबट्याने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर वनविभागाने या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावले होते. शुक्रवारी या दोन्ही पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंद झाल्याने परिसरातील बिबट्याची भीती नाहीशी झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. वनविभागाकडून हे पिंजरे ताब्यात घेण्यात आले असून, या बिबट्यांना गाळणे येथील त्यांचा अधिवास असलेल्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्रात वॉटर कप स्पर्धा

$
0
0

१५ तालुक्यांत होणार वॉटर कप अंतर्गत जलसंधारण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा उत्तर महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये वॉटर कप स्पर्धा होणार असून, त्यासाठी अर्ज नोंदणीला प्रारंभ झाला आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे यंदाच्या वॉटर कप स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, राज्यभरातून २४ जिल्ह्यातील ७६ तालुक्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाउंडेशनच्या वतीने 'सत्यमेव जयते वॉटर कप २०१९' या स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून, स्पर्धेचे यंदा चौथे पर्व आहे. राज्यातील गावांमध्ये भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी, यासाठी या स्पर्धेंतर्गत जलसंधारणाचे श्रमदान गावकऱ्यांमार्फत करण्यात येते. यंदा ८ एप्रिल ते २२ मे २०१९ या कालवधीत ही स्पर्धा होणार असून, प्रथक क्रमांक पटकविणाऱ्या गावास ७५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ५० लाख रुपये आणि तृतीय क्रमाकांस ४० लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात जलसंधारणासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावाला १० लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रात यंदा दुष्काळामुळे गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून, पाच जिल्ह्यांतील पंधरा तालुक्यांत यंदा ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चांदवड व सिन्नर, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चाळीसगाव, पारोळा आणि जामनेर, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील धुळे व सिंदखेड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, अहमदनगर, पारनेर, कर्जत आणि संगमनेर या तालुक्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरीत अल्पवयीन मुलगा!

$
0
0

सुमारे सव्वा लाख रुपयांचे १८ हॅण्डसेट जप्त

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात भद्रकाली पोलिसांचा एका अल्पवयीन मुलांपर्यंत येऊन थांबला. या मुलाने दिलेल्या माहितीनुसार दोघा खरेदीदारांना पोलिसांनी अटक केली असून, चोरीचे दोन गुन्हे देखील उघडकीस आले आहेत. संशयित आरोपीच्या ताब्यातून एक लाख ३७ हजार रुपयांचे १८ मोबाइल हस्तगत करण्यात आले. संशयितांच्या अटकेने अनेक गुह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

बाजारपेठ असलेल्या मेनरोडसह जुन्या नाशकातील वर्दळीच्या भागात सतत मोबाइल चोरीचे प्रकार घडतात. नाशिक-पुणे मार्गावरील सिद्धार्थ हॉटेल पाठीमागे राहणाऱ्या शीतल प्रमोद नेवासकर यांचाही मोबाइल काही महिन्यांपूर्वी चोरीस गेला होता. मेनरोड भागात खरेदीसाठी आलेल्या नेवासकर यांच्या पाठीवर असलेल्या बॅगची चेन उघडून चोरट्यांनी दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला होता. या घटनेची दखल घेत भद्रकाली पोलिस चोरट्यांचा माग काढीत होते. या दरम्यान बागवानपुरा भागातील १७ वर्षांच्या अल्पवयीन युवकाबाबत पोलिसांना माहिती मिळाली. संशयावरून पोलिसांनी गत शुक्रवारी मुलाकडे चौकशी केली. यावेळी त्याने कबुली देत १८ मोबाइल चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी, उपनिरीक्षक विशाल मुळे, हवालदार सोमनाथ सातपुते, पोलिस नाईक रवींद्र मोहिते, पोलिस शिपाई संतोष उशीर, उत्तम पाटील, एजाज पठाण, दीपक शिलावट, गणेश निंबाळकर आदींच्या पथकाने कारवाई केली.

दोघा खरेदीदारांना अटक

चोरी केलेल्या १८ पैकी तीन मोबाइल अक्षय बाळू तेजाळे व अक्षय कैलास शिंदे (रा. दोघे काळे चौक, मोठा राजवाडा) यांना विक्री केल्याची माहिती दिली. पोलिसांनी दोघा खरेदीदारांना अटक करीत विविध कंपन्यांचे सुमारे एक लाख ३७ हजार ४८० रूपये किंमतीचे १८ मोबाइल हस्तगत केले आहेत. संशयितांच्या अटकेने भद्रकाली आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरीच्या आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुले विद्यामंदिरात गाडगेबाबांना वंदन

$
0
0

फुले विद्यामंदिरात

गाडगेबाबांना वंदन

नाशिक : अंधश्रद्धा आणि अस्वस्थता यांनी बुरसटलेल्या समाजाला कीर्तनासारख्या माध्यमातून समाजसुधारणा करणारे संत गाडगेबाबा २० व्या शतकातील आधुनिक संत होते, असे विचार संगिता महाजन यांनी व्यक्त केले.

पखाल रोडवरील मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यामंदिरात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधुरी फडके होत्या. मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन झाले. ज्योती महाले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश खैरनार यांनी प्रास्ताविक केले. मोहन माळी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रशांत गवळी यांनी आभार मानले. सांस्कृतिक प्रमुख वैशाली राजभोज यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. विद्या महाजन, जयश्री पवार, लक्ष्मण काशिद यांचे विशेष सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिओ फेन्सिंगद्वारे जलस्त्रोतांचे १०० टक्के टॅगिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'नाशिक जिल्ह्यात जिओ फेन्सिंग मोबाइल अॅपचा वापर करून एकूण ७ हजार ३९२ स्त्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात आले असून, मागील दोन वर्षांत प्रथमच स्त्रोतांचे १०० टक्के टॅगिंग करण्यात आले आहे', असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेत पाणी गुणवत्ता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. गिते बोलत होते. पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण समितीअंतर्गत जिओ फेन्सिंगद्वारे पाणी नमुने गोळा करण्याचे काम १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत करण्याचे निश्चित करण्यात आले होते. या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक स्त्रोतांची रासायनिक तपासणी अभियान राबविण्यात आले. सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे पाणी नमुने एमआरएसएसी, नागपूर यांनी तयार केलेल्या 'जिओ फेन्सिंग' या मोबाईल अॅपचा वापर करून गोळा करण्यात आले असून हे काम करणारा नाशिक जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व स्रोतांच्या पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिनस्त असणाऱ्या प्रयोगशाळेत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दूषित पाणी नमुने, टीसीएल नमुने, तालुकास्तरावरील पाणी गुणवत्ता बैठक या विषयांवर डॉ. गिते यांनी यावेळी आढावा घेतला. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, ग्रामपंचायत विभागाचे राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, कार्यकारी अभियंता पी.ठाकूर, पाणी गुणवत्ता निरीक्षक, सल्लागार, उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामलेखा समन्वयक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाताळानिमित्त फुलली बाजारपेठ

$
0
0

बच्चेकंपनीत उत्साह; आकर्षक वस्तूंची खरेदी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केवळ तीन दिवसांवर नाताळ सण आल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरातील बाजारपेठ आकर्षक वस्तूंनी फुलली असल्याचे दिसून येत आहे. ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी पताका यांसह सांताक्लॉजचे कपडे आणि विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. यामध्ये बच्चेकंपनीचा उत्साह सर्वाधिक असून, चर्च आणि घर सजावटीच्या वस्तूंची मागणी वाढली आहे.

नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती बांधवांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मेनरोड, त्रिमूर्ती चौक, नाशिकरोड येथील बाजारपेठेत नाताळाच्या वस्तूंची आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. होली रीट, बेल्स, प्रभू येशू आणि मेरी यांच्या मूर्ती, सांताक्लॉजचे कपडे, चांदणी, खेळणी, सांताक्लॉजचा मुखवटा, ख्रिसमस बॉल्स, ट्री आणि टोप्या खरेदी करण्याची लगबग बाजारात दिसून येत आहे. तसेच नाताळाच्या शुभेच्छा देण्यासाठी ख्रिस्ती बांधवांकडून मिठाई, चॉकलेट आणि केक्सची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जात असून, नाताळासाठी खास केक विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे कॉन्व्हेंट शाळांमध्येही नाताळ सणाचे सेलिब्रेशन होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह असून, बच्चेकंपनीही बाजारात गर्दी करत आहेत.

\Bअसे आहेत दर\B

- चांदणी, बॉल्स आणि बेल्स - ४० रुपयांपासून पुढे

- हँगिंग बेल्स - २५० ते १२०० रुपये

- सांताक्लॉज कापडी टोपी - १२० रुपयांपासून पुढे

- सांताक्लॉज टोपी (लाइट असलेली) - २०० रुपयांपासून पुढे

- ख्रिममस ट्री - २०० ते ३००० रुपये

- प्रभू येशू आणि मेरी मूर्ती - १५० रुपयांपासून पुढे

..

फोटो : सतीश काळे

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजंग एमआयडीसीचेफेब्रुवारीत भूमिपूजन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील अजंग-रावळगाव येथील तिसऱ्या टप्प्यातील औद्योगिक वसाहतीच्या ८२३ एकर जमिनींच्या ले-आउटला उद्योग विभागाची मान्यता प्राप्त झाली असून, या वसाहतीचे फेब्रुवारी २०१९ मध्ये भूमिपूजन होणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत भुसे यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमहापौर सखाराम घोडके उपस्थित होते. अजंग रावळगाव येथे होणाऱ्या औद्योगिक वसाहतीसंदर्भात बुधवारी मुंबई येथे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस दादा भुसे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा, अण्णासाहेब मिसाळ, कैलास जाधव, प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील आदींसह मालेगाव येथील व्यापारी व उद्योजक उपस्थित होते.

बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अजंग रावळगाव एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करून मंजूर ले-आउटनुसार सदर भूखंडावर मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज व इतर कामे व्हावीत याचे अंदाजपत्रक १५ दिवसात तयार करून निविदा मागविण्याची प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करण्यात यावी, असे आदेश देसाई यांनी बैठकी दरम्यान दिल्याचे भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. फेब्रुवारीत भूखंड मागणी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. यात समांतर भूखंड वाटप प्रक्रिया राबविण्यात येणार असून स्थानिकांबरोबर महिला, अपंग, बचतगट, शेतकरी, अनु.जाती/जमाती साठी विशेष प्रोत्साहन योजनेंतर्गत मागासवर्गीय उद्योजकांना काही भाग राखीव ठेवण्यात यावे, अशी सूचना या बैठकीत केली असल्याचे भुसे यांनी सांगितले. तसेच मालेगाव येथील प्रस्तावित उद्योग उभारणी बाबत राज्य व स्थानिक पातळीवरील उद्योजकांशी फेब्रुवारीत बैठक घेण्यास देसाई यांनी मान्यता दिली आहे. जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या दोन्ही विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक आठवड्यातून एक दिवस मालेगावी येणार असल्याचे देखील भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले

भूखंड दर ५० टक्क्यांनी कमी

तालुक्यातील सायने (बु), चाळीसगाव फाटा येथील दुसऱ्या टप्यातील वसाहतीतील भूखंड धारकांना उद्योग उभारणीस झालेल्या विलंबनामुळे उद्योग विभागाकडून भूखंड परत करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या संदर्भात भूखंड धारकांना एक वर्षांची मुदत वाढ देण्यात आली आहे. तर या ठिकाणी असलेले भूखंडाचे प्रति चौरस फूट असलेले दर जादा असल्याने उद्योजकांना परवड नसल्यामुळे सदर भूखंडाचे दर ५० टक्क्याने कमी करण्यात आले. यामुळे उद्योग उभारणीला गती मिळणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. तालुक्यातील काष्टी येथील चौथ्या टप्प्यातील शेती महामंडळाची ६३९ एकर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी मिळण्याबाबत सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरीसाठी प्रयत्न करण्यासाठी देसाई यांनी सूचना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राचा डबल धमाका

$
0
0

अजय कश्यप

भरत पुरस्कार

…अमृता जगताप

ईला पुरस्कार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे झालेल्या २९ व्या किशोर-किशोरी (१४ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अजिंक्यपद पटकावले. सबज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत दिला जाणारा किशोर गटातील भरत पुरस्कार सोलापूरच्या अजय कश्यपला, तर किशोरी गटातील इला पुरस्कार उस्मानाबादच्या अमृता जगतापने पटकावला.

किशोर गटातील अटीतटीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावातील दोन गुणांची पिछाडी भरून काढत अतिरिक्त डावात तेलंगणवर १७-१६ (५-७, ६-४, ६-५) अशी एका गुणाने मात करून अजिंक्यपद कायम राखले. तेलंगणने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्यातील दोन डावांनंतर दोन्ही संघ ११-११ अशा समानगुण स्थितीत होते. ही कोंडी फोडण्यासाठी अलाहिदा डाव खेळवण्यात आला व या डावातील महाराष्ट्राच्या संरक्षणाच्या पाळीत प्रतिस्पर्धी संघाला सामना बरोबरीत सोडवायला एका गुणाची आवश्यकता असताना अजय कश्यपने नाबाद १.४० मिनिट पळतीचा खेळ करीत विजयश्री खेचून आणली. महाराष्ट्राच्या विवेक ब्राह्मणे (१.२० मिनिट, १.२० मिनिट, १.४० मिनिट व १ गडी), सचिन पवार (नाबाद १.१० मिनिट व ४ गडी), रवी वसावे (१.१० मिनिट, १.३० मिनिट, १.३० मिनिट व ३ गडी) व किरण वसावे (२.५० मिनिट व २ गडी) यांचा विजयात सिंहाचा वाटा होता.

मुलींच्या अंतिम फेरीत बलाढ्य महाराष्ट्राने ओडिशाचा ७-६ (७-२, ०-४) असा १ डाव व १ गुणाने दणदणीत पराभव करून अजिंक्यपदावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या अमृता जगताप (नाबाद ३ मिनिटे), प्रीती काळे (२.५० मिनिटे व १ गडी), मनीषा पडेर (२.३० मिनिटे), ललिता गोबाले (३ गडी) व अर्चना व्हनमाने (१.३० मिनिट, १ मिनिट व ३ गडी) यांनी प्रशंसनीय कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगणक साक्षरतेतून ‘सोनेफो’चा वर्धापनदिन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेवखंडी (ता. पेठ) आणि माळेगाव (ता. त्र्यंबकेश्वर) या दोन शाळांमध्ये संगणक साक्षरता अभियानास प्रारंभ करून सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थेचा आठवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

पेठ तालुक्यातील शेवखंडी येथील शाळेत उभारलेल्या संगणक कक्षाचे उद्घाटन सैन्याधिकारी कर्नल शशांक सरोदे, तहसीलदार हरीश भामरे यांच्या हस्ते झाले. यावेळी 'फोरम'चे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, गट शिक्षणाधिकारी झोले, रामदास शिंदे, संदीप बत्तासे, सरपंच मैनाबाई भोये, मुख्याध्यापक चंदर चौधरी, ग्रामसेवक दुर्गादास बोसारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

त्र्यंबक तालुक्यातील माळेगाव येथील शाळेतील संगणक कक्षाचे उद्घाटन एबीबीचे महाव्यवस्थापक गणेश कोठावदे, जीएसटी उपायुक्त संजय निकम आणि बॉशचे व्यवस्थापक संदीप कारखानीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास तहसीलदार महेंद्र पवार, बीडीओ मधुकर मुरकुटे, एबीबीबीचे सीएसआर प्रमुख कुमावत, बॉशचे श्रीकांत अष्टपुत्रे, अहिरे, सरपंच तानाजी दिवे, मुख्याध्यापक अनिल भामरे, ग्रामसेवक मनोहर गांगुर्डे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दोन्ही शाळांना बॉश कंपनीच्या मदतीने प्रत्येकी १० संगणक संच आणि एबीबी कंपनीच्या वतीने २० व्हीलचेअर्स उपलब्ध करून देण्यात आल्या. दोनही शाळेतील शिक्षकांनी स्वतःच संगणक कक्षासाठी आवश्यक फर्निचर आणि सजावटीसाठी मदतनिधी उभारला. महत्त्वाचे म्हणजे उभारण्यात आलेले अद्ययावत संगणक कक्ष बघून बॉश कंपनीने जास्त शाळांत साक्षरता अभियान राबवण्यासाठी अजून काही संगणक उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे.

'फोरम' अनेक वर्षांपासून आदिवासी आणि ग्राम विकासासंबंधित उपक्रम राबवून आपला वर्धापन दिन साजरा करतो. या परंपरेनुसार या दोन गावांना आधुनिक संगणक कक्ष उभारून देण्यात आले. आधुनिक शिक्षणाशिवाय ग्रामविकास साधणे शक्य नसल्याने आदिवासी पाड्यांच्या शाळांना इ-लर्निंग आणि संगणक प्रशिक्षणाची गरज आहे.

'फोरम'चे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या संकल्पनेतून सातपुड्याच्या डोंगररांगेतील वेली माता या अतिदुर्गम आश्रम शाळेत २०१० सालापासून संगणक प्रशिक्षण यशस्वीरित्या सुरू आहे. या शाळेतून आजवर शेकडो मुलं संगणक साक्षर बनले आहेत. या यशामुळे इतरही शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यासाठी या नव्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

सोशल मीडियावर उभ्या राहिलेल्या कामामुळे ज्या सुविधा शहरातील शाळांतही मिळू शकत नाही त्या माळेगाव, शेवखंडीसारख्या अति दुर्गम खेड्यात पोहोचू शकल्या ही अनोखी घटना असल्याचे प्रतिपादन गणेश कोठावदे यांनी केले. मधुकर मुरकुटे, संदीप कारखानीस आणि असी. कमिशनर संजय निकम यांनीही उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोवासीय झाले ‘मालक’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोने नाशिक शहरात उभारलेल्या सहा योजना लिज पद्धतीच्या असल्याने येथील रहिवाशांना विविध गोष्टींसाठी सिडको प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागत होता. हस्तांतरण करताना सरकारी मुद्रांक शुल्क व सिडकोची हस्तांतरण फी दोन्ही रकमांचा बोजा पडत होता. मात्र, आता सिडकोच्या सर्व मिळकती 'फ्री होल्ड' करण्यात आल्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याने, या घरांची मालकी 'मुक्त' झाली आहे.

याबाबत आमदार सीमा हिरे म्हणाल्या की, सिडको नागरिक संघर्ष समितीच्या माध्यमातून २०१४ पासून सिडकोच्या मिळकती 'फ्री होल्ड' करून मालकी हक्‍कांत लाभार्थीचे नाव लागावे, यासाठी मागणी करण्यात येत होती. या मिळकती लिजवर असल्याने कोणत्याही परवानगीसाठी किंवा हस्तांतरणासाठी रहिवाशांना सिडकोच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. मात्र, आता या मिळकती राज्य सरकारने मुक्त केल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिडको 'फ्री होल्ड' करण्यासाठी व रहिवाशांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांच्याकडेदेखील नागरिक संघर्ष समिती व गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह सप्टेंबर २०१७ मध्ये बैठक झाली होती. या बैठकीत सिडको 'फ्री होल्ड' करण्याच्या दृष्टीने तातडीने प्रस्ताव तयार करण्यात येईल, असे आश्वासन व्यवस्थापकीय संचालकांनी दिले होते. तसा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला. तो मंत्रालयात प्रलंबित होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावावर निर्णय घेऊन सिडकोच्या मिळकती 'फ्री होल्ड' करण्यात आल्याचे जाहीर केले.

हे होणार फायदे

-बांधकाम परवानगी, वारस नोंदणी, मिळकत हस्तांतरणासाठी सिडकोच्या परवानगीची गरज नाही.

- मालमत्ता विकताना सिडकोची हस्तांतरण फी वाचणार

- गृहकर्ज प्रकरणांसाठी सिडकोच्या ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

- सिडको कार्यालयाचे हेलपाटे टळणार

एकूण सहा योजना

सिडकोने नाशिक शहरात सन १९७२ पासून घरकुल योजना बनविण्यास सुरुवात केल्यानंतर आजपर्यंत सिडकोने सहा योजना उभारल्या आहेत. यात सुमारे २५ हजार घरे असून, पाच हजार मोकळे भूखंड तयार करण्यात आले होते. सिडकोतील कोणतीही मिळकत हस्तांतरीत करण्यासाठी सिडकोची परवानगी आवश्यक होती. सिडकोतील पहिल्या १ ते ५ योजना महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झाल्यानंतर मागील वर्षी सिडकोची सहावी योजनासुद्धा हस्तांतरीत झाली आहे. नियोजनाचे अधिकारही महापालिकेला देण्यात आले आहेत. या सर्व घडामोडींमध्ये सिडको प्रशासनाचे काम कमी झाले होते. त्यातच आता सिडकोची सर्व घरे व भूखंड 'फ्री होल्ड' करण्यात आल्याने लिजवर राहणारे रहिवाशी या घरांचे मालक होणार आहेत.

९९ वर्षांचा करार संपुष्टात

सिडकोतील घरे व भूखंड हे सिडकोने नागरिकांना ९९ वर्ष किंवा ६० वर्षे लिजवर दिलेले आहेत. या निर्णयामुळे हे लिज रद्द होणार असून, नागरिक घरांचे मालक होणार आहेत. या निर्णयाने हे लिज रद्द झाल्याचे निश्चित झाले आहे. नाशिक शहराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे. बुधवारी सिडकोतील पेलिकन पार्कचा विषय मार्गी लागल्यानंतर गुरुवारी सिडकोच्या मिळकती फ्री होल्ड केल्यामुळे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्याची चर्चा सिडको परिसरात सुरू होती

रहिवाशांचा जल्लोष

'फ्री होल्ड'चे वृत्त समजताच सिडको परिसरात नागरिकांनी एकत्र येत जल्लोष केला. संध्याकाळी भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर सिडको नागरिक संघर्ष समिती व सिडकोतील हजारो नागरिकांनी स्टेट बँक चौक येथे फटाके फोडून, पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी आमदार सीमा हिरे, नगरसेविका छाया देवांग, कावेरी घुगे, भाग्यश्री ढोमसे, सिडको मंडलाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जगन पाटील, आर. आर. पाटील, पिंटू काळे, सिडको नागरिक संघर्ष समितीचे गणेश पवार, किरण थोरात, अमोल सोनार, जावेद शेख आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.

सिडकोतील मिळकती 'फ्री होल्ड' झाल्याचे समजले असले तरी अद्याप याबाबतचा निर्णय प्राप्त झालेला नाही. आदेश प्राप्त झाल्यावरच त्यातील तपशील समजणार आहे.

- अनिल झोपे, प्रशासक, सिडको

अनेक वर्षांपासूनची असलेली सिडको फ्री होल्डची मागणी मुख्यमंत्र्यांनी मंजूर करून सिडकोवासियांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. सिडकोतील नागरिक मिळकतींचे मालक झाले याचा आनंद आहे.

- सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम

सिडकोच्या नागरिकांना मिळकत घेतल्यानंतर प्रत्येक गोष्टीसाठी सिडकोची परवानगी आवश्यक होती. सिडको फ्री होल्ड करण्यासाठी १९९२ पासून पाठपुरावा सुरू आहे. त्याला यश आल्याने आनंदच झाला आहे.

-नाना महाले, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस

सिडको नागरिक संघर्ष समितीच्या वतीने सन २०१४ पासून या मिळकती फ्री होल्ड करण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. या निर्णयामुळे नागरिकांची आर्थिक कोंडीतून सुटका झाली आहे.

- गणेश पवार, अध्यक्ष, सिडको नागरिक संघर्ष समिती

सिडकोच्या विविध जाचांतून नागरिकांची आज सुटका झाली आहे. सिडकोवासीय खऱ्या अर्थाने मिळकतींचे मालक झाले आहेत.

- काशिनाथ दिंडे, नागरिक

शिवसेनेने सिडकोच्या विविध जाचक अटींबाबत मोर्चा काढला होता. त्यावेळी सिडको 'फ्री होल्ड' करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. शिवसेनेच्या मागणीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली.

- हर्षा बडगुजर, सभापती, सिडको विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकांसाठी उद्या कृतिपत्रिका मार्गदर्शन

$
0
0

रेषा केंद्रासोबत 'मटा'चा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इयत्ता दहावीच्या परीक्षा पद्धतीत कृतिपत्रिकेच्या माध्यमातून होणाऱ्या बदलांना सामोरे जाताना पालक म्हणून तुमची जबाबदारी काय असेल, कृतिपत्रिका विषयक बदलादरम्यान पाल्याला नेमके काय मार्गदर्शन करावे या आणि संबंधित प्रश्नांच्या मार्गदर्शनासाठी शनिवारी (दि. २२) पालकांकरीता सत्राचे आयोजन करण्यात आले आहेत. रेषा शिक्षण केंद्र आणि 'महाराष्ट्र टाइम्स' यांच्या वतीने हा उपक्रम होणार आहे.

दोन दिवसीय सत्रापैकी पहिले म्हणजे शनिवारचे सत्र पालकांसाठी मोफत असेल. तर रविवारी (दि. २३) विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या सत्राकरीता १०० रुपये शुल्क असेल. बदलत्या शैक्षणिक धोरणांमध्ये यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षा पद्धतीला कृतिपत्रिकांचा आधार असणार आहे. त्यामुळे पारंपरिक परीक्षेच्या प्रचलित पद्धतीशिवाय कृतिपत्रिका सोडविण्यासाठी आवश्यक घटक कोणते, त्यांची तयारी पालकांनी कशी करून घ्यावी, विद्यार्थ्यांनीही कुठल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करावे, आदी विषयांवर या उपक्रमात पालक व विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे मार्गदर्शन केले जाणार आहे. पालकांशी शनिवारी (दि. २२) संवाद साधला जाईल. पालकांना या उपक्रमासाठी मुक्त प्रवेश असेल. तर विद्यार्थ्यांशी रविवारी (दि. २३) संवाद साधला जाईल. विद्यार्थ्यांना यात सहभाग घेण्यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाईल. पालकांसाठी दि. २२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता तर दि. २३ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत एसएससी बोर्डाच्या मराठी माध्यमातील आणि याच दिवशी दुपारी १ ते दुपारी ३ या वेळेत इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र पार पडेल. हे सर्व उपक्रम ३ बी, कौस्तुभ, एस.टी. कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक या पत्त्यावर होतील. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९८५००१९६०६ किंवा ९८२२०११९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामासाठी एकच निविदा!

$
0
0

'स्मार्ट सिटी'ला ठेकेदारांचा अल्प प्रतिसाद; प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अभियानंतर्गत शहरात कोट्यवधी रुपयांच्या कामांची घोषणा करण्यात आली असली तरी, या कामांसाठी ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. गोदा प्रोजेक्ट, गावठाण पुनर्वसन विकासाच्या कामांना ठेकेदारांसाठी वारंवार निविदा काढावे लागत असल्याचे स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत समोर आहे.

स्मार्ट सिटीच्या कामांसाठी आलेल्या एकाच ठेकेदारांच्या निविदेच्या माहितीचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले. दरम्यान अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान सुरू असलेल्या स्मार्ट रस्त्याचे काम लांबल्याने संबंधित ठेकेदाराला गतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच स्मार्ट रस्त्याच्या कामाचे प्राकलन मंजूर निधीपेक्षा अधिक होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी प्रशासनाला दिल्या.

स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची दहावी बैठक अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस महापौर रंजना भानसी, स्थायी समितीस सभापती हिमगौरी आहेर-आडके, दिनकर पाटील, शाहू खैरे, गुरुमित बग्गा या संचालकांबरोबरचं पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, स्मार्ट सिटीच्या अधिकारी प्राजक्ता लवंगारे आदी उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

गोदावरी सुशोभिकरणासाठी स्मार्ट सिटी कंपनीने तीन वेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. अहल्यादेवी होळकर पुलाखाली मॅकेनिकल गेट तयार करायचा असल्याने गोदावरी सुशोभिकरणात या कामाचा समावेश असल्याने प्रतिसाद मिळत नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार आता गोदावरी सुशोभिकरण व मॅकेनिकल गेट उभारणीच्या स्वतंत्र निविदा काढल्या जाणार आहेत. तसेच गावठाण विकासाचा एकत्रित प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आल्या. त्यालाही एकाच कंपनीकडून प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी वाहतुकीबाबतचे प्रश्‍न सोडविणे गरजेचे असल्याचे नमूद केले. त्यानंतर आयटी, वाहतूक सेल कार्यान्वित करण्यास मंजुरी देण्यात आली.

स्मार्ट रोडवरून वाद

काही दिवसांपूर्वी स्मार्ट सिटी रस्त्याच्या कामाचे प्राकलन वाढविण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा होती. त्याआधारे संचालक दिनकर पाटील यांनी सविस्तर माहिती मागितली. स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ प्रकाश थविल यांनी वस्तुंचे दर वाढल्यास रस्त्याचा खर्च वाढण्याची शक्‍यता वर्तविली. मात्र, कुंटे यांनी यापूर्वी रस्ते कामासाठी मंजूर असलेल्या निधीपेक्षा अधिक खर्च वाढणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. स्मार्ट रस्त्याचे काम जूनमध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली; परंतु या दरम्यान नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने कामाला गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

कंपनीचा ३८ पदांचा आकृतीबंध

स्मार्ट सिटीमध्ये अंतर्भूत असलेल्या कामांना गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या नियमानुसार या बैठकीत कंपनीसाठी ३८ पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला. त्यामुळे अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी १५ पदे भरण्यास तात्काळ मंजुरी देण्यात आली. त्यामुळे सध्या कंपनीत रिक्त असलेली सर्व पदे भरली जाणार आहेत.

आयुक्त गमेंची नियुक्ती

तुकाराम मुंढे यांच्या बदलीमुळे स्मार्ट सिटीवरील त्यांचे पद रिक्त झाले होते. त्यामुळे मुंढे यांच्या जागी नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती झाली आहे. गमे यांना आता स्मार्ट सिटीचे सर्व आर्थिक अधिकार प्रदान करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच स्मार्ट सिटी निधी ठेवी स्वरुपात राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचेही अधिकार गमेंना प्रदान करण्याचा निर्णय याच बैठकीत झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खान्देशची संस्कृती अन् खाद्यपदार्थांची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संबळ, हलगीचे वादन, टिपरी नृत्य अन् नाशिक ढोलच्या तालावर थिरकणारे खान्देशमधील नागरिक. खान्देशच्या अस्सल ठसकेदार खाद्यपदार्थांवर ताव मारत असलेले खवय्ये अन् खान्देशच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे कलाकार, असे उत्साहवर्धक वातावरण शहरातील ठक्कर डोम येथे पहायला मिळाले. निमित्त होते, नाशिककरांच्या खान्देश महोत्सवाचे.

आमदार सीमा हिरे यांच्या संकल्पनेतून आयोजित महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी दुपारी १२.३० वाजता करण्यात आले. माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांच्या हस्ते जाते फिरवून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे यांच्यासह शहरातील नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते. सीमा हिरे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची संस्कृती आणि परंपरा अभिमानास्पद आहे. नाशिकमध्ये खान्देशच्या नागरिकांची संख्या जास्त असून, खान्देशी संस्कृती जतन करण्यात येत आहे. शिक्षण किंवा रोजगारासाठी नाशिकमध्ये स्थलांतरीत झालेल्या खान्देशातील कुटुंबांची नाळ या संस्कृतीशी जोडलेली रहावी, तसेच पुढील पिढ्यांनाही या संस्कृतीमधील परंपरांचे दर्शन घडावे, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या महोत्सवातून खान्देशची संस्कृती जाणून घेत, खाद्यपदार्थांची चव चाखण्यात नाशिककर दिवसभर रंगलेले दिसून आले.

\Bविनायकदादांना भोवळ\B

गेल्या काही दिवसांपासून काँग्रसचे ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांची प्रकृती बरी नाही. त्यामुळे महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात दीपप्रज्वलन करताना विनायकदादा पाटील यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने, त्यांना भोवळ आली. महोत्सवात उपस्थित डॉक्टरांनी विनायकदादांच्या प्रकृतीची तपासणी केली. विनायकदादांची प्रकृती ठिक असल्याचे डॉक्टरांनी सांगतले. त्यानंतर त्यांना आरामासाठी लागलीच घरी नेण्यात आले.

\Bकाव्यसंमेलनाची रंगत

\Bमहोत्सवात दुपारी २ वाजता खान्देश बहुभाषिक कवी संमेलन घेण्यात आले. या संमेलनात नाशिक, चाळीसगाव, नंदुरबार, दोंडाईचा यासह इतर जिल्ह्यातील सुमारे शंभरहून अधिक खान्देशी कवींनी सहभाग घेतला. कवींनी खान्देशच्या जीवनशैलीवर आधारित स्वरचित काव्य सादर करत काव्यसंमेलानाची रंगत अधिक वाढवली. सकाळी ८ वाजता सिडकोतील महाराणा प्रताप चौकातून महोत्सवाच्या शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. हलगी, संबळ आणि ढोलाच्या तालावर थिकरणारे खान्देशातील नागरिक, लेझीम नृत्य करणारे विद्यार्थी अन् विविध सोंगे घेऊन शोभायात्रेत सहभागी झालेले कलाकार, अशा भव्य शोभायात्रेने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. खान्देशी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी महोत्सवात खवय्यांनी गर्दी केली. खापरावरील मांडे (पुरणपोळ्या), कळण्याची भाकर, मिरचीचा ठेचा, भरलेली वांग्याची भाजी, वांग्याचे भरीत, भरली कारली, वडापाव, काळ्या मसाल्याची आमटी, मटण, चिकन, बाजरी, ज्वारी, दादरच्या भाकरी, शेंगुळे, थाळी पीठ व विविध प्रकारचे खान्देशी पापडांचा आस्वाद खवय्यांनी घेतला.

\Bमहोत्सवात आज \B

या महोत्सवात शुक्रवारी (२१ डिसेंबर) सकाळी ११ वाजता ज्येष्ठोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये ज्येष्ठांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आणि विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच सायंकाळी ६ वाजता 'न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम कार्ड बदलून घ्या!

$
0
0

\Bएटीएम कार्ड

बदलून घ्या!

\Bबँक ऑफ महाराष्ट्राचे खातेधारकांना आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

१ जानेवारी २०१९ पासून ईएमव्ही चिप असलेलीच एटीएम कार्ड सुरू राहणार आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या नियमानुसार मॅगस्ट्रीप असलेले जुन्या पद्धतीची एटीएम कार्ड ३१ डिसेंबरच्या अगोदर खातेधारकांनी बदलून घ्यावीत, असे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे करण्यात आले आहे.

मॅगस्ट्रीप असलेले एटीएम कार्ड बदलून घेण्याचे आवाहन बँकांनी खातेधारकांना वेळोवेळी केलेले असून, १ जानेवारीपासून ईएमव्ही चिप असलेली एटीएम कार्ड सुरू राहणार आहेत. त्यांचा वापर डेबिट कार्ड म्हणूनही करता येणार आहे. सर्व बँकांमध्ये नव्या ईएमव्ही चिपचे एटीएम कार्ड खातेधारकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आले असून, खातेधारकांनी एटीएम त्वरित बदलून घ्यावीत, असे बँक ऑफ महाराष्ट्रने कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतिम फेरीसाठी स्पर्धकांची निवड

$
0
0

ग्रामीण कलाकारांना नाट्य प्रशिक्षण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा येवला आणि महात्मा फुले अकादमी नाशिक यांच्यातर्फे येवल्यातील मुक्तानंद विद्यालयात झालेल्या नटश्रेष्ठ निळू फुले अभिनय करंडक अंतिम फेरी करिता स्पर्धकांची निवड झाली आहे.

निवड झालेल्या स्पर्धकांना २४ व २५ डिसेंबर रोजी कला व वाणिज्य महा विद्यालय येवला, विंचूर रोड येथे नाट्य अभिनयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात नाशिक येथून संजीव सोनावणे, नुपूर सावजी आणि नीरज करंदीकर हे नाट्य अभिनय क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षण देणार आहेत. २४ व २५ तारखेला सकाळी साडेदहा वाजेपर्यंत स्पर्धकांनी उपस्थित राहावे, येताना सोबत दुपारच्या जेवणाचा डबा, पिण्याचे पाणी, एक वही व पेन आणावा, असे संयोजकांनी कळविले आहे.

यांची झाली निवड

तनुजा कदम, गायत्री कदम, आंचल बोंबले, अर्जुन वाघ, शिवानी गिडगे, अदिती कदम, राकेश घोडेराव, प्रणाली वाघ, कृष्ण गाढे, साक्षी कदम (पाचवी ते सातवी) ओमकार दाने, भारती सौंदाणे, संकेत सोनावणे, मुस्कान शेख, प्रद्युम्न जाधव, पवन चव्हाणगीर, रसिका चव्हाण, प्रियांका नवले, प्रवीण शेलार, अनिकेत बाविस्कर (आठवी ते बारावी)

..

लोगो : नटश्रेष्ठ निळू फुले अभिनय करंडक

कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images