Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पाणीपातळीच्या खोलीने गाठला तळ!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भूजल पातळीत वेगाने घट होत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील ६ हजार ७२ पैकी तब्बल २ हजार ३१६ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील विभागातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपाययोजना आखण्यासाठी प्रशासनाची युद्धपातळीवर धावपळ सुरू झाली आहे. दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांची यादी सरकारने नुकतीच जाहीर केली असून उत्तर महाराष्ट्रातील त्यात ५४ पैकी ३९ तालुक्यांचा समावेश आहे. स्थानिक प्रशासनानेही संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार केला आहे.

नाशिक विभागातील ५४ पैकी तब्बल ४९ म्हणजे ९० टक्क्यांपेक्षा अधिक तालुक्यांतील भूजल पातळीत तीन मीटरपर्यंत घट आली आहे. गेल्या पाच वर्षांच्या सरासरीचा विचार करता भूजल पातळीत घट झालेल्या तालुक्यांची संख्या प्रथमच वाढली आहे. पाणीपातळीत घट झालेल्या २३ तालुक्यांमध्ये १ मीटर, १५ तालुक्यांमध्ये १ ते २ मीटर, ७ तालुक्यांमध्ये २ ते ३ मीटर आणि ४ तालुक्यांमध्ये ३ मीटरहून जास्त भूजल पातळीत घट आली आहे. नाशिक जिल्ह्यातील ८, धुळे जिल्ह्यातील ३, नंदुरबारमधील ४, जळगावमधील १३ आणि नगरमधील ११ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश आहे. विभागातील नंदुरबार, भुसावळ, रावेर आणि यावल या चार तालुक्यांतील भूजल पातळीत ३ मीटरपेक्षा जास्त घट आल्याने या तालुक्यांतील गावांना पाणीटंचाईची झळ सर्वांत जास्त बसणार आहे.

टंचाईग्रस्त गावे वाढणार

विभागातील सरासरी पर्जन्यमानात मोठी घट आल्याने प्रशासनाने जाहीर केलेल्या संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या टप्प्यात ४६९, जानेवारी ते मार्च २०१९ या दुसऱ्या टप्प्यात ६४२ आणि एप्रिल ते जून २०१९ या तिसऱ्या टप्प्यात १ हजार २०५ अशा एकूण २ हजार ३१६ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, भूजल पातळीत घट आलेल्या तालुक्यांची संख्या विचारात घेत टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.

८८९ गावांमध्ये पाणीबाणी

पावसाळा सरून महिना उलटला नाही तोच विभागातील १९४ गावे आणि ६९५ वाड्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या गावे व वाड्यांवरील ४ लाख १९ हजार ७७१ नागरिकांना प्रशासनातर्फे ५३ शासकीय आणि १४१ खासगी अशा १९४ टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. प्रशासनाकडे सध्या शेकडो गावांचे टँकर्स मागणीचे प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल झालेले आहेत. त्यामुळे हा टंचाईग्रस्त गावांचा आकडा जानेवारीपर्यंत २ हजारांवर पोहचण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून नागरिकांना पाणीटंचाईच्या तडाख्यातून वाचवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विभागातील पशुधन आणि उपलब्ध चाऱ्याची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विभागातील १०१ विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे.

विभागातील टंचाई स्थिती

नाशिक जिल्हा

तालुका गावे/वाड्या टँकर्स

मालेगाव ६९ १६

नांदगाव ६५ ६

सिन्नर १२२ १८

येवला ४६ १८

देवळा ४ १

बागलाण ९ ७


धुळे जिल्हा

तालुका गावे/वाड्या टँकर्स

शिंदखेडा ८ ६

धुळे १ १


जळगाव जिल्हा

तालुका गावे/वाड्या टँकर्स

जळगाव १ १

भुसावळ २ २

चाळीसगाव ५ ३

अमळनेर १७ ८


नगर जिल्हा

तालुका गावे/वाड्या टँकर्स

संगमनेर ८४ २२

पारनेर १४३ २५

पाथर्डी २६४ ५३

नगर १९ ३

शेवगाव ६ ४

एकूण ८८९ १९४


पाणीटंचाईत होरपळणारी जनता

जिल्हा लोकसंख्या

नगर २,१४,७१६

नाशिक १,५१,७२६

जळगाव ३०,१४२

धुळे २३,१८७

एकूण ४,१९,७७१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन

$
0
0

नाशिक

मनमाडमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचं आज सकाळी निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. स्वातंत्र्य सैनिक, खंडकरी शेतकऱ्यांचे नेते, झुंजार व लढवय्ये व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती.

डाव्या चळवळीतील एक झुंजार नेते म्हणून गेली ५ ते ६ दशकं कॉम्रेड माधवराव गायकवाड कार्यरत होते. आदर्शवत व तत्वनिष्ठ राजकारणाने त्यांनी देशभर आपली आगळी छाप उमटवली होती. खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी मिळवून देण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्यात गायकवाड यांनी मोलाची कामगिरी केली. शेतकरी, कामगार, महिलांच्या प्रश्नासाठी त्यांनी शासन दरबारी वेळोवेळी आवाज उठवला होता. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. मनमाड येथील राहत्या घरी आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी कुसुमताई, कन्या अॅड. साधना असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवान चौकट

$
0
0

शासकीय इतमामात

गोसावींवर अंत्यसंस्कार

..

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

भारत-पाक सीमेवर पाक सैनिकांच्या गोळीबारात वीरमरण आलेले सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथील जवान नाईक केशव गोसावी यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. समाजाच्या संस्कारानुसार नाईक गोसावी यांच्या पार्थिवाचा दफनविधी करण्यात आला.

जवान गोसावी यांचे पार्थिव वायूसेनेच्या विशेष विमानाने ओझर येथे आणण्यात आले. ओझरहून त्यांचे पार्थिव श्रीरामपूर येथे नेण्यात आले. जवानांनी बंदुकीच्या २१ फैरी झाडत शहीद गोसावी यांचे तिरंगामध्ये लपटलेले पार्थिव दफनविधीसाठी त्यांच्या कुटुंबीयांचे स्वाधीन केले. दरम्यान, जवान नाईक केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे २५ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान १ शहीद जवान

$
0
0

शासकीय इतमामात

गोसावींवर अंत्यसंस्कार

..

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

भारत-पाक सीमेवर पाक सैनिकांच्या गोळीबारात वीरमरण आलेले सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथील जवान नाईक केशव गोसावी यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. समाजाच्या संस्कारानुसार नाईक गोसावी यांच्या पार्थिवाचा दफनविधी करण्यात आला.

जवान गोसावी यांचे पार्थिव वायूसेनेच्या विशेष विमानाने ओझर येथे आणण्यात आले. ओझरहून त्यांचे पार्थिव श्रीरामपूर येथे नेण्यात आले. शहीद गोसावी यांचे तिरंगामध्ये लपटलेले पार्थिव दफनविधीसाठी त्यांच्या कुटुंबीयांचे स्वाधीन केले. दरम्यान, जवान नाईक केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे २५ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीरामपूरला फुटला आसवांचा बांध!

$
0
0

शहीद केशव गोसावी यांना आदरांजली वाहण्यासाठी जिल्हावासीयांची गर्दी

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

पाकिस्तानकडून भारतीय ताबारेषेवरील नौशेरा सेक्टरवर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे शहीद झालेल्या भारतीय जवान केशव सोमगीर गोसावी (वय २९) यांचे पार्थिव सिन्नर तालुक्यातील श्रीरामपूर (शिंदेवाडी) या त्यांच्या मूळ गावी सोमवारी आणण्यात आले. केशव यांना आदरांजली वाहण्यासाठी जिल्हावासीयांनी तुफान गर्दी केली.

शहीद केशव यांचे पार्थिव विमानाने सायंकाळी ओझर विमानतळावर आणण्यात आले. तेथे प्रांत महेश पाटील यांनी केशव यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर केशव यांचे पार्थिव श्रीरामपूर (शिंदेवाडी) गावात नेण्यात आले. तेथे लष्करी इतमामात केशव यांच्यावर रात्री साडेनऊनंतर दफन पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, आकाशात बंदुकीच्या २१ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. तसेच तिरंग्यात लपटलेले केशव यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

स्थानिक रहिवाशांनी केशव यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी फुलांची सजावट केलेले स्टेज उभारले. तसेच दफनविधीसाठी खड्डा खोदण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस अधीक्षक संजय दराडे, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, अनिल कदम, डॉ. राहुल आहेर, माजी आमदार माणिकराव कोकाटे, अतिरक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, दशनाम गोसावी समाजाचे तालुकाध्यक्ष वसंत गोसावी, माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष मधुकर सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

१९९० मध्ये जन्मलेले केशव गोसावी हे २००९ रोजी लष्कराच्या सेवेत दाखल झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण तालुक्यातील श्रीरामपूर (शिंदेवाडी), माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, पंचाळे तर बारावीपर्यंत शिक्षण वावी येथील कॉलेजला झाले. शिक्षणासाठी केशव आपल्या शिंदेवाडी गावापासून १५ किलोमीटर दूर असलेल्या वावी या सायकलने जात. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते सैन्यात दाखल झाले. केशव यांच्या पश्चात अपंग वडील, पत्नी आणि दोन्ही बहिणी विवाहित आहेत. केशव यांच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे.

पत्नीवर मानसिक आघात

केशव यांच्या पत्नी यशोदा या गर्भवती असून त्या औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथील आपल्या माहेरी सोमवारीच जाणार होत्या. मात्र, त्यापूर्वीच पती गेल्याची वार्ता धडकली. याचा केशव यांच्या पत्नीवर दु:खाचा डोंगरच कोसळला. या घटनेबद्दल तालुकावासीयांच्या डोळ्यातून आसवांचा बांध फुटला.

घराचे स्वप्न अधुरे राहिले

साधे दोन खोल्यांचे कच्चे घर नव्याने बांधण्याचे केशव यांचे स्वप्न होते. तीन वर्षानंतर ते लष्करी सेवेतून निवृत्त होणार होते. या काळात घराचा कायापालट करण्याचा त्यांचा मनोदय होता. तीन महिन्यांपूर्वी ते सुटी घेऊन गावी आले होते. मात्र, त्यांचे घराचे स्वप्न अधुरे राहिले.

केशव मितभाषी होता. त्याने हलाखीची परीस्थिती सोसत स्वतःच्या पायावर शिक्षण पूर्ण केले आणि तो सैन्य दलात भरती झाला. तो आमच्या कुटुंबातील एकमेव आधार होता. त्याच्या जाण्याने आमचा आधारच हरपला. परंतु, तो देशासाठी शहीद झाला याचे समाधान मोठे आहे.

- सोमगिरी गोसावी,

शहीद केशव यांचे वडील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३ सफाई कामगार मनपातून सेवामुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सवेत असलेल्या १३ सफाई कामगारांना सेवामुक्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून लवकरच त्यांना पदमुक्त करण्यात येणार आहे. याबाबत संघटनांनी आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता आयुक्तांनी भेट नाकारली.

महापालिकेच्या सेवेत ४५ सफाई कामगार हे कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते. शासननिर्णयानुसार ही पदे फक्त अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत; मात्र यातील १३ पदांवर इतर जातींचे कर्मचारी काम करीत असल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली नाही. तर अन्य ३१ कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे १३ कामागारांना पदमुक्त केले जाणार आहे. शासनाच्या लाड समितीनुसार ही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या कर्मचाऱ्यांना तीन हजार रुपये महिना मानधन देण्यात येत होते. याबाबत औरंगाबाद महापालिकेत अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने नाशिक महापालिकेच्या प्रशासनाने धसका घेत ही कारवाई केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबूजींचे निधन

$
0
0

\Bकॉ. माधवराव गायकवाड यांच्यावर आज अंत्यसंस्कार\B

..

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार तसेच खंडकरी शेतकऱ्यांचे नेते, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड ऊर्फ बाबूजी (वय ९५) यांचे सोमवारी सकाळी मनमाड येथे राहत्या घरी निधन झाले. कॉ. गायकवाड यांच्या निधनाने तत्त्वनिष्ठ व मूल्यवर्धित राजकारणाची कास धरणारा आणि राजकीय क्षेत्राला लौकिक बहाल करणारा आदर्शवत मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्यामागे पत्नी कुसुमताई, कन्या अॅड. साधना असा परिवार आहे. मनमाड येथे आज, मंगळवारी सकाळी दहा वाजता गुरुगोविंदसिंग हायस्कूलशेजारील स्टेडियमसमोर कॉ. माधवराव गायकवाड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डाव्या चळवळीतील एक झुंजार नेते म्हणून माधवराव गायकवाड हे गेली अनेक दशके कार्यरत होते. आपल्या आदर्शवत व तत्त्वनिष्ठ राजकारणाने त्यांनी देशभर आपली आगळी छाप उमटवली होती. खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी मिळवून देण्यासाठी कॉ. गायकवाड यांनी संघर्ष करून न्याय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. शेतकरी, कामगार, महिलांच्या प्रश्नासाठी त्यांनी शासन दरबारी वेळोवेळी आवाज उठवला होता. कष्टकरी, शेतकरी, श्रमजीवी कामगारांना न्याय मिळावा, धर्मनिरपेक्षता आणि समतेचा पुरस्कार व्हावा यासाठी, उभे आयुष्य संघर्ष करणारे कॉ. गायकवाड हे बाबूजी या नावाने परिचित होते.

विधान परिषद व विधानसभेचे सदस्य, मनमाड पालिकेचे पहिले थेट नगराध्यक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते व लाल झेंड्याचे खरे निष्ठावान पाईक म्हणून त्यांनी अनेक दशके कार्य केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या अस्तित्वाने मोलाचा सहभाग घेणारे कॉ. गायकवाड हे विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी देखील आदर्शवत होते. कोणाचेही सरकार असो, शेतकरी-कामगार यांच्या प्रश्नी सरकारला धारेवर धरण्याचे काम त्यांनी निष्ठेने केले. महाराष्ट्राचे लाडके अष्टपैलू व्यक्तिमत्व आचार्य अत्रे, तसेच दस्तुरखुद्द साने गुरुजी, क्रांतिसिंह नाना पाटील, शांताबाई दाणी, दादासाहेब गायकवाड यांचा सहवास त्यांना लाभला. दरम्यान, कॉ. गायकवाड यांना आदरांजली म्हणून आज (दि. १३) मनमाड बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

...

पुस्तक प्रकाशनाचे स्वप्न राहिले अधुरे!

कॉ. माधवराव गायकवाड यांचे जीवनपट सांगणाऱ्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा त्यांच्या हयातीत करण्याचे स्वप्न डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचे होते. पण, गायकवाड आजारी पडले व पुस्तक सोहळाही लांबला. त्यामुळे कार्यकर्त्यांचे हे स्वप्न अधुरे राहिले. गेल्या काही दिवसांपासून हे पुस्तक छापून तयार असूनही हा सोहळा झाला नाही.

...

- सविस्तर वृत्त...४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विकास परिषदेचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जून महिन्यात शाळा, कॉलेजांचे प्रवेश झाले असले तरी अद्याप वसतिगृहात प्रवेश मिळत नसल्याने संतप्त झालेल्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने आदिवासी विकास भवनासमोर सोमवारी बेमुदत आंदोलनास सुरुवात केली आहे.

नाशिकसह धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगरच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत विविध मागण्यांसाठी आवाज उठवला. तसेच आदिवासी आयुक्तालयाच्या कारभाराच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. आदिवासी विकास परिषदेच्या वतीने वारंवार मागण्या करूनही मागण्यांची पूर्तता करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळावा, नाशिक प्रकल्प अधिकारी आशीर्वाद यांची तात्काळ बदली करण्यात यावी, आरटीओ कॉर्नर येथील वसतिगृह बंद करण्यात आल्याने दीडशे मुले व शंभर मुलींची गैरसोय झाली आहे. ते पुन्हा सुरू करून या मुला-मुलींना न्याय देण्यात यावा, अशा अनेक मागण्या आंदोलनातून मांडण्यात आल्या. याशिवाय, आहाराची डीबीटी पद्धत बंद करावी, ती बंद न केल्यास १९ डिसेंबरपासून बेमुदत आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष लकी जाधव यांनी दिली आहे.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरगम विद्यालयातर्फे शनिवारी ‘दो पल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरगम सुगम संगीत विद्यालय नाशिक आयोजित, फेजर टच स्टुडिओनिर्मित 'दो पल' या संगीतमय कार्यक्रमाचे शनिवारी (दि. १७) आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मीबाळ सदन, मालवीय चौक, कोंडाजी चिवडासमोर, पंचवटी कारंजाजवळ येथे सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमाचे महाराष्ट्र टाइम्स मीडिया पार्टनर आहेत.

संगीतकार मदनमोहन व लता मंगेशकर यांच्या सांगीतिक प्रवासाचे अनोखे रसग्रहण या कार्यक्रमातून केले जाणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन जयेश आपटे यांचे असून रुपाली देशमुख यांनी संहिता लेखन केले आहे. शिवानी जोशी व रसिका नातू गाण्यांचे सादरीकरण करणार आहेत. त्यांना प्रमोद पवार (संवादिनी), सुवर्णा क्षीरसागर (व्हायोलिन), कृपा परदेशी (की-बोर्ड) संगीतसाथ देणार आहेत. ओवी भालेराव कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच काही जागा राखीव असणार आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

\Bलोगो : मीडिया पार्टनर \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी तालुक्यात शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टिटवे (ता. दिंडोरी) येथील एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. भाऊबीजेच्या दिवशी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली असून, याबाबतचा प्राथमिक अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. या तरुणाच्या वडिलांच्या नावे शेती असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात चालू वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ८९ झाली आहे.

राहुल विश्वनाथ गवळी (वय २१) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या नावे शेतजमीन नाही. परंतु, त्याचे वडील विश्वनाथ मनोहर गवळी यांच्या नावे गट क्र. ८३ मध्ये २.६७ आर इतके सामाईक क्षेत्र असल्याची माहिती टिटवे येथील तलाठ्याने जिल्हा प्रशासनाला कळवली आहे. या शेतकरी कुटुंबाच्या नावे सोसायटीचे तसेच बँकांचे काही कर्ज होते का याची माहिती स्थानिक यंत्रणेकडून घेतली जात आहे. दिंडोरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांत घडलेली ही दुसरी शेतकरी आत्महत्येची घटना आहे.

...

आत्महत्या घटनांबाबत आज बैठक

आज, मंगळवारी (दि.१३) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी हे शेतकरी आत्महत्येच्या घटनांबाबत बैठक घेणार आहोत. सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी ऑगस्टपासूनची २९ प्रकरणे मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांपुढे ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवानाच्या कुटुंबियांना २५ लाख

$
0
0

पालकमंत्री गिरीश महाजन यांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारत-पाक सीमेवर पाक सैनिकांच्या गोळीबारात वीरमरण आलेले सिन्नर तालुक्यात शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथील जवान नाईक केशव गोसावी यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे २५ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

जवान गोसावी यांचे पार्थिव वायुसेनेच्या विशेष विमानाने ओझर येथे आणण्यात आले. पालकमंत्र्यांनी पार्थिवावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय सैनिक या घटनेला चोख प्रत्युत्तर देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय लष्कराच्या वतीने एअर कमांडर एस. बोराडे, कॅडमो विनोदकुमार, ले. कर्नल एसपीएस रावत, मेजर अंकित शर्मा यांनी तर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीही पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. खासदार हेमंत गोडसे, आमदार डॉ. राहुल आहेर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार दीपक पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्या रत्नपारखी यांनीही शहीद गोसावी यांना विमानतळावर श्रद्धांजली अर्पण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्ल्यू आटोक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात थैमान घातलेल्या डेंग्यू आणि स्वाइन फ्ल्यूची साथ आटोक्यात आली असून, नोव्हेंबर महिन्यात स्वाइन फ्ल्यूचा अवघा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. राज्यात स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णसंख्येत नाशिक शहर आघाडीवर होते. नाशिक महापालिका व जिल्हा रुग्णालय येथे स्वाइन फ्ल्यू व डेंग्यूसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता. सप्टेंबर महिन्यात १३६ लोकांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाली होती. ऑक्टोबर महिन्यात १२७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते, तर नोव्हेंबर महिन्यांच्या दहा दिवसांत केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २७६, तर स्वाइन फ्ल्यू झालेल्यांची संख्या ४ होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरबसल्या मागवा पैसे!

$
0
0

शुभवार्ता

\B

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

टपाल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) 'पोस्टमन तुमच्या दारी' ही संकल्पना कार्यरत करण्यात आली आहे. या अंतर्गत आयपीपीबीमध्ये खाते असलेल्यांना २० हजार रुपयांपर्यंतचा आर्थिक व्यवहार घरबसल्या करता येणार आहे. आयपीपीबीच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधत घरी पैसे मागविणे, तसेच घरून पैसे पोस्ट कार्यालयात पाठविणे खातेधारकांना शक्य होणार आहे. नाशिकमध्ये सध्या पाच हजार खातेधारक या सुविधेचा लाभ घेत आहेत. शहरासह तालुका स्तरावरील ३२ टपाल कार्यालयांत सोमवारी आयपीपीबीची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

भारतीय डाक विभागातर्फे इंडिया पोस्ट पेमेंट बँक नाशिक विभागात सुरू करण्यात आली आहे. नाशिकमधील मुख्य टपाल कार्यालय, दिंडोरी, नळवाळापाडा, पालखडे बंधारा, टिटवे येथे सप्टेंबरमध्ये आयपीपीबीची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या पाठोपाठ सोमवारी (१२ नोव्हेंबर) शहरासह तालुका स्तरावरील ३२ टपाल कार्यालयांत आयपीपीबीची सुविधा सुरू करण्यात आली. याअंतर्गत आयपीपीबी या मोबाइल अॅपवरून सर्व प्रकारचे बँकिंग व्यवहार खातेधारकांना करता येणार आहेत. यामध्ये इंटरनेट बँकिंग, विविध सेवांची बिले भरणे, गॅस सबसिडी, सुकन्या योजना व पोस्ट आरडीमध्ये पैसे भरणे या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. आयपीपीबीअंतर्गत खातेधारकांना एटीएम कार्ड देण्यात आले आहे. बायोमेट्रिकच्या आधारेच खातेधारकांना सर्व प्रकारचे व्यवहार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीची फसवणूक या बँकेच्या कार्यप्रणालीत होणार नाही, असा विश्वास टपाल विभागाने व्यक्त केला आहे. आयपीपीबी खातेधारकांना १५५२९९ या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून घरबसल्या आर्थिक व्यवहार करता येणार आहे. आयपीपीबीमध्ये बचत खाते असणाऱ्यांना ५ हजार, तर चालू खातेधारकांना २० हजार रुपयांपर्यंतची रक्कम घरबसल्या मागविता येणार आहे. आयपीपीबीमध्ये कार्यरत पोस्टमन ही रक्कम खातेधारकांपर्यंत पोहोचविणार आहेत. खात्यात पैसे भरायचे असल्यास खातेधारकाच्या घरून पैसे पोस्टमन घेऊन जाणार आहेत. ही सर्व प्रोसेस जीपीएसअंतर्गत होणार आहे. त्यामुळे खातेधारकाला आयपीपीबीच्या मोबाइल अॅपच्या माध्यमातून पैशांबाबतचे सर्व अपडेट मिळणार आहेत. सध्या जिल्ह्यातील ३७ टपाल कार्यालयांत ही सुविधा सुरू झाली आहे. नाशिक विभागातील पेठ, हरसूल, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबक, सिन्नर या ठिकाणी ३०० टपाल कार्यालयांत आयपीपीबीची सुविधा डिसेंबर २०१८ च्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे. मालेगाव विभागात कळवण, सटाणा, देवळा, नांदगाव या तालुक्यांतील २५० टपाल कार्यालयांत ही सुविधा होईल, अशी माहिती नाशिक टपाल विभागाचे प्रवर अधीक्षक प्रल्हाद काखंडकी यांनी दिली.

\Bयेथे सुविधा सुरू

\Bनाशिक रोड, नाशिक शहर, अंबड, पाथर्डी, पिंपळगाव खांब, पिंपळद, विल्होळी, भगूर, आगासखिंड, लहवित, नानेगाव, पांढुर्ली, पिंपळगाव दुक्रा, साकूर, शेणित, शिवदे, विंचूरदळवी, भाऊसाहेबनगर, पिंपळस, पिंपरी, चांदोरी, खेरवाडी, देवळाली, बार्न्स स्कूल, बेलटगव्हाण, वडनेरदुमाला, मेरी कॉलनी, अकरले, खटवड, म्हसरूळ, पिंपळणेर, तळेगाव.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राथमिक आरोग्य केंद्रांचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बंद पडलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करावीत, गंगापूर गाव व सिन्नर फाटा येथे असलेल्या आरोग्य केंद्रात मॅटर्निटी होम सुरू करावेत, अशी नगरसेवकांनी वारंवार केलेली मागणी लक्षात घेऊन प्रशासनाने १५ आरोग्य केंद्रे करणार असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी दिली.

नाशिक महापालिकेची आरोग्यसेवा विस्कळीत झाल्याचा आरोप नगरसेवकांनी महासभेत केला होता. महापालिकेच्या हद्दीत असलेल्या १५ आरोग्य केंद्रांची दुरवस्था झाली असून, काही ठिकाणी कर्मचारी नाहीत तर काही ठिकाणी इमारत नाही, अशा तक्रारी नगरसेवकांकडून वारंवार केल्या जात होत्या. महासभेत प्रशासनाला वारंवार जाब विचारण्यात आला होता. यावर कार्यवाही करावी व नागरिकांना देण्यात येणाऱ्या मुलभूत सुविधा त्वरित द्याव्यात, असे नगरसेवकांनी प्रशासनाला सांगितले होते. गोरेवाडीत गेल्या अनेक वर्षांपासून तयार असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पडझड झाली होती. त्याची दुरुस्ती करणे गरजेचे होते. ही बाब नगरसेवकांनी प्रशासनास लक्षात आणून दिल्यानंतर या कामाचे टेंडर काढण्यात आले असून, त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गंगापूर गावात मॅटर्निटी होम सुरू करावे अशी अनेक वर्षांपासून मागणी होती. येथील महिलांना नाशिक शहरात घेऊन यावे लागते. याठिकाणी पूर्वी मॅटर्निटी होम सुरू होते. मात्र, काही वर्षांपासून या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने ते बंद पडले होते. ते पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली होती, तीदेखील काही दिवसांत पूर्ण होणार आहे. म्हसरुळ व मखमलाबाद येथील केंद्र देखील सुरू करण्यात येणार असून, सिडको येथील गणेश चौकात असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधून पूर्ण होत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुलतानपुरा येथे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा सुरू करण्यात येणार असून, ते अद्ययावत करण्यात येणार आहे.

वैद्यकीय विभागातील २८ पदे भरणार

नाशिक महापालिकेत वैद्यकीय विभागातील विविध २८ पदे रिक्त होती. यामुळे विविध प्रकारच्या सेवा नागरिकांना मिळत नव्हत्या. मात्र २० पदे भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, १६ नोव्हेंबर रोजी मुलाखती होणार आहेत. यासाठी आतापर्यंत २० अर्ज आले आहेत. येत्या काही दिवसांत २८ पदांवरील अधिकारी महापालिकेत रुजू झाल्यानंतर नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा मिळणार आहे.

१५ ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू

प्रस्तावित ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला असून, नागरिकांना सुविधा देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, महत्त्वाच्या सेवा येत्या काही दिवसांत पुरविण्यात येणार असल्याचे राहुल गायकवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाटबंधारे’च्या पोटात गोळा!

$
0
0

लढा पाण्यासाठी

जायकवाडीत पाणी न पोहोचल्याने धसका; महसूल आयुक्तांकडे धाव

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जायकवाडीला नियोजित पाण्यापेक्षा कमी पाणी पोहोचल्याने पाटबंधारे विभागाला खडबडून जाग झाली असून, शेतकऱ्यांनी अडवलेले पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाने नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने यांना साकडे घातले आहे. त्यामुळे जायकवाडी पाणीप्रश्न येत्या आठवड्यात पुन्हा पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. हिवाळी अधिवेशनात जायकवाडी पाणीप्रश्न उपस्थित होण्याचा धसकाही पाटबंधारे विभागाने घेतला आहे.

नाशिक आणि नगर जिल्ह्यातून औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडीसाठी सहा टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. मात्र, यापैकी अवघे साडेचार टीएमसी पाणी प्रत्यक्षात जायकवाडी धरणात पोहोचले. उर्वरित दीड टीएमसी पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणापासून पुढे कोपरगाव व श्रीरामपूर या दोन तालुक्यांमध्ये गोदावरी आणि प्रवरा या दोन्ही नद्यांतील केटी वेअर बंधाऱ्यांत स्थानिक शेतकऱ्यांनी अडविल्याचा आरोप पाटबंधारे विभागाने केला आहे. या दोन्ही तालुक्यांत तब्बल १७ केटीवेअर बंधाऱ्यांत निडल्स टाकून शेतकऱ्यांनी पाणी अडविल्यानेच जायकवाडीला कमी पाणी पोहोचल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे.

शेतकऱ्यांनी अडवलेले पाणी जायकवाडीला सोडण्यासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त मिळावा, जमावबंदी आदेश लागू करावा, गरज भासल्यास राज्य राखीव पोलिस दलाची मदत मिळावी, अशा प्रकारचे आर्जव पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी नाशिक विभागाचे आयुक्त माने यांच्याकडे सोमवारी केले. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मागणीवरून विभागीय आयुक्तांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या प्रश्नावर आवश्यक त्या कायदेशीर उपाययोजना करून पाटबंधारे विभागाला सहकार्य करण्याचे ताबडतोब आदेश दिले. शेतकऱ्यांनी अडवलेले पाणी सोडण्याच्या मुद्द्यावर नियोजन करण्यासाठी महसूल, पोलिस आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावण्याचेही विभागीय आयुक्तांनी नगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

अधिवेशनात प्रश्न पेटणार

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन तोंडावर आले आहे. त्यातच जायकवाडी पाणीप्रश्नावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष गेल्या महिन्यातच उफाळून आला होता. मात्र, अशाही परिस्थितीत नगर व नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागले होते. सहा टीएमसी पाणी सोडण्यात आले. मात्र, त्यापैकी दीड टीएमसी पाणी गोदावरी व प्रवरा नदीवरील १७ केटीवेअर बंधाऱ्यांत शेतकऱ्यांनी अडवून ठेवल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. मराठवाड्यात पूर्ण पाणी न पोहोचल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींचा पाटबंधारे विभागावरील दबाव वाढला असल्याने व हा प्रश्न येत्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला जाण्याचा धसका पाटबंधारे विभागाने घेतला आहे.

शेतकऱ्यांना फसविल्याचा आरोप

जायकवाडीला पाणी सोडण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शविल्याने शेवटच्या दिवशी केटीवेअर बंधाऱ्यांना चार निडल्स लावण्याची तोंडी परवानगी पाटबंधारे विभागानेच दिल्याचा दावा स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. त्यानुसार अडवलेले पाणी बेकायदेशीर असल्याचा दावा करणाऱ्या पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना फसविल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत केटीवेअर बंधाऱ्यांतील पाणी आता सोडू दिले जाणार नसल्याची भूमिका स्थानिक शेतकऱ्यांनी घेतली आहे. केटीवेअरमध्ये चार निडल्स टाकून पाणी अडविण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्याची माहिती समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नृत्य-गायनाच्या ‘आवर्तना’ने रसिक चिंब

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नृत्यांगण कथक नृत्यसंस्थेतर्फे दरवर्षी होणाऱ्या दोन दिवसीय आवर्तन संगीत समारोहाला सोमवारी प्रारंभ झाला. समारोहाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.

कार्यक्रमाच्या प्रथम पुष्पात नृत्यांगना सायली मोहाडकर व त्यांच्या शिष्यांनी 'तराणा' ही नृत्यप्रस्तुती सादर केली.

तराणा हा गायकीचा एक प्रकार आहे. यात राग, ताल, लयीचे सुंदर दर्शन घडते. कार्यक्रमाची सुरुवात कौशिकी चक्रवर्ती यांच्या स्वरातील 'गाइये गणपती जगवंदन' या गणेशवंदनेने झाली. त्यानंतर अहिरभैरव रागातील तराणा सादर झाला. त्यानंतर पं. गोपीकृष्णजींच्या पारंपरिक तराण्यावर नृत्यप्रस्तुती झाली. जोग रागातील तराण्यावर लहान मुलींनी सादरीकरण केले. त्यानंतर झालेल्या विभास रागातील तराण्यातून कथकचा वस्तुक्रम सादर करण्यात आला. पहिल्या पुष्पाचा शेवट पं. रविशंकर यांच्या भैरवीने करण्यात आला. विविध रागातील तराण्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

द्वितीय पुष्पात औरंगाबादच्या सुप्रसिद्ध नृत्यांगना सुश्री पार्वती दत्ता यांनी कथक नृत्य प्रस्तुत केले. सर्वप्रथम त्यांनी 'शिव पंचाक्षर स्तोत्र' सादर केले. त्यातून भगवान शंकराचे सूक्ष्म वर्णन केले आहे. खंड जातीतील पाच मात्रांच्या बोलांचा आधार घेऊन या रचनेची मांडणी केली आहे. त्यानंतर तालअंगात त्यांनी साडे नऊ मात्रांचा ताल सादर केला. या तालाची रचना पार्वती दत्ता यांनी १९९३ मध्ये केली होती. एक प्रयोग म्हणून तयार केलेला हा ताल कथकच्या सर्व गुरुजनांमध्ये कौतुकाचा विषय ठरला. या तालात त्यांनी कथकच्या वस्तुक्रमानुसार थाट, आमद, उठान, तोडे, तुकडे, परमेलू, तिहाई हे सादर केले.

त्यानंतर त्यांच्या शिष्यांनी शीतल भामरे व श्रिया दीक्षित यांनी ताल झपतालचे वर्णन करणारी पं. बिरजू महाराजजींची रचना प्रस्तुत केली.

ठुमरी सादरीकरणाने सांगता

कार्यक्रमाच्या शेवटी पार्वती दत्ता यांनी 'मुरलिया मन में बसी तोरी शाम' ही पारंपरिक ठुमरी सादर केली. या ठुमरीच वैशिष्ट्य म्हणजे त्यात उपज अंगाने प्रत्येक ओळीचा विस्तार केलेला होता. त्यांना तबल्यावर चारुदत्त फडके, सारंगीवर संदीप मिश्रा आणि गायनासाठी सुरंजन खंडाळकर यांनी साथसंगत केली. पार्वती यांच्या अभिनयाने, पदन्यासाने रसिक प्रेक्षक भारावून गेले. किशोरी किणीकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शिंदे गावातील दिनकर नामदेव झाडे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे जीवदान मिळाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

शिंदे गावातील दिनकर झाडे यांच्या शेतातील विहिरीत रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याचा एक बछडा पडला होता. दुपारच्या सुमारास या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या सिंधू झाडे यांच्या ही बाब लक्षात आल्यावर दिनकर झाडे यांनी या घटनेची माहिती बाजार समिती संचालक संजय तुंगार यांना दिली. तुंगार यांनी या बछड्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यावर या कर्मचाऱ्यांनी शिंदे येथे हजर होत स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला खाटेच्या सहाय्याने बाहेर काढले. विहिरीतून बाहेत पडताच बिबट्याच्या बछड्याने बाजूच्या उसाच्या पिकात धूम ठोकली. शिंदे गाव परिसरात यापूर्वीही बिबट्या आढळून आलेला आहे. वर्षभरापूर्वी एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटनाही घडली होती. त्यामुळे या भागात वन विभागाने बिबट्यांपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी यावेळी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

--

दोन गावांत बिबटे जेरबंद

सिन्नर : तालुक्यातील घोरवड शिवारातील सागाडी मळा येथे, तसेच दापूर शिवारातील तेलमाथा भागात दोन दिवसांत दोन बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. अन्न-पाण्याच्या शोधार्थ बिबट्यांचा मानवी वस्तीकडे शिरकाव वाढला असल्याचे अलीकडे दिसून येत आहे. घोरवड शिवारातील सागाडी मळा परिसरात सुदाम गांजवे यांच्या घराशेजारील कांदाचाळीत बिबट्याने प्रवेश केला होता. गांजवे कुटुंबीयांनी चाळीच्या अर्धवट जाळीवर काटेरी झुडपे टाकून बिबट्याला कोंडले. नंतर वन विभागाचे अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भुलीचे इंजेक्शन देऊन बिबट्यास ताब्यात घेतले. तत्पूर्वी, त्याने चार कोंबड्या फस्त केल्या होत्या. दुसऱ्या घटनेत बिबट्याचा बछडा दापूरच्या तेलमाथा भागात शनिवारी पहाटेच्या सुमारास शंकर निवृत्ती आव्हाड यांच्या घराच्या ओट्यालगत असलेल्या बाथरूममध्ये शिरला होता. वन विभागाच्या पथकाने या बछड्याला जेरबंद केले. दोन्ही बिबट्यांना मोहदरी वनोद्यानात ठेवण्यात आले आहे.

००००००००००००

(स्वतंत्र सिंगल)

--

'त्या' गायींचा मृत्यू शिळ्या अन्नामुळे

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

वंजारवाडी गावातील सात गायींचा गेल्या २२ व २३ ऑक्टोबर रोजी झालेला मृत्यू शिळे अन्न खाल्याने विषबाधा होऊन झाला आहे. पंचायत समिती सदस्य डॉ. मंगेश सोनावणे यांनी यासंदर्भात माहिती दिली.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारे या गायींच्या मृत्यूपूर्वी एक दिवस अगोदर गावामध्ये वर्षश्राद्धाचा कार्यक्रम होता. तेथील उरलेला भात मोकळ्या जागेवर फेकण्यात आला होता. परिसर मोकळा असल्याने चरण्यासाठी सोडलेल्या गायींनी हे शिळे सेवन केल्याने आधी तीन, तर दुसऱ्या दिवशी चार गायींचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय अधिकारी कविता पाटील, डॉ. शेळके, डॉ. लक्ष्मण कुमावत आदींसह कर्मचाऱ्यांनी या गायींची तपासणी केली असता त्यांच्या मृत्यूचे कारण उघड झाले. दरम्यान, गावातील ७० हून अधिक गायींना लाळखुरकत नावाचा रोग होऊ नये म्हणून लसीकरण करण्यात आले आहे.

----

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना ५० हजार रूपये मदत द्या

$
0
0

शेतकऱ्यांना पन्नास हजार मदत द्या

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यात १९७२ पेक्षा भयानक दुष्काळ आहे. खरीप रब्बी पिकांचे नुकसान मोठे आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या उपाययोजना करण्यासाठी सरकारने तिजोरी रिकामी करावी. केवळ बैठकांवर बैठक घेऊन काही होणार नाही. त्यावर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे म्हणाले. बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुष्काळ आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांना मागण्याचे निवेदन देऊन धनंजय मुंडे निघून गेले.

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुष्काळ आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यात १९७२ पेक्षा भयानक दुष्काळ आहे. खरीप रब्बी पिकांचे नुकसान मोठे आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या उपाययोजना करण्यासाठी सरकारने तिजोरी रिकामी करावी अशी मागणी केली. खरीप आणि रब्बीच्या पीक नुकसान पोटी शेतकऱ्यांना पन्नास हजार मदत द्या, टंचाई आराखडे आज टँकर मंजुरी दिली जात नाही बोअर विहीर अधिग्रहण केले जात नाही, कुठे ही पाणी नाही. रोजगार हमी योजनेच्या बाबतीत नवा जीआर काढला आहे.नोंदणीकृत मजुरांना कामे, रब्बीची पेरणी सोळा टक्के असून यातील ज्वारीची किती येईल दावणीला चारा दिला पाहिजे. यात निर्णय करावा खात्यावर पैसे किती देणार .बोन्ड अळीच वाटप झालेले नाही. त्याबाबत खोटी माहिती दिली जात आहे. विम्याचे पैसे खात्यावर अजूनही जमा नाहीत. कर्जमाफी पूर्णपणे मिळू शकली नाही. या सर्व विषयावर लेखी निवेदन दिले.

परळी शहर पाणी पुरवठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत प्रशासनाची काय भूमिका आहे, हे स्पष्ट करावे अशी मागणी यावेळी केली. राज्य सरकारने ऊस जास्त असलेल्या पट्ट्यातील कारखाने लवकर चालू करणे आवश्यक होते. ऊस वाहतूक अनुदान द्यावे अशीही मागणी केली.

संभाजी भिडे यांच्या विरुद्ध अनेक फिर्यादी आहेत. मात्र, सरकारने त्यांच्याविरुद्धचे गुन्हे मागे घेतले आहेत. त्यांच्या शेतातील आंब्याची चव राजकर्त्यांपैकी काहींनी चाखली असावी म्हणून त्यांची ते बाजू घेत असावेत. पुरोगामी महाराष्ट्रात तुकोबापेक्षा मनू श्रेष्ठ म्हणतो त्यांची तरफदारी राज्य सरकार करते हे दुर्दैवी आहे असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाजनांची नियुक्ती ‘नगरविकास’कडून रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या उपायुक्तपदी उन्मेश महाजन यांची होणारी नियुक्ती नगरविकास खात्याने आदेश काढून रद्द केली आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला चाप बसल्याने नगरसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महापालिकेत परसेवेतील अधिकारी घेण्याचा आयुक्त मुंढे यांनी सपाटा लावला आहे. आपल्या मर्जीतील अधिकारी आणून कारभार करण्यावर त्यांचा भर असून ही बाब स्थानिक अधिकाऱ्यांना न रुचल्याने महाजन यांच्या नियुक्तीला विरोध होता. तसेच महाजन हे खडसे यांचे निकटवर्ती असल्याने पालकमंत्री गिरीष महाजन यांचाही विरोध असल्याची चर्चा महापालिका वर्तळात होती. महाजन हे सध्या नाशिकच्या विभागीय आयुक्तालयात सहाय्यक आयुक्त (भूसुधार) पदावर कार्यरत आहेत. या पदावर असलेल्या महाजन यांची २० ऑक्टोबर रोजी मनपा उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे मनपा कारभारात सूसुत्रता येणार अशा चर्चा झडत होत्या; मात्र त्यांची नियुक्ती रद्द झाल्याने नगरसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाजन यांची नियुक्ती झाल्यास महापालिकेतील अर्थकारण ढासळणार होते, असा दावा करून नगरसेवकांनी विरोध केला होता.

आयुक्त मुंढेंना शह

आयुक्त तुकाराम मुंढे यांची महापालिकेत नियुक्ती झाल्यानंतर त्याचे आणि नगरसेवकांचे द्वंद नाशिककरांसमोर आले होते. यात करवाढीच्या मुद्यावरून अनेकदा हमरीतुमरी झाली होती. तसेच परिवहन समिती स्थापन करावी की कंपनी स्थापन करावी यावरूनही नगरसेवक मुंढेंच्या विरोधात गेले होते. महापालिकेत परसेवेतील अधिकारी आल्यानंतर ते मुंढेंचेच एकतात, स्थानिक नगरसेवकांना जुमानत नाहीत. त्यामुळे परसेवेतील अधिकारी घ्यायचे नाहीत, याबाबत नगरसेवक ठाम होते. या निर्णयामुळे नगरसेवकांचा विजय झाल्याची चर्चा महापालिकेत रंगली.

अनेक अधिकारी त्रासदायक

महापालिकेत नागरिकांची कामे होत नाहीत, असा नगरसेवकांचा आरोप आहे. आयुक्त तुकारम मुंढे यांनी आणलेले परसेवेतील अधिकारी नगरसेवकांचे ऐकत नाहीत. त्यामुळे परसेवेतील अधिकारी परत पाठवावेत, महापालिकेतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन कारभार करावा, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. उन्मेश महाजन यांची नाशिक महापालिकेत नियुक्ती झाली असती तर तुकाराम मुंढे यांचे हात बळकट झाले असते. यामुळे नगरसेवकांच्या निर्णयांना चाप बसला असता. त्यामुळे मनमानी निर्णय घेता येणार नव्हते. महाजन यांची नियुक्ती झाली असती तर तुकारम मुंढे यांचे हात बळकट झाले असते. तसे होऊ नये यासाठी ही बदली रद्द करण्यात आल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा मिळकतींवर अडीच टक्क्याने भाडे

$
0
0

आकारणीबाबत होणार पूनर्मुल्यांकन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मिळकती अनेक धनदांडग्यांना नाममात्र दरात देण्यात आल्याने त्यांचे पूनर्मुल्यांकन करण्यात येणार आहे. या मिळकतींना अडीच टक्के रेडिरेकनर दराने भाडे आकारले जाणार आहे.

महापालिकेच्या शहरातील विविध भागातील मिळकती, गाळे धनदांडग्यांनी अत्यंत नाममात्र दरात स्वत:च्या ताब्यात ठेवल्या असून काही ठिकाणी तर पोटभाडेकरू टाकण्यात आले आहेत. काही गाळे महापालिकेने छोट्या व्यावसायिकांना भरमसाठ भाडे आकारणी करून दिले. अशा गाळ्यांना जास्त भाडे तर मोठ्या गाळ्यांना कमी अशी विसंगती अनेक ठिकाणी आहे. या भाडे आकारणीत कोणत्याही प्रकारची सुसूत्रता नसल्याने प्रशासनाने सरकारच्या नियमावतील ७३ डी या नियमानुसार कार्यवाही करण्याचे धोरण अवलंबिले असून अशा मिळतीचा शोध घेण्यात येत आहे. यातील काही मिळकतधारकांना नोटिसा बजवण्यात आल्या असून त्यांच्याकडून सुधारित दराने करार करून घेतले जात आहेत. यामध्ये समानता यावी असा त्यामागील उद्देश आहे.

महापालिकेच्या किती मिळकती आहेत, याबद्दल प्रशासनही अनभिज्ञ होते. यातीवल अनेक मिळकतींचे कागदपत्रे व करारनामे प्रशासनाकडे उपलब्ध नाहीत. शहराच्या सहाही विभागातील विभागीय अधिकाऱ्यांना या मिळकती शोधण्याचे आदेश देण्यात आले होते. यावरून आतापर्यंत ९०० च्या वर मिळकतींचा तपास लागला असून त्यावर कार्यवाही केली जात आहे. काही मिळकती पाच रुपये ते शंभर रुपये महिना दराने काही राजकारण्यांनी बळकावल्या आहेत. या मिळकतीत पोटभाडेकरू ठेवून रग्गड पैसा कमविला जात आहे. मात्र, नव्या भाडे अकारणीमुळे या गैरप्रकारास आळा बसणार आहे.

नवीन नियमानुसार करार करण्यास नकार दिल्या जाणाऱ्या मिळकती सील केल्या जात आहेत. या मिळकतधारकांना अवधी दिला जाणार असून नवीन करारानुसार भाडे देण्यास तयार असल्यास त्या मिळकती पुन्हा त्यांना देण्यात येणार आहेत. अन्यथा या मिळकती दुसऱ्या भाडेकऱ्यांना हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. नवीन दराने भाडे आकारणीनंतर महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images