Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

$
0
0

आ. फरांदेंची जलसंपदाकडे मागणी; नाशिकचे आरक्षण साडेसहा टीएमसी असल्याचा दावा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत आणि अमर्यादपणे सिंचन तसेच साखर उद्योगासाठी पाणीउपसा सुरू आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामडळांच्या संचालकांनी फेरसर्वेक्षणात याची नोंद केलेली नाही. तुटीच्या खोऱ्यात अनधिकृतपणे उपसा होत असल्यानेच नाशिक-नगरमधून पाणी सोडावे लागत असल्याचा आरोप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केला आहे. महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहीरकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत नाशिकसाठी जलसंपदा विभागाच्याच निर्णयानुसार २०१८ मध्ये ६. ५ टीएमसी आरक्षित असताना, मेंढेंगिरी अहवालात मात्र ४.५ टीएमसी दाखवण्यात आल्याचा दावाही आ. फरांदे यांनी केला आहे.

जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात होणाऱ्या अवैध पाणीउपसाबाबत प्रा. फरांदे यांनी पत्रकार परिषद घेतली. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात पाणी उपशाकडे दुर्लक्ष करून करीत महाराष्ट्र जलसंपती नियमन प्राधिकरणाकडे दिशाभूल करणारा अहवाल सादर केला. जायकवाडीच्या बॅकवॉटरमधील चार तालुक्यांमधील आठ साखर कारखान्यांमध्ये ४५.३८ लक्ष मेट्रिक टन साखर उत्पादन घेण्यात आले आहे. या चार तालुक्यांमध्ये उसाच्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे धरणातून पाणीउपसा केला जात आहे. तसेच साडेसात टीएमसी पाणी हे उद्योगांसाठी राखीव आहे. पाच एचपीच्या मोटारींची परवानगी असतांना १० ते १५ एचपीच्या मोटारी लावून पाणी उपसले जात आहे. त्याकडे महावितरणाच्या अधिकाऱ्यांसह कार्यकारी संचालक कोहीरकर यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कोहीरकर यांच्यासह महावितरणच्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी आ. फरांदे यांनी केली. मराठवाड्याला पिण्यास पाणी देण्यास विरोध नाही. मात्र, शेती व उद्योगासाठी पाणी देऊ नये. गोदावरी आणि दारणा खोऱ्यातून नाशिकची लूट केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

नाशिकचे आरक्षण ६.५

जलसंपदा विभागाने नाशिकच्या पाणीवापर आरक्षणाची २०४१ पर्यंतची तरतूद आपल्या अहवालात तरतूद केली आहे. परंतु, मेंढेगिरी समितीच्या अहवालात कमी आणि चुकीची तरतूद दाखविण्यात आली आहे. २०११ पर्यंत गंगापूर आणि दारणा धरणातून ४.५ टीएमसी पाण्याची तरतूद आहे. तर, २०२१ पर्यंत नाशिकसाठी ७.२० टीएमसी पाणी आरक्षित ठेवले आहे. २०१८ मध्ये शहरासाठी ६.५ टीएमसी पाणी वापराची परवानगी आहे. असे असतांना, मेंढेगिरी समितीने चुकीची आकडेवारी दाखवून नाशिकचे दोन टीएमसी पाणी कमी केल्याचा आरोप फरांदे यांनी केला.

जायकवाडीची क्षमता ४२ टीएमसी

राज्य सरकारने २००२ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत जायकवाडीची धरणक्षमता ८१ टीएमसी असल्याचा दावा केला होता. परंतु, प्रत्यक्षात सीडीओ-मेरीने २००४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात जायकवाडीची क्षमता अवघी ४२.२० टीएमसी असल्याचे नमूद केले आहे. यासंदर्भातील कागदपत्र हे पाटबंधारे महामंडळ आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे उपलब्ध असल्याचे सांगत, धरण क्षमता कमी असूनही तुटीचे खोरे दाखवून नाशिक-नगरचे पाणी पळविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

याचिका दाखल

२००५ मध्ये तयार झालेला समन्यायी पाणीवाटप कायदा चुकीचा असून, या कायद्याचे फेरनियोजन करावे, मेंढेगिरी समितीच्या अहवालाचे फेरसर्वेक्षण करावे, या मागण्यांसाठी आ. फरांदे यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाकडे शुक्रवारी याचिका दाखल केली. आपल्या अर्जाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्राधिकरणाकडे आता थेट कायदेशीर पद्धतीने त्यांनी हरकत आपले म्हणणे शुक्रवारी सादर केले. तसेच निर्णय लागत नाही तोपर्यंत पाणी सोडू नये, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंधी पंचायतीतर्फे समाजबांधवांचे संमेलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील पूज्य सिंधी पंचायतीच्या वतीने दिवाळीनिमित्त सर्व सिंधी समाजबांधवांच्या संमेलनाचे आयोजन येत्या सोमवारी (दि. २९ ऑक्टोबर) पूज्य सिंधी पंचायत सभागृहामध्ये करण्यात आले आहे. त्यानिमित्त सर्व समाजबांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पूज्य सिंधी पंचायतीचे अध्यक्ष रतन चावला यांनी दिली.

दिवाळीनिमित्त सोमवारी सर्व समाजबांधवांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्ताद्वारे होणारे विभिन्न आजार, रक्तातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबिन, थायरॉइड, प्लेटलेट्स तपासणी, रक्तातील पांढऱ्या पेशी कमी-जास्त होणे, रक्तातील कोलेस्टेरॉल, यूरिक अॅसिड, शरीरातील रक्ताचे प्रमाण, थॅलेसेमिया यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी देवळाली कॅम्पसह परिसरातील नागरिकांकरिता पूज्य सिंधी पंचायतीतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये ज्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे, त्यासाठी होणारा सर्व खर्च सिंधी पंचायतीच्या वतीने करण्यात येणार आहे. संमेलन आणि आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी रतन चावला, हंसानंद निहालानी, मोहनदास मनवानी, भरत दर्यानी, हीरो रिझवानी, मनीष चावला, भगवानदास कटारिया, जयरामदास चावला, धनेश अडवानी, टिकमदास केवलानी, मनोहर माखिजा, नरेश पिर्थियानी, प्रकश केवलानी, तरुण पंजाबी, मूलचंद अहुजा, अॅड. वर्षा नागपाल, डॉ. देवी लखमियानी, रश्मी अहुजा, नेहा चावला, नीलम कलाल, दीक्षा कुकरेजा, लक्ष्मी निहालानी, मानसी सचदेव, साक्षी नागदेव, प्रिया रिझवानी, शोभा लखवानी आदी प्रयत्नशील आहेत.

गजल मैफलीची पर्वणी

पूज्य सिंधी पंचायतीतर्फे सोमवारी सायंकाळी ७ वाजता संजय वस्तल आणि संजोत यांची संगीतमय गजल मैफल रंगणार आहे. त्याचप्रमाणे अन्य धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील सर्व सिंधीबांधवांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायतीचे अध्यक्ष रतन चावला यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेड गटात पाहणी

$
0
0

घोटी : इगतपुरी तालुक्यातील व सिन्नर मतदार संघातील खेड गटात शुक्रवारी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दुष्काळी भागाची पाहणी केली. व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून तालुक्यात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते इगतपुरी तालुक्यालाही दुष्काळाची झळ इगतपुरी तालुक्याला बसत आहे त्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यात दुष्काळ स्थितीत दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी, सुविधा व मदतीचा लाभ या तालुक्याला दिला जाणार असल्याची ग्वाही जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायदा बनविणारे बनले आंदोलक

$
0
0

जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांची टीका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयावर ज्यांनी कायदा केला तेच लोक आंदोलन करत असल्याची टीका मृदा व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली. विरोधकांची ही दुतोंडी भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. तत्कालीन सरकारने २००५ मध्ये कायदा केला. त्यानंतर कोर्टाने निर्णय दिला. त्याची अमंलबजावणी सरकार करत असल्याचेही ते म्हणाले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर प्रा. शिंदे नाशिक, इगतपुरी व सिन्नर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नाशिक पंचायत समिती येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळेस ते पत्रकारांशी बोलत होते. याविषयावर केव्हा न केव्हा चर्चा करावी लागणार आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यात दुष्काळ असतांना हे पाणी सोडण्याबाबत त्यांनी नापसंती व्यक्त केली. पण, अगोदरच्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आमचे हात बांधलेले असल्याचेही त्यांनी सांगितले. पिण्याचे आवर्तन असते तर समजू शकलो असतो. पण, तसे नसतांना केवळ कायदा केल्यामुळे हे पाणी सोडावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नाशिक व नगरच्या शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे.

गेल्यावर्षी असा प्रश्न नव्हता. आता पाणीटंचाई असल्याने हा प्रश्न तीव्रपणे समोर आला आहे. दुष्काळ पाहणी दौऱ्यात इगतपुरी तालुक्यात धरणाजवळील गावामध्ये पाणी नाही. पण, हेच पाणी २०० किलोमीटर जात असेल तर त्या भागावर अन्यायच आहे. त्यामुळे अगोदर या दोन्ही जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेला पाणी मिळायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोक्का आरोपींचा धिंगाणा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक येथील मोक्का न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यासाठी आणलेल्या मोक्काच्या तीन आरोपींनी कैदी पार्टीला शिविगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. या तीन आरोपींपैकी दोघांनी शासकीय वाहनाच्या छताला डोके आपटून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केल्याने काही काळ पोलिसांचीही मोठी धांदल उडाली. नाशिकरोडऐवजी धुळे कारागृहात दाखल करण्याची या आरोपींची मागणी असल्याची माहिती आहे.

या घटनेप्रकरणी धुळे जिल्हा पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्मचारी तुकाराम नामदेव सोनवणे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आरोपी गुरू अर्जुन भालेराव (वय २७, रा. येवला), सागर गणेश मरसाळे (वय २७, रा. मनमाड) आणि विनोद गणेश मरसाळे (वय ३२, रा. धुळे) या तिघांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार या तिघा आरोपींविरोधात धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात हे तिघेही आरोपी धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात होते. या तिघांना गुरुवारी नाशिकच्या मोक्का न्यायालयात हजर करण्याकामी फिर्यादी सोनवणे, पोलिस हेड कॉन्स्टेबल डी. एस. जोशी, पोलिस नाईक एस. पी. कोतवाल आणि पोलिस कॉन्स्टेबल जी. ए. बागूल हे पोलिस कर्मचारी एम. एच. १८, जी १७४ या शासकीय वाहनाने धुळे येथून घेऊन आलेले होते. गुरुवारी नाशिकच्या मोक्का न्यायालयात या तिघा आरोपींना दुपारी अडीच वाजता सुनावणीसाठी हजर केल्यानंतर मोक्का न्यायालयाने या तिघांपैकी गुरू अर्जुन भालेराव या आरोपीस पोलिस कोठडी तर उर्वरित सागर मरसाळे आणि विनोद मरसाळे या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सागर व विनोद मरसाळे या दोघा आरोपींना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्याचेही आदेश दिले होते.

वाहनातून उतरण्यास नकार

मोक्का न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादीने या तिघा आरोपींना त्यांच्याकडील शासकीय वाहनाने सायंकाळी ५ वाजता नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आणले. येथे आल्यावर कैदी पार्टीने सागर मरसाळे आणि विनोद मरसाळे या दोघा आरोपींना वाहनातून खाली उतरण्यास सांगितले असता त्यांनी कैदीपार्टीतील पोलिस कर्मचाऱ्यांना शिविगाळ केली. गुरू भालेराव याने पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शासकीय वाहनाच्या छताला डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची माहिती कैदीपार्टीतील पोलिस कर्मचाऱ्यांनी धुळे शहराचे पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांना दिल्यावर त्यांनी या आरोपींविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या तिघांना नाशिकरोड पोलिस ठाण्यात आणल्यावर येथेही खाली उतरण्यास नकार देत या तिघा आरोपींनी पोलिसांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली. सागर मरसाळे व विनोद मरसाळे या आरोपींनी वाहनाच्या छताला डोके आपटले. या प्रकारामुळे पोलिसांची काही काळ मोठी धांदल उडाली होती. या प्रकारानंतर नाशिकरोड पोलिस ठाण्यात या तिघाही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नाशिकरोड कारागृहाचे वावडे का?

या प्रकरणातील मोक्का आरोपींना मोक्का न्यायालयाने नाशिकरोड कारागृहात दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, नाशिकरोडऐवजी अगोदरच्या धुळे कारागृहातच दाखल करण्याची या आरोपींची मागणी असल्याचे समजते. या तिघा आरोपींविरोधात मोक्का कायदयानुसार कारवाई झालेली असल्याने त्यांचा गंभीर गुन्ह्यांत सहभाग असल्याचे उघड आहे. त्यामुळे या आरोपींना नाशिकरोड कारागृहाचे वावडे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारणा, मुकणेतून जायकवाडीसाठी पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील दारणा, मुकणे, भावली, भाम वाकी या धरणातून जायकवाडी धरणासाठी जिल्हा प्रशासनाने पाणी सोडले. यावेळी माजी आमदार मेंगाळ, माजी शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात नेत्यांसह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

इगतपुरी तालुक्यातील धरणातील पाणी व शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. जायकवाडीसाठी दारणा व मुकणे धरणातून अद्याप प्रशासनाने पाणी सोडलेले नाही; मात्र भावली, भाम व वाकी या धरणातून शुक्रवारी सकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या तीनही धरणांचे पाणी दारणा धरणात जलसाठा संचित करण्यात आला. दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आलेल्या इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणातून जायकवाडीला पाणी देण्याबाबत प्रशासन आग्रही आहे; त्यास इगतपुरी तालुकावासीयांचा विरोध आहे.

भावली धरणातून शहापूरला पाणी देऊ नये म्हणून आमदार निर्मला गावित, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोरख बोडके, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्त्वाखाली धरणाचे पाणी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. दारणा, भावली धरणावर मोठ्या प्रमाणात पोलिस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

धरण...........पाणीविसर्ग (क्युसेस)

भावली.........२५०

भाम............४००

वाकी...........५००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जया दिवेसह साथीदारांची धिंड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दोन दिवसांपूर्वी कारागृहातून जामिनावर सुटलेला गुन्हेगार जया दिवे याच्या सुटकेचा आनंद साजरा करण्याची योजना त्याच्या साथीदारांनी आखली. त्यानुसार त्यांनी गुरुवारी (दि.२५) इंद्रकुंड येथील सिद्धी टॉवरच्या गच्चीवर फटाके फोडले. त्यांच्या या प्रकाराची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली. पोलिस त्या ठिकाणी पोहचताच जया दिवे व त्याच्या साथीदारांनी पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. याप्रकरणी पोलिसांनी जया दिवेसह व त्याच्या पाच साथीदारांसह दोन महिलांना अटक केली. दिवे आणि त्याचे साथीदार यांची शुक्रवारी (दि. २६) पंचवटी परिसरात पोलिसांनी धिंड काढली.

गुन्हेगार जया हिरामण दिवे (२९, रा. पेठ नाका, एरंडवाडी) हा गेल्या वर्षभरापासून नाशिकरोड कारागृहात खुनाच्या खटल्यात दाखल होता. न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केल्याने, गुरुवारी (दि. २५) कारागृहाबाहेर आला. 'भाई' बाहेर आल्याने त्याचे साथीदार इंद्रकुंड परिसरातील सिद्धी टॉवरमधील दिवेच्या घरी सेलिब्रेशन साजरे करण्यासाठी पोहचले. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास या सर्वांनी इमारतीच्या गच्चीवर फटाके फोडण्यास सुरुवात केली. फटाके गच्चीवरून खाली फेकले. याची गुप्त माहिती पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली. त्यांनी याची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गिरमे यांना अन्य पोलिस कर्मचारांसह पाठविले. गुन्हेगार दिवेने गिरमे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व धक्काबुक्की करीत त्यांचा शर्ट फाडला. यातच दिवेने मेहुणीच्या पंजाबी ड्रेसचा टॉप फाडला व गिरमे यांच्यावर धावून जात माझ्या मेहुणीवर हात का टाकला, असे विचारत पुन्हा धक्काबुक्की केली व पोलिसांना तसेच न्यायालयाला पुन्हा अर्वाच्च शिवीगाळ केली.

याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी जया दिवेसह विकी कीर्ती ठाकूर (२४, रा. गाजवे भवन चाळ, शनी मंदिर जवळ, पेठरोड), भूषण कपिल चौधरी (१९, रा. राधाकृष्ण मंदिरामागे, इंद्रकुंड), गणेश नंदू परदेशी (२४, रा.शिवाजी नगर, सातपूर), मयूर शिवाजी खैर (१९, रा.जाणता राजा कॉलनी, पंचवटी), अक्षय सुधीर बोराडे (२७, रा. सी फोर अनमोल पार्क रो हाऊस, लोखंडे मळा, उपनगर), दिवेची मेहुणी प्रियंका मस्तकीन शेख (२६, रा.घर नं.६, दत्त नगर, पेठरोड) व सासू विजया राजेंद्र खरात (४५, रा.फ्लॅट नं.२०२, सिद्धी टॉवर, इंद्रकुंड) यांना घटनास्थळी अटक केली. दिवेचे अन्य साथीदार आकाश जाधव, नकुल परदेशी (पूर्ण नाव व पत्ते उपलब्ध नाही) व अन्य दोघेजण फरार झाले आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वाल्मीक शार्दुल करीत आहेत. दरम्यान या सर्व संशयितांना न्यायालयासमोर शुक्रवारी (दि. २६) हजर केले असता दि. १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पंचवटी परिसरात फिरविले

अटक करण्यात आलेला जया दिवे व त्याच्या साथीदारांची शुक्रवारी (दि.२६) पंचवटी परिसरातून धिंड काढण्यात आली. दिंडोरी नाका, पंचवटी कारंजा, इंद्रकुंड व मालेगाव स्टँड या मार्गाने पंचवटी पोलिसांनी या सर्वांना पायी फिरवून नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटबंधारेवर हल्लाबोल

$
0
0

युती होणारच! (मुख्य अंक पान १)

दसरा मेळाव्यात शिवसेनेने हिंदुत्वाचाच पुरस्कार केला असून, देशात हिंदुत्वावर काम करणारा भाजप एकमेव पक्ष आहे. एकमेकांचे तोंड न पाहणारे लालूप्रसाद यादव व नितीश कुमार, मायावती व मुलायम एकत्र येऊ शकतात, तर शिवसेना आणि भाजप, जे जन्मभर एकत्र राहिले, ते एकत्र येतीलच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.

--

पाटबंधारेवर हल्लाबोल (मुख्य अंक २ लीड)

नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला सोडण्याच्या निर्णयामुळे नाशिकवर अन्याय झाल्याचे सांगत शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, अपक्ष या विरोधी पक्षांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देत हल्लाबोल केला. त्यांनी मुख्य अभियंता किरण कुलकर्णी यांना घेराव घालत निषेधाच्या घोषणा देत सिंचन भवन दणाणून सोडले.

--

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे (प्लस पान ५ चटकमटक)

गेल्या आठवड्यात चटकमटकमध्ये आपण अंडा भुर्जी, अंडा करी, अंडा रोल, तसेच अंड्याचे विविध प्रकार चाखले. या आठवड्यातही आपण पुन्हा अंड्याचे लज्जतदार प्रकार चाखणार आहोत. चला, तर मग मित्रविहारचे फेमस टोस्ट ऑम्लेट, 'आरके'वरची अंडा भुर्जी, गोलूज् अंडा रोल अशा चविष्ट ठिकाणांची अंडा भुर्जी आणि अंडा रोलची चव चाखायला...

००००००००००००००००००००

दुरुस्त सुखोई हवाई दलात (मुख्य अंक पान ३)

ओझर येथील हवाई दलाच्या केंद्रात देखभाल आणि दुरुस्ती केलेले सुखोई ३० (एमकेआय) हे लढाऊ विमान शुक्रवारी हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आले. त्याचा शानदार सोहळा ओझर येथील केंद्रात पार पडला. सुखोईची निर्मिती ओझरच्या 'एचएएल'मध्ये केली जाते. तसेच, त्याची देखभाल आणि दुरुस्तीही 'एचएएल'मार्फतच होते.

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कशीश डगळेची राज्य डॉजबॉल संघात निवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत येथील भिकुसा हायस्कूलच्या संघाने नाशिक विभागाचे नेतृत्व करीत उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत कशीश शरद डगळे हिने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना दुसऱ्यांदा 17 वर्षाआतील मुलींच्या डॉजबॉल संघात तिची निवड झाली. मागील राष्ट्रीय स्पर्धेत तिला सुवर्णपदक मिळाले होते. तिचा अनुभव लक्षात घेता तिची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली. छत्तीसगड येथे राष्ट्रीय स्पर्धा पार पडणार असून, विद्यालयाच्यावतीने कशीश डगळे व तिच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष किरण डगळे यांची ती पुतणी असून, तिला क्रीडा शिक्षक रामनाथ जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता पाचवीपासून दररोज पहाटे ५ ते ७ या वेळेत भिकुसा हायस्कूलच्या मैदानावर ती सराव करते. कशिशच्या यशाबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. एम. एस. गोसावी, डॉ. दिप्ती देशपांडे, विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, सिन्नर केंद्राचे अधीक्षक शशांक गंधे, मुख्याध्यापिका एस. एस. दारोळे आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकता दौड वाढविणार एकात्मता अन् सलोखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ग्रामीण पोलिसांतर्फे बुधवारी (दि. ३१) जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा कायम ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी जिल्ह्यातील १८ ठिकाणी या एकता दौडचे नियोजन केले आहे. या दौडमध्ये शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी केले आहे. बुधवारी सकाळी ६ वाजता पोलिस ठाणेनिहाय सर्व तालुका स्तरांवर आणि ओझर, पिंपळगावसह मनमाड शहरात या दौडला प्रारंभ होईल. विविध गटांत वयोमानानुसार ही स्पर्धा पार पडणार असून, प्रत्येक सहभागी धावपटूस पोलिस दलाच्या वतीने प्रमाणपत्र दिले जाणार आहे. धावपट्टूंसाठी प्राथमिक उपचार केंद्र, सुसज्ज अ‍ॅम्ब्युलन्स सुविधांचे पोलिस दलाने नियोजन केले आहे. सर्व जाती-धर्मीयांनी एकत्र येऊन या राष्ट्रीय एकता दौडमध्ये सहभाग नोंदवावा. त्यासाठी नागरिकांनी नजीकच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक दराडे यांनी केले आहे.

--

राष्ट्रीय एकात्मता ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी युवावर्गाची भूमिका महत्त्वाची आहे. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव पाहता मुलांना मैदानांकडे वळविणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असून, त्यादृष्टीने एकता दौड महत्त्वाची ठरते.

-संजय दराडे, जिल्हा पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात

$
0
0

चौहान हायस्कूलमध्ये

पणती सजावट उपक्रम

नाशिकरोड : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नाशिकरोड येथील श्रीमती र. ज. चौहाण (बि) गर्ल्स हायस्कूल येथे विद्यार्थिनींच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी दिवाळीनिमित्त पणती सजावट या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थिनींनी विविध रंग व सजावट साहित्य वापरून पणत्यांची आकर्षक सजावट केली. या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी धामणे यांच्यासह सुरेश दीक्षित, माधव मुठाळ व प्रतिमा खैरनार व सुषमा वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.

-----

आकाशकंदिल कार्यशाळा

नाशिकरोड : द्वारका येथील रवींद्र विद्यालयात दिवाळीच्या पार्श्वभुमीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत शाळेचे कलाशिक्षक राजेश मालवी यांनी सहभागी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक आकाशकंदीलाचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व पटवून देत आकाशकंदील बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मनोज पिंगळे, उपाध्यक्ष वसंत राऊत, कार्यवाह वासंती गटवे, मुख्याध्यापक केशव चव्हाण आदींनी विशेष कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेगाब्लॉकचा ग्रामीण प्रवाशांना फटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी येथे मुंबई-भुसावळ मध्य रेल्वेचा मेगाब्लॉकमुळे भुसावळ-मुंबई अप आणि डाऊन पॅसेंजर तसेच गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना बसला आहे. त्यामुळे इगतपुरी - भुसावळ दरम्यान स्वतंत्र पॅसेंजर सुरू करावी तसेच मनमाड-देवळाली धावणारी पॅसेंजर घोटी, इगतपुरीपर्यंत आणावी, रद्द केलेल्या गाड्या पूर्ववत लवकर सुरू करण्याची मागणी शिवसेना शाखा प्रमुख अंबादास धोंगडे, नांदुरवैद्य सरपंच दिलीप मुसळे, दिनेश गव्हाणे, संतोष गुळवे, बाबा शेट्टी आदींनी केली आहे.

सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. तसेच शालेय, महाविद्यायलीन परीक्षा सुरू आहेत. अस्वली स्टेशन, पाडळी, घोटी परिसरातील अनेक ग्रामीण विद्यार्थी शिक्षणासाठी नाशिक येथे जातात. तसेच दुग्ध व्यवसायिक, शेतकरी, भाजीपाला विक्रेते आणि आता दीपावलीसाठी महिलांची खरेदीची लगबग सुरू आहे. या भागातील वरील सर्वांना रेल्वेची पॅसेंजर गाडी उपयोगात येते. एसटी बसेस या भागात सध्या येतच नसल्यामुळे ग्रामीण प्रवाशी अनेक गैरसोयींना तोंड देत आहेत. सरपंच दिलीप मुसळे, अंबादास धोंगडे यांनी आज अस्वली रेल्वे स्थानक स्टेशन मास्तरांची भेट घेऊन प्रवाशांची बाजू मांडली. मात्र रेल्वेचे सर्व निर्णय मनमाड व भुसावळ वरून वरिष्ठ पातळीवर घेतले जातात, असे सांगितले. तसेच इगतपुरी स्थानकात युद्धपातळीवर प्लॅटफॉर्म नूतनीकरण काम सुरू असून त्यामुळेच मेगाब्लॉक घेऊन वरील गाड्या रद्द झाल्याचे सांगण्यात आले. लवकरात लवकर पॅसेंजर गाडी पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आता ई-टॉयलेट्स

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील गर्दीच्या ११२ ठिकाणी 'पीपीपी' तत्त्वावर ई-टॉयलेट्सची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासनाने निविदा मागविल्या आहेत. विशेष म्हणजे यात महापालिकेला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.

शहरात पार्किंगसह सार्वजनिक शौचालयांची समस्या अत्यंत गंभीर आहे. महापालिकेची जवळपास दीडशे शौचालये आहेत. परंतु, वाढत्या लोकसंख्येमुळे ही शौचालयेही आता अपुरी पडत आहेत. सत्ताधाऱ्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी रस्तेविकासाला प्राधान्य दिल्याने पार्किंगसह शौचालये, स्वच्छतागृहांची उभारणी आदी प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या ई-टॉयलेट प्रकल्पाला प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे.

बाजारपेठेच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने प्रामुख्याने महिलांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागते. १०० टक्के हागणदारीमुक्त शहर संकल्पनेत नाशिक केंद्राच्या निकषांवर खरे उतरले असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी नाशिक शहरात ई-टॉयलेट्सची संकल्पना राबविण्याचा मनोदय स्थायी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाच्या माध्यमातून व्यक्त केला होता. त्याची अंमलबजावणी आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केली आहे.

--

वापर राहणार सशुल्क

शहरात 'पीपीपी' तत्त्वावर ११२ ठिकाणी ई-टॉयलेट्सची उभारणी केली जाणार असून, त्यासाठी महापालिकेला एक रुपयादेखील खर्च करावा लागणार नाही. ई-टॉयलेट्स उभारणीसाठीचा संपूर्ण खर्च ठेकेदाराला उचलावा लागणार आहे. ई-टॉयलेट्सचा वापर सशुल्क राहणार असून, त्यातून मिळणारा महसूल व ई-टॉयलेट्सवर उभारण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून ठेकेदाराला परतावा मिळणार आहे. शहरातील गर्दीच्या, तसेच बाजारपेठाच्या ठिकाणी हे ई-टॉयलेट्स उभारले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक समितीची बैठक

$
0
0

शिक्षक समितीची बैठक

जेलरोड : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज (२८ ऑक्टोबर) शालीमार येथील हॉटेल रॉयल हेरिटेजमध्ये होणार आहे. प्रदेशाध्यक्ष उदयराव शिंदे, शिवाजीराव साखरे, कार्याध्यक्ष किरण गायकवाड, कोषाध्यक्ष केदू देशमाने, उपाध्यक्ष राजन कोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचे आंदोलन-न्यायालयीन लढा, मुख्याध्यापक-शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाइन कामाबाबत चर्चा, कमी पटाच्या नावाखाली शाळा बंद करण्याच्या शासनाच्या भूमिकेवर चर्चा, जिल्हानिहाय शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आदींबाबत भूमिका निश्चित केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर गमावणार तीन महिन्यांचे पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठवाड्यातील जनतेची आणि पिकांची तहान भागविण्यासाठी नाशिकमधील धरणांमधून विसर्ग करण्यात येणार आहे. शहरातील सुमारे २० लाख लोकसंख्येची ८४ दिवसांची पाण्याची गरज भागेल एवढे पाणी जायकवाडीत सोडले जाणार असल्याने ऐन दुष्काळाच्या तोंडावर नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

समन्यायी पाणीवाटपाच्या निकषानुसार मराठवाड्यातील जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून एकूण ८.९९ टीएमसी पाणी सोडावे, असे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणसमूहातून ३.२४ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून ६०० दशलक्ष घनफूट पाणी सोडावे, असे महामंडळाचे आदेश आहेत. नाशिक शहरासह आसपासच्या परिसराला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो, तर दारणा धरणातूनही नाशिककरांसाठी दर वर्षी ४०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण केले जाते. महामंडळाच्या आदेशामुळे नाशिक शहरवासीयांसाठी उपयुक्त ठरणारे एकूण १००० दशलक्ष घनफूट म्हणजेच एक टीएमसी पाणी औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणामध्ये सोडावे लागणार आहे. महामंडळाच्या आदेशांचे पालन करणे अनिवार्य असल्याने प्रशासनही पाणी सोडण्याच्या तयारीला लागले आहे. त्यामुळे नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळाले असून, नाशिककरांना सुमारे ९० दिवस पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे.

--

रोजची उचल ३४ कोटी लिटर!

नाशिक शहराची तहान भागविण्यासाठी महापालिकेला दररोज १२ दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता भासते. गंगापूर आणि दारणा धरणामधून एकूण दररोज १२ दशलक्ष घनफूट म्हणजेच ३४ कोटी लिटर पाणी उचलले जाते. शहराची लोकसंख्या २० लाखांच्या जवळपास असून, एवढ्या रहिवाशांची तहान या पाण्यातून भागविली जाते. दररोज १२ दशलक्ष घनफूट याप्रमाणे १ हजार दशलक्ष घनफूट पाणी ८४ दिवस शहराकरिता पुरू शकते. म्हणजेच हे पाणी जायकवाडीला गेल्यास सुमारे तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा नाशिककरांना गमवावा लागणार आहे. गंगापूर आणि दारणा अशा दोन्ही धरणांमधून केवळ शहरवासीयांची तहान भागविण्याकरिता उपयोगात आणले जाणारे दोन हजार ८३१ कोटी लिटर पाणी जायकवाडीला सोडले जाणार आहे. एकट्या गंगापूर धरणातून शहराला ५० दिवस पुरेल एवढे, तर दारणातून शहराला ३४ दिवस पुरेल एवढे पाणी मराठवाड्याकरीता सोडण्यात येणार आहे.

सिंचनालाही बसणार फटका

जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा सिंचनाच्या आवर्तनालाही फटका बसणार आहे. पालखेड धरणातूनही ६०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने दिले आहेत. हे पाणी सोडल्यास पालखेडचे सिंचनासाठीचे एक आवर्तनच गमवावे लागणार असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. सर्वाधिक फटका दिंडोरी, निफाडसह चार तालुक्यांमधील द्राक्षबागांना बसणार आहे. पालखेड धरणसमूहातील करंजवण, वाघाड, पुणेगाव, ओझरखेड, पालखेड आणि तिसगाव या धरणांमधून हे पाणी सोडले जाण्याची शक्यता असून, या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. पाणी सोडल्यास डाव्या कालव्यातून होणारे सिंचनाचे एक आवर्तन कमी होणार आहे. त्यामुळे दिंडोरी, निफाड, येवला आणि नांदगाव तालुक्यांतील द्राक्षबागांना त्याची झळ बसण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. गंगापूर धरणातूनही नाशिक आणि निफाड तालुक्यातील काही गावांना सिंचनासाठी पाणी दिले जात असल्याने या सिंचनालाही काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेने मैदानाबाबत फेरविचार करावा

$
0
0

मनमाडमधील पालकांची अपेक्षा

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर पार्किंगचा बोर्ड लावल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी शैक्षणिक वर्तुळातून होत आहे. रेल्वेने या बाबत राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कळवायला हवे होते, असा सूर व्यक्त करीत मैदान मुलांना खेळण्यासाठी राहू द्या अशी मागणी जोर धरत आहे.

विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होण्यासाठी मैदाने आवश्यक असल्याने रेल्वेने याचा गांभीर्याने विचार करावा असे मत पालक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, रेल्वेच्या या पार्किंग झोन संदर्भात संस्था पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा होऊन विचार विनिमय करण्यात आला. रेल्वेने अंधारात ठेवले, फसवणूक केली, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे

शालेय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान रेल्वेने केवळ फलक लावले आहेत. पार्किंगसाठी आवश्यक असलेल्या बाबी अजून पूर्ण केलेल्या नाहीत. मैदानात त्याबाबत हालचाली अद्याप सुरू नाहीत असे संस्था पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यावर पहारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूरसह अन्य धरणांमधून सोमवार (दि. २९)पासून केव्हाही पाणी सोडण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सलग गंगापूर धरण परिसराची पाहणी करणाऱ्या ग्रामीण पोलिसांनी शनिवारी येथे काही कर्मचारी तैनात केले असून, आज, रविवारी (दि. २८) सायंकाळपासून येथे खडा पहारा ठेवण्याचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

जायकवाडीसाठी पाणी सोडण्यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध यंत्रणांच्या समन्वयाची बैठक घेतली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. समन्यायी पाणीवाटपाच्या निकषानुसार जायकवाडी धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचे निर्देश गोदावरी मराठा विकास महामंडळाने दिले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमधून तब्बल ८.९९ टीएमसी पाणी सोडावे लागणार असून, ते सोडण्यास दोन्ही जिल्ह्यांतून तीव्र विरोध होऊ लागला आहे. नाशिक जिल्ह्यात गंगापूर, दारणा आणि पालखेड या तीनही धरण समूहांमधून ३.२४ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. परंतु, जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळसदृश जाहीर झाले असताना आणि अन्य तालुक्यांमध्येही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसताना पाणी सोडण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांसह शेतकरी, तसेच अन्य सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. पाणी सोडल्यास होणाऱ्या परिणामांची जबाबदारी राज्य सरकार आणि प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवारपासून धरणांमधून पाणी सोडणार असल्याचे स्पष्ट केल्याने या विरोधाची धार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

--

वहन मार्गावरही बंदोबस्त

पाणी सोडण्याचा मुद्दा सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असून, जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील पाणी सोडण्याबाबतचे लेखी आदेश अद्याप दिलेले नाहीत. परंतु, रविवारनंतर कधीही जिल्हाधिकाऱ्यांकडून पाणी सोडण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता असून, पोलिसांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. वहन मार्गासह धरण परिसरातही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा गंगापूर धरणाचा परिसर अधिक संवेदनशील असल्याने पोलिस उपअधीक्षक सचिन गोरे यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी शुक्रवारी गंगापूर धरण परिसराला भेट देऊन पाहणी केली. शनिवारी दुपारी पुन्हा ग्रामीण पोलिसांचे पथक गंगापूर धरण परिसरात दाखल झाले. धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार असून, बॅरिकेडिंगचेही नियोजन केले जात आहे. गरज भासल्यास रविवारी सायंकाळपासून बंदोबस्त वाढविण्याचे संकेत पोलिसांकडून दिले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा तहसीलवर मोर्चा

$
0
0

सटाणा : बागलाण तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा, तसेच अन्य मागण्यांसाठी सटाणा येथेही बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार प्रदीप हिले यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी येथील शासकीय विश्रामगृहाच्या पटांगणावर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.त्यानंतर जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे आदीं यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चात अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफूर मलिक शेख, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, यतिन पगार, खेमराज कोर, संजय पवार, विजय वाघ, काकाजी सोनवणे, जिभाऊ खंडू, डॉ. विठ्ठल येवलकर, जनार्दन सोनवणे, सुरेखा बच्छाव, अॅड. रेखा शिंदे, गायत्री कापडणीस, शमा मन्सुरीआदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरट्यांच्या हाती ठोकल्या बेड्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनमाड शहरातनू पाच सराईत मोटारसायकल चोरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १३ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या. गुरुवारी २५ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने मोटारसायकल चोरणारे गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी येवला व मनमाड परिसरात गस्त घालत असताना मनमाड शहरातील काही संशयित बनावट नंबर प्लेट लावून मोटारसायकल वापरत आहेत, अशी गुप्त माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनी मनमाड शहरातून सराईत गुन्हेगार गणेश राजेंद्र खैरनार (वय २७ रा. निंबाळकर चाळ, मनमाड) राजू रमेश सपकाळ (वय २३ रा. विवेकानंदनगर, मनमाड), अमोल पोपट वाघ (वय २५ रा. विवेकानंदनगर, मनमाड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक बनावट नंबरप्लेट असलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. सदर मोटारसायकल या चोरट्यांनी येवला शहरातून चोरल्याची कबुली दिली. सदर आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदार गोरख कदम (वय २२), वाल्मिक भाऊसाहेब पिंपरकर (वय २८ दोघे रा. सोमठाण देश, ता. येवला), रवींद्र उर्फ भैय्या वसंत बेलेकर (रा. विंचुरकरवाडा, विंचुर ता. निफाड) यांच्यासह येवला, मनमाड, लासलगाव, चांदवड, निफाड परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवण पंचायत समिती विभागात द्वितीय

$
0
0

यशवंत पंचायतराज अभियानात उत्कृष्ट कामगिरी

म. टा. वृत्तसेवा, कळवण

यशवंत पंचायतराज अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल कळवण पंचायत समितीने नाशिक विभागात द्वितीय क्रमांक (सन २०१७-१८साठी)पटकावला आहे. आठ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते कळवण पंचायत समितीचे सभापती लालाजी जाधव, उपसभापती विजय शिरसाठ, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ग्रामविकास विभागचे सचिव अश्विन गुप्ता आदी उपस्थित होते.

निवड समितीच्या बैठकीत राज्यस्तरीय पडताळणी समितीकडून प्राप्त झालेल्या अहवालावरून प्रथम, द्वितीय आणि तृतीय जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत यांची निवड करण्यात आली आहे. नाशिक विभागीय पातळीवर राहता पंचायत समिती (प्रथम), कळवण पंचायत समिती (द्वितीय) व शेवगाव पंचायत समिती (तृतीय ) यांना पारितोषिक आणि स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

या अगोदरही कळवण पंचायत समितीला २०१३-२०१४ व २०१४-२०१५ मध्येही राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान अंतर्गत गौरविण्यात आले होते. तर २०१५ मध्ये अनुसूचित जाती जमाती क्षेत्र विभागातून कळवण पंचायत समितीला राज्य सरकारचा द्वितीय तर नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचा व २०१६-१७ मध्ये विभागात दुसरा असे पुरस्कार मिळाले आहेत. सभापती लालाजी जाधव, उपसभापती विजय शिरसाठ, डी. एम. बहिरम, एस. एस. जाधव, नरेंद्र पोतदार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images