Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नात्यांचा विणलेला गोफ ‘ऋतू आठवणींचे’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाते हे गुंफलेले असते, ते कितीही उलगडण्याचा प्रयत्न केला तरी शेवटपर्यंत त्याचे मर्म कळत नाही, अशा नात्यांच्या आठवणी 'ऋतू आठवणींचे' नाटकातून उजळवण्यात आल्या.

५८ व्या राज्य नाट्य स्पर्धेत मंगळवारी कलाकुंभ बहुद्देशीय संस्थेच्या (फिल्मी कट्टा) वतीने 'ऋतू आठवणींचे' हे नाटक सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या नाटकाचे लेखन पराग घोंगे यांनी तर दिग्दर्शन हेमंत गव्हाणे यांनी केले होते. पती-पत्नी, आई व प्रेयसी अशा चार पात्रांभोवती हे नाटक फिरते. प्रेयसीसाठी पती पत्नीला घटस्फोट देण्याची प्रक्रिया सुरू करतो. या दरम्यान हे चौघे जण एकमेकांना भेटत राहतात. या भेटीत त्यांना समोरची व्यक्ती तिच्या जागी कशी योग्य आहे, याची जाणीव होते. मात्र, तरी घटस्फोट होतो आणि आठवणींच्या कोलाजातून प्रत्येकाला घुसमट सहन करावी लागते, अशी नाटकाची कथा होती.

या नाटकात महेश खैरनार, निशिगंधा घाणेकर, गायत्री पवार, मयूरी विसपुते यांनी भूमिका साकारल्या. नेपथ्य राजेश भालेराव, संगीत वेदांत हातवळणे, प्रकाशयोजना रवी रहाणे, रंगभूषा ललित कुलकर्णी यांची होती. मनोज नागपुरे, राजा पाटेकर, अरुण गिते, रफीक सय्यद, राजेश जाधव, संध्या दुबे, ज्ञानेश्‍वर वाघ, अमोल थोरात यांनी निर्मिती सूत्रधाराची जबाबदारी सांभाळली.

आजचे नाटक

लोकहितवादी मंडळाचे 'कळसुत्री'

स्थळ : परशुराम साईखेडकर नाटगयृह

वेळ : सायंकाळी ७ वाजता

लोगो : राज्य नाट्य स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वयमच्या सृजनशीलतेचा गौरव

$
0
0

केंद्र सरकारचा पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डाउन सिंड्रोम आजारावर मात करीत नाशिकच्या स्वयंम पाटील या जलतरणपटूने राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली आाहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा सृजनशील बालकाचा पुरस्कार त्यास जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ३ डिसेंबर रोजी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

स्वयंमने डाउन सिंड्रोमवर मात करीत अनेक स्पर्धा जिंकल्या असून प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने समुद्रीय जलतरण स्पर्धेतही यश मिळवले आहे. मुंबई सागरातील संकरॉक ते गेटवे ऑफ इंडिया हे पाच किलोमीटरचे अंतर त्याने अवघ्या एक तासात पूर्ण केले. याबद्दल त्याची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. कर्नाटकमधील उडपी येथे ३० डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या स्पर्धेत १ किलोमीटर अंतर पोहून गेल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार झाला होता. तसेच ७ जानेवारी रोजी गुजरात येथील पोरबंदर येथील स्पर्धेत त्याने दोन किलोमीटर पोहून सागरी अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. सायकल स्पर्धेतही त्याने यश मिळविले आहे.

रोज चार तासांचा सराव

स्वयंम हा रोज चार तास स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावात सराव करतो. स्वयंमने आतापर्यंत कर्नाटक, गुजरात, गोवा, मालवण अशा राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत चुणूक दाखवली आहे. त्याने १० सुवर्ण, १ रौप्य व ८ कांस्य पदके मिळविली आहेत. थायलंड येथील पुकेत येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिन स्विमिंग प्रकारात त्याने ५० मीटर व १०० मीटर प्रकारात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सहभाग घेणारा स्वयंम हा सर्वात कमी वयाचा खेळाडू होता. स्वयमला सध्या स्पीच थेरपीद्वारे बोलावे लागते. कान, नाक, घसा आजारासाठी त्याच्यावर आतापर्यंत तीन शस्त्रक्रीया झाल्या आहेत.

…पस्तीस वर्षांपासून दिव्यांग जलतरणपटूंना प्रशिक्षण देण्याचे काम करतोय. आतापर्यंत माझ्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्याच जलतरणपटूला हा पुरस्कार मिळाल्याने आनंद होत आहे. स्वयम आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली कामगिरी करेल.

- हरी सोनकांबळे, प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट रोडवर आता एकेरी वाहतूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या रस्त्याच्या कामामुळे या मार्गाच्या अर्ध्या भागातून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते़ या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम होईपर्यंत त्र्यंबक नाका सिग्नल बाजूकडून अशोक स्तंभाकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात येत आहे़

या वाहतूक बदलामुळे वाहनधारकांना त्र्यंबक नाक्यापासून अशोक स्तंभाकडे येता येईल. मात्र, अशोक स्तंभाकडून त्र्यंबक नाक्याकडे जाता येणार नाही. स्मार्टरोडचे काम सुरू असल्याने त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ व त्र्यंबक नाका ते किटकॅट कॉर्नर परिसरात नो हॉल्टिंग, नो पार्किंग झोन कार्यरत करण्यात आले आहेत़ या नियमांचे पालन केले नाही तर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

--

वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग

--

पंचवटीकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी

या वाहनांना सीबीएसकडे जायचे असल्यास त्यांनी रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल-शालिमार-शिवाजीरोड-सीबीएस या मार्गाचा अवंलब करावा. त्र्यंबक नाका-सातपूरकडे जायचे असल्यास शालिमार-खडकाळी सिग्नल-जिल्हा परिषदमार्गे त्र्यंबक नाका या मार्गाचा वापर करावा.

--

गंगापूररोड-रामवाडी पुलाकडून येणारी वाहतूक

सर्व प्रकाराच्या वाहनांना मेहेर सिग्नल-सीबीएस-त्र्यंबकनाकाकडे जायचे असल्यास त्यांनी अशोकस्तंभ-रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल-मेहेर सिग्नल- अशोकस्तंभ-रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल-शालिमार-शिवाजीरोड-सीबीएस-

अशोकस्तंभ-रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल-शालिमार-खडकाळी सिग्नल-जिल्हा परिषद-त्र्यंबक नाका-सातपूर या मार्गांचा किंवा गंगापूर नाका-कॅनडा कॉर्नर-टिळकवाडीमार्गे सीबीएस या मार्गाचा वापर करावा.

--

मुंबई नाक्याकडून पंचवटीकडे येताना

मुंबई नाका-वडाळा नाका-द्वारका-आडगाव नाका-काट्या मारुती-निमाणी

--

सिडको व सातपूरकडून पंचवटीकडे येताना

मायको सर्कल-जुना सीटीबी सिग्नल-एचडीएफसी सर्कल-कॅनडा कॉर्नर-जुना गंगापूर नाका-रामवाडी किंवा ड्रीम कॅसलमार्गे पंचवटीकडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशी १४८ अर्जांचे वितरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज वितरण आणि अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी १४८ नामनिर्देशन पत्रांचे वितरण झाले. दोन दिवसांत एकूण ३२२ अर्जांचे वितरण झाले आहे. दोन दिवसांत १३० जणांनी हे अर्ज नेले असून मंगळवारी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

नामको बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज वितरणास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अर्जासाठी कोणतेही शुल्क न ठेवत बँकेने सभासदांना दिलासा दिला आहे. पहिल्याच दिवशी ७४ सभासद १७४ अर्ज घेऊन गेले. तर मंगळवारी (दि. २०) दुसऱ्या दिवशी देखील ५६ व्यक्ती १४८ अर्ज घेऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये सुरेश पाटील, आकाश छाजेड, प्रशांत दिवे, सोहनलाल भंडारी, राहुल दिवे, नरेंद्र पवार, विजय साने, ईश्वरलाल बोथरा आदी इच्छुक अर्ज घेऊन गेले.

निवडणूक रंग : नामको बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रेय ठेवीदारांना तक्रारींचे आवाहन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेय समूहाकडून ठेवीदारांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी राज्यात ३० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांच्या तपासात मैत्रेयच्या वित्तीय आस्थापनाच्या नोंदीद्वारे ठेवीदारांची माहिती उपलब्ध झाली असून, पुढील तपास पोलिस यंत्रणेमार्फत सुरू आहे. त्यामुळे अद्याप आपल्या ठेवींच्या रक्कमेची मागणी दाखल न केलेल्या ठेवीदारांनी जवळच्या पोलिस स्टेशन अथवा जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून ठेवींच्या मागणीबाबत विहित नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलिस महासंचालकांनी केले आहे.

फसवणूक प्रकरणात दाखल गुन्ह्यांचा तपास तसेच कार्यवाहीमध्ये समन्वयाच्या दृष्टीने पोलिस महासंचालक कार्यालयात सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ नुसार आतापर्यंत ३०८ मालमत्ता जप्त करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. या ३०८ मालमत्तांच्या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून कायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता तसेच सक्षम प्राधिकारी नेमण्यात आले आहेत.

गुन्ह्यांचा तपास सुरू असून निष्पन्न झालेल्या उर्वरित मालमत्ता जप्त करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत करण्यात येईल. त्यामुळे ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळण्यासंदर्भात अन्य व्यक्ती किंवा यंत्रणेकडे संपर्क न साधता पोलिसांकडे अर्ज सादर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पस मुलाखतीतून १०० जणांना रोजगार

$
0
0

कळवण : महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने डिप्लोमा इंजिनिअर व आयटीआय पात्रता असणाऱ्या गरजू बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने देवळा येथे कॅम्पस मुलाखतीद्वारे सुमारे १०० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. भरूच (गुजरात) येथील अलायन्स टायर ग्रुप या कंपनीच्या वतीने सुमारे ५०० पैकी २६७ युवकांच्या परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी ९० जण पात्र ठरल्याची माहिती संस्थाचे संस्थापक भाऊसाहेब पगार व प्रकल्प संचालक किरण आहेर यांनी दिली. अलायन्स टायर ग्रुपचे वरिष्ठ व्यवस्थापक बीसी व्हिलया, सहाय्यक व्यवस्थापक सुमित खैरनार यांनी मुलाखती घेतल्या.

यावेळी महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष संजय निकम, सचिव दिनेश पगार, व्यवस्थापकीय संचालक राजीव पगार, बिजनेस डेव्हलपमेंट व्यवस्थापक भुवनेश गांगुर्डे, मार्गदर्शक जितेंद्र आहेर, संदीप पगार, नितीन निकम, सतीश बच्छाव, विशाल निकम, राहुल आहेर, सचिन सूर्यवंशी, योगेश वाघ, रघू नवरे, राकेश हिरे, प्रा. अनिल भामरे, अनिल आहेर, प्रवीण आहेर, तेजस भामरे, दावल भदाणे, तेजस आहेर, हेमंत विसपुते, साहेबराव पगार आदींनी मेळावा यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात होणार बायोमायनिंग प्रकल्प

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरातील कचऱ्यावर बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया करण्यास पालिकेला नगरविकास विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी ३ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी पालिका प्रशासनाने शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी नगरविकास विभागाकडे सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला होता. त्याला संबधित विभागाने मान्यताही दिली होती. मात्र धोरण निश्चित होईपर्यंत बायोमायनिंगचा खर्च न करण्याच्या सूचना नगरविकास विभागाने यापूर्वी दिल्या होत्या. राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरामध्ये हागणदारीमुक्त व स्वच्छतेबाबत कार्यवाही सुरू आहे. त्यात सटाणा पालिकेचा समावेश असून घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन कोटी ९४ लाख रुपयांच्या प्रकल्प अहवालास मंजुरी दिली आहे. आता या प्रकल्प अहवाल मंजूर झाल्यानंतर शासनाने साठवून ठेवलेला कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया राबविण्याचे धोरण निश्चित केले आहे. या प्रक्रियेचा अभ्यास करून त्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी संबधित प्रकल्प पथदर्शी स्वरुपात राबविण्यास परवानगी देण्यात आली आहे. या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात सहा नवीन घंटागाड्यांना मान्यता, कचरा संकलन व विलगीकरण करणे, कचरा डेपोस कंपाउंड करण्यास मान्यता, यंत्रसामग्री घेणे आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षानुवर्षांची उपेक्षा सरणार तरी कधी?

$
0
0

समस्यांची एक्स्प्रेस

मटा मालिका

000

वर्षानुवर्षांची उपेक्षा सरणार तरी कधी?

संजय लोणारी, येवला

सातासमुद्रापार पोहचलेल्या पैठणीचे माहेरघर असलेल्या येवला शहरातील मध्य रेल्वेचे स्टेशन आवश्यक सोयीसुविधांअभावी एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या थांब्यावाचून कायमच उपेक्षित राहिले आहे. शेकडो वर्षांपूर्वी ब्रिटीश काळात उभे राहिलेल्या या स्थानकावर येवलेकरांना अपेक्षित असलेल्या अनेक रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्याच्या मागणीचा विचार झालेला नाही. रेल्वे स्थानकावरील पिण्याच्या पाण्याची गैरसोय, कुलूपबंद शौचालये, सुसज्ज नसलेले प्रतिक्षागृह आदी समस्यांमुळे येवला रेल्वेस्टेशन 'अच्छे दिन'पासून दूरच आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात या रेल्वे स्थानकाच्या झोळीत भरीव असे काहीच मिळालेले नाही. परिणामी, गेल्या काही वर्षांत या रेल्वे स्थानकाचा अवघा काहीसा झालेला कायापालट वगळता वर्षानुवर्षांच्या विविध समस्यांसह येवलकरांच्या अनेक मागण्या आजही केवळ कागदावरच आहेत.

कोट्यवधींचे उत्पन्न, सुविधा तोकड्या

अनेक कांदा व्यापारी या रेल्वे स्थानकातून वॅगनद्वारे विविध राज्यात लाखो टन कांदा पाठवितात. गेल्यावर्षी या रेल्वे स्थानकावरून १ लाख ६८ हजार ३८८ टन कांदा बाहेर पाठविण्यात आला होता. त्यातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत जवळपास २१ कोटी रुपयांची भर पडली होती. याशिवाय येथे थांबणाऱ्या चार प्रवाशी रेल्वे गाड्यांमधून रेल्वेला मिळणारे उत्पन्न देखील वेगळेच. हे सगळं काही बघताही रेल्वेने येवला स्थानकात आवश्यक त्या सोयीसुविधा देण्यासह काही प्रवाशी रेल्वे गाड्यांना थांबा देण्याच्या मागणीबाबत सातत्याने आखडता हात घेतला आहे.

------

चारच प्रवाशी गाड्यांना थांबा

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात येणाऱ्या येवला स्थानकावरून असंख्य रेल्वे धावत जातात खऱ्या, मात्र या स्थानकावर वर्षानुवर्षांपासून केवळ कोल्हापूर-गोंदिया 'महाराष्ट्र एक्स्प्रेस' या एकमेव एक्स्प्रेस प्रवाशी गाडीसह पुणे-मनमाड, दौंड-नांदेड व पुणे-निजामाबाद या तीन पसेंजर गाड्यांनाच थांबा मिळतो. या स्थानकावरून दिल्ली-गोवा (वास्को निजामुद्दीन), बंगळूर-दिल्ली (कर्नाटक एक्स्प्रेस) या दोन प्रवाशी गाड्यांना येवला स्थानकावर थांबा मिळण्याच्या येवलेकरांनी केलेल्या मागणीला रेल्वे प्रशासनाने आजवर नेहमीच केराची टोपली दाखवली आहे. आठड्यात सोमवार, मंगळवार व गुरुवार या तीन दिवशी येथून जाणाऱ्या जालना-साईनगर (डेमो) पॅसेंजरला येवल्यात थांबा देण्याची मागणी आता पुन्हा जोर धरत आहे. 'जालना-साईनगर' गाडीला येवल्यात थांबा देण्यास कुठलीही अडचण नसताना देखील थांबा देण्याबाबत का हात आखडता घेतला जात आहे, असा प्रश्न व्यक्त होत आहे.

'ओव्हरब्रीज'ची आवश्यकता

येवला रेल्वे स्थानकात रेल्वगाडया थांबण्यासाठी चार 'रुळ' असून त्यावरील पूर्वेच्या दोन रुळांवर मालवाहू गाडया थांबतात. स्टेशनच्या उंच फलाटावरून प्रवाशी रेल्वे गाडी धावतानाच, अनेकदा रेल्वे क्रॉसिंगवेळी येथील स्थानकावर दुसरी प्रवाशी रेल्वेगाडी फालतपलीकडील दुसऱ्या रुळावर थांबते. अशावेळी गाडीत चढणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांना रेल्वेमार्ग ओलांडून दुसऱ्या बाजूला उभे राहण्याची किंवा कसरत करून फलाट चढण्याची वेळ येते.त्यामुळे स्थानकावर 'ओव्हरब्रीज'सह दादर अर्थातच जिना निर्मितीची गरज आहे.रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवला-मनमाड मार्गावर अपघात; ६ जणांचा मृत्यू

$
0
0

नाशिक:

येवला-मनमाड मार्गावर अनकाई बारी इथं भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन महिला, दोन पुरुष तसंच एका लहान मुलाचा समावेश आहे.

बुधवारी (२१ नोव्हेंबर) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून आयशर ट्रक आणि एर्टिगा कार यांची जोरदार धडक झाल्यानं हा अपघात घडला आहे.

मृत्युमुखी पडलेले नगर जिल्ह्यातील रहिवाशी असून एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की; कारचा समोरील भाग संपूर्ण चक्का चुर झाला आहे.
66728429

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकाराम मुंढे यांची अखेर बदली

$
0
0

नाशिक :

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाली असून राधाकृष्ण गमे हे नाशिकचे नवे आयुक्त असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. गमे सध्या उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्या जागी मुंढे यांची पाठवणी करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांची ही चौथी बदली आहे. याआधी पुणे पालिका परिवहन सेवेच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून बदली होऊन त्यांची नाशिकला पाठवणी करण्यात आली होती. नाशिकमध्येही धडाकेबाज कामगिरीमुळे सत्ताधारी आणि मुंढे यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. नाशिककर मात्र सातत्याने मुंढे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले होते. या संघर्षाचा शेवट आज मुंढे यांच्या बदलीत झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषिथॉन प्रदर्शन आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कृषिथॉन प्रदर्शनाला गुरुवारपासून (२२ नोव्हेंबर) प्रारंभ होत आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते सकाळी १० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, अॅड. जयंत जायभावे, 'नाडा'चे अध्यक्ष विजू पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. ठक्कर डोम येथे हे प्रदर्शन असून, ते ५ दिवस चालणार आहे. प्रदर्शनाचे यंदा १३ वे वर्ष आहे. यंदाच्या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण 'अत्याधुनिक कृषी यांत्रिकीकरण' असे आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभानंतर कृषिथॉन युवा सन्मान सोहळा होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते युवा शेतकरी, उद्योजक, संशोधक यांना सन्मानित करण्यात येणार आहे. दुपारी २.३० वाजता 'अन्नप्रक्रिया उद्योगातील संधी' या विषयावर परिसंवाद होणार आहे. शुक्रवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता कृषिथॉन गुणवंत कृषिविद्यार्थी पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. दुपारी १ वाजता राज्यस्तरीय नर्सरी उद्योजक परिषद होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान १ कंटी मुंढे

$
0
0

सोमवारीच झाली स्वाक्षरी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये सुरुवातीपासूनच मुंढे आणि वाद हे समीकरण बनले. करवाढीच्या मुद्द्यावर अविश्वास प्रस्ताव मागे घेतल्यानंतरही मुंढे यांनी लोकप्रतिनिधींशी जुळवून घेतले नाही. त्यामुळे अखेरीस भाजपच्या तीनही आमदारांसह पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुंढे यांच्या बदलीचे साकडे मुख्यमंत्र्यांकडे घातले. गेल्या सोमवारीच त्यांच्या बदलीच्या फाइलवर स्वाक्षरी झाली.

दोन वर्षांत चार बदल्या!

इतर ठिकाणांप्रमाणेच मुंढे यांची नाशिकमधील कारकीर्दही अल्पावधीचीच ठरली. एक वर्षाचाही कार्यकाळ ते पूर्ण करू शकले नाहीत. ८ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांची महापालिकेत आयुक्तपदी बदली झाली होती. परंतु, अवघ्या ९ महिने १३ दिवसांतच त्यांची बदली झाली आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांची ही चौथी बदली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली होती. परंतु, येथेही त्यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे बदलीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात करण्यात आली होती. परंतु, तेथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी खटके उडाले होते. सोबतच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे त्यांची महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली आहे.

गमेंचा नाशिकचा कार्यकाळ

राधाकृष्ण गमे हे मूळचे नगरचे असले तरी सध्या उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी नाशिकमध्ये काम केलेले आहे. मालेगावचे प्रांत, नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी कर्तव्य बजावलेले आहे. सोबतच विभागीय जातपडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. त्यामुळे नाशिकची त्यांना परिपूर्ण माहिती आहे. तसेच, नाशिक शहरातच त्यांची सासरवाडी आहे. गमे यांनी नाशिकमध्ये अनेक वर्षे काम केल्याने त्यांना नाशिकच्या प्रश्नांची अधिक माहिती आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाला पालकमंत्र्यानी पसंती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांना दंड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी माधुरी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे ५ वाजता तसेच रात्री १० वाजेनंतर ब्लॅक स्पॉट ठिकाणी उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सातपूर परिसरात ९ ब्लॅक स्पॉटवर कचरा फेकणे पूर्णपणे थांबल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

अशोकनगररोडवरील मौले हॉलच्या वळणावर ब्लॅक स्पॉट आरोग्य विभागाने बंद केला. यानंतर त्र्यंबक रोडवरील जाधव संकुलच्या वळणावर, पटेल वखारीच्या बाजूला, सातपूर टेम्पो स्टँड शेजारी, स्वारबाबानगर येथील सिद्धार्थ चौक, संगम चौक, मळे विभागातील नंदिनी नदीवरील गोरक्षनाथ पूल, अंबिका स्विट समोरील व अंबड लिंकरोडवरील संजीवनगर येथील आनंद बेकरीच्या बाजूला असलेले ब्लॅक स्पॉट आरोग्य पथकाने बंद केले आहेत.

भल्या पहाटे अथवा रात्री अंधार पडल्यावर कचरा फेक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याने जबर निर्माण झाली आहे. अगोदर केवळ नावापुरती कारवाई केली जात होती. आता उघड्यावर कचरा टाकल्यावर जागेवर दंडाची पावती आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहे. तरी नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवाद मेळाव्यात ‘प्रगती’चे आवाहन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नामको बँकेवर प्रशासक लादून बँकेचा एनपीए ३५ टक्क्यांवर नेवून ठेवणाऱ्या उमेदवारांना आपण मतदान करणार, की बँकेच्या प्रगतीसाठी कटीबद्ध असलेल्या प्रगती पॅनलच्या उमेदवारांना मतदान करणार असा प्रश्न प्रगती पॅनलचे सूत्रधार व माजी आमदार वसंत गिते यांनी केला.

येथील राधाई मंगल कार्यालयात नामको बँक निवडणूक पार्श्‍वभूमीवर प्रगती पॅनलच्या वतीने आयोजित संवाद मेळाव्यात गिते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय चव्हाण उपस्थित होते. व्यासपीठावर प्रगती पॅनलचे नेते सोहनलाल भंडारी, अशोक सोनजे, हेमंत धात्रक, महेंद्र बुरड, प्रकाश दायमा उपस्थित होते. सोहनलाल भंडारी, अरविंद सोनवणे, साहेबराव सोनवणे, दिलीप चव्हाण यांची भाषणे झालीत.

प्रगती पॅनलमध्ये सटाणा शहरातून नामको बँकेसाठी प्रथमच महेंद्र बुरड यांच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आल्याने शहरवासीयांनी प्रगती पॅनलच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन भंडारी यांनी केले. संवाद मेळाव्यास राजेंद्र राका, प्रमोद राका, कांतीलाल लुंकड, रमेश देवरे, श्रीधर कोठावदे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रगती’ भरणार आज नामनिर्देशनपत्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंन्ट बँकेच्या २१ संचालक निवडीसाठी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत जोरदार रस्सीखेच सुरू असून, अनेकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फॉर्म नेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पॅनल निर्मिती करण्याच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, सत्ताधारी माजी संचालकांचे प्रगती पॅनलचे बहुतांश उमेदवार गुरुवारी नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत. तर सहकार पॅनलचे उमेदवार सोमवारी नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत. या दोन्ही पॅनलने अद्यापपर्यंत उमेदवारांची यादी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. माघारीनंतर किंवा नामनिर्देशन पत्राची मुदत संपल्यानंतर ही यादी जाहीर केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

२३ डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत २७ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशपत्र दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर पॅनलची घोषणा केली जाणार आहे. या निवडणुकीत तीन पॅनल होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. माजी सत्ताधारी संचालकांचे प्रगती पॅनल सोहनलाल भंडारी, वसंत गिते, हेमंत धात्रक, विजय साने यांच्या नेतृत्वाखाली लढवले जाणार आहेत. तर विरोधी गटाचे सहकार पॅनल हे भास्करराव कोठावदे, अजय ब्रम्हेचा, ललित मोदी व गजानन शेलार यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहेत. त्याचप्रमाणे अजित बागमार यांचे नम्रता पॅनलही रिंगणात उतरणार आहे. त्यांच्या नामनिर्देशपत्रही एकत्रित दाखल केले जाणार आहेत.

माघारीत घडणार नाट्य

या निवडणुकीसाठी २७ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशपत्र दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशपत्राची छाननी सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी ही ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर १ ते ४ डिसेंबरपर्यंत माघार नाट्य घडणार आहे. यावेळेस मोठ्या घडामोडी व तडजोडी होतील, असे दिसते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नायिकेचा स्वार्थातून ‘कळसुत्री’ प्रवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यक्तीं-व्यक्तींमध्ये सातत्याने भांडण लावणे, त्यांना झुलवत ठेवणे हे कळसुत्री कलाकार करीत असतो. आपल्या तालावर एखाद्या व्यक्तीला नाचवणे हे कसब कळसुत्री कलाकाराला अवगत असते. याच सुत्रावर आधारित कळसुत्री हे नाटक बेतण्यात आले होते. स्वार्थापोटी एखादी व्यक्ती दुसऱ्याला कशी नाचवते हे कळसुत्री या नाटकातून दाखवण्यात आले. लोकहीतवादी मंडळाच्यावतीने ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात बुधवारी हे नाटक सादर झाले. स्वर्थापोटी सुरू केलेला एखादा डाव न कळत त्या डावाचा दुसऱ्याच्या आयुष्यावर होणारा परिणाम असा या नाटाकाचा आशय आहे. नाटकातील नायिकेचा कळसुत्रीप्रमाणे इतरांच्या तालावर जीवन प्रवास घडत जातो आणि विदारक शेवट तिच्या नशिबी येतो, हे या नाटकातून सांगण्यात आले. बुधवारी सादर झालेल्या नाटकाला प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभला.

नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन नीलेश घोरपडे यांचे होते. निर्मिती गितांजली घोरपडे यांची होते. गितांजली घोरपडे (तारा), गुंजन पुरोहित (माधुरी), सलमान तांबोळी (बबन आणि दीपक), कल्पेश कुलकर्णी (भास्कर), सम्राट सौंदाणकर (म्हतारा), नवीन हिरगुडे (पाड्यावरचा माणूस) यांनी भूमिका केल्या. नेपथ्य बाळकृष्ण तिडके, प्रकाश योजना- सुयोग देशपांडे, रंगभूषा माणिक कानडे, ध्वनी- प्रतिक नाईक, वेशभूषा प्रियंका घोगरे, रंगमंच सहाय्य निखील नरोडे, कुणाल पेठकर, सौरभ रसाळ, शुभम हिरगुडे यांचे होते.

आजचे नाटक

प्रारब्ध

ल्युमिनस फाउंडेशन, नाशिक

वेळ : सायंकाळी ७ वाजता

स्थळ : प. सा. नाट्यगृह

..

लोगो : राज्यनाट्य स्पर्धा

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त मुंढेंची बदली!

$
0
0

राधाकृष्ण गमे महापालिकेचे नवे आयुक्त

महापालिकेत नियुक्ती : ८ फेब्रुवारी २०१८

कार्यकाळ : ९ महिने १३ दिवस

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंढे यांच्या बदलीबाबत रात्री उशिरापर्यंत आदेश प्राप्त झाले नसले तरी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या बदलीला आणि गमे यांच्या नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्तीला दुजोरा दिला आहे. अतिकर्तव्यकठोरतेमुळे सुरुवातीपासून मुंढे नाशिकमध्ये वादाच्या केंद्रस्थानी राहिले. महापालिकेतील लोकप्रतिनिधींशी झालेला वाद मुंढे यांना भोवला असून, नाशिकहून अवघे नऊ महिने १३ दिवसांत त्यांची बदली झाली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या महापालिकेतील उन्मादी कारभाराला कंटाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांची बदली करीत ८ फेब्रुवारी रोजी मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली होती. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदावरून त्यांची महापालिकेत आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, अन्य ठिकाणांप्रमाणेच लोकप्रतिनिधींशी मुंढे यांचे नाशिकमध्येही खटके उडण्यास सुरुवात झाली. मुंढे यांनी पदभार घेताच पालिकेतील विस्कटलेली प्रशासकीय शिस्त आणि कामचुकार अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना ठिकाणावर आणले. त्यांच्या या कामाचे कौतुक झाले. मात्र महापालिकेचे बजेट स्थायीवर मांडण्याऐवजी थेट महासभेवर सादर केल्यावरून भाजप आणि मुंढे यांच्यात खटके उडाले. त्यानंतर मुंढे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधील वाद टोकाला भिडला. मुंढे यांनी महासभेचा करवाढीचा अधिकार डावलत नाशिककरांवर भरमसाठ करवाढ लादली. यामुळे पालिकेतील पदाधिकारी आणि मुंढे यांच्यातील संघर्ष विकोपाला पोहचला. शेतीवरही कर लावल्याने मुंढे विरोधात सर्वपक्षीय लढाच नाशिकमध्ये उभारण्यात आला. मुंढेंच्या करयोग्य मूल्याच्या निर्णयाने नाशिककरांचे कंबरडेच मोडले होते. मुंढे आणि पालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील वाद मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचला होता. तरीही मुंढेंनी करवाढ मागे न घेतल्याने अखेरीस सत्ताधारी भाजपने मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. परंतु, मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करीत हा प्रस्ताव मागे घेण्यास भाग पाडले होते. तेव्हापासून मुंढेंच्या बदलीची चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातून चार दुचाकी लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरातून सर्रास दुचाकींची चोरी होत असल्याचे प्रकार घडत आहेत. घरासमोरील पार्किंगमधूनच वाहने चोरी होत असल्याने नाशिककरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, याचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश येत आहे.

आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जत्रा हॉटेलजवळ असलेल्या शरयू पार्कच्या बालाजी अपार्टमेंटमधून अशोक भीमराव मोहिते यांची बजाज डिस्कव्हर दुचाकी (एमएच १७ झेड ९८५९) चोरून नेली आहे. याबाबत अशोक मोहिते यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार वाढवणे करीत आहेत. पंचवटीतील निमाणी बस स्टॅण्डसमोर असलेल्या सूर्या आर्केडमधून राहुल सुधाकर देसले यांच्या मालकीची होंडा अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५ सीपी ९८११) चोरट्यांनी लंपास केली आहे. याबाबत प्रकाश हंसराज वाघ (रा. संजयनगर, पंचवटी) यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस हवालदार घोरपडे करीत आहेत.

टाकळी रोडवरील सेंट झेवियर स्कूल येथून चोरट्यांनी मयूर भाऊसाहेब भंडारे (रा. कसबे सुकेणे, ता. निफाड) यांची बजाज डिस्कव्हर दुचाकी (एमएच १५ डीई ४०७३) भर दुपारी चोरून नेली आहे. याबाबत भद्रकाली पोलिस स्टेशनचे हवालदार भोज पुढील तपास करीत आहेत. नाशिकरोडच्या बिग बाजारशेजारी असलेल्या जयाबाई कॉलनीतील प्राईड ग्लोरी सोसायटीतून चोरट्यांनी मनीषा दत्तात्रय गोडगे (रा. वरीलप्रमाणे) यांची अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५ जीबी १२८०) चोरून नेली आहे. याबाबत उपनगर पोलिस स्टेशनचे एएसआय काकड पुढील तपास करीत आहेत.

कृषिथॉन प्रदर्शनातून चोरी

सिटी सेंटर मॉलजवळील ठक्कर डोम येथे सुरू होणाऱ्या कृषी प्रदर्शन स्थळावरून चोरट्यांनी ९० हजार रुपयांचे अ‍ॅल्युमिनियमचे पार्टीशन मटेरियल चोरून नेले आहे. अहमदाबाद येथील वासना येथील सोमेश्‍वरनगर येथे राहणारे ईश्‍वरभाई बोराणा यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. कृषिथॉन प्रदर्शन भरविण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या सेटअपवरून १६ ते १८ नोव्हेंबर रोजी चोरट्यांनी ६०० किलो अ‍ॅल्युमिनियमचे मटेरियल चोरून नेले आहे. याबाबत पोलिस हवालदार उगले तपास करीत आहेत.

चंदनाचे झाड पळविले

पुणे महामार्गावरील चेहेडी शिव येथे असलेल्या शिंदे मळ्याजवळील १५ वर्षे जुने चंदनाचे झाड चोरट्यांनी चोरून नेले आहे. चंदनाचे हे झाड १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान कटरने बुंध्यापासून तोडले, तसेच त्याचे खोडही चोरून नेले. याबाबत स्वप्नील नारायण पाटील (रा. विजयनगर, देवळाली कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत नाशिकरोड पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार गांगुर्डे पुढील तपास करीत आहेत.

मृत अर्भक आढळले

पंचवटी : गोदाघाटावरील गांधी तलावाजवळ बुधवारी सकाळी ९ वाजता ५ ते ६ दिवसांचे स्त्री अर्भक बेवारस स्थितीत आढळले आहे. या अर्भकाचा मृत्यू झाला असून, अज्ञात महिलेविरुद्ध पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी पोलिस ठाण्याचे शिपाई संदीप घुगे हे गंगाघाटावर पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गांधी तलावाजवळ मयत अवस्थेतील स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. पोलिसांनी हे अर्भक ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात पाठविले. याबाबत पोलीस हवालदार डी. व्ही. पाटील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनाड परिवारावर काळाची झडप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड/येवला

अनकाई बारी येथे येवल्याकडून मनमाडकडे जाणारा आयशर टेम्पो (एचआर ४५, ए ७०७०) आणि मनमाडकडून येवल्याकडे जाणारी इर्टिगा कार (एमएच १७, बीएल १८८१) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कार अक्षरश: चक्काचूर झाली. यात कारमधील अनाड कुटुंबातील सहाही जण जागीच मुत्युमुखी पडले. कारचा चेंदामेंदा झाल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागली. 'जेसीबी'ने दोन्ही वाहने बाजूला करावी लागली.

अपघाताचे वृत्त समजतात मृतांच्या नातेवाइकांनी येवला ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. नातेवाइकांचे मृतदेह पाहून त्यांनी आक्रोश केला. मृतदेहांचे येवला ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी येवला तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक भापकर पुढील तपास करीत आहेत.

अपघातात ठार झालेले बाळासाहेब अनाड यांचा कोपरगाव येथे येवला नाक्याजवळ पानटपरीचा व्यवसाय आहे. अपघातात मृत झालेला त्यांचा मुलगा श्रीनाथ हा सध्या बाबा पानस्टॉल चालवित होता. बाळासाहेब यांची बहीण भीमाबाई गोखले या इंदूर येथे राहतात. बाळासाहेब हे पत्नी इंदूबाई, मुलगा श्रीनाथ, अहमदनगर येथे राहणारी मुलगी मोहिनी व नातू हरी यांच्यासह गेल्या रविवारी इंदूरला गेले होते. बहिणीला इंदूरहून कोपरगावला येताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. मोहिनी आणि हरी यांच्यावर अहमदनगर येथे तर अनाड कुटुंबातील मृत झालेल्या चौघांवर कोपरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाइकांचा आक्रोश पाहून परिसरातील नागरिकही हेलावून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीराम एक्स्प्रेस आज अयोध्येला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

केंद्र सरकारने राममंदिर उभारणीस त्वरित प्रारंभ करावा या मागणीसाठी राज्यभरातून शिवसेना कार्यकर्ते गुरुवारी (दि. २२) अयोध्येला रवाना होणार आहेत. नाशिकरोडहून मध्यरात्री एक वाजता १ हजार २५४ कार्यकर्ते विशेष रेल्वेगाडीने रवाना होणार असून या गाडीला जय श्रीराम एक्स्प्रेस असे नाव देण्यात आल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

अयोध्येला जाऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी असून रेल्वेगाडीत जागा मर्यादित आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांन पास, बॅचेस, टोप्या, टी शर्ट देण्यात आले आहेत. पासधारकांनाच या गाडीत प्रवेश दिला जाणार आहे. खासदार गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सनील पाटील आदी नेते कार्यकर्त्यांसमवेत असतील.

ही गाडी शनिवारी, २४ नोव्हेंबरला पहाटे पाचला अयोध्या स्थानकात पोहोचेल. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा संपल्यावर जय श्रीराम एक्स्प्रेस अयोध्येहून नाशिकला रवाना होईल. नाशिकरोड स्थानकात ती सोमवारी, २६ नोव्हेंबरला रात्री बारा वाजता पोहोचेल. गाडीला १८ बोगी असून इंजिनानंतरची पहिली बोगी एसआरएल आहे. या बोगीची क्षमता ४० प्रवाशांची आहे. त्यानंतर एसी बोगी असून तिची क्षमता ६४ प्रवाशांची आहे. त्यापाठोपाठ स्लीपर क्लासच्या सात बोगी असून प्रत्येक बोगीची ७२ प्रवासी क्षमता आहे. स्लिपर कोचनंतर पॅन्ट्री बोगी असेल. त्यामागे ४० प्रवासी क्षमतेची एसआरएल बोगी राहील. या गाडीतून १ हजार २५४ पासधारक कार्यकर्ते अयोध्येला रवाना होतील.

पाच दिवस प्रवास

पाच दिवसांचा हा प्रवास तीन हजार किलोमीटरचा आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने १ हजार २५४ पासधारकांनाच जागा देण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना टी शर्ट, टोपी आणि विशेष बॅच देण्यात येणार आहेत. टी शर्टवर जय श्रीराम आणि जय शिवसेना तर भगव्या टोप्यांवर जय श्रीराम लिहिलेले आहे. सुरक्षेसाठी प्रत्येक बॅचवर कार्यकर्त्याचे नाव व फोटो असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images