Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रिक्त जागांचा प्रश्न कायम

$
0
0

माने यांनी घेतला आरोग्य सुविधांचा आढावा

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील सामान्य रुग्णालय व पालिका रुग्णालय येथील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी मालेगावी भेट दिली. काही दिवसांपासून सातत्याने आरोग्य सुविधांचा आढावा घेतला जात आहे. यात वेळोवेळी सुचविण्यात आलेल्या सुधारणा होत असल्या तरी अद्याप सुधारणांना वाव आहे. प्रामुख्याने सामान्य रुग्णालयातील रिक्त जागांचा प्रश्न कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील आरोग्य सुविधांबाबत सामाजिक कार्यकर्ते राकेश भामरे यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने एक समिती गठीत केली होती. या समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. सोमवारी यासंदर्भात आयुक्तांनी मालेगावी भेट दिली. सामान्य रुग्णालय व अली अकबर रुग्णालयास भेट देऊन आरोग्य सुधारणांची पाहणी केली. यानंतर शासकीय विश्राम गृहावर बंद दाराआड बैठक झाली. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, महापौर रशीद शेख, आयुक्त संगीता धायगुडे, उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी डॉ. किशोर डांगे, याचिकाकर्ते राकेश भामरे उपस्थित होते. बैठकीनंतर आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, न्यायालयाने समितीचे पुनर्गठन केले असून, त्यात स्थायिक आमदार, विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त, नगरसेवक व याचिकाकर्ते असतील. दवाखान्यात भेटी दरम्यान बऱ्याच सुधारणा झाल्याचे दिसले. सामान्य रुग्णालयात मात्र रिक्त पदांचा प्रश्न अद्याप कायम आहे. पालिकेने यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र डॉक्टर्स यायला तयार नसल्याने खासगी डॉक्टर्सच्या मदतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्याबाबत चर्चा झाल्याचे माने यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

$
0
0

\B

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील शरद संपत शिंदे आणि लक्ष्मण जनार्दन रासकर यांचा राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. फळे, फुलशेती व भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबाबत या शेतकऱ्यांसह बारा शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. मुंबईतील राजभवनात सोमवारी (५ नोव्हेंबर) रोजी हा सोहळा पार पडला.

राज्यातील १२ शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामागिरी केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते लॅपटॉप देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, कृषि सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंग यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. भारताची अस्सल संस्कृती कृषी क्षेत्राचा विकास आहे. कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांच्या संसोधनातून अमूलाग्र बदल होत आहेत. ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांमधील संशोधनवृत्ती वाढावी, यासाठी हा सन्मान करण्यात येत आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. या सोहळ्यात बीड जिल्ह्यातील नेकनूर तालुक्यातील संजय शिंदे (जल व्यवस्थापन), सोलापूर जिल्ह्यातील सोगाव तालुक्यातील ब्रह्मदेव सरडे (कृषी क्षेत्रात संशोधन), चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील दत्तात्रय गुंडावार (कृषी अभिनव उपक्रम), जालना जिल्ह्यातील डोंगरगाव तालुक्यातील ईश्वरदास घनघाव (ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योग), उस्मानाबाद जिल्ह्यातील बाळासाहेब गिते (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय), रायगड जिल्ह्यातील अशोक गायकर (मत्स्य व्यवसाय), बुलढाणा जिल्ह्यातील विद्या गुंजकर (कृषी व सामाजिक वनीकरण), सुधाकर राऊत (कृषी उद्योग), अहमदनगर जिल्ह्यातील ताराचंद गागरे व श्रीकृष्ण सोनुने (कृषी विस्तार क्षेत्र) यांना सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत विद्यार्थ्यांची पर्यावरणपूरक दिवाळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली सडा-रांगोळी, फुलवाती अंगणात सोनसकाळी, आली दिवाळी, आली दिवाळी... यांसह दिन दिन दिवाळी... अशा दिवाळीच्या गाण्यांचे सादरीकरण अन दिवाळीतील धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा व भाऊबीज अशा सणांचे महत्त्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनीच सांगत फटाके न फोडण्याचे आवाहन करीत देवळाली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली.

विद्यार्थ्यांना शाळेतदेखील आपल्या सहकाऱ्यांसमवेत सणाचा आनंद घेता यावा या उद्देशाने शाळेतर्फे सुटी लागण्याच्या दिवशी शाळेतच दिवाळी साजरी करण्यात आला. प्रारंभी एक विद्यार्थी निवडून त्याच्याजवळील वही, पुस्तके, पेन यांचे पूजन सहसचिव अशरफी घडियाली, मुख्य कार्यकारी अधिकारी गोवर्धनदास मनवानी, मुख्याध्यापक हेमंत मोजाड, उपमुख्याध्यापिका लतिफा खान, शर्मिला वैद्य आदींच्या हस्ते करण्यात आले. संकेत जाधव, प्रांजल पोरजे यांनी दीपावलीचे महत्त्व, तर नंदिनी बरकले, साक्षी बोराडे या विद्यार्थ्यांनी संस्कृत गीतातून मामाच्या गावची मजा वर्णन केली. धनश्री हगवणे या विद्यार्थिनीने सादर केलेले आली दिवाळी हे गाणे सर्वांना आनंदी करून गेले. राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या अंकिता करंजकर व धनश्री पाळदे या विद्यार्थ्यांनी फटाक्यांमधील घटक व विषारी रसायनयुक्त घटकांची माहिती देत त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम विशद केले.

भव्य रांगोळीतून गिरविले काळ!

शाळेसमोरील मैदानावर शिक्षिका रुपाली पवार यांच्यासह दहावी कच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या २० फूट व्यासाच्या रांगोळीतून विद्यार्थ्यांना 'मी दिवाळी साजरी करीत आहे' या वाक्याचे तीन काळ व त्याद्वारे बारा उपप्रकारांमध्ये तयारी होणारी वाक्ये रेखाटण्यात आली. श्रेया मोजाड या विद्यार्थिनीने त्याचे याचे लेखन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारणा समूहातील पाणी थांबवले

$
0
0

जिल्ह्यातून ३.२४ टीएमसी पाणी जायकवाडीला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडी धरणाला नाशिकहून सोडले गेलेले पाणी सोमवारी दुपारी ३ वाजता थांबवण्यात आले. दारणा धरण समूहातून या पाण्याचा गुरुवारपासून (दि. १) विसर्ग सुरू होता. ३.२४ टीएमसी पाणी सोडल्यानंतर ते थांबवण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणाचे गेट दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आले. त्यानंतर नाशिकमधून हा विसर्ग थांबला.

समन्यायी पाणी वाटपातून नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून ८.९९ टीएमसी पाणी देण्याचे आदेश गोदावरी मराठाडवाडा पाटबंधारे विभागाने दिला होता. त्यानंतर त्यावर नाशिक व नगर जिल्ह्यातून प्रचंड विरोध झाला. नाशिकच्या गंगापूर धरणातून सकाळी सोडण्यात आलेले पाणी सायंकाळी थांबवण्यात आले. त्यानंतर दारणा समूहातून सर्व पाणी देण्याचा निर्णय झाला व अधिकाऱ्यांनी सुस्कारा सोडला. या पाणीवाटप प्रक्रियेत जलसंपदा, महसूल व पोलिस यंत्रणेवरही ताण होता. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दोन दिवस अगोदरच पाणी सोडणे थांबवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळाला.

असे गेले पाणी

नाशिक जिल्ह्यातून सुरुवातीला गंगापूर व पालखेड धरण समुहातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. पण, पालखेड धरणात दुष्काळी गावांना पाणी टंचाई भासेल म्हणून अगोदर या धरण समूहातून पाणी न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले. पण, नाशिकला भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये, म्हणून पाणी थांबवण्यात आले. दरम्यानच्या काळात ६०० पैकी ८० दशलक्ष घनफूट सोडण्यात आले. त्यानंतर दारणातून पाणी सोडण्यात आले. त्यात गंगापूर धरणाचा आकडाही पकडण्यात आला.

निळवंडेतून विसर्ग सुरुच

दारणा, मुळा धरणाचा विसर्ग थांबवण्यात आला असला तरी अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून विसर्ग मात्र सुरुच राहणार आहे. त्यासाठी किती वेळ लागेल हे सांगणे अधिकाऱ्यांनी टाळले. पण, आठ दिवस हे पाणी सुरुच राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगाव सोसायटीचेअरमनपदी पुंजाराम पवार

$
0
0

नाशिक : पिंपळगाव (ता. मालेगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी पुंजाराम पवार यांची, तर व्हा. चेअरमनपदी मीनाबाई पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीनुसार चेअरमन डॉ. जयंत पवार व व्हा. चेअरमन किरण पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. रिक्त पदांसाठी निबंधक कार्यालयात सहकार अधिकारी भाऊसाहेब अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी सुरेश पवार, तानाजी पवार, विजय पवार, अशोक पवार, मदन पवार, मधुकर पवार, रवींद्र पवार, सुभद्राबाई पवार, बाबुराव पवार आदी संचाक उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचा मविप्र संचालक डॉ. जयंत पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समको’ बरखास्त; लवरकच निवडणुका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा मर्चंट्स बँकेचे संचालक मंडळ अल्पमतात आल्याने संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश जिल्हा निबंधक गौतम बलसाणे यांनी दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कार्यकाळ संपण्याच्या आधीच संचालक मंडळ बरखास्त झाल्याने संचालकांचे धाबे दणाणले आहे. विरोधी गटाचे हे मोठे यश मानले जात असून, सत्ताधारी गट मात्र या बरखास्तीमुळे तोंडघशी पडला आहे. विशेष म्हणजे जिल्हा निबंधकांनी सटाणा मर्चंट्स बँकेत प्रशासक म्हणून नांदगावचे सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांची नेमणूक केली आहे.

शनिवारी सायंकाळी उशिरा विद्यमान उपसभापती कल्पना येवला यांच्यासह डॉ. व्ही. के. येवलकर आणि किशोर गहिवड यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडालेली असतांनाच सोमवारी अचानक महाराष्ट्र सहकारी बँक अधिनियम १९६० चे कलम ७३ क अ (१/३) नुसार संचालक यशवंत अमृतकार, कैलास येवला, पंकज ततार व राजेंद्र अलई यांचे संचालक पद जिल्हा निबंधकांनी रद्द केले. तसेच यापूर्वीच रमेश देवरे व अशोक निकम यांचे संचालक पद रद्द झालेले असल्याने १७ संचालक असलेल्या बँकेत केवळ ८ संचालक शिल्लक राहिल्याने जिल्हा निबंधक बलसाणे यांनी महाराष्ट्र सहकार अधिनियम १९६० चे कलम ७७ अ (ब १) व कलम अ (क) (२) नुसार संपूर्ण संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश दिले आहेत. प्रशासक कांदळकर यांचा कार्यकाळ केवळ सहा महिनेच असून सहा महिन्याच्या आत नवीन निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेतील पार्किंग झोनला स्थगिती

$
0
0

मनमाडमधील 'मरेमा'च्या विद्यार्थ्यांना दिलासा

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथील मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावरील 'पार्किंग झोन'ला न्यायालयाने स्टे दिला आहे.

मुलांसाठी खेळण्याच्या मैदानावर रेल्वेने पार्किंचा घाट घातलयाने शाळा व संस्था प्रशासनाने मालेगाव न्यायालयात धाव घेतली होती.

'शाळेच्या मैदानावर रेल्वे पार्किंगचा घाट' अशाप्रकारचे सविस्तर वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रसिद्ध केले होते. तसेच विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी मैदान आवश्यक असल्याची भूमिका मांडत या बाबत पाठपुरावा केला होता.

मालेगाव न्यायालयाचे न्यायाधीश यांनी मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाच्या याचिकेवर निर्णय देताना 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे तात्पुरता का होईना पण शाळा प्रशासन व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आता या पुढची सुनावणी १४ नोव्हेंबरला होणार आहे.

शिक्षक उपोषणाला बसणार

विद्यार्थ्यांचे हित रेल्वे पहात नसल्याचे सांगत रेल्वेच्या निर्णयाच्या विरोधात शाळेचे शिक्षक प्रवीण खरोळे हे भुसावळ रेल्वे डिव्हिजन ऑफिस समोर १० नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

खासदारांची भेट

रविवारी मनमाड दौऱ्यावर आलेल्या खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची भेट घेऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत मार्ग काढण्याची विनंती केली. यावेळी डॉ. सी. एच. बागरेचा, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील, क्रांती कुंझरकर, प्रवीण खरोळे, हर्षद गद्रे, आदी उपस्थित होते.

या प्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन चव्हाण यांनी शिष्टमंडळाला दिले.

'छत्रे'चा प्रश्न सुटावा

मनमाड मधील छत्रे विद्यालयासमोरील पोलिस परेड मैदानाबाबत राज्य सरकारने, पोलिस प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मैदान मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पुन्हा नव्याने जोर धरू लागली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मनमाडच्या नावाजलेल्या शाळेतील मोठी समस्या दूर करण्यासाठी याकडे लक्ष घालावे असाही पालक, शिक्षक व नागरिकांचा सूर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक उद्ध्वस्तेचा कट

$
0
0

७५ टक्के शहर अनधिकृत ठरविल्याने विरोधी पक्ष आक्रमक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हायकोर्टात अनधिकृत बांधकामांसंदर्भातील एका याचिकेत नाशिकमध्ये दोन लाख ६९ हजार मालमत्ता म्हणजे ७५ टक्के शहर अनधिकृत असल्याचा दावा करून स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे.

खासगी कंपनीद्वारे केल्या जात असलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल येण्यापूर्वी आणि अनधिकृत ठरवण्याची कायदेशीर प्रक्रिया करण्यापूर्वी या मालमत्ता अनधिकृत कशा ठरल्या, असा सवाल विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. विशेष म्हणजे विधी, नगररचना, अतिक्रमण आणि मिळकत विभागही याबाबत अनक्षिज्ञ असताना हायकोर्टात ही माहिती दिली गेलीच कशी, असा जाब विचारत दिवाळी तोंडावर असताना नाशिक उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला आहे.

मुंबई हायकोर्टात न्या. नरेश पाटील यांच्या पिठांसमोर अनधिकृत बांधकामांसदर्भात तीन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत नाशिक महापालिका क्षेत्रात दोन लाख ६९ हजार मालमत्ता अनधिकृत असल्याचा दावा करण्यात आला. यावेळी हायकोर्टाने मुंढे यांनी केलेल्या या कामाबद्दल कौतुकही केल्याचे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. त्याबाबत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या या आततायी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात सर्वेक्षण सुरू झाले. त्याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. खासगी कपंनीने दिलेल्या माहितीवरच ही बांधकामे अनधिकृत कशी ठरवली जाऊ शकतात? बांधकाम अनधिकृत ठरवण्याची कायदेशीर प्रक्रिया आहे. नगररचना विभागामार्फत याची पडताळणी केली जाईल, संबधितांना नोटिसा देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर बांधकाम अधिकृत की अनधिकृत ठरवले जाते. परंतु, त्यापूर्वीच ही बातमी नाशिककरांसाठी धक्कादायक आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच प्रशासन प्रमुख म्हणून मुंढे यांचे कौतुक केले जात आहे, असा हल्लाबोल बोरस्ते यांनी केला.

प्रसिद्धीची एवढी घाई का?

मुंढे यांच्या दाव्यामुळे तब्बल ७५ टक्के शहर अनधिकृत ठरणार असल्याने थंडीपूर्वीच नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. मिळकत, विधी, नगररचना आणि कर संकलन विभागाने अशी कोणतीही माहिती कोर्टात दिली नसताना, ही माहिती हायकोर्टात गेली कशी आणि प्रसिद्धीसाठी एवढी घाई का, असा सवाल बोरस्ते यांनी उपस्थित केला. यासंदर्भात आयुक्त मुंढे यांना पत्र लिहणार असून अशा प्रकारचा अहवाल कोर्टात कोणाच्या सहीने गेला याची माहिती मागवली जाणार आहे. सोबतच पुढील महासभेत या विषयावरही चर्चा होणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.

नाशकपुढे नवीन संकट

महापालिकेत सध्या चार लाख मालमत्ता आहे. त्यापैकी ३ लाख २७ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण झाले असून त्यात दोन लाख ६९ हजार मालमत्तांमध्ये अतिरिक्त बांधकाम आणि वापरात बदल आढळून आला आहे. त्यामुळे हायकोर्टाने या बांधकामांबाबत कडक पवित्रा घेतला, तर ७५ टक्के नाशिक अनधिकृत ठरणार आहे. धार्मिक स्थळांचे शुक्लकाष्ठ संपण्यापूर्वीच अनधिकृत बांधकामांचे नवीन संकट नाशिककरांवर ओढावल्याचा आरोपही बोरस्ते यांनी केला आहे.

तिप्पट कर आकारणीचा डाव

महापालिकेने अनधिकृत ठरवल्यानंतर या मालमत्तांच्या करआकारणीतही मोठा बदल होणार आहे. या मालमत्ता अनधिकृत ठरल्यानंतर तसेच वापरात बदल आढळल्यानंतर त्यांच्याकडून सध्याच्या तिप्पट दराने कर आकारणी होणार असून त्यांचे कंबरडेचे मोडले जाणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे येत्या महासभेत हा विषय अधिकच गाजणार असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आर्यवर्त फ्लॅटचा ताबा देण्यास मनाई

$
0
0

दुधाधारी मशिद पदाधिकाऱ्यांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिडको मधील सर्व्हे क्रमांक ९८० व ९८१ या मिळकतीवर पुणे येथील परांजपे बिल्डर्सने बांधण्यात आलेल्या आर्यवर्त टाउनशिपमधील फ्लॅटचा ताबा देण्यास वक्फ बोर्डाने मनाई केल्याची माहीती सलीम खान, अॅड. नाजीम काजी, अॅड.सैय्यद मुरतसर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सदर जमिनीबाबत दुधाधारी मशिद देवस्थानाचे अपिल हक्क ट्रिब्युनलने मंजूर केले आहे. ट्रिब्युनलने सदर प्रकरणात तत्कालीन सीईओ नसीमबानो पटेल यांनी देवस्थानचे विरोधात दिलेला हुकूम बेकायदेशीर ठरवून प्रकरण फेरचौकशीसाठी वक्फ बोर्डाकडे पाठवले आहे. बक्फ बोर्डानेही चौकशी पूर्ण होईपर्यंत फ्लॅटचा ताबा देण्यास मनाई केली आहे.

पत्रकार परिषदेत सलीम खान म्हणाले की, सिडको येथे महाले मळा नावाने ओळखली जाणारी ५३ एकर जमीन कथडा मशिद देवस्थानाची असल्याचा दावा देवस्थानाने केलेला आहे. याबाबत २००५ पासून महाले कुटुंबीय व देवस्थानामध्ये वाद चालू आहेत. दरम्यान, या जमिनीवर महाले कुटुंबीय आणि पुण्याचे परांजपे बिल्डर्स कंपनी लिंकर शेल्टर प्रा. लि. मार्फेत आर्यावर्त नावाने गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. यावेळी अॅड. नाजीम काजी म्हणाले, की आर्यावर्तमधील फ्लॅटचा ताबा देण्याची विनंती उच्च न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्येच आदेश दिले आहेत. मात्र, तत्कालीन सीईओ नसीमबानो पटेल यांनी २०१६ मध्ये आदेश पारीत करत सदर मिळकत वक्फ नाही, असा आदेश दिला होता. त्या आदेशास देवस्थानने वक्फ ट्रिब्युनलमध्ये आव्हान दिले होते. ट्रिब्युनलने या प्रकरणाची चौकशी चालू असताना मुंबई उच्च न्यायालयानेही फ्लॅटचा ताबा एप्रिल २०१६ मध्ये देण्यास मनाई केली होती. सर्वोच्च न्यायालयानेदेखील तोच आदेश कायम ठेवला होता. या पत्रकार परिषदेत हनिफ बशीर, नजीर खान, राजू खान, साबीर खान सह पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नमवार पुलासाठी सिंहस्थ मार्ग बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

कन्नमवार पुलाच्या कामासाठी नवीन सिंहस्थ शाही मार्ग पुलाच्या खालच्या भागात बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे तपोवनाकडून अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने महामार्गावरील उड्डाणपुलाखालून पंचवटी महाविद्यालयाच्या समोरून पंचवटीकडे वळवावी लागत आहेत. पुलाचे काम होईपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे.

नवीन सिंहस्थ मार्गावर वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. पंचवटीच्या तपोवन ते पंचवटी कारंजा या भागात वाढलेल्या वाहनांमुळे होणारी कोंडी या रस्त्यामुळे कमी होण्यास मदत होते. सध्या हा मार्ग बंद असल्यामुळे ही वाहने नवीन आडगाव नाका, चौफुली, जुना आडगाव नाका, निमाणी या मार्गाने जात असल्यामुळे या भागात वाहनांची कोंडी वाढली आहे.

कन्नमवार पुलाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी वाहने जाताना अडथळा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. जीर्ण झालेल्या या जुन्या पुलाचा भाग काढण्यासाठी याअगोदर हा मार्ग बंद करण्यात आला होता. पूल काढून झाल्यानंतर हा मार्ग पूर्ववत करण्यात आला. आता पुन्हा पुलाचे बीम टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुलाचा जुना भाग काढून टाकण्यासाठी या पुलाखालचा मार्ग बंद करण्यात आला होता. हे काम झाल्यानंतर हा मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला. पुलासाठी गोदापात्रातील बीम टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.

--

फलकाअभावी पडतोय वळसा

पुढच्या भागातील कामाला सुरुवात झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा मार्ग बंद करताना त्याविषयीचा फलक पंचवटी अमरधाम आणि तपोवनातील लक्ष्मीनारायण लॉन्सच्याजवळ लावणे अपेक्षित होते. मात्र, तसे केले नसल्यामुळे वाहने थेट कन्नमवार पुलाच्या खालच्या भागात गेल्यानंतर हा मार्ग बंद असल्याचे त्यांना कळते. त्यामुळे एकतर वाहने परत माघारी न्यावे लागतात किंवा हिरे महाविद्यालयाकडून महामार्गावरून टकलेनगर भागातून पंचवटीकडे न्यावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरे-भुजबळांमध्ये ‘डिनर डिप्लोमसी’

$
0
0

मालेगावी झाली भेट; राजकीय चर्चेला उधाण

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

अगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या हालचालींना-भेटीगाठी यांना वेग आला आहे. त्यातच रविवारी रात्री माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मालेगावी हिरे कुटुंबियांची सदिच्छा भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. . हिरे कुटुंब भाजप सोडून पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. तसा पक्षप्रवेश कार्यक्रम देखील निश्चितच झाला होता. काही कारणांमुळे पक्षप्रवेश लांबला होता. मात्र रविवारी भुजबळांनी हिरे कुटुंबियांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

अद्वय हिरे यांच्या संपर्क कार्यालयाकडून एक पत्रक काढण्यात आले असून, भुजबळांच्या भेटीला त्यात दुजोरा देण्यात आला आहे. भाजपवासी असलेल्या हिरे कुटुंबियांनी कौळाणे येथील कार्यकर्ता मेळाव्यात स्पष्ट शब्दात आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीत पक्षप्रवेश कार्यक्रम निश्चित झाला होता. मात्र मराठा आरक्षण आंदोलनामुळे हिरे यांनी प्रवेश लांबणीवर टाकला होता. त्यानंतर देखील विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी हिरे कुटुंबियांची भेट घेतल्याने अनेक चर्चां रंगल्या होत्या. रविवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी छगन भुजबळ धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तेथून नाशिककडे जातांना त्यांनी येथील 'मधुरमुरली' या मालेगाव-कॅम्प येथील निवासस्थानी माजी मंत्री डॉ. प्रशांत हिरे यांची दिवाळी निमित्त सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. हिरे कुटुंबासोबत दिवाळी निमित्ताने सुग्रास भोजनाचा आस्वादही घेतला. यावेळी माजी शिक्षक आमदार डॉ. अपूर्व हिरे व डॉ. अद्वय हिरे यांनी सत्कार करून स्वागत केले. समता परिषदेचे तालुकाध्यक्ष धर्माअण्णा भामरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप पवार, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अरुण आहिरे, नरेंद्र सोनवणे, माजी आमदार मुफ्ती मोहम्मद ईस्माईल, अरुण देवरे, काशिनाथ पवार, दशरथ निकम, विनोद शेलार, शांताराम लाठर आदी उपस्थित होते. हिरे व भुजबळ यांच्यात राजकीय चर्चा काय झाली याचा तपशील मिळू शकला नाही. परंतु आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिरे भुजबळ यांची दिवाळी निमित्ताने झालेली भेट महत्वपूर्ण मनाली जाते आहे.

बळीचे राज्य येवो!

छगन भुजबळांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम गजानन महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर, 'मी शब्दांपेक्षा कृतीवर भर देणारा आहे. बोलून नाही तर करून दखवणार आहे. 'इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो', अशा शब्दात त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी रंगभूमी अधिक समृद्ध होणार

$
0
0

डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रंगकर्मीची निष्ठा, कला आणि रसिक मायबाप प्रेक्षकांचे रंगभूमीला लाभलेले प्रेम यातूनच मराठी रंगभूमी समृद्ध झाली असून, भविष्यातही मराठी रंगभूमी अशीच समृद्ध होईल, असे प्रतिपादन प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले.

'सावाना'च्या वतीने परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रंगमंच तसेच नटराज पूजनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी रंगमंच, पडदा पूजन तसेच नटराज पूजन पारंपारिक व विधीवत पद्धतीने धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर चारुदत्त दीक्षित व सहकारी कलाकारांनी मानअपमान या नाटकांतील नांदी सादर केली. नाट्यगृह सचिव अॅड. अभिजित बगदे यांनी कार्यक्रमांचे प्रास्तविक व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास अॅड. भानुदास शौचे, संजय करंजकर, नंदू वराडे, जयप्रकाश जातेगांवकर, रंगकर्मी सदानंद जोशी, सी. एल. कुलकर्णी, लक्ष्मण सावजी, सचिन शिंदे, नुपूर सावजी, लक्ष्मण कोकणे, राजेश भुसारे, रोहित पगारे, राजेश जाधव, राजेश शर्मा, ईश्वर जगताप, राजेंद्र जाधव, माणिक कानडे, प्रकाश साळवे, प्राजक्त देशमुख, दिलीप बोरसे आदींसह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ बाजारात ५ कोटींची उलाढाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

धनत्रयोदशीनिमित्त सराफ बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. सोन्याचे भाव स्थिर असल्यामुळे ग्राहकांची पावले सराफी दुकानांकडे वळली. एकाच दिवसात बाजारपेठेत ५ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज सराफ असोसिएशनने व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांत सर्व क्षेत्रात मंदीचे सावट होते. त्यात राज्यात दुष्काळाचे सावट असल्यामुळे त्याचा परिणामही बाजारपेठेवर होत असतो. पण, या सर्व परिस्थितीत बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाल्याचे सराफांनी सांगितले. धनत्रयोदशीनिमित्त ग्राहकांचा कल चोख सोने खरेदी करण्याकडे जास्त होता. चांदीची नाणी व दागिन्यांना चांगली मागणी होती. विविध डिझाइन्सच्या दागिन्यांना मागणी होती. त्याचबरोबर वेढे, बिस्किटेही अनेकांनी या मुहुर्तावर खरेदी केली. सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून ३२ हजारांच्या आसपास आहेत. धनत्रयोदशीला हा भाव ३२ हजार ३०० रुपये होता. चांदीचा भाव ४० हजार रुपये होता. मोठ्या सुवर्णदालनांतही चांगली खरेदी झाली.

धनत्रयोदशीनिमित्त बाजारपेठ ग्राहकांनी फुलली आहे. बाजारपेठेत एकाच दिवशी पाच कोटींची उलाढाल झाली आहे. त्यामुळे दिवाळीची सुरुवात चांगली झाली.

- चेतन राजापूरकर, अध्यक्ष सराफ असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयडीसी’मध्ये आठवडाभर शुकशुकाट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीनिमित्त सहा दिवस शहरातील सातपूर आणि अंबड एमआयडीसीतील बहुतांश कंपन्या बंद राहणार आहेत. कामगारांना मंगळवारपासून (दि. ६) रविवारपर्यंत (दि. ११) ही सुटी असणार आहे. या काळात सर्वच कामगार व व्यवस्थापनही सुटीवर असल्याने कारखान्याची सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे.

सातपूर, अंबड सह विविध ठिकाणच्या उद्योगांनी सामूहिकपणे निर्णय घेऊन ही सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे नाशिकमधील सर्व औद्योगिक कामगारांना एकत्र सुटी मिळणार आहे. विविध कंपन्यांनी दिवाळीचा बोनसही जाहीर केला आहे. त्यामुळे मंगळवारी बाजारपेठेतही त्याचा परिणाम दिसणार आहे. सातूपर, अंबड येथे येथे सुमारे चार हजार कारखाने आहे. त्याचप्रमाणे इतर उद्योगही मोठ्या प्रमाणात इतरत्र आहे.

पोलिसांच्या बैठका

दिवाळीनिमित्त एकाच वेळी सर्व कारखाने बंद असणार असल्याने पोलिसांनी उद्योजकांच्या बैठका घेतल्या. या बैठकीत काय काळजी घ्यायला हवी याबाबत सूचना केल्या. 'निमा' व 'आयमा'मध्ये या बैठकी झाल्या.

दिवाळीनिमित्त मंगळवारपासून सहा दिवस सुटी असणार आहे. सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. सोमवारी पुन्हा कारखाने सुरू होतील. सुरक्षेततेची काळजी या काळात घेण्यात आली आहे.

- तुषार चव्हाण, सरचिटणीस, निमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालिमार-मेनरोडवर वाहनांना ‘नो-एन्ट्री’!

$
0
0

कोंडी रोखण्यासाठी दिवाळी संपेपर्यंत निर्णय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मुख्य बाजारपेठेत होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेत वाहतूक पोलिसांनी शालिमार, मेनरोडसह भद्रकालीतील काही रस्ते सायंकाळच्या सुमारास वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सणांच्या दिवसात प्रथमच असा प्रयोग होत असून, याचा फायदा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दिवाळी दरम्यान मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा या मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होते. त्यातच अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या स्मार्टरोड काम आणि अरुंद रस्त्यांवर वाहनांची होणारी गर्दी यामुळे नागरिकांनी अगदी जीव मुठीत धरून या भागात पोहचावे लागते. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने वाहन विरहित आणि वाहन प्रवेशबंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी ११ नोव्हेंबरपर्यंत सांयकाळी ४ ते रात्री १० या वेळेत होणार आहे.

वाहन विरहित रस्ता

नेपाळी कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा, गाडगे महाराज पुतळा ते धुमाळ पॉईंट, गाडगे महाराज पुतळा ते बादशाही कॉर्नर, त्र्यंबक पोलिस चौकी ते ठाकरे रोडमार्गे गाडगे महाराज पुतळा परिसरात सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत हा मार्ग वाहनविरहित असेल. येथे वाहने पार्क करता येणार नाही.

वाहनांना प्रवेश बंद

नेपाळी कॉर्नर, बादशाही कॉर्नर, त्र्यंबक पोलिस चौकी, सांगली बँक सिग्नल, रविवार कारंजा या ठिकाणी सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहनांना प्रवेश बंद असून, नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

स्थानिकांना सूट

पोलिसांच्या या निर्णयाची अंमलबजावणी करताना स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. या परिसरात राहणारे नागरिक आणि व्यावसायिकांना त्यांच्या दुचाकीचा वापर करायचा असल्यास रहिवासाबाबत कागदपत्रे सादर करावी लागतील. आवश्यक कागदपत्रे नसतील तर वाहने सोडण्यात येणार नाही, असे पोलिसांनी कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवाळी सुट्यांसोबत ‘विक-एंड’चा बोनस

$
0
0

सरकारी कार्यालयांना उद्यापासून सुटी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्षातील सर्वात मोठा सण अर्थात दिवाळीसाठी सरकारी कार्यालयांना बुधवारपासून सुटी जाहीर करण्यात आली आहे. लक्ष्मीपूजनपासून भाऊबीजेपर्यंत ही सुटी असणार असली तरी त्यावर शनिवार आणि रविवार अशा लागून आलेल्या दोन सुट्यांचा बोनस मिळाल्याने सरकारी बाबूंमध्ये खुशीचा माहोल आहे. सणाचे वेध लागल्याने आतापासूनच शुकशुकाट जाणवण्यास सुरुवात झाली आहे.

आनंद आणि मांगल्याची उधळण करणाऱ्या दिपावलीला रविवारपासून सुरुवात झाली आहे. वसुबारसपाठोपाठ सोमवारी धनत्रयोदशी उत्साहात साजरी झाली. लक्ष्मीपूजन हा सणाचा मुख्य दिवस असून बुधवारपासून सरकारी कार्यालयांना सुटी असणार आहे. बलिप्रतिपदा (दि. ८) आणि भाऊबीज (दि. ९) अनुक्रमे गुरुवारी व शुक्रवारी असल्याने सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुटी असणार आहे. त्यानंतर महिन्याचा दुसरा शनिवार आणि रविवारची सुटी लागून आल्याने सरकारी बाबूंना सलग पाच दिवस सुटीचा आनंद उपभोगता येणार आहे. सणानिमित्त काही कर्मचाऱ्यांनी सोमवारपासूनच रजा मंजूर करवून घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट पहावयास मिळू लागला आहे. त्यामुळे सरकारी कार्यालये आता सोमवारनंतरच (दि. १२) गजबजणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कालिदास’मध्ये नटराज पूजन

$
0
0

महापौरांना मात्र कार्यक्रमाला टाळले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची नाशिक शाखा व महापालिका यांच्यातर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्त महाकवी कालिदास कलामंदिरात नटराज पूजन करण्यात आले. स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते नटराज पूजन झाले. दरम्यान, या कार्यक्रमास महापौरांची अनुपस्थिती दिसून आली.

नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी रंगभूमी दिनानिमित्त घोषित करण्यात आलेले पुरस्कार व पुरस्कारार्थी यांच्याविषयी माहिती दिली. याप्रसंगी लक्ष्मण सावजी, मधुकर झेंडे, विवेक पाटणकर, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, सदानंद जोशी, प्राजक्त देशमुख, सचिन शिंदे, श्रीकांत बेणी, हेमंत महाजन, गिरीश गर्गे, नूपुर सावजी, राजेश जाधव, विजय साळवे, प्रकाश साळवे, लक्ष्मण कोकणे, प्रवीण कांबळे, राजेश शर्मा, प्रदीप पाटील, सुनील परमार, ईश्वर जगताप, राजेंद्र जाधव यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते. राजेश भुसारे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील ढगे यांनी आभार मानले.

नटराज पूजनाच्या कार्यक्रमासाठी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह गटनेत्यांनाही निमंत्रित करणे अपेक्षित होते. परंतु, प्रशासनकडून केवळ स्थायी समिती सभापतींनाच आमंत्रण दिले गेले. त्यामुळे हा महापौरांचा अवमान असल्याची चर्चा भाजप वर्तुळात आहे. शहराच्या प्रथम नागरिक या नात्याने महापौरांना कार्यक्रमास बोलविणे अपेक्षित होते. परंतु, सध्या महापालिकेत महापौर विरुद्ध आयुक्त असा सामना सुरू आहे. त्यामुळे महापौरांना कुठेही बोलवले जात नसल्याची चर्चा आहे.

लोगो : चर्चा तर होणारच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात बाजाराला दिवाळीची झळाळी

$
0
0

नवीन वस्तू खरेदीसाठी गजबजल्या बाजारपेठा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

दिवाळी सणाला सुरुवात झाली असून, गेल्या दोन दिवसांपासून शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागल्याने सोमवारी (दि. ५) शहरातील मुख्य बाजारपेठ पाचकंदील चौकापासून ते थेट महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत नोकरवर्गासह नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे बाजारपेठ गजबजून गेली होती. फराळाच्या साहित्यासह सजावटीच्या वस्तूंना चांगली मागणी दिसून आली. दरम्यान, सोमवारी व्यावसायिकांसह नागरिकांनी घरोघरी धनत्रयोदशी मोठ्या उत्साहात साजरी केली.

वसूबारसनिमित्त रविवारी (दि. ४) जिल्ह्यातील ग्रामीण भागात वासरासह गायीची पूजा करण्यात आली. यानिमित्त काही महिलांनी उपवास केला. तसेच दिवाळीनिमित्त सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळी ९ वाजेपासून रात्री उशिरापर्यंत खुली ठेवली होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल्स विक्रेत्यांनी अनेक ऑफर्स देऊ केल्या आहेत. त्यामुळे या दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. नोकर वर्गाच्या हातात पगारासह बोनस पडल्यामुळे नोकरवर्गाने कुटुंबासह बाजारात येऊन खरेदी केली. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला आग्रारोड गर्दीने फुलून गेला होता. गर्दीमुळे दिवसभरातून अनेकदा वाहतूक कोंडी झालेली दिसत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोणत्याही धमक्यांना घाबरणार नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

आपण मनूस्मृती जाळल्याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली असून, माझे जे करायचे ते करा मी धमक्यांना घाबरत नसल्याचे सांगत, मला कितीही धमक्या दिल्या तरी मी थांबणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिला आहे.
दिल्लीची ईडा आणि राज्यातील पीडा टळो आणि शेतकऱ्याचे राज्य येवो, अशा दीपावलीच्या शुभेच्छा देत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हमीभावच्या आश्वासनाची मिमिक्री करीत त्यांनी चांगलीच खिल्लीदेखील उडवली.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मधील बाजार समिती आवारात त्यांच्या उपस्थितीत समता परिषदेची समता सभा रविवारी (दि. ४) दुपारी झाली. या सभेत त्यांच्या हस्ते मनूस्मृती जाळून निषेध करण्यात आला. सभेच्या सुरुवातीलाच भुजबळ यांनी संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर सडकून टीका केली. ज्यांनी मोदींना गोध्रा घटनेत मदत केली त्यांनाच आज दिल्लीत महत्त्वाची पदे दिल्या जात असल्याचे सांगत आपल्याला नाहक अडीच वर्षे जेलमध्ये टाकल्याचे सांगितले. युतीच्या सरकारमध्ये विरोधीपक्ष नेते असताना आपण सरकार विरोधात उठवलेल्या आवाजाने त्यांचे सरकार पडले होते. हीच भीती ओळखून सध्याच्या भाजप सरकारने खोट्या गुन्ह्यांमध्ये रोवून आपल्याला जेलमध्ये डांबल्याचा आरोपदेखील भुजबळ यांनी केला आहे.

यानंतर धुळे तालुक्यातील सोनगीर येथे रविवारी सायंकाळी ओबीसी समाजाचा समता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी छगन भुजबळ यांच्या हस्ते सोनगीर येथे माळी समाज मंगल कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे भुजबळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. आम्ही ब्राह्मणांच्या विरोधात कधीच नाही, स्वतः महात्मा फुलेदेखील ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते. मात्र, आमचा विरोध हा ब्राह्मणवादाला आहे. सत्तेत असलेले भाजप सरकार हे मनुवादी सरकार आहे. या सरकारने सर्वसामान्य नागरिकांची, शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोपही भुजबळ यांनी केला. मोदींनी नोटबंदीच्यावेळी दिलेल्या आश्वासनांचं काय झाले जीएसटी लागू झाल्यामुळे व्यापाऱ्यांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नोटबंदी केल्यास आतंकवाद थांबेल असे मोदींनी सांगितलं होत. मात्र, त्याच काय झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरलाही सुरेल गितांची मैफल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर येथील मातोश्री नर्मदा लॉन्सवर गुरुवारी (दि. ८) दिवाळी पाडव्यानिमित्त पहाटे साडेपाच वाजता 'पाडवा पहाट'चे आयोजन करण्यात आले आहे. अमोल पालेकर प्रस्तुत महाराष्ट्राची लोककला या कार्यक्रमाचे सादरीकरण या निमित्ताने करण्यात येणार आहे. ज्येष्ठ उद्योजक लालाशेठ चांडक, पुंजा सांगळे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णा भगत यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षांपासून पाडवा पहाट या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या पाडवा पहाटमधून सिन्नरकरांना याआधीही अनेक दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी मिळाली आहे. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून सुरेल सुमधूर आवाजात विविध नृत्यप्रकारातून महाराष्ट्रात साजरे होणारे सण राज्यातील विविध नृत्य कला व अविष्कार यांचे सादरीकरण केले जाणार आहे. या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घेण्याचे आव्हान पाडवा पहाट संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images