Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

स्मार्ट फोन, सोशल मीडिया दिवाळीमय!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटर ही सध्या व्यक्त होण्यासाठी, शेअरिंगसाठी पसंतीची माध्यमे आहेत. या माध्यमांमुळे यंदाची दिवाळी नेटिझन्ससाठी स्पेशल ठरली. लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीजेचे फोटो शेअर करण्यात आल्याने सोशल मीडिया दिवाळीमय झाले होते. यंदा ऐन दिवाळीतच व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स लाँच झाले. हे स्टिकर्स तर नेटिझन्सना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. हॅशटॅग दिवाळी वापरून अनेकांनी आपल्या कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला.

सोशल मीडियामुळे जग खऱ्या अर्थाने जवळ आले आहे. दुसऱ्या देशातील व्यक्तीही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबासोबत सहजपणे दिवाळी साजरा करतात. काही जण गावी जातात, शिक्षण, नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले दिवाळीनिमित्त एकत्र येत हा सण आनंदात साजरा करतात. नवनवीन कपडे, फटाके फोडण्याची धमाल, खुसखुशीत फराळाचा आनंद कुटुंबासमवेत लुटण्याची मजा या दिवसांमध्ये पुरेपूर लुटण्यात येते. पूर्वी एकत्र कुटुंबामुळे सर्वजण नेहमी सोबत असत. परंतु, आज नोकरी, शिक्षण, गावातून शहरात झालेले स्थलांतर अनेक कारणांमुळे कुटूंबातील व्यक्ती सोबत नसतात. त्यांना एकत्र आणण्याचे काम सणांद्वारे होते. दिवाळी हा सण तर त्यातील अतिशय महत्त्वाचा आहे. या सणाचा आनंद आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करून द्विगुणित करण्याचे काम या माध्यमातून करण्यात आले. घराची सजावट, आकाशकंदील, रांगोळ्या, पणत्यांचे फोटो शेअर करत दिवाळीचा आपल्या घरातील उत्साह सोशल मीडियावर शेअर केला. दिवस उजाडल्यापासून ते रात्रीपर्यंत आतषबाजी करण्यापर्यंतचे सगळ्या पोस्ट्स, फोटोस व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये नेटिझन्स अपडेट करताना दिसत आहेत. या स्टेटसला अन्य युझर्सकडून दाद मिळत असून, सोशल मीडियावरही दिवाळी हा चर्चेचा विषय ठरत आहे.

\Bसेल्फीची क्रेझ कायम\B

सेल्फीचा आनंद एरवीही उत्साहाने लुटला जातो. त्यात सण, उत्सव असेल तर त्याची मजाच वेगळी असते. सेल्फी चांगले यावेत, म्हणून मोबइईल कंपन्यांनीही फ्रंट कॅमेरा चांगल्यात चांगला देण्यावर भर दिला आहे. दिवाळीच्या सणात सेल्फीची क्रेझ यंदाही कायम होती. घरातील सजावट, कुटुंबातील व्यक्तींसोबत काढलेले सेल्फी अनेकांनी शेअर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार-बस अपघातात पाच ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर- शिर्डी मार्गावर खासगी प्रवासी बस आणि इनोव्हा कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार झाले, तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पांगरीलगतच्या देवपूर फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मृत प्रवासी मुंबईचे रहिवासी असून, त्यांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

मुंबई येथील मीरा रोड परिसरातील २८ भाविक वेगवेगळ्या वाहनांतून शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते. शिर्डीहून सिन्नरकडे परतत असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास देवपूर फाट्याजवळ या वाहनांपैकी एक असलेली इनोव्हा (एमएच ०४/जेबी ७०९०) कार आणि नाशिकहून शिर्डीकडे निघालेल्या खासगी प्रवासी बसची देवपूर फाट्याजवळील भोकणी शिवारातील साईशोभा पेट्रोलपंपाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता, की त्यामध्ये इनोव्हा कारचा चक्काचूर झाला. कारमधील सहापैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वावी पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना नाशिकमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, पवनाज जोशी (वय १२), ऋषी वराळे (वय १३) यांचा वाटेतच मृत्यू झाला. पवनी जोशी (वय १०) गंभीर जखमी असून, तिच्यावर मुंबई नाका येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अन्य तिघांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दोन्ही वाहने भरधाव होती. चालकांना ही वाहने नियंत्रित करता न आल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज वावी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरसे यांनी व्यक्त केला.

वाहतूक कोंडीत अडकल्या रुग्णवाहिका

जखमींना सिन्नरमार्गे नाशिककडे आणण्यात येत होते. त्या वेळी शिंदे-पळसे मागार्वर वाहतूक कोंडी झाली. या कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकल्याने वेळेत पोहोचण्यात अडथळे आल्याचे सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवनीसाठी आज नाशिकमध्ये रॅली

0
0

नाशिक : अवनी वाघिणीला निर्दयपणे मारल्याचा निषेध नोंदविण्यासाठी रविवारी शहरातील प्राणीप्रेमी रॅली काढणार आहेत. अवनीच्या पिलांचे पुनर्वसन करावे आणि त्यांना सुरक्षित वातावरण मिळवून द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये रविवारी शरण फॉर अॅनिमल्स, गिव्ह आणि इको इको यांसारख्या स्वयंसेवी संस्थांनी शांततेत रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी चार वाजता कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केटपासून या रॅलीला सुरुवात होईल. कॉलेजरोड मार्गे भोसला कॉलेजच्या प्रवेशद्वारापर्यंत ही रॅली येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राईम डायरी

0
0

\Bपिकअप जाळून नुकसान\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून पिकअप व्हॅन जाळल्याची फिर्याद एका तरुणाने पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजता पेठरोडवरील हमालवाडी मार्केटच्या मागील बाजूस हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. सागर रामदास येलमामे (वय २३, रा, हमालवाडी, पेठरोड) असे त्याचे नाव आहे. अर्जुन विठ्ठल धात्रक (वय ३४, रा. हमालवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी आणि फिर्यादी यांचे पूर्ववैमनस्य आहे. या वैमनस्यातून पिकअप व्हॅन जाळून सव्वा दोन लाख रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

विनयभंगप्रकरणी एकास अटक

नाशिक : भांडणाची कुरापत काढून मनात लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केल्याची फिर्याद एका महिलेने उपनगर पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आम्रपाली झोपडपट्टीत हा प्रकार घडला. पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. दत्ता लक्ष्मण हिरोडे (वय २४) असे त्याचे नाव आहे. संशयित फिर्यादीच्या घराजवळ आला. पूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फिर्यादी यांच्या सासूला शिवीगाळ केली, तर दीर अनिल यास चाकू दाखवून तुझा आता मर्डर करतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

धारदार हत्यार बाळगणाऱ्यास अटक

नाशिक : लोखंडी पाते असलेली धारदार २७ इंच लांब तलवार बेकायदेशीररित्या जवळ बाळगणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी अटक केली आहे. मालधक्का गेटजवळ ही कारवाई करण्यात आली. सचिन विलास चौधरी (वय २८, रा. शिवमल्हार हौसिंग सोसायटी, चेहडी शिव) असे संशयिताचे नाव आहे. जनार्दन पंडीत गायकवाड या पोलिस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. टाटा इंडिगो कारच्या डिक्कीमध्ये ही तलवार आढळून आली. पोलिस उपायुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जुगार प्रकरणी १० जणांना अटक

रविवार कारंजा परिसरातील रेडक्रॉस चौकाजवळ तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या चौघांना, तर उपनगर येथे वैदुवाडीत जुगार खेळणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नरेश डाया सुमरा (वय ५३) याच्यासह अन्य तिघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रेडक्रॉस येथील बिल्डींग क्र. दोन जवळ बेकायदेशीररित्या जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सायंकाळी सहाच्या सुमारास तेथे छापा टाकून कारवाई केली. उपनगर येथे आगारटाकळी परिसरातील वैदुवाडीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तेथे छापा टाकून संशयित दीपक बापू लोखंडे (वय २८) याच्यासह आठ जणांना अटक केली.

कैद्याचा मृत्यू

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कैद्याचा आजारपणामुळे मृत्यू झाला. राहुल तुळशीराम आहिरे (वय ३२, रा. मध्यवर्ती कारागृह, जेलरोड) असे त्याचे नाव आहे. आहिरे आजारी असल्याने त्याला कारागृहातील कर्मचारी नितीन रामचंद्र शेरताटे यांनी बुधवारी (दि.७) सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. औषधोपचारादरम्यान गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

तरुणावर जीवघेणा हल्ला

बहिणीच्या घराकडे का गेले अशी विचारणा केल्याचा राग आल्याने एका तरूणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सिडकोतील शिवाजी चौक बसस्थानकाजवळ बुधवारी हा प्रकार घडला. राजेंद्र नामदेव आठवले (वय ३७, रा. इंदिरा गांधी वसाहत, जुने सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. प्रकाश दांडेकर (वय ३०), सुनील पुंडीराम काळे (वय २७, रा. इंदिरा गांधी वसाहत, लेखानगर), शरद जाधव, गणेश कुऱ्हाडे (वय २७), स्वप्नील सुभाष कळमकर (वय ३०, रा. आदर्श सोसायटी, सिडको) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी काळे, जाधव, कुऱ्हाडे आणि कळमकर यांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास शिवाजी चौक बसस्टॉप जवळ संशयित आणि फिर्यादी यांच्यात वाद झाला. या रागातून संशयितांनी त्यांना स्टीलच्या रॉडने, फावड्याच्या दांड्याने बेदम मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघांची आत्महत्या

0
0

तिघांनी ऐन दिवाळीत

संपवली जीवनयात्रा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात ऐन दिवाळीच्या काळात दोन महिला आणि एका पुरुषाने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केली. सातपूर, उपनगर आणि सिडको परिसरात या वेगवेगळ्या घटना घडल्या.

सातपूर येथील स्वारबाबानगरमध्ये एकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय एकनाथ आढाव (वय ४०) असे त्याचे नाव आहे. बबन उत्तम तपासे (वय ३०, रा. दुर्गानगर, गंगापूर) यांनी सातपूर पोलिस स्टेशनमशध्ये फिर्याद दिली आहे. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास आढाव यांनी राहत्या घरात गळफास घेतला.

सिडकोतील तोरणानगर परिसरात राहणाऱ्या दीपाली नितीन कोळेकर (वय ३२) या विवाहितेने बुधवारी (दि. ७) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री पावणे नऊच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राणाप्रताप चौकात राहणाऱ्या किशोर गोपीचंद दोंदे (वय ४१) यांनी अंबड पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. तर याच दिवशी सकाळी साडेदहा वाजता जेलरोड येथील पुष्पकनगर परिसरात अर्चना हेमंत महाजन (वय ५३) या महिलेने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेतला. हेमंत माधव महाजन (वय ५९) यांनी उपनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. या आत्महत्यांचे कारण समजू शकले नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाम नदीत एक बुडाला

0
0

भाम नदीत बुडून

तरुणाचा मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव शिवारात भाम नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. गोरख निवृत्ती गव्हाने (वय १९) असे त्याचे नाव आहे. अजय नंदू काशीकर (वय १८) यास वाचविण्यात यश आले. गोरख हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे.

जनावरांना पाणी पाजण्यासाठी दोघेही भाम नदीच्या तिरावर गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे काही मित्रही होते. अंघोळ करण्यासाठी गोरख पाण्यात उतरला. मात्र, थोड्याच वेळात तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी अजयने नदीत उडी घेतली. मात्र, तोही बुडू लागला. अन्य मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेऊन दोघांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. गोरखला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवश्यक ते बदल होतील

0
0

देवळाली कॅम्प : गेल्या काही दिवसांपासून कॅन्टोन्मेंट बोर्ड कायद्यात बदल होणार असल्याने याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून लिखित सूचना कमिटीकडे सादर करण्यात आल्या आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व समस्यांबाबत संरक्षणमंत्री सीतारामन यांना माहिती देण्यात आली होती. त्यांनी यावेळी 'नागरी व लष्करी विभागाचा समन्वय साधून कायद्यात आवश्यक ते बदल केले जातील,' अशी माहिती दिल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा मीना करंजकर यांना सांगितले. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा करंजकर, नगरसेवक बाबुराव मोजाड, दिनकर आढाव, सचिन ठाकरे, माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर आदींनी संरक्षणमंत्र्यांची भेट घेत त्यांचे स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा पुन्हा धडकणार!

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत १५ नोव्हेंबरपर्यंत ठोस निर्णय घेतला नाही; तर मराठा आंदोलनाला निर्णायक दिशा देण्यासाठी १६ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील प्रत्येक महसुली विभागात मराठा संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या संवाद यात्रा २६ नोव्हेंबर रोजी एकत्रित विधानभवनावर धडकणार आहेत. मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्णय शनिवारी मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक विभागातील समन्वयक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठकीत घेण्यात आला.

नांदूर येथील वरद लक्ष्मी लॉन्स येथे झालेल्या बैठकीस नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यातील समन्वयक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांना करण गायकर, संजीव भोर, प्रमोद पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, विश्वास वाघ, गणेश कदम, संदीप लभडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदूरबार येथून मराठा समाज बांधव नाशिकला (दि. २५) नोव्हेंबरला रामसेज किल्ला येथे जमा होऊन तेथून वाहनांनी मुंबईकडे जाण्याचे ठरविले. 'आरक्षण मिळवू नाहीतर सरकार पाडू,' असा निर्धार बैठकीत करण्यात आला.

बैठकीत जिल्ह्यातील संवाद यात्रेचा मार्ग, स्वरुप, मराठा संवाद मेळाव्याचे ठिकाणे यांच्याबाबतीत नियोजन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या मूळ आंदोलनाची धार कमी करण्यासाठी काही लोक स्वार्थी हेतूने एकतर्फी, बेजबाबदारीने मराठा क्रांती मोर्चा नावाचा गैरवापर करुन हिंसक आंदोलने किंवा राजकीय पक्षाच्या अनाठायी घोषणा करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. ठोक मोर्चा व मराठा क्रांती नावाची संघटना किंवा राजकीय पक्षाशी मराठा क्रांती मोर्चाचा संबंध नसल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

मराठा क्रांती मोर्चात मराठा समाजासाठी सरकारकडे करण्यात येणाऱ्या मागण्या या बैठकीत मांडण्यात आल्या. त्यांना बैठकीत मंजुरी घेण्यात आली. त्यात कोपर्डी अत्याचारातील फाशीची शिक्षा सुनाविण्यात आलेल्या आरोपींवरील उच्च न्यायालयातील खटला जलद गतीने चालवून उच्च न्यायालयात विशेष सरकारी वकिलांचा तत्काळ नियुक्ती करावी, आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी, महिलांच्या अन्याय अत्याचाराविरोधात कायमस्वरुपी कायदेशीर उपाय योजना कराव्यात, राज्य घटनेतील तरतुदीनुसार एससी, एसटी, ओबीसी अशा तीन प्रवर्गातून आरक्षण देता येते. यास अनुसरून मराठा समाजास कायद्यात टिकणारे अर्थात ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे. अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी. तसेच सुधारीत कायद्यातील कलम १८-अ मागे घेण्यात यावे. अट्रॉसिटी कायद्यान्वये खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना शिक्षेची तरतुद कायद्यात करावी. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत. सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी ईबीसी विद्यार्थ्यांना ५० टक्के शिक्षण शुल्क माफी, प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत व्याज परतावा योजना, सारथी संस्था याबाबतचे शासन निर्णय सदोष असून, त्यात मराठा समाजाच्या आडून इतर समाज घटकांच्या हितास प्राधान्य देण्याचा प्रयत्न अनेक निर्णयात दिसून येत आहे. त्रुटी व मराठा समाजाचे आक्षेप विचारात घेऊन या निर्णयात त्वरीत सुधारणा करण्यात याव्यात. तसेच या निर्णयांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होऊन समाजास प्रत्यक्ष लाभ मिळेल अशा ठोस उपाय योजना कराव्यात, या मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

गड किल्ल्यांचे संवर्धनासाठी तरतूद करा

पदोन्नती, समांतर आरक्षण व खुल्या प्रवर्गातील जागांवर सरकारी पाठबळाने सर्रास अतिक्रमण होत असून, मराठा व खुल्या प्रवर्गाविरोधातील भूमिकेचा सरकारने फेरविचार करून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील समूहांना न्याय द्यावा, मराठा आरक्षण निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकारने कोणतीही शासकीय नोकरभरती करू नये. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, विजबिल माफी द्यावी. शेतमालाला उत्पादन खर्च अधिक दीडपट हमीभाव व डॉ. स्वामीनाथन कमिटीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यात यावी, शेतकरी विरोधी जुलमी कायदे मागे घ्यावेत, मुंबईतील आंतराराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक तसेच महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे संवर्धन याबाबत विशेष आर्थिक तरतूद करून याबाबत सरकारने ठोस कृती करावी, आदी मागण्याचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवा पायंडा स्वागतार्ह

0
0

संपूर्ण तालुक्याला नव्हे तर संबंधित तालुक्यांमधील काही महसुली मंडळांनाच दुष्काळी जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने यंदा प्रथमच घेतला आहे. संभाव्य टंचाईचा सामना करू पहाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदनांवर फुंकर मारण्याचा प्रयत्न या माध्यमातून सरकारने केला असून आमच्या तालुक्यांना दुष्काळी जाहीर करा ही राजकीय हेतूने प्रेरीत विविध पक्ष आणि संघटनांची मागणीही निकाली काढली आहे.

प्रवीण बिडवे

pravin.bidve@timesgroup.com

पाण्याच्या अनिर्बंध वापरावर मर्यादा आणायला हव्यात, याचा साक्षात्कार कोरडा दुष्काळ जेव्हा खुणावू लागतो तेव्हाच प्रकर्षाने होतो. दुर्दैव हे, की पाण्याचे महत्त्व ज्यांना सर्वार्थाने पटलेले असते आणि जे पाण्याचा बऱ्यापैकी सांभाळून वापर करीत असतात, त्यांच्यावरच पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जाण्याची वेळ येते. विशेषत: भौगोलिक परिस्थिती ही पाणी उपलब्धतेच्या समस्येवर सर्वांत मोठा अडसर ठरते. याउलट जेथे दाट लोकवस्ती असते अशा शहरी भागात पाण्याचे मोल माहीत नसल्याने त्याची वारेमाप उधळपट्टी करण्यात धन्यता मानली जाते. जिल्हा प्रशासनाने शहरवासीयांसाठी राखून ठेवलेल्या पाण्यामुळे शहरी नागरिकांना दुष्काळाची दाहकता अनुभवण्याची कधी गरजच भासत नाही. त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत नाही. त्यामुळेच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याऐवजी उधळपट्टीच अधिक होताना दिसते. स्वयंस्फूर्तीने पाणी बचतीची सवय अंगी बाणविली जाणार नसेल तर पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची जाणीवपूर्वक सवय लावण्याचा पवित्रा महापालिकेला स्वीकारावा लागेल. त्यासाठी कदाचित दंडात्मक कारवाईचा फासही आवळावा लागू शकतो. पाणीटंचाईचा सामना करणे मुश्कील झाल्यास ग्रामीण भागातील रहिवाशांचे लोंढेच्या लोंढे शहरात मुक्कामाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा आगंतुक पाहुण्यांकरिता पाण्याची तजवीजदेखील महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला विचारात घ्यावी लागणार आहे.

दुष्काळसदृश या शब्दच्छलातून बाहेर पडत अखेर सरकारने राज्यातील १८० तालुक्यांना दुष्काळी जाहीर केले. तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थिती उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही सरकार या परिस्थितीला दुष्काळसदृश का म्हणतेय, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडणे स्वाभाविकच होते. दुष्काळ जाहीर करण्यासाठीच्या कार्यवाहीकरिता वेळ घेत अखेर सरकारने ऑक्टोबरअखेरीस दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव, देवळा, बागलाण, चांदवड, सिन्नर, नाशिक आणि इगतपुरी या आठ तालुक्यांना दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीमध्ये लागू करावयाच्या सवलती या तालुक्यांनाही लागू झाल्या आहेत; परंतु येवल्यासारख्या तालुक्यात अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असतानाही हा तालुका दुष्काळी म्हणून जाहीर झाला नाही. तालुक्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस झाल्याने तो दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समाविष्ट होऊ शकला नाही. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेकांनी तालुक्यातील दाहकतेचे चित्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून येवल्याचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत करावा, अशी जोरदार मागणी केली. दुष्काळाच्या निकषांमध्ये पूर्ण तालुका बसत नसला तरी महसूलमधील काही मंडळांना दुष्काळी जाहीर करावे का, याबाबत बराच खल झाला. पुण्यात कृषी आयुक्तालयात बोलावण्यात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा मुद्दा प्राधान्याने मांडण्यात आला. ज्या महसुली मंडळांमध्ये अल्प पाऊस झाला आहे, त्यांना दुष्काळी जाहीर करायला हवे, अशा सूचना करण्यात आल्या. त्यावर सरकारनेही सकारात्मकता दर्शवत अशा मंडळांची माहिती मागवून घेतली. त्यानंतर काही दिवसांतच महसूल मंडळांना दुष्काळी जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांना आगळीवेगळी दिवाळी भेट दिली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाच्या निकषांनुसार ही मंडळे दुष्काळी जाहीर करण्यात आल्याने संबंधित गावांमधील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या ७५ टक्के पाऊस झालेली किंवा ७५० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झालेली मंडळे हा निकष ठेवून राज्यातील २६८ महसुली मंडळांना दुष्काळी जाहीर करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला. या निर्णयाचा लाभ नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड, दिंडोरी आणि कळवण तालुक्यातील एकुण १७ मंडळांना होणार आहे. या निर्णयामुळे संबंधित मंडळांच्या कार्यक्षेत्रातील रहिवाशांनादेखील जमीन महसूलामध्ये सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीमध्ये स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलामध्ये ३३.५ टक्के सूट, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये माफी, रोजगार हमी योजनेच्या कामांच्या निकषांत काही प्रमाणामध्ये शिथिलता, टँकर्सद्वारे पाणीपुरवठा, शेतीपंपांची वीज खंडित न करणे यांसारख्या सवलतींचा लाभ या महसुली मंडळांतील शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. पूर्ण येवला तालुका दुष्काळी म्हणून जाहीर होऊ शकला नसला तरी या तालुक्यातील नगरसूल, अंदरसूल, पाटोदा, सावरगाव, जळगाव (नेऊर)या पाच मंडळांमध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने आणि तेथे पावसाळ्यापासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याने त्यांना दुष्काळी जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय बागायतदारांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील सर्वाधिक सहा महसुली मंडळांचीही सरकारने दुष्काळी म्हणून नोंद घेतली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस झालेला तालुका म्हणून निफाडची नोंद झाली. त्यामुळे या तालुक्यातील निफाड, रानवड, चांदोरी, देवगाव, सायखेडा, नांदूर या महसुली मंडळांना दुष्काळी उपाययोजनांचे लाभ दिले जाणार आहेत.

दिंडोरी तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाला असला तरी दिंडोरी महसूल मंडळासह मोहाडी आणि वरखेडा मंडळात सरासरीच्या खूपच कमी पाऊस झाला. त्यामुळे या मंडळांनाही दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळणार असून कळवण तालुक्यातील कळवणसह नवीबेज, मोकभाणगी या मंडळांमधील शेतकऱ्यांना दुष्काळी योजनांचा लाभ देऊन सरकारने खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. दुष्काळासाठी महसूल मंडळात झालेल्या पावसाचा निकष विचारात घेतल्याने यापुढे खऱ्या अर्थाने दुष्काळाची दाहकता सोसणाऱ्या गावांपर्यंत दुष्काळी उपाययोजनांचे लाभ पोहोचविणे सरकारला शक्य होणार आहे. उपाययोजनांमुळे वेदनांवर फुंकर घालता येते. अशा असह्य वेदनाच कुणाच्या वाट्याला येऊ नयेत याकरिता ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नामको’च्या हालचालींना वेग

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीनंतर नामको निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. २३ डिसेंबर रोजी निवडणुकीच्या मतदानाची घोषणा झाल्यानंतर प्राथमिक बैठका झाल्या. पण, त्यानंतर दिवाळीमुळे काहीसा हालचाली मंदावल्या. आता पुन्हा या हालचालींना वेग आला आहे.

या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख ही १७ ते २७ नोव्हेंबर असल्यामुळे अवघ्या १० ते १५ दिवसात उमेदवारांचे नाव पुढे येणार आहे. कै. हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या संचालक मंडळाने पुन्हा त्यांनाच संधी देण्याची रणनिती आखली असून, त्यामुळे नवीन उमेदवाराला फारशी संधी मिळणार नाही. त्यासाठी येत्या तीन दिवसात याबाबत बैठक होणार आहे. दुसरीकडे सहकार पॅनलनेही या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

सत्ताधारी असलेल्या माजी संचालकांमध्ये समन्वयाची भूमिका सोहनलाल भंडारी व वसंत गिते यांनी स्विकारली असून, शनिवारी त्यांनी याबाबत प्राथमिक चर्चा झाली. तर दुसरीकडे सहकार पॅनल बनविण्यासाठी भास्करराव कोठावदे, ललित मोदी, अजय ब्रम्हेचा व गजानन शेलार यांनी आराखडा तयार केला असून, त्यांनी विविध क्षेत्रातील उमेदवारांची चाचपणी केली आहे. अजित बागमारनेही पॅनल तयार करण्याची घोषणा केली आहे.

डोकेदुखी वाढणार

पाच वर्षे प्रशासकीय राजवट असल्यामुळे बँकेत निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक सभासद या निवडणुकीत नामनिर्देशपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत पॅनलची डोकेदुखी वाढणार आहे. काही इच्छुकांनी दोन्ही प्रमुख पॅनलकडे विचारणा सुरू केली आहे.

वैयक्तिक प्रचाराला सुरुवात

सोशल मीडिया व इतर माध्यमातून इच्छूक उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. काही उमेदवारांनी थेट सभासदांना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवून आपला संपर्क वाढवला आहे. तर काहींनी फोनवरुन संवाद साधत त्यांना उमेदवारी करणार असल्याची कल्पना दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यराणीचा अपघात टळला!

0
0

मनमाडजवळ रेल्वेरुळाला तडा; वेळीच रोखली गाडी

- रापली येथील घटना

- गस्तीदरम्यान दिसला तडा

- डीटोनेटर फोडून व लाल सिग्नलने दिली धोक्याची सूचना

- थंडीमुळे रुळाला तडे जाण्याची शक्यता

- घातपाताची शक्यता नाही

...

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड नजीक रापली येथे रेल्वेरुळाला तडा गेल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे मनमाड येथून निघणाऱ्या मनमाड मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसचा अपघात टळला. शुक्रवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. शेकडो प्रवाशांचे प्राण वाचिवणाऱ्या या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला.

शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मनमाडहून मुंबईकडे राज्यराणी एक्स्प्रेस निघाली होती. यावेळी पेट्रोलिंग करीत असलेले रेल्वे कर्मचारी ट्रेकमेन काशीनाथ ठाकरे यांना वडगाव रापली सेक्शनमध्ये रेल्वेरुळाला तडा गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच रेल्वे समोर धावत जात रेल्वे ड्रायव्हरला सावध करण्यासाठी धोक्याची सूचना देणारे डीटोनेटर फोडून तसेच, रेड सिग्नल देत रेल्वेड्रायव्हरला गाडी थांबविण्याचे संकेत दिले. ड्रायव्हरने गांभीर्य ओळखून लगेच रेल्वे थांबवली. यामुळे मोठा अपघात टळला. त्वरित रेल वेल्डिंग फ्रॅक्चर झालेल्या स्थळी फिश प्लेट बांधून त्यानंतर रेल्वे मार्गस्थ करण्यात आली. हिवाळ्यात वातावरणामुळे रेल्वेरुळाला तडा जाणे शक्य असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. रेल सुरक्षित करून प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या चेतन आहिरे व काशीनाथ ठाकरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

...

आहिरे, ठाकरे यांचा सत्कार

दिवाळीत रेल्वेगाड्यांना गर्दी असल्याने या गाडीने प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या चेतन आहिरे व काशीनाथ ठाकरे या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रेल्वे कर्मचारी व एससीएसटी रेल्वे कर्मचारी संघटनेचे मनमाड ओपन लाइन शाखेचे कोषाध्यक्ष चेतन आहिरे व काशीनाथ ठाकरे यांचा या माणुसकीच्या व कर्तव्य तत्परतेच्या कार्याबद्दल संघटनेतर्फे पदाधिकारी सतीश केदारे यांनी सत्कार करून कार्याचा गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव दीपोत्सव

0
0

दीपोत्सवाने

राममंदिर प्रकाशमय

मालेगाव : रामसेतू येथील राममंदिरात भाऊबीजेच्या दिवशी श्रीराम मंदिर रामबाग सेवा समितीच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सहस्त्र दिव्यांच्या प्रकाशात हे राममंदिर उजळून निघाले होते. सुमारे ११०० दिव्यांनी मंदिर प्रकाशमान झाले होते. यासह आकर्षक रांगोळी, फुलांच्या गालीचाने मंदिर सजविण्यात आले होते. प्रभू श्रीरामाची महाआरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला. दीपोत्सव यशस्वीतेसाठी बंटी तिवारी, नंदा पोरवाल, नीलम अग्रवाल, प्रेरणा तिवारी, अल्का बागूल, सलोनी अग्रवाल,भारती तिवारी, दीपक पाटील, शंकरलाल तिवारी, गणेश जंगम, रमेश बागूल आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज आली, दिवाळी गोड झाली!

0
0

सारस्तेतील पिंपळके कुटुंबियांना सौभाग्य योजनेचा लाभ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासीबहुल सारस्ते गावातील वसंत पिंपळके यांच्यासाठी यंदाची दिवाळी विशेष आनंदाची झाली आहे. सौभाग्य योजनेअंतर्गत घरात वीज आल्याने त्यांच्याकडे खरा आनंदोत्सव साजरा होत आहे.

पिंपळके शेतमजूरी करून लहानशा कुडात राहतात. दिवसभर कष्ट करून आल्यावर घरात मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात रात्रीचे भोजन करायचे आणि सकाळी परत कामावर जायचे असा त्यांचा दिनक्रम असे. मदतीला बॅटरी असायची ती रिचार्ज करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागे. आर्थिक परिस्थितीमुळे घरात दिव्याची सुविधा करणे त्यांना शक्य नव्हते. दाराशी बांधलेल्या गुरांना चारापाणीदेखील अंधारातच करावे लागे. रात्री कामासाठी घराबाहेर पडणे कठीण होते. अशा परिस्थितीत सौभाग्य योजनेअंतर्गत त्यांना एक दिवा आणि मोफत वीज कनेक्शन मिळाले. वीज जोडणी येताच घरातील व्यवहार जणू गतिमान झाले. घरात दिवा आल्याने अकरावीत असलेल्या मुलाला अभ्यासाची सुविधा झाली आहे. बॅटरी चार्जिंगची सुविधा घरातच झाल्याचा आनंद पिंपळके यांना आहे. दिवसभरातील थकल्यानंतर रात्रीच्या विरंगुळ्यासाठी घराच्या छतावर डिश अँटेना दिसू लागला आहे. मुलगा ॲथलीट असल्याने अभ्यासासोबत चांगल्या स्पर्धा पाहिला मिळतील याचा त्याला विशेष आनंद आहे.

वीज आल्याने गुजराबाईंना रात्रीची कामे करणे सोपे झाले आहे. वसंतरावांना दिवाळीला घरावर लायटींग करता येईल याचाही विशेष आनंद आहे. त्यांच्याप्रमाणेच गावातील इतर ५० पेक्षा अधिक कुटुंबांसाठी यावेळची दिवाळी सौभाग्य योजनेमुळे विशेष अशीच आहे. गावात फिरताना त्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर दिसतो. वीजेमुळे बाहेरील जगाची ओळख होण्याबरोबर दिवाळीचा सण या सर्वांसाठी विशेष ठरला आहे.

२४ हजार कुटुंबांना लाभ

जिल्ह्यात सौभाग्य योजनेअंतर्गत २४ हजार ६७९ कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. नाशिक शहर मंडळातील ८ हजार ६८७ आणि मालेगाव मंडळातील १५ हजार ९९२ जोडणींचा समावेश आहे.

कोट

घरी मुलगी आपल्या बाळासह आली आहे. बाळाकडे लक्ष देताना रात्रीची चिंता राहिली नाही. रात्री पाणी भरतानाही आता त्रास होणार नाही याचा आनंद आहे.

गुजराबाई पिंपळके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बच्चे कंपनीसाठी बुधवारी ‘श्यामची आई’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'शामची आई' हे नाटक म्हणजे आईने साने गुरुजींच्या बालमनावर केलेल्या संस्कारांची कलाकृती म्हणून ओळखली जाते. आजच्या काळातील मुले आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता या नाटकाची खरी गरज असल्याचे चित्र आहे. दिवाळीच्या सुटीनिमित्त व बालदिनानिमित्त या नाटकाचा लाभ नाशिककरांना आपल्या मुलामुलींसोबत घेता येणार आहे. दामोदर प्रॉडक्शन, नाट्य चंद्रशाळा बाल रंगभूमी प्रस्तूत या नाटकाचे महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे आयोजन करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता कालिदास कलामंदिर येथे या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

सध्या दिवाळीच्या सुटीचा आनंद लुटण्यात बच्चेकंपनी दंग आहे. सुटीची मजा घेण्याबरोबरच मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांच्यावर संस्कारही रुजावे या उद्देशाने नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. साने गुरुजीलिखित 'श्यामची आई' या नाटकाची निर्मिती दामोदर प्रॉडक्शन संस्थेने केली आहे. नाटकाचे दिग्दर्शन डॉक्टर प्रशांत वाघ यांनी केले आहे, तर नाट्यरुपांतर शैलजा औटी यांनी केले आहे. जे कल्चर क्लबचे सदस्य आहेत त्यांना तिकीटदरात विशेष सवलत देण्यात येणार आहे. नव्याने सदस्य होणाऱ्यांना या नाटकाची दोन तिकिटे मोफत मिळणार आहेत. आजच महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि या नाटकाची दोन तिकिटे मोफत मिळवा. कल्चर क्लब सदस्यांनी व नव्याने सदस्य होणाऱ्यांनी तिकिटासाठी सोमवारपासून १ ते ५ या वेळेत ०२५३-६६३७९८७, ९४२२५१३५६९ या नंबरवर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीला तोबा गर्दी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाने जादा बस गाड्यांचे नियोजन केल्यामुळे गर्दीतही प्रवाशांना दिलासा मिळाला. भाऊबीजेला मात्र बस स्थानकावर प्रचंड गर्दी होती. गेले तीन दिवस बसच्या गर्दीमुळे एसटीचे आगारही फुलले होते. शनिवारी मात्र या गर्दीत थोडी घट झाली असली तरी बस फुल्ल होत होत्या. सोमवारी सर्व सरकारी कार्यालये आणि उद्योग सुरू होणार असल्याने रविवारी प्रवाशांची मोठी गर्दी होणार आहे. त्याचे नियोजन महामंडळाने केले आहे.

दिवाळीनिमित्त एसटी होणाऱ्या गर्दीमुळे एसटी दरवर्षी भाडेवाड करते. पण, यावेळी ही दरवाढ १ ते २० नोव्हेंबरपर्यंत १० टक्के केल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कमी चाट बसली. गेल्या वर्षापासून एसटीने सुरू केलेल्या शिवशाही बसमुळे एसटीकडे पुन्हा प्रवाशांचा कल वाढला आहे. त्यामुळे यावर्षी खासगी बस वाहतुकीवरही त्याचा परिणाम जाणवला. एसटी महामंडळाने दिवाळी अगोदर जादा बस गाड्यांचे नियोजन केले होते. त्यामुळे दिवाळीच्या सणात प्रवाशांचा प्रवाशांनाही हायसे वाटले.

असे होते नियोजन

दिवाळी निमित्त १८० जादा बस सोडण्याचे नियोजन एसटीने केले आहेत. त्यामुळे गेले ११ दिवस विविध ठिकाणाहून या बस सोडण्यात आल्या. जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर, पेठ, कळवण, पिंपळगाव, इगतपुरी, सटाणा, लासलगाव, येवला, मनमाड, नांदगाव या आगारातून जादा बस सोडण्यात आल्या. पुणे येथे जाण्यासाठी एसटीने दर १५ मिनिटाला एक शिवशाही बसचे नियोजन केले आहे. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहण्याची गरज पडत नाही. या सेवेमुळे बसला गर्दी वाढली. त्याचप्रमाणे धुळे येथेही अशीच व्यवस्था करण्यात आली होती. येथे जाण्यासाठी गर्दीनुसार नियोजन करण्यात आले. इतर मार्गावरही असेच नियोजन होते.

एसटीचा सुपर संडे

सणानिमित्त नाशिकला आलेले पुन्हा सोमवारी कामावर जाणार असल्यामुळे रविवारी एसटीला पुन्हा गर्दी होणार आहे. अनेकजण पुणे, मुंबई येथे नोकरीसाठी राहतात. त्यामुळे त्यांची गर्दी मोठी होणार आहे. त्यामुळे एसटीने त्यासाठी नियोजन केले आहे. पुणे येथे जाण्यासाठी दर १५ मिनिटांच्या बसबरोबरच ३० जादा बस सोडण्यात येणार आहेत. एसटीने तुळजापूर, कोल्हापूर, माहुरगड, अक्कलकोट या धार्मिक स्थळांच्या दर्शनसाठी बस सोडल्या असून, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे पुसद, लातूर, बुलढाणा, चोपडा, कल्याण येथेही या काळात जादा बस धावल्या. नाशिक शहरात एसटीचे बाहेरगावी जाण्यासाठी जुने सीबीएस, नवे सीबीएस, महामार्ग व नाशिकरोड बस स्थानक आगार आहे. या चारही आगारांपैकी नव्या सीबीएसवर प्रचंद गर्दी आहे. या बस स्थानकावरून पुणे, औरंगाबाद, धुळे, जळगाव, शहादा यांसह विविध ठिकाणी बस सोडल्या जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऐन दिवाळीत मंगळसूत्रं हिसकावली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऐन दिवाळीत तीन महिलांना आपले गळ्यातील सोन्याचे दागिने गमवावे लागले आहेत. सक्रिय झालेल्या चोरट्यांनी चेनस्नॅचिंग करीत हजारो रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

नाशिक-पुणे महामार्गावरील तुलसी आय हॉस्पिटलजवळ एक चेन स्नॅचिंगची घटना घडली. प्रियंका समीर वाघ (वय २९, रा. रौनक रो हाऊस, हॅप्पी होम कॉलनी) यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि. ९) दुपारी साडेतीनच्या सुमारास त्या तुलसी आय हॉस्पिटलजवळून पायी चालल्या होत्या. त्यावेळी मोटरसायकलवरून हेल्मेट परिधान करून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली. पंचवटीतील हिरावाडी रोड परिसरातही एका महिलेचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेले. आशा भगवान बागूल (वय ४९, रा. शिवकृपा अपार्टमेंट, महालक्ष्मीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. सायंकाळी सात वाजता त्या हिरावाडी रोडवरील कपील बंगल्याजवळून चालल्या होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेतली.

निमाणी बसस्थानकातही गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली. सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथे राहणाऱ्या सुमन सुखदेव बोडके (वय ६०) यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्या शुक्रवारी दुपारी तीन वाजता निमाणी बस स्थानकात बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाची आणि ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबविल्याचे बोडके यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी स्मृती अतुल राव (वय ४९, रा. कल्याण) या सायंकाळी सातच्या सुमारास भावाला भेटण्यासाठी अशोका मार्गरोड येथून चालल्या होत्या. त्यावेळी समोरून एकजण मोटरसायकलवरून आला. त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून त्याने पोबारा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना पुरेसे कमिशन;ना सुरक्षेची हमी!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरातील विविध कंपन्यांच्या गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरचे घरोघरी वितरण करणारे वितरकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकिकडे गॅस एजन्सी चालकांकडून कमी कमिशन देण्याचा प्रकार घडतो तर तेही वेळेवर मिळत नसल्याने उसनवारी करून जगावे लागत असल्याची व्यथा अनेक वितरकांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केली. घरोघरी सिलिंडर पुरविताना आवश्यक सुरक्षेच्या सुविधाही मिळत नसल्याने जगणे रामभरोसे झाल्याची चिंता ते व्यक्त करतात.

गॅस सिलिंडर मिळणे आता अगदी सोपे झाले आहे. मोबाइलवर सिलिंडरची बुकिंग केली की, अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सिलिंडर दारात हजर होतो. मात्र, ही प्रक्रिया मोबाइलवर पार पडत असली तरी दारात येणारा सिलिंडर गॅस एजन्सीत काम करणाऱ्या कामगारच आपल्या खांद्यावर घेऊन येतो. मग आपले घर बिल्डिंगच्या कोणत्याही मजल्यावर असो. त्यांच्या या कष्टामागे त्यांना खूप पैसे मिळत असणार असा आपला समज होतो. मात्र प्रत्येक सिलिंडर मागे त्यांचे कमिशन ठरलेले असते. हे कमिशन संबंधित कंपनी ठरविते व ते गॅस एजन्सीमार्फत त्या कामगाराला (वितरकाला) मिळते. मात्र साधारण २० रूपये कमिशन ठरले असतानाही फक्त खांद्यावर दारोदारी सिलिंडरचे वितरण करणारा कामगाराच्या हाती फक्त दहाच रूपये पडतात. यामुळे या कष्टकऱ्या सिलिंडर वितरकाची आर्थिक उपेक्षा होताना दिसते. त्यातच गॅस वितरण करणाऱ्या कामगारांना पुरेशा सुरक्षेचे उपाययोजना देण्याचे बंधनकारक असतानाही कोणतेही सुरक्षेची साधने त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे सिलिंडर वितरकाचे खांदे १८ किलोचे सिलिंडर उचलून काळे पडल्याची व्यथा वितरक मांडतात.

सिलिंडर वितरकांची होणारे हाल लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने गॅस एजन्सी चालकांची बैठक घेत वितरकांच्या समस्या सोडवात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र यातून काही साध्य होईल, असे वाटत नसल्याचा खुलासा सिलिंडर वितरक करतात. गॅस कंपनीने वितरकांना द्यावयाच्या सुविधांबाबत नियमावली केली असली तरी गॅस एजन्सी याकडे दुर्लक्ष कसे करते, असा प्रश्न त्यांना पडतो. त्यातच सिलिंडर वितरकांची संघटना नसल्याने आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्यास कामावरून कमी केले जाण्याची भीतीमुळे ठोस काही हाती पडत नाही. मात्र, किती दिवस अशाच पद्धतीने काम करायचे असाही प्रश्न कामगारांना सतावतो आहे. पुरेशी सुरक्षेची साधने, कपडे, बुट व विमा या प्राथमिक गरजा तरी मिळाव्यात, अशी अपेक्षा सिलिंडर वितरक व्यक्त करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिसेंबरमध्ये विवाहाच्या अवघ्या दोन तारखा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतात विवाह हा एक महत्वपूर्ण संस्कार मानला जातो. गेल्या तीन महिन्यांपासून थांबलेल्या विवाहांना पुन्हा सुरुवात होणार असून डिसेंबर महिन्यात अवघ्या २ तारखांना विवाह होणार आहेत.

चांगल्या मुहूर्तावर लग्न समारंभ आयोजित केले जातात. अनेकदा वधू आणि वराची कुंडली पाहूनही विवाहाचे मुहूर्त निश्चित केले जातात. त्यात कुंडली, ग्रह, नक्षत्र यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. तसेच विवाहाच्या तारखांमधील व्यावहारिकतादेखील विचारात घेतली जाते. यात शक्यतो सुटीचा दिवस, शनिवार व रविवार या दिवशी असलेल्या मुहुर्तांना प्राधान्य दिले जाते. यंदाच्या वर्षी विवाहाचे एकूण २८ मुहूर्त होते त्यातील फेब्रुवारी महिन्यात ३, मार्च ४, एप्रिल ७, मे २, जून ७, जुलै ३ अशा संख्येने तारखा होत्या. फेब्रुवारी ते जुलै या कालावधीत २६ तारखांना विवाह झाले. त्यांनतर विवाहांना ब्रेक लागला. जुलै महिन्यातील प्रबोधिनी एकादशीनंतर चार महिने देवतांच्या विश्रांतीचा कालावधी असल्याने या काळात विवाह होत नाहीत. या कालावधीत शुभकार्य वर्ज्य मानले आहे. त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात विवाह समारंभ झाले नाहीत. चार महिन्यांपासून थांबलेल्या विवाहांना आता सुरुवात होणार आहे. मात्र आपल्याकडे चातुर्मास सुरू असल्याने नोव्हेंबर महिन्यात कोणताही मुहूर्त नाही. डिसेंबर महिन्यात १२ आणि १३ या तारखांना विवाह करता येणार आहेत. आपल्याकडे प्रांतरचनेनुसार पंचांग पहाण्याची पद्धत आहे. त्यामुळे विविध पंचांगांनुसार वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत.

आपल्याकडे विविध पंचांगानुसार सोयीने तारखा काढल्या जातात. नोव्हेंबर महिन्यात विवाहाच्या तारखा नाहीत. मात्र, डिसेंबर महिन्यात फक्त २ तारखा आहेत.

- उल्हास शुक्ल, पंचाग अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावकरांची ‘पाडवा पहाट’ झाली सूरमय!

0
0

रसिकांसाठी बहारदार आयोजन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

'लिटिल चॅम्प्स' फेम अंजली व नंदिनी गायकवाड यांच्या सुरेल गायकीने मालेगावकारांची दिवाळी पहाट सूरमय झाली. निमित्त होते येथील एकता सांस्कृतिक मंच आयोजित 'पाडवा पहाट' या संगीत मैफलीचे. गायकवाड भगिनी व त्यांचे वडील अंगद गायकवाड यांनी आपल्या बहारदार गायकीने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते.

दरवर्षीप्रमाणे यंदादेखील येथील गोरवाडकर वाड्यात या पाडवा पहाटचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. मैफलच्या प्रारंभी मंचचे डॉ. विनोद गोरवाडकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर राग अहिर भैरवच्या गायनाने संगीत मैफलीचा प्रारंभ झाला. गायक अंगद गायकवाड यांनी सुरेश वाडकर यांच्या आवाजातील 'ओंकार स्वरूपा' हे गीत गायले. अंगद गायकवाड यांच्या गीतानंतर गायकवाड भगिनींनी नाट्यसंगीतापासून ते भक्तिसंगीतापर्यंत अशी वैविध्यपूर्ण गाणी सादर करून मैफलीत रंग भरले.

नंदिनी गायकवाड हिने 'भेटी लागी जिवा' हा अभंग सादर केला. तर अंजलीने सादर केलेल्या 'घडी घडी आठवते चरण तुझे राम' या गीताने श्रोत्यांची दाद मिळवली. संगीतकार यशवंत देव यांना आदरांजली वाहत अंगद गायकवाड यांनी 'या जन्मावर या जगण्यावर' हे गीत सादर केले. कार्यक्रमाच्या अखेरीस 'धन्य भाग सेवा का अवसर पाया' या भैरवी गायनाने समारोप झाला. या बहारदार मैफलीस तबला वादक शेखर नरवडे व तालवाद्य वादक महाजन यांनी साथसंगत केली. या वेळी प्रायोजक प्रवीण दशपुते, राजेश दीक्षित यांच्या हस्ते गायक कलावंतांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अभय दीक्षित यांनी केले. कार्यक्रमासाठी शहरातील मान्यवर श्रोत्यांची मोठी उपस्थिती लाभली. यशस्वीतेसाठी स्वप्नील कोळपकर, प्रवीण गायकवाड, भरत जाधव, मनोज येवले, प्रवीण कुलकर्णी, अजिंक्य गोरवाडकर, मोहित दीक्षित, रेवण गोरवाडकर आदींनी परिश्रम घेतले.

रोटरीतर्फे बसवाहक-चालकांना फराळ वाटप

मालेगाव : दिवाळीच्या धामधुमीत प्रवाशांना आपापल्या गावी सुखरुप पोहचवणाऱ्या एसटीच्या वाहक-चालकांनादेखील दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनतर्फे भाऊबीजनिमित्ताने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. शुक्रवारी येथील जुन्या बस स्थानकावर बस चालक व वाहकांना फराळ वाटप करण्यात आले. या वेळी उद्योगपती रवींद्र दशपुते यांनी रोटरीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी सतीश कलंत्री, शाम कासार, राजेंद्र भामरे, राकेश डिडवानीया यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास रोटरीचे नियोजित प्रांतपाल राजेंद्र भामरे, उपप्रांतपाल राकेश डिडवानीया, आगार व्यवस्थापक निकम, प्रकल्प संयोजक सुमित बच्छाव आदी उपस्थित होते. राजेंद्र दिघे यांनी आभार मानले. या वेळी प्रवीण निकम, राजेंद्र देवरे आदी उपस्थित होते.

सिन्नरलाही रसिक मंत्रमुग्ध

सिन्नर : सिन्नर येथील मातोश्री नर्मदा लॉन्सवर गुरुवारी (दि. ८) दिवाळी पाडव्यानिमित्त पहाटे साडेपाच वाजता 'पाडवा पहाट'चे आयोजन करण्यात आले होते. अमोल पालेकर प्रस्तुत 'महाराष्ट्राची लोककला' या कार्यक्रमाचे सादरीकरण या निमित्ताने करण्यात आले. ज्येष्ठ उद्योजक लालाशेठ चांडक, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. कार्यक्रमाची सुरुवात गणेशाच्या नामस्मरणाने झाली. त्यानंतर अनेक महाराष्ट्र लोकगीते नृत्याच्या प्रकारे सादरीकरण करण्यात आले. या वेळी सिन्नर च्या रसिकांनी शेकडो टाळ्यांच्या गजरात गीतांना साद दिली. अनेक दर्जेदार गीते गायनाच्या रुपाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी अलोट गर्दी पाडवा पहाटेच्या वेळी झालेली दिसली. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चळवळीचा भाष्यकार हरपला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रा. डोळस यांच्या निधनाने साहित्य वर्तुळात शोककळा

प्रा. अविनाश डोळस यांच्या निधनाने जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोचविण्यासह वंचितांसाठी लढा देणारा लढवय्या आणि चळवळीचा भाष्यकार हरपल्याची प्रतिक्रिया साहित्य वर्तुळात उमटली.

महाराष्ट्रात नाशिक जिल्हा हा मानवतावादी-आंबेडकरवादी चळवळीचे केंद्र म्हणून ओळखला जातो. त्या महनीय शृंखलेमध्ये डोळस सर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा मागोवा व सुनिश्चित दिशा आपल्या प्रतिभेतून एक निष्ठावंत कार्यकर्ता, वक्ता, साहित्यकार म्हणून स्पष्ट आणि प्रभावीपणे मांडण्याचे काम केले. त्यांच्या आकस्मित जाण्याने मोठा धक्का बसला असून आंबेडकरवादी चळवळीचा सच्चा भाष्यकार गेल्याने अतीव दुःख झाले आहे. त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श घेऊन नव्या पिढीने लिहिते राहून सामाजिक प्रश्नांना न्याय मिळून देणे सदोदित मानवतावादी-आंबेडकरवादी चळवळ गतिमान करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.

- प्रा. शरद शेजवळ, अध्यक्ष, वामनदादा कर्डक संस्था

आंबेडकर विचारांसाठी प्रा. डोळस यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांनी आंबेडकरी विचार घेऊन चळवळी चालवल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे एक सृजनशील लेखक, कार्यकर्ता, संपादक, कुशल संघटक नाहिसा झाला आहे.

- उत्तम कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक

गेल्या तीन महिन्यांपासून मी त्यांच्या सतत संपर्कात होतो. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्र चरित्र साधन समिती' महाराष्ट्र राज्य या समितीचे ते उपसचिव होते. समितीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या महाराष्ट्रातील 'आंबेडकरी चळवळीचा कोष' या ऐतिहासिक ग्रंथासाठी नाशिक जिल्ह्याचे संकलनाचे कार्य त्यांनी माझ्यावर सोपवले होते. ते काम नाशिक जिल्ह्यातील सहकार्याच्या मदतीने व परिवर्त परिवाराच्या माध्यमातून मी दोन महिन्यांपासून करीत होतो.

- प्रा. गंगाधर अहिरे, लेखक

आंबेडकरी चळवळीला आयुष्य वाहून घेतलेले ज्येष्ठ नेते, अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे सहकारी, अभ्यासू प्राध्यापक व दलित कथाकार प्रा. डोळस यांनी अकाली घेतलेली एक्झिट खूपच वेदनादायी आहे. दलित चळवळीला बहुजन चेहरा देणारा विचारवंत गेला. खूप मोठी हानी झाली.

- मारोती कसाब, लेखक

प्रा. डोळस हे आंबडेकर चळवळीचे नेते होते. मिलिंद कॉलेज, औरंगाबाद येथून उदय पावलेले डोळस समाजाभिमुख व अभ्यासू लेखक होते. ते प्रतिभाशाली कलावंतही होते. अनेक नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केलेले होते. समाज परिवर्तनातील सम्यक आकलन असणारे ते नेते होते. तळागाळात मोठा अनुयायी त्यांना लाभला. सोनई, खैरलांजी या हत्याकांडामध्ये आपल्यातील लेखकपणा त्यांनी बाजूला ठेवून रस्त्यावर उतरून लढाई सुरू ठेवली, न्यायासाठी ते युद्धखोर होते.

- राकेश वानखेडे, लेखक

प्रबोधनाची धुरा खांद्यावर घेणारा एक चिकित्सक विचारवंत वक्ता हरपल्याने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झालेली आहे. लालित्यपूर्ण भाषेतून विषयाची वैचारिक मांडणी करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अवघड विषय सर्वसामान्य माणसांच्या भाषेत ते मांडत असत. कथा, नाट्य, वैचारिक लेखन ते साक्षेपी विचारवंत असे विविध पैलू त्यांच्या ठायी होते. 'पितळ' या कथासंग्रहासाठी मी आणि त्यांनी अशा दोन प्रस्तावना लिहिल्या होत्या. त्यांच्या जाण्याने एक मोठा विचारवंत कार्यकर्ता हरपला आहे.

- प्रमोद अहिरे, कार्याध्यक्ष, प्रगतिशील लेखक संघ

कोणतीही पूर्वओळख नसताना प्रा. डोळस यांनी माझ्या पितळ कथासंग्रहास प्रस्तावना लिहून दिली. इतकंच नव्हे तर कथा कशी असावी, तिचा उद्देश काय असावा, याचेही मार्गदर्शन करत राहिले. ते निव्वळ कार्यकर्ते नव्हे तर कार्यकर्ते घडवणारे आणि विधायक कामासाठी त्यांचा योग्य उपयोग करून घेणारे आंबेडकरी चळवळीचे सच्चे पाईक होते. त्यांच्या जाण्याने माझ्यासारख्या नवोदित साहित्यिकांना मार्गदर्शन करणारा वाटसरू हरवला आहे.

- संजय दोबाडे, लेखक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images