म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक मद्याच्या नशेत अंध विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या शासकीय अंधशाळेच्या कनिष्ठ काळजी वाहकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर हा गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. संदीप भिमराव कांबळे (रा. सामाजिक न्याय भवन आवार) असे संशयित काळजीवाहकाचे नाव आहे. गेल्या शनिवारी सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना मारहाणीची घटना घडली होती. सामाजिक न्याय भवन आवारातील शासकीय अंधशाळेत कांबळे काळजीवाहक म्हणून कार्यरत आहे. शिक्षण घेणाऱ्या १४ ते १७ वयोगटातील पाच विद्यार्थ्यांना कांबळेने मद्याच्या नशेत लाकडी बॅट आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. यावेळी संस्थेतील स्वंयपाकी, दुसरे काळजीवाहक, पहारेकरी यांनी कांबळे यास थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो जुमानला नाही. या सर्वांनी प्रयत्नपूर्वक कांबळेला संस्थेच्या बाहेर काढले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी या प्रकरणाविषयी विचारणा केली असता, मुले ऐकत नसल्याने मारहाण केल्याचे उत्तर त्याने वरिष्ठांना दिले. यानंतर सुट्टीचा अर्ज सादर करून तो निघून गेला. या अमानुष मारहाणीची वाच्यता झाल्यानंतर समाज कल्याण विभागाकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या चौकशीत कांबळे विरुद्ध पुरावे समोर आले. त्यानुसार संस्थेच्या अधीक्षका मानसी वाझट यांनी या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी बालकांची काळजी आणि संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत. दरम्यान, संशयित आरोपीस अद्याप अटक झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. असे प्रकार यापूर्वी घडले आहेत काय किंवा नाही, या दृष्टिकोनातून तपास करण्यात येणार असल्याचे संबंधित सूत्रांनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट