Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वाहतूक कोंडमाऱ्यातून सुटका?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेसह शहर वाहतूक विभाग पुढे सरसावले आहेत. शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली जाणार असून, २८ ऑफस्ट्रीट आणि ऑनस्ट्रीट पार्किंगबाबत वाहतूक शाखेच्या वतीने लवकरच क्लिअरन्स दिला जाणार आहे. तीन ठिकाणी नवीन सिग्नल बसविण्यात येणार आहेत. महापालिकेत झालेल्या मोबिलिटी सेलच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना, शहरात पार्किंग, वाहतुकीचे प्रश्नही दिवसेंदिवस बिकट होत चालले आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला दिशा देण्यासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मोबिलिटी सेलची स्थापना केली होती. त्यानुसार या सेलमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील वाहतूक समस्यांबाबत उपाययोजना करण्यासाठी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात 'मोबिलिटी सेल'ची बैठक पार पडली. यात शहर वाहतूक सुरळीत होण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीस शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) शिवाजी चव्हाणके, उपायुक्त (अतिक्रमण) रोहिदास बहिरम, कार्यकारी अभियंता (नगरनियोजन) उदय धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता (वाहतूक कक्ष) रामसिंग गांगुर्डे, उपपरिवहन अधिकारी विनय आहिरे, शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक फुलदास भोये, उपप्रकल्प संचालक दिलीप पाटील, नाशिक फर्स्ट या संस्थेचे अभय कुलकर्णी, देवेंद्र बापट, प्रमोद लाड, उद्यान अधीक्षक शिवाजी आमले आदी उपस्थित होते. सध्या शहरात अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहनांमुळे अपघात होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा वाहनांना शहरात प्रवेश करण्यापासून मज्जाव केल्यास शहरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणातही घट होईल अशी चर्चा बैठकीत करण्यात आली. अवजड वाहनांसाठी आडगाव ट्रक टर्मिनसच्या धर्तीवर शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर ट्रक टर्मिनस उभारण्यात येतील. याद्वारे अवजड वाहने या ट्रक टर्मिनसवर थांबवून लहान वाहनांद्वारे आवश्यकतेनुसार त्यातील मालाची वाहतूक केली जाईल. अथवा ठराविक वेळेतच अशा वाहनांना शहरात प्रवेश दिला जाईल. यासंदर्भातील अधिसूचना लवकरच जारी केली जाईल, असे वाहतूक शाखेच्या वतीने या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त गमे यांनी दिले.

प्रोजेक्ट गोदाबाबतही दक्षता

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत 'प्रोजेक्ट गोदा'चे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. यासाठी पंचवटी, रामकुंड तसेच गोदाघाट परिसरातील वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. यासाठी पोलिस यंत्रणेचीही मोठ्या प्रमाणावर मदत लागणार असल्याची चर्चा या बैठकीत करण्यात आली. प्रोजेक्ट गोदाअंतर्गत नदीकाठावर 'नो पार्किंग झोन' आणि फेरीवाला धोरणासंदर्भातील स्पॉट वाहतूक विभागाने सुचवावेत, अशा सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. त्यादृष्टीने वाहतूक शाखा व पोलिस खात्याने नियोजन करण्यात येणार आहे.

१२ अपघातप्रवण ठिकाणी उपाययोजना

शहरी हद्दीतल्या रस्त्यांवरील अपघातांना आळा घालण्यासाठी अपघातप्रवण ठिकाणे शोधून त्यावर लघुत्तम व दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. महापालिका स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीमार्फत त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्यात येईल. त्यामार्फत शहरातील १२ अपघातप्रवण क्षेत्रांचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्याचे व त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त गमे यांनी दिले. तूर्त अपघातप्रवण क्षेत्रावर रम्बलर्स, कॅट आय, मार्गदर्शक फलक लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तीन ठिकाणी सिग्नल

या बैठकीत शहरात नव्याने पाच ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यावर सविस्तर चर्चा झाली. पाचपैकी पपया नर्सरी (त्र्यंबकरोड), प्रिं. टी. ए. कुलकर्णी चौक (कॉलेजरोड), विहितगाव चौक (नाशिकरोड) या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कर्मयोगीनगर चौक येथे सिग्नलऐवजी वाहतूक बेट करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचप्रमाणे शरणपूररोडवरील एचडीएफसी चौक अरुंद असल्याने या ठिकाणी पाहणी करून निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले.

२८ ठिकाणी पार्किंगस्थळांचा अभ्यास

शहरातील वाहनतळांचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरात २८ ठिकाणी ऑनस्ट्रीट तर ५ ठिकाणी ऑफस्ट्रीट पार्किंगची उभारणी केली जात आहे. या पार्किंगबाबत येत्या दोन दिवसांत अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा मोबिलिटी सेलचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी शहर वाहतूक शाखेला दिले. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरात २८ ठिकाणी ऑनस्ट्रीट तर ५ ठिकाणी ऑफस्ट्रिट स्मार्ट वाहनतळे विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र पोलिस, वाहतूक शाखा आणि महापालिका यांच्यातील समन्वयाअभावी हा प्रकल्प रखडला होता. प्रामुख्याने ऑनस्ट्रीटवरील वाहनतळ हे समांतर असावे की काटकोनी स्वरुपात याविषयीचा वाद होता. सिटी सेंटरसमोरील रस्त्यावर या मुद्द्यामुळेच स्मार्ट पार्किंगचा प्रयोग फसला होता. अखेर या विषयावर आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली व शहर वाहतूक शाखा, पोलिस, प्रादेशिक परिवहन विभाग आदी विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या 'मोबिलिटी सेल'च्या बैठकीत तोडगा काढला गेला. ऑनस्ट्रीट पार्किंगबाबत शहर वाहतूक शाखेने दोन दिवसांत अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्त गमे यांनी दिले. त्यानुसार शहर वाहतूक शाखेमार्फत तातडीने परवानगी देणेबाबत सहमती दर्शविली.

ही आहेत पार्किंगस्थळे!

कुलकर्णी गार्डनलगत साधू वासवानी रोड, कुलकर्णी गार्डनमागील रस्ता, कुलकर्णी गार्डन ते बीएसएनएल कार्यालय रस्ता, ऋषिकेश हॉस्पिटल ते गंगापूरनाका, प्रमोद महाजन उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर, गंगापूरनाका ते जेहान सर्कल, जेहान सर्कल ते एबीबी सर्कल, श्रीगुरुजी रुग्णालय ते पाइपलाइन रोड, थत्तेनगर रोड, पंडित कॉलनी मनपा कार्यालयासमोर, कॅनडा कॉर्नर ते पॅनासोनिक गॅलरी, एचडीएफसी चौक ते एमएसईबी कार्यालय, मॉडेल कॉलनी चौक ते भोसला स्कूल गेट, सिटी सेंटर ते लव्हाटे नगर लेन २, मोडक पॉइंट ते धाडीवाल रुग्णालय, जिल्हा रुग्णालय ते जलतरण तलाव, रमाबाई विद्यालय ते आयकर कार्यालय, मालेगाव स्टॅण्ड ते निमाणी चौक, निमाणी चौक ते चित्रकूट, मालेगाव स्टॅण्ड ते मखमलाबाद नाका, एम. जी. रोड, सीबीएस ते शालिमार, मोडक पॉइंट ते खडकाळी रोड, शिवाजी पुतळा ते आंबेडकर पुतळा (नाशिकरोड), बिटको चौक ते महात्मा गांधी पुतळा, शालिमार ते नेहरू गार्डन, गाडगे महाराज पूल ते टाळकुटेश्वर पूल.

स्मार्टचे काम वेळेत पूर्ण करा

या बैठकीत स्मार्ट सिटीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट रोडवरही चर्चा करण्यात आली. या रोडच्या संथ कामामुळे वाहतुकीचा प्रश्न बिकट बनला आहे. त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभापर्यंत १.१ किलोमीटरचा मॉडेल रोड तयार केला जात असून, ठेकेदाराला एक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे थविल यांनी या रस्त्याबाबत टाइमबाँड प्रोग्राम तयार करावा, अशी सूचना गमे यांनी केली. हा रस्ता आता दिलेल्या वेळेत पूर्ण करा, असेही सुनावले.

मोबिलिटी सेलच्या बैठकीत शहर वाहतूक सुरळीत करण्यासह पार्किंगच्या प्रश्नांवर चर्चा झाली. शहर वाहतुकीच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आले असून त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले आहेत. स्मार्ट रोडचे कामही वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- राधाकृष्ण गमे, आयुक्त, मनपा

येथे होणार सिग्नल

-पपया नर्सरी, त्र्यंबकरोड

-प्रिं. टी. ए. कुलकर्णी चौक, कॉलेजरोड

-विहीतगांव चौक, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डांगसौंदाणे येथील जवानास वीरमरण

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथील मराठा बटालियनचा लष्करी जवान विजय बापू सोनवणे (वय ३३) यांना आसाममधील तेजपूर सेक्टर येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले. त्यांच्या मागे आई, वडील, मोठा भाऊ, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, जवान विजय सोनवणे यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्याला वीरमरण आल्याची माहिती बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी दिली. दरम्यान, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनीदेखील या वृत्तास दुजोरा दिला असून, मंगळवारी विमानाने विजय सोनवणे यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे.

लष्करी सेवेत १५ वर्षांपासून कार्यरत असलेले जवान विजय सोनवणे यांनी लेह-लडाखसह जम्मू-काश्मीर भागातही कर्तव्य बजावले होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेले विजय बारावीनंतर लष्करी सेवेत दाखल झाले. गेल्या महिन्यात ते दिवाळीसाठी गावी आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवेवर लुटणारे दोघे तरुण अटकेत

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हायवेवर कंटेनर अडवून चालकावर चाकू हल्ला करीत लूटमार करणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह विविध अवजड वाहनचालकांचे लायसन्स जप्त करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील हायवेवरील लुटमारीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

सतीश बाळू दोंदे (वय २१, रा. तळेगाव, ता. इगतपुरी) आणि दीपक सखाराम जाधव (वय २१ मूळ रा. तळेगाव, हल्ली दांड उमरावण, ता. शहापूर) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास लुटमारीची घटना घडली होती. उत्तर प्रदेशातील चालक इमरान सत्तार शेख तळेगाव शिवारात रस्त्याच्या कडेला कंटेनर उभा करून काच पुसत असतांना ही घटना घडली. पल्सर दुचाकीवर आलेल्या अज्ञात तिघा आरोपींनी शेख याच्यावर चाकूहल्ला केला. तसेच खिशातील २५ हजाराची रोकड लायसन्स आणि कंटेनरची चावी घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी इगतपुरी पोलिसात शनिवारी (दि. १५) लुटमारीचा गुन्हा दाखल झाला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांना या गुन्ह्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, सतीश दोंदे यास ताब्यात घेण्यात आले. दोंदेने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदाराचे नाव सांगितले. पोलिसांनी लागलीच शहापूर तालुक्यातील लतीफवाडी शिवारात जाधवला पकडले. संशयिताकडून दोन हजार १०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. संशयितांच्या ताब्यात अनेक ट्रक चालकांचे लायसन्स मिळून आले. त्यामुळे हायवेवरील लुटमारीच्या अनेक गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दोघे संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कसारा पोलिस स्टेशनमध्ये जबरी लूट, रेल्वेत दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई उपनिरीक्षक स्वप्नील नाईक, एएसआय नवनाथ गुरूळे, हवालदार शिवाजी जुंदरे, बंडू ठाकरे, शिपाई संदीप हांडगे, सचिन पिंगळ आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयिताच्या कोठडीत वाढ

0
0

संशयिताच्या

कोठडीत वाढ

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

संतोष आगाम याच्या खुनप्रकरणी ऋषिकेश गोरे याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने १९ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. संतोषने संशयित असलेल्या आरोपीच्या बहिणीशी हुज्जत घातली होती. यानंतर गोरे व दोन अल्पवयीन मुले संतोषकडे विचारणा करण्यासाठी गेले. संतोषने त्यांच्याशी भाईगिरीची भाषा करीत मारहाण केली होती. याचाच राग मनात धरून गोरे व दोन अल्पवयीन मुलांनी संतोषला शनिवारी, ८ डिसेंबर रोजी दुचाकीवरून बेळगाव ढगा शिवारात नेले. तेथे संतोषवर कोयत्याने अनेक वार केले होते. यानंतर पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना आणि नंतर गोरे यास नांदेड येथून ताब्यात घेतले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन नेट परीक्षा आजपासून

0
0

१० हजारांवर परीक्षार्थी; पहिल्या टप्प्यास प्रारंभ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या वतीने यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणारी 'नेट' परीक्षा शहरातील परीक्षा केंद्रावर सुरू होणार आहे. या आठवड्यात पाच दिवसांच्या कालावधीत ही परीक्षा दिवसभरातील दोन सत्रांमध्ये पार पडणार आहे. जिल्हाभरातून सुमारे १० हजारावर परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहे.

नेट परीक्षा यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. या परीक्षेत तीन ऐवजी दोनच पेपर समाविष्ट करण्यात आले आहेत. पहिल्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना ५० प्रश्न तर दुसऱ्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना १०० वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवावे लागणार आहेत. एकूण ३०० गुणांसाठी ही परीक्षा होईल. यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा पार पडत असल्याने एनटीएच्या वेबसाइटवर उमेदवारांसाठी मॉक टेस्टची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या सत्रात सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत दोनपैकी पहिला पेपर तर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत दुसरा पेपर पार पडणार आहे. तर दुसऱ्या सत्रातील पहिला पेपर दुपारी २ ते ३ या वेळेत आणि या सत्रातील दुसरा पेपर ३.३० ते ५.३० या वेळेत हे पेपर होणार आहेत.

\Bपरीक्षेला जाताना हे लक्षात ठेवा

\B- तुमच्या हॉलतिकीटावरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करा

- परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेअगोदर उपस्थित रहा

- सोबत अॅडमिट कार्डवर अपलोड केलेल्या पासपोर्ट फोटोच्या प्रति असू द्या

- ओळखपत्र म्हणून अॅडमिट कार्ड सोबतच शासनाधिकृत ओळखपत्राचा वापर करा (उदा. ड्रायव्हींग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक आयोग ओळखपत्र, रेशन कार्ड इ.)

- परीक्षागृहात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पेन-पेन्सील, कागद नेण्यास मनाई आहे

- परीक्षेदरम्यान कच्च्या कामासाठी आवश्यक ते शैक्षणिक साहित्य परीक्षा केंद्रावर पुरविले जाईल

- परीक्षागृह उघडल्यानंतर परीक्षार्थी आपल्या आसन क्रमांकावर जाऊन लॉग इन करून सूचनांचे अवलोकन करू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवेच्या गुणवत्तेची एकलहरेत तपासणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकलहरे येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या आसपास आता प्रदूषण मंडळ हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसवणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण केले जाणार असून त्यानंतर ही यंत्रणा कोठे बसवायची याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे एकलहरे येथे वारंवार होणाऱ्या प्रदूषणाच्या तक्रारींना त्यामुळे बळ मिळणार आहे.

एकलहरे येथील औष्णिक प्रकल्पात मोठ्या प्रमाणात फ्लाय अॅश तयार होते. ही राख मोठ्या प्रमाणात हवेत मिसळते. त्यातून प्रदूषण होते. यासाठी प्रदूषण मंडळाने या प्रकल्पाला अनेक वेळा प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या तर काही वेळेस बँक गँरंटी घेतली. आता हवेची गुणवत्ता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्वयंचलित यंत्रणाच मोजणार असल्याने त्यातून प्रदूषणाची नेमकी स्थितीही कळणार आहे.

४८ वर्षांपासून एकलहरे येथे कोळशापासून वीजनिर्मिती करणारा प्रकल्प आहे. तो पूर्ण क्षमतेने कार्यरत असताना दर महिन्याला १ लाख १० मेट्रिक टन राख बाहेर पडले. या राखेमुळे वायू, भूमी व जलप्रदूषण होते. या राखेचा सर्वाधिक फटका हा पिकांनाही बसतो. तर काहींना आजारही होतात.

मालेगावमध्ये ९५ यंत्र

जिल्ह्यातील मालेगाव या शहरातही प्रदूषण मंडळाने हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ९५ ठिकाणी स्वयंचलित यंत्रणा बसवली आहे. यंत्रमाग असलेल्या या शहरात हवेच्या शुद्धतेचा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. तसेच लाकडाचे व प्लॅस्टिक जाळण्याचे प्रमाण कमी व्हावा, यासाठी कोळसा वापरण्याचा कोटा दिल्याची माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमानात घसरणीने खान्देश गारठला

0
0

टीम मटा, जळगाव

गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यासह खान्देशात थंडीची लाट आली आहे. सोमवारी (दि. १७) नाशिकपेक्षादेखील जळगावचे किमान तापमान कमी आहे. शहराचे किमान तापमान ८.४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने जिल्हा गारठला असून, नागरिकांना थंडीने हुडहुडी भरली आहे. राज्यात किमान तापमानात जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून, पुण्यानंतर जळगावकरांना बोचरी थंडीचा अनुभव मिळत आहे. धुळे शहराचेही किमान तापमान ७.२ अंश सेल्सिअस एवढे कृषी विभागाच्या केंद्राकडून नोंदविण्यात आले आहे.

जळगाव शहरात डिसेंबर महिन्यापासून तापमानात चढउतार सुरूच आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी १४ अंश असलेले किमान तापमान सहा अंशांनी घसरून ८ अंश सेल्सिअसवर आले आहे. थंडीबरोबरच बोचऱ्या वाऱ्यांमुळे जळगावकर हैराण झाले आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांचा जोर वाढल्याने जळगाव शहरात थंडीची हुडहुडी वाढली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच जळगावकरांनी थंडीची लहर अनुभवली. शहराचे किमान तापमान गेल्या काही दिवसांपासून ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. गेल्या दोन दिवसांत किमान तापमान घसरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. अंगाला झोंबणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यामुळे जळगावकर गारठून गेले आहेत. झोंबणारे हे गार वारे थंडीची हुडहुडी वाढवित असून, या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम होऊन सर्दीच्या रुग्णांतही वाढ होताना दिसत आहे.

उबदार कपड्यांना मागणी
थंडीचा जोर वाढल्याने उबदार कपड्यांच्या घड्या मोडण्यास सुरुवात झाली आहे. शिवतीर्थ मैदानावर आलेल्या स्वेटर विक्रेत्यांकडे खरेदीसाठी नागरिकांची रा‌त्री उशिरापर्यंत झुंबड उडत आहे. हिवाळ्यात एरवी सकाळी नऊ वाजेपर्यंत व सायंकाळी सात वाजेनंतर नागरिकांच्या अंगात दिसणारे उबदार कपडे गेल्या दोन दिवसांपासून दुपारीदेखील त्यांच्या अंगावर दिसत आहेत.

मेथीच्या लाडूंची तयारी
दिवसेंदिवस शहरात हुडहुडी वाढत असून, घरोघरी सुकामेव्यांपासून लाडू बनविण्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. सुदृढ आरोग्यासाठी हिवाळा हा ऋतू महत्त्वाचा असतो. याकरीता बाजारेपठेत काजू, बदामसोबतच मेथी, डिंक आणि नुसते सुकामेव्याचे लाडू विक्रीसाठी काही दुकानांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. थंडीच्या कडाक्यामुळे शीतपेयांच्या मागणीत घट आली आहे. ज्युससह आईस्क्रीमच्या दुकानावरी गर्दी ओसरून आता शरीर उबदार करण्यासाठी चहाच्या दुकानांवर नागरीकांची झुंबड उडत आहे.

................................

धुळ्यात निच्चांक तापमान
धुळे : शहराच्या तापमानात गेल्या ३-४ दिवसांपासून घट झाली असून, रविवारी (दि. १६) सर्वांत नीचांकी किमान ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कमाल तापमानतही मोठी घसरण झाली असून, दुपारीही ऊबदार कपडे घालूनच बाहेर पडावे लागत आहे. दरम्यान, थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज धुळे शहरातील कृषी विभागाच्या हवामान खात्याकडून व्यक्त केला आहे. यावर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे थंडीचे प्रमाण कमी असेल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. शहरासह परिसरात गेल्या चार दिवसांपासून थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. दररोज तापमानाचा पारा घसरत असून, थंडीची लाट आल्याचा अनुभव धुळेकर घेत आहेत. रविवारी किमान तापमानाची सर्वात नीचांकी ७.२ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. चार दिवसांपूर्वी किमान तापमान ९.४ अंशावर होते. त्यानंतर तापमानात दररोज घट पाहायला मिळत आहे. घटत्या तापमानामुळे हुडहुडी वाढली असून जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यात तापमान स्थिर असून, अजून कडक थंडीचा कडाका जाणवत नाही.

रब्बी पिकांना फायदा
थंडीच्या कडाक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी या थंडीचा गहू आणि हरभरा पिकाला फायदा होणार आहे. यंदा पावसाअभावी रब्बी हंगामात कमी प्रमाणात पेरणी झाली आहे. मात्र, थंडीमुळे पेरणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. रब्बीच्या पिकांना ही थंडी पोषक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकीकडे थंडीचा त्रास असला तरी पिकांना गुणकारी असलेल्या थंडीने दुसरीकडे शेतकरी मात्र सुखावला आहे.

................................

राज्यातील नीचांकी तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे...........८.३
जळगाव.............८.४
नाशिक...........८.५
अहमदनगर............८.७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द बर्निंग कार

0
0

घोटी : नवी मुंबई येथील प्रवाशी शिर्डीकडे जात असताना घोटीजवळ खंबाळे शिवारात त्यांच्या कारने दुपारी अचानक पेट घेतला. चालकाच्या लक्षात येताच त्याने तत्काळ प्रवाशांना खाली उतरवल्यामुळे जीवितहानी टळली. मात्र पूर्ण कार आगीत भस्मसात झाली.

नवी मुंबई येथील संतोष व्हटकर कारने (एमएच ४३ बीई ६८४१) शिर्डीकडे जात होते. मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही कार घोटी शिवारातील खंबाळे जवळ येताच पुढील बाजूने अचानक पेटली. चालक शिवराम बंगेरा याने प्रसंगावधान राखून प्रवाशांना बाहेर काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी अॅड. कासलीवाल

0
0

मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी अॅड. कासलीवाल

चांदवड : चांदवड मर्चंटस बँकेच्या चेअरमनपदी अॅड. नरेंद्र कासलीवाल, तर व्हाईस चेअरमनपदी सचिन खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन जगन्नाथ राऊत व व्हाईस चेअरमन सुनील डुंगरवाल यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने दोन्ही पदे रिक्त होती. मंगळवारी बँकेच्या सभागृहात चांदवडच्या सहाय्यक निबंधक सविता शेळके यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी सर्व संचालकांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत दोघांची बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालार्थ कृतीदल बरखास्त करा

0
0

मुख्याध्यापक संघाचे शिक्षण आयुक्तांना साकडे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यामध्ये शालार्थ आयडी देण्याचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. शालार्थ आयडीची रखडलेली प्रकरणे लवकर मार्गी लागणे गरजेचे असताना खास या कामी नेमण्यात आलेले शालार्थ कृतीदल पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत हे कृतीदलच बरखास्त करावे, असे साकडे मुख्याध्यापक संघाने राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना घातले आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाचे मार्गदर्शन घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त सोळंकी यांनी दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

शालार्थ आयडीच्या प्रलंबित प्रकरणांना निपटारा लवकर व्हावा यासाठी सरकारने २८ फेब्रुवारी २०१७ रोजी शीघ्र कृतीदल समिती स्थापन केली. या आदेशानुसार १५ मार्च २०१८ पूर्वी शालार्थ आयडी संदर्भातील फाईल्सचा निपटारा गरजेचे होते. पण कृतीदल समितीमार्फत कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नसल्याची तक्रार मुख्याध्यापक संघाने केली. कृतीदल समिती सदस्यांची आतापर्यंत केवळ दोनच वेळा बैठक घेतली. मात्र, त्यातून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे कृतीदल समितीकडून अपेक्षित कार्य झालेले नाही. शालार्थच्या सर्व फाईलचा निपटारा ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत करणार असल्याची माहिती यावेळी आयुक्तांनी संघटनेच्या प्रतिनिधींना दिली.

दरम्यान, या विषयासंदर्भात काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत यावेळी माहिती देण्यात आली. यामध्ये 'ना हरकत प्रमाणपत्र' रद्द करण्यात आले, अनुशेष बदलाबाबत फेरनिर्णय करण्यात आले, मंत्रालयातून मान्यता घेण्यात आलेल्या ११४ उमेदवारांच्या प्राप्त यादीनुसार सरसकट शालार्थ आय. डी. मिळावा या संदर्भात संघाने मागणी केली. वाढीव पायभूत पदांवरील मान्यता प्राप्त शिक्षकांना १४ सप्टेंबर२०१४ च्या शासन निर्णयनुसार पायाभूत शिक्षकंच्या पदास मान्यता देण्यात आलेल्या आहे. त्यांना त्वरित शालार्थ आयडी मिळाला पाहिजे.

अधिकार उपसंचालकांकडे

नवीन वर्ष अर्थात १ जानेवारी २०१९ पासून शालार्थ आयडीचे संपूर्ण अधिकार शिक्षण उपसंचालकांना देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सोळंकी यांनी मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळास दिली. ३० डिसेंबर २०१८ पर्यंत सर्वांना शालार्थ आयडी न मिळाल्यास ५ जानेवारी २०१९ रोजी महाराष्ट्रातील सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालय समोर सर्व संघटना व सर्व शालार्थ आय. डी. धारक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, सुरेश बडगुजर, संजय देसले, पी. एस. पानपाटील, व्ही. डी. पाटील, प्रमोद गरुड, कैलास पाटील यांनी दिला आहे. यावेळी नाशिक विभागातून नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातून २५० शालार्थ आयडी धारक शिक्षक व संघटनाचे पदाधिकारी हजर होते. आयुक्तांना या मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर ओतला कांदा

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

उन्हाळी कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने मंगळवारी कळवण माकपतर्फे बस्थानाकपासून कोल्हापूर फाटा प्रशासकीय कार्यालयापर्यंत रस्त्यावर कांदा ओतून आंदोलन करण्यात आले. शेतकरी योगेश शिंदे यांचा कांदा कवडीमोल भावात विकला गेला म्हणून दोन ट्रॅक्टरमधील तब्बल ५० किंटल कांदा रस्त्यावर ओतून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. कळवण शहरापासून कोल्हापूर फाटा प्रशासकीय कार्यालयापर्यत संपूर्ण रस्त्यावर कांद्याचा चिखल झाल्याने वाहने चालवणे कठीण झाले होते.

कळवण तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. शेतकऱ्यांना रात्र-पहाट करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. पाण्याअभावी मका, बाजरी, भात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच वनजमिनीचा प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लागले नाही तर पुन्हा मुंबई लॉग मार्च करावा लागेल अशा शब्दांत आमदार जे पी गावित यांनी शासनाच्या धोरणांवर टीका केली. माकपच्या आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माकपचे सुरगाणा उपसभापती इंद्रजित गावित, विश्वास देवरे, रामजी गावित उपस्थित होते.

माकपतर्फे पाच किलो मीटर रॅली काढून नंतर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. कळवण प्रशासकीय कार्यालय समोर दोन ट्रॉली कांदा ओतून शासनाचा निषेध करण्यात आला. त्यानंतर आंदोलनाचे निवेदन घेण्यासाठी प्रांतधिकारी पंकज आशिया व तहसीलदार कैलास चावडे उपस्थित नसल्यामुळे गावित यांच्या नेतुत्वाखाली कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याशी गावित यांनी मोबाइलद्वारे संपर्क साधून रस्ता रोको मागे घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेवारस वाहनांची माहिती द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागातील रस्त्यांवर, आजूबाजूला कितीतरी वाहने बेवारस अवस्थेत दिसत असतात. अशा वाहनांची माहिती नागरिकांनी द्यावी, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे. त्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांकांसह इमेल आयडीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

रस्त्यांवर अनधिकृतपणे सोडून दिलेली वाहने, बेवारस वाहने हटविण्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांची दखल पोलिसांकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी नागरिक cronasikrural@gmail.com या ई मेल आयडीवर किंवा ९९२३२९८८५६, ८६०५५२८४८८, ८३९०८२१९५२ या मोबाइल क्रमांकावर तक्रारी करू शकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा जणांना खान्देश रत्न पुरस्कार

0
0

शनिवारी पुरस्कारांचे वितरण

...

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक शहरात मागील वर्षापासून आयोजित करण्यात येत असलेल्या खान्देश महोत्सवात दिल्या जाणाऱ्या खान्देश रत्न पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक शहरात अनेक जण हे खान्देशातून स्थायिक झालेले आहेत. या खान्देशमधील सर्वांना एकत्र करण्याबरोबरच खान्देशी संस्कृतीची माहिती सर्वांना व्हावी, या हेतूने मागील वर्षापासून खान्देश महोत्सव सुरू करण्यात आला आहे. यंदाही हा महोत्सव २० ते २३ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या महोत्सवात खान्देशातून नाशिकमध्ये स्थायिक होऊन विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्यांना खान्देश रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदा १५ खान्देशरत्न निवडण्यात आले असल्याची माहिती आमदार हिरे यांनी दिली.

शनिवारी (दि. २२) या पुरस्कारांचे विरतण पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू कृष्णा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या पत्रकार परिषदेप्रसंगी महेश हिरे व महोत्सवाच्या संयोजिका रश्मी हिरे-बेंडाळे आदी उपस्थित होते.

..

खान्देश रत्नचे मानकरी

यंदाचे खान्देश रत्न पुरस्कारचे मानकरी राजेंद्र कलाल, विलास पाटील, सतीश सोनवणे, रेखा महाजन, प्रशांत पाटील, बाळासाहेब पाटील, प्रशांत कुलकर्णी, डी. एल. देवरे, अनिल जाधव, नागराज देवरे, शामदत्त विभांडीक, नितीन ठाकरे, गंगाराम सावळे, कौतिक जाधव, विवेक पाटे यांची निवड करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समिती बरखास्त करा

0
0

मालेगाव मनसेची मागणी

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुंगसे येथील कांदा व्यापारी शिवाजी सूर्यवंशी याने शेतकऱ्यांचे पैसे थकवले असताना येथील बाजार समितीचे संचालक मंडळ, व्यापारी व जिल्हा निबंधक शेतकऱ्यांचे शोषण करीत आहेत. व्यापाऱ्यांकडून वसूल करण्यात आलेले पैसे वाटप करताना शेतकऱ्यांवर निम्मेच पैसे घ्या आणि विषय संपवा, असा दबाव संचालक मंडळ आणत आहे. त्यामुळे मालेगाव कृउबाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक बसवावा, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष राकेश भामरे यांनी केली आहे.

सूर्यवंशी यांच्याकडे शेतकऱ्याचे सुमारे २ कोटी रुपये थकीत आहेत. याप्रकरणी गेल्या आठवड्याभरात शेतकऱ्यांनी बाजार समिती सचिवांना डांबणे, सहकार उपनिबंधक यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळला नाही. त्यामुळे याप्रकरणी मनसेने आवाज उठविला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष भामरे यांनी थेट बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव एका हॉटेलमध्ये पैसे वाटप करीत असल्याचा व्हिडियो दाखवीत धक्कदायक प्रकार समोर आणला आहे. पत्रकार परिषदेत उपजिल्हा अध्यक्ष श्रीराम सोनवणे, मुकेश कावळे, उपशहर अध्यक्ष किशोर गवळी, गणेश पवार, मधुकर वडगे, प्रवीण सोनवणे, भरत सूर्यवंशी, सुनील मोरे , डॉ.रईस सिद्दीकी व मनविसेचे चेतेश आसेरी आदींसह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

व्हिडियो क्लिपने खळबळ

भामरे यांनी बाजार समितीचे सभापती एका हॉटेलमध्ये शेतकऱ्यांना बोलावून पैसे वाटप करीत असल्याची व्हिडियो क्लिप दाखविली. शेतकऱ्यांना शिवारात अथवा एखाद्या हॉटेलवर बोलावून घेत तोडीपाणी केली जात आहे. लाख रुपये थकीत असतील तर ५० हजारातच विषय संपविण्याचा दबाव टाकला जात असल्याचे भामरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीच्या कामांनासरकारी विभागांचाच नकार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आगामी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूकविषयक कामे करण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने सरकारी, निमसरकारी, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि बँकांकडून कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, राज्य सरकारच्या १६ विभागांनी कर्मचाऱ्यांची माहिती देण्यास नकार दिला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधित विभागांना 'कारणे दाखवा' नोटिसा बजाविल्या आहेत.

पुणे शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि जिल्ह्यातील दहा अशा २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीविषयक कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका कराव्या लागणार आहेत. त्यासाठी निवडणूक शाखेने विविध सरकारी, निमसरकारी कार्यालये, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, बँका आदी कार्यालयांना कर्मचाऱ्यांची माहिती देण्यास सांगितले आहे. त्यानुसार सुमारे पाचशे कार्यालयांकडून माहिती मिळाली आहे. अनुदानित ४१५ शाळांमधील तीन हजार २५० कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक शाखेकडे आली आहे. मात्र, राज्य सरकारच्या १६ सोळा विभागांनी या कामासाठी कर्मचाऱ्यांची माहिती देण्यास नकार दिला असल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.

माहिती न देणाऱ्या विभागांमध्ये महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय सचिव कार्यालय, सहकारी संस्थांचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प क्रमांक एक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, बी. जे. मेडिकल कॉलेज अधिष्ठाता कार्यालय, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पणन संचालक, भारत पेट्रोलियम, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, यशदा, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था आणि अप्पर कामगार आयुक्त आदी विभागांचा समावेश आहे.

निवडणूकविषयक कामांसाठी कर्मचाऱ्यांची माहिती देणे बंधनकारक आहे. ही माहिती न देणाऱ्या कार्यालयांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या असल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कथार्सिस’ देणार वाचन चळवळीला बळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरच्या पोस्ट वाचण्याचा ट्रेंड तरुणाईत कमालीचा हिट आहे. या तरुणाईला आता साहित्याकडे वळविण्यासाठी शहरात चळवळ उभी केली जात आहे. नाशिकच्या तरुणांची संख्या साहित्यक्षेत्रात अधिक वाढावी, यासाठी 'कथार्सिस' या ग्रुपने पुढाकार घेतला आहे. त्यांच्याकडून शहरात पुस्तक अभिवाचनाचे उपक्रम घेतले जाणार आहेत.

साहित्याची आवड असलेल्या पाच तरुणांनी 'कथार्सिस' ग्रुप तयार केला असून, शहरातील इतरही तरुणांना साहित्य क्षेत्रास जोडण्यासाठी 'पुस्तक अभिवाचन' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. इंग्रजी साहित्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या नीरज करंजीकरच्या संकल्पनेतून हा ग्रुप सुरू झाला असून, अभिनेत्री नूपुर सावजी, संगीतशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणारी आस्था मांदळे, आर्किटेक्ट अद्वैत मोरे आणि शेफ अक्षय भुवनेश्वर हे तरुण नीरजला जोडले आहेत. मुंबईत होत असलेल्या स्टोरी टेलिंग या उपक्रमापासून प्रेरित होत, नाशिकमध्ये पुस्तक अभिवाचन सुरू करण्याचा उपक्रम ही तरुण मंडळी राबविणार आहेत. त्यासाठी त्यांची बैठक नुकतीच झाली असून, डिसेंबरच्या अखेरीस या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. सध्या या उपक्रमाची माहिती इन्स्टाग्रामद्वारे पसरवली जात असून, अवघ्या काही दिवसांत या ग्रुपला ३८३ फॉलोअर्स मिळाले आहेत. तरुणांमध्ये या नव्या उपक्रमाची जोरदार चर्चा रंगत असून, अनेकांनी उपक्रमाशी जोडले जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

\Bकाय आहे 'कथार्सिस'?\B

ग्रीक तत्त्वज्ञ अॅरिस्टॉटल यांच्या पोएटिक्स नावाच्या ग्रंथात 'कथार्सिस' या शब्दाचा वापर झाला असून, हा मूळ ग्रीक भाषेतील शब्द आहे. या शब्दाचा अर्थ असा की, कलेच्या माध्यमातून भावना व्यक्त करणे. पुस्तकांच्या अभिवाचनातून पुस्तकाच्या आणि वाचकाच्या भावना व्यक्त करणे, या आशयाने ग्रुपचे नाव 'कथार्सिस' ठेवण्यात आले आहे.

\Bअसा असेल उपक्रम

\Bपुस्तक अभिवाचनाचे उपक्रम कॉलेजरोडवरील 'द हॅपी फिस्ट' या रेस्टॉरंटमध्ये होणार असून, याअंतर्गत तरुणांना पुस्तके देण्यात येणार आहेत. एक महिन्यानंतर देण्यात आलेल्या पुस्तकातील कथेचा अर्थ सांगत, ते पुस्तक वाचण्यासाठी इतरांना प्रेरित करायचे आहे. या माध्यमातून तरुणांना पुस्तक वाचनासाठी प्रोत्साहीत करण्यात येणार असून, वाचक आणि लेखकाच्या भावना व्यक्त केल्या जाणार आहेत. दर महिन्यातील एका शनिवारी किंवा रविवारी हा उपक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव घरपट्टीबाबत दिलासा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने बजावलेल्या घरपट्टीच्या नोटिसांबाबत नागरिकांमध्ये अनेक तक्रारी असून येत्या दोन महिन्यात सर्व तक्रारी निकाली काढल्या जातील अशी ग्वाही नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

शहरातील ६२ हजार मिळकतींना नव्याने घरपट्टी लागू करण्याबाबतची प्रक्रिया खासगी कंत्राटदाराकडून केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे राबविण्यात आली. हे सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीचे झाल्याने अनेक मिळकतदारांना घरे घेण्याच्या आधीपासून घरपट्टी आकारली गेली. त्याचप्रमाणे अनेक फ्लॅटधारकांच्या मिळकतीवर चुकीची नावे लावली गेली असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. ६२ हजारपैकी ४२ हजार नागरिकांना याबाबत विशेष नोटिसा देण्यात आल्या. त्यापैकी १० हजार नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत. या हरकतींची शहनिशा करून त्यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल. त्याचप्रमाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ज्या घरपट्टीबाबत शंका येईल, अशा मिळकतधारकांच्या घरपट्ट्यांबाबत महापालिकेचे अधिकारी 'सुमोटो' निर्णय घेऊन निकालात काढतील. अनेक जुन्या वाड्यांना नोटिसा गेल्या आहेत. त्याचप्रमाणे लाकडी खांब असलेल्या घरांना आरसीसी काम केल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ज्या फ्लॅटधारकांनी २०१६ मध्ये घरे घेतली, अशांना २०१२ पासून घरपट्टी आकारली गेली आहे. काही मिळकतधारकांना फ्लॅटच्या किमतीपेक्षा निम्म्या किमतीच्या घरपट्ट्या प्राप्त झाल्या आहेत. नाशिक महापालिकेने आकारलेल्या घरपट्ट्या भरण्यासाठी पुन्हा कर्ज काढावे लागेल अशी चर्चा मिळकत धारकांमध्ये आहे. ज्या नागरिकांना अवाजवी घरपट्ट्या आकारल्या आहेत, त्या पुराव्याच्या आधारे तातडीने कमी केल्या जातील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीवर कारवाई

नाशिक महापालिकेमध्ये चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीवर काही कारवाई करता येईल का, याबाबतदेखील विचार केला जात आहे. या कंपनीचा करार तपासून कारवाई करणार असल्याचे सूतोवाच आयुक्त गमे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारा लागवडीला अल्प प्रतिसाद

0
0

गाळपेरा क्षेत्र : ३७५० एकर

चारा लागवडीसाठी अपेक्षित लाभार्थी : १२००

आतापर्यंत लाभार्थींचे आलेले अर्ज : १२०

एका लाभार्थ्याला मिळणारे क्षेत्र : तीन एकर

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धरणातील पाणीसाठा संपुष्टात येताना उपलब्ध होणाऱ्या क्षेत्रावर चारा लागवड करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले असले तरी जिल्ह्यात अद्याप त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. जिल्ह्यातील अशा ३ हजार ७५० एकर गाळपेरा क्षेत्रावर १२०० हून अधिक लाभार्थी चारा लागवड करू शकणार असले तरी जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत १२० इच्छुक लाभार्थींचेच अर्ज प्राप्त झाले आहेत. चारा लागवड करू इच्छिणाऱ्यांनी २० डिसेंबरपर्यंत तालुका पाळवरील पंचायत समिती कार्यालये तसेच, पशुधन विकास कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याची टंचाई भासू नये, याकरिता धरणांच्या गाळपेरा क्षेत्रावर चारा लागवड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्ह्यात अशा १५०० हेक्टरवर म्हणजेच ३ हजार ७५० एकरवर चारा लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बाजरी, मका आणि घास या प्रकारच्या चाऱ्याची लागवड करण्यासाठी प्रशासनाकडून मोफत बियाणे पुरविण्यात येणार आहे. एका शेतकऱ्याला तीन एकरपर्यंतचे क्षेत्र चारा लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २० डिसेंबरपासून चारा लागवडीला सुरुवात करावयाची असली तरी जिल्ह्यात प्रशासनाच्या या आवाहनाला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. आतापर्यंत १२० लाभार्थींनी चारा लागवडीची तयारी दर्शविल्याची बाब मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावलेल्या आढावा बैठकीतून स्पष्ट झाली. जिल्ह्यात किमान १२०० लाभार्थींना चारा लागवड करणे जिल्हा प्रशासनाला अभिप्रेत आहे. गाळपेरा क्षेत्रावर पिकविलेल्या चाऱ्याची संबंधित लाभार्थीं विक्री करू शकणार आहेत. त्याचा दर ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असणार आहे.

...

चारा लागवड बंधनकारक

गाळपेऱ्याचे क्षेत्र सरकारच्या मालकीचे असले तरी अनेक शेतकरी वर्षानुवर्षे अशा गाळपेरा क्षेत्रावर भाजीपाला पिकवितात. आताही जिल्ह्यातील अनेक जलाशयांच्या कोरड्या क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड करण्यात आल्याचे पहावयास मिळते. हा भाजीपाला निघाल्यानंतर या क्षेत्रावरही संबंधित शेतकऱ्यांना चारा लागवडच करावी लागेल, असे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा घसरला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या पाच दिवसांपासून पूर्वेकडून उत्तरेकडे वाहणारे वारे ताशी ६ नॉट्सने वाहत असून, त्याचा परिणाम शहरातील वातावरणावर कायम आहे. शहरातील थंडीचा पारा १ अंश सेल्सिअसने घरसला असून, मंगळवारी किमान ९.०५, तर कमाल २५.०८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे शहरात दिवसभर गारठा जाणवला. मंगळवारी शहरात आर्द्रतेचे प्रमाण पहाटे ६५, तर सायंकाळी फक्त ३५ टक्के इतके होते. शुक्रवारपासून शहरातील तापमानाचा पारा घसरत असून, शुक्रवारी किमान तापमान १०.०४ अंश सेल्सिअस इतके होते. हे तापमान सोमवरपर्यंत कायम राहिले, तर मंगळवारी १ अंशाने पारा घसरला. समुद्रातील वादळी वाऱ्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे, वाऱ्यांचा वेग वाढला असून, येत्या काही दिवसांत थंडीचा पारा आणखी घसरणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेसमध्ये वारसभरतीचा मार्ग मोकळा

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोडच्या आयएसपी आणि नोट प्रेसमधील मृत कामगारांच्या वारसांचा मेळावा आयएसपी मजदूर संघ कार्यालयात झाला. भरती प्रक्रियेला विलंब होत असल्याने व्हॅकेन्सी बेसवर वारसांना कामावर घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार नोटप्रेसमध्ये २० ते २५ आणि आयएसपीमध्ये ५० ते ६० वारस लवकरच कामावर येणार आहेत. याआधीच २१ वारस कामावर रुजू झाल्याची माहिती संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.

गोडसे म्हणाले की, दोन्ही प्रेसमधील मृतांच्या नातेवाईकांना भरती करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. मृत कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यासाठी पाच टक्के प्रमाण दिलेले असून, ते २५ टक्के करण्याचा प्रस्ताव आम्ही प्रशासनासमोर मांडला आहे. दोन्ही प्रेसमधील सेवानिवृत्त ६३ कामगारांना पुन्हा सेवेत घेतल्याने मृत कामगारांच्या नातेवाईकांनी आम्हाला का डावलले म्हणून प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला होता. मात्र, पासपोर्ट तपासणीसाठी सुमारे पंचवीस वर्षांचा अनुभव असणारे कामगार हवे आहेत. या मुद्द्यावर प्रेस प्रशासनाने कुठलीही जाहिरात न काढता सोयीने सेवानिवृत्त कर्मचारी सेवेत सामावून घेतले आहेत.

जुंद्रे यांनी सांगितले की, वारसांना सेवेत घेण्याची संधी नव्हती. मजदूर संघाने केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करून पाच टक्के भरतीमध्ये मृतांच्या वारसांना संधी देण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने ती मान्य केल्याने भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

भरतीप्रक्रियाही राबविणार

प्रेसमध्ये किती मनुष्यबळ कमी आहे, याबाबत महामंडळाचे अधिकारी प्रेसला भेट देऊन व्यवस्थापनाशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे ठरले आहे. आयडीए पे स्केल महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रेसच्या आधुनिकीकरणाची मागणी व्यवस्थापनाने मान्य केली असून, लवकरच नवीन मशिन आणि जादा इंटॅग्लिओ मशीनही बसविण्यात येईल. जुन्या मशिनचे ओव्हरहॉलिंग केले जाणार आहे. पीबीएस मशीनदेखील आणले जाईल. भारतातील नामवंत रुग्णालयांत प्रेस कामगार व कुटुंबाला उपचार करून घेण्यासाठी सरकारी विमा कंपन्यांकडून विमा पालिसी घेण्यात येणार आहे. यावेळी मृत कामगारांच्या १७५ वारसांची नोंद करण्यात आली. मेळाव्याला उपाध्यक्ष सुनील आहिरे, दिनकर खर्जुल आदींसह कामगार प्रमुख उपस्थित होते.

मजदूर संघाच्या प्रयत्नामुळे या आधी २१ वारसांना कामावर घेण्यात आले आहे. आता सुमारे ८० वारसदारांना कामावर घेतले जाणार आहे. हा जीवनातील सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे. खासदार हेमंत गोडसे यांचे सहकार्य लाभले. कामगारांच्यावतीने त्यांचे आभार.

- जगदीश गोडसे, सरचिटणीस, प्रेस मजदूर संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images