Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

प्रश्न सोडविण्यासाठी ‘नाथपंथीं’चा अजेंडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सकल नाथपंथी समाज संघटनेच्या विभागीय मेळाव्यात संघटनेचा उद्देश आणि संघटनेची बांधणी या विषयावर चर्चा करण्यात आली. सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेचा अजेंडा मांडण्यात आला. नाशिक विभागातील सकल नाथपंथी समाज संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गोविंद इंगळे होते.

अमृतधाम येथील शिवगोरक्ष योगपीठ येथे झालेल्या कार्यक्रमास सकल नाथपंथी समाज संघटनेचे नाशिक येथील राज्य सचिव चंद्रकांत देवगुणे, जालना येथील राज्य सचिव सखाहरी चंद्रहास, जळगाव येथील राज्य सचिव प्रा. डॉ. एस. के. जोगी, मुंबई येथील राज्य सचिव सुनीता महाले आदी उपस्थित होते.

समाज संघटनेची बांधणी करणे कसे गरजेचे आहे, या बांधणी मागील उद्देश याची राहुल बोरकर यांनी माहिती दिली. किशोर लाड यांनी संघटनेने केलेल्या कामाचा आढावा मांडला. अतुल सोनारे, प्रवीण चव्हाण, राहुल रुद्रवंशी, शंतनू शिंदे, ज्ञानेश्वर सोमोसे, मधुकर शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. भाऊसाहेब गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. विनायक लाड यांनी प्रास्ताविक केले. माणिक कानडे यांनी आभार मानले.

समाज प्रबोधनाची गरज

नाथपंथी समाजाला आजही प्रबोधनाची गरज आहे. समाज प्रबोधनाची काम समाजातील नेते आणि साधुसंतांनी करायला पाहिजे. समाजाच्या पतपेढी, बँक, शिक्षणसंस्था असावी. वस्ती, गाव, रस्ता, चौक यांनी नवनाथांची नावे दिली जावी. समाजाच्या संप्रदायाची परंपरा, ग्रंथ, उपासना यांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, असे डॉ. एस. के. जोगी यांनी सांगितले.

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बागेश्री’ने रचला ‘नांदी’चा विक्रम

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

नाशिक : मराठी रंगभूमी दिन असो की शहरातील कोणताही पुरस्कार सोहळा, तेथे 'बागेश्री' वाद्यवृंदांची नांदी सादर होणार नसेल तरच नवल! नाशिक शहरातील कार्यक्रमांमध्ये आतापर्यंत तब्बल ११८५ नांदी सादर करण्याचा विक्रम बागेश्रीने केला असून, त्यातून ७५० हून अधिक कलाकारांना रंगमंचावर संधी दिली आहे. लवकरच हे वाद्यवृंद ११८६ वी नांदी सादर करणार असून, हा विक्रम अद्याप कोणी मोडला नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

शहरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गेल्या १० वर्षांपासून बागेश्री वाद्यवृंद नांदी सादर करीत असून, मराठी संगीत रंगभूमीवर १५० वर्षे पूर्ण झालेल्या संगीत मानापमान या नाटकातील 'नमन नटवरा विस्मयकारा' ही नांदी ८०० हून अधिक ठिकाणी त्यांनी सादर केली आहे. नटराजाच्या अभिवादनाची ही नांदी सादर करीत असताना प्रत्येकवेळी नवीन कलाकाराला संधी देण्याचादेखील विक्रम त्यांनी केला असून, त्यातूनच अनेक गायक, गायिका पुढे आल्या आहेत. आता ते स्वतंत्रपणे कार्यक्रम करीत आहेत.

भालजी पेंढारकर, राम मराठे, प्रभाकर पणशीकर, जयमाला शिलेदार, कीर्ती शिलेदार, हृदयनाथ मंगेशकर, डॉ. श्रीराम लागू, विक्रम गोखले, श्रीधर फडके, मोहन जोशी, प्रशांत दामले यांसह अनेक दिग्गज कलाकारांसमोर बागेश्रीच्या वाद्यवृंदांनी नांदी सादर केली असून त्यांनी अनेक बालकलाकारांना आशीर्वाददेखील दिले आहेत.

नाट्य परिषदेचा रंगभूमी दिन, सावाना रंगभूमी दिन, संगीत नाट्य महोत्सव, राज्य नाट्य महोत्सव, कामगार कल्याण नाट्य महोत्सव, जनस्थान पुरस्कार या कार्यक्रमांत नांदी सादरीकरण केले आहे. यात संगीत मानापमान, संगीत सौभद्र, संगीत जयजय गौरीशंकर, संगीत कान्होपात्रा, संगीत शाकुंतल, संगीत रणदुदुंभी, संगीत बावणखणी, संगीत पंडितराज जगन्नाथ, संगीत होनाजी बाळा, संगीत स्वयंवर या नाटकांमधील नांदी हे वाद्यवृंद सादर करतात.

कुसुमाग्रजांनी एकटाकी लिहिलेली नांदी

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कार सोहळ्यात बागेश्रीच्यावतीने 'हे नटराज देवाधिराज' ही नांदी सादर करण्यात आली होती. ही नांदी खुद्द कुसुमाग्रजांनी संगीत संयोजक मोहन करंजीकर यांच्या सांगण्यावरून मागताक्षणी एकटाकी लिहून दिली असून, करंजीकर यांनी तिला लगेच चाल लावून त्यांच्यासमोर सादर केली. ती नांदी बागेश्री वाद्यवृंद सगळीकडे सादर करीत असून नाशिकचा नावलौकिक वाढवत आहेत.

आतापर्यंत गायन कला क्षेत्रातील ७५० हून अधिक कलाकारांना बागेश्रीने व्यासपीठ मिळवून दिले आहे. नांदी सादर करण्यामध्ये आमचा हातखंडा असून वेगवेगळ्या नाटकातील नांदी आम्ही सादर केली आहे. आता आम्ही ११८६ वी नांदी सादर करणार आहे, हा विक्रमच.

-चारूदत्त दीक्षित, संस्थापक, बागेश्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्त वाहनचालकांना दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अवैध वाहतूक करणारे, तसेच हेल्मेट, सीटबेल्ट न घालणारे, वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ग्रामीण पोलिस दलाने रडारवर घेतले आहे. ग्रामीण पोलिस दलाच्या वाहतूक शाखेने आतापर्यंत ७,५५७ जणांवर कारवाई केली असून, तब्बल १५ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

जिल्ह्यात जीवघेण्या अपघातांची संख्या लक्षणीय असून, दरवर्षी सरासरी सातशे व्यक्ती रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडतात. जिल्ह्याच्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रात मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गासह नाशिक- पुणे, नाशिक- औरंगाबाद, नाशिक- गुजरात असे महामार्ग जातात. या महामार्गांवर अपघाताचे प्रमाण मोठे आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी याचमुळे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वळविले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन, तसेच वाहतूक शाखेला नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. हेल्मेट व सीटबेल्ट वापराबाबत वेगवेगळ्या स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे.

जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, मालेगावची शहर वाहतूक शाखा, तसेच पोलिस स्टेशननिहाय वाहतूक पोलिसांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे. विनाहेल्मेट व सीटबेल्ट, मोबाइलवर बोलणारे चालक, नो पार्किंग झोन, ड्रंक अँड ड्राइव्ह, अवैध वाहतूक, तसेच भरधाव वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करून ७,५५७ केसेस दाखल करण्यात आल्या, तसेच १५ लाख २० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

२५ परवाने निलंबित

हायकोर्टाच्या आदेशानुसार, वाहन चालवताना बोलणारे, राँग साइड वाहन चालवणारे, तसेच सिग्नल तोडणाऱ्यांचे परवाने थेट निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभाग व पोलिसांनी केलेल्या संयुक्‍त कारवाईत २,८४२ केसेस करण्यात आल्या. त्यापैकी ६९ वाहने जप्त करण्यात आली. यापैकी २५ वाहनचालकांचे परवाने रद्द करण्यात आले असून, ३० वाहनांचे निलंबन प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

दृष्टिपथात कारवाई

७५५७ जणांवर कारवाई

१५,२०,८०० रुपयांचा दंड वसूल

६९ वाहने जप्त

२५ चालकांचे परवाने निलंबित

३० परवान्यांवर निलंबनाचा प्रस्ताव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिव्हिल’च्या लिफ्टजवळच महिलेची प्रसूती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलच्या दोन्ही लिफ्ट अचानक बंद पडल्या असून, रविवारी सकाळी एका महिलेची लिफ्टजवळच प्रसुती झाली. यावेळी हॉस्पिटलमधील इतर विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन महिलेची मदत केली. दरम्यान, सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने मात्र लिफ्ट बंद असण्याचा आणि त्या महिलेची वाटेतच प्रसुती होण्याचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

निफाड तालुक्यातील खांडगाव येथील गर्भवती महिलेला सकाळच्या सुमारास त्रास सुरू झाला. दुसऱ्यांदा माता होणाऱ्या आणि मुदतीपूर्वीच अचानक त्रास सुरू झालेल्या महिलेच्या मदतीला गावातील आशा सेविका धावून आली. आशा सेविकेने तत्काळ १०८ अॅम्ब्युलन्सला फोन केला. अॅम्ब्युलन्स वेळेत आली. कुटुंबातील एकही सदस्य यावेळी महिलेबरोबर नव्हते. अॅम्ब्युलन्सने महिलेला जवळच्या चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, मुदतीपूर्व प्रसुतीसाठी आलेल्या मातांना विशेष उपचारांची गरज असते. त्यामुळे चांदोरी येथून महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगण्यात आले. अॅम्ब्युलन्सने महिलेला घेऊन सिव्हिल हॉस्पिटल गाठले. बाळंतपण केव्हाही होण्याची स्थिती असल्याने असल्याने तिला लागलीच अॅडमिट करणे गरजेचे होते. मात्र, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसुती कक्ष पहिल्या मजल्यावर असून, महिलेला तिथे लिफ्टने घेऊन जाणे गरजेचे होते. त्यामुळे ही महिला आणि तिच्या मदतीला आलेले इतर कर्मचारी तब्बल १० मिनिटे लिफ्टजवळ थांबले. महिलेला मोठी कळ आल्याने हॉस्पिटलमधील आहार विभागाच्या कर्मचारी शिला कांबळे पुढे आल्या.

परिचारिकांची धावपळ

यानंतर सर्व परिचारिकांची धावपळ झाली. साऱ्यांनी तिकडे धाव घेतली. कांबळे यांनी पोर्चमधील सर्व पुरुषांना बाहेर काढले. पोर्चचे दोन्ही बाजूकडील गेट बंद करून गादीच्या कापडांनी आडोसा निर्माण केला. तोपर्यंत पोहचलेल्या प्रसुती विभागातील परिचारिकांनी लिफ्टच्या बाहेरच बाळाला जन्म दिलेल्या महिलेवर उपचार सुरू केले. त्यानंतर वॉर्डबॉय यांनी झोळी करून प्रसूत झालेली महिला व बाळाला प्रसूती कक्षात दाखल केले. बाळाचे वजन अडीच किलो असून, माताही सुखरुप असल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. लिफ्ट बंद असल्याची माहितीच नसल्याने हा गंभीर घडल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकाराबाबत सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे म्हणाले की, लिफ्ट बंद असल्याने हा प्रकार झालेला नाही. महिला शेवटच्या क्षणी हॉस्पिटलमध्ये पोहचली. लिफ्ट सुरू असती तर ती लिफ्टमध्ये प्रसूत झाली असती. हॉस्पिटलची पेशंटसाठी असलेली लिफ्ट शनिवारी रात्री तांत्रिक कारणांमुळे बंद पडली. रविवारी दुपारपर्यंत ती सुरू झाली असल्याचे डॉ. जगदाळे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूड ब्लॉगिंगचे महत्त्व वाढावे

$
0
0

नाशिककर खवय्यांच्या मेळाव्यातील सूर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक आणि खवय्येगिरी, हे समीकरणचं अनोखे असून, फूड ब्लॉगर्सची संख्या नाशिकमध्ये अधिक आहे. फूड ब्लॉगर्स शहराची खाद्यसंस्कृती सर्वत्र पोहोचविण्याचे काम करत असूनही, त्यांना हवा तितका सन्मान दिला जात नाही. त्यामुळे शहरातील सर्व फूड ब्लॉगर्सनी एकत्र येणे गरजेचे असून, फूड ब्लॉगिंगचे महत्त्व मेट्रो सिटीप्रमाणे नाशिकमध्ये वाढविण्याची गरज असल्याचा सूर नाशिककर खवय्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

खवय्येगिरीचे वेड असलेल्या नाशिकच्या मृणाल भिडे या तरुणीने, इन्स्टाग्रामवर काही महिन्यांपासून 'फूड इज लाइफ शून्य शून्य एक' हा फूड ब्लॉग सुरू केला आहे. या ब्लॉगवर आतापर्यंत ४०१ हून अधिक पदार्थांच्या पोस्ट अपलोड केल्या असून, ९ हजार ५१४ खवय्ये हा ब्लॉग फॉलो करत आहेत. या ब्लॉगच्या माध्यमातून एकत्र आलेल्या नाशिकच्या चोखंदळ खवय्यांचा मेळावा कॉलेजरोडवरील दि हॅप्पी फिस्ट कॅफमध्ये रविवारी रंगला. यावेळी सुमारे ८० हून अधिक खवय्ये आणि फूड ब्लॉगर्स या मेळाव्यात सहभागी झाले.

मेळाव्यात खवय्यांनी एकमेकांचा परिचय करून घेत नाशिकच्या खवय्येगिरीवर चर्चा केली. त्यावेळी शहरातील खाद्यसंस्कृती जगभरात पोहोचविण्यासाठी सोशल मीडियावरील फूड ब्लॉग हा उत्तम पर्याय आहे. नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांनीही फूड ब्लॉगर्सला प्रोत्साहित करण्याची गरज आहे. तसेच फूड ब्लॉगर्सनी ओळख देऊन पदार्थांची चव चाखण्यापेक्षा, पहिल्यांदा खवय्ये म्हणून पदार्थाची चव घ्यावी. त्यानंतर ब्लॉग लिहिण्यासाठी व्यावसायिकांची परवानगी घ्यावी, असे या मेळाव्यात ठरविण्यात आले. नाशिकच्या खाद्यसंस्कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी चोखंदळ खवय्ये आणि फूड ब्लॉगर्सनी एकत्र येत सोशल मीडियावर ही चळवळ उभी करत सर्वांच लक्ष वेधून घ्यावे, असे यावेळी ठरविण्यात आले.

\Bखवय्येगिरी जपणार \B

फूड ब्लॉगर्सची चळवळ व्हावी आणि खाद्यसंस्कृती सर्वांपर्यंत पोहोचावी, यासाठी फूड ब्लॉगर्स दर तीन महिन्यांनी एकत्र येणार आहेत. तसेच खवय्येगिरी जपण्यासाठी आहारासंदर्भात लिहिणाऱ्या तज्ज्ञांनाही फूड ब्लॉगशी जोडणार आहे. इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडियावर नाशिकचे फूड ब्लॉग अधिक लोकप्रिय करण्यासाठी सर्व खवय्ये आणि ब्लॉगर्सला एकत्रित आणण्याचा निर्धार मेळाव्यात खवय्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जोडी पखवाज’च्या तालाने रंगले श्रोते

$
0
0

'जोडी पखवाज'च्या तालाने रंगले श्रोते!

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तबल्याच्या तुलनेत मोठा, जोरकस व गंभीर आवाज असणाऱ्या जोडी पखवाजच्या तालात नाशिककर रंगले. पंडित सुखविंदर सिंग यांचे शिष्य ग्यानसिंग नामधारी यांच्या हाताने पखवाज वादनात आणलेली जादू नाशिककरांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.

पवार तबला अकादमी, नाशिक आयोजित आणि एस. डब्ल्यू. एस. फायनान्शिअल सोल्युशन्स प्रा.लि. प्रस्तुत पं. भानुदास पवार स्मृती समारोह रविवारी झाला. या संगीत समारोहाचे हे २१ वे वर्ष होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला.

मृदंगापासून उत्पन्न झालेले जोडी पखवाज या वाद्याविषयी नाशिककरांना कमालीची उत्सुकता होती. यावेळी ग्यानसिंग यांनी सांगितले की, हे वाद्य पंजाबी पखवाज म्हणून देखील ओळखले जाते. शिखांचे पाचवे गुरु अर्जुन देवजी यांच्या दरबारातील दोन संगीतकार सत्ता आणि बलवंद यांनी या वाद्याची निर्मिती केली, असे मानले जाते. तीनशे वर्षांपूर्वी कोणतीही ध्वनिव्यवस्था नसल्याने गुरुद्वाराबाहेरील कीर्तनात हजारो लोकांना ऐकू येईल, असे असा आवाज असणारे वाद्य सध्या तितकेसे वापरात नाही. ग्यानसिंग यांनी धमार तालात पारंपरिक पंजाब घराण्याचा पखवाजचा बाज असलेले ठाह के बोल, चलन, लयकारी, रेला आणि तीन तालात पारंपरिक बंदिशी सादर केल्या. त्यांना प्रशांत महाबळ यांनी संवादिनीवर साथ केली.

कार्यक्रमाचा प्रारंभ युवा पिढीतील आघाडीच्या तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या कन्या व शिष्या सावनी तळवलकर-गाडगीळ यांच्या एकल तबलावादनाने झाला. त्यांना पुष्कराज भागवत यांनी संवादिनीवर साथसंगत केली. सावनी यांनी ताल तीन तालात परंपरेनुसार पेशकार, कायदे, रेले, चलन, रव, गत, तुकडे आणि चक्रदार सादर केले.

प्रारंभी रघुवीर अधिकारी, मनिषा अधिकारी व नितीन पवार, डॉ. अविराज तायडे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. मध्यंतरात नाशिकच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी कल्याण पांडे, बल्लाळ चव्हाण, अद्वय पवार, देवश्री नवघरे यांचा सत्कार ग्यानसिंग यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन सुनेत्रा मांडवगणे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राला फॉलोऑन

$
0
0

रणजी करंडक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात सुरू असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामन्यात महाराष्ट्राला फॉलोऑन मिळाला. डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाच्या सहा बळींच्या जोरावर सौराष्ट्राने रविवारी तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा पहिला डाव २४७ धावांत गुंडाळला. त्यानंतर महाराष्ट्राला फॉलोऑन देण्याचा निर्णय सौराष्ट्राने घेतला. तत्पूर्वी, सौराष्ट्राने पहिल्या डावात ३९८ धावसंख्या रचली होती. दिवसाचा खेळ थांबल्यानंतर फॉलोऑनसाठी उतरलेल्या महाराष्ट्राने दुसऱ्या डावात तीन गडी बाद १५७ धावा केल्या. यामुळे यजमानांना सहा धावांची आघाडी मिळाली आहे. अद्याप महाराष्ट्राकडे सात फलंदाज बाकी आहेत. पहिल्या डावात केदार जाधवचे शतक अवघ्या एका धावेने हुकले.

महाराष्ट्राने सकाळी तीन बाद ८३ धावांवरून पहिल्या डावाला सुरुवात केली. शनिवारी ३८ धावांवर नाबाद असलेल्या केदार जाधवचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याने ९९ धावांच्या खेळीत १ षटकार आणि १२ चौकार लगावले. मकवानाने त्याचा त्रिफळा उडवला. केदारच्या ९९ धावांच्या खेळीनंतरही यजमानांचा संघ फॉलोऑनपासून वाचू शकला नाही. सकारियाने पहिल्या डावात ६४ धावांच्या बदल्यात सहा गडी बाद केले. दुसऱ्या डावात यष्टिरक्षक रोहित मोटवानीच्या नाबाद ६५ धावांमुळे महाराष्ट्राने तीन बाद १५७ धावसंख्या उभारली. खेळ थांबला तेव्हा कर्णधार अंकित बावणे १३ धावांवर खेळत होता.

रोहित त्रिपाठीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने ३६ चेंडूंत पाच चौकारांसह ३० धावा केल्या. मात्र सकारियाने त्याचा अडसर दूर केला. चिराग खुरानानेही ७७ चेंडूंत ४ चौकारांसह ३० धावा केल्या. सत्यजित बच्छावला घरच्या मैदानावर पुन्हा अपयशी ठरला. त्याला एकही बळी मिळू शकला नाही. मात्र, त्याने फलंदाजी करताना चांगला खेळ केला. २५ चेंडूंत ४ चौकारांसह २१ धावा केल्या. सुरुवातीला आलेल्या जय पांडेने १५ धावा केल्या. मात्र, सकारियाने त्याला हार्विक देसाईकरवी झेलबाद केले. महाराष्ट्राचा खेळ संपला तेव्हा २४७ धावसंख्या झाली होती. सौराष्ट्राची महाराष्ट्रावर १५१ धावांची आघाडी होती. दुसऱ्या पारीला सुरुवात करताना सौराष्ट्राने महाराष्ट्राला खेळण्याची संधी दिली. जय पांडेने डावाची सुरुवात केली. त्याने ६० चेंडूंत २६ धावा केल्या. मात्र, सकारियाने त्याला अर्पित वासवदाकरवी झेलबाद केले. त्याच्याबरोबर असलेल्या चिराग खुराणाने २४ चेंडूत १५ धावा केल्या. रविवारचा खेळ संपला तेव्हा महाराष्ट्राची धावसंख्या ३ बाद १५७ इतकी होती.

नाशिकची धावपट्टी चांगली आहे. रविवारी आम्ही पाच विकेट घेण्याचा डाव आखला होता; मात्र तीन गडी बाद करू शकलो. सोमवारी सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त खेळाडू बाद करण्यावर आमचा भर राहील.

जयदेव उनाडकट, कर्णधार, सौराष्ट्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीदारांवर नोटिसांची मात्रा

$
0
0

४६ कोटींच्या पाणीपट्टी वसुलीसाठी कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील ४६ कोटी ३२ लाखांपर्यंत पोहचलेल्या पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी अवघे तीन महिने शिल्लक राहिले आहेत. महापालिकेच्या करसंकलन विभागाने थकीत पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. पाच हजार रुपयांपेक्षा अधिक पाणीपट्टी थकलेल्या तब्बल ३६,२०९ नळजोडणीधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्याकडून ३३ कोटी ८० लाखांच्या थकबाकीसह तब्बल ४६.३२ कोटी रुपयांची वसुली केली जाणार आहे.

महापालिकेच्या करसंकलन विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याने घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसुली रोडावली आहे. महापालिकेने एकीकडे घरपट्टी वसुलीवर जोर दिल्याने पाणीपट्टीची देयके वाटपाला उशिर झाला आहे. त्यातच थकबाकीदारांची संख्याही मोठी असल्याने घरपट्टीची वसुली यंदा चांगली झाली असली तरी पाणीपट्टीची वसुली मात्र थंडावली आहे. देयके मिळत नसल्याने नळजोडणीधारकांकडून केल्या जाणाऱ्या दिरंगाईमुळे पाणीपट्टी थकबाकीचा आकडा ४५ कोटींचा पल्ला पार गेला आहे. पाणीपट्टीच्या थकबाकीदारांवर कारवाईसाठी महापालिकेने टप्पे निश्चित केले असून पहिल्या टप्प्यात पाच हजारांपेक्षा अधिक पाणीपट्टी असणाऱ्या नळजोडणीधारकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. पाच हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या नळजोडणीधारकांची संख्या ३६ हजार २०९ एवढी आहे.

असे आहेत थकबाकीदार

विभाग............. थकबाकीदार संख्या

पंचवटी .......... ८,८११

नाशिक पूर्व ....... ७,३१५

सातपूर .............. ६,५७५

नाशिकरोड ....... ५,९३०

सिडको ....... ५,९१२

नाशिक पश्चिम ....... १,६६६

एकूण...............३६,२०९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शांताबाईंचे चळवळीत येणे ही मोठी गोष्ट

$
0
0

शांताबाईंचे चळवळीत येणे ही मोठी गोष्ट

ज्येष्ठ विचारवंत अर्जुन डांगळे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शांताबाई दाणी यांचे आयुष्य अत्यंत खडतर परिस्थितीत गेले. त्यांचे वडील नशेच्या आहारी गेले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. लहानग्या शांताबाईंना त्यांची आई व आजी यांनी कष्टाने वाढवले, त्यांचे शिक्षण केले. दलित स्त्रियांची स्थिती अत्यंत बिकट असताना, सुशिक्षित असलेल्या शांताबाईंचे दलित चळवळीत येणे, ही मोठी गोष्ट होती, असे प्रतिपादन दलित चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित ग्रंथालय सप्ताहाचे दुसरे पुष्प डांगळे यांनी गुंफले. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात डांगळे यांनी 'शांताबाई दाणी यांचे सामाजिक योगदान' या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले, रिपब्लिकन चळवळीत अनेक गट-तट असताना, शांताबाई दाणी खंबीरपणे उभ्या राहून काम करीत राहिल्या. त्यांची विचारधारा एका समाजासाठी नव्हे, तर सर्वव्यापक होती. त्यांच्या कर्तृत्वातून त्यांचे लखलखते तेजस्वीपण उठून दिसते. प्रारंभीच्या काळात त्यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचे समर्थपणे नेतृत्व केले. तेव्हाच्या पुरुषप्रधान मानसिकतेच्या काळातही शांताबाई पुरुषांच्या बरोबरीने काम करीत. त्या अत्यंत धीट होत्या. त्या कोणाला घाबरत नसत. स्वभावातील बंडखोरपणा त्यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याकडून घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही शांताबाईंचा चळवळीतील दृष्टिकोन आवडत असे.

यंदाच्या बी. लिब. परीक्षेत प्रथम येणार्‍या छाया जाधव, तर एम. लिब. परीक्षेत प्रथम येणाऱ्या प्रिया केदार यांना कै. मु. शं. औरंगाबादकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते विचारमंचावर उपस्थित होते. डॉ. धर्माजी बोडके यांनी प्रास्ताविक केले. बी. जी. वाघ यांनी परिचय करून दिला. प्रा. गंगाधर अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेंद्र सांगळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी पाड्यावर कपडे वाटप

$
0
0

लोगो - सोशल कनेक्ट

आदिवासी पाड्यावर कपडे वाटप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था आणि जिल्ह्यातील सर्व शिंपी समाज मंडळांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी पाड्यावर कपडे वाटप करण्यात आले. त्र्यंबकेश्वर परिसरातील हरसूल येथील कुळवंडी आणि खर्डी पाडा या ठिकाणी संस्थेच्यावतीने स्वेटर, ब्लँकेट यांसह दैनंदिन जीवनात वापराचे कपडे वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील निकुंभ, जिल्हाध्यक्ष संदीप खैरनार, महिला कार्याध्यक्ष वंदना जगताप, जिल्हाध्यक्ष सुनीता शिंपी यांनी पाड्यावरील नागरिकांशी संवाद साधला. या उपक्रमाच्यावेळी पाड्यावरील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. संस्थेच्यावतीने समाजपयोगी उपक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असून, आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीही संस्था उपक्रम राबविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी संजय खैरनार, महिंद्र जगताप, राजेंद्र खैरनार, गोकुळ बोरसे, सोनल नेरे यांसह संस्थेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--

नेत्रतपासणीही होणार

नाशिक लायन्स क्लब आणि अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेच्यावतीने येत्या काही दिवसांत हरसूल येथील बांधवांसाठी नेत्रतपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरात डोळ्यांचे विकार आणि मोतीबिंदूची तपासणी केली जाणार असून, नेत्ररोग असणाऱ्यांना संस्था मदत करणार असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रवासी असुरक्षिततेच्या ट्रॅकवर

$
0
0

टीम मटा, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) या दोन्ही यंत्रणांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर परिणाम होत आहे. प्रवासी व रेल्वेगाड्यांची वाढलेली संख्या, नवीन जबाबदाऱ्या आदींमुळे ताण वाढला आहे. मनुष्यबळवाढीचे पत्र वरिष्ठांना देऊनही कार्यवाही झालेली नाही. भुरटे चोर, गुंड, समाजकंटक त्याचा फायदा घेत असल्याने प्रवाशांना भुर्दंड बसत आहे.

नाशिकरोड स्थानकातून दिवसाला दीडशे तर महिन्याला सुमारे ४५०० रेल्वेगाड्या धावतात. दिवसाला पंधरा हजार आणि महिन्याला लाखो प्रवासी प्रवास करतात. या सर्वांच्या सुरक्षेसाठी आरपीएफचे केवळ ४९ जवान आहेत. ८१ जवानांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, देवळाली येथे मेल, एक्स्प्रेसही थांबू लागल्याने आरपीएफचे नवीन दूरक्षेत्र देवळालीत सुरू झाले. आरपीएफचे अकरा जवान तिकडे देण्यात आले. त्यामुळे नाशिकरोडला फक्त ३८ कर्मचारी उपलब्ध आहेत. कमी मनुष्यबळात अडीचशे किलोमीटर हद्दीतील बारा रेल्वेस्थानके व परिसरात गस्त घालावी लागते. धावत्या रेल्वेगाडीतही जवान द्यावे लागतात. दोन गाड्यांवर देखरेखीची पूर्ण जबाबदारी नाशिकरोड आरपीएफवर आहे. त्यात पाच जवान द्यावे लागतात. साप्ताहिक सुटी, रजा, आजारपणांमुळे सर्व ३८ जवान उपलब्ध होत नाहीत. नाशिकरोड स्थानकात पार्किंगवर लक्ष ठेवण्यासाठी जवानच नाहीत. वरिष्ठ अधिकारी आल्यावर मनुष्यबळ द्यावे लागते.

नाशिकरोड आरपीएफची हद्द इगतपुरीपासून ओढ्यापर्यंत होती. आता कसबे सुकेणे व खेरवाडीचा भाग आल्याने काम वाढले आहे. या हद्दीत एकूण आठ स्थानके येतात. चेन पुलिंग, लूटमार, गाडीतून प्रवासी पडणे, घातपात आदी घटना वाढल्या आहेत. रेल्वे प्रवाशांसह रेल्वे मालमत्तेचे रक्षण करणे, स्थानकातील व रेल्वेतील गुंडगिरीला आळा घालणे आदी जबाबदारी आरपीएफची आहे. हे जवान स्थानकाबरोबरच गाड्यांमध्येही गस्त घालतात. लूटमार, गुंडगिरी करणाऱ्यांना प्रतिबंध करतात.

पोलिसांवरही ताण

आरपीएफप्रमाणेच नाशिकरोड रेल्वे पोलिसांची गत आहे. रेल्वे पोलिस ठाण्यात दोन उपनिरीक्षक, एक सहाय्यक निरीक्षक व ३४ कर्मचारी आहेत. यात सात महिला आहेत. कर्मचारी संख्या ६० हवी. कसबे सुकेणे ते लहवित अशी या ठाण्यांची हद्द आहे. गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. तपासी अंमलदार संख्या कमी आहे. एका ठाणे अंमलदाराकडे वर्षाला वीस गुन्हेही खूप होतात. मात्र, नाशिकरोड पोलिस ठाण्यात किमान ३० तपास असतात. एका तपासासाठी अनेक महिने लागतात. येथे तर महिन्याला तीन प्रकरणांचे तपास करावे लागतात. बारा तास काम, ढासळते आरोग्य, लोकांची टीका, वाढते गुन्हे, अपुरे मनुष्यबळ, अपुरी जागा, स्वच्छतागृहाची वानवा, मोडकळीस आलेली निवासस्थाने अशा समस्यांना तोंड देत हे पोलिस कर्तव्य बजावत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद जवानाच्या कुटूंबाला मदत

$
0
0

जवानाच्या कुटुंबाला मदत

जेलरोड : शिंदेवाडीचे शहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबियांना नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेतर्फे ५० हजाराची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी अध्यक्ष दत्ता गायकवाड, ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष अशोक चोरडिया, संचालक सुनील आडके, अशोक सातभाई आदी उपस्थित होते. बँकेतर्फे आतापर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. शेतकरी आत्महत्या, दुष्काळग्रस्त, केरळ पूरग्रस्त आदी प्रसंगात बँकेतर्फे मदतीचा हात देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धावत्या रेल्वेतील मोबाइलवर ‘काठी’ने डल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

धावत्या रेल्वेतील प्रवाशांवर लाठीहल्ला करून मोबाइल चोरण्याचा अजब प्रकार सुरू झाला आहे. नाशिकरोड स्टेशनजवळच हा प्रकार घडत आहे. या चोरांवर कारवाई करुन धडा शिकविण्याची मागणी होत आहे.

नाशिकरोड स्टेशन परिसरात नशा करणारे गर्दुले, भुरटे चोर, गुन्हेगार यांचा त्रास वाढला आहे. गुर्दुल्ल्यांना तर पोलिसही वैतागले आहेत. नशेसाठी हे गर्दुले प्रवाशांचे किमती साहित्य चोरतात. बाहेरगावच्या गरिब प्रवाशांना ते लुबाडतात, मारहाण करतात. प्रवाशांच्या बॅगा लंपास करतात. स्टेशनवर प्रवाशांना डुलकी आली की त्यांचा मोबाइल व किमती वस्तू लांबवतात. आता गर्दुल्ल्यांबरोबरच भुरट्या चोरांनी मोबाइल चोरीची अनोखी शक्कल लढवली आहे.

नाशिकरोड स्टेशनवरून प्रवाशांना घेऊन रेल्वेगाडी मनमाडच्या दिशेने निघाली की देवीचौक पार करून रेल्वेच्या ब्रह्मगिरी गेस्ट हाऊसजवळ येते. तेथून नवले चाळ व प्रेसपर्यंत रुळाच्या दुतर्फा झाडेझुडपे वाढली आहेत. चोर झाडीमध्ये काठ्या घेऊन दबा धरुन बसतात. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीच्या दरवाजात प्रवासी मोबाइल घेऊन बोलण्यासाठी उभे राहतात. त्यांच्या हातावर हे चोर काठी मारुन मोबाइल खाली पाडतात. किमती मोबाइल घेऊन ते पलायन करतात. नाशिकरोड परिसरातच मोबाइल विकतात. गाडीने वेग घेतलेला असल्यामुळे प्रवाशांना खाली उतरता येत नाही. मोबाइल चोरीचा गुन्हा नोंदवल्यानंतरही मोबाइल हाती लागेल याची शाश्वती नसते.

पोलिसांकडे तक्रार

लांब पल्ल्याच्या गाडीतील प्रवासी तक्रार देण्याचे टाळतात. कारण त्यांना नाशिकरोडला कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी यावे लागते. खर्च आणि मनस्ताप वाढतो. नवले चाळ परिसरात राहणारे नाशिकरोडचे समाजसेवक जगन गवळी यांनी नाशिकरोड पोलिस, नाशिकरोड रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलिस येईपर्यंत चोर फरार झालेले असतात. ब्रह्मगिरी गेस्ट हाऊसपासून नाशिकरोड प्रेस, पवारवाडी या पट्ट्यात पोलिसांनी गस्त घातल्यास चोरांना पकडता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोन्याचा नकली हार चार लाखांत विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घर गहाण आहे, बहिणीचे लग्न करायचे आहे, अशी भावनिक कारणे सांगत नकली हार सोन्याचा असल्याचे भासवून एकाची चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार देवळाली कॅम्प परिसरात घडला. या प्रकरणी नागपूरमधील एका महिलेसह विजय दशरथ चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी संतोषकुमार त्रिवेणीसिंग यादव (रा. मिलन लाइन, साताबट्टा, देवळाली कॅम्प) यांनी तक्रार दिली आहे. एक डिसेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत देवळालीतील रेणुकादेवी मंदिर परिसरात संशयित विजय चौधरी व एक महिला यादव यांना भेटली़ या दोघांनी घर गहाण असल्याचे, तसेच बहिणीचे लग्न करायचे असल्याची करुण कहाणी यादव यांना सांगत त्यांना भावनिक केले. यानंतर पैशांची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून जवळील ७९० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नकली हार देऊन तो खरा असल्याचे भासवून यादव यांच्याकडून चार लाख रुपये घेतले. यादव यांनी फार चौकशी न करता पैसे त्यांना दिले. या हाराच्या सत्यतेबाबत यादव यांनी पाठपुरावा केला असता तो नकली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

डिक्कीतून मोबाइल लंपास

भगूर येथील रहिवासी कुणाल भवर या तरुणाच्या दुचाकीच्या (एमएच १५/जीपी १७०६) डिक्कीत असलेला साडेसोळा हजार पाचशे रुपयांचा मोबाइल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना शनिवारी (ता. १५) दुपारच्या सुमारास भद्रकाली परिसरातील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडली़ या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी घसरून मृत्यू

मुंबई- आग्रा महामार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले त्र्यंबकेश्वरचे महंत सामराजबाबा लोणारकर (वय ७७, रा. श्रीकृष्णवाडी, त्र्यंबकेश्वर) यांचे शनिवारी (ता. १५) सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले़ महंत लोणारकर महाराज मंगळवारी (ता. ११) दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबई- आग्रा महामार्गावरील प्रेमदानसमोरून दुचाकीवरून (एमएच १५/डीवाय ३७६६) जात होते़. अचानक त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी बाळू नेरकर (रा़ महानुभाव आश्रम, अंजनेरी) यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

प्रवासात दागिने लंपास

महामंडळाच्या बसने शिर्डी येथे जात असलेल्या मुंबईतील महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची चेन चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शनिवारी (ता. १५) सायंकाळी नाशिकरोड बसस्थानकात घडली. वंदना घेगडमल (रा. सोमय्या ट्रस्ट, टिळकनगर) शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास नाशिकरोड बसस्थानकावर शिर्डी बसमध्ये बसल्या होत्या. या वेळी चोरट्यांनी त्यांची ७० हजार रुपयांची सोन्याची पाच तोळ्यांची पोत लंपास केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार दुचाकींची चोरी

शहरातील विविध भागांतून चोरट्यांनी बुलेटसह चार दुचाकी लंपास केल्या. या प्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले. टाकळी रोडवरील शांती पार्कमधील रहिवासी समीर धोपावकर यांची ९० हजार रुपयांची रॉयल इनफिल्ड बुलेट (एमएच १५/जीई ९६५३) चोरट्यांनी बिल्डिंगच्या पार्किंगमधून लंपास केली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सिडकोतील राजरत्ननगरमधील रहिवासी बापू पवार यांची बजाज बॉक्सर दुचाकी (एमएच १५/एएल १५९२) ठक्कर बाजारमधील हॉटेलच्या पार्किंगमधून चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. सीबीएसजवळील कान्हेरेवाडीतील राजेंद्र सुराणा (रा. रामकृपा बिल्डिंग) यांची पॅशन प्रो दुचाकी (एमएच १५/ईटी ४४६७) चोरट्यांनी सुराणा यांच्या घराजवळून लंपास केली. पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. दरम्यान, देवळाली कॅम्प परिसरातील लोहशिंगवे येथील किसन पाटोळे यांची स्प्लेंडर प्लस (एमएच १५/सीए १६२७) चोरट्यांनी घराजवळून लंपास केली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालहक्कांसदर्भात आज प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई व 'सेव्ह द चिल्ड्रेन' यांच्या सहकार्याने आज (१७ डिसेंबर) बालकांशी संबंधित प्रमुख भागधारकांच्या क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल कॅम्फोटेल, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लबसमोर येथे सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजता यादरम्यान हे प्रशिक्षण होणार आहे. आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

रस्त्यावरील परिस्थितीत राहणारी बालके ही शहरी भारतात सर्वत्र आढळून येतात. ही मुले ट्रॅफिक सिग्नल, रेल्वे प्लॅटफॉर्म, धार्मिक स्थळे, बस किंवा रिक्षा स्टॅण्डजवळ, पुलाखाली, फूटपाथवर आढळतात. त्यांना प्रत्येक दिवस मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. रस्त्यावरील राहणारा मुलांचा गट हा भारतातील शहरी भागात वेगाने वाढणारा समूह मानता जात आहे. अशा बालकांसाठी सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी आणि त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर लोकनेते गोपीनाथ मुंढे जयंतीनिमित्त भागवत सप्ताहालाही घुगे उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रांगोळीतून एचआयव्ही जनजागृतीचा संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिंद्रा आणि महिंद्रा लिमिटेड आणि यश फाउंडेशनतर्फे एचआयव्ही एड्स विषयाशी संबंधित रांगोळी स्पर्धेत सावतानगर येथील लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालयाच्या गौरी चव्हाण या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. सीबीएस येथील शासकीय कन्या विद्यालयात ही स्पर्धा झाली.

स्पर्धेत विविध शाळा, महाविद्यालय, वस्तीपातळीवरील किशोरवयीन युवती अशा ११० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समाजामध्ये एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती व्हावी हा या स्पर्धेचा उद्देश होता. महिंद्रा आणि महिंद्राचे नामदेव येलमामे, चित्रकार मुक्ता बालिगा, यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी प्रमुख पाहुणे होते. रांगोळीची मांडणी, रंगसंगती आणि एचआयव्हीशी संबंधित संदेश अशा त्रिसूत्री निर्देशांचा विचार करून स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. गौरी चव्हाण हिने ७०१ रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारीतोषिक पटकावले. सावतानगर येथील ऋतुजा अमोल बेहेरे हिने ५०१ रुपयांचे द्वितीय क्रमांकाचे, तर याच विद्यालयाच्या सुमन सलगू हिने ३०१ रुपयांचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. याच विद्यालयाच्या पूजा सुरेश बोरसे व कोमल रवींद्र भोळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. यश फाउंडेशनच्या मेघा भाबड, कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत साळुंखे, कविता साठे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस११

$
0
0

जिवा पांडू गावित

आमदार, कळवण-सुरगाणा

विजय ओहोळ

माजी नगरसेवक

मुक्तेश्वर मुनशेट्टीवार

ज्येष्ठ कामगार नेते

प्रदीप भुतडा

वकील

सुभाष पाटील

समन्वयक, एमकेसीएल

सुभाष सोमवंशी

बांधकाम व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दागिनेचोरास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वयोवृद्धांसह एकट्यादुकट्या महिलेला गाठून पॉलिशच्या बहाण्याने दागिने लंपास करणाऱ्या संशयितास शहर पोलिसांनी अटक केला. त्याच्या ताब्यातून साडेतीन लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्या अटकेने शहरातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली.

कुर्बान अली परवेज अली (वय ४५, रा. नांदुरा, जि. बुलडाणा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. गेल्या काही दिवसांत शहरात पॉलिशच्या बहाण्याने दागिने लंपास करण्याच्या घटनेत वाढ झाली होती. त्यामुळे पोलिस संशयिताच्या मागावर होते. युनिट एकचे निरीक्षक आनंदा वाघ आणि सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. नांदुरा (जि. बुलडाणा) येथील संशयित शहरात येऊन वयोवृद्धांसह एकट्या महिलांना गाठून अलंकार हातोहात लंपास करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने त्याला नांदुरा येथे अटक केली. त्याने शहरातील गंगापूर, सरकारवाडा आणि भद्रकाली हद्दीत पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिने लंपास केल्याची कबुली दिली. संशयिताच्या ताब्यातून तीन लाख ४८ हजार ७५० रुपयांची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली. त्याच्या अटकेने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पालकर, पोपट कारवाळ, हवालदार रवींद्र बागूल, जिवाजी महाले, प्रवीण कोकाटे, बाळासाहेब दोंदे, वसंत पांडव, संजय मुळक, पोलिस नाईक आसीफ तांबोळी, दिलीप मोंढे, मोहन देशमुख, संतोष कोरडे, शिपाई विशाल देवरे, शांताराम महाले, रावजी मगर, विशाल काठे, नीलेश भोईर, स्वप्निल जुंद्रे, गणेश वडजे, राहुल पालखेडे, प्रवीण चव्हाण, प्रतिभा पोखरकर, चालक दीपक जठार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजारपणाला नकारात्मकता कारणीभूत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नकारात्मक विचारांचा परिणाम आपल्या वर्तनावर आपसूक होत जातो. त्यामुळे आपली मानसिकता खालावत जाते. मानसिकतेत कायम नकारात्मक विचारांचे आदानप्रदान होत राहिल्यास तणाव अधिकाधिक वाढू लागतो. हाच तणाव पुढे आजारपणाला कारण ठरतो. याचाच अर्थ, नकारात्मक विचार आजाराचे मुख्य कारण आहे, असे प्रतिपादन सत्याचार्या वैशाली दराडे यांनी केले. तेजज्ञान फाउंडेशनतर्फे टिळकवाडी येथे 'तणावमुक्त राहण्याचे तंत्र' या विषयावर शिबिर झाले. शिबिरात सत्याचार्या दराडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी निरोगी आयुष्यासाठी कायम सकारात्मक विचारांचे सान्निध्य गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. विजय घाटगे आणि डॉ. विद्या शिंदे यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोतवालांचे आजपासून ‘भीक मांगो’ आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

चतुर्थ श्रेणीचा दर्जा आणि सहावा वेतन आयोग मिळावा या प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठी सरकारकडून टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ राज्यातील कोतवालांनी सोमवारपासून (दि. १७) भीक मांगो आंदोलनाचा प्रशासनाला लेखी इशारा दिला आहे. राज्यातील कोतवालांनी कामबंद ठेवून येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या २८ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्य अध्यक्ष गणेश इंगोले यांच्या नेतृत्वाखाली १९ नोव्हेंबरपासून येथील विभागीय आयुक्त कार्यालयापुढे कोतवालांच्या मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी राज्यातील कोतवालांचे धरणे आंदोलन सुरू आहे. कोतवालांकडून चतुर्थ श्रेणीचा दर्जा आणि सहावा वेतन आयोग मिळावा या मागण्या शासनदरबारी सातत्याने केल्या जात आहेत. त्यांच्या पूर्तीसाठी कोतवालांनी यापूर्वी वेळोवेळी आंदोलनेही केली. परंतु, सरकारकडून केवळ आश्वासने मिळाली. दुसरीकडे एकछत्री योजनेत समावेश करून कोतवालांची राज्य सरकारने दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने केला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. एकछत्र योजनेचा अहवाल प्राप्त झालेला असतानाही सरकार ठोस निर्णय घेण्यासही टाळाटाळ करीत असल्याचा आरोप कोतवालांच्या संघटनेने केला आहे. गेल्या २८ दिवसांपासून सुरू असलेल्या कोतवालांच्या आंदोलनाची सरकारकडून सकारात्मक दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे आक्रमक भूमिका घेत कोतवाल सोमवारपासून (दि.१७) भीक मांगो आंदोलन करणार आहेत. यासंदर्भात लेखी निवेदन आयुक्तालय प्रशासनाला दिले आहे.

पालकमंत्र्यांवरही नाराजी

राज्यभरातील कोतवालांचे नाशिकरोड येथे २८ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. याबाबत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या कोतवालांनी खेद व्यक्त केला आहे. या जिल्ह्यात पालकमंत्री आहे की नाही, असा प्रश्न करीत कोतवालांनी पालकंमत्र्यांविरोधातील नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images