Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जुगार खेळणारा भाजप नगरसेवक फरार

$
0
0

पोलिसांच्या कारवाईत पाच जण अटकेत

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

जुगार अड्डे, गावठी दारू तयार करणे, मटका खेळणे, अवैध दारू विक्री आदींसाठी कुप्रसिद्ध असलेल्या वाघाडी परिसरात गुन्हे शाखेच्या युनिट १ ने कारवाई करीत जुगार खेळणाऱ्या भाजपच्या विद्यमान नगरसेवकांसह आठ जुगाऱ्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १६ हजार ३२० रुपये रोख आणि जुगार खेळण्यासाठी असलेला पत्त्याचा कॅट जप्त केला आहे. पोलिसांची चाहूल लागताच संशयित तिघे जुगारी संरक्षक भिंतीवरून उड्या मारून पळून जाण्यात यशस्वी झाले.

पंचवटी पोलिस ठाण्याच्या पूर्वेला काही अंतरावर असलेल्या मेरीच्या मोकळ्या मैदानावर अंदर बाहर (काठी फिराव) नावाचा जुगार खेळविला जात असल्याची माहिती गुन्हे शोध पथक एकचे वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने सहायक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, प्रवीण कोकाटे, येवाजी महाले, विशाल काठे, संतोष कोरडे, दिलीप मोंढे, गणेश वडजे, राहुल पालखेडे यांच्या पथकाला मार्गदर्शन करून वाघाडी येथील संबंधित ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने अड्ड्यावर छापा टाकला. घटनास्थळी त्याठिकाणी जमीर आसिफ शेख (३२ रा. गणेश चौक, सिडको), कुणाल दशरथ पाटील ( ३२ रा. वाल्मीक नगर), रमीज इकबाल शेख (२८ रा. श्रीजी कॉम्प्लेक्स इंदिरानगर), योगेश गोपीनाथ आव्हाड (३० रा. सेवाकुंज), संभाजी शंकर कदम (३८ रा. पृथ्वी टॉवर देवळाली गाव) हे जुगारी ५२ पाणी पत्त्याचे कॅटवर जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना अटक केली. तर नगरसेवक हेमंत शेट्टी (रा. कृष्णनगर), भरत पुराणिक उर्फ डागन, सचिन पाटील ऊर्फ जॅक हे संरक्षक भिंतीवरून उड्या मारून फरार झाले.

पंचवटी पोलिसांवर प्रश्नचिन्ह

गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने सोमवारी (दि. १२) सायंकाळी सहा वाजता धडक कारवाई करीत पाच संशयितांना अटक केली असून भाजपचे प्रभाग ४ चे विद्यमान नगरसेवक हेमंत शेट्टी यांसह आठ संशयितांच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात केला आहे. याबाबत पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला याचा मागमूसही नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाइन बँकिंगद्वारे लांबविली रोकड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियामधील खात्यातून परस्पर एक लाख ११ हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार पुढे आला आहे. आनंदवली परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने या प्रकरणी सायबर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

प्रशांत सुरेश अहिरराव (वय ३८, रा. पाटील नेस्ट, आनंदवली, गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचे खाते आहे. त्यांच्या बँक खात्यामधून अज्ञात व्यक्तीने १३ मे ते २६ जून २०१८ या कालावधीत परस्पर १ लाख १० हजार ६८५ रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दुचाकी घसरून तरुण ठार

नाशिक : भरधाव दुचाकी दुभाजकावर धडकल्याने परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाला. औरंगाबाद रोडवरील नांदूर शिवारात ही घटना घडली. आडगाव पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली आहे. मुकेश बलकसिंग यादव (वय ३२, रा. अकोडा, मध्य प्रदेश, हल्ली, नांदूर नाका) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. मुकेश हा गुरुवारी (दि. ८) रात्री औरंगाबाद नाक्याकडून नांदूर नाक्याकडे दुचाकीवरून जात होता. गावकरी हॉटेलसमोर दुचाकी घसरून तो दुभाजकावर फेकला गेला. या अपघातात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

फटाके फोडण्यास विरोध केल्याने चाकू हल्ला

नाशिक : घरासमोर फटाके फोडण्यास मज्जाव केला म्हणून टोळक्याने तरुणावर चाकूहल्ला केला. दिंडोरी रोडवरील वडनगर भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी कोळीवाड्यातील तिघांविरोधात म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विश्वास दिलीप शार्दुल (वय २६, रा. वडनगर, म्हसरूळ) यांनी तक्रार दाखल केली. कोळीवाड्यातील महेश नावाचा युवक रविवारी (दि. ११) सायंकाळी शार्दुल यांच्या घरासमोर फटाके फोडत होता. यावेळी शार्दुल यांनी त्यास येथे फटाके फोडू नको, असे सांगितले. त्यामुळे वाद निर्माण झाला. महेशने अन्य तीन साथीदारांना तेथे बोलावून घेत विश्वासला शिवीगाळ केली. तसेच त्याच्यावर चाकूहल्ला केला.

पेठरोडला घरफोडी

नाशिक : पेठरोडवरील आरटीओ कार्यालयालगत अश्वमेधनगर परिसरात बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने सुमारे २९ हजारांचा ऐवज चोरून नेला. म्हसरूळ पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रदीपकुमार मनोहर इंपाळ (रा. अश्वमेधनगर) यांनी फिर्याद दिली आहे. इंपाळ कुटुंबीय दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून सोन्याचांदीचे दागिने, बँकेचे पासबुक आणि एटीएम असा सुमारे २९ हजाराचा ऐवज चोरून नेला.

बसची बॅटरी गायब

नाशिक : एसटी बसची बॅटरी चोरून नेल्याची घटना पंचवटी डेपोत घडली आहे. द्वारकानाथ विश्वनाथ गवळी (रा. केतकीनगर, म्हसरूळ) यांनी पंचवटी पोलिसात फिर्याद दिली आहे. नाशिक आगाराची बस (एमएच १४ बीटी १३४०) रविवारी (दि. ११) रात्री डेपोमध्ये उभी होती. चोरट्यांनी बसची सुमारे तीन हजार रुपयांची बॅटरी चोरून नेली.

महिलेची पोत लांबविली

नाशिक : कट लागल्याच्या कारणातून कारचालकाला मारहाण करीत दुचाकीस्वाराने महिलेची पोत हिसकावून पोबारा केला. जेहान सर्कलजवळ सोमवारी (दि. १२) दुपारी हा प्रकार घडला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे. दिंडोरी रोडवरील राहुल बापूराव पाटील (रा. कलानगर, आकाश पेट्रोल पंपामागे) यांनी फिर्याद दिली आहे. राहुल सोमवारी दुपारी आपल्या मामी व मावशीला घरी सोडण्यासाठी कारने जात होते. जेहान सर्कलजवळ अ‍ॅक्सेस मोपेडवरून लहान मुलीसमवेत आलेला दुचाकीस्वार थांबला. कट का मारला, अशी विचारणा करीत त्याने कारची काच फोडली. पाटील त्यास समजावून सांगत असताना त्याने त्यांना मारहाण सुरू केली. वाद मिटविण्यासाठी दोन्ही महिला कारमधून उतरल्या. संशयिताने त्यांनाही शिवीगाळ केली. एका महिलेच्या गळ्यातील सुमारे ३६ हजारांची सोन्याची पोत हिसकावून त्याने पोबारा केला.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये लवकरच रेल्वे चाइल्ड लाइन

$
0
0

नांदगाव ते इगतपुरी स्टेशन कार्यक्षेत्रात होणार कार्यान्वित

....

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

...

नाशिक : कोणत्या ना कोणत्या कारणांनी भरकटणारी, कुटुंबीयांपासून मनाने दुरावलेली मुले रेल्वेचाच आधार घेत असल्याचे निरीक्षण चाइल्ड लाइनने नोंदविले आहे. अशा मुलांच्या समुपदेशनासह त्यांच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करता यावे, याकरिता देशभर रेल्वे चाइल्ड लाइनचे जाळे निर्माण करण्यास चाइल्ड लाइन इंडिया फाउंडेशनने सुरुवात केली आहे. देशभरात आतापर्यंत ३० ठिकाणी कार्यान्वित असलेली रेल्वे चाइल्ड लाइन हायरिस्क झोनमध्ये असलेल्या नाशिकमध्येही लवकरच सुरू होणार आहे.

एक दिवसांच्या बाळापासून अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर पावले ठेऊ पहाणाऱ्या युवांच्या पुनर्वसनासाठी चाइल्ड लाइन इंडिया फाउंडेशन काम करीत आहे. देशभरात ४८० हून अधिक शहरांपर्यंत चाइल्ड लाइनचा विस्तार वाढला आहे. अनाथ, निराधार अवस्थेत सापडणारी, भीक मागणारी, गुन्हेगारीकडे ओढली गेलेली, बालकामगार म्हणून काम करणारी, कुटुंबीयांपासून दुरावलेली, अत्याचाराचा बळी ठरलेल्या बालकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समुपदेशनासह पुनर्वसनाचे काम चाइल्ड लाइन करीत आहे. काही मुले जाणीवपूर्वक घर सोडतात, काही हरवतात, तर काही व्यसनाधिनतेमुळे भरकटतात. रेल्वे स्टेशन परिसरात अशा अल्पवयीनांचे प्रमाण वाढू लागले आहे. चाइल्ड लाइनच्या १०९८ या हेल्पलाइन क्रमांकावर त्याबाबतची माहिती सातत्याने प्राप्त होत असते. विशेषत: रात्री नऊपासून पहाटेपर्यंत याबाबतचे कॉल्स येत असल्याने त्याचक्षणी संबंधित बालकांपर्यंत पोहोचून त्यांना मदत पोहोचविण्यात चाइल्ड लाइनला अनेक मर्यादा येत आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाच्या मदतीने चाइल्ड लाइन ऑफ इंडिया फाउंडेशनने रेल्वे चाइल्ड लाइन कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनल्स या ठिकाणी चाइल्ड लाइन कार्यान्वित झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातही रेल्वे तसेच, रेल्वे स्थानकांवर बेवारस अवस्थेत बालके आढळण्याचे प्रमाण वाढते आहे. यामुळे नाशिक रेल्वेस्टेशन येथे रेल्वे चाइल्ड लाइन सुरू करण्यास फाउंडेशनने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यात नांदगाव ते इगतपुरी स्टेशन या कार्यक्षेत्रासाठी रेल्वे चाइल्ड लाइन सुरू होऊ शकणार आहे.

-

काय आहे रेल्वे चाइल्ड लाइन

चाइल्ड लाइनची जबाबदारी दिली जाईल, त्या स्वयंसेवी संस्थेचे रेल्वे स्थानकावर कार्यालय असेल. तेथे केंद्र समन्वयकांबरोबरच आठ ते दहा जणांचे पथक कार्यरत असेल. बालक असुरक्षित असल्याची किंवा ते भरकटत आल्याची माहिती मिळाली, तर त्यांच्यापर्यंत वेळीच पोहोचून मदत करण्यास, त्यांनी घर सोडले असल्यास त्यांचे समुपदेशन करून पुन्हा कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यास मदत करू शकेल.

...

रेल्वेत एखाद्या बालकाची सुटका करण्यासाठी आम्ही गेलो, तर लोक आमच्याकडेच संशयाने बघतात. त्यामुळे मदतकार्यात अडचणी येतात. रेल्वे पोलिसातील कर्मचारी अनोळखी असतील, तर त्यांची मदत मिळण्यातही आम्हाला मर्यादा येतात. रेल्वे चाइल्ड लाइन सुरू झाली, तर अशा अनेक अडचणी दूर होऊन बालकांना अपेक्षित मदत मिळू शकेल. सहा महिन्यांत ही चाइल्ड लाइन सुरू होणे अपेक्षित आहे.

- प्रवीण आहेर, समन्वयक, चाइल्ड लाइन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर स्वच्छतेची झाडाझडती

$
0
0

- तब्बल ३६७ सफाई कामगार गैरहजर

- विभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीचा माहोल ओसरल्यानंतरही शहरात कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील स्वच्छतेची मंगळवारी अचानकपणे झाडाझडती घेतली. पहाटेच्या सुमारास अधिकाऱ्यांना सहाही विभागांत तपासणीसाठी पाठविल्यानंतर तब्बल ३६७ सफाई कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले आहे. याची गंभीर दखल घेत आयुक्त मुंढे यांनी विभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. जे कर्मचारी कायम गैरहजर असतील, अशांवर निलंबनाची कारवाई करण्याचे फर्मानही त्यांनी सोडले आहे.

अनेक दिवसांपासून शहरातील कचऱ्याच्या समस्येवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आयुक्त मुंढे महापालिकेत रुजू झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस सफाई कर्मचाऱ्यांनी इमानेइतबारे काम केले. मात्र, त्यानंतर पुन्हा आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. त्यामुळे शहरात पुन्हा कचरा दिसू लागला होता. दिवाळीच्या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात कचरा झाला होता. ज्या प्रमाणात स्वच्छता व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नव्हती. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही कर्मचारी सफाई करण्यासाठी येत नव्हते. ऑनलाइन अॅपवरदेखील सर्वाधिक तक्रारी सफाईबाबतच होत्या. याबाबत आयुक्तांनी आरोग्य विभागाला सूचना दिल्या. मात्र, त्यावर कार्यवाही होत नसल्याने आयुक्तांनी मंगळवारी शहरातील प्रभागांची अचानक तपासणी करून गैरहजर असलेल्या ३६७ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आयुक्त मुंढे यांनी सोमवारी रात्री सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी सकाळी महापालिकेच्या मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले. अधिकारी हजर होताच त्यांना स्वच्छता ऑपरेशनची माहिती देऊन स्वच्छता निरीक्षकांच्या कार्यालयात हजेरी रजिस्टर तपासण्यास सांगण्यात आले, त्याचप्रमाणे शहरात स्वच्छता होते की नाही, याबाबत नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यास सांगण्यात आले. जे विनापरवानगी गैरहजर असतील, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. या आदेशान्वये सर्व खातेप्रमुखांनी शहरातील प्रभाग तपासले. या तपासणीत १६० कर्मचारी कुणालाही न सांगता कामावर येत नसल्याचे आढळून आले, तर २०७ कर्मचारी सुटीवर असल्याचे निष्पन्न झाले. शहरात १५५० कर्मचारी असताना ३६७ कर्मचारी गैरहजर असल्याने शहरातील स्वच्छता कशी होणार, हा प्रश्न उपस्थित झाला. प्रभाग क्रमांक २३ मध्ये महापालिका कर्मचाऱ्याच्या नावावर दुसराच कर्मचारी काम करताना आढळला. या प्रकरणामुळे शहरातील सहाही विभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून, जे कर्मचारी कायम गैरहजर असतील अशा कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता निरीक्षक पाठीशी घालत असतील, अशा स्वच्छता निरीक्षक, विभागीय स्वच्छता निरीक्षकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, अशा प्रकारची कारवाई सातत्याने करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. महापालिकेच्या विभागप्रमुखांनी कारवाई केल्यानंतरही सायंकाळी कचऱ्याचे ढीग कायम होते.

१५५०

सफाई कर्मचारी

१६०

विनापरवानगी गैरहजर

२०७

कर्मचारी सुटीवर

३६७

एकूण कर्मचारी सुटीवर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये लवकरच रेल्वे चाइल्ड लाइन

$
0
0

नांदगाव ते इगतपुरी स्टेशन कार्यक्षेत्रात होणार कार्यान्वित

....

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

...

नाशिक : कोणत्या ना कोणत्या कारणांनी भरकटणारी, कुटुंबीयांपासून मनाने दुरावलेली मुले रेल्वेचाच आधार घेत असल्याचे निरीक्षण चाइल्ड लाइनने नोंदविले आहे. अशा मुलांच्या समुपदेशनासह त्यांच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करता यावे, याकरिता देशभर रेल्वे चाइल्ड लाइनचे जाळे निर्माण करण्यास चाइल्ड लाइन इंडिया फाउंडेशनने सुरुवात केली आहे. देशभरात आतापर्यंत ३० ठिकाणी कार्यान्वित असलेली रेल्वे चाइल्ड लाइन हायरिस्क झोनमध्ये असलेल्या नाशिकमध्येही लवकरच सुरू होणार आहे.

एक दिवसांच्या बाळापासून अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर पावले ठेऊ पहाणाऱ्या युवांच्या पुनर्वसनासाठी चाइल्ड लाइन इंडिया फाउंडेशन काम करीत आहे. देशभरात ४८० हून अधिक शहरांपर्यंत चाइल्ड लाइनचा विस्तार वाढला आहे. अनाथ, निराधार अवस्थेत सापडणारी, भीक मागणारी, गुन्हेगारीकडे ओढली गेलेली, बालकामगार म्हणून काम करणारी, कुटुंबीयांपासून दुरावलेली, अत्याचाराचा बळी ठरलेल्या बालकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समुपदेशनासह पुनर्वसनाचे काम चाइल्ड लाइन करीत आहे. काही मुले जाणीवपूर्वक घर सोडतात, काही हरवतात, तर काही व्यसनाधिनतेमुळे भरकटतात. रेल्वे स्टेशन परिसरात अशा अल्पवयीनांचे प्रमाण वाढू लागले आहे. चाइल्ड लाइनच्या १०९८ या हेल्पलाइन क्रमांकावर त्याबाबतची माहिती सातत्याने प्राप्त होत असते. विशेषत: रात्री नऊपासून पहाटेपर्यंत याबाबतचे कॉल्स येत असल्याने त्याचक्षणी संबंधित बालकांपर्यंत पोहोचून त्यांना मदत पोहोचविण्यात चाइल्ड लाइनला अनेक मर्यादा येत आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाच्या मदतीने चाइल्ड लाइन ऑफ इंडिया फाउंडेशनने रेल्वे चाइल्ड लाइन कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनल्स या ठिकाणी चाइल्ड लाइन कार्यान्वित झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातही रेल्वे तसेच, रेल्वे स्थानकांवर बेवारस अवस्थेत बालके आढळण्याचे प्रमाण वाढते आहे. यामुळे नाशिक रेल्वेस्टेशन येथे रेल्वे चाइल्ड लाइन सुरू करण्यास फाउंडेशनने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यात नांदगाव ते इगतपुरी स्टेशन या कार्यक्षेत्रासाठी रेल्वे चाइल्ड लाइन सुरू होऊ शकणार आहे.

-

काय आहे रेल्वे चाइल्ड लाइन

चाइल्ड लाइनची जबाबदारी दिली जाईल, त्या स्वयंसेवी संस्थेचे रेल्वे स्थानकावर कार्यालय असेल. तेथे केंद्र समन्वयकांबरोबरच आठ ते दहा जणांचे पथक कार्यरत असेल. बालक असुरक्षित असल्याची किंवा ते भरकटत आल्याची माहिती मिळाली, तर त्यांच्यापर्यंत वेळीच पोहोचून मदत करण्यास, त्यांनी घर सोडले असल्यास त्यांचे समुपदेशन करून पुन्हा कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यास मदत करू शकेल.

...

रेल्वेत एखाद्या बालकाची सुटका करण्यासाठी आम्ही गेलो, तर लोक आमच्याकडेच संशयाने बघतात. त्यामुळे मदतकार्यात अडचणी येतात. रेल्वे पोलिसातील कर्मचारी अनोळखी असतील, तर त्यांची मदत मिळण्यातही आम्हाला मर्यादा येतात. रेल्वे चाइल्ड लाइन सुरू झाली, तर अशा अनेक अडचणी दूर होऊन बालकांना अपेक्षित मदत मिळू शकेल. सहा महिन्यांत ही चाइल्ड लाइन सुरू होणे अपेक्षित आहे.

- प्रवीण आहेर, समन्वयक, चाइल्ड लाइन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेताना पोलिसाला पकडले

$
0
0

नाशिक : फसवणुकीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून नाव न घेण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागून त्यापैकी पाच हजार रुपये स्वीकारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. मंगळवारी मुंबईनाका पोलिस स्टेशन समोरील आवारात ही कारवाई करण्यात आली. योगेश शंकर लोंढे असे या पोलिस शिपायाचे नाव आहे. तक्रारदाराच्या मित्राविरोधात मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत्यूनंतरही बाबूजींची अवहेलनाच!

$
0
0

शासकीय इतमामात अंत्यसंस्कारापासून वंचित

...

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

आयुष्यभर तत्त्वांशी बांधिलकी सांगणारे व मूल्यांशी निगडित राहणारे राजकारण करीत आपले वेगळे अस्तित्व जपणारे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते कॉ. माधवराव गायकवाड हे मरणानंतरही सरकार दरबारी उपेक्षितच राहिले. जिल्हा प्रशासन व राज्य सरकारच्या अनास्थेमुळे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. यामुळे सरकार टीकेचे धनी बनले आहे.

स्वातंत्र्य सैनिक, गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढा, हैदराबाद मुक्ती संग्राम अशा तिन्ही लढ्यात कॉ. गायकवाड यांचे योगदान होते. तसेच, ते विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते होते. असे असताना या लढवय्या नेत्याचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार तसेच, मानवंदना देण्यासंबंधी जिल्हा प्रशासन व मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती दिली होती. मात्र, चोवीस तास उलटूनही त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार की नाहीत हे स्पष्ट होत नव्हते. राज्यमंत्री दादा भुसे यांनीदेखील याबाबत पाठपुरावा केला. अखेर अंत्यसंस्कार सुरू असताना प्रशासनाकडून याबाबतचा फॅक्स पाठवून काही काळ थांबण्याची विनंती करण्यात आली. पण, गायकवाड कुटुंबीय व बाबूजींच्या कॉम्रेड अनुयायांनी तो नाकारून साध्या पद्धतीने अंत्यसंस्कार करून नंतर राज्य सरकारला धारेवर धरले. गायकवाड कुटुंबीय देखील नाराज झाले. त्यामुळे शासनाच्या गौरवाची वाट न पाहता अंत्यविधी करण्यात आल्याचे साधना गायकवाड यांनी सांगितले.

...

मटा भूमिका

कष्टकऱ्यांसाठीच सारे आयुष्य वेचलेल्या कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या अंत्यविधीप्रसंगी शासन- प्रशासनाने घातलेला घोळ हा लज्जास्पद तर आहेच शिवाय संसदीय परंपरांचा भंग करणाराही आहे. स्वातंत्र्य संग्रामापासून हैदराबाद व गोवा मुक्ती लढ्यात सहभाग, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते व विधानसभा सदस्य अशी सारी पात्रता असतांना बाबूजींचा अंत्यविधी शासकीय इतमामात न होणे हा शासनाने सद्सदविवेकबुध्दीला रजा दिल्याचे द्योतक आहे. डाव्या चळवळीतील तत्त्वनिष्ठ नेत्याला मृत्यूपश्चात मिळालेली ही वागणूक राज्याच्या पुरोगामी प्रतिमेला धक्का देणारी ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीची जीवनशैली, आजारांना आमंत्रण देई!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मधुमेह हा केवळ जीवनशैलीच्या अनियमिततेतून उद्भवाणारा आजार असल्याचा गैरसमज आहे. या आजारासाठी असणाऱ्या अनेक कारणांपैकी एक कारण चुकीची जीवनशैली असले तरीही हे सर्वव्यापी कारण नाही. तरीही एकसमान कार्यपध्दती आणि खानपान पध्दती असणाऱ्या विशिष्ट समूहांमध्ये मधुमेहासारखे आजार फोफावत असल्याची अलिकडील वैद्यकीय निरीक्षणे वास्तवावर बोट ठेवत असल्याची बाब 'मटा राऊंड टेबल' चर्चेत अधोरेखीत झाली.

नाशिक शहर आणि जिल्ह्यातही तज्ज्ञ डॉक्टरांची याबाबत सूक्ष्म निरीक्षणे आहेत. विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट खानपान पध्दती, आहाराच्या विशिष्ट वेळा आणि अत्याधुनिक यंत्रांमुळे कमी झालेली श्रमपध्दती या कारणांमुळे विशिष्ट समूहच मधुमेहजन्य आजारांना मोठ्या संख्येने बळी पडत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. यासाठी डॉक्टरांना अशा समूहातील रुग्णांवरील उपचार पध्दतीने विशिष्ट औषधांची मात्र द्यावी लागते. या समूहातील रुग्णांशी संवाद साधून समुपदेशनाव्दारे त्यांच्या जीवनशैलीत आरोग्यास पूरक बदल घडविल्यास त्यांचे सकारात्मक परिणामही दिसून येत असल्याने तज्ज्ञांनी सांगितले.

...

आवश्यक उपाययोजनांची गरज

दिवसेंदिवस वेगाने वाढत जाणाऱ्या समूहजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा समावेश आरोग्यविषयक धोरणांमध्ये शासनाने केल्यास त्याचा जनतेच्या आरोग्यास लाभच होईल, असा आशावादही तज्ज्ञ डॉक्टरांनी या चर्चासत्राव्दारे व्यक्त केला.

- सविस्तर वृत्त...प्लस ४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ पोलिसाचे निलंबन

$
0
0

नाशिक : पेठ तालुक्यात कार्यरत पोलिस अधिकाऱ्याच्या वाहनावरील चालक विलास पाटील हा हॉटेल व्यावसायिकाकडून हप्ता वसूल करीत असल्याचा व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. पेठमध्ये कार्यरत पाटील आडनावाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासाठी ही हप्ते वसुली सुरू असल्याचे या व्हिडीओमधून स्पष्ट होत होते. या प्रकाराची दखल घेऊन पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. याखेरीज कर्मचाऱ्याची खात्यांतर्गत चौकशी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार अनिल गोटेंचा भाजपविरुद्धच सामना

$
0
0

धुळे महापालिकेच्या रणात चुरस कायम

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरातील भाजपमध्ये पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आलेली असतानाच पक्षाचे आमदार अनिल गोटे यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष आता राज्यस्तरावर पोहचला आहे. याबाबत आमदार अनिल गोटे यांनी मंगळवारी एक सात पानी पत्र जाहीर करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता भाजप विरुद्ध स्वामिभानी भाजप असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

धुळे महापालिकेची निवडणूक लागण्याअगोदरपासूनच राजकीय फटाके फूटू लागले होते. त्यात आता भाजप आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडाच्या बॉम्बचा समावेश झाला आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सभेत झालेल्या प्रकारानंतर धुळ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, दुसऱ्या दिवशी नाराज आमदार अनिल गोटे यांनी जाहीर सभा घेत मीच महापौरपदाचा उमेदवार असल्याचे जाहीर केले. तसेच प्रसंगी आमदरकीचा राजीनामा देणार, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे इतर राजकीय पक्षांसह धुळेकरांचेही लक्ष लागून आहे.

दरम्यान, प्रभारी म्हणून नेमलेले मंत्री गिरीश महाजन हे भाजपची आता रणनीती तयार करीत आहेत. तर स्वाभिमानी भारतीय जनता पार्टी नावाने आमदार अनिल गोटे हे एक गट निवडणूक मैदानात उतरविणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे धुळे महापालिकेत भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप यांच्यात सामना होण्याची चिन्हे आहेत. धुळे मनपाच्या आगामी निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, तीन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

इतर पक्षांचे ‘आस्ते कदम’
धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले असून, भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि स्वाभिमानी भाजपा यांच्यात चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये शिवसेनेने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. मात्र, खासदार संजय राऊत आणि के. पी. नाईक यांच्यावर या निवडणुकीची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरच शिवसेनेचे चित्र स्पष्ट होईल. समाजवादी पक्षाचे अबू आझमी धुळ्यात येऊन पक्षाचे काम निश्चित करून गेले आहेत. तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांची गोपनीय चर्चादेखील झालेली आहे. राहिला विषय बहुजन महासंघ, रिपाईचे नेमकं काय चित्र जाणार अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे इतर पक्षांनी भाजपमधील बंडाचे नाट्य पाहून सध्यातरी ‘आस्ते कदम’ हीच भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्र व केंद्रनिहाय मतदार यादी आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांनी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी सुमारे ४५० मतदान केंद्रे असून, प्रत्येक केंद्रावर ६ तसेच १० टक्के राखीव म्हणून एकूण २ हजार ७४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

धुळे महापालिकेचा आकड्यांचा खेळ...
१९ प्रभागांसाठी .............दि. ९ डिसेंबरला मतदान
६ नोव्हेंबरला.................अंतिम मतदार यादी जाहीर
३ लाख २९ हजार ५६९ मतदार.......मतदानासाठी पात्र
१ लाख ७४ हजार ६९६..........पुरुष मतदार
१ लाख ५४ हजार ८६०..........महिला मतदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परिवर्तन महोत्सव’ शुक्रवारपासून धुळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव मधील प्रसिद्ध नाट्यसंस्था परिवर्तन यांच्याकडून धुळे येथे दि. १६, १७ व १८ नोव्हेंबर या कालावधीत ‘यादव खैरनार स्मृति परिवर्तन महोत्सव २०१८’ साजरा केला जाणार आहे. या महोत्सवाने धुळेकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. या महोत्सवाचे आयोजन व्यंकटेश लॉन गरुड बाग, धुळे येथे रोज सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित केला जाणार आहे. शहरातील कलावंत, लेखक, रसिक या महोत्सवात एकत्र येऊन महोत्सवाच्या नियोजनात मदत करीत आहेत.

या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘नली’ या एकलनाट्याचा प्रयोग सादर होईल. श्रीकांत देशमुख लिखित नलिनी देवराव हे व्यक्तिचित्रण ज्याचे नाट्यरूपांतर ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केलेले आहे. योगेश पाटील यांचे दिग्दर्शन तर हर्षल पाटील अभिनित एकल नाट्य प्रयोगाने या कला महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि. १७ नोव्हेंबरला बहिणाबाईंच्या कविता व गाण्यांवर आधारित संगीतमय कार्यक्रम ‘अरे संसार संसार’ सादर होणार आहे. याची संकल्पना विजय जैन यांची तर दिग्दर्शक पुरुषोत्तम चौधरी यांचे आहे. तिसऱ्या दिवशी महाश्वेता देवी लिखित ‘कुरुक्षेत्रा नंतर’ हे मंजुषा भिडे दिग्दर्शित अभिवाचन व उदय प्रकाश लिखित ‘वारेन हेस्टिंग्सचा सांड’ हे नारायण बाविस्कर दिग्दर्शित अभिवाचन सादर होईल. नाट्य संगीत व साहित्य यांचा अनोखा मिलाफ या महोत्सवात सादर करण्यात आलेला आहे.

धुळ्यामधील सांस्कृतिक क्षेत्रात या महोत्सवामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. महोत्सवामध्ये डॉ. रेखा महाजन, सुदीप्ता सरकार, होरिलसिंग राजपूत, सोनाली पाटील, मंगेश कुलकर्णी, श्रद्धा पुराणीक, उदय सपकाळे, भूषण गुरव, जयश्री पाटील, अक्षय गजभिये, अंजली हांडे, अभिषेक पाटील, हर्षदा कोल्हटकर, मनीष गुरव, अनुषा महाजन, हर्षदा पाटील, मोना तडवी, निखिल क्षीरसागर, सुनील बारी आदी कलावंत सहभागी होणार आहेत. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी वसंत गायकवाड, राजू बाविस्कर, ज्ञानेश्वर शेंडे, विकास मल्हारा, नितिन सोनवणे, विशाल कुळकर्णी, राहुल निंबाळकर, रश्मी कुरंमभट्टी, मानसी जोशी, सुनीता दप्तरी, मनोज पाटील, डॉ. किशोर पवार, प्रीती झारे, योगेश चौधरी, शशीकांत महानोर, प्रतीक्षा कल्पराज, मिलिंद जंगम, अक्षय नेहे, उदय ऐशे, मुकेश पवार, संदीप केदार आदी कलावंत प्रयत्नशील आहेत .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा यंदाही रडवणार

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सरासरीइतका पाऊस न झाल्याने राज्यासह उत्तर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पाणीबाणीचा फटका कांदालागवडीला बसला असून, कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाखालील क्षेत्र पाण्याअभावी वाया गेले आहे. परिणामी कांदाउत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांसह ग्राहक आणि सत्ताधारी सरकारलाही यंदा कांदा रडवण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत गेल्या मोसमात पावसाने सरासरी न गाठल्याने यंदा कधी नव्हे इतक्या लवकर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. विभागातील तब्बल ३९ तालुक्यांत भूजलपातळी खालावली असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा कांदा पिकाखालील क्षेत्रात काही अंशी वाढ झाली आहे; मात्र पाण्याअभावी कांदा पीक संकटात सापडले आहे.

गेल्या वर्षीच्या खरीपात नाशिक विभागात २९ हजार ४६६ हेक्टर, तर लेटखरीपात ५६ हजार १९८ हेक्टर अशी एकूण ८५ हजार ६६४ हेक्टर क्षेत्रावर लाल कांद्याची लागवड झाली होती. नाशिक विभागात यंदा खरीपातील लाल कांद्याची ७५ हजार ७१२ हेक्टर इतक्या मोठ्या क्षेत्रावर लागवड झाली आहे. मात्र ऑगस्टमध्ये दोन मोठे ड्राय स्पेट आल्याने व परतीच्या पावसानेही हजेरी न लावल्याने खरीपातील कांदा पीक पाण्याअभावी वाया गेले आहे. परतीच्या पावसानेही अपेक्षाभंग केल्याने लेटखरीपातील लाल कांद्याच्या लागवडीत घट आली आहे. खरीपात लाल कांद्याच्या लागवडीत वाढ होऊनही पाण्याअभावी हे पीक वाया गेल्याने आणि लेटखरीपातील कांदालागवडीत मोठी घट आल्याने यंदा कांदाउत्पादनात घट निश्चित आहे. नाशिक व नगर जिल्ह्यात लेटखरीप तर नंदुरबार जिल्ह्यात खरीप कांदालागवडीत मोठी घट आली आहे.

66613303

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनच्या पैशातून आदिवासींना मदत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

अशोका मार्गावरील समता ज्येष्ठ नागरिकांतर्फे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षवाडी, जांभुळपाडातील आदिवासी पाड्यांवर चारशे आदिवासींना फराळ, कपडे वाटप करुन दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमाचे हे दहावे वर्ष होते. ज्येष्ठ सदस्यांनी आपल्या पेन्शनची काही रक्कम या उपक्रमासाठी दिली.

संघाचे अध्यक्ष डॉ. श्रीराम ठाकूर, उपाध्यक्ष डी. एफ. मोरे, सचिव दिनानाथ पाटील, बळवंत शिर्के, आर. आर. गरुड, रा. शि. दोंदे, चिंतामण आहेर, राजेंद्र सावंत एस. एस. मोरे, आनंद कांबळे, सरपंच हर्षदा बुरुंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. संघाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन हर्षवाडी गावाचा सर्वांगीण विकासाचा संकल्प सोडला आहे. येथील आदिवासींच्या आरोग्याला प्राधान्य देऊन संघ व अशोक मेडिकव्हर हास्पिटलतर्फे आरोग्य शिबिर घेण्यात आले. डॉक्टरांनी रुग्ण तपासणी करून औषधोपचार केले. हर्षवाडी हे गाव दत्तक घेतल्याचे ठाकूर यांनी सांगितले. ते म्हणाले की आदिवासी हे समाजाचा महत्वाचा घटक असून आपल्याबरोबर त्यांचाही विकास झाला पाहिजे. संघातर्फे वेळोवेळी येथे भेट देऊन शेती नियोजन, जलसिंचन व्यवस्था, आरोग्य याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या गावाजवळ हरिहर गड आहे. तो पाहण्यासाठी पर्यटक येतात. त्यामुळे युवकांना रोजगारही मिळतो. हर्षवाडी पर्यटनस्थळ होण्यासाठी प्रयत्न केले जातील. सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगीत महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंजमाळ परिसरातील पंचशीलनगर झोपडपट्टीमध्ये पाच झोपड्यांना लागलेल्या आगीत एक विवाहिता जळून ठार झाली. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक रहिवाशांसह अग्निशमन विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. परंतु, या आगीमुळे संबंधित रहिवाशांचे संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही, असे पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले.

भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता योगेश लाहोटी (वय ३०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला भगूर येथील रहिवाशी असून मंगळवारी सायंकाळी पंचशीलनगर येथे राहणाऱ्या भागूबाई आव्हाड या तिच्या आत्याला भेटण्यासाठी आली होती. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आव्हाड भाजी आणण्याकरीता घराबाहेर पडल्या. त्यावेळी सुनीता घरात एकट्याच होत्या. काही वेळातच घरातून धूर निघू लागल्याचे या परिसरातील छोटू भालेराव, सोनू पठाण, शाहरूख शेख, इम्रान शेख, जावेद शेख, कुणाल पवार, अल्ताफ शेख आदी रहिवाशांनी पाहिले. त्यांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. आव्हाड यांच्या आसपासच्या घरांपर्यंत आग पसरली होती. काही रहिवाशांनी लगेचच पोलिस आणि अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. काही धडपड्या तरुणांनी आपल्या घरांमधून पाण्याच्या बादल्या भरून आणत आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. आव्हाड यांच्या घरातून ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने काही तरुणांनी त्यांच्या घराच्या दरवाजाकडे धाव घेतली. परंतु, दरवाजाला आतून कडी असल्याने तो उघडत नव्हता. बाजूलाच राहणाऱ्या रत्ना मोरे कामावर गेल्याने त्यांचेही घर बंद होते. या दोन्ही घरांमध्ये आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने रहिवाशांनी त्यांचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. शर्थीचे प्रयत्न करून दरवाजे उघडण्यात आले. परंतु, तोपर्यंत सुनीता यांचा मृत्यू झाला होता. घरांमधील सर्व संसारोपयोगी सामानही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या आगीच्या घटनेत आव्हाड आणि मोरे यांच्यासह प्रकाश जाधव, रेणुका नेमाने, सुनील पालवे, सुनील गवांदे यांच्याही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या भद्रकाली पोलिसांनी सुनीता यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी एकच आक्रोश झाला. पोलिसांनी हा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविला. घरात स्टोव्हचा भडका झाला असावा, त्यामुळे लाकडी फळ्यांच्या भिंतीने पेट घेऊन आग पसरली असावी असा प्राथमिक अंदाज रहिवाशी व्यक्त करीत होते.

अग्निशमन विभागाला अडचणी

आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे चार बंब पंचशीलनगर परिसरात दाखल झाले. परंतु, अरुंद रस्ते आणि गल्लीबोळांमुळे या वाहनांना घटनास्थळापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी मुख्य रस्त्यांवर वाहने उभे करून तेथून पाण्याचे पाइप घटनास्थळांपर्यंत आणले. पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु, तोपर्यंत रहिवाशांच्या घरांमधील टीव्ही, सीडी प्लेअर, कपडे, भांडी यांसह जीवनावश्यक सर्व साहित्य जळून खाक झाले.

सिलेंडर गेले चोरीस

आगीची घटना घडल्यानंतर परिसरातील जागरूक नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून घरातील सर्व सिलेंडर्स घटनास्थळापासून काही अंतरावर नेऊन ठेवले. त्यानंतर अधिक जोमाने आग विझविण्याचे काम सुरू झाले. परंतु, या दरम्यान काही रहिवाशांचे गॅस सिलेंडर चारीस गेल्याचे प्रकार घडले. एकीकडे काही नागरिकांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मदत कार्यात स्वत:ला झोकून दिल्याचे चित्र पहावयास मिळत होते तर दुसरीकडे काही नागरिकांनी या दुर्घटनेकडे संधी म्हणून पहात जीवनावश्यक वस्तू लांबविण्यात धन्यता मानली. त्यामुळे घटनास्थळी आलेल्या पोलिसांना चोरीस गेलेले सिलेंडर मिळवून देण्याची जबाबदारी देखील पार पाडावी लागली. आग लागलेल्या एका घरात सुमारे १० हजार रुपयांची रोकड आढळून आली. संबंधितांना ती रक्कम परत करता यावी यासाठी काही रहिवाशांनी ती जपून ठेवल्याचेही सांगितले जात होते.

लाहोटी कुटुंबावर पुन्हा दु:खाचा डोंगर

सुनीता यांच्या मृत्यूमूळे लाहोटी कुटुंबावर गेल्या दहा दिवसांत दुसऱ्यांदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुनीता यांच्या सासूबाईंचे १० दिवसांपूर्वी निधन झाले आहे. गुरूवारी होणाऱ्या उत्तरकार्याची तयारी सुरू असतानाच सुनीता यांचाही असा अकाली मृत्यू झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात हळहळ व्यक्त होत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संपूर्ण नाशिक जिल्ह्यालाच दुष्काळी जाहीर करून माणसांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, वनराई बंधारे घालून उपलब्ध पाणी अडवावे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेने बुधवारी शहरातून लक्षवेधी मोर्चा काढला. दुष्काळी उपाययोजनांबरोबरच शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात, अशी मागणीही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य किसान सभेने भव्य मोर्चाची साद दिली असल्याने जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शेतकरी तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले होते. मोर्चाची वेळ दुपारी १२ वाजताची होती. परंतू तालुक्यांच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांना शहरात पोहोचण्यास विलंब झाला. त्यामुळे दुपारी दोनच्या सुमारास मोर्चाला सुरूवात झाली. डोक्यात लाल टोप्या घालून हजारो शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यात महिलांचे प्रमाणही लक्षणीय होते. राज्य किसान सभेचे अध्यक्ष सावळीराम पवार, आमदार जीवा गावीत, इरफान खान, सुनील मालुसरे, किसन गुजर, इंद्रजित गावित, सुभाष चौधरी, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मार्चात सहभाग घेतला.

गोल्फ क्लब मैदान येथून मोर्चाला सुरूवात झाली. त्र्यंबकनाका सिग्नल, जिल्हा परिषद, खडकाळी सिग्नल, शालिमार मार्गे हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पोहोचला. मोर्चेकऱ्यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे जोरदार घोषणाबाजी करीत सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले. सीबीएस आणि शालीमारकडील दोन्ही रस्त्यांवर मोर्चेकऱ्यांनी बैठक मारली. मोर्चाचा अंदाज घेऊन पोलिसांनी सीबीएस ते शालीमार हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. सुमारे दोन ते तीन तास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे अन्य मार्गांनी वाहतूक वळविण्यात आली.

सभेनंतर मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यंदा सरासरीहूनही खूपच कमी पाऊस झाल्याने खरीपातील पिके जळाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, भरपाईपोटी प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टर ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज माफ करावे, नदीजोड प्रकल्प रद्द करून नार-पार दमण गंगा व त्यांच्या उपनद्यांचे पाणी अडवून ते बोगद्यापर्यंत वळवून मराठवाडा, खानदेश, नगरसारख्या दुष्काळी विभागात वळवा, वनाधिकाराचे अपात्र दावे पात्र ठरवून सात बारा उतारा तयार करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, नवीन रेशन कार्ड द्या, ज्येष्ठ नागरिकांना दरमहा पाच हजार रूपये पेन्शन लागू करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महावितरणतर्फे नेहरूंना अभिवादन

$
0
0

नाशिकरोड : महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयात देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी झाली.

मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या हस्ते पं. नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक प्रवीण बागुल, व्यवस्थापक सुरेश रोकडे, कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, वित्त व लेखा विभागाचे प्रभारी सहायक महाव्यवस्थापक ललित खाडे, सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने, उपकार्यकारी अभियंता भूषण आचार्य, प्रशांत चव्हाण, सहायक अभियंता सतीश मेहेर, भूषण पाटील, यांच्यासह परिमंडळ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉर्नर मीटिंगला पोलिसांना प्रतिसाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

सहाय्यक पोलिस आयुक्त ईश्वर वसावे आणि उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सहकाऱ्यांसह देवळालीगावात नागरिकांची कॉर्नर मीटिंग घेतली. कायदा व सुव्यवस्थेबाबत जनजागृती करण्यात आली.

आम्रपाली झोपडपट्टी, जेतवननगर, लोखंडे मळा, हनुमाननगर, रोकडोबावाडी, फर्नांडिसवाडी, आनंदनगर येथेही अशा मीटिंग घेण्यात आल्या. मुक्तिधाम येथे वाहतूक समस्येबाबत बैठक घेऊन प्रबोधन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्थित राखण्यासाठी पोलिसांना मदत करावी, असे आवाहन वसावे यांनी केले. चेन स्नॅचिंग व दुचाकी चोरीला प्रतिबंध कसा करावा, थंडीत घरफोड्यांचे प्रमाण वाढते, त्याला आळा कसा घालावा, याबाबत वसावे आणि रायते यांनी प्रबोधन केले. सामाजिक संस्थांनी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन करण्यात आले. एटीएम सुरक्षेबाबतही बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. एटीएममध्ये अलार्म सिस्टीम, ई सव्हेलन्स सिस्टीम, डिटेक्टिंग सिस्टीम तसेच प्रभावी सीसीटीव्ही बसविण्याची सूचना पोलिसांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओपन टेनिस स्पर्धा आजपासून

$
0
0

ओपन टेनिस स्पर्धा आजपासून

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील एसएसके वर्ल्ड क्लबच्यावतीने १५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान पाथर्डी गावाजवळ असलेल्या टेनिस कोर्टवर एसएसके ओपन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जिल्हास्तरीय असून, यात नाशिक जिल्ह्यातील दोनशेच्यावर खेळाडू सहभागी होणार आहेत.

पाथर्डी फाटा येथील द एसएसके वर्ल्ड क्लबमध्ये स्विमींग, टेनीस, बास्केटबॉल, बॉक्स क्रिकेट, स्केटिंग अॅडव्हेंचर स्पोर्ट यासारखे अनेक खेळ सुरू केले जाणार आहेत. या क्लबच्या पहिल्या टप्प्यात टेनिसच्या सिंथेटीक ट्रॅकचे काम पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा १२, १४ आणि १६ या वयोगटासाठी आयोजित करण्यात आल्या असून १२ वर्षांखालील मुले मुली-सिंगल, १६ वर्षाखालील मुले, मुली- सिंगल, पुरुष एकेरी ओपन, महिला एकेरी ओपन, पुरुष दुहेरी ओपन, वेटरर्न डबल, मिक्स डबल अशा वयोगटात या स्पर्धा होणार आहेत. माजी पोलिस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल, मनपाचे माजी आयुक्त संजय खंदारे यांच्यासह मान्यवर खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील अशी माहीती क्लबचे डायरेक्टर शैलेश कुटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावर झाले सारेच लहान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लहानपणीच्या आठवणी म्हातारपणातही सुखावतात. वयाने कितीही मोठे झालो, कितीही जबाबदाऱ्या वाढल्या तरी बालपणीच्या आठवणी मात्र कायम मनात घर करुन असतात. आपण लहानपणी कसे होते, हे इतरांना सांगावेसे वाटते, हे शेअर करण्याचा हक्काचा दिवस बालदिनातून नेटिझन्सला मिळाला. जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करीत या आठवणींना उजाळा देण्यात आला.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून १४ नोव्हेंबर रोजी देशभर साजरा केला जातो. हल्ली दिनविशेषांसंबंधित फोटो शेअर करण्याचा ट्रेण्ड सोशल मीडियावर चांगलाच रुळला असल्याने बालदिनही त्यास अपवाद ठरला नाही. बुधवारी सकाळपासूनच फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्स अॅप स्टेटसवर बालपणीचे फोटो शेअर करण्यात येत होते. या फोटोंबरोबर लहानपणीच्या आठवणीही शेअर करण्यात आल्या. एरवी सद्यस्थितीतील, चांगल्या कॅमेऱ्यांमधून फोटो शेअर करण्यावर भर दिला जात असला तरी नव्वदीपूर्वीच्या या जुन्या फोटोंनी सोशल मीडियाच्या भिंती रंगल्या होत्या. फोटो पाहून मित्र परिवाराकडून मिळणारी दाद, कमेंटद्वारे केले जाणारे कौतुक, चिडवणे अनेकांसाठी आनंद देणारे ठरत होते. शहरातील सामाजिक संस्थांकडून, शाळांकडून बालकांसाठी विविध उपक्रम बालदिनानिमित्त राबविण्यात येतात. यावेळी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येच बालदिन आल्याने लहानग्यांचा हा विशेष दिवस आनंदात गेला. अनेक पालकांनीही आपल्या चिमुकल्यांचे फोटो शेअर करत बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. चॉकलेट, केकचे सरप्राइज देत त्यांना फिरायला नेत हा दिवस पालकांनी खास राखीव ठेवला होता.

\Bसेलिब्रिटींकडूनही शेअरिंग

\Bसामान्य व्यक्तींला सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टीबद्दल अप्रूप असते. आपल्याला आवडणारे हिरो, हिरॉइन किंवा आपली आदर्श व्यक्ती त्याच्या लहानपणी कशी असेल, याविषयीही सामान्यांना आकर्षण असते. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या सेलिब्रिटींनी बालदिनाचा आनंद लुटला. इन्स्टाग्रामवर फोटो शेअरिंगसाठी मोठे प्राधान्य दिले जात असल्याने बालदिनाचे फोटोही यावर सर्वाधिक प्रमाणात होते. बॉलिवूडच्या मोठमोठ्या स्टार्सपासून नाशिकमधील व सध्या मराठी चित्रपटसृष्टी गाजवत असलेल्यांनीही बालपणीचे फोटो शेअर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण दर्जा उन्नतीसाठी प्राचार्यांचे चिंतन

$
0
0

यूजीसीच्या निर्देशांनुसार आयोजित सहविचार सभेस प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वरिष्ठ महाविद्यालयांचे व्यवस्थापन सांभाळताना शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि दुसरीकडे संस्था व्यवस्थापनासोबत राखावा लागणारा समन्वय या कसोट्यांवर प्राचार्यांना शैक्षणिक वर्षात कसरत करावी लागते. उच्च शिक्षणातील व्यवस्थापन विषयक आव्हाने कशी स्वीकारावीत, या विषयावर राज्यभरातील विविध महाविद्यालयांमधून उपस्थित प्राचार्यांचे चिंतन केटीएचएम कॉलेजात आयोजित सहविचार सभेत झाले. 'मविप्र'च्या केटीएचएम कॉलेजमधील व्हीएलसीसी सभागृहात ही प्राचार्यांची सहविचार सभा पार पडली.

मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते सहविचार सभेचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी प्राचार्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की गेल्या काही वर्षांच्या कालावधीत संशोधन या विषयाची जागृती वाढण्यास मदत होत आहे. पण अद्यापही संशोधनाच्या क्षेत्रात समाजाभिमुख संशोधनाची कमतरता जाणवते. या प्रकारचे संशोधन वाढविण्यासाठी उच्च शिक्षणाच्या प्रवाहातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राचार्यांनी सहभाग घ्यायला हवा. प्राचार्यांनी व्यवस्थापनाची भूमिका समजावून घेतल्यास त्यांच्या दैनंदिन कामकाजातील अनेक आव्हान सहजगत्या कमी होतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मंचावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, आयटी सेलचे प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र तलवारे, कुलसचिव प्रफुल्ल पवार, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड उपस्थित होते. यानंतर पुणे विद्यापीठाच्या मानव संसाधन विकास केंद्राचे प्रमुख डॉ. संजीव सोनवणे यांनी 'अध्यापन पद्धती' या विषयावर मार्गदर्शन केले. एमकेसीएलचे समन्वयक अमित रानडे यांनी एमकेसीएलचे अध्ययनासाठी वापरण्यात येणारी 'कॅम्पस सक्सेस' या अॅपचा डेमो सादर केला. अँड्रॉईड मोबाइलवर ऑफलाईन पद्धतीनेही चालणारे हे अॅप प्रभावी अध्ययनासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतरच्या सत्रात नाशिक इस्कॉनचे प्रमुख कृष्णा धनदास यांनी प्राचार्यांशी संवाद साधताना भारतीय वैदिक पद्धतीवर आधारित शिक्षण व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले.

चर्चासत्राद्वारे थेट संवाद

सहविचार सभेच्या अखेरच्या सत्रात प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, 'बीसीयूडी'चे माजी संचालक व प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड आदी मान्यवरांनी प्राचार्यांच्या समस्यांबाबत खुले चर्चासत्र घेत थेट संवाद साधला. यावेळी प्राचार्यांच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या शंकांवरही या पॅनलने उत्तरे दिली.

\Bफोटो : सतीश काळे \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images