Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सैनिकाची आत्मकथा उलगडणारे ‘आधारशिला’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सैनिकाचे जगणे मोठे अवघड असते, त्याला राष्ट्रासाठी लढावे लागते. मनात बायको पोरांचा कितीही विचार असला, घराची कितीही आठवण येत असली तरी लढणे हेच त्याचे भागधेय असते. परंतु, आपल्याच राष्ट्राचे लोक युद्धाच्या वेळी आपल्याच सैनिकांच्या घरातील लोकांवर अत्याचार करीत असतील तर अशावेळी ज्याचे ते घर आहे, त्या सैनिकाने काय करावे? तो सैन्यातूनच पळ काढतो, अशा आशयाचे कथानक असलेले आधारशिला नाटक शुक्रवारी सादर करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे आयोजित ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू आहे. यात बॉश फाईन आर्टसच्या वतीने आधारशिला हे नाटक सादर करण्यात आले. मुकंद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन बाळ मुजुमदार यांनी केले होते.

जगातील एका छोट्याशा खेड्यात ही घटना घडते. हे गाव जगाच्या नकाशावर शोधायचे झाले तर भिंग लावून शोधावे लागेल, अशी त्याची अवस्था. परंतु, तेथे सुख-शांतता नांदत असते. वर्षभरातून एखादाजण मरण पावत असे. त्यामुळे तितकेच काय ते दु:ख असे. मात्र, या गावाकडे शेजारील देशाच्या सैनिकांची वक्रदृष्टी पडते आणि गावातील बायका, पोरे, म्हातारी माणसे यांना नाडले जाते. बायकांवर अत्याचार केले जातात. सगळीकडे प्रेतांचा खच पडतो. अशावेळी गावात विध्वंस झालेला असताना, त्याच शत्रुराष्ट्राचा एक सैनिक या गावात येतो. आपल्याच सैनिकांकडून तो पोळलेला आहे. जीव वाचविण्यासाठी तो गावात येतो आणि गावचाच होऊन जातो. त्यांचाही त्याच्यावर विश्वास बसतो तो गावाचा आधार बनतो; परंतु एक दिवस त्याचे सैनिक त्याला शोधत येतात आणि कोर्ट मार्शलसाठी त्याला घेऊन जातात, गाव पुन्हा एकदा निराधार बनते, अशी या नाटकाची कथा होती.

नाटकाचे नेपथ्य आदित्य समेळ यांचे होते, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, संगीत अमोल काबरा, वेशभूषा अपूर्वा देशपांडे , रंगभूषा समीक्षा कानडे यांची होती. नाटकात चैतन्य गोखले, अनिल कडवे, कौमुदी गदगे, विजय सहाणे, किरण समेळ, कविता आहेर, स्नेहा ओक यांनी भूमिका केल्या. निर्मिती प्रमुख नीलेश फणसे होते.

\Bलोगो : राज्य नाट्य स्पर्धा \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस निरीक्षकासह कर्मचाऱ्यास कोठडी

$
0
0

दोन लाखांच्या लाचखोरीचे प्रकरण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

फसवणुकीच्या गुन्ह्यात वॉरंट न बजावण्यासाठी तसेच खटल्यात मदत करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केलेल्या नाशिक ग्रामीण पोलिस निरीक्षक राजेश सदाशिव शिरसाठ (४८, आर्थिक गुन्हे शाखा) आणि पोलिस हवालदार संजीव खंडेराव आहेर (४८) यांना पुणे कोर्टाने १९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या दोघांना स्वारगेट परिसरात गुरुवारी (दि. १५) अटक झाली होती.

या प्रकरणी पुणे 'एसीबी'कडे तक्रार करणाऱ्या तक्रारदारासह त्याच्या साथिदाराविरुद्ध दिंडोरी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. दिंडोरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या गुन्ह्यात प्राक्लेमेशनची (जाहीरनामा) नोटीस काढली आहे. त्यात अटक करण्याची धमकी देऊन व तपास कामी मदत करण्यासाठी पोलिस निरीक्षक शिरसाठ व हवालदार आहिरे हे गुरुवारी पुण्यात आले होते़. यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून त्यांना वॉरंट बजावायचे नसेल तसेच खटल्यात मदत करावी, यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लागलीच 'एसीबी'कडे तक्रार केली. मागणीची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी दुपारी स्वारगेटजवळील मित्र मंडळ चौकाजवळ नेवैद्यम हॉटेलसमोर पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, प्रतीभा शेंडगे व इतर कर्मचाऱ्यांनी सापळा लावला. तक्रारदाराकडून दोन लाख रुपये घेताना पोलिस हवालदार संजीव आहिरे यांना पकडण्यात आले. यावेळी शिरसाठ दुसरीकडे थांबले होते. 'एसीबी'ने ही संधी साधत फोन करून या गुन्ह्यात शिरसाठ यांचा सहभाग असल्याबाबतचे संभाषण रेकॉर्ड करून घेतले. पुरावा हाती येताच शिरसाठलाही अटक करण्यात आली. दोघा संशयितांना शुक्रवारी पुणे कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना कोर्टाने १९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपअधीक्षक प्रतीभा शेंडगे करीत आहेत.

आणखी एका व्हिडिओची कहाणी

ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील वाहनचालक असलेल्या कर्मचाऱ्याने एका हॉटेल चालकाकडे पैसे मागितल्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अद्याप वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत गेला नसल्याचे समजते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ मागील महिन्यातील आहे. सापगाव येथील हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा मारला होता. हॉटेल मालकाची बहीण देखील ग्रामीण पोलिस दलातच कार्यरत असल्याने तिने थेट उत्पादन शुल्क विभागात जाऊन कारवाईचा जाब विचारत शासकीय कामात हस्तक्षेप केला होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच याचा अहवाल मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी महिला कर्मचाऱ्यास निलंबित केले होते. मात्र, हॉटेलमालक आणि निलंबित महिला पोलिस कर्मचाऱ्याने उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी दाखल व्हावी यासाठी त्र्यंबकेश्वर पोलिसांकडे तगादा सुरू केला. हा गुन्हा दाखल झाला नाही. त्यातच बदली चालक म्हणून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने याच हॉटेलचालकाकडे पैशांची मागणी केली. सध्या या व्हिडिओबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू असून, कागदोपत्री काहीच नसल्याने 'एसीबी'सह पोलिस अधीक्षक काय भूमिका घेतात, याकडे पोलिस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संशयित पाटील फरारच

पेठ उपअधीक्षक कार्यालयात कार्यरत असताना हॉटेल चालकाकडून पैशांची मागणी करून ती स्विकारणारा विलास पाटील हा संशयित पोलिस कर्मचारी अद्याप फरार आहे. पाटीलचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यास निलंबित करण्यात आले. तसेच नाशिक 'एसीबी'ने गुन्हा दाखल केला. त्यानंतर पाटील फरार असून, त्याचा शोध घेतला जात असल्याचे 'एसीबी'च्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पायल शर्माची निवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिक-पुणे मार्गावरील गांधीनगर येथील रहिवासी आणि डॉन बॉस्को महाविद्यालयात बारावीत शिकणारी विद्यार्थिनी पायल कपिलदेव शर्मा हिची औरंगाबाद येथे होणाऱ्या १९ व्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पायलने जळगाव येथे नुकत्याच झालेल्या विभागीय स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते. पायलला प्रशिक्षक सौरभ डांगळे, ओंकार पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोळीबार आवाजातून साधकांची मुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इगतपुरीतील विपश्यना केंद्रात मनशांतीसाठी येणाऱ्या साधकांना आता गोळीबाराचे आवाज ऐकावे लागणार नाहीत. पिंपळद येथे गोळीबार मैदानासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेवर पोलिस चौकी आणि विश्रांतीकक्षाच्या उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे निधी पुरविण्याचा निर्णय घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या वादावर अखेर पडदा टाकला आहे.

इगतपुरीत जागतिक ख्यातीचे विपश्यना केंद्र आहे. तेथून जवळच ग्रामीण पोलिस दलाचे गोळीबार प्रात्यक्षिक मैदान होते. पोलिस कर्मचारी या मैदानावर गोळीबाराचा सराव करीत असत. परंतु, या सरावाचा त्रास विपश्यना केंद्रात येणाऱ्या साधकांना होत असल्याने हे सरावाचे ठिकाण पोलिसांनी बदलावे, अशी मागणी विपश्यना केंद्र २००० पासून करीत आहे. मध्यंतरीच्या काळात विपश्यना केंद्राने पोलिस दलासाठी पिंपळद येथे अडीच हेक्टर जागा उपलब्ध करून दिली. जिल्हा प्रशासनानेही पाच हेक्टर जागा दिल्याने इगतपुरीतील हे केंद्र पिंपळद येथे स्थलांतरीत करण्यात आले. इगतपुरीतील ६८ गुंठे जागेसह पिंपळद येथे पोलिस चौकी आणि विश्रांतीकक्ष उभारून देण्याच्या मागणीवर ग्रामीण पोलिस अडून बसले होते. विपश्यना केंद्र त्याबाबत फारसे उत्सुक नसल्याने तिढा निर्माण झाला होता.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी याबाबत गुरुवारी बैठक घेतली. पिंपळद येथे पोलिस चौकी तसेच विश्रांती कक्षाचा ग्रामीण पोलिसांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे सादर करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हा नियोजन विभागाकडे असलेल्या निधीमधून हे काम पूर्ण करून दिले जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत पुढाकार घेतल्याने या वादावर पडदा पडण्यास मदत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळ्या फिती लावून निषेध

$
0
0

महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका प्रशासनाकडून सफाई कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने करण्यात येत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सफाई कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून आंदोलन केले. शहरातील सहा विभागात सर्व सफाई कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा न देता व त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना कामचुकार ठरवून त्यांच्यावर करण्यात येत असलेली कारवाई अन्यायकारक असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशान्वये मंगळवारी महापालिकेच्या वतीने स्वच्छतेबाबत स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यात तब्बल २०६ कर्मचीर रजेवर गेल्याचे तर १६० कर्मचारी विनापरवाना अनुपस्थित राहिल्याचे आढळून आले. त्यामुळे या सर्वांवर कारवाईचे आदेश मुंढे यांनी दिले. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या तुलनेत सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत तोकडी असताना त्यांच्याकडून क्षमतेपेक्षा अधिक काम करवून घेतले जाते आहे. त्यांच्यावर अविश्वास दाखवून त्यांची पिळवणूक करण्याचे काम प्रशासनाकडून केले जात असल्याचा आरोप वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीच्या वतीने केला आहे.

तीन महिन्यांपासून सफाई कर्मचाऱ्यांना रजा देण्यात आलेली नव्हती. सण संपल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांना रजा मंजूर केल्या गेल्या. २०६ कर्मचारी रजेवर गेले. मात्र, गैरहजर दाखवून या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा आसूड प्रशासनाने ओढला आहे. प्रशासनाच्या जाचाला कंटाळून फिक्स पे वरील काही कर्मचारी गैरहजर होते. या कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुविधा न देता व त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना कामचुकार ठरवून त्यांच्यावर करण्यात येत असलेली कारवाई अन्यायकारक असल्याचा दावा संघटनेने केला आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसएसके ओपन टेनिसला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात शुक्रवारपासून एसएसके ओपन टेनिस स्पर्धेला सुरुवात झाली. एसएसके ग्रुपचे चेअरमन शैलेश कुटे, आमदार योगेश घोलप आदींच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यात १२ वर्षांखालील मुले- मुली, १६ वर्षांखालील मुले-मुली यांचे एकेरीचे सामने झाले. दिवसभरात एकूण ३६ सामने झाले. या सामन्यांमध्ये उपांत्य फेरीत ८ मुले आणि ८ मुली दाखल झाल्या असून, उर्वरित सामने शनिवारी होणार आहेत. जिल्ह्यातून दोनशेवर खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून, रात्री उशिरापर्यंत सामने सुरू राहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्याण ब्लॉकचा नाशिकला फटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

महिनाभराच्या इगतपुरी स्थानकातील रेल्वे ब्लॉकनंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली होती. नाशिककरांनी सुस्कारा सोडला असतानाच आता कल्याणच्या ब्लॉकशी सामना करावा लागणार आहे. कल्याण येथील पत्रीपूल पाडण्यासाठी रविवारी (दि. १८) मध्य रेल्वेने सहा तासांचा विशेष जम्बो ब्लॉक घेण्याचे जाहीर केला आहे. सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीनपर्यंत कल्याण स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या लोकलसह लांब पल्ल्याची वाहतूक राहणार बंद राहणार आहे. त्यामुळे पंचवटी, राज्यराणीसह अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्याने नाशिककरांना घरीच बसावे लागणार आहे. मामाच्या गावावरुन रविवारी नाशिकला परतणाऱ्या आणि नाशिकहून आपल्या गावी जाणाऱ्यांची गैरसोय होणार आहे. रविवार सुटीचा वार असल्याने पंचवटी, राज्यराणीने अप-डाउन करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत.

१८ नोव्हेंबरची भुसावळ-पुणे एक्सप्रेस नाशिकऐवजी मनमाड-दौंडमार्गे धावेल. १८ तारखेला भुसावळहून सुटणारी भुसावळ पॅसेंजर तसेच एलटीटी-मनमाड अप-डाउन एक्स्प्रेस गाडी रद्द करण्यात आली आहे. पंचवटी एक्स्प्रेस, भुसावळ-मुंबई एक्स्प्रेस, राज्यराणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. डोंबिवली ते कल्याण सहा तास वाहतूक बंद राहणार असून, दुपारी चारनंतर सर्व वाहतूक सुरळीत होईल. १९ रोजी निघणारी मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द झाली असून, ही गाडी २० तारखेपासून नियमित धावणार असल्याचे रेल्वेने कळवले आहे. अप-डाउन मार्गावरील फास्ट-स्लो लोकल, एक्स्प्रेस सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे

या गाड्यांना विलंब

१८ नोव्हेंबरला मुंबईहून सुटणारी दुपारी १२.४० ऐवजी पाचला आणि मुंबई-हावडा एक्स्प्रेस सकाळी अकराऐवजी पाच वाजता सुटेल. मुंबई-पाटलीपुत्र एक्स्प्रेस रात्री साडेअकरा ऐवजी रात्री दोन वाजता सुटेल. मुंबई-गोरखपूर दुपारी सव्वादोन ऐवजी सायंकाळी पावणेसातला सुटेल. मुंबई-हावडा मेल रात्री साडेनऊऐवजी रात्री एक वाजता सुटेल. १९ नोव्हेंबरची मुंबई-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस रात्री बाराऐवजी दोनला सुटेल. तर एलटीटी-वाराणसी एक्सप्रेस रात्री साडेबाराऐवजी रात्री अडीचला सुटेल. १७ नोव्हेंबरची नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस १८ नोव्हेंबरला नाशिकरोडपर्यंतच धावेल. तेथूनच ती नागपूरला परतेल.

मार्गात बदल

१८ नोव्हेंबरला भुसावळवरुन सुटणारी हावडा-मुंबई एक्स्प्रेस, वाराणसी-एलटीटी आणि राजेंद्रनगर-पटना एक्स्प्रेस या गाड्या जळगाव-वसईरोड-दिवामार्गे जातील. भिंवडी आणि दिवा येथे त्या थांबा घेतील. एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस, एलटीटी-दरभंगा पवन एक्स्प्रेस याच मार्गाने भुसावळला जातील आणि थांबा घेतील. १८ नोव्हेंबरची भुसावळ-पुणे एक्स्प्रेस नाशिकऐवजी मनमाड-दौंडमार्गे धावेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवार चित्रवृत्त

$
0
0

रविवार चित्रवृत्त - फोटो - सतीश काळे

--

असा होतो गूळ

गोड पदार्थ कोणाला आवडत नाहीत? मात्र, साखरेपासून बनलेल्या पदार्थांमुळे मधुमेह, उच्च रक्तदाबाचा धोकाच अधिक असतो. अशा वेळी त्याला पर्याय म्हणून गूळ गुणकारी मानला जातो. त्यात सेंद्रिय गुळाला मागणी अधिक असते. पाचनशक्ती सुधारण्यासाठी गूळ खाणे उत्तम मानले जाते. स्वयंपाकघरात अत्यावश्यक बाब म्हणूनही गुळाचे स्थान अनन्यसाधारण आहे. निफाड तालुक्यातील पिंपळस येथे सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पात रोज १३ टन गूळ तयार होतो. या गूळनिर्मितीविषयी जाणून घेऊया चित्रवृत्तातून.

१. गव्हाणीमध्ये ऊस टाकताना. येथूनच ऊस बारीक करण्याच्या प्रक्रियेसाठी पुढे जातो.

२. ऊस कटिंग मशीनमध्ये बारीक केला जातो.

३. ऊस मशीनमध्ये बारीक झाल्यानंतर रोलरमधून रस काढला जातो.

४. इंटर कॅरिअरमार्फत उसाचा भुसा ज्वलनासाठी वापरला जातो.

५. उसाचा रस भट्टीत आल्यानंतर त्याची मळी वेगळी होते.

६. उसाचा रस गरम झाल्यानंतर घोटण्याची प्रक्रिया.

७. तयार झालेला गूळ थंड होण्याची प्रक्रिया.

८. तयार झालेला गूळ डब्यांमध्ये भरताना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जनतेमध्ये आदर्श निर्माण व्हावा

$
0
0

जनतेमध्ये आदर्श निर्माण व्हावा

पोलिस आयुक्तांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिसाने उत्कृष्ट सेवा द्यावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असते. नागरिक आणि पोलिस एकत्र आले तरंच गुन्हेगारी कमी होऊ शकते. यामुळे कोठेही कमी न पडता आपल्या चांगल्या वागणुकीने जनतेमध्ये आदर्श निर्माण करावा, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.

पोलिस आयुक्तालयातील कॉन्फरन्स हॉल येथे पोलिस मित्र योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणातील विजेत्यांना बक्षिस वितरण प्रसंगी सिंगल बोलत होते. त्यांच्या हस्ते या शिबिरातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. आपल्या पोशाखाबद्दल प्रत्येक पोलिस अधिकारी तसेच कर्मचाऱ्याला गर्व, अभिमान असला पाहिजे. तसेच असाच अभिमान स्वतःबद्दलही असायला हवा. आपण आपली मानसिकता, शारीरिक तंदुरुस्ती चांगली ठेवून आपल्या कुटुंबियांसह शहर, राज्य, देश व समाजाप्रती आपुलकी जोपासायला हवी. कोणताही सामाजिक भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला समान न्याय देण्यासाठी सर्वांनी कार्यरत रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रशिक्षण शिबिरात सोमनाथ राठी यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. आपल्यामधील सुप्त गुणांना वाव देत त्याचा आपल्या कामात कुशलतेने वापर करणे, शरिराबरोबरच मानिसक आरोग्य उत्तम राखण्यासाठी करायचे व्यायाम, सतत प्रोत्साहित राहून कामात आनंद निर्माण करण्याचे विविध उपाय त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. यावेळी विशेष शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे, पोलिस कल्याण विभगाच्या पोलिस निरिक्षक संगीता निकम, नयना आगलावे, कर्मचारी रूचा हिरे, हेमंत बढे आदी उपस्थित होते.

--

प्रशिक्षणाचे बदलते स्वरूप

पोलिस कर्मचाऱ्याचे काम समाधानकारक नसेल तर अशा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवले जायचे. या सर्वांना मैदानात पळायला लावणे अथवा तेथे थोडीफार माहिती दिली जात असे. या सर्वांना फाटा देत पोलिस आयुक्त सिंगल यांनी विविध विषय निवडले. त्यातील तज्ञांना निमंत्रित करून सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात नाविन्यपुर्णता आणणे तसेच त्यांचे ताण तणाव कमी करून कार्यक्षमात वाढविण्यावर भर दिला. आतापर्यंत ८० प्रशिक्षण सत्र पार पडली असून, यातून सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावाना पुस्तक मित्र मंडळातर्फे व्याख्यान

$
0
0

डॉ. गवांदे, पाराशरे यांचे व्याख्यान

नाशिक : सार्वजनिक वाचनालय, नाशिक पुस्तक मित्र मंडळाच्यावतीने नासाच्या माध्यमातून अवकाश संशोधन क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या डॉ. रोहित गवांदे आणि डॉ. चैताली पाराशरे या दाम्पत्याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

स्व. कल्पना चावला फाउंडेशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम सोमवारी (१९ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृह, सावाना आवार, टिळकपथ, नाशिक येथे हे व्याख्यान होणार आहे. नाशिक ते नासा प्रवास आणि अवकाश मोहिमेत युवकांना संधी हा व्याख्यानाचा विषय असून १४ वर्षांवरील विद्यार्थी आणि युवकांना हे व्याख्यान मार्गदर्शक ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लालकृष्ण महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुचबिहार क्रिकेट करंडक ही १९ वर्षांखालील खेळाडूची क्रिकेट स्पर्धा रणजी करंडकानंतर अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या स्पर्धेतून अनेक खेळाडूना करिअरची नवी दिशा प्राप्त झाली आहे. बीबीसीआयच्या वतीने घेण्यात येणाऱ्या चार दिवसीय कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी या वर्षी महाराष्ट्राच्या संघात नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज लालकृष्ण सोनवणे याची निवड करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सुरत येथे घेण्यात आलेल्या विनू मंकड चषक एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत लालकृष्णने आपल्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीची कमाल दाखविली होती. या स्पर्धेत लालकृष्णे सर्वाधिक १४ गडी गोलंदाजीच्या जोरावर बाद केले. लालकृष्णच्या या कौशल्यामुले कुचबिहार करंडकात सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघात त्याची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा १९ नोव्हेंबर ते २५ जानेवारी या कालावधीत घेण्यात येणार आहे. स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाची हिमाचल, छत्तीसगड, दिल्ली, तामिळनाडू, मुंबई, उत्तर प्रदेश, बडोदा या क्रिकेट संघाशी लढत होणार आहे. स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल लालकृष्ण सोनवणे याचे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे, इतर पदाधिकारी आणि खेळाडूनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पगाराच्या वादातून करंजी येथे एकाचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

करंजी (ता. निफाड) येथे चोंढी-मेंढी रस्त्यावर दत्त मंदिराजवळ गुरुवारी (दि. १५) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पगाराच्या वादातून संतोष अंबादास तांबेकर (वय २५) याचा खून झाला. सायखेडा पोलिस स्टेशनला भिमाजी अंबादास तांबेकर यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष तांबेकर हा पत्नी, मुलासह करंजी येथे राहतो. तीन महिन्यांपासून गावातील लखन झुरडे यांच्याकडे वाळूच्या ट्रॅक्टरवर तो काम करत होता. त्याच्या बरोबर काळू उर्फ आनंदा रमण आव्हाड, रोहिदास सोपान झुरडे हे पण कामास होते. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गावातीलच रोहिदास झुरडे याच्या मोटारसायकलवर गावातून गेला. रात्री दहा-साडे दहाच्या सुमारास पोलिस पाटील लखन झुरडे यांनी भिमाजी तांबेकर यांना फोनवर सांगितले की, संतोष यास मार लागला होता, त्यास नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याचा मृत्यू झाला. तांबेकर कुटुंबासोबत हॉस्पिटलमध्ये पोहचले असता संतोष मृतावस्थेत होता. त्याच्या डोक्यास, दोन्ही कानांजवळ तसेच गुप्तांगाजवळ मार लागलेला होता.

पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा ज्ञानेश्वर तांबेकर यांनी सांगितले की, दत्त मंदिराजवळ संतोष तांबेकर, रोहिदास झुरडे, काळू आव्हाड यांच्यात भांडण सुरू होते. संतोष यांस दोघांनी काठीच्या दांड्याने मारले असल्याचे मी बघितले. शुक्रवारी सकाळी तांबेकर याचे पोस्टमोटर्म करून करंजी येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिसेंबर अखेरपर्यंतकामांना गती द्या

$
0
0

आमदार राजाभाऊ वाजे यांच्या सूचना

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील पूर्वभाग असलेल्या टाकेद गटातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी इगतपुरी पंचायत समिती सभागृहात यंत्रणा, ग्रामसेवक व अधिकारी यांची आढावा बैठक आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या आढावा बैठकीत प्राधान्याने गटातील ४० गावांच्या विकास कामांवर चर्चा झाली. अनेक गावातील पाणीपुरवठा योजना अपूर्ण असल्याने कोट्यवधी रुपये खर्च होऊनही जनतेला योजनेचे पाणी मिळत नसल्याने खंत व्यक्त करण्यात आली. दरम्यान, या बैठकीत अपूर्ण योजनांवर गांभिर्याने चर्चा झाली. गावागावातील मूलभूत गरजा, या योजनांबाबत डिसेंबर अखेरपर्यंत कामांना पूर्णत्त्वाच्या दिशेने गती देण्याबाबत आमदार राजाभाऊ वाजे यांनी निर्देश दिले. यात पिंपळगाव मोर, धामनी, मांजरगाव, आदी पाणीपुरवठा योजनांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीत आमदार वाजे यांनी टाकेद गट कार्यक्षेत्रातील ग्रामपंचातीच्या संदर्भात ग्रामपंचायत निहाय आढावा घेतला. कामे पूर्ण करण्याच्या दिशेने कामात गती घेण्याबाबत आमदार वाजे यांनी सूचना केल्या. आगामी काळात दुष्काळ व टंचाईवर मात करताना उपाययोजना करण्याबाबत येत्या काही दिवसात स्वतंत्र आढावा बैठक घेण्याबाबतही वाजे यांनी सूचना केली. आढावा बैठकीत माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, उपसभापती भगवान आडोळे, अण्णा पवार, राजाभाऊ नाठे, सोमनाथ जोशी आदींनी रखडलेल्या कामांबाबत चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओबीसी आरक्षणाला धक्का नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यास आमचा सुरुवातीपासूनच पाठिंबा आहे. परंतु, हे आरक्षण देताना इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लागू नये, या स्पष्ट भूमिकेचा पुनरुच्चार माजी उपमुख्यमंत्री आणि ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी शनिवारी नाशिकमध्ये केला. समितीच्या अहवालानंतर सरकार नेमकी काय भूमिका स्पष्ट करते, त्यानंतर या विषयावर बोलणे योग्य राहील असे सूचक विधानही भुजबळ यांनी केले.

भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी सकाळी राधाकृष्णन बी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण हा राज्यात सध्या चर्चेचा मुद्दा आहे. आरक्षणाबाबत भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यास आमचा पाठिंबा आहे. परंतु, ओबीसींसाठी २७ ते ३० टक्के आरक्षण होते, त्यापैकी आता केवळ १७ ते १९ टक्केच शिल्लक राहिले आहे. या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी आमची भूमिका असून, ती सर्वच राजकीय पक्षांना मान्य आहे. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचा अधिकृत अहवाल काय येतो, यापेक्षाही सरकार त्यावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर-तर च्या मुद्द्यांवर आज बोलण्यापेक्षा सरकारची भूमिका स्पष्ट झाली की त्यावर अधिक बोलता येईल, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

-

बाळासाहेबांना आदरांजली

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त पंकज भुजबळ यांनी त्यांच्या नांदगाव मतदारसंघात होर्डिंग लावल्याने त्याकडे भुजबळ यांचे लक्ष वेधण्यात आले. पंकज यांनी मतदारसंघात अभिवादनाचे होर्डिंग लावले असतील, तर त्याने काय झाले. पंकज, समीर असेल, उध्दवजी किंवा राज ठाकरे असतील आमचे गेल्या अनेक वर्षांपासून कौटुंबीक संबंध आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्याचे योग्य काम पंकज यांनी केले आहे. मी देखील तुमच्या माध्यमातून ठाकरे यांना आदरांजली वाहतो, असे भुजबळ म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तांचा एनएसजीतर्फे सन्मान

$
0
0

पोलिस आयुक्तांचा एनएसजीतर्फे सन्मान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय सुरक्षा दलातर्फे (एनएसजी) आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान आर्यनमॅन किताब पटकवणाऱ्या पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल आणि कृष्णप्रकाश या दोघांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आज (१८ नोव्हेंबर) सकाळी साडेसहा वाजता नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे पार पडणार आहे.

ऑपरेशन ब्लॅक कमांडो या मोहिमेस १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एनएसजीने परवाह-अ ट्रिब्युट टू द २६/११ हिरोज या धर्तीवर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी हाफ मॅरेथॉन, मिनी मॅरेथॉन आणि रन फॉर फनचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमावेळी पोलिस आयुक्त डॉ. सिंगल आणि मालेगावचे तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक आणि सध्या राज्य गुप्तवार्ता विभागात पोलिस महानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कृष्ण प्रकाश यांचा गौरव करण्यात येणार आहे. फ्रान्स येथे आयोजित करण्यात आलेल्या आर्यनमॅन ट्रायलेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन या दोघांनी ती स्पर्धा यशस्वीरित्या पार करून किताब पटकवला. स्पर्धेदरम्यान दोघांची उपस्थिती एनएसजी कंमोडोंसाठी खूप प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा एनएसजीने व्यक्त केली आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी पोलिस आयुक्त डॉ. सिंगल दिल्लीला रवाना झाले असून, यामुळे नाशिकचे नाव पुन्हा एकदा देशपातळीवर पोहचले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अग्रवाल महिला अधिवेशन आज

$
0
0

अग्रवाल महिला अधिवेशन आज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अग्रनारी प्रांतिय महिला असोसिएशन संचलित महाराष्ट्र राज्य अग्रवाल महिलांचे पंधरावे प्रांतिक अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. आडगाव नाक्यावरील स्वामीनारायण सभागृहात आज (१८ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन शिर्डी संस्थानच्या सीईओ रुबल अग्रवाल, संरक्षणमंत्री सुभाष भामरे, महापौर रंजना भानसी, महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलन अध्यक्ष विजयकुमार चौधरी यांची उपस्थिती अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी असणार आहे.

राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांतून अग्रवाल महिला या अधिवेशनासाठी येणार आहेत. महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन, पारितोषिक समारंभ, सल्लामसलत असा सर्वसमावेशक स्वरुपाचे हे अधिवेशन असणार आहे. महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन, पारितोषिक समारंभ, सल्लामसलत असा सर्वसमावेशक स्वरुपाचा हे अधिवेशन असणार आहे.

- -

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला गोदाआरती

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच शनिवारी सायंकाळी इंद्रकुंड परिसरातूल पारंपरिक पध्दतीने मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर रामकुंडाजवळ पारंपरिक पध्दतीने आरती करुन गोदामाईचे पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष मालती गुप्ता, चेअरपर्सन मीना अग्रवाल, महामंत्री उषा अग्रवाल, गोपालबाबू अग्रवाल, समाजाचे प्रांतीय अध्यक्ष विजयकुमार चौधरी, नाशिकचे अध्यक्ष नेमीचंद पोद्दार, महामंत्री विमल सराफ आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारने प्रसंगाची दाहकता ओळखावी

$
0
0

सरकारने प्रसंगाची दाहकता ओळखावी

प्रमाणपत्रे जाळावी लागल्याने शिक्षण क्षेत्रातून तीव्र नाराजी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

करिअरची दिशा दाखवणाऱ्या प्राध्यापकांच्या समस्यांकडे सरकार दरबारी दखल घेतली जात नाही. विनाअनुदानित प्राध्यापकांच्या समस्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढतो आहे. आता तर पगार मागितल्यामुळे प्राध्यापकाला थेट नोकरीवरून काढून टाकणे आणि त्यामुळे संतापलेल्या प्राध्यापक पदवी प्रमाणपत्रे जाळणे या प्रसंगाची दाहकता सरकारने ओळखायला हवी, असे मत प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मांडले आहे.

पुणे येथील सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमध्ये सूरज माळी कार्यरत होते. गेल्या काही महिन्यांपासून माळी यांना कॉलेज व्यवस्थापनाने पगार दिला नाही. थकीत पगार घेण्यासाठी गेलेल्या माळी यांना व्यवस्थापनाने पगार देण्यास नकार दिला. तसेच त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. काम करूनही पगार मिळत नाही. पगार मागितल्यावर थेट कामावरून काढले जाते. त्यामुळे आजवर मिळवलेल्या पदव्या आणि प्रमाणपत्रे हवीतच कशाला, असं म्हणत माळी यांनी घरात गॅस पेटवून त्यावर पदवी प्रमाणपत्रे जाळली. मध्यमवर्गीय घरातील प्राध्यापक परागाअभावी इतके टोकाचे पाऊल उचलतो. त्यातच व्यवस्थापनाचा उर्मटपणा दिवसेंदिवस वाढतो आहे. पण सरकार दरबारी याकडे सर्रास दुर्लक्ष होते. असेच होत राहिले तर प्राध्यापक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांचीही संख्या खालावेल, अशी चिंताही प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

--

प्राध्यापकाला राग अनावर झाल्याने पदवी प्रमाणपत्रे जाळावी लागली, या घटनेची दाहकता सरकारला समजायला हवी. मध्यवर्गीय घरातल्या अनेक तरुणांची सध्या पगाराअभावी आणि नोकरीअभावी अशी परिस्थिती आहे. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, याला कंटाळून हे पाऊल उचलले जात आहे. कित्येक महिने कामाचा मोबदला मिळत नसेल तर संतापाची लाट असे वळण घेणारच. नॉन ग्रँट प्राध्यापकांच्या मागण्यांकडे आणि त्यांचे पगार वेळेत होण्याकडे आता तरी सरकाराने लक्ष द्यायला हवे.

- प्रा. डॉ. मिलिंद वाघ, सचिव, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच

--

विनाअनुदानित प्राध्यापकांच्या पगाराचा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. कॉलेज व संस्था व्यवस्थापनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सरकारकडून तासिका तत्वावर कार्यरत प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. मात्र, पुण्यातील घटनेही दाहकता अधिक आहे. पदवी जाळण्याचा विचार येणे इथपर्यंत प्राध्यापकाचा संताप होतो. प्राध्यापकांचे पगार थकविणाऱ्या व्यवस्थापनांची सरकारने चौकशी करायला हवी.

- प्रा. डॉ. संजय अहिरे, सचिव, स्फुक्टो स्थानिक शाखा

--

प्राध्यापक होण्यासाठी नेट-सेट स्पर्धा परीक्षांसाठी कंबर कसावी लागते. प्राध्यापक होण्यासाठीच्या स्पर्धेत स्वतःला झोकून देताना नोकरीचा प्रश्न समोर उभा राहतो. विनाअनुदानित तत्त्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना पगाराअभावी हाल होतात. अशा घटना कायम घडताहेत. त्यातच पदवी जाळेपर्यंत संताप होणे ही दाहकता अधिक वाटते. सरकारने प्राध्यापकांच्या प्रश्नांकडे आणि विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधीकडे लक्ष देणे अपेक्षित आहे.

- पुष्कर तिवारी, नेट-सेट परीक्षार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवार लेख

$
0
0

(निमित्त)

गुलशन का कारोबार चले

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे खास गझल प्रेमींसाठी 'शिशों का मसीहा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी, २१ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ उर्दू कवी फैझ अहेमद फैझ यांचा चरित्रप्रवास या कार्यक्रमात सांगीतिक पद्धतीने दाखवण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने...

- प्रा. डॉ. अशोक पिंगळे

फैज अहमद फैज (१९११-१९८४) यांना भारतीय उपमहाद्विपात जगविख्यात पंजाबस्थित उर्दू शायर म्हणून ओळखले जाते. आपल्या क्रांतीकारी (इन्कलाबी आणि रुमानी) रचनांमुळे संपूर्ण जगाला ज्ञात असलेले हे कवी आहे. त्यांच्या मानवतावादी विचारांनी ओतप्रोत भरलेल्या सम्मानीत झालेल्या गजलपैकी

गुलों में रंग भरे बाद-ए-नौ-बहार चले

चले भी आओ कि गुलशन का कारोबार चले

जी मेहदी हसन, रुना लैला व असंख्य गायकांनी गायलेली आहे. त्यातील दोन शेर असे आहेत

कफस उदास है यारो सबा से कुछ तो कहो

कहीं तो बहर-ए-खुदा आज जिक्र-ए-यार चले

म़कामे 'फै़ज' कोई राह में जचा ही नहीं

जो कू-ए-यार से निकले तो सू-ए-दार चले

(याचा शब्दश: अर्थ असा की, तुरुंगात उदासीनता आहे त्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या मंद वाऱ्याला सांगा की कुठे तरी माझ्या प्रियेची चर्चा असेल तेवढीच बातमी मला लागू द्या. दुसरा शेर- फै़ज आम्हाला वाटेत कोणताच मुक्काम भावला नाही. माझ्या प्रेयसीच्या गल्लीतून जे निघालो ते फाशीच्या दोरखंडापर्यंत म्हणजे थेट मृत्यूपर्यंत)

ही गजल त्यांनी २१ जानेवारी १९५४ रावळपिंडी येथील मोन्टगोमेट्री कारावासात असताना लिहिली. प्रेयसी ही देश आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. म्हणून देशाच्या स्वातंत्र्याची खबर आली तर तुरुंगातील स्वातंत्र्य सैनिकात जोश संचारतो. त्यामुळे वाटेत कोणताच मुक्काम किंवा ऐहिक सुख भावत नाही अशी स्वातंत्र्याची नशा फाशीच्या दोरखंडापर्यंतच्या प्रवासानंतरच संपते असे त्यांचे विचार होते. त्यांची देश व देशावरील प्रेमाबाबतची अशीच एक रचना -

निसार मैं तिरी गलियों के ऐ-वतन कि जहाँ

चली है रस्म कि कोई न सर उठा के चले

जो कोई चाहनेवाला तवा़फ (परिक्रमा) को निकले

ऩजर चुरा के चले जिस्म ओ जाँ बचा के चले

(हे मातृभूमी तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांना ताठ मानेने तर सोडाच परंतु गल्लीतून फिरणेही अवघड झाले आहे. दुसऱ्यांच्या नजरा चुकवत स्वत:चे प्राण वाचवत फिरावे लागत आहे.)

फै़ज यांनी देशाबद्दलचे प्रेम, दुनियाच्या दु:खाचे चित्रण आपल्या अनोख्या काव्यशैलीतून व्यक्त करीत सामान्य जनतेला प्रभावित केले. ते विसाव्या शतकातील प्रतिभा संपन्न शायर म्हणून सामान्य माणसांत प्रसिद्धीस आले म्हणूनच त्यांना इ. १९४७ मध्ये पाकिस्तान टाइम्सचे संपादकपद मिळाले. तेथे पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी व मजुरांच्या समस्यांना आपल्या लेखणीतून वाचा फोडली. भारत-पाकिस्तान फाळणी, स्वातंत्र्य व स्वातंत्र्याच्या वाटाघाटी त्यांना मान्य नव्हत्या. स्वातंत्र्यापूर्वी सामान्य जनतेने जी स्वप्ने उराशी बाळगली होती ती पूर्ण न झाल्याची खंत त्यांनी आपल्या शायरीतून व्यक्त केली. फाळणीनंतर नव्या वातावरणात नवीन विचार प्रवाह, समीकरणे सांस्कृतिक धृवीकरणात निर्माण झाली. फै़ज अहमद फै़ज पाकिस्तानात आणि साहिर लुधयानवी भारतात. राष्ट्रवादी विचारसरणी व कम्युनिझमची छाप २० व्या शतकाच्या पूर्वाध व उत्तरार्धात साहित्यावर उमटत होती. नव्या तरुणाईची भाषा, त्यांचे आश्वासक आव्हाने, शेतकरी मजुरांचे प्रश्न जुनी वास्तव स्थित्यंतरे, भूतकाळातील दु:ख, वेदना यांची नोंद साहिर व फै़ज समवेत जोश मलिहाबादी, अली सरदार जा़फरी, कै़फी आझमी सुद्धा त्यांच्या लेखणातून करीत होते.

फै़ज यांचा जन्म १९११ चा, साहिर यांचा जन्म १९२१ आणि फरा़ज यांचा १९३१ त्यामुळेच की काय परंतु साहिर व फराजच्या शायरीवर फै़ज यांचा प्रभाव दिसत होता तो त्या-त्या दशकातील सामाजिक व राजकीय अस्वस्थतेमुळे. साहित्यविश्वात १९३५ ते १९६५ ही तीस वर्षे जादुई होती आणि त्याला कारणीभूत होते फै़ज. कारण त्यांनी स्वातंत्र्य लढा, वास्तविकता यांचा रोमँटिसिझमच्या माध्यमातून जो अविष्कार घडवला होता त्याने अवघे साहित्यविश्व स्तंभित झाले होते. सरगोधा आणि लायलपूर मध्ये त्यांना पेन, कागद आणि वर्तमानपत्र वापरण्यास व वाचनास बंदी होती. या कठीण प्रसंगीही दु:खी न होता ते त्यांच्या लिखाणामधून जास्तच प्रतिभासंपन्न दिसून आले. त्यांच्या काव्याला त्यांनी नवीन निखार देण्यासाठी आणि सरकारला चकमा देण्यासाठी ही प्रतिकांची शैली अधिक बळकट आणि विस्तृत केली.

मता-ए-लौह-ओ-कलम छिन गई तो क्या गम है

कि खून-ए-दिल में डुबो ली हैं उँगलियाँ मैं ने

जबाँ पे मोहर लगी है तो क्या कि रख दी है

हर एक हल़्का-ए-जंजीर में जबाँ मैं ने

(माझी लेखणी, कागद, जरी काढून घेतले पण हृदयातील रक्तात बोटं बुडवून आहे... माझे तोंड जरी तुम्ही बंद केलं म्हणून काय झालं? माझ्या साखळदंडाच्या प्रत्येक कडीवर शब्द पेरून ठेवले आहेत.)

त्यानंतरच्या काळात म्हणजे १९५७ मध्ये भारतामध्ये कर्जबाजारी शेतकऱ्यांची दयनीय स्थिती, स्त्रियांचे शोषण, शेतमजुरांचे प्रश्न, तरुणांची बेरोजगारी त्यातून आलेले नैराश्याचे चित्रण करताना आणि प्यासा चित्रपटाद्वारे व्यक्त होताना साहिर लिहतात -

ये महलों, ये तख्तों ये ताजों की दुनिया

ये इनसां के दुश्मन समाजों की दुनिया

ये दौलत के भूखे रिवा़जों की दुनिया

ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है

हर एक जिस्म घायल, हर एक रुह प्यासी

निगाहों में उलझन, दिलों मे उदासी

ये दुनिया है या अलम-ए-बदहवासी

ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है

लायलपूर जेलमधून सुटल्यानंतर फै़ज यांनी पुन्हा 'पाकिस्तान टाइम्स'च्या संपादक प्रवासास प्रारंभ केला होता. जेलमध्ये राहिल्याने ते विश्वविख्यात शायर म्हणून प्रसिद्धीच्या प्रकाश झोतात राहिले. त्यांच्या लिखाणात दाहक वास्तवतेचे रुप दिसून येत होते. इ. १९५८ मध्ये त्यांचे लिखित साहित्याचे इतर भाषांमध्ये अनुवादन झाले. केवळ रुसी भाषेतच फै़ज यांच्या काव्याच्या पुस्तकाची एकूण दोन लाख दहा हजार प्रति प्रकाशित झाल्या. १९६२ मध्ये त्यांना 'लेनिन प्राईड' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या शायरीवर बांगलादेशाचे राष्ट्रीय कवी का़जी ऩजरूल इस्लाम यांचा प्रभाव होता. इ. १९७४ मध्ये बांगलादेश स्वातंत्र्यानंतर राजकीय चर्चेसाठी पाकिस्तानचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष झुल्फिकार भुट्टो यांचे समवेत फैज बांगलादेशाची राजधानी ढाका येथे गेले होते. बांगलादेश मुक्ती संग्रामातील नरसंहाराचे प्रमुख सुत्रधार भुट्टो होते अशी धारणा साहित्याशी संबंधित विचारमंथन करणाऱ्या जनतेची होती. त्यामुळे त्यांनी फै़ज यांना भेटण्यास नकार दिला होता. हे दु:ख त्यांनी आपल्या शायरीतून व्यक्त केले. फै़ज यांची शायरी खऱ्या व्यक्तीची हिंमत, माणुसकी, त्यावरील प्रेम व सुंदर भविष्यासाठीचा विश्वास संपादन करणारी आहे. म्हणूनच त्यांचा आवाज जगात अशा संघर्षमय माणसांच्या स्फंदनात आहे की जे तुरुंगातील वेड्या व फाशीच्या दोरीत गुंजन करताना भासवतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर अधिवेशनात जाब विचारू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील काही महसुली मंडळे दुष्काळाच्या झळा सोसत असूनही त्यांचा दुष्काळी म्हणून समावेश झालेला नाही. अशा वंचित महसुली मंडळांमध्ये पुन्हा तपासणी करून त्यांनाही अन्य दुष्काळी भागांप्रमाणेच समान न्याय द्यावा, अशी मागणी आपण हिवाळी अधिवेशनात करणार आहोत, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी नाशिकमध्ये दिली. पालखेडमधून १९ नोव्हेंबरला पाण्याचे आवर्तन न सोडल्यास हिवाळी अधिवेशनात जाब विचारू, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.

पालखेड डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडावे यासह अन्य काही मागण्यांसाठी भुजबळ यांनी शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, आमदार नरहरी झिरवाळ, डॉ. भारती पवार, माजी आमदार दिलीप बनकर यांसह जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य संजय बनकर, शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, अरुण थोरात, गणपत कांदळकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, अधीक्षक अभियंता राजेश मोरे आदी उपस्थित होते.

पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना अत्यंत दाहक परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याकडे भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. १२ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत आवर्तन सोडू, असा शब्द प्रशासनाने दिला होता. मात्र, तो शब्द न पाळल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. एकदा मुहूर्त टळला असून, आता पुन्हा १९ नोव्हेंबरचा मुहूर्त सांगण्यात आला आहे. याच काळात हिवाळी अधिवेशनही सुरू होते आहे. आता मुहूर्त टळला तर या प्रश्नावर अधिवेशनात हैदोस घालू. का त्रास देताय, अशी विचारणा अधिवेशनात करू, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. दिंडोरी, निफाड, येवला आणि सुरगाणा यांसारख्या काही तालुक्यांमधील महसुली मंडळांत पाणीटंचाईची दाहकता जाणवत असली तरी सरकारने त्यांची दुष्काळी म्हणून नोंद घेतलेली नाही. अशा मंडळांमध्ये पुन्हा तपासणी करून त्यांना समान न्याय द्यावा, अशी मागणी हिवाळी अधिवेशनात केली जाईल, असेही भुजबळ यांनी सांगितले. पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर लाभक्षेत्रातील दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम केलेला आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामासाठी आवर्तन द्यावे अशी मागणी मी यापूर्वी केली होती. आवर्तनाबाबत नियोजन नसल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके जळू लागल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून द्राक्षे, डाळिंबासह रब्बीची पिके घेतली आहेत. येवला व निफाड तालुक्यात शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची मोठे नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. जिल्ह्यातील येवला, लासलगांव, ओझर आणि पिंपळगाव या महसुल मंडळांमध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना या मंडळांचा समावेश न झाल्याने या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्यासाठी सरकारला अहवाल पाठवावा, अशी मागणी या वेळी केली.

उद्या पाणी सोडणार

पालखेड डाव्या कालव्यातून निफाड, येवला, मनमाड, मनमाड रेल्वे व कालव्यावर अवलंबून असलेल्या अन्य भागांसाठी पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात आली. सोमवारी (दि. १९) पाणी सोडू, अशी ग्वाही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी भुजबळ यांना दिली आहे. त्याबाबतचे आदेशही सायंकाळी काढण्यात आले. पिण्यासाठी ३५० दशलक्ष घनफूट, तर सिंचनासाठी १५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. दोन्ही आवर्तने एकाचवेळी सोडण्यात येणार असून, तीन आठवडे हे आवर्तन सुरू राहील, अशी माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोडगेनजीक बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

आठवड्यातील दुसरी घटना; बिबट्यांचा अधिवास धोक्यात

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील झोडगेगावानजीक कंधाणे शिवारात असलेल्या धनदाई माता मंदिर टेकडीनजीक शनिवारी बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाला. या आठवड्यातील बिबट्याच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. मृत बिबट्याला वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांनी शवविच्छेदनासाठी लोणवडे येथील नर्सरीत आणले होते. बिबट्याच्या खाण्यात आलेल्या अन्नातून त्यास विषबाधा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

झोडगेनजीक असलेल्या कंधाणे शिवारातील डोंगर परिसरात दाट झाडी असल्याने गेल्या काही दिवसांपासून येथे बिबट्याचा वावर आढळून आल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शनिवारी देखील या टेकडीनजीक असलेल्या खड्ड्यांत बिबट्याची चाहूल शेतात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांना लागली. बघता बघता बिबट्या दिसल्याची वार्ता झोडगे, कंधाणे परिसरात पसरल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांची बिबट्याला पाहण्यासाठी चांगलीच गर्दी झाली.

बिबट्या आढळल्याची माहिती वनविभागास मिळताच वनपरीक्षेत अधिकारी व्ही. डी. कांबळे, बी. एस. सूर्यवंशी, अतुल देवरे, तुषार देसाई, ए. बी. देवरे आदी घटनास्थळी पोहचले होते. यावेळी खड्ड्यात काहीसा निद्रावस्थेत पडलेला बिबट्या हालचाल करीत नसल्याची बाब वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. मात्र एरवी गर्दी व गोंगाटामुळे बिबट्या आक्रमक होत असतात. त्यामुळे शांत असलेल्या या बिबट्याविषयी आश्चर्य व्यक्त होत होते. अखेर बिबट्या हालचाल मंदावल्याचे लक्षात येताच वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. डी. गुडगे यांच्या मदतीने त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

विषबाधेने मृत्यू झाल्याचा संशय?

मृत बिबट्यास शवविच्छेदन करण्यासाठी लोणवाडे येथील नर्सरीत आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुडगे यांनी त्याचे शवविच्छेदन केले. बिबट्याच्या पोटात अन्न आढळून आले असून, यातून त्यास विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या विषबाधेमुळेच बिबट्या मरण पावला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्याच्या पोटातील अन्नाचे नमुने नाशिक येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

आठवड्यात दुसरी घटना

याच आठवड्यात बिबट्या मरण पावल्याची ही दुसरी घटना आहे. बुधवारी देखील दहिदी-करंजगव्हाण रस्त्यावर हाताणे फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला होता. गेल्या अकरा महिन्यात एकूण चार बिबटे मरण पावले आहेत. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे वनक्षेत्रात अन्न पाण्याचा टंचाई निर्माण झाल्यामुळेच हे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे येत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images