Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भाजपचा विकासनामा जाहीर

$
0
0

मंत्री महाजनांकडून अनेक आश्वासने

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महानगरपालिकेची सत्ता भाजपाच्याच ताब्यात येणार असून, फिप्टी प्लसने उमेदवार निवडून येतील. सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम दररोज नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (दि. ५) महापालिका निवडणूकीचा भाजपचा विकासनामा जाहीर केला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, डॉ. माधुरी बाफना, विनोद मोराणकर आदी उपस्थित होते. या वेळी मंत्री महाजन म्हणाले की, शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून, भाजपच्या हातात मनपाची सत्ता दिल्यास सुरुवातील पाणीप्रश्न निकाली काढण्यात येईल. त्यानंतर नाशिक, जळगाव, औरंगाबादच्या बरोबरीने शहराचा विकास करण्याचा प्रयत्न राहील. शहरात गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस, काँगेसच्या हातात महापालिकेची सत्ता होती. मात्र, शहरात कोणताही बदल झालेला दिसत नाही. शहराचा विकास मागे पडला असून, तो आता भाजप पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. नाशिक व जळगावच्या लोकांनी आमच्यावर विश्वास दाखविला तो विश्वास धुळेकरही दाखवतील. मात्र एकदा महापालिकेत भाजपाला संधी द्यावी लागेल आणि शहराचा कायापालट त्याशिवाय होणार नाही, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

जळगावकर धुळ्यात दाखल
महापालिका निवडणुकीला आता फक्त दोन दिवस शिल्लक असताना जळगावातील काही दिग्गज लोकप्रतिनधी आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर शहरात ‘MH 19’ पार्सिंगच्या चारचाकी बुधवार सायंकाळपासून मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. यामुळे आता मंत्री महाजन यांच्यावर भाजपने महापालिका निवडणुकीसाठी टाकलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी जळगावहून फौजफाटा हळूहळू दाखल होत असून, ते नेमकी कोणती जादू सत्ता काबीज करण्यासाठी वापरतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांची आज सभा
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज (दि. ६) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळ्यात येत असून महापालिका निवडणूकीत भाजपकडून रिंगणात असलेल्या ६२ उमेदवारांची शहरातील पांझरा नदीकिनारी महाकाली मंदिराजवळ प्रचार सभा होणार आहे. यात मुख्यमंत्री फडणवीस नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच याचवेळेत सायंकाळी ७ वाजता आमदार अनिल गोटे यांचीही शिवतीर्थ चौक येथे सभा होणार आहे. यामुळे भाजपचे मुख्यमंत्री व भाजपचे शहरातील आमदार गोटे यांच्या पक्षवादामुळे एकाच वेळी दोन जणांच्या सभा होणार आहेत. भाजपविरुध्द स्वाभिमानी भाजपा लोकसंग्राम यांच्यातील प्रचाराची अखेरचा सामना आज होणार आहे. यातून मतदार नेमके कोणाच्या हाती सत्ता देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार हजारांवर जणांना व्हायरल फिव्हर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात एकीकडे डेंग्यू व स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी तापसदृश्य आजाराच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. सोबतच चिकनगुणिया सदृश आजाराच्या रुग्णांचीही संख्या वाढली आहे. तापसदृश आजाराचे नोव्हेंबरमध्ये तब्बल तीन हजार ८५४ रुग्ण पालिकेच्या दप्तरी नोंद झाले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्यामुळे नाशिककरांचे आरोग्य अद्याप बिघडलेलेच असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

तीन महिन्यांपासून शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यू व व्हायरल फिवरने थैमान घातले होते. परंतु, वातावरणात बदल होऊन अचाकन थंडी वाढल्याने शहरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या घटली आहे. नोव्हेंबरमध्ये स्वाइन फ्लूचे अवघे चार रुग्ण आढळून आले आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये मात्र डेंग्यूबाधितांची संख्या ९२ पर्यंत सीमित राहिली आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूपाठोपाठ डेंग्यूचाही जोर ओसरल्याचा दावा आरोग्य-वैद्यकीय विभागातर्फे केला जात आहे. नोव्हेंबर महिन्यात काविळीचे सहा, स्वाइन फ्लूचे तीन, तर अतिसाराचे १८७ रुग्ण आढळले. या आजारांचा प्रादूर्भाव कमी झाल्याचे दिसत असले तरी तापसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या मात्र धडकी भरवणारी आहे. नोव्हेंबरमध्ये तब्बल ३८५४ जणांना तापसदृश आजार झाल्याचे महापालिकेच्या रुग्णालयांतील रुग्णसंख्येवरून समोर आले आहे. या रुग्णांमध्ये चिकुनगुनियासदृश आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. विशेषत वडाळागाव, जेलरोड, पंचवटीतील फुलेनगर, सातपूर, नवीन नाशिक या भागात या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे वैद्यकीय विभागाने या भागांमध्ये तपासणी मोहीम सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींचा एल्गार!

$
0
0

धनगर विरोधासाठी नाशिकमध्ये काढणार उत्तर महाराष्ट्राचा मोर्चा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) धनगर समाजाचा समावेश करण्याची मागणीविरोधात तसेच आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार एकवटले असून थेट सरकारचे निर्णय आणि होणाऱ्या अन्यायाविरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. धनगर समाजाला आदिवासींच्या सात टक्के आरक्षणात समाविष्ट करू नये, यासाठी आदिवासी समाजातर्फे नाशिकमध्ये राज्यस्तरीय मोर्चा काढला जाणार आहे.

राज्यातील आदिवासींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहावर उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली. बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ, आमदार वैभव पिचड यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. भारती पवार, भास्कर गावित, अशोक टोंगारे, हिरामण खोसकर, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक देवीदास पाटील, अनुसूचित जमाती केंद्रीय समितीचे माजी सदस्य सुनील भुसारे, प्रदीप वाघ, राजेंद्र वागळे, राम चौरे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर खासदार चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर धनगर समाजाचे ठिकठिकाणी मोर्चे-मेळावे काढले जात आहे. त्यामुळे धनगर समाजाचा आदिवासींच्या आरक्षणात समावेश होतो की काय अशी भीती आदिवासी समाजाला वाटत आहे. त्यामुळेच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतल्याचे खासदार चव्हाण यांनी यावेळी सांगितले. प्रत्येकाला त्याच्या मागण्यांचा अधिकार आहे. परंतु, आदिवासींना कायद्याने सात टक्के आरक्षण मिळाले आहे. यात कोणत्याही समाजाचा समावेश करू नये, सर्वोच्च न्यायालयाने बोगस आदिवासींवर कारवाई करून त्यांच्या जागेवर मूळ आदिवासींच्या नियुक्तीचे आदेश दिले आहे. त्यानुसार कारवाईच्या मागणीसाठी आदिवासी एकत्रित येत असून, नाशिकमध्ये आदिवासींच्या मागण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या दोन-दिवसात या मोर्चाची तारीख निश्चित होईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे सांगत आमदार वैभव पिचड यांनी गेल्या साडेचार वर्षांत आदिवासी आमदारांच्या समितीची बैठक झालेली नसल्याचे सांगितले. धनगर समाजालाही त्यांच्या मागण्यांप्रमाणे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे आदिवासींवर अन्याय केला जात आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांचा प्रश्न आणि अन्य प्रश्नांवरही शासन व प्रशासनाची उदासिनता दिसून येत असल्याने समाजाने एकत्रित येण्याचा निर्धार केला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

धनगर समाज व आदिवासींमध्ये धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रचंड तफावत आहे. त्यामुळे मूळ आदिवासींमध्ये इतर कोणत्याही समाजाचा समावेश करण्यास आदिवासींचा विरोध असल्याचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. आदिवासींचे सर्वेक्षण रद्द करणे, आदिवासी वसतिगृहांमधील डीबीटी योजना रद्द करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे शासकीय सेवेतील बोगस आदिवासींवर कारवाई करून त्यांच्या जागेवर मूळ आदिवासींना नोकरी देण्याच्या मागणीसाठी संघर्ष करण्याचा निर्णय बैठकीत झाला.

बैठकीचा बार फुसका

आदिवासींच्या हक्कप्रश्नी बोलावलेली बैठक राज्यस्तरीय असून त्यात राज्यभरातील आदिवासी आमदार व खासदार येणार असल्याचा दावा चव्हाण यांनी केला होता. मात्र, चव्हाण यांचा दावा फुसका निघाला. बैठकीला जिल्ह्यातील चारपैकी एकच आदिवासी आमदार हजर होता. बैठकीकडे आमदारांनीच पाठ फिरवल्याचे दिसून आले.

स्वपक्षावरच दबावाचा प्रयत्न

भाजपकडून २०१९ मध्ये चव्हाण यांना उमेदवारी धोक्यात असल्याची चचा आहे. त्यामुळे चव्हाण आदिवासींचे नेते होऊन स्वपक्षावरच दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा भाजपसह अन्य पक्षांमध्ये सुरू आहे. त्यामुळे चव्हाण यांना अचानक साडेचार वर्षात आदिवासींची आठवण कशी आली, असा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार लगावत आहेत. त्यामुळे चव्हाणांचे नियोजित शक्तीप्रदर्शन अपयशी ठरल्याची चर्चा असून आता मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेतवननगरला दुचाकी चोर अटकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

उपनगर पोलिसांनी दुचाकी चोरास अटक करून त्याच्याकडून चोरीची अॅक्टिव्हा ही दुचाकी जप्त केली आहे. कैलास कृष्णा आहिरे (१९, रा. जेतवननगर, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे.

वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांना या चोराबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रदीप ठाकूर यांना कळविले. त्यानंतर उपनिरीक्षक सतीश जगदाळे, महेंद्र जाधव, अमोल टिळेकर, धोंगडे आदींनी नेहरूनगरसमोरील जेतवननगर येथे कारवाई केली. तेथे एक संशयित चोरीची गाडी घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली. कैलासने अॅक्टिव्हा गाडी (एमएच १५ एफडी ३११६) चोरल्याचे कबूल केले. आहिरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास काकड, डावले हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्रीपणाची व्यथा मांडणारे ‘डोंगरार्त’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रुदालीचे आयुष्य हे एक विस्तीर्ण पट असतो. राजस्थानात काही ठिकाणी आजही ही प्रथा सुरू आहे. माणूस मेल्यावर भाड्याने रडण्यासाठी रुदालीला बोलावले जाते. ती उर बडवून बडवून रडते, जणू काही तिच्याच कुणा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या रुदालीचे आयुष्य कसे असते, याची कहाणी म्हणजे डोंगरार्त नाटक होय.

राज्य नाट्य स्पर्धेत गुरुवारी झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे 'डोंगरार्त' हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकाच्या सादरीकरणाबरोबरच राज्य नाट्य स्पर्धेचा समारोपही झाला. प. सा. नाट्यगृहात हा स्पर्धा सुरू होत्या.

रुदालीचे आयुष्य जगणाऱ्या चार बायकांची ही कथा आहे. मा, जलपा, सावित्री, मोरणी या चौघी एकाच घरात राहून स्वतंत्र आयुष्य जगत आहेत. एकमेकींशी केवळ बाईपणाच्या धाग्यात बांधल्या गेलेल्या या बायका आहेत. या घरातील तरुण मोरणीला या तिघींपैकी तिची आई कोण हे माहीत नसते. लग्नाचे फेरे संपण्याच्या आत विधवा झालेल्या मोरणीला घेऊन सावित्री घरी येते आणि या बायकांच्या नात्यात सुरुंगाचे स्फोट व्हायला सुरुवात होते. घरातील कर्त्या स्त्रीचे स्थान असलेल्या जलपाच्या अस्तित्त्वालाच आव्हान देऊ बघणाऱ्या मोरणीला सांभाळत असताना पूर्ण घराला बाईपणाची उब देणाऱ्या सावित्रीची दमछाक होत आहे. परिस्थितीच्या तडाख्यामुळे मौन झालेली मा, मोरणीची शिक्षणाची आस, जलपाच्या राठ वागण्यात दडलेली स्त्री या सगळ्यांना सांभाळत भूतकाळातील घटनांना उरात दाबत जगणारी सावित्री या कुटुंबातील खऱ्या अर्थाने वर्तमानात जगणारी स्त्री आहे. या सगळ्यांनाच ज्याच्या त्याचा डोंगर पार करून सुखाचा शोध घ्यायचा आहे. पण प्रत्येकीचा रस्ता वेगळा आहे. अशा आशयाचे नाटकाचे कथानक होते.

नाटकाची संकल्पना पल्लवी-अपर्णा यांची होती. लेखन अपर्णा क्षेमकल्याणी, दिग्दर्शन पल्लवी पटवर्धन, संगीत शुभम जोशी, संगीत संचलन अमोल काबरा, नेपथ्य श्याम लोंढे, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, वेशभूषा स्नेहल एकबोटे, रंगभूषा माणिक कानडे, रंगमंच सहाय्य विनय कुलकर्णी, संतोष इटनारे, मीनल भालेराव, नृत्य सादरीकरण सुप्रिया देवघरे, मुग्धा काळकर, नृत्य दिग्दर्शन सचिन शिंदे यांचे होते. या नाटकात हेमा जोशी, योगेश वाघ, प्राज्ञी मोराणकर, रेखा केतकर, नीलेश जोशी यांच्यासह कलाकारांनी भूमिका केल्या.

\Bराज्य नाट्य स्पर्धा \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमामध्ये आज ‘जीएसटी आउटरिच’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे (निमा) शुक्रवारी (दि. ७) दुपारी ४ वाजता 'जीएसटी आउटरिच प्रोग्रॅम'चे आयोजन करण्यात आले आहे. सातपूर येथील निमा सेमिनार हॉल येथे हा कार्यक्रम होईल. यात जीएसटी विभागाचे अधिकारी उद्योजकांशी संवाद साधणार आहे.

जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, उपायुक्त यांची उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमातून उद्योजकांना जुना व्हॅट कायदा, व्हॅट स्पेसिफिक जे १ आणि जे २ मॅटर्स, व्हॅटडिपॉसिट्स रिफंड्स तसेच जीएसटी संबंधातील अडचणी असल्यास त्या अगोदर कळवल्यास परिणामकारक रितीने त्या सोडवण्यास मदत होईल, असेही निमातर्फे सांगण्यात आले.

उद्योजक, व्यावसायिक व व्यापाऱ्यांना आपल्या अडचणी, सूचना जीएसटी अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. जीएसटी अधिकारी उद्योगांकडून असलेल्या अपेक्षा मांडतील. उद्योजक, व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहून जीएसटी संदर्भातील आपल्या अडचणी, प्रश्न व शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष नितीन वागस्कर व शशिकांत जाधव, मानद सचिव किरण पाटील वसुधाकर देशमुख, खजिनदार कैलास आहेर, निमा कर व वित्त समितीचे अध्यक्ष उल्हास बोरसे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदविवेक बुद्धी ही जीवनाचा सारथी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माणूस हा बुद्धीने कमी तर भावनांनी जास्त काम करतो. कोणतेही काम करीत असताना सदविवेक बुद्धी जागृत असेल तर माणसाकडून चांगले कर्म होते. बुद्धी ठिकाणावर ठेवून काम केले तर माणसाची प्रगतीकडे वाटचाल होते, ती जर जागेवर नसेल तर आपोआप अधोगतीकडे वाटचाल होते. त्यामुळे बुद्धी ही जीवनाची सारथी असल्याचे प्रतिपादन श्रृतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले.

शंकराचार्य न्यास व शिवशक्ती ज्ञानपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. गंगापूररोडवरील शंकराचार्य न्यास संकुलात ही व्याख्यानमाला सुरू आहे. 'मृत्यू आणि पुनर्जन्माचे रहस्य' हा व्याख्यानमालेचा विषय असून ९ डिसेंबरपर्यंत ही व्याख्यानमाला सुरू रहाणार आहे. गुरुवारी व्याख्यानाचे चौथे पुष्प गुंफतांना स्वामीजी म्हणाले, की बुद्धी चांगली असेल तर तुमचे मन चांगले राहील आणि मन चांगले असेल तर इंद्रियांवर ताबा मिळवता येईल. तुम्ही इंद्रियांवर ताबा मिळवाल त्यावेळी हे जगण समृद्ध होईल, बुद्धी ही कुशल सारथी आहे. ती चांगली असेल तर तुम्ही निश्चित एक उच्च स्थानावर पोहचाल. प्रत्येकाची बुद्धी सारखी नसते; मात्र तिच्यावर संस्कार करणे आपल्या हातात असते. बुद्धीचा दुरुपयोग केला तर तुम्हाला क्षमा नाही. बुद्धी चांगली नसेल तर मानवाची वाटचाल अध:पतनाकडे होईल. माणूस कुकर्माकडे वळेल यालाच मृत्यू असे देखील म्हणता येईल. व्याख्यानमालेची सुरुवात न्यासाचे ट्रस्टी नरेंद्र जांभोटकर यांच्या हस्ते स्वामीजींच्या सत्काराने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ मोगल यांनी केले.

मनाला लगाम हवाच!

बुद्धीचा वापर कसे करतो यावर माणुष्याचे जीवन अवलंबून आहे. शरीर हा रथ तर इंद्रिय घोडे आहेत. त्याचे नियमन करण्यासाठी मनाचा लगाम पाहिजे. खाणे-पिणे याला जीवन म्हणत नाही. जंगली श्वापद सुद्धा आपल्या पिलावळांना जगवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यात विशेष काही नाही. काळाच्या ओघात हे घडत असते. मानवाला बुद्धी दिली आहे त्याचा वापर मानवाने चांगल्या पद्धतीने केला पाहिजे, असेही स्वामीजींनी सांगितले.

\Bलोगो : स्वामी स्वरुपानंद व्याख्यानमाला \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभारी आयुक्तांनी उडवला २१ कोटींचा ‘बार’!

$
0
0

लोगो- निष्पक्ष

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचा कारभार प्रभारींच्या हातात असतानाच, गंगापूर रोडवरील आकाशवाणी केंद्रानजीक असलेल्या सर्व्हे नं. ७०५ च्या वादग्रस्त २१ कोटींच्या मोबदल्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आक्षेप असताना, तसेच स्थायी समितीचा विरोध असतानाही भूसंपादनापोटी गुपचूपपणे २१ कोटी अदा करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या मोबदल्यासाठी नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकपदाचा कार्यभार उपअभियंत्याकडे सोपवून हा डाव साधण्यात आला आहे. प्रभारी आयुक्त व जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी शासकीय संकेत पायदळी तुडवत हा मोबदला अदा केल्याचा खुलासा लेखा विभागाने केला आहे. राधाकृष्णन बी. यांच्या कृतीवर सभागृहनेते दिनकर पाटील यांनी आक्षेप घेत, नवनियुक्त आयुक्तांकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सावरकरनगरमधील आकाशवाणी केंद्राजवळील सर्व्हे क्रमांक ७०५ या क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचे संपादन दोन वर्षांपासून वादग्रस्त ठरले असून, या रेडीरेकनर दरापेक्षा जास्त मोबदला दिल्याचा आरोप केला जात आहे. या जागेच्या भूसंपादनाकरिता ५६ कोटींचा मोबदला अदा करण्याचा प्रस्ताव २०१६ मध्ये स्थायी समितीने मंजूर केला होता. यापैकी काही रक्कम पहिल्या टप्प्यात जागामालकास अदा केल्यानंतर हा वादग्रस्त व्यवहार उघड झाला होता. त्यामुळे उर्वरित रकमेला खोडा बसला होता. मात्र, तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कार्यकाळात अचानक न्यायालयाचा दाखला देत, २१ कोटींचा मोबदला एका हस्तकामार्फत देण्याची फाइल फिरली होती. मात्र, यावर आक्षेप आल्यानंतर हा मोबदला थांबला होता. त्यानंतर स्थायी समितीच्या १२ सदस्यांनी रीतसर पत्र देऊन या जागामालकाला रोखीने मोबदला देण्याऐवजी टीडीआर देण्याची मागणी केली होती. नगरसचिवांना तसे पत्रही देण्यात येऊन स्थायी समिती सभापतींनीही टीडीआर देण्याचे आदेश दिले होते. मुंढेंच्या बदलीच्या दिवशीही हा मोबदला देण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, दिनकर पाटील यांनी हा प्रयत्न हाणून पाडला होता. मुंढेंच्या बदलीनंतर प्रभारीपदावर असलेले राधाकृष्णन यांच्या काळात मात्र संशयास्पद घडामोडी होऊन हा रोखीने मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त गमे रुजू होण्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी अचानक २१ कोटींचा मोबदला रोखीने अदा करण्याचा निर्णय प्रशासन स्तरावर घेतला गेला. या संदर्भातील संचिकेवर प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकाऱ्यांनी राधाकृष्णन स्वाक्षरी केल्यानंतर लेखा विभागातर्फे २१ कोटींचा धनादेशही तत्काळ अदा केला गेला. त्यामुळे पालिकेतील 'कृष्णनलीला' चर्चेचा विषय बनल्या आहेत.

अधिकाऱ्यांवरही संशय

नगररचना विभागातील सहाय्यक संचालक व कार्यकारी अभियंता रजेवर असताना उपअभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सहाय्यक संचालक नगररचनापदाचा अतिरिक्त कार्यभार देऊन हा सारा डाव साधण्यात आला. या प्रकरणात मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुहास शिंदे, उपअभियंता तथा प्रभारी सहाय्यक संचालक नगररचना संजय अग्रवाल यांच्यासह प्रभारी आयुक्तांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे फाइल मंजुरीसाठी दीड पानांची टिप्पणी लिहिली गेली आहे. गमे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या संदर्भातील कुणकुण सभागृहनेते पाटील यांना लागल्यानंतर हा सारा प्रकार उघड झाला.

गमेंनी मागविली फाइल

या सर्व प्रकाराची तक्रार सभागृहनेते दिनकर पाटील यांनी आयुक्त गमे यांच्याकडे केली. भूसंपादन प्रकरणात अदा केलेला धनादेश त्वरीत थांबविण्यात यावा, अशी मागणीदेखील पाटील यांनी केल्याने आयुक्त गमे यांनी दखल घेत या प्रकरणाची फाइल मागविली आहे. माहिती घेतल्यानंतर या प्रकरणात उचित निर्णय घेतला जाईल, असे गमे यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात रोखीने मोबदला अदा करण्यास स्थायीसह पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याने नगररचना सहाय्यक संचालकांनी सादर केलेली संचिका आपण पाच वेळा परत पाठविली होती. मात्र, प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी या भूसंपादनात रोखीने मोबदला अदा करणे किती गरजेचे आहे याविषयीची टिप्पणी संचिकेत नमूद केल्यानंतर रोखीने मोबदला अदा करण्यात आला आहे.

डॉ. सुहास शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मनपा

आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने या भूसंपादन प्रकरणात टीडीआरद्वारे मोबदला अदा करण्याची मागणी १२ सदस्यांनी केली होती. त्यानुसार सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी तसा निर्णयही दिला. मात्र, सभापतींनी नंतर प्रभारी आयुक्तांची भेट घेत या प्रकरणात रोखीने मोबदला अदा करण्याची गळ घातली. हा प्रकार सदस्यांचा आणि सभागृहाचा अवमान करणारा असल्याने सभापतींविरोधात मुख्यमंत्री, तसेच पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.

- दिनकर पाटील, सभागृहनेते, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्तांच्या निवासस्थानीस्वच्छता मोहीम

$
0
0

आयुक्तांच्या निवासस्थान

परिसरात स्वच्छता मोहीम

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे गंगापूररोडवरील नवश्या गणपती मंदिर परिसरात निवासस्थान आहे. आता तेथे त्यांचे वास्तव्य राहणार असल्याने गमे यांच्या निवासस्थान परिसरात महापालिकेच्या बांधकाम विभागाने जोरदार स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

आयुक्त गमे गंगापूररोडला राहण्यासाठी आलेच नसते तर स्वच्छता केली गेली नसती का, असा सवाल गंगापूररोडवासीयांनी केला. महापालिकेचा सर्व कर वेळेवर भरणाऱ्या गंगापूररोडवरील रहिवाशांच्या भागात नियमित स्वच्छता ठेवली जावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, महापालिकेच्या बांधकाम विभागाने रस्त्यांना पडलेले खड्डेही बुजविण्यात आले. एमआयडीसीची जुनी पडून असलेल्या जलवाहिनीला लागून वाढलेले स्वच्छता मोहिमेत काढण्यात आले. दिवसभर बांधकाम विभाग व आरोग्य विभागाचा लवाजमा स्वच्छता मोहिमेत लागला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेगा भरतीबाबत रविवारी कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात होणाऱ्या मेगा भरतीबाबत विद्यार्थ्यांना सर्वंकष माहिती व्हावी तसेच कोणत्या विभागात किती जागांची भरती होणार आहे, त्यासाठीची आवश्यक अर्हता, पदांची माहिती व अभ्यासक्रम या विषयांवर माहिती देण्यासाठी युनिव्हर्सल फाउंडेशनतर्फे रविवारी (दि. ९) कॅनडा कॉर्नर येथील फाउंडेशनच्या हॉलमध्ये सकाळी ११ वाजता मोफत मार्गदर्शन शिबिर होणार आहे. फाउंडेशनचे संचालक व प्रा. राम खैरनार व पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. राहुल शिंदे या मेगाभरती विषयावर मार्गदर्शन करणार आहे.

मेगा भरतीत आरोग्य खात्यातंर्गत १० हजार, गृह खात्यातील ७ हजार, ग्रामविकासमधील ११ हजार, कृषी विभागातील अडीच हजार, सार्वजनिक बांधकाम विभागातील ८ हजार, नगरविकासमध्ये दीड हजार, जलसंपदा अंतर्गत ८ हजार, जलसंधारण खात्यामध्ये दोन हजार पशुसंवर्धन विभागात एक हजार अशा तब्बल ७२ हजार पदांची भरती केली जाणार आहे. यातील काही पदांची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तर बहुतांश पदांची भरती जिल्हास्तरावर होणार आहे. तरी तरुणांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनचे संचालक प्रा. राम खैरनार व राहुल शिंदे यांनी केले आहे.

मराठा आरक्षणाचा मार्ग खुला झाल्यानंतर राज्य सरकारतर्फे अखेर रखडलेल्या मेगा भरतीची कार्यवाही सुरू झाली आहे. राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये तब्बल ७२ हजार पदांची भरती केली जाणार असून पुढील दोन महिन्यांत भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आराखडा शासनातर्फे तयार करण्यात आल्याने नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना राज्य सरकारने १९५४-५५ या शैक्षणिक वर्षापासून सुरू केली आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी सर्व शाळांनी शाळेमधील किमान ७० टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृषी परीक्षा देण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डी. जे. जगताप यांनी केले.

जिल्हा मुख्याध्यापक संघ व शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्यातर्फे गुरू गोबिंदसिंग इंजिनीअरिंग कॉलेज येथे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी मुख्याध्यापक आदींसाठी विभागीय कार्यशाळा झाली. यात नाशिक, जळगाव, धुळे व नंदूरबार येथील शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी मुख्याध्यापक संघाचे जिल्ह्याचे व तालुक्याचे पदाधिकारी अशी ३५० मुख्याध्यापकांची उपस्थिती होती.

अध्यक्ष जगताप म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासास प्रोत्साह देणाऱ्या एनएमएमएस, एनटीएस अशा अनेक परीक्षा आहेत. याशिवाय, नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठीही परीक्षा आहे. या परीक्षांतून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मार्फत पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा अनुक्रमे इयत्ता चौथी व इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात होती. केंद्र सरकारने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ पारित केला असून राज्यात या कायद्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१० पासून सुरू झालेली आहे. या कायद्यात इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण प्राथमिक शिक्षण म्हणून समावेशित करण्यात आले आहे.

कार्यशाळेचे प्रास्ताविक नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी केले. यावेळी परीक्षा परिषदेच्या सहआयुक्त स्मिता गौड, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, धुळे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, नंदूरबारचे शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, जळगावचे शिक्षणाधिकारी प्रवीण महाजन, औरंगाबादचे महाराष्ट्र राज्य आंग्ल भाषा संचालक सुभाष कांबळे उपशिक्षणाधिकारी, मनोज कोळी, अनिल शहारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सानेगुरूजी कथामाला स्पर्धांचा बक्षिस समारंभ

$
0
0

कथामाला बक्षिस समारंभ

नाशिक : बालभवन सानेगुरुजी कथामालेतर्फे प्रथम सत्रात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस समारंभ रविवारी (९ डिसेंबर) सकाळी ११ वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृह सावाना आवार, टिळक पथ, नाशिक या ठिकाणी होणार आहे. बक्षिसपात्र विद्यार्थ्यांनी व पालकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन बालभवन प्रमुख संजय करंजकर व सावाना कार्यकारी मंडळाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालोकअदालतीचे शनिवारी आयोजन

$
0
0

७० हजारांवर केसेसचा समावेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत राष्ट्रीय लोकअदालत होणार असून शनिवारी (दि. ८) नाशिकमध्ये होणाऱ्या लोकअदालतीत दाखल आणि दाखलपूर्व अशा तब्बल ७० हजार केसेस ठेवण्यात आल्या आहेत. पक्षकारांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्राधिकरणाचे सचिव एस. एम. बुक्के यांनी केले आहे.

दर तीन महिन्यांनी लोक अदालतीचे आयोजन केले जाते. मागील वर्षांपासून लोकअदालतीत लाखोंच्या संख्येने केसेस ठेवण्यात येत असून, तितक्याच मोठ्या संख्येने केसेसचा निपटाराही होत आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यासाठी प्रयत्नशील असतात. शनिवारच्या लोकअदालतीत जिल्ह्यातील विविध कोर्टांमध्ये दाखल असलेल्यापैकी सहा हजार ४०० प्रकरणे निपटारा होण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. यात तीन हजार २०० फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्स प्रकरणी दाखल असलेल्या ७५० केसेस, ८० बँकांचे दावे, ३८० मोटर अपघात, २४८ कौटुंबिक वादाची प्रकरणे, ७८० दिवाणी व इतर प्रकरणे ठेवण्यात आलेली आहेत. यापैकी सुमारे एक हजार ९०० प्रकरणे नाशिक कोर्टातील आहेत. यात ८२० फौजदारी, ३२० चेक बाऊन्सची प्रकरणे, २० बँकांचे दावे, २०० मोटर अपघात प्रकरणे, १८ कौटुंबिक वाद, २४५ दिवाणी प्रकरणे असून, त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. दाखलपूर्व ६० हजार प्रकरणे ठेवण्यात आली असून, त्यात नाशिकमधील २२ हजार प्रकरणांचा समावेश आहे.

लोकअदालतीमुळे पक्षकारांचा वेळ, पैसा वाचतो. तसेच होणारा मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रास देखील कमी होतो. त्यामुळे लोकअदालतीचा लाभ अधिकाधिक पक्षकारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे आणि सचिव एस. एम. बुक्के यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांजरपाडा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावा

$
0
0

अधिकाऱ्यांना आमदार भुजबळांची सूचना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मांजरपाडा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर येथील स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नावर आमदार छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. देवसाने येथील नागरिकांनी या मागणीसाठी काही वेळ रस्त्यांवर ठाण मांडून या पाहणी दौऱ्यात भुजबळांचा ताफा अडवला होता. त्यानंतर त्यांनी या प्रश्नासाठी मी पाठपुरावा करेल असे आश्वासन स्थानिक नागरिकांना दिले होते. त्यानंतर या बैठकीचे आयोजन करुन त्यांनी विविध मागण्या मांडल्या.

नाशिक येथील भुजबळ फॉर्म येथे झालेल्या बैठकीत आमदार नरहरी झिरवाळ, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिक्षक अभियंता अलका वाघ, प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गिरीश संघांनी, सहायक अभियंता विश्वास दराडे यांच्यासह स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मांजरपाडा योजनेतील प्रकल्पग्रस्त स्थानिक नागरिकांचे पाण्याचे आरक्षण, बंधारे, दळणवळणासाठी पूल व रस्त्यांची कामे तसेच येथील नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्थ भारत यात्रा १८ रोजी मालेगावात

$
0
0

सायकल रॅलीतून जनजागृती; 'एफडीए'तर्फे विविध कार्यक्रम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

योग्य आहार पद्धतीबाबत जनजागृती करण्यासाठी देशातील सहा वेगवेगळ्या ठिकाणाहून ६ ऑक्टोबरपासून निघालेली सायकल रॅली १८ डिसेंबर रोजी मालेगावमध्ये येणार आहे. त्यानिमित्त १९ डिसेंबर रोजी विविध जनजागृतीपर कार्यक्रम ठेवल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) विभागीय सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक विभागात ही यात्रा १० डिसेंबर रोजी अहमदनगर येथे येणार असून त्यानंतर नेवासा, मालेगाव, धुळे, शिरपूर या ठिकाणाहून ही यात्रा २४ डिसेंबर रोजी मध्य प्रदेशमध्ये जाणार आहे. अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाने 'ईट राईट इंडिया मूव्हमेंट' सुरू केली आहे. याच चळवळीचा भाग हा अखिल भारतीय सायकल रॅली आहे. या रॅलीचे स्वस्थ भारत यात्रा असे नामकरण करण्यात आले आहे. महात्मा गांधी यांनी १९३० मध्ये दांडीयात्रेच्या माध्यमातून मिठाचा सत्यागृह केला. ज्याची परिणीती देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळण्यात झाली. त्याच धर्तीवर ही यात्रा होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

देशात प्रत्येकाचा अन्नाशी संबध येतो. लठ्ठपणाबरोबर कुपाषणाचीही समस्या आहे. या दोन्ही बाबींमध्ये चुकीच्या खाद्य सवयी आहेत. याचा सार्वजनिक आरोग्यावर पर्यायाने देशाच्या विकासावर नकारात्मक परिणाम होतो. देशात बहुतांश आहार असंतुलित आहे. विविध आवश्यक जीवनसत्वे व खनिजे यांची आहारात मोठ्या प्रमाणात उणीव असते. याचे आरोग्यावर दूरगामी व अनिष्ट परिणाम होतात. त्यामुळे जनजागृतीसाठी यात्रा होत असल्याचे साळुंके यांनी सांगितले.

अशी आहे सायकल रॅली

देशातून विविध ठिकाणाहून निघालेली ही सायकल रॅली २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे पोहचणार आहे. तेथे मुख्य कार्यक्रम होणार आहे. रॅलीत २५ स्वयंसेवक एका दिवसात दोन किंवा तीन ठिकाणी थांबून ५० ते ६० किलोमीटर प्रवास करतात. त्यानंतर हे स्वयंसेवक प्रतिकात्मक रिले बॅटऑन पुढच्या बॅचला देतात.

टेस्टिंग गाडी

रॅलीत रस्त्यावरच्या थांब्याची ठिकाणी विविध माध्यमातून जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती केली जाते. या ठिकाणी भेसळीसंदर्भात सोप्या चाचण्या करून दाखविल्या जातात. शाळांमधून निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा याचे सुद्धा आयोजन केले जाते. या रॅलीत टेस्टिंग गाडी देखील असणार आहे.

मालेगावात पथनाट्य

मालेगावमध्ये रॅलीच्या वेळी पथनाट्य व विविध जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहेत. तसेच अन्न हेच औषध, आरोग्याची गुरुकिल्ली यावर निबंध व पोस्टर स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. याच पद्धतीची स्पर्धा नंतर जिल्हाभर घेतली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘झेडपी’च्या २४ कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली

$
0
0

टंकलेखन परीक्षा प्रमाणपत्र सादर न करणे पडले महागात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेतील २४ कनिष्ठ सहाय्यकांनी टंकलेखन (टायपिंग) परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमानुसार जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नियुक्त केलेल्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीत टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक होत. मात्र, या कर्मचाऱ्यांनी हे प्रमाणपत्र सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमानुसार या कर्मचाऱ्यांना इंग्रजी व मराठी भाषेतील ३० शब्दाहून कमी नाही, अशा टंकलेखनाच्या गतीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास कोणती कार्यवाही करावी याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश नाही. मात्र, १९९९ मधील सामान्य प्रशासन विभागाच्या राजपत्राच्या नियमावलीनुसार मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखून धरण्याची तरतूद आहे. या नियमाचा आधार घेत सामान्य प्रशासन विभागाने विविध विभागात कार्यरत २४ वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याची कार्यवाही केली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी यास मान्यता दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोपाळ गवारी यांचा एलआसीतर्फे सत्कार

$
0
0

गोपाळ गवारी यांचा एलआसीतर्फे सत्कार

नाशिक : जेष्ठ कवी डॉ. गोपाळ गवारी यांच्या वाळवण या कविता संग्रहाला गिरणा गौरव प्रतिष्ठानचा स्मिता पाटील शब्दपेरा काव्य पुरस्कार मिळाल्याबद्दल 'एलआयसी'तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एलआयसी नाशिक विभातील प्रशासकीय अधिकारी महेंद्र शिंगणे, पुरुषोत्तम गाडेकर आणि निलेश जाधव यांची उपस्थिती होती. डॉ गोपाळ गवारी यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहासाठी पाच कोटी मंजूर

$
0
0

आमदार फरांदे यांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहाच्या नुतनीकरणासाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या वसतिगृहाच्या नुतनीकरणाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच निविदा राबवून कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती आ. प्रा. फरांदे यांनी दिली आहे.

मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहाचे भूमिपूजन डॉ. आंबेडकरांच्या हस्ते झाले होते. त्यामुळे ही इमारत नाशिकमधील ऐतिहासिक धरोवर आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचाच वारसा पुढे चालवित अनेकांना स्फूर्ती देणारे हे स्मृतिस्थान सांभाळण्याचा प्रयत्न पी. के. गायकवाड, अध्यक्ष सुमनताई कर्डक, रमेश गायकवाड, अभय गायकवाड, सुधीर गायकवाड, सुमन गायकवाड, बेबीताई डेर्ले, संजय गायकवाड व गायकवाड परिवार यांच्याकडून १९५५ पासून केला जात आहे. विद्यार्थिनींची वाढती संख्या पाहता हे वसतिगृह अपुरे पडत आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या स्थळांचा विकास निधी अंतर्गत आपण या इमारतीसाठी निधी मागितला असल्याचे फरांदे यांनी सांगितले.

पाठपुराव्याला यश

समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी एकूण मंजूर ३१ कोटींपैकी या वसतिगृहाच्या नुतनीकरणासाठी ४ कोटी ९८ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार प्रा. फरांदे यांनी दिली आहे. २७ नोव्हेंबर रोजी या निधीला प्रशासकीय मान्यता दिली असून आता लवकरच निविदा काढून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. या कामाच्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड व डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची संधी प्राप्त झाल्याबद्दल सरकारचे आ. प्रा. फरांदे यांनी आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी शिष्यवृत्ती

$
0
0

शास्त्रीय संगीतासाठी शिष्यवृत्ती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 'सिटी-एनसीपीए'तर्फे भारतीय शास्त्रीय संगीताच्या उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी ख्याल, धृपद, तबला, पखवाज या विभागातील अर्ज मागविण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत प्रति महिना रुपये ७,५०० शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ncpascholarships@gmail.com या इमेल आयडी वर किंवा 'सिटीएनसीपीए' संगीत शिष्यवृत्ती, नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्टस्, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ या पत्त्यावर कुरियरद्वारे ३१ डिसेंबरपर्यंत पाठवावेत. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये आपले नाव, जन्मतारीख, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, शिक्षणासंबंधी माहिती, इमेल आयडी, संगीत शिक्षकांचे नाव, संगीत शिक्षणाचा एकूण कालावधी, पारितोषिके, पुरस्कार, इतर शिष्यवृत्ती, कार्यक्रमांच्या सादरीकरणांबद्दल माहिती हा तपशील लिहायचा आहे. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना इमेल किंवा दूरध्वनीद्वारे कळविण्यात येईल. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रत्यक्ष सादरीकरणासाठी एनसीपीए, मुंबई येथे यावे लागेल. एनसीपीए समितीचा निर्णय अंतिम असेल. अधिक माहितीसाठी ०२२ ६६२२३८७२/ ३७३७ येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महिला महाविद्यालयात कार्यक्रम

$
0
0

देशमुख कॉलेज

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. बिंदू रामराव देशमुख महिला महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. प्रास्तविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. स्मिता माळवे यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हिरे कॉलेजचे प्रा. डॉ. कुणाल वाघ उपस्थित होते. आभार प्रा. भास्कर नरवटे यांनी मानले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. डॉ. जीवन सोळंके, नॅक समन्वयक प्रा. प्रकाश वारकरी व इतर शिक्षकवृंद, विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images