Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आपण लाचारी पत्करली नाही!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके आणि सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यात आता वाकयुद्ध सुरू झाले असून, आहेर-आडके यांच्या आरोपावर पाटील यांनीही पलटवार केला आहे. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर आपण आजही ठाम असून, मुंढेंची कधीही लाचारी पत्करली नाही असा टोला त्यांनी सभापतींनी लगावला आहे. स्वार्थासाठी आपण कोणाशी हातमिळवणी केली नसून मुंढेंच्या समर्थनार्थ मोर्चे काढणाऱ्यांना मदतही केली नाही, अशा आशयाचे पत्र पाटील भाजप शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप व महापौर रंजना भानसी यांना सादर केले आहे.

गंगापूररोडवरील वादग्रस्त सर्व्हे क्रमांक ७०५च्या आरक्षित भूखंडाच्या संपादनापोटी रोखीने मोबदला अदा करण्याच्या प्रशासनाच्या कृतीनंतर सभागृहनेते पाटील व सभापती आहेर-आडके यांच्यात आता आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. भाजपच्याच दोन नेत्यांमध्ये सुरू झालेल्या शाब्दिक संघर्षाने मात्र भाजपचीच अडचण झाली आहे. पक्षशिस्त शिकवण्यासह वैयक्तिक टीकेवर कायदेशीर उत्तर देण्याचा इशारा सभापती आहेर यांनी दिल्यानंतर पाटील यांनी शहराध्यक्ष सानप तसेच महापौर भानसी यांना पत्र पाठवत आपली भूमिका मांडली आहे. यात पाटील यांनी सभापतींवर हल्लाबोल केला आहे. आपल्या पक्षशिस्तीबाबत पक्षश्रेष्ठींना चांगली माहिती आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवाजी सहाणे यांना मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश होते. त्यावेळी आपण विरोधी उमेदवार दराडे यांना मदत केली नाही. जिल्ह्यात कोणी किती वेळा पक्ष बदलले, कोण किती गरीब-श्रीमंत आहे, हे स्वत:हून सांगणे आपल्याला उचित वाटत नाही. मी सुसंस्कृत भारताचा नागरीक आहे. माझी संस्कृती ही महिलांना बहीण म्हणून आदर करणे आहे, असे नमूद करत आलेल्या पाहुण्यांना आपण देव समजतो, असा चिमटाही पाटील यांनी या पत्राद्वारे काढला आहे. पक्षात भांडण होऊ नये म्हणून लक्ष द्यावे, असा सल्ला शहराध्यक्षांना पाटील यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसवाय, टीवायच्या निकालात गोंधळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

ऑक्टोबर २०१८ मध्ये झालेल्या एसवाय व टीवायच्या परीक्षेच्या ऑनलाइन निकालात मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या आहेत. एसवायचे विद्यार्थी थेट टीवाय परीक्षा उत्तीर्ण दिसणे, परीक्षेसाठी न घेतलेल्या विषयाला मार्क मिळणे, विषयच बदलणे, मार्च २०१८ चेच मार्क विद्यार्थ्यांना मिळणे अशा गंभीर चुका गुणपत्रिकेत दिसत आहेत. त्यामुळे ही गुणपत्रिका रद्द करावी, फेरतपासणी करावी अशी मागणी नांदगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या गोंधळाला पुणे विद्यापीठ व परीक्षा समिती जबाबदार असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक सुनील कोल्हे, तालुका प्रमुख योगेश सोनार, शहर प्रमुख रवींद्र सोनवणे,यांनी प्राचार्य पटेल यांना निवेदन दिले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालयाने प्रयत्न करावेत, फेरतपासणी करण्याचा आग्रह करू नये, या बाबतचे शुल्क रद्द करावे अशी मागणी त्यांनी केली. नांदगाव कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. आय. पटेल म्हणाले की, ऑनलाइन निकालात चुका दिसत आहेत. प्रत्यक्ष गुणपत्रिका येतील तेव्हा त्यात त्या नसतील. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आलेल्या गुणपत्रिका न पाहता ऑनलाइन गुणपत्रिका पाहिल्यामुळे मुलांचा गोंधळ उडालेला असून, यात नांदगाव महाविद्यालयाचा काहीही संबंध नसल्याचे ते म्हणाले.

जे विद्यार्थी उत्तीर्ण आहेत, त्यांना अनुत्तीर्ण शेरा आला आहे. विद्यापीठाने धावपळीत निकाल लावल्याचे दिसते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

- योगेश सोनार, मनसे पदाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हीव्हीपॅटची कार्यपद्धती समजून घ्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपण दिलेले मत संबंधित उमेदवारालाच मिळाले का याची खातरजमा व्हावी, यासाठी यंदा लोकसभा निवडणुकीत व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल मशिनचा (व्हीव्हीपॅट) वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या काळात ययाबाबतची माहिती नागरिकांना दिली जाणार असून मतदारांनी व्हीव्हीपॅटची कार्यपद्धती अवश्य समजून घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी मंगळवारी केले.

अंबड येथील सेंट्रल वेअर हाऊस येथे अधिकाऱ्यांसाठी इव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती मोहीम व प्रशिक्षण बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, निवडणूक शाखेचे तहसीलदार गणेश राठोड, नायब तहसीलदार अमित पवार यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माने यांनी व्हीव्हीपॅटची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना करण्यात आले. नागरिकांनीही व्हीव्हीपॅटची कार्यपद्धती जाणून घ्यायला हवी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीने नाशिकमध्ये आलेले अभियंता बसंतकुमार यांनी व्हीव्हीपॅट यंत्राची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. इव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्र एम-३ प्रकारचे असून मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने पार पडण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी व्हीव्हीपॅट यंत्राची माहिती प्रत्येक गावात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या जनजागृती मोहिमेला शनिवारपासून (दि. १५) सुरुवात होणार आहे.

प्रत्येक तालुक्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ३९ पथक बनविण्यात आले असून १५ डिसेंबरपासून ही पथके जिल्हाभर रवाना होणार आहेत. एखादा मतदार इव्हीएम मशिनवर उमेदवाराच्या नावासमोरचं बटन दाबतो त्याचवेळी मतदान केल्याची पावती व्हीव्हीपॅट या मशिनमध्ये दिसते. तसेच मतदार इव्हीएम मशीनवर उमेदवाराच्या नावासमोरचं बटन दाबतो त्याचवेळी उमेदवारांचे नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली व्हीव्हीपॅट स्लिप सात सेकंदात मतदाराला दिसते. त्यानंतर आपोआप ही स्लिप कट होऊन बीप वाजतो आणि स्लिप सीलबंद पेटीत जमा होते अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुसावळमध्ये रेल्वेचा प्रकल्प!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

भुसावळ येथे रेल्वेने ४७२ कोटी रुपये खर्चून एलएचबी या आधुनिक कोचेसचा ओव्हरऑइलिंगचा म्हणजेच संपूर्ण दुरुस्तीचा कारखाना उभारण्यास मान्यता दिली आहे. प्रदीर्घ काळानंतर भुसावळ विभागात अशी मोठी गुंतवणूक होत आहे. या प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती आणि परिसराचा विकास हे हेतू साध्य होणार आहेत, तसेच रेल्वेच्या पायाभूत सुविधाही अधिक मजबूत होणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. भुसावळ विभागाचे मुख्य व्यवस्थापक आर. के. यादव यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सूत्रांनी सांगितले, की आधी हा प्रकल्प नागपूरला होणार होता; परंतु एकाचा तोटा म्हणजे दुसऱ्याचा फायदा या तत्त्वाने नागपूरला प्रकल्प उभारण्यासाठी जास्त खर्च येणार होता. त्यामुळे भुसावळला हा प्रकल्प मिळाला. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी त्याला मान्यता दिली आहे. नागपूर येथे हा प्रकल्प उभारला असता तर ५०७ कोटी ६४ लाख रुपये खर्च आला असता; परंतु भुसावळ येथे रेल्वेची स्वतःची मोठी जमीन उपलब्ध असल्याने ४७२ कोटींचा खर्च येणार आहे. प्रकल्पात ३५ कोटींची बचत झाली आहे. त्यामुळेच भुसावळला रेल्वेने पहिली पसंती दिली आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी बांधकाम खर्च ३०६ कोटींचा, तर यांत्रिक खर्च १४० कोटींचा असेल.

भुसावळच्या प्रस्तावित प्रकल्पातून एलएचबी कोचेसची (बोगी) पूर्ण दुरुस्ती केली जाईल. इंटिग्रल कोच फॅक्टरी सध्या पारंपरिक कोचेसचे उत्पादन करते. मात्र, त्यांचा वापर आता थांबवण्यात आला असून, एलएचबी कोचेसचा वापर रेल्वे देशभरात करू लागली आहे. नाशिक, भुसावळचा समावेश असलेल्या मध्य रेल्वेला अशाच प्रकल्पाची मोठी गरज होती. एलएचबी कोचचा मेटेनन्स, रिपेअरिंग किंवा ओव्हरऑइलिंग ही कामे भुसावळ प्रकल्पात होतील. मुंबई आणि पुणे येथून मोठ्या प्रमाणावर रेल्वेगाड्या सोडल्या जातात. या गाड्यांमध्ये एलएचबी कोचचा वापर केला जातो. हे कोच दुरुस्तीसाठी नागपूरला पाठवावे लागले असते. आता भुसावळला प्रकल्प झाल्यानंतर वेळ आणि खर्चात बचत होणार आहे.

धाडसाचा फायदा

भुसावळ रेल्वे विभागाने पोलिसांच्या मदतीने भुसावळ आणि मनमाड येथे गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याचे धाडस दाखवले. रेल्वेच्या जागेवरील हे अतिक्रमणे हटविल्याने भुसावळ विभागाकडे मोक्याच्या जागी मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध झाली आहे. या जागेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांनी रेल्वेच्या वीज व अन्य सुविधांचा वापर सुरू केला होता. त्याचा फटकाही रेल्वेला बसत होता. आता अतिक्रमण हटविल्याने मोठी जमीनही मिळाली आणि रेल्वेचा खर्चही वाचला आहे. प्रस्तावित प्रकल्पाला जागा मिळाल्याने खर्चही वाचला आहे. स्थानिकांना रोजगार मिळणार असून, उद्योग- व्यवसायालाही चालना मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेनापतींच्या स्मारकाची जागा बदला’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

सेनापती तात्या टोपे यांच्या येवल्यातील नियोजित स्मारकासाठी केंद्र शासनाने १० कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र या स्मारकासाठी नगरपालिकेने निवडलेली जागा अडगळीची असल्यामुळे स्मारकाची जागा बदलण्यासाठी पुन्हा एकदा सर्वपक्षीय येवलेकर आक्रमक झाले आहेत. स्मारकाच्या निविदा प्रक्रियेस तत्काळ स्थगिती देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पालिकेने स्मारकासाठी शहरापासून दूर असलेली व शहरवासियांचा आक्षेप असलेली बाभूळगाव शिवारातील अडगळीची जागा निश्चित केली आहे. आता बांधकामाची निविदाही काढल्याने शहरातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेस तत्काळ स्थागिती देण्यात यावी तसेच स्मारकाची बाभूळगाव शिवारातील जागा बदल करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन येवला नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. नगरपरिषेदेने १६ डिसेंबरपर्यंत निर्णय बदलला नाही तर नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू, असा इशारा राजेश भंडारी, एकनाथ गायकवाड, रुपेश घोडके, धीरज परदेशी, गौरव कांबळे, दीपक लोणारी, अविनाश कुक्कर, सुभाष गांगुर्डे, धनंजय कुलकर्णी, अतुल घटे, राजेंद्र नागपुरे, भूषण लाघवे, विशाल परदेशी, ऋषिकेश कुलकर्णी आदींनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोगो : धगधगते नाशिकरोड - भाग १

$
0
0

गुन्हेगारी, मटका अड्डे, वाळू आणि भूमाफियांची दादागिरी, राजकीय गुन्हेगारी मंडळींचा वाढलेला सुळसुळाट, केबलवॉर, जीवघेणे हल्ले, एकलहरे येथील राख वाहतूक आणि मध्य रेल्वेतील कोळसा चोरीतून निर्माण झालेल्या गुन्हेगारीच्या ज्वालामुखीवर नाशिकरोड सध्या येऊन थांबलेले आहे. या धगधगत्या नाशिकरोडमधील गुन्हेगारी आणि समस्यांचा काट्याचा नायटा होण्यापूर्वीच नायनाट करणे आवश्यक आहे. पोलिसांपुढे हे मोठेच आव्हान आहे. याचा वेध घेणारी ही वृत्तमालिका आजपासून.

..

गुन्हेगारीमुळे नाशिकरोडची बिकट वाट

..

मटका, जुगाराचा सुळसुळाट

..

टीम मटा, नाशिकरोड

जुगार आणि मटक्याचा गंभीर विळखा शहरातील काही भागाला बसला असून, त्याविरोधात कारवाई होत नसल्याने हे अड्डे गुन्हेगारीचे केंद्रेही बनले आहेत. यामुळे नाशिकरोडच्या कायदा आणि सुव्यवस्थेलाही बाधा पोहचत असली तरी त्याचे सोयरसूतक पोलिसांना नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी सर्वसामान्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

नाशिकरोड, उपनगर आणि देवळाली कॅम्प या तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विभागलेले आहे. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त, विभाग चारचे सहाय्यक पोलिस आयुक्त यांची कार्यालयेही याच विभागात कार्यरत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांचा रात्रंदिवस शहरात राबता असूनही जुगार आणि मटक्याचे अड्डे सर्रास सुरू आहेत. पोलिसांच्या वरदहस्ताशिवाय हे अड्डे सुरू राहूच शकत नाही, अशी जनतेची भावना आहे. शहरात इंगळेनगर पाण्याची टाकी, देवळालीगाव, बिटको रुग्णालयाची मागील बाजू, सिन्नर फाटा रेल्वे प्रवेशद्वार, गोसावी वाडी, सुभाषरोड, रोकडोबावाडी, गुलाबवाडी, रेल्वे स्टेशनजवळील परिसर या ठिकाणी जुगार व मटका अड्डे दिवसाढवळ्या सुरू आहेत. यातील काही ठिकाणी यापूर्वी पोलिसांनी छापे मारून कारवाईही केली होती. मात्र हे मटका अड्डे पुन्हा सुरू झाले आहेत.

..

राजकीय कार्यकर्त्यांचाही सहभाग

शहरात सुरू असलेले मटका व जुगारअड्डे काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशीच संबंधित आहेत. जेलरोडवरील मटका अड्डा एका माजी नगरसेवकामार्फत चालविला जातो. देवळालीगाव, रोकडोबावाडी, सुभाष रोड, गोसावीवाडी, रेल्वे स्टेशन परिसर, सिन्नर फाटा प्रवेशद्वार या ठिकाणी सुरू असलेले मटका व जुगार अड्डेदेखील शिवसेना आणि आरपीआय या दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून चालविले जातात. यात काही आजी-माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. परिणामी शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत आहे.

..

दारुविक्रीही जोरात

शहरातील विविध भागासह चेहेडी जकात नाका, सिन्नर फाटा, गुलाबवाडी, एकलहरे, शिंदे, पळसे, बेलतगव्हाण, पिंपळगाव खांब, बागूलनगर, चेहेडी शिव, अरिंगळे मळा, जुना ओढारोड या भागात देशी दारुची बेकायदेशीर विक्री सर्रास सुरू आहे. गुन्हे शोध पथकाकडून या दारू विक्रीच्या अड्ड्यांवर कारवाई केल्याची पोलिस दप्तरी नोंदही आहे. परंतु, हा केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोल्डन एज बॅडमिंटन लीग शनिवारपासून

$
0
0

रचना स्पोर्ट्स, कल्चर अकादमीतर्फे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रचना स्पोर्ट्स आणि कल्चर अकादमीतर्फे 'गोल्डन एज बॅडमिंटन लीग' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सावरकर नगर, गंगापूर रोड येथील रचना अकादमीच्या बॅडमिंटन कोर्टवर १५ आणि १६ डिसेंबर दरम्यान ही व्हेटरन गटाच्या खेळाडूंसाठी (वयोगट ३५ पुढील) होणाऱ्या या स्पर्धेचे दुसरे पर्व रंगणार आहे.

लीग पद्धतीने खेळली जाणारी नाशिकमधील ही पहिली बॅडमिंटन स्पर्धा असून, एकूण सहा संघ एकमेकांशी विजेतेपदासाठी लढतील. या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात महिला संघाचाही समावेश करण्यात आला आहे. ३० वर्षांवरील १० महिला खेळाडूंसह एकूण १०८ खेळाडू सहभागी होणार आहेत. संतोष पाटील, आशिष तोरणे आणि आदित्य कासार यांचा मराठा वॉरियर्स तर विशाल शाह, संजय म्हात्रे आणि हर्षद परांजपे यांचा हॉटशॉट, डॉ. प्रीतम जपे आणि रवी आढाव यांचा सुपर जायंट्स, मुकेश पवार आणि योगेश दुसाने यांचा नाशिक सुपर किंग्ज तर नितिन वाघस्कर, करण गुप्ता यांचा निवेक मास्टर्स, डॉ. सुहास राहणे आणि संजय चंदोई खान यांचा डॉल्फिन शटलर्स अशा सहा संघाचा या लीगमध्ये समावेश असणार आहे.

अनुक्रमे चंदन जाधव, सिद्धार्थ वाघ, अमित देशपांडे, योगेश एकबोटे, आदित्य शिरसाठ आणि आदित्य आर्डे हे या संघांचे प्रशिक्षक आहेत.

सहा संघमालकांनी उत्कृष्ट खेळाडूंना बोली लावून आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे. तर महिला खेळाडू मिश्र दुहेरीत खेळतील. प्रत्येक संघात १८ खेळाडूंचा समावेश असून, मुख्य स्पर्धेत १४ खेळाडू तर बोली न लागलेले प्रत्येकी ४ खेळाडू ६ संघांकडून जंबल डबल प्रकारात खेळतील.

भरघोस बक्षिसे

स्पर्धेत विजयी संघ आणि खेळाडूंना १ लाखाहून अधिक रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. शनिवारी (१५ डिसेंबर) रोजी सकाळी साडेआठ वाजता स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पुढील दोन दिवस सहा सत्रात स्पर्धा होणार असून रविवारी (१६ डिसेंबर) संध्याकाळी अंतिम सामने रंगतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर गारठले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तर महाराष्ट्रात थंडी परतली असून मंगळवारी नाशिकमध्ये ९.४ अंश सेल्सियस एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील हे यंदाच्या वर्षातील सर्वात नीचांकी तापमान ठरले आहे. राज्यातील सर्वात कमी ९.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद अहमदनगरमध्ये झाली.

हुडहुडी भरविणारी थंडी नाशिककरांना नवीन नाही. त्यामुळेच थंड हवेचे ठिकाण म्हणूनही नाशिक ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात तापमानाचा पारा १०.२ अंश सेल्सियपर्यंत खाली आला होता. हे जिल्ह्यातील किमान तापमान ठरले होते. त्यानंतर तापमान वाढत जाऊन १४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातून थंडी गायब झाल्याचे बोलले जाऊ लागले. परंतु, पुन्हा तापमान घसरण्यास सुरुवात झाली असून, सोमवारी (दि. १०) रोजी १२.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे सोमवारचे हे राज्यातील सर्वात निचांकी तापमान ठरले. मंगळवारी तापमानात अधिकच घसरण झाली. नाशिकमधील किमान तापमान ९.४ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. चालू वर्षातील हे सर्वात नीचांकी तापमान ठरले आहे. मंगळवारी सर्वात निचांकी तापमानाची नोंद अहमदनगर जिल्ह्यात झाली असून ९.२ अंश सेल्सियस ऐवढे किमान तापमान नोंदविण्यात आले.

हुडहुडी भरणार

या आठवड्यात थंडी गायब होणार असा अंदाज सोमवारी वर्तविणाऱ्या भारतीय हवामान विभागाने मंगळवारी मात्र वेगळाच अंदाज वर्तविला आहे. या आठवड्यात जिल्ह्यातील किमान तापमान घसरत जाणार असून, टप्प्याटप्प्याने ते आठ अंश सेल्सियसपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे चालू आठवड्यात नाशिककरांना थंडी हुडहुडी भरवेल, अशी शक्यता बळावली आहे. या आरोग्यदायी हंगामाचा लाभ घेण्यासाठी शहरातील जॉगिंग ट्रॅकवर गर्दी वाढू लागली आहे.

दिनांक किमान तापमान

१२ डिसेंबर ९.०

१३ डिसेंबर ९.०

१४ डिसेंबर ८.०

१५ डिसेंबर ८.०

१६ डिसेंबर ८.०

१७ डिसेंबर ८.०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुरव समाजाच्या कॅलेंडरचे प्रकाशन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

शैवगुरव समाज या संस्थेची बैठक नुकतीच पंचवटी येथे झाली. यावेळी समाजाच्या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष सुधीर चांदसरकर, डॉ. नागेश गुरव, रमेश पवार, संजय गुरव, सुरेंद्र सोनवणे, भाऊसाहेब गुरव, सुरेश गुरव, राजेंद्र पवार, गणेश, सोनवणे, बाळासाहेब महाजन, राजेंद्र दावलकर, संतोष सोनवणे, रमेश गुरव आदींची प्रमुख उपस्थिती होती. नितीन काळे यांनी प्रास्तविक केले. भाऊसाहेब गुरव म्हणाले की, समाज विकासासाठी सर्व पोटजातींनी एकत्र येऊन एकजुटीने काम करण्याची गरज चांदसरकर यांनी व्यक्त केली. डॉ. नागेश गुरव यांनी समाजाचे मंगल कार्यालय व सामाजिक भवन उभारण्याची गरज व्यक्त केली.

सुधीर चांदसरकर म्हणाले, की गुरव समाजाच्या पोटशाखा एकत्र येत आहेत ही ऐतिहासिक घटना असून समाज विकासाच्या मार्गातील मैलाचा दगड ठरेल. मंगेश भांडारे यांनी सूत्रसंचलन केले. पराग गुरव, राजेंद्र पवार, विजय शिंदे, रविंद्र सोनोने, शिरीष गुरव, मीना सोनवणे, शामराव गाढे, ऊर्मिला काळे,कल्पना चांदसरकर, जयश्री शिंदे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस १२ डिसेंबर

$
0
0

वाढदिवस १२ डिसेंबर

--

रवी पगारे

संचालक, शामराव विठ्ठल को-ऑप. बँक

रामदास चारोस्कर

माजी आमदार

प्रवीण चांडक

उपाध्यक्ष, नावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्दीतील गुन्हेगारांना सरळ करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी निवडणुका तोंडावर असून, त्याची तयारी आतापासूनच सुरू करा. प्रतिबंधक कारवाई, समाजकंटकांवर कारवाईस गती देणे अपेक्षित असताना वर्दीतील गुन्हेगारांना खड्यासारखे बाजूला करा, असे स्पष्ट आदेश राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलीगकर यांनी दिले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलिस महासंचालक पडसलगीकर यांनी शहर पोलिसांच्या कामगिरीचा आढावा घेतला. या वेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह सर्व पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक हजर होते. शहर पोलिसांच्या कामगिरीबाबतची माहिती अवगत असल्याने पडसलगीकर यांनी सरळ संवाद सुरू केला. पोलिसांचा प्रतिसाद, त्यांची प्रतिमा यावर नागरिक आपले मत बनवितात. त्यामुळे आपण या बाबी लक्षात घेऊन त्या दृष्टीने बदल करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. जातीय तेढ, दंगली, राजकीय गुन्हेगारी अशा सर्वच बाबींवर यापुढे लक्ष केंद्रित करून कारवाई वाढविण्यात यावी. दुसरीकडे खाकी वर्दी घालून गुन्हेगारांशी संबंध ठेवणाऱ्या, लाचखोरी करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करून कठोर कारवाई करण्याबाबत त्यांनी सूचित केले. या वेळी पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी आजवर केलेल्या कारवाईची माहिती पोलिस महासंचालकांना दिली. लाचखोरी अथवा गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येत असल्याचे सिंगल यांनी सांगितले.

दरम्यान, गुन्हेगारी आणि पोलिसिंग यात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र कोठे आहे, त्यात आणखी काय सुधारणा होणे गरजेचे आहे, याबाबतच्या सूचना आपल्या दीड तासांच्या मार्गदर्शनात पडसलगीकर यांनी केल्या. अंतर्गत सुरक्षा, गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण याबाबत पडसलगीकर यांनी शहर पोलिसांकडून माहिती घेतली.

प्रतिसाद महत्त्वाचा

सर्वसामान्य नागरिकांचे आणि पोलिसांचे संबंध चांगले असावेत, यासाठी पोलिस स्टेशनसह नियंत्रण विभागाकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला हवा. एवढेच नव्हे, तर यानंतर संबंधित तक्रारदाराला नंतर त्याबाबत सूचित करणे आवश्यक असते. याबाबत देशपातळीवर एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत ११२ हा एकच क्रमांक सर्व सेवांसाठी वापरण्यात येणार असल्याबाबत त्यांनी सविस्तर माहिती सर्व पोलिस अधिकाऱ्यांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तपोवन’ एक्स्प्रेसने ऐनवेळी बदलला प्लॅटफॉर्म

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड रेल्वे स्थानकात तपोवन एक्स्प्रेस नेहमीच्या प्लॅटफॉर्म एकवर न येता ऐनवेळी प्लॅटफार्म दोनवर आल्याने एकच गोंधळ उडाला. गाडी पकडण्यासाठी प्रवाशांनी धोका पत्करत रूळ ओलांडले, तर बाकीच्यानी अरुंद जिन्याकडे धाव घेतली. प्रवाशांची गर्दी उसळल्याने जिना आणि पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाली. सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नसली तरी प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांवर प्रचंड संताप व्यक्त केला. याप्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी केली.

मराठवाड्याच्या प्रवाशांसाठी तपोवन एक्स्प्रेस आहे. औरंगाबादकडे जाणारी ही गाडी सकाळी पावणेदहा वाजता येते. तिची रोजची जागा प्लॅटफॉर्म क्रमांक एक आहे. त्यामुळे प्रवाशी या गाडीची वाट पाहत उभे होते. गाडी प्लॅटफॉर्म एकवरच येणार असल्याची अनाऊन्समेंट होत होती आणि इलेक्ट्रॉनिक फलकांवरही तसेच झळकत होते.

अन् उडाली धावपळ

गाडी स्टेशनवरुन दृष्टीपथात येताच प्रवाशांनी जागा पकडण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. चढाओढ सुरू झाली. अचानक तपोवन एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म दोनकडे येऊ लागल्याने प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला. या गाडीला नेहमी गर्दी असते. प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी असतात. अनेक प्रवासी गाडी पकडण्यासाठी रुळावर उतरले. काहींनी जिन्याच्या दिशेने धाव घेतली. एकच गर्दी उसळल्याने आरडाओरड, धक्काबुक्की सुरू झाली. ज्येष्ठांचे तसेच लहान मुले व महिलांचे मोठे हाल झाले. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पादचारी पुलावरुन जातानाही चेंगराचेंगरी झाली.

जबाबदार कोण?

तपोवन एक्सप्रेसमधून मराठवाड्याचे मोलमजुरी करणारे प्रवासी असतात. अशा आपत्तीवेळी कसे वागायचे याची माहिती त्यांना नसते. नाशिकहून मनमाड, लासलगाव, निफाडला अप-डाऊन करणारे चाकरमाने, शेतकरीही या गाडीत असतात. मुंबईहूनच गाडी भरून येते. तिच्यात उभे राहण्यासही जागा नसते. गाडी आल्यावर ती पकडण्यासाठी अनेक प्रवाशांनी रेल्वेचे नियम मोडून रूळावर उडी घेतली. रुळामध्ये बॅरिकेडस टाकलेले आहेत. तरुणांनी बॅरिकेड्स ओलांडले. महिला व ज्येष्ठांना जमले नाही. ते रुळावरच उभे राहिले. अशावेळी दुसरी गाडी आली असती तर दुर्घटना घडली असता. बाकी प्रवाशांनी जिने आणि पादचारी पुलावर गर्दी केली. मुंबई आणि अलाहाबाद येथे पादचारी पुलावर चेंगराचेंगरीत अनेक प्रवाशांचा बळी गेलेला आहे. तशीच परिस्थिती नाशिकरोडला उद्भवली होती. मात्र, प्रवाशांचे सुदैव की दुर्घटना घडली नाही. दुर्घटना घडली असती तर जबाबदार कोण, असा प्रश्न प्रवाशांनी केला. प्रवाशांची संतप्त भावना लक्षात घेऊन गाडी दहा मिनिटे उशिरा सोडण्यात आली.

पोलिसही हतबल

रेल्वे प्रशासनाने गाडीचा ट्रॅक बदलण्याबाबत पूर्वसूचना न दिल्याने रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बल बेसावध राहिले. गर्दी आवरताना त्यांचीही धावपळ उडाली. दुर्घटना घडली असती तर पोलिसांनाच जबाबदार धरण्यात आले असते. रेल्वे अधिकारी बचावले असते. या घटनेची चौकशी करावी, जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संजय गांगुर्डे, लकेश नेमाणे, वसंत चौधरी, दिलीप यादव, धर्मेंद्र यादव, विलास पेंढारी आदींनी तसेच रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६६ टक्के निधी अखर्चित!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याची कारणे देत नगरसेवकांच्या विकास कामांना केराची टोपली दाखविणाऱ्या प्रशासनाने आठ महिन्यात अवघे ३४ टक्के बजेट खर्च केल्याचे समोर आले आहे. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमोर ही बाब समोर आल्यानंतर तेही अवाक् झाले.

बजेट तरतुदीनुसार मोठ्या प्रमाणात अखर्चित रक्कम शिल्लक राहिल्याने महापालिकेचा स्पिल ओव्हर कमी झाल्याची पाठ थोपटली. परंतु, प्रत्यक्षात नागरिक आणि नगरसेवकांच्या कामाला काट मारल्याने ६६ टक्के निधी अखर्चित राहिल्याचा ठपका प्रशासनावर मारण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने सुधारित बजेटची तयारी सुरू झाली असून यात अशा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

महापालिकेने सध्या सुधारित बजेट तयार करण्यासह २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या बजेटचीही तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा आढावा घेतला जात आहे. जानेवारीमध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांची एक हजार ७८३ काटी रुपयांचे बजेट स्थायी समितीला सादर केले. स्थायी समितीने काही योजनांचा समावेश केल्याने सुमारे ११६ कोटी रुपये वाढून १,८९९.७४ कोटींपर्यत बजेट नेले होते. महासभेनेही त्यात वाढ करत बजेट २०३३ कोटींपर्यंत पोहचले होते. मुंढे यांनी मात्र बजेट एकीकडे वाढवित असताना त्रिसूत्री लागू करीत, नागरिक तसेच नगरसेवकांच्या लोकोपयोगी कामांवर फुली मारली होती.

कामेच होत नसल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी वाढत असताना मुंढे यांच्याकडून मात्र करोडो रुपयांचे प्रस्ताव महासभेवर दाखल होऊ लागले. नगरसेवकांच्या प्रस्तावांना नाकारणाऱ्या मुंढेंनाही धडा शिकविण्याचा भाग म्हणून महासभा व स्थायी समितीत प्रस्तावांना विरोध होऊ लागला. त्यामुळे या वादातून मोठ्या प्रमाणावर निधी अखर्चित राहिल्याचे समोर आले आहे. बजेटच्या आढाव्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत ३४ टक्केच म्हणजेच ६०० कोटींचा निधी खर्च झाल्याचे समोर आले आहे. अद्यापही बजेटमधील ६६ टक्के रक्कम खर्च झाली नसल्याचे माहिती समोर आली आहे. खर्च झालेल्या रकमेत बहुंताश रक्कम ही महसुली कामासाठी असून भांडवली कामांचा निधी अद्यापही जैसे थे आहे. त्यामुळे प्रशासनाची या आढाव्यातून पोलखोल झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खराब कशी, असा सवाल आयुक्त गमे यांनी केला आहे.

लोकप्रतिनिधी आक्रमक होणार

महापालिकेचे बजेटमध्ये ६६ टक्के रक्कम अखर्चित राहिल्याचे समोर आल्यानंतर नगरसेवक आता आक्रमक होणार आहे. भाजपच्या २५७ कोटींच्या रस्त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टसह नगरसेवक निधीचीही मागणी आता जोर धरणार आहे. त्यामुळे प्रशासनाला नागरिकांसह नगरसेवकांच्या अपेक्षांचाही पूर्ती करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. सोबतच नव्याने कामे सुचविण्यासाठीचा तगादाही महापालिकेत सुरू होणार आहे. त्यामुळे नगरसेवकांना 'अच्छे दिन' येण्याची शक्यता आहे.

नव्या बजेटची तयारी

आगामी लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याच्या शक्‍यतेने महापालिका प्रशासकीय पातळीवर या आर्थिक वर्षाच्या सुधारित बजेटसह २०१९-२० या नवीन आर्थिक वर्षांचे बजेट स्थायी समितीला जानेवारीत सादर करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. मार्च महिन्यात लोकसभेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेट फेब्रुवारीत मंजूर करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईव्हीएम घोटाळ्याप्रकरणी धुळ्यात सर्वपक्षीय मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महानगरपालिका निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार करीत मंगळवारी (दि. ११) सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातून मोर्चा काढून निवडणूक निर्णय अधिकारी तथा मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले.

या घोटाळ्याविरुद्ध सर्वप्रथम प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवारांनी आवाज उठविला आणि त्याला साथ देत शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीसह इतर अपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा मोर्चा मनपावर काढला. या वेळी मोर्चात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. मनपा आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका निवडणुकीत वापरण्यात आले ईव्हीएम मशिनबद्दल सुरुवातीपासूनच तक्रारी होत्या. तर नवीन अत्याधुनिक स्वरुपातील व्ही. व्ही. पॅट असलेले मशिन वापरावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात आली होती. शक्य नसेल तर मतदान मतपत्रिकेच्या साहाय्याने करण्यात यावे, अशी मागणीदेखील करण्यात आली होती. मात्र, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करीत निवडणुकीसाठी ईव्हीएम मशिनचा वापर केला. परिणामी, नुकताच जाहीर झालेला महापालिकेचा निकाल धक्कादायक लागला आहे. जवळपास सर्वच प्रभागात पॅनल ते पॅनल मतदान झाल्याचे म्हणत भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. यातील काही उमेदवार नवीन असून ते निवडून येतील अशी खात्रीदेखील नव्हती, असेही निवदेनात म्हटले होते. या वेळी मोर्चात राष्ट्रवादीचे उमेदवार कैलास चौधरी, सागर कांबळे, मंदाकिनी पाटील, शिवसेनेचे महेश मिस्तरी, लोकसंग्रामचे अमोल सूर्यवंशी, रवींद्र आघाव, जितेंद्र शिरसाठ, उमेश महाले, संदीप पाटोळे, मुकेश खरात, गणेश चौधरी, प्रमोद चौधरी आदींसह महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात ‘अण्णां’ना ‘भाऊं’चा धक्का!

$
0
0

महापालिकेत भाजपला ५० तर लोकसंग्रामला एकच जागा; एमआयएमचे चार विजयी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सोमवारी (दि. १०) सकाळी मतमोजणी करीत निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारत तब्बल ५० जागा मिळविल्या. महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवित मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार अनिल गोटे यांना ‘भाऊं’चा धक्का दिला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीला १४ जागांवर यश मिळाले तर आमदार गोटे यांच्या स्वाभिमानी भाजप लोकसंग्रामला केवळ एकच मिळविता आली.

राज्याचे लक्ष या महापालिकेच्या निकाल लागले होते. सोमवारी दुपारी पूर्ण निकाल मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत आणि निवडणुकीआधी अनेक आरोप-प्रत्यारोपाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. यामध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना प्रभारीपद दिल्याने भाजपमध्ये आमदार गोटे यांच्या रुपाने बंड झाले होते. पालिकेची प्रभाग १२ मधील एक जागा अगोदरच बिनविरोध झाली होती. त्यामुळे ७३ जागांसाठी ही मतमोजणी करण्यात आली.

बंडखोरी, गुंडगिरीचीच चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक आजी नगरसेवकांना भाजपने प्रवेश दिल्यानेही आमदार गोटे नाराज होते. मात्र, सोमवारी जाहीर निकालात धुळेकरांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर विश्वास दाखवत महापालिकेची सत्ता ताब्यात दिली आहे. यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी गेल्या चार महिन्यांपासून मनपात भाजपची सत्ता यावी यासाठी कंबर कसली होती. तर दुसरीकडे भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी ‘गुंडगिरीमुक्त धुळे’ या मुद्द्यावर निवडणूक रिंगणात उतरून भाजपविरोधातच दंड थोपटले होते. आमदार गोटे यांनी लोकसंग्राम पक्षाकडून ५९ उमेदवार उभे केले होते. यापैकी त्यांच्या पत्नी हेमा गोटे या वगळता उर्वरित सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारात बंडखोरी, उमदेवारांची गुंडगिरी प्रतिमा यांचीच चर्चाच जास्त रंगली.

‘आघाडी’ची पंधरा वर्षांची सद्दी संपवली
या निकानाने आता राष्ट्रवादीच्या हातात सलग पंधरा वर्षे महापालिकेची सत्ता अखेर भाजपाच्या हातात गेली आहे. त्यामुळे आघाडीची पंधरा वर्षांची सद्दी संपवित राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. अनेक दिग्गज विद्यमान नगरसेवकांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला खिंडार पडले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीला ४५ पैकी फक्त ८ जागांवर विजय मिळविता आला. त्यामध्ये विद्यमान महापौर कल्पना महाले यांचादेखील समावेश आहे. तर काँग्रेसकडून २२ जागांवर उमेदवार दिले असताना केवळ ६ उमेदवार निवडून आले. मात्र, काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करणकाळ यांचे पुत्र प्रीतम करणकाळ मोठ्या मतांनी पराभूत झाले आहेत. या पराभवाने राष्ट्रवादीसह काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज निर्माण झाली आहे.

शिवसेनेला अपयश
शिवसेनेकडून ७४ जागांपैकी ४५ उमेदवार रिंगणात असताना सर्वात मोठा धक्का शिवसेनेला बसला असून, फक्त १ जागा निवडून येणे म्हणजे शिवसेना कोमात असल्याचे चित्र आहे. वास्तविक माजी आमदार शरद पाटील, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख संजय गुजराथी यांच्यासह दिग्गज पदाधिकारी व नेते प्रचारात सक्रिय होते. तसेच निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवस धुळ्यात मुक्काम करून सभा घेतल्या होत्या. तरीदेखील शिवसेनेचे मातब्बर उमेदवार संजय गुजराथी, महेश मिस्तरी, नरेंद्र परदेशी यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला हे अपयश येणे म्हणजे कोमात जाण्यासारखेच आहे.

एमआयएमचा चंचूप्रवेश
धुळे शहरात अनेक प्रभाग हे मुस्लिमबहूल आहेत. त्यांच्या मतांच्या जोरावरच एमआयएमने पहिल्यांदाच महापालिकेत तब्बल चार जागांवर विजय मिळवित पालिकेत चंचूप्रवेश केला आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी यांना त्या-त्या प्रभागात एक-दोन जागा मिळविण्यात यश मिळाले आहे.

महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात?
महापालिकेत एकहाती सत्ता आल्यानंतर आता महापौरपदासाठी कवायती सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपमध्ये आलेले चंद्रकांत सोनार, शीतल नवले यांच्यासह भाजपमधीलच प्रतिभा चौधरी, कल्याणी अंपळकर हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मात्र, भाजपचे वरिष्ठ पालिकेच्या महापौरपदासाठी निर्णय देताना सर्वाधिक मतांनी विजयी, प्रभागात पूर्ण पॅनल आणणारे हा निकष लावतात किंवा ऐनवेळी नवा चेहरा देतात, यासाठीच्या चर्चांना उधाण आले आहे.

भाजपकडून जळगावात जल्लोष
जळगाव : भाजपने धुळे महापालिकेसह शेंदूर्णी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. १०) जळगावातील जि्ल्हा भाजप कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच एकमेकांना पेढे भरविण्यात आले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली धुळे महापालिकेत भाजपने ५० जागांवर यश मिळवले. तसेच जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने १७ पैकी १३ जागांवर विजय मिळविला. शिवाय नगराध्यक्षपदी भाजपच्या महिला उमेदवाराने मोठ्या फरकाने प्रतिस्पर्धी महिला उमेदवाराचा पराभव केला. हे भाजपचे मोठे यश असल्याने भाजपच्या जळगावातील कार्यकत्यांनी पक्षाच्या बळीराम पेठेतील 'वसंतस्मृती' कार्यालयात एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, महापालिका स्थायी समितीचे सभापती जितेंद्र मराठे, महापालिका गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राज्यातील ऐंशी टक्के महापालिका भाजपच्या ताब्यात आहेत. आता धुळेकरांनीदेखील विश्वास दाखविला असून, नाशिक, जळगावप्रमाणे शहराचा विकास करण्यात येईल. आमदार अनिल गोटे यांनी भाजपवर अनेक आरोप केले. मात्र, लोकसंग्राम पक्षाकडे आम्ही लक्ष दिले नाही. गोटेंचे नेतृत्व स्वीकारले असते तर भाजपच्या हातात सत्ताच आलीच नसती. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी योग्य निर्णय घेतल्यानेच भाजपला मनपामध्ये बहुमत मिळाले आहे.
- गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

हा धनशक्तीचा विजय असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझा विश्वासघात केला आहे. मी आता कोणतीही भूमिका घेणार नसून, ते सर्व त्यांच्यावर सोपविले आहे. भाजपवाल्यांनी गुंडांना पक्षात प्रवेश दिल्याने गुंडगिरी वाढल्याशिवाय राहणार नाही. सर्व काही मॅनेज करीत भाजपचा विजय शक्य झाला. पण, आता काय विकास करतात याकडे लक्ष ठेवून आहे.
- अनिल गोटे, आमदार, शहर

भाजपने पालिका निवडणुकीत धनशक्तीचा वापर केला असून, शासकीय यंत्रणेला हाताखाली ठेवून एकाप्रकारे गुंडगिरी केली आहे. आता नेमका विकास कसा करतात हा महत्त्वाचा प्रश्न राहील. तर आता शांततेच्या मार्गाने नाही, गुंडगिरीयुक्त शहर म्हणून अजून जास्त धुळ्याची ओळख असेल.
- राजवर्धन कमदबांडे, माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

भाजपने मनपात एकहाती विजय मिळवित इतिहास घडविला असून, जनतेने जो विश्वास दाखविला तो पूर्ण करू. कुठल्याही उमेदवार अथवा पदाधिकारी यांनी भांडण केले नाही अथवा वाद घातला नाही. मात्र, अनेक विरोधकांनी आमच्यावर आरोप केले. धुळेकरांना विकास हवा होता त्यामुळेच आमच्या हातात मनपाची सत्ता दिली. एका वर्षात धुळे शहराचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही.
- अनुप अग्रवाल, शहर जिल्हाध्यक्ष भाजप

हा विजय म्हणजे पैशांचे मोठं गणित असून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. यात काही प्रशासनालाही हाती घेतले होते. आता नुकत्याच ज्या मनपा भाजपच्या ताब्यात आहेत त्यात काय सुरू आहे, किती विकास होत आहे हे सर्वांना माहित आहे. मग, आता धुळे मनपात भाजपची सत्ता आल्याने त्यांच्याकडूनही विकासाच्या अपेक्षा करणे अपेक्षितच नाही.
- कुणाल पाटील, आमदार, धुळे ग्रामीण

निवडणुकीतील महत्त्वाची वैशिष्ट्ये...

.. निवडणूक जाहीर होण्याअगोदरच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्यात ‘पत्रकवॉर’
.. निवडणूक प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा होताच आमदार गोटेंचे बंडाचे निशाण
.. अचानक आमदारकीचा राजीनामा देण्याची आमदार गोटेंची भूमिका
.. भाजपचे आमदार अनिल गोटे यांचा ‘स्वाभिमानी भाजप लोकसंग्राम’ नावाखाली ‘एकला चलो रे’चा नारा
.. अनेक घडामोडींनंतर राज्याचे लक्ष लागलेली लक्षवेधी निवडणूक
.. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना प्रवेश दिल्याचा भाजपवर गोटेंकडून आरोप
.. आमदार गोटेंच्या हत्येची सुपारी देणाऱ्या संभाषणाची तथाकथित ‘ऑडिओ क्लिप’
.. भाजपविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र असे चित्र
.. मतदानाच्या दोन दिवसांआधी पैसे वाटण्याच्या संशयावरून गाडीची तोडफोड
.. आमदार गोटेंच्या कारवर दगडफेकीची घटना
.. निवडणुकीत १८९ पुरुष तर १६६ महिला उमेदवार
.. ३६ आजी तर १७ माजी नगरसेवकांकडून विविध पक्षांकडून नशिब आजमावले

धुळे महापालिका बलाबल २०१८

भाजप.........................५०
राष्ट्रवादी काँग्रेस.........०८
काँगेस........................०६
शिवसेना.....................०१
एमआयएम...................०४
समाजवादी पार्टी...........०२
लोकसंग्राम पक्ष.............०१
बसपा............................०१
अपक्ष............................०१
.......
एकूण.............................७४


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रलंबित मागण्यांविरोधात माथाडी कामगारांचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करणे व त्या समितीवर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात अनुभवी कामगार नेत्यांची सदस्य म्हणून नेमणूक करणे, पुनर्रचित माथाडी मंडळावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात मंडळ सदस्यांच्या नेमणूका करणे अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या नाशिक जिल्ह्यातील संघटना पदाधिकारी, माथाडी कामगार यांच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा नेण्यात आला.

माथाडी कामगारांच्या न्याय प्रश्नांची सोडवणूक व्हावी याबाबत राज्य सरकारकडून त्वरित निर्णय घेण्यात यावेत, अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली. सुरक्षारक्षक मंडळामार्फत सुरक्षारक्षकांच्या वेतनातून राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक व पतसंस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची कपात न करण्याबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभागाने २८ सप्टेंबर २०१८ रोजी काढलेल्या निर्णयास स्थगिती देणे, माथाडी मंडळात पूर्णवेळ चेअरमन, सेक्रेटरीची नेमणूक करावी, माथाडी कायद्याच्या सुवर्ण महोत्सवीकाळात माथाडी कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, या मागण्याही मोर्चामध्ये प्रकर्षाने मांडण्यात आल्या संघटनेचे नाशिक जिल्हा चिटणीस सुनील यादव, कृष्णराव जगदाळे आदींची उपस्थिती यावेळी होती.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरितक्षेत्राला तूर्त ‘रेड सिग्नल’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीतील हरित क्षेत्र विकास योजनेंअतर्गत नाशिक आणि मखमलाबाद शिवारात साकारण्यात येत असलेल्या नगर परियोजनेतील (टीपी स्कीम) अडचणी वाढत्याच आहेत. शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या सादरीकरणात शेतकऱ्यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करीत परियोजना जाहीर करण्याआधी शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच, परस्पर महासभेत प्रस्ताव सादर कसा सादर झाला याबाबत शेतकऱ्यांनी जाब विचारला. आम्हाला ७०-३० चार पॅटर्न हवा असे सांगत एफएसआय किती मिळेल, याचे उत्तर द्या अशी मागणी करीत कंपनीच्या अधिकाऱ्यांची कोंडी केली. हरित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याची कंपनीच्या अधिकाऱ्यांची मागणी धुडकावून लावत, बैठकीनंतर निर्णय घेऊ, असे सांगितल्याने निर्णयाविनाच बैठक संपली.

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने नाशिक शिवारातील हनुमानवाडी व मखमलाबाद शिवारातील ७५४ एकर क्षेत्रावर हरित क्षेत्र विकासाअंतर्गत टीपी स्कीम राबविली जात आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव शेतकऱ्यांच्या संमतीविनाच महासभेवर दाखल झाला आहे. शेतकऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर हा प्रस्ताव सध्या थांबला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांचा अहमदाबाद दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी होते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना अहमदाबाद टीपी स्कीमची माहिती देण्यासाठी कालिदास कलामंदिरात कंपनीच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ प्रकाश थविल व नगररचनाकार कांचन बोधले यांनी सादरीकरण केले. प्रथम जमिनीचे सर्वेक्षण, एकत्रित मोजणी नकाशा तयार करणे, भूधारकांशी संवाद, प्रारुप आराखडा तयार करून सरकारला सादर करण्याची प्रक्रिया त्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितली. शेतकऱ्यांना हरकती व सूचना करण्याची संधी दिली जाईल. टीपी स्कीममध्ये पुरविल्या जाणाऱ्या सुविधांचे सादरीकरण करण्यात आले. महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, माजी स्थायी समिती सभापती शरद कोशिरे यावेळी उपस्थित होते. परंतु, अन्य संचालकांनी मात्र या सादरीकरणाकडे पाठ फिरवली.

सादरीकरणानंतर शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. विशेषत: एफएसआय अहमदाबादप्रमाणे १.८ एफएसआय आणि ७०-३० जमीन वाटपाचा फॉर्म्युला हवा अशा मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी केल्या. त्यावर सर्वेक्षणानंतरच किती जागा द्यायची, याचा निर्णय होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रथम जागेचे सर्वेक्षण करू द्या, त्यानंतरच निर्णय घेता येईल, अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली. परंतु, नगर परियोजनेसाठी जागेचे क्षेत्रफळ निश्‍चित कसे केले. सात-बारा उताऱ्यावरून क्षेत्रफळ निश्‍चित करून ढोबळमानाने एफएसआय जाहीर करता येणार नाही का, अशा प्रश्नांचा भडिमार शेतकऱ्यांनी केल्याने अधिकाऱ्यांना उत्तरे देताना नाकीनऊ आले. या‌वेळी शरद कोशिरे यांनी सर्वेक्षणासंदर्भात शेतकऱ्यांसोबत दोन दिवसांत बैठक घेऊन सर्वेक्षण करू द्यायचे की नाही याबाबतचा निर्णय घेऊन कंपनीला कळविले जाईल, असे सांगितले. त्यामुळे कोणत्याही निर्णयाविनाच ही बैठक संपल्याने हरितक्षेत्राच्या अडचणीत संपत नसल्याचे चित्र आहे.

जमिनी विकून 'स्मार्ट सिटी' नको

यावेळी काही शेतकऱ्यांनी आम्हाला अजून जमीन द्यायचीच नाही, आमच्या जमिनी विकून आम्हाला स्मार्ट सिटी नको. ५० वर्षे शेती करायची आहे, असे मुद्दे उपस्थित केले. आमच्या घरात नोकरी करणारा कोणी नाही, जमिनी गेल्यावर आम्ही कुठे जायचे? शेती हेच आमचे जीवन आहे. आम्हाला उत्तम शेती करायची आहे. त्यामुळे आम्हाला स्मार्ट सिटी नको अशी भूमिका मांडल्याने अधिकाऱ्यांचीही बोलती बंद झाली. त्यावर विकास ही निरंतर प्रक्रिया असल्याचे सांगण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केल्यावर हा विकासच नको, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतली.

शेतकऱ्यांचे प्रश्न...

- परवानगी न घेताच महासभेवर प्रस्ताव कसा?

-अहमदाबादचा ६०-४० पॅटर्न नाशिकमध्ये का नाही?

- नाशिकमध्ये जमीन वाटपाचा ७०-३० पॅटर्न हवा.

- नगर परियोजनेत शहरातील २६ गावांचा समावेश का नाही?

- सरकार बदलल्यास राजकीय सुडापोटी योजना रखडली तर?

- बळजबरीने जमिनी ताब्यात घेणार का?

- गुंठेवारीतील जमिनी कशा ताब्यात घेणार?

- न्यायालयात प्रलंबित १७५ दावे कसे निकाली काढणार?

-अहमदाबादची जमीन पडीक, आमची बागायती जमीन का द्यायची?

- अहदाबादमध्ये १.८ एफएसआय आहे, आपल्याकडे किती देणार?

- सर्वेक्षण न करताच आम्हाला मोबदला कसा मिळेल?

- विकास आराखड्यातील आरक्षणांचे काय करणार?

कंपनी अधिकाऱ्यांची उत्तरे...

-नियमानुसार इंटेन्शन डिक्लेरेशनसाठी महासभेवर प्रस्ताव

- राज्याच्या टीपी स्कीम कायद्यात ५०-५० ची तरतूद

-नियमानुसार जास्त मोबदला देता येत नाही

-नाशिकची टीपी स्कीम मॉडेल असेल, टप्प्या टप्प्याने विस्तार करू

- ही योजना स्वावलंबी आहे. त्यामुळे योजना बंद होणार नाही

- शेतकऱ्यांच्या संमतीनेच जमिनी ताब्यात घेऊ

-त्यांना पर्यायी जागा किंवा जमिनी देऊ

- न्यायालयाला निकाल लवकर देण्यासाठी विनंती अर्ज करू

- शेतकऱ्यांना जमिनींचा योग्य मोबदला मिळेल

- विकास आराखड्यात १.१ एफएसआय आहे, जमिनींच्या मोजणीनंतरच समजेल.

-जागेच्या सर्वेक्षणानंतरच अंतिम मोबदल्याबाबत सांगता येईल.

- शासनाकडून योग्य मार्गदर्शन घेऊन निर्णय घेणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण ७ लाखांवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गोवर रूबेला लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील ७ लाख १० हजार ९०२ मुला-मुलींना गोवर रूबेला या लसीचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्याचे ३६.४९ टक्के काम झाले असून, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ५ लक्ष ४०७ मुला-मुलींना लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली.

जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय यांचेमार्फत ६६ हजार ६७२ मुला-मुलींना लस देण्यात आली असून, नाशिक महापालिका अंतर्गत १ लक्ष १४ हजार ८६४ मुलामुलींना लस देण्यात आली आहे. मालेगाव महापालिका अंतर्गत २८ हजार ९५९ मुला-मुलींना लस देण्यात आली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नियोजनानुसार काम सुरू असून, मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. डेकाटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एड्स जनजागृतीसाठी अॅप

$
0
0

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे पुढाकार

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या वतीने एड्स विषयी जनजागृती अंतर्गत 'समाधान एसएमएसीएस' हे अॅप सुरू करण्यात आले. एड्सविषयी सर्व माहिती व एआरटी केंद्रांची माहिती या अॅपमध्ये देण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने समाधान एसएमएसीएस अॅप तयार केले आहे. यात शहरातील सर्व एचआयव्ही तपासणी केंद्रांची माहिती व पत्ते तसेच मोफत समुपदेशन केंद्रांचीही माहिती देण्यात आली आहे. एड्सविषयी जनजागृतीसाठी पहिल्यांदाच अॅपद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे. व्हिडिओ डॉक्युमेंटरीद्वारे तपासणी व संबंधित सर्व शंकांचे निरसन शक्य झाले आहे. सुरक्षित शारीरिक संबंध ठेवण्याविषयी सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अॅपमध्ये रिस्क कॅलक्युलेटरची सुविधा उपलब्ध असल्याने या माध्यमातून सर्व शंकांचे निरसन केले जाणार आहे. समाजात एड्सविषयी विविध संभ्रम आहेत. त्यावर योग्य समुपदेश करून अॅपद्वारे जनजागृतीसाठी मदत होणारा आहे. अॅपमध्ये इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांमध्ये माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या भाषेत योग्य माहिती मिळणे शक्य झाले आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांनी एड्सविषयी जागृतीसाठी अॅपद्वारे पुढाकार घेतला आहे. सरकारतर्फे निरनिराळ्या योजना राबविण्यात येत असल्याने आता मोबाइल अॅपची नाविन्यपूर्ण सुरुवात फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ डॉक्युमेंटरी आणि त्यातील समाविष्ट सर्व निकष प्रबोधनासाठी पूरक ठरणार आहेत.

..

\B शुभवार्ता \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक प्रचाराला वेग

$
0
0

नऊ जागांसाठी गुरुवारी मतदान

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड वकिल संघाची २०१८ ते २०२१ या कालावधीसाठी गुरुवारी, २० डिसेंबरला निवडणूक होत आहे. एकूण ११ जागा असून यातील दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने नऊ जागांसाठी लढत होत आहे. प्रचाराला वेग आला असून उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे.

नाशिकरोड कोर्टाच्या स्थापनेपासून नाशिकरोड वकिल संघ कार्यरत आहे. नाशिकरोड हे या संघाचे कार्यक्षेत्र आहे. मागील निवडणूक नऊ वर्षांपूर्वी झाली होती. तेव्हा अॅड. सुदाम गायकवाड अध्यक्ष होते. विद्यमान गायकवाड यांच्या विकास पॅनेलने प्रचारात आघाडी घेतली असून पॅनेलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.

एकूण २८८ मतदार असलेल्या या संघाच्या नव्या कार्यकारिणीसाठी गुरुवारी (दि. २०) सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत मतदान होऊन त्यानंतर लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, उपसचिव, खजिनदार, ग्रंथपाल प्रमुख आणि सदस्य अशा नऊ जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी जनसंपर्क अधिकारी आणि महिल सदस्य या पदांसाठी अनुक्रमे मंगेश खालकर आणि मनीषा बेदरकर हे दोघे बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. व्ही. मुंडे, विष्णू मानकर, अशोक कुलकर्णी, दीपक बर्वे आदी काम पाहत आहेत.

अंतिम उमेदवार यादी

अध्यक्षपद : सुदाम गायकवाड, सोमनाथ गायकवाड

उपाध्यक्षपद : अशोक कटारे, प्रकाश गायकर, अजयसिंह बायस

सचिव : सुनील शितोळे, बबन मुठाळ

उपसचिव : सोमनाथ बोराडे, भीमाजी आरणे

खजिनदार : संग्राम पुंडे, सुनील हांडोरे

ग्रंथपाल : रेखा धुळधुळे, दमयंती दोंदे

सदस्य : प्रमोद कासार, महेश गायधनी, उमेश साठे, नीलेश सानप

..

निवडणूक रंग : नाशिकरोड वकिल संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images