Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अवसायक पॅनलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील अवसायनातील संस्थांच्या कामकाजासाठी पॅनल तयार करायचे असून त्यासाठी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्ज करणाऱ्या व्यक्ती न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त विधी अधिकारी, प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट्स, चार्टर्ड अकाउंटन्ट, कॉस्ट अकाउंटन्ट, कंपनी सेक्रेटरी राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, भूविकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी नसलेले सेवानिवृत्त अधिकारी, सहकार विभागातील सेवानिवृत्त वर्ग-१, वर्ग-२ अर्जाचे अधिकारी आणि प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी दर्जाचे कर्मचारी, महसूल विभागातील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी किंवा कंपनी लिक्विडेटर म्हणून कामकाज केलेले अनुभवी व्यक्ती किंवा सहकारी संस्थेच लेखापरिक्षण केल्याच्या १० वर्षांच्या अनुभवी प्रमाणित लेखापरिक्षक असावे.

अर्जदार व्यक्तींवर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत. शासकीय सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी असल्यास त्यांची कोणत्याही प्रकारची खातेनिहाय चौकशी चालू नसावी व सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा. वयोमर्यादा ७० वर्षांपर्यंत असावी. शारीरीक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेटस व चार्टर्ड अकाउंटन्ट, कॉस्टह अकाउंटन्ट, कंपनी सेक्रेटरी यांना सहकारी संस्थेचे कामकाजाचा ५ वर्षांचे अनुभव असणे आवश्यक आहे. तो कोणत्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसावा किंवा कलम ८३ व ८८ च्या चौकशीबाबत जबाबदार नसावा. यातील व्यक्ती कोणत्याही काळ्या यादीमध्ये समाविष्ट नसावी. निवड झालेली व्यक्ती सबंधित विभागाच्या सहनिबंधक, सहकारी संस्था, कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावी. एक व्यक्ती एकावेळी एकाच जिल्ह्यातून अर्ज दाखल करू शकेल.

अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक गृहनिर्माण भवन, ३ रा मजला, गडकरी चौक, नाशिक यांच्या कार्यालयात ३० ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. प्राप्त अर्जाची छाननी १३ नोव्हेंबर रोजी पूर्ण होऊन १७ नोव्हेंबरपर्यंत प्रारुप नामिका प्रसिद्ध केली जाईल. त्यावर हरकती मागवून निर्णय घेण्यात येईल. हरकतीचा निर्णय करून ३० नोव्हेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. याबाबतची जाहीर सूचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, असे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमाडमध्ये भरदिवसा घरफोडी

0
0

दोन लाख लंपास; दोघांपैकी एका चोरट्यास अटक

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथील श्रावस्ती नगर येथे बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा २ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दोघा चोरट्यांपैकी एका चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून, फरार चोराचा पोलिस तपास करीत आहेत. बुधवारी रात्री या बाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनमाड येथील व्यावसायिक नुरुद्दीन भारमल हे बुधवारी कुटुंबियांसह आपल्या दुकानात गेले होते. दुपारनंतर ते घरी आले असता

त्यांच्या बंगल्याचे दाराचे कुलूप तोडलेले आढळून आले. बंगल्यातील कपाट फोडून रोख रक्कम २८ हजार सह सोन्या चांदीचे दागिने असा दोन लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. त्याचवेळी दोन संशयित बंगल्याच्या आवारातून पळून जात असल्याचे त्यांनी पाहिले. भारमल यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र एक जण त्यांच्या तावडीत सापडला व दुसरा निसटला. दरम्यान भारमल यांच्या फिर्यादीवरून मनमाड पोलिसांनी बुधवारी रात्री घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहोपयोगी वस्तूंसाठी झुंबड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला पसंती देण्यात आली. अनेकांनी मोबाइल, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, लॅपटॉप यांसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. शहरातील मुख्य बाजारपेठेसह मॉल्समध्येही ग्राहकांची झुंबड दिसून आली.

दसऱ्याच्या मुहुर्तावर शहरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू व्यावसायिकांनी अनेक ऑफर्स जाहीर केल्या होत्या. या ऑफर्सचा ग्राहकांनी फायदा करून घेतला. यंदा फोरजी मोबाइलला अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मोबाइलच्या किमतीवर डिस्काउंटसह काही ठिकाणी कॅशबॅक ऑफर्सही देण्यात आल्या. सोबतच एलईडी टीव्ही, वॉशिंग मशिन, स्वयंपाकघरातील उपकरणे यांच्या खरेदीला अधिक पसंती होती. ४० टक्के डिस्काउंट, बंपर ऑफर यासह काही दुकानदारांनी स्क्रॅच कार्डचा वापर करत ग्राहकांना आकर्षित केले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांच्या बाहेर होर्डिंग लावत ऑफर्सची जाहिरात करण्यात आली. लॅपटॉप खरेदीवर डिस्काउंटसह काही अॅक्सेसरीज मोफत देण्यात आल्या. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन या वस्तूंवरही ३० ते ४० टक्के डिस्काउंट देण्यात आला. सकाळी १० वाजेपासून शहरातील मेनरोड, गंगापूर रोड, कॉलेज रोड, सातपूर, नाशिकरोड, जेलरोड, पंचवटी या भागातील सर्व बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसून आली.

\Bऑनलाइनला पसंती\B

ई-कॉमर्स कंपन्यांनी ऑफर्स दिल्यामुळे अनेकांनी ऑनलाइन वस्तूखरेदीस पसंती दिली. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक घरांत ऑनलाइन शॉपिंगमधून मागविलेल्या वस्तू पोहोचल्या. अपडेटेड लाइफस्टाइलचा परिणाम सणोत्सवातील खरेदीवर होत असल्याचे यामुळे पुन्हा अधोरेखित झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहृत मुलगा पुण्यात सापडला

0
0

सिडको : बहिणीशी भांडण झाल्यानंतर घरात आपले कोणी ऐकून घेत नाही, असा समज करून अल्पवयीन मुलगा घरातून निघून गेला. मात्र, पोलिसांनी तपास करून त्याला पुण्यात ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी दिली. सावतानगर येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी दिली होती. यात पोलिसांना मिळालेल्या काही माहितीवरून पुणे येथे एक पथक रवाना केले. तेथे शिवाजीनगर येथे हा मुलगा एका हॉस्टेलमध्ये असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन नाशिकला आणले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दसऱ्यानिमित्त मालेगाव, येवल्यात संघाचे संचलन

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव/येवला

विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या निमित्ताने मालेगाव आणि येवल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन केले. ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातून सकाळी सात वाजता पारंपरिक व शिस्तबद्धरीतीने संचलन करण्यात आाले.

शहरातील विविध चौकात रांगोळ्या काढून, झेंडूच्या फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली. नागरिकांनी पथसंचलनाचे स्वागत केले. भारत माता की जय, वंदे मातरम् आदी घोषानांनी परिसर दणाणून गेला. यावेळी संघाचे जिल्हाकार्यवाह सुनील चव्हाण, मालेगाव शहर संघचालक अशोक कांकरिया, कार्यवाह दीपक थोरात, ज्येष्ठ स्वयंसेवक आदींच्या प्रमुख उपस्थितीत पथसंचलन करण्यात आले. मालेगावात पथसंचलन रामसेतू, काकूबाईचा बाग, जगताप गल्ली, सावता चौक, आंबेडकर पूल, किदवाई रोड, पेरी चौक, मुल्लाबाडा, नेहरुचौक, मामलेदार गल्ली, पांचकंदिल, टिळकरोड, तांबाकाटा, किल्ला पोलिस ठाण्यामार्गाने किल्ल्यात पथसंचलनाचा समारोप करण्यात आला.

त्र्यंबकमध्ये पालखी

त्र्यंबकेश्वर : येथे दसरा सण उत्साहात साजरा झाला. त्र्यंबकराजाची पालखी पूर्वपरंपरेने सीमोल्लंघनासानी संस्थानी पद्धतीने मिरविण्यात आली. दुपारी चार वाजेच्या दरम्यान पालखी प्रथम कुशावर्तावर आली. त्यानंतर मेनरोडने नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या जवळ देवस्थानच्या जागेत शमीवृक्षाच्या पुजनासाठी पालखी नेण्यात आली. तेथे सीमोल्लंघन झाले. विश्वस्त तृप्ती धारणे, अॅड. पंकज भूतडा, अॅड. संतोष दिघे, संतोष कदम उपस्थित होते. पालखीसोबत कैलास देशमुख आणि आकाश तुंगार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्संग!

0
0

सकाळी पहिल्या गाडीने नाशिकला जाण्यासाठी निघालो. टू बाय टू एसटी होती. थंडीचे दिवस असल्यामुळे सकाळी काळोखच होता. एसटीतले दिवे चालू होते. एका सीटवर जागा होती तेथे बसलो. माझ्या शेजारचे गृहस्थ खिडकीजवळच्या सीटवर बसलेले होते. आम्ही दोघं एकमेकांचे बहुतेक ओळखीचे नसू. मी जरा संकोचून लहान होऊन बसलो. गृहस्थ लगेच म्हणाले, सरका इकडे. मोकळे बसा. भरपूर जागा आहे. मला हा सन्मान फारच सुखद वाटला. मी माझी हँडबॅग डोक्यावरच्या लगेज कॅरिअरमध्ये ठेवली. घड्याळात वेळ पाहिली व डोळे मिटून बसलो. पाचेक मिनिटांनी गाडी सुरू करण्याचा इशारा म्हणून कंडक्टरने डबल बेल दिली. मी डोळे उघडले. शेजारच्या गृहस्थाने त्यांच्याजवळचे वर्तमानपत्र मला स्वतःहून वाचायला दिले. कोरे करकरीत घडी न मोडलेले ताजे वर्तमानपत्र. मी वाचणारा असल्यामुळे मी न मागता मिळालेले वर्तमानपत्र आनंदाने घेतले व त्याची घडी मोडून वाचायला लागलो. बरचसं चाळून व काहीसं वाचून झाल्यावर दुसऱ्याची वस्तू मागायच्या आत परत करायला पाहिजे याचं दडपण म्हणून मी त्यांना ते देऊ केलं. पण, त्यांनी ते मी निवांतपणे वाचावं असं सांगून घेतलं नाही. मी आता मनमोकळेपणाने वाचू लागलो. अर्ध्या तासानंतर मी त्यांना पुन्हा देऊ केलं व त्यांनी ते घेऊन दुसरं कोरंकरकरीत, घडी न मोडलेलं ताजं वर्तमानपत्र माझ्या हाती सुपूर्द केलं. मी तेही वर्तमानपत्र मोठ्या आनंदानं स्वीकारलं व निःसंकोचपणे वाचू लागलो. वस्तुतः माझ्या बॅगेत वाचण्यासाठी एक पुस्तक मी घेतलेलं होतं. वृत्तपत्रं घरी येत असूनही मी भल्या सकाळी निघाल्यामुळं ती तोपर्यंत घरी पोहोचलेली नव्हती. पण, दरवेळी प्रवासात शक्यतो पुस्तकच ठेवतो. त्या गृहस्थाचं दुसरं वर्तमानपत्र बरचसं वाचून झाल्यामुळे व दडपणामुळं मी त्यांना देऊ केलं. पण, पुन्हा त्यांनी अभय दिलं. मी पुन्हा ते वर्तमानपत्र निवांत वाचून काढलं व त्यांना दिलं. त्यांनी ते घेऊन मला कोरं करकरीत साप्ताहिक वाचायला दिलं.

मी तेही आनंदाने घेऊन वाचू लागलो. महत्त्वाचे लेख भरभर वाचून काढले. कव्हर स्टोरीही वाचून झाली. गुळगुळीत पानांवर छापलेलं ते साप्ताहिक छायाचित्रांनीही व्यापलेलं होतं. मी काही वेळ बारकाईनं चित्रं न्याहाळली. लेखांच्या आशयाला पूरक अशी जुनी छायाचित्रं पाहत असताना तो काळ जागृत होत होता. साप्ताहिक असल्यामुळे माझ्या दोन्ही राशींचं भविष्य वाचून काढलं. एक फारच अनुकूल होतं व दुसरं फारच प्रतिकूल होतं. अनुकूल राशीभविष्याने मी निहायत खूश झालो होतो. त्यात योगायोगाचा भाग म्हणजे आजचा दिवस शुभ. शेजाऱ्याच्या कृपेने धनी व्हाल. न मागता काहीही मिळेल... वगैरे होतं आणि त्याचा साक्षात प्रत्यय येत असल्यामुळे आनंद द्विगुणित झाला होता. त्या आनंदविभोर अवस्थेत मी त्यांना साप्ताहिक परत केले. त्यांनी घेतले. मला देण्यासारखं जे होते ते त्यांनी उदारमनानं दिलं होतं. त्यांचे आभार मानावे असे मनात येऊनही मी मानले नाहीत. कारण, त्यांच्या अकृत्रिम स्नेहाच्या पटलावर कृत्रिमपणाचा ओरखडा उठला असता. त्यांना परिचय तरी कसा विचारावा? त्यांनी आपल्याला ओळखले असेल का, हे तरी कसे जाणून घ्यावे? आपले गप्प राहून त्यांच्या अनवरत स्नेहाचा सुगंध आस्वादत संतुष्ट राहावे, असा शहाणपणाचा निर्णय मी घेतला.

त्यांच्या मालकीची वाचनसामग्री मी उष्टावल्यानंतर ते सद्गृहस्थ वाचत होते. मी व्यवस्थितपणे ती सामग्री हाताळल्यामुळे मला बरे वाटले. त्यांची दोन्ही वर्तमानपत्रे वाचून झाली व त्यांनी घडी घालून आपल्या बॅगेत ठेवली. नंतर ते साप्ताहिक वाचू लागले. गुळगुळीत पानांचे साप्ताहिक वाचताना त्यांनाही माझ्यासारखाच आनंद होत असल्याचं त्यांच्या चर्येवरून मला ताडता आलं. त्यांनीही छायाचित्रं बारकाईने पाहिली. शेवटी त्यांनीही राशीभविष्य वाचलं. दोन राशींचं वाचलं, की नाही ते मला सांगता येणार नाही. पण, त्यांचा चेहरा उजळून निघाला होता. त्यांच्या राशीने बहुधा जे भविष्यकथन केलं असेल ते असं असावं. आजचा दिवस परोपकारात जाईल. शेजाऱ्यांना उपकृत कराल. पुण्यसंचय होईल, वगैरे.

साप्ताहिकही त्यांनी आपल्या बॅगेत ठेवलं व प्लास्टिकची एक पिशवी काढली. तिच्यात भाजलेल्या शेंगा होत्या. भरीव मूठभर शेंगा प्रथम मला दिल्या व खा म्हटले. थांबा असं म्हणून मला पुन्हा एक वर्तमानपत्र दिलं व एक त्यांनी ठेवून टरफलं पेपरवर ठेवा म्हणाले. आम्ही दोघं शेंगा खात राहिलो. दरम्यान, त्यांनी गूळही दिला. शेंगा खाऊन झाल्यावर त्याच प्लास्टिकच्या पिशवीत टरफलं भरली व ती आपल्या बॅगेत ठेवली. वर्तमानपत्रंही खिडकीबाहेर झटकून बॅगेत ठेवली. पाण्याची बाटली काढली व मला प्रथम पाणी प्यायला दिलं. मग ते प्यायले.

त्यांच्याबद्दल काय विचारावं या विवंचनेत असताना ते म्हणाले, आज एकादशी आहे. वद्य एकादशी. मी दर वद्य एकादशीला त्र्यंबकला जाऊन निवृत्तिनाथांचं दर्शन घेतो. नाशिकपासून पायी जातो. शुद्ध एकादशीला देवाची वारी असते. दर पंधरवड्याला पंढरीला जाणं शक्य होत नाही. पण, आषाढी-कार्तिकीला जातो. वद्य एकादशीची वारी ही संतदर्शनाची वारी असते. गेली अनेक वर्षे माझा हा नित्यनेम आहे. मी त्र्यंबकला मुक्काम करतो. हरिकीर्तन ऐकतो. दुसऱ्या दिवशी द्वादशीचं पारणं सोडून मग एसटीने त्र्यंबकहून घरी पोचतो.

ऐसी कळवळ्याची जाती! करी लाभावीण प्रीती असा संतमार्ग अनुसरणाऱ्या त्या सत्पुरुषाचा सहवास व दर्शनाने माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले.

लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिस्तबद्धतेस सिडकोत दाद

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमीनिमित्त दर वर्षीप्रमाणे यंदाही सिडको आणि इंदिरानगर परिसरातून शिस्तबद्ध संचलन करण्यात आले.

सिडको परिसरातून दीडशेहून अधिक स्वयंसेवकांच्या उपस्थितीत निघालेले हे संचलन पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती. शिस्तबद्धपणे निघालेल्या या संचलनाच्या पुढे घोषातील स्वयंसेवक सर्वांचेच आकर्षण ठरले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दर वर्षी सिडको आणि इंदिरानगर भागातून सकाळी संचलन काढण्यात येते. गणेश चौकापासून सुरू झालेले हे संचलन पेलिकन पार्कची मागील बाजू, हनुमान चौक, राणाप्रताप चौक, शिवाजी चौक, वंदे मातरम् चौकातून पुन्हा गणेश चौक येथे आले. सुमारे तासभर सुरू असलेल्या या संचलनात सुरुवातीला ढोल पथकांसह घोषपथक सहभागी झाले होते. संचलनाच्या समारोपप्रसंगी बांधकाम व्यावसायिक अनिल करकरे, जिल्हा सहकार्यवाह सुबोध कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

संचलनात भारत माता की जय, हिंदू धर्म की जय यांसारख्या घोषणा देत घोड्यावर विराजमान होऊन हातात भगवा झेंडा घेतलेले स्वयंसेवक सहभागी झाले होते. चौकाचौकांत हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. महेंद्र चित्ते, विजय शिरोडे, अंकुश बर्शिले, मंगेश आंदोरे, भूषण जोशी आदींनी संयोजन केले. नियामक म्हणून राजेंद्र गिते, अनिल चांदवडकर, सुधाकर चौधरी यांनी काम पाहिले. या संचलनात प्रदीप पेशकार, दिलीप देवांग, शेखर आफळे, बन्सी आंदोरे, विजय काळोखे, अशोक कुलकर्णी, भीमराव गारे यांच्यासह परिसरातील स्वयंसेवक सहभागी झाले होते. विशाल मिस्त्री यांनी सूत्रसंचालन केले.

--

इंदिरानगर भागात उत्साह

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इंदिरानगर गटाच्या वतीने पाथर्डी फाटा परिसरातून संचलन करण्यात आले. हे संचलन आर. के. लॉन्स येथून सुरू करण्यात येऊन प्रशांतनगर, विक्रीकर भवन, नरहरीनगर, म्हाडा कॉलनी, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर या मार्गाने नेण्यात आले. या संचलनात गटातील सुमारे २१२ स्वयंसेवक सहभागी झाले होते. मंगेश खाडिलकर, अविनाश भावसार, सुनील नांदेडकर, अभिषेक चिखले, आशुतोष देशपांडे आदी उपस्थित होते.

००००

नाशिकरोड सदंड संचलन

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड येथे विजयादशमीनिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे गुरुवारी सकाळी सदंड संचलन करण्यात आले. संघाचा गणवेश, पुढे घोषपथक, त्यापुढे भारतमातेची प्रतिमा ठेवलेली जीप आणि ध्वज हातात घेतलेला घोडेस्वार हे येथील संचलनाचे वैशिष्ट्य होते.

संघाच्या स्थापनेपासून नाशिकरोडला संघातर्फे विजयादशमीला संचालन होते. नाशिकरोड येथील कदम लॉन्स येथे सकाळी सात वाजता ध्वजवंदन झाल्यानंतर संचलनास प्रारंभ झाला. जिल्हा संघचालक विजयराम कदम, नाशिकरोडचे गटप्रमुख गजानन देशपांडे, सहगटप्रमुख दीपक साबळे, संचालन मुख्य शिक्षक राम कदम, घोष पथकप्रमुख सर्वेष झोडगेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. १८० स्वयंसेवक आणि घोष पथकातील ३५ सदस्य यात सहभागी झाले होते.

--

युवकांचा लक्षणीय सहभाग

नाशिकरोड, जेलरोड, उपनगर, एकलहरे, देवळाली कॅम्प, भगूर येथून स्वयंसेवक या संचलनात सहभागी झाले होते. त्यामध्ये युवकांचे प्रमाण लक्षणीय होते. कदम लॉन्स येथून संचलन सुरू झाल्यानंतर तरणतलाव, डावखरवाडी, कदम मळा, जय भवानीरोड, औटे मळामार्गे पुन्हा कदम लॉन्स येथे ते आले. तेथे ध्वज खाली उतरविण्यात आल्यानंतर विसर्जन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रे विद्यालयाची मुले खेळणार विभागाच्या संघात

0
0

वेटलिफ्टिंग स्पर्धेतून १७ खेळाडूंची निवड

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व छत्रे विद्यालय मनमाड आयोजित नाशिक विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे जय भवानी व्यायामशाळा येथे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील १७ व १९ वर्ष आतील मुले व मुलींनी सहभागी होत चुरस निर्माण केली.

स्पर्धेचे उद्घाटन श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिनेश धारवाडकर, संचालक प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापिका के. एस. लांबोळे, उपमुख्याध्यापक आर. एन. थोरात, पर्यवेक्षक एस. व्ही. देशपांडे, स्पर्धा प्रमुख प्रवीण व्यवहारे, एनआयएस प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांनी केले. गतवर्षी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांना या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

छत्रे विद्यालय व जयभावानी व्यायामशाळेच्या १७ खेळाडूंची बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी नाशिक विभागाच्या संघात निवड करण्यात आली आहे.

दिया किशोर व्यवहारे, अमृता भाऊसाहेब शिंदे, वैष्णवी वाल्मिक इप्पर, धनश्री विनोद बेदाडे, वैष्णवी जनार्दन उगले, रुषाली सुनील शेळके, संजना राजू भदाणे, खुशाली निवृत्ती गांगुर्डे, अनामिका मच्छिंद्र शिंदे, धनश्री नितीन पवार, पूजा मनसुब कुणगर, प्रतीक्षा राजेंद्र कुऱ्हाडे, केतकी अनिल माळी, करुणा रमेश गाढे या मुलींची तर मुलांमध्ये मुकुंद संतोष आहेर, अकिफ नाविद शेख, रोहन विजय पंदरकर या खेळाडूंची बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

संध्या भास्कर सरोदे, साहिल प्रशांत गायकवाड, भारत भाऊसाहेब कांगणे, राहूल दत्तात्रय भोजने, अथर्व किरण माने यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेचे आयोजन क्रीडा शिक्षक हरीश चंद्रात्रे, एनआयएस प्रशिक्षक तृप्ती पाराशर, पवन निरभवणे, पंकज त्रिवेदी, समीर कुणगर,ललित सांगळे,सुनील कांगणे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शिक्षणा’साठी गवसला मुहूर्त

0
0

समिती सदस्य नियुक्तीसाठी २६ रोजी विशेष महासभा; वृक्षप्राधिकरण समितीवरही सात सदस्य जाणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण मंडळ गठीत करण्याचे प्रयत्न फसल्यानंतर दीड वर्षानंतर भाजपला शिक्षण समिती स्थापनेसाठीचा मुहूर्त सापडला आहे. सोबतच वृक्षप्राधिकरण समितीच्या सदस्य नियुक्तीसाठी २६ ऑक्टोबरला विशेष महासभा होणार आहे. शिक्षण समितीवर नऊ तर वृक्षप्राधिकरण समितीवर सात सदस्यांची नियुक्ती होणार आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत असल्याने या दोन्ही समित्यांवर भाजपचेच वर्चस्व राहणार आहे. सोबतच संख्याबळानुसार शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेलाही प्रतिनिधित्व मिळणार आहे.

महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपने नगरसेवकांवर पदांची खैरात करण्यासाठी विधी, शहर सुधारण आणि आरोग्य अशा तीन समित्यांची घोषणा केली होती. तर, राज्यभरातील महापालिका क्षेत्रांतील शिक्षण मंडळ बरखास्त करण्याच्या शासनाच्या निर्णयानंतर भाजपने शिक्षण समितीऐवजी शिक्षण मंडळाचा हट्ट धरला. महापालिकेच्या विविध समित्यांमध्ये नगरसेवकांची वर्णी लावल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना मंडळावर नियुक्तीचा पक्षाचा प्रयत्न होता. सरकारने अन्य समित्यांप्रमाणेच शिक्षण समिती गठीत करण्याचे निर्देश महापालिकेला दिले असतांना सत्ताधाऱ्यांनी सरकारकडे पुन्हा शिक्षण मंडळ स्थापण्याच्या आग्रह कायम ठेवला. शिक्षण मंडळ स्थापनेसाठी महासभेत ठराव संमत करून तो शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला. मात्र, महासभेच्या या ठरावाला सरकारने केराची टोपली दाखवत शिक्षण समिती संदर्भात केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यामुळे शिक्षण मंडळ गठणाचे सत्ताधाऱ्यांचे स्वप्न भंगले. यासंदर्भातील शासनाच्या नगरविकास विभागाचे आदेश प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर चार महिन्यांपूर्वी नगरसचिव विभागाकडून महापौरांना शिक्षण समिती गठणाचे पत्र पाठविण्यात आले होते. मात्र, कार्यकर्त्यांसाठी मंडळांसाठी आग्रहावर ठाम राहिलेत. परंतु, आता मंडळावर प्रशासनानेच फुली मारल्याने अखेर सत्ताधाऱ्यांनी शिक्षण समिती गठीत करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी येत्या २६ ऑक्टोबरला विशेष महासभा होणार असून त्यात शिक्षण समितीसाठी पक्षीय बलानुसार नऊ सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

वृक्षप्राधिकरण सदस्य निवड

वृक्षप्राधिकरण समितीतील सदस्यांच्या अहर्तेचा वाद उच्च न्यायालयात पोहचल्यानंतर न्यायालयाने महापालिकेने गठीत केलेली वृक्षप्राधिकरण समिती बेकायदा ठरवित नव्याने समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. परंतु, सत्तारुढ भाजपने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या सदस्यांच्या नियुक्तीकडेही दुर्लक्ष केले. वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने या समितीअभावी अनेक महत्त्वपूर्ण प्रस्ताव प्रलंबित राहिले. या समित्यांचे गठण केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर सत्तारूढ भाजपला उशिरा का होईना, जाग आली असून या समितीच्या सदस्यांची निवडही शिक्षण समितीसोबतच केली जाणार आहे.

भाजपचा दबदबा

शिक्षण समितीवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ३१ (अ) मधील तरतुदीनुसार महापालिकेतील राजकीय पक्ष किंवा गटांच्या संख्याबळाच्या प्रमाणात नऊ जणांना प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. त्यानुसार शिक्षण समितीवर सत्तारूढ भाजपचे पाच, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेने तीन तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ समसमान असल्याने या दोन्ही पक्षांपैकी एकाचा एक सदस्य या समितीवर जाईल. त्यामुळे शिक्षण समितीवर वर्चस्व हे भाजपचेच राहणार हे स्पष्ट आहे. वृक्षप्राधिकरण समितीच्या सात पैकी भाजपचे चार, शिवसेनेचे दोन सदस्य जातील. उर्वरित एक सदस्य काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यापैकी एकाचा असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजच्या महासभेत प्रशासनाची कसोटी

0
0

शिवसेनेच्या पाठबळाने भाजपची व्यूहरचना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील स्वाईन फ्लू, डेंग्यूसह साथीच्या आजारांवर उपाययोजना करण्यात प्रशासनाला आलेले अपयश, अंगणवाडी सेविकांचा ठराव, नगरसेवक निधी, अधिकाऱ्यांची चौकशी आणि कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानावरून शुक्रवारची (दि. १९) महासभा वादळी होणार आहे. शिवसेनेने साथीच्या आजारांवर लक्षवेधीच सादर केली असून या लक्षवेधीच्या माध्यमातून प्रशासनावर सत्ताधाऱ्यांकडून हल्लाबोल केला जाणार आहे. त्यामुळे आजच्या महासभेत प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महासभा होत आहे. यात अंगणवाडी सेविकांना मुदतवाढ, अधिकाऱ्यांची चौकशी विषय चर्चेला ठेवण्यात आले आहेत. परंतु, शहरात पसरलेल्या साथीच्या आजारांवर शिवसेनेकडून लक्षवेधी देण्यात आली आहे. भाजपच्या बैठकीत साथीच्या आजारांसह अधिकाऱ्यांची चौकशी, अंगणवाडी सेविकांच्या ठरावाकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष, कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा केलेला ठराव, नगरसेवक निधीतील अडचणी यावर आक्रमक होण्याचे आदेश शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांनी नगरसेवकांना दिले आहे. त्यामुळे या महासभेतही भाजप विरुद्ध मुंढे असा सामना पहायला मिळणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून वॉक विथ कमिशनर उपक्रम सुरू करण्यात आला असून यावरही सत्ताधारी भाजपला आक्षेप आहे. आयुक्तांना उत्तर देण्यासाठी महापौरांनी प्रभाग दौरे सुरू केले असून त्यात नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला आहे. त्यामुळे या दौऱ्यांवरूनही महापौरांसह नगरसेवक प्रशासनाला जाब विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारची महासभा ही प्रशासनासह आयुक्त मुंढे यांच्यासाठी कसोटी ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेंढगिरी अहवालाच्या वैधतेवर प्रश्न

0
0

आमदार फरांदेंनी ठेवले त्रुटींवर बोट

अहवालातील दुरुस्तीशिवाय पाणी सोडण्यास विरोध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडीला नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्याविरोधात भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आक्रमक भूमिका घेत, मेंढगिरी अहवालाच्या वैधतेवरच प्रश्न उपस्थित केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सचिवाकडे त्यांनी आक्षेप नोंदवित नाशिकच्या पाणीप्रश्न आणि वापराकडे या समितीने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

मेंढगिरी अहवालातच दर पाच वर्षांनी पाणी सोडण्यासंदर्भातील नियमांचा अभ्यास करण्याची तरतूद आहे. त्यामुळे या अहवालाची मुदतच आता संपली आहे. त्यामुळे उर्ध्व भागाताली प्रकल्पांचे फेरनियोजन करून तशा दुरुस्त्या केल्याशिवाय पाणी धरणांमधून पाणी सोडू नये, अशी मागणी आमदार फरांदे यांनी केली आहे.

गंगापूरच्या उपयुक्त व मृत साठ्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. तसेच या प्रकल्पावर औष्णिक प्रकल्पासह औद्योगिक कंपन्या आणि शेतीही अवलंबून आहे. आळंदी धरणाचा चुकीच्या पद्धतीने दारणात समावेश केला आहे. पाणी सोडल्याने बाष्पीभवन होत असल्याने राष्ट्रीय संपत्तीचा नाश होत आहे. गरजेव्यतिरिक्त पाणी सोडण्यासंदर्भात राष्ट्रीय संपत्तीचा ऱ्हास होणार नाही, याबाबत काळजी घेण्याचे मत उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. त्यामुळे मेंढगिरी अहवालातील त्रुटी सर्वप्रथम सोडविणे गरजेचे आहे. या अहवालावर दर पाच वर्षांनी नियमांचा आढावा घेण्याचेही निर्देश दिले आहेत. मेंढगिरी अहवाल २०१३ पासून लागू झाला आहे. त्यामुळे आता या अहवालाची वैधताच संपुष्टात आली असून सर्वप्रथम या अहवालाच्या नियमांचा आढावा घेण्याची गरज आहे. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातील उर्ध्व धरणांमधल्या पाण्याचे फेरनियोजन करून तशा दुरुस्त्या मेंढगिरी अहवालात करणे अपेक्षित आहे. या दुरुस्त्या केल्याशिवाय पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी आमदार फरांदे यांनी जलसंपदा मंत्री व प्राधिकरणाच्या सचिवांकडे केली आहे. त्यांच्या या आक्षेपामुळे आता प्राधिकरणाचीच अडचण होणार असून त्याला उत्तर दिल्याशिवाय पाणी सोडता येणार नसल्याचे चित्र आहे.

प्रकल्पांची फोड करावी

मेंढगिरी अहवालात गंगापूर प्रकल्प समूह, दारणा प्रकल्प समूह, प्रवरा प्रकल्प समूह, पालखेड प्रकल्प समूह असे समूह करून पाण्याचा हिशेब धरला आहे. प्रत्येक जलाशयाचा पाणी वापर वेगवेगळा आहे. प्रकल्प समूह केल्याने खरीप हंगामात एखाद्या प्रकल्पाच्या कालव्यांना खरिपात पाणी दिलेले असल्यास त्याची विभागणी समूहातील इतर प्रकल्पांवरही करण्यात येते. त्यामुळे प्रकल्पाच्या लाभधारकावर अन्याय होते. त्यामुळे प्रकल्पांचा समूह न करता पाणी वापरात स्वतंत्र प्रकल्प अशी व्याख्या करून त्यात बदल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघटना हे एकच साधन...

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्षभरातील प्रमुख उत्सवांपैकी एक असणाऱ्या विजयादशमीचा उत्सव शहरातील संघ शाखांमध्ये उत्साहात पार पडला. 'मनामनातील दुवा साधण्या, संघटना हे एकच साधन...' संघगीतातील हा संदेश देत शहरातील विविध भागातून संचलन काढण्यात आले.

नाशिक शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने महानगरात एकूण सहा गटांमध्ये विविध भागांमधून स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध संचलन करीत नागरिकांचे लक्ष वेधले. शिस्तबद्ध नियोजन, संचलनातील अचूकता, घोषवाद्याचा निनाद आणि जागोजागी स्वयंसेवकांचे फुलांच्या पाकळ्या, रांगोळ्यांनी होणारे स्वागत अशा वातावरणात विजयादशमीचे संचलन शहरात पार पडले. सहा भागांमधून सुमारे दीड हजारावर संघ स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग घेतला. नाशिकच्या मध्यवर्ती भोसला भागाचे संचलन गुरुवारी दुपारी कॅनडा कॉर्नर येथील डोंगरे वसतिगृह मैदानापासून निघाले. या संचलनात प्रमुख निमंत्रित म्हणून कर्करोगतज्ज्ञ डॉ. राज नगरकर उपस्थित होते. पंचवटी गटाच्या संचलनास गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास भद्रकाली मंदिरासमोरून प्रारंभ झाला. यात निमंत्रित म्हणून उद्योजक शेखर औरंगाबादकर उपस्थित होते. नाशिकरोड गटाचे संचलन मुक्तिधामच्या मागील कदम लॉन्सपासून निघाले. या संचलनास मार्गदर्शक म्हणून शहर संघचालक विजयराम कदम यांची उपस्थित होती. सिडको भागाच्या संचलनास गणेश चौकापासून सुरुवात झाली. त्यासाठी विकसक अनिल करकरे हे प्रमुख निमंत्रित म्हणून उपस्थित होते. इंदिरानगर गटाचे संचलन पाथर्डी फाटा परिसरातील आर. के. लॉन्सजवळून निघाले. येथे डॉ. सागर मंडलिक उपस्थित होते. आडगाव गटाचे संचलन दिंडोरीरोडवरील जिजामाता उद्यानापासून काढण्यात आले. येथे निमंत्रित मान्यवर म्हणून अरुण तुसे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जय श्रीरामच्या घोषात रावणदहन!

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

'जय श्रीराम', 'पवनपुत्र हनुमान की जय'च्या घोषात नाशिक-पुणे मार्गावरील गांधीनगर येथे आज सायंकाळी हजारो भक्तांच्या साक्षीने रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी फटाक्यांच्या नयनरम्य आतषबाजीने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. कार्यक्रमानंतर नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक प्रचंड गर्दीमुळे विस्कळीत झाली होती. गांधीगर रामलीला मैदानावर गेल्या ६३ वर्षांपासून दसऱ्याला रावण दहन केले जाते. यंदा तब्बल ६५ फुटी रावणाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.

पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, समितीचे अध्यक्ष कपिल शर्मा, पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, गांधीनगर प्रेस वरिष्ठ अधिकारी लक्ष्मीकांत पात्रे, अरविंद चौदा, गुरदयाल वर्मा, नगरसेवक अनिल ताजनपुरे, सुषमा पगारे आदी उपस्थित होते. नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक सुरळीत रहावी यासाठी वाहतूक पोलिस तसेच बंदोबस्तासाठी नाशिकरोड, उपनगरच्या पोलिसांची मदत घेण्यात आली होती. अग्निशमन दल, स्वयंसेवकही मदतीला होते. सुतळी, काथ्या, ओला व सुका बांबू, खिळे,कामट्या, घोटीव कागद, कपडा यांचा वापर करुन रावणाचा पुतळा तयार करण्यात आला होता. क्रेनच्या सहाय्याने तो उभा करण्यात आला. समितीचे कार्यकर्ते रमाकांत वाघमारे, मुश्ताक तडवी, सुनील मोदियानी, प्रीतेश खालकर, तस्लिम पठाण आदी कलावंतानी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडावर रावणदहन

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रावणाची उभारण्यात आलेली ४० फुटांची प्रतिकात्मक मूर्ती, फटाक्यांची आतषबाजी, विजदशमीच्या सायंकाळी रामकुंड परिसरात जमलेला जन समुदायाच्या उपस्थितीत 'सियावर रामचंद्र की जय' अशा घोषात दृष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याचा संदेश देत रामकुंडावर सालाबादप्रमाणे रावणदहन करण्यात आले. चतु:संप्रदाय आखाडा ट्रस्टतर्फे झालेल्या रावणदहन कार्यक्रमात पंचवटी परिसरातून श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान, वानरसेना, रावण, कुंभकर्ण, बिभीषण आणि राक्षस सेना यांची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक रामकुंड परिसरात आल्यानंतर वानरसेना व राक्षस सेना यांचे युद्ध बघायला मिळाले. नयनरम्य आतषबाजीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. होळकर पूल, रामकुंड पार्किंग, रामकुंड परिसर, गांधी तलाव परिसर जनसमुदायाने फुलून गेला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवविवाहितेची ढकांबेत आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील ढेकांबे येथील १९ वर्षांच्या नवविवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेनंतर माहेरच्या मंडळींनी सासरच्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत मृतदेह घेण्यास नकार दिल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

सोनाली गोकुळ बोडके (१९ रा. ढेकांबे, ता. दिंडोरी) असे या विवाहितेचे नाव आहे. सोनालीने आपल्या घरी गुरुवारी (दि. १८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. ही घटना लक्षात येताच पती गोकुळ बोडके यांनी तिला तात्काळ सिव्हिलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. सोनालीच्या आत्महत्येचे वृत्त समजताच माहेरकडील मंडळींनी सिव्हिलमध्ये धाव घेतली. सोनालीचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेला असतांना तिने आत्महत्या कशी केली, असा जाब विचारत बोडके कुटुंबीयांना धारेवर धरले. यामुळे सिव्हिल आवारात काही काळ तणाव निर्माण झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली. माहेरच्यांनी आरोपींना अटक करावी, अशी मागणी लावून धरल्याने पोलिसांचा अतिरिक्त ताफा मागविण्यात आला होता. दरम्यान, नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी दिडोंरी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजारात तेजीचा बहर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर रिअल इस्टेटमध्ये गुरुवारी १०० कोटींहून अधिक उलाढाल झाली असून, २०० ते ३०० फ्लॅटची विक्री झाल्याचा अंदाज क्रेडाईने व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे रिअल इस्टेटमध्ये मंदीचे सावट होते. पण, फेस्टिवल सिझनमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होणाऱ्या दसऱ्याने बांधकाम व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. या उलाढालीमुळे रिअल इस्टेला बूस्ट मिळाला असून, दिवाळीपर्यंत मोठ्या प्रमाणात उलाढाल होण्याची शक्यताही बांधकाम व्यावसायिकांनी वर्तवली आहे. रिअल इस्टेटबरोबरच वाहन विक्री व फर्निचरसह इतर वस्तूंची विक्री जोरात होती.

केंद्र सरकारने घर खरेदीसाठी दिलेली योजना, विविध बँकांचे सहज उपलब्ध होणारे कर्ज याचाही ग्राहकांनी लाभ घेतला आहे. घरांमध्ये तयार फ्लॅटला जास्त मागणी असल्याचे पुढे आले आहे. त्याचप्रमाणे अॅफोर्डेबल फ्लॅटकडेही ग्राहकांचा मोठा कल होता. रिअल इस्टेटबरोबरच वाहनविक्रीतही कोट्यवधींची उलाढाल झाली. या मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात वाहन विक्री होत असते. बाजारात दुचाकी, चारचाकी वाहनांची विविध मॉडेल्स बाजारात आल्यामुळे ग्राहकांनी अगोदरच बुकिंग केली होती. त्यामुळे दसऱ्याला वाहनांच्या शोरुममध्ये गाडी घेण्यासाठी गर्दी होती. मोठ्या उत्साहाने आलेल्या ग्राहकांनी आपल्या नव्या वाहनांबरोबर सेल्फी काढत हा फोटोही शेअर केला. लोन देण्याची सुविधा असल्यामुळे ग्राहकांनी त्याचाही फायदा घेतला. फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाइलसह घरगुती वस्तूंचा बाजारही तेजीत होता. जास्त किमतीच्या फर्निचरसाठी कर्जसुविधाही विक्रेत्यांनी उपलब्ध करुन दिल्यामुळे ग्राहकांना खरेदी करणेही सोपे झाल्याचे चित्र होते. राज्यात दुष्काळाचे सावट असल्यामुळे बाजारपेठेवर त्याचा परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, विजयादशमीच्या दिवशी झालेल्या उलाढालीमुळे बाजारपेठेला झळाळी मिळाली आहे. कापड खरेदी व विविध वस्तूंच्या दुकानातही दिवसभर गर्दी होती.

रिअल इस्टेटमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर १०० कोटींच्या आसपास उलाढाल झाली आहे. २०० ते ३०० फ्लॅटची विक्री झाली असून दिवाळीपर्यंत त्यात मोठी वाढ होईल. तयार असलेल्या फ्लॅटला मोठी मागणी असून, परवडणारी घरे घेण्याकडेही कल आहे.

- उमेश वानखेडे, अध्यक्ष, क्रेडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फराळाच्या नवे पदार्थ शिकण्याची संधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीच्या फराळातली नेहमीची चव चाखून कंटाळला असाल. यंदाच्या फराळात नव्या चवीचे नवे पदार्थ बनवून नातेवाइक अन् आप्तेष्टांची मने जिंका. नव्या पद्धतीच्या फराळाच्या रेसिपी शिकण्यासाठी सहभागी व्हा, महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आयोजित 'फराळ उत्सव'मध्ये.

शनिवारी (२० ऑक्टोबर) मटा कल्चर क्लबतर्फे फराळ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इंदिरानगर परिसरातील अजय मित्र मंडळ हॉलमध्ये दुपारी १ ते ४ या वेळेत हा उत्सव होणार आहे. यंदाच्या दिवाळीत नेहमीच्या पदार्थांपेक्षा नव्या पद्धतीचा फराळ तयार व्हावा. चोखंदळ व्यक्तींना फराळाची नवी चव चाखता यावी, या हेतूने हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये फराळ आणि मिठाईच्या नव्या रेसिपी शिकविल्या जाणार आहेत. फराळातील सर्वांच्या आवडीच्या शेव या पदार्थाचे चीज शेव, पालक पुदीना शेव, टोमॅटो शेव हे नवे प्रकार शिकविले जातील. भाजणीच्या चकलीसह चॉकलेट पेढा, ड्रायफ्रूट चॉकलेट फज, अफगाणी व्हेज बेक डिसर्टचा बकलावा आणि केसर मिल्क बर्फी या मिठाईच्या रेसिपी उत्सवात शिकविण्यात येणार आहेत. शेफ विवेक सोहनी उत्सवात सहभागी होणाऱ्यांना प्रात्यक्षिकांसह या सर्व पदार्थांच्या रेसिपी शिकविणार आहेत. सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून, कल्चर क्लब सभासदांसाठी १०० तर इतरांसाठी ४०० रुपये शुल्क असणार आहे. नावनोंदणीसाठी महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड येथे दुपारी ११ ते ६ या वेळेत संपर्क साधू शकतात किंवा ०२५३-६६३७९८७, ९४२२५१३५६९ या क्रमांकावर फोन करू शकतात.

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

वेबसाइट - www.mtcultureclub.com

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

ट्विटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपअभियंता मगर यांचा देयकावरून राजीनामा?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या संगणक विभाग प्रमुख पदावरून स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला असतांनाच उपअभियंता प्रशांत मगर यांनी नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या चीफ नॉलेज ऑफिसर या अतिरिक्त पदाचाही राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मगर यांच्या राजीनामा देण्यामागे केपीएमजी या सल्लागार कंपनीला देयके अदा करण्याचा वाद कारणीभूत असल्याची चर्चा दबक्‍या आवाजात पालिका वर्तुळात सुरू आहे.

केपीएमजी कंपनीकडून संचालकांच्या परदेशवाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात मेहरबानी केली जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. स्मार्ट सिटी कंपनीचे चीफ नॉलेज ऑफिसर हे पद रिक्त असून त्याचा अतिरिक्त कार्यभार हा मगर यांच्याकडे आहे. स्मार्ट सिटीसाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या केपीएमजी कंपनीमार्फत संगणक विभागाशी संबंधित काही कामांचे देयके सादर करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मंगळवारच्या बैठकीत या देयकांवर स्वाक्षरी करण्यावरून वाद झाल्याची चर्चा असून ती देयके अदा करण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात आहे. त्यातूनच मगर यांनी राजीनामा देऊन सुटका करून घेतल्याची चर्चा रंगली आहे. अन्य अधिकाऱ्यांनीही या देयकाला विरोध केल्याचे समजते. मगर यांनी गेल्या आठवड्यात स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला आहे. मात्र, महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या कामकाजाची व्याप्ती लक्षात घेता चीफ नॉलेज ऑफिसर पदासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याचा उल्लेख मगर यांनी राजीनाम्यात केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साईभक्तांवर काळाचा घाला

0
0

पाथरे शिवारात अपघातात दोन महिला ठार, तीन जखमी

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर-शिर्डी मार्गावर पाथरे शिवारातील खंडोबा मंदिराजवळील वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात

दोन महिला भाविक ठार झाल्या. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मुलूंड वेस्ट येथील भाविक शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना त्यांच्यावर दसऱ्याच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

भावना वधाणी आणि परिता मोदी असे अपघातातील मृत महिलांची नावे आहेत. केवीन मोदी, अनुप पांडे आणि भावील वधाणी हे तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर शिर्डी येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

हे सर्व भाविक मालाड वेस्ट येथून फॉर्च्यनर कारने (एमएच ४८, एसी ६९९७) शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. पाथरे शिवारातील खंडोबा मंदिराजवळील वळणावर चालकाकडून कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या खाली नाल्यात सुमारे ३ ते ४ वेळी उलटली. स्थानिकांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली. या अपघातात एका महिलेचा जागेवरच तर दुसऱ्या महिलेचा शिर्डी येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. वावी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा ‘वेद’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वयाच्या नवव्या वर्षी मराठी सिनेसृष्टीतल्या करिअरची स्वप्ने 'तो' रंगवू लागला आहे.. अभिनयाच्या आकर्षणातून अन् कला क्षेत्राच्या आवडीतून बालकलाकाराची व्यक्तिरेखा 'तो' अप्रतिम साकारतोय.. सर्वगुणसंपन्न अभियन करीत दिग्गजांची दाद त्याला मिळू लागली आहे..

करिअर म्हणून विचार करताना सिव्हिल इंजिनीअरिंग करीत मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी 'त्याने' आतापासूनच तयारी सुरू केली आहे. लवकरच एका मराठी सिनेमाच्या माध्यमातून 'तो' सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.. ही कथा आहे, नाशिकच्या वेद पिळोदेकर या बालकलाकाराची!

मराठी सिनेसृष्टीत नाशिकच्या कलाकारांची संख्या लक्षवेधी आहे. अभिनयाच्या क्षेत्रात नाशिकचा मानाचा तुरा कायम फडकतो आहे. यामध्ये वेद पिळोदेकर या नव्या बालकलाकार शिलेदाराचा समावेश झाला आहे. अशोका युनिव्हर्सल स्कूलमध्ये इयत्ता चौथीचे शिक्षण वेद घेत आहे. शाळेतल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होत असताना अभिनयाची आवड वेदमध्ये निर्माण झाली. या आवडीतून वेदने एका म्युझिक सीरिजमध्ये अभिनय केला. त्यानंतर मराठी सिनेमासाठी वेदने पहिल्यांदा ऑडिशन दिली. या ऑडिशनमधून त्याला एका मोठ्या मराठी सिनेमासाठी निवडण्यात आले. या मराठी सिनेमाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. चित्रपटातील प्रमुख नायक व नायिकेच्या मुलाची भूमिका वेद साकारतो आहे. या चित्रपटात अभिनेते नागेश भोसले, समीर धर्माधिकारी, गिरीश परदेशी यांच्यासह अभिनेत्री सागरिका घाटगे, विद्या माळवदे, स्मिता गोंदकर यांच्यासोबत काम करण्याची संधी वेदला मिळतेय.

वेदचे वडील सुनील पिळोदेकर हे बांधकाम व्यावसायिक असून, त्याच्या अभिनयाबाबत बोलताना ते सांगतात, की वेदमध्ये अभिनयाचा स्पार्क जाणवत होता. त्यादृष्टीने त्याला अभिनयात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. चित्रपटाच्या संधीसोबतच अनेक संधी त्याला मिळत आहेत. शाळेतल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत अभिनयाची प्रमुख भूमिका तो साकारत आहे. भविष्यात मराठी व हिंदी चित्रपट, जाहिरात यामध्ये काम करण्यासाठी त्याला प्रोत्साहन देणार आहोत.

अनुभवासोबतच मौजमस्तीही...

अभिनय आणि मराठी सिनेसृष्टीच्या अनुभवाबाबत बोलताना वेद सांगतो, की अभिनयाचे नवे पैलू मला रोज शिकायला मिळत आहेत. माझ्या आवडीच्या क्षेत्रात मी काम करीत असल्याचा मला विशेष आनंद आहे. चित्रीकरणाच्या सेटवर अभिनय कौशल्याच्या शिकवणीसोबतच मौजमस्तीही मला करायला मिळते. सध्या जाहिरातींसाठी मी ऑडिशन देत आहे. शालेय शिक्षणासोबतच अभिनयाच्या करिअरची उंची मला गाठायची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images