Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कामगार रुग्णालये असुरक्षितच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको/सातपूर

मुंबईमध्ये कामगार रुग्णालयात आग लागल्याने दहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने शहरातील कामगार रुग्णालयांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुढे आला आहे. सातपूर आणि अंबड येथे कामगार रुग्णालये आहेत. या दोन्ही ठिकाणी अग्निसुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना नसल्याची बाब उघडकीस आली आहे. मुंबईच्या घटनेनंतर तरी या रुग्णालयांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना केली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिकमध्ये सातपूर आणि अंबड येथे औद्योगिक वसाहत आहे. तर, सिन्नर येथे माळेगाव, मुसळगाव येथे औद्योगिक वसाहत आहे. नाशिक शहरालगत गोंदे, वाडीवऱ्हे येथेही खासगी उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. दिंडोरी तालुक्यातही औद्योगिक वसाहत आहे. या सर्व औद्योगिक वसाहतींत काम करणाऱ्या लाखो कामगारांसाठी अवघी दोनच रुग्णालये नाशिकमध्ये आहेत. त्यात सातपूर आणि अंबड येथील रुग्णालयाचा समावेश आहे. सातपूर येथे १०० बेडचे रुग्णालय आहे. मात्र या ठिकाणी अग्नी सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना नाहीत. यासंदर्भात प्रशासनाला विचारले असता निधी उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. तर, अंबड येथील रुग्णालयात साधे सिलेंडरही उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मुंबईमध्ये भीषण घटना घडल्यानंतर तरी या दोन्ही रुग्णालयात अग्नी सुरक्षा उपाययोजना व्हाव्यात, अशी कामगारांची मागणी आहे.

मटा भूमिका

कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांप्रमाणेच त्यांच्यासाठी असलेली रुग्णालयेही दशकानुदशके सलाइनवर आहेत. डॉक्टर, कर्मचाऱ्यांबरोबरच आवश्यक सामग्रीची टंचाई त्यांच्या पाचवीलाच पूजलेली असते. अस्वच्छतेसह इतर मूलभूत सुविधांचीही या रुग्णालयांत नेहमीच बोंब असते. आता मुंबईतील कामगार रुग्णालयातील अग्नितांडवामुळे अग्निसुरक्षेचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. कुठेतरी काही अनुचित प्रकार घडले की मग सरकारी यंत्रणेसह साऱ्यांनाच या रुग्णालयांची आठवण होते. मग तात्पुरते उपाय वा मलमपट्टीचा खेळ दाखवून रुग्णालये पुन्हा वाऱ्यावर सोडली जातात. खरेतर कामगारांच्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करुन या रुग्णालयांना आवश्यक ती मदत पुरवत सुसज्ज करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्तर महाराष्ट्र काँग्रेसची उद्यापासून बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नुकत्याच हाती आलेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर काँग्रेसचा उत्साह वाढला असून, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी उद्यापासून शहरात उत्तर महाराष्ट्र काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होत आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आ. चेल्ला वामसी चांद रेड्डी यांची या बैठकीसाठी प्रमुख उपस्थित राहणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे व शहराध्यक्ष शरद आहेर यांनी दिली.

या दोन (२० आणि २१ डिसेंबर) दिवशी होणाऱ्या बैठकीस प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी आ. के. सी. पाडवी, सहप्रभारी डी. जी. पाटील, आ. निर्मला गावित, आ. सुधीर तांबे, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, माजी मंत्री शोभा बच्छाव, प्रताप वाघ, शिरीषकुमार कोतवाल, अनिल आहेर, नानासाहेब बोरस्ते, काशिनाथ बहिरम, शंकर अहिरे, डॉ. तुषार शेवाळे तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रांतिक सदस्य, तालुकाध्यक्ष, फ्रंटल प्रमुख, लोकप्रतिनिधी, सेल अध्यक्ष व नेते उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत जिल्हानिहाय आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात येणार आहे. बूथ कमिट्या, जनसंपर्क अभियान, पक्षाच्या वतीने आयोजित प्रशिक्षण शिबिरे व वेगवेगळे कार्यक्रम याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाची रणनीती या बैठकीत आखण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी दिली. दि. २१ रोजी युवक काँग्रेस व महिला काँग्रेसची बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारची भूमिका पूर्वग्रहदूषित

$
0
0

काकाणी ग्रंथालय सप्ताहात दिप्ती राऊत यांचे मत

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शेतकरी आत्महत्याबद्दल गैरसमज असल्यामुळे समाज आणि सरकारची या प्रश्नांकडे पाहण्याची भूमिका पूर्वग्रहदूषित आहे. सरकारची भूमिका वास्तववादी व संवेदनशील असल्यास निश्चितच शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सकारात्मक बदल घडू शकेल असे, प्रतिपादन पत्रकार लेखिका दीप्ती राऊत यांनी केले.

येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेत 'कोरडी शेतं, ओले डोळे; व्यथा शेतकरी विधवांच्या' या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी त्या बोलत होत्या. राऊत यांनी व्याख्यानात महाराष्ट्रातील विविध भागांतील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना प्रत्यक्ष भेटून पाहिलेली विदारक वस्तुस्थिती श्रोत्यांसमोर मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र अजय शाह होते.

राऊत म्हणाल्या, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांकरिता शासनाने निश्चित धोरण आखले पाहिजे. या विधवांना सरकार व समाजाकडून पाठबळ मिळाल्यास त्या हिमतीने समस्यांचा सामना करीत कुटुंबाचा उद्धार करतील. बहुसंख्य शेतकरी महिलांना नवऱ्याच्या आर्थिक व्यवहारांची अजिबात माहिती नसते. किती कर्ज आहे, कुणाकडून घेतले आहे, काय तारण ठेवले आहे, सातबारावर कुणाचे नाव आहे या बाबतीत त्या अनभिज्ञ असतात. कुटुंबांमध्ये परस्पर संवाद असला आणि महिलांना आर्थिक व्यवहाराची जाण असली तर अनेक शेतकरी आत्महत्या टळू शकतील असे मत त्यांनी व्यक्त केले.

समाज आणि सरकारकडून थोडेसे जरी पाठबळ मिळाले तरी शेतकरी विधवा आपल्या कुटुंबाला समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढू शकतात असे अनेक शेतकरी विधवांची उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात शाह यांनी समाजातील संवेदनशीलता कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून शेतकरी विधवांच्या समस्यांवर व्याख्यान आयोजित करण्यामागची भूमिका विशद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ जवानाचीआत्महत्याच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डांगसौदाणे येथील जवान विजय बापू सोनवणे याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन विद्या रत्नपारखी यांनी त्यास दुजोरा दिला आहे. ड्युटीवर असताना आत्महत्या केल्याने संरक्षण विभागाकडूनही त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. म्हणूनच या संदर्भात अधिक माहिती देण्यात येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

आता कोर्ट ऑफ इनक्वायरी होणार... २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेताना एकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मंदिरासमोरील दगड, मातीचे ढिग हटवून तेथे स्वच्छता करून देण्याकरिता ६०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महापालिका विभागीय कार्यालयातील शेड मास्तर (मिस्तरी) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. धनंजय लक्ष्मण थोरभिसे असे त्याचे नाव आहे.

नाशिकरोड येथील स्वामी लक्ष्मीनंद महाराज मंदिरासमोर गेल्या काही दिवसांपासून दगड आणि मातीचे ढिग साचले होते. हे ढिग हटवून येथे स्वच्छता केली जावी, यासाठी तक्रारदाराने महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयामध्ये अर्ज केला होता. धनंजय यांनी स्वच्छता करून देण्याच्या मोबदल्यात ७०० रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली. तडजोडीअंती ६०० रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत माहिती दिली. मंगळवारी (दि.१८) सायंकाळी महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शेड कार्यालयात तक्रारदाराकडून ६०० रुपयांची लाच घेताना धनंजय यास पकडण्यात आले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी जोड

$
0
0

गीत कार्यक्रम: गाजलेल्या हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सादरकर्ते मुकुंद फणसळकर

स्थळ : कालिदास कलामंदिर, शालीमार

वेळ : रात्री ९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानात रंगली प्रश्नमंजूषा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रंथालय सप्ताहात मंगळवारी प्रश्नमंजुषा कार्यक्रम रंगला. विभावरी शिरूरकरांचे खरे नाव काय? पहिल्या मराठी वर्तमानपत्राचे नाव काय? २०१७ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक कुणाला मिळाले? यासह जनरल नॉलेजची अनेक प्रश्न विचारण्यात आली. देवदत्त जोशी, गिरीश नातू व हेमंत देवरे यांनी प्रश्न विचारले. तसेच जे योग्य उत्तर देतील त्यांना पेन बक्षिस देण्यात येत होते. विनोद राठोड, हेमंत चोपडे, प्रा. कृष्णा शहाणे, अशोक घैसास यांसह अनेकांनी उत्तरे दिली.

प्रश्नमंजुषा कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण बघावयास मिळाले. मध्येच उठून कुणीही उत्तर देत होते. प्रत्येकाला पेन मिळविण्याची घाई झालेली असल्याने कुणीही उत्तर सांगून मोकळे होत होते. मध्येच पेन संपल्याने ते आणण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू झाले. काही प्रश्न चुकीचे तर काही प्रश्नांना ऑप्शनमध्ये चुकीची उत्तरे देण्यात आली होती. एकूणच अत्यंत गोंधळाच्या वातावरणात प्रश्नमंजुषा कार्यक्रम पार पडला.

---

आजचा कार्यक्रम

वक्ते : डॉ. महेश करंदीकर

विषय : सुखाचा शोध : मानवी मेंदूत दडलंय काय?

स्थळ : मु. शं. औरंगाबादकर सभागृह, टिळकपथ

वेळ : सायंकाळी ६.३० वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंधश्रद्धा मांडणारे ‘बळी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जगभरात आधुनिकता आणि तंत्रज्ञानाच्या गोष्टी सुरू असताना महाराष्ट्रातील काही खेड्यांमध्ये मात्र अंधश्रद्धेची पाळेमुळे आजही खोलवर गेलेली आढळतात. त्यामुळे कित्येक पिढ्यांचे नुकसान झालेले आहे, यापुढेही होणार आहे. परंतु, या अंधश्रद्धेचा निकाल लावायला कुणी तयार नाही, असा आशय असलेले नाटक सादर करण्यात आले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ६६ व्या नाट्यमहोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत मंगळवारी ललित कला भवन, जळगाव, मेहरूण वसाहतच्या वतीने 'बळी' हे नाटक सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात या स्पर्धा सुरू आहे. बळीची संहिता सत्य घटनेवर आधारित होती. यात अंधश्रद्धेविषयी जागरूकता आणि योगायोग या विषयाला केंद्रबिंदू धरून ही कथा मांडण्यात आली. पारंपरिक विचारसरणी आणि त्याचा आजच्या पिढीवर होणारा परिणाम आणि शिक्षणाची कमतरता यातून एका सामान्य कुटुंबाची होणारी ससेहोलपट या नाटकात दाखविण्यात आली.

नाटकाचे लेखन रूपाली गुंगे यांनी, तर दिग्दर्शन बापुराव गुंगे यांनी केले. रंगभूषा-वेशभूषा वंदना नेवे, पद्मजा घैसास यांची होती. नेपथ्य विजय सोनार, तर प्रकाशयोजना किशोर शिंदे यांची होती. संगीत हाफीज खान यांचे होते. नाटकात निशा पाटील, जगदीश नेवे, मानसी नेवे, निखिल शिंदे, रेषा गुंगे, रत्ना ठाकरे, नीलेश रायपूरकर, योगेश हिवरकर, भूषण निकम, आनंद जोशी यांसह कलाकारांनी भूमिका केल्या.

...

आजचे नाटक

डार्लिंग

कामगार कल्याण केंद्र, सिन्नर

स्थळ : प. सा. नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ६ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार दिवस माहितीपटांची मेजवानी

$
0
0

\Bअंकुर फिल्म फेस्टिव्हल उद्यापासून\B

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सामाजिक विषयांवर भाष्य करणारे आणि तळागाळातील समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या माहितीपटांनी परिपूर्ण असा अंकुर फिल्म फेस्टिव्हल उद्या (२०) पासून सुरू होत आहे. कुसुमाग्रज स्मारक, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड येथे चार दिवस रोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.

अभिव्यक्ति मीडिया फॉर डेव्हलपमेंट, नाशिक यांच्या वतीने या सातव्या अंकुर फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. फेस्टिव्हलचे औपचारिक उद्घाटन २० रोजी प्रसिद्ध माहितीपट निर्माते अंजली मोंटेरो आणि मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे के. पी. जयशंकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी त्यांचा प्रसिद्ध माहितीपट 'अ डेलिकेट विव' दाखवला जाणार आहे.

फेस्टिव्हलमध्ये दुसऱ्या दिवशी, २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते १.३० वाजेपर्यंत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील प्राध्यापक फैझ उल्लाह हे 'चॅलेंजेस ऑफ फेक न्यूज' यावर मार्गदर्शन करणार असून, सोबत चर्चासत्र होणार आहे. याच दिवशी दुसऱ्या सत्रात संध्याकाळी ७ ते ९ यावेळेत प्रसिद्ध दिग्दर्शक कमल स्वरूप यांची 'पुष्कर पुराण' ही फिल्म दाखवली जाणार आहे. तसेच, त्यांच्याशी चर्चा करण्याची संधीही उपस्थितांना मिळणार आहे.

फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी, २२ डिसेंबर रोजी गोल्डन लोटस अॅवॉर्ड विजेते फिल्ममेकर कमल स्वरूप सकाळी १०.३० ते १.३० वाजेपर्यंत 'दिग्दर्शन' या विषयावर कार्यशाळा घेणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत विक्रांत बदरखे यांच्या 'द ड्रेनेज' या फिल्मचे स्क्रीनिंग असून, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधीसुद्धा मिळणार आहे. याच दिवशी दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत पाणी फाउंडेशनमधील वैभव हिवासा हे तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माध्यमांचा कसा प्रभावी वापर करता येईल या विषयावर संवाद साधणार आहेत.

फेस्टिव्हलच्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात १०.३० ते १ या वेळेत राष्ट्रीय पारितोषिक विजेते चित्रपट निर्माते प्रशांत नाईक हे 'फिल्म संकलन' अर्थात 'एडिटिंग' या विषयावर कार्यशाळा घेणार आहेत. संध्याकाळी ६ वाजेनंतर समारोपाच्या वेळी रांची (झारखंड) येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते मेघनाथ कुमार यांची प्रसिद्ध फिल्म 'लोहा गरम है' दाखवली जाणार आहे. पत्रकार परिषदेस रणजीत गाडगीळ, रघुनाथ फडणीस, महेश जगताप आणि जितेंद्र पगारे यांची उपस्थिती होती.

...

विनामूल्य प्रवेश

फेस्टिव्हलमध्ये प्रत्येक दिवशी फिल्म्स डिव्हिजन मुंबई यांच्या सह्योगाने, तर आयोजक अभिव्यक्ति, नाशिक यांच्या सहकार्याने पुरस्कार विजेत्या फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. हा फेस्टिव्हल सर्वांसाठी खुला असून, यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वास बँक आणि महिला सहकारी बँकेला पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्नाडस् बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनतर्फे नाशिकच्या दोन बँकांचा गौरव करण्यात आला आहे. त्यात विश्वास बँक आणि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेचा समावेश आहे. विश्वास बँकेस तीन तर महिला बँकेस दोन पुरस्कार मिळाले आहेत.

कोल्हापूर येथे प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल राम गणेश गडकरी सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा झाला. कार्यक्रमास श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी अप्पर सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर, राज्य सहकारी बँकेचे माजी सरव्यवस्थापक प्रमोद कर्नाड, शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र प्रमुख डॉ. विजय ककडे, किरण कर्नाड आदी मान्यवर उपस्थित होते. अर्बन बँक्स फेडरेशनचे व महाराष्ट्र राज्य सहकार बँक मुंबईचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते विश्वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांना आणि महिला बँकेच्या अध्यक्ष डॉ. शशी अहिरे यांना सर्वोत्तम अध्यक्ष या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विश्वास बँकेच्या २०१७-१८ च्या आर्थिक अहवालास द्वितीय पुरस्कार मिळाला. विश्वास बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेंद्र हरिभाऊ जाधव यांना विशेष वसुली अधिकारी म्हणून प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर, महिला बँकेचे सीईओ धर्मराज महाजन यांना विशेष प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा प्रश्नी नेते नाशकात

$
0
0

कांदा प्रश्नी नेते नाशकात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कांद्याच्या प्रश्नाची दखल आता विविध नेत्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे प्रणेते व स्वराज इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव तसेच प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे नाशिक जिल्ह्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारवर दबाव वाढणार आहे.

कांद्याला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. याप्रश्नी विविध प्रकारचे आंदोलनही केले जात आहे. आता या आंदोलनात शेतकरी नेतेही सक्रीय होताना दिसत आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे प्रणेते व स्वराज इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन झाले. आता त्यांनीही कांदा प्रश्नाची दखल घेतली आहे. कांद्याचा प्रश्न नक्की काय आहे, त्यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहेत हे जाणून घेण्यासाठी ते शुक्रवारी (२१ डिसेंबर) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीत ते येणार आहेत. याठिकाणी ते शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष ललित बाबर, राज्य सरचिटमीस अॅड सविता शिंदे, राष्ट्रीय नेते सुभाष लोमटे, अण्णासाहेब खंदारे आदी उपस्थित राहमार आहेत. हा प्रश्न जाणून त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा स्वराज इंडियाकडून ठरविली जाणार असल्याचे सचिव अमोल गोरडे यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलानेच केला वृद्ध पित्याचा खून

$
0
0

टेहरे येथील खून प्रकरणात उलगडा

...

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

टेहरे येथील साठ वर्षीय वृद्ध रखवालदाराच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. सैन्यातील त्याच्या जवान मुलानेच जन्मदात्या बापाच्या जाचाला कंटाळून हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.

अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी मंगळवारी सायंकाळी छावणी पोलिस ठाण्यात पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची माहिती दिली. दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी टेहरे गावाजवळील रिक्षा थांब्यापासून काही अंतरावर प्रकाश महादू बोरसे (वय ६०) या रखवालदाराचा मृतदेह आढळून आला होता. प्रारंभी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, शवविच्छेदन अहवालात धारदार हत्याराने त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस उपनिरीक्षक राहुल कोलते यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला होता

स्थानिक गुन्हे शाखा आणि 'छावणी'च्या पथकाने समांतर तपास केला. गुप्त माहितीच्या आधारे बोरसे यांचा लहान मुलगा ज्ञानेश्‍वर जो भारतीय सैन्य दलात शिपाई आहे, त्याचे घटनेच्या एक दिवसापूर्वीच वडिलांशी कडाक्याचे भांडण झाले होते. भांडणाच्या आधारे ज्ञानेश्‍वरला ताब्यात घेण्यात आले. उलटतपासणीत त्याने वडिलांचा खून केल्याचे कबूल केले. मंगळवारी संशयित आरोपीला मालेगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री ऐकत नसतील तर कांदे फेकून मारा: राज ठाकरे

$
0
0

नाशिक: 'मंत्री तुमचं ऐकत नसतील. तुमच्या मागण्या मान्य करत नसतील तर त्यांना कांदे फेकून मारा,' असा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. नाशिक दौऱ्यावर आले असता राज यांनी हा सल्ला शेतकऱ्यांना दिला.

राज ठाकरे आज कळवणला आले होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आलं होतं. यावेळी शेतकऱ्यांनी मंत्री आमचं ऐकत नसल्याची तक्रार राज यांच्याकडे केली. शेतकऱ्यांच्या या समस्या जाणून घेतानाच मंत्री ऐकत नसतील तर त्यांना कांदे फेकून मारण्याचा सल्लाही राज यांनी दिला. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी राज यांनी शेतकऱ्यांना मुंबई भेटीचं आमंत्रणही दिलं.

दरम्यान, राज यांच्या या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दिंडोरीतही त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोलताशे वाजवून राज यांचं स्वागत केलं. राज यांच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाक कर्मचारी संपावर

$
0
0

मनमाड : डाक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचे अस्त्र उपसले असून, मनमाड येथे मालेगाव विभागाच्या डाक सेवक संघटना कर्मचाऱ्यांचा संप सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी देखील सुरू होता. या संपामुळे डाक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघटना पदाधिकारी ए. पी. सोनार, प्रवीण गोसावी, सी. जे. सोनवणे, व्ही. डी. दुसाने, डी. बी. चिंचोले, एस. व्ही. जोशी यांच्यासह डाक कर्मचारी सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडूंची निवड

$
0
0

नाशिक : मविप्र संचलित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयातील कल्पंजय नाठे, सौरभ घुले व वैष्णव देशमुख या खेळाडूंची १९ ते २५ डिसेंबरदरम्यान वीर नर्मदा साऊथ युनिव्हर्सिटी सुरत गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संघात निवड झाली आहे. या निवडीबद्दल मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना क्रीडा संचालक डॉ. डी. एस. गडाख यांचे मार्गदर्शन मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकहो, ऐका हो ऐका...व्हीव्हीपॅट वापरून पहा

$
0
0

जिल्ह्यात विशेष जनजागृती मोहीम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ईव्हीएमबरोबर व्हीव्हीपॅट म्हणजे खात्री बरोबरच विश्वास हे पटवून देण्यासाठी जिल्ह्यात जनजागृतीवर भर दिला जातो आहे. खेडोपाड्यांत चित्ररथांद्वारे पथके जनजागृती करीत आहेत. मालेगाव येथील न्यायालयातही वकिलांनी स्वत: व्हीव्हीपॅटचा वापर करून पाहिला.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने पार पाडली जात असली तरी या प्रक्रियेवर राजकीय पक्षांकडून शिंतोडे उडविले जातात. म्हणूनच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट नेमके कसे काम करते याबाबतची प्रात्यक्षिके लोकांना दाखवा असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ३९ पथके स्थापन करण्यात आली असून, त्यांनी ठिकठिकाणी जाऊन जनजागृतीला सुरूवात केली आहे. यामध्ये बाजारपेठा, बसस्थानके, आठवडे बाजार व गर्दीच्या ठिकाणी जाण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने पथकांना दिल्या आहेत. त्यानुसार या पथकांनी जनजागृती सुरू केली आहे. मालेगाव येथे न्यायालयात याबाबतची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी ईव्हीएमच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. वकील बांधवांनी स्वत: ही प्रात्यक्षिके करून पाहिली. तसेच, शंकांचे निरसनही करवून घेतले. १५ जानेवारीपर्यंत ही पथके जिल्हाभर फिरणार असून, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून जनजागृती करा, असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. पथकांमध्ये बीएलओंसह ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या सुरक्षिततेसाठी पोलिस कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुंचाळ्याला नवीन पोलिस स्टेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंबड आणि सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीचे विभाजन करून चुंचाळे येथे नवीन पोलिस स्टेशन सुरू करण्याबाबत पोलिस प्रशासन सकारात्मक असून याबाबतच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे याबाबतचा आढावा घेतला. नवीन पोलिस स्टेशन कार्यान्वित झाल्यास अंबड पोलिस स्टेशनवरील कामाचा बराचसा ताण कमी होणार आहे.

अंबड आणि सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये बहुतांश मध्यमवर्गीय लोकवस्ती आहे. या परिसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. अंबड स्टेशनच्या हद्दीमध्ये जुने आणि नवीन सिडको, कामटवाडे, अंबडसह विल्होळीपासून उंटवाडीपर्यंत आणि गणेश चौकापासून अंबडगावपर्यंतचा परिसर येतो. तर सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्येही सातपूर औद्योगिक वसाहतीसह शिवाजीनगरपर्यंतचा परिसर येतो. या दोन्ही पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुमारे सहा लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे. वाढती लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी आणि तुलनेने अपुरे ठरणारे मनुष्यबळ यामुळे या दोन्ही पोलीस स्टेशनचे विभाजन करून चुंचाळे येथे नवीन पोलिस स्टेशनची निर्मिती करावी असा प्रस्ताव गृह विभागाला पाठविण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गृह विभागाचे सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे याबाबतचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या व्हिडीओ कॉन्फरन्सला पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे, तहसीलदार शरद घोरपडे आदी उपस्थित होते.

विभाजनाबाबत अहवाल पाठविणार

अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेमकी किती लोकसंख्या वास्तव्यास आहे? किती लोकसंख्येमागे पोलिस स्टेशन असायला हवे याबाबतचा अहवाल पोलिस आयुक्तांनी महासंचालकांमार्फत गृह विभागाला पाठवावा अशा सूचना परदेशी यांनी यावेळी केल्या. त्यामुळे या दोन्ही पोलिस स्टेशनचे विभाजन करावयाचे झाल्यास कोणता भाग चुंचाळे या नवीन पोलिस स्टेशनमध्ये घेता येईल, लोकसंख्येचे नेमके विभाजन कसे असणार याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून तो गृह विभागाला पाठविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुरकुलवाडीला भारत पेट्रोलिअमची साथ

$
0
0

शाळेसाठी पुरविणार पाणी, शौचालयाच्या सुविधा

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम तेल कंपनीच्या सहकार्य व सौजन्याने जवळच असलेल्या बुरकुलवाडी येथील पालिका प्राथमिक शाळा क्रमांक सातचा चेहरा मोहरा बदलणार आहे. मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या मराठी शाळेत पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून ते स्वच्छ सुलभ शौचालयापर्यंत सर्व सुविधा भारत पेट्रोलियम कंपनी देणार आहे. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी पाणी जलशुद्धीकरण यंत्रणा कंपनीतर्फे कार्यान्वीत करण्यात येत असून, सुलभ शौचालयाच्या कामांचे भूमिपूजन करून कंपनी प्रबंधक कुलदीप माने यांनी मनमाडनजीक मराठी प्राथमिक शाळेत विकास कामे करण्यात येतील याची ग्वाही दिली आहे. कंपनीच्या या स्थायी स्वरूपाच्या उपयुक्त उपक्रमाचे पानेवाडी परिसरात कौतुक होत आहे.

मनमाड नांदगाव मार्गावर पानेवाडी येथे भारत पेट्रोलिअम कंपनीचा मोठा प्रकल्प आहे. याच मार्गावर बुरकुलवाडी येथे मनमाड पालिकेची शाळा क्रमांक सात आहे.

या शाळेत मूलभूत सुविधा नसल्याचे भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याबाबत कंपनी वरिष्ठांकडे विकास कामांचा प्रस्ताव पाठवला. सदर प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून आता भारत कंपनी तर्फे प्राथमिक शाळेत सुलभ शौचालय, शाळेसाठी स्वतंत्र बोअर वेल, पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा, पोषण आहारासाठी गॅस व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा कंपनी प्रबंधक कुलदीप माने यांनी केली. नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, नगरसेवक महेंद्र शिरसाट, गालिब शेख, पालिका शिक्षण मंडळाचे अधिकारी मनीष गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत शौचालय कामाचा भूमिपूजन झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवान विजय सोनवणे यांना अखेरचा निरोप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

'अमर रहे, अमर रहे वीर जवान विजय सोनवणे अमर रहें', 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' अशा घोषणा देत डांगसौंदाणे येथील नागरिकांनी भूमीपूत्र लष्करी जवान विजय सोनवणे यांना भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप दिला. विजय सोनवणे (वय ३३) यांचा आसामच्या तेजपूर भागात सोमवारी (दि.१७)कर्तव्यावर असताना मृत्यू झाला होता.

मंगळवारी (दि.१८) रात्री उशिरा विजयचे पार्थिव डांगसौंदाणे येथे आणण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांनी गावातील आठवडे बाजार, व्यापारी पेठा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत विजय सोनवणे यांच्या अंतिम संस्कारासाठी बाजार आवारतील मुख्य पटांगणात फुलांनी सजविलेला चबुतरा बांधून तयारी केली होती. अंत्यसंस्कारापूर्वी विजय यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी विजय यांची पत्नी खुशाली, आई-वडील, त्यांची ४ वर्षाची मुलगी अनुष्का आणि १३ महिन्यांचा मुलगा वृषभ या सर्वांचा आक्रोश उपस्थितांची मने हेलावणारा होता. फुलांनी सजविलेल्या रथातून विजय यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी अंतिम दर्शनासाठी मोठी रीघ लागली होती. प्रत्येक घरासमोर विजय यांना रांगोळी घालून श्रद्धांजली वाहण्यात आली. अंत्यसंस्कारप्रसंगी बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, नगराध्यक्ष सुनील मोरे, सटाणा बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे, सुरेश वाघ, कैलास बोरसे, पंढरीनाथ बोरसे, सोपान सोनवणे, उपसरपंच विजय सोनवणे, डॉ. सुधीर सोनवणे, पंकज बधाण, अंबादास सोनवणे, पंढरीनाथ सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्यावतीने प्रभारी पोलिस अधिकारी सोनाली कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, आसाम तेजपुरहून आलेले नायक सुभेदार गोरख कोरडे, नायक सुभेदार उत्तम सेंडगे, नायक कृष्णा सोनवणे, दादा जाधव, संपत चव्हाण, प्रांताधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार प्रमोद हिले, ग्रामपंचायत सरपंच जिजाबाई पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरेंचे दिंडोरीत जंगी स्वागत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दिंडोरी शहरात ढोलताशांच्या गजरात आणि त्यांच्या वाहनावर पुष्पवृष्टी करून उत्साहात स्वागत करण्यात झाले. दिंडोरी शहरात तरुणांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने राज ठाकरेही भारावून गेले.

कळवण दौऱ्यावर जात असताना दिंडोरी येथे पालखेड चौफुलीवर सकाळी साडे नऊपासून तालुक्यातील मनसैनिक, युवक कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. सकाळी अकराच्या सुमारास राज ठाकरे यांचे आगमन होताच ढोल ताशाच्या निनादात फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज ढिकले, तालुकाध्यक्ष अमोल उगले, उपाध्यक्ष सतीश मालसाने, रोशन दिवटे, प्रीतम गांगोडे, शहराध्यक्ष अभिजित राऊत, रमेश जोंधळे आदी पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. दिंडोरी नगरपंचायतच्या वतीने उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, गुलाब जाधव आदींनी स्वागत केले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाला गराडा घालत ठाकरे यांची छबी टिपण्यासाठी गर्दी केली. अखेर राज ठाकरे यांनी कारच्या फूटरेस्टवर उभे राहून सर्वांचे अभिवादन स्वीकारले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दौऱ्यात राज ठाकरे यांचे समवेत माजी मंत्री बाळा नांदगावकर, प्रदेश सरचिटणीस अनिल शिदोरे, अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम आदी मान्यवर सहभागी होते.

तरुणाईत क्रेज कायम

युवकांमध्ये युवा नेते म्हणून राज ठाकरे यांची क्रेझ कायम असल्याचे आज दिंडोरीत दिसून आले. सकाळपासून शेकडो युवक राज ठाकरे यांच्या प्रतीक्षेत होते. राज ठाकरे यांचे आगमन होताच युवकांनी त्यांना बघण्यासाठी व मोबाइलमध्ये फोटो घेण्यासाठी गर्दी केली होती. राज ठाकरे यांनीही उभे राहून सर्वांना अभिवादन करीत प्रतिसाद दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images